Tuesday, December 9, 2014

।।भासबोध।। १२६ ते १३७

कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रुजा घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' ?। सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७

Friday, December 5, 2014

।।।भासबोध।। १०७ ते १२५

स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ भेटल्याविना नाहि जवळीक ।पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ या कृतींद्वारा ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५

Tuesday, December 2, 2014

।।भासबोध।। नवा अध्याय ८६ ते १०६

।। दास-वाणी ।। ज्येष्ठ बंधू बाप माये । त्यांची वचने न साहे । सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०६/२६ ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही. ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य. माय, तांत, बंधू, सखा । जाणा जीवाच्या तुकड्या सारखा । त्यांना जो होईल पारखा । गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६ विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी । पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी । निंदनीय वर्तन तयांप्रती । अक्षम्यचि होय ।। ८७ डोईवरी आभाळमाया । काळी आई, मखमल पाया । तैसेचि वागवावे आप्तस्वकीया । तेचि होय 'माणूस'पण ।। ८८ छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी । कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी । हा अविचार ? नाही ! जगराहाटी । कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९ म्हणोनि राखणे भाकरतुकडा । भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा । सुसंस्कृत गृहिणी देती धडा । परंपरा 'अतिथी' साठी ।। ९० सातजणांत एक तीळ । वाटता, मिळे सुख सकळ । कोणताही कठिण काळ । सहज होई सुकर ।। ९१ मारितो कां भूल थापा ? अतिशहाणा हा कोणं बाप्पा ? आवरा, अटकाव करा या पापा ? आरडती आढ्य, संभावितं ।। ९२ 'धर्मास लावितो चूड । उतरवा याचे वेड । करण्यास परतफेड । हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३ अध्यात्म मोक्ष, गती । हा स्वयंसिध्द मंदमती । कैसा जाणेल ? उपरती। यांस होईल ?।। ९४ गरम, नरम, विविध पराठे । थंडीमधे खावे, वाटे । 'नाम' 'देव' सगळे खोटे । घुमान घुमण्या लेखकूंना ।। ९५ उभे आयुष्य म्हणे संशोधनी । अध्यासनाधिष्ठित साहित्यिकांनी । परंतू सहिष्णुता आचरणी । बाणविण्यांत अपयशी ।। ९६ बालयोगी ज्ञानदेव । सांसारिक तुकोब्बा, नामदेव । न मिरविता संतभाव । झालेचि ना जनमान्य ?।। ९७ मग कां बरे सायास । मिरविण्या वृथा आभास । भाटांना ठेउन आसपास । 'उमेद' 'वार' करिति ढोंगी ।। ९८ धरा धरा काकतकर । मोजुनी मारा पैजार । शमविण्या सूडाची धार । वार करा नेमके ।। ९९ गति, मोक्षावरती करीत बसला वार । लागेल ऊर्ध्व, मग येइल भानावर ?। तेंव्हा तरि यांवे उचलायाला चार ? । सुखरूप दावण्या 'माहेरा'चे द्वार ।। १०० ।। दास-वाणी ।। लोकी भले म्हणायाकारणे । भल्यास लागते सोसणें । न सोसता भंडवाणे । सहजचि होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०२/१३ लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर 'काय भांडकुदळ आहे हा माणूस' अस सहज ऐकून घ्यावे लागते. काळोख असतो ठाय । प्रकाश पावतो विलय । तेज शोधीत जाय । क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१ मुकाट न राहता बोलावे । शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे । कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे । संभाषण ।। १०२ बरे, वाईट पाहावे तैसे । व्यक्तिसापेक्षच सहसा असे । भावांचे आयाम विविधसे । असावे संग्रही ।। १०३ अंधारच असतो सत्य नि स्थाई । प्रकाशा मावळतीची घाई । जन्म सांगाती घेउन येई । मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४ कोण जाणे. अंधाराचा ध्यास । कां न बरवा वाटें प्रकाश ?। हीच बहुधा ओलांडण्या वेस । घालमेल जीवाची ?।। १०५ पुत्र कमावितो पुण्याई । आज मजला कामा येई । व्यक्तण्यास साहाय्यभूत होई । नकळत पण निश्चित ।। १०६

Tuesday, November 25, 2014

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: १ते ८५

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: मनांत वसते येते ते स्वप्नी उमलते । संसार,व्यापार कारणे चिंता असते । या विचारांत असता सामान्यजनांते । ग्रासते निद्रा ।। १ कष्ट, संकट, वेदना । व्यापीत असतां आप्तजना । मुक्तीच्या पाहाणे स्वप्ना । जाणा महत्पाप ।। २ हवी हविशी जर वाटे मुक्ती । मुळांत कोण्याकारणे अवतरती ?। संसार मांडुनी हे अवनीवरती । कहार होती गिळावया ।। ३ पटकुर पसरावे पदपथी । 'त्याच्या' नांवे दया मागती । त्यत्तीस कोटींपैकी किती येती । ऐशा निष्क्रीय निलाज-या भेटावया ।। ४ ।। दास-वाणी ।। स्वप्नी बद्ध मुक्त जाला । तो जागृतीस नाहीं आला । कैचा कोण काये जाला । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०६/६२ मी आणि माझे नातलग, संपत्ती, व्यवसाय यात गुरफटलेला आणि त्यातच परमसुख मानून धडपडणारा म्हणजे बद्ध. हा बद्ध एके दिवशी गाढ झोपला अन् त्याला आपण ध्यानस्थ बसलोय असे स्वप्न पडले. जागा झाला आणि पुन्हा नेहमीचेच उद्योग सुरू केले. पारमार्थिक जागृतीचा पत्ताच नाही. अशा स्वप्नातील मुक्तीला काय अर्थ ? परमेश्वरापायी चित्त एकाग्र तो खरा मुक्त ! तैसे कोठलेही ज्ञान । शोषित गेले कण कण । तर्काने परस्परांशी सांधून । विषय आकळतो परिपूर्ण ।। ५ उदाहरण एकलव्याचे । वा गर्भस्थित अभिनन्यूचे । अंकुरल्या, जोपासल्या कोंभांचे । त्यांनी केले वटवृक्ष ।। ६ पाहाता, ऐकता चाणाक्षपणे । विश्लेषतां परिणाम, कार्यकारणे । समोर येतो सहजपणे । अन्वयार्थ ।। ७ म्हणोनि गुरु चराचर स्थीत । जेथून जावे तेथे संगत । वावरती ! राखोनि सावधचित्त । असावे आपण ।। ८ 'मुक्ती मुक्ती' सर्वदा आरडती । 'उक्ती उक्तीं' त्रिकाल संगाती । 'भक्ती भक्ती' कां न आग्रहिती । कर्मयोगाची हे ।। ९ पाठपुरावा पळण्याचा । कर्मनिष्ठेपासून ढळण्याचा । सर्वसंगपरित्यागाचा । उपदेश, सांगा, योग्य कां ?।। १० रणांगणी वा भवसागरी लढतां । कमकुवत शरीर, मने होता । सैन्य, प्रजा कामी येतां । सत्ता गाजविण्या कुणि नुरेल ।। ११ म्हणुनि राखावे समाजभान । 'मी' म्हणावे, 'सेवक प्रधान' !। ऐसेचि वदले असावे, 'जाण, । राजा' दास शिवबासी ।। १२ मग आपोआप स्वानिनिष्ठा । जागेल स्वादिल्या मिठा । उद्योगारोग्य, संपन्न पेठा । सजवितील नगरि-देशा ।। १३ न्हाऊ-माखू घातलेली घरी । धुळींत लोळति सडकेवरी । रक्त-मांस एकचि जरी । गोमट्यासि न्याय वेगळा कां ?।। १४ 'देव' तुमचा आंधळा । प्रसाद भक्षुनी निद्रिस्त गोळा । काणा करोनिही डोळा । न पाहे तिकडे ।। १५ दुर्दैवी, प्रतीक्षेंत, मूढ । कधी मिळेल सुवर्ण कु-हाड । वाकोनि पाहती आड । तोल जाता होति मुक्त ।। १६ गति मिळता गर्तेंत जाती । 'मोक्ष' लोभाने सर्वस्व त्यजती । उखळे पांढरी करिती। बुवा, बाबा, भोंदूंची ।। १७ जनावेगळा कसा राहील ?। भुकेला कंदमुळे खाईल ?। भिक्षेसाठी झोळी करेल । पुढ ! जनताजनार्दनीच ना ?।। १७ सेवा, साधना वा परिचार । अखेरीस माध्यम शरीर । पोसाण्या लागते अन्न आणि नीर । कोठ शिजवतील बाबा, साधू ।। १८ आपला खारीचा वाटा । गरजूंना देण्या, अनेक वाटा । संसार करोनि नेटका । सद्भावे अर्पिती जन ।। १९ भले राहा ब्रह्मचारी । अभ्यासूनि वेद चारी । सुविहित चालल्या संसारी । विचलित करु नका गृहस्था ।। २० निसर्गे दिधल् दान । दुर्लक्षुनि करू नका अवमान । सुलक्षणे, सुज्ञपणे अवलंबुन । जिवंतपणी वा मरणोत्तर ।। २२ नर नारी कां दोनचि स्थिती । योजने या कारणे कोणती । विचार कोणी केला ? किती ?। नि:संगासि प्रतिपादिता ।। २३ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २५ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २६ 'ते' तर त्यत्तिसकोटी । त्यातला उपकारक जगजेठी । निवडून, दीन दुबळ्यांसाठी । नेमस्तेल, तो महंत ।। २७ गरीबांस कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ म्हणे 'ते' त्यत्तिसकोटी । वसंत असता उरी-पोटी । तरी क्षुधाशांतीसाठी । कपिला गोमाता रानोमाळ ।। २९ म्हणे 'शोध घ्या स्व अंतरी,। भेटतील तिथे 'दैवते' सारी !' । मग कशास करण्या वारी । प्रेरित वृथा करिति 'संत' ? ।। ३० कशास हवा महंत ? अंकुश घेवुनि जणु माहुत । अगम्य गति-मोक्षाप्रती जनमत । कोण्या कारणे रेटावया ? ।। ३१ तर्क बुध्दीच्या विश्लेषक कसोट्या । देणग्या निसर्गाच्या मोठ्या । ढोंगी, भोंदू संत 'माणसांच्या' । स्वार्थी हेतूंनी गाडल्या ।। ३२ संत-महंताना नकोच जाणकार । जनता राहिला जर भाबडी निरक्षर । तेंव्हाच झोळींत पडेल भरपूर । भिक्षा, दक्षिणा नि संपदा ।। ३३ चर्चा करणे कां बा व्यर्थ ? चिंतनास जर देईल दिशा नि अर्थ ! मौन धारण्या निरर्थ । जावेचि कां ?।। ३४ उंच डोगरी चढोनि जावे । बहुत आरडा ओरडावे । हवेतर हवेशी भांडावे । हर्षोल्हासित होत्साते ।। ३५ हर्षोल्हास, सुख वाटावे सर्वांशी । वेदना दु:ख राखावी आपुल्यापाशी । कोठे न्यायचे असते 'त्या' दिशी ।सांगा बरे ऐहिक ? ।। ३६ या विचारें थांबवू नका सुकर्म । काज जगण्याचे तेचि वर्म । करित राहिलांत निकामि धर्म । 'पूज्य' राहिल गांठीशी ।। ३७ तुमच्या अनाठइ 'धर्म'भावे । आळशी साधु भोंदू सेवतील 'खवे' । सागतील, 'असेचि करित राहावे । उभयतांच्या कल्याणार्थ ' ।। ३८ रक्षेने बरबटतील अंगे । नग्नदेही धावतील कुंमंडलु-त्रिशुळा संगे । शुध्द जळनिधीत करोनि दंगे । नासतील उत्सर्जिताने ।। ३९ 'पुरुषार्थ' शब्द कालबाह्य । सर्वक्षेत्रांत महिला सक्रिय । 'मानवार्थ' उपाधीचा अनुनय । करावा भविष्यी ! हे बरें ।। ४० पुरुष, तरिही व्यवहार निरर्थ । कुटुंबात अडचण, त्रास व्यर्थ। पेलण्या संसार रथ । असमर्थ, मोडके, जणु चाकं ।। ४१ असावे नेहमी मितभाषी । तसेच नेहमी मृदुस्पर्शी । मनांना गवसणी घालण्यासी । उपकारक सर्व हे ।। ४२ म्हणोनि वंदन ज्ञानोब्बांसी । लहानं जरि अचाट कर्तृत्वदर्शी । दशकोत्तरिषष्ठ वर्षी । घालावा शिवबासी मुजरा ।। ४३ ओवींत ना कठोर व्यंजन । रयतमनीची अपार जाण । संभवती क्वचितच युगांतुनं । ऐसे आदर्श योगी ।। ४४ हृदय आवेगे उचंबळे । पापणीकांठी नीर साकळे । जीवमात्र जगति सगळे । घेतांतच अनुभव ।। ४५ प्रेम, वात्सल्य, करुणा । परी काजांच्या नाना । परि पाहता परिणामा । असति मात्र एक ।। ४६ कुणा आंचती विरहज्वाळा । कुणा दुरावा क्षणिक साहेना । कोण्या मनी आनंद माईना । विविध स्वरुपी प्रकटे ।। ४७ हे लिहितसे मी जरी । निगळेल कुणी भवसागरी ?। दखल घेवोनि परोपरी । विचार अन्या सांगेल ?।। ४८ नाही !... नका म्हणू उपदेश । कृपा मागतो तुमच्यापास । जगण्यातल्या कडु-गोड अनुभवांस । मांडण्या धजलो तुम्हापुढे ।। ४९ मज नसे तो अधिकार । नाही अभ्यास चिंतनाची धार । परंतु चिंता हृदयी अपार । भाबड्या, अबालवृध्दांची ।। ५० कैसा करतील उपदेश । ज्वलामुखीच्या तोंडास । जन्मत:च दैवाने गरिबास । धरिले ! होरपळत, आक्रंदती ।। ५१ नका दवडू समय अकारण । पुनःपुन्हा तेचतेच करुन पठण । जगण्यास आवश्यक उदरभरण । योग्य ते साधेल कां ?।। ५२ संकल्पना भ्रामक, कालबाह्य । तात्विक चिंतनाचे आरण्यकाव्य । कर्म करिता नसते संभाव्य । 'फोल'पट अखेरिस ।। ५३ 'अर्थ' असे सद्यकाली परम । निरर्थ गाळणे, त्यासाठी घाम । मोक्ष, काम वा धर्म । मिळवावा,भोगावा 'अर्था'ने ।। ५४ दारिद्रयाशी ज्याचा संग । भले प्रस्तर सहजि करि भंग । लौकिकार्थे तेचि खरा अपंग । जगाने त्याने मरणांत ।। ५५ मार्गक्रमण्या केवळ 'अर्थ' हवा । अन्यथा, क्षुधा-तृषेशि केवळ 'हवा' । मारा, चोरा, वा कर्जाने मिळवा । कारण 'अर्थ' महा-परम ।। ५६ 'अर्था'नेचि साधते सगळे । भोळ्या-भाबड्यासि गिळण्या बगळे । शुभ्र पर लेवून कावळे । भवसागरी 'ध्यानस्थ' ।। ५७ 'अर्था'नेच प्राप्त होई महत्ता । 'अर्थ' कारणे कोसळती महासत्ता । 'अर्थ' देतो आव्हान ललना-जगतां । विचलित करण्या तर्क-बुध्दी ।। ५८ कैसा वर्णू आनंद । मन होइ विभोर स्वच्छंद । पडेल कोणतेही बिरुद । उणेच, ओवण्या शब्दांमाजी ।। ५९ चक्र, अंकुश, पद्म, शुंडेवरी । मोदक सेवुनि पोटभरी । किलकिल्या नजरेचि पांखर धरी । भक्तावरी सर्वदा ।। ६० शा र दा त्रैक्षरी तत्व । शाश्वती रक्षण दायित्व । देवोनि आप्तांसि ! पूर्णत्व । पावाल, समाधाने ! ।। ६१ कळकाच्या बनांत शारदा । ग्रथाचिये पानांत शारदा । उदयास्ताच्या कनकांत शारदा । सर्वदा खुणावते ।। ६२ दृष्टी मात्र तैसी पाहिजे । मग तर्कांतुनि अर्थ निपजे । आपोआप पडघम वाजे । स्वसंवर्धनाचा ।। ६३ कसला 'कुंभ' कोण जाणे । अमृतबिंदू 'सांडले' म्हणे । नग्न देहांची प्रदर्शने । साधण्या धावति साधू, बाबा ।। ६४ ऐसे भ्रामक, भाकड कारण । परिणामी,नद्या जलनिधींचे प्रदूषण । मैला भरल्या गंगेचे करिती पूजन ?। कधी होतिल बा शहाणे ?।। ६५ ।। दास-वाणी ।। मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०५/२१ निर्भयता, दानी प्रवृत्ती, इंद्रियजय, स्वाध्याय, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, मृदुता, दया, तेज, क्षमाशीलता हे सर्व गुण दैवी संपत्तीचे अलंकार मानले जातात. मोक्षप्राप्त संतांना हे दागिने शोभतातही. असे हे श्रीमंत संत असंख्य सामान्यजीवांना देहबोधावरून आत्मबोधावर आणून ठेवतात. 'आपणासारिखे करिती तत्काळ ' हेच पारमार्थिक राजेपण होय. कोण अभागी भाग्यवान झाले । कुठल्यास्थळी रंकांचे राव झाले । कोण्या संत-महंते घडवियले । दाखवाना बाप्पा ।। ६६ 'मरा मरा' म्हणत वाल्याने । ऋषीपद प्राप्तिले अनवधानाने । मागल्या द्वारे प्रवेश संपदेने । करणे ! मान्यता पावली परंपरा ।। ६७ प्रज्ञा वा धनवंत जगी । जे जाहले ते तर कर्मयोगी । अध्यात्म, गतिची 'मिरगी' । टाळिली !मांदियाळींत 'संतां'च्या ।। ६८ कालापव्यय अनाठाई । कधीच त्यांनी केला नाही । उजळल्या भवतिच्या दिशा दाही । तर्क, बुध्दी, श्रमाने ।। ६९ मृदु भावांचा मृद्निधी । साकारुन, वज्रलेप सर्वांगी । देऊन, म्हणती, 'वचने बोलकी' । काव्य-प्रस्तर फोडित बसा ।। ७० समज दृढ एक, दुर्बोधता । उकले-आकळेना तीच कविता । चर्चा-चर्वण, विरोध करिता । स्वानंद मिळवितो समीक्षक ।। ७१ गावे, सांगावे अगदी सहज । न आळविता अनवट 'भिन्न-षड्ज' । भारवाहक उपदेशांचे सावज । वृथा श्रोत्यां करो नये ।। ७२ रसिक अखेरच्या पंक्तीत । भेदरून मंचावरचे साठवित । श्रवण-दृष्टीद्वारे मनांत । शोधण्या येतो विरंगुळा ।। ७३ प्रथम पंक्ती विद्वान विश्लेषकांची । तदनंतर मूल्यधारी प्रवेशकांची । मागे फुलवाती वळणाऱ्यांची । गर्दी असते अधे-मधे ।। ७४ दुर्बोध ज्यांचा काव्य-स्रोत । सरस्वती सारिखा सदा गुप्त । दर्शना-स्नांनांस दुरापास्त । त्यांस म्हणती 'कविश्रेष्ठ' ।। ७५ सुबोध, साधे, सरळ नि सोपे । कां न लिहिती बाया नि बापे ?। कष्टेविणा कळेल आपोआपे । ते यांना वर्ज कां ?।। ७६ संवाद साधण्या बोलीभाषा । करण्या अंतरांत प्रवेशा । माहिती, वर्णने, नोंदी वितरण्या ग्रंथभाषा । ऐसी योजना असावी ।। ७७ लिहिले, बोलले ते पोहोचणे । लक्षित परिणाम साधणे । सायास त्याचसाठी करणे । क्रियेंतून अपेक्षित ।। ७८ ।। दास-वाणी ।। भरोन वैभवाचे भरीं । सद् गुरूची उपेक्षा करी । गुरूपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/३४ प्राप्त वैभवाच्या जोरावर आपल्या सद् गुरूचीही उपेक्षा करतो. ज्या गुरूकृपेमुळे आपल्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळाली ती गुरूपरंपरा लोकांना सांगण्यासही मुद्दाम टाळाटाळ करणारा शाहाणा असला तरी मूर्ख म्हणजेच पढतमूर्ख. ( समर्थांची ज्ञानगंगा ... www.samarthramdas400.in) गुरु तर गुरुच होय । मग कोठल्याही रूपे उभा ठाय । नि:शब्द, निरव देवोनिजाय । ज्ञानामृत क्षणोक्षणी ।। ७९ गुरूसम नाही सखा । जीव एक, दोन देहांत सारखा । एक बोले, दुजा देइ हाका । अखंडित ।। ८० गुरु, जगण्यांतला पालकचि होय । तापल्या गोरसावरची देई साय । मथुनि देइ जैसि यशोदामाय । नवनीत बाल'ब्रह्मांडा' ।। ८१ ।। दास-वाणी ।। वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटी । आशागुणे हिंपुटी । करी तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/२२ जे जे चमकदार, शानदार दृष्टीला पडेल ते मनाला आवडेल इथपर्यंत ठीक आहे. ते सर्व वैभव आपल्यालाच प्राप्त व्हावे ही इच्छा निर्माण होणे, त्याची सतत चुटपुट लागणे हे अयोग्य. नुसते मनोरथ सिद्धीस जात नाहीत त्यामुळे हिरमुसला होतो हे रजोगुणी स्वभावाचे लक्षण होय. (समर्थविचार ....... www.samarthramdas400.in) सद्यकाळी चळबुळ 'पक्षां'त । सत्तास्थाने ठेवेोनि 'लक्षां'त । किमान कांही कोटींत । संपदा वोरपण्या ।। ८२ चमक एकुटी काय करेल ? शंकाच असते किति टिकेल । परंतू फोलपण जाणतील । ऐसे बहुत विरळा ।। ८३ संपदा, सत्तेची धाकुली । भगिनी ! दाखवित वाकुली । अधिकारा पाठोपाठ गेली । रडत बसली निवृत्ती ।। ८४ जे 'त्याचे' ते कां वांछावे ? । मुखरस गळेतो अभिलाषावे । कर्ज, वा अपहार अवलंबावे । पात्रांत सामावण्या ?।। ८५

Saturday, November 1, 2014

।।भासबोध।। ३५१ ते ४०० (पुस्तकासाठी विश्राम)

।। दास-वाणी ।। लागता सद् गुरूवचनपंथे । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५१ सद् गरूंनी एकदा मंत्र दिला, साधना सांगितली, त्या मार्गाला लागला की अगदी जगबुडी आली तरी ज्याची आपल्या गुरूवरील निष्ठा कणभरही कमी होत नाही तो सत् शिष्य. आत्यंतिक अडचणीतही जो साधना सोडत नाही किंवा बदलत नाही तो पैलतीर गाठतोच ! गुरु वागला यथार्थ । तरीच शिकवण सार्थ । शिष्य समाधानी परिपूर्त । मग होतो ।। ३५१ गुरु सद्यस्थित आगळे । फोल बोलांचे फेकीत जाळे । नको ते दावीत बळेबळे । नकळे कोठे नेतील ।। ३५२ न ठावे मज ब्रह्म । करित राहाता उचित कर्म । निरपेक्ष न राहाणे हेचि वर्म । गृहस्थाश्रमी जाणिले ।। ३५३ आकंठ लुटतो आनंद । भोव-यांचा करुन भेद । भव-सरितेंचा झुळझुळ नाद । ऐकतो ! हेचि का हो ब्रह्म ।। ३५४ नाही कोणी शिकवीत । अनुभवाची सारी करामत । ज्ञानेंद्रियांना ठेवोनि प्रवृत्त । अखंड अंतरी रुजवितो ।। ३५५ सद्भावनेस जागृत ठेवोनी । घडवीत राहातो जीवमात्र, प्राणी । सात्विक लक्षणि मधुरवाणी । अवलंबुनी अविरत ।। ३५६ तर्कबुध्दीचा दिवा । ज्ञानघृते तेववा । जे करितांत 'देवा'चा धावा । प्रतीक्षेंत अखंड राहोत ।। ३५७ सिध्द करिते रोज विज्ञान । अंधश्रध्देचे फोलपण । बंद डोळे आणि कान । गल्लाभरूं, परि 'संतां'चे ।। ३५८ अरे पाहा अवती-भवती । ठाई ठाई विज्ञानाची प्रचिती । करू नका आयुष्यांची माती । निष्फळ भजनी लावूनिया ।। ३५९ मंगलग्रह समृध्द लाल । मृद्-जळयोगे परिपूर्ण स्थलं । वसति योग्य म्हणे ठरेल । भविष्यांत कदाचित ।। ३६० प्रथम, द्वितीयाचे क्षेत्र । तृतीय प्रथमपदासि पात्र । चमत्कार नाही, गणितीय सूत्र । साधे, सरळ, सोपे ।। ३६१ एक येतो, एक जातो । रितेपणा भरून पावतो । सोबत्यांच्या प्रतीक्षेंत राहातो । तरी कां बा आपण ।। ३६२ एकलेपणाची वेदना । जन्म देई विविध प्रलोभनां । अपहार, आत्मघात मना । वारंवार मग खुणावतो ।। ३६३ सिध्द करा, जर खरे वाटे । की मी बोलतो खोटे । अनुभवांचे वेचीत काटे । पोहोचलो येथवरी ।। ३६४ ।। दास-वाणी ।। विवेके अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । नि:संग योगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०४/१२ सार असार किंवा नित्य अनित्य विवेक केल्यामुळे कुठल्याही वस्तु विषयी आकर्षण उरले नाही. विरक्ती मुळे व्यावहारिक गोष्टींशी फारकत घेतली. अंतर्बाह्य मोकळा झालेला हा नि:संग साधक योगी मानावा. ऐसा कैसा अतर्क्य निष्कर्ष । काढिती समर्थराम दास । नि:संग, विरक्त पळपुट्यास । म्हणती साधक योगी ?।। ३६५ शेजेवरी वर्षे इतुकी । कुठल्या 'योगे' भोगिली सखी । लुटावयास ना उरले बाकी । म्हणुनि पळे पाहा 'चोर' ।। ३६६ म्हणे हे आदर्श रामभक्त । नशीब, राम नाही सद्यकाळांत । धरुनी छाटी, कमंडलूस । असते दिले सुळावरी ।। ३६७ शोषितासि निराधार सोडे । त्या मातीवरी उभारी वाडे । त्यांच्या मनगटी सुवर्णकडे । चढवू पाहाती कां दास ।। ३६८ हे तर जाणा नारी अरि । संसारास म्हणती उघड्यावरी । न्हाणुल्या लेकी, सुना घरी । टाकुनि ! म्हणति 'व्हा साधक' ?।। ३६९ ।। दास-वाणी ।। जाणावें दुसर्याचें जीवीचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०५/३४ समोरच्या माणसाच्या मनातील विचार त्याच क्षणी तो काही न बोलता ओळखणे याला मनकवडा म्हणतात. ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याने तो फार मोठा ज्ञानी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाचे लक्षण नाही. पाहावें आपणासी आपण या नांव ज्ञान. स्वत्व तर जाणांवेचि प्रथम । तत्पश्चात इतरांचे अंतर्याम । जाणिवेशि तोलतां जाणीव । सुख-दु:खे प्रकर्षें भिडतील ।। ३७० ।। दास-वाणी ।। रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/४४ रथ किंवा कुठलेही वाहन वेगात धावत असताना दोन्ही बाजूची जमीन तितक्याच वेगाने उलट दिशेने मागेमागे सरकत आहे असा भास होतो. प्रत्यक्षात जमीन स्थिरच असते. भौतिक शास्त्रातील दृष्टांत वापरून समर्थ सांगताहेत की मायेमुळे अनेक रंग रूप आकारांत व्यक्त झालेला मुख्य देव आपल्याला दिसतो, भासतो परंतु त्याचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार असेच आहे. (सूक्ष्म आशंका निरूपण समास ज्ञानदशक. ) भूमी जर धावली उलट्या दिशेने । वेग रथाचा वाढेल दुपटीने । भौतिक सिध्दतो ऐशा लक्षणे । वैज्ञानिक सत्य ।। ३७१ कोठे सांगा दिसतो 'देव' । मूर्ती तर पाषाण संभव । 'त्या'च्या नावें उच्चरव । कोणत्या कारणे करावा ?।। ३७२ सुसंस्कृत, विकृत स्वभावता । माणसे विविध स्थळी भेटता । विशुध्द जोपासता वा नासता । कोठे असतो तुमचा 'देव' ?।। ३७३ आंता ऐका सांगणे । एकचि आहे मागणे । करोनि टाका आम्हास उणे । अध्यात्म, गति, मोक्षांतुनी ।। ३७४ आम्ही तर 'गति' प्राप्तं । जगता जगता मरणांत । मोक्ष आम्हा सदाचि परोक्ष । राहिला तर बरेचि ।। ३७५ असो थंडी, वारा, ऊन । स्वेदगंगेत आनंदे न्हाऊन । बांसगांव ठेवू बांधून । कुबट कद, सोवळी ।। ३७६ शिशिर, ग्रीष्म वा श्रावणसरी । सर्वत्र आम्हा आनंदाच्या परी । निर्ढावलेल्या कणखर शरीरी । झेलू, रिचवू, पचवू अखेरपर्यंत ।। ३७७ ।। दास-वाणी ।। तेजीं असे परि जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनी असे परी कळेना । परब्रह्म तें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०४/३२ निर्गुण निराकार असलेले परब्रह्म हे सर्व चराचराला व्यापूनही शिल्लकच असते. तो ईश्वर अग्नीमधेही असतोच पण इंधनासारखा जळून संपत नाही. वायूमधेही अस्तित्वात असतो पण वावटळीबरोबर हलत नाही. तेच परब्रह्म आकाशात असते तरी जनसामान्यांना ते दिसत नाही. सिद्धपुरूषांना मात्र ते विमलब्रह्म ठायीठायी अनुभवास येते. काय पडले आकाशांतुनी ? 'सिध्द' ? हे तर अध्यात्माचे वाणी । आद्य निसर्गाची लेणी । संबोधिती 'परब्रह्म' ?।। ३७८ नसते ज़र एक पेशीय जीव । 'अध्यात्म' ठोकण्या उत्क्रांत मानव । जाहले असते संभव ?। सांगा बरे ।। ३७९ आतां तरी या भानावर । पंचमहाभूतांचा आविष्कार । क्षणोंक्षणि देतीं साक्षात्कार । वंदनीय खरे तेची ।। ३८० हडपोनि संचित, करोनि निर्धन । वृध्द माय-तांत हताश पराधीन । देतां,दयानिधींच्या भरवशां सोडून । ऐसे करंटे वर्णांने कैसे ।। ३८१ मजपाशी नाही लौकिक, धन । 'शब्द' केवळ उपजीविके साधन । त्या आधारे मन तवाव, प्रसन्न । ठेवू पाहातो ।। ३८२ जर कांही अधिक उणे । लिहिले गेले उद्वेगाने । त्यासाठी 'क्षमस्व' म्हणणे । आवश्यक अखेरीस ।। ३८३ नाही अधिक्षेप करणे, अंतरी । बल वापरुन कर्म घरी-दारी । नाही केले ! विश्वास धरी । मायबापा ! अन्यायगर्भी संताप ।। ३८४ सोड सोड ना माझ्या अक्षरबाळा । धड धड वाजतो पडघम आगळा । वेड-सूड, मूळ विकृतविकार ज्वाळा । बघ मजला बाहती ।। ३८५ मी संतापी, करंटा भोगलोलूप । मज सगळे पुण्य नि पाप । सारखेचि ! अनुष्ठान-जप-तप । नावडलेच निरंतर ।। ३८६ ।। दास-वाणी ।। उंचनीच नाही परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरूष अथवा नारी । येकचि पद ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२४ त्या मुख्य देवापाशी कुठलाही भेदभाव नाही. मग तो राजा असो वा भिकारी, स्त्री असो वा पुरूष सर्वजण एकाच समान पातळीवर येतात. प्रत्येकाला साधनेअंती येणारा आत्मानुभव सारखाच उत्कट असतो . मी लिहितो तो उपदेश ?। मलाच येउ लागला त्याचा वास । काय म्हणुनि 'सद्भावी' 'संतास' । 'पोकळ' मग म्या म्हणावे ।। ३८७ तरि निक्षून सागतो बाप्पा । ढोंगीपणा, भाकड, थापा । टाळा ! दावा निखळ रूपा । जैसे निसर्गे घडविले ।। ३८८ जीवजंतू वा उत्क्रांत मानव । स्थल काल भिन्न तरि एकच भाव। निसर्ग मर्यादेंत शोधणे ठाव । जगण्या !जोवर ना मरण ।। ३८९ जनकल्याण संतांचा श्वास । शब्द माझे, तर उत्सर्जित नि:श्वास । कदाचित बोधाचे भास । होइल ! परि फसूं नका !।। ३९० जर समान नर नारी । त्यजुनि संसार भोगोत्तरी । शोधाया मोक्ष-गति, द-या खोरी । सांगिती केवळ नरास कां ?।। ३९१ निसर्गे जखडिले नारीस । उच्चाटुनि 'मातृपदास' । श्वशुरगृही भोगत राहाते त्रास । परागंदा पती जरी ।। ३९२ ओवींत गुंफिता शब्दक्रमणा । नकळे कोठेनि मिळाली प्रेरणा । दासांच्या मार्गप्रदीप्तीविणा । बहुधा नसते झाले संभव ।। ३९३ आसने मर्यादित जरी । मात्र कामना अंतरी धरी । स्वप्नाळू बुभुक्षित चर्येवरी । भाव कांही मिटेना ।। ३९४ सर्व मण्यांची माळ एक । कुणि पोवळ्, पाचू वा मौत्तिक । सूत्रांतुनि ओघळणे स्वाभाविक । त्यांसा कैसे उमगेना ?।। ३९५ अंत येता नाही परतणे । प्रत्येक जीव अंतरि हे जाणे । 'वेळ' आली तरी झगडणे । आप्तां सांगे 'सोडू नका' ।। ३९६ सहज निवृत्ती कठिण फार । उसने अवसान करी जोर । 'बलवंत' आहे शरीर, अंतर । कथित राही परिवारा ।। ३९७ सनई, चौघडे, ढोल, ताशे । मर्तिक, विवाह वा बारसे । धनिकांघरी 'सोहळे' असे । होती ! सेवकां पर्वणी ।। ३९८ मी आरडतो कोणत्या काजे ?। कष्टकल्लोळांची वेदना गाजे । महानगरांत आयुष्य माझे । व्यतीत झाले ! म्हणोनी ?।। ३९९ शतके चार, अखंड प्रवास । मजसाठी कैसा महत्प्रयास । प्रेमभरे कवटाळा पामरास । उरी धरोनि, निरोप द्या ।। ४००

Sunday, October 19, 2014

।।भासबोध।। ३०८ ते ३५०

।। दास-वाणी ।। ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/३१ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जरी काही कारणाने षोडशोपचार यथासांग पूजाविधी करता आला नाही तरी त्याची खंत न बाळगता मानसपूजा सुरू करावी. परमेश्वर सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्यामुळे आपण मनानेच कल्पना करून वाहिलेली पाने, फुले, फळे, गंध, अक्षता थेट त्याच्यापर्यंत पोहोचतातच. फक्त आपल्या मनात तो उत्कट अर्चनभक्तीचा भाव मात्र असावा. रामकृष्ण परमहंस कालीमातेची मानसपूजा नेहमीच करायचे. जर असशी सर्वव्यापी सर्वसाक्षी । उद्योग सोडोनि अबाल-वृध्दासी । मग वारी कां बा करविशी । फुका, कष्टप्रद ?।। ३०८ मनोमनी वेधतो आम्ही । सतर्क राहोनि दिशा दाही । उपजीविकेची साधने कांही । त्यासि संबोधा परमेश्वर ।। ३०९ प्रार्थना पूजेचे काय काज ? उदरभरणां घास रोज ?। आणि रात्री निवांत नीज ?। अट्टाहास त्याकारणेचि ना ?।। ३१० प्रांत:काळी छकुल्याचे हसू । वयस्कांचा सावरी स्पर्शू । अस्तुरिचा लाडिक कटाक्षू । लाभता सगळे पावते ।। ३११ क्षणोक्षणी पाठोपाठ । तिन्ही त्रिकाळ उपदेशाचे लोट । त्याने कां भरते पोटं । भस्मपट्टेधारींनो ।। ३१२ हातांत नाही घेत झोळी । वा पंचपात्र-पळी । कर्मोत्तरीच मिळते पोळी । आम्हासारख्यांना जगी ।। ३१३ कां दवडता उगा वाफ । म्हणतां 'वारितो आम्ही पाप !'। पडता पोळीवर अनासाय तूप । होता क्षणार्धांत अदृश्य ।। ३१४ जोडोनि दोन हस्तक । तुकवोनि एक मस्तक । समस्त आम्ही सांसारिक । विनम्र असतो सदा ।। ३१५ हे लिहीलं कोणीही, लिहावे । अंत:करण मथुनि व्यक्त व्हावे । धगधगते शब्द 'ओवीं'त जावे । मोकळणे हेतू ।। ३१६ ।। दास-वाणी ।। आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेता जीवें । देवहि त्रासे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१३ त्या एका परमेश्वराशिवाय कोणीही संकटातून मला वाचवू शकणार नाही अशी ठाम श्रद्धा म्हणजे अनन्यभाव. तो असला की आपोआप योग्य तो मार्ग दिसतोच. आपल्या निष्ठा जर बदलत राहिल्या, अनन्यभाव ढळला तर आपल्याच देहात वास्तव्यात असणारा आत्मदेवही त्रासून जातो. आतून येणारे स्फुरण थांबते आणि कार्यही बिघडते. माहीत असोनि हे सारे । कां कष्टविती शरीरे । माय-बाप, अस्तुरी, पोरे । सुखवा ! 'देव' जाणा तिथेचं ।। ३१७ विचार आप्त-स्वकीयांचा प्रथम । विस्तारलेला कल्पद्रुम । देवोनि वात्सल्य-ममता प्रेम, । जोपासला जो आपणचि ।। ३१८ देव जर असला सर्व ठाई । आप्तांमधे तो कां नाही ?। सोडून पळण्याची घाई । भोगोत्तरि कां संतांना ?।। ३१९ ना मी रुजवू पाहातो विषवल्ली । माझी प्रामाणिक ही 'काका'वली । सद्भाव, निष्ठेने सरसावली । निर्मूलण्या अंधविश्वास ।। ३२० ।। दास-वाणी ।। शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे तें येथार्थ । परी आपण मिथ्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/१०/१ ९ एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी शब्द आवश्यकच असतात. त्या वर्णनातून वस्तू समजली की शब्दांचे महत्व संपले. शब्दांनी सांगितले ते यथार्थ असल्यामुळेच जरी आकलन झाले तरी निव्वळ शब्द हे मिथ्याच मानावे कारण त्या वस्तूवर्णनापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. जिचे वर्णन शब्दांनी केले गेले ती मूळ वस्तूच सत्य मानावी. इथे वस्तू हा शब्द परब्रह्म या अर्थाने घेतल्यास उलगडा अधिक स्पष्ट होईल. डोळसांसाठी प्रतिमेचा ठसा । मेधा सहजचि रुजविते सहसा । श्रवणे वेधलेला शब्दार्थ योग्यसा । ताड़ून पाहते तर्काने ।। ३२१ केवळ प्रतिमा वा शब्द । वा वेगळा ठेवला अर्थ । जर तर्क ताडण्या असमर्थ । फोल ठरतो प्रयास ।। ३२२ भाषांमध्ये शब्द समानार्थी । उच्चार, लिपीरूपे विविध धारिती । प्रतिमेशि परि एकवटती । केवळ तर्कबळाने ।। ३२३ तर्काविना तथ्यहीन । भाषण, उच्चारण, लेखनं । असंबध्द, बेलगाम,बेभानं । केवळ जाणा 'नाद' तो ।। ३२४ ।। दास-वाणी ।। सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासारविचारें । संतसंगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०६/५५ साधनेची सुरूवात मूर्ती, प्रतिक किंवा चिन्ह डोळयासमोर ठेऊन होते. चर्मचक्षू ते पाहू शकतात म्हणून मन एकाग्र होते. पुढे सद् गुरू, संतकृपेने ज्ञानचक्षू उघडले की साकार समोर नसले तरी निर्गुण परब्रह्मावर लक्ष केंद्रित होते. सार म्हणजे काय जपावे, असार म्हणजे काय टाकून द्यावे हा विचार पक्का होत जातो. देवशोधन दशकात मुख्य देव संतसंगानेच मिळतो हे सांगताहेत. डोळे मिटता विवंचना । समोर ठाकती संकटे नाना । त्या गर्दींत 'देव' गणां । स्थान कैसे लाभावे ?।। ३२५ अंतर्यामी विविधांच्या मूर्ति भिन्न । प्रेमिका, चंडिका, परिचारिका ! वयास अनुसरून । प्रत्यक्षावे कि भग्नावे स्वप्न । अवलंबे इप्सितावरी ।। ३२६ ।। दास-वाणी ।। भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद् गुरू जाणावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/११ भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. गो म्हणजे गाय परब्रह्माचे प्रतीक. वत्स म्हणजे संसारात अडकलेला जीव. प्रपंचरूपी वाघाने मनुष्यावर उडी घालून त्याची परमेश्वरापासून केलेली ताटातूट जो थांबवतो आणि जीवब्रह्माचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करतो तो सद् गुरू ! थोडक्यात सामान्य प्रापंचिकाला जो परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद् गुरू होय. कां करता बा ताटातुट । ब्रह्मभेटी साठी आटापिट । सुखदु:खांशी भव भेट । होता आम्ही समाधानी ।। ३२७ नका होवू कल्याणकारी । तोडून आम्हा विविधपरी । जिवाभावाच्या संसारी । पोरके करण्या सरसावू नका ।। ३२८ नका होवू कराल दैत्य । तुम्हा जरी 'ब्रह्म' सत्य । ना संसार, आप्त, अपत्य । म्हणोनि हेवा करू नका ।। ३२९ तरुणहो वेळच्या वेळी । भोगसुखे, मिळवा सगळी । काळ पळतो न देता हाळी । अन्यथा उरते विदग्धता ।। ३३० ग्रंथ वाचणे, अभ्यासणे । आशयांत न गुंतोनि जाणे । रुचेल, रुजेल ऐसे निवडणे । श्रेयस्कर ।। ३३१ निरुद्योग्यांशी अध्यात्म । भजनि लागा सोडोनि काम । नसल्या 'देव' 'मोक्षा'चा नित्यनेम । व्यसनांचे हे व्यपारी ।। ३३२ म्हणती ठेवा दक्षिणा । फळे-फुले मिष्टान्न आणा । मग दावीन चमत्कार नाना । ऐसे लोभी हे 'महाराज' ।। ३३३ सावध राहा ऐशांपासुनी । लाथाडा फोलपट त्याची वाणी । उधळा, जाळा काळी करणी । म्हणा, ' जा मोक्षाप्रती !' ।। ३३४ ।। दास-वाणी ।। जे जे रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडली गळां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२४ शिष्याला जे आवडेल तेच गुरू करतो. त्याच्या लहरीप्रमाणे वागु देतो. शिष्य साफ चुकला तरी त्याला योग्य ती समज देण्याऐवजी त्याचीच मनधरणी करतो असा लाचार गुरू. आश्रमाचा खर्चच मुळी श्रीमंत शिष्य भागवत असतो ना . इलाज नाही कामनारूप पापिणी गळयात पडलेला हा भोंदू गुरू कोणाला मोक्ष मिळवून देणार कोण जाणे ? ऐसे माजले 'शिक्षण सम्राट' । भोवती गोडवे गाणारे भाट । गुणी, बुध्दिवंताने त्यांतुनी वाट । शोधावी कैसी ? सांगा बरें !।। ३३५ परीक्षा देती शिक्षकगण । सोडविती शिष्यांचे प्रष्ण । ऐसे 'आनंददायी' शिक्षण । म्हणे, 'प्रगती योग्य' साधेल ।। ३३६ कांही महाभाग 'सम्राट । स्वशिष्येशि लाविती पाट । यथेच्छ भोगोनि सोडिती मोकाट । अश्रू मुकाट ढाळावया ।। ३३७ सगळिच माजली बजबजपुरी । धन-संपत्ती वोपरून सत्ताधारी । तडस लागेस्तो मिष्टान्न-पुरी । म्हणती 'चाटा उत्सर्जित !' ।। ३३८ ।। दास-वाणी ।। तैसे आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तरीं सामग्री पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/११ साधना करता करता गुरूकृपेने परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान झाले तरी आत्मबोधावर स्थिर होण्यासाठी साधना सुरूच ठेवावी. साधनाक्रमही तोच असावा. बदल करू नये. कितीही तुडंब जेवलो तरी संध्याकाळ साठी जसा शिधा तयार ठेवावाच लागतो तसच ज्ञानोत्तर साधनेचे आहे. आता पुरे असे कधीच म्हणता येत नाही. 'पुरे पुरे आतां' नये म्हणू । नुरे नुरे होतं नाही ज्ञानाचा घनु । खरे खरे भेटतां शिष्यवरु । उचंबळे गुरुहृदय ।। ३३९ जैसे जिरते ज्ञानामृत । बौध्दिक कृती तीक्ष्ण होतं । नीर-क्षीर विवेके सुकृत । घडविते आपोआप ।। ३४० ।। दास-वाणी ।। सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४९ जो दुश्चित्त नाही म्हणजेच अत्यंत सावध आहे, विशेष प्रयत्नांचे सातत्य ज्याच्यामधे भिनलय, चिंतन मनन करू शकणारी बुद्धी म्हणजे प्रज्ञा अंगभूतच आहे आणि परमेश्वराविषयी अपार श्रद्धा आहे तो सत् शिष्य ! अशा शिष्याला साधनेचे फार कष्ट पडत नाहीत किंवा पडले तरी ते बिलकुल जाणवत नाहीत. ।। दास-वाणी ।। तया स्वानमुखीं परमान्न । की मर्कटास सिंहासन । तैसें विषयाशक्तां ज्ञान । जिरेल कैचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/६२ मेधा, प्रज्ञा, तर्कशक्ती । बुध्दीची आभूषणे असती । वर्धमान ती होता प्रगती । कृतिमधे दृश्यमान।। ३४१ विना योगे यांच्या होडी । भवसागरांत करते कोंडी । शीड, वल्ह्याविना नावाडी । हताश जैसा ।। ३४२ अरुणी वा एकलव्या । अदृश्य गुरु, देतो छाया । दक्षिणापेक्षा केवळ परीक्षाया । निष्ठा, साधना स्थिर मति ।। ३४३ कुत्र्याला पंचपक्वान्ने भरवली, माकडाला राजसिंहासनावर बसवला तर जो परिणाम होईल तीच गोष्ट एखाद्या दैनंदिन सुखविलासात लोळत असलेल्या शिष्याला आत्मज्ञान शिकवायला गेले तर होईल. अनधिकारी शिष्याला ब्रह्मज्ञान आवडणारही नाही अन् पचणारही नाही. श्वान, मर्कट, कुशिष्य जरी । मिष्टान्न, सुकृताची आंस धरी । स्वप्नांची आव्हाने त्यांच्या स्वीकारी । तोचि खरा गुरू ।। ३४४ जीव सगळे सारखेचि ना ? मग कां हेटाळता सर्वदा त्यांना ? प्रलोभना तुम्हि कधीच ना । शरण गेला ?।। ३४५ ब्रह्मचा-या विषयभोग । पंगूसि शारीर आवेग । अवकाशी उल्केशि पतनयोग । निसर्गदत्त, स्वाभाविक ।। ३४६ विकाराविना जीवमात्र । जगण्या असतो सत्पात्र ?। सत्प्रवृत्तीचा अवलंबुनी वेत्र । दुष्कृत्य वारी तो भला ।। ३४७ ओसाडावर फुलवी मळा । त्यां वंदावे कृषिवलां । खडक, तणास कधी न भ्याला । कार्यप्रवण एकाग्र ।। ३४८ 'हा असा, तो तसा' म्हणती । कार्यपरावृत्त सदैव होती । वृथा कालापव्यय करिती । जाणा तें बाष्कळ ।। ३४९ आखुनी वेळीच कार्यकक्षा । लाभार्थींच्या रास्त अपेक्षा । पूर्ततेसाठी करिति दुर्लक्षा । संकटांकडे ! कर्मयोगी खरे ।। ३५०

Thursday, October 9, 2014

।।भासबोध।। २५६ ते ३०७

।। दास-वाणी ।। रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०६/०१ एखाद्याचे रंग रूप उंची बांधा कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे बदलता येत नाहीत. सह ज म्हणजे जन्मत: जी ठेवण घेऊन मनुष्य येतो ती अपरिवर्तनीय असते. तरीही स्वत: प्रयत्नपूर्वक जे सद् गुण किंवा कौशल्य अंगी बाणवणे शक्य आहे त्यासाठी कष्ट केल्यास नैसर्गिक उणीवा भरून काढता येतील हे नक्की. चित्तवृत्ती स्वभाव । सहजची देतो अनुभव । प्रामाणिक वा अन्य डाव । मुद्रेवरी उमटतो ।। २५६ सरळ नासिका, नेत्री चमक अद्वितीय । शुभ्र दंतपंक्ती, सुबक ओष्ठद्वय । प्रमाणबद्ध श्रवणेंद्रिय । लक्षणे कां सुरूपाची ?।। २५७ वाणींत, स्पष्ट मृदु भाष्य । मुद्रेवरी स्मित हास्य । धारण करणे अवश्य । समाजांत जातांना ।। २५८ नासिका चाफेकळी असे । सावध नजरेंत मृग विलसे । ओष्ठद्वय ताज्या गुलाबासम भासे । कर्ण प्रमाणबध्द समांतर ।। २५९ हे सर्व काय कामाचे । जर मुद्रेवर दुर्भिक्ष हास्याचे ।नासिकेस वावडे सरळपणाचे । आणि जाळे आठ्यांचे कपाळी ।। २६० ।। दास-वाणी ।। विद्या नाही बुद्धी नाही । विवेक नाही साक्षेप नाही । कुशलता नाही व्याप नाहीं । म्हणोन प्राणी करंटा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१० शिकला नाही, तशी बुद्धीही झाली नाही त्यामुळे योग्य अयोग्य निवडण्याचा विवेक नाही. आळसामुळे प्रयत्नांचे सातत्य नाही. कौशल्य कधी अंगी बाणलेच नाही त्यामुळे कामाची व्याप्ती मर्यादित राहिली असा माणुस दरिद्रीच राहणार. जाणपणनिरूपण समासात समर्थ करंटलक्षण सांगताहेत. श्वापदेसुध्दा धरिती सावज । प्रस्तर जळबळे फुटता करि आवाज । तमगर्भी दीप्यमान होई वीज । प्रळयवेळी ।। २६१ हालेना डुलेना कांहीकेल्या । ऐसा बैल, सांगा तेल्या । काय कामाचा भल्या । भुईला भार नुसता ।। २६२ ।। दास-वाणी ।। वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । काहीं केल्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०२/०८ सभेमधे वक्ता बोलतोय.विषय छान मांडला जातोय. अशा वेळी आपण मध्येच त्याला अडवून शंका विचारू नये. त्याने आपले पांडित्य तर सिद्ध होणार नाहीच उलट एकाग्र झालेले श्रोते विचलीत होउन सभेचा बेरंग होईल. आपण स्वत:चा विद्याभ्यास करूनच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधावीत हे उत्तम लक्षण ! शंकांचे निराकरण । करण्या ज्ञान संवर्धन । परंतु सकल निरुपण । श्रवणोत्तरी, करोनि घ्यावे ।। २६३ टोकण्या, गाठू नये टोक । नि:शब्द चिंतनाचा विवेक । अवलंबुनी, व्हावे विश्लेषक । आशया, विषयाचा ।। २६४ ।। दास-वाणी ।। करंटयास आळस आवडें । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०३/०४ करंटा म्हणजे कर्मदरिद्री. तो आर्थिक दारिद्र्यात नसेलही कदाचित. परंतु आयुष्य कायम असमाधान अशांतीमधेच जाते. आळस म्हणजे काहीही करायचा कंटाळा. प्रयत्न कष्ट उद्योग याला आवडत नाहीत. याच्या इच्छा चमत्कारिक असल्याने इच्छापूर्तीचे मार्गही सरळ सात्विक नसतात. गैरमार्गानेच व्यवहाराकडे करंटयाचा कल असतो. विनाकष्ट संपदा प्राप्ती । एहिक सुखांची देई प्रचिती । परंतु अधोगतीची निश्चिती । नकळत हळुवार, जाणा ।। २६५ आळसाने वाढे मेद । पाठोपाठ बुध्दिभेद । अंती देह-अंतरिचा आक्रंद । आपोआप ।। २६६ ।। दास-वाणी ।। अंतर्निष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्य्रांची संगती खोटी । मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०५/१९ साधना करता करता मन अंतर्मुख केलेल्या व्यक्ती उच्च प्रतीच्या मानाव्यात. बहिर्मुखी मनाचे लोक खाणे पिणे, कपडे लत्ते यात मशगूल असल्याने त्यांची संगत प्रगती पथावर नेत नाही. ही गोष्ट शाहाणे जाणतात. मूर्ख आणि चंचळ समजू शकत नाहीत. म्हणोनि घ्यावा धांडोळा । स्वांतरीच्या नाना कळा । दर दिवसा एक तरि वेळा । पारखाव्या चिंतनी ।। २६७ विचार विकारांची दळे । स्व-तेज, वा तमोबळे । उन्नतीप्रति क्रमण सगळे । पाहतील ग्रासू ।। २६८ तरी अढळ ठेवावा विश्वास । फेडत शंक-कुशंकांचे पाश । आपुल्या विहित कर्मास । जात राहावे सामोरे ।। २६९ मी हा ऐसा उपदेश । साक्ष ठेवोनि वास्तवास । पुराणांतील आदर्शवादास । शब्दांकितो भेदण्या ।। २७० ।। दास-वाणी ।। मन दिसते मां धरावे । ज्याचें त्यानें आवरावें । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/१७ सूक्ष्मदेहाचा एक भाग असलेले मन हे दिसत नाही, दाखवता येत नाही, धरून पकडता येत नाही. परंतु प्रत्येकाला स्वत:ला मात्र पूर्ण जाणीव असते की ते कुठे भरकटलय. ज्याने त्याने मनाच्या मुसक्या बांधाव्या, त्याला आवरावे आणि आत्मविवेकाने श्रवणाच्या अर्थाकडे लावावे. तर आणि तरच उन्नती आहे. अतर्क्य घटना, गर्दी, कल्लोळ । मन ठेवणे स्थिर निश्चल । कष्टप्रद ! तरि उत्तम फल । अनुभवावे ।। २७१ परिस्थितीजन्य अस्वस्थता । सुधारते वातावरण निवळता । कालौषधि एकमेव असतां । फोल सर्व उपाय ।। २७२ म्हणोनि दैवावरी भिस्त । ना ठेवतो आम्ही समस्त । कर्मधर्म राहतो साधत । अविरत ।। २७३ मग शरण आपोआप । संकटे येती टाकींत धाप । पदरांत देती माप । यशाचे, प्रयत्नांति ।। २७४ द्विशतकोत्तरी सप्तदशके । वर पंचम, लिखाण इतुके । फोलपटे नि 'जळ'मटांचे पुंजके । जणु, म्यां पामरे प्रसविले ।। २७५ कलानिधि, साहित्यिक नामी । नसतांना ! कोण्या अधिकारे मी । 'प्रतिबिंब ओवी' प्रबंध कर्मी । म्हणोनि जाणला जावा ?।। २७६ ।। दास-वाणी ।। मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/११ एखादा जाणकार श्रोता पुष्कळ सभा, कीर्तने, निरूपणे वर्षानुवर्षे ऐकत असतो. यथावकाश त्याच्या ज्ञानात खूपच भर पडलेली असते. त्याला कुठलाच विषय नवीन वाटत नसल्याने तो सभेमधे वाक्यावाक्याला अडथळे आणतो. पांडित्य दाखविण्याच्या हव्यासात तो इतर श्रोत्यांचे श्रवण सुद्धा बिघडवतो. हा श्रोता ज्ञानी असला तरी अवलक्षणीच मानावा. बेभान वक्त्याची, अनावर । सहसा टाळिते नजर । म्हणोनि भले वाटू दे अडसर । लक्ष वेधण्या मधेमधे ।। मंच मिळतांच सुटतांत । विषयांतरी बरळतांत । त्यांना भानावर आणणे क्रमप्राप्त । होते नाइलाजे ।। २७७ वेदना, व्यथेचा आवाज । विरून जातो, गर्जता मत्त गाज । बहुधा असते जी विनाकाज । भाटांना सुखावण्या ।। २७८ गरिबांचा जो कैवारी । जो असतो परोपकारी । 'सत्ता'धा-सास त्रास भारी । सहसा होतसे ।। २७९ कार्यकारणभावाचे भानं । सहजचि जाती विस्मरुन । गांजल्या शंकांचे रानं । अडसर वाटे ऐशांना ।। २८० व्हा आक्रामक, प्रष्णकर्ते । शोधा वाचाळ निष्क्रिय नाकर्ते । विद्वान जरि म्हणविती ते । उत्तरदायित्व त्यांसि शिकवा ।। २८१ ।। दास-वाणी ।। बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंवीण तत्वता । कार्य न चले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२१ परमेश्वरापाशी पोहोचण्यासाठी जी नवविधा भक्ती सांगितली आहे तिची सुरूवात श्रवण आहे. ऐकणे ही पहिली पायरी अत्यावश्यकच. त्यानंतर मनन, चिंतन येते. मग मनात ज्ञान मुरायला लागते आणि शेवटी आचरणात येते. श्रवणाशिवाय पुढचे सर्व टप्पे अशक्य, त्यामुळे अन्य कोणतीही ज्ञानसाधने श्रवणापुढे कनिष्ठ होत. बहुधा स्वतःव्यतिरिक्त । इतरांचे संवाद, ध्वनिसंकेत । नावडणारेच बहुसंख्येंतं । आढळतांत सहसा ।। २८२ ऐकत जावे सर्व कांही । परंतु त्याची धरुन बाही । अवलंबून राहाणे बरे नाही । आधारास्तव कदापी ।। २८३ स्वमति, मंथनोत्तर विचार । स्वानुभव, जगण्यातिल अपार । संयम, विवेक सारासार । स्मरावा कृतिपूर्व ।। २८४ कां असले अक्षर-पांप । विधानार्थाना येई दर्प । की मज डसला सर्प । अगंकाराचा ?।। २८५ ।। दास-वाणी ।। मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१९ सगुण म्हणजे ज्याला रंग रूप आकार आहे असे मूर्त स्वरूप. कुठल्याही स्वरूपातल्या मूर्तिरूप देवता समोर नसतील तर आणि ऐकणारे श्रोते विद्वान अभ्यासू असतील कीर्तनकाराने अद्वैत शास्त्रांचे निरूपण जरूर करावे. 'अहम् ब्रह्मास्मि ' हा भाव समजण्यासाठी श्रोता जाणकारच हवा. ऐका एक सुरसा कथा । शब्दांनी सजली होती गाथा । ग्रंथ होता पुरेपूर सर्वथा । परंतु निरक्षरा काय त्याचे ?।। २८६ कोणे एकाने आणिले चित्र । उलगडू लागला आशयाचे गोत्र । निरक्षराने तेंव्हा मात्र । प्रतिबंधिले ।। २८७ कारण, समजणे सोपे । जाणवते आपोआपें । शब्देविण आशय छापे । सहजचि चित्र ।। २८८ विद्वान, ज्ञानियांच्या जगी । प्रगल्भांची मांदियाळी जंगी । अक्षरांचा उदोउदो जागोजागी । निरक्षरा अप्राप्य ।। २८९ शब्दसंभार ऐकताक्षणी । अर्थाची समूर्त लेणी । ऐसी असावी मांडणी । समग्र ग्रंथांची ।। २९० चित्रमयता सोपी नसे । अभावानेच प्रतिभेंत विलसे । सहजी अनुभवास न येतसे । पढत पांडित्यांत ।। २९१ श्रवणेंद्रियांची सजगता । उच्चारेच्छेची करिते पूर्तता । मेधा तर्कबळे विश्लेषिता । साकारते चित्र ।। २९२ ।। दास-वाणी ।। पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती । तेचि पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१० मंदिरामधे कीर्तन सुरू आहे. समोर राम, कृष्ण, शंकरादि कुठल्यातरी दैवताची सुंदर मनोहारी रमणीय मूर्ती आहे. श्रोते छान सगुणाच्या आख्यानासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी जर कीर्तनकाराने निर्गुण ब्रह्माचे निरूपण सुरू केले आणि परमेश्वराच्या सगुण रूपाचे खंडण सुरू केले तर तो ज्ञानी असला तरी मूर्खच ! पढतमूर्ख मानावा. कौतुक करावे पाथरवटाचे । काष्ठ-पाषाण-मृद् कसबकाराचे । अनुल्लेखे टाळण्या-याचे । उपटावे कान ।। २९३ समूर्त-सगुण-साकार ठाकले । जेंव्हा प्रस्तरें घाव सोसले । स्वेदगंगेंत चिंब झाले । छिन्नी-हातोडीसह हात ।। २९४ मूर्तीचे मंद स्मित । भरून वाहते काळजांत । ओघळते प्रेय अश्रुरूपांत । सांगा श्रेय कुणाचे ?।। २९५ ।। दास-वाणी ।। हरिनामे प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायणनामें पावन जाला । अजामेळ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१७ दैत्य, राक्षस कुळातला असुनही प्रल्हाद सतत नारायण नारायण असे नामस्मरण करायचा. त्याचे वडील हिरण्यकश्यपु. विष्णुच्या द्वेषापोटी स्वत:च्या मुलाला सुद्धा हर प्रयासाने ठार करण्याचे प्रयत्न केले. केवळ नामस्मरणामुळे प्रल्हादाचे रक्षण झाले. अत्यंत पापी नामद्वेष्टया अजामेळ नावाच्या ब्राह्मणाने रोगजर्जर अवस्थेत स्वत:च्या नारायण नावाच्या मुलाला आर्ततेने हाक मारली, विष्णुदेवांना नाही. तरी देखील अजामेळ वाचला आणि पुढे उत्तम गतीस पावला. अभावितपणे केलेला नामोच्चारही जर तारून नेतो, तर समजून उमजून निष्ठेने केलेले नामस्मरण कितीतरी अधिक फलदायी ठरेल. होय ना ? नाम घेत राहा बसून । कवळ मुखी येईल आपणहून । कृतिशीलतेस छेद देऊन । म्हणे 'मोक्ष' मिळतसे ।। २९६ हा कसला उपदेश ?। कां सुचला ऐशा 'संतास' ?। कर्मधर्माचा करण्या -हास । कसा बा सरसावला ?।। २९७ हा गीतासाराचा अवमान । आलस्यभावाला निमंत्रण । कर्मेच्छेचे निर्घृण वपन । या परते कोणते ?।। २९८ आवरा आवरा ऐशा नरा । सावरा सावरा सामान्यांच्या संसारा । भवरा भवरा, सुखसरितेच्या उदरा । अवजार कृतिनाशाचे जाणा ।। २९९ अध्यात्म,मोक्ष कल्पना भ्रामक । स्वेदगंगेंस आटविणारा पावक । भोंदू, संधिसाधूंची विकृत भूक । शमवेलही हा कदाचित ।। ३०० जरि असेल ज्ञानसमृध्दी । थोरांचीही चळते बुध्दी । भावुक जनता भोळी, साधी । बिचारी जाई भांबावुनी ।। ३०१ आवरा आवरा ऐशा नरा । विशेषत्वाने उत्साही शिष्यवरा । सदुपदेशाच्या विखारी अवतारा । जे जनमानसी रुजविती ।। ३०२ माहीत नाही कोणती । दासांची होती मन:स्थिती । केवळ नामस्मरणाची महती । सांगो धजले ।। ३०३ रूप आगळेचि सामोरे आज । काय घडले ? काय काज ?। दासांतरी अंकुरले बीज ?। कैसे नैराश्याचे ।। ३०४ हे शिवरायांचे गुरु । सकारात्मत्मकतेचे आधारु । बल-बुध्दी-वृध्दि निर्धारु । सदैव केला ।। ३०५ मागे शिष्यांचे कोंडाळे । 'गादी'वरी ज्यांचे डोळे । संस्थानाधिकार मधाचे पोळे । जिभल्या चाटित वेधिती ।। ३०६ मज नवल नेहमा वाटें । विश्वास ठेविती थोर मोठे । भाकडावरचे मुलामे खोटे । आकर्षिती त्यांसही ?।। ३०७