Monday, January 26, 2015
।।भासबोध।। २३४ ते ३०३
व्याघ्रादिकांचि वृत्ति श्वापदी ।
कवळ कवळून करिति जायबंदी ।
नरडे फोडोनि होती आनंदी ।
शोणित-प्राशने ।। २३४
तैसेची तथाकथित 'समाजकारणी' ।
लटक्या प्रेमभरे कुरवाळुनी ।
करिती काळेंना अत्याचारी करणी ।
जैसा फुकरे मूषक ।। २३५
सगेसोयरे, आप्तेष्ट।
नित्यनेमाने वास्तपुस्त ।
करत राहावे कर्म रास्त ।
सर्वांस जे हितकर ।। २३६
कर्म-कर्तव्य प्रामाणिकपणे ।
गृहस्थाश्रमी करीत राहाणे ।
बाळ-गोपाळ, अस्तुरी सुखविणे ।
हीच आमुची जीवनकला ।। २३७
।। दास-वाणी ।।
भिक्षेने वोळखी होती ।
भिक्षेने भरम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करिती ।
सकळ प्राणी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०२/१३
गावोगावी, घरोघरी भिक्षा मागितल्यामुळे महंताचा जनसंपर्क वाढतो. लोकांच्या मनातील धर्माविषयीचे भ्रम महंत दूर करू शकतो. अत्यंत कमी मोजकीच भिक्षा महंत घेत असल्याने गरीबाला सुद्धा आर्थिक बोजा न पडता पुण्यप्राप्ती होते. (आताच्या काळात महंत म्हणजे कार्यकर्ते, भिक्षा म्हणजे सभासदत्व व देणगी घेणे)
उदरनिर्वाहासि मागण्याने भिक्षा ।
दास म्हणति रुंदावते संपर्ककक्षा ।
परगृही शिजले ते 'मोक्षा' ।
कष्ट टाळोनि मिळवीलं?।। २३७
सद्यकाली नाकारला 'चंदा' ।
तर तोडफोडती उदिम, धंदा ।
गुन्हे करोनि परागंदा ।
होती कार्यकर्ते महंत ।। २३८
हेरोनि तोरणे,माळा, उत्सव ।
त्रस्त करिता अबालवृध्द बांधव ।
'राजा'श्रयासि ही एकच ठेव ।
गांवगुंड 'महंतां'कडे ।। २३९
हा असला 'उपदेश' ।
कर्मयोगी साधकास ।
देशोधडीला हमखास ।
लावेल ना ? सांगा बरें !।। २४०
।। दास-वाणी ।।
मरणाचे स्मरण असावे ।
हरिभक्तीस सादर व्हावें ।
मरोन कीर्तीस उरवावे ।
येणें प्रकारें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १२/१०/१३
कधीतरी आपण नक्की मरणार आहोत.आपल्या चांगल्या वाईट कृत्याची वर कुठेतरी पक्की नोंद होतीय ही जाणीव म्हणजे मरणाचे स्मरण. व्यावहारिक, प्रापंचिक, सुखविलासापेक्षा जो हरिभजनात प्राधान्याने दंग असतो अशा उत्तमपुरूषाची कीर्ती तो मृत्यू पावल्यावरही खूप काळ टिकते, वाढतच जाते.
मरण कसले ?, म्हणाना 'मोक्ष' ।
'आत्मा' शोधितो नवा 'कक्ष' ।
अध्यात्माला कोरे 'भक्ष' ।
आपोआप ।। २४१
कशास हवी, कुणास कीर्ती ?
सय येतां पांपण्या पांणवती ।
हृदये आप्तस्वकीयांनी हेलांवती ।
पुरेसे असते जनसामान्या ।। २४२
स्मरण कोणाचे ? किती ?
कृत्ये विविधांगी करिती ।
प्रमाणांत त्यांच्या, व्यक्ती ।
राहती आठवांत ।।२४३
गद्गद होवुनी कुणी वंदे ।
आठवुनि जखमा कुणि क्रोधे ।
उच्चारण्या अपशब्द, ओठामधे ।
कर्माजोगी प्रतिक्रिया ।। २४४
नको कीर्ती नको पुतळे ।
टाळक्यावर बसतिल कावळे ।
'कावकाव'त मिळुनि सगळे ।
मुद्रा भरतिल विष्ठेने ।। २४५
जगण्याची कला कां 'शिकविता'?।
सहज श्वासना सारिखी असतां ।
'रवि'तेजातळि रोज घडतां ।
'शंकर' काय करील ? ।। २४६
शिबिरे की नृत्यांगणे ? ।
कालापव्यय विनाकारणे ।
द्विजास अवकाशी झेप घेणे ।
शिकवणारा एक मूर्ख ।। २४७
फोडिता शब्दांची अंतरे ।
त्यांतूनि प्रसवतील धनधान्यांची कोठारे ?।
सुखावतील अस्तुरि आणि पोरे ?।
क्षुधाशमनोपरान्त ?।। २४८
संधी गरजूंना काबाडकष्टांची ।
त्यांतूनि चरितारार्थ अर्थार्जनाची ।
भवसागर तरून जाण्याची !।
व्हा प्रदीप त्यस्तव संतहो !।। २४९
म्हणे 'अध्यात्मिक अनाथ' ।
आणि सद्गुरू तारिल धर्माचरणांत ।
पण जगण्यासाठी घास ओठांत ।
देइल ऐसा गुरू ?।। २५०
उपदेश हवेंत विरेल ।
जर श्रोता पुढती नसेल ।
भरल्या पोटीच सहसा पचेल ।
व्यर्थ बोध वा भक्तिधारा ।। २५१
आधी भागवा शारीर गरजा ।
विशेषत: चालना देण्या मगजा ।
सजग करण्या चेतना,संवेदना, समजा ।
तवान हवे ना तन-मन?।। २५२
होईल साध्य, की राहील स्वप्न ?।
ज़रि अर्पिले तन-मन-धन ।
जैसे ज्याचे कर्मावगुंठित प्राक्तन ।च
तेचि पदरी पडेल ना ?।। २५३
भव्य आकार जरि बहिर्रूप ।
हृदयांत वात्सल्य, माया अमाप ।
विघ्नहर, आपदांचा सकोप ।
संहारकर्ता ।। २५४
चंद्रगुप्तासि चाणक्य जैसा ।
शिवरायांसि समर्थ तैसा ।
सत्तेसाठि नाहि पसरायचा पसा ।
मिळवायची लढोनि, हा केला उपदेश ।। २५५
शुंडेंत एकवटली शक्ती ।
कर्ण विस्तीर्ण उत्सुक ऐकण्या स्तुत्योक्ति ।
नेत्र किलकिले तरि तीक्ष्ण दृष्टी ।
पांखर सदैव भक्तांवरी ।। २५६
लंबोदरांत सहज रिचवे ।
सेवा जे करिती मनोभावे ।
ऐशांचा अपराध संभवे ।
जरि अनवधानें ।। २५७
ऐसी ठेवावी गुरुने धारणा ।
ज्ञानतृषार्था शिष्य म्हणा ।
जळनिधी जगति कधि कोणा ।
अव्हेरतो कां ?।। २५८
योग्यता जोखावी गुरुंची ।
तेथे 'आवड-निवड' त्यांची ।
तीक्ष्णबुध्दी शिष्योत्तमांची ।
क्षीणबुध्दी बालकांवर अन्याय ।। २५९
भेगाळल्या भुईवर बीज रुजवी ।
निगराणी करुनि फुलवी, फळवी ।
झेलण्या वादळ-वारे मार्ग दावी ।
तोचि कसबी कृषिवलां ।। २६०
धरुन हाती हिरा मुळांतला ।
घासुनि-पुसुनी चमकविला ।
'वल्गना' करितो, 'मीच घडविला' ।
तो कसला गुरू ?।। २६१
मोकळिली सर्वत्र शारदा ।
विविध विद्याशाखांची संपदा ।
ज्ञान-विज्ञान, कर्मयोग, व्यवसायीसि सर्वदा ।
वरदायिनी ।। २६२
कळाकुसर, तंत-स्वर-ताल ।
ज्ञान भारले भवताल ।
अनंत अवकाशाचा तोल ।
शारदा सहजी सांभाळी ।। २६३
शाश्वती, रक्षण, दायित्व ।
वात्सल्य, प्रिती, ममत्व ।
कर्तृत्व, दातृत्वादि तत्वं ।
अंतरंगी उपजवी ।। २६४
असो राजा वा रंक ।
अनाकारण कुणा डंख ।
करू पाहेल ! तर हकनाक ।
सर्वनाश अटळ ।। २६५
जगा, जगूद्या हे सूत्र ।
मानवतेचा आधारमंत्र ।
अत्याचारासि दया मात्र ।
दुरापास्त ।। २६६
राम होता ना देव ?।
मग चंद्रप्राप्ती कां झाली असंभव ?।
झाली प्रतिबिंबित कल्पनेची धाव ।
कौसल्या मायेची ।। २६७
म्हणे होता बालहट्ट ।
वसतो जो 'बिंदू पासुनि सिंधूंत ।
बाल, युवा वा जर्जराशक्त ।
'देव' कसा असेल हो ?।। २६८
विरंगुळा कथेचा रयतें ।
करमणूक आयती होते ।
परस्पर 'कार्य' सिध्दीस जाते ।
भाकड भाटांचे ।। २६९
संकटे झेलीत राज्ञी सीता ।
परपाशांतुन सोडवुनि आणिता ।
झाला राम आज्ञा करिता ।
अग्निदिव्याची ।। २७०
रापाच्या मिशें वणवे ।
लाविती कृषिवव अननुभवी नवे ।
भडकतां अवघे रान पेटवे ।
विक्राळ पावक ।। २७१
अमर्यादित त्याची व्याप्ती ।
मरुतादी भूते साहाय्य करिती ।
शमविण्यासि जळनिधी अपुरे ठरती ।
प्रसंग बांका ठाकतो ।। २७२
कर्मोत्तरीच अनुभव ।
तोचि जाणा योग्य 'देव' ।
त्याचाच जर असला अभाव ।
तर 'शोधेनि गवसेना' अशी स्थिती ।। २७३
केवळ म्हणे पदस्पर्शाने ।
शीळेंतुन अहल्येस मुक्त केले ।
मग स्वपत्नीस कां म्हणे ।
धाडिले वनांत ? ।। २७४
प्रष्णांची उत्तररामचरितांतं ।
उत्तरे सारी मिळतांत ।
आणि सिध्द करतांत ।
'मनुष्य'पण रामाचे ।। २७५
म्हणोनि जरि दिसला नाही ।
कल्पनाचक्षूंनि न्याहाळी पाही ।
शब्दरूप 'त्या' ला दई ।
रसिकांसाठी ।। २७६
मात्र जाणा त्यांतील सत्य ।
ते कल्पनेचेचि क्रीडाकृत्य ।
'दिसला, पाहिला', गर्जोनि नृत्य ।
आनंदविभोरें करू नका ।। २७७
काव्य, गीतांत बहुतेक ।
फसव्या प्रतिमा अनंत ।
सत्य प्रतिबिंबाचीचं भ्रात ।
तेथ नेमकी असते ।। २७८
उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांतादी ।
अनुप्रास, रूपक अलंकारांची यादी ।
लेखक, कवि, बुध्दिवादी ।
वसते याच्या संग्रही ।। २७९
विणोनि कल्पनाविश्वाचे जाल ।
हे सुखाशांचे दलाल ।
भाबड्या रसिकांसाठी कलाल ।
सहजी होती ।। २८०
चढवुनि होता पुरेपूर नशा ।
'गल्ला' जमता गुंडाळिती गाशा ।
वाचकास सोडोनि प्रदेशा ।
अतर्क्य, अनाकलनीय अनुभवण्या ।। २८१
जय जय भास्कराचार्या ।
अपाला वदली प्रथम आर्या ।
वेदरचनेच्या महत्कार्या ।
आरंभिले जिने ।। २८१
जयतु सुश्रुत शल्यचिकित्सक ।
अश्विनिकुमार, औषधोपचार संशोधक ।
कृषि, अवकाश वैज्ञानिक ।
जगणे सुखविण्या जे झटले ।। २८२
कोणास आत्मा मुळांत ।
दिसला, जाणवला भवतालांत ?।
परमात्म्याचे कां मग 'भूत' ।
व्यथितांच्या गळी उतरविता ।। २८३
जगतों, चालतो, बोलतो ।
हसतो, खंतावतो, वेदना रिचवितो ।
संसारावर पांखर धरितो ।
तो धैर्यशील ।। २८४
'संत' पण काय वेगळे ?।
अतर्क्य बडबड, अगम्य जाळे ।
त्यांत भाबड्यांना ओढण्याचे चाळे ।
करिती ते संत ।। २८५
संकटांत अविचल ।
सुकाळांत सुखे भोगीत ।
आकंठ बुडला संसारांत ।
तो खरा 'संत' ।। २८६
वाटते कां कमीपण ?।
अभ्यासण्या त्यांची शिकवण ।
अनुभव, वागण्या-बोलण्यांतुन ।
कां दुर्लक्षिवा कथित 'संतांनी ।। २८७
वक्ता वक्ताचि नव्हे श्रोतेविणं ।
समोरचा ज्ञानतृषार्त जनगण ।
तृप्त श्रवणाने मन ।
समाधान पाहिजे पावले ।। २८८
प्रारंभी रीझवावी अंत:करणे ।
मग आकर्षूनि आशयाप्रत नेणे ।
उपसंहारे प्रोत्साहित करणे ।
असा क्रम सामान्यतः ।। २८९
कुणा कमी न लेखतो ।
स्मितभाष्यें सर्वांस सुखवितो ।
नेत्रांतली उत्कठा जाणितो ।
वक्तादशसहस्रेषु ।। २९०
त्यां हृदयीचे स्वहृदयी रुजविती ।
रसिकत्वा परस्पर येइ भरती ।
देउ-घेवोनि समृध्द होती ।
वक्ते, श्रोते ।। २९१
जो संसारी आप्तांसाठी झटला ।
त्याने नाही कां परमार्थ साधिला ?।
जपजाप्य, उपासनेसि नाही बसला !।
बिघडले कोठे ?।। २९२
चिंतन चिंतांचे केले ।
वारण्यास उपाय शोधिले ।
भवसागर करून गेले ।
ते कर्मयोगी परमार्थी ।। २९३
जो ज्या जागी स्थित ।
करीत राहतो कार्य विहित ।
तोचि रोजच्या जगण्यांत ।
परमोच्चपदी ।। २९४
कोणी पाहिले जन्म अनेक ?।
काय असते त्याचे प्रमाणक ?।
कशाल मग स्मरता चार्वाक ?।
म्हणे 'तत्वज्ञानी आम्ही' ।।२९५
शब्दरत्नाच्या भांडारा माजी ।
सद्यकाली वसती माझी ।
आपोआप वीण त्यांची ।
उपजवी आशया ।। २९६
स्वर-शब्द उठविती तरंग ।
उचंबळविती अंतरंग ।
अमूर्त आनंदाचे भाग ।
पिसे जडवित उधळिती ।। २९७
स्वरभारित आसमंत ।
रसिकत्व होई उत्क्रांत ।
ज्ञानेंद्रिये कांठोकांठ तृप्त ।
पांपणीकांठी दहिवर ।। २९८
हे तो होय सत्कीर्तल ।
हरेक पावला पुनर्तवान ।
विस्मरण्या शरीरे नि मन ।
आपदा विपदांना ।।२९९
थकले वाटे हृदय, मगज ।
क्षणिक विश्रामाची गरज ।
सप्तशतकी लहरींची गाज ।
भारतसे अंतर्मन ।। ३००
पुन:पुन्हा पुनर्जन्म ।
कशास सारखे स्मरण ।
एकदाचि असते मरण ।
कां पांडिता भ्रमांत ?।। ३०१
अक्षरे वाचू लिहू लागली ।
भाबडी शिक्षणाने सरसावली ।
आंता अंधश्रध्दांची काळी बाहुली ।
नको वाटे त्यांना ।। ३०२
आतां आवरा भाकडे ।
ना तर म्हणतिल 'खोटारडे' !।
भिऊनि पाउल वाकडे ।
ना टाकेल कोणी ।। ३०३
Wednesday, January 7, 2015
।।भासबोध।। २२२ ते २३३
निसर्गें सृजनाचा वर ।
मगजग्रंथींत रुजविला पुरेपूर ।
अखंड अभिषेक कलेवर ।
करण्या दिला मनुष्यां ।। २२२
अलंकाराचा करण्या वापर ।
सुकृतार्थ विचार सारासार ।
करावा ! अन्यथा 'कलेवर' ।
होइल त्याचे निश्चित ।। २२३
।। दास-वाणी ।।
मीपणे प्रपंच न घडे ।
मीपणे परमार्थ बुडे ।
मीपणे सकळहि उडे ।
येशकीर्तिप्रताप ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०७/०७/४७
' मी ' पणाची सतत असलेली जाणीव म्हणजे अहंकार. प्रपंचामधे तर तो त्रास देतोच कारण मोठेपणाची कर्तृत्वाची जाणीव इतरांचा अधिकार मन मान्य करत नाही.
परमार्थातही मी साधना करतो हा अहंकार परमेश्वरापर्यंत पोचू देत नाही.
संपूर्ण शरणागतीशिवाय तो भेटत नाही.
याच अहंकारापोटी भौतिक जगतातील यश, कीर्ती, प्रताप, मानमरातब यांनाही किंमत उरत नाही.
विनम्रपण स्वीकारले तरच समाजमान्यता मिळते.
'मी' च नाही तर भवताल ।
काष्ठ-पाषाण-तेज-सलील ।
जैसी कवडश्याची 'सल' ।
नेत्रहीनासि ।। २२४
'मी' च नाही तर भवताल ।
काष्ठ-पाषाण-तेज-सलील ।
जैसी कवडश्याची 'सल' ।
नेत्रहीनासि ।। २२४
'अस्तित्व'चि जाणिते पंचतत्वे ।
ना जडती कसलीच ममत्वे ।
विचार, कल्पना, यश, कर्तृत्वे ।
नसलेपणासि फोल सर्वथा ।। २२५
'मा'पण ज्याचे सरले ।
जगणे कशास मग उरले ।
मरण सुध्दा परवडले ।
तुलनेंत ।। २२६
संत ना मी, ना तत्ववेत्त ।
माझी तर शुध्द अनुभव-कथा ।
सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा ।
लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। २२७
।। दास-वाणी ।।
बहुतां जन्मांचे अंतीं ।
होये नरदेहाची प्राप्ती ।
येथें न होता ज्ञानें सद् गती ।
गर्भवास चुकेना ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०८/०७/१८
अनेक प्रकारचे जन्म घेतल्यावर क्वचित माणसाचा जन्म मिळतो.
मानवी देहातच साधना करणे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून उत्तम गती लाभणे शक्य आहे.
अन्यथा शिल्लक राहिलेल्या वासनांच्या पूर्तीसाठी जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते.
मोक्षलक्षण समासात मनुष्यजन्मातील कर्तव्याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात.
कोण जाणे, कैसा पुनर्जन्म ।
हा तर केवळ अंधश्रध्द भ्रम ।
निसर्गे नेमुनि दिलेले विहित कर्म ।
करावे जोवरि हृदय सजग ।। २२८
जन्मला तो नाशवंत ।
मरणातुनी न होय उत्क्रांत ।
हे तर परंपरासिध्द निश्चित।
विज्ञानसत्य जगन्मान्य ।।२२९
'हे तर थोतांड !' म्हणे चार्वाक ।
एकदाच प्राक्तनी इहलोक ।
अभ्यासुनि उक्ती विस्मरती विवेक ।
पुनःपुन्हा 'संत' बरळती ।। २३०
जे 'गेले'ते परतुनी आले ?।
बाष्फ घनरूपे अवतरले ?।
'रक्षेंतुन' मूळरूपी प्रकटले ?।
दावा ना मज कोणी ।। २३१
वास्तव कालातीत भीषण ।
आदर्शवादाची त्याला वेसण ।
युगानुयुगे, साधक, संत सज्जन ।
पाहती घालू ।। २३२
परि बदलेल सद्यावस्था ? ।
शर्यत लुटण्या सत्ता, संपदा ।
राजकारणे बरबटल्या कथा ।
ऐकता मन विषण्ण ।। २३३
Saturday, January 3, 2015
।।भासबोध।। २०१ ते २२१
न केले अपेयपान ।
वा कधि अभक्ष भक्षण ।
पूजिली अवघी श्रद्धास्थानं ।
अकाल काळाघात टळेना ।। २०१
आनंदे जगला स्वच्छंदी ।
रंगला भिजला सुस्वरनादी ।
'तृप्त मी ! घेउदे समाधी' ।
विनवणी परि ऐकेना ।। २०२
सूर्यकिरणां उगमस्थळि विघटिते ।
जळबिंदूतुन सत्व शोषिते ।
व्यघिविनाशक सहजचि होते ।
शुध्दस्वरूपी प्राशिता ।। २०३
(सूर्यपादोदकम् तीर्थम् जठरे धारम्यांमहं ।।)
विरघळता हितकर क्षार, वायू ।
जळांत ! निरामय होण्या आयु ।
प्राशिता, कृत्रिम औषधी, उपायू ।
अनावश्यक ।। २०४
रुजल्यावर सहजचि वृध्दी ।
स्थैर्याची सखि समृध्दी ।
अस्तवेळि विकार, व्याधी ।
स्नभाविक जीवनक्रम ।। २०५
लिहिणे केवळ हव्यास ।
नका म्हणू, 'हा व्यास' ।
कक्षेचा विस्तारणे व्यास ।
जगण्याच्या ! हा हेतू ।। २०६
म्हणून अनुभवत जगतो ।
डोळसपणे जागर करितो ।
खंतावतो, उचंबळतो, रागेजतो ।
कल्लोळ अंतरी माजता ।। २०७
कुणि अवकाश वैज्ञानिक ।
कुणि सावकाश अज्ञान मानक ।
दोघेही निवडले पुरस्कारार्थ ।
साहित्यतीर्थे ? अचंबा !! ।। २०८
कुणि शतकी शतक खेळे ।
कुणि डबक्यांत वळवळे ।
दोघे एका मंचावर ? आगळे ।
दृश्य याहून कैचे ।। २१०
कुणि स्वरांची मांडी दुकाने ।
वाहिन्यांच्या वाऱ्या करित नेमाने ।
थोरांच्या बाह्या धरुन राहाणे ।
धर्म निष्ठेने आचरती ।। २११
आग्रह असतो पुण्यनगरींत ।
'भूषण' म्हणावे त्यां, ऐसी रीत ।
नामचीन साहित्यिक अडगळींत ।
कुरवाळित स्वाभिमान ।। २१२
'सरले' म्हणता कां सरिते ।
प्रवाहित राहावेच लागते सरितें ।
भविष्याची आव्हाने पसरिते ।
कर्म-कर्तव्य पूर्ततेची ।। २१३
तोचि सूर्य, तीच आभा ।
निळाईही आश्वासक तीच नभा ।
मनि धरोनि लाभ, लोभा ।
पळत सुटूं नित्यासारखे ।। २१४
तेच तेच सारे सारे ।
ठाई ठाई चराचरे ।
कर्म-कर्तव्याच्या उभारे ।
म्हणू, 'उत्तिष्ठत, जाग्रत' ।। २१५
परत परत सा रे सा रे ।
म ग ध नी प्रेमभरे ।
अवनीवरी तेजोभरे ।
तैसाचि पसा उजळेल ।। २१६
आकडे पुढे चालले ।
उदयास्त रोज पाहिले ।
अर्थहीन पळ जगलेले ।
भेडसावति आतांशा ।। २१७
हा मोजायाचा खेळ ।
चालेल असा किति काळ ?।
त्यांतच चिरनिद्रा भूल ?।
मिळो आंता !।। २१८
मावळती-गुलाल सलीलां ।
यमुना तीरी रासलीला ।
मधुराभक्तिच्या विविध लीला ।
रंगती गोकुळी ।। २१९
म्हणे अध्यात्माने आत्मोंन्नती ।
अर्थार्थ कर्मापासोनि मुक्ती ।
ज्यची नियत करंटी ।
तोचि जाणे घेऊ ।। २२०
आत्मोन्नत मुक्ती फसवी ।
डोहाळे भिकेचे पुरवी ।
दारिद्र्याचे अस्मान दावी ।
आप्त-स्वकीयां ।। २२१
Friday, December 26, 2014
।।भासबोध।। १९३ ते २००
मेंदू बुध्दीचा जन्मदाता ।
बुध्दि देते तर्कशुध्दता ।
हृदयिच्या भावाचा संगम होता ।
शब्द, भाषा समृध्द ।। १९३
जैसी असेल कर्मरीती ।
तैसीच येते प्रचिती ।
अध्यात्म, भक्ती, मोक्ष, गती ।
केवळ कल्पनाविश्व ।। १९४
कांहीच न देतो हरी ।
बैसल्या जीवा खाटल्यावरी ।
अर्जुनासहि तो वदे 'कर्म करी' ।
तेंव्हाचि कथा सुफल ।। १९५
पाहुनी अभेद्य श्रध्दा ।
पांपणींत ओथंबल्या जलदा ।
आतुर निवारण्या आपदा ।
भाबड्या भक्तांच्या ।। १९६
कोणी जोडिती हस्तक ।
कोणी घासतो चरणी मस्तक ।
'त्याचे' आडते, मध्यस्थ, हस्तक ।
सावज घेरण्या टपलेले ।। १९७
।। दास-वाणी ।।
गरळ आणि अमृत जाले ।
परी आपपण नाही गेलें ।
साक्षत्वे आत्म्यास पाहिलें ।
पाहिजे तैसें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०८/१९
साप किंवा नागाचे जहाल विष म्हणजे गरळ. कोणत्याही आजारातून निश्चित बाहेर काढणारे संजीवन द्रव्य अमृत.
दोन्हींमधे जलतत्व आहे ते एकच आहे.
त्याच प्रमाणे दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमधे सुद्धा आत्मतत्व एकच असते.
हे समजले की आपली वर्तणुक सर्वांशीच चांगली आपुलकीची राहते.
पैठणाधीश 'धर्मकर्मठांची ।
गरळफेक पचवुनी चूळ अमृताची ।
गीता उकलत, ओवी ज्ञानोब्बांची ।
सालंकृत झाली ।। १९८
हलाहलाच्या हालाग्नींत ।
जनसामान्य होते पोळत ।
भावार्थदीपे त्यांना शमवित ।
कर्मधर्म सांगे ज्ञाना ।। १९९
ऐसा कोणी अवतरेल ?।
तमारि दीपस्तंभ होईल ?।
लांडग्यांना सहजी वारील ?।
शंका सद्यकाली ।। २००
Wednesday, December 24, 2014
।।भासबोध।। १७६ ते १९२
ऐन दुपारचे तळपते ऊन ।
सर्व जीव सावली धरून ।
तरुवराचे हे योगदान ।
लक्षण सुकृताचे ।। १७६
वस्तींत माजतो दंगाधोपा ।
कसले सूड प्रसवती पापा ।
आधार माणुसकीचा खोपा ।
सदन निधर्मी सुकृताचे ।। १७७
लयापूर्वी जैसी स्थिती ।
तयापूर्वी होण्या उत्पत्ती ।
निसर्गाकडे कोणती ऊर्जा, शक्ती ।
जाणिले कोणी ।। १७८
मग कोणते द्ष्कृत्य ।
वा मानावे सुकृत ।
होईल लयाशिवाय स्थितं ।
उत्पत्ती जगती ?।। १७९
आपण सगळे क्षुद्र जीव ।
शोधीत बसतो कार्यकारणभाव ।
आकळेना त्यांसि देत सुटतो नांव ।
सुकीर्त वा दुष्कीर्त ।। १८०
तळहाती प्रारंभी फोड ।
कष्टकरी करती तडजोड ।
घट्टे होता त्याचे, बिमोड ।
होतो वेदनेचा ।। १८१
सवयीने सारे सुसह्य, सोपे ।
प्रारंभी मन थरकापे ।
मंथर नंतर आपोआपे ।
लागतो निवळू ।। १८२
।। दास-वाणी ।।
ज्ञान विवेकें मिथ्या जाले ।
परंतु अवघेचि नाही टाकिलें ।
तरी मग भजनेंचि काय केलें ।
सांग बापा ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०६/०७/१८
साधना करता करता साधक ब्रह्मस्थितीला पोहोचला सत्य असत्याचा विवेक प्राप्त होऊन संपूर्ण दृष्य जग हे मिथ्या आहे असे ज्ञान त्याला झाले.
म्हणून काय त्याने खाणे पिणे, उठणे बसणे आणि शरीराची नित्यकर्मे सोडून दिली काय ?
तसे जर नसेल आता मला ज्ञान झालय, भजनाची मला गरज उरली नाही असे तू म्हणू शकतोस का रे बाबा ?
ज्ञानोत्तर भक्तीचे महत्व समर्थ सगुणभजन समासात सांगतात.
शब्द असावे सार्थ सुगंधी ।
संगीत अन् मोदाची नांदी ।
हृदयस्थ शांतीस योग्य संधी ।
भजनांत ।। १८३
भजन करावे स्वान्त:सुखाय ।
सुखांत रुजते ज्ञान निरामय ।
क्षणात आनंदाचा ठाय ।
सहजचि नकळता ।। १८४
ज्ञानांकुर रुजवुनी अंतरी ।
कोंभांच्या वाढल्या तरुवरी ।
मधुर फळे लगडणारी ।
चाखावी येथेचि जाणा ।। १८५
पिंडास कावळा शिवे ।
टोच मारण्या चोंच शिवशिवे ।
आनंदविभोर, कृतज्ञ भावे ।
नाचती आप्तजन ।। १८६
जेथे नाहीच कावळा ।
तेथे ठेवा पिंडगोळा ।
दर्भाचा मग मार्ग मोकळा ।
करोनि देई किरवंत ।। १८७
गुलाले माखिला पिंड ।
मनुष्यासही क्षुधाशमनखंड ।
रित्यापोटी जेंव्ह ब्रह्मांड ।
भुकेल्या लागे जाणवू ।। १८८
घाटावरि ठेविती पिंड ।
तटावर अनावर आसवे अखंड ।
ताटावर तेराव्यास किरवंत कर्मठ ।
ओठ शिवोनी नि:शब्द ।। १८९
'उरकले कां रे बाबा ?'।
पुसती जिवंत आज्ज्या-आजोबा ।
घेती वेदना, दु:ख ताबा ।
अस्तुरि, कच्च्याबच्च्यांचा ।। १९०
सर्वांगावर सुरकुत्या ।
अपचनाने अतिसार, वांत्या ।
'जा दूर, येउ नको अंत्या' ।
श्वास लोभी आरडे ।। १९१
कोण्या उद्देश्ये लिखाण ?।
जागवण्या अंधश्रध्द जन ।
त्याकरिता आवश्यक प्रकाशन ।
लोकार्पणार्थ ।। १९२
Monday, December 22, 2014
।।भासबोध।। १६२ ते १७५
मी उन्हांत राहिन चालत ।
काटे जरि तळपायांत ।
तळपाया असिधाराव्रत ।
एकचि यशस्वितांना ।। १६२
।। दास-वाणी ।।
देखणे दाखविती आदरें ।
मंत्र फुंकिती कर्णद्वारें ।
इतुकेच ज्ञान तें पामरें ।
अंतरली भगवंता ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०२/२९
दिखाऊ श्रीमंती, डामडोल, भपकेबाज सत्संग आणि कानमंत्र देण्याचे भव्य सार्वजनिक कार्यक्रम इतकेच ज्ञान असणारे भोंदू गुरू असतील तर गरीब बिचारे अज्ञानी शिष्य भगवंताला कधी भेटू शकतील का ?
सद्यकाली ऐशीच करणी ।
अंधश्रध्दांचे जाल फेकोनी ।
'व्यावसायिक' बडवे होवुनी ।
गरीब भोळे हेरिती ।। १६३
कैसे सावध करावे ?।
कोठले पाठ यांना द्यावे ?।
पाठ 'अशांची' भाग पाडावे ।
सोडण्या ! आकळेना ।। १६४
जैसी श्वापदे कराल जंगली ।
तैशी सत्ता शर्यतींत धावली ।
परस्परांवर चिखलफेक केली ।
यथेच्छ ! जनसामान्य फासावर ।। १६५
कुणास नाही कसली क्षिती ।
सामोरे आलेले 'भक्ष' भोगिती ।
नासले-सडलेले करिती ।
'लोकार्पण' ।। १६६
।। दास-वाणी ।।
अधर्मास स्वधर्मे लुटिले ।
कुकर्मासि सत्कर्में झुगटिले ।
लाटूंन वाटा लाविलें ।
विचारें अविचारासी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०९/४८
समर्थांच्या या संग्रामशूर साधकाने
अखंड स्वधर्मपालन करून अधर्म नेस्तनाबूत केलाय.
सत्कर्मांचेच आचरण करून वाईट कृत्यांना झुगारून दिलय.
विचारपूर्वक आचरणाने अविचारांना हाकलून देऊन वाटेला लावलय.
साधकलक्षण समासात समर्थांनी साधकाच्या समाजातील वर्तणुकीची
पथ्ये सांगितली आहेत.
नेमाने खुरपिता तण ।
निश्चित वाढेल उत्पादन ? ।
मशागतीची तेवढीच जाण ।
कृषिवला हवी ।। १६७
अबालवृध्द वाऱ्यावरी ।
नाहक मारती शस्त्रधारी ।
विकृत मानसिकतेवरी ।
उपायो कोणता ?।। १६८
अहिंसा उपाय हिंसेवरी ?।
निष्पाप जीवां मारेकरी ।
सर्वत्र युगानुगे अवनीवरी ।
खंडिती हा इतिहास ।। १६९
'दया' शब्द त्यांना वर्ज ।
कितीही करा विनंत्या-अर्ज ।
संपदा, सत्तेचा लोभ, माज ।
दुष्कृत्या ठरते कारण ।। १७०
सत्कृत्य शब्द फसवा ।
परस्पर विरोधी भावा ।
गोवत्स कधि, कधि छावा ।
गोंडस, तरि भिन्न वृत्ती ।। १७१
विषवल्ली रुजविणे ।
तुलसिवृंदावन लावणे ।
क्रिया एक परि भिन्न असणे ।
परिणाम ! स्वाभाविक ।। १७२
दुष्कृत्यांची जाणा महती ।
निवारण्या सुकृतांची माहिती ।
ज्यांना मान्यता लौकिकार्थी ।
अभावे त्यांच्या कैची ? ।। १७३
कोठलाही प्रस्तर कठोर ।
फोडितो वेगवान जळप्रहार ।
पेटता वडवानळ रौद्र ।
जळ शीतळ शमविते ।। १७४
परंतु जळ प्रळयवेळी ।
निसर्गाची अमोघ खेळी ।
प्रस्तरी वा वडवानळी ।
निराकरण्या ना सक्षम ।। १७५
Wednesday, December 17, 2014
।।भासबोध।। १३८ ते १६१
अभ्यासले म्हणे संत ।
सहिष्णुता तरी अंतरांत ।
कांही केल्या ना रुजत ।
पीठासनाधिष्टांच्या ।। १३८
कांही जात्याच देखणे ।
भरडती जात्यांत दाणे ।
भारुडादि लोकसाहित्य लेणे ।
संशोधिती निष्ठेने ।। १३९
संतोपदेशांची अमृतजळे ।
नासविती माजविति शेवाळे ।
ते तर अंगभूत बुळबुळे ।
भाबडे भोळे धडपडती ।। १४०
कांही साहित्य'दुर्वास' ।
परस्परांचा करिती दुस्वास ।
घरकुल जरि साहित्य'सहवास' ।
'वांदरे' स्थितं ।। १४१
फोडित बसती काव्यकोडी ।
मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी ।
तोडींत लौकिक,हिरवी माडी ।
चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२
सदा स्मरावे विहित कर्म ।
आप्तस्वकीय रक्षण धर्म ।
जगराहाटीचे हे वर्म ।
कुठल्या 'नामे' साधते ।। १४३
'नाम' घेता कोण अवतरतला ?।
सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?।
संकटसमयी खरेच धावला ?।
कधी, कसा दाखवा बा ।। १४४
अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' ।
कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?।
आनंद-वेदना, सुख-दु:खाने ।
भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५
चिमणी चिल्ली घरट्यांत ।
पक्षिणी घास इवल्या चोचींत ।
भरवुनी, पोसुनि पंख बलवंत ।
आभाळमायेस वाहते ।। १४६
जन्मती रोज असंख्य जीव ।
जीवापाड चुकवीत घाव ।
अवकाळिचे निष्ठुर डाव ।
माय सहजी परतवे ।। १४७
मादी स्वाभाविक जरि वत्सल ।
रिपुदमना परि कराल, कळिकाळ ।
विशेषत: रक्षण प्रतिपाळ ।
करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८
।। दास-वाणी ।।
आपुलिया मनोगताकारणें ।
देवावरी क्रोध येणे ।
ऐसीं नव्हेत की लक्षणे ।
सख्यभक्तीची ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/०८/२१
जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची.
हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही.
न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे.
जो तो जाणितो स्वकर्माने ।
सुख-दु:ख भोगणे-निवारणे ।
वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे ।
अन्य कुणा ?।। १४९
सख्य, मैत्र राखते वैर दूर ।
वोलांडुनि मोद-क्रोध अपार ।
वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर ।
सवंगड्यांचे ।। १५०
द्वापारयुगी मैत्रीच न्यारी ।
सद्यकाली माजले कलिधारी ।
लांगूलचालन दारोदारी ।
करिती 'दामा'साठी ।। १५१
।। दास-वाणी ।।
पंचभूतांमध्यें आकाश ।
सकळ देवांमध्यें जगदीश ।
नवविधा भक्तीमध्यें विशेष ।
भक्ती नवमी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०४/०९/२४
पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे.
देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी.
भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती.
स्वगतासि नाहीच वेळ ।
क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ ।
अन्यथा चिंतांचा जाळ ।
मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२
कुणाची, कशास भक्ती ? ।
कधी, कुठे मिळेल शाश्वती ? ।
जंजाळ, जाळी, अवमान, अनिती ।
भीती भारते अंतर ।। १५३
पंचतत्वांची नसते करणी ।
निसर्ग नसतो सुखद:खा कारणी ।
सावरी वा काटेरी सजवितो लेणी ।
आपणची जाणा ।। १५४
अवकाश अथवा रुधिर कण ।
सर्वसमान अवघे योजन ।
फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?।
आकळेना ।। १५५
ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी ।
डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी ।
'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी ।
कष्टकरी जनांच्या ।। १५६
।। दास-वाणी ।।
सर्वसाक्षी अवस्ता तुर्या ।
ज्ञान ऐसें म्हणती तया ।
परी तें जाणिजें वाया ।
पदार्थज्ञान ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०६/०६
अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात.
जागृती - जागेपण
स्वप्न - झोपेतील जागेपण
सुषुप्ती - गाढ झोप
तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा.
काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात,
परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या .
त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते.
अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान.
तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म.
शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत.
आम्हासि ठावकी एकचि अवस्था ।
तिला विविध नामे संबोधिता ।
कर्मधर्म संभवतो विशेषत: ।
तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७
मनात कुजवुनि भोग, निद्रा ।
जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा ।
दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा ।
बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८
अनेक मंचिले म्या विद्वत्जन।
तयांनी मथिले तत्वज्ञान ।
परि सामान्य जनता जनार्दन ।
वंचितचि राहिला भाबडा ।। १५९
लाल दिव्यांच्या आधी गाड्या ।
मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या ।
सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या ।
कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६०
पंचाधीक दशकांवरती शतकोटी ।
किड्या, मुंग्यासम जन राबती ।
त्यांच्या कल्याणासाठी ।
काय बा केले ?।। १६१
Subscribe to:
Posts (Atom)