Wednesday, December 28, 2011

PASSAYADAAN...FREE ADAPTATION...


GLOBAL PRAYER…

O Supreme, Unseen, infinite, unknown..
Grace thou verbal, vocal, vibrant throne..

Bestow me with heavenly, transcendental cool
Not more, only a blessing blissful..

Let hatred fade n’ affection flower
N’ goodwill clouds hover and shower..

Content lamp glow and light
Life n’ like take a flight..

Abundance overflow and death drown
Cosmic aura crust the crown..

Fulfill the dreams with greedless need
Beyond faith, creed, cast n’ apartheid..

Sanctity mingle with gentle folk
No fear around ever choke..

Clear the air of all disgrace
Let it reflect on every face..

Flora n’ fauna n’ fragrance upbeat
Spark-in vigor, wit n’ grit..

Chirping birds, savage beast
Live n’ let live with lust the least..

Speck less moon and soothing sun
Delight human in the eternal run..

Joy to the brim, bubble the chime
All be grateful to root n’ prime..

Yen for perception yearn a word’s worth
‘Caused a just n’ vocal dream-birth..

O state of minute, vacuum n’ space
Part n’ full of every face..

May little dreams morph real n’ fill
Of joy n’ cheer DNYAANAA lays a keel…

Traslated by Arun Kakatkar.

Monday, December 26, 2011

’दोन लावण्या...’


’दोन लावण्या’
चवल्या-पावल्यांचा केलाय मी वांधा
रुपया रूपाचा कलदार बंदा...
भाळ आभाळावर उगवतीचा शिलेदार..थंडावा रातिचा कां जळ नजरेवर ?.. डाळिंबि व्हटाची पहाट जणू हाकारं..
रंग-कांतिची पुनव उतरली, जनु चाफा बहरलाय औंदा....
नथं नाकांत थरथरे, तिरिप जशी माध्यान्ह..कानि कुडिबुगडी, सांज गुपितांचं कोंदन..मान कमळदेठ धाडि पांचव्याचं आवतान...
केस मोकळे द्वाड, पसरले..झाकत्यांत अटकर बांधा...
धडधडत्या वक्षी, दिठी काढुद्या नख्‌शी..मनगतांव माझ्या बसवा राघवपक्षी..अवघ्या मुशींत रिचवा बेगिन तुम्ही रसरशी...
लुटा कवळ्या तरनाईचा चंदा...
( ही राम कदमांनी संगीतबद्ध करून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांत, माधुरी सुतवणेनं गायली होती.)
*****
हाड फोडते थंडी तरिही, थोडक्यांत असते गोडी..
राया जरा सैल करा मिठि थॊडी..
कनगींत भरुनिया दाणं तुमी निवांत..गोविंदविडा घ्या,देते लावुनि ! पंत..मन चुळबुळते तरि ठेवा त्याला शांतं...
वाकळ घेवू आंतुन, वरती पांघरुया घोंगडी...
आडसालि उसाची होइल साखर आंता..चतईच्यां वाकितं, हिरकणं बसवुनि देता ?..नजरेचं माज्या कसबं तुमी जाणता..
धुंद सुखाच्या, भरून आनल्या तुम्हासाठी कावडी...
गारटःआ असोनी, दमटपना कां वाटे ?..चोरटे स्पर्श शहार्‍याचे फुलविति कांटे..ठिणगीचा झाला वणवा, डोंगर पेटे...शमवायाला डोंब तुम्हि बरसा वळिवझडी...
*****
अरुण काकतकर.

Thursday, December 15, 2011

एक फडकती लावणी...


न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात
हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत
नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ
निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ
झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा,
ही नार करी बेजार, थांबवा दंगा
कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे
चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे
विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत
विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात...

Monday, December 5, 2011


’थप्पड’...
’थप्पड’ म्हणजे, लहान मूल फारच हट्ट करू लागले तर, ’कल्याणकारी’ क्रोधापोटी, आई किंवा वडिलांनी हलकेच गालावर मारलेली चापटी. शारीरिक इजेपेक्षा मानहानीकारक, मानसिक क्लेश देणारी.. ! ही जेंव्हा उलट्या तळव्याने, जरा जोरांत मारली जाते तेंव्हा ती गालावर आपली गुलाबी (किंवा ’वांगीरंगाची’) नाम(मात्र)मुद्रा उठविते.
असो... ! विनोदाचा भाग सोडू...
पण
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, वीरभू, रांगडी माती पवित्र झाली
गड-दगडांच्या त्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
उत्तुंग हिमांकित शुभ्र बुरुज राखाया, कणखर देशाची नित्य स्फुरतसे काया
मायभू चरणिच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी जवान सरसावला
गनिमाच्या या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले...
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, गालांत हसत जिंकतो क्रुद्ध शत्रूला
असं सार्थ वर्णन लागू पडणार्‍या एका ऋजु व्यक्तीला कोण्या एका माथेफिरूच्या ’थप्पड’हल्ल्याला बळी पडावं लागलं या इतक दुर्दैव नाही. पण हा ’चप्पल-बूट्‌-हस्त’ ताडनाचा सिलसिला बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेंत सुरू झाला, अध्यक्षांवरील हल्ल्यांपासून. त्यामधे गोळीबारांत बळी पडलेले जागतिक कीर्तीचे राष्ट्रप्रमुख जॉन्‌ केनेडी, मार्टीन ल्यूथर्‌ किंग, इंदिराजी ! श्रीलंकेत, हल्ल्यांतून बचावले राजीवरत्न गांधी, पण मानवी बॉम्ब्‌नं पेरांबदूरमधे त्यांचा प्राण घेतला. त्यानंतर चिदंबरम्‌, आणि आता शरदराव...
आदरणीय शिवसेनाप्रमुख, महाराष्ट्राचा ’ढाण्यावाघ’, मराठी माणसांच्या स्वाभिमानाचे आधारवड बाळासाहेबांचे, शरदराव, राजकारणा पलीकडचे स्नेही. बाळासाहेबांची बहुतेक विशेषण त्यांनाही लागू होतांत. म्हणूनच त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनाप्रमुखांनी निषेध केला.  
प्रेषितांचे पाय मातीचे...ठीक आहे ’म्हण’ म्हणून. पण आधी मातीचे नुसतेच पाय. त्यांतून फोफावलेली विषवल्ली स्वत:ला प्रेषित म्हणवून घेते आजकाल..अशाच एका नेत्या(?)वरही, राष्टकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यांत अडलल्या मुळे, तिहारमधे नेतांना हल्ला झाला पण त्याचा साधा निषेधही कोणी केला नाही हो !).आणि मग त्याच माळेंत, महात्मा गांधींच्या समाधी समोर बसून केलेल्या चिंतन’ फिंतनाला विसरून, आपल्या वयायोगे प्राप्त झालेल्या अपेक्षित परिपक्वतेला विसरून, ’एकच ?’ असा अत्यंत चीड आणणारी ’आचरत कोटी करणार्‍या, ’सिद्धी’पुरुषअला आम्ही का लेखू नये ?
पण आपल्याकडे, हल्लेखोराच्या बिचार्‍या निरपराध कुटुंबियांना, नातेवाइकांवर, नंतर ज्या पद्धतीनं मानसिक, शारीरिक हल्ले होतांत तेही तितकचं गर्हणीय आणि निषेधार्ह. म्हणजे एकानं गाईची ’हिंसा’ केली म्हणून दुसर्‍यानं ’वासरा’ची करावी तसंच कांहीसं ! एकानं कांही विशिष्ट हेतून हिंसा केली म्हणून त्याची सर्व ज्ञाती वाईट ? मग त्याची घरदारं जाळणं, त्यांना रस्त्यावर आणणं ही कुणी शिकविलेली आणि आचरणांत आणलेली 'अहिंसा,...मग 'गांधी' टोपीखाली काळे धंदे करणारे वाईट, म्हणून गांधीटोपी घालणारा मुंबईचा डबेवाला वाईट ? अशी त्रैराशिक मांडणार्‍यांचे सडके मेंदू तर मग हिट्‌लर्‌पेक्षाही हिंस्र मानायला हवेत !
दीडशे वर्ष, ब्रिटिशांच्या सत्तेशी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणार्‍या कच्च्याबच्यांची, ज्यांत आमच्या नाशिकचा बाबू गेनू होता, पुण्याचे चाफेकर बंधू होते, नाशिकचे कान्हेरे, राजगुरूनगरचे राजगुरू, पंजाबातले भगतसिंह, मदनलाल धिग्रा होते. विसरलांत इतक्यांत ? आणि ’रानी झांसीवाल’ ? ’कित्तुर चेन्नम्मा’ ? अहो अजून उणीपुरी सत्तर वर्षही नाही झाली हो त्या हुतात्म्यांना अनंतांत विलीन होवून ! स्वत:ला फाशी झाल्यानं आपण एका निष्पाप स्त्रीला वैधव्याच्या खाईंत लोटून,  किंवा संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याला सुरुंग लावतो आहे असले विचार त्या क्रांतिकारकांच्या भडकलेल्या मनाला कधीच स्पर्श करू शकले नाहीत.... त्यांच्या डोक्यांय फक्त अखंड भारत, असेतुहिमाचल, पश्चिमेला अफगाणिस्तान सीमेपासून ते पूर्वेला चीनच्या सीमेपर्यंत हिंदुस्थान हे एकच स्वप्न होतं. ’स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..’ असं न्यायालयाला ठणकावून ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ असा सवाल करणार्‍या पुरुषसिंव्हाचा सक्रीय पाठिबा आणि वरदहस्त या ’क्रांतिकारकांच्या’ माथ्यावर होता.
'सारख' वारकरी' वारकरी' म्हणून आरडाओरडा करणार्‍या आय्‌बीएन्‌लोकमतवाल्यानं हे लक्षांत ठेवायला हवं की, वारीला जातांना, पांडुरंगाच्या नावाच्या गजरापेक्षा वारकरी, त्याच्या महान भक्तांचा, ज्ञान्नोब्बामाऊली-तुकाराम असा घोष करीत चाललेले असतांत. तुकोब्बाराय तर ' भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी' ... अशा, योग्य तिथे आक्रमक व्हा असा संदेश देणारे, शिवछत्रपतींचे गुरू समर्थ रामदासांच्या समविचारी होते. महात्मा गांधींना नथुराम गोडश्यांनी, आधी हात जोडून, आपल्या अमानुषत्वाची लाज वाटून, माणुसकीला नमस्कार करून घातलेली गोळी ही पिस्तुलातून सुटल्यानंतर, पस्तीस कोटी जाज्वल्य देशप्रेमी भारतीयांची हृदयं विदीर्ण करीत त्याच्या ठिकर्‍या उडवीत, चिंध्या करीत, सरदार वल्ल्भभाई पटेलांसारखे ’सच्चे’, स्वकीयांच्या हिताला आणि आत्माभिमानाला सर्वोच्च प्राथमिकता देणारे,  फाळणीविरोधी, धुरंधर राजकारणी नेते,  त्यांच्या 'अखंड भारत'प्राप्तीच्या, आसुसल्या भावनांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडवीत, बावन्नकोटी रुपयांच्या नोटांच्या चिधड्या उडवीत पुढच्या प्रवासाला निघाली होती. हे कुणी ध्यानांत घेतल तेंव्हा ? अहो निरुपद्रवी घाबरट मांजरीला जरी कोनाड्यांत गाठायचा प्रयत्न केला तर ती, 'आपण वाघाची मावशी आहोत' या विचारानं, शत्रूच्या नरड्याचा वेध घेते. मग ही तर माणसं...गांजलेली पिचलेली माणसं होती. फाळणी नंतरच्या सिंध, पंजाबमध्ल्या विस्थापित जनतेच्या, सर्व संसारासकत गांवं सोडून जातांनाची ससे-होलपत ज्यांनी पाहिली आहे त्यांच्याही अंगावर शहारे येतांत नुसत्या आठवणीनं. मग तो’ काळा अनुभव’ प्रत्यक्ष घेतलेल्यांच्या हृदयांतली भडस कशी कोण जाणू शहणार ? 'क्रांतिकारकांच्या आईबापांना काय हौस होती आपली मुलं होरपळींत ढकलायची ?  मग लचके तोडू पाहाणार्‍या पाकिस्तान चीनच्या सैनिकांना संरक्षण देवून, त्यांना गीतेचे पाठ ऐकवून, अहिंसेची ही ज्योत (?) अशीच तेवत ठेवा की ? आणि माझ्या सैनिक टाकळीच्या, प्रत्येक कुटुंबातल्या, सैन्यांत पाठविलेल्या एकेका तरुण मुलाला, 'चिन्यांना कंठस्नान का घातल ? पाकिस्तान्याला गोळी का घातली ?' म्हणून न्यायालयांत खटले चालवून फाशी ठोठवा...!  कसं ?
सध्या देशाची लोकसंख्या आहे फक्त पस्तीस कोटी  नेते आणि कार्यकर्ते मिळून. बाकी सगळे, किडामुंगी सारख एक नगण्य आयुष्य, निसर्गानं जन्माला घातलं म्हणून आंणि आत्महत्येचं धाडस नाही म्हणून बापडे जगत आहेत...रोज विविध दिशांतून ’थपडा’खात, त्या दूषित पाण्याच्या घोटाबरोबर गिळत...’थपडा’ कधी नेत्यांकडून तर कधी कार्यकर्त्यांकडून. कधी ’दगड’ देवाच्या ढॊंगी’ भक्त बाबा-बुवे-(संधी)साधू, जरीमरी काळी जादूवाल्यांकडून तर क्धी, रक्तानं स्वाक्षर्‍या करायला लावणार्‍या, तथाकथित ’अंधश्रद्धा निर्मूलन(?) वाल्यांकडून, तर कधी, ’पाळीव प्राणी भूतदये’ (तो पिसाळला तरी ?... गंमतच आहे !) च्या ’भुतानं पछाडलेल्यांकडून, कधी जमीन माफिया तर कधी तेल माफिया, वाळू माफिया तर कधी होळी ते ख्रिसमस, वर्षभर विविध (अ)धर्म महोत्सवाच्या नावाखाली ’चंदा; गोळा करीत हिडणारे, आणि त्यांतून ’आर्थिक उन्नती’ साधत मिळालेल घबाड ’वाटून खाणार्‍या उद्याचे तरुण-तडफदार युवकांकडून...’थपडा..थपडा..आणि थपडा’ फक्त..
अहिंसा-तत्वाचे अध्वर्यू महात्मा गांधींच नाव धेत अनावरण, उद्घाटनाच्या निमित्तानं, स्वत:ची (निर्‌)लज्जा तलवारी उपसत क्षणोक्षणी अनावर होवून अनावृत्त करणारे गल्लीकर ते दिल्लीकर रोज झळकताय्‌त वृत्तपत्रांत, विविध वाहिन्यांवर आणि माध्यमं कमावताय TRP वाढवून त्यांतून रग्गड पैसा...मला इथं बादल सरकारच्या ’जुलूस’ या नाटकाची तीव्रतेनं आठवण होते...संसदेत मिली भगत जरून, ’हंगामा’ करीत, कोट्य्वधी रुपये रोज पाण्यांत घालत दोनीहीकडच्या बाकांवरचे, मतपेटींतून (?) की ’खोक्यांतून ? निवडून(?) आलेले, आणि एक ’टर्म्‌’ पूर्ण व्हायच्या आतच, ’कौन बनेगा करोडपती’ पेक्षाही अधिक वेगानं, गब्बरसिंव्ह कोट्याधीश होणारे ५८४...’सब अलबेल है ! चलो ! हटो !, सब अलबेल है’ अशा बरळत आरोळ्या ठोकत हातांतली लाठी किंवा ak47 चालवत हिडताय‍त, ’सारे जहाँसे अच्छा’ असलेल्या या ’हिंदोस्तां’त ! कुठं जायच पंच्याऐंशीकोटी किडामुंग्यांनी ?
मग उजाडते एक दिवस ’फ्रेंच्‌ क्रांती’, हिट्‌लर्‌, गोअरिंग, हेस्‌, स(उ)द्दाम हुसैन, गडाफीच्या जातकुळींतल्यांना बिळांतून, गटाराच्या पाईपमधून बाहेर खेचून, कद्रावलेली, पिसाळलेली जनता, उंदरा-कुत्र्याच्या मौतेनं मारते...नाईलाजानं...मनांत बेगडी ’अहिंसा जपत...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Sunday, November 27, 2011


’संजीवन समाधी’
२३ नोव्हेंबर, कार्तिक वद्य त्रयोदशीला, सातशे पंधरावा समाधी सोहळा संपन्न झाला. श्रीमद्भग्वद्गीतेच्या अठरा अध्यायांतल्या संस्कृत सातशे श्लोकांचं सार, सर्वसामान्यजनांसाठी, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांतादि लेण्यांनी समृद्ध, प्राकृतातल्या नऊ हजार, सालंकृत ओव्यांमधे सांगीतल्यावर, शेवटी ज्ञानोब्बामाउलीनं, प्रसादाचं मागणं केल...कुणाकडे ? पंढरपुरच्या, इंद्रायणी काठी, पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर, कटीवरी हात ठेवून उभा ठाकलेल्या, सगुण साकाररूप विठ्ठलाकडे ? नाही... तर विश्वात्मकाकडे...
आणि हे मागणं फक्त नेवाशांतल्या लोकांसाठी होतं ? की फक्त आळंदीतल्या, की महाराष्ट्रांतल्या किंवा भारतांतल्या लोकांसाठी होत ? नाही. ज्ञानदेवांनी मागणं केल ते या केवळ पृथ्वीवरच्याचं नव्हे तर विश्वांतल्या प्रत्येक ’भूतमात्रा’साठी... भू म्हणजे उत्पन्न होणे..जन्म घेणे...
’हे विश्वरूप, निसर्गरूप, पंचमहाभूतरूप, अनंत, अरूप, अनाकलनीया...प्रसाद दे...सर्व भूत-प्राणिमात्रांसाठी...’
कारण, , निसर्गांतल्या कांही विषिष्ट गुणधर्म असलेल्या घटकांपासूनच जीव निर्मिती होते...आणि असे घटक, ह्या पृथ्वीनामक ग्रहावर उपलब्ध असल्यामुळेंच केवळ, इथं जीवसृष्टी आहे या वैज्ञानिक सत्याच पूर्ण आकलन ज्ञानदेवांना होतं. श्रद्धावान अशिक्षित समाजाला विश्वास वाटावा आणि त्यांना आपलं म्हणंणं पटवून देता याव यासाठीच फक्त त्यांनी ’विठ्ठल’ नामधारी, त्यांचा ’देव’सुद्धा स्विकारला, आळवला. मोठी माणसं जशी आपल्या लहानग्यांच्या भातुकलींतला काल्पनिक स्वयंपाक, त्याचं कौतुक करीत अगदी ’चवीचवी’नं खातांत...त्याला आनंद व्हावा, बरं वाटावं आणि मग पुढे त्यानं आपल ऐकावं यासाठी ? तसच कांहींसं...
काय मागितलं आहे पसायदानांत ?
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥
जनसामान्यांना भगवान युगंधरविरचित गीतेंतल्या तत्वज्ञानाची ओळख करून देण्याच्या विशिष्ट हेतूने सुरू केलेल्या किंवा तू  मजकडून करवून घेत असलेल्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेंत मी जे योगदान, एखाद्या यज्ञांत आहुती दिल्याप्रमाणं दिलं आहे, ते गोड मानून घे, आणि मला प्रसाद दे
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे
दुष्टांची कुकर्मांची ओढ कमी होवून, सत्कर्मांची गोडी वाढू दे...विंचवाच्या नांगीतलं विष नाहीस होवू दे... विंचवाच्या ’नांगी’पेक्षा माणसाच्या ’मनांगी’चा विखार  कित्येक पटीन धोकादायक असतो...निर्दालन वाईटपणाच होवू दे...जिण्यातला चांगुलपणा वृद्धिंगत होवू दे...
दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
पापाचा अंधार नाहीसा होवून, स्वधर्माचा सूर्यप्रकाश ओसंडू दे...इथं ज्ञानदेवांना ’धर्म म्हनजे ’संप्रदाय’ अभिप्रेत नाहीच मुळी...धर्म म्हणजे जसं...आईनं मुलांवर प्रम कराव, वडिलांनी त्यांचं पालन-पोषण कराव, शिक्षकांनी शिकवावं, शेतकर्‍यानं पिकवावं... माणूस म्हणून जन्मल्यावर ’माणुसकी’ हाच धर्म...तसा हा प्रत्येकाचा ’स्वधर्म’ जर प्रत्येकानं पाळला तर फक्त पुण्यच साचत जाईल. पापाला जागाच उरणार नाही...
मला जे मिळालं नाही त्याची मला खंत नाही, पण तुला जे मिळाल त्याचा मला आनंद आहे अशी भावना जेंव्हा परस्परांमधे निर्माण होईल तेंव्हा जीवांचं खरंखुरं ’मैत्र’...मित्रत्व, स्नेहभाव, एकात्मभाव, तादात्म्य निर्माण होईल...
वानगीदाखल उदाहरण...सचिनन शतक केलं किंवा अगदी सुंदर फटका जरी मारला तरी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर जगांतल्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयांत आनंदाचा उचंबळ येतो...ते ’मैत्र’ अभिप्रेत असावं माउलींना......
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भू मंडळी । भेट तू भूता ॥
सर्वांच्या कल्याणाची अखंड कामना, इच्छा, अपेक्षा मनांत ठेवून जे’ईश्वर’ आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवणार्‍यां जनसमुदायाचा सागर विश्वभर उसळो...
प्रत्यक्षांत, विचार करून पाहा...आपण जे नाहीस होणार आहे, लय पावणार आहे, अस्तास जाणार आहे, म्हणजेच जे ’नश्वर आहे त्याच्या मागे धावत असतो...म्हणजेच आपण, ’नश्वर’निष्ठ असतो ’इश्वर’निष्ठ नसतो
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचितामणींचे गांव । बोलते जे अर्णव । पियुषाचे ॥
मनांत नुसती कल्पना केली तरी प्रत्यक्ष देईल अशी ख्याती असलेला ’कल्पवृक्ष’, एक नाही, तर त्यांचे ’चला’ म्हणजे चालणारे स्थलांतरपात्र समूह, बगीचे, आणि चिंता,काळजी,भयमुक्ती देणारी हितचितक ’रत्न’, ज्यांचा शब्द म्हणजे, रंजल्या-गांजल्या जीवांचं शांतवन करणारं अमृतच जणू
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । जे सर्वाहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥
ज्यांच अस्तित्व चांदण्यासारखं शीतल, निर्व्याज, निरपेक्ष आणि निष्कलंक आहे, जे शक्ति-आरोग्यवर्धक असून क्लेशदायी नाहीत, जे नेहमीच ऋजु, सौम्य, आल्हाददायक आहेत अश्या सुहृदांचा, आप्तांचा सहवास लाभू दे...
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होवावेजी ॥
अक्षर-साहित्यांत कार्यरत असलेल्या, ग्रंथ लेखन वाचन कथन यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपजीविका करणार्‍या अभ्यासकांचं कल्याण होवो...
किबहुना सर्व सुखी । पूर्ण होवोनि तिन्ही लोकी । भजीजो आदिपुरुखी । अखंडित ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दान पसावो । येणेवरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
अविरतपणे त्या ’आदि-अनंत-रूपा’चं स्मरण करीत, कर्म करणार्‍यांना हा प्रसाद मिळाला तर मी समाधान पावेन...
तसं पाहिलं तर, पसायदानातल्या कुठल्याही ओवींतला एक चरण जरी प्रत्यक्षांत आला तरी सर्व-सहज-साध्य होईल. पण ज्ञानदेवांनी, द्विरुक्तीच नाही तर विविधांगी पुनरुक्ती करीत हे ’लोककल्याणार्थ’ दान मागितल आहे...
अखेरीस, ज्या प्राचार्य राम शेवाळकरांनी ’पसायदानां’तलं हे सर्व ’गूज’ (’गूढ’ ?) उलगडलं, त्यांचं स्मरण अपरिहार्य आहे...
*****

Tuesday, November 22, 2011


’अक्षरे’
कविवर्य मंगेश पांडगांवकरांच्या संगीतिकेतल्या ,’शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ आणि’ माझे जीवन गाणे’ अशी दोन गीतं, तत्कालीन आकाशवाणीसाठी पु. ल. देशपांड्यांनी संगीतबद्ध केली आणि आपल्या खास शैलींत, मधली आलापी, गमकाच्या अंगानं करीत, गावून पंडित जितेन्द्र अभिषेकींनी ती अजरामर करून ठेवली. दोघांच स्मरण, ८ नोव्हेंबरला सगळ्या  साहित्य-संस्कृती-संगीत रसिकांनी केलं.  अनुक्रमे, जन्मदिन आणि पुण्यतिथी निमित्त. ’वैशाख वणवा’ चित्रपटांमधलं, रमेश देव आणि जयश्री गडकर यांच्यावर, पार्श्वगीत म्हणून चित्रित झालेलं, ’गोमु माहेरला जाते रे नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा’ हे सुद्धा ’बुवां’च्याच आवाजांतल, स्पष्ट श्ब्दोच्च्चारानं अर्थ अधोरेखित करीत म्हटलेलं, रुपेरी पडद्यावरचं त्यांचं, बहुतेक पहिलंच गीत. त्याच ’आकाशवाणी’ दिवसांतलं... ’आकाशवाणी’ साठी अभिषेकींनी, कविवर्य सुरेश भटांचं ’मेंदीच्या पानावर...’ हे गीत स्वरांकित करून उषा पंडित...देवकीची आई...कडून गाऊनही घेतलं होतं, हे अनेकांना माहीत नसेल. नंतर ’प्रथितयश’ झालेल्या अनेक कलाकारांची ’पहिली रोजी-रोटी’ देणार्‍या ’आकाशवाणी’तल्या दिवसांतचं !
नाट्यसंगीताला नवा रंग देत, बहराला आणणारे अभिषेकी वरकरणी अतीशय गंभीर पण मुळांत सर्वार्थानं खूप रसिक आणि मिश्किल व्यक्तिमत्व होतं. संस्कृत साहित्याचा चांगल्यापैकी अभ्यास. विशेषत: शब्दोच्चार, अगदी शास्त्रीय बंदिशी (रचना) मधले सुद्धा, स्पष्ट आणि अर्थवाही करण्यांचा त्यांचा कटाक्ष असे. कथालेखनाचा सुद्धा त्यांचा व्यासंग होता. राहाणी-वागणुकीतला साधेपणा इतका की संगीतसभा, महोत्सव यांसाठी प्रवासाला जातांना, बुवा नेहमी  साथीदारा आणि शिष्यांसह, रेल्वेंत एकाच श्रेणीच्या बोगींतून जात असत. सादरीकरणांतला प्रामाणिकपणा, शिस्त, गांभिर्य यांचा पगडा शिष्यमंडळींवर, साथीदारांवरपण आपोआपच  जाणवायचा. गाणं सुरू व्हायच्या आधी कमींतकमी अर्धातास ते बैठक घालून साथीदारांसह तयार असायचे. तानपुरे सुरांत लावून तयार असायचे. (पडदा उघडल्यावर, अर्धा-पाऊणतास तानपुर्‍यांशी झगडणारे, अगदी राष्ट्रीय कीर्तीचे प्रथितयश गायक आणि त्यांच्या ...फक्त...त्याच सवयी घेतलेले त्यांचे शिष्योत्तम मी इतके पाहोलेत, की नमनाला सुरुवात व्हायच्या आंतच श्रोत्यांच्या डोळ्यांतून घडाभर पाणी सांडलेलं असायचं, म्हणून हा खास उल्लेख). मफिली दरम्यान शिष्य़ांना मधे गायला भरपूर संधी देवून त्यांच्याकडून गायल्या गेलेल्या आलाप, बोलतांना, तानांना यथोचित दाद देण्यांत त्यांनी कधीच कंजूषपणा दाखविला नाही.
बुवांच्या नाट्यसंगीत संयोजनांतले महत्वाचे टप्पे म्हणजे, भावसंगीताला त्यांनी अत्यंत सहजतेनं नाट्यसंगीतांत सामावून घेतलं. त्यामुळं नाट्यसंगीताला एक नवा आयाम तर मिळालाच शिवाय नाटकांत ’आळवल्या’ जाणार्‍या अनिर्बंध ’गायकी’ला एकप्रकारची शिस्त मिळाली  ’मत्स्यंगंधा’ मधली, ’गर्द सभोती रान साजणी, मी तर चाफेकळी’, किंवा ’तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना’ ही दोनच गाणी जरी आठवलीं तरी पटेल. शिवाय ’विकल मन आज झुरत असहाय’, ’कांटा रुते कुणाला’ अशी कितीतरी भावगीत आणली बुवांनी नाटकांत. ’लेकुरे उदंड झाली’ किंवा ’बिकट वाट वहिवाट’ मधली, पूर्वध्वनिमुद्रित वाद्यमेळा (Pre-recorded score) बरोबर, श्रीकांत मोघ्यांसारख्या समर्थ कलाकारानं सादर केलेली गाणी हा आणखी एक’ बुवांच्या प्रायोगिक संगीत -नियोजन-प्रक्रियेंतला महत्वाचा यशस्वी टप्पा. ’कट्यार काळजांत घुसली’ या नाटकांतल्या सर्व पदांचा, बुवानी गायलेला Track जर कुठे ऐकायला मिळाला तर अवश्य ऐका. मी ज्या काळांत हे नाटक बघितलं...शंकर घाणेकर ’राग-मालिका’ सादर करायचे त्या काळांत...त्यां काळांत, पडदा उघडण्या पूर्वी प्रेक्षक प्रेक्षागृहांत येत असतांना, हे ध्वनिमुद्रण लावलेलं मी अनेकदा ऐकलं आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ’ययाती आणि देवयानी’ मधलं, ’सर्वात्मका, सर्वेश्वरा’चं संगीत-नियोजन आणि गायन हे तर बुवांच्या, पक्क्या अध्यात्मिक बैठकीचं प्रत्यंतरच प्रत्येक वेळी देत असे, आणि त्याच रंगावृत्तीतलं,’ हे सुरांनो चंद्र व्हा’ हे त्यांच्या संगीत नियोजनाच्या शास्त्रीय बठकीच्या सखोलतेचं ! त्यांच्या, ’अबीर गुलाल, उधळीत रंग...’ सारख्या अनेक संतरचना,बरोबरच आधुनिक संत, कविवर्य ’बाकीबाब’ बोरकरांची, ’नाहि पुण्याची मोजणी, नाहि पापाची टोचणी’ किंवा अशोकजी परांजप्यांची ’कैवल्याच्या चादण्याला भूलला चकोर’  या रचनांमधली उत्कटता...कशी कोणी विसरणं श्यक्य आहे. तशीच बकीबाबांच्यांच ’कशि तुज समजावू सांग, का भामिनि धरिशी राग’ ह्या रचनेंतलं आर्जव, विनवणी...क्या बात है सर !!
’नको जन्म मरण आतां, नको येरझार
नको ऐहिकाचा आतां व्यर्थ बडिवार’
म्हणत, ९८ मधे, बुवा  फारच लवकर, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अद्वितीय स्वरावलींपासून पोरक करून गेले, बाकीबाबांच्या पंक्तीत थॊडा बदल करून
’विरले सगळे सूर, तरीही उत्तर रात्र सुरेल
स्वरावलींची तरिही हृदयी, तशीच ओलं उरेलं’
असं म्हणावसं वाटतं...
आमराइतुन गातो कोकिळ, दडतो पानांआड
आभाळाशी स्पर्धा करिती, हिरवे खेटुनि माड...
राउळांतुनी घुमत नगारे, पवित्र घंटानाद
टाळमृदुंगासवे आर्तशी सुरेल अभंग साद...
लाल मातिची विरते सीमा पुळणिंत ! सागर साक्षी
लाट किनारी खेळ खेळता रेखुन जाई नक्षी...
मंगेशा अभिषेक कारणे अवतरली स्वरगंगा
गाज गभिरशी जिंकुन घेई रसिकाहृदयी जागा...
टिपुन आणिले अमृतकण, शोधून मंदिरे नाना
भावस्वर गहिर्‍या रंगांचे विणून केल्या रचना...
वरकरणी जरि असे मुनीश्वर अंतरि इंद्रधनू
रती-विरक्ती-शक्त्यासक्ती मयसभाच ही जणू...
अनुयायांवर केली माया, अशी गुरूची कृपा
परिक्रमा घडविली स्वरांची, दावित अनंत रूपा...
ज्ञानाच्या आसक्तीपोटी कसे लोटले जिणे
माधुकरीचे घास रिचवुनी, कंठि रुजविले गाणे...
कृतज्ञता जपली हृदयी जरि पैलतिरीची हांक
दमड्यांचा ना विचार केला, भागविली स्वरभूक...
राजाश्रय ना कधी मिळाला, खंत कधी ना केली
जणू हलाहल पचवुनि सहजच अमृतवाणी सजली...
विविध सजविले कवी स्वरांनी, वेधुनि भावार्थाला
बाकिशब्दसम गंधाराच्या स्वयंभु प्रकटार्थाला...
सय स्नेहाची नकळत करिते आर्द्र पापणी कांठ
कृपा एक की पुत्राकरवी नितनूतन स्वर भेट...
*****
अरुण काकतकर
24ak47@gmail.com
 

Wednesday, October 19, 2011

दृष्टिहीन दिवस किंवा श्वेतछडी...व्हाइट्‌केन्‌...दिवस...
१९३० मधे युरोपांत एका छायाचित्रकाराला अपघातानं दृष्टिहीनता आली. गर्दीत किंवा रस्त्यावर चालतांना त्याला अडचणीचं व्हायला लागल्यावर त्यानं एक काठी जवळ बाळगली. पण रस्त्याच्या काळ्या रंगांत काठी स्पष्ट दिसेना तेंव्हा त्यानं त्या काठीला पांढरा रंग दिला. आणि
व्हाइट्‌ केन्‌ किंवा श्वेतछडीचा जन्मझाला.
पण पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९३१ नंतरच ह्या काठीचा खरा पसार, पचार झाला. १९६४ मधे दृष्टिहीनांसाठीच्या अमेरिकेतल्या राष्ट्रीय मंडळाच्या सुचनेवरून सेनेट्‌नं ६ ऑक्टोबर्‌ रोजी ठराव करून, तत्कालीन अध्यक्ष लिंडन्‌ बी, जॉन्सन्‌ यांना, या काठीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे अधिकार दिले आणि १५ ऒक्टोबर्‌ हा जागतिक व्हाइट्‌ केन्‌ दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश अध्यक्षांनी काढला
ही श्वेतछडी आधार-काठी म्हणून वापरांत न आणता गर्दीत किंवा रस्त्यांत रहदारीमध्ये दृष्टिहीनांना वावरण सुकर व्हावं म्हणून सुविधा-स्वरूप वापरण्यांत येवू लागली. त्या श्वेत वर्णावर जर दोन आडव्या लाल रेषा असल्या तर ती व्यक्ती कर्णबधीर-दृष्टिहीन आहे असं मानण्यांत येवू लागलं.
काठीच्या तळाशी असलेला ३..४ इंचाचा लाल रंग कदाचित, ती पांढर्‍या पार्श्वबूमीवरही स्पष्टपणे दिसावी ह्या हेतूनं पुढे दिला गेला असावा.
अवकाशाचा स्थायीभाव कोणता ? अंधार की उजेड ? अर्थातच अंधार ! कारण प्रकाशाला, उजेडाला स्रोत आवश्यक असतो. अंधार असतोच सर्वत्र,,,सर्वदूर...प्रकाशाला सीमा, मोजमाप असत...पण अंधाराला ना सीमा, ना मोजमाप
आपण या जगांत अस्तित्वात यायच्या आधी पण अंधार... आणि आपलं अस्तित्व संपल्यावर पण अंधारच.
आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय ? तर त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होवून आपल्या बुबुळांद्वारे आंत नेत्रपटलावर पडतो आणि नेत्रपटलातल्या संवेदन-वाहिका...नर्व्ह्ज्..तो संदेश मेंदूला देतांत...निमिषार्धात...आणि आपण ती वस्तू पाहातो
या जगांत अनेक प्राणिमात्र निसर्गानं, कांही तरी लौकिकार्थानं कमतरता असलेले जीव, जन्माला घातलेत आणि ते आपलं आयुष्य, सभोवतालांत, व्यवस्थित जगताहेत. उदाहरणार्थ, सर्पाला म्हणे श्रवणेंद्रिय नसते, मासा जळांत पोहोतांना तोंडावाटे पाणी घेउन कल्ल्यांतून बाहेर सोडतांना म्हणे त्यांतला प्राणवायू ग्रहण करतो. कासवी आपल्या पिलांना, आपल्या दृष्टीनं दूध पाजते असा दृष्टांत खुद्द संतश्रेष्ट ज्ञनेश्वरांनीच दिलाय. अगदी माणसांत सुद्धा, लौकिकार्थी हाती-पायी धड असूनसुद्धा, काळीज किंवा मन नसलेले नमुन्यांचा आपण क्षणोक्षणी अनुभव घेतोच की !
काहींना डोळे असतांत, घारे, भुरे, तपकिरी रंगाचे कधी भृंगाच्या काळ्याभोर अंगाचे. पण त्यांना नजर किंवा दृष्टी असेलच याची आपण खात्री देवू शकतो ? कान आहेत पण ते हलके नाहीत याची ग्वाही देवू शकतो ? नाक आहे पण ते फक्त सुगंधाचाचं वेध घ्रेईल असं छातीठोकपणे सांगू शकतो ?
बीदॊवेन्‌हा जागतिक कीर्तीच्या संगीतकार, त्याची सुप्रसिद्ध ९वी सिंफनी रचे पर्यंत, हळूहळू श्रवणक्षमता कमी होवून नंतर ठार बहिरा झाला होता पण त्या नंतरही त्यानं केलेल्या रचना तोडीस तोड आहेत.
हात नसतांना, पायांनी संवादिनी-वादन करणारे, उत्कृष्ट पदाक्षर असणारे, तोंडात ब्रश्‌धरून अप्रतिम रंगसंगती साधणारे कांही चित्रकारही आहेत. कांहीवेळा आपण डोळे उघडे ठेवून समोरचं पाहात नाहीच. मनांनंच दुसरं कांहीतरी पाहात असतो. तस हे आपले बांधव प्रज्ञाचक्षूंनी पाहात असतांत. त्यांत वकील आहेत. संगीतकार, गायक, वादक आहेत. नागपुरचे, प्रथितयश संगीतकार गायक, व्हायोलीने-वादक प्रभाकर धाकडे हे त्या पैकीच.
या आपल्या बांधवांसाठी मुबईतली स्नेहांकित हेlल्प्‌लाइन्‌ ही संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. म्हणजे परीक्षार्थींना लेखनिक निळवून देणे, कविता लिखाणाच्या, वाचनाच्या, गाण्यांच्या स्पर्धांपासून ते अगदी दृष्टीहीन, संसारी गृहिणींच्या पाककला स्पर्धांपर्यंतचे हे उपक्रम त्यांना जगण्यातल्या, आणखी एक आगळा आनंद मिळवून देतांत.
दोन दिवसांनी सुरू होणार्‍या दीपोत्सवांत, या आपल्या सारख्याच, पण निसर्गानं नेत्रांतल्या दृष्टिज्यातीपासून वंचित ठेवलेल्या, संवेदनाक्षम मित्र-मैत्रिणींना सहभागी करून घेवून, नेत्रदानाचा संकल्प करून, दृष्टिहीनतेच्या नरकासुराचा नायनाट कण्याचं पहिलं पाऊल उचलूया...
त्यांना सुद्धा दाखवूया...
रांगोळीचे रंग, रोषणाईचे अंग
नक्षीमधल्या रेषा, देखाव्याची भाषा
प्रकाश-झोतांचे विभ्रम, पणत्यांची चमचम
हसणारे चेहेरे आणि उजेडाची दारे
                उजेडाची दारे...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com