Saturday, September 29, 2012

’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????

सदर चित्रांत एक सद्‌(?) गृहस्थ त्याच्या चलत्ध्वनिसंचावर छायाचित्र काढीत आहेत रस्त्यावर उभे राहून.. आणि त्यांचं चार-पांच महिन्याचं बछडं त्यानं आपल्या पायाच्या गुडघ्यांत दाबून धरलं आहे.. केवळ अतर्क्य दृश्य... ***** ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’ अरं काय ल्येका, काय तुझं चाललय काय ? असं काय आक्रित तिकड घडतं हाय ? नाय काढला फोटू तर फासावर जाशिला ? द्येवाला पायी घालतोस ? पाप कुठं फेडशिला ? ’असं पुन्हा दिसणार नाही’ म्हनतुयास निर्लज्जा ? मानूस नावाच्या श्वापदा तुला कुठली द्यावी सजा ? काय मानूस हैस की कोन ? ’गोंडस’ धराया पाय ? कोल्ही कुत्री सुद्धा तुला क्षमा करायची नाय दोन घडीचा डाव मांडून मोकळ होवू नका, जबाबदारी घ्या ! वर करूं नका काखा पायांत छान वाळे, कानटोपी डोईला ’कवळा’ कुठल्या भरवशानं तुला सोपिवला ? जस पेरशिला तस उगवल, माती-मायचा नियम हे सूत्र कोरून ठेव हृदयांत तुझ्या कायम ? असल्या अपेष्टांतनं जर झालाच उद्या मोठा, फोटो पाहून नक्की हानल डोस्कित तुज्या सोटा पाहिले असले बाप, आपल्याच शौकांत सदैव मश्गुल, काळीज, काळजी नाही, यांचा वंश ’काजळी-कुल’ असलं कांही अतर्क्य केल्याशिवाय आपली नोंद कुणी घेणार नाही आणि आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही, असं या सद्‌(?)गृहस्थाची धारणा असावी बहुधा ! यापेक्षा Child abuse आणखी काय वेगळी असते ? कसली नाती अन्‌ कसलं काय ! ’जिव्हाळा’ चित्रपटासाठी अण्णांनी,,कै.ग.दि.माडगुळकरांच्या सिद्धहस्त लेखणींतून...अहं...कुंचल्यांतून अवतीर्ण झाले्ल्या, स्वरमांत्रिक कै. श्रीनिवास खळ्यांनी नादमधुर केलेलं आणि कै. बाबूजी..सुधीर फडके यांच्या भावविभोर कंठांतून आळवलं गेलेलं गीत.. त्याचं ध्रुपद आठवतं...’लळा जिव्हाळा शब्दचं खोटे, मासा माश्या खाई..कुणीकुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’... मी गदिमांचा ’कुंचला’ म्हटलय आधीच्या ओळींत.. कारण अण्णांचं प्रत्येक गीत हे एखाद्या जिवंत , सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यांतल्या कडू गोड अनुभवांचा प्रसंगाचा पुन:प्रत्यय देणारं, चित्रदर्शी शब्दांकन असायचं.संदर्भाधीन छायाचित्रांतल्या ’माणसा’सारखी माणसं (?), संवेदनशील कविमनाला सृजनहेतु सजग करत असली तरी दिसणार कृत्य हे निंदनीयच ! या गीतांतलं वास्तव..’मासा माश्या खाई’ हे कांही फक्त विशिष्ट जलचरांपुरतच मर्यादित नाही तर तो केवळ एक दृष्टांत. बुडणार्‍या माकडिणीच्या नाकांपर्यंत पाणी आलं की, पिलाला आधी कडेवर नंतर, त्याला वाचविण्यासाठी डोक्यावर घेणार्‍या मादीच्या काळजांतली ’माय’ स्वरक्षणहेतु, अखेरीस, त्याला पायाखाली घेत दोन इंचांचा आणि क्षणांचा अतिरिक्त अवधी मिळवू पाहातेचं, हे एक जागतिक सत्य.. जसं कै. ’ग्रेस्‌’ माणिक गोडघाटे यांच्या कवितेंतली संकल्पना ’भय इथले संपत नाही’..पटतय ? हे भय मरणाचं, ’असणं’ नष्ट होण्याचं, विलयाचं आणि भुकेसाठी ! भूक ? जगण्याची, जगण्यासाठी कांहीही करण्याची.. आणि या भुका तरी कसल्या ? मनाच्या शरीराच्या ? संस्कृत ? विकृत ? ही विकृतीचं प्रकृती होऊ लागली तर ? अनेक वर्षांपूर्वी, पुण्यांत एका परित्यक्ता-आधार-गृहांत. मुलाखत चित्रित करीत होतो मी, १/२ इंच्‌ ओपन्‌स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ रेकॉर्डर्‌वर, कृष्ण-धवल ’दूरदर्शन’ साठी... वीणा...वीणा देव विचारित होती एका पीडित तरुण मुलीला, ’काय झालं बाळा ? काय घडलं ?’ त्या मुलीनं कांठोकाठ भरल्या डोळ्यानं आणि दु:खानं ओघळणार्‍या अश्रूंनी ओले झालेले गाल पदराच्या शेवानं टिपत, वीणाकडे असं काही पाहिलं की मला ते क्लोज्‌अप्‌ मधे व्ह्यू फाइंडर्‌वर दिसल आणि माझा बुबुळांवर पण नकळत धुकधुकं झालं आणि फोकस्‌ कळेना.. ’काय आणि कसं सांगू ताई ?’.. तरुणीच्या ओठांतून अस्फुट शब्द..अर्धवट वाक्य बाहेर पडलं, ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’

Thursday, September 27, 2012

’You just wait'

सदर चित्रांत एक पोक्त ग्रामीण महिला , सराइत चालकासारखी ’बाइक’वर स्वार झालेली दिसते आहे.. ’You just wait' डोरलं बांधलं मला तवा व्हती म्या झोळींत बोहल्यावर म्हणे नेलं, मामानं हातावर झेलित इवल्याश्या भाळावर एवढा मोठा टिळा, कुड्याबुगड्या कानी नी गळ्यांत बोरमाळा टिळ्यावर मायेनं रेखली लाल चिरी ल्यायला दिला परकर नि पोलक भरजरी, जरा चालायला लागल्यावर पांगुळगाडा आला धरभर आन्‌ वावरांत माजा राबता सुरू जाला पर बैलगाडीची मज्जा काय औरच अस्ती बाबा ’हुर्रर्र हुर्रर्र सर्ज्या-मौज्या’ आरडत पळवायचे आबा परकराचा वरती, शिस्तित कांचाबीचा ,मारून हिंडत व्हती नंतर म्या, सायकलवर टांग टाकून, माय कवतीकानं म्हनं, ’गांवभर उंडारती’ भ्या वाटतं.. बघुन कुनाकडं बी हासती..’ म्या म्हनं, ’राजपुत्र येनार घोड्यावर, बसवुन माला फुड्यांत, शर्यत वार्‍याबरूबर, खरचं आला एक दिशी, मनांतला राजा संग बाइकबाई,म्हनं, ’करतू वावरांला ये-जा’ सवतापाठी, ’बस’ म्हन्ला, ’चल जत्रंला जाऊ, सवतीपाठी बसून म्ह्न्ले, ’बाई तुझी पाठ लई मऊ !’ पडली माझी पावल कधीच जिमिनीवर न्हाईत असा थाट बाई, कुनाला सोपनांत तरी म्हाईत ? फटफटीवर बसून आंता जाते कुटं बी थेट विमानसुद्धा उडवन बरं, You just wait.. You just wait.. पुण्याची, दक्षिण ध्रूवावर Parajumping करणारी पहिली महिला शीतल महाजन, अंतराळ काबीज करू पाहाणार्‍या कल्पना चावला, सुनिता विल्यम्स्‌, यांच्या आयांनी पण ’पोटूशा’ असतांना अशीच स्वप्न पाहिली असतील कदाचित. शारीर सौंदर्य, नजाकत, वृत्तीनं सहनशील, परावलंबी, सेवाभावी वगैरे केवळ यांच विशेषणांचं सगुण-साकार रूप ही स्त्रीची प्रतिमा होती एकेकाळी. ती प्रतिमा पुराणं, इतिहासांत आणि अगदी अलिकडच्या काळापर्यंत अनेक पराक्रमांनी आणि अनेक क्षेत्र सहजी पादाक्रांत करून स्त्रीयांनीच मोडींत काढली आहे हे सर्वज्ञात आहे. अर्थात वेदांमधली पहिल्या ऋचेची रचैता एक स्त्रीच होती हे इथं विशेषत्वानं नमूद करायला हवं ! अपाला तिचं नांव.. तेंव्हा, बुद्धीच, सृजनक्षमतेचं माप निसर्गानं स्त्री-पुरुषाला, नर-मादीला अगदी समसमान दिलं आहे. उत्कृष्ट अवधि-नियोजन, मानवसंसाधन व्यवस्थापन, अर्थ पुरवठा नियंत्रण, संगोपन, हे सगळ शिकायचं तर कुणाही यशस्वी गृहिणीकडून शिकांव ! या सगळ्याचं एकत्रित वर्णन करायला, उपमा, विशेषणं, दृष्टांत रूपकं आदि साहित्यिक आभूषण अपुरीच पडतील तरी सुद्धा.. व्याघ्रावाहना जगदंबा, शारदा मोरावरी, महिषासुरारि महाकाली, त्रिशूळ शोभे करी अंबुजवासिनि लक्ष्मी, धनसंपदा नि समृद्धी खल दमना देइ धैर्य, शौर्य, स्थैर्य, बल, बुद्धी अश्या विविध रूपधारिणी स्त्रीचं वर्नन करण्याचा मोह अटळ आहे. आज विविध क्षेत्रांत, उत्तुंग-यशप्राप्त सुकन्या बघतांना, स्त्री-पुरुष भेद किती लयाला गेलाय याची जाणीव क्षणॊक्षणी आपल्याला होतेय. या पार्श्वभूमीवर जवळ जवळ वीस वर्षापूर्वी कधीतरी, स्वत: जवळच्या शब्दसंपदेची परीक्षा घेण्यासाठी मी ही विशेषणांनी युक्त रचना केली. ती,माझ्या आईने वाचली आणि,. शेवट पर्यंत अत्यंत श्रद्धेने आणि माझ्याविषयीच्या कौतुकाने ती प्रार्थना म्हणून वाचायची ! ॥जगदंबा स्तुतिअष्टक॥ प्रकटता तेज । आदिशक्ती बीज । जागेपणी नीज । भेदू पाहे ॥ व्याकूळ व्याकूळ । गर्तेतला तळ । शक्तिसेवा फळ ।उद्धरेल ॥ सत्या, शुभा, सुंदरा । त्रिशुळाच्या तीन धारा । दर्शने देई धैर्या । रिपुदमना ॥ जगदंबा करवीरी । भवानीआई गड शिवनेरी । देवी सप्तसृंगी वणीच्या डोंगरी । झालीये अवतीर्ण ॥ संपदेचे आगार । ज्ञानसमृद्ध भांडार । सारे होतसे असार । मातेचरणी ॥ व्याघ्रारोहि सुंदरी । शस्त्रां धरुनी चारहि करी । दैत्य निर्दय, अविचारी । संहारितसे ॥ दाही दिशा भरूनि राही । पंचमहाभूतांचि माय होई । त्रिकालाबाधित निवारा देई । विश्वमाता ॥ हे ऐसे स्तुतिअष्टक । शाब्दी श्रद्धामूल सार्थक । सदा देवो सारासार विवेक । जगण्यासी ॥ ****

Tuesday, September 25, 2012

’आयडिया ची कल्पना’

सदर चित्रांत एक एक शब्दश: हातका माणूस एका ATM मधे उभा आहे.. ’आयडिया ची कल्पना’ मले शिरमंत व्हायचय्‌ माह्या बापा, करू कुठल्या मी सांगा की पापा.... हे ’हरघडी पैक्याचं यंत्र’ पर उघडाया ठावा नाई मंत्र कशा उघडाव्या म्हंतो मी झापा.... कष्ट करून घाम ढाळीला पाणी भुकेला, शीळा उशाला त्ये बी लुटत्यांत मारून थापा.... कसं ठेवांवं जपून त्यांना लांडगे भवतीचे करत्यांत दैना तुडवत ’दये’च्या मारत्यांत गप्पा.. .बाकी.. कसा वाटला हा माझा Make-over ? हां.. पडू नको.. सोताला सावर ! लई नाई आतां तुला फशिवनार गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... भाइर गुंडांची मोकाट टोळी करतिये कमावल्या धनाची होळी कसं यांना पुरुन आपन उरनार ?... डोळ्यांत टाकतंत मिरचीची पूडं सगळ्या आशेला लावत्यात चूडं कशा तरवारी म्यान यांच्या होनार ?... पायी नको घालू वहाणा अंगी बाणव भिकारी बाणा तुला ढुंकुन नाई ते बघनार... पाठी घेवून फाटकी गोणी अन्‌ नजरेंत करुण कहाणी पाहायाला त्यांना वेळ कसा गावणार ?... माज्या नजरेंत दिसतोय ना अंगार ? नाइ असातसा, नाई मी ’भंगार’ संधी मिळताच त्यांना मि हाननार... फाटकी विजार नी उसवला सदरा अन्‌ खंतावला उद्विग्न चेहेरा तुला जवळ करू नाहि पाहाणार... ’भाई’गिरीची पापणी आड नशा अन्‌ ओठावर ’दादा’च्या मिशा नाहि धुंदी यांची उतरनार... बघा चेहेरा माहां निरखुन पारखुन अभि बच्चनचं वाटतया कां Cartoon ? नको.. लचांड मागं उगा लागनार... असेच दिवस आलेत आता राजा, शिरिमंत ’दिसन्यां’त बी नाई राह्यली मजा सोन म्हणून. पितळ सुद्धा लुटणार... म्हणून गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... . गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार.... आजकाल रस्त्यावर अनेक बॅंकांसमोर, लोखंडी जाळ्या वगैरे लवून, Fortification केलेल्या व्हॅन्स्‌, कोट्यवधींची रोकड, विविध शाखांकडे पोचवायला किंवा त्यांच्या कडून मुख्यालयांत आणायला, सज्ज असलेल्या आपण जवलपास रोज पाहातो. इतकी काळजी.. म्हणजे अगदी सशस्त्र सुरक्षा रक्षक, ’कवच-कुंडलां’सह..त्या ’चिलखती’च म्हणावं अशा गाड्यांबरोब्र, मधे आसपास ठेवून सुद्धा, लुटारू दरवडेखोर आपल काम तमाम करतातच ना ? म्हणून कदाचित, हे ’पारंपरिक धोके, संकटं लक्षांत घेवून रंग-केश-वेशभूषा बदलून ’सर्वदा धन उपलब्धिसेवा गृहांत’ (म्हणजे ATM हो !) हा खरा म्हणजे मुळचा ’धनाढ्य़’ दाखल झाला असावा. पण आयडियाची कल्पना मात्र भन्नाट आहे हं ! पूर्वी, मृच्छकटिकांतल्या वर्णनाप्रमाणे किंवा रंगावृत्तींत आपण बघतो त्याप्रमाणे ’पारंपरिक शार्वीलिक’ म्हणजे चौर्यकर्म तज्ञ, अंधारांत अंगावर काळ्या रंगात रंगून लोप पावणारी काळी घोंगडी घेवून कुणाला दिसू नये म्हणून बिचारा ’निशाचरी’ करीत, मजल दरमजल करीत दारोदार हिंडायचा. पण आजकाल धनिकांवर ही पाळी आली आहे, कारण ’शार्वीलिक’ दिवसाढवळ्या दरोडे वगैरे घालायच्या फंदात न पडता गुंड-मवालीगिरीनं निर्माण केलेल्या दहशतीच्या वातावरणांत, सर्वसामान्यांकडूनही त्यांच्या मिळकती हिसकावून घेत त्यांच इप्सित साध्य करीत आहेंत. अशा वेळी, चित्रांतल्या त्या वेशांतरिताची क्लृप्ती वापरणं कदाचित फायद्याचं ठरूं शकेल... म्हणजे मोठ्यारकमा फाटक्या पोत्यांतून आणि कोट्यवधींच्या चलनी नोटा, सोनंनाणं वगैरे कचर्‍याच्या गाड्यांतून... कारण.. कलालानं ’एकच प्याल्यांत’ दूध जरी वतल पियक्कडाला प्याल्यावर ’नशा झाली’ वाटल... नाई कां ?

Saturday, September 22, 2012

’दोस्ती बिस्ती..’

सदर चित्रांत पाणीखात्यांत काम करणारे दोन कर्मचारी, तिसर्‍याचे पाय धरून त्याला उलट्या अवस्थेंत खड्ड्याच्या आंत त्याचं अर्धं शरीर जाईल अशा पद्धतीनं अधांतराधार देत आहेत. ’दोस्ती बिस्ती..’ येऽऽ दोऽऽस्ती, हम नहीं छोडेंगे फिसले भले पॉंव, साथ ना तोडेंगे पकडीवर आमच्या गड्या आहे तुझी भिस्त, बिनधास्त कर काम, ठरवू विश्वास तुझा रास्त आंत भले दिसेल तुला सगळच उलटं आहोत भक्कम बाहेर आम्ही काळिज ठेवुन सुलटं गंमत म्हणजे तीघांना एकदम एकच काम नको चिंता करू, नाही वेगळा मागणार दाम.. कुणाच्या तरी ताटांत ’तर्री’ बरोबर, पाय आणि नांगी तोडलेल्या अवस्थेंत, ’तुकड्या’ म्हणून पडण्याच्या भीतीच्या गर्तेंतून सुटका व्हावी म्हणून,, पोरांनी पकडून ठेवलेल्या टोपलीच्या नरकांतून बाहेर पडू पाहाणार्‍या खेकड्यांची एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा चाललेली असते. गल्ली ते दिल्लेच्या राजकारणांत, सफाई खात्यापासून अर्थखात्यापर्यंत नोकरशाहींत, उद्योग आणि व्यापार उदीम क्षेत्रांत उद्योजक आणि व्यावसायिक यांचीही ’सतास्थानं’ मिळविण्या आणि टिकविण्यासाठी एकमेकांचे ’पाय ओढण्या’पासून, सगळी तत्व, वचननामे, आश्वासनपत्र गुंडाळून ठेवत, एक मेकांचे ’पाय धरण्या’पर्यंत स्पर्धा सतत चालणार्‍या या जगांत, दोन सहकारी तिसर्‍याचे पाय ’आधार’ म्हणून धरून ठेवताहेत, हे चित्र खरतर असंभव वाटावं इतकं विरळा...पण मित्र हो, ही कुणा कलाकाराच्या कल्पनेंतून साकारलेली, कलाकृती नाही तर चक्क ’छायक-चक्षुर्वैहिसत्यम्‌’ वास्तव आहे. तुम्हाला ऑल्‌ द बेस्ट्‌ नाटकांतले तीन मित्र आठवताय्‌त ? एक मुका दुसरा आंधळा आणि तिसरा बहिरा एका सुंदर तरुणीशी संवाद साधण्यासाठी एकमेकाच्या शारीरिकत्रुटींवर मात करायला अहमहामिकेनं सरसावणारे.. किंवा ’दोस्ती’ नावाच्या हिंदी चित्रपटांतले मित्र ? एक आंधळा तर दुसरा लंगडा... ’मेरी दोस्ती, मेरा प्यार’ गात हिंडणारे पण याच बरोबर, सूर्याजी पिसालासारखे अस्तनींतले निखारे किंवा... शेक्स्पिअर्‌च्या ’ज्यूलिअस्‌ सीझर्‌ मधला,(सर्‌ रिचर्ड्‌ बर्टन्‌..पी‍टर्‌ ओ’टूल्‌) ’ओ:..ब्रूटस्‌ यू टू’...हा जागतिक स्तरावरचा प्रसिद्ध, दगाखोरीनं व्यथित कुठल्याही व्यक्तीच्या मनाचा चित्कार शब्दरूप करणारा, म्हणजे ज्यूलिअस्‌ सीझर्‌ची हत्या होतांना त्याच्या तोंडचा उद्गार... हत्या करणारा होता त्याचा विश्वासू मित्र सहकारी, राजकारणांतल्या डावपेचांचा सल्लागार कधीकधी कटांचा योजक. ब्रूटस्‌नं...पाठीमागून वार करून केल्री हत्या, चर्चमधे... तात्विक मतभेदांतून झालेल्या वादाची अतर्क्य परिणिती आणखी एक उदाहरणं..एका प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटांतल्या पात्रांचं, ज्याचं नावच मुळी शीर्षक म्हणून वापरलं गेलं आहे.. बेकेट्‌, एक धर्मगुरू..त्याची हत्या केली त्याच्याच मित्रवत राजानं हेन्री २ नं, चर्चमध्येच मारेकरी घालून.. किंवा याच सूत्रावर बेतलेला राजेश खन्ना, अमिताभनं अभिनित केलेला ’नमक हराम’ हा हिंदी चित्रपट.. ही उदाहरणं ही सर्वज्ञात आहेत.. एखा्द्या घट्ट विणीच्या नात्याचं वर्णन करायचं असेल तर इंग्रजींत, एक खास वाक्प्रचार वापरतांत, ’We are not related but he is more than a brother to me'.. असं विधान करतांत, त्यांतल्या भावनेला द्विरुक्त करण्यासाठी. तर असं हे ’मैत्री’चं नातं. पण त्याला छेद देणारे चित्रपट कलाकृती, ऐतिहासिक घटना नजरेस पडतांत बालवयांत, तरुणपणी आणि मग कुशंका अंकुरायला लागतांत नकळत कवळ्या मनांत. माझा नातू तेरा वर्षांचा, काय म्हणाल माहिताय्‌ ? ’आजोबा , कशावरून त्या काठावरच्या दोघांना त्याला, ज्याला तुम्ही ’व्यावसायिक सहकारी’ वगैरे म्हणताय.. उलटा करून खड्ड्यांत टाकायचा नसेल कुठल्यांतरी सूडापोटी ?’ मी म्हटल ’असेल बाबा, ज्या रंगाच्या चष्म्यांतून बघावं तसं दिसतं ! ’ शिवाय एक वेगळी ’जमांत’ असते मित्रांची, माहीत आहे ?..उगवत्या सूर्याला वंदन करणार्‍यांची किंवा ’खुर्ची’ असेतो ;मैत्री’ (?) टिकवणार्‍यांची.. मी स्वत: खूप अनुभव घेतलाय म्हणून विश्वासानं सांगतोय...वेळीच ओळखा अशांना आणि खड्यासारखे वगळा आयुष्यांतून

Tuesday, September 18, 2012

’पोटासाठी काहीही’

सदर चित्रांत एका ट्रक्‌च्या चाकाचे Nut-bolts पहारीच्या साहाय्यानं आवळणार्‍या ’पति-व्रता’ दिसते आहे.. ’पोटासाठी काहीही’ पोटासाठी काहीही, ना मागे हटणार तसुभरही तळहाताला येत्यांत फोड, सगळी भुकेसाठी तडजोड मालक ’ते’ पन अस्तुरि मी, अन्‌ तान्ह्याची बी मी आई दोघांनाबी हुर्द दिलय, जीवापाड प्रेम केलय मनगटि माझ्या वज्रचुडा, डोइवर पदराचा पहारा खडा पिंजर रेखुन भाळावर, गाडी आणणार रुळावर कैकयि जगतेय युगायुगांत, समानतेची गीतं गात सात हजार वर्षांपूर्वीच्या रामायण कालादरम्यान रघुकुलांतल्या राजा दशरथाच्या महाराणी कैकयीचंच उदाहरण कशाला ? कारण तिची भूक तिच्या पदाप्रमाणेच खूप मोठी होती. सर्वसामान्यांचीधडपड चालू असते ती सकाळ संध्यालाळच्या दोन घासासाठी स्वत:च्या आणि बायको पोरांच्या.. तुलनेनं अगदी अलिकडच्या काळांतली कितीतरी उदाहरणं आहेत, नवर्‍यानं अंगिकारलेल्या व्रतांत तनमनानं समर्पण करीत अजरामर झालेल्या ’पतिव्रतां’ची...हो..हो ! प्राचार्य राम शेवाळकरांची हीच व्याख्या आहे, ’पतिव्रता’ या शब्दाची.. ! पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, या बरोबरच वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे, स्वातंत्र्य लढ्यांतले चाफेकरबंधू, क्रांतिकारक पतीला, ब्रिटिश राजवटींत, तुरुंगात माती कालवलेल्या पिठाची भाकरी खावी लागते म्हणून, घरी स्वत:च्यासाठी माती कालवलेली ’रोटी’ करून खाणारी पंजाबातली राजबन्स कौर..अशा पतिकर्तृत्वाच्या वटवृक्षाच्या पसार्‍याला घरांत त्यांचे संसार मूकपणे विनातक्रार सांभाळत, अनामिक राहून ’बळ’कट करणार्‍या अनेक वीर-पत्नी...फार काय गोवा मुक्ति लढ्यांत, खांद्याला खांदा लावून लढणार्‍या पंडित महादेवशास्त्री जोशींबरोबर सौ. सुधाताई, पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमधे आणिबाणीविरोधी लढ्यांत, प्राध्यापक मधू दंडवतें बरोबर सौ. प्रमिला ताई, आंतरराष्ट्रीय स्तरावर, वर्णद्वेषविरोधी लढ्यांत दक्षिण आफ्रिकेंत नेल्सन्‌ मंडेलांबरोबर विनी मंडेला... किती किती म्हणून उदाहरणं द्यावींत ? पण तरीसुद्धा ही सगळीच असामान्य व्यक्तिमत्व. पण प्रत्येक सामान्यांतसुद्धा असामान्यत्वाचा एक स्फुल्लिंग दडलेला असतो.योग्य वेळ येतांच त्या ठिणगीचा भडका उडतो.. जिणं जगतांना अडचण ठरणार्‍या, अपमान निवारण, अन्याय निराकरण, गुंडशाहीच्या प्रतिकारार्थ आदि ’सामान्य(?)’ कार्यांसाठी. आणि तसंसुद्धा, सगळेच जर असामान्य झाले, ’चला कल्पतरूं’च्या ’आरवा’प्रमाणे, तर ’असामान्यत्वा’ची गरजच भासणार नाही, नाही का ? असो नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा ! हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण चित्रांतल्या कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणार्‍या महिलेप्रमाणं, वर्षभर उन्हातान्हांत, थंडीवार्‍यांत, पावसापाण्यांत, काळ्या आईची मशागत करीत, कृषिवल पतीबरोबर खपलेल्या कारभारणीच्या मनांत, दाण्यावर आलेल्या, वार्‍याच्या झुळुकेवर डोलणार्‍या कणसावर स्वत:च्या छोट्याछोट्या आकांक्षा, स्वप्न झोके घ्यायला ठेवत, ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार... मग तिनं, का नाइ म्हणावं... पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान, वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान, दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर, गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर, सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी, पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी, कधीपासुन टोपपदरी घ्याव वाटतय मनांत बैलजोडी आणत्याल नवी तवा सांगन ’त्यांच्या’ कानांत, लेक लई हुश्शार माझी, तिला कराय्‌चिये डॉक्टर, पोरं चढविल झळाळ, खंबीर वाश्यांच्या घरावर या दुर्दम्य आशावादाला सर्वथ: फलद्रूप करूं पाहाणारं अगदी चपखल दृश्य आहे की नाही वर दिसणार्‍या चित्रांत ?

Monday, September 17, 2012

’कुणाला काय हो त्याचे...’

सदर चित्रांत एक कष्टकरी...बिनचेहेर्‍याचा, आपल्या सायलल्‌वरून विटांचा अक्षरश: ढिगारा घेवून चालत चालला आहे.. ’चित्रिका’ २३-०९-१२ साठी मजकूर.. (तुषार जी कृपया) ’कुणाला काय हो त्याचे...’ दुचाकिने वाहताहे कुणाचे हा ओझे ऊन तापलेले, ’मुका’’दम’ पोळी भाजेथेंब थेंब उतरतो घामाचा भुईंत कोंभ अंकुरला, वर येई तरारत मात्र कणसाचे भरल्या वेगळेच राजे... कुणासाठी घरे यांनी बांधावी ? कशास ? दमा, क्षयासाठी नसे दया-क्षमा ’त्यां’स कुणाच्या दारी हो तोरण ? सनई बेंडबाजे... ’ओझे’ ? अंहं ! आहे ही तर ’भाकरीची कथा’ कच्च्याबच्च्यांसाठी पोटी गिळायाची व्यथा तव्यावरी हात जरी माउलीचा भाजे.. कधी ऊन, थंडी, वारा कोसळती धारा, सोसतं मुक्याने, नाही टाकायाचा ’भारा’ मिळवाया होवे, ’त्यांनी’ वांछिलिये जे जे... ओढायाची अशी रोज थकली पाऊले, बाळघास देतादेता चिउले, काऊले थकल्या ’बापानं’ श्वास राखला पाहीज... घरी उफाड्याची वाढे न्हातीधुती पोर डोरल बांधेपातूर जिवालाहे घोर टवाळांना दूर ठेवू कोणत्या मी काजे ? आम्हा नसे हसूं रडूं नसेच चेहरा हातापायावर फक्त टरारल्या शिरा भावभावना ? कसल्या ? काळीजचं(काळजीचं?) थिजे मात्र एक घ्या ध्यानांत, लई झालं आतां ! कुठवर रडायाची वेदनांची गाथा ? ’अंगार’ल्या मनांत, रुजती बदला(बदल्या?)ची बीजे... निवार्‍याला घराचा आकार देण्यासाठी, भाजलेल्या विटा’ वाहून जळलेल्या संवेदनांमुळे, जगण्याचा ’वीट’ आलेल्या त्या बिनचेहेर्‍याच्या ’माणसा’(?)ची कथा सांगतय हे चित्रं ? वाहकानं या भाजलेल्या विटा वाहत कुठल्यातरी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पासाठी मदन मोहन लता या स्वरद्वयीनं अजरानर करून ठेवलेली एका चित्रपटांत्ली गझल, रस्मे उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे त्यांतला एक शेर आजकाल क्षणोक्षणी रोजमरा क्र्र जिंदगी अडखळत, चाचपडत, ठेचकाळत...मरणं सोप नाही म्हणून...जगू पाहाणार्‍या सर्वसामान्याच्या, अंधारी येणार्‍या डोळ्यासमोर तरळत असतो बोझ होता जो गमोंका, तो उठा भी लेते जिंदगी बोझ बनी तो, उठाएं कैसे असा प्रष्ण पडलेल्यांना, या चित्राचा बिनचेहेर्‍याचा नायक म्हणजे एक उत्तरच आहे... ...ठिगळं लावलेल्या धडुत्याच्या झोळींत, कमरेला किंवा पाठीवर तान्ह्याला बांधून, दहा बारा विटा लोखंडी घमेल्यांत घेवून, डोईवर ठेवून चालणारी माउली आणि त्या विटा एकावर एक रचत कोणा अनामिकासाठी घरकुल साकारणारा गवंडी, दार, खिडक्यांच्या चौकटी बनविणारा सुतार, किंवा एखाद्या बॅंकेत निर्विकार चेहेर्‍यानं, नोटा मोजत त्या ग्राहकाला देणार्‍या किंवा त्याच्याकडून घेणार्‍या कर्मचार्‍याला पाहिलं की मला, ’इदं न मम’ असा मंत्रोच्चार करीत अग्नीकुंडांत हवन देणार्‍या ऋषी-मुनींचीच आठवण येते. पाठीवर लाठ्या किंवा छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलणार्‍या क्रांतिकारकांइतकेच हे कष्टकरी निरपेक्ष नवनिर्माणाच्या वारीतले वारकरी नव्हत काय ? पाठीवरचं छकुलं मोठ होवून रांगत, दुडुदुद्डु धावत, आधी झोपडींत आणि नंतर आई-बापाच्या घामानं पक्क्या होत जाणार्‍या भिंती उभ्या राहिल्यावर त्यांच्या आड स्वतंच जग निर्माण करून आनंदविभोर होईस्तो, त्याच्या प्रस्थानाची वेळ येते. आणि मग, ’आपण इथून का जायचं ? कुठं ?’ असा केविलवाणा प्रष्ण व्यथित विस्फारलेल्या नजरेंत घेवून, एकदा आई-बापाकडं आणि एकदा त्यांनीच उभारलेल्या दिमाखदार इमल्याकडं बघत, त्यापासून दूरदूर खेचत नेल जाणारं ते बाललेण दिसू लागतं आणि गलबलत काळजांत ! दररोज कोट्यवधींच्या रकमा हाताळून, घरी आल्यावर, संसाराच्या रामरगाड्यांनं क्लान्त भार्येनं, फुटक्या कपातनं दिलेला चहा, तितक्याचं थकलेल्या आणि निर्विकार चेहेर्‍यानं,मुखावाटे पोटांत ’ढकलणार्‍या कर्मचार्‍याचीही तीच की हो कथा ! ’भाळी कोरले कुणाच्या कुणाचे गोंदणं कुणा काय त्याचे आणि काय देणं घेणं’ **** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Monday, September 10, 2012

प्रामाणिकपणे..

मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी

Sunday, September 2, 2012

शेळी जाते जिवानिशी...

शेळी जाते जिवानिशी... (सदर चित्रांत एका ढासळल्या पडिक घरासमोर मोडींत काढलेल्या मोटर्‌-बाइक्‌वर चढून एक शेळी रिअर्‌व्ह्यू मिरर्‌ मधे पाहाते आहे.) पाऊस कसला, भुरभुर नुस्ती, न्हाई पानी-दाना, मोडित काडुन आमाला बी, धनी फिरवत्यांत माना दलदल माजली, चारा न्हाई, पुडं भुकेची खाई दशा, हिची बी, अशीच दिस्तिया,’ ’बिच्चारी’ बाइक‌ बाई मैत्र जीविचे शोधू जाता, समोर आला नेत्र झडली, पिचली, खिळखिळलेली अन्‌ झिजलेली गात्र जाणू गेले दु:ख तिच, पाठीवर तिच्याच बसून विझूविझू पाहांत होती, ’आ’ अखेरचा वासून कोंबडी, कुत्री, मांजरी बकरी, का नसतो ’बाई’कला जीव ? अरं ’देवाच्या’ त्या काठीला ल्येका, जरा तरी भीव... मोडीत निघत्यांत मानसं थितं आमाला कुठला चारा ? कोनो भी देस, प्यारे ! इस हालात का नही चारा धावत्या जगाबरोबर राहाण्यासाठी स्वाभाविक इच्छेंतून आधी घोडा हत्ती, उंट अगदी ’गरीबरथ’’ गाढवाचा सुद्धा माणसानं स्वत:च्या दीड-दुप्पट वेगानं चालण्या/धावणार्‍या पाळीव जनावरांचा वाहन म्हणून उपयोग करायला सुरुवात केली. अगदी सर्वप्रिय गणेशाला सुद्धा आपली तुंदिल तनु सावरत, स्वत:च्या एक शतांश आकाराच्या मूषकाचा वाहन म्हणून स्वीकार करणं क्रमप्राप्त झालं, महादेवाचा नंदी तर, भगवान विषूचा गरुड, अन्‌ यमाचा रेडा.. वगैरे वगैरे ! दोनचाकांवर तोल सांभाळता यायला लागल्यावर मग पायक्कीमारत दुचाकी, तदनंतर स्वयंचलित दुचाकी आणि चार चाकी अशा अनेक प्रकारच्या ’भू-जल-खे चर’ वाहनांचा शोधकर्ता आणि उपभोक्ता पण माणूस झाला. आतां काय तं म्हणे स्वत:च्या मनाला संगणकांतल्या टिक्की...चिप्‌.. वर ठेवून मुक्त व्हायचा ध्यास घेतलाय‌ त्यानं ! पण.. म्हणून काय तो स्वतंच्या शारीर अस्तित्वाला पायानं चालत इकडून तिकडं न्यायचं विसरलाय ? अंहं ! तेंव्हा बकरीनं स्वत:च्या अस्तित्वाच्या शक्यतेबद्दल शंका घेत ’बाइक’बाईच्या नेत्रां’त...आरशांत, उपर्युक्त सर्व बाबींचा विचार करतां, डोकावणं अगदी स्वाभाविक आहे. पण माकडाची शेपटी झडून दोन पायांवर चालणारा माणूस उत्क्रांत व्हायला जशी अब्जावधी वर्ष सरावी लागली तसंच हे स्तित्यंतर..झालच तर... व्हायला साध्या-सोप्या त्रैराशिकानं सुद्धा अनंत काळ जाणार आहे... अर्थांत, पाठीमागून खंजीर खुपसून, बाई गं... हा माणूस कधी तुला भक्ष करेल, ते मात्र सांगता येणार नाही हं