Wednesday, December 26, 2012

’जोहार मायबाप जोहार’

’जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार’ कां कुणास ठावकी पण नव्या वर्षाच्या नांदीचे चौघडे निनादायला लागायच्या सुमारास ह्या ओळींनी, अचानक माझ्या मनांत कां बरं काहूर माजवावं ? ’बालगंधर्व’ नारायणराव राजहंस, या संगीत रंगभूमी-सम्राटानं अजरामर करून ठेवलेलं पद..’कान्होपात्रा’ या नाटकांतलं (लेखक कै. नारायण विष्णू कुलकर्णी.. ज्यांचा महाजालांतल्या या नातकाच्या माहितीमध्ये कुठेही उल्लेख नाही पण विभानं ..देशपांडे.. माहिती पुरविली..). हे पद मी बर्‍याचवेळेला, नाट्यसंगीताच्या मैफलीच्या अखेरीस गातांना ऐकलय. आणि सुरावट सुद्धा करुण लागते कानाला. त्यामुळं ती भैरवी असावी किंवा कसे अशी शंका मनांत यायची. तसं सुद्धा कानाला सुखावून जाणारं गाणं, ’कुठल्या रागांतलं बॉ ?’ अशी पृच्छा चेहेर्‍यावर घेवून वावरणार्‍यांचा मला खॊप राग येतो. अरे लेको, आनंद घ्या की गाण्याचा.. कशाला त्या व्याकरणाच्या घनदाट जंगलांत घुसता ? पण आज मात्र या नव्या सदराचा प्रपंच मांडतांना, आपल्या किखाणांतून, जर कांही माहिती मिळणारचं असेल माझ्या, ’मायबाप’ वाचकांना तर ती श्यक्यतो अचूकच असायला हवी म्हणून मीही आज त्या ’जंगला’च्या परिघावरून आंत डॊकावून पाहायचं ठरवलं ! त्या साठी अर्थातच, कुणा अधिकारी व्यक्तीचं दार ठोठावणं आलच.. मग हक्काचं माणूस कोण ? डोळ्यापुढं एकच नांव आलं.. म्हणजे तशी बरीचं नावं असतील पण मी आपलं विचारलं, आनंदला.. आनंद भाटे...गळ्यांत जन्मजात गंधर्वस्वर घेवून आलेला.. ’आनंद गंधर्व’ ( याला आनंदगंधर्व म्हटल्या बरोब्बर, एका, निवासानं मुबैकर पण वृत्तीनं पुणेकर, प्रथितयश, पुरोगामीलक्षणधारीदेदीप्यमान साहित्यिकाच्या पोटांत काय दुखलं कुणास ठावे ? पुण्यातल्याच दुसर्‍या एका बालकलाकाराचं कौतुक करतांना त्यानं, ’पुण्यांत गल्लोगल्ली आतां गंधर्व दिसायला लागलेत..’ अशी कुजकट, दुगाणी झाडल्यागत, टिप्पणी, दिल्लींतल्या एका भाषणांत.. हे ध्वनिमुद्रण मी स्वत: ऐकलय हं.. केली, आणि स्वत:ची ’गल्ली’ संस्कृती चव्हाट्यावर मांडली... जे समोरून वार करू धजत नाहीत ते अशा दुगाण्या, मागच्या खुरांनी झाडतांत.. त्यांतून या गृहस्थांना अशा फुसकुल्या, नथींतले तीर वगैरे शस्त्रांचा उपयोग करून, हंशे ’वसूल’ करायची खोड होतीच... असो !) हो ! त्यानं दिलेल्या माहिती प्रमाणे,हा कलिंगडा+बिभास असा मिश्र राग आहे. मनांत परत एक विचार आला. म्हटलं, बापरे दोनदोन ’राग’ असूनसुद्धा, ज्याला जोहार घालायचा त्याचा, करभरणीच्या मोहोरा मोजायला विलंब लागल्यामुळं झालेला संताप, आलेला ’राग’ सुद्धा शमवील अशा शब्दांबरोबरच (रचना-संत चोखामेळा) अशी ही सुरावट देणार्‍या संगीतकारांचं (संगीत-मा.कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन) आणि त्या आर्जव भरल्या (भारल्या ?) गंधर्वकंठातून उमटलेल्या स्वरावलीचं सुद्धा कौतुक तुम्ही आम्ही बापडे काय करांवं ? गंमत म्हणजे संगणकीय महाजालावर..Internet.. या पदाच्या माहिती-आलेखामधे त्याची चाल ’लावणीची’ असल्याचं म्हटलं आहे. असेल असेल. कारण, तुम्ही पठ्ठे बापुरावांची मुंबईची लावणी, मूळ चालींत ऐका.. मी म्हणतो ते तुम्हाला पटतं की नाही ते पाहा ! मी स्वत: बालगंधर्वांना पाहिलय.. मुंबईला राम मारुती रोडवरच्या मालती बिल्डिंग.. मुकुंदनिवास मधे मी राहात असतांना.. त्यांना खुर्चीवरून उचलून आणलव‌त.. खाकी अर्धी चड्डी आणि खादीचा बंडीवजा अंगरखा.. डोकीचा तुळतुळींत गोटा.. गोंडस, निरागस, निर्व्याज, गोल गोबरा चेहेरा... डी. एल्‌. वैद्य रोड वरच्या ब्राह्मणसहायक संघाच्या.. आतां जिथं ’धन्वंतरी रुग्णालय आहे तिथं.. त्या दिवशी रामभाऊंच्या पंडित राम मराठ्यांच्या मुलांच्या मुंजी होत्या बहुतेक.. त्या सोहळ्याला उपस्थित राहाण्यासाठी आलेवव्‌ते ’ते’.. नुसतं पाहेलचं नाही तर गाणसुद्धा ऐकलं त्या दिवशी... त्या गलितगात्र अवस्थेंतकां होईना पण, कंठातला दैवदत्त, रियाजी स्वर थोडाच विरतो ? कंप पावला असेल कदाचित पण कंपन संख्या ? अं हं ती अबाधीतच राहिली होती ! तेंव्हा ते पद म्हटलं होतं त्यांनी, ’जोहार मायबाप जोहारं..’ तरी पण सुरुवातीलाचं, मायबाप वाचकांना जोहार घालतांना, या ओळी का दाटाव्यांतं माझ्या ओठांत ? कदाचित, माझा स्नेही आनंद.. आनंद अभ्यंकर आणि अभिनयाच्या क्षितिजावरचा उगवता तारा अक्षय.. यांना नियतीनं अकाली हे शब्द म्हणायला लावले म्हणून ? प्रत्येक खेपेस सुरुवातीला गुढ्या-तोरणंच उभारायला कशाला हवींत.. ज्यांनी आपल्याला अनंत सुखद क्षण बहाल करताकरता, मंचावरून Exit' घेतली.. त्यांच्या स्मृती अलवार जोजवत कां नाही करायची सुरुवात.. त्यांच्या आशीर्वादानं ?

Tuesday, December 25, 2012

अनंत मी, अवध्य मी..

अनंत मी, अवध्य मी.. मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे...

Wednesday, December 19, 2012

’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास..

सदर छायाचित्रांत एका ’मोटर्‌-बाइक्‌’ला, मागील बाजूस, खास, बहुसासनी व्यवस्था केलेली दिसतेय्‌... ’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास.. साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाता है मिलकर बोझ उठाना । आणि हे ’ओझ’, बोझ’, शब्दार्थानं, शब्दश: वजन गृहित धरू नका हं !. हे ’ओझ’ आहे जबाबदारीचं.. आपल्या सगळ्यांच्याच..आपल्या सगळ्यांनाच ’मोकळा’ श्वास घ्यायला मिळावा म्हणून... हवेच्या शुद्धतेचं भान राखायच्या जबाबदारीचं... ’बोझ’ न समझना ! ऐसा है, ना ’धुऑं’ हवा मे भरना कुठल्या राज्यांतल कुठला रस्ता आहे कुणास ठाऊक ? पण इतका सुरम्य, प्रदूषण विरहित, स्वच्छ परिसर, रस्ता, गुळगुळित अगदी ’गालिचा अंथरावा तसा, चक्क खड्डे नसलेला, शहरांतल्या बजबजपुरींत राहाणार्‍यांना अगदी हेवा वाटावा असा.. कारण ? चित्रांत स्पष्ट आहे.. वेगळ सांगायलाच नको, पार्श्वभागी जलाशय किंवा जलधी.. म्हणजे तलाव किंवा समुद्र सागराची पुळणी दिसते आहे. म्हणजे हे वाहन, अर्थातच डिझेल, इंधन म्हणून वापरणार ? अं हं ! ’मोटर-बाइक’लाच मागे ’बहु-आसनी’ व्यवस्था केलेली दिसतेय्‌ !.. बराच चढ चढून येतय्‌.. पण, मागे ’धुराच्या रेषा हवेंत सोडी’ त नाहिये ! आठ-नऊ माणसांना वाहण्यासाठी चार दुचाकी किंवा दोन चारचाकी... म्हणजे चित्रांत दिसणार्‍या एका स्वयंचलित वाहनाच्या ठिकाणी, चौपट किंवा किमान दुप्पट संख्या आणि पर्यायानं त्याच पटींत इंधन जाळून होणारा धूर.. आणि परिणाम ?.. आठजण आपाआपल्या इच्छित स्थळी आपलं ’इप्सित’ सिद्ध्यार्थ पोहोचणार. कविश्रेष्ठ गजानन, दिगंबर तथा अण्णा माद्डगुळकरांच्या, विश्वकीर्त ’गीतरामायण’ या महाकाव्यातलं ते गीत आठवतय ? ’सियावर रामचंद्र की जय.. !’ म्हणत, एकेक महाकाय प्रस्तर फोडून त्याचे झालेले छोटेछोटे शीलाखंड वाहून नेणार्‍या वानरसेनेला प्रोत्साहित करणारं, जणू कांही समर गीतच.. ’सेतू बांधारे सागरी.. सेतू बांधारे सागरी’ सहकाराने रावण मर्दुन, मोद भरू अंबरी किंवा गदिमांनीच, ’उमज पडेल तर’ या चित्रपटासाठी केलेली गीतरचना, सहकाराचा मूलमंत्र देणारी, किंवा ’वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ हे महाभारतांतलं, एकजुटीची महती विदित करणारं प्रसिद्ध वचन आग्रहानं मांडणारी शब्द रचना. नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी.. शब्द तेच पण संदर्भ वेगवेगळे. तिथं रावणवध हा हेतु होता, किंवा दुसर्‍या गीतांत ’हरी’ म्हणजे सत्य-शिव-सुंदराचं प्रतीकरूप... लौकिकार्थानं देव वगैरे... दर्शनासाठी, तर इथं चित्रसंदर्भानुसार, मंडळी प्रदूषणरूपी ’रावणा’चा अगदी त्यांच्याही नकळत संहार करतायत्‌ ! संहार नाही तरी त्या ’राक्षसा’ची नख तोडायला आणि दात पाडायला काय हरकत आहे, एकमेकांच्या साथीनं ? माझ्या शेजारी एक छोटा मुलगा राहातो. तो रोज सकाळी, त्यान आदल्या दिवशी केलेला कचरा , कागदाचे कपटे, पेन्सिलीला टोक करतांना पडलेलं ’पील्‌’, खाल्लेल्या फळांची सालं, आपल्या अंगणातल्या एका खड्ड्यांत फेकतो आणि वरती थोडी माती नी पाणी टाकतो. कांही दिवसांनी तो त्यांत गांडुळं सोडणाराय्‌ म्हणे.. कुठून आली ही जागरूकता, जाणीव, पर्यावरण रक्षणाची ? आजकाल शाळेंत सग्गळ शिकवतांत.. पण.. झोपलेल्याला जागं करतां येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही हो !! या चित्राचा आणखी एक आयाम शोधायचाच म्हटला तर, ही ’मंडळी’ तेवढाच इंधनखर्च चक्क एक अष्टमांश असा वाटून घेणाराय्‌त ! एक की जगह आठ हो, तो कमही होगा खर्चा अलग अलग ना लेना होगा अब हर एक को पर्चा चलो... ले लेते है एक दूजे का साथ, हवा मे धुआ कम और सेहतकी बढेगी बात. सेहतकी बढेगी बात.

Monday, December 17, 2012

’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ”

सदर छायाचित्रांत एक आधुनिक वेशांतला ’साधू’ व्यथित मुद्रेनं उभा आहे.. ’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ***** जरि असला भगवा ’भेस’ । जटारूप बांधले केस । हिमालय हजारो कोस । दूर ! आम्हा ठावके ॥ जेंव्हा असू ज्या ज्या देशी । इमान राखू तिथल्या रीतिशी । प्रतिज्ञा मनोमनी ऐशी । केली असे ॥ इमारती मोठमोठ्या । लक्षवेधि मोहक पाट्या । चारचाकि नि दुचाकी छोट्या । जागोजागी भवताली ॥ कृतांतकटकामल ध्वजजरा । जडे जेंव्हा कोण्या नरा । त्यजण्यासि घरा दारा सहसा नसे धजावत ॥ शबनम एका बाहुवर । दुसरा घेइ छडीचा आधार । कालदर्शिका मनगटावर । भान देइ बदलाचे ॥ दाढी-मिशा स्वच्छ नि शुभ्र । तिच्या आड रुद्राक्ष शंभर । कांचामागे सचिंत नजर । संचित जणु वेदनेचे ? चित्त्याची झेप छातीवरी । जणू सांगते व्यथा भारी । तृष्णा, क्षुधा कोण वारी ? समस्त नर-नारी स्वमग्न ॥ निसर्गाचे लहरी चक्र । रक्षिण्या जराजर्जर गात्र । ’भात्यांत’ विराजमान ’छत्र’ । सज्ज असे सदैव ॥ जरी बावळा भाव दिसे । अंतरि कल्लोळ माजलासे । पालथि याने गांवकुसे । घातलि ’शांती’ शोधार्थ ॥ तपाची बदलली रूपे । नशा, व्यसन साधन सोपे । ’संधि’साधु, जनांमजि ’छुपे’ । माजले हो चहुकडे ॥ वास्तव्य असे कधिकाळी । त्यांचे दूर: एकांत स्थळी । जेथे न भेटे ’मांदियाळी । सामान्यांची ॥ प्रस्थान ठेविती हिमालया । कष्टविण्या पार्थीव काया । अध्यात्म-तत्वज्ञानाचा पाया । तपाचरणे शोधिती ॥ आज जागोजागी दिसती । सर्वदूर त्यांची वस्ती । हे कसले वत्स, वाल्मिकी, अगस्ती । फसवे ढोंगी लबाड ॥ जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज । पण समजे समाज । पक्षिराज त्यांना ॥ आजकाल आपल्या नांवां मागे साईं ,सन्यासी साधू ,बाबा,स्वामी,आचार्य,बापू,माँ,आनंद मूर्ती असल्या उपाधि लावून अध्यात्मांतले, तत्वज्ञानांतले आपण ’माहिर’ असल्याचे भासवून, कधी हातचलाखी तर कधी नजरबंदीच्या सहाय्यानं, भोळ्याभाबड्या अंधश्रद्ध भाविकांना हातोहात फसवून, त्यांच्या संसारांतील अडचणींवर मात करण्यांतली हताशा जोखून, मोठमोठ्या नगद रकमांसह पोबारा करण्याचे अनंत प्रकार चालू आहेत. अशा कित्येक (संधि)साधूंविरोधांत न्यायालयांत दावे दाखल होवून ’फसलेल्यां’ना न्याय मिळवून द्यायचे प्रयत्न सुद्धा ’जारी’ आहेत. आतां ते खटले किती दिवस चालणार, निकाल, भाविकांच्या बाजूनं लागले तरी अशांच्या (बरबटल्या) चरणी वाहिलेल्या रकमांपैकी किती परत मिळणार.. मिळणार की नाही, अशा असंख्य प्रष्णांची साखळी समोर आहेच ! अगदी मोठेमोठे राजकारणी, उद्योगपती, कलावंत, बुद्धिजीवीसुद्धा या ’माया-मोहजालां’त अलगद गुंतले, गुरफटले जातांत. कोळियाच्या व्यूहांत । अलगद किडे फसतांत । ’शोषित’ होवुनी परततांत । केविलवाणे, बिचारे ॥ कारण भीती ! सत्ता जाईल की काय, प्रतिस्पर्धी पुढे जाईल की काय, मी वादविवादांत हरेन की काय, माझं गाण, वाजवण, सर्वोच्च ठरलं नाहीतर ? सारखी भीती.. कविवर्य ’ग्रेस्‌’ तथा माणिअक गोडघाट्यांनी आपल्या एका कवितेंत.. जिला सिद्धहस्त संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी अत्यंत समर्पक स्वरावली बहाल केली आहे... आणि दिदींनी म्हणजे लताजींनी तिला आपला अद्वितीय स्वर देउन अजरामर केली आहे... ती कविता हे वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जाते, ’भय इथले संपत नाही..’ माणूस आहे तोवर महत्वाकांक्षा, हांव, गर्व, मत्सर, सूड भावना हे भीतीच्या पोटांतले विकार, विखार बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत, जसजसं वय वाढेल तसे ’पनपणार’च. आणि मग त्यांच्यावर उपाय सांगायच्या बहाण्याने त्यांना खतपाणी घालून, स्वत:चे गल्ले, झोळ्या भरणार्‍या ’साधु’ म्हणविणार्‍यांची रानं माजणारच... नाही कां ?

Tuesday, December 11, 2012

’माहुत असतो मनांत’

सदर चित्रांत, एक, जवळ जवळ ’डांस’ सदृश युवक, संरक्षणदलांतल्या निवडप्रक्रिये दरम्यान, वैद्यकीय चांचणीला सामोरा जातोय... ’माहुत असतो मनांत’ छातीचा पिंजरा पुढं, कणा ’धनुष्मान’ कशासाठी एवढ बाबा उसन अवसान ? जमेल तसा जमेल तिय्हं अंग’कांठी’ वक्र चेहेरे पे पढो तो.. रोजी-रोटी की है फ़िक्र मिळल बाबा काम, जाउन चार घास खा खोटं फुगवुन उर, असं फशिवता येतं कां ? तशी तर जिगर, ताकद नसतांतच बाहूंत जिद्दीच्या हत्तीचा, मनांतच असतो माहूत काळजांत फुलतो अंगार..वार करायचा वेधून स्नायूंना मग आदेश जातो ’वरून’.. मगजा मधून वार्‍याच्या वेगानं फ़िरायला हवेंत हात, बोजड शरीर कस करेल शत्रूवर मात ? तूप-रोटी खाउन उद्या झालो लठ्ठमुठ्ठ आळस म्हणेल ’बेट्या, दाखव शत्रूला पाठ.. !’ आणि सगळ्या कसोट्या उत्तीर्ण झाल्यावर, निवडपत्र मिळून, सेनेंत दाखल झाल्यावर, शत्रु समोर आल्यावर, नायकान, हल्लाबोल’ चा आदेश दिल्यावर सुद्धा, मनांत कुठलीही दुविधा न आणता कार्यप्रवण होण्या आधी, हृदयस्थ हरी, ना म्हणतो, ’लढ जा !’ जोवरि अर्जून कोणता उचलिल ’गांडिव’ स्वकरी भगवंत म्हणे वसतो मनि प्रत्येकाच्या ’ते’ देइल आज्ञा खेचण्यास प्रत्यंच्या कुंभकर्ण, आणिक बकासूर हारले शक्तीपेक्षाही ’त्यां’ युक्तीने जिंकिले एक कथा आठवली... मध्ययुगीन कालखंडांतली. राजा भोज नावाच्या एका पराक्रमी सम्राटाचं नांव बहुतेक सर्वांना परिचित आहे. त्याचीच ही गोष्ट. आतां राजा झाला तरी निसर्गदत्त केशसंभार, डोकीवरचा, चेहेर्‍यावरचा वाढणारच की हो !.. तेंव्हा तो वाढवायचा नसल्यास, म्हणजे त्या काळांत ऋषी, मुनी, साधू संत वगैरे ..म्हणजे कदाचित तपश्चर्येंतून वेळ न मिळाल्या मुळे दाढ्या मिशा, जटा वगैरे वाढवायचे.. ..आणि राजे महाराजे छान, अगदी वळणदार भांग वगैरे पाडून, गुळगुळींत दाढ्या वगैरे करून दरबारांत बसायचे. अर्थातं हे केश-संगोपन संवर्धन कर्तनाचं काम शाही.. म्हणजे ’सरकारनं नेमलेल्या ’नापिता’ कडे म्हणजे केश कर्तनकाराकडे असायचं पिढ्यान्‌पिढ्या ! असचं एकदा राजा भोजाचं केश कर्तनाच काम त्याचा नापित करत असतांना, चुकून वस्तरा गालाला लागून चक्क रक्त आलं आणि वेदनेनं राजाच्या तोंडून, ’स्स..’ असा उद्गार बाहेर पडला. नकळत नापित.. काय अवदसाआठवली त्याला झालं.. ’फिस्स’ करून हसला. राजानं गर्रकन वळून पृच्छा केली, ’का रे बाबा ? एवढ हसूं का आलं तुला ?’ प्रष्ण ऐकतांत नापिताची गाळण उडाली, पांचावर धारण बसून तो चाचरायला लागला. राजानं दरडावून परत विचारलं, ’बर्‍या बोलानं सांगतोस की चढवू सुळावर लेका ?’ महाराज तुम्ही एवढे शूर वीर लढवय्ये.. रणांगणावर शत्रूला कंठस्नान घालतांना शरीरावर एवढे घाव झेलता.. मग साधा वस्तरा जरासा लागल्यावर का दुखलं बॉ ? म्हून वाइच फिसकारलो सरकार ! राजानं हसून त्याला चुचकारलं आणि म्हणाला, ’ठीक आहे ! उद्या भेटू तेंव्हा उत्तर देतो.. ’ नापित सटकला तत्क्षणी, आजचा ’सूळ’ तरी टळला या आनंदांत ! दुसर्‍या दिवशी, राज्याच्या गर्भगृहांत नापित दाखल झाला. राजा भोजानं आल्याआल्या त्याच्या हातांत एक तरवार दिली आणि आपला दंड पुढे करून म्हणाला, ’ हं ! घाल ती तरवार माझ्या दंडांतून आरपार !’ कालचीच ’गाळण-कथा’पुनर्दृग्गोचर व्हायला लागली.. राजा म्हणाला ’करतोस सांगितल्या प्रमाणे की आधी फटके मारून नंतर सुळावर चढवू ?’ नाइलाजानं नापितानं तरवार चालविली.. दंड रक्तलांछित झाला पण राजाच्या चेहेर्‍यावर तसूभरही वेदना उमटली नाही की मुखांतून ती चित्कारली नाही. नापित घाबरून पाहायला लागला. राजानं त्याला हसून सांगितलं, ’काल माझ्या मनाची तयारी नव्हती ती वेदना सहन करण्याची. पण आज मन तयार आहे, कनखर करून दगड केलाय त्याचा.. आता कोणताही वार शरीरावर कुठेही झेलून मी सहन करू शकेन.. समजलं ?’ तेंव्हा.. ! सुज्ञास अधिक सांगणे न लगे ! *****

Wednesday, December 5, 2012

’वज्रमुष्टी..

सदर चित्रांत, एक छकुला एका मोठ्या घमेल्याची नाव करून ती खळाळत्या, ओढाळ नदीप्रवाहांत पैलतीराला वल्हवत न्यायच्या प्रयत्नांत आहे... ’वज्रमुष्टी..’ खूप वर्षांपूर्वी, बालचित्रवाणीत मी कार्यरत असतांना, बालकांचं भावविश्व शोधावं म्हणून त्यांच्या अंतरंगांत जावून, त्यांना अभ्यास शाळा, स्पर्धा-परीक्षा या बाबत काय वाटत असेल ? हे ताडण्यासाठी, त्यांतल्या काहींशी गप्पा मारल्या. अर्थात ही सगळी छोटी सेना मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू कुटुंबांतली होती.. रोज आईनं ह्नाऊ-माखू घालून, डाव्या हातांत चेहेर्‍याचे दोन्ही गाल धरून, उजव्या हातानं ओल्या केसांचा भांग पाडून, पाठीवर दफ्तर-बिफ्तर देवून, ’बालिस्तर’ व्हायला, शाळेंत धाडली जाणारी...त्याचा परिपाक म्हणून मी एक रचना केली.. एका हातांत खूप खाऊ, दुसर्‍या हातांत खेळणी मगच सुरू करू आम्ही अभ्यासाची बोलणी या रचनंतल्या शेवटचे दोन चरण होते.. म्हणून थोडी माया मिसळा दुधावरच्या सायींत नाइतर आमची ’यंत्र’ होतिल ’हुश्शार’ व्हायच्या घाईंत पण सोबतचं छायाचित्र बघितलं आणि खाडकन भानावर यायला झालं. तसं आम्ही बालचित्रवाणीसाठीच, भामरागडला जावून, डॉ. प्रकाश आमट्यांच्या प्राणिसंग्रहालय आणि लोकबिरादरीवर आधारित लघुपट तयार करतांना बघितलेलं एक दृश्य माझ्या मनांत नेहमीच रेंगाळत राहील. आम्ही राहात असलेल्या भामरागडच्या शासकीय विश्रामगृहांतून समोर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र यांच्या सीमा अधोरेखित करणार्‍या तीन नद्यांचा संगम दिसायचा. मुक्कामादिवशी रात्री झालेल्या वादळवारा, विजांचा कडकडांट, प्रलयंकारी वाटावा असा मेघांचा गडगडाटानंतर धुंवाधार कोसळलेल्या पावसानंतरची भीषण शांतता.. आणि दुसर्‍या दिवशी झुंजूमुंजू व्हायच्या आधी नदीच्या खळखळत्या पाण्यांत त्यातल्या त्यांत संथ शांत प्रवाहाची जागा शोधू्न....कारण जलचरांना सुद्धा शांत, संथ प्रवाहच आवडतो. खळाळ, ओढाळ, खट्याळ पाण्यांत ते हडबडतांत..तिथं येतांत आणि फसतांत मासेमार्‍यांचे, कोळ्यांचे बळी ठरतांत होतांत....चाळण्या, घरांतली चिरगुट घेवून मासे पकडणारी छोटीछोटी मुलं.. हसत खेळत, एकमेकांच्या खोड्या काढत, पाणी उडवत , कधी कुणाचा पाय ओढून त्याला गटांगळ्या खायला लावत त्या पाण्यांत हुंदडणारी... दिसली आम्हाला सकाळी विश्रामगृहाच्या व्हरांड्यांत बसून चहा पितांना ! कधी हा लघुपट पाहायचा योग आला तर तुम्हाला जाणवेल... कसलं सर्वशिक्षा आणि साक्षरता अभियानं, आनंददायी शिक्षण, बालसंगोपन, ज्ञानवृद्धी वगैरे संकल्पना ? सकाळ झाल्याबरोबर, रोज, पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:घराबाहेर पडतांना मुलांना बाहेर पिटाळायचं हेच फक्त पालकांना, ’ग्रामीण आणि आदिवासी, गिरिजन’ जनतेला माहीत आहे या देशांत. आणि मुलं पण असल्या जिण्याला निर्ढावली आहेत.. जशी शहरी भागांतली धनाढ्यांची मुलं गुन्हेगारीला निर्ढावलीत तशीच छायाचित्रांत त्या, पाठमोर्‍या, ’बिनधास्त’ छोट्याच्या कसबाचं, नाविक कौशल्याच्या प्रतिभेचं प्रतिबिंब, प्रवाहांत तर आहेच, पण त्याला सोबत म्हणून, पाठराखण करणार्‍या सवंगड्यासारखी त्याची सावली पण दिसते आहे. याला उत्तर मिळाली आहे.. निश्चित.. कारण ज्या अर्थी सावली उजव्या अंगाला आहे त्या अर्थी मावळतीचा सूर्य त्याच्या डाव्या अंगाला आहे आणि उत्तराभिमुख छकुला पाठमोरा आहे.. त्या मुळे अर्थातच ’उत्तर ’ आयुष्यातल्या कठिण, गहन प्रष्णांचं... त्याच्या समोर आहे खळाळत्या जळौघांला कापणारी वाट अगदी योग्य दिशेनं चालली आहे वल्ही धराया उभ्या वज्रमुष्टी क्षणार्थात जिंकेल हा सर्व सृष्टी घमेले जरी ’नांव’रूपास आले’ पैल गाठणे त्यांतुनी शक्य झाले प्रवाहा विरोधी शोधून मार्ग वक्र जगाचे सहजीच फिरवेल चक्र क्षिति वा न भीती न थकवा हातांना नावीक हा आदर्श बालकांना *****

Thursday, November 29, 2012

’तव राहो नेहमिच ताठ कणा..

सदर छायाचित्रांत एक कष्टकरी, डोक्यावर चक्क एक मोटर्‌साय्‌कल वाहून नेतोय.. मजुरीसाठी... ’तव राहो नेहमिच ताठ कणा..’ रे अजून थोडे साहि तना, श्रमल्यावाचुन नाही प्राप्ती, दारिद्र्यांतुन नाही मुक्ती, जीवन परिघा नाही व्याप्ती नशिब घडव, घालून घणा... तिजवर सारे नेहमिच ’स्वार’, आजार ’तिला’ ? मग ’हे’ बेजार, टाकिति ’बोजा’ तुझ्या शिरावर, हा धनिकांचा रे ’चतुरपणा... तुला निरंतर स्मरेल रे ’ती, यंत्रांनाही असते रीती, सचेत करिती ’निर्जिव’ नाती, ’तिज’पाशि खरा ’माणूस’पणा पाहाणारे वाकून पाहती, ’बोजा’ला वचकून राहती, दयार्द्र कटाक्ष नाहि तुजप्रती’ तव राहो नेहमिच ताठ कणा... छायाचित्र बघितल्याबरोबर, मला ’बाकीबाब’ बा. भ. बोरकरांची ती सुप्रसिद्ध ’जीवनदर्शी’, वास्तवाचं भान देणारी, सुस्त जनांच्या मनाला खडबडून जाग करणारी रचना आठवली... रे अजून थॊडे सोस मना प्रसव वेदनांविण ना सृष्टी, तपनावाचुन नाही वृष्टी, दु:खाविण ना जीवन दृष्टी मेल्याविण मिळला स्वर्ग कुणा ? रे अजून... आणि तो घाट वापरत छायाचित्रांतल्या वास्तवच्या ’विस्तवा’ झळा शब्दांकित करत मांडायचा मोह आवरला नाही ! असली, लौकिकार्थानं ’हलकी’ (?) काम करणार्‍यांबद्दल पांढरपेशांचा एक नेहमीचा प्रश्ण, तुच्छतेच्या तिरक्या कटाक्षासह असतो.. ’कौन है बे तू ?’ त्यांना या कष्टकरी जिवाचं हे उत्तर तर नसेल ? ’तुम्ही कोण ?’ म्हणून काय पुसता, नाही आम्ही कोणिही पोटासाठि अतर्क्य कर्म असले ’हट्‌ के’ करू कांहिही ’तुम्ही कोण ?’ म्हणून नजरा वळवू नका वाकड्या ’आम्हा’विण नेहमीच ठरतिल तुमच्या, धनराशी तोकड्या ’तुम्ही कोण ?’ म्हणोनि करु नका हर घडी ’बेदखल’ तुम्हा अमृत देवुनी पचवितो आम्हीच हो हलाहल आणि असली दृश्य पाहायची सवय नसलेल्या नजरांना, हे, त्यांच्या परिचित आश्चर्यांमधली भर वाटेल कदाचित ! पण म्हणतांत ना, ’मरता न क्या करतां ?’ मेरू पर्वत मुंगीनं गिळला, डोइवर चढली दोन-चाकी सागर सारा आटून गेला, घामांतच राहिलं मीठ ’बाकी’, उचलायाच होवी ही ’नखरेल नार’, जरि खायला कहार अन्‌ भुईला भार फुटक्या नांवेतलं पाणी उपशित, पार कराया होवी ना ओढाळ धार ? दुनियेला आनंद कदाचित, ’गिनीज्‌’मध्ये एक आणखी भर गोरगरिबाला काय हो त्याचं ? एका दिसाची सुटली भाकर ’चवल्या पायजेत ? तर कर बाबा ह्ये !’ म्हने मालक रामप्रहराले, ओझं जिण्याचं वागवित चालणं, किती दीस आमच्या नशिबाले ? तक्रार करणार कुणा कडे ? सरकारास्नि कुठला येळ सारे नेते येतिल लोळत, ’तेंव्हा’ मतांशि घालाया मेळ कुणाला पडलिये चिंता आमची ? हर आमआदमी भई है व्यस्त, पेट्यांच्या, खोक्यांच्या चळती मोजत, दादा भाई सदा नशेंत मस्त आणि राजकारणातल्या ’मांडवली’ करंयासाठी, ’तू थोडं मार, मग मी गोंजारतो’ या सत्ताधारी आणि विरोधकांच्या जीवघेण्या खेळांतला ’बंद’ हा एक हुकमाचा एक्का.. त्यांनाही विनंती करावीच लागते दरिद्री नारायणांना.. हरदम.. नका करू बंदबिंद आम्ही जगायचं कसं ? हातावरच्या पोटाल समजावावं कसं ? नका करू बंदबिंद कशी कमवायची रोटी ? तेल, मीठ कसं न्यायच कच्याबच्यांसाठी ? नका करू बंदबिंद, आम्हा ’बारा’ची भ्रान्त रक्ताचा घाम जरी, वृत्ती क्लान्त क्लान्त करू नका बंदबिंद, झालीत मढी आमची आधीच परवड आणि कुरतड चुकवीत मेलोय जगलेपणी कधीच ! मेलोय जगलेपणी कधीच !

Thursday, November 1, 2012

अंतिम इच्छा

सर्व आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी अंतिम इच्छा मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा

Monday, October 22, 2012

’कर्म(?).. अंहं.. धर्मकांड..’

सदर छायाचित्रांत, एक द्विजद्वय, विमानतळावर एका वायुयानाच्या पंख्याखाली बसून पूजाअर्चा, होम हवनाची तयारी करीत आहे... ***** ’कर्म(?).. अंहं.. धर्मकांड..’ हे दोन व्युत्पन्न(?).. शंका आली कारण या वायुयानाच्या ज्या भागाखाली ते बसलेंत त्या पंखांमध्ये म्हणे लाखो लिटर्‌ इंधन..एव्हिएशन्‌ फ़्युएल्‌ साठविलेलं असतं, ’कोटिच्याकोटि उड्डाणे’ सहज श्यक्य व्हावी म्हणून.. आणि बहुतेक पूजेचा एक भाग म्हणून यज्ञ वगैरे करायचा, या जोडगोळीचा मानस असेल आणि त्यां यज्ञातली एक शलाका जरी तिथं गेली तरी अग्निदेवाचा प्रकोप होवून या दोघांना ’तिथं’ न्यायलासुद्धा हे वायुयान शिल्लक राहाणार नाही, याची कल्पना या दोघांना आली असती.... म्हणजे ते खरंच व्युत्पन्न वगैरे असते तर... शुभचिंतनासाठी कर्मकांड करायलाच हवीत ? मग देवपूजेला, नवरा-नवरीसकट वर्‍हाड घेवून जाता-येतांना रस्थावर एकमेकांशी धडकून, रेल्वे क्रॉसिंग्‌वर जीवघेण्या अपघातांना, अंधश्रद्ध ’भक्त’मंडळींना का सामोर जायला लागतं ? त्या नवपरिणित जोडप्याला बघून हृदयांतला आनंदकल्लोळ पांपणीकांठावर येवून थबकला तर तो शुभ चिंतनाला पुरेसा होत नाही ? निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान..               वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान... ’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते,              शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते... तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र,              पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ? पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं,             लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज, सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज... हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा,            डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा... बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं,           ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं... खुणावणारं निळं आभाळ, बाळमुठीला काळी आई,          कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई... ’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो,         आप्त, सखा, सुहृद, मित्र ...                            फक्त गंमत पाहात असतो..., फक्त गंमत पाहात असतो... एक अगदी गमतीशीर विचार.. पण उधृत विचारांना छेद देणारा... परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल जर साशंक असलांत तर खाली उधृत केलेला संवाद वाचा म्हनजे अश्रद्धांचे डोळे ’उघडतील’ आणि अंधश्रद्धांना दिलासा मिळेल कदाचित... भक्त: देवा मला तुला विचारायचय्‌.. देव: बोल वत्सा.. :तू चिडणार नाहीस ना ? :’देवा’शप्पथ नाही... :आज माझ्या ’रोजमराकी जिदगींत’ तू अनंत अडचणी का निर्माण केल्यास ? :म्हणजे.. :उशिरा उठलो मी.. :बरं..मग ? :गाडी चालूच होईना...t :ठीकै.. :जेवणांत मला करपलेली पोळी मिळाली :हं..हं.. :परत घरी जातांना, माझ्या चलत्ध्वनीचा ऊर्जास्रोत संपला :ठीक..पुढे.. :घरी पोचल्यावर, डोक्याला बाम लावावा म्हटलं तर, बाटली सापडेना..सकालपासून हे असं का घडवलस सगळं ? :हे बघ मित्रा, सकाळी तुझ्या उशाशी एक यमदूत उभा होता त्याच्याशी लढायला मला एक जीवनदूत पाठवायला लागला... :ओह ! :तुझ्या रोजच्या रस्त्यांत, एक पिऊन तर्र झालेला चालक होता . त्यानं तुला धडकूनये म्हणून मीच तुझी गाडी जरा उशिराच ’सोडली’... :(शरमिंदा) :तुझी पोळी ’पिकविणारा’ व्याधिग्रस्त होता म्हणून जिवजंतू ’दमनार्थ’ मीच करपवली..अहं..जरा जास्त भाजली पोळी.. :(वरमून) बरं... :अरे लेका तुला एक धमकीचा दूरध्वनी येणार होता म्हणून मी तुझं यंत्रच बंद पाडलं.. :(नम्रपणे) हं..हं.. :’मरावीमं’ कृपा माझ्या कृपेवर नेहमीच मात करते..तर ’त्या’ अवकृपेने वीज जाणार होती... बामच बोट चुकून डोळ्यांत गेलं असतं तर... म्हणून बा्टलीच गायब केली मी..मित्रा ! :माफ कर मला... :छे..छी माफी कशाला...फक्त माझ्यावर विश्वास ठेव...सगळ्या बर्‍या-वाइटावरसुद्धा....  :होय देवा...या पुढे नक्की...  :आणि तू ठरविलेल्या गोष्टींपेक्षा बरंच बरं मी तुझ्यासाठी योजत असतो यावरही विश्वास ठेव... :होय..होय, देवा ! आणि खूपखूप धन्यवाद, आभार आजच्या सुंदर दिवसाबद्दल.... :ठीकै रे...असाच एक दिवस भक्तांसाठीचा...विशेष कांऽऽही नाही... मला आवडत भक्तांना मदत करायला... क्या बात है... कितना बदल गया भगवान !!

Tuesday, October 16, 2012

माणुसकीच्या वारस

माणुसकीच्या वारस आम्ही दुजाभाव नाहिसा करू नव्या जगाच्या, शांतियुगाच्या शिल्पकारका ! सार्थ ठरू. . अणुरेणूंची अमोघ शक्ती नभगोलांची असीम दीप्ती ज्ञानाचे लावून पाश आम्हि, विश्वकारणा साध्य करूं शास्त्र-कलांचा सुरम्य संगम आम्ही घडवू जगति, विहंगम, समृद्धीची धरुन कांस ’लोकराज्य स्वप्न आम्हि साकारू, उक्ति आमुची व्यर्थ ना ठरो भावबंधना ना ’मनु’ विसरो आदिशक्तिला स्मरुनी भवती उन्नत्तीचे बिज पेरू

’तेजोगर्भा...

छायाचित्रांत तरुणींचा समूह पंचकर्माचं प्रशिक्षण घेत आहे. एका नाकपुडींतून झारीनं पाणी सोडून, दुसर्‍या नाकपुडींतून बाहेर सोडणे.. ’तेजोगर्भा...’ फालतूचे विचार टाळा, ठेवा मोकळ मन चांगलच ऐका, बघा, बोला, सजग ठेवा तन मोकळी फुफुसं, प्राणवायू, आरोग्या हितकारी अखेरीस Winner ठरतो, खरा निसर्गोपचारी दिनक्रमाची सुरुवात जर अशी पंचकर्मांकित सुदृढतेची अन्‌ शरीराची सहज जडेल प्रीत शिस्तीला नाही पर्याय, वाटचाली साठी उद्याच्या राष्ट्राला तुमची गरज मोठी... आपल्या शालेय अभ्यासक्रमांत शिकलेली, (बहुधा त्या वयांत अर्थ न कळतांच) पाठ सुद्धा केलेली, बहुतेक कविवर्य ’बालकवीं’ची हीसुप्रसिद्ध कविता अठवतेय ? ’कळी उमलली, जो न पावली पूर्ण विकासाला, यांतला दुसरा चरण, सद्य परिस्थितीच्या अनुषंगाने बदलून ’तोच तिजवरी अमानुषांचा पडला की घाला’ असा लिहावा अशी धारणा कुठल्याही संवेदनाशील ’माण्साला’ होणं स्वभाविक आहे. या काव्यपंक्ती आणि त्यांतलं विदारक सत्य जर खरंच इतिहासजमा करून गाडून टाकायचं असलं तर, छायाचित्रांतल्या, नुकत्यांच तारुण्यांत पदार्पण करून, आदर्श कन्या, पत्नी, माता अशा अनेकविध जबाबदार्‍या लीलया पार पाडायला निसर्गोपचाराचीचं कांस धरायला हवी ! हो की नाई ? मला सांगा तुमच्या माझ्या आई, आज्जी, आत्या, मावशी यांच्या काळी कुठं होती हो, Multispeciality Clinics वगैरे ? उठल्या-सुटल्या आणि माझी आई म्हणायची तसं, ’हागल्या-पादल्या’ औषध आणायला धावत सुटायला ? निभावल्याच ना त्यांनी सगळ्या जबाबदार्‍या यशस्वी रित्या ? त्याकाळी ’निसर्गोपचार’ या गोंडस नावाखाली कांही विशेष करायची सुद्धा गरज नाही पडली त्यांना. कारणं, ’रांधा(वाटा, लाटा ढवळा, घुसळा), वाढा(झाडा, सजवा, वाका, वळा), उष्टी काढा(सावडा, सारवा)’ या सगळ्या क्रियांमध्ये स्त्री-देहाच्या विविधांगांची होणारी हालचाल नुसती डोळ्यासमोर आणलींत तरी उमजेल तुम्हाला, ’कां ?’ ते ! शेती-मशागतीसाठी, नांगरटीसाठी ’बैल’ नावाच्या प्राण्याचा शोध लागेपर्यंत स्त्री-प्रधान संस्कृतींत, पुरुषमंडळीच खांद्यावर जूं पेलत कामाला लावली जात होती महिलावर्गाकडून त्या काळी.. दोनच ’कर्तव्यपूर्त्यार्थ’.. पहिलं म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे ’प्रजोत्पादनहेतु’ एक साधन ! त्याचाचं सूड म्हणून की काय, पुढील काळांत, ’पुरुष’ जमातीनं, स्त्रीला, स्वयंपाकघर, माजघर, देव्हारा, परस अशा जागांमधे बंदिवान करीत, वर उल्लेख केलेली ’कर्म’ करायला लावली हजारो वर्षं ! आणखी एक कहर म्हणजे, रजस्वला स्त्रीला अपवित्र मानत, स्वत:च्या शरीरांत, विविधठाई रक्त-मांस-विष्ठा-मूत्र-पित्त-वात, आणि मनाच्या विविध कप्प्यांत, विकृतीजनक वासना धारण करीत ’मिरविणार्‍या’, पूजापाठा आधी ’पवित्रक’ धारण अनिवार्य असलेल्या पुरुषवर्गानं, तिला मासिक रजोदर्शनकाळी धार्मिक (?) कार्यां पासून वंचित ठेवलं. अरे लेको, हे निसर्गदत्त लेणं जर स्त्री धारण न करती तर, तुम्ही त्या, ’महालक्ष्मी’नामक स्त्री-देवतेला लुगडी नेसवायला उत्पन्न तरी झाले असतांत कां ? पण आतां, विज्ञानाधिष्ठित शिक्षण घेवून. युगानुयुगं बंदिस्त, नाइलाजानं निद्रिस्त ठेवलेल्या आपल्या मनांना जाग आणत स्त्रीवर्ग, समानतेच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.. तेंव्हा सावधान पुरुष हो..ही गर्जना ऐका.. जाळा पोळा हाल करा तरि तेजोगर्भा आम्ही साम दाम दंड भेदुनी यश नेवू निजधामी पराक्रमाला आम्हा मोकळे गगन, हीच मर्यादा जन्मजात कौशल्यें वुहरू अणु-रेणूंतुन सुद्धा कुणी म्हणति जरि ’मुलगि झालि हो ! कां जगवावी हिला ?’ जळमट झटका, आणि विचारा ’जन्म तुला कुणि दिला ? आईच्या पोटांतच आम्ही बाळे सर्व समान ’बाळ’ असे ’मुलगी’, तर हाती गुणरत्नांची खाण रक्त सारखे सर्वांचे ? आणि श्रमाचा घाम ? बल, बुद्धी लावून ’पणा’, राहू शिखरावर ठाम पटविण्यास कां वेळ आम्हावर यावी ? हे दुर्दैव,, युगांयुगांतुन गाजवूनही गगनभेदि कर्तृत्व.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Monday, October 15, 2012

जय जगदंब

मातेश्वरी, परमेश्वरी, ज्ञानेश्वरी शुभदे, पांखर सदा सश्रद्ध या भक्तांवरी असु दे बघ आपदांची मोहळे, क्रुधश्वापदांची जणु दळे, संहार कर.. कर मोकळॆ, सान त्यांच्या आकांक्षा भवसागरी तरु दे तू प्रकाशाची वल्लरी, या तमप्रवाहा किनारी, पिडितांस जणु पंचाक्षरी, नाम जय जगदंब जप गंभीरसा घुमु दे शरणागतांना पाहुनी, करवीरग्रामी येउनी, झणि संकटा निर्दालुनी, ऊर्जांगिनी, बलदायिनी, तेजस्विनी दिसु दे

Saturday, September 29, 2012

’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????

सदर चित्रांत एक सद्‌(?) गृहस्थ त्याच्या चलत्ध्वनिसंचावर छायाचित्र काढीत आहेत रस्त्यावर उभे राहून.. आणि त्यांचं चार-पांच महिन्याचं बछडं त्यानं आपल्या पायाच्या गुडघ्यांत दाबून धरलं आहे.. केवळ अतर्क्य दृश्य... ***** ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’ अरं काय ल्येका, काय तुझं चाललय काय ? असं काय आक्रित तिकड घडतं हाय ? नाय काढला फोटू तर फासावर जाशिला ? द्येवाला पायी घालतोस ? पाप कुठं फेडशिला ? ’असं पुन्हा दिसणार नाही’ म्हनतुयास निर्लज्जा ? मानूस नावाच्या श्वापदा तुला कुठली द्यावी सजा ? काय मानूस हैस की कोन ? ’गोंडस’ धराया पाय ? कोल्ही कुत्री सुद्धा तुला क्षमा करायची नाय दोन घडीचा डाव मांडून मोकळ होवू नका, जबाबदारी घ्या ! वर करूं नका काखा पायांत छान वाळे, कानटोपी डोईला ’कवळा’ कुठल्या भरवशानं तुला सोपिवला ? जस पेरशिला तस उगवल, माती-मायचा नियम हे सूत्र कोरून ठेव हृदयांत तुझ्या कायम ? असल्या अपेष्टांतनं जर झालाच उद्या मोठा, फोटो पाहून नक्की हानल डोस्कित तुज्या सोटा पाहिले असले बाप, आपल्याच शौकांत सदैव मश्गुल, काळीज, काळजी नाही, यांचा वंश ’काजळी-कुल’ असलं कांही अतर्क्य केल्याशिवाय आपली नोंद कुणी घेणार नाही आणि आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही, असं या सद्‌(?)गृहस्थाची धारणा असावी बहुधा ! यापेक्षा Child abuse आणखी काय वेगळी असते ? कसली नाती अन्‌ कसलं काय ! ’जिव्हाळा’ चित्रपटासाठी अण्णांनी,,कै.ग.दि.माडगुळकरांच्या सिद्धहस्त लेखणींतून...अहं...कुंचल्यांतून अवतीर्ण झाले्ल्या, स्वरमांत्रिक कै. श्रीनिवास खळ्यांनी नादमधुर केलेलं आणि कै. बाबूजी..सुधीर फडके यांच्या भावविभोर कंठांतून आळवलं गेलेलं गीत.. त्याचं ध्रुपद आठवतं...’लळा जिव्हाळा शब्दचं खोटे, मासा माश्या खाई..कुणीकुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’... मी गदिमांचा ’कुंचला’ म्हटलय आधीच्या ओळींत.. कारण अण्णांचं प्रत्येक गीत हे एखाद्या जिवंत , सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यांतल्या कडू गोड अनुभवांचा प्रसंगाचा पुन:प्रत्यय देणारं, चित्रदर्शी शब्दांकन असायचं.संदर्भाधीन छायाचित्रांतल्या ’माणसा’सारखी माणसं (?), संवेदनशील कविमनाला सृजनहेतु सजग करत असली तरी दिसणार कृत्य हे निंदनीयच ! या गीतांतलं वास्तव..’मासा माश्या खाई’ हे कांही फक्त विशिष्ट जलचरांपुरतच मर्यादित नाही तर तो केवळ एक दृष्टांत. बुडणार्‍या माकडिणीच्या नाकांपर्यंत पाणी आलं की, पिलाला आधी कडेवर नंतर, त्याला वाचविण्यासाठी डोक्यावर घेणार्‍या मादीच्या काळजांतली ’माय’ स्वरक्षणहेतु, अखेरीस, त्याला पायाखाली घेत दोन इंचांचा आणि क्षणांचा अतिरिक्त अवधी मिळवू पाहातेचं, हे एक जागतिक सत्य.. जसं कै. ’ग्रेस्‌’ माणिक गोडघाटे यांच्या कवितेंतली संकल्पना ’भय इथले संपत नाही’..पटतय ? हे भय मरणाचं, ’असणं’ नष्ट होण्याचं, विलयाचं आणि भुकेसाठी ! भूक ? जगण्याची, जगण्यासाठी कांहीही करण्याची.. आणि या भुका तरी कसल्या ? मनाच्या शरीराच्या ? संस्कृत ? विकृत ? ही विकृतीचं प्रकृती होऊ लागली तर ? अनेक वर्षांपूर्वी, पुण्यांत एका परित्यक्ता-आधार-गृहांत. मुलाखत चित्रित करीत होतो मी, १/२ इंच्‌ ओपन्‌स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ रेकॉर्डर्‌वर, कृष्ण-धवल ’दूरदर्शन’ साठी... वीणा...वीणा देव विचारित होती एका पीडित तरुण मुलीला, ’काय झालं बाळा ? काय घडलं ?’ त्या मुलीनं कांठोकाठ भरल्या डोळ्यानं आणि दु:खानं ओघळणार्‍या अश्रूंनी ओले झालेले गाल पदराच्या शेवानं टिपत, वीणाकडे असं काही पाहिलं की मला ते क्लोज्‌अप्‌ मधे व्ह्यू फाइंडर्‌वर दिसल आणि माझा बुबुळांवर पण नकळत धुकधुकं झालं आणि फोकस्‌ कळेना.. ’काय आणि कसं सांगू ताई ?’.. तरुणीच्या ओठांतून अस्फुट शब्द..अर्धवट वाक्य बाहेर पडलं, ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’

Thursday, September 27, 2012

’You just wait'

सदर चित्रांत एक पोक्त ग्रामीण महिला , सराइत चालकासारखी ’बाइक’वर स्वार झालेली दिसते आहे.. ’You just wait' डोरलं बांधलं मला तवा व्हती म्या झोळींत बोहल्यावर म्हणे नेलं, मामानं हातावर झेलित इवल्याश्या भाळावर एवढा मोठा टिळा, कुड्याबुगड्या कानी नी गळ्यांत बोरमाळा टिळ्यावर मायेनं रेखली लाल चिरी ल्यायला दिला परकर नि पोलक भरजरी, जरा चालायला लागल्यावर पांगुळगाडा आला धरभर आन्‌ वावरांत माजा राबता सुरू जाला पर बैलगाडीची मज्जा काय औरच अस्ती बाबा ’हुर्रर्र हुर्रर्र सर्ज्या-मौज्या’ आरडत पळवायचे आबा परकराचा वरती, शिस्तित कांचाबीचा ,मारून हिंडत व्हती नंतर म्या, सायकलवर टांग टाकून, माय कवतीकानं म्हनं, ’गांवभर उंडारती’ भ्या वाटतं.. बघुन कुनाकडं बी हासती..’ म्या म्हनं, ’राजपुत्र येनार घोड्यावर, बसवुन माला फुड्यांत, शर्यत वार्‍याबरूबर, खरचं आला एक दिशी, मनांतला राजा संग बाइकबाई,म्हनं, ’करतू वावरांला ये-जा’ सवतापाठी, ’बस’ म्हन्ला, ’चल जत्रंला जाऊ, सवतीपाठी बसून म्ह्न्ले, ’बाई तुझी पाठ लई मऊ !’ पडली माझी पावल कधीच जिमिनीवर न्हाईत असा थाट बाई, कुनाला सोपनांत तरी म्हाईत ? फटफटीवर बसून आंता जाते कुटं बी थेट विमानसुद्धा उडवन बरं, You just wait.. You just wait.. पुण्याची, दक्षिण ध्रूवावर Parajumping करणारी पहिली महिला शीतल महाजन, अंतराळ काबीज करू पाहाणार्‍या कल्पना चावला, सुनिता विल्यम्स्‌, यांच्या आयांनी पण ’पोटूशा’ असतांना अशीच स्वप्न पाहिली असतील कदाचित. शारीर सौंदर्य, नजाकत, वृत्तीनं सहनशील, परावलंबी, सेवाभावी वगैरे केवळ यांच विशेषणांचं सगुण-साकार रूप ही स्त्रीची प्रतिमा होती एकेकाळी. ती प्रतिमा पुराणं, इतिहासांत आणि अगदी अलिकडच्या काळापर्यंत अनेक पराक्रमांनी आणि अनेक क्षेत्र सहजी पादाक्रांत करून स्त्रीयांनीच मोडींत काढली आहे हे सर्वज्ञात आहे. अर्थात वेदांमधली पहिल्या ऋचेची रचैता एक स्त्रीच होती हे इथं विशेषत्वानं नमूद करायला हवं ! अपाला तिचं नांव.. तेंव्हा, बुद्धीच, सृजनक्षमतेचं माप निसर्गानं स्त्री-पुरुषाला, नर-मादीला अगदी समसमान दिलं आहे. उत्कृष्ट अवधि-नियोजन, मानवसंसाधन व्यवस्थापन, अर्थ पुरवठा नियंत्रण, संगोपन, हे सगळ शिकायचं तर कुणाही यशस्वी गृहिणीकडून शिकांव ! या सगळ्याचं एकत्रित वर्णन करायला, उपमा, विशेषणं, दृष्टांत रूपकं आदि साहित्यिक आभूषण अपुरीच पडतील तरी सुद्धा.. व्याघ्रावाहना जगदंबा, शारदा मोरावरी, महिषासुरारि महाकाली, त्रिशूळ शोभे करी अंबुजवासिनि लक्ष्मी, धनसंपदा नि समृद्धी खल दमना देइ धैर्य, शौर्य, स्थैर्य, बल, बुद्धी अश्या विविध रूपधारिणी स्त्रीचं वर्नन करण्याचा मोह अटळ आहे. आज विविध क्षेत्रांत, उत्तुंग-यशप्राप्त सुकन्या बघतांना, स्त्री-पुरुष भेद किती लयाला गेलाय याची जाणीव क्षणॊक्षणी आपल्याला होतेय. या पार्श्वभूमीवर जवळ जवळ वीस वर्षापूर्वी कधीतरी, स्वत: जवळच्या शब्दसंपदेची परीक्षा घेण्यासाठी मी ही विशेषणांनी युक्त रचना केली. ती,माझ्या आईने वाचली आणि,. शेवट पर्यंत अत्यंत श्रद्धेने आणि माझ्याविषयीच्या कौतुकाने ती प्रार्थना म्हणून वाचायची ! ॥जगदंबा स्तुतिअष्टक॥ प्रकटता तेज । आदिशक्ती बीज । जागेपणी नीज । भेदू पाहे ॥ व्याकूळ व्याकूळ । गर्तेतला तळ । शक्तिसेवा फळ ।उद्धरेल ॥ सत्या, शुभा, सुंदरा । त्रिशुळाच्या तीन धारा । दर्शने देई धैर्या । रिपुदमना ॥ जगदंबा करवीरी । भवानीआई गड शिवनेरी । देवी सप्तसृंगी वणीच्या डोंगरी । झालीये अवतीर्ण ॥ संपदेचे आगार । ज्ञानसमृद्ध भांडार । सारे होतसे असार । मातेचरणी ॥ व्याघ्रारोहि सुंदरी । शस्त्रां धरुनी चारहि करी । दैत्य निर्दय, अविचारी । संहारितसे ॥ दाही दिशा भरूनि राही । पंचमहाभूतांचि माय होई । त्रिकालाबाधित निवारा देई । विश्वमाता ॥ हे ऐसे स्तुतिअष्टक । शाब्दी श्रद्धामूल सार्थक । सदा देवो सारासार विवेक । जगण्यासी ॥ ****

Tuesday, September 25, 2012

’आयडिया ची कल्पना’

सदर चित्रांत एक एक शब्दश: हातका माणूस एका ATM मधे उभा आहे.. ’आयडिया ची कल्पना’ मले शिरमंत व्हायचय्‌ माह्या बापा, करू कुठल्या मी सांगा की पापा.... हे ’हरघडी पैक्याचं यंत्र’ पर उघडाया ठावा नाई मंत्र कशा उघडाव्या म्हंतो मी झापा.... कष्ट करून घाम ढाळीला पाणी भुकेला, शीळा उशाला त्ये बी लुटत्यांत मारून थापा.... कसं ठेवांवं जपून त्यांना लांडगे भवतीचे करत्यांत दैना तुडवत ’दये’च्या मारत्यांत गप्पा.. .बाकी.. कसा वाटला हा माझा Make-over ? हां.. पडू नको.. सोताला सावर ! लई नाई आतां तुला फशिवनार गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... भाइर गुंडांची मोकाट टोळी करतिये कमावल्या धनाची होळी कसं यांना पुरुन आपन उरनार ?... डोळ्यांत टाकतंत मिरचीची पूडं सगळ्या आशेला लावत्यात चूडं कशा तरवारी म्यान यांच्या होनार ?... पायी नको घालू वहाणा अंगी बाणव भिकारी बाणा तुला ढुंकुन नाई ते बघनार... पाठी घेवून फाटकी गोणी अन्‌ नजरेंत करुण कहाणी पाहायाला त्यांना वेळ कसा गावणार ?... माज्या नजरेंत दिसतोय ना अंगार ? नाइ असातसा, नाई मी ’भंगार’ संधी मिळताच त्यांना मि हाननार... फाटकी विजार नी उसवला सदरा अन्‌ खंतावला उद्विग्न चेहेरा तुला जवळ करू नाहि पाहाणार... ’भाई’गिरीची पापणी आड नशा अन्‌ ओठावर ’दादा’च्या मिशा नाहि धुंदी यांची उतरनार... बघा चेहेरा माहां निरखुन पारखुन अभि बच्चनचं वाटतया कां Cartoon ? नको.. लचांड मागं उगा लागनार... असेच दिवस आलेत आता राजा, शिरिमंत ’दिसन्यां’त बी नाई राह्यली मजा सोन म्हणून. पितळ सुद्धा लुटणार... म्हणून गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... . गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार.... आजकाल रस्त्यावर अनेक बॅंकांसमोर, लोखंडी जाळ्या वगैरे लवून, Fortification केलेल्या व्हॅन्स्‌, कोट्यवधींची रोकड, विविध शाखांकडे पोचवायला किंवा त्यांच्या कडून मुख्यालयांत आणायला, सज्ज असलेल्या आपण जवलपास रोज पाहातो. इतकी काळजी.. म्हणजे अगदी सशस्त्र सुरक्षा रक्षक, ’कवच-कुंडलां’सह..त्या ’चिलखती’च म्हणावं अशा गाड्यांबरोब्र, मधे आसपास ठेवून सुद्धा, लुटारू दरवडेखोर आपल काम तमाम करतातच ना ? म्हणून कदाचित, हे ’पारंपरिक धोके, संकटं लक्षांत घेवून रंग-केश-वेशभूषा बदलून ’सर्वदा धन उपलब्धिसेवा गृहांत’ (म्हणजे ATM हो !) हा खरा म्हणजे मुळचा ’धनाढ्य़’ दाखल झाला असावा. पण आयडियाची कल्पना मात्र भन्नाट आहे हं ! पूर्वी, मृच्छकटिकांतल्या वर्णनाप्रमाणे किंवा रंगावृत्तींत आपण बघतो त्याप्रमाणे ’पारंपरिक शार्वीलिक’ म्हणजे चौर्यकर्म तज्ञ, अंधारांत अंगावर काळ्या रंगात रंगून लोप पावणारी काळी घोंगडी घेवून कुणाला दिसू नये म्हणून बिचारा ’निशाचरी’ करीत, मजल दरमजल करीत दारोदार हिंडायचा. पण आजकाल धनिकांवर ही पाळी आली आहे, कारण ’शार्वीलिक’ दिवसाढवळ्या दरोडे वगैरे घालायच्या फंदात न पडता गुंड-मवालीगिरीनं निर्माण केलेल्या दहशतीच्या वातावरणांत, सर्वसामान्यांकडूनही त्यांच्या मिळकती हिसकावून घेत त्यांच इप्सित साध्य करीत आहेंत. अशा वेळी, चित्रांतल्या त्या वेशांतरिताची क्लृप्ती वापरणं कदाचित फायद्याचं ठरूं शकेल... म्हणजे मोठ्यारकमा फाटक्या पोत्यांतून आणि कोट्यवधींच्या चलनी नोटा, सोनंनाणं वगैरे कचर्‍याच्या गाड्यांतून... कारण.. कलालानं ’एकच प्याल्यांत’ दूध जरी वतल पियक्कडाला प्याल्यावर ’नशा झाली’ वाटल... नाई कां ?

Saturday, September 22, 2012

’दोस्ती बिस्ती..’

सदर चित्रांत पाणीखात्यांत काम करणारे दोन कर्मचारी, तिसर्‍याचे पाय धरून त्याला उलट्या अवस्थेंत खड्ड्याच्या आंत त्याचं अर्धं शरीर जाईल अशा पद्धतीनं अधांतराधार देत आहेत. ’दोस्ती बिस्ती..’ येऽऽ दोऽऽस्ती, हम नहीं छोडेंगे फिसले भले पॉंव, साथ ना तोडेंगे पकडीवर आमच्या गड्या आहे तुझी भिस्त, बिनधास्त कर काम, ठरवू विश्वास तुझा रास्त आंत भले दिसेल तुला सगळच उलटं आहोत भक्कम बाहेर आम्ही काळिज ठेवुन सुलटं गंमत म्हणजे तीघांना एकदम एकच काम नको चिंता करू, नाही वेगळा मागणार दाम.. कुणाच्या तरी ताटांत ’तर्री’ बरोबर, पाय आणि नांगी तोडलेल्या अवस्थेंत, ’तुकड्या’ म्हणून पडण्याच्या भीतीच्या गर्तेंतून सुटका व्हावी म्हणून,, पोरांनी पकडून ठेवलेल्या टोपलीच्या नरकांतून बाहेर पडू पाहाणार्‍या खेकड्यांची एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा चाललेली असते. गल्ली ते दिल्लेच्या राजकारणांत, सफाई खात्यापासून अर्थखात्यापर्यंत नोकरशाहींत, उद्योग आणि व्यापार उदीम क्षेत्रांत उद्योजक आणि व्यावसायिक यांचीही ’सतास्थानं’ मिळविण्या आणि टिकविण्यासाठी एकमेकांचे ’पाय ओढण्या’पासून, सगळी तत्व, वचननामे, आश्वासनपत्र गुंडाळून ठेवत, एक मेकांचे ’पाय धरण्या’पर्यंत स्पर्धा सतत चालणार्‍या या जगांत, दोन सहकारी तिसर्‍याचे पाय ’आधार’ म्हणून धरून ठेवताहेत, हे चित्र खरतर असंभव वाटावं इतकं विरळा...पण मित्र हो, ही कुणा कलाकाराच्या कल्पनेंतून साकारलेली, कलाकृती नाही तर चक्क ’छायक-चक्षुर्वैहिसत्यम्‌’ वास्तव आहे. तुम्हाला ऑल्‌ द बेस्ट्‌ नाटकांतले तीन मित्र आठवताय्‌त ? एक मुका दुसरा आंधळा आणि तिसरा बहिरा एका सुंदर तरुणीशी संवाद साधण्यासाठी एकमेकाच्या शारीरिकत्रुटींवर मात करायला अहमहामिकेनं सरसावणारे.. किंवा ’दोस्ती’ नावाच्या हिंदी चित्रपटांतले मित्र ? एक आंधळा तर दुसरा लंगडा... ’मेरी दोस्ती, मेरा प्यार’ गात हिंडणारे पण याच बरोबर, सूर्याजी पिसालासारखे अस्तनींतले निखारे किंवा... शेक्स्पिअर्‌च्या ’ज्यूलिअस्‌ सीझर्‌ मधला,(सर्‌ रिचर्ड्‌ बर्टन्‌..पी‍टर्‌ ओ’टूल्‌) ’ओ:..ब्रूटस्‌ यू टू’...हा जागतिक स्तरावरचा प्रसिद्ध, दगाखोरीनं व्यथित कुठल्याही व्यक्तीच्या मनाचा चित्कार शब्दरूप करणारा, म्हणजे ज्यूलिअस्‌ सीझर्‌ची हत्या होतांना त्याच्या तोंडचा उद्गार... हत्या करणारा होता त्याचा विश्वासू मित्र सहकारी, राजकारणांतल्या डावपेचांचा सल्लागार कधीकधी कटांचा योजक. ब्रूटस्‌नं...पाठीमागून वार करून केल्री हत्या, चर्चमधे... तात्विक मतभेदांतून झालेल्या वादाची अतर्क्य परिणिती आणखी एक उदाहरणं..एका प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटांतल्या पात्रांचं, ज्याचं नावच मुळी शीर्षक म्हणून वापरलं गेलं आहे.. बेकेट्‌, एक धर्मगुरू..त्याची हत्या केली त्याच्याच मित्रवत राजानं हेन्री २ नं, चर्चमध्येच मारेकरी घालून.. किंवा याच सूत्रावर बेतलेला राजेश खन्ना, अमिताभनं अभिनित केलेला ’नमक हराम’ हा हिंदी चित्रपट.. ही उदाहरणं ही सर्वज्ञात आहेत.. एखा्द्या घट्ट विणीच्या नात्याचं वर्णन करायचं असेल तर इंग्रजींत, एक खास वाक्प्रचार वापरतांत, ’We are not related but he is more than a brother to me'.. असं विधान करतांत, त्यांतल्या भावनेला द्विरुक्त करण्यासाठी. तर असं हे ’मैत्री’चं नातं. पण त्याला छेद देणारे चित्रपट कलाकृती, ऐतिहासिक घटना नजरेस पडतांत बालवयांत, तरुणपणी आणि मग कुशंका अंकुरायला लागतांत नकळत कवळ्या मनांत. माझा नातू तेरा वर्षांचा, काय म्हणाल माहिताय्‌ ? ’आजोबा , कशावरून त्या काठावरच्या दोघांना त्याला, ज्याला तुम्ही ’व्यावसायिक सहकारी’ वगैरे म्हणताय.. उलटा करून खड्ड्यांत टाकायचा नसेल कुठल्यांतरी सूडापोटी ?’ मी म्हटल ’असेल बाबा, ज्या रंगाच्या चष्म्यांतून बघावं तसं दिसतं ! ’ शिवाय एक वेगळी ’जमांत’ असते मित्रांची, माहीत आहे ?..उगवत्या सूर्याला वंदन करणार्‍यांची किंवा ’खुर्ची’ असेतो ;मैत्री’ (?) टिकवणार्‍यांची.. मी स्वत: खूप अनुभव घेतलाय म्हणून विश्वासानं सांगतोय...वेळीच ओळखा अशांना आणि खड्यासारखे वगळा आयुष्यांतून

Tuesday, September 18, 2012

’पोटासाठी काहीही’

सदर चित्रांत एका ट्रक्‌च्या चाकाचे Nut-bolts पहारीच्या साहाय्यानं आवळणार्‍या ’पति-व्रता’ दिसते आहे.. ’पोटासाठी काहीही’ पोटासाठी काहीही, ना मागे हटणार तसुभरही तळहाताला येत्यांत फोड, सगळी भुकेसाठी तडजोड मालक ’ते’ पन अस्तुरि मी, अन्‌ तान्ह्याची बी मी आई दोघांनाबी हुर्द दिलय, जीवापाड प्रेम केलय मनगटि माझ्या वज्रचुडा, डोइवर पदराचा पहारा खडा पिंजर रेखुन भाळावर, गाडी आणणार रुळावर कैकयि जगतेय युगायुगांत, समानतेची गीतं गात सात हजार वर्षांपूर्वीच्या रामायण कालादरम्यान रघुकुलांतल्या राजा दशरथाच्या महाराणी कैकयीचंच उदाहरण कशाला ? कारण तिची भूक तिच्या पदाप्रमाणेच खूप मोठी होती. सर्वसामान्यांचीधडपड चालू असते ती सकाळ संध्यालाळच्या दोन घासासाठी स्वत:च्या आणि बायको पोरांच्या.. तुलनेनं अगदी अलिकडच्या काळांतली कितीतरी उदाहरणं आहेत, नवर्‍यानं अंगिकारलेल्या व्रतांत तनमनानं समर्पण करीत अजरामर झालेल्या ’पतिव्रतां’ची...हो..हो ! प्राचार्य राम शेवाळकरांची हीच व्याख्या आहे, ’पतिव्रता’ या शब्दाची.. ! पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, या बरोबरच वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे, स्वातंत्र्य लढ्यांतले चाफेकरबंधू, क्रांतिकारक पतीला, ब्रिटिश राजवटींत, तुरुंगात माती कालवलेल्या पिठाची भाकरी खावी लागते म्हणून, घरी स्वत:च्यासाठी माती कालवलेली ’रोटी’ करून खाणारी पंजाबातली राजबन्स कौर..अशा पतिकर्तृत्वाच्या वटवृक्षाच्या पसार्‍याला घरांत त्यांचे संसार मूकपणे विनातक्रार सांभाळत, अनामिक राहून ’बळ’कट करणार्‍या अनेक वीर-पत्नी...फार काय गोवा मुक्ति लढ्यांत, खांद्याला खांदा लावून लढणार्‍या पंडित महादेवशास्त्री जोशींबरोबर सौ. सुधाताई, पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमधे आणिबाणीविरोधी लढ्यांत, प्राध्यापक मधू दंडवतें बरोबर सौ. प्रमिला ताई, आंतरराष्ट्रीय स्तरावर, वर्णद्वेषविरोधी लढ्यांत दक्षिण आफ्रिकेंत नेल्सन्‌ मंडेलांबरोबर विनी मंडेला... किती किती म्हणून उदाहरणं द्यावींत ? पण तरीसुद्धा ही सगळीच असामान्य व्यक्तिमत्व. पण प्रत्येक सामान्यांतसुद्धा असामान्यत्वाचा एक स्फुल्लिंग दडलेला असतो.योग्य वेळ येतांच त्या ठिणगीचा भडका उडतो.. जिणं जगतांना अडचण ठरणार्‍या, अपमान निवारण, अन्याय निराकरण, गुंडशाहीच्या प्रतिकारार्थ आदि ’सामान्य(?)’ कार्यांसाठी. आणि तसंसुद्धा, सगळेच जर असामान्य झाले, ’चला कल्पतरूं’च्या ’आरवा’प्रमाणे, तर ’असामान्यत्वा’ची गरजच भासणार नाही, नाही का ? असो नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा ! हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण चित्रांतल्या कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणार्‍या महिलेप्रमाणं, वर्षभर उन्हातान्हांत, थंडीवार्‍यांत, पावसापाण्यांत, काळ्या आईची मशागत करीत, कृषिवल पतीबरोबर खपलेल्या कारभारणीच्या मनांत, दाण्यावर आलेल्या, वार्‍याच्या झुळुकेवर डोलणार्‍या कणसावर स्वत:च्या छोट्याछोट्या आकांक्षा, स्वप्न झोके घ्यायला ठेवत, ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार... मग तिनं, का नाइ म्हणावं... पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान, वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान, दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर, गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर, सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी, पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी, कधीपासुन टोपपदरी घ्याव वाटतय मनांत बैलजोडी आणत्याल नवी तवा सांगन ’त्यांच्या’ कानांत, लेक लई हुश्शार माझी, तिला कराय्‌चिये डॉक्टर, पोरं चढविल झळाळ, खंबीर वाश्यांच्या घरावर या दुर्दम्य आशावादाला सर्वथ: फलद्रूप करूं पाहाणारं अगदी चपखल दृश्य आहे की नाही वर दिसणार्‍या चित्रांत ?

Monday, September 17, 2012

’कुणाला काय हो त्याचे...’

सदर चित्रांत एक कष्टकरी...बिनचेहेर्‍याचा, आपल्या सायलल्‌वरून विटांचा अक्षरश: ढिगारा घेवून चालत चालला आहे.. ’चित्रिका’ २३-०९-१२ साठी मजकूर.. (तुषार जी कृपया) ’कुणाला काय हो त्याचे...’ दुचाकिने वाहताहे कुणाचे हा ओझे ऊन तापलेले, ’मुका’’दम’ पोळी भाजेथेंब थेंब उतरतो घामाचा भुईंत कोंभ अंकुरला, वर येई तरारत मात्र कणसाचे भरल्या वेगळेच राजे... कुणासाठी घरे यांनी बांधावी ? कशास ? दमा, क्षयासाठी नसे दया-क्षमा ’त्यां’स कुणाच्या दारी हो तोरण ? सनई बेंडबाजे... ’ओझे’ ? अंहं ! आहे ही तर ’भाकरीची कथा’ कच्च्याबच्च्यांसाठी पोटी गिळायाची व्यथा तव्यावरी हात जरी माउलीचा भाजे.. कधी ऊन, थंडी, वारा कोसळती धारा, सोसतं मुक्याने, नाही टाकायाचा ’भारा’ मिळवाया होवे, ’त्यांनी’ वांछिलिये जे जे... ओढायाची अशी रोज थकली पाऊले, बाळघास देतादेता चिउले, काऊले थकल्या ’बापानं’ श्वास राखला पाहीज... घरी उफाड्याची वाढे न्हातीधुती पोर डोरल बांधेपातूर जिवालाहे घोर टवाळांना दूर ठेवू कोणत्या मी काजे ? आम्हा नसे हसूं रडूं नसेच चेहरा हातापायावर फक्त टरारल्या शिरा भावभावना ? कसल्या ? काळीजचं(काळजीचं?) थिजे मात्र एक घ्या ध्यानांत, लई झालं आतां ! कुठवर रडायाची वेदनांची गाथा ? ’अंगार’ल्या मनांत, रुजती बदला(बदल्या?)ची बीजे... निवार्‍याला घराचा आकार देण्यासाठी, भाजलेल्या विटा’ वाहून जळलेल्या संवेदनांमुळे, जगण्याचा ’वीट’ आलेल्या त्या बिनचेहेर्‍याच्या ’माणसा’(?)ची कथा सांगतय हे चित्रं ? वाहकानं या भाजलेल्या विटा वाहत कुठल्यातरी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पासाठी मदन मोहन लता या स्वरद्वयीनं अजरानर करून ठेवलेली एका चित्रपटांत्ली गझल, रस्मे उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे त्यांतला एक शेर आजकाल क्षणोक्षणी रोजमरा क्र्र जिंदगी अडखळत, चाचपडत, ठेचकाळत...मरणं सोप नाही म्हणून...जगू पाहाणार्‍या सर्वसामान्याच्या, अंधारी येणार्‍या डोळ्यासमोर तरळत असतो बोझ होता जो गमोंका, तो उठा भी लेते जिंदगी बोझ बनी तो, उठाएं कैसे असा प्रष्ण पडलेल्यांना, या चित्राचा बिनचेहेर्‍याचा नायक म्हणजे एक उत्तरच आहे... ...ठिगळं लावलेल्या धडुत्याच्या झोळींत, कमरेला किंवा पाठीवर तान्ह्याला बांधून, दहा बारा विटा लोखंडी घमेल्यांत घेवून, डोईवर ठेवून चालणारी माउली आणि त्या विटा एकावर एक रचत कोणा अनामिकासाठी घरकुल साकारणारा गवंडी, दार, खिडक्यांच्या चौकटी बनविणारा सुतार, किंवा एखाद्या बॅंकेत निर्विकार चेहेर्‍यानं, नोटा मोजत त्या ग्राहकाला देणार्‍या किंवा त्याच्याकडून घेणार्‍या कर्मचार्‍याला पाहिलं की मला, ’इदं न मम’ असा मंत्रोच्चार करीत अग्नीकुंडांत हवन देणार्‍या ऋषी-मुनींचीच आठवण येते. पाठीवर लाठ्या किंवा छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलणार्‍या क्रांतिकारकांइतकेच हे कष्टकरी निरपेक्ष नवनिर्माणाच्या वारीतले वारकरी नव्हत काय ? पाठीवरचं छकुलं मोठ होवून रांगत, दुडुदुद्डु धावत, आधी झोपडींत आणि नंतर आई-बापाच्या घामानं पक्क्या होत जाणार्‍या भिंती उभ्या राहिल्यावर त्यांच्या आड स्वतंच जग निर्माण करून आनंदविभोर होईस्तो, त्याच्या प्रस्थानाची वेळ येते. आणि मग, ’आपण इथून का जायचं ? कुठं ?’ असा केविलवाणा प्रष्ण व्यथित विस्फारलेल्या नजरेंत घेवून, एकदा आई-बापाकडं आणि एकदा त्यांनीच उभारलेल्या दिमाखदार इमल्याकडं बघत, त्यापासून दूरदूर खेचत नेल जाणारं ते बाललेण दिसू लागतं आणि गलबलत काळजांत ! दररोज कोट्यवधींच्या रकमा हाताळून, घरी आल्यावर, संसाराच्या रामरगाड्यांनं क्लान्त भार्येनं, फुटक्या कपातनं दिलेला चहा, तितक्याचं थकलेल्या आणि निर्विकार चेहेर्‍यानं,मुखावाटे पोटांत ’ढकलणार्‍या कर्मचार्‍याचीही तीच की हो कथा ! ’भाळी कोरले कुणाच्या कुणाचे गोंदणं कुणा काय त्याचे आणि काय देणं घेणं’ **** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Monday, September 10, 2012

प्रामाणिकपणे..

मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी

Sunday, September 2, 2012

शेळी जाते जिवानिशी...

शेळी जाते जिवानिशी... (सदर चित्रांत एका ढासळल्या पडिक घरासमोर मोडींत काढलेल्या मोटर्‌-बाइक्‌वर चढून एक शेळी रिअर्‌व्ह्यू मिरर्‌ मधे पाहाते आहे.) पाऊस कसला, भुरभुर नुस्ती, न्हाई पानी-दाना, मोडित काडुन आमाला बी, धनी फिरवत्यांत माना दलदल माजली, चारा न्हाई, पुडं भुकेची खाई दशा, हिची बी, अशीच दिस्तिया,’ ’बिच्चारी’ बाइक‌ बाई मैत्र जीविचे शोधू जाता, समोर आला नेत्र झडली, पिचली, खिळखिळलेली अन्‌ झिजलेली गात्र जाणू गेले दु:ख तिच, पाठीवर तिच्याच बसून विझूविझू पाहांत होती, ’आ’ अखेरचा वासून कोंबडी, कुत्री, मांजरी बकरी, का नसतो ’बाई’कला जीव ? अरं ’देवाच्या’ त्या काठीला ल्येका, जरा तरी भीव... मोडीत निघत्यांत मानसं थितं आमाला कुठला चारा ? कोनो भी देस, प्यारे ! इस हालात का नही चारा धावत्या जगाबरोबर राहाण्यासाठी स्वाभाविक इच्छेंतून आधी घोडा हत्ती, उंट अगदी ’गरीबरथ’’ गाढवाचा सुद्धा माणसानं स्वत:च्या दीड-दुप्पट वेगानं चालण्या/धावणार्‍या पाळीव जनावरांचा वाहन म्हणून उपयोग करायला सुरुवात केली. अगदी सर्वप्रिय गणेशाला सुद्धा आपली तुंदिल तनु सावरत, स्वत:च्या एक शतांश आकाराच्या मूषकाचा वाहन म्हणून स्वीकार करणं क्रमप्राप्त झालं, महादेवाचा नंदी तर, भगवान विषूचा गरुड, अन्‌ यमाचा रेडा.. वगैरे वगैरे ! दोनचाकांवर तोल सांभाळता यायला लागल्यावर मग पायक्कीमारत दुचाकी, तदनंतर स्वयंचलित दुचाकी आणि चार चाकी अशा अनेक प्रकारच्या ’भू-जल-खे चर’ वाहनांचा शोधकर्ता आणि उपभोक्ता पण माणूस झाला. आतां काय तं म्हणे स्वत:च्या मनाला संगणकांतल्या टिक्की...चिप्‌.. वर ठेवून मुक्त व्हायचा ध्यास घेतलाय‌ त्यानं ! पण.. म्हणून काय तो स्वतंच्या शारीर अस्तित्वाला पायानं चालत इकडून तिकडं न्यायचं विसरलाय ? अंहं ! तेंव्हा बकरीनं स्वत:च्या अस्तित्वाच्या शक्यतेबद्दल शंका घेत ’बाइक’बाईच्या नेत्रां’त...आरशांत, उपर्युक्त सर्व बाबींचा विचार करतां, डोकावणं अगदी स्वाभाविक आहे. पण माकडाची शेपटी झडून दोन पायांवर चालणारा माणूस उत्क्रांत व्हायला जशी अब्जावधी वर्ष सरावी लागली तसंच हे स्तित्यंतर..झालच तर... व्हायला साध्या-सोप्या त्रैराशिकानं सुद्धा अनंत काळ जाणार आहे... अर्थांत, पाठीमागून खंजीर खुपसून, बाई गं... हा माणूस कधी तुला भक्ष करेल, ते मात्र सांगता येणार नाही हं

Sunday, August 26, 2012

पैलतीर गाठण्या

चित्राधारित मजकूर या छायाचित्रांत, पावसाळ्यांत, सांडव्यावरून ओढ घेत वाहणार्‍या पाण्यांतून दुचाकीवर बसून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य कष्टकर्‍याचे दृश्य आहे. ***** पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन प्रसंगी भेदुन प्रवाहा, पैलतीरा भिडेन पाऊस सुखवी प्रेमीकांना , म्हणति ऐसे जरि जन ... लेउनी मग विरहसयि नक्राश्रु ढाळे तन-मन मांडतो जरि प्रपंचाचा डाव मोहाच्या क्षणी मोडुपाहे कधि कणा मग झुंजतां रात्रंदिनी संकटांना घेउनी पाठीवरी मी धावतो पापण्या ओलावल्या तरि हसूं ओठी धारितो अंदाज नाही पलिकडे मज, काय वाढुन ठेविले भाळरेखा रेखितांना निर्मिकाने योजिले अडथळ्यांच्या अभावी पण काय जगण्याची मजा ? निष्क्रीय, आळशि लोळणे ही धनिकपुत्रांची ’सजा’ रोजचीही जरि व्यथा, तरि वृथा कां आक्रोश मग ? वाट आपुली शोधतांना धडपडे सारे जग धडपडे सारे जग... तेंव्हा या नमनाला धडाभर तेल झालेल्या पंक्तींचा मथितार्थ इतकाच की कष्ट आणि कमाई यांच गणित विणतांना किंवा सोडवितांना, नियती ’पंक्तिभेद’ करतेच ! आणि म्हणूनच मग सर्वसामान्य पोटार्थी माणूस अडथळे ओलांडत किंवा त्यांना सोइस्कररित्या ’वलसे’ घालत, "टाळत’, पडतझडत, ठेचकाळत, अपमान पचवीत पुढेपुढे धावत असतो, नियतीकडे, कुंडलींतल्या गेहांकडे, तळहातावरच्या, निसर्गदत्त रेषांकडे सर्वथ: दुर्लक्ष करीत ! There is no shortcut to success..या इंग्रजी वाक्प्रचाराला पुढे .for the poor. & down-trodden. अशी जोड द्यायला हवी. विविध उत्पादनांच्या जाहिरातींचा पाया हा, अशाच ’यशा्ची शोधयात्रा’ या सूत्रावर आधारित असतो...म्हणजे ’तुम्हाला ते मिळवायचय ना ? मग तुम्ही आमचं हे उत्पादन वापरा...’ ! या विधानांतल्या ’ते’ आणि ’हे’ च्या जागी ’फायदा’ आणि ’उत्पादनाचं’ नांव फक्त भरत जायचं.. उदाहरणार्थ तुम्ही ती बास्केट्‌ बॉल्‌ खेळणार्‍या मुलीची किंवा अ‍ॅथेलेटिक्स्‌ उडीचा(Bench lift jump ?) सराव करणार्या मुलाची जाहिरात पाहिली आहे ? आधी अपयश आणि कांहीतरी ’शक्तिवर्धक’ दुधांतून धेतल्यावर एकदम यशोदीपांचा पंचपंच उष:काल...बालकाच्या आणि मातेच्या प्रफुल्लित मुखावर ! म्हंजी, ’पी हळद आन्‌ हो गोरी’.... है का नाय ? *****

Thursday, August 23, 2012

’दुसरीही बाजू’

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत पावसाळ्यांत,हे. कार्यालयीन कामाच्या वेळेंत संगणकाचा पत्ते खेळण्यासाठी उपयोग करणार्‍या महिला कर्मचार्‍याचे दृश्य आहे. ’दुसरीही बाजू’ आम्हि काय कुणाचे खातो रे । तो धनी आम्हाला देतो रे ॥ रंगला डाव पत्त्यांचा । ग्राहक जरि उभे बिचारे ॥ हा सुयोग्य जागी पडदा । ना दिसतो, कळतो त्यांना ॥ यत्किंचित संशय, शंका । ना भिडे भाबड्या मना ॥ समजतील ’अ’दृश्यांत । मी संगणकावर व्यस्त ॥ परि सदैव गुरफटलेली । निज सुखांसनि मी ’मस्त’ ॥ आम्हि ’निवडक’ नेहमी असतो । बेपर्वा, अन्‌ माजोरे ॥ जरि आम्हा कारणे होती । ’बदनाम’ इतरपरि सारे ॥ हे एक प्रातिनिधिक चित्र.. कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणाचं की ग्राहकांच्या, अशा गैरव्यवस्थेला सामोर जावून धीटपणे प्रष्ण विचारीत त्याचा निषेध करण्याची मानसिकता गमावल्याचं ? सेवा देणारे आणि घेणारे...दोनीही बाजूंची मन, संवेदना ’मेल्या’सारख्या झाल्या आहेत. बरं ग्राहकानं, शब्द, मूक देहबोली, हस्तमुद्रा, मुखावरची साधी नाराजी जरी अशा वर्तनाबाबत दाखवली तरी, डाफरून एकदम ’संघटित’ वगैरे होवून ’सहकारी-संरक्षणार्थ’ क्षणार्धांत. ’वयं पंचाधिकम्‌ शतम्’ असा पवित्रा घेत ’कर्म’(?)चारी तयार. पण या ’चित्रा’ची दुसरी सकारात्मक, खरीखुरी सेवाभावी, कृतिसमर्पित भावनेनं, मिळालेल्या सु(?)विधांबद्दल यत्किंचित नाराजी मनांत न बाळगणारी मानसिकता मी कांही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली आहे. ’बालचित्रवाणी’मधील माझ्या कार्यकालांत, पुणे जिल्हापरिषदेच्या, विविध विभागांतल्या शाळांना शासनानं दिलेले चित्रवाणीसंच, त्यांची नियमित देखभाल, त्यांची सुयोग्य उपयोगिता वगैरे बाबींची खातरजमा करणं हा माझ्या कामाचा भाग होता. अशाच एका भेटीच्यावेळी, खेड-शिवापुरमधल्या एका शाळेंत आम्ही जरा लवकरच, म्हणजे सव्वानऊवाजतांच पोहोचलो होतो. ऐन पावसाळ्याचे दिवस धोधो पाऊस पडत होता..वर्गखोल्या अजून बंदच होत्या. पण समोरची मोकळी अच्छादित जागा उघडलेली होती..दिसलेलं दृश्य फारचं आश्वासक होतं एक शिक्षिका वीसपंचवीस मुलांना त्या व्हरांड्यांत समोर बसवून शिकवीत होत्या.. मी सहज चौकशी केली.. तर मिळालेली माहिती अशी.. शिष्यवृत्ती-परीक्षेची तयारी करून घ्यायला, दैनंदिन वेळापत्रकांत उपल्ब्धी नसते..त्यामुळं या पोक्त शिक्षिका, आपली पुण्यांतल्या घरांतली गृहिणीची सगळी कर्तव्य पार पाडून, सकाळी सातला, छत्री-पिशवी सांभाळंत, राज्य परिवहनाची बस गाठायला घराबाहेर पडतांत.. एकदीड तासाचा प्रवास करून विद्यालयांत पोचतांत आणि तिथं ज्ञानार्जनाच्या शुद्ध हेतून, तीनतीन, चारचार मैल, अर्धवट भिजत, चालत आलेल्या विद्याथी-विद्यार्थिनींची, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतांत. शाळा सुरू व्हायच्या आधी... मी ऐकतांना गहिवरलो, मूक झालो आणि अंतर्मुख सुद्धा.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Saturday, August 18, 2012

Locked Footwear...

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एका रबरी चप्पल-जोडाला, चोरीला जाऊ नये म्हणून, मोठे कुलूप लावले आहे.. ”चप्पल’, ’वहाण’ हे स्त्रीलिंगी शब्द पण ’जोडा’ खणखणींत पुल्लिंगी ! इंग्रजीत Weaker gender किंवा मराठींत अबला असं वर्णन असून सुद्धा ह्या वहाणेला कां बरं स्थानबद्ध केलय ? ’बिचरी स्त्री आधीच परंपरांच्या ओझ्याखाली ’स्थानबद्ध ! ती कुठं जाणार पळून ? पन पुरुषवर्ग भयभीत आहे अनादि काळा पासून.. कारण स्त्रीत्वाच्या शृंखला तोडून, पुरुषांपेक्षा आक्रमक होत, प्रसंगी मानसिक कणखरपणाचा आदर्श घालून देणार्या स्त्रिया अगदी वेदकालापासून आजतागायत सर्वदूर परिचित आहेत. पहिली ऋचा लिहिणारी अपाला. पहिली ओवी-रचिता महदंबा, पतीच्या रथाचं चांक निखळत असतांना, त्याच्या आरीला स्वत:च्या हाताचा आधार, ऐन युद्धभूमींत देणारी कैकयी, झांशीची राणी, अहल्याबाई होळकर, कित्तुर चेन्नम्मा, इंदिराजी गांधी, कल्पना चावला, अगदी परवांपरवां ऑलिंपिक् पदक जिंकून आणणारी मेरी कोम, अशी विविध क्षेत्रांत देदीप्यमान, आणि प्रसंगी तथाकथित ’पुरुषां’नासुद्धा पराक्रमंच्या शतसूर्यांच दीपदान करणारी ही कांही अत्यल्प उदाहरण ! स्त्री-मुक्ती चळवळीची या स्त्रियांना कधीच गरज भासली नाही. ’स्वातंत्र्य मागायचं नसतं तर ते स्वत:च्या कर्तृत्वानं मिळवत, कमावत उपभोगायचं असतं...विरोधकांच परित्राण करीत आणि समविचारी सहकार्यांच्या स्वातंत्र्यावर गदा ना आणता..’ हे सूत्र या सर्व ’भामिनी रणचंडिकांनी कायम उराशी बाळगलं होतं. याच स्त्रीमुक्ती चळवळीच्या सुरुवातीच्या काळांत किंवा आजकाल स्त्रीभ्रूण ह्याविरोधी चळवळीच्या काळांतसुद्धा, एक अतिशय बोलक्या....केवळ दहा सेकंदांच्याच...मूक-चित्रफितीचा उल्लेख केल्यावाचून मला राहावत नाही.. एक नवजात बालिका...निद्रिस्त अवस्थेंतली तिचे कवळेकवळे हातपाय दोरीनं बांधलेले...गोबर्यागोबर्या गालांमधल्या लालचुटुक ओठांवर एक पांढरी चिकटपट्टी लावलेली...असं हृदय दयार्द्रतेनं हेलावून टाकंणार चित्र दृश्यमान होतं सुरुवातीला ! त्या दृश्यांत एक हात प्रवेश करतो आणि हाता-पाया-मुखावरची बंधनं अल्वारपणे दूर करींत, त्या तान्ह्या जिवाला...बालिकेला मुकत करतो... क्या बात है... कशाला हवेंत शब्द हवेंत विरून जाणारे ? वर्षानुवर्ष हा ’दृश्यसंदेश’ माझ्या कालजांत घर करून बसलाय ! मुक्तीची उक्ती । नका करू मूक । स्वातंत्र्याची भूक । क्रांतिची जन्मदा ॥ *****

Monday, August 13, 2012

भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एक आठ दहा वर्षांचा बालक, थेट गाईच्या आचळांना जाऊन भिडला आहे...लुचायला भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ कसे तुवा बापा । सोडिले छकुल्याला । भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ माउलीने त्यास । की रागे भरियेले ? धास्तावून भिडले । कपिलाईस ॥ भुकेजला बाळ । जरी नसे तान्हा । तरी शोधे पान्हा । वात्सल्याचा ॥ जणू देवकीनंदन । यशोदेचा कान्हा । गाउलीच्याही भाना । हरतसे ॥ गाउलीच्या डोळा । ममतेचे आंसू । माउलीसही हासूं । आवरेना ॥ तुम्हाला माहीत आहे, हे चित्र पाहिल्यावर मला काय काय दिसलं ? चित्रांत नसलेला, माजावर येवून उधळलेला ’(अ)राजकी’य बैल, अपप्रवृत्तींचा, विकृती-विकारांचा, पापवासनांचा भारवाही रेडा, ’नेते’पणाच्या टोपीखालचे आणि विविधरंगी ’टिळ्यां’मागचे, जनतेला क्षणोक्षणी कुठल्या ना कुठला कारणाने वेठीस धरून ’गर्तेप्रत’ ’नेते’ झालेले, अभागी जनतेमधलेच कांही महाभागी सर्प सदृश गुंड-मवाली आणि... ’ज्ञानदेव’ नावाच्या पायापासून ’तुकाराम’ नावाच्या कलशधारी मानवता-मंदिरांतल्या, मीरा-सूर-कबीरापासून, सावतामाळी, गोराकुंभात, कान्होपात्रा, जनाई, ’पंढरिनाथ’रूपानं, मुगल दरबारी मोहरा घेवून गेलेला महार, अशा सर्व जाती-चर्म-पंथांच्या संताच्या मांदियाळीपासून ते बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसा आदि, जवळ आलेल्या प्रत्येकाची व्यथा, वेदना, खंत, भीती, गंड जाणून घेत त्यांना धीर देत आश्वासक हात त्यांच्या पाठीवर ठेवत त्यांना ’जीवनमार्ग-प्रदीप’ ठरणारी ही वात्सल्यरूपं ! तस पाहिलं तर भूक कुणाला चुकली आहे ? जे जे अंकुरलय, वाढलंय, उमललंय फुलतय त्या प्रत्येक सजीवाला..इथं वनस्पतीही अभिप्रेत आहेत अर्थातच..भूक, तहान आणि निवारा हे जगण्याला जोडलेले अविभाज्य घटक आहेत. ते मिळवण्यासाठी, उपभोगण्यासाठी, ’उद्या मिळाले नाहीत तर ?’ या भीतीने आजच्या घासांतला भाग बाजूला काढून तो राखण्यासाठी रोज ’अहर्निश’ धडपेड चालते या अवनीवर त्यांची ! कुठे हे चित्र आणि कुठे सततच्या यादवी युद्धांत निर्घृण अत्याचार, छळ करीत, हलाल पद्धतीनं मृत्यूचं थैमान मांडीत, खदखदा हांसत ’तोडलेली’ मानवी मुंडकी शीतगृहांत ठेवून त्यावर रोजची भूक भागविणारा इदी अमीन नावांचा, ’नावालाच’माणूस असलेला कॅनिबल्‌, नराधम. तस बघायला गेलं तर ’इदी अमी” हे कोणा एका व्यक्तीचं नाव नसून, ’संस्कृती’ला जबरीनं आणि जरबेनं ’निवृत्ती’प्रत नेणार्‍या एका प्रवृत्तीचं एक नांव आहे. या प्रवृत्तीला छेद देणारी एक चित्रफीत महाजालावर एका माझ्या मित्रानं पाठविलेली मला पहायला मिळाली आणि मी, ’माणुसकी अजून जिवंत आहे’ या भावनेनं आश्वस्त झालो. ’अरे मानसा मानसा कधी व्हशील म्हानूस ?’ असा आक्रोश करणार्‍या बहिणाबाईनं ही चित्रफीत किंवा त्यांतलं दृश्य पाहिलं असतंतर त्यांतल्या व्यथेची धार थोडी कमी झाली असती असं मला उगाचच आपलं वाटून गेलं ! दक्षीण अमेरिकेंतल्या एका समुद्रकिनार्‍यावर एका हौशी ’व्हिडिओग्राफरनंचित्रित केलेली ही घटना..निळ्याशार सागरलाटांचं दृश्य तो साठवत होता..आणि.. अचानक त्या दृश्यांत लाटांवर ’गटागळ्या’ खात, बहुधा ’वाट’ चुकलेले वीस पंचवीस शार्क्‌सदृश मासे किनार्‍याकडे येवू लागले आणि वाळूंत तडफडायला लागले. हे अतर्क्य, अवचित दृश्य नजरेस पदताच सुरुवातीस अचंबित झालेले, समुद्र-पर्यटनासाठी आलेले तरुण-तरुणी, ललना-बाप्ये, अबाल वृद्ध कांही पळांतच भानावर आले. सुरुवातीस एकानं त्यांतल्या एका माशाला, शेपटीधरून ओढत खोल समुद्रांत नेलं आणि त्याला परत ’जलचर’ केलं. ते पाहून अनेकांची भीती, भीड चेपली आणि मंडळी चक्क, ”संकटनिवारन आणि पुनर्वसन कार्या’ला प्रवृत्त झाली. पाहातांपाहातं सर्व च्या सर्व मासे खोल पाण्यांत जावून आपली ’रोजमराकी जिंदगी’ व्यतींत करायला लागले आणिमग किनार्‍याचर्च्या सर्व विघ्नहारी, संकटविमोचकांनी एकचं जल्लोश केला...स्वत:च्या ’जागल्या’च्या भुमिकेवर पशिसित होत, कुणालातरी ’जगवल्याच्या आनंदांत..हर्षविभोर होत.... तेंव्हा आतां, कान्होपात्रेच्या, ’नको देवराया । अंत पाहु आतां ।’ या टाहोमधले ’हरिणीचे पाडसं । व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले । तैसे देवा ॥’ हे चार चरण, संदर्भाधीन चित्र पाहाता.. ’गाउलीची कांस । तान्हे धरियेली । देखता दहिवरली । देवसभा ॥ इवल्याल्या ओठी । प्रपातला पान्हा । जणू शुष्क राना । हिरवा बहरं ॥ मरणाला आतां । करूनी निवृत्त । बासनी बंदिस्त । ठेवू आम्ही ॥’ असे बदलून घ्यावे की काय असा मोह होतो... खरंच असं होईल ?

Friday, August 3, 2012

’उद्या आयुष्यांतनं उठणार्‍या नऊ गोष्टी’

’उद्या आयुष्यांतनं उठणार्‍या नऊ गोष्टी’ ही ना तक्रार अथवा वेदनांची यादी भविष्यांतल्या बदलांची आहे, नोंद घ्यावी अशी नांदी. पण ढळू नका चळू नका, खुशीत राहा, नि:शंक निचिंत आज तरी सुविधांची आपणा कुणाला नाही भांत आला दिवस मजेंत जगा, बदल तर होतच राहाणार, उत्क्रांतावस्थेंत, या पुढेही मर्कटांची पुच्छ गळूनच जाणार या ’नवां’ची नवलाई बहुधा आतां नुरली नि सरली ’गर’ सगळा संपून गेला आतां फक्त ’सालं’ उरली ..तर.. या, तुमच्या-माझ्या हयांतींत, कुणाला त्याच्यात्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे आवडो वा नावडो, पण कालानुपरर्त्वें लोप पावत जाणार्‍या किंवा परिवर्तन पावत जाणार्‍या नऊ बाबी ’सुख’सोयी, ’रोजमराकी जिंदगी’ सुसह्य करणा‍‍र्‍या सुविधा, ...तुम्ही त्या बदलांसाठी तयार असा किंवा नसा... कुठल्या ? टपाल-कार्यालयहीन संज्ञापनाला सामोरं जायला तयार राहा. कारण त्यांची अर्थव्यवस्था इतकी ढासळलेली आहे कीं त्यांतून बाहेर पडण आणि फार काळ कार्यप्रवण राहाणं त्यांना यापुढ अवघड आहे. ई-मेल्‌, फेड्‌ एक्स्‌ आणि यूपीएस्‌ हया इतकया कमी खर्चिक आणि वेगवान संज्ञापन सुविधांनी, कागदी पत्रांच, टपालानं येणा-जाणार्‍या संदेश वहनाच जग जणू संपुष्टांत आणलं आहे. कारण आज अनावश्यक माहितीपत्रकांचा ’कचरा’ आणि कागदी बिलांची, धूळ खात पडणार अडगळ आणि रद्दी ह्या ’तापदायक’, या सदरांत मोडल्या जाताय्‌त ! धनादेश.. इंग्लंड्‌मधे, इसवीसन २०१८ च्या अखेरीपर्यंत, धनादेशाची बोळवण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत या आधीच. कारण अक्षरश: कोट्यवधी डॉलर्स्‌ केवळ धनादेश वटविण्याच्या प्रक्रियेवर खर्च होण्याचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर दरवर्षी पडतो. क्रेडित्‌ कार्ड्स्‌चा वापर आणि संगणकाद्वारे व्यवहार या दोनीही पर्यायामुळे हळूहळू धनादेशांचा वापर बंद होत चाललाच आहे. आणि पर्यायानं टपाल कार्यालय सुद्धा या मुळं ’कार्यरहित’ होण्याचा संभव आहे. कारण तुम्ही तुमची देयक जर महाजालातर्फे मिळवत आणि भागवत असाल तर मग ती टपालाने देवाणघेवाण करण्याचा प्रयास वाचतो आणि पर्यायानं टपालकार्यालयांच बरचसं काम सुद्धा ठप्प होतं. वृत्तपत्र, नियतकालिक म्हणजेच दैनिक, साप्ताहिकं किंवा मासिकं... तुम्ही सांगा, तरुण पिढीच्या प्रतिनिधींपैकी कितीजन रोजचं वर्तमानपत्र किंवा एखाद नियतकालिक नियमितपणे वाचतांत ? हाताच्या बोटावर मोजण्याइअतके सुद्धा नाही. कारन त्यांना सकाळे उठून घाईघाईनं सगळी आन्हिकं उरकून त्यांच्या ’दफ्तरी’’ दाखल व्हायचं असतं. कुठून बिचार्‍यांना वेळ मिळणार ? कित्येकजण तर मुद्रित माध्यमांशी फारकत घेतलेलेचं असतांत. भविष्यांत ’दूधवाला’ आणि ’धोबी’ यांचीही हीच दशा होणार बहुधा.. म्हनजे तेही ’येणं’ हे लोक बंद करनार...म्हणजे दुधाच्या गोळ्या आंणि ’क्रीज्‌लेस्‌’ कापडाच्या ३/४ चड्या आणि 'टी-शर्टस्‌चा वापर वाढवून.. अहो तुम्हाला चल्त्ध्वनिसंचावर महाजाल उपलब्ध झाल्यावर कोण घरी ’वर्तमानपत्रांच्या घड्या उघदत-घालत बसनार ? उगाच रद्दी.. झालं, ? म्हणजे रद्दीवाल्यांच्या पोटावरसुद्धा पाय.. उध्या प्रकाशक आणि विपनक अ‍ॅपल्‌ सारख्या संस्थांबरोबर हातमिळवणीकरून ’मूल्याधिष्ठित’’ मजकूर-सेवा देण्याची संकल्पना राबवतील.. अं हं त्यांना ती राबवावीच लागेल अन्यथा देशोधडीला लागतील बिच्चारे ! पुस्तकं तुम्हाला वाटतय ना की तुम्ही तुमच्या हातांत पुस्तक घेवून त्याची पानं उलतत आरामांत वाचत पडून राहाल. मलाही, माझ्या आवडीच्या संगीता बद्दल तसंच वाटत होत. की माझ्याकडे ध्वनिचकती असेल आणि मी ती पाहिजे तेंव्हा वाजवून ऐकू शकेन. आणि तसं होतही होतं पण जोप्र्यंत मला आय%% ट्यून्स्‌वर, जवल जवल निम्म्या किमतींत तीच गाणी.. अगदी अद्ययावत.. ’उतरवून घेण श्यक्य झालं नव्हतं किंवा ते तंत्रज्ञान माहीत नव्हतं तोपर्यंत. आणि ते सुद्धा घराच्या बाहेर न पडता, विनासायास ! पुस्तकांच्या बाबतींतसुद्धा... माझ्याकडून लिहून घ्या की..तुम्हाला तोच अनुभव येणार आहे नजिकच्या भविष्यांत. विनासायास, घरबसल्या, महाजालांतल्या पुस्तकांच्या दुकानांत जावून पुस्तकांचे अभिप्राय, परीक्षणांचा तौलनिक अभ्यास करून, तुम्ही पाहिजे ते पुस्तक, निम्म्याहून कमी किमतींत वाचू शकणार आहांत महाशय ! आहांत कुठं ? फरक एवढाचं की पानं बोटांनी ’उलटा’यच्या ऐवजी तुम्हाला ती ’क्लिक्‌’ करायला लागणार आहेत. तुम्ही त्या मजकुरांतल्या आशयाच्या मध्यभागी विराजमान होत, आपण पुस्तक हातांत धरण्याऐवजी संगणक’ नावाच्या एका सुविधे समोर बसलो आहोत याचं कालांतरानं विस्मरण होणार आहे तुम्हाला, आणि एक दिवस या सवयीचेही गुलाम होणार आहांत. सर्वसामान्य दूरध्वनिसंच जोडणी: जर तुमचं कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीचं नसेल आणि तुम्ही दिवसांत, दूरध्वनिसंचाचा स्थानिक संपर्कासाठी खूप उपयोग करीत नसाल तर अशा परिस्थितींत, तुम्ही सर्वसामान्य दूरध्वनिसंच जोडणीऐवजी साहाजीकच, चलत्ध्वनिसंचालाच पसंती देणार ना ? कांही लोक केवळ ’सवयी’नं अशी जोडणी ठेवतांतही, पन त्यांच्या हे लक्षांत येत नाही की कांही अनावश्यक सेवांसाठी उगाचच त्यांना शुल्क भरावे लागतं. आणि बहुतेक सर्व चलत्ध्वनिजोडणीसंस्था तुम्हाला त्याच दरांत संपर्काची सुविधा देतांत. संगीत: नवनवीन संगीतकार गायक विविधप्रकारच्या सादरीकरणाचे अनेकविध आणि खरोखरंच अप्रतिम प्रयोग करून पाहाताहेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, महाजालावरच्या उपलब्ध सण्गीताचं बेकायदेशीर ’अपहरण’ आणि वापर यामुळं ही सगळी सर्जकता, प्रयास वाया जातांत की काय अशी भीती वाटण्याइतकी परिस्थिती गंभीर झाली आहे. सद्यस्थितींत संगीत-तबकड्या निर्मिती संस्थांनासुद्धा पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही आणि आणि चित्रवाणीच्या ’आक्रमणा’मुळं ’ध्वनिप्रक्षेपणा’ला श्रोता नाही. हव्यास यशस्वितेचा आणि मत्सर, यशस्वी झालेल्यांचा अशी दुधारी तलवार चालतेय ती मात्र सुरां’वर. शिवाय जुन्या जमान्यांतल्या गायक-गायिकांची गीतं अजून श्रोत्यांच्या मनांत रुंजी घालतायत हे आणखी एक कारण. संगीत मैफिलींची अवस्था याःउन कांही वेगळी नाही. या विधानांच्या पुष्ट्यार्थ, स्टीव्ह नॉपर्‌चं, स्वनाशाचा हव्यास.. "Appetite for Self-Destruction" हे पुस्तक वाचणं आणि "Before the Music Dies."या शीर्षकाचा एक लघुपट तुम्ही बघण आवश्यक आहे असं मला वाटतं ! चित्रवाणी: महाजालावर उपल्ब्ध असलेल्या कथापटांच्या प्रवाहा.. अं हं. धबधब्यामुळं लोकांचं त्यासाठी चित्रवाणीच्या छोट्या पडद्याला शरण जाणं, चित्रपटगृहांत तिकिटं काढून जाण्यापाठोपाठचं बंद झालय जवळ पास ! शिवाय चित्रपटांव्यतिरिक्त, विविध मनोरंजक खेळ..आणि ’बरंच’कांही संगणकावर केवळ कांही ’क्लिक्स्‌’च्या अंतरावर हात जोडून उभं असतांना कोण फुकाचे कथापट पाहाणार ? praaim^^ Taaim^^' असा आता मुळी राहिलाच नाहिये..शिवाय चित्रवाणीच्या पदद्यावरचे तद्दन भिकार कथापट, दरचार मिनिटांनी चार मिनिटे पहाव्या लागनार्‍या निरर्थक, निरुपयोगी जहिराती यांचा उबग आतां सर्वसामान्य जनतेला येवू घातलाय. आतां हळूहळू चित्रवाणी वाहिन्यांनी गाशा गुंडाळायला हवा कारण ’त्यांना’ पाहिजे ते प्रेक्षकांनी बघण्यापेक्षा, प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचं मनोरंजन निवडण्याचं स्वातंत्र्य संगणकीय महाजालाच्या क्षितिजावर तळपायला लागलय ! ’तुमच्या’ मालकीच्या कांही गोष्टी: तुमच्या खास खाजगी अशा कांही वस्तू, गोष्टी, बाबी ज्या आजही तुमच्या घरांत अस्तित्वांत आहेत, त्या कदाचित उद्या तिथं नसल्या तर चक्रावून जावू नका. तुमच्या संगनकाची Hard-drive, तुमच्या संगणक प्रनाली ज्याचांत आहेत आणि ज्या तुम्ही पाहिजे तेंव्हा संगणकाच्या Hard-driveमधे समाविष्ट करू शकता त्या तुमच्याकडच्या CD,DVD वर असतील ना ? पण आतां ‘आपल्‌. माय्‌क्रोसॉफ्ट्‌, गूगल्‌ सारख्या संस्था यापुढ त्यांच्या सेवा बंद करतील आणि तुम्ही तुमचा संगणक सुरू केलांत की महाजालच एक सेवाप्रणाली म्हणून काम करायला लागेल आणि विंडोज्‌, गूगल्‌, मॅक्‌OS वगैरे सगळे महाजालाचे गुलाम होतील. तुम्ही एखाद्या चिन्हावर क्लिक्‌ केलंत की महाजालाचं महाद्वार उघडेल आणि कांही ’वाचवायचं’ असेल तरीही महाजाल त्याचं ग्रहण करून त्याला ’ग्रहण’ लागणार नाही याची काळजी घेईल. अर्थांत ’ते’ या महाजालावरच्या अब्जावधीगोष्टींम्धे हरवून जाईल कां ? ’आपल्या’ असनार्‍या बहुतेक गोष्टी कचर्‍यासमान होतील कां.. आणि छायाचित्रांचा तुम्ही जपलेला संगेह, जपलेल्या पुस्तकांतलं मोराचं पीस किंवा जाळीदार पिंपळ पान, एखादी महत्वाची CD ? या अमूल्य गोष्टी, ज्यांच्याशी तुमच्या अलवार भावना निगडींत आहेत त्यांचं काय होईल ? माहीत नाही... आणि शेवटी.. अर्थातचं ’स्वत्व’ ’सत्व’ आणि ’संपृक्तता’ गतस्मृतींत रमण्याचा आनंददायी अनुभव, स्वत:शी जपलेले अनमोल क्षण, त्यांचा पुन:प्रत्यय नाही तरी आठवणी, हे आपलं नेहमीचाच एक स्वप्न, असोशी असते. ते ’खाजगी’ पन आतां संपलच आहे. कारन बारा महिने चोवीस काळ तुमच्या अवतीभवती, रस्त्यावर, घरांत तुमच्या संगणकावर, चलत्ध्वनिसंचाचर छायक तुमच्यावर पहारा देताहेत. तुम्ही कुठे आहांत, काय करतां आहांत, अगदी अक्षांश-रेखांशासह ठिकाणाच्या अचूक माहितीसह तुमचं ’स्वत:’शी असण, तुमच स्वत:चं अवकाश ओरबाडताहेत. तुमची खरेदी, तुमच्या सवयी लकबी, या सगळ्यावर ’त्यां’चं नियंत्र्ण असणार आहे. तुमची खरेदी. पसंती ’ते’ बदलतील किंवा अगदी रद्द सुद्धा करतील उद्या...! आहांत कुठं ? फक्त एकच गोष्टं आपल्या ताब्यांत राहाणार..अगदी खात्रीपूर्वक...म्हणजे आपल्या ’सुवर्णमूल्य स्मृती. असो.. हे ही नसे थोडके.. पण सावध.. उद्या ’अल्झाय्‌मर्स्‌’..डिम्नेशिया किंवा ’स्मृतिभ्रंश’ त्यां पासूनही तुम्हाला वंचित करू शकेल ’स्मृतिभंशात्‌ बुद्धिनाशो बउद्धिनाशांत प्रणश्यती’ ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Sunday, July 29, 2012

ए मित्रा !

ए मित्रा तू कांही लोकांसाठी किती, अनमोल, ’खास व्यक्ती आहेस, माहीत आहे तुला ? तुझा नुसता आवाज त्यांच्या आयुष्य़ांतले कांही क्षण आनंदाने उजळून टाकतो..आणि मग तुझं दर्शन..किंवा सहवास जर मिळाला त्यांना तर काय होईल त्यांचं ? जरा विचार कर ! तू नेहमीच तुझ्या सहकार्‍यांना, सहाध्यायांना, सहप्रवाशांना खूपच उत्थापन देवून त्यांच तुझ्या जगण्यांतलं स्थानं किती महत्वाचं आहे हे जाणवून देतोस. त्या पैकी प्रत्येकजण तुझ्या या वागण्यामुळं मनोमन सुखावलेला असतो ...आणि ते सुखावण त्यांच्या चेहेर्‍यावर नेहमीच मंद स्मिताच्या रूपानं दिसतं. अनेकवेळा ते कांही कारणांनं व्यथित असतांना, तुझा साधा, ’कस काय पावनं, बरं हाय ना ?’ असा सर्वसामान्य चौकशी करणारा निरोप जरी त्यांना मिळाला तरी ते पतर उत्साहित होतांत आणि कांहींच्या चेहेर्‍यावर चक्का हसू दृग्गोचर होतं.. मित्रा ! ठावूक आहे.. तुझ्याजवळच्याअ सगळ्याचा त्यांच्याबरोबर उपभोग घेतांना तुझे आभार वगैरे मानण्याचा प्रपंच उगाच ते करीत नाहीत..कारण त्यांना माहीत आहे की तुझं-त्यांचं नातं हे कधीच औपचारिक नव्हत, नाही आणि नसणार आहे तू त्यांना किती आवडतोस हे कधी तुला त्यांनी तोंड उघडून शबदांकित केलय ? नाही ना ? तेच कारण आहे... आणि तेच मी तुला सांगतोय या क्षणी .. स्नेहा शिवाय आणि स्नेह्याशिवाय जगणं शय्क्य आहेकां ? सांग बरं तूच.. म्हणून...आपलीमैती आहे..आपण दोस्त आहोंत एकमेकांचे यापरतं सुख-आनंद-समाधानदायी काय असूं शकत.. सांग मित्रा ?

Thursday, July 26, 2012

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा’ ***** जे जे जगी या जन्मते, उमलून फुलते, बहरते कालापरत्वे शुष्क अन्‌ निष्पर्ण होवुन संपते... चुकले कुणां कां हे कधी, जरि होतसे परमावधी वय जाय पुढती हर क्षणी, ’लय’ साधतो बेसावधी, म्हणुनी कुणी कां थांबती, शिर धरुनी हाती बैसती, बेतून कार्य नि योजना, धरती असोशि नि, धावती उलटली साठी तरिही अजुन यौवनांत मी... अशी भूमिका ठेवून वागा, हा एक सल्ला..कदाचित अनाहूत असेल, पण सार्थ आहे. हजारो वर्ष जगलेले वृक्ष या अवनीवर अजून आहेत, पण आवघी शंभरी गांठलेली कितीशी माणसं आहेत ? लाखांत एखादांच वयाची शंभरी गाठतांना, ओलांडतांना आपल्याला दिसतो, कळतो किंवा फारच क्वचित, आपल्या परिचितांपैकी असतो. तुम्ही नव्वद वर्ष जगलांत तर तुमच्या पदरी दहा वर्ष शिल्लक असतांत..आणि ऐंशी वर्ष जगलांत तर अर्थातच, आणखी वीस वर्ष वाट पाहायची असते. जर ’जायच्या’ आधी तुम्हाला फक्त कांही वर्षांचच आयुष्य उपभोगायला मिळणारं असलं आणि ’जातांना’ तुम्ही इथून ’कांऽऽऽहीऽऽऽही’ घेवून ’जाऊ’ शकणार नाही आहांत याची खात्री... अं हं ! ते एक त्रिकालबाधित सत्य असल्यामुळे, तुम्ही कंजूषपणे वागून कांही साध्य होणार नसतं.म्हणून.. पैसे खर्च करा, मौजमजा पुरेपूर करून घ्या, घ्यायचे राहिलेले आनंद या उर्वरित उतारवयांत जमतील तसे, तेवढे उपभोगून घ्या, त्यांतून शिल्लक राहिलंच तर ’सत्पात्री’ दानं द्या, पण आयुष्यभराची सग्गळी कमाई, पुत्र-पौत्रांच्यानांवे करू नका, जर त्यांना परावलंबी झालेलं तुम्हाला पाहायचं नसेल तर... तुम्ही ’गेल्यावर’ काय होईल याची चिंता करीत बसूं नका. कारण त्यावेळी खालेल्या तुमच्या चिमुटभर राखेला, राग-लोभ, प्रशंसा-निर्भत्सना, स्तुती-नालस्ती यांची जाणीवच नसणाराय्‌ मुळी ! मुलांच्या चिंतेचे, काळजीचे गुलाम होवू नका, कारण त्यांचं नशीब तुम्हीच काय कोणीच बदलू शकणार नाही. ते तर, जसे तुम्ही वाढलांत जगलांत तसेच त्यांच्या पद्धतीनं वाढणार, जगणार आहेत. तेंव्हा व्यर्थ, फुकाचं मानसिक ओझं कशाला ? मुलाबाळांच संगोपन करतांना, त्यांच्या बालपणी त्यांना काय हवं नको ते बघतांना, कोडकौतुक करतांना, त्यांच्या बद्दल फार अपेक्षा बाळगायची अक्षम्य चूक कधीही करू नका मित्रांनो ! कारण येणार्‍या ’उद्यां’ ते त्यांच्या आयुष्याशी झगडण्यांत, कर्तव्यांच पालन, उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करण्यांत, , कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यांत व्यग्र असणार आहेत. जेआपल्या अपत्यांबाबत हे करणारनाहीत त्यांची अपत्य त्यांच्या ’असले’पणींच ’वडिलोपार्जिता’वरून वादविवाद, वितंडादि आयुध एकमेकांवर उगारणार आहेत, आणि तुमच्या ’महानिर्वाणा’ची प्रतीक्षा करण्यांतच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यतां मानणार आहेत. तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे तेच फक्त वारस आहेत याबाबत तुमच्या मुलाबाळांना हक्काची नुसती हमींच नाही तर शतप्रतिशत निश्चितीच असते. तुमच्यासारखा साठ्योत्तर ’वर्धिष्णु’ स्वत:च्या ’आरोग्य-संपदा’ या पैकी कशाचीही देवाणे-घेवाण करण्यापलीकडे पोहोचलेले असतांत. कारन आरोग्य हे कधीच पैशांनी विकत घेता येत नाही, हे तुम्हाला एव्हांना पटलेलं असतं. आतां पैसा.. मग तो किती मिळवायचा ? लाख ? दहा लाख ? कोटी ? दशकोटी, अब्ज ? हा ज्याचा त्याचा प्रष्ण आहे. पण एक कायम ध्यानांत ठेवलं पाहिजे आपण सर्वांनी की एक हजार एकर उत्तम प्रतीच्या पिकाऊ जमिनीमधे घेतलेल्या भात पिकापैकी एकट्याला फक्त तीन भांड्यांचा शिजवलेला भात एका दिवसांला, आणि हजारो महालांची मालकी जरी तुमच्या गांठी असली तरी केवळ बहात्तर चौरस फूट जागा तुम्हाला रात्री झोपण्यासाठी लागते. आणि जोवर, तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पुरेस अन्न मिळतय आणि तुम्ही जवळ पुरेसा पैसा बाळगून आहांत तर मग तुमचं उत्तम चाललं आहे असं म्हेणायला हरकत नसावी, नाही कां ? म्हणून आनंदी, प्रसन्न राहा. अडचणी कुणाला आणि कुठल्या कुटुंबांत कुरबुरी नसतांत ? दुसर्‍यांच्या आमदनी, लौकीक, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी स्वत:च्या तत्सम बाबींची तुलना करीत बसूं नका. पुढची पिढी किती यशस्वी होते आहे, मुलाबाळांच्या प्रगतीचा आलेख उद्‌गामी आहे की नाही याकडे बारकाईने लक्षपूर्वक नजर ठेवा. आणि दुसर्‍यांच्या आनंद, प्रकृती आणि दीर्घायुष्याचं गमक साध्य करायचा प्रयत्न करा. जे बदल करणं तुमच्या आवाक्याबाहेरचं असेल त्यांच्या फंदात उगा पडू नका. तो वेळेचा अपव्यय तर ठरेलच आणि तुमच्या अनारोग्यालाही कदाचित कारणीभूत ठरेल. तुम्हाला स्वत:लाच अखेर ’स्वांत:सुखाय’ जगण्याचा आणि संतोष मिळवण्याचा प्रयास करावा लागेल. तुमच्या चित्तवृत्ती जोवर प्रसन्न आहेत, तोपर्यंत ’गोड गोष्टी’, बकुळिच्या तळाशी मिळतांत तशा सुगंधित स्मृतींचीच कांस धरा. स्वत:ला ’छान’ वाटेल अशा काहीतरी कृती, कर्तव्य, समाजकार्य रोज करायची सवय अंगवळणी पाडा. गंमत असते त्यांत आणि वेळही छान जातो हा एक ’बोनस्‌’ फायदा.. एक दिवस ’आला तसा गेला’ तर तुमच्या साठ्यांतला एक दिवस ’कमी’ झाला, तोच दिवस तुम्ही ’आनंदमयी’ केलांत तर तुम्हाला तो ’मिळाला’ असंहे साधं गणित आहे ! ’प्रसन्नवदना’ला रोगराई सुद्धा वचकते, आणि लांब प्ळते, ’ साजिरे’ असाल तर व्याधी लवकर बर्‍या होतांत, आणि दोन्ही... म्हणजे आनंदी आणि खुशहाल असाल तर आजारपण येतच नाही. शिवाय उल्हसित चित्तवृत्तीनं, स्वच्छ सूर्यप्रकांशांतला व्यायाम, न्याहारींत आणि भोजनांत पुरेशी जीवनसत्व, क्षारं असलेले, विविध ’जायका’वाले पदार्थ यांचा समावेश केलांत तर, खात्री बाळगा की पुढची वीस-तीस वर्ष तुमच्या आरोग्याला कांऽऽहीऽऽही धोका नाही. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे स्वत:च्या आजूबाजूला बहुतेक वेळ ’आनंदविभोर’ वातावरण राहील याची दक्षता घ्या. आणि मित्रमंडळ ? त्या शिवाय आयुष्य असूंच शकत नाही कोणाचं खर की नाही ? तो एक महत्वाचा ऊर्जास्रोत असतो रोजच्या जगण्यांतला. त्यांच्या आणि त्याच्या शिवाय अस्तित्व ? उघड्याबोडक्या माळावरच्या एकाकी, शुष्क, निष्पर्ण वृक्षासारखं ! त्याला काय असंणं म्हणायचं ? अहो म्हणून ठेवल ना..कुणीतरी.. ’निदकाचे घर (सुद्धा चालेल एकवेळ, पण), असावे शेजारी’ तेंव्हा.. शुभेच्छा... हो, आणि ’साठ्योत्तरी’ साजर्‍याकरणार्‍या तुमच्या सुहृदांना ही ’विचार=आहेर’ नक्की द्यायला विसरू नका !!

Sunday, July 22, 2012

’विश्वात्मकता..’

’विश्वात्मकता..’ विश्वात्मकता म्हणजे नेमक काय ? सामान्यत: रुचू-पचू शकणारी व्याख्या बहुधा हीच असावी... माझ्या माफक बुद्धीला आकलन होत असलेला किंवा झाला असलेला, विश्वात्मकतेचा अर्थ असा... प्रष्ण: वैश्वकतेचा तंतोतंत, शब्दश:, अचुक, नेमका अर्थ काय ? युवराज्ञी डायनाचं ’महानिर्वाण’ (आता अपघाताला महानिर्वाण म्हणायच कीाही हा ’ज्याचा त्याचा प्रष्ण’, पण व्यक्ती महान म्हणजे ’निर्वाण’ सुद्धा ’महान’च असणार, नाही का शाब्दिक त्रैराशिका प्रमाणे ?) आतां हे कसं हे सांगण क्रमप्राप्त झालं...असो पाहूया हं ! उत्तरादाखल ’दाखल’ केलेली विधान माझ्या प्रिय वाचकांनो काळजीपूर्वक अभ्यासा.. युवराज्ञीचा नित्र होता इजिप्शियन. दोघेही Pleasure Drive साठी एका जर्मनींतल्या स्वयंचलित वाहन निर्माण संस्थेनं दच्‌ इंजिन वापरून साकारलेल्या आणि एक ’पियक्कड’ बेल्जियन चालक चालवीत असलेल्या ’कार’ मधून जात असतांना फ़्रेंच बोगद्यांत (French Tunnel) कशालातरी धडकले आणि दोघांच्या हृदयाची धडकन ’विझूविझू’ पावायला लागली. गंमत म्हणजे...खरंतर या मधे गमतीशीर वगैरे म्हणून वर्णन करण जरा जास्तच ’क्रूर’ वगैरे ठरेल, पण दुर्दैवानं ते खरं आहे असं न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षावरून सिद्ध झालं..त्या चालकानं प्यालेली ’वारुणी’ स्कॉट्‌लंड्‌ मधे तयार झालेली होती. त्या दोघांवर’ करडी नजर’ ठेवायला...गुप्तहेरच म्हणाना...इटालियन ’पापाराझ्झीं, जपान मधल्या स्वयंचलित दुचाकी-निर्मिती संस्थेनं कौशल्यपूर्ण बांधणी केलेल्या दुचाकीवरून पाठलाग करीत होते. अपघातग्रस्ततेनंतर, दोघांवरही ऑस्ट्रेलियन शल्यचिकित्सकानं, ब्राझीलि औशधींचा वापर करून उपचार सुरू केले.. पण.. हाय रे दुर्दैवा... असो.. ही माहिती एका मलेशियन्‍६ नागरिकानं अमेरिकेतल्या विख्यांत माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञानं विकसित केलेलं तंत्रज्ञान वापरून संगनकाच्या महाजालांत गोवली.. आणि तुम्ही ज्या संग्णकसंचावर ती पाहात आहांत, ज्यांत तैवानमधे बनविलेल्या Micro-chips वापरलेल्या आहेत, आणि, ज्याचा पडदा (Monotor), कोरियांततला आहे, तो बांगलादेशी कारागिरांनी सिंगापुरमधल्या एका कार्खान्यांत ’विणला’ (विणणे म्हणजे जन्म देणे या अर्थी) आहे. नंतर तो भारतीय, अवजडवाहनचालकांनी त्यांच्या वाहनांतून एका ठिकाणेहून दुसर्‍या ठिकाणी नेत असतांना इंडोनेशियन दरोडेखोरांनी पळवून, व्हिएतनामी कोळ्यांकडून बोटींवर चढविला आहे, ज्या बोटी म्यानमारमधल्या अतिक्रमित, बेकायदा नागरिकांनी पुढे, त्यांच्या वाहनांतून वाहिला आहे. तर मित्रांनो.. याचं नावं वैश्विकता... कळ्ळं ? *****

Saturday, July 14, 2012

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’ ***** येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाउस आला मोठा येग येग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून तान्ह्याला रिझवण्यासाठी मराठी माय, अडगुलं मद्डगुलं बरोबर पावसाची पण आठ्वण काढतेच पण यंदा ही बडबड गाणी बदलून ये ना बाबा पावसा, जीव वाटे जाईसा अंदाज ठरतो खोटा, उगा करत्यांत बोभाटा ये बाई सरी, मडके अर्धे तरी भरी सर भाव खाऊन, बसली कुठं जाऊन ? अशी म्हणायची वेळ आली आहे. एकेकाळी... फार कशाला ? अगदी मागल्या वर्षीसुद्धा आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंग रानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग, ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ प्रत्येक हृदयी ठाकला, वाकला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ ’विका भांडीकुंडी, भाकर घ्या हाती, पोराले शिकवा बापडे हो !’ डेबूजी सांगूनी गेला तरीही ही मानसं आंधळी असी कां हो ? असा असायचा... असो... पण काय गंमत आहे अबाल वृद्धांना वेग वेगळ्या कारणांसाठी पाऊस हवा-नकोसा असतोचं अष्ट नायिकांपैकी कुणी विरहिणी, ऐ सावन तूं इतना ना बरस की वो आना सके और उनके आनेके बाद इतना बरस की वो जा ना सकें अशी दुहेरी विनवणी सुद्धा करायला मागे पुढे पाहात नाही. ऐतिहासिक काळांत कदाचित या ’लहरी राजा’ ला वेसन, तानसेन सारखे गायक घालू शकत असतील कदाचित पण आजकालं ढगांवर रासायनिक फवारणी करतांत म्हणून ’मेघराज’ फिरकतच नाहीत त्याचं काय ? कवि मंडळींचं कवित्व तर पावसावरची एखादी तरी कविता केल्याशिवाय पूर्णत्वाला पोहोचतच नाही पाऊस कुणालाही भुरळ घालतो. अगदी डॉ. वसंतराव पटवर्धन...महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष सुद्धा या मोहांतून सुटले नाहीत. विविध ऋतूंवर त्यांनी लिहिलेल्या गीत-समूहांत, वर्षाऋतूच स्वागत करतांना, अवचित आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, आपल्या सखीला त्यांची गीत-नायिका, मोहरून म्हणते, आला पाउस नव्हे नव्हे ग जिवलग आला घरी अंगांगावर आषाढाच्या, नव्हे सुखाच्या सरी कविकुलगुरु कालिदासाच्या मेघदूताचं भाषांतर, रुपांतर करण्याचा मोहसुद्धा असाच मोठमोठ्या साहित्यिकांना पडला. शेलेनं डोक्यावर घेवून नाचत ’जगांतलं सर्वश्रेष्ठ’ प्रीत महाकाव्य’ म्हणून गौरविलेल्या या महाकाव्याचा नायक एक शापित यक्ष. वैशाखवणव्याच्या काहिलीनं तनाची आणि पत्निविरहानं मनाची लाहीलाही झालेला आणि त्यामुळं मंदमंद झुळुकांच्या शोधात पर्वतारोहन करीत हिंडतांना,त्याला दिसला, विदर्भांतल्या रामटेकच्या नगाधिवरून आपल्याच तंद्रींत, पूर्वोत्तर वाहाणार्‍या मरुत्‌वेगावर स्वार होत, विहरणारा एक पांढरा-भुरा मेघ. त्या मेघांचा हृदयस्थ ओलावा आणि स्वत:च्या विरहव्याकुल अवस्थेंतल्या अश्रुपाताची दखल घेण्याची त्याची क्षमता यामुळच ’आपली व्यथा आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचविण्यासाठी, सांगावा धाडायला हाच दूत योग्य आहे’ याची खात्री त्याला पटली असावी. त्या महाकाव्याच्या पहिल्या कांही श्लोकांच, त्यांच्या ’गीत-मेघ’ या काव्यसमूहांत रूपांतर करतांना, डॉ. वसंतराव पटवर्धन लिहितांत, आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला म्हणुनिया विनवित मेघा तुला बाकीबाब बा.भ. बोरकर तर गोव्याच्या यक्ष भूमींतले, त्यांच्या शब्दाशब्दातून संस्कृतप्रचुर भाषालावण्य मिरवत आशयघन बरसलेले आपण पाहिलेश-ऐकलेले आहेत. पुलंनी १९८० ्मधे फिल्म्‌ इन्स्टिट्यूट्‌च्या कलागारांत, दूरदर्शनसाठी एक मुलाखत घेतली होती कविवर्य बोरकरांची. तींत ’बाकीबाब’ इतके धुंवांधार बरसले की पुलं सारख्या कसलेल्या निवेदक-सूत्रसंचालकालाही, मंचावर कुठं आसरा शोधावा याचा प्रष्ण पडला ! घन बरसे रे घन बरसे.. नं सुरुवात झालेली ही बरसातीची सांगता सरिवर सरी आल्या गं सचैल गोपी न्हाल्या गं असं आपल्याचं तंद्रींत गांत बोरकरांनी केली तशीचं, अण्णा ग.दि.माडगुळकर..बाबूजी अण्णा सुधीर फडके-आशातईंनी अजरानर केलेलं, चार वेगवेगळ्या अंतर्‍यांना वेगवेगळ्या, रागसंगीतावर आधारित स्वररचनेनं सजविलेलं आज अचानक या धरणीवर गरजत यावी वळवाची सर तसे तयाने गावे आज कुणितरी यावे किंवा घनघन माला नभी दाटल्या, कोसळती धारा.. हे चित्रपट गीत किंवा मृच्छकटिक मधे अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येवुनी बिलगति आवेगाने तेचि पुरुष दैवाचे ही स्त्री-लोलूप ’पुरुषी’ आग जागविणारं नाट्यपद, आपण विसरूं शकतो ? दशरथ पुजारी-सुमन कल्याणपुर जोडीचं.. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशांत प्रियाविण उदास वाटे रात हे गीत, किंवा, मंगेश पांडगांवकर-श्रीनिवास खळे-लता मंगेशकर त्रिकुटाचं श्रावणांत घन निळा बरसला रिमझिम रेशिम धारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ह्या रचना शब्दावली, स्वरावली नाहीत नुसत्या तर आपल्या आयुष्यांतल्या कितीतरी नाजुक, भावुक, व्याकूल क्षणांच्या स्नृती ताज्या राखणार्‍या नादावली आहेत. ’कॉफी हाउस‌, कॉफी हाउस‌..प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस’ शांताबाईं शेळक्याकडून, अश्याच कुठल्याशा गप्पांच्या मैफलीत ऐकलेला ’हायकू’...एक जपानी काव्य प्रकार .. ’हायकू’ म्हणजे क्मीत कमी शब्दांत, विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणार्‍या पंक्ती. खरंच, ह्या नियमानं आपलं रोजचं जगण म्हणजे, विविध इंद्रधनुषी रंग घेवून येणार ’कॉफी हाउस्‌’च असतं की... अगदी अंकुरण्यापासून, निर्वाणापर्यंत कितीतरी रंग... सुख दु:खाचे, रागा लोभाचे, मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे... घडण्या बिघडण्याचे, मीलनाचे, ताटातुटीचे, प्रेमाचे, विरहाचे बघणारे डोळे आणि आणि त्यामागची ’नजर’, आणि त्याही मागच्या मनाची, त्या विशिष्ट वेळची धारणा...’Mood' म्हणू हवंतर... यावरचं ठरतं त्या रंगांच गडद किंवा फिकेपण...नाही का ? लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे बिंबाच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे, फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग... दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे, उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग... मग माझ्या एका मैत्रीणीनं, ’मी टीव्हीचे कार्यक्रम बघते’, म्हटलं तर कुठे बिघडतं ? ’काय बघतेस गं परी तू ?’, ’मला ? मला ना, घरांतल्या, माझ्या खोलीच्या खिडकीशी हातांत, स्वत: केलेल्या वाफाळत्या कॉफीचा कप्‌ घेवून बाहेर ’बघतां’ना गडगडणारे ढग, कडाडणार्‍या विजा, श्रावण सरींतून मधेच येणारं आश्वासक ऊन...शाळेंतून परत आल्यावर दूधबीध पिऊन, ओठ फ्रॉकच्या बाहीनं पुसत, शेजारी, पैंजण वाजवत येणारी मिनी...मालकीण घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी, ’मिशू’...कमरेला लवलेला चांदी्च्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येवून, मिनीला हाक मा्रणारी तिची आई...सगळ दिसतं मला अरुण...!’ खिडकींतून, पावसांत खाली हुंदडणारी मुलं दिसतांत तिला, एकदम वर आभाळाकडे बघत, ओरडत नाचायला सुरुवात करतांत ती... ’परी’पण वर ’बघते’... आणि चक्क ’इंद्रधनुष्य’ दिसतं की हो तिला... काय म्हणावं या पोरीला ? तिनं आम्हा, ’डोळस आहोत’ असा भ्रम असणार्‍यांना कधीचं, चारी मुंड्या चीत केलय जगण्याच्या मैदानांत जगण्याच्या तिच्या ’कॉफी हाऊस्‌’मधल तिच ’टेबल्‌’, तिन बरोबर दरवाजा ’दिसेल’ अशा पद्धतीनं, ’अतिथिभिमुख’ निवडलय आणि खुर्चीचा कोन असा साधलाय की येणार्‍या जाणार्‍याचं, प्रसन्न मुद्रेनं स्वागत करताकरता ती, त्यांच्या भावविश्वांत हळूचं दाखल होवून मनांतला आनंदविभोर, प्रसन्न, बरसणारा, कोसळणारा पाऊस.. तो थांबल्यावर घरंग्ळणार्‍या पागोळ्या... सगळ सगळं त्यांच्या अंगावर उधळूं शकेल... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com

Thursday, July 5, 2012

’धाडसी पण आवश्यक..’

’धाडसी पण आवश्यक..’ हिंदुस्थानावर, पूर्व-पश्चिम अशा दोनीही बाजूंनी कुरापती काढत, कायमचं दुखणं बनण्याचे पाकिस्तानचे मनसुबे, ’भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू कांठी ॥’ या संतश्रेष्ठ सुकाराम महारांच्या ओवीप्रमाणे, प्रमाणाबाहेर चालविलेल्या पाकिस्तानच्या माकडचाळ्यांनी त्रस्त होवून तत्कालीन पूर्वपाकिस्तानमधल्या असंतोषाचा अत्यंत चतुरपणे फायदा उठवत, कै. इंदिराजींनी, अक्षरश: उभे चिरले. आंतरराष्टीय स्तरावर खळबळ माजविणारा हा धादसी निर्णय, त्यांच्या इतक्या समर्थपणे कोणी अन्य नेत्याने...पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांशिवाय...घेतला असतां कां ? ह्या विषयी शंकाच वाटते. ९/११ ला अमेरिकेवरील दहशतवाद्यांनी केलेक्ल्या हल्ल्यानंतर, आणि त्यानंतर अफगाणिस्थानवर अमेरिकेनं, अतिरेक्यांना त्यांच्या बिळांतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या तळावर केलेल्या पूर्वादेशित ड्रोन क्षेपणास्त्र हल्यानंतर वैश्विक स्तरावर दहशतवादी आणि अतिरेकी यांची दहशत इतकी वाढली की शांतताप्रिय राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान एकत्रित आणि उघडपणे हे छळसत्र संपविण्यासाठी कटिबद्ध झाले. त्यांतून एखादी महिला राष्ट्रप्रमुख असली तर ती जरा जास्तच आक्रमक असते (कारंण मादीच फक्त आपल्या पिलांच्या संरक्षणाबाबत इतकी कठोर आणि क्रूर होवू शकते) की काय अशी धरणा पक्की करीत, एक जहाल भाषण, एका, सलग दुसर्‍यांदा नवनिर्वाचित राष्ट्रप्रमुखानं केलं. ओह ! क्या बात है ? तिनं हे पुन्हा एकदा सत्यांत उतरवून दाखवलं. ऑस्ट्रेलियानं नाही म्हटलय. दुसर्‍यांदा..हे तिनं खरं करून दाखवलय ! स्वतंच्या कठोर वागणुकीच्या पवित्र्यांतून ती कदापीही मागं हटणार नाहीये ! आणि स्वदेशवासियांच्या ह्क्काबद्दलच्या तिच्या जागरूकतेला दाद द्यायलाच हवी आपण सर्वांनी ! एखादी स्वच्छ, थंडगार वार्‍याची, वेलींवरच्या ताज्या फुलांचा सुगंध लेवून आलेली मंद झुळूक अंगावर सुखद शहारा आणत आणि मनाला आश्वासक सहारा देत प्रसन्न करीत अलवारपणे कळत नकळत, आसमंत व्यापावी तस कांहीसा निर्णय ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री महोदयांनी घेतलाय ! विश्वांतल्या यच्चयावत राष्ट्रांना सध्या अशा पुढार्‍यांची नेत्यांची गरज आहे. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री ज्यूलिया गि्लार्ड्‌. मुस्लिम शरियतप्रमाणे जगू-वागूपाहाणार्‍या नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यांत आलं आहे. कारण कुठल्याही धर्माच्या मूलतत्ववाद्यांच्या अतिरेकी, दहशतवादी कारवाया आणि लाड या पुढं ऑस्ट्रेलिया खपवून घेणार नाही कांहीश्या संतापानंच ज्यूलिया जी, मुस्लिमांवर कडा्डून गरजल्या, ’इथल्या स्थानिक ऑस्ट्रेलियन जनतेच्या ऐवजी: इथं नव्यानं स्थाईक होवू पाहाणार्‍यांनी इथल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे. हे पटत असेल तर गुण्यागोविंदानं राहा नाहीतर चालते व्हा, मुकाट्यानं.. कारण मला कुणा एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक भावना दुखावल्यातर जांत नाहीत ना ? वगैरे बाबींची काळजी करायचा खरंच कंटाळा आला आहे. बालीमधे दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्याकांडानंतर, देशांत राष्ट्रीय भावनेची जणू कांही ’त्सुनामी’ आली आहे.. ,आणि सगळे देशवासीय त्यानं भारावले आणि वेड्यासारखं वागायला लागलेत आहेत. स्वातंत्र्यप्रापतीसाठी, झगडतांना इथल्या स्थानिक अबालवृद्ध युवक-युवतींनी जवळपास दोन शतक पिळवणूक, अत्याचार, दंडेली, स्वातंत्र्यसैनिकांवरचे न्यायासनासमोर उभे राहिलेले खटले आदि संकटांशी सामना करीत पारतंत्र्याच्या बेड्या तोडत महामुश्किलीन मुक्ती मिळवली आहे आणि सांस्कृतिक जडण घडण जपली आहे. आमचा सर्व बोली-लेखी व्यवहार इंग्रजींत चालतो. स्पॅनिश्‌, लेबेनीज्‌, अरेबिक, चायनीज्‌, जपानी, रशियन्‌, किंवा इतर कोणत्याही भाषेंत नाही. बहुतेक ऑस्ट्रेलियन नागरिक देवाच्या अस्तित्वाला मानतांत. ही कांही ख्रिश्चन धर्माची, किंवा राजकीय अथवा परंपरावादी ध्येयांनी प्रेरित चलवळ नाही तर हे एक सत्य आहे. कारण धर्मानं ख्रिश्चनं असणार्य़ा अबालवृद्धांनी उभारलेली आणि ख्रिश्चन धर्माच्या तत्वाधारित अशी ही भूमी, हे राष्ट्र आहे, आणि हे संदर्भाधीन कागदपत्रांमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि अर्थातच माझ्या या राष्ट्रातल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागांवर त्याबाबतचा मजकूर असण हे अगदी स्वाभाविक आहे. कारण ’देव’ हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ’देवा’च्या अस्तित्वावरच्या श्रद्धेबद्दल तुमच्या मनांत आकस असेल तर तुम्ही, ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त या विश्वांतला इतर कुठलाही भाग तुमच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी निवडू शकता. तुमच्या श्र्द्धा, श्र्द्धास्थानं, धर्मगुरूंबद्दल आमचा काखहीही आक्षेप नाही. तसाच तो तुम्हाला आमच्या श्रद्धांबद्दल नसावा आणि आमच्याबरोबर तुम्ही गुण्यागोविंदानं, शांततापूर्वक आपलं आयुष्य इथं व्यतीत करावं ही माफक अपेक्षा आहे. ही आमची भूमी, आमचं राष्ट्रं आणि आमची जीवनशैली आहे, आणि आम्ही या सगळ्याचा पुरेपूर उपभोग धेण्याच्या सर्व वाटा तुम्हाला खुल्या करून देवू. पण तुम्ही जर तक्रार, कुरबूर, नापसंती, असंतोष या पोटी धुमसणार्‍या क्रोधाच्या भरांत, आमचा राष्ट्रध्वज, आम्ही राष्ट्राच्या नावांन घेतलेली आण आणि आमच्या ख्रिश्चन श्रद्धा, श्रद्धेय यांचा अधिक्षेप करण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलांत, तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या स्वातंत्र्याचा आहेर मिळेल...हा देश सोडून जाण्याचं स्वातंत्र्य !! तुम्ही जर इथं सुखी नसाल तर कृपया चालते व्हा. कारण आम्ही तुम्हाला इथं येण्याचं आमंत्रण कधीच दिल नव्हत. तुम्ही तुमच्यास्वत:च्या सुखाच्या शोधांत इथं येण्याचं निश्चित करून आला आहांत हे कायम ध्यानांत ठेवा, तेंव्हा जे राष्ट्र तुम्ही पूर्ण विचारांती निवडलय त्याचा स्वीकार करा. धन्यवाद ! ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्यांच्या या भाषणांतला सूर जरी कांही विशिष्ट दहशतवादी संघटनांविरोधांत असला तरी पिळवणूक आणि पारतंत्र्यातून सुटका करून घेण्यासाठीचा लढा, त्या भावनॆंतून जन्मलेली अतिरेकी प्रवृत्ती आणि सत्तालोलूपता आणि जगावर राज्य करण्याच्या अहंकारी महत्वाकांक्षेपोटी अतिरेकी अत्याचार या मधे फरक करायलाच हवा. आणि हकनाक दहशत माजविणे ही विशेषत: मानव ’जमाती’ची... मग ती कुठल्याही देश-प्रांत-जात-पंथ-धर्माची असो... प्रवृत्ती आहे. महान तत्ववेत्ते, सर बर्ट्रांड्‌ रसेल यांनी बघितलेलं वैश्विक प्रजासत्ताकाचं स्वप्न हे स्वप्नच जोपर्यंत राहील तो पर्यंत असे क्रोधोद्गारांचे उद्रेक होतच राहाणार... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Thursday, June 21, 2012

पुणं अग्रणी ? का ?

सौरऊर्जेच्या उपयोगांत, पुणं अग्रणी ठरूं पाहात आहे अशी माहिती मिळाली आणि विचार करायला लागलो की, आणखी कांही, पुण्याला ’अग्रभागी’ ठेवणार्‍या घटना गोष्टी आहेत का ? आणि जवळपास पंचवीस मुद्दे मिळाले, पुण्र्करांची मान आणि पाठीचा कणा...जो आधीच, ’शिष्ठ्पणा’ आणि बर्‍यापैकी ’आढ्यताखोरी’ यामुळ...ताठ आहे तो आणखी ताठ व्हावा असे ! गेल्या वीस वर्षांतला विक्रमी वेगाने विकास..जगांतील सगळ्यांत जास्त ’पब्ज्‌’ असलेलं शहर..आणि विक्रमी ’धूम्रकांडधारीं’च शहर...सगळ्यांत जास्त ’संगनक प्रणाली’ संस्था २१२ पुण्यांत आहेत. त्या खालोखाल बंगळूरू २०८, हैदराबाद ९७ वगैरे. आणि म्हणूनच पुणं हे, महाराषट्राची ’सिलिकॉन वॅली’ म्हणून ओळखलं जातं.. तसंच पुण्यांत ३५ अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत..विक्रमी संख्या..जगांत कुठल्याही एका शहरांत असलेली.. पुणे विद्यापीठाशी आज तारखेला ५७ अभियांत्रिकी महाविद्यालय संलग्न आहेत...परत विद्यापीठ स्तरावरचा हा एक आगळा विक्रम संरक्षण-सज्ज वायुदल आणि प्रवासी वाहतूक करणारी व्यापारी वायुयानं एकाच धावपट्टीवरून आकाशांत झेपावतांत इथं. पुण्यांत सगळ्यांत जास्त सार्वजनिक आणि शासकीय न्यास किंवा संस्था आहेत.’पुणे विद्यापीठांतून सर्वांत जस्त सण्ख्येनं विद्यार्थी परदेशांत शिक्षणासाठी जातांत. एकेकाळी आय्‌आय्‌टी कानपूरचा क्रमांक या बाबतींत पहिला होता. पुण्यांत सध्या मूळ मराठी स्थानिकांची संख्या फक्त ३८% आहे..तर, २०% उत्तरप्रदेशी, १०% तमिळ, १४% आंध्रा प्रदेशी, १०% केरेळय समाज, ८% मूळचे परदेशस्थ, ५% आफ्रिकावासी, २% बंगाली, आणि उरलेले ६%, त्यावितिरिक्त इतर प्रदेशांतून सर्व जाति धर्म पंथाचे जनसामान्य आलेले आहेत, त्यामुळं पुण्याचा सामाजिक चेहेरा आतां खरंच, बहुरंगी बहुढंगी झाला आहे. शिवाय पुणे पोलिसांचा गुन्हे अन्वेषण, तपास यंत्रणा आणि उलगडा, वचक, नागरी सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण, याबाबींमध्ये, मुंबई पाठोपाठ, ख्यातकीर्त म्हणून क्रमांक लागतो. पुण्यांत विक्रमी संख्येनं दुचाकी, स्वयंचलित वाहन आहेत. आणि त्यामुळं रहदारी...पादचारी, फ़ेरीवाले आणि दुचाकी(आशियांत प्रथम क्रमांकाची संख्या..), तीन चाकी चारचाकी आणि अवजड वाहनांची...यांचा आणि अर्थातच त्यामुळं प्रदूषणाचा, दाटपणाही बहुतेकवेळा असह्य होईल अशा पातळीला असतो.. मुंबई आणि दिल्ली खालोखाल, सर्व क्रीडाप्रकारांमधल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या स्तरावर, सहभागी खेळाडूं पाठविण्यांत पुण्याचा क्रमांक लागतो. आणि कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक, संशेधक हे पुण्याचे आहेत...नारळीकर माशेलकर हे कांही ’मासले’ अमेरिकेंत कामकरणार्‍या निष्णांत भारतीय व्यावसायिकांपैकी, अधिकतम संख्या ही पुणेकरांची आहे. तिथं कायम किंवा अस्थायी वास्तव्य करणाया भारतीय कुटुंबांऐकी,जवळपास ६०% पुणेकर आहेत.‍ भारतांत, एकाच शहरांत ७ विद्यापीठ असलेलं पुणं हे एकमेव शहर आह पुण्यांतून किती नद्या वाहतांत माहीत आहे ? मुळा, मुठा, पवना, राम आणि देव नदी अशा पांच एकूण.. तसच धरण ? खडकवासला, पानशेत, वरसगांव, टेमघर, पवना आणि मुलशी अशी एकून सहा... आणि तरीसुद्धा दर उन्हाळ्यांत पुण्याला अवर्षण सदृश परिस्थितीला तोंड द्यावं लागतं.. पण... सर्वांत जास्त प्रदूषित शहर, सर्वांत जास्त प्रदूषित चौक...स्वारगेट्‌..आणि सर्वांत जास्त गरीब वस्ती, झोपडपट्टीवासी, कठोर माणसाचं काळीज सुद्धा द्रवावं अशा परिस्थितींत राहाणारे, अन्न-वस्त्र-निवारा या तीन जगण्यासाठी आवश्यक गोष्टींपासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेले ’नागरिक’ सुद्धा या पुण्यांतच आहेत ज्या पुण्याचा आपल्याला ’अभमान’वगैरे वाटतो...मित्रहो...!!

Saturday, June 16, 2012

प्रेमाला कसले मोल

प्रेमाला कसले मोल ’प्रेम, म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमचं अगदी ’सेम्‌’ असतं’ कविकुलदीपकांच्या मांदियाळींतले एक अग्रणी वारकरी, वीणेकरी आदरणीय मंगेशजी पांडगांवकरांच्या कवितेंतल्या या लोकप्रिय ओळी..’प्रेम’ ला ’सेम्‌’ चं यमक अगदी ’फिट्ट्‌’ बसलय... सगळं ठीक आहे...पण.. ’तुमचं आमचं सगळ्यांच ’प्रेम’ अगदी ’सेम्‌’ असत कां हो ? आईच मुलांवर, पतीच पत्नीवर, आणि मैत्रीणीच मित्रावर, किंवा उलट्या क्रमानं(विवाहपूर्व..अर्थातच), शेतकर्‍याचं पिकावर, शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर...सगळी सारखी ’प्रेमं’ असतांत ? या प्रत्येक ’प्रेम-प्रकारां’वर एक स्वतंत्र लेख होईल इतकी ती भिन्न असतांत याच ’प्रेम भावनेचा एक अनोखा प्रकार आहे पुढे वाचाल त्यां गोष्टींत तर... एका कृषिवलाच्याघरी पाळलेल्या कुत्रीनं एक दिव्स कांही गोडगोड गोजिरवाण्या बछड्यांना जन्म दिला. आपल्याच सारख्या, परिसरांतल्या सहकार्‍यांना कदाचित ही पिलं पालता येतील आणि घराच्या घरपणाला रात्रीसुद्धा ’जागत’ ठेवणारा सवंगडी मिळेल या हेतून, कृषिवलानं कुंपणाबाहेर एक सूचना-फलक लावायच ठरवल. तो फलक कुंपणाच्या दाराला लावत असतांनाच त्याला जा्णवलं की आपला सदरा कुणीतरी मागून ओढत आहे. कृषिवलानं मागे वळून बघोतलं तर त्याचा गुढग्याशी एक छोटा त्याला दिसला. ’काका, मला एक पिलू द्याना...विकत !’ छोटा म्हणाला, ’बेटा, ही पिलं फार उच्च जातकुळीची आहेत. बरीच किंमत मोजावी लागेल तुला. आहेत का एवढे पैसे तुझ्याजवळ ?’ कृषिवलानं आपल्या कपालावरचा घाम पुसत छोट्याला विचारलं.. छोट्यानं निराशेनं खाली मान घातली सुरुवातीला पण क्षणभर थांबून, एक हात विजारीच्या खिशांत घातला आणि मूठभ्र नाणी काढली. वर पाहात, आशेने ती मूठ सेतकरीकाकांकडे करीत उघडली त्यानं, ’काका माझ्याकडे हे एवढेच पैसे आहेत. मला कमीतकमी पाहूतरी द्यानां त्या पिलांना..’ विनवणी करीत उच्चारला छोटा ’गड्या, एवढ जर मी केलं नाही तुझ्यासाठी तर मला तो’ वर आभाळाकडे पाहात दादा म्हणाले, ’क्षमा करेल कां ?’ आणि चत्कन शीळ घालीत त्यानं श्वानमातेला सद घातली. तत्क्षणी मागे दुडूदुडू धावणार्‍या चार कापसाच्या गुंड्यांसह बाहेर दाखल झाली श्वानमाता.. ’ती पाहतांच बाळें, काळीज धन्य झाले’ अशी अवस्था, कुंपणाच्या कांटेरी तारेला अगदी चिकटून, पिलांना निरखणार्‍या छोट्याची झाली...डोळे आनंदानं भिरभिरू लागले, मनांत खुशीचा मोर, पिसारा फुलवायला लागला...आणि तेवढ्यांत त्याच लक्ष श्वान-सदनाकडं गेलं..आंतमधे कांहीतरी हालचाल दिसली त्याला आणखी एक कापसाचा गोळा पाठोपाठ बाहेर येत होता, हळूहळू चालत..किंवा खुरडत म्हणा हवंतर..बाकीच्या आपल्या भावंडांना गाठण्याची धडपड करीत.. छोट्याचे डोळे आणखी आनंदानं विस्फारले गेले. आणि तो उच्चरवांत, त्या पिलाकडे तर्जनी दाखवत, मागणी मांडू लागला... ’काका मला तेच हवय..सगळ्यांत शेवटी आलेलं..’ सेतकरीदादा, छोट्याच्याशेजारी बसत, थोड खंतावत म्हणाले, ’बेटा, नको नेवूस त्या पिलाला घरी. ते कधीच खेळू किंवा पळू शकणार नाही तुझ्या बरोबर, या बाकीच्या पिलांसारखं !’ छोटा दोन पावलं मागे सरकला, खाली वाकला, आणि आपल्या विजारीचा एक पाय वर गुंडाळू लागला.. आणि दृश्यमान झाला एक दैवदुर्विलास...छोट्याच्या विजारीच्या गुंडाळलेल्या पायाआड होता एक पंगू पाय दोनेही बाजूला खास बनविलेल्या आधाराच्या पोलादी पट्ट्या लावलेला...’ काका, अहो मलातरी कुठं धावता येतय इतरांसारखं. मी पण तरीसुद्धा खुरडत राहातोच की सवंगड्यां मागे त्यांना गाठायच्या प्रयत्नांत.. मला असाच माझ्याबरोबरीचा एक नवा सवंगडी सापडेल ना, या कापसाच्या गोळ्यांत..! आणि त्यालापण, या, आपल्याबरोबरच्या अपंग, बलहीनांना मागे सोडत धावणार्‍यांच्या जगांत सांभाळणारा, त्याला समजून घेणारा, त्याच्या जगांतला आणि जगण्या-जागण्यांतला कुणीतरी हवांच की हो काका.. !’ शेतकरीदादा, पांपणीकांठावर सांकळलेल दहिवर सदर्‍याच्या बाहीनं टिपत, छोट्यापासून नजर लपवत खाली वाकले. त्या पिलाला उचलून त्यांनी पोटाशी ध्ररलं आणि, रुद्ध कंठांतून शब्दफुटेनासा झाल्यामुळं थबकले क्षणभर.. पन परत भानावर येवून, मंदस्मित करीत, ते पिलू त्या छोट्याच्या हातांत देवू लागले.. छोट्यानंपण, लगेच पिलाला हातांत घेवून कुरवाळत छातीशी धरलं. पिलू सुद्धा, त्याच्या इवल्याश्या लालचुटुक जिभेनं छोट्याचा खुललेला चेहेरा चाटायला लागलं... जगांतल्या सगळ्या वात्सल्यमूर्तींनी हेवा करावा असं दृश्य साकार होत होतं तिथं त्या क्षणी... डबडबल्या डोळ्यांनी,पण अत्यंत आनंदित स्वरांत छोटा शेतकरीदादांना प्रष्ण करता झाला.. ’किती पैसे देवू दादा मी याचे ?’ शेतकरीदादाच्या ’कुर्दांत’ चर्र झालं..गळ्यांत दाटलेला हुंदका बड्या मुश्किलीनं दाबत शेतकरी दादा म्हणाले, ’अंहं.. कांही देवू नकोस मला...खूप दिलस तू आतांच आम्हा दोघांना, मला आणि या दुर्दैवी जीवाला...प्रेम-वात्सल्य-माया-ममता यांची पखरण करीत. यापेक्षा अधिक मूल्यवान कांहीच नाही बाळा या जगांत...’ आंसवं, नेत्रगामी व्हायच्या आधीचं सेतकरीदादांनी, झटकन पाठ फिरवली आणि ते जड अंत:करणानं घराकडे चालायला लागले... हा मजकूर लिहितांना आझीसुद्धा अवस्था जवळपास त्या शेतकरीदादा इतकीच बिकट झाली होती... प्रेमाला कसले मोलं, स्पर्शांला उजवा कौलं ही मधुभावाची भूल, निष्पाप वेलिवर फूल प्रेमांत नसे हव्यास, बरसतो जसा पाऊस निरपेक्ष देवुनी कांस, निष्पर्णा देई जोश प्रेमाने फुटति धुमारे, प्रेमांत नसति देव्हारे मागते प्रेम क्षण सारे, पत्र मात्र ठेवुनि कोरे प्रेमांत नसे कुरघोडी, सहजीवन असते गोडी शब्दांची भाषा थोडी, आवंतण नजरचं धाडी हे असे विश्व मायेचे, स्नेहाचे, अनुबंधांचे खोट्या नात्यांपलिकडचे, अन्‌ विशुद्ध आनंदाचे ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Thursday, June 14, 2012

एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस...


एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस... ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा... या अभंगा मधे बदल करून तो रस नाही अंगा परी ऊसं लई डोंगा असं म्हणायची वेळ आतां...आतां काय म्हणा, गेली कित्येक तप, म्हणजे साधारणत: स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर प्रत्येक निवडणुकीच्या ’लोकशाही’तत्वांना वगैरे अनुसरून जाहीर झालेल्या निकालोत्तर, सगळ्या राज्य विधान आणि राष्ट्र लोक सभागृहांत, लोकप्रतिनिधींनी आपाआपल्या ’शिटा’ धरल्या की...सर्वसामान्यजनांवर येते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून, पुढं येणारी कथा वाचाचं लोकहो ! त्याचं काय झालं... एक दिवस एक फुलंविक्रेता एका केशकर्तनालयामधे आला, या नापित महोदयांच्या..केशकर्तनाची क्रिया पूर्ण झाल्यावर, सहाजीकच त्या फुलंविक्रेत्यानं, सरसावत, खिशांत हात घालत, ’किती झाले ?’ असा स्वाभाविक प्रष्ण विचारला. नापित महोदय, आपले हात मागे घेत आणि मागे सरत उद्गारले, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’ चेहेर्‍यावर आश्चर्य आणंत, पण मनांत, सुखावत, फूल-विक्रेत्यानं, खिशांतला हात तसाच ठेवला. दुसर्‍या दिवशी आपलं दुकान उघडायला गेल्यावर नापिताला दाराशी एक पुष्पगुच्छ आणि एक आभार-पत्र ठेवलेलं मिळालं आणि त्याच्याही चेहेर्‍यावर मंदस्मित झळकलं नंतर कांही वेळानं एक पोलिसदादा केशसंभार कर्तनार्थ दाखल झाले दुकानांत. परत सगळा प्रसंग, जो आदल्या दिवशी घडला होता त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजे पोलिसदादानं पैसे काढणं, नापितानं ते नम्रतापूर्वक नाकारत, त्याचं कारण सांगणं वगैरे वगैरे. पुढल्या दिवशी परत आदल्या दिवशी सारखीच फुलं दाराशी..फक्त एक बदल म्हणजे आज आभार-पत्राबरोबरी एक ताज्या, गरमागरम बटाटावड्यांचा पुडाही होता. ’कृतज्ञता केवळ शब्दांनी व्यक्त करण्या ऐवजी, कृतीनं का नये करूं व्यक्त ?’ या सद्‌हेतूने आणि ’उदरभरणाने, यज्ञकर्माचे पुण्य मिळून उपकारकर्त्याची क्षुधाशांती होवून, आशीर्वादही प्राप्त होईल’ या वरकरणी सद्भावनेने पण अंतस्थ स्वार्थी हेतूने, कदाचित ठेवला असावा त्या फूलं विक्रेत्यानं... त्या दिवशी मग एक ’खासदार’..चक्क..आले डोकं भादर्ण्यासाठी केशकर्तनालयांत..कर्तनोत्तर परत, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’. सुरू झालं नापिताचं पालुपद...’खासदार’ महोदय तत्परतेनं पैसे परत खिशांत कोंबत, ओठांचा चंबू करून, शिळेवर एक त्यांच आवडत चित्रपटगीत वाजवत, आनंदित होत्साते, हर्षविभोरावस्थेंत, टणाटण निघाले परतीच्या वाटेनं. चौथ्या दिवशी सकाळी, सत्कारणार्थ आपल्या ’कर्मभूमी’कडे निघालेल्या नापिताला, लांबूनच दिसलेलं दृश्य बघून तो बुचकळ्यांत पडला...जवळ गेला तो काय ! अहो आश्चर्यम्‌.. दुकानाबाहेर एक डझनभर खासदार उभे होते ’नापित कधी एकदा येतो आणि दरवाज्याच्या फळ्या उघडतो’ याची वाट पाहात. तात्पर्य: मित्रांनो ! हाच तर फरक आहे, सर्चसामान्य भारतीय नागरिक आणि जनतेला, ’मुकी बिचारी, कुणिही हांका !’ म्हणत आणि त्यांच्या (मतपेटींत खोट्या आश्वासनांनी हुरळून मतं टाकणार्‍या) भोळसटपणाला हसंत त्यांना ’हाकणार्‍या..भारतीय राजकारण्यांमधला !! आणि म्हणून शासनकर्ता राजकीय पक्ष, बालकांच्या वारंवार बदलाव्यालागणार्‍या ’लंगोटांप्रमाणेच बदळून, अंगी परिवर्तनवाद बाणवायला पाहिजे आंता आपल्याला...

Friday, June 8, 2012

महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी...

महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी... श्रीरामाला, आयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर, वाल्मिकीमुनिविरचित ’रामायण’ अस्तित्वांत आलं. महर्षी वाल्मिकी हे अवकाशस्थ ग्रह-तारे, नक्षत्र, आकाशगंगेंतील प्रमुख तारे सूर्यमाला, धूमकेतू, अशनी, राशिचक्र, कुंडली आणि ग्रहगोलांची त्यामधली भ्रमणं, हालचालींबद्दल सखोल अभ्यास असलेले तज्ञ होते, हे त्यांनी, रामायणांतील अनेक प्रमुख घटनांच्यावेळची, ग्रहस्थिती ज्या अचूकपणे नोंदवून ठेवली आहे त्यावरून सिद्ध होतं. अवकाशस्थ, चक्रनेमिक्रमे भ्रमणव्यस्त अस्तित्वांची, एकमेकांच्या संदर्भांतली स्थानांची, हजारो वर्षांमधे क्वचितच पुनरावृत्ती होते.. ’प्लॅनेटेरिअम्‌’ नावाच्या एका संगणक प्रणालीद्वारा, रामायणांतल्या उल्लेखनीय घटनाच्यावेळी महर्षी वाल्मिकींनी नोंदलेली ग्रहस्थिती जर ताडून पाहिली तर त्या घटनांचे, इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे असलेले दिनांक, वार आदि अगदी स्पष्टपणे दृग्गोचर होतांत. भारतीय, नागरी सेवेंतल्या, पुष्कर भटनागर नावाच्या अधिकारी व्यक्तीनं, ही संगनक प्रणाली, अमेरिकेंतून प्राप्त केली. तिथं या प्रणालीचा उपयोग सूर्य-चंद्रांची ग्रहण, सूर्यमालेंतल्या इतर ग्रहांच पृथ्वीपासून अंतर आणि स्थानांची निश्चिती या गोष्टी जाणून घेण्यासाठी सामान्यत: करतांत. आधी वर्णन केल्याप्रमाणे भटनागर महोदयांनी, प्रणालींत रामायणांतल्या घटनांची ग्रहस्थिती, समाविष्ट केल्याबरोबर त्यांच्यापुढ दिनांक, वार उभे ठाकायला लागले.. अगदी घटना आणि त्यांचा अचूक क्रम ताडून पाहाण्या इतपत..रामजन्मापासून ते १४ वर्ष वनवासोत्तर रावणाशी झालेल्या युद्ध आणि विजयानंतर, आयोध्येंत पुनरागमन राज्याभिषेक वगैरे सर्व घटना अचूक ताडल्या गेल्या. महर्षी वल्मिकींनी बालकांडांतल्या १९व्या सर्गांत, आठव्या आणि नवव्या श्लोकांत नमूद केल्या प्रमाणे, चैत्र शुद्ध नवमीला, अवकाशस्थ ग्र्ह-नक्षत्रांची स्थिती निम्ननिर्देशाप्रमाणे होती: सूर्य मेष राशींत, शनी तूळेंत, गुरु कर्केंत, शुक्र मीनेंत, मंगळ मकरेंत, चांद्रमास चैत्रांतलीतली अमावस्योत्तर नवमी, कर्क लग्न (कर्क राशी, पूर्वेला उदितावस्थेंत), चंद्र मिथुन राशींत, पुनर्वसू नक्षत्रांत, दिवसा माध्यान्हीच्या सुमारास... ’प्लॅनेटेरिअम्‌’ मधे ही सर्व माहिती अंतर्भूत केल्यावर, असं स्पष्टपणे दिसंलं की ही ग्रहस्थिती असलेला दिवस म्हणजे रामजन्माचा दिवस, ख्रिस्तपूर्व १० जानेवारी ५११४ हा होता. म्हणजे आजपासून जवळजवळ ७१२६ वर्षांपूर्वीचा..भारतीय दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रांतल्या शुक्लपक्षांतली नवमी...ज्या दिवशी राष्ट्रांत सर्वदूर ’रामजन्मोत्सव’ साजरा होतो..’रामनवमी’ म्हणून... युरोप किंवा भारतीय उपखंडांतल्या अनेक..ख्रिस्तपूर्व किंवा ख्रीस्तोत्तर... इतिहास संशोधक, पर्यटकांनी नमूद करून ठेवलेल्या नोंदींप्रमाणे रामजन्म आयोध्येंत झालां हे निर्विवाद सत्य अधोरेखित होत. या लेखक-संशोधकांच्या ग्रंथांत, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, कालिदासांचं’रघुवंशम्‌’, बुद्ध आणि जैन साहित्याकृतींचा समावेश होतो. आयोध्येच्या तत्कालीन सुबत्ता, गृहसंकुलं, महाल, प्रार्थना आणि कला मंदिरं, पथ आणि महामार्ग, नगर-रचना यांतली, अधिपत्यांतल्या प्रदेशांत सर्वदूर प्रकर्षानं जाणवणारी सुबकता, प्रसन्न वातावरण आणि समशीतोष्ण हवामान, यांच वर्णन या सर्व ग्रंथ-साहित्यांत ठाइठाई वाचायला मिळतं. शरयू तीरावरच्या आयोध्येच्या अलिकडच्या-पलीकडच्या तीरावर, गंगा आणि पांचाल प्रदेश आणि मिथिलानगरी स्थित होते. सात सहस्रकं हा सामान्यत:, मानवी जीवनाचा आणि कदाचित राष्ट्रांच्या, भूप्रदेशांच्या आणि उपखंडांच्या आयुष्यांतसुद्धा खूपच प्रदीर्घ कालावधी असतो. या कालावधींत भूपृष्ठाखाली घडणार्‍या घडामोडींमुळे, भूकंप, अतिवृष्टीमुळं पूर, नद्यांचे बदलणारे प्रवाह, परकीय आक्रमणांतून युद्ध, त्यांतून नरसंहार, नागरी आणि ग्रामीण वस्त्या उध्वस्त होणं, कडेकपारी, दरडी कोसळूनं त्याखाली गादली जाणं, हे वारंवार घडतचं असतं. त्यामुळं, इतिहासाचं अध्ययन, अभ्यास संशोधन आणखीच अवघड होवून बसतं. आयोध्येच्या आसपासच्या नद्यांनी आपले प्रवाह, जवळजवळ तीस-चाळीस किलोमीटर्‌ उत्तर/दक्षिणे कडे सरकल्यामुळं बदलले आहेत, त्यामुळं मूळं नगरीच्या क्षेत्रफळांत बरीच घट झाली आहे. रामाला तर त्याच्या शैशवांतच, म्हनजे वाल्मिकी रामायणातल्या नोंदॆऎप्रमाणे वयाच्या तेराव्या वर्षी आयोध्येपासून दूर जावं लागलं..महर्षी विश्वामित्रांच्या तपोवनस्थित सिद्धाश्रमांत, उपनयनोत्तर ब्रह्मचर्याचरण करीत सर्वंकष शिक्षणासाठी. त्यानंतर श्रीराम, जनकराजाच्या मिथिला नगरींत दाखल झाले, सीतास्वयंवरांत एक राजपुत्र म्हणून. तिथं त्यांनी शिवधनुष्यभंग करीत सीतेचं पाणिग्रहण केलं आणि आयोध्येला प्रयाण केलं वाल्मिकी रामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, इतिहासतज्ञांनी शोधकार्य सुरू थेवून, श्रीरामाच्या या ’प्रवासां’तल्या घटनाक्रमांनुसार जवळपास तेवीस ठिकाणांची खातरजमा करून निश्चिती केली. त्यांतली कांही ठिकाणं अशी: सृंगी आश्रम, रामघाट,त्राटिकावन, सिद्धाश्रम, गौतमाश्रम, सध्या नेपाळांत असलेलं जनकपुर, सीताकुंड वगैरे.. स्मृतिमंदिरं आणि वंदनस्थळं ही, अद्भुतकार्य करणार्‍या ’संभवामि युगे युगे’ अशा ’माणसांसाठीच उभारली जातांत...काल्पनिक, ’कुठलाही आधार नसतांना ’कथित’ रचनांद्वारा उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांसाठी नाही. महर्षी वाल्मिकींनी, आयोध्याकांडांतल्या दुसर्‍या सर्गांतल्या चार ते अठरा श्लोकांम्धे वर्णन केल्या प्रमाणे, राजा दशरथाच्या कुंडलींतल्या नक्षत्रांना रवि, मंगळ आणि राहू यांनी ग्रासल्यामुळं निर्माण झाल्ल्या परिस्थितीमुळं, जी बहुतेक ’सम्राटा’च्या मृत्यूप्रत प्रवासाची नांदी ठरते किंवा त्याच्या विरुद्ध कटाला चिथावणी देणारी ठरते.. त्यानं श्रीरामाला सिंव्हासनावर बसवून राज्याभिषेकासाठी पाचारण केलं. राजा दशरथाची रास होती मीन आणि जन्मनक्षत्र, रेवती. वर वर्णन केलेली ग्रहस्थितीच दिवस होता ५ जानेवारी ५०८९, ख्रिस्तपूर्व. याचं दिवशी, मंथरेनं कान भरल्यामुळं आधीच मत्सरग्रस्त असलेल्या कैकयीच्या हट्टापोटी, दिलेल्या वचनपूर्तीसाठी दशरथानं श्रीरामांना १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्येबाहेर धाडलं. म्हणजे श्रीराम तेंव्हा पंचवीस वर्ष वयाचे होते.(५११४-५०८९ ख्रिस्तपूर्व). रामायणांतल्या अनेक श्लोकांत, या उपर्युक्त विधानांच्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळतांत. वनवासाच्या तेराव्या वर्षाच्या उत्तरार्धांत श्रीरामानं खरदूषणाशी केलेल्या युद्धाचा उल्लेख वाल्मिकी रामायणांत मिळतो. त्या दिवशी अमावस्या होती आणि मंगळ अवकाशमध्यावर होता. ’प्लॅनेटेरिअम्‌’नं ग्रहस्थितीचे हे संदर्भ मिळतांच, त्या दिवशी, ७ ऑक्टोबर ५०७७ ही तारीख होती’ सूर्यग्रहण होतं आणि ते ’पंचवटी’ (दंडकारण्यांत, नाशिक जवळ) मधून दृश्यमान होत होतं, हे खात्रीपूर्वक ’सांगितलं’ भटनागरजींचे एक सहकारी, डॉ. राम अवतार, यांनी, वाल्मिकीरामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, श्रीराम वनवासाला निघाल्यापासून म्हणजे आयोध्येपासून, ते रामेश्वरम्‌, धनुष्कोडीपर्यंतचया, मार्गक्रमणेंतल्या सगळ्या स्थळांबाबतींत संशोधन करण्यासाठी तिथं प्रत्यक्ष जावून माहिती जमा केली. अशा १९५ स्थळांबाबत, जिथं वनवासादरम्यानच्या, श्रीराम आणि सीता यांच्या आयुष्यांतल्या ठळक घटना निगडींत आहेत. उदाहरणार्थ: तमसा तल(मंदाह), श्रिगवेपुर(शिगरूर), भारद्वाज आश्रम(अलाहाबाद जवळ), अत्री आश्रम, मार्कंडेय आश्रम, (मारकुंड),चित्रकूट, रामकुटी(गोदावरी तीरी), पंचवटी,सीतासरोवर, रामकुंड(नाशिक जवळील त्र्यंबकेश्वरमधे), शबरी आश्रम, किष्किंधा(अन्नागोराई नावाचं ग्राम) आणि अर्थांत धनुष्कोडी आणि रामेश्वर मंदिर. वाल्मिकीसांगतांत की श्रीरामसेनेनं रामेश्वरम्‌ ते लंका सागरसेतू बांधला आणि त्या सेतूवरून, उसळणार्‍या जलधीला वेंघत(पाल्कची सामुद्रधुनी) श्रीरामसेनेनं, युद्धांत, कुंभकर्णादि बलाढ्य सेनापतींसह प्रत्यक्ष रावणाचा पराजय करून सीतेला अशोकवनांतून मुक्त करून आयोध्येला परत आणलं. आता, सागराच्या पृष्ठभागाखाली अजून अस्तित्व राखून असलेल्या या सेतूची उपग्रहावरून घेतलेली छायाचित्र, संगणकाच्या महाजालावर उपलब्ध करून दिली आहेत...कांही शंकेखोरांचे दात घशांत घालण्यासाठी... सीतेला दैत्यांच्या पाहार्‍यांत, ख्रिस्तपूर्व ५०७६ मधे, जिथं ठेवलं होतं ती सीता वाटिका,अशोकवन’ देशांतल एक प्रमुख पर्य्टनस्थळ म्हणून विकसित करायचं नुकतचं, श्रीलंकेच्या शासनानं, निश्चित केलं आहे. श्रीराम हे सूर्यवंशांत जन्मले होते. ते या वंशाचे चौसस्ठावे नृपति होते. त्या आधीच्या त्रेसस्ठ नृपतींच्या नावांसह उल्लेख, ’आयोध्या का इतिहास’, या जवळपास नव्वद वर्षांपूर्वी राय बहादुर सीताराम यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आढळतो. लुइसिआना विद्यापीठांतल्या प्राध्यापक सुभाष काक यांनी लिहिलेल्या, The Astronomical Code of the Rig Veda, या ग्रंथांतसुद्धा श्रीरामांच्या त्रेसस्ठ पूर्वजांचा, ज्यांनी आयोध्येवर राज्य केलं.. नामनिर्देशासह उल्लेख सापडतो. त्यांतली कांही ठळक नावं: राजा दशरथ, त्या आधी अज, रघु, दिलिप वगैरे.. असेतु-हिमाचल, भारतवर्षांतली अबाल-वृद्ध जनता, विशेषत: हिमाचल, राजस्थान आणि मध्यप्रदेशांतली आदिवासी,जनजाती.. श्रीरामांच्या ’असण्या’बद्दल आणि ती केवळ ’पुराणांतली वांगी’ नाहीत याबद्दल पूर्णपणे नि:शंक आहेत. या आदिवासींमधले बहुतेक उत्सव, सण समारंभ श्रीराम-सीता आणि श्रीकृष्ण यांच्या आयुष्यांतल्या घटनांशी निगडीत असतांत. हे सगळे प्रसंग आणि घटनास्थळ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ठेव्यांतला एक महत्वाचा घटक अ होता, आहे आणि भविष्यांत असेल. रामायण काल हा प्रेषित मोहंमद किंवा जीझस्‌ ख्र्रिस्ट्‌ यांच्या जन्माच्या किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी, हे धर्म या जगांत अस्तित्वांत येण्याच्या बराच आधीचा होता. हिंदू, म्हणजे हिंदु-स्थान चे रहिवासी आणि इंडियनस्‌ म्हनजे इंडियाचे रहिवासी हे दोन समान अर्थी शब्द आहेत . इंडियाची ओळख भारत...ज्ञानियांचा प्रदेश,,, आणि आर्यावर्त...जिथं आर्यांची वस्ती आहे, आणि हिंदुस्थान (’इंडस्‌’ या शब्दावरून व्युत्पत्ती) अशीही जगांत आहे. रामराज्यांत जन्मावरून जातपात ठरविण्याची पद्धतच नव्हती. महर्शी वाल्मिकी जन्मान जरी वाटमारी करणारे आदिवासी होते तरी सीतेनं, लंकादहनानंतर अग्निपरीक्षा दिल्यावरही, केवळ एका परिटानं तिच्या पावित्र्याबद्दल शंका व्यक्त केलेली ऐकून, श्रीरामांनी दिलेल्या आज्ञेवरून आयोध्येचा त्याग केल्यानंतर आश्रय घेतला तो महर्षी वाल्मिकींच्या आश्रमांतच, आणि लव-कुशही तिथंच सैशवांतून बाल्यांत आणि तारुण्यांत आले. महर्षी वाल्मिकींच...पहिल्या भारतीय अवकाशवेत्त्यांचं...अवकाशविज्ञानाचं आणि ग्र्ह-नक्षत्र-तार्‍यांच्या भ्रमण आणि आवर्तनांच्या गणिती नियमिततेचं ज्ञान आणि भान हे इतक अचूक आणि स्पृहणीय होतं की प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटावा. हे ज्ञान आजच्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व कसोट्यांमधे यशस्वी ठरत आहे. नवीन संगणक प्रणालीनं सुद्धा याला दुजोरा देत वाखाणणीच केली आहे. ज्या प्रमाणे शबरी ही एक आदिवासी स्त्री होती त्याच प्रमाणे, रावणाचा पराजय करणारं श्रीरामाचं सैन्यदळ हे मध्य आणि दक्षिण भारताच्या विविध प्रदेशांतल्या आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींनी परिपूर्ण होतं. रामायणांतील प्रमुख घटना आणि बारीकबारीक संदर्भ हे प्रत्येक भारतीयाचा म्हणजे जनजाती-जमाती, मुस्लिम, ख्रिश्चनधर्मीय यांचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आहे. इस्लाम धर्मसंस्थापक, प्रेषित मोहमदाचा जन्म १४०० वर्षांपूर्वीचा तर ख्रिश्चन धर्मप्रमुख संस्थापक, जीझस्‌ ख्राइस्ट्‌चा जन्म २००० पेक्षा कांही अधिक वर्ष पूर्वीचा, गौतमबुद्धाचा जन्म २६०० वर्षांपूर्वीचा...आणि श्रीरामाचा तब्बल ७००० वर्षांपूर्वीचा. त्यामुळं पृथ्वितलावरच्या, भूकंप, पूर, नद्यांचे बदललेले प्रवाह, दिशा आणि इतकच नाही तर परकीय आक्रमणांमुळं भौतिक, भौगोलिक हानी आदि विविध कारणांनी झालेल्या घडामोडीमधून, श्रीरामाच्या जीवनांतल्या घटनांच, रामायणकालाचं संशोधन करण हे अर्थातच सर्वांत जिकिरीचं’ पण त्यामुळ खचून न जाता आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा शोध घेण, तरीही अव्याहतपणे सुरूच ठेवणार आहोत ना ? त्यामुळं भारतीय म्हणून आपल्याला आपल्या पुरातन जवळपास दहा हजार वर्षांचा इतिहस असलेल्या, नागरी संस्कृती, समाजरचना, प्रागतिक आणि नवनव्या संकल्पनांच स्वागत करणारी मानसिकता यांचा रास्त अभिमान बाळगायला हवा, आणि ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष, आर्यांनी भारतीय उपखंडावर आक्रमण केलं होतं ही दिशाभूल करणार्‍या सिद्धांताचं खंडन करायला हवं. ज्या मॅक्स्मुल्लर्‌नं हा सिद्धांत प्रथम मांडला, त्यानच नंतर तो नाकारलाही, हे सर्वश्रुत आहे. पारतंत्र्यांत असतांना आपण सगळे मेकॉलेप्रेरित आणि मान्यताप्राप्त शिक्षणप्रणालीनुसार ’विद्याभ्यास’ (आभास ?) केला.. ’प्रत्येक भारतीय हा निम्नदर्जाचा मानव असून त्याच ’साहित्य’ म्हणजे इंग्लंड्‌मधलं एक फडताळ भरून पुस्तकं...ग्रंथ तर सोडाच..सुद्धा नसतील’ अशी हेटालणीवजा समजूत मनांत रुजविणं हा त्या शिक्षण प्रणालीचा मुख्य उद्देश होता. त्यांतून एखाद्या भारतीय माणसांत विशेष चमक दिसल्याबरोबर, ’हा, इंग्लंड्‌मधून आक्रमण करून, इथं स्थाईक झालेल्या आर्य वंशाच्या कुटुंबातलाच असला पाहिजे..’ अशी बतावणी करायलाही तत्कालीन ’गोरे’ मागेपुढे पाहात नसत. कुणीही या, मानहानीकारक सिद्धांताच्या पाठचं असत्य खॊडून, सत्यशोधनार्थ कृतिप्रवण झालं नाही त्या काळी...म्हणून आतां वेळ आली आहे की सर्व भारतीयसंस्कृतिसंवर्धक, संशोधक, विचारवंत, ज्ञानी, बुद्धिवादी आ सगळ्यांनी आतापर्यंत डोळ्यावर ओढून घेतलेली झापड दूर करून सत्याला सामोरं जावून ते विश्वाला ठणकावून सांगण्याची, आणि, ’ही तर भाकड पुराण कथा...’ म्हणून अवहेलना करणार्‍यांचे डोळे आणि कान उघडण्याची ! एकत्र येवूया, उपल्ब्ध पुरावे कागदपत्र, माहिती यांचा सूक्ष्म अभ्यास, विश्लेषण करूया, ज्या योगे आपण पुरातन समृद्ध भारतीय जीवनशैली, आणि समाजव्यवस्था यांच्यावर आनखी प्रकाश टाकू शकूं...मुद्रित आणि आधुनिक संवेदनेशील माध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यायला हवी आणि वातावरणनिर्मिती करायला, आणि सुशिक्षित अबालवृद्ध जनमानसाला ही माहिती समजावून घेवून पचनी पाडायला साहाय्यभूत व्हायला हवं...त्यांतून उद्या कदाचित आणखी पुरातत्व संशोधक हे काम पुढं न्यायला तयार होतील, आणखी निर्भयपणे सारे निष्कर्ष अभिमानानं विश्वभरांत पोचवतील... ****** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar