Monday, October 22, 2012

’कर्म(?).. अंहं.. धर्मकांड..’

सदर छायाचित्रांत, एक द्विजद्वय, विमानतळावर एका वायुयानाच्या पंख्याखाली बसून पूजाअर्चा, होम हवनाची तयारी करीत आहे... ***** ’कर्म(?).. अंहं.. धर्मकांड..’ हे दोन व्युत्पन्न(?).. शंका आली कारण या वायुयानाच्या ज्या भागाखाली ते बसलेंत त्या पंखांमध्ये म्हणे लाखो लिटर्‌ इंधन..एव्हिएशन्‌ फ़्युएल्‌ साठविलेलं असतं, ’कोटिच्याकोटि उड्डाणे’ सहज श्यक्य व्हावी म्हणून.. आणि बहुतेक पूजेचा एक भाग म्हणून यज्ञ वगैरे करायचा, या जोडगोळीचा मानस असेल आणि त्यां यज्ञातली एक शलाका जरी तिथं गेली तरी अग्निदेवाचा प्रकोप होवून या दोघांना ’तिथं’ न्यायलासुद्धा हे वायुयान शिल्लक राहाणार नाही, याची कल्पना या दोघांना आली असती.... म्हणजे ते खरंच व्युत्पन्न वगैरे असते तर... शुभचिंतनासाठी कर्मकांड करायलाच हवीत ? मग देवपूजेला, नवरा-नवरीसकट वर्‍हाड घेवून जाता-येतांना रस्थावर एकमेकांशी धडकून, रेल्वे क्रॉसिंग्‌वर जीवघेण्या अपघातांना, अंधश्रद्ध ’भक्त’मंडळींना का सामोर जायला लागतं ? त्या नवपरिणित जोडप्याला बघून हृदयांतला आनंदकल्लोळ पांपणीकांठावर येवून थबकला तर तो शुभ चिंतनाला पुरेसा होत नाही ? निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान..               वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान... ’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते,              शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते... तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र,              पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ? पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं,             लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज, सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज... हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा,            डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा... बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं,           ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं... खुणावणारं निळं आभाळ, बाळमुठीला काळी आई,          कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई... ’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो,         आप्त, सखा, सुहृद, मित्र ...                            फक्त गंमत पाहात असतो..., फक्त गंमत पाहात असतो... एक अगदी गमतीशीर विचार.. पण उधृत विचारांना छेद देणारा... परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल जर साशंक असलांत तर खाली उधृत केलेला संवाद वाचा म्हनजे अश्रद्धांचे डोळे ’उघडतील’ आणि अंधश्रद्धांना दिलासा मिळेल कदाचित... भक्त: देवा मला तुला विचारायचय्‌.. देव: बोल वत्सा.. :तू चिडणार नाहीस ना ? :’देवा’शप्पथ नाही... :आज माझ्या ’रोजमराकी जिदगींत’ तू अनंत अडचणी का निर्माण केल्यास ? :म्हणजे.. :उशिरा उठलो मी.. :बरं..मग ? :गाडी चालूच होईना...t :ठीकै.. :जेवणांत मला करपलेली पोळी मिळाली :हं..हं.. :परत घरी जातांना, माझ्या चलत्ध्वनीचा ऊर्जास्रोत संपला :ठीक..पुढे.. :घरी पोचल्यावर, डोक्याला बाम लावावा म्हटलं तर, बाटली सापडेना..सकालपासून हे असं का घडवलस सगळं ? :हे बघ मित्रा, सकाळी तुझ्या उशाशी एक यमदूत उभा होता त्याच्याशी लढायला मला एक जीवनदूत पाठवायला लागला... :ओह ! :तुझ्या रोजच्या रस्त्यांत, एक पिऊन तर्र झालेला चालक होता . त्यानं तुला धडकूनये म्हणून मीच तुझी गाडी जरा उशिराच ’सोडली’... :(शरमिंदा) :तुझी पोळी ’पिकविणारा’ व्याधिग्रस्त होता म्हणून जिवजंतू ’दमनार्थ’ मीच करपवली..अहं..जरा जास्त भाजली पोळी.. :(वरमून) बरं... :अरे लेका तुला एक धमकीचा दूरध्वनी येणार होता म्हणून मी तुझं यंत्रच बंद पाडलं.. :(नम्रपणे) हं..हं.. :’मरावीमं’ कृपा माझ्या कृपेवर नेहमीच मात करते..तर ’त्या’ अवकृपेने वीज जाणार होती... बामच बोट चुकून डोळ्यांत गेलं असतं तर... म्हणून बा्टलीच गायब केली मी..मित्रा ! :माफ कर मला... :छे..छी माफी कशाला...फक्त माझ्यावर विश्वास ठेव...सगळ्या बर्‍या-वाइटावरसुद्धा....  :होय देवा...या पुढे नक्की...  :आणि तू ठरविलेल्या गोष्टींपेक्षा बरंच बरं मी तुझ्यासाठी योजत असतो यावरही विश्वास ठेव... :होय..होय, देवा ! आणि खूपखूप धन्यवाद, आभार आजच्या सुंदर दिवसाबद्दल.... :ठीकै रे...असाच एक दिवस भक्तांसाठीचा...विशेष कांऽऽही नाही... मला आवडत भक्तांना मदत करायला... क्या बात है... कितना बदल गया भगवान !!

Tuesday, October 16, 2012

माणुसकीच्या वारस

माणुसकीच्या वारस आम्ही दुजाभाव नाहिसा करू नव्या जगाच्या, शांतियुगाच्या शिल्पकारका ! सार्थ ठरू. . अणुरेणूंची अमोघ शक्ती नभगोलांची असीम दीप्ती ज्ञानाचे लावून पाश आम्हि, विश्वकारणा साध्य करूं शास्त्र-कलांचा सुरम्य संगम आम्ही घडवू जगति, विहंगम, समृद्धीची धरुन कांस ’लोकराज्य स्वप्न आम्हि साकारू, उक्ति आमुची व्यर्थ ना ठरो भावबंधना ना ’मनु’ विसरो आदिशक्तिला स्मरुनी भवती उन्नत्तीचे बिज पेरू

’तेजोगर्भा...

छायाचित्रांत तरुणींचा समूह पंचकर्माचं प्रशिक्षण घेत आहे. एका नाकपुडींतून झारीनं पाणी सोडून, दुसर्‍या नाकपुडींतून बाहेर सोडणे.. ’तेजोगर्भा...’ फालतूचे विचार टाळा, ठेवा मोकळ मन चांगलच ऐका, बघा, बोला, सजग ठेवा तन मोकळी फुफुसं, प्राणवायू, आरोग्या हितकारी अखेरीस Winner ठरतो, खरा निसर्गोपचारी दिनक्रमाची सुरुवात जर अशी पंचकर्मांकित सुदृढतेची अन्‌ शरीराची सहज जडेल प्रीत शिस्तीला नाही पर्याय, वाटचाली साठी उद्याच्या राष्ट्राला तुमची गरज मोठी... आपल्या शालेय अभ्यासक्रमांत शिकलेली, (बहुधा त्या वयांत अर्थ न कळतांच) पाठ सुद्धा केलेली, बहुतेक कविवर्य ’बालकवीं’ची हीसुप्रसिद्ध कविता अठवतेय ? ’कळी उमलली, जो न पावली पूर्ण विकासाला, यांतला दुसरा चरण, सद्य परिस्थितीच्या अनुषंगाने बदलून ’तोच तिजवरी अमानुषांचा पडला की घाला’ असा लिहावा अशी धारणा कुठल्याही संवेदनाशील ’माण्साला’ होणं स्वभाविक आहे. या काव्यपंक्ती आणि त्यांतलं विदारक सत्य जर खरंच इतिहासजमा करून गाडून टाकायचं असलं तर, छायाचित्रांतल्या, नुकत्यांच तारुण्यांत पदार्पण करून, आदर्श कन्या, पत्नी, माता अशा अनेकविध जबाबदार्‍या लीलया पार पाडायला निसर्गोपचाराचीचं कांस धरायला हवी ! हो की नाई ? मला सांगा तुमच्या माझ्या आई, आज्जी, आत्या, मावशी यांच्या काळी कुठं होती हो, Multispeciality Clinics वगैरे ? उठल्या-सुटल्या आणि माझी आई म्हणायची तसं, ’हागल्या-पादल्या’ औषध आणायला धावत सुटायला ? निभावल्याच ना त्यांनी सगळ्या जबाबदार्‍या यशस्वी रित्या ? त्याकाळी ’निसर्गोपचार’ या गोंडस नावाखाली कांही विशेष करायची सुद्धा गरज नाही पडली त्यांना. कारणं, ’रांधा(वाटा, लाटा ढवळा, घुसळा), वाढा(झाडा, सजवा, वाका, वळा), उष्टी काढा(सावडा, सारवा)’ या सगळ्या क्रियांमध्ये स्त्री-देहाच्या विविधांगांची होणारी हालचाल नुसती डोळ्यासमोर आणलींत तरी उमजेल तुम्हाला, ’कां ?’ ते ! शेती-मशागतीसाठी, नांगरटीसाठी ’बैल’ नावाच्या प्राण्याचा शोध लागेपर्यंत स्त्री-प्रधान संस्कृतींत, पुरुषमंडळीच खांद्यावर जूं पेलत कामाला लावली जात होती महिलावर्गाकडून त्या काळी.. दोनच ’कर्तव्यपूर्त्यार्थ’.. पहिलं म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे ’प्रजोत्पादनहेतु’ एक साधन ! त्याचाचं सूड म्हणून की काय, पुढील काळांत, ’पुरुष’ जमातीनं, स्त्रीला, स्वयंपाकघर, माजघर, देव्हारा, परस अशा जागांमधे बंदिवान करीत, वर उल्लेख केलेली ’कर्म’ करायला लावली हजारो वर्षं ! आणखी एक कहर म्हणजे, रजस्वला स्त्रीला अपवित्र मानत, स्वत:च्या शरीरांत, विविधठाई रक्त-मांस-विष्ठा-मूत्र-पित्त-वात, आणि मनाच्या विविध कप्प्यांत, विकृतीजनक वासना धारण करीत ’मिरविणार्‍या’, पूजापाठा आधी ’पवित्रक’ धारण अनिवार्य असलेल्या पुरुषवर्गानं, तिला मासिक रजोदर्शनकाळी धार्मिक (?) कार्यां पासून वंचित ठेवलं. अरे लेको, हे निसर्गदत्त लेणं जर स्त्री धारण न करती तर, तुम्ही त्या, ’महालक्ष्मी’नामक स्त्री-देवतेला लुगडी नेसवायला उत्पन्न तरी झाले असतांत कां ? पण आतां, विज्ञानाधिष्ठित शिक्षण घेवून. युगानुयुगं बंदिस्त, नाइलाजानं निद्रिस्त ठेवलेल्या आपल्या मनांना जाग आणत स्त्रीवर्ग, समानतेच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.. तेंव्हा सावधान पुरुष हो..ही गर्जना ऐका.. जाळा पोळा हाल करा तरि तेजोगर्भा आम्ही साम दाम दंड भेदुनी यश नेवू निजधामी पराक्रमाला आम्हा मोकळे गगन, हीच मर्यादा जन्मजात कौशल्यें वुहरू अणु-रेणूंतुन सुद्धा कुणी म्हणति जरि ’मुलगि झालि हो ! कां जगवावी हिला ?’ जळमट झटका, आणि विचारा ’जन्म तुला कुणि दिला ? आईच्या पोटांतच आम्ही बाळे सर्व समान ’बाळ’ असे ’मुलगी’, तर हाती गुणरत्नांची खाण रक्त सारखे सर्वांचे ? आणि श्रमाचा घाम ? बल, बुद्धी लावून ’पणा’, राहू शिखरावर ठाम पटविण्यास कां वेळ आम्हावर यावी ? हे दुर्दैव,, युगांयुगांतुन गाजवूनही गगनभेदि कर्तृत्व.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Monday, October 15, 2012

जय जगदंब

मातेश्वरी, परमेश्वरी, ज्ञानेश्वरी शुभदे, पांखर सदा सश्रद्ध या भक्तांवरी असु दे बघ आपदांची मोहळे, क्रुधश्वापदांची जणु दळे, संहार कर.. कर मोकळॆ, सान त्यांच्या आकांक्षा भवसागरी तरु दे तू प्रकाशाची वल्लरी, या तमप्रवाहा किनारी, पिडितांस जणु पंचाक्षरी, नाम जय जगदंब जप गंभीरसा घुमु दे शरणागतांना पाहुनी, करवीरग्रामी येउनी, झणि संकटा निर्दालुनी, ऊर्जांगिनी, बलदायिनी, तेजस्विनी दिसु दे