Wednesday, October 19, 2011

दृष्टिहीन दिवस किंवा श्वेतछडी...व्हाइट्‌केन्‌...दिवस...
१९३० मधे युरोपांत एका छायाचित्रकाराला अपघातानं दृष्टिहीनता आली. गर्दीत किंवा रस्त्यावर चालतांना त्याला अडचणीचं व्हायला लागल्यावर त्यानं एक काठी जवळ बाळगली. पण रस्त्याच्या काळ्या रंगांत काठी स्पष्ट दिसेना तेंव्हा त्यानं त्या काठीला पांढरा रंग दिला. आणि
व्हाइट्‌ केन्‌ किंवा श्वेतछडीचा जन्मझाला.
पण पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९३१ नंतरच ह्या काठीचा खरा पसार, पचार झाला. १९६४ मधे दृष्टिहीनांसाठीच्या अमेरिकेतल्या राष्ट्रीय मंडळाच्या सुचनेवरून सेनेट्‌नं ६ ऑक्टोबर्‌ रोजी ठराव करून, तत्कालीन अध्यक्ष लिंडन्‌ बी, जॉन्सन्‌ यांना, या काठीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे अधिकार दिले आणि १५ ऒक्टोबर्‌ हा जागतिक व्हाइट्‌ केन्‌ दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश अध्यक्षांनी काढला
ही श्वेतछडी आधार-काठी म्हणून वापरांत न आणता गर्दीत किंवा रस्त्यांत रहदारीमध्ये दृष्टिहीनांना वावरण सुकर व्हावं म्हणून सुविधा-स्वरूप वापरण्यांत येवू लागली. त्या श्वेत वर्णावर जर दोन आडव्या लाल रेषा असल्या तर ती व्यक्ती कर्णबधीर-दृष्टिहीन आहे असं मानण्यांत येवू लागलं.
काठीच्या तळाशी असलेला ३..४ इंचाचा लाल रंग कदाचित, ती पांढर्‍या पार्श्वबूमीवरही स्पष्टपणे दिसावी ह्या हेतूनं पुढे दिला गेला असावा.
अवकाशाचा स्थायीभाव कोणता ? अंधार की उजेड ? अर्थातच अंधार ! कारण प्रकाशाला, उजेडाला स्रोत आवश्यक असतो. अंधार असतोच सर्वत्र,,,सर्वदूर...प्रकाशाला सीमा, मोजमाप असत...पण अंधाराला ना सीमा, ना मोजमाप
आपण या जगांत अस्तित्वात यायच्या आधी पण अंधार... आणि आपलं अस्तित्व संपल्यावर पण अंधारच.
आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय ? तर त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होवून आपल्या बुबुळांद्वारे आंत नेत्रपटलावर पडतो आणि नेत्रपटलातल्या संवेदन-वाहिका...नर्व्ह्ज्..तो संदेश मेंदूला देतांत...निमिषार्धात...आणि आपण ती वस्तू पाहातो
या जगांत अनेक प्राणिमात्र निसर्गानं, कांही तरी लौकिकार्थानं कमतरता असलेले जीव, जन्माला घातलेत आणि ते आपलं आयुष्य, सभोवतालांत, व्यवस्थित जगताहेत. उदाहरणार्थ, सर्पाला म्हणे श्रवणेंद्रिय नसते, मासा जळांत पोहोतांना तोंडावाटे पाणी घेउन कल्ल्यांतून बाहेर सोडतांना म्हणे त्यांतला प्राणवायू ग्रहण करतो. कासवी आपल्या पिलांना, आपल्या दृष्टीनं दूध पाजते असा दृष्टांत खुद्द संतश्रेष्ट ज्ञनेश्वरांनीच दिलाय. अगदी माणसांत सुद्धा, लौकिकार्थी हाती-पायी धड असूनसुद्धा, काळीज किंवा मन नसलेले नमुन्यांचा आपण क्षणोक्षणी अनुभव घेतोच की !
काहींना डोळे असतांत, घारे, भुरे, तपकिरी रंगाचे कधी भृंगाच्या काळ्याभोर अंगाचे. पण त्यांना नजर किंवा दृष्टी असेलच याची आपण खात्री देवू शकतो ? कान आहेत पण ते हलके नाहीत याची ग्वाही देवू शकतो ? नाक आहे पण ते फक्त सुगंधाचाचं वेध घ्रेईल असं छातीठोकपणे सांगू शकतो ?
बीदॊवेन्‌हा जागतिक कीर्तीच्या संगीतकार, त्याची सुप्रसिद्ध ९वी सिंफनी रचे पर्यंत, हळूहळू श्रवणक्षमता कमी होवून नंतर ठार बहिरा झाला होता पण त्या नंतरही त्यानं केलेल्या रचना तोडीस तोड आहेत.
हात नसतांना, पायांनी संवादिनी-वादन करणारे, उत्कृष्ट पदाक्षर असणारे, तोंडात ब्रश्‌धरून अप्रतिम रंगसंगती साधणारे कांही चित्रकारही आहेत. कांहीवेळा आपण डोळे उघडे ठेवून समोरचं पाहात नाहीच. मनांनंच दुसरं कांहीतरी पाहात असतो. तस हे आपले बांधव प्रज्ञाचक्षूंनी पाहात असतांत. त्यांत वकील आहेत. संगीतकार, गायक, वादक आहेत. नागपुरचे, प्रथितयश संगीतकार गायक, व्हायोलीने-वादक प्रभाकर धाकडे हे त्या पैकीच.
या आपल्या बांधवांसाठी मुबईतली स्नेहांकित हेlल्प्‌लाइन्‌ ही संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. म्हणजे परीक्षार्थींना लेखनिक निळवून देणे, कविता लिखाणाच्या, वाचनाच्या, गाण्यांच्या स्पर्धांपासून ते अगदी दृष्टीहीन, संसारी गृहिणींच्या पाककला स्पर्धांपर्यंतचे हे उपक्रम त्यांना जगण्यातल्या, आणखी एक आगळा आनंद मिळवून देतांत.
दोन दिवसांनी सुरू होणार्‍या दीपोत्सवांत, या आपल्या सारख्याच, पण निसर्गानं नेत्रांतल्या दृष्टिज्यातीपासून वंचित ठेवलेल्या, संवेदनाक्षम मित्र-मैत्रिणींना सहभागी करून घेवून, नेत्रदानाचा संकल्प करून, दृष्टिहीनतेच्या नरकासुराचा नायनाट कण्याचं पहिलं पाऊल उचलूया...
त्यांना सुद्धा दाखवूया...
रांगोळीचे रंग, रोषणाईचे अंग
नक्षीमधल्या रेषा, देखाव्याची भाषा
प्रकाश-झोतांचे विभ्रम, पणत्यांची चमचम
हसणारे चेहेरे आणि उजेडाची दारे
                उजेडाची दारे...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com