Saturday, January 26, 2013

मनाला सुख-शांती देणारं ’धन’

’मनमोकळं’.. *** परवा, एका दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीमधे, भविष्यांच सदर, केवळ सवयीनं चाळतांना, माझ्या भविष्यांत, ’अचानक धनलाभ’ असं भविष्य वाचलं आणि हसूं आलं. अहो ! इतक दैव बलवत्तर असतं तर, अशी दांत कोरून पोट भरायची पाळी कशाला आली असती ? पण ’अहो आश्चर्यम्‌’.. खंरच झाला की हो ’धनलाभ’. आतां धन कशाला म्हणायचं हा ’ज्याचा त्याचा प्रष्ण’ नाही कां ? ’सोने-चांदी आम्हां मृत्तिके समान । देखता विठूला हरपते भान ॥’ म्हणणार्‍या महाराष्ट्रीय संतांच्या मांदियाळीला, ते ’सावळे परब्रह्म, आवडे या जीवा ।’ म्हणजेचं मनाला सुख-शांती देणारं तेच ’धन’.. माही कां ? एखाद्या माउलीला, कडेवरच्या छकुल्याच्या ओठावर फुललेलं हंसू, तर बाबा आमट्यांसारख्या ’संता’ला कुष्ठरोग्याच्या जखमा धुतांना मिळणारं समाधान हेचं धन ! अगदी निर्विवाद... तर त्याचं झालं असं की, मी जेंव्हा दूरदर्शनमधे कार्यरत होतो, त्या काळी घरगुती दृकश्राव्यमुद्रक...Domestic Video Recorders फारसे प्रचलित नव्हते असले तरी ते घरी आणणं आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखही नव्हत. आपण करीत असलेल काम पूर्ण झाल्यावर, ते तटस्थपणे पाहायची संधी म्हणजे तो कार्यक्रम जेंव्हा प्रक्षेपित व्हायचा तेंव्हा आणि तेंव्हाच ! कारण Off-Telecast recordong सुविधाच नसायची स्वत:कडे. कार्यक्रम निर्मितीची नशा एव्हढी असायची की निर्मिती दरम्यान साधी छायाचित्र काढून ठेवण्याचंही भान नसायचं. आजकाल 'Making' चं record ठेवण्यासाठे एक स्वतंत्र युनिट्‌ असतं म्हणे... कालायतस्मै:नम: त्यामुळे, हे ’वेचोनि धन’ आणण्यासाठी गेल्या कांही वर्षांत मी माझ्याच कार्यक्रमांच्या शोधांत झोळी घेवून हिंडतो आहे आणि बर्‍यापैकी (दृक्श्राव्य)माया जमविली आहे त्यांतून. अशाच शोधांत असतांना सुप्रसिद्ध लेखक, आपल्या लिखाणाच्या महतीनं राष्ट्रीय स्तरावर वाचकप्रियता कमावलेले, शिवाजीराव सावंतांच्या मुलाखतीचा, १९८५ मधे ’प्रतिभा आणि प्रतिमा’ साठी चित्रित केलेला.. कार्यक्रम मिळाला..मुलाखत चित्रित केली होती सिंव्हगडाच्या कल्याण दरवाज्यांत त्यांना आणि मुलाखत घेणार्‍या दोन संवादक.. कै. कविवर्य रविंद्र भट आणि माझे एक सन्मित्र ज्यांच्यामुळं माझा शिवाजीरावांशी वैयक्तिक परिचय झाला तें, विजय केसकर.. असे तीघे आणि कांही कुटुंबीय मंडळींना नेवून. चित्रीकरण चमूंत छायाचित्रकार श्रीकांत पुराणिक, आणि ध्वनिरेखक मुकुंद येवलेकर.. एक सहायक अभय काटे आणि मी स्वत: असे चारजण होतो. एका इतिहास-तज्ज्ञ लेखकासाठी याहून सुयोग्य पार्श्वभूमी चित्रीकरण स्थळ मलातरी त्यावेळी सुचलं नाही बुवा ! प्रतिभा आणि प्रतिमा या कर्यक्रमाच्या चित्रीकरणांत कांहीतरी वेगळ, वैविध्यपूर्ण करायला हवं या ऊर्मींतून, ’लेखकाला कलागारांत न बोलविता दूरदर्शननच लेखकाकडे जायचं ठरवलं. या आधी असा प्रयोग मुंबई केंद्राच्या अगदी सुरुवातीच्या आठवड्यांत आम्हीचं, म्हणजे निर्माते केशव केळकर आणि त्यांचा सहायक मी, मिळून केला होता सुप्रसिद्ध लेखक बाबूराव बागुल यांची प्रतिभा आणि प्रतिमासाठी मुलाखत चित्रित करतांना..किंवा कविवर्य आरतीप्रभु तथा चं.त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यावर आधारित ;गेले द्यायचे राहून’ या कार्यक्रमाच्या निर्मितीवेळी.. कृष्णधवल, सेल्यूलॉइड्‌ फिल्म्‌वर, किंवा १/२ इंच्‌ ओपन्‌ स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ मुद्रकावर चित्रीकरण करून... शिवाजीरावांच्या दारांत जावून आम्ही ’टक्‌टक्‌’ केलं आणि मग शिवाजीरावांनीच सुहास्य मुद्रेनं आमचं स्वगत केलं. कांही प्रष्णोत्तरं झाल्यावर मग ’मृत्युंजय’ आणि ’छावा’ या दोन कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानचे त्यांचे अनुभव चित्रित करण्यासाठी जवळच असलेल्या सिंव्हगडावर आपण कां जावू नये ? असा प्रस्ताव मी मांडला.. आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही सर्वजण गडाच्या कल्याण दरवाज्यांत.. जिथं वर्दळ कमी असते तिथं जावून छान बसायची जागा शोधून चित्रीकरणाला सुरुवात केली. मला इथं या कार्यक्रमांतल्या ध्वनिमुद्रणाच्या उत्कृष्टतेबद्दल विशेष उल्लेख करायलाच हवा, कारंण गडासारख्या उंचावरच्या बाह्यचित्रीकरण स्थळी, वातावरणांतील कुठल्याही इतर आवाजांचा Ambiance.. कुठलाही त्रास ऐकणार्‍याला होवू नये अशा पद्धतीनं तो आमच्या मुकुंदानं... मुकुंद येवलेकरनं.. तो मुद्रित केला होता. कधी संधी आलीच तर मजकडे असलेल्या या कर्यक्रमाचा जरूर लाभ घ्या खूप छान मुद्दे मांडलेंत शिवाजीरावांनी या कार्यक्रमांत पौराणिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानच्या अनुभवांबद्दल आणि एकूणच आगामी संकल्पाबद्दल, साहित्य चळवळीबद्दल ! ’रामायण’ हे आयुष्य कसं असावं हे सांगत तर महाभारत हे आयुष्य कसं असतं हे सांगतं.. महाभारतावर कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना मोकळ आकाश होतं पण छावा सारखी ऐतिहासिक कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना, नोंद झालेल्या प्रत्येक घटनेची, प्रत्यक्ष प्रसंगाची वेसण होती, त्यामुळं मृत्युंजयमधली भाषा अधिक लालित्यपूर्ण करतां आली आणि छावा मधल्या भाषेचा लहेजा वेगळा ठेवावा लागला.. त्यांत सुद्धा राजघराण्यांतल्या पात्रांच्या तोंडची आणि सर्वसामान्य मावळे सैनिकांच्या तोंडची भाषा यांतला फरक लक्षांत घेवून, ते भान ठेवून संवाद लिहावे लागले..’ खूप छान आणि अत्यंत शांतपणे मुद्दे मांडत , त्यांचं विवे्चन विश्लेषण करतकरत संवाद सहज खुलत होता.. चित्रीकरणाचे तीनचार तास कसे संपले हे कळलचं नाही... आणि मग सगळ्यांच्या पोटांत कावळे कोकलायला लागल्यावर आम्ही गडावरून पायउतार झालो.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Tuesday, January 15, 2013

’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’

’मनमोकळं’.. ( तुषार जी कृपया..) *** मोठ्या उत्साहानं योजलेल्या आणि पार पाडलेल्या एखाद्या कार्यक्रमाचा, अतर्क्य मानसिकतेचे प्रेक्षक असा फज्जा उडवितांत. म्हणजे आज ’Big boss आवडीनं पाहाणार्‍या आणि त्यांतला 'इमाम’ नांवांच्या सद्‌(?)गृहस्थांचा, अक्षरश: ’नंगानाच’ लाळा गाळत 'Enjoy' करणार्‍या प्रेक्षकांनासुद्धा मान’सिक’(Sick)तेची परंपरा आहे बरकां ! ज्या वृत्तपत्रानं, १९६३ मधे, मझ नांव, NDA, 31st Courseच्या Batch मधे, जे केवळ दोन उमेदवार ग्वाल्हेर एअरफोर्स्‌ सिलेक्शन्‌ सेंटर्‌ क्रमांक ३ मधून, Officer's Potentiality Test आणि Pilot's Aptitude Test यशस्वीपणे उत्तीर्ण होवून, वायुदलासाठी निवडले गेले त्यांतला एक म्हणून, माझं नांव गौरवानं छापलं, त्यांच वृत्तपत्रांत बरोबर वीस वर्षांनंतर, ’आरोही’संदर्भांत, अर्थाअर्थी माझा कांहीही प्रमाद नसतांना, भलंबुरं छापावं याचं खूप वाईट वाटल..! असो.. पण, प्रत्येक कार्यक्रमांतून, भेटलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वांच्या सहवासांतून, आम्हा सर्व तरुण, अननुभवी पण ऐकण्या-शिकण्याची जबर मनिषा बाळगून असणार्‍या निर्मात्यांची, ज्ञानवृद्धी होत होती.. नकळत ! ’आरोही’च्या दरम्यानं, असचं एकदा पंडित नरेन्द्र शर्मांनी सांगितलं, ’राम और रमा.. पति-पत्नी ! लेकिन भेद कैसा व्याकरणाधारि शब्दसूचित होता है, जानते हो ? राम मे ’र’ यह शक्तिरूप कठोर व्यंजनको आकार दिया गया है, क्यौंकी राम है पुरुष और रमा मे ’म’ जैसे ’मृदु’ व्यंजनको मिला है आकार स्त्रीत्व अधोरेखित करने हेतु. समझे ?’ मनांत म्हटलं आणि प्रत्यक्ष उच्चारलं सुद्धा, विनम्र होवून, ’त्रिवार-वंदन पंडितजी, त्रिवार वंदन.. !’ आतां थोड तंत्राविषयी.. चालेल ना ? १९८१ मधे, कलागारांत एकाच नेपथ्यावर, बहुछायक पद्धतीनं.. Multy-Camera.. पद्धतीनं चित्रितकेलेल्या, कविवर्य सुरेश भटांच्या, कृष्ण-धवल कार्यक्रमांतली दोन छायाचित्र सोबत देत आहे. एक वाइड्‌ अँगल्‌ लेन्स्‌नं घेतलेलं दृश्य ज्यांत, भटांबरोबर देवकी पंडित, श्रीकान्त पांरगांवकर आणि निमंत्रित प्रेक्षकांऐकी कांहीजण दिसताय्‌त, तर दुसरं कॅमेरा झूम्‌ इन्‌ होत फक्त भटांवर केंद्रित झाल्यावर, Fore-ground, soft-focus झालेलं दिसतय. हीच तर गंमत आहे झूम लेन्स्‌ची. अपेक्शित दृश्य समीप जावून दाखवितांना ती आपोआपच बाकीचा, पुढचा-मागचा सगळा फापटपसारा, अंधुक किंवा धूसर करून टाकते. या कार्य क्रमांतल्या सुरेश भटांच्या दोन रचना.. गझल नव्हेत..सुधीर मोघ्यांनी संगीतबद्ध केल्या होत्या. पहिली रंगुनी रंगांत सार्‍या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यांत सार्‍या पाय माझा मोकळा या रचनेंतली एक ओळ तर फारच, ’लाजवाब’ आहे. अगदी भटांच्या अंतरंगाच आणि, स्वत:ला ’भवसागरा’च्या खाईंत लोटतांना, संसाराच्या फाटल्या शिडाच्या फुटक्या होडींत, तुटक वल्ह मारीत, धडपडत, आक्राळ-विक्राळ लाटांमधे पडायला झांलंच तर गटांगळ्या खात, जिवाच्या करारानं ’पैल’ गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य माणसांचं यथार्थ चित्र डोळ्यासमोर उभं करणारी, ’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’ माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा’ तशीच आणखी एक पंक्ती त्यांच्याच एका धगधगत्या रचनेंतली, गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे.. सद्य परिस्थितीतच नाही तर, माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या हृदयांतला अंगार, जिथंजिथं म्हणून सत्तेकडून पिळवणूक होते तिथंतिथं शब्दरूप धारण करीत, कालांतीत झालेला, ... जगभर सर्वदूर.. आणि दुसरी दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले, थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले’ वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली . .मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन्‌ माझी हांक तुझ्या अंतरांत हुरहुरेल तर या गझल कां नव्हत ? सुरेश भटांनीच सागितल्याप्रमाणे, ’रदीफ-काफियाचं Format जमला म्हनजे ग्झल लिहिता आली असं नाही आणि ते तंत्र जरी वापरलं असलं तरी प्रत्येक शेरला वेगळ अस्तित्व, आशय नाही.. कारण, ’रंगुनी’ मधे ’स्व’ सगळ्या शेरमधे तर ’मग माझा’ मधे ’ती’ सर्व(शेर)व्यापी.. !’ मला त्यांची एक गझल स्वरबद्ध करायची होती एका प्रकल्पासाठी म्हणून मी त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलो असतांना त्यांनी हे सांगितलं.. अं हं ! ’बजावलं’ होतं मला..अणि गझल निवडून दिलाव्‌ता स्वत:च्या नव्या संग्रहांतून... लागले डोळे तुझे माझ्याकडे अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे कधी योग आलां तर ’इंद्रधनुष्य’ या त्यांच्या संग्रहांतली, ही खरीखरी ’गझल’ म्हणता येईल अशी रचना नजरेखालून जरूर घाला. मी ती स्वरांकित केली आणि गिरिश जोशीनं ती गायली आहे त्या प्रकल्पासाठी आणि हो ! बर्‍याच रसिकांना माहिती नसेल कदाचित म्हणून सांगतो की, ’मग माझा’च्या आधीचे चार चरण, हे सुधीरनं, सुरेश भटांच्याच संग्रहांतून शोधून सुरुवातीला जोडले होते.. ते इतके चपखल बसले की क्या केहेने ! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Thursday, January 10, 2013

काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!

प्रेक्षकांची मानसिकता अभ्यासण्यासाठी, कार्यक्रम संकल्पनेच्या उंबरठ्यावर असतांनाच, त्याबाबतचा अभ्यास अर्थातच, Formative Research आवश्यक असतो हे खरं आहे, पण तो केल्यानंतर सुद्धा अंदाज कोलमडतांत, होरा चुकतो, हमखास यशस्वितेच्या आत्मविश्वासाची, आत्मप्रौढीची दांडी गुल होते, धुंदीचे इमले कोसळतांत पत्त्यांच्या बंगल्यांसारखे.. परवां परवाच्या, भारत-पाकिस्तान क्रिकेट्‌ सामन्यांच्या शृंखलेप्रमाणे... असच, माझ्या एका कर्यक्रमाबद्दल घडलं १९८३ मधे. ’आरोही’ या कार्यक्रमाच्या निर्मितीची सूत्र त्या वर्षी माझ्याकडे सोपविण्यांत आली होती. १९८०-८१ पासून पाठपुरावा करीत, चिकाटी न सोडता, ’प्रभुकुंज’शी आदरयुक्त स्नेहबंध जोडले होते.. फक्त ’मॉं सरस्वती’ ची आराधना हा एकच हेतू मनांत बाळगून. त्यांतून मग ८२ ला बाळासाहेब..हृदयनाथ मंगेशकरांचा.. ’शब्दांच्या पलीकडले’ साकारला होता. तो खूपच गाजला होता. माझीही भीड चेपत चालली होती. माझ्या २३, मुकुंद निवास या मुंबईतींल डबल्‌रूम्‌ मधे येवून, मंगेशकर, पेटी ओढून तासभर, मूडांत येवून गप्पांच्या ओघांत छान गाऊन जाणे इतपत मोकळेपणा उभयतांमधे रुजलाव्‌ता.. त्याच नात्यांतून मी प्रस्ताव मांडला, ’बाळासाहेब, ’आरोही’सुरू करायचाय.. पहिला कार्यक्रम दिदींचा असावा अशी मनोमन इच्छा आहे. शब्द टाकाल कां ?’ छान कल्पना आहे. सांगतो दिदीला. पन अडचण म्हणजे दिदी लंडनला आहे हो. पंधरा दिवसांनी येईल. चालेल ?’ मनांतल्या आनंदाच्या उकळ्यादाबत म्हटलं, ’चालेल ? पळेल, पळेल..’” मग लागा तयारीला’ चला ! बालेकिल्ला तर सर झालाव्‌ता. कार्यालयांत मानस आंणि मिळालेला ’होकार’ कळतांच सगळेच सुखावले.. हुरूप आला’गाणी कुठली ? नेहमीच्या घिसीपिटी चित्रपट गीत ? अं हं त्यापेक्षा ’आरोही’ला नवी ओळख देणारी, स्वराच्या पावित्र्यानं श्रोते-प्रेक्षकांची मनं उजळून टाकणारी, कबीर-मीरादि संत कवींची तीन, आणि पंडित नरेंद्र शर्माजी रचित दोन, अशी योजना केली बाळासाहेबांनी. संगीत अर्थातच बाळासहेबांचं.. ध्वनिमुद्रन ’बॉम्बे लॅब्‌’ च्या ध्वनिकलागारांत करायचं ठरलं. बहुतेक १५,१६,१७ जुलै ८३. दिदी जवळ जवळ १५/१६ वर्षांच्या ’गॅप्‌’ नंतर अवतरणार होत्या तिथं. तिथंही मंडळी आनंदविभोर होती. बी.एन्‌. शर्माजी.. मुख्य मुद्रक.. तर जवळ जवळ सद्‌गतींत झाले होते. मधून मधून बाळासहेब मला सांगायचे, ’ दिदीचा फोन आलाव्‌ता.. म्हणाली काकतकरांना सांगा मी नक्की येतेय्‌.. कालजी करू नका..’ हे म्हणजे, सुदाम्याच्या झोळींत, हिरेजडित-सुवर्णपात्रांसह पंच पक्वान्नांच भोजन-दान पडल्यासारखचं होत बॉ मला तरी..! मुद्रनाच्या पहिल्या दिवशी सगळे उच्चश्रेणी वादक, वाद्यमेळ संयोजक अनील मोहिलेसह वेळेंत हजर झाले. दिदी आल्या. शर्माजी..बी.एन्‌.. नी पुष्पगुच्छ देवून स्वगत वगैरे केलं. व्हॉइस्‌-रूम्‌ मधे जातांना उंबरठ्याला अडखळून ठेच लागली त्यांच्या पावलाला. ’नोच आगई घुटनेमे, और मेरी घुटन बढने लगी.. धावपळ.. मला घाम सुटला.. Cold sweat..आणि हातपाय गार पडायला लागले..’ बर्फ आणा, बर्फ आणा..’ ! बर्फ आला... मग मी सेवेची आणखी एक संधी घेतली...’बालासाहेबांकडे बघितलं.. बाळासाहेबांनी नजरेनं होकार भरला आणि मी मग हळुवार हातांनी दिदींच्या घोट्यावर बर्फ फिरवला.. एक मंद स्मितरेषा उमटली त्यांच्या चेहेर्‍यावर आणि आजूबाजूच्या तीसचाळीस लोकांनी, ’हुश्श !’ केलं. नंतर तीनही दिवस सुविहीत मुद्रण झालं. बरोब्बर आठवड्यानं..२४ जुलैला चित्रीकरण निश्चित झालं होतं चासकरांनी खास सुशोभित मंच उभारला. प्रकाशयोजमा झाली.. सकाळपासून पाऊस रिपरिपत होतांच दुपारी १२ पर्यंत त्यानं रौद्र स्वरूप धारण केलं, त्यांतच भरतीची वेळ..वरळी भरली पाण्यानं... कशा येणार दिदी पेडर्‌ रोड्‌ वरून... परत काळजी.. संधी हुकते की काय.. पण कशी कुणास ठावूक.. ’सरस्वती’ अवतरली कलागारांत.. परत एकदा सगळ्यांच ’हुश्श !’प्रेक्षकांत होते खुद्द पं.नरेन्द्र शर्मा, शशिकला, सध्याच्या दोन प्रसिद्ध गायिका, देवकी आणि पद्मजा, पुण्याची गायिका अनुराधा मराठे, ठाण्याला रेल्वे ’ठप्प’ झाल्यावर माझी पत्नी तिला घेवून मुलुंडला आली आणि मग ’टॅक्सी’.. काय करणार ? छान ’एन्ट्री’ वगैरे घेतली दिदींची मंचावर आणि पांचही गाणी रेकॉर्ड्‌ झाली... सूत्रसंचालिका होती स्मिता..स्मिता पाटील.. तिच निवेदन नंतर तिच्या सोईनं रेकॉर्ड्‌ केल आणि संकलनोत्तर कार्यक्रम प्रक्षेपित झाला... दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून.. खूप खूष होतो स्वत:वर मी... पण दुसर्‍यादिवशी, मुंबईच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं, मोठ्ठा मथळा देवून फोटोसकट ’धिंड’ काढली माझ्या कार्यक्रमाची.. ’लताचा आरोही आणि चित्रपट गीतं नाहीत ? काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!’

’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?

’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?’** या लेखमालेच्या मागील भागांत, मी उल्लेख केलेला Bolex spring loaded कॅमेरा मला स्वखुशीनं वापरायला द्यायचे माझे त्याकाळचे पुण्यांतले स्नेही, विख्यात,आंतरराष्ट्रीय छायालेखक, ज्यांनी UNO साठीही काम केलं व्हिएट्नाम मधे, ते कै विजय परुळकर.. एकदा स्प्रिंग्‌ आवलली, हॅन्डल्‌ फिरवून की साधारण १० ते १५ सेकंदाचे ५/६ शॉट घेता यायचे, कारण भरलेल्या रिळांतच मुळी २॥ मिनिट चालेल एवढीच फिल्म असायची. जेमतेम १०० फूट.. त्या कॅमेर्‍याचं छायाचित्र मला महाजालावर उपलब्ध झालं, ते इथं देतोय्‌.. माहिती व्हाव म्हणून. कॅमेरा हाताळायला खूप सोईचा होता पण टेलिलेन्स्‌ वापरतांना फार काळजी घ्यायला लागायची.नुसत्या श्वासानं होणारी हालचालसुद्धा चित्रीकरणांत प्रतीत व्हायची. त्यामुळं एखाद समीप दृश्य घेतांना, श्यक्य असेल तेवढ्या कालावधीपुरता, दीर्घ श्वास घेवून, तो रोखून धरायला लागायचा. हा माझा लेख वाचल्यानंतर तुम्ही कधी कालजीपूर्वक बघितलतं चित्रपट पाहातांना तर तुम्हाला एखाद्या समीप-दृश्यांत...Close-up..जाणवू शकेल ती ’धक्‌धक्‌’.. वृत्तांकनासाठी छायांकन करतांना नेहमी वाइड्‌ अँगल्‌ लेन्स्‌चा वापर करायचं प्रशिक्षण आम्हाला मंडी हाउस्‌मधे दिलं गेलव्‌त १९७२ मधे.. कारण अशा छायांकनांत धावपळ असते, फोकस्‌ हमखास बदलू शकतो क्षणोक्षणी.. अर्थात, आग लागलीये, पूर आलाय्‌ अशा घटनांच्या वेळी दूरवरून, ट्राय्‌पॉड्‌ लावून, मीडियम्‌ किंवा टेली-लेन्स्‌चाच वापर करा हे आवर्जून सांगायला आमचे तेंव्हाचे, UNDP अंतर्गत आलेले प्रशिक्षक विसरले नाहीत हं ! दोन वेगवेगळ्या दृश्यांचा ’सार्थ मेळ साधण्याचं आणखी एक तंत्र, म्हणजे, एले्क्ट्रॉनिक्‌ इन-सेट्‌.. उदाहरणादाखल १९८४मधे चित्रित केलेल्या माझ्या एका कार्यक्रमांतलं, चलत्‌चित्रांतली चौकट स्थिर करून साधलेलं, Freez frame.. छायाचित्र देतोय्‌ इथं... छायाचित्रांत, ’जैत रे जैत’ चित्रपटांतल्या, स्मिता पाटीलवर चित्रित केलेल्या एका गीतामधल्या दृश्यावर, पार्श्वगायिका आशाताईंचं दृश्य चौकटीची शोभा बिघडू न देता, Composition चा आब राखत In-set केलेलं दिसेल तुम्हाला. या पद्धतींत, दृश्यमिश्रकाच्या Vision-mixer..साहाय्यानं एका फ्रेम्‌वर दुसर्‍याफेम्‌चा तुकडा चक्क कापून ठेवावा तसा परिणाम दिसतो. मणजे ’मूक-नायिका’ आणि ’पार्श्व-गायिका’ एकाच वेळी दृश्यमान करायला ही पद्धत मला उपयोगाला आली त्या वेळी. त्या काळांत, म्हणजे १९८२चं एशियाड क्रीडा स्पर्धा पार पदल्यावर आणि चौकटींत इंद्रधनुष्यांचे रंग दिसायला लागल्यावर, मुंबई दूरदर्शन कडे नवीनचं आलिव्‌ती ही सुविधा. असं कांही ’नवीन’ आलं की आम्ही निर्माते, आपल्या कार्यक्रमाची Visual value आणखी वरच्या दर्जाला नेण्यासाठी अक्षरश: त्यावर ’तुटून’ पडायचो अधाशीपणे.. कधीकधी अतिरेक व्हायचा.. अजीर्ण झाल्यासारखा.. कानपिचक्याही मिळायच्या दुसर्‍या दिवशीच्या Transmission Review Meeting मधे..पण कांही नवीन शिकतांना, कांही गोष्टी क्षम्य असतांत ना तसच कांहीसं ! कधीकधी अतिरेक व्हायचा.. प्रेक्षकांच्या अतर्क्य आणि चिकित्सक(?) अभिरुचीचा.. त्यांतल्या दोन-चार आठवणी इथं मांदायचा मोह मी नाही आवरू शकत. कारण असे प्रेक्षक, तथाकथित समीक्षकांच अस्तित्व हे स्थलांतींत आणि कालांतींत असतं.. पहिली एका गाजलेल्या सांगीतिक कार्यक्रमाबद्दल.. ’मत्स्यगंधा ते महानंदा’ या पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरांकित केलेल्या नाट्यपदांच्या, Review वजा कार्यक्रमांत, सूत्रसंचालिका वीणानं.. डॉ. वीणा देव.. ’लेकुरे’ हे मुद्रित संगीताचा गाण्याच्या वाद्यमेळासाठी उपयोग करनारं पहिलं नाटक’ असं विधान करून गेल्या.. त्यावर ज्योत्स्नाबाईंनी एका वृत्तपत्रांत ते विधान खोडून काढलं.. लगेच पुण्याच्या एका ’जळाऊ’ महाशयानं, ’असे सूत्रसंचालक बोलाव्‌ताचं कां ?’ अशी जाहीर वृत्तपत्रीय बोंब मारली... दुसरा प्रसंग जरा वेगळा.. पुण्याच्या थिएटर्‌ अ‍ॅकॅडेमीनं ’बदकांच गुपित’ या कविवर्य बा.सि.मर्ढेकरांच्या संगीतिकेवर, सु्दर नृत्यनाट्य मंचावर आणलव्‌त. ते पाहून मी त्याचं चित्रवाणी नाट्यरुप प्रेक्षकांसाठी सादर करायचं ठरवलं आणि चित्रित करून प्रक्षेपितही केलं.. अर्थात मी कदाचित एक चूक केली असेल ती ही, की चित्रवाणी माध्यम हे ग्रामीण भागांतल्याही घराघरांत पोहोचलं आहे हे लक्षांत न घेता, अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा अभ्यास, ज्याला Formative Research म्हणतांत तो न करतां आणि ’युवदर्शन’ कार्यक्रमांतर्गत ते सादर केलं.. झालं ! सवंग करमणुकीवर पोसलेल्या प्रेक्षकवर्गाच्या एका प्रतिनिधीनं एक पोस्ट्‌कार्ड्‌ धाडलं.. तत्परतेनं ! त्यांतला मजकूर, म्हणजे फक्त एक ओळ होती.. ’आतां झुरळांचं गुपित’ कवा दाव्‌तां ?’ आतां बोला..

Sunday, January 6, 2013

’दृश्य-मेळां’चं तंत्र..

’दृश्य-मेळां’चं तंत्र.. रतीचे जया रूपलावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधेसारखा स्वाद, स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे जसा जन्मतो तेज घेउन तारा जसा मोर घेउन येतो पिसारा तसा येई कंठात घेउन गाणे असा बालगंधर्व आता न होणे बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनानिमित्त अण्णा... गदिमांनी ही शब्दसुमनांजली ’बालगंधर्वांना अर्पण केली होती... त्याला स्वरसाज चढवला होता.. विख्यात हरहुन्नरी ’पुल्दें’नी, आणि कंठ दिलाव्‌ता, गाभार्‍यांतल्या निरांजनांच्या ज्योती सारख्या शांत, पवित्र, आश्वासक, व्यक्तिमत्वाच्या आमच्या ताईंनी... माणिकताईंनी.. ! मला त्या मुलासारख वागवायच्या कारण श्रीकांत दादरकर माझा मित्र.. १९६८ पासून.. मला ही आठवण झाली कारण, मुंबई दूरदर्शन सुरू झालं १९७२ मधे आणि पुण्याचं सहक्षेपण केंद्र सुरू झालं बरोब्बर एक वर्षानं, म्हणजे २ऑक्टोबर१९७३ ला. तेंव्हाचे आकाशवाणीचे महासंचालक मुखर्जी यांना सोबत..Escort.. म्हणून मला पाठवलव्‌त कार्यालयीन कर्तव्य म्हणून..त्यांच्याबरोबर पुण्याला. उद्घाटन सोहळ्यांत तीन सौंदर्यवती युवती, दोन स्मिता.. पाटील (मराठा) आणि (गोळवलकर) तळवलकर.. कहाडे+सारस्वत....आणि एक पुणेकर, आकाशवाणीची निवेदिका, कोकणस्थ शोभा चितळे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करीत होत्या तीन वेगवेगळ्या पद्धतीची नऊवारी नेसणं, निवेदन करतांना मिरवीत.. आणि त्या सोहळ्यांत अण्णा.. गदिमांची ही रचना गायली गेली होती माणिकताईंनीच... बाल गंधर्व रंगमंदिरांतली तोन तैलचित्र पाहिली आहेत तुम्ही असतीलच नसलीत तर अवश्य पहा, त्यासाठी खास पुण्याला जावून ! एक स्त्रीवेशांतलं आणि दुसरं पुरुष वेशांतलं.. अशी एक वदंता आहे की कुणा एका महाभाग ’महा’पौरानं एका पुणे भेटीला आलेल्या परदेशी पाहुण्याला चित्रांचं वर्णन करतांना, ’This is Mr. Balagandharv and that is Mrs. Balagandharv' अशी ओळख करून दिलिव्‌ती म्हणे.. आपल्या अज्ञानाची आणि प्रथम नागरिक म्हणून त्यांना निवडून दिलेल्या पुण्याच्या इभ्रतीची लक्तरं, आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर मांडीत... या तैलचित्रांची चित्रकार होते गोपाळराव देउसकर.. बालगंधर्वांची अप्रतिम ही दोन तैलचित्र.. कलाकृती म्हणून फारच वरच्या दर्जाची, कलाकाराच्या प्रतिभेच्या दर्जाइतकीचं... कुंचल्याचे जादूगारच होते ते... त्यांच वास्तव्य, फर्ग्यूसन्‌ महाविद्यालयाच्या प्रांगणांतल्या बंगल्यांत असायचं... बंगल्याला शेंदरी फाटक..त्याला बाहेरून कुलूप.. आंतलं दार उघडं आंत अंधार... कुणी भेटायला गेलं की आंतून विचारणा व्हायची , ’कोण आहे ? ’ नाव सांगितल्यावर किल्ली हवेंतून यायची ती पाहुण्यांनी ज्गेलून फाटकाचं कुलूप काढून आंत प्रवेश करायचा.. मला हे माहीत आहे कारण, ब्हुतेक ’प्रतिभा आणि प्रतिमा’ मधे त्यांच्या सहभागासाठी विनंती करायला त्यांच्याकडे जायचा योग आला होता... जुइली तेंव्हा तिथं होती की नाही आठवत नाही.. असो.. तर मागील भागांतल्या छायाचित्रांतल्या In-set बद्दल.. In-set अनेक प्रकारे करतां येतो. ऑप्टिकली.. मल्टोपल्‌ एक्स्पोजर्‌ तंत्रानं.. म्हणजे एक दृश्य चित्रित करायच... एक्स्पोज्ड्‌ फ़िल्म्‌ कॅमेर्‍यांतून बाहेर न काढता रिवाइंड्‌ करायची आणि त्यावरच दुसरं दृश्य चित्रित करायचं... अर्थात याला कॅल्क्युलेटेड्‌ शॉट्‌ कॉम्पोझिशनचं बिनचुक तंत्रज्ञान आणि कसब अवगत असावं लागतं.. शालेयचित्रवाणीच्या एका कार्‍यक्रमांत मी असं एक दृश्य सुरेश भागवतवर चित्रित केलं होतं..झोपेंतून स्वप्नांत जातो आणि वाघ होतो, वगैरे..वगैरे.. ७५, ७६ साली असेल बहुधा.. दुसरा प्रकार म्हणजे, चित्रवाणी कलागारांत बहुछायक पद्धतीमधे (Multi-camera system), दोन इलेक्ट्रॉनिक्‌ छायकांनी टिपलेल्या दृश्यांच दृक्मिश्रका द्वारे..Vision-mixer एकत्रीकरण करणं.. पण याला प्रकाश योजना करतांना, पार्श्वभागी अंधार योजना, म्हणजे Limbo lighting करायला लागतं अन्यथा प्रतिमा एकमेकाच्या ’उरावर बसलेल्या दिसतांत.. आजकाल सगळ्या माध्यम प्रशिक्षण संस्थांत Thee point lighting शिकवतांना ह्या चौथ्या महत्वाच्या Light sourceचा विसर पदतो तथाकथित ’तज्ज्ञांना... दुर्दैव दुसरं काय ? झूम लेन्स्‌ नव्हती त्या काळी छायकाला Turret असायच.. तीन लेन्सेस्‌चं एक वाइड्‌ अ‍ॅंगल्‌.एक मीडियम्‌ आणि एक टेली बहुतेक ५०, ३५ १५ अंश कोनाच्या आणि विविध अशा फोकल्‌ लेग्थ च्या.. . दिग्दर्शकानं दिलेल्या सूचनेबरहुकूम, छायालेखल, त्यांच्या कॅमेर्‍याची लेन्स्‌ ’Mask' करायचे आणि मग दोन (किंवा अधिक) कॅमेर्‍यांच्या दृश्यांच मिश्रण, Vision-mixer द्वारे व्हायचं.. तो साधलेला परिणाम मागील भागात पाहिलांत... अशाच पद्धतीन तीन छायकांच्या दृश्यांचं मिश्रंण मी केलं होतं... अमोल पालेकरनं सादर केलेल्या ’दिवाकरांच्या नाट्यछटा’ या चित्रवाणीपटाच्या चित्रीकरणांत.. मी Bolex, spring loaded turret camera वापरायचो Hand-held.. गंमत म्हनजेत्यानं घेतलेल्या वाइड्‌ अँगल्‌ शोट्‌ मधे टेले-लेन्स्‌चं हूड्‌ दिसायचं, म्हणून आधी ते Dismount करायला लागायचं.. केळकर संग्रहालयांतल्या मस्तानी महालांतला, रजनी चव्हाणचे Shots.. १९८० मधले..