Tuesday, November 12, 2013

एकाकि दूरवर

एकाकि दूरवर निवांतशी वनराई, नि:शब्द शांतता भरली ठाईठाई तरुवरे वेढिला संथ जलाशय हासे, सलिलांत बिंबवित नभ, विहगांचे ठसे मग झुळुक एक अवखळशी गिरकी घेई, अलवार स्पर्श जळअंकी करुनी जाई नाच-या लहरि मग धावत कांठाकडे, शतकंठांचे जणु स्वरावलिस सांकडे....

Tuesday, October 8, 2013

सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद

यांतल्या प्रत्येक ओळींत तुम्हाला नजीकच्या भूतकाळांत आपल्या आजूबाजूला घडलेल्या आणि आपली मन सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद दिसतील..मनांत साकळलेले प्रष्ण दिसतील.. सरणार कधी सण प्रभो तुझे रे, उतरणार ही नशा कधी चिरडु-चेंगरुनी मरणाची अन्, फिटेल कां हो हौस कधी देवदर्शनोत्तर अपघाती मृत्युभेट टळणार कधी.. साधुसंत बेगडी तयांच्या, बेडि करी पडणार कधी.. माणुस असुनी श्वापदवृत्ती, अंतरिची त्यजणार कधी.. तेलाने जगण्याच्या ज्योती निमालणे थांबेल कधी..

Wednesday, June 12, 2013

जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं

गीतरामायणाच्या या चित्रमुद्रणा दरम्यान, रोज उशिरा, काम संपल्यावर, चित्रकुटीत म्हणजे बाबूजींच्या पुण्यांतल्या घरी भोजनमैफल रंगायची बाबूजीं बरोबर, श्रीधर, सुधीर(मोघे), श्रीकांत पांरगांवकर, केशव बडगे, प्रसिद्ध संगीतकार रामभाऊ फाटक, अजित सोमण अश्या नामचिन व्यक्ती असायच्या आणि मला सुद्धा त्यांत सहभागी करून घेतलं जायचं. तो काळच असा होता, कौटुंबिक जिव्हाळा, नाती, प्रेम, आपुलकी वात्सल्य जपण्याचा. मग गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगायचा. मग बाबूजी आणि रामभाऊंचे वाद वगैरे गम्मत झाल्यावर ‘आमटी आणि ताक यांच्या समप्रमाणांतल्या मिश्रणाने तयार होणारा ऍमटॅक् हा पदार्थ उत्कृष्ट असून जागतिकस्तरावर तो अफाट लोकप्रिय होवू शकतो, आणि आपण उपहारगृह सुरू केल्यावर, होच नांव त्याला देऊ !’ या बद्दल त्यांच एकमत व्हायचं. अशाच एका रात्री, कॅन्टोनमेंट् भागांत, रामभाऊंच्या एका मैत्रिणीकडे जायच ठरलं. त्यांचे पति सैन्यदलांत कर्नल होते. दूरदर्शनच्या ऍंम्बॅसडर् मधे आठ अधिक एक चालक बसून इप्सितस्थळी पोचलो. साडे अकरा.. फक्त.. वाजले होते..यजमान युगुल घरी नव्हतं. मग ते येईपर्यंत तिथंच बंगल्याच्य हिरवळीवर बसून, बरोबर नेलेलं लिंबूपाणी, नारळपाणी, ताक अश्या पेयां(?)बरोबर चकल्लस सुरू झली. यजमान आल्यावर, आणखी रसद आली..पिठलंभात, पापड अश्या बेतानंतर, परतून पुण्यांत पोचायला अडीच वाजले. पहिलं घर श्रीकांतचं. तो उतरला आणि घराच्या दिशेनं निघाला.. दरवाज्यांत उभी होती, पांरगांवकर-अर्धांगिनी प्रभा.. रणचंडीचा अवतार धारण करून, ‘काकतकर कुठैत ?’ ती गरजली आणि मी डुलकींतून खडबडून जागा झालो. माझ्या पत्नीनं.. निरंजनानं काळजीपोटी विजय देवांना फोन् केलावता. ती दोघ नुकतीच पांरगांवकरांकडे येऊन गेलिवती..मला शोधायला.. मग काय ? घरी गेल्यावर, वाट पाहात थांबलेल्या विजयरावांनी कान पिळून, एकंदर रागरंग बघून, काढता पाय घेतला आणि मग.. नच सुंदरि करु कोपा दे ना मज.. वगैरे मनधरण्या, पुरुष सुलभ... अश्या खूप गमती.. पण काम पण खूप झालं. ते दिवस जणू की होते पिंपळपानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानी दृश्यमान हर क्षणी मज अप्रुप होते सगळे जणु की स्वर्ग समृद्ध जाहला नूतन जीवन सर्ग कधि सामान्यातच असामान्य प्रकटले कधि कुणी फाटका वैश्विक उक्ती बोले कधि प्रचिती येई बौधिक श्रीमंतीची कधि विद्वज्जड आढ्यता, कर्मकांडांची तो सुहासिनीचा केवळ आशीर्वाद आधारा स्मरुनी कृतज्ञ अन् कटिबद्ध राहील सदा जाण तिची.. माझा शब्द मनरंजन निर्मळ, विशुद्ध.. आम्हा वेद नियती सगळांना सगळच भरभरून देते असं नाही. स्नातकोत्तर, पुढच्या मार्गक्रमणासाठी, दिशा मिळण्याच्या प्रतीक्षाकालावधी दरम्यानच्या दिवसांत, मला कधी स्वप्न सुद्धा पडण्याची सुतराम श्यक्यता नव्हती, की मी, सरधोपट मार्ग चोखाळणार-या मुंबईतल्या एका कुटुंबांतला मुलगा, चित्रवाणी नामक एका, त्या काळांत फारशा परिचित नसलेल्या माध्यमांत, माझं भविष्य घडविणार आहे.. जाउ दे पुढे, ज्यांना भरभरुनि मिळाले मी पाहत आहे मागे कितिजण उरले जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं बाकींची आलिमिळि गुपचिळीच राखेनं..

Tuesday, June 4, 2013

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना असलेल्या राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या.. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही.. नसावा बहुधा !! १..शांपूच्या बाटलींतल्या संपृक्त द्रावानं तळ गाठला, की आम्ही त्या बाटलींत थोड पाणी घालून, ते विसळंण, पुनःपुन्हा वापरतो. काय करणार.?. कांटकसर अंगवळणी पडलिये नां..! २..दंतमंजनार्थ मलम..Paste.. तेंव्हाच आम्ही संपलं असं म्हणतो, जेंव्हा, पत्र्याचं आच्छादन पिळून, खालपासून वर पर्यंत गुंडाळून सुद्धा त्यांतून कांहीही फलित मिळत नाही तेंव्हा ! ३..मी जेंव्हा भाजी बाजारांत जावून, १००य१५० रुपयांची भाजी खरेदी करतो, तेंव्ह त्या भाजीवाल्या/ली कडे, आल्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या..दोन कां होईना.. कांड्या, कढीपत्ता आणि एकदोन मिरच्या, ‘तशाच’, म्हणजे ‘फुकट’, पिशवींत टाक अशी मागणी करतो.. तो मसाला माझ्या जन्मसिद्ध हक्काचा असल्या सारखा.. ४..मला कांही कारणानं, समारंभांत, आप्तेष्ट, स्नेही आदी मंडळींनी, प्रेमादरानं दिलेल्या भेट वस्तू, मी संधी मिळतांच, कुणा नवपरिचिताला, किंवा माझ्यासाठी फारशा महत्वाच्या नसलेल्या व्यक्तीला, त्याच्याकडच्या आमंत्रणानंतर, नाइलाजानं, नाखुषीनं जावून, व्यवस्थीत पुख्खा झोडून (नाइ’लाजा’नं ?), मजकडून भेट म्हून प्रदान करतो. आणि साज्या निर्लज्जपणाचा कळस, कहर म्हणजे, मी त्या मिळालेल्या भेटवस्तूचा चकचकीत आच्छादन-कागदसुद्धा पुनर्वापर करींत, कांटकसरीच्या संस्कारांची बूज राखतो. ५..शोभेच्या वस्तू ठेवायच्या, कांचांची पारदर्शक दारं असलेल्या कपांटांत आलेल्या पाहुण्यानं डोकावून, त्यांतल्या, मी हौसेनं खरिदलेल्या चिनी मातीच्या, कषाय-पेय-धारक-संचाचं कौतुक करून, किंमत विचारली, की मी मनोमन सुखावून, खरिदल्या किमतीच्या दीडदोनपट बढाके दाम सांगतो. पण त्या पाहुण्याला हे माहीत नसतं की मी स्वतः त्यांतून चहा-कॉफी वगैरे कधीच पीत नाही. हाः..हाः..हाः.. फुटलं तर नुस्कानी नको रे बाबा.. ६..घरांत कांही कार्य आहे.. अलंकार घडवून पत्नीला सुखावून, तिचं कौतुक भरलं स्मितहास्य झेलंत, कसचं, कसचं म्हणत मान ताठ करायची आहे. तेयासाठी सराफकट्ट्यावर जावून सुवर्ण खरेदी करायची आहे.. असं कांही नसतांनासुद्धा मी सोन्याच्या आजच्या भावाची चिंता करीत बसतो. ७..माझ्या चित्रवाणीसंचाचा, किंवा दृक्श्राव्य-तबकडी-दर्शकाचा दूरनियंत्रक.. म्हणजे Remote हो..जोंव्हा मला सहकार्य करेनासा होतो, तेंव्हा मी तो, खिळखिळा होईस्तो, सर्व बाजूंनी ठोकतो, आपटतो, उघडून, उगाचाच, त्यातलं तंत्रज्ञान अवगत असल्याच्या आविर्भावांत, त्यांत पारंगत असल्यासारखा आंतले भाग उचकटत बसतो, पण साधी गोष्ट की त्याचा ऊर्जा स्रोतसंच..Battery of cells..बदलंला पाहिजे हे माझ्या लक्षांत येत नाही, किंवा लक्षांत येवऊनसुद्धा अवलंबकृती करीत नाही.. खिशांतले चार चव्वल खर्ची पडतील म्हणून.. ८..कधीकाळी, बायको-मुलांनी फारच हट्ट केला तर.. म्हणजे मुलांचा हट्ट आणि भार्येचं डोळे वट्टारणं.. चौपाटीवर जावून भेळ-पाणीपुरी खायचा बेत करतोसुद्धा मी, बरंका,, पण पाणीपुरी खावून झाल्यावर, दोनचार डाव मसाल्यांचं पाणी ढोसल्यावर, हायहुई करीत, तिखट लागलं म्हणून, भेळवाल्या भय्याकडे, साधी कोरडी पुरी, फुकट मागायची सवयच लागली आहे मला एका साध्या पुरीचे कुणी पैसे देतं कां सांगा बरं मला... आणि जर कां भैयानं ती नाकारली तर मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते, मी बरोबरच्या कुटुंबियांना शरमेनं मान खाली घालावीशी वाटेल, अशा पद्धतीनं आकांडतांडव करतो.. आजूबाजूला गर्दी जमेस्तो.. ९..कुणाकडचं, दुपारच्या भोजनाचं जर निमंत्रण मिळालं मला, तर यजमानाला, अतिथी पूर्ण समाधानानं भरपूर, यथेचित जेवला हे समाधान मिळावं या प्रमाणिक आणि शुद्ध हेतूनं, त्यादिवशीच्या सकळच्या नाश्त्याला फाटा देतो, नि जवळजवळ उपाशीपोटी पोहोचतो इप्सित स्थळी.. १०..माझे सदरे, जुने दिसायला लागल्यावर, मी ते शय्याभूषा म्हणून वापरायला सुरुवात करतो. ते आणखी जुने वाटायला लागल्यावर, मी, खास होळी, धुळवड, रंगपंचमीसाठी म्हणून, बासनांत बांधून ठेवतो.दोनचार वर्षांनी मग जेंव्हा ते फारच जीर्णशीर्ण दिसायला लागातांत, तेंव्ह, नाइलाजानं, अत्यंत जड अंतःकरणानं, पत्नीच्या हवाली करतो.. पोच्छ्या म्हणून वापरायला.. ११..तसा पिझ्झाबिझ्झा घरपोच मागवायला मला जिवावरच येतं. पण काय करणार, मुलाभाळांसाठी करावं लातं ना कधीकाळी, सठीसमाशी..त्यांतल्या त्यात एक, माझ्या कांटकसरीच्या संस्करांना पूरक गोष्ट म्हणजे, त्या वितरणकुमारांना, ‘वरदक्षिणा घ्यायला बंदी असते म्हणे.. मग मी खूप आग्रह करतो त्यांना प्रेमपूर्वक.. नशीब, घालून दिलेला नियम तोडणारा, त्यांतला एखादा भेटला नाहिये मला.. नाइतर पंचाईतच नां.. मग आतां तो अगदीच नाहा नाही म्हणतोय अशी खात्री झाल्यावर, मी कोडगेपणानं त्याच्या मागं लागून, चारपांच, आमचुरा आणि मीर्चीच्या भुकटीच्या पुड्या पदरांत पाडून घेतोच.. दुस-या दिवशई सकाळी, मॅगीवर छिडकून, ती आणखी चविष्ट करायला.. आणि... छिद्रान्वेषी लोक कितीही आणि कांहीही म्हणोंत.. कांही गोष्टी म्हणजे, पुणेकरांची मक्तेदारी आहे असं मुळीच नाही हं..! उदाहरणार्थः दुधाची प्लास्टिक् पिशवी विसळून ते पाणी, मूळ दुधांत मिसळणे, आदल्या दिवशीच्या पोळ्या कुस्करून, त्यांत तूप-साखर किंवा तूपगूळ घालून त्याचे छान लाडू करणे वगैरे. हे सगळ तर आम्ही करतोच, पण तुम्हाला सांगतो, माझी आई दोन लाजवाब पदार्थ करायची.. छान, बिनडागाच्या, केळीच्या सालांची, डाळ घातलेली भाजी आणि वांगी, भोपळा, भेंड्या यांची देठं चिरून, त्यांत दही, तिखट, मीठ घालून केलेली देठी.. आम्ही उदबत्ती पाण्यात भिजवून लावतो.. जास्त वेळ टिकते.. अमृतांजनाच्या किमती वाढल्यापासून, कांही दुकानदारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ आम्ही, त्याला दुवा देत, घेतो.. म्हणजे, उघड्या बाटलींत बोट घालून त्याला लागलेलं अमृतांजन कपाळाला चोळून घ्यायचं.. फक्त एक रुपयांत.. हे सगळ आम्ही कां करतो..? विनोद निर्मिती करायची म्हणून.. ? गैरसमज, मनांतून काढून टाका..! आज आमच्या सारख्या सर्वसामान्यानं, असा निगुतीनं संसार केला नाही, तर मरण्यासाठी विष विकत घ्ययलासुद्धा दमड्या उरणार नाहींत. जनहो..!!

Thursday, May 23, 2013

रमेश गोविंद वैद्य

रमेश गोविंद वैद्य संस्कारानं मित-मृदुभाषी, सहृदय, प्रसन्नचित्त, शिक्षणानं कायदेतज्ज्ञ वकील, व्यवसायानं जाहिरात संकल्पक, लेखक, वृत्तीनं सक्षम कवि-रुबाईकार असा आमचा मित्र रमेश गोविंद वैद्य..याचा परिचय मला करून दिला, आणखी एका सुहृदानं.. १९८०-८१ मधे बहुधा.. २३, मुकुंद निवास, डी.एल्. वैद्य रोड, दादर, या माझ्या मुंबईंतल्या वास्तव्याच्या ठिकाणी, ८० ते ८७ हा सातवर्षांचा कालखंड, आम्ही सर्वांनी श्रवण, दर्शन, घ्राण, रसना आदि ज्ञानेंद्रियांनी, म्हणजे त्वचेचा सहभाग फक्त रोमांच जाणिवेपुरतांच हं..अक्षरशः भोगलाय ! आम्ही म्हणजे कोण माहीत आहे..आजकालचे सगळे प्रथितयश.. डेबू देवधर, सुधीर मोघे, त्या काळांत माझ्याशी.. कां कुणास ठावकी.. पण खूप जवळीक साधून असलेला, म्हणजे किमान तसं अगदी बेमालूमपणे भासविणारा सुधीर गाडगीळ, अरविंद हसबनीस, चंद्रशेखर गाडगीळ, विलास आडकर आणि शिवानंद पाटील..या यादींतले तीघे आतां हयात नाहीत पण ते लौकीक जगासाठी.. आमच्या मनांत ते रुजलेत, वाढलेंत बहरलेंत आणि बरसलेंत.. शब्द-स्वरांच्या स्नेहमयी वर्षेंत चिंब भिजवीत.. अक्षरशः काव्यशास्त्रविनोदाचं वारं रोज अगदी पंचपंच उषःकाली..म्हणजे थोडक्यांत सगळ्या हस्ती जागृतावस्थेंत येवून माणसांत आल्यावर..वाहायला लागायचं.. मग जाऊन येऊन, सुरेश वैद्य, आनंद मोडक, श्रीकांत पांरगांवकर, चंदू काळे, सदानंद चांदेकर अणि पुण्यातले अनेक कलाकार.. उभरते, प्रथितयश.. स..ग्गळे. अगदी आदरणीय, सुप्रसिद्ध, जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त सुद्धा एका रात्रीचा निवारा घेवून गेलेंत २३ मुकुंद निवासांत.. आणि विख्यात संगीतकार रामभाऊ कदम.. माझी पेटी घेवून, रात्री ११ ते पहाटे तीन पर्यंत.. लिहायला लागलं तर एक लठ्ठमुठ्ठ कादंबरी होईल या वास्तूवर.. असाच एक ‘दिवस’ रमेशला घेवून आला आमच्या त्या मठींत.. आणि, उंबरठा ओलांडल्या क्षणापासून रमेश मग आमच्या परिवारांतला एक होवून गेला. जशी सुधीरनं.. मोघेंच्या हं.. शब्दधून तीथं लिहिली, एका हिंदी चित्रपटासाठी गीतं रचली संगीतबद्ध केली, डेबू नागीण किंवा खानदान च्या छायाचित्रणांत व्यस्त असायचा, चंद्या गाडगीळनं बाकीशब्द आणि कांचनसंध्या स्वरांकित केली, तशाच अनेक रुबाया किंवा अन्य काव्यप्रकारांच्या ज्योती, रमेशनं तिथं उजळल्या पाजळल्या.. त्याच दरम्यान त्याची ही कादंबरी, व्हिक्टोरिया टर्मिनस्, महानगर मधून प्रकाशित होतं होती. सगळ्यांना एकत्र सवड असेल तेंव्हा तो, क्रमशः प्रसिद्ध होणारं ते लिखाण वाचून दाखवीत असे. ‘यह मुंबइ मेरि जान’.. देणारी आणि चुकलांत माकलांत तर घेणारी सुद्धा.. अशा या मायामोहिनीचे नखरें आणि तिच्या त्या गुबगुबींत पंज्यामधे लपलेली नखं.. दोन्हीचं यथार्थ, रोमांचक वर्णन, रमेश ऐकवायचा आणि आम्ही अंतर्मुख व्हायचो.. कारण आमच्यापैकी प्रत्येकजण, पोटार्थी, रोजमरा की जींदगी जगण्याचा एक अविभाज्या भाग म्हणून.. त्या चरकांतून घाम गाळत थकलाभागला घरी.. त्या मठींत येत होतां..त्यामुळं ब-या जवळच्यांच्या जगण्याचा जणू आरसाच असल्याचा भास व्हायचा ऐकतांना.. रमेशला मी कधी, खिन्न, दुःखी, खंतावलेला पाहीलाच नाही इतक्या वर्षांत..कायम हसतमुख, प्रसन्नमुद्रा. पण कधीकधी अंतर्मुख, तंद्री लागलेला मात्र अनेक वेळां पाह्यलय त्या काळांत..ही तंद्री बहुतांशी अध्यात्मिक भासली मला.. उगा सृजनाचा आव आणलेली कधीच नव्हती ती.. कारण त्याच्या रचना सहजप्रसवा असतांत.. आयुष्याचे चढउतार, अनुभव, निरीक्षणं यांचं शब्दरूप असलेल्या.. या रचनांनी जशी मला भुरळ पडली ,तशीच, एका अतिशय संवेदनशील आणि कवितेच्या शब्दांमधल्या अध्याऋताची विलक्षण जाण असणा-या चंद्य़ाला.. चंद्रशेखर गाडगीळलाही पडली आणि रुबायांना अप्रतिम स्वरकोंदणं मिळाली. त्या काळांत, मुंबई दूरदर्शनची मेट्रोवाहिनी...म्हणजे दुसरा मनोरंजन-स्रोत.. सुरूं झालिवती. त्या वाहिनीसाठी मी या, प्रगल्भ पण उपेक्षित कलाकाराच्या रुबायांवर बेतलेले दोन कार्यक्रम केले. तसा वरकरणी.. आणि अंतःकरणीसुद्धा खरं तर..अत्यंत साधा सीधा, अगदी लक्षमणच्या कॉमन् मॅन इतका, फाटका दिसणारा हा माणूस, स्वरचित रुबाया सादर करायला लागाला की, जितक्या अलवारपणे तो एखाद्या छोट्या समूहाला मोहून टाकतो, तितक्याच सहजतेनं, पहिल्या दहा-बारा मिनिटांतच, कुठल्याही जाणकार वयोगटाच्या, पांचशे हजार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला लागतो. आणि मग, रुबाई घाटाला साजेसे विविध विषय, प्रेमापासून प्रेतापर्यंत, भोगापासून वैराग्या पर्यंत, आणि कळ्यंपासून पुतळ्यांपर्यंत, कधी तिरकस फटकेबाजी करीत. कधी निष्ठुर सत्य सांगत आपल्याला अंतर्मुख करतांत, आणि प्रसंगी खळखळून हसायलासुद्धा लावतांत.. हे सगळ आज लिहायचं निमित्त म्हणजे, व्हिक्टोरिया टर्मिनस् चं वाचन होतय.. पुण्यांत. आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दप्रपंच.. हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा आमचा हा आनंदी निरागस, निर्व्याज, निरपेक्ष जिवलग सखा, यंदा त्र्यहात्तरींत प्रवेश करतोय.. या वळणावर त्याला, निरामय आरोग्य, अभिष्ट चिंतून आणखी खूप, गूढार्थी शब्दलेणी, त्याच्याकडून पुढच्या काळांत मिळतील, अशी खात्री बाळगूया ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Friday, May 17, 2013

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २)

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २) गेल्या सपताहांत आपण, नकारात्मकतेच्या व्याधींतून बाहेर पडण्याच्या, पांच सोप्या युक्त्या दृष्टीपथांत आणल्या, त्यांची दखल घेतली.. आज ऊर्वरित पांच उपाय, उपचारांचा विचार करूं.. ६..राहून गेलेल्या आणि करण निकडीचं असलेल्या कामांची यादी, स्मरणपत्र म्हणा हवं तर.. जमेल तिथं, घरांत जागोजागी, लावा.येताजाता तुमच्या नजरेस ती वारंवार पडेल याची काळजी.. नाही नाही,, खात्री वाटली पाहिजे. जेवणाचं मेज, शीतपेटी, आरसा, बेसिन वरचा, कपाटावरचा, प्रसाधन मेजावरचा.. ज्याला आपण मराठींत, ड्रेसिंग् टेबल् म्हणतो.. दरवाजामागे, पुढे. वाहनाचं इप्सित-स्थल-मार्गक्रमण-सुविधा चक्र.. म्हणजे आपलं स्टिअरिंग् व्हील् हो... अशा या कांही जागा तुम्हाला, सहज सुचल्या म्हणून सांगतोय.. काराण नजरेआड ते मनापल्याड गेलंच म्हणून समजा.. म्हणून हा खटाटोप. कामं ठेवा नजरेसमोर अन् वावरा बिनघोर.. जोडीला, गंमत म्हणून, ती कामं व्हायच्यी आधी आणि नंतर तुमचा चोहेरा, अनुक्रमे, कसा होता आणि होईल हे दर्शविणारी व्यंगचित्र लावा..पहा ती तुम्हाला आपोआप उत्तेजना देतांना तुमच्या ओठांवर एक हलकी स्मितरेषा फुलवतांत की नाही ते.. ७..मित्रमंडळींबरोबर कुटुंबियांसमवेत, तुमच्या, नजीकच्या भविष्यांतल्या उद्दिष्टांबद्दल सतत च्रचा. निचार विनिमय, सल्लामसलत सुरूं ठेवा..हेतू जाहीर करा..त्यामुळं आपोआपच तुम्हाला ते साध्य करण्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागेलं, आणि त्या दिशेनं तुम्ही वाटचाल करूं लागाल. स्वतःबरोबर एक कार्यपूर्तता-काल-दर्शक करार करा, त्याच्या प्रती मित्रमंडळी कुटुंबिय यांना किंवा अन्य कोणीही, जे तुमचा उत्साह वृद्धिंगत करूं इच्छितांत, अशा सर्वांना वाटा. त्यापैकी झालेल्या कामांबद्दल, त्यांना मधूनमधून कल्पना द्या, अभिप्राय घ्या.. आणि कार्यपूर्तीसाठी स्वतःलाच कालमर्यादेचं रिंगण आखून द्या. ८. स्वतःच्या नाउमेदीला कुरवाळत बसूं नका. जेंव्हा जेंव्हा निरुत्साही वाटेल, तेंव्हा तेंव्हा त्या जाणिवेला लगाम घाला. सर्वसामान्यतः, ही एक सवय असते की आपले प्रष्ण सुटण्यात अडचणी येत असतील किंवा उत्तर मिळत नसेल तर त्या प्रष्णाच्यामानानं आपण स्वतःला अल्पकुवतधारक समजायला लागतो. हा अनुभव आपणापैकी बहुतेक सर्वांनी कधीनाकधीतरी घेतलेला असतो. त्यावर तोडगा म्हणजे.. मनातल्या नकारात्मकतेला तीलांजली देवून, त्यांच्या जागी सकारात्मकतेच्या बीजांची पेरणी करा. स्वतःला बजावा की हे प्रष्ण आपल्याला वाटतायत त्यामानानं खूपच क्षुल्लक आहेत. उदाहरणारथ, मला हे कसं जमणार.. मी यांतनं कसा बाहेर येणार.. असं रडत बसण्या ऐवजी, हे करणं मला अत्यंत आवश्यक आहे.. एकावेली एक अशा छोट्याछोट्या क्लृप्त्या शोधत मी ते कसंही करून मिळवेनच.. असं घोकत रहा. ९.. दीर्घ श्वास घ्या.. रात्री शांत झोप घ्या.. सकाळी उठून आन्हिकं उरकल्यावर एक छानपैकी Shower घ्या. आणखी एक युक्ती माहीत आहे..ब-याच वेळा कामास येते प्रातःकालीन वैचारिक गोँधळांत.. आदल्या रात्री, मेंदूची नैराश्यदायी विचारांनी चाळण केली असताँना, पोटाच्या स्नायूंची, श्वासाबरोबर, संथपणे, आंतबाहेर हालचाल करीत, योग सदृश व्यायाम करा. म्हणत रहा.. मी आता यानंतर मस्त ताणून देणार आहे. पूर्ण विश्रांती घेतल्यावरच उठणार आहे. उद्या जागं होतांना, या उद्वेगजनक मनावस्थेंतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी, मी प्रसन्न, ताजातवाना आणि उत्साही, गतीशील मानसिकता घेवून डोळे उघडलेले असेन. मग स्नानासाठी अंगाला जलधारांचा स्पर्श झाला की हळूहळू आपोआपच विचारांना सकारात्मकता, अडचणींतून सुटकेचं तंत्र, समोर उभ्या ठाकलेल्या प्रष्णांची उत्तरं.. सगळं माझ्याकडूनच प्राप्त होईल.. हे सगळ अनुभवा, आणि कोडी सुटल्यावर आणि कोँडी फुटल्यावर हा मंत्र तुमच्या मनोव्याघिग्रस्त आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणींना देवून त्यांचा दुवा घ्या १०.. वाणीची, उच्चाराची शक्ती, ताकद, बलं फार मोठं असतं. मरा मरा, हे म्हणताम्हणता वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालाच की नाही...शब्दांच्या, वाक्यांच्या, साध्यासाध्या उच्चारांत, अनुक्रमे अक्षरांवरच्या, शब्दांवरच्या आघातांवर बदल करून बघा.. दूर जाणारा एखादा मागे वळून पाहांत जसा परत फिरतो तश्या सकारात्मक संधी तुमच्या भवती आपोआप गोळा व्हायला लागतील. अडचणींच्या विचारांभवती रुंजी घालण्यांत, त्यांना कुरवाळण्यांत अमुल्य वेळ दवडण्यापेक्षा, लाभाचे हिशेब करीत वृद्धीची गणितं मांडण्यांत व्यस्त रहा.. या छोट्याछोट्या बाबी तुमच्यांतल्या नकारात्मकतेला बाहेरचा रस्ता दाखवितांना, सकारात्मकता रुजवतील आणि तुम्ही, नाइलाजानं, नकळत जोपासत असलेली स्थितिप्रियता लोप पावून, ती गतिशीलतेंत, उपक्रमशीलतोंत परीवर्तित होईल. तुमची विचारशक्ती हे एक कसब असल्याप्रमाणे तुम्ही जोपासत रहा, कुशाग्रता वाढवा, आणि त्यांवर स्वर व्ह एखाद्या कुशल योद्ध्या सारखे. तुमचा सकारात्मक प्रवेग वाढल्यावर तुमची ऊर्जा आपोआपच पुनरुजेजीवित होइल आणि तुम्ही तुमच्या मनाचा, वागणुकींतला तोल सहजगत्या पुनर्प्राप्त कराल.. ..इति

Monday, May 13, 2013

दशसूत्री.. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत

दशसूत्री उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत कधीकधी आपल्याला खूप थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं, किंवा उदास, एकलकोंड वगैरे वाटायला लागतं. पण तस वाटल तरी काळजी करण्यासारख कांही नसत त्यांत. हे सगळ जगण्याचा, जिवंतपणाचा भाग असतो.. एवढच नव्हे तर ते सगळ म्हणजे जिवंतपणाचा पुरावासुद्धा असतो. कारण, मी मागं एकदा नमूद केलय तसं.. सुखं वाटावी घरोघरी दुःख आपल्या गांठीच बरी.. त्यामुळ आपण ते ओझ वागवत हिंडत असतो आणि स्वतःला उदासवाण, केविलवाण करून घेत असतो वारंवार..आयुष्य लाटांसारखं असतं. त्यामुळं त्याला चढ-उतार अर्थातच असतांत.. कधी पुळणीवर लोळण तर कधी नभाकडे झेप.. नाही कां.. कुठे आणि कुणाचं जिणं चढ-उताराविणा आहे.. अगदी रावा पासून रंका पर्यंत.. सगळ्यांचीच एक गत.. सुटका नाहीच.. कितीही किंमत मोजा.. कधीकधी असं वाटत असेल तुम्हाला, की आतां मनाची उभारी, उदासी झटकून कामाला लागणं वगैरे अशक्यप्राय गोष्टी आहेत. पण असं वाटलं तरी खचून जावू नका, कारण असे तुम्ही एकटेच नाही आहांत..आपण सगळेच समवेदनांकित आहोत. जोएल् सिम्स् म्हणतांत की, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून आणि अभ्यासांतून, मी अश्या निराशाजनक क्षणांमधून बाहेर कसं पडायचं याचं एक तंत्र विकसित केलं आहे. मी परत उभारी धेवून, ऊर्ध्वगतिशील आणि क्रियारत व्हायला शिकलो आहे. तर.. उत्तिष्ठ, जागृत, प्राप्यवरन्निबोधित हे ते दहा उपाय.. लक्षांत ठेवा ही एक तात्पुरती अवस्ता असते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असकांत. तुम्ही सद्धा या नाण्याच्या खालच्या बाजूला पाहता आहांत असं समजा. पण याचा अर्थ असा थोडाच आहे की त्याला वरची बाजूच नाही तुमची चलनगती आणि प्रेरणाबल जेंव्हा मंद वाटेल तुम्हाला, तेंव्हा तुमच्या राखीव ऊर्जेची गुंतवणूक करा आणि परिस्थिती बदलत असल्याची जाणीव अल्पकाळांतच तुम्हाला व्हायला लागेल. जिवावर आलेलं असतांना सुद्धा उठा आणि मस्त फेरफटका मारून या. थकलांत तर कुणा मित्राला दूरध्वनी करा. पहा तुमचा उत्साह आणि उमेद परतते की नाही तें.. आपली एक भ्रामक समजूत असते की, आपल्या जिवाला तेंव्हाच बरं वाटत, जेंव्हा कांहीतरी भरघोस वैयक्तिक लाभ होतो. पण खरं तर तसं नसतं. पहिलं एक पाऊल पुढे टाकून बघा तर खरं..मग पुढच. आणि मग हळूहळू अंतर कापत वाटचाल सुरू करायची.. सुरू ठेवायची.. ज्या दिवशी चित्तवृत्ती उल्हसित नसतील, त्या ताळ्यावर आणायच्या असतील त्या दिवशी. सुरुवात करा थोड्याश्या व्यायामानं किंवा, रोजच्या आन्हिकांच्या निमित्तानं शारीर हालचालीनं मग आपोआपच तुम्ही स्वतःला बजाऊ धजाल.. त्या काशीनाथ घाणेकरांनी गायलेल्या चित्रपटगीतांतल्या सारखं.. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आणि चमत्कार झाल्यासारखं, हळूहळू तुमची व्यायामची गोढी वाढायला लागेल अन् वृत्ती तजेलदार, प्रफुल्लित होतील..मनोगतींला एक प्रकारची प्रेरणा मिळेल.. आणि हे करीत असतांना एका वेळी एकच उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवा, आणि त्यावरच लक्ष केंन्द्रित करा. कारण कधी कधी, कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित असं म्हणत, आपण एकाच वेळी अनेकविध कामांचा विचार, प्रक्रिया, कृती यामधे गुंतल्यावर, एक ना धड, भाराभर चिंध्या या (अ)न्यायानं बोजवारा उडतो आणि मग मनाचिये गुंथी गंफियेला शेला तितरभितर होतो, बिघडतो, आणि थकवा जाणवायला लागतो..आपणच ओढवून घेतलेला, शिंगरू मेलं हेलपाट्यानं.. तसं.. कांही विशेष नसतं बरं कां हे.. अगदी सग्गळ्यांच्या बाबतींत, हे कधीना कधीतरी घडतचं... या सगळ्यावरचा एक जालीम उपाय म्हणजे, एकावेळी एकाच प्रकल्पावर काम करा. शांतपणे आणि उत्तम रीतीनं तो पार पाडा. त्या यशामुळं आपोआपच, तुमचा उत्साह द्विगुणित होईल आणि तो ऊर्जास्रोत तुम्हाला पुढच्या प्रकल्पाला पुरेसा उत्साह, उमेद, बल.. पुरवेल. नाउमेदीच्या अशा काळांत, जिथं कांही सकारात्मक काम, समारंभ सुरू आहे अशा एखाद्या मित्राकडे, आप्तस्वकीयाकडे गेलांत तर तुमच्या मनाची जड अवस्था नकळत गळून पडेल आणि हलकं वाटायला लागेल. काळजी एकच घ्या की ज्या स्नेह्या किंवा आपताकडे जाल, तो स्वतः उमद्या स्वभावाचा आणि अगदी आगंतुकम्हणून गेलांत तरी स्वागतोत्सुक असायला हवा. नाहीतर त्याचा आंबट चेहेरा बघून तुमचं तोंड आणखी कडू व्हायचं.. आणि मदत मागा.. संकोच कसला करता.. अशा क्षणी निकटवर्तियांनीच एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हायचं असतं..महाजालांतल्या एखाद्या संकेतस्थळांतूनसुद्धा मित्रत्वचे, सुखदायी सल्ले मिळून जातांत कधीकधी..अवलंब करून बघायला काय हरकत आहे.. नाउमेदी अवस्थेंत, नकळत मन सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतं. आणि हेच कधीकधी तुमच्या निरुत्साहाच मूळ कारण होतं. विचारांची गाडी रुळावर आणा आणि विचारप्रवाहाला अशा ठिकाणी वळवा की जिथं उतार.. आणि उतारा सुद्धा.. मिळेल आणि आपोआपच गतिमानता प्राप्त होईल.. सव्तःचा स्वतःशी संवाद वाढवा अगदी अंतर्मनांत वादावादी, संघर्ष झाला तरी चालेल.. घर्षण देत ऊर्जेला जन्म..आणि फेकून देतं गारठा.. आखडलेपण.. मी हे नाही करूँ शकत पेक्षा, पहाच तुम्ही मी कसं पैलतिराला लावतो तारू, असं म्हणत रहा.. (क्रमशः)