Wednesday, December 26, 2012

’जोहार मायबाप जोहार’

’जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार’ कां कुणास ठावकी पण नव्या वर्षाच्या नांदीचे चौघडे निनादायला लागायच्या सुमारास ह्या ओळींनी, अचानक माझ्या मनांत कां बरं काहूर माजवावं ? ’बालगंधर्व’ नारायणराव राजहंस, या संगीत रंगभूमी-सम्राटानं अजरामर करून ठेवलेलं पद..’कान्होपात्रा’ या नाटकांतलं (लेखक कै. नारायण विष्णू कुलकर्णी.. ज्यांचा महाजालांतल्या या नातकाच्या माहितीमध्ये कुठेही उल्लेख नाही पण विभानं ..देशपांडे.. माहिती पुरविली..). हे पद मी बर्‍याचवेळेला, नाट्यसंगीताच्या मैफलीच्या अखेरीस गातांना ऐकलय. आणि सुरावट सुद्धा करुण लागते कानाला. त्यामुळं ती भैरवी असावी किंवा कसे अशी शंका मनांत यायची. तसं सुद्धा कानाला सुखावून जाणारं गाणं, ’कुठल्या रागांतलं बॉ ?’ अशी पृच्छा चेहेर्‍यावर घेवून वावरणार्‍यांचा मला खॊप राग येतो. अरे लेको, आनंद घ्या की गाण्याचा.. कशाला त्या व्याकरणाच्या घनदाट जंगलांत घुसता ? पण आज मात्र या नव्या सदराचा प्रपंच मांडतांना, आपल्या किखाणांतून, जर कांही माहिती मिळणारचं असेल माझ्या, ’मायबाप’ वाचकांना तर ती श्यक्यतो अचूकच असायला हवी म्हणून मीही आज त्या ’जंगला’च्या परिघावरून आंत डॊकावून पाहायचं ठरवलं ! त्या साठी अर्थातच, कुणा अधिकारी व्यक्तीचं दार ठोठावणं आलच.. मग हक्काचं माणूस कोण ? डोळ्यापुढं एकच नांव आलं.. म्हणजे तशी बरीचं नावं असतील पण मी आपलं विचारलं, आनंदला.. आनंद भाटे...गळ्यांत जन्मजात गंधर्वस्वर घेवून आलेला.. ’आनंद गंधर्व’ ( याला आनंदगंधर्व म्हटल्या बरोब्बर, एका, निवासानं मुबैकर पण वृत्तीनं पुणेकर, प्रथितयश, पुरोगामीलक्षणधारीदेदीप्यमान साहित्यिकाच्या पोटांत काय दुखलं कुणास ठावे ? पुण्यातल्याच दुसर्‍या एका बालकलाकाराचं कौतुक करतांना त्यानं, ’पुण्यांत गल्लोगल्ली आतां गंधर्व दिसायला लागलेत..’ अशी कुजकट, दुगाणी झाडल्यागत, टिप्पणी, दिल्लींतल्या एका भाषणांत.. हे ध्वनिमुद्रण मी स्वत: ऐकलय हं.. केली, आणि स्वत:ची ’गल्ली’ संस्कृती चव्हाट्यावर मांडली... जे समोरून वार करू धजत नाहीत ते अशा दुगाण्या, मागच्या खुरांनी झाडतांत.. त्यांतून या गृहस्थांना अशा फुसकुल्या, नथींतले तीर वगैरे शस्त्रांचा उपयोग करून, हंशे ’वसूल’ करायची खोड होतीच... असो !) हो ! त्यानं दिलेल्या माहिती प्रमाणे,हा कलिंगडा+बिभास असा मिश्र राग आहे. मनांत परत एक विचार आला. म्हटलं, बापरे दोनदोन ’राग’ असूनसुद्धा, ज्याला जोहार घालायचा त्याचा, करभरणीच्या मोहोरा मोजायला विलंब लागल्यामुळं झालेला संताप, आलेला ’राग’ सुद्धा शमवील अशा शब्दांबरोबरच (रचना-संत चोखामेळा) अशी ही सुरावट देणार्‍या संगीतकारांचं (संगीत-मा.कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन) आणि त्या आर्जव भरल्या (भारल्या ?) गंधर्वकंठातून उमटलेल्या स्वरावलीचं सुद्धा कौतुक तुम्ही आम्ही बापडे काय करांवं ? गंमत म्हणजे संगणकीय महाजालावर..Internet.. या पदाच्या माहिती-आलेखामधे त्याची चाल ’लावणीची’ असल्याचं म्हटलं आहे. असेल असेल. कारण, तुम्ही पठ्ठे बापुरावांची मुंबईची लावणी, मूळ चालींत ऐका.. मी म्हणतो ते तुम्हाला पटतं की नाही ते पाहा ! मी स्वत: बालगंधर्वांना पाहिलय.. मुंबईला राम मारुती रोडवरच्या मालती बिल्डिंग.. मुकुंदनिवास मधे मी राहात असतांना.. त्यांना खुर्चीवरून उचलून आणलव‌त.. खाकी अर्धी चड्डी आणि खादीचा बंडीवजा अंगरखा.. डोकीचा तुळतुळींत गोटा.. गोंडस, निरागस, निर्व्याज, गोल गोबरा चेहेरा... डी. एल्‌. वैद्य रोड वरच्या ब्राह्मणसहायक संघाच्या.. आतां जिथं ’धन्वंतरी रुग्णालय आहे तिथं.. त्या दिवशी रामभाऊंच्या पंडित राम मराठ्यांच्या मुलांच्या मुंजी होत्या बहुतेक.. त्या सोहळ्याला उपस्थित राहाण्यासाठी आलेवव्‌ते ’ते’.. नुसतं पाहेलचं नाही तर गाणसुद्धा ऐकलं त्या दिवशी... त्या गलितगात्र अवस्थेंतकां होईना पण, कंठातला दैवदत्त, रियाजी स्वर थोडाच विरतो ? कंप पावला असेल कदाचित पण कंपन संख्या ? अं हं ती अबाधीतच राहिली होती ! तेंव्हा ते पद म्हटलं होतं त्यांनी, ’जोहार मायबाप जोहारं..’ तरी पण सुरुवातीलाचं, मायबाप वाचकांना जोहार घालतांना, या ओळी का दाटाव्यांतं माझ्या ओठांत ? कदाचित, माझा स्नेही आनंद.. आनंद अभ्यंकर आणि अभिनयाच्या क्षितिजावरचा उगवता तारा अक्षय.. यांना नियतीनं अकाली हे शब्द म्हणायला लावले म्हणून ? प्रत्येक खेपेस सुरुवातीला गुढ्या-तोरणंच उभारायला कशाला हवींत.. ज्यांनी आपल्याला अनंत सुखद क्षण बहाल करताकरता, मंचावरून Exit' घेतली.. त्यांच्या स्मृती अलवार जोजवत कां नाही करायची सुरुवात.. त्यांच्या आशीर्वादानं ?

Tuesday, December 25, 2012

अनंत मी, अवध्य मी..

अनंत मी, अवध्य मी.. मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे...

Wednesday, December 19, 2012

’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास..

सदर छायाचित्रांत एका ’मोटर्‌-बाइक्‌’ला, मागील बाजूस, खास, बहुसासनी व्यवस्था केलेली दिसतेय्‌... ’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास.. साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाता है मिलकर बोझ उठाना । आणि हे ’ओझ’, बोझ’, शब्दार्थानं, शब्दश: वजन गृहित धरू नका हं !. हे ’ओझ’ आहे जबाबदारीचं.. आपल्या सगळ्यांच्याच..आपल्या सगळ्यांनाच ’मोकळा’ श्वास घ्यायला मिळावा म्हणून... हवेच्या शुद्धतेचं भान राखायच्या जबाबदारीचं... ’बोझ’ न समझना ! ऐसा है, ना ’धुऑं’ हवा मे भरना कुठल्या राज्यांतल कुठला रस्ता आहे कुणास ठाऊक ? पण इतका सुरम्य, प्रदूषण विरहित, स्वच्छ परिसर, रस्ता, गुळगुळित अगदी ’गालिचा अंथरावा तसा, चक्क खड्डे नसलेला, शहरांतल्या बजबजपुरींत राहाणार्‍यांना अगदी हेवा वाटावा असा.. कारण ? चित्रांत स्पष्ट आहे.. वेगळ सांगायलाच नको, पार्श्वभागी जलाशय किंवा जलधी.. म्हणजे तलाव किंवा समुद्र सागराची पुळणी दिसते आहे. म्हणजे हे वाहन, अर्थातच डिझेल, इंधन म्हणून वापरणार ? अं हं ! ’मोटर-बाइक’लाच मागे ’बहु-आसनी’ व्यवस्था केलेली दिसतेय्‌ !.. बराच चढ चढून येतय्‌.. पण, मागे ’धुराच्या रेषा हवेंत सोडी’ त नाहिये ! आठ-नऊ माणसांना वाहण्यासाठी चार दुचाकी किंवा दोन चारचाकी... म्हणजे चित्रांत दिसणार्‍या एका स्वयंचलित वाहनाच्या ठिकाणी, चौपट किंवा किमान दुप्पट संख्या आणि पर्यायानं त्याच पटींत इंधन जाळून होणारा धूर.. आणि परिणाम ?.. आठजण आपाआपल्या इच्छित स्थळी आपलं ’इप्सित’ सिद्ध्यार्थ पोहोचणार. कविश्रेष्ठ गजानन, दिगंबर तथा अण्णा माद्डगुळकरांच्या, विश्वकीर्त ’गीतरामायण’ या महाकाव्यातलं ते गीत आठवतय ? ’सियावर रामचंद्र की जय.. !’ म्हणत, एकेक महाकाय प्रस्तर फोडून त्याचे झालेले छोटेछोटे शीलाखंड वाहून नेणार्‍या वानरसेनेला प्रोत्साहित करणारं, जणू कांही समर गीतच.. ’सेतू बांधारे सागरी.. सेतू बांधारे सागरी’ सहकाराने रावण मर्दुन, मोद भरू अंबरी किंवा गदिमांनीच, ’उमज पडेल तर’ या चित्रपटासाठी केलेली गीतरचना, सहकाराचा मूलमंत्र देणारी, किंवा ’वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ हे महाभारतांतलं, एकजुटीची महती विदित करणारं प्रसिद्ध वचन आग्रहानं मांडणारी शब्द रचना. नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी.. शब्द तेच पण संदर्भ वेगवेगळे. तिथं रावणवध हा हेतु होता, किंवा दुसर्‍या गीतांत ’हरी’ म्हणजे सत्य-शिव-सुंदराचं प्रतीकरूप... लौकिकार्थानं देव वगैरे... दर्शनासाठी, तर इथं चित्रसंदर्भानुसार, मंडळी प्रदूषणरूपी ’रावणा’चा अगदी त्यांच्याही नकळत संहार करतायत्‌ ! संहार नाही तरी त्या ’राक्षसा’ची नख तोडायला आणि दात पाडायला काय हरकत आहे, एकमेकांच्या साथीनं ? माझ्या शेजारी एक छोटा मुलगा राहातो. तो रोज सकाळी, त्यान आदल्या दिवशी केलेला कचरा , कागदाचे कपटे, पेन्सिलीला टोक करतांना पडलेलं ’पील्‌’, खाल्लेल्या फळांची सालं, आपल्या अंगणातल्या एका खड्ड्यांत फेकतो आणि वरती थोडी माती नी पाणी टाकतो. कांही दिवसांनी तो त्यांत गांडुळं सोडणाराय्‌ म्हणे.. कुठून आली ही जागरूकता, जाणीव, पर्यावरण रक्षणाची ? आजकाल शाळेंत सग्गळ शिकवतांत.. पण.. झोपलेल्याला जागं करतां येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही हो !! या चित्राचा आणखी एक आयाम शोधायचाच म्हटला तर, ही ’मंडळी’ तेवढाच इंधनखर्च चक्क एक अष्टमांश असा वाटून घेणाराय्‌त ! एक की जगह आठ हो, तो कमही होगा खर्चा अलग अलग ना लेना होगा अब हर एक को पर्चा चलो... ले लेते है एक दूजे का साथ, हवा मे धुआ कम और सेहतकी बढेगी बात. सेहतकी बढेगी बात.

Monday, December 17, 2012

’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ”

सदर छायाचित्रांत एक आधुनिक वेशांतला ’साधू’ व्यथित मुद्रेनं उभा आहे.. ’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ***** जरि असला भगवा ’भेस’ । जटारूप बांधले केस । हिमालय हजारो कोस । दूर ! आम्हा ठावके ॥ जेंव्हा असू ज्या ज्या देशी । इमान राखू तिथल्या रीतिशी । प्रतिज्ञा मनोमनी ऐशी । केली असे ॥ इमारती मोठमोठ्या । लक्षवेधि मोहक पाट्या । चारचाकि नि दुचाकी छोट्या । जागोजागी भवताली ॥ कृतांतकटकामल ध्वजजरा । जडे जेंव्हा कोण्या नरा । त्यजण्यासि घरा दारा सहसा नसे धजावत ॥ शबनम एका बाहुवर । दुसरा घेइ छडीचा आधार । कालदर्शिका मनगटावर । भान देइ बदलाचे ॥ दाढी-मिशा स्वच्छ नि शुभ्र । तिच्या आड रुद्राक्ष शंभर । कांचामागे सचिंत नजर । संचित जणु वेदनेचे ? चित्त्याची झेप छातीवरी । जणू सांगते व्यथा भारी । तृष्णा, क्षुधा कोण वारी ? समस्त नर-नारी स्वमग्न ॥ निसर्गाचे लहरी चक्र । रक्षिण्या जराजर्जर गात्र । ’भात्यांत’ विराजमान ’छत्र’ । सज्ज असे सदैव ॥ जरी बावळा भाव दिसे । अंतरि कल्लोळ माजलासे । पालथि याने गांवकुसे । घातलि ’शांती’ शोधार्थ ॥ तपाची बदलली रूपे । नशा, व्यसन साधन सोपे । ’संधि’साधु, जनांमजि ’छुपे’ । माजले हो चहुकडे ॥ वास्तव्य असे कधिकाळी । त्यांचे दूर: एकांत स्थळी । जेथे न भेटे ’मांदियाळी । सामान्यांची ॥ प्रस्थान ठेविती हिमालया । कष्टविण्या पार्थीव काया । अध्यात्म-तत्वज्ञानाचा पाया । तपाचरणे शोधिती ॥ आज जागोजागी दिसती । सर्वदूर त्यांची वस्ती । हे कसले वत्स, वाल्मिकी, अगस्ती । फसवे ढोंगी लबाड ॥ जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज । पण समजे समाज । पक्षिराज त्यांना ॥ आजकाल आपल्या नांवां मागे साईं ,सन्यासी साधू ,बाबा,स्वामी,आचार्य,बापू,माँ,आनंद मूर्ती असल्या उपाधि लावून अध्यात्मांतले, तत्वज्ञानांतले आपण ’माहिर’ असल्याचे भासवून, कधी हातचलाखी तर कधी नजरबंदीच्या सहाय्यानं, भोळ्याभाबड्या अंधश्रद्ध भाविकांना हातोहात फसवून, त्यांच्या संसारांतील अडचणींवर मात करण्यांतली हताशा जोखून, मोठमोठ्या नगद रकमांसह पोबारा करण्याचे अनंत प्रकार चालू आहेत. अशा कित्येक (संधि)साधूंविरोधांत न्यायालयांत दावे दाखल होवून ’फसलेल्यां’ना न्याय मिळवून द्यायचे प्रयत्न सुद्धा ’जारी’ आहेत. आतां ते खटले किती दिवस चालणार, निकाल, भाविकांच्या बाजूनं लागले तरी अशांच्या (बरबटल्या) चरणी वाहिलेल्या रकमांपैकी किती परत मिळणार.. मिळणार की नाही, अशा असंख्य प्रष्णांची साखळी समोर आहेच ! अगदी मोठेमोठे राजकारणी, उद्योगपती, कलावंत, बुद्धिजीवीसुद्धा या ’माया-मोहजालां’त अलगद गुंतले, गुरफटले जातांत. कोळियाच्या व्यूहांत । अलगद किडे फसतांत । ’शोषित’ होवुनी परततांत । केविलवाणे, बिचारे ॥ कारण भीती ! सत्ता जाईल की काय, प्रतिस्पर्धी पुढे जाईल की काय, मी वादविवादांत हरेन की काय, माझं गाण, वाजवण, सर्वोच्च ठरलं नाहीतर ? सारखी भीती.. कविवर्य ’ग्रेस्‌’ तथा माणिअक गोडघाट्यांनी आपल्या एका कवितेंत.. जिला सिद्धहस्त संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी अत्यंत समर्पक स्वरावली बहाल केली आहे... आणि दिदींनी म्हणजे लताजींनी तिला आपला अद्वितीय स्वर देउन अजरामर केली आहे... ती कविता हे वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जाते, ’भय इथले संपत नाही..’ माणूस आहे तोवर महत्वाकांक्षा, हांव, गर्व, मत्सर, सूड भावना हे भीतीच्या पोटांतले विकार, विखार बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत, जसजसं वय वाढेल तसे ’पनपणार’च. आणि मग त्यांच्यावर उपाय सांगायच्या बहाण्याने त्यांना खतपाणी घालून, स्वत:चे गल्ले, झोळ्या भरणार्‍या ’साधु’ म्हणविणार्‍यांची रानं माजणारच... नाही कां ?

Tuesday, December 11, 2012

’माहुत असतो मनांत’

सदर चित्रांत, एक, जवळ जवळ ’डांस’ सदृश युवक, संरक्षणदलांतल्या निवडप्रक्रिये दरम्यान, वैद्यकीय चांचणीला सामोरा जातोय... ’माहुत असतो मनांत’ छातीचा पिंजरा पुढं, कणा ’धनुष्मान’ कशासाठी एवढ बाबा उसन अवसान ? जमेल तसा जमेल तिय्हं अंग’कांठी’ वक्र चेहेरे पे पढो तो.. रोजी-रोटी की है फ़िक्र मिळल बाबा काम, जाउन चार घास खा खोटं फुगवुन उर, असं फशिवता येतं कां ? तशी तर जिगर, ताकद नसतांतच बाहूंत जिद्दीच्या हत्तीचा, मनांतच असतो माहूत काळजांत फुलतो अंगार..वार करायचा वेधून स्नायूंना मग आदेश जातो ’वरून’.. मगजा मधून वार्‍याच्या वेगानं फ़िरायला हवेंत हात, बोजड शरीर कस करेल शत्रूवर मात ? तूप-रोटी खाउन उद्या झालो लठ्ठमुठ्ठ आळस म्हणेल ’बेट्या, दाखव शत्रूला पाठ.. !’ आणि सगळ्या कसोट्या उत्तीर्ण झाल्यावर, निवडपत्र मिळून, सेनेंत दाखल झाल्यावर, शत्रु समोर आल्यावर, नायकान, हल्लाबोल’ चा आदेश दिल्यावर सुद्धा, मनांत कुठलीही दुविधा न आणता कार्यप्रवण होण्या आधी, हृदयस्थ हरी, ना म्हणतो, ’लढ जा !’ जोवरि अर्जून कोणता उचलिल ’गांडिव’ स्वकरी भगवंत म्हणे वसतो मनि प्रत्येकाच्या ’ते’ देइल आज्ञा खेचण्यास प्रत्यंच्या कुंभकर्ण, आणिक बकासूर हारले शक्तीपेक्षाही ’त्यां’ युक्तीने जिंकिले एक कथा आठवली... मध्ययुगीन कालखंडांतली. राजा भोज नावाच्या एका पराक्रमी सम्राटाचं नांव बहुतेक सर्वांना परिचित आहे. त्याचीच ही गोष्ट. आतां राजा झाला तरी निसर्गदत्त केशसंभार, डोकीवरचा, चेहेर्‍यावरचा वाढणारच की हो !.. तेंव्हा तो वाढवायचा नसल्यास, म्हणजे त्या काळांत ऋषी, मुनी, साधू संत वगैरे ..म्हणजे कदाचित तपश्चर्येंतून वेळ न मिळाल्या मुळे दाढ्या मिशा, जटा वगैरे वाढवायचे.. ..आणि राजे महाराजे छान, अगदी वळणदार भांग वगैरे पाडून, गुळगुळींत दाढ्या वगैरे करून दरबारांत बसायचे. अर्थातं हे केश-संगोपन संवर्धन कर्तनाचं काम शाही.. म्हणजे ’सरकारनं नेमलेल्या ’नापिता’ कडे म्हणजे केश कर्तनकाराकडे असायचं पिढ्यान्‌पिढ्या ! असचं एकदा राजा भोजाचं केश कर्तनाच काम त्याचा नापित करत असतांना, चुकून वस्तरा गालाला लागून चक्क रक्त आलं आणि वेदनेनं राजाच्या तोंडून, ’स्स..’ असा उद्गार बाहेर पडला. नकळत नापित.. काय अवदसाआठवली त्याला झालं.. ’फिस्स’ करून हसला. राजानं गर्रकन वळून पृच्छा केली, ’का रे बाबा ? एवढ हसूं का आलं तुला ?’ प्रष्ण ऐकतांत नापिताची गाळण उडाली, पांचावर धारण बसून तो चाचरायला लागला. राजानं दरडावून परत विचारलं, ’बर्‍या बोलानं सांगतोस की चढवू सुळावर लेका ?’ महाराज तुम्ही एवढे शूर वीर लढवय्ये.. रणांगणावर शत्रूला कंठस्नान घालतांना शरीरावर एवढे घाव झेलता.. मग साधा वस्तरा जरासा लागल्यावर का दुखलं बॉ ? म्हून वाइच फिसकारलो सरकार ! राजानं हसून त्याला चुचकारलं आणि म्हणाला, ’ठीक आहे ! उद्या भेटू तेंव्हा उत्तर देतो.. ’ नापित सटकला तत्क्षणी, आजचा ’सूळ’ तरी टळला या आनंदांत ! दुसर्‍या दिवशी, राज्याच्या गर्भगृहांत नापित दाखल झाला. राजा भोजानं आल्याआल्या त्याच्या हातांत एक तरवार दिली आणि आपला दंड पुढे करून म्हणाला, ’ हं ! घाल ती तरवार माझ्या दंडांतून आरपार !’ कालचीच ’गाळण-कथा’पुनर्दृग्गोचर व्हायला लागली.. राजा म्हणाला ’करतोस सांगितल्या प्रमाणे की आधी फटके मारून नंतर सुळावर चढवू ?’ नाइलाजानं नापितानं तरवार चालविली.. दंड रक्तलांछित झाला पण राजाच्या चेहेर्‍यावर तसूभरही वेदना उमटली नाही की मुखांतून ती चित्कारली नाही. नापित घाबरून पाहायला लागला. राजानं त्याला हसून सांगितलं, ’काल माझ्या मनाची तयारी नव्हती ती वेदना सहन करण्याची. पण आज मन तयार आहे, कनखर करून दगड केलाय त्याचा.. आता कोणताही वार शरीरावर कुठेही झेलून मी सहन करू शकेन.. समजलं ?’ तेंव्हा.. ! सुज्ञास अधिक सांगणे न लगे ! *****

Wednesday, December 5, 2012

’वज्रमुष्टी..

सदर चित्रांत, एक छकुला एका मोठ्या घमेल्याची नाव करून ती खळाळत्या, ओढाळ नदीप्रवाहांत पैलतीराला वल्हवत न्यायच्या प्रयत्नांत आहे... ’वज्रमुष्टी..’ खूप वर्षांपूर्वी, बालचित्रवाणीत मी कार्यरत असतांना, बालकांचं भावविश्व शोधावं म्हणून त्यांच्या अंतरंगांत जावून, त्यांना अभ्यास शाळा, स्पर्धा-परीक्षा या बाबत काय वाटत असेल ? हे ताडण्यासाठी, त्यांतल्या काहींशी गप्पा मारल्या. अर्थात ही सगळी छोटी सेना मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू कुटुंबांतली होती.. रोज आईनं ह्नाऊ-माखू घालून, डाव्या हातांत चेहेर्‍याचे दोन्ही गाल धरून, उजव्या हातानं ओल्या केसांचा भांग पाडून, पाठीवर दफ्तर-बिफ्तर देवून, ’बालिस्तर’ व्हायला, शाळेंत धाडली जाणारी...त्याचा परिपाक म्हणून मी एक रचना केली.. एका हातांत खूप खाऊ, दुसर्‍या हातांत खेळणी मगच सुरू करू आम्ही अभ्यासाची बोलणी या रचनंतल्या शेवटचे दोन चरण होते.. म्हणून थोडी माया मिसळा दुधावरच्या सायींत नाइतर आमची ’यंत्र’ होतिल ’हुश्शार’ व्हायच्या घाईंत पण सोबतचं छायाचित्र बघितलं आणि खाडकन भानावर यायला झालं. तसं आम्ही बालचित्रवाणीसाठीच, भामरागडला जावून, डॉ. प्रकाश आमट्यांच्या प्राणिसंग्रहालय आणि लोकबिरादरीवर आधारित लघुपट तयार करतांना बघितलेलं एक दृश्य माझ्या मनांत नेहमीच रेंगाळत राहील. आम्ही राहात असलेल्या भामरागडच्या शासकीय विश्रामगृहांतून समोर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र यांच्या सीमा अधोरेखित करणार्‍या तीन नद्यांचा संगम दिसायचा. मुक्कामादिवशी रात्री झालेल्या वादळवारा, विजांचा कडकडांट, प्रलयंकारी वाटावा असा मेघांचा गडगडाटानंतर धुंवाधार कोसळलेल्या पावसानंतरची भीषण शांतता.. आणि दुसर्‍या दिवशी झुंजूमुंजू व्हायच्या आधी नदीच्या खळखळत्या पाण्यांत त्यातल्या त्यांत संथ शांत प्रवाहाची जागा शोधू्न....कारण जलचरांना सुद्धा शांत, संथ प्रवाहच आवडतो. खळाळ, ओढाळ, खट्याळ पाण्यांत ते हडबडतांत..तिथं येतांत आणि फसतांत मासेमार्‍यांचे, कोळ्यांचे बळी ठरतांत होतांत....चाळण्या, घरांतली चिरगुट घेवून मासे पकडणारी छोटीछोटी मुलं.. हसत खेळत, एकमेकांच्या खोड्या काढत, पाणी उडवत , कधी कुणाचा पाय ओढून त्याला गटांगळ्या खायला लावत त्या पाण्यांत हुंदडणारी... दिसली आम्हाला सकाळी विश्रामगृहाच्या व्हरांड्यांत बसून चहा पितांना ! कधी हा लघुपट पाहायचा योग आला तर तुम्हाला जाणवेल... कसलं सर्वशिक्षा आणि साक्षरता अभियानं, आनंददायी शिक्षण, बालसंगोपन, ज्ञानवृद्धी वगैरे संकल्पना ? सकाळ झाल्याबरोबर, रोज, पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:घराबाहेर पडतांना मुलांना बाहेर पिटाळायचं हेच फक्त पालकांना, ’ग्रामीण आणि आदिवासी, गिरिजन’ जनतेला माहीत आहे या देशांत. आणि मुलं पण असल्या जिण्याला निर्ढावली आहेत.. जशी शहरी भागांतली धनाढ्यांची मुलं गुन्हेगारीला निर्ढावलीत तशीच छायाचित्रांत त्या, पाठमोर्‍या, ’बिनधास्त’ छोट्याच्या कसबाचं, नाविक कौशल्याच्या प्रतिभेचं प्रतिबिंब, प्रवाहांत तर आहेच, पण त्याला सोबत म्हणून, पाठराखण करणार्‍या सवंगड्यासारखी त्याची सावली पण दिसते आहे. याला उत्तर मिळाली आहे.. निश्चित.. कारण ज्या अर्थी सावली उजव्या अंगाला आहे त्या अर्थी मावळतीचा सूर्य त्याच्या डाव्या अंगाला आहे आणि उत्तराभिमुख छकुला पाठमोरा आहे.. त्या मुळे अर्थातच ’उत्तर ’ आयुष्यातल्या कठिण, गहन प्रष्णांचं... त्याच्या समोर आहे खळाळत्या जळौघांला कापणारी वाट अगदी योग्य दिशेनं चालली आहे वल्ही धराया उभ्या वज्रमुष्टी क्षणार्थात जिंकेल हा सर्व सृष्टी घमेले जरी ’नांव’रूपास आले’ पैल गाठणे त्यांतुनी शक्य झाले प्रवाहा विरोधी शोधून मार्ग वक्र जगाचे सहजीच फिरवेल चक्र क्षिति वा न भीती न थकवा हातांना नावीक हा आदर्श बालकांना *****