Wednesday, October 19, 2011

दृष्टिहीन दिवस किंवा श्वेतछडी...व्हाइट्‌केन्‌...दिवस...
१९३० मधे युरोपांत एका छायाचित्रकाराला अपघातानं दृष्टिहीनता आली. गर्दीत किंवा रस्त्यावर चालतांना त्याला अडचणीचं व्हायला लागल्यावर त्यानं एक काठी जवळ बाळगली. पण रस्त्याच्या काळ्या रंगांत काठी स्पष्ट दिसेना तेंव्हा त्यानं त्या काठीला पांढरा रंग दिला. आणि
व्हाइट्‌ केन्‌ किंवा श्वेतछडीचा जन्मझाला.
पण पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९३१ नंतरच ह्या काठीचा खरा पसार, पचार झाला. १९६४ मधे दृष्टिहीनांसाठीच्या अमेरिकेतल्या राष्ट्रीय मंडळाच्या सुचनेवरून सेनेट्‌नं ६ ऑक्टोबर्‌ रोजी ठराव करून, तत्कालीन अध्यक्ष लिंडन्‌ बी, जॉन्सन्‌ यांना, या काठीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे अधिकार दिले आणि १५ ऒक्टोबर्‌ हा जागतिक व्हाइट्‌ केन्‌ दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश अध्यक्षांनी काढला
ही श्वेतछडी आधार-काठी म्हणून वापरांत न आणता गर्दीत किंवा रस्त्यांत रहदारीमध्ये दृष्टिहीनांना वावरण सुकर व्हावं म्हणून सुविधा-स्वरूप वापरण्यांत येवू लागली. त्या श्वेत वर्णावर जर दोन आडव्या लाल रेषा असल्या तर ती व्यक्ती कर्णबधीर-दृष्टिहीन आहे असं मानण्यांत येवू लागलं.
काठीच्या तळाशी असलेला ३..४ इंचाचा लाल रंग कदाचित, ती पांढर्‍या पार्श्वबूमीवरही स्पष्टपणे दिसावी ह्या हेतूनं पुढे दिला गेला असावा.
अवकाशाचा स्थायीभाव कोणता ? अंधार की उजेड ? अर्थातच अंधार ! कारण प्रकाशाला, उजेडाला स्रोत आवश्यक असतो. अंधार असतोच सर्वत्र,,,सर्वदूर...प्रकाशाला सीमा, मोजमाप असत...पण अंधाराला ना सीमा, ना मोजमाप
आपण या जगांत अस्तित्वात यायच्या आधी पण अंधार... आणि आपलं अस्तित्व संपल्यावर पण अंधारच.
आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय ? तर त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होवून आपल्या बुबुळांद्वारे आंत नेत्रपटलावर पडतो आणि नेत्रपटलातल्या संवेदन-वाहिका...नर्व्ह्ज्..तो संदेश मेंदूला देतांत...निमिषार्धात...आणि आपण ती वस्तू पाहातो
या जगांत अनेक प्राणिमात्र निसर्गानं, कांही तरी लौकिकार्थानं कमतरता असलेले जीव, जन्माला घातलेत आणि ते आपलं आयुष्य, सभोवतालांत, व्यवस्थित जगताहेत. उदाहरणार्थ, सर्पाला म्हणे श्रवणेंद्रिय नसते, मासा जळांत पोहोतांना तोंडावाटे पाणी घेउन कल्ल्यांतून बाहेर सोडतांना म्हणे त्यांतला प्राणवायू ग्रहण करतो. कासवी आपल्या पिलांना, आपल्या दृष्टीनं दूध पाजते असा दृष्टांत खुद्द संतश्रेष्ट ज्ञनेश्वरांनीच दिलाय. अगदी माणसांत सुद्धा, लौकिकार्थी हाती-पायी धड असूनसुद्धा, काळीज किंवा मन नसलेले नमुन्यांचा आपण क्षणोक्षणी अनुभव घेतोच की !
काहींना डोळे असतांत, घारे, भुरे, तपकिरी रंगाचे कधी भृंगाच्या काळ्याभोर अंगाचे. पण त्यांना नजर किंवा दृष्टी असेलच याची आपण खात्री देवू शकतो ? कान आहेत पण ते हलके नाहीत याची ग्वाही देवू शकतो ? नाक आहे पण ते फक्त सुगंधाचाचं वेध घ्रेईल असं छातीठोकपणे सांगू शकतो ?
बीदॊवेन्‌हा जागतिक कीर्तीच्या संगीतकार, त्याची सुप्रसिद्ध ९वी सिंफनी रचे पर्यंत, हळूहळू श्रवणक्षमता कमी होवून नंतर ठार बहिरा झाला होता पण त्या नंतरही त्यानं केलेल्या रचना तोडीस तोड आहेत.
हात नसतांना, पायांनी संवादिनी-वादन करणारे, उत्कृष्ट पदाक्षर असणारे, तोंडात ब्रश्‌धरून अप्रतिम रंगसंगती साधणारे कांही चित्रकारही आहेत. कांहीवेळा आपण डोळे उघडे ठेवून समोरचं पाहात नाहीच. मनांनंच दुसरं कांहीतरी पाहात असतो. तस हे आपले बांधव प्रज्ञाचक्षूंनी पाहात असतांत. त्यांत वकील आहेत. संगीतकार, गायक, वादक आहेत. नागपुरचे, प्रथितयश संगीतकार गायक, व्हायोलीने-वादक प्रभाकर धाकडे हे त्या पैकीच.
या आपल्या बांधवांसाठी मुबईतली स्नेहांकित हेlल्प्‌लाइन्‌ ही संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. म्हणजे परीक्षार्थींना लेखनिक निळवून देणे, कविता लिखाणाच्या, वाचनाच्या, गाण्यांच्या स्पर्धांपासून ते अगदी दृष्टीहीन, संसारी गृहिणींच्या पाककला स्पर्धांपर्यंतचे हे उपक्रम त्यांना जगण्यातल्या, आणखी एक आगळा आनंद मिळवून देतांत.
दोन दिवसांनी सुरू होणार्‍या दीपोत्सवांत, या आपल्या सारख्याच, पण निसर्गानं नेत्रांतल्या दृष्टिज्यातीपासून वंचित ठेवलेल्या, संवेदनाक्षम मित्र-मैत्रिणींना सहभागी करून घेवून, नेत्रदानाचा संकल्प करून, दृष्टिहीनतेच्या नरकासुराचा नायनाट कण्याचं पहिलं पाऊल उचलूया...
त्यांना सुद्धा दाखवूया...
रांगोळीचे रंग, रोषणाईचे अंग
नक्षीमधल्या रेषा, देखाव्याची भाषा
प्रकाश-झोतांचे विभ्रम, पणत्यांची चमचम
हसणारे चेहेरे आणि उजेडाची दारे
                उजेडाची दारे...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Thursday, September 22, 2011

’सुगी’


दरसाल, हरमोसमाप्रमाणे, कृषिभूषण, शेतीनिष्ठ वगैरे पुरस्कारांची घोषणा, वृत्त-वाहिन्यांवरून व्हायला लागली ! नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा...हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण कारभारणीच्या मनांत ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार...मग तिनं, का नाइ म्हणावं...

पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान,
वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान
दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर,
गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर
सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी,
पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी
कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय्‌ मी,
बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी,
लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्‌चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर

Monday, September 19, 2011

’लता’ जीवेत्‌ ‍शरद:शतम्‌

 ’लता’ जीवेत्‌ शरद: शतम्‌
संस्कृत, मराठी अक्षर-साहित्यातल्या. अगदी पुराणकालीन भगवद्‌ गीतेपासून ते बाराव्या शतकातल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीपासून ते अर्वाचीन काळांतल्या साहित्यामधल्या सोनसळी शब्दकळांना, कंठातल्या ज्वालाफुलांमधून तावून सुलाखून पार करीत, झळाळी देत, उजळत, रसिकांच्या तृषार्त श्रवणेंद्रियांना सामोरा जातोय, गेली जवळपास पांच तपं, एक अद्वितीय, नादब्रह्मातल्या प्रत्येक श्रुतीचा मापदंड असलेला ’लता’चा स्वर. खर्जा पासून, मंद्र, तार आणि कधीकधी अतितारापर्यंत, जवळपास सव्वादोन सप्तक, ’सहज-प्रवाही’, शंखनादाची गभीरता, ललनेच्या कांकणांच्या नादातलं आश्वासन, मुग्धेच्या पैंजणांतल्या किणकिणीची निरागसता, शयनेषु रंभा’ नायकिणीच्या चांळांच्या ठसक्यातलं शृंगारिक आवाहन,  मंदिरातल्या घंटानादाच पावित्र्य, रणांगणातल्या असिधारेचं ओज आणि स्फुल्लिंग, अशी विविधरंगांची, घाटांची लेणी ’एकसमयावच्छेदेकरून’ मिरवणारा ’लता’चा स्वर...कितीकिती, कुणीकुणी आणि कायकाय लिहावं, बोलावं...सगळ सगळ अपुरच पडणार..स्वर-शब्द-भावांपलीकडलं आहे हे सगळ...अवकाशाला ओंजळीत धरण्याच्या व्यर्थ प्रयत्नांसारखं...या विशेषणांना सोदाहरण सिद्ध करायच म्हटल तर अगणित ग्रंथ अपुरे पडतील आणि ’दशांगुळे उरला’ अशी अवस्था होईल...
’अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।’
सार्थ झाला हा चरण, जेंव्हा त्या’अक्षरा’ना आंजारत-गोंजारत, कुरवाळलं, ’लता’च्या स्वरांनी...
सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर...
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांतलं आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
गीतेच्या अध्यायांतला, ज्ञानदेवांच्या विराण्यातला किंवा हरिपाठाच्या किंवा तुकयाच्या अभंगातला, संस्कृत, प्राकृत, मराठी मधाळ शब्द, असो किंवा गालिब, राजा मेहेंदी अलि खान, मीर तकी मीर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, शैलेन्द्र, कैफी आझमी यांच्या शायरीतला ’सुरे’च्या कैफांत दडलेला ऊर्दू शब्द असो किंवा मीरा-सूर-कबीर ते पंडित नरेंन्द्र शर्मा यांच्या भजन-दोह्यांतला सगुण, मधुरा-भक्तीतं भिजलेला शब्द असो,
’लता’चा स्वर त्यातल्या अभिप्रेत ध्वन्याथ, व्यंग्यार्थ, दृष्टांत, श्लेष, रूपक या शुष्क व्याकरणी संज्ञांच्याही पलीकडचं कांहीतरी सांगून जातो...
कारण, ’लता’च गाण म्हणजे नुसतं गाणं नसत...
             शब्द-स्वर-भावांपलीकडचं ते एक ’सांगण’ असतं
कथेतली व्यथा, व्यथेतली आर्तता, कवितेतली प्रीती, त्यांतली उत्कट अनुभूती यांना, जाई, जुई, हिरवा, कवठी, सोनचाफा, चंदनाच्या मंद सुगंधाचं देण असतं...
अहो ! नुसतं ’शिवकल्याण राजा’ ऐकलं तरी कोण कोण भेटत आपल्याला ’लता’च्या स्वरांतून ?
समर्थ रामदासांपासून, कवि भूषण, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमागज, ते अगदी कविवर्य शंकर वैद्यांपर्यंत, ’मर्‍हाठी’ काव्यप्रतिभेचे समस्त मानदंड...
’गुणि बाळ असा..’, ’वेडांत दौडले वीर मराठे सात...’, ’निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु...’
कायकाय म्हणून आठवावं ? हे तो...    
हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर,
 ’मॉं’ सरस्वतीच्या वीणेचा शृंघार,
गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र,
श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर
ही शिवतेजाची लखलखती असिलता,
ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा,
ही विनायकाच्या शब्दामधले ओज,
अन्‌ अग्रज कविच्या उर्मीमधली वीज
ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा,
अन्‌ गाभार्‍यांतिल मंद तुपाचादिवा,
हा स्थीरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ,
हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ,
हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ,
हा प्रेम, विरह अन्‌ करुणेचा आवेग,
हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळू,
हा तुकयाचा अन्‌ अभंग अक्षय बोलू,
अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी,
रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी
*******
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
www,targetpointblank.blogspot


Tuesday, September 6, 2011

अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव... ’अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’


अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...
तुझ्या पूजनांत । आनंद सोहळा । भाव मनी भोळा । वसे सदा ॥
दहाच दीसांत । लावलासी लळा । गौरीच्या वेल्हाळा । विघ्नहरा ॥
जातांना माघारी । वळून रे पाही । भिजू पाहे बाही । आसवांनी ॥
हातावरी तुझ्या । दह्याची कवडी । देताना भाबडी । भांबावती ॥
ओसरता कल्लोळ । उरे मागे गाज । अस्तित्वाचा षड्ज । रेंगाळतो ॥
शुभसूचक उक्ती । बाहूंमधे शक्ती । हृदयांतरि भक्ती । सर्वदा दे बा ॥
’कृतीविणा नाही । भक्तीला बा अर्थ’। शिकवण सार्थ । देई सर्वां ॥
विरह-अष्टक । स्वीकारा गणेशा । करा दशदिशा । निरामय ॥’

अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’
देखिला ना कधी म्यां देव । परि अनुभवला भक्तिभाव ।
दुर्दम्य निश्चय असंभव ।  सहस्रावधि ललनांचा ॥
निश्चयाच्या महामेरू । सकल कुटुंबाच्या आधारू ।
हृदयी वत्सल शरीरी चारु । माता, भगिनी गौरी या ॥
गणेशा आधी उच्चार, गौरी । सर्वज्ञात चराचरी ।
नरास भारी पडते नारी । यशस्विते ! अनुभवा... ॥
गणपति-अथर्वशीर्ष पठणाचा घोष करीत रात्रभर चालत पहाटेपहाटे ’श्रीं’च्या चरणी सेवेसाठी, मंदिरांत ’समूर्त, सगुण’रूपा समोर रुजू होण्याचे, आदल्या दिवशीचे मनसुबे,, श्रावण सरतासरता त्याच्या विरहांत, कोसळणार्‍या, भादव्यातल्या धुंवाधारांनी, अक्षरश: ’वाहून’ गेल्यावर सुद्धा , स्त्री-सुलभ हिरमुसलेपणा त्यजून, जवळ जवळ बारासहस्र पुण्यपत्तनस्थ ’गौरी’ सकाळी प्रार्थनास्थळी पोहोच्ल्या ! त्यांनी ’एकसमयावच्छेदेकरून’ अथर्वशीर्षाचा पठण-घोष संपन्न केला. बालिकांपासून, वृद्धांपर्यंत, सर्व जाति-पंथांच्या पलीक्डे जावून, हा उपक्रम निर्विघ्नपणे. निर्वेध पार पडला.
घोषाची महती आणि कीर्ती किती ? पूर्वी युद्धांत, योद्ध्यांना स्फुरण देण्यासाठा, घोष पथक ज्यांत शंख, तुतारी, शिंगे यासारखी उच्च-ध्वनिकंपनसंख्या असलेली फुंकवाद्य तर खर्ज-गंभीर नादाची पण दूरवर ऐकू येणार्‍या नगारे, पडघम, ढोल, ताशे अशा चर्मवाद्यांचा समावेश असायचा आजसुद्धा आप्ल्या सैन्यदलांची घोषपथक ख्यातकीर्त आहेत.. इतकच काय तर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी, होलिवुड‌ निर्मिती, ’अ क्लोज्‌ एन्‌काउंटर्‌ ऑफ्‌ दी थर्ड काइंड्‌’ या इंग्रजी चित्रपटांत सुद्धा, परग्रहावरील ’जीवां’ना आवाहन करण्यासाठी, जगांतल्या विविध देशांत धर्मगुरू, साधू, सामान्यजन ’घोष’च करतांना दाखविले आहेत. कसला घोष माहीत आहे ? अवकाशाचा, स्वयंभू अनाहत अनुनाद ॐकाराचा..’द लॉंगेस्ट्‌ डे, चित्रपट सुरू होतांना ऐकू येतात, नगार्‍यावर वाजवलेले तीन र्‍ह्स्व आणि एक दीर्घ आवाज, म्हणजे ’थ्री लॉंग्‌ अन्द वन्‌ शॉर्ट्‌’...मोर्स्‌कोड्‌ मधे ’व्ही’ अक्षरासाठी पर्याय, अर्थात ’व्हिक्टरी’साठी, मित्रराष्ट्रांच्या फौजांनी केलेलं ’नॉर्‌मंडी बीच्‌ इन्व्हेजन्‌’, ’व्ही’ फॉर्‌ व्हिक्टरी ! संधी मिळाली तर चित्रपट जरूर बघा हे चित्रपट !
सर्वसामान्यांची तळमळ, त्यांच्या व्यथा व्यक्त करण्याच्या पद्धतीततला हा सकारात्मक बदल, जाळपोळ, दंगली, हिंसाचारापासून दूर नेणारा, खरोखरच कौतुकास्पद ! इप्सित साध्यासाठी साधन, हे अहिंसात्मक असूं शकतं हे या महिलांना कुठल्या प्रशिक्षणवर्गांत जावून शिकावं लागलं नाही कधी ! अर्थात ऐहिक सुविधांमधे वृद्धी असल्या उपक्रमांमुळ होईल किवा नाही याची माझ्या, ’अंधश्रद्धाविरोधी’ मनाला खात्री नाही...अहं, होणार नाहीच, याची नि:शंकपणे मी ग्वाही देतो ! पण या सर्व माउलींनी गणपतिअथर्वशीर्षाच्या, अगदी फलश्रुतीसह, केलेल्या या पारायणामुळं, त्यांच्या पाल्यांचे श्ब्दोच्चार सु्धारण, शब्दसंपदा वृद्धिंगत होणं..उदाहरणार्थ:
कर्ता, धर्ता, हर्ता, वक्ता, दाता, धाता ही विशेषण...अवपश्चात्तात म्हणजे पश्चिम पासून पूर्व, उत्तर, दक्षिण, उर्ध्व आणि अधर...वरची आणि खालची दिशा... यासह दशदिशा वगैरे अनेक शब्द...
कुठल्याही निश्चयाबाबत, दृढ ’श्रद्धे’बाबत, पाठांतराबाबत...ज्याची आजकाल वानवा आहे... बालकांची विद्यार्थ्यांची, आस्था जागृत झाली तरी निर्गुण निराकार वगैरे ’बाप्पा’ पावले म्हणायला हरकत नाही... अर्थात ’मराठी’चागलं येत म्हणून अर्थार्जनांत वृद्धी होण्याच भाग्य, ’मर्‍हाठी’ तरुणांना कधी लाभणारं आणि लाभणार का ? हा प्रष्ण सुटणार कधी...असो...
गेले दहा दिवस, समाजमनांत ’उत्सव-सौदामिनि-संचार’ करणारी ही ऊर्जामूर्ती, आज तिच्या ’मूलस्थानी’ जळांत, पृथेंत एकरूप होत मिसळून जाणार...
म्हणून हा अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...




Friday, August 26, 2011

’लता’, सचिन’, ’अवयवदान’, ’अतर्क्य-था’


’लता’
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
हे सगळं व्यक्त व्हायला मला कांही कुठल्या वाहिनीवरच्या कार्यक्रमाची गरज नाही !
****
’सचिन’
आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी ।
क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी  ?
ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा ।
पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥
त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र ।
’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥
***
’समीक्षा’
जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान ।
आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥
जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ ।
ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥
आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक ।
कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥
चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व ।
त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥
परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र ।
तोचि झिरपतो हृदयापर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ॥
****
’अवयवदान’
डॉ. लहान्यांनी, देशांतल्या दृष्टीहीनांची,  डोळ्यांची गरज आणि उपलब्ध दाते, यांच गणित कसं व्यस्त आहे, हे सांगितलं...पण ’डोळ्यांपेक्षा .’दृष्टी’ची गरज...डोळसांपैकी ९९% जनतेला विशेषत: राजकारणी, नेते, तथाकथित पुढार्‍यांना..कशी आहे हे सर्वज्ञात आहे. नाहीतर, माझी एक अम्ध मैत्रींण म्हणते त्या प्रमाणे,
          जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ?
          वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी
          जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’,
          दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी...
          भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही
          डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही...
                              अश्रूंनी भिजेल बाही
****
’अतर्क्य-था’
विंदाच्या कवितेतल्या सारखं
परत परत तेच तेच , मालिकांमधले डाव..पेच
याला मार, त्याला ठेच, ’कथा’ (?), (मालिका लांबविण्यासाठी) चहूबाजूंनी खेच...
गरीब गाय काशी ,तिची अचानक झाली ’झांशी’ (म्हणजे ’झांसा’ देणारी)
टीआर्‌पी साठी बाबा, तुझी दिसतिया कासाविशी...
****

 



Thursday, August 25, 2011

’व्यथा’, ’आषाढ,, ’शिवस्तुती’


’व्यथा...’
मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं
मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई
चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल
’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग
थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं
माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ
पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ
’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल..
यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं
****
आषाढातला महाराष्ट्र...
मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी
ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी
दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी
थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’
प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग
काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !!
****
’शिवस्तुती’
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली
गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया
मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला
या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला  

Wednesday, August 24, 2011

दु:ख आपल्या गाठीच बरी


सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी
सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत
सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ
आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई
हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर
जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर
दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसली भेगाळली रानं