Monday, March 19, 2012

शत शतक भास्कर..

शत शतक भास्कर.. ’विजयपताका शत शतकांच्या झळ्कती अंबरी गुढि, मायमराठी उभारी...’ अप्राप्य...केवळ अप्राप्य..! जगांतल्या कुठल्याही देशांतल्या, कुठल्याही क्रिकेटपटूला अप्राप्य...निदान पुढची,,, किती वर्ष म्हणावं ?...माहीत नाही, पण अप्राप्य असा हा पराक्रम, माझ्या माय मराठीच्या, वाघिणीच्या, दुधाची साय खाल्लेल्या एका जिगरबाजानं, मनाची एकाग्रता ढळू न देतां, मधून मधून परकीयांच्याचं(पॉंटिंग्‌, ग्रेग्‌ चॅपेल्‌) नव्हे तर, स्वकीयांच्या (कपिलदेव निखंज, बिशनसिंह बेदी..) सुद्धा अशुभ, अभद्र टीकेची यत्किंचित पर्वा न करतां, निश्चयानं, निग्रहानं घडविला हा इतिहास ! याचि देही, याचि डोळा याचि श्रवणेंद्रियांद्वारा याचि युगी याचि जगी, भोगिल्या आनंदधारा याचसाठी सकळे, केला अट्टाहास, स्वप्नांचा आभास, झाला खरा शंभराव्या वेळी बॅट्‌ आणि हेल्मेट्‌ उंचावत आकाशाकडे पाहून, त्यानं आभार मानले, शंभराव्या वेळी जगातले अब्जावधी प्रेक्षक श्रोते, प्राण कंठाशी आणून स्तब्ध उभे राहिले शंभराव्या वेळी जगांतलं प्रत्येक बालक, घामेजल्या तळव्याची, वळलेली, हवेंत धरलेली मूठ वेगानं खाली आणत उद्गारलं, ’Yes..Yes..' शंभराव्या वेळी तो निर्मिक देखिल स्तंभित झाला, स्वत:च जन्माला घातलेल्या, या अतुलनीय, आश्चर्यकारक, अद्भुत प्राणिमात्राकडे पाहून आणि...शंभराव्या वेळी सगळं जग हर्षविभोर होत्सातं, नाचू-गाऊ लागलं...’सच्चिन..सच्चिन...’...’आला रे आला..सच्चिन आला...आला रे..’ कारण, ज्यावर आयुष्यभर प्रेम केलं, त्या क्रिकेटचाच फक्त ध्यास त्यानं लहानपणी घेतला, तो त्यानं आजवर सोडलेला नाही, ’स्वप्न बघा आणि प्रयत्न करीत राहा, सातत्यानं...ती कधीतरी सत्यांत उतरतांतच, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगतोय्‌..’ सचिन सांगत होता एका वाहिनीवरील एका मुलाखती दरम्यान. या सार्‍या यशासाठी तो वडिलांचे...प्रा. रमेश तेंडुलकरांचे विशेष आभार मानतो.... ’बोर्ग्‌चा शांतपणा, पीट्‌ सॅंप्रस्‌चा चिवटपणा मला आवडतोच...पण माझा अत्यंत आवडता टेनिस खेळाडू म्हणजे, मॅकॅन्रो...’ सांगत होता सचिन एका उत्तरादरम्यान. खरतर मॅक~न्रोमधला आक्रसताळेपणापासून सचिन अनेक योजनं दूर होता... आहे.. नेहमीच ! मी त्याला फक्त एकदांच सहकारी खेळाडूशी चढ्या आवाजांत बोलतांना आणि एकदाच चेंडू ग्राउंड्‌वर आपटतांना पाहिला आहे. किती संयम, किती शांतपणा नि परिपक्वता...मला नाही वाटतं कुठल्याही प्रशिक्षणानं ती साध्य होते इतक्या प्रमाणांत...तो तुमचा ’स्व भाव’ असावा लागतो जन्मत: ! ’प्रत्येक येणारा नवा बॉल्‌ हा नवी खेळी ऐनवेळी खेळायला लावनारा असतो. त्या वेळी तुम्ही आधी किती शतकं, अर्धशतकं केली आहेत त्यांची ’पुण्याई’ उपयोगाची नसते, तर तुमच्या कार्य करीत राहाण्याच्या अनुभवानं तुमच्यांत निर्माण झालेली परिपक्वताच तुमच्या मदतीला असते फक्त..’ किती मोलाचा संदेश आणि किती सहजपणे दिलेला...अगदी रोजच्या जगण्याच्या मैदानावरसुद्धा कायम ध्यानांत ठेवावा असा... हे असं बोलायला, संतबिंत असायला लागत नाही तर ’संभवामि युगेयुगे..’ असंच यांच अस्तित्व असतं आणि ते आपल्या अगदी नजिकच्या परिसरांत वावरतं असत हे, आपलं भाग्य असतं... ’मी देव नाहीये...I'm no GOD...’ हे म्हणतांना त्याचा निखळपणा, निरागसपणा, आणि प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून गेला... तू देव नसशील कदाचित, पण , कांही वर्षांपूर्वी, श्रीलंकेत झालेल्या विश्वकरंडकादरम्यान, तुझा एक झेल सोडल्यानंतर, वासीम अक्रम नावाच्या महान गोलंदाजानं, ’अबे तू किसका कॅच्‌ छोडा है मालूम है तुझे ?’ हे काढलेले उद्गार किंवा , शेन वॉर्न्‌ सारख्या, फलंदाजांच्या कर्दनकाळानं, शारजाच्या सामन्यानंतर, ’Sometimes I dream of Sachin...perspire heavily, get drenched and wakeup with my heart beating hard...' ही दिलेली प्रांजळ आणि दिलखुलास दादवजा कबुली, हे सगळं कशाचं लक्षण आहे ? शतपैलूंची हिरकणी । आनंद सर्वत्र, वनिभुवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी ? ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधार-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥ त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र । ’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥ ध्यास हा, ना आभास । स्वप्न नाहि, निखळ सत्यास । शत शतकांच्या पराक्रमास । कवळिले, सहजपणे ॥ म्हणून, त्र्वार वंदनासाठी आमचे हात जुळलेत आज.. यापरता कुठला ’गुढी पाडवा’ ’सण मोठा असूं शकतो ?..

Monday, March 5, 2012

’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’


’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले’
आशाताईंच्या भावविभोर स्वरांत भिजलेल्या या ओळी कुठून तरी, दूरवरून कानावर पडतांत आणि वरवर पाहाता ’आत्ममग्न’ वाटणारा, डोळे मिटून स्वत:शीच मंदस्मित करीत हलकेच मान डोलणारा कविवर्य सुरेश भटांचा चेहेरा आठवतो, त्यांची ’शब्दोत्सवा’पेक्षा ’भावोत्सव’ साजरा करणारी प्रत्येक मैफल आठवते...
’माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी’ म्हणणार्‍या एका तेजस्वी भाव-भास्कराला अस्तास जाऊन, पाहाता पाहाता नऊ वर्ष सरली ...! त्यांच्या प्रसिद्ध ’रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ या कवितेंतली...गझलमधली नव्हे...ही पंक्ती, त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वास, आत्मभानाची साक्ष देते. ’रंगुनी रंगात...’ ही रचना गझल नाही, हे स्वत: भटांनीच मला सांगितलं, जेंव्हा मी त्यांच्याकडे, ती ’गझल’ म्हणून एका कार्यक्रमांत वापरायची अनुमती घ्यायला गेलो होतो तेंव्हा. ’गझल चा प्रत्येक ’शेर’ वेगवेगळा आशय साकारतो, ते ’अंतरे’ किंवा ’कडवी’ नसतांत, त्यांना एक-सूत्रबद्धता नसते... केवळ रदीफ आणि काफियाचं तंत्र जमवलं म्हणजे ’गझल’ साकारली असं होत नाही’, भट सांगत होते. मग त्यांनी स्वत: मला त्यांच्या त्यावेळी नुकत्याचं प्रकाशित झालेल्या, ’सप्तरंग’ या नवीन काव्य संग्रहांतली ’वृतानं’ आणि ’वृत्तीन’सुद्धा परिपूर्ण अशी ’गझल’ निवडून दिली... शब्द आहेत..
’लागले डोळे तुझे माझ्याकडे,
अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे’
भटांच्या लेखणींतून उतरलेली,
’आज गोकुळांत रंग खेळतो हरी..
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’
ही होरी कुठे, किंवा
’दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले
थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले
वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली,
अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली,’
ही विरहिणी कुठे आणि
’उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून या उशीवरी टिपूर चांदणे पडे’
ही मिलनोत्सुक प्रेमपात्राची लाडिक मागणी, किंवा
’उष:काल होताहोता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’, किंवा,
’गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे,
मधल्या, मानसिक षंढत्वग्रस्त, निष्क्रीय समाजाची अवस्था बघून केलेल्या या उद्वेगजन्य मागण्या कुठे..
केवढी विविधता, आढळते सुरेशजींच्या रचनांमधे ! भट आपल्या कविता स्वत: स्वरांकित करून गात असत आणि त्या ऐकतांना त्यांतला रांगडा प्रामाणिकपणा, हृदयांतून उसळणारी चीड, संताप, तर कधी आल्‌वार भावोत्कटता यांचा विलक्षण प्रत्यय यायचा...त्यामुळं भटांची कविता ही वाचण्यापेक्षा ती ऐकण आणि विशेषत: ती त्यांच्याच कडून ’गाइली’गेलेली ऐकणं, हा एक अवर्णनीय अनुभव असायचा.
’साय मी खातो मराठीच्या दुधाची,
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला’’
या त्यांच्या रचनेंतला दुसरा चरण, सुरेशजी उच्च रवांत, ज्या पोटतिडकीनं म्हणत, ती पोटतिडीक, अनेक उत्तमोत्तम गीत स्वरांकित केलेल्या, त्या प्रथितयश संगीतकाराच्या जाणकार हृदयांत जागली-पोचली-जोपासली होती किंवा कसे मला ठावूक नाही. पण
’लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’
या ’माय-मराठी अभिमान गीताला’ स्वरांत गुंफतांना, भटांना अभिप्रेत असलेली ’पोटतिडीक’ कुठेतरी कमी प्डली असं आपलं माझं मत आहे. शब्दांमधल्या ’अध्याहृता’ पेक्षा सुरावटीच्या प्रेमांत अडकले बहुधा महोदय..असो..
म्हणून, द्विरुक्तीचा आक्षेप स्वीकारून परत परत म्हणतो की भटसाहेबांच्या रचना जर त्यांच्याच कडून ’ऐकायला’ मिळत नसतील तर त्या ’वाचाव्या’ किंवा, हृदयनाथांसारख्या, त्या आशयांत आकंठ बुडलेल्या संगीतकारानं स्वरबद्ध केलेल्या आणि श्यक्यतो त्यांनी स्वत: सादर करतांना ऐकायला हव्यांत...
*****

’विश्व म्हणींचं...’


||श्री॥
’अक्षरे’(दिनांक ०४-०३-१२)..’उत्सव’ पुरवणीसाठी मजकूर...  (संजयजी डहाळे कृपया)
’विश्व म्हणींचं...’
पिढ्यान्‌पिढ्या, शतकानुशतक, रोजच्या जगण्या-बोलण्यांतून मंडळी संवाद साधत, विविध भावना व्यक्त करतांना, कांहीतरी ’म्हणता म्हणता’ नकळत ’म्हणीं’ची भर, वाक्य-कोशांत टाकीत आहेत..भाषा समृद्धी आणि संवर्धनार्थ !
सहज म्हणून आठवायला गेल तर तुम्हालाही आढळेल की आपल्या रोजच्या वापरांतल्या कितीतरी म्हाणींत जगण्याचे संकेत, सत्यता, अगदी ठासून भरले आहेत.
या ’म्हणी’ कधीकधी यमकयुक्त पंक्ती उदाहरणार्थ ’ज्याच करायला जावं भलं, तो म्हणतो आपलंचं खर’, किंवा,  ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ किंवा ’बैल गेला नि झोपा केला’, तर कधी नुसत्याच ’गद्य’..उदाहरणार्थ ’स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..’, ’नाचता येईना अंगण वाकडे’, ’वरातीमागून घोड..’
संगणकावर, माहितीचं महाजाल चाळताचाळता एक छान Site दृष्टोत्पत्तीस आली. अभ्यासक दीपक शिन्दे यांनी या म्हणींच्या संदर्भांत खूप मौल्यवान माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय्‌ या Siteद्वारे.
माहिती देतांनाची पूर्वपीठिका सांगतांना ते लिहितांत, ’म्हणी वाचून जमाना झाला असं वाटत असेल ना ? मला तर तसं वाटतं.. चौथीला – त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात वाचलेल्या आणि रट्टा मारलेल्या काही म्हणी आजही आठवताहेत. गावी गेलो की त्यातल्याच काही विसरलेल्या म्हणींचा वापर ऐकायला मिळतो. बर्‍याचवेळा ते माझ्यासाठी ’टोमणे’ असतात. उदाहरण द्यायचं तर ’पालथ्या घड्यावर पाणी’ म्हणजे मला कितीही वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी मी ती ऐकेनच असं नाही! असो. महाजालावरुन जमा केलेल्या काही नव्या - काही जुन्या म्हणी खाली देतोय. एखादी विसरली तर तुम्ही ’प्रतिक्रियेत’ लिहा!’
शिंदे महोदयांनी, नाही म्हणताम्हणता ’म्हणीं’चा खजिनाच आपल्या पुढं ओतलाय... अगदी ’अ’ पासून ’ज्ञ’ पर्यंत आद्यक्षर असलेल्या म्हणी या खजिन्यांत तुम्हाला भेटतील.
वाचायला सुरुवात केलींत तर करमणूक तर होईलंच पण अंतर्मुख पण व्हायला होईल. कारण प्रत्येक म्हण ही आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगाच्या, व्यक्तीच्या, घटनेच्या, स्वभाव वैशिष्ट्य/वैचित्र्य यांच्या स्वरूपांत रोज भेटतेय, प्रत्यय, प्रतीती, अनुभव देते हे लक्षांत येईल. कारण कधीकधी या म्हणी आपण अगदी सहज, बोलता-सांगतां-विवादतांना आणि विशेषत: भांडतांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून वापरलेल्या असतांत... अगदी नकळत. पण भाषा समृद्धी आणि संवर्धनाचं हे केवढ मोठं दालन आहे हे आपण कधी ध्यानांतच घेत नाही...
या म्हणींचा उद्गम काय ? या प्रष्णाचं उत्तर शोधतांना आणखी कांही अनुत्तरित प्रष्ण सुचतांत..
’पाण्या’ला ’पाणी’ कां म्हणतांत ? ’तो माझ्या दारावरून गेला’ म्हणजे ’वरून’ ’उडत गेला कां ? वगैरे...
दीपकजींनी दिलेल्या म्हणींच्या सूचीपैकी ’अं’ आद्याक्षराच्या कांही म्हणी, वानगी दाखल बघूया, की ज्या सहसा अपरिचित..निदान मला तरी..आहेत !
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
( टुणी’ म्हणजे बहुधा पोत उचलतांना लावतांना खुपसतांत तो आणकुचीदार आकडा)
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
अकिती आणि सणाची निचिती.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
(यातल्या ’अठरा विश्वे’ची खरी फोड एकदा शंनांनी...शं.ना. नवरे...सांगितली ती अशी..
’अठरा विसावे’ म्हणजे अठरा गुणिले वीस म्हणजे तीनशे साठ दिवस म्हणजे वर्षभर जिथं ’गरिबी, विपन्नावस्था’ नांदतेय्‌ असं दारिद्र्य)
अडली गाय खाते काय.(किंवा ’काय बी खाय, न खाउन करते काय ?)
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती राग ? मग भीक माग !
अशी ही यादी अजून खूप मोठी आहे. खरचं वाचण्याची इच्छा असली तर ’महाजाला’वर उपलब्ध आहे..
सगळ्या ’म्हणी वाचून शेवटी तुम्हीच म्हणाल..
’अती झालं अऩ हसू आलं...’

Thursday, February 16, 2012

’स्थलातीत, कालातीत...’


’स्थलातीत, कालातीत...’
उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही!
सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडताती
चोहीकाडी!
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूरभूर!
माहीत आहेत या कवितेचे कवी ? बर्‍याच मराठीच्या अभ्यासकांना, प्राध्यापकांनाही हे माहीत नसावं, पण आपल्यापैकी प्रत्येकानं बालपणांत ऐकलेल्या, वाचलेल्या, गाईलेल्या या काव्यपंक्ती आहेत, विख्यात कवि, वि.वा. शिरवाडकर ;कुसुमाग्रज’ यांच्या ! खरंतर मलासुद्धा हे माहीत नव्हतं ! पण बर्‍यांच वर्षांपूर्वी, नाशिकमधल्या, रुंगठा हायस्कूलमधल्यामुलांनी,’ कुसुमाग्रजां’च्या, वर उल्लेखिलेल्या आणि अहि-नकुल, कणा आणि अन्य अनेक कवितांवर आधारित नृत्यनाट्याच्या प्रयोगाच्या चित्रीकरणाच्यावेळी मला ते कळलं आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला...
उद्या, कविश्रेष्ठ ’कुसुमाग्रज’ तथा वि. वा शिरवाडकर यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे.. ’लहान मुलांना ताल, ठेका यांची जन्मत:च जाण असते. त्यांना मात्रा, वृत्त, यमक लघु-गुरु यांची ओळख करून द्यायला हवी...म्हणजे छोट्याछोट्या रचना भावव्यक्ततेसाठी, ती करूं शकतांत... अर्थ आशय वगैरे खूप नंतरची गोष्ट आहे...मोठ्यामोठ्या कवींनासुद्धा कधीकधी त्यांनी लिहिलेल्या कवितेचा अर्थ लावता येत नाही... आणि मग समीक्षक शोधत बसतांत आशय, अंत:प्रवाह वगैरे...’ बालचित्रवाणीसाठी त्यांच्या नाशिकमधल्या राहात्याघरी, ’कविता’ करू इच्छिणार्‍या मुलांसाठी मोकळेपणानं मर्गदर्शन करतांना, १९८९ साली ते बोलत होते.
..
विष्णु वामन शिरवाडकर ’कुसुमाग्रज’ एक मानवतावादी कवी होते ज्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि मुक्ती या विषयांवर भरपूर लिखाण केलं. सोळा कवितासंग्रह, तीन कादंबर्‍या, आठ लघुकथासंग्रह, सात निबंध-मालिका, अठरा नाटकं, आणि सहा एकांकिका अशी संपन्न साहित्य संपदा हे त्यांच मराठी सारस्वताला लाभलेलं योगदान होतं अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी विभूषित ’कुसुमाग्रजां’ना १९७४ मधे साहित्य अकादमीगौरव आणि १९८८ मधे भारतीय साहित्यक्षेत्रांतला सर्वोच्च ’ज्ञानपीठ’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यांत आलं

मराठीतले नामवंत कवी, लघुकथाकार, नाटककार, कादंबरीकार, गजानन रंगनाथ शिरवाडकर यांचा जन्म दिनांक २७ फ़ेब्रुअरी १९१२ रोजी पुण्यांत झाला. त्यांचं बालपण, नाशिकजवळच्या, पिंपळगांव बसवंत इथं गेलं.  मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नाशिकच्या ’न्यू इंग्लिश स्कूल, जी पुढं रुंगठा हायस्कूल म्हणून ओळखली जाऊ लागली..त्या शाळेंत झालं. त्यांनी नंतर स्वत:ला विष्णु वामन शिरवाडकर अशी नवी ओळख त्यांनी स्वत:च दिली.
तारुण्याच्या सुरुवातीलाच, ढोंगी, परंपरेच्या जोखडांत जखडलेल्या दांभिक, तथाकथित ’विद्वानां’बद्दल त्यांच्या मनांत असंतोष खदखदतच होता. त्याचचं पर्यवसान, वयाच्या २०व्या वर्षी, नाशिकमधल्या हरिजनांना राममंदिर प्रवेश नाकारणार्‍या कर्मठ, कर्मकांडप्रेमी, अन्यायभावनाप्रेरित ब्राह्मणांच्या विरोधांत अहिंसात्मक ’सत्याग्रह’ करण्यांत आणि मंदिर सर्व जाती जमातींच्या ’भक्तां’साठी खुलं करून देण्यासाठीच्या चळवळींत सहभागी होण्यांत झालं. आयुष्यभार, नाशकांतल्या वास्तव्यांत त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला आणि कांही आंदोलनांचं नेतृत्वही केलं.
’जीवनलहरी’ हा त्यांचा पहिलावहिला काव्यसंग्रह, ते अवघे २० वर्षांचे असतांनाच प्रकाशित झाला.
अर्थात, १९४२ हे वर्ष, कुसुमाग्रजांच्या जीवनांतलं एक संस्मरणीय वर्ष ठरलं कारण त्या वर्षी मराठी साहित्यांतल्या परमपितृवत, कविवर्य वि.स. खांडेकरांनी स्वत:च्या खर्चानं, कुसुमाग्रजांचा, ’विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याच्या प्रस्तावनॆंत, कुसुमाग्रजांच वर्णन ’जाज्वल्य मानवतावादी’ असं करतांना खांडेकरांनी लिहिलं, ’कुसुमाग्रजांच्या शब्दांतून उचंबळलेला जाणवतो सामाजिक असंतोषाबरोबरच, दुर्दम्य आशावाद आणि निष्ठा ’जुने जाउद्या मरणालागुन’ म्हणत अंकुरणार्‍या उद्याच्या जगाबद्दल’ (खांडेकर स्वत: किती उच्चकोटीचे मानवतावादी होते हे त्यांनी, त्यांच्या, दिदींनी अजरामर करून ठेवलेल्या ’ये, जवळि घे जवळी, प्रिय सखया भगवंता’ या, उचंबळणार्‍या सागरांत मधोमध एकाकी पडलेल्या खडकाचं रूपक, गीतस्वरूपांत, माणसाला पंख असतांत’ या चित्रकृतीसाठी लिहून निर्विवाद सिद्ध केलय.). पुढे हाच दुर्दम्य आशावाद त्यांच्या ’ययाति आणि देवयानी’ या नाटकांतल्या  ’तम निशेचा सरला..अरुणकमळ प्राचीवर फुलले’ या पदांतून प्रकट झालेला दिसतो..
१९९० मधे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर, नाशिककरांनी आयोजिलेल्या भव्य सत्कार-सोहळ्यांत, ’मी जन्मानं, आणि जन्मानंच फक्त, जरी पुणेकर असलो तरी माझी खरी कर्मभूमी ही नाशिकच आहे आणि म्हणून नाशिककरांनी आयोजलेला हा कौतुक सोहळा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे’ असं अत्यंत भारावलेल्या अंत:करणानं उपस्थित श्रोत्यांना सांगितलं होतं. याचं सोहळ्यांत त्यांनी त्यांच्या ’कणा’ या प्रसिद्ध कवितेसह, सहा रचना ऐकवून प्रेक्षकांच्या आयुष्यांतल्या कांही क्षणांना, ’याचि देही, याचि डोळा’, सुवर्णझळाळी प्राप्त करून दिली होती.
आणि...
त्या क्षणांचा मीही साक्षीदार आणि ’आनंदविभोर प्रेक्षक-श्रोता होतो...

Thursday, February 9, 2012

जाणता राजा


जाणता राजा
समर्थ रामदास आणि शिवप्रभु गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती हे समकालीम जरी असले तरी प्रत्यक्षांत त्यांची भेट झाल्याचे ऐतिहासिक निर्वाळे मिळतनाहीत असे जाणकार इतिहासतज्ञ सांगतांत. मात्र शिवाजीमहाराजांच्या, ’महाराष्ट्रधर्म आणि अस्मिता’ जागविण्याच्या, जगविण्याच्या बहुमोल कार्याकडे समर्थांचं बारकाईनं लक्ष होतं. ’राम’ या संकल्पनेची बीज, शिवप्रभूंमधे समर्थांनी पाहिली निरखली पारखिली जोखली आणि खात्री झाल्यावर आणि मनांतली ’रामराज्या’ची संकल्पना, छप्तपतींच्या काळांत पूर्णत्वास येण्याचे संकेत जेंव्हा मिळूं लागले तेंव्हा समाधानपावते ते लिहिते झाले... बहुधा १६७४ मधे त्यांनी ही शिवस्तुती लिहिली ती किती अप्रतिम आहे हे परतपरत वाचल्यावर त्याची प्रतीती येते
निश्चयाचा महामेरू,(कृतनिश्चयी म्हणजे निश्चय प्रत्यक्षांत उतरविण्याची योग्यता असलेला ’उत्तुंग’) बहुत जनांसी आधारू(जनतेनं, रयतेनं ज्याच्याकडे विश्वासानं पाहावं असा), अखंड स्थितिचा निर्धारू( कायम स्वरूपी ’स्थिति’ म्हनजे स्थैर्याचा संकल्प सोडलेला), श्रीमंत योगी(सद्‌गुणसंपन्नतेने धनसंपदेने ’श्रीमंत’, पण योगसाध्य संयमी वृत्ती अंगी बाणवलेला)
नरपति,(पायदळ) हयपति,(घोडदळ किंवा तुरंगदळ) गजपति,(हत्तिदळ) गडपति(किल्ले, कडेकोट, दुर्ग), भूपति(प्रदेश), जळपति(नौदल,सागरसीमा), पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी
वसुंधरेच्या या सर्व भौतिक घटकांचा अधिनायक. त्यां काळांत अवकाशयानांचा शोध लागला असता तर, महाराजांनी ’अवकाश’पतिपद सुद्धा धारण केलं असतं, जसं मराठ्यांच नौदल स्थापन करून त्यांनी, सरदार कान्होजी आंग्रे यांना ’सरखेल’ या नौदल प्रमुखपदाची धुरा सांभाळण्याचे आदेश दिले होते.
यशवंत, कीर्तिवंत(जेता आणि सर्वमुखी कौतुकपात्र), सामर्थ्यवंत, वरदवंत( स्वबळाच्यायोगे मिळविलेल्या यशाद्वारे, लोकाधार ठरलेला), पुण्यवंत, नीतिवंत.जाणताराजा(सत्कृत्ये आणि कल्याणकारी रीतीरिवाज यांची जाण असलेला)
आचारशील, विचारशील(वागण्या-बोलण्यां्ला बुद्धीचा निकष लावून, समाजाभिमुख मान्यताप्राप्त) , दानशील, धर्मशील(स्वार्थत्यागाची मानसिकता बाळगणारा, नेतृत्वधर्म, जो ’धर्म’ म्हणून राजाचा असतो तो आचरनारा), सहजपणे सुशील सकळाठायी (सर्वांसाठीच जन्मत: सत्कृत्यक्षम),
धीर उदार, गंभीर,(धैर्या बरोबर आलेलं औदार्य, गांभिर्य) शूर क्रियेसि तत्पर(निधड्या छातीने संकटांशी, शत्रूला विचार करायलासुद्धा वेळ न देता समर्थपणे दोन हात करणारा), सावधपणे नृपवर तुच्छ केले (अनेक बलाढ्य शक्तींना ’मांडलिक’पणी रगडून, राजांनी काळजीपूर्वक बाjUला ठेवले...कां ? तर त्यांची बलस्थानं कदाचित भविष्यकाळांत ’स्वराज्या’साठी उपयुक्त ठरतील या हेतूने.
देव(श्रद्धेय) धर्म(कर्मप्राप्त कर्तव्यदक्षता) गोब्राह्मण(जे स्वबळावर संकटांशी लढू शकत नाहीत असे सर्व), करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण (साक्षांत नारायण म्हणजे विष्णू ज्याच्या अंत:करणांत प्रकट होवून कार्यप्रवृत्त केले आहे असा), प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही(कर्तव्यच्युत स्वकीयालासुद्धा कठोर शासन करून ’राज’धर्म पाळणारा), महाराष्ट्रधर्म राहिला कांही, तुम्हा कारणे(महाराष्ट्राची म्हणून असलेली अस्मिता, आत्मगौरव, प्रतिष्ठा अबाधित राहिली, ती, हे राजा, केवळ तुझ्यामुळे...)
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला, कित्येकांसि आश्रयो जाहला(शत्रू, जनहितबाधक, अस्तनीतले निखारे, अराजकी, फुटीर यांचा केलेला संहार पाहून बाकीचे भयभीत झाले, तसेच शरण आलेल्यांसाठी ’दयार्णव’ अपार मायेचा सागरसुद्धा होणारा हा राजा म्हणजेच...)
शिवकल्याण राजा...
मराठी साहित्यांतल्या या अद्वितीय ’गुणवर्णनपर स्तुति’रचनेवर तेवढाच ’समर्थ’ स्वरसाज चढवून, बाळासाहेब हृदयनाथ मंगेशकर यांनी तो दिदींच्या वैश्विकस्वरांत गुंफला आहे, केवळ तानपुर्‍याच्या पार्श्वनादावर. तो ऐकतांनां तर आपण खरोखरच प्रत्यक्ष शिवप्रभूंना पाहात आहोत असा भास होतो...
ही अनुभूती खरंतर सर्वांनीच घ्यावी अशी...
*****

Sunday, January 29, 2012

’अक्षर-बाकी’


’अक्षर-बाकी’ भाग १
’पिलांस फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे
आतां आपुली कांचनसंध्या, मेघडंबरी सोनपुटे’
वृद्धत्वाला ’संध्याछाया’ असं उदास संबोधन न देता,  वयोमानानुसार आलेल्या शारीर थकव्यांत सुद्धा, मनाची सोनेरी किनार अबाधित राखण्याचं आवाहन करणारे, ’बाकीबाब’  बाळकृष्ण भगवंत बोरकर हे महाराष्ट्राच्या समृद्ध कविकुलांतले एक अग्रणी...
’जळल्यावाचुन नाही ज्योती, रडल्यावाचुन नाही प्रीती, कढल्यावाचुन नाही मोती
ना घणावाचुनी देवपणा
रे अजून थोडे सोस मना...
प्रसववेदनांविण ना सृष्टी, तपनावाचुन नाही वृष्टी, दु:खाविण ना जीवनदृष्टी
मेल्याविण मिळला स्वर्ग कुणा ?’
अटळ, अबाधित सत्य, कांही वैज्ञानिक, कांही माणसाच्या भावभावनांशी निगडित...दुखर्‍या ,खंतावल्या सामान्यजनांच्या वेदनांवर फुंकर घालतांना बोरकर काय छान उदाहरणं देतांत, बरं ते सुद्धा, त्या पंक्तींमधल्या काव्यात्मकतेला एका वेगळ्या अध्यात्मिक उंचीवर नेत, कुठल्याही ’उपदेश’पर उक्तीचा वास न येवू देता...
तशीच आणखी एक रचना
अखंड प्रीतीची घट्ट वीण, भावस्पर्शी शब्दांतून व्यक्त करतांना बोरकर एक छान दृष्टांत (कांहीश्या वेगळ्या नजरेनं पाहाणार्‍याला, त्याचा अंत:प्रवाह शारीर वाटू शकतो) देतांत, अर्थातच ते ज्या माडापोफळीच्या, सागरतीराच्या स्वप्नभूप्रदेशांत वातावरणांत वाढले, तिथंच क्षणोक्षणी घडणार्‍या भौगोलिक सत्याचा, दिसणार्‍या दृश्याचाच
’विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेल
ओसरल्यावर आपण सजणी अशीच ओलं उरेल
आणि गंमत पाहा हे भरती (भरतं ?) येणं आणि ओसरणं, पृथ्वीच्या निर्मितीपासून अखंड अव्याहत चालू आहे. अतूट प्रेमाच्या वर्णनासाठी यापेक्षा कोणता दृष्टांत आधिक समर्पक असू शकतो ? भरतीचा आवेग खळाळणारा तर ओसरणं ? संथ, सबुरीनं, किनार्‍याच्या कणाकणाला स्पर्श करीत...
बोरकरांच्या कवितेंत अत्युच्च काव्यगुणांबरोबरच भाषेची समृद्धी, प्रभावानं दृष्टोत्पत्तीस येते.
रुसलेल्या प्रिय सखीची समजूत धालणार्‍या प्रेमिकाच्या प्रणयाराधनेंच्या वर्णनपर गीताच्या ध्रुवपदांत, ते
’कशि तुज समजावु सांग
कां ’भामिनि’ धरिसी राग ?’
अशा ओळी ओवतांना सामान्यत: मराठींत सहसा न वापरलं जाणारं, ’भामिनी’ हे संबोधन वापरतांत...
तर...
’गडद निळे गडद निळे जलद भ्ररुनी आले’
मधे, तें बाष्पवृत्त ढगाला, ’मेघ’ असं न म्हणता, संस्कृतोद्भव ’जलद’ हे विशेषणात्मक संबोधन वापरतांत...
कारंण ’मेघ’ श्वेत, जलविरहित असू शकतो, पण ’जलद’ ? अधिक स्पष्टीकरणाची गरज नसावी बहुधा !
गत वर्षी ३० नोव्हेंबरला, गोव्याच्या या शब्दप्रभु सुपुत्राच्या जन्मशताब्दीची सांगता झाली. करंदीकर-बापट-पांडगांवकर यांच्या आधीच्या पिढींतल्या, स्वत:च्या कवितांच सादरीकरण, ’काव्यगायन’ पद्धतीनं करणार्‍या कांही निवडक कवींपैकी एक म्हणजे ’बाकीबाब’ ! लेखांत उल्लेख झालेल्या सर्वच रचना, खरं तर पूर्णपणे वाचाव्या अशाचं आहेत. पण लेखाच्या शब्दमर्यादेंत जमेलं एवढंच लिहितांना, त्या काव्यरसिकांकडून आणि विशेषत: मराठीच्या अभ्यासक तरुण पिढीकडून त्यांचा ’पूर्णास्वाद’ घेतला जाईल ही अशा व्यक्त करतो.
एकेका शब्दाचे प्रचलित पदर उलगडून दाखवतानांच, त्या अर्थांपलीकडचे भाव अनावृत्त करण हेच तर कविजनांच कसब. या माझ्या उक्तीच्या पुष्ट्यार्थ, जाताजाता, बोरकरांच्या, आणखी एका रचनेचा उल्लेख अपरिहार्य आहे...
’जळणार्‍या जळत रहा, जळतो सारेच आम्ही
जळण्याच्या लाख तर्‍हा, राख मात्र जास्त कमी’
आतां या ’लाख तर्‍हा’ कुठल्या ? संपूर्ण कविता वाचा...आणि ’जाणिवे’चा आनंद घ्या.
अशीच आणखी एक कविता, जिचा उल्लेख, ’बाकीबाब’ अभ्यासतांना अपरिहार्य म्हणजे, पत्निविरहाची वेदना परतिबिंबित करणारी ही रचना,
’तू गेल्यावर फिके चांदणे, घर-परसूंही सुने, सुके...
मुले मांजरापरी मुकी अन्‌ दरदोघांच्या मधे धुके...
कविता वाचतावाचता शेवटाला याल आणि थक्क व्हाल...खात्रीनं सांगतो !
ह्या अशा  ’सारस्वतां’च वर्णन एका लेखांत करणं कर्म कठीण. कारण माझा आवाका इतका लहान आणि ही सगळी मंडळी म्हणजे,
’दशांगुळे उरला...’
तेंव्हा उर्वरित ’बाकीशब्द’, पुढील भागांत...
****

’माझ्या दूरस्थ लाडक्यांनो...’
या आपल्या कवितेंत, शिक्षण-व्यवसायानिमित्त, परदेशी स्थलांतरित भारतीयांना, तिथल्या ’सांस्कृतिक’ धोक्यांबाबत सावध करतांना, बोरकर म्हणतांत
’आणि तुमच्या हृदयांतून उसळू दे इतक गंगौदक की, त्यानं पण्यांगनेची पुण्यांगना होवून जावी’
’पण्यांगनेची पुण्यांगना’ अशा, केवळ एका उकारप्रदानांतून, लौकिकार्थानं कंचनी असणार्‍या स्त्रीला, गरती करून टाकण्याचा हा ’चमत्कार’ केवळ बोरकरांसारखे भाषा प्रभुच करू शकतांत...
स्वप्नभूमी गोव्याच्या...
’आमराइतुन गातो कोकिळ, दडून पानां आड...
पुळणीवरती स्पर्धा करिती पिसारलेले माड...’
आपल्या जन्मभू, कर्मभूबद्दल सांगतांना, विशेषत:
’माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या साळीचा रे भात,
वाढे आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात...’
ह्या ओळी गातांना, बोरकर भावविवष होवून सद्गदीत होत असत......
अशा वातावरणांत अंकुरत, आपल्या कल्पनांचा शब्दोत्सव, काव्यसंग्रहांच्या पानापानांतून साजरा करणार्‍या...
कविवर्य ’बाकीबाब’ बा.भ.बोरकरांची,.अशीच, एका ओकाराच्या जागी, उकार ठेवीत वेगळाच आयाम देणारी ही रचना
’विझवून दीप सारे, मी चाललो निजाया...’
या कवितेंत पुढे, एके ठिकाणी ते लिहितांत,
’मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे !...’
’जे न देखे रवी ते देखे कवी’...यासाठी परकाया प्रवेशाची विद्या कवीला निसर्गत:च प्राप्त झालेली असते. मग श्रेष्ठ रचनाकार, ’बाकीबाब’ त्याला अपवाद कसे असतील ? एका ’कोठी’वरच्या नायिकेची वरकरणी ’हसवणूक’ करणारी पण मनाच्या भळभळा वाहणर्‍या जखमेच उदास अस्तर असणारी ही रचना ’बाकीबाबां’चीचं
’विसर म्हणाया कधी तुझे मी स्मरण ठेविले होते ?
दिसल्यावर तू, हसले मी ते, मुळांत होते खोटे...’
योग आणि भोग यांच्या सीमारेषेवर वसलं आहे बहुतेक गोवा,
इथला सगळाच ’माहोल, ज्याला जसा भावेल तसा त्यानं घ्यावा...
पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरबद्ध करून गायलेलं, ’नाहि पुण्याची मोजणी, नाहि पापाची टोचणी’ हे.... काय म्हणूया ?.... ’विलय-समीप’ गीत आठवा...विशेषत: त्यांतला..’आम्हा नाहि नांमरूप, आंम्ही अवकाश स्वरूप’...हा चरण...
आजीनं लहानपणी, स्वरचित श्लोकाला ’बाकी म्हणे’ अशी नाममुद्रा लावल्याबद्दल, व्यक्त केलेल्या नाराजीनंतरची ही उपरती तर ’बाकीबाबां’ना झाली नसावी ना ? कदाचित म्हणूनच ’नाममुद्रे’च्या ठिकाणी ’आम्हां नाहि नामरूप’ वगैरे विश्वामित्री पवित्रा... ?
भावोत्कटता ह्या, काव्याला आवश्यक घटकाबरोबरच ’बाकीबाब’ समृद्ध भाषासंस्कृतीचं दर्शन, अनेकवेळा जागोजागी संस्कृतोद्भव शब्दांचा प्रयोग करून घडवतांत...
गंगौघ, पण्यांगना-पुण्यांगना, जलद, भामिनी...हे कांही वानगीदाखल.
बहुतेक वेळां, पांढरं स्वच्छ, करवत कांठी धोतर, गुडघ्याखालपर्यंत लांबीचा रेशमी झब्बा किंवा कुर्ता, छान तेल लावून मागे वळविलेला भरपूर केशसंभार, चेहेर्‍यावर कायम एक मिश्किलपणाकडं झुकणारं स्मितहास्य असं उमदं व्यक्तिमत्व होतं कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचं...बहुतेक वेळा. उजव्या हाताच्या. तर्जनी आणि मघ्यमा यामधे, तर कधी करांगुली आणि अनामिका यामधे विराजमान, धूम्रकांड...म्हणजे अर्थातच सिगारेट्‌...असायचीच...उंची मेक्‌ची ...
गोवा म्हणजे रुपेरी वाळूच्या पुळणी, समोरच्या तळ्यांत प्रतिबिंबित होणारी   मंदिरांची गोपुरं, उन्हाळ्यांत रंध्रारंध्रांतून, दमट उष्म्यामुळे उसळणार्‍या स्वेदधारा आणि पावसाळ्यांत, अक्षरश: कोसळणार्‍या पर्जन्यधारा...
ऐन पावसाळ्याच्या तॊंडावर, दूर क्षितिजावर समुद्राशी सलगी करू पाहाणार्‍या, कृष्णमेघांच्या पंक्तींच ’ओथंबलेपण’ न्याहाळतांना ’बाकीबाब’ सहजच लिहून जातांत...
’समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पांचवा महिना’
अशा मेघाच्छादित, हुरहुर लावणार्‍या वातावरणांत, ’बाकीबाबां’च्या चित्तवृत्ती सजग होवून ते उत्स्फूर्तपणे गायला लागतांत
’गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले’
लाहीलाही झालेल्या तना-मनांबरोबरच, आसुसल्या भूमीला सचैल स्नान घडवून तृप्त करून, मग अनेक वाटांनी पागोळणार्‍या ओघळणार्‍या, खळखळणार्‍या, झुळझुळणार्‍या, वाचलेल्या, साचलेल्या, उरलेल्या, मुरलेल्या, धावणार्‍या, बावणार्‍या अशा या, पाण्याची विविधरूपं, बोरकरांनी आपल्या शब्दरंगांनी चितारली आहेत.
आणि मग श्रावणांतला ऊन-पावसाचा खेळ...’साळीच्या बालकां’ना सुखावणारा, खुलविणारा, हसविणारा...त्याचं हे वर्णन आणखी एका प्रसन्न रचनेंतलं...
इकी अलंकृत कविता आहे की परतपरत वाचावीशी वाटेल तुम्हाला...
’फारा दिवसांनी आज, उन्हे सोनियाची आली...
चिंब साळिची बालके उब पीऊनीया धाली...
गोव्यासारख्या प्रदेशांत मानसिक जडण घडण आणि वैचारिक उपज झालेले कविवर्य बोरकर, आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यावर, आपल्या कवितांम्धून झोके घेतांना वारंवार जाणवतांत...
अशाच एका, विरक्त मनस्थितींतल्या, बोरकरांनी लिहिलेल्या एका कवितेचं गीत रूप, ...
’आतां माझ्या व्यथा-कथा कुणा न येती जाणता..
वृथा त्यांना का दूषण, ना ये मला न सांगता...’
****
अरुण काकतकर.




Thursday, January 26, 2012

शुद्ध-लेखना आधी शुद्धोच्चार


शालेय-स्तरापासून, आपल्या सगळ्यांच्याच मनावर शिक्षकांकडुन, लेखनाच्या सरावाच्यावेळी ’शुद्धलेखना बद्दल जेवढा अग्रह ध्रला जातो, तेवढाच तो शब्दांच्या ’शुद्धोच्चाराबद्दलही धरला जातो की नाही हे मला माहीत नाही. पन लेखन शुद्ध होण्या/असण्यासाठी, शब्दांचे, शुद्ध स्वरूपांतले उच्चार माहिती असणं आवश्यक आहे. आणि आजकाल अशा ’शुद्धोच्चार’ जाणणार्‍या आणि शिकविणार्‍या शिक्षकांचीच वानवा आहे.
उदाहरणार्थ..संधी’चं अनेकवचन ’संधी’ असच होतं,,,’संध्या’ नाही...’गांधी’ म्हणजे माशी किंवा कीटक चावल्यावर उठते ’ती’ किंवा ’त्या’ ’गांधी’च...त्यांच अनेकवचन ’गांध्या’ नाही होत... तसच पाणी आणि पाणि.. ’कृष्ण किंवा विष्णू’चक्रपाणी’ नसून तो ’चक्रपाणि’ आहे...कारण ’पाणी’ म्हणजे जल, उदक, नीर किंवा H2O अशी रासायनिक संज्ञा... तर ’पाणि’ म्हनजे हात, कर...म्हणून ज्याच्या हातांत ’चक्र’ आहे तो ’चक्रपाणि’...... तसंच दुसरा-दूसरा...तिसरा-तीसरा या उच्चारांतला फरक. हा सगळा वाहिन्यां,रोज माथी मारीत असलेल्या हिंदीचा प्रभाव, मला मदतच्या ऐवजी माझी मदत अशी अशी अनेक उदाहरण देतां येतील. परंपरा, इतिहास, व्यवसाय या शब्दांच विशेषणरूपं, पारंपरिक, ऐतिहासिक, व्यावहारिक...पहिल्या अक्षराला ’अ’ चा जोड, तिसरं अक्षर तसच्यातसं आणि चौथ्या अक्षराचा ’इ’ कार (म्हणजे ’र्‍ह्स्व’) हा सर्वसाधारण नियम इथं दिसतो. तसच नांव आणि नाव...नांव म्हणजे नाम, संबोधन...या मधे ’ना’चा उच्चार सानुनासिक हवा. तो तसा नसेल तर त्याची होईल ’होडी’,किंवा ’तर’..
हृषीकेश हे नांव सामान्यत: आणि विशेषेकरून वाहिन्यांवर कायम ’ऋषिकेश’ असं लिहिलं जातं कारण ’हृ’चा उच्चारच माहिती नसतो...आणि त्यावर कडी म्हनजे ’ऋ’चा उच्चार ’रु’ असाच चुकीचा शिकविला गेल्यामुळे मुळांतले सगळे ’ऋषि’ ’ऋचा’ ’ऋग्वेद’, ’रुषी’ ’रुचा’ ’रुग्वेद’ असे लिहिले गेलेले मी अनेकवेळा व्यथित होवून पाहिले आहेत... तसंच, ’सूचना’...मराठी मायबोली म्हणून मिरविणार्‍या मराठी अधिकार्‍यांच्या उच्चारांत...आणि ते सुद्धा विशेषत: ’शिक्षण’ विभागाच्या अधिकारीवर्गाकडून, या शब्दाचं उच्चारण ’सुचना’ असं चुकीच झालेल, आणि ,ग्रामीण विभागांतल्या जिल्हा परिषदांच्या शाळांपासून ते अगदी त्या विभागाच्या मुख्यालयांत सुद्धा फलकावर ’लिखित’ स्वरूपांत, तीच चूक मी वर्षानुवर्ष पाहात-ऐकत आलो आहे. तसच ’सूत्रधार’ परीक्षक’ प्रतीक्षा’ निरीक्षक’ हे शब्द बहुतेक वेळा इकार,उकार र्‍हस्व करून लिहिले जातांत. वाहिन्यांवर, आरेखन विभागांत, मराठीचं ज्ञान असणार्‍यांची वानवा असते...आणि अभ्यासक-संशोधकांनी, वर्षानुवर्ष काम करून साकारलेला मराठी ’शब्दकोश’ जवळ बाळगण्याच्या मानसिकतेचा अभाव असतो...शब्दकोशांत मंजुषा आणि मंजूषा तसंच मनिषा आणि मनिषा दोनीही मान्यताप्राप्त आहेत. पण ’सूत’ च ’सुत’ झालं की, ’धाग्या’चा ’पुत्र’ होतो ना ! गंमत म्हणून ’शब्दकोशां’तून ’कोश’ आणि ’कोष’ यामधला फरक जाणून घ्या.
भाषा-शुद्धतेचं भान राखण्यासाठी (किंवा भरकटलेल्यांना भानावर आणण्यासाठी) जसा ’शब्दकोशा’चा उपयोग आहे तसाच तो अधूनमधून चाळणे हासुद्धा एक उपयुक्त ’विरंगुळा ठरूं शकतो
अनुस्वारांचा उपयोग, अंत्याक्षराचं ’पूर्णोच्चारित्व’ अधोरेखित करण्यासाठीच असतो. उदाहरणार्थ अमुक अमुक ’होतं’(भूतकाळ) आणि अमुक अमुक ’होत’(सद्यस्थितिदर्शक), ’उच्चारणं’ आणि ’उच्चारण’, ’कारण’ म्हणजे एक आणि ’कारणं’ म्हणजे अनेक...
सहस्र, स्रोत हे शब्द बहुतेक वेळा त्यांत एका ’आगंतुक’, ’अनावश्यक’ ’त’ची जोड देवून ’सहस्त्र’ स्त्रोत’ असे चुकीचे लिहिले जातांत...कारण तेच...मुळांत त्या शब्दांचा उच्चारच माहिती नसतो... संस्कृत मधल्या अनेक ’इ’कारान्त उच्चारांना ’ई’कारान्त होण्याची मान्यता मराठी व्याकरणकारांनी दिली आहे...उदाहरणार्थ ’कवि’चा मराठींत ’कवी’, स्वीकारार्ह झाला आहे
दिवा, दिवाळी जसे बरोबर तसेच दीप, दीपावली, दीप्ती हे शब्द लिहितांना ’दीर्घत्वाचं भान राखायला हवं ! ’महत्त्व’ ’महत्व’ असा लिहिण हे चूक आहे.
इंग्रजीमधे लिखित अक्षरं, अनेक शब्दांमधे उच्चारांत लुप्त करण्याची पद्धत आहे...म्हणजे ’Spelling' आणि उच्चार यांत खूपच तफावत असते...उदाहरणार्थ...'Schedule' ’Scintiletting' Lieutinent' ’'Psycology' उच्चारणांत ’शेड्यूल्‌’ ’सिंटिलेटिंग्‌’ ’लेफ्ट्नंट्‌’ ’साय्‌कॉलॉजी’ होतांत. ’Colonel'चा उच्चर ’कर्नल्‌’ कां ? याच उत्तर कुणी इंग्रजीचे व्यासंगी ’पंडित’च देवू शकतील.
तसंच, इंग्रजींतसुद्धा, र्‍हस्व-दीर्घोच्चार योग्य केले नाहीत तर अर्थ बदलतो. उदाहरणार्थ, Kill, Keel (मारणे, जहाजाचा कणा)..Pill, Peel (औषधाची गोळी, सोलणे)..Mill, Meal(गिरणी, जेवण)..Fill, Feel (भरणे, स्पर्श करणे किंवा जाणवणे)
म्हनजे भाषेची शुद्धता राखण्यासाठी लेखनाआधी उच्चार व्यवस्थित आणि शुद्ध-स्वरूपांत होतील याची कालजी आवश्यक आणि अनिवार्य आहे..
*****
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com