Friday, December 26, 2014

।।भासबोध।। १९३ ते २००

मेंदू बुध्दीचा जन्मदाता । बुध्दि देते तर्कशुध्दता । हृदयिच्या भावाचा संगम होता । शब्द, भाषा समृध्द ।। १९३ जैसी असेल कर्मरीती । तैसीच येते प्रचिती । अध्यात्म, भक्ती, मोक्ष, गती । केवळ कल्पनाविश्व ।। १९४ कांहीच न देतो हरी । बैसल्या जीवा खाटल्यावरी । अर्जुनासहि तो वदे 'कर्म करी' । तेंव्हाचि कथा सुफल ।। १९५ पाहुनी अभेद्य श्रध्दा । पांपणींत ओथंबल्या जलदा । आतुर निवारण्या आपदा । भाबड्या भक्तांच्या ।। १९६ कोणी जोडिती हस्तक । कोणी घासतो चरणी मस्तक । 'त्याचे' आडते, मध्यस्थ, हस्तक । सावज घेरण्या टपलेले ।। १९७ ।। दास-वाणी ।। गरळ आणि अमृत जाले । परी आपपण नाही गेलें । साक्षत्वे आत्म्यास पाहिलें । पाहिजे तैसें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/१९ साप किंवा नागाचे जहाल विष म्हणजे गरळ. कोणत्याही आजारातून निश्चित बाहेर काढणारे संजीवन द्रव्य अमृत. दोन्हींमधे जलतत्व आहे ते एकच आहे. त्याच प्रमाणे दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमधे सुद्धा आत्मतत्व एकच असते. हे समजले की आपली वर्तणुक सर्वांशीच चांगली आपुलकीची राहते. पैठणाधीश 'धर्मकर्मठांची । गरळफेक पचवुनी चूळ अमृताची । गीता उकलत, ओवी ज्ञानोब्बांची । सालंकृत झाली ।। १९८ हलाहलाच्या हालाग्नींत । जनसामान्य होते पोळत । भावार्थदीपे त्यांना शमवित । कर्मधर्म सांगे ज्ञाना ।। १९९ ऐसा कोणी अवतरेल ?। तमारि दीपस्तंभ होईल ?। लांडग्यांना सहजी वारील ?। शंका सद्यकाली ।। २००

Wednesday, December 24, 2014

।।भासबोध।। १७६ ते १९२

ऐन दुपारचे तळपते ऊन । सर्व जीव सावली धरून । तरुवराचे हे योगदान । लक्षण सुकृताचे ।। १७६ वस्तींत माजतो दंगाधोपा । कसले सूड प्रसवती पापा । आधार माणुसकीचा खोपा । सदन निधर्मी सुकृताचे ।। १७७ लयापूर्वी जैसी स्थिती । तयापूर्वी होण्या उत्पत्ती । निसर्गाकडे कोणती ऊर्जा, शक्ती । जाणिले कोणी ।। १७८ मग कोणते द्ष्कृत्य । वा मानावे सुकृत । होईल लयाशिवाय स्थितं । उत्पत्ती जगती ?।। १७९ आपण सगळे क्षुद्र जीव । शोधीत बसतो कार्यकारणभाव । आकळेना त्यांसि देत सुटतो नांव । सुकीर्त वा दुष्कीर्त ।। १८० तळहाती प्रारंभी फोड । कष्टकरी करती तडजोड । घट्टे होता त्याचे, बिमोड । होतो वेदनेचा ।। १८१ सवयीने सारे सुसह्य, सोपे । प्रारंभी मन थरकापे । मंथर नंतर आपोआपे । लागतो निवळू ।। १८२ ।। दास-वाणी ।। ज्ञान विवेकें मिथ्या जाले । परंतु अवघेचि नाही टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०७/१८ साधना करता करता साधक ब्रह्मस्थितीला पोहोचला सत्य असत्याचा विवेक प्राप्त होऊन संपूर्ण दृष्य जग हे मिथ्या आहे असे ज्ञान त्याला झाले. म्हणून काय त्याने खाणे पिणे, उठणे बसणे आणि शरीराची नित्यकर्मे सोडून दिली काय ? तसे जर नसेल आता मला ज्ञान झालय, भजनाची मला गरज उरली नाही असे तू म्हणू शकतोस का रे बाबा ? ज्ञानोत्तर भक्तीचे महत्व समर्थ सगुणभजन समासात सांगतात. शब्द असावे सार्थ सुगंधी । संगीत अन् मोदाची नांदी । हृदयस्थ शांतीस योग्य संधी । भजनांत ।। १८३ भजन करावे स्वान्त:सुखाय । सुखांत रुजते ज्ञान निरामय । क्षणात आनंदाचा ठाय । सहजचि नकळता ।। १८४ ज्ञानांकुर रुजवुनी अंतरी । कोंभांच्या वाढल्या तरुवरी । मधुर फळे लगडणारी । चाखावी येथेचि जाणा ।। १८५ पिंडास कावळा शिवे । टोच मारण्या चोंच शिवशिवे । आनंदविभोर, कृतज्ञ भावे । नाचती आप्तजन ।। १८६ जेथे नाहीच कावळा । तेथे ठेवा पिंडगोळा । दर्भाचा मग मार्ग मोकळा । करोनि देई किरवंत ।। १८७ गुलाले माखिला पिंड । मनुष्यासही क्षुधाशमनखंड । रित्यापोटी जेंव्ह ब्रह्मांड । भुकेल्या लागे जाणवू ।। १८८ घाटावरि ठेविती पिंड । तटावर अनावर आसवे अखंड । ताटावर तेराव्यास किरवंत कर्मठ । ओठ शिवोनी नि:शब्द ।। १८९ 'उरकले कां रे बाबा ?'। पुसती जिवंत आज्ज्या-आजोबा । घेती वेदना, दु:ख ताबा । अस्तुरि, कच्च्याबच्च्यांचा ।। १९० सर्वांगावर सुरकुत्या । अपचनाने अतिसार, वांत्या । 'जा दूर, येउ नको अंत्या' । श्वास लोभी आरडे ।। १९१ कोण्या उद्देश्ये लिखाण ?। जागवण्या अंधश्रध्द जन । त्याकरिता आवश्यक प्रकाशन । लोकार्पणार्थ ।। १९२

Monday, December 22, 2014

।।भासबोध।। १६२ ते १७५

मी उन्हांत राहिन चालत । काटे जरि तळपायांत । तळपाया असिधाराव्रत । एकचि यशस्वितांना ।। १६२ ।। दास-वाणी ।। देखणे दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेच ज्ञान तें पामरें । अंतरली भगवंता ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२९ दिखाऊ श्रीमंती, डामडोल, भपकेबाज सत्संग आणि कानमंत्र देण्याचे भव्य सार्वजनिक कार्यक्रम इतकेच ज्ञान असणारे भोंदू गुरू असतील तर गरीब बिचारे अज्ञानी शिष्य भगवंताला कधी भेटू शकतील का ? सद्यकाली ऐशीच करणी । अंधश्रध्दांचे जाल फेकोनी । 'व्यावसायिक' बडवे होवुनी । गरीब भोळे हेरिती ।। १६३ कैसे सावध करावे ?। कोठले पाठ यांना द्यावे ?। पाठ 'अशांची' भाग पाडावे । सोडण्या ! आकळेना ।। १६४ जैसी श्वापदे कराल जंगली । तैशी सत्ता शर्यतींत धावली । परस्परांवर चिखलफेक केली । यथेच्छ ! जनसामान्य फासावर ।। १६५ कुणास नाही कसली क्षिती । सामोरे आलेले 'भक्ष' भोगिती । नासले-सडलेले करिती । 'लोकार्पण' ।। १६६ ।। दास-वाणी ।। अधर्मास स्वधर्मे लुटिले । कुकर्मासि सत्कर्में झुगटिले । लाटूंन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/४८ समर्थांच्या या संग्रामशूर साधकाने अखंड स्वधर्मपालन करून अधर्म नेस्तनाबूत केलाय. सत्कर्मांचेच आचरण करून वाईट कृत्यांना झुगारून दिलय. विचारपूर्वक आचरणाने अविचारांना हाकलून देऊन वाटेला लावलय. साधकलक्षण समासात समर्थांनी साधकाच्या समाजातील वर्तणुकीची पथ्ये सांगितली आहेत. नेमाने खुरपिता तण । निश्चित वाढेल उत्पादन ? । मशागतीची तेवढीच जाण । कृषिवला हवी ।। १६७ अबालवृध्द वाऱ्यावरी । नाहक मारती शस्त्रधारी । विकृत मानसिकतेवरी । उपायो कोणता ?।। १६८ अहिंसा उपाय हिंसेवरी ?। निष्पाप जीवां मारेकरी । सर्वत्र युगानुगे अवनीवरी । खंडिती हा इतिहास ।। १६९ 'दया' शब्द त्यांना वर्ज । कितीही करा विनंत्या-अर्ज । संपदा, सत्तेचा लोभ, माज । दुष्कृत्या ठरते कारण ।। १७० सत्कृत्य शब्द फसवा । परस्पर विरोधी भावा । गोवत्स कधि, कधि छावा । गोंडस, तरि भिन्न वृत्ती ।। १७१ विषवल्ली रुजविणे । तुलसिवृंदावन लावणे । क्रिया एक परि भिन्न असणे । परिणाम ! स्वाभाविक ।। १७२ दुष्कृत्यांची जाणा महती । निवारण्या सुकृतांची माहिती । ज्यांना मान्यता लौकिकार्थी । अभावे त्यांच्या कैची ? ।। १७३ कोठलाही प्रस्तर कठोर । फोडितो वेगवान जळप्रहार । पेटता वडवानळ रौद्र । जळ शीतळ शमविते ।। १७४ परंतु जळ प्रळयवेळी । निसर्गाची अमोघ खेळी । प्रस्तरी वा वडवानळी । निराकरण्या ना सक्षम ।। १७५

Wednesday, December 17, 2014

।।भासबोध।। १३८ ते १६१

अभ्यासले म्हणे संत । सहिष्णुता तरी अंतरांत । कांही केल्या ना रुजत । पीठासनाधिष्टांच्या ।। १३८ कांही जात्याच देखणे । भरडती जात्यांत दाणे । भारुडादि लोकसाहित्य लेणे । संशोधिती निष्ठेने ।। १३९ संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।। १४० कांही साहित्य'दुर्वास' । परस्परांचा करिती दुस्वास । घरकुल जरि साहित्य'सहवास' । 'वांदरे' स्थितं ।। १४१ फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी । चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२ सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या 'नामे' साधते ।। १४३ 'नाम' घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।। १४४ अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' । कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दु:खाने । भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५ चिमणी चिल्ली घरट्यांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।। १४६ जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।। १४७ मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषत: रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८ ।। दास-वाणी ।। आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोध येणे । ऐसीं नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/२१ जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची. हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही. न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे. जो तो जाणितो स्वकर्माने । सुख-दु:ख भोगणे-निवारणे । वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे । अन्य कुणा ?।। १४९ सख्य, मैत्र राखते वैर दूर । वोलांडुनि मोद-क्रोध अपार । वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर । सवंगड्यांचे ।। १५० द्वापारयुगी मैत्रीच न्यारी । सद्यकाली माजले कलिधारी । लांगूलचालन दारोदारी । करिती 'दामा'साठी ।। १५१ ।। दास-वाणी ।। पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/२४ पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२ कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती । भीती भारते अंतर ।। १५३ पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखद:खा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी । आपणची जाणा ।। १५४ अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?। आकळेना ।। १५५ ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । 'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।। १५६ ।। दास-वाणी ।। सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजें वाया । पदार्थज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/०६ अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात. जागृती - जागेपण स्वप्न - झोपेतील जागेपण सुषुप्ती - गाढ झोप तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा. काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या . त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान. तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म. शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत. आम्हासि ठावकी एकचि अवस्था । तिला विविध नामे संबोधिता । कर्मधर्म संभवतो विशेषत: । तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७ मनात कुजवुनि भोग, निद्रा । जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा । दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा । बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८ अनेक मंचिले म्या विद्वत्जन। तयांनी मथिले तत्वज्ञान । परि सामान्य जनता जनार्दन । वंचितचि राहिला भाबडा ।। १५९ लाल दिव्यांच्या आधी गाड्या । मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या । सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या । कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६० पंचाधीक दशकांवरती शतकोटी । किड्या, मुंग्यासम जन राबती । त्यांच्या कल्याणासाठी । काय बा केले ?।। १६१

Tuesday, December 9, 2014

।।भासबोध।। १२६ ते १३७

कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रुजा घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' ?। सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७

Friday, December 5, 2014

।।।भासबोध।। १०७ ते १२५

स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ भेटल्याविना नाहि जवळीक ।पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ या कृतींद्वारा ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५

Tuesday, December 2, 2014

।।भासबोध।। नवा अध्याय ८६ ते १०६

।। दास-वाणी ।। ज्येष्ठ बंधू बाप माये । त्यांची वचने न साहे । सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०६/२६ ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही. ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य. माय, तांत, बंधू, सखा । जाणा जीवाच्या तुकड्या सारखा । त्यांना जो होईल पारखा । गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६ विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी । पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी । निंदनीय वर्तन तयांप्रती । अक्षम्यचि होय ।। ८७ डोईवरी आभाळमाया । काळी आई, मखमल पाया । तैसेचि वागवावे आप्तस्वकीया । तेचि होय 'माणूस'पण ।। ८८ छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी । कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी । हा अविचार ? नाही ! जगराहाटी । कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९ म्हणोनि राखणे भाकरतुकडा । भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा । सुसंस्कृत गृहिणी देती धडा । परंपरा 'अतिथी' साठी ।। ९० सातजणांत एक तीळ । वाटता, मिळे सुख सकळ । कोणताही कठिण काळ । सहज होई सुकर ।। ९१ मारितो कां भूल थापा ? अतिशहाणा हा कोणं बाप्पा ? आवरा, अटकाव करा या पापा ? आरडती आढ्य, संभावितं ।। ९२ 'धर्मास लावितो चूड । उतरवा याचे वेड । करण्यास परतफेड । हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३ अध्यात्म मोक्ष, गती । हा स्वयंसिध्द मंदमती । कैसा जाणेल ? उपरती। यांस होईल ?।। ९४ गरम, नरम, विविध पराठे । थंडीमधे खावे, वाटे । 'नाम' 'देव' सगळे खोटे । घुमान घुमण्या लेखकूंना ।। ९५ उभे आयुष्य म्हणे संशोधनी । अध्यासनाधिष्ठित साहित्यिकांनी । परंतू सहिष्णुता आचरणी । बाणविण्यांत अपयशी ।। ९६ बालयोगी ज्ञानदेव । सांसारिक तुकोब्बा, नामदेव । न मिरविता संतभाव । झालेचि ना जनमान्य ?।। ९७ मग कां बरे सायास । मिरविण्या वृथा आभास । भाटांना ठेउन आसपास । 'उमेद' 'वार' करिति ढोंगी ।। ९८ धरा धरा काकतकर । मोजुनी मारा पैजार । शमविण्या सूडाची धार । वार करा नेमके ।। ९९ गति, मोक्षावरती करीत बसला वार । लागेल ऊर्ध्व, मग येइल भानावर ?। तेंव्हा तरि यांवे उचलायाला चार ? । सुखरूप दावण्या 'माहेरा'चे द्वार ।। १०० ।। दास-वाणी ।। लोकी भले म्हणायाकारणे । भल्यास लागते सोसणें । न सोसता भंडवाणे । सहजचि होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०२/१३ लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर 'काय भांडकुदळ आहे हा माणूस' अस सहज ऐकून घ्यावे लागते. काळोख असतो ठाय । प्रकाश पावतो विलय । तेज शोधीत जाय । क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१ मुकाट न राहता बोलावे । शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे । कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे । संभाषण ।। १०२ बरे, वाईट पाहावे तैसे । व्यक्तिसापेक्षच सहसा असे । भावांचे आयाम विविधसे । असावे संग्रही ।। १०३ अंधारच असतो सत्य नि स्थाई । प्रकाशा मावळतीची घाई । जन्म सांगाती घेउन येई । मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४ कोण जाणे. अंधाराचा ध्यास । कां न बरवा वाटें प्रकाश ?। हीच बहुधा ओलांडण्या वेस । घालमेल जीवाची ?।। १०५ पुत्र कमावितो पुण्याई । आज मजला कामा येई । व्यक्तण्यास साहाय्यभूत होई । नकळत पण निश्चित ।। १०६