Friday, August 26, 2011

’लता’, सचिन’, ’अवयवदान’, ’अतर्क्य-था’


’लता’
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
हे सगळं व्यक्त व्हायला मला कांही कुठल्या वाहिनीवरच्या कार्यक्रमाची गरज नाही !
****
’सचिन’
आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी ।
क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी  ?
ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा ।
पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥
त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र ।
’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥
***
’समीक्षा’
जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान ।
आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥
जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ ।
ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥
आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक ।
कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥
चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व ।
त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥
परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र ।
तोचि झिरपतो हृदयापर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ॥
****
’अवयवदान’
डॉ. लहान्यांनी, देशांतल्या दृष्टीहीनांची,  डोळ्यांची गरज आणि उपलब्ध दाते, यांच गणित कसं व्यस्त आहे, हे सांगितलं...पण ’डोळ्यांपेक्षा .’दृष्टी’ची गरज...डोळसांपैकी ९९% जनतेला विशेषत: राजकारणी, नेते, तथाकथित पुढार्‍यांना..कशी आहे हे सर्वज्ञात आहे. नाहीतर, माझी एक अम्ध मैत्रींण म्हणते त्या प्रमाणे,
          जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ?
          वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी
          जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’,
          दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी...
          भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही
          डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही...
                              अश्रूंनी भिजेल बाही
****
’अतर्क्य-था’
विंदाच्या कवितेतल्या सारखं
परत परत तेच तेच , मालिकांमधले डाव..पेच
याला मार, त्याला ठेच, ’कथा’ (?), (मालिका लांबविण्यासाठी) चहूबाजूंनी खेच...
गरीब गाय काशी ,तिची अचानक झाली ’झांशी’ (म्हणजे ’झांसा’ देणारी)
टीआर्‌पी साठी बाबा, तुझी दिसतिया कासाविशी...
****

 



Thursday, August 25, 2011

’व्यथा’, ’आषाढ,, ’शिवस्तुती’


’व्यथा...’
मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं
मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई
चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल
’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग
थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं
माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ
पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ
’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल..
यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं
****
आषाढातला महाराष्ट्र...
मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी
ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी
दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी
थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’
प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग
काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !!
****
’शिवस्तुती’
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली
गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया
मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला
या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला  

Wednesday, August 24, 2011

दु:ख आपल्या गाठीच बरी


सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी
सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत
सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ
आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई
हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर
जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर
दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसली भेगाळली रानं

’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !


’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !
परवा, समोर राहाणार्‍या, ज्येष्ठ लोक-कलाकार गुलाबबाई संगमनेरकर, माझ्या घराच्या,थोड्याथोडक्या नाही तर सदुसष्ठ पायर्‍या चढून, घरी आल्या. कशासाठी...तर त्यांच्याकडच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचं निमंत्रण देण्यासाठी ! परंपरेनं लाभलेली कलासमृद्धता स्वत:च्या मेहेनतीनं जोपासून, अनान्वित हाल-अपेष्टां सोसत, ’जगण्या’च्या सर्वच पातळ्यांवर अनुभवसमृद्ध झालेल्या या माउलीला हे सारं करायची काय गरज होती ?
बरं त्यांच्या मुलाकडे, रवीकडे माझा चलत्ध्वनिक्रमांक आहे. त्याचा माझ्याकडे आहे. दूरध्वनीवर किंवा ’संदेश’ देवून निमंत्रण देता आलं असतं ना . पण नाही. ह्या ज्येष्ठांना, सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणं केल्याशिवाय चैन पडत नाही. तिथं मग कुठलीही तडजोड त्यांना चालत नाही.
मुळांत सत्यनारायणाची पूजाबीजा हा आजकाल खूपच वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरला आहे असं माझं ठाम मत आहे. सगळ प्रामाणिकपणं निष्ठेनं, तळमळीनं करून सुद्धा अनेकांच्या पदरी अपयश येतं. आणि मग मंडळी ’पाहूया कांही होतो का चमत्कार, पूजाबीजा करून’ अंधश्राद्ध होतांत. त्यांत एखाद्याला ’कावळा बसायला...’ या म्हणीप्रमाणे, यश प्राप्ती होते नि मग ती बातमी कर्णोपकर्णी होवून, ’त्या’ दिशेने अविचारी धाव घेत सुटलेल्यांची संख्या वाढत जाते.
तुम्ही बारकाईन जर अपघातांच्या बातम्या वाचल्यांत, तर सहज लक्षांत येईल की देवदर्शनाला गाडीभर आप्तेष्ट, मित्रपरिवार वगैरे घेवून जातांना, किंवा परततांना हे अपघात विशेषत: चैत्रा महिन्यांत जत्रांच्या वेळी होतांत. कारण बेदरकार वागणूक, बेफाम वेग...सगळ, त्या मुळांत अस्तित्वातच नसलेल्या ’देव’ या भ्रामक संकल्पनेच्या भरवशानं करत असतांत ही मंडळी. ’देव तारी...’ ही म्हण बदलून ती आता ’ मणूसच मारी त्याला कोंण तारी ?’ अशी वापरली जायला हवी..
ज्ञानोब्बा, तुकोब्बा, गाडगेबाबा, बहिणाबाई पासून, मीरा कबीरा सूरदास अ‍ॅरिस्टॉटल्‌, सर्‌ बर्ट्रांड्‌ रसेल्‌पर्यंत सर्वांनी ’देव’ नावाच्या संकल्पनेच्या ’नसलेपणा’बद्दल किंवा असलाच तर तो आसपासच्या ’माणसां’तच ’हृदयस्थ असल्याची ग्वाही दिल्यानंतर सुद्धा, माणसं स्वत:च्या नाकर्तेपणाचं ’डस्ट्‌बिन्‌’ म्हणून ’देव’ किंवा ’दैव’ हे शब्द वापरत असतांत...
कोण देव ? काय देव ? नसलेपण एक नि अभाव
गंडेदोरेवाल्या बाबा बुवांची ’त्या’च्या नांवे कावकाव
जन्म-मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतरं
उत्पत्ती-स्थिती-विलय सारा शास्त्राचा प्रभावं...
काझ्या घरी माझा मुलगा सत्यनारायणाची पूजा करीत असतांना, मी आत संगणकावर, मनांतली ’खळबळ’ ठोकत’ बसलो होतो...
निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान..
              वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान...
’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते,
             शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते...
तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र,
             पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ?
पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं,
            लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं
इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज,
            सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज...
हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा,
           डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा...
बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं,
          ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं...
खुणावणारं निळं आभाळ, बाळ मुठीला काळी आई,
         कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई...
’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो,
        आप्त, सखा, सुहृद मित्र, फक्त गंमत पाहात असतो...
                           फक्त गंमत पाहात असतो...
अरुण काकतकर.

Monday, August 22, 2011

॥ॐ॥....अक्षर गणेश


॥ॐ॥....अक्षर गणेश
’ॐ नमोजि आद्या..’ अशी सुरुवात करून  ’भावार्थदीपिका’ या ग्रंथाच्या  पहिल्या ओवींत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ’माउलीं’नी, ’जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’ला पहील नमन जरी  केलं असलं तरी त्यांना पहिल ’अक्षर’ उच्चाराव लागलं ते म्हणजे ’महाप्राण’ असं ज्याचं वर्णन करतांत तो ’ॐ’.
’ॐ’..’गणपती’..’गजानन’..जो ईश सर्वा गुणांचा’..त्याचंच .अ-क्षर’ म्हणजे ज्याला ’क्षर’ किंवा विलय नाही असं रूप..अबालवृद्धांच्या उत्साहाचा, आनंदाचा स्रोत,  न्हाऊन-माखून, चेहेर्‍यावर अवखळ वार्‍यानं येणार्‍या बटा मागं सारणार्‍या परकर्‍या बालिकेपासून, एकपेडी वेणी मोठ्या डौलानं, मानेच्या झटक्यानं मागे फेकत चालणारी युवती, किंवा सुस्नात भाळावर,पिंजर घेवून तिची चंद्रकोर रेखणारी प्रौढा आणि अगदी ’कृतांतकटकामलध्वजजरा’ म्हणजे अनुभवसमृद्धीनं श्वेतवर्ण झालेल्या केसांचा छोटासा आंबाडा घालणार्‍या आज्जीबाईंपर्यंत सगळ्यांना लगबगीनं स्वागताच्या तयारीला उद्युक्त करणारी ’चैतन्यमूर्ती’...’ॐ गं गणपतये नम:’ अशी प्रार्थना सहजस्फूर्त, ओठांवर आणणारी देवता...
’पंचपंच उष:काली’ अंगणात सडासंमर्जन करतांना, नंतर त्यावर सुबक नाजुक, ठिपक्यांची रांगोळी चितारून तींत रंग भरतांना, साग्रसंगीत पूजेची तयारी करतांना, सजावट आणि आरास करण्यासाठी फुलांच्या माळा ओवतांना, एकीकडे प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची योजना करण्यांत गर्क , घरांतल्या स्त्रिया, तर केळी-कर्दळीचे खुंटे आणणे, ’पत्री’, आंब्याचा डहाळा, विड्याची पानं वगैरे आणण्यासाठी दुचाकीवर टांग मारत निघालेला पुरुषवर्ग...सगळ्यांच्याच मनांत हे ’वक्रतुंड महाकाय’ पण गोजिरवाणं रूपड, उर्जास्रोत होवून ’पायीच्या घागर्‍या’ रुणुझुणु वाजवीत नाचत असत.
’अ’कार चरण युगुल । ’उ’कार उदर विशाल । ’म’कार महामंडल । मस्तकाकारे ॥
मला या ’अक्षर’ गणेशांत नेहमीच जाणवत आलय की ’अ’कार म्हणजे स्थिती, ! भूमीवर, आपले दोनीही आंकडे नांगरा सारखे घट्ट रोवून ठोकलेली मांड. कुठल्याही कार्याला आवश्यक मजबूत पाया...’उ’कार, उदर, म्हणजे ऊर्जा स्रोत, सर्व ’गुणावगुणी’ घटकांना समर्थपणे पचवून, त्यांतल्या पोषक द्रव्यांना, रसांना कार्यसफलतेसाठी आवश्यक ’उर्जारूप’ देण्याच कार्य करंणारी यंत्रणा..आणि..’म’कार मस्तक म्हणजे, कार्यपूर्तीनंतरच्या निर्मितीला ’मंगल’दीप दाखवून ’सत्कारण’मार्ग दाखविण्यासाठी शरीरांतल्या उच्चतम स्तरावर निसर्गानं रचलेला ’नियंत्रक’, सुबुद्धीबीजावरण ! ’अ’कार किंवा ’उ’कार जेवढे मोकळे तेवढाच ’म’कार बंदिस्त...’अक्षरं’ नजरेसमोर आणा म्हणजे सहज ध्यानांत येईल...
गणनायक, सुखदायक, दुखवारक, बलसाधक
मूषकावरी मूर्ती, शुभंकर तु विश्वकीर्ति
तू दुर्वांकुरधारक,  क्लेश,वेदनाहारक
गणनायक....
सत्कर्माधार नित्य, दमन करी कृष्णकृत्य
शक्ति-बुद्धि-गुणवर्धक, सांबसुता प्रतिपालक
गणनायक...
श्रद्धेला ’दृष्टी’ दे, ’कार्यप्रवण वृत्ती दे
हो बापा, हो नायक, संकटांत पथदर्शक...
गणनायक...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com  

Sunday, August 21, 2011


कॉफी हाऊस्‌
’कॉफी हाउस‌, कॉफी हाउस‌..प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस’
शांताबाईं शेळक्याकडून, अश्याच कुठल्याशा गप्पांच्या मैफलीत ऐकलेला ’हायकू’...एक जपानी काव्य प्रकार ..
’हायकू’ म्हणजे क्मीत कमी शब्दांत, विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणार्‍या पंक्ती.
खरंच, ह्या नियमानं आपलं रोजचं जगण म्हणजे, विविधरंग घेवून येणार ’कॉफी हाउस्‌’च असतं की...
अगदी अंकुरण्यापासून, निर्वाणापर्यंत कितीतरी रंग...
सुख दु:खाचे, रागा लोभाचे, मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे...
घडण्या बिघडण्याचे, मीलनाचे, ताटातुटीचे, प्रेमाचे, विरहाचे
बघणारे डोळे आणि आणि त्यामागची ’नजर’, आणि त्याही मागच्या मनाची, त्या विशिष्ट वेळची धारणा...’Mood' म्हणू हवंतर...
यावरचं ठरतं त्या रंगांच गडद किंवा फिकेपण...नाही का ?
लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे
भानूच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे,
फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग...
दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे,
उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग...
तुमच्या माझ्यासारख्या, निसर्गानं पाहाण्याची संवेदना दान केलेल्या माणसांच ठीक आहे हो..
ह्या दृश्य ’रंगांच्या’, विविध ऋतूतल्या विविध ’रुपां’चा अनुभव घेवू शकतो आपण....
पण ज्यांच्या सगळ्या जाणिवा केवळ स्पर्श-रस-गंध-नाद या संवेदनांतच एकवटल्यांत, त्या आपल्या बांधवांचं काय ?
मी ’अंध’ हा शब्द मुद्दाम वापरत नाही...
कारण आपल्यापैकी प्रत्येक जण, आयुष्याच्या अनेक टप्प्यावर, अनेक क्षणी अगदी ’जाणतेपणी’सुद्धा, अंध-मूक-बधीर-संवेदनाहीन होतच असतो, या ना त्या कारणानं...
मग ’त्यांना’च फक्त ’दृष्टिहीन’ का म्हणायचं ?
आणि ज्यांना डोळे असतांत, त्यांना ’नजर’ किंवा ’दृष्टी’ असतेच असं कुठाय ?
आपण अनेकवेळा आपली मतं, धोरण, बाबींचा स्वत: अनुभव न घेता, त्या प्रत्यक्ष न पाहाता, ठरवीत असतोच ना...
’ते’.. सांगतांत म्हणून,.म्हणजे केवळ ऐकीव माहितीवर...बरोबर ?
मग माझ्या एका मैत्रीणीनं, ’मी टीव्हीचे कार्यक्रम बघते’, म्हटलं तर कुठे बिघडतं ?
’काय बघतेस गं परी तू ?’,
’पात्र एकमेकांशी बोलतांत ते ! ती घरांत हॉलमधे आहेत की स्वैपांकघरांत की बाहेर कुठे रस्त्यावर की ऑफिसमधे !
स्वत:शी की दुसर्‍या कोणाशी ! शब्दांनी न बोलतासुद्धा एकमेकाशी बोलतांत ती कधीकधी ! ते सऽऽगळ मी बधते अरुण ! आणि माझ्या बरोबर बघणार्‍यांचा आनंद, दु:ख, हसणं, हुंदके सगळ दिसत रे मला...’
शिवाय हिला, घरांतल्या, तिच्या खोलीच्या खिडकीशी हातांत, स्वत: केलेल्या वाफाळत्या कॉफीचा कप्‌ घेवून बाहेर ’बघतां’ना गडगडणारे ढग, कडाडणार्‍या विजा, श्रावण सरींतून मधेच येणारं आश्वासक ऊन...शाळेंतून परत आल्यावर दूधबीध पिऊन, ओठ फ्रॉकच्या बाहीनं पुसत, शेजारी, पैंजन वाजवत येणारी मिनी...मालकीण घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी, ’मिशू’...कमरेला लवलेला चांदी्च्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येवून, मिनीला हाक मा्रणारी तिची आई...सगळ दिसतं...
खिडकींतून, पावसांत खाली हुंदडणारी मुलं दिसतांत तिला,
एकदम वर आभाळाकडे बघत, ओरडत नाचायला सुरुवात करतांत ती...
’परी’पण वर ’बघते’...
आणि चक्क ’इंद्रधनुष्य’ दिसतं की हो तिला...
काय म्हणावं या पोरीला ? तिनं आम्हा, ’डोळस आहोत’ असा भ्रम असणार्‍यांना कधीचं, चारी मुंड्या चीत केलय जगण्याच्या मैदानांत
जगण्याच्या तिच्या ’कॉफी हाऊस्‌’मधल तिच ’टेबल्‌’, तिन बरोबर दरवाजा ’दिसेल’ अशा पद्धतीनं, ’अतिथिभिमुख’ निवडलय आणि खुर्चीचा कोन असा साधलाय की येणार्‍या जाणार्‍याचं, प्रसन्न मुद्रेनं स्वागत करताकरता ती, त्यांच्या भावविश्वांत हळूचं दाखल होवू शकेल...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
हवे ’न्यायराया’। दयामरण आता..॥ 
’हरीणीचे पाडस। व्याघ्रे धरीयेले। मजलागी जाहले ।.तैसे देवा ॥’
बेसावध क्षणी, तीक्ष्ण नखांच्या शक्तिशाली पंजांच्या तडाख्यांत सापडून, क्रूर कराल हिंस्र दाढांमधे अडकलेल्या, मायेच्या मातृस्पर्शापासून तुटल्यामुळं, आणि येणार्‍या मृत्यूची चाहूल लागल्या मुळे आक्रोश करणार्‍या पाडसाचा शेवटचा श्वास, व्याघ्रानं संपवेपर्यंतची अवस्था आणि, 
जराजर्जर, दुर्धर-व्याधिजर्जर, अशा अवस्थेंत अंथरुणाला खिळून राहाव लागत असल्यामुळं, सतत
’आपण कुणावर तरी, आपल्या निरुपयोगी, निरर्थक जगण्याचं ओझं लादतो आहोत’ 
या जाणिवेनं पोखरल्या जाणार्‍या मनाच्या यातना सहन करणार्‍या व्यक्तीची अवस्था...सारखीच... 
’विझवून दीप सारे, मी चाललो निजाया
आता अशाश्वताची, उरली मुळी न माया’ 
असं, बाकीबाब आपल्या कवितेत म्हणतांत ते ठीक आहे हो... 
पण स्वत:च्या पावलांनी, समाधीस्थळीच्या गुहेंत चालत जावून, कृतींतून, 
’उरली मुळी न माया’ सिद्ध करणारा एखादाच सिद्धयोगी, संत...’संत ज्ञानेश्वर’...
तुमच्या आमच्यासारख्या, रोज जगता जगता दिवेबिवे न विझवता, मरणच भोगणार्‍या माणसाला शक्य आहे हे ? 
समजा मनांत आलं आणि कोणी प्रयत्न केलाच, तर ’आत्महत्येच्या प्रयत्नाच ’कलम’ लावून, फौजदारी होवून, कुटुंबियांपासून तोडून, 
सद्यस्थितीतल्या यातना कमी की काय म्हणून, तुरुंगात खडी फोडायला पाठवतील....एवढा, योगगुरू ’बाबा’...लाठीमाराच्या आणि तुरुंगवासाच्या भीतीनं, मैदान सोडून 
शिष्यिणीची वस्त्र परिधान करून पळाला...
अनेक रुग्ण, वृद्ध आज ’दयामरणासाठी न्यायालयाचे दरवाजा ठोठावताहेत...
’गुजारिश’ पाहिलात ? ऋतिक-ऐश्वर्याचा ? त्यांत,  महामुश्किलीने घरी आलेल्या’न्यायासनाला, ऋतिक एक छान प्रयोग करून दाखवतो...
सरकारी वकिलाला, एका पेटार्‍यांत बंद करून, दहा-बारा मिनिटांनी बाहेर काढतो, आणि विचारतो...
’कैसे रही ?’..’पसीना पसीना’ झालेला वकील आवाक झालेला असतो...
’चंद पलोंमे आपका ये हाल है,,, फिर, मेरे लिये ये ’जीनेकी’ उम्र कैद क्यूं ?’
फक्त हृदयाचं स्पंदन चालू आहे म्हणून ’जिवंत’ असा, वैद्यकीय ’शाप’ मिळालेल्या जीवांच काय ?
'Life-support' काढा असं जोपर्यंत आप्त सांगत नाहीत, तो पर्यंत डॉक्टर जमातीचापण नाइलाज असतो...
पण आजकाल. अशा रुग्णांना ’मृत्यू’ बहाल करण्याची दया दाखवून, 
त्या पार्थीवांतले अनेक उपयुक्त अवयव, गरजू रुग्णांना दान करण्याची तयारी दर्शविणार्‍या 
विज्ञानाभिमुख आप्तांची संख्या वाढतेय्‌ ! या परतं दुसर सार्थक त्या थांबलेल्या जिण्याचं काय असू शकतं ?
महाभारतांत, म्हणे भीष्मपितामह, इच्छामरणी होते. त्यामुळं,’धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रा’च्या रणांगणावर, शरपंजरी पडून सुद्धा ते, योगेश्वर कृष्णाच्या हातून शेवटचा वार व्हावा म्हणून, मोक्षदानासाठी करुणा भाकत राहिले...
आणि तो अश्वत्थामा, ’चिरंजीव’पणाचा शाप, कपाळावरच्या भळभळा वाहाणार्‍या, जखमेच्या रूपान घेवून, ’कुणीतरी तेल घाला रे!’ म्हणत, युगानुयुग हिंडतोय...
आपल्यासारख्या सर्वसामान्यांना, हे दोनीही परवडणारं नाही...
आपण आपली, ’दयामरणासाठी’, न्यायासनाची करुणा भाकायची...
कधी कणव येईल त्याला, याची वाट बघत... 
आणि ’जन्मोत्सवा’सारखा, ’मरण-सोहळा’सुद्धा ’साजिरा-गोजिरा व्हावा म्हणून...
आप्तेष्टांना सांगत राहायचं...              
मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा,
दान करुनी पार्थीव, नेत्र , द्या मज मरणा, आयाम नवा
श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा
निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करतिल रवा रवा
आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी,
विरहाला विसरून तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा
येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक,
स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा 
                       स्वर म्हणजेच खरा धावा 
अरुण काकतकर.
24ak47@gmail.comचित्रदर्शी केवळ मूळ’अक्षरे’...
जॉन्‌ स्टाइनबेक्‌.. नांव ऐकलय ? प्रसिद्ध लेखक..ग्रेप्स्‌ ऑफ्‌ राथ्‌, ईस्ट्‌ ऑफ्‌ ईडन्‌ वगैरे पुस्तकांचा लेखक..
माझा, आधी शाळेतला आणि नंतर दूरदर्शनमधला मित्र विनय धुमाळे... 
त्यानं मला चांगली पुस्तक वाचायला देवून, माझ्यावर जे कांही वैचारिक ’सुसंस्करण’ झांल वाचनांतून... 
त्यातला थोडाफार भार त्याकाळांत नक्कीच उचलला...
त्यातलच एक ’Grapes of Wrath'...
शंभर एक वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतांतून, तिथले मूळ आदिवासी निग्रो Cotton-growers यांची हाकालपट्टी, अतिक्रमण करून गोर्‍यांनी सुरू केली...
का ? तर त्यांना तिथ सफरचंदांची शेती आणि डुकरांची पैदास करायची होती...
गरीब बिचार्‍या निग्रोंच्या त्या पीछेहाटीवर आधारित अशी ही अप्रतीम कादंबरी आहे...
हाताला लागली तर जरूर वाचा...भले वेळ लागला तरी चालेल, पण, मूळ इंग्रजी वाचा...
कारण...भाषांतरांत...’मूळ’ तत्व कुठेतरी हरवतं असं मला वाटतं...
उत्तम उदाहरण म्हणजे, ’एका कोळियाने’...
An oldman and the sea...' या अर्नेस्ट्‌ हेमिग्वेच्या, नोबेल्‌पुरस्कार विजेत्या, ’अक्षर’ शब्दाकृती मधल्या
युगानुयुग चाललेल्या, माणसाच्या अस्तित्वासाठीच्या झगड्याचा आणि एकुणातच... 
अवतीभवती सदासर्वकाळ घोंघावणार्‍या विनाशकारी वादळांशी, सृष्टीची चाललेली लढाई... 
हे वैश्विक सत्य...येईल कुठल्या भाषांतरांत ?
Rise and fall of third rische...मधला, गरिबीच्या धगींतून फुललेला सूडाचा अंगार, ज्यानं पुढं, दुसर महायुद्ध पेटवून, तीनचतुर्थांश जगाच्या सार्वभौमत्वाला चूड लावली त्यातल्या क्रोधगर्भ शब्दांच्या विखारी धारेचा अंत:प्रवाह, ’नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या ’भाषांतरांत कसा डोकावणार ?
Cocasiana chalk circle..चं ’अजब न्याय वर्तुळाचा’ झालं, ते कसंत्याला मी साक्षी होतो.
मी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या, ’अमृत नाट्य भारती’, या रंगभूमी प्रशिक्षण वर्गाला, ६८-६९ मधे मधून मधून जायचो. आणि, काय, बहुतेक तेंव्हाच, ’ब्रेश्त’ च्या ’कॉकेशिअन्‌ चॉ‍क्‌ सर्कल्‌’ च्या मराठी रूपांतराची,...’अजब न्याय वर्तुळाचा’च्या, मुंबई मराठी साहित्य संघातर्फे निर्मिती प्रक्रिया सुरू झाली होती. मी ’रूपांतर’ म्हटलं...’भषांतर’ नाही. कारण, जगांतल्या बहुतेक सर्व लोकभाषेंत परंपरेनं स्थित असलेल्या या लोककथेतला, न्याय’, ज्यावर ते नाटक आधारित होतं ते, आपल्या समृद्ध अनुभवानं आणि समर्थ लेखणीनं, मराठी मातीचा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुगंधी उटण-लेप लावून, सजवल होतं, सुप्रसिद्ध कविवर्य-लेखक आणि नाटककार कै. चिंतामण त्र्यंबक खानोलकर’आरतीप्रभू, यांनी.
साधा लेंगा,कुडता, खांद्यावर शबनम पिशवी
’नक्षत्रांची देणी’ ’हा’, अनवट काव्य-शिल्पातून भेटवी
सृजनला नसें ठिकाण नी नांव, गांव
या फाटक्या माणसाच्या ह्रदयातच रंगला शब्दरत्नांचा डाव
’आरतीप्रभू’ ? अं हं ! हा तर ’आर्ताचा चिंतामणी’
जणू, वैशाखाक्षरांना श्रृतींचे डोहाळे, लागावे ऐन श्रावणी 
अशी सोनसळी शब्दकळा, जपत जरतारी बासनांत
अखंड ’श्रीमंती’ जगला ’हा’, चंद्रमौळी घरांत  
जगण्याला अवेळी, झाकोळानं गाठलं
काळाच्या तळ्यांत, उलट उलट झाड, बुडत बुडत गेलं
१९७७ मधे,,युवदर्शन’साठी, पहिला. ’गीतसंध्या’ मी केला त्यासुमारास, बहुतेक के ई एम्‌ मधल्या रुग्णशैयेतच, त्यांनी लिहिलेली कविता, ’दिशादिशांतूनं घुमत राहावा,......मनमोराचा गर्द पिसारा...सागर तीरी...थकले पाऊल, परत फिरावे...आणि सरावा प्रवास सारा...’ 
त्या कवितेच छान गाणं झालं एक...आणि आताचा सुप्रसिद्ध गायक, सुरेश...सुरेश वाडकरनं, त्याचं ’दूरदर्शन’वरच पहिलं गाणं, म्हणून ते गायलं....
त्याचं ध्वनिमुद्रण, अजून आहे माझ्याकडे . हो...आणि त्यला स्वरसाज चढव्ला होता विवेक लागूनं...हो हो आपला लाडका अभिनेता विवेक. थोड विषयांतर झालं हे पण.....
आई आहे शेतांत , मातृका, पडघवली, गारंबीचा बापू...येतीलही किंवा आलीही असतील अभारतीय भाषेंत...
पण सांस्कृतिक पार्श्वभूमी, स्थळांची, घरांची, माणसांची ? त्यांचं काय ?
'Fiddler on the roof...’बिकट वाट वहिवाट...’च्या रूपानं...तात्या माडगुळकरांनी रंगमंचावर आणलं, ते सुद्धा आपल्या मातींत मळवून-घोळवून... 
श्रीकान्त मोघे, जितेन्द्र अभिषेकी, दिलिप प्रभावळकर...सगळेच कलामंडळातले देदीप्यमान तारे संबंधित होते या अप्रतिम मंचानुभवाशी...
आणि आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाशी साधर्म्य अनुभवत, रोजच्या जगण्याशी Relate करत प्रेक्षवर्गही त्यांत समरसून जायचा हे मी स्वत: पाह्यलय्‌, अनुभवलय्‌ !
तेंव्हा..
भाषांतरे रस अंतरे । जैसी जळातळी पांखरे । 
चित्रदर्शी मूळ’अक्षरे’ । केवळ, जाणा ॥
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com