Tuesday, August 30, 2016

१५३४ ते २०००

।। दास-वाणी ।। अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौली ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/२३ या नामस्मरणाचे महत्व शब्दांनी सांगता येण्याच्याही पलीकडे आहे. अफाट आहे तरीही मी प्रयत्न केला आहे.आजपर्यंत लक्षावधी जीवांना या नामस्मरणाद्वारे मुक्ती मिळाली आहे. समुद्रमंथनातून निघालेल्या अनेक वस्तू देव दानवांनी आपापसात वाटून घेतल्या. अत्यंत जहाल असे हलाहल विष मात्र कुणीही न घेतल्याने भगवान शंकरानी प्राशन केले .त्याने प्रचंड दाह झाला. आपल्या जटेत दाह शांत होण्यासाठी चंद्राला सामावले म्हणून चंद्रमौली. तरीही आग शमेना. रामनामाचा जप सुरू केला आणि शंकरदेव शांत झाले. रामनाम देवांनाही तारक आहे. 'हलाहल सहजी प्राशूनं । चूळ अमृताची टाकेनं । वेचोनि मौत्तिक कणं। समृध्देनं जनसामान्या' ।। १५३४ मनोमनी संकल्प केले । संस्कृतास, प्राकृतरूप दिले । गीतासार पोहोचविले । वदविले जनरेड्याकडून ।। १५३५ ऐसी होती माउली । इतिहासे अनुभवली । शब्दरूपे माडिली । सच्चिदानंदे ।। १५३६ मेघांना देती साथ । उंचावले तेजोगेंद । एकवटोनी अभेद । धावती प्रतिमा ।। १५३७ हिरव्या पगडीला मिळाले । शुभ्र तुऱ्यांचे झालर-झेले । मेघडंबरीशी स्पर्धाधीन झाले । होवुनी ऊर्ध्वगामी ।। १५३८ ।। दास-वाणी ।। असो हीं अनुभवाची द्वारें । कळती सारासारविचारे । सत्संगें करून सत्योत्तरें । प्रत्ययासि येती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०४/१५ परमार्थाचे दरवाजे हे अनुभवायच्या गोष्टी आहेत.वेदादि ग्रंथांचे अध्ययन करून सार असार , नित्य अनित्य , आत्म अनात्म गोष्टी जाणून घ्यायच्या.सद् गुरूंची सेवा करून त्यांच्या सहवासात राहून सत्याचा मार्ग धरायचा तरच ब्रह्मानुभव येण्याची शक्यता आहे. सद् गुरू पादसेवन भक्तीला पर्याय नाही. रोजचे सुख-दु:ख, जीवनानुभव । लंघण्या रौद्रस्वरूप सागरभव । जणू कर्मयोग्या हाती नाव । गाठण्या पैल ।। १५३९ आप्तार्थी अविरत झटावे । त्यांच्या चिंतेंत सदा राहावे । कष्ट करित झगडावे । समजावा कां 'ब्रह्मा'नुभव ।। १५४० करूनी पाहावा संसार । सांभाळत अस्तुरी, पोरं । मग चाखू अनुभवाचे गर । आंबट गोड तुमच्या ।। १५४१ भवताली सत्कर्मकारांची गर्दी । लावून व्यसने 'अध्यात्म'वादी । नका होवू कर्मयोगाचे गारदी । 'संत'(?)जन हो ।। १५४२ युवा, पोक्त, मधे वृध्द । आरण्य राखण्या सिध्द । तृण पर्णांना देत छेद । उर्ध्वगामी नभाकडे ।। १५४३ म्हणुनचि ग्रास 'परब्रह्म' । अवलंबावा कर्म 'धर्म' । केवळ ! त्याच्याप्रती प्रेम । म्हणोनि असावे ।। १५४४ कुडी ! मन भावनांचे घर । कुडी ! जळता सर्व निराधार । कुडी ! माया भारले अंतर । तमपासूनि तमापर्यंत ।। १५४५ कबऱ्या मेघांना झालरं । गर्द हिरव्याची बहार । कडा सजवे पोपटी किनारं । आनंदविभोरं मन होई ।। १५४६ सारे निसर्गचे राज । अशी नवलाई रोज । देतो मनांस इलाज । खंतावल्या ।। १५४७ समांतर प्रतिबिंब जळी । काय कळेना दडले तळी । रंग-रूप पाहिले डोळी । परि मन आकळेना ।। १५४८ नाही वरलिया रंगा भुलायचे । रंग कसे कळावे अंतरंगाचे । पारखो-जोखोनि अनुभवायचे । म्हणोनि, 'मनुष्य'पणं ।। १५४९ विस्तीर्ण परिघाचा पसारा । जळनिधीस सावरे किनारा । हीरव्यागार, ऊजायुक्त परिसरा । पारावार न दिसे ।। १५५० गालिचास तृण मउशार । पाउलासि स्पर्श अलवार । उभारीत तरतरींत आपुले कर । की पर पर्णतरुचे ?।। १५५१ प्रशान्त संथ जलनिधी । नीरवास विपुल अवधी । अवकाश-बिंब कवळण्या सिध्दी । साधिली तपश्चर्यें ।। १५५२ ।।दास-वाणी ।। येथील येथे अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊन जातें । सांगाना कां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०८/२८ आयुष्यभर हाडाची काडे करून मिळवलेली संपत्ती ,जमीनजुमला ,बंगले , गाडया ही संपूर्ण कमाई मृत्यूच्या वेळी इथेच सोडून द्यावी लागते ना ? एकतरी गोष्ट पुढच्या जन्मासाठी होईल म्हणून नेता येते का ? मृत्यूनंतर जीव या जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांची पुरचुंडी बरोबर घेऊनच पुढील जन्मात पदार्पण करतो. या जन्मातील कर्म हे पुढील जीवनातील दैव आहे हे लक्षात घेऊनच संपत्तीची हाव टाकून परोपकाराकडे ओढा वाढवावा हाच विवेक होय . ******* कळेना नेमके हेचि । तारांबळ जनसामान्यांची । स्वप्ने उराशि पुनर्जन्माची । आवळोनि, प्रतीक्षिती मृत्यू ।। १५५३ पुण्य म्हणजे संपत्ती ?। पुण्यें मिळते सद्गती ?। पुण्याचे हिशेब करिती । म्हणे चित्रगुप्त दूत ।। १५५४ ज्याने सांभाळला संसार । माय-बाप, अस्तुरी, पोरं । त्याने केला परोपकार । आयुष्यभरी निश्चित ! जाणा ।। १५५५ कासेला लज्जा रक्षणार्थ लंगोटी । हाती कमंडलू, अभावाने छाटी । कशास हवी यांना राहुटी । फुका कारण खर्चाला !।। १५५६ मुळातल्या गांजेकसा । कशास हवी वेगळी नशा ?। अध्यात्माचा फसवा आरसा । दाविती भाबड्यासीं ।। १५५७ नशा ! देई बुध्दिभ्रम । नशा ! सहसा विकृतिचा उद्गम । नशा ! अतर्क्य कल्पनांचे सृजन । विविधरूपे ।। १५५८ व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ?। की शासकीय निरिच्छेचे लक्षण ?। भोंदू (संधि)साधूंना लोटांगण । नग्नतेस घालिति किं कारणे ? ।। १५५९ कसले गौरविता आखाडे ?। कसले नाचविता ध्वजांचे घोडे ?। जे देऊ पाहती नंगेपणाचे धडे । कां बां त्यांची कवतिके ?।। १५६० इकडे दर्गा, पल्याड मंदिर । पवित्र मेरी, तिकडे गुरुद्वार । प्रार्थना ? निमित्त, धर्मकांडांचे आगार । ठाईठाई ।। १५६१ धर्म म्हणजे गुंडांचा हैदोस ?। धर्म म्हणजे भाबड्या भोळ्यांना त्रास ?। धर्म म्हणजे माणूसकीला गळफास ?। नेमके काय ?।। १५६२ धर्म ! असतो कष्टकऱ्यांसी ?। धर्म ! असतो आपदा, हर्षोल्हासासि ?। धर्म ! असतो परमार्थासी ? जाणा फोलपण धर्माचे ।। १५६३ धर्म ! म्हणजे मंत्रोच्चार ?। धर्म ! म्हणजे पूजा, पाठादि अवडंबर ?। धर्म ! म्हणजे रक्षा, रुद्राक्ष, भिक्षाज्वर ?। दुर्लक्षिण्या आप्त स्वकीय ?।। १५६४ धर्म ! मेघांचा, बरसणे !। धर्म ! तरुवरांचा, छायाकारणे । धर्म ! वायूचा, पुनरुज्जीवन संभवणे । निसर्गांत ।। १५६५ धर्म ! विरावा कर्मकेंद्री । धर्म ! विझावा सहृदयांतरी । धर्म ! विरघळावा खडिसाखरेपरी । मनुष्यतत्वांत ।। १५६६ धर्म ! लीनतेचे व्हावे वर्म । धर्म ! हीनतेचा व्हावा तम । धर्म ! माणूसकीचा उद्गम । व्हावा धरेवर ।। १५६७ धर्म ! विद्वेषाचे कारण । धर्म ! झगडे, तंटे, युध्दांसि आवतण । धर्म ! सामान्यांचे मरण । सत्य हेचि अंतिम ।। १५६८ धर्म ! रक्ताचा कोणता, धमनींत ?। धर्म ! शक्तीचा कोणता, शौर्यांत ?। धर्म ! भक्ताचा कोणता, प्रार्थनास्थळांत ?। वेगळी जरी श्रध्देये ।। १५६९ धर्म ! उत्सव, बेहोषीस कारण । धर्म ! वादळे, संकटांना कां ना कारण ?। धर्म ! कर्पूरासम शुध्दिकारक प्रमाण । कां न व्हावा ज्वलनोत्तरी ?।। १५७० धर्म ! का न व्हावा वात्सल्य, माया । धर्म ! का न व्हावा, शहारणारी काया। धर्म ! का व्हावा, अडथळा पाया ?। होवोनि बेडी ?।। १५७१ धर्म मानतो निसर्गखुणा । धर्म सांगतो 'श्रध्येये तीच जाणा' । 'धर्म' आरडत घालिती धिंगाणा । पार्थिवांशी घालीत सांगड ।। १५७२ धर्म ! उपजीविकेचे साधन । धर्म ! विरंगुळ्याचे क्षण । धर्म ! न उधळावा बेभान । ही अल्प अपेक्षा ।। १५७३ धर्म ! कोसळतो भक्तांवरी । धर्म ! जाळितो भक्तांच्या जमाती । धर्म ! चेंगरून मरती, तरि कवटाळिती । भाबडे भयभीत ।। १५७४ धर्म ! दावितो सदैव भीती । धर्म ! अडसर 'माणूस'कीं प्रति । धर्म ! कर्मठांच अतर्क्य नीती । विमा अपवाद जगभरी ।। १५७५ धर्म ! प्रतिपादितो काकबळी । धर्म ! पार्थीवासि वस्त्रावंकारे उजळी । धर्म ! अधर्म्यांस चूल वेगळी । सांगतो मांडण्यासी ।। १५७६ ************* ।। दास-वाणी ।। देव अनुकूळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवाब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/२३ ज्याला परमेश्वर अनुकूल होत नाही त्याने विचारपूर्वक आपली कृत्ये आठवावी. पूर्वजन्मातील पापकर्मेसुद्धा या जन्मी दुर्दैव म्हणून येऊ शकतात.अशा जीवाला संसारसागर तरून पलीकडे मो्क्षाच्या तीराला पोहोचता येत नाही.आत्मस्वरूपाची भेट न घेताच मृत्यू पावतो म्हणून समर्थ त्याला आत्महत्यारा म्हणतात. या जन्मातील आपले कर्मस्वातंत्र्य वापरून जो दुष्कृत्ये टाळून सत्कर्मे करीत राहील त्याला कालांतराने मोक्ष निश्चित आहे . ************** स्वतंत्राने कसेही वागणे । म्हणजे इतरांसि लोटणे । पारतंत्र्यात ? आणि दुर्लक्षिणे । कामना त्यांच्या ? अश्लाघ्य !।। १५७७ पै पै करुनी अल्पसंपदा घडवंचीत । कामास जी येइल संकटांत । दानासाठी ती स्वहस्ते खर्चीत । जाणे ! अस्तुरीस कष्टप्रद ।। १५७८ ऐसे भाबड्यांसि लाविती भजनी । 'साधू'न संधी लुटती सोने, नाणी । म्हणती, 'अर्पिण्या, 'त्या'च्या चरणी । न दिसे, जो ! भेटणे दूरचि ।। १५७९ भरभरूनी लेकरे, वृध्द बापे बाया । म्हणती 'चला दर्शन घ्याया' । गर्दीत मरती चेंगरुनि पोरे, जाया । बेफिकिरीची परिसीमा ।। १५८० यात्रा तीर्थाटनासि जाती । प्रवासांत अपघातग्रस्त होती । अनुकळण्या त्यास संधी न देती । आत्महत्यारी ॥ १५८१ कोणता येतो देव ?। जो देऊन अमृतानुभव । परतोनि संसाराचा भव । असंभव जो दावेल ?।। १५८२ दयार्द्र ओढिती कलेवरे । परिचर, औषधोपचारे । बेशुध्द आपदाग्रस्तासि वाटावे बरे । म्हणुनी झटती अहर्निश ।। १५८३ कोण करंटा होतो सिद्ध । मतिमंद भक्त निर्बुद्ध ? की जो करण्यात मग्न प्रबुद्ध । 'त्या'च्या भक्तास ?॥ १५८४ साधनेकरिता एकटपण । कधि प्रसवते हेकटपण । हट्टांतुनं क्रोधाचे स्रवणं । अनिवार्य 'ताप'सासी ।। १५८५ भाबडे कष्टविती शरीरे । संगती घेउनि अस्तुरी पोरे । गावांत समग्र घरे दारे । ओसाड, उघडी ।। १५८६ तिकडे साधू साधती संधी । अनुदानाचा भोगत निधी । पक्वान्न झोडीत राहुटीबंदी । होत ! घोरती बिनघोर ।। १५८७ ह पाहिलेंत चित्र उलटे ? । माणुसकीसहि लज्जा वाटे । भाविकांची रिकामी पोटे । सांगा ! ते जाणतील ? ।। १५८८ वाचतांना गाथा, ग्रंथ । जर भावला कांहि दृष्टांत । शोधण्या साहित्यालंकार स्रोत । रेंगाळले मन ! वावगे काय ?।। १५८९ वारंवार होण्या एकाग्र । मन राहिले जर व्यग्र । तर्क-बुध्दी मूलत: कुशाग्र । हरवोनि बसेल संवेदना ।। १५९० रुजण्या सुफळण्या आशय । पळभर 'रवंथ' नको काय ?। अन्यथा 'अपचना'चे भय । अभ्यासांशि जाणा सदा ।। १५९१ उपदेश जरि योग्य असला । शिष्याप्रति पोहोचवायला । सुचल्या जर क्लृप्त्या 'सत्' गुरुला । दिनु जाणा 'सोनियाचा' ।। १५९२ वृध्दांच्या वेदनाध्वनींचे श्रवण । अस्तुरिच्या लाडक्या बोलांचे श्रवण । आनंदविभोर चित्कारांच् श्रवण । छकुल्यांच्या ! कोणती भक्ती ?।। १५९३ कीर्तन ! घणाच्या घावांचे । कीर्तन ! कर्मयोग्यांच्या नावांचे । कीर्तन ! शब्द-श्रुतीं पल्याडल्या भावांचे । कोणती भक्ती ?।। १५९४ स्वेदगंगेत बीजांस भिजविणे । मायेच्या छायेंत, रुजविणे, फुलविणे । कळेने पांपणी पाणावणे । काळजांतल्या ! कोणती भक्ती ?।। १५९५ जराजर्जर मायबाप स्मरणे । तान्हांसि आठवोनि स्मित करणे । मनोमनी पाहाणे । आप्तस्वकीयांसि ! कोणती भक्ती ?।। १५९६ सेवा ! दीन, दुबळ्यांची । सेवा ! अपंग, अनाथांची । सेवा ! अथक् कृतिप्रवणांची । कोणती भक्ती ?।। १५९७ वास्तव्य वा वास नकोचि समीप । 'अभाव' देव होणे टळेल आपोआप । नसलेपण स्वप्नांतही पाहाणे.. पाप । थांबता श्वास, मुक्तीसत्य ।। १५९८ वंदन ! पंचमहाभूतांना । वंदन ! शशि भास्कर तारकांना । वंदन ! सप्तस्वर, द्वादशाधिक दोन श्रुतींना । अविरत आमुचे ।। १५९९ तरिही विभोर उत्सवहेतु । बांधण्या सांधण्या विचार, सेतू । न बाळगता अश्रध्द किंतू । मनांत ! आणिली मिरवणुकीने ।। १६०० आणोनि, विधिवत प्रतिष्ठापिली । मनोभावे न्याहाळिली, पूजिली । उत्तरपूजोत्तरी विसर्जिली । वाहुनी अ-क्षता ।। १६०१ सुख वाटले निरखिता । उचंबळली वेदनांची गाथा । तरी मागणी उध्दरण्या करिता । न केली, निग्रहाने ।। १६०२ न चर्चिले सर्वांगी भस्म । न रुद्राक्षांचे कांही काम । न जटा, जप-तपादि धर्म(?)कर्म । नाहक आम्ही अवलंबिले ।। १६०३ कोठे म्हणे सांडले 'अमृत' । वडवानली 'पुण्य'प्राप्त्यार्थ घृत । दमल्या भागल्या भुकेल्या पोटांत । घातले घास कोणी ?।। १६०४ अरे विटाळू नका रे माणूसकी । काय घेवोनि जाल उरले बाकी । वस्त्र-प्रावरणे छानछोकी । ओरबाडतील कुडिवरोनी ।। १६०५ लक्षवेधी जर दिसाल । कार्यदाते विचार करतील । तत्पश्चात मुद्रा लागतील । हातासि, करण्या गुजराण ।। १६०६ मिळाल्या ग्रासाचे वाटे । करोनि सारखे, जितुकी पोटे । राखोनि, द्यावा कणव वाटे । त्यासी, ममत्वाने ।। १६०७ इहलोकी प्रपंचांत । कुटुंबियांच्या क्षुधाशमनार्थ । झटत राहाती दिवस-रात्र । कसा पाहावा 'परमार्थ' ?।। १६०८ 'स्व' पलीकडले जे जे । त्यांसि संगोपन काजे । शिरावर वाहिले ओझे । कां न मानती 'परमार्थ' ?।। १६०९ तसे 'अति' जगणे व्यर्थचि । वेळ 'ती' कोणती ? माहितीची । नसते स्वप्नांतही कल्पायाची । जनसामान्यांनी ।। १६१० जरि आराध्य इष्टदैवत । तरि प्रत्यक्ष भेटणे दुरापास्त । असोनि पुरते माहीत । भज-पूजती आनंदहेतु ।। १६११ कसे 'पुरेसे' वाटावे ? । अस्तुरी-पोरां ओठी ग्रास पडावे । कष्टोत्तरी फळ पुरेपूर मिळावे । अपेक्षिणे काय अनिष्ट ?।। १६१२ नाद ! नवजाताच्या टॅंहॅं चा नाद ! छकुल्याच्या खिदळण्याचा नाद ! मायेच्या हांकेचा अनावर, अनिवार्य ।। १६१३ घर्षण मूळ कारण घर्षण नादासि आवंतण घर्षण तेजोशलाकेचे अऱ्कुरण ऊर्जारूपे अवघी ।। १६१४ सामान्यासि ग्रंथस्वरूप मूक बधिरासि अक्षररूप तैसे नेत्रहीनासि ध्वनिरूप ज्ञानार्जना हितकर ।। १६१५ कर दोन्ही, उर्जास्रोत । जोडोनि तळवे एकवट । अखंड असावे कार्यरत । अभावदेवा दुर्लक्षुनी ।। १६१६ विविध निसर्गरम्य स्थळे । रचनाशास्त्र आदर्शशी, देवळे । शिल्पाकृती पार्थिव उजळे । निरांजन, समया मंद प्रकाशांत ।। १६१७ वस्त्रालंकारे टाकिती लेपुनी । उट्या, गंधाक्षतांच्या पुटींनी । सजवू पाहाती लावण्य-लेणी । घडविली पाथरवटें जी ।। १६१८ कोठे शोधाल त्याला ? बडव्याच्या कोंडाळ्यांत घुसमटला । नाहीच प्राणप्रतिष्ठापिला गेला । मुळांत अस्तित्वहीन ।। १६१९ मणभर चढवतील सुवर्णझळाळी । कणभर अन्नास पारखी जनावळी । करतील ! पंचपक्वान्नें भिक्षेची झोळी । भरतील 'साधूं(?)' ची जरी ।।१६२० अस्थिव्यंगस्थ जराजर्जर । अष्टवक्र, शुष्क शरीर । परि मुखावर तवान सर्वदूर । लालिमा आवाहनास सज्ज ।। १६२१ फुललेला सालंकृत गुलमोहर । धरी छाया तळिच्या तृणावर । हलेना त्यावरुनी नजर । पांपणी मिटेना ।। १६२२ धर्म म्हणजे संप्रदाय ?। धर्म म्हणजे पोळल्या मना उपाय ?। धर्म म्हणजे खरे काय ?। कोडे सर्वसामान्यांना ।। १६२३ धर्म म्हणजे अनुष्ठानं ?। धर्म म्हणजे हवी भक्षक यज्ञ ?। धर्म म्हणजे जगण्याचे विज्ञान ?। कां पडावा प्रष्ण ?।। १६२४ धर्म म्हणजे परंपरा रीती ?। धर्म म्हणजे 'पाप' घडण्याची भीती ?। धर्म म्हणजे श्रध्देयाप्रती प्रीती ?। कसे जाणावे ?।। १६२५ धर्माला काय अधिष्ठान ?। धर्माला काय हवे असते ? मन की धन ?। धर्माला काय आधार ? वेद, पुराणं ?। मुळांत जे अनाकलनीय ।। १६२६ धर्म म्हणजे साधी राहाणी ?। धर्म म्हणजे कणवेने पांपणींत पाणी ?। धर्म म्हणजे सुखसमाधानाची पुष्करणी ?। व्हावी निर्विवाद ।। १६२७ धर्माचरणे साधते काय ?। धर्माचरणे साधते भवतरण। कार्य ?। धर्माचरणे साधते सत्कर्मतात्पर्य ?। जगतांना ?।। १६२८ धर्म म्हणजे संस्काराची चौकट । धर्म म्हणजे ना वेद, मंत्र बिकट । धर्म म्हणजे मानवकल्याणाचे यत्न धीट । व्हावे साहाय्यभूत भवसागरी ।। १६२९ धर्म म्हणजे कर्तव्यपूर्ती । धर्म म्हणजे कार्यमग्न निवृत्ती । धर्म म्हणजे कर्मयोगनीती । समजावी सर्वकाळ ।। १६३० धर्म ! अपंगांसी आधार । धर्म ! छिन्नमनावर फुंकर । धर्म ! आश्वस्त परिसर । असावा सदा ।। १६३१ धर्म ! नसावा व्यसनाधीन नशा । धर्म ! नसावा तमगर्भी निशा । धर्म ! असावा तेजोद्भव कवडसा । तृणांकुरा ऊर्जादाता ।। १६३२ धर्म ! सप्तरंगांचा आविष्कार । धर्म ! नादावले सप्तसूर । धर्म ! बावीस श्रुतींचा तंतकार । सुखकर अबालवृधांसि व्हावा ।। १६३३ धर्म ! रूप, रस, गंध । धर्म ! श्रवण, स्पर्शाचा आनंद । धर्म ! संथ, शांत, कल्लोळ कंद । ज्ञात व्हावा सर्वदूर ।। १६३४ धर्म ! म्हणजे छाटी, चिमटा ?। धर्म ! म्हणजे दाढी, जटा ?। धर्म ! म्हणजे उत्तरदायित्वाचा वाटा । झुगारोनि होणे परागंदा ?।। १६३५ धर्म ! म्हणजे कालबाह्य पुराणे गाथा ?। धर्म ! म्हणजे हाक अनाकलनीय अज्ञातां ?। धर्म ! म्हणजे अथांग खोल गर्ता ?। लोभसवाणी ।। १६३६ धर्म ! म्हणजे नामस्मरण उफराटे ?। धर्म ! म्हणजे जप-पाठ,जोवरी न ऊर फाटे ?। धर्म ! म्हणजे भवसागरी आधार बेटे । कां न व्हावी ?।। १६३७ धर्म ! माझा कोणता म्हणावा ?। धर्म ! जन्मदात्रिचा असावा ?। धर्म ! जन्मदात्याचा वा कल्पावा ?। 'टाकलेले' जाणावे कोणधर्मी ?।। १६३८ हिमरूप धारिते जेंव्हा जळ । कठोर कुठार धारदार, सहस्र गजबळ । सहजी भंगीत जलनिधि कल्लोळ । अवतरे भाग आठवा ।। १६३९ वरकरणी प्रवाही निर्मळ । निर्झरी नितळ स्वच्छ जळ । परि तळाशी साचतो गाळ । जैसी परमार्थोत्तरि उद्विग्नता ।। १६४० उत्सर्जितांतुन साखर ? । निसर्गाचा 'चमत्कार' ? । परंतू विज्ञानाचा आधार । निर्विवाद ।। १६४१ मुळाशी वोतले जळ । तोडुनि गुरुत्वाकर्षणबळ । हिरवाइत विविधरंगी पुष्प, फळ । त्यां वेरी पोचते वर पोहोचे ।। १६४२ जे सापडले कचऱ्यांत । आणुनी पाळले घरांत । प्रेमभरे घेतले कुशींत । त्याचे 'कुल' कोठले ?।। १६४३ महाल होता परिपूर्ण । चंबूगवाळे, अस्तुरी, छकुले घेऊन । कर्मकार त्यजती भावबंधन । तान्ह्याची 'वास्तू' कुठली ? ।। १६४४ नका म्हणू 'माझे माझे'। अखेरिस येथेच सोडोनि जायचे । कुळ, वास्तू, संपदा, प्रतिष्ठेचे । 'लोढणे' ! मूकपणे ।। १६४५ कशास कालापव्ययी वारी । कशास प्रदूषित कर्दम पंढरी । जर 'भगवंत' हृदयांतरी । कशास आटापिटा ।। १६४६ निरभ्र आभाळ वा झाकोळ । सारे निसर्गाचे खेळ । विज्ञान करु पाहे उकल । सहस्रकांतुनी ।। १६४७ अंकुराचे वाढणे फोफावणे । अळीचे फुलपाखरू होणे । इंद्रधनुत रंग भरणे । निसर्ग चक्रमेनिक्रम सारे ।। १६४८ करू धजाल पूजा पाठ ?। मिसर्ग खचितच फिरवेल पाठ । पुरणपोळीच वा जाड रोठ । कर्मांचेचि केवळ फळ ।। १६४९ अवर्षण वा अतिवृष्टी । निसर्गाधीन अवघी सृष्टी । जप तप आळवण्यादि गोष्टी । फोल ! सायास व्यर्थ ।। १६५० 'कर्तव्य' जाणा एकचि धर्म । पहिल्या अखेरच्या मधले वर्म । श्वासाच्या । नमविण्या कांड कर्म । तोकडे, फाटके जीर्ण सारे ।। १६५१ आपण सारे य:कश्चित । जन्मल्यावर मृत्यू निश्चित । तेल संपता विझतेचि वात । नवल त्यांत कसले बा ? ।। १६५२ किती चढवाल श्रीफळ लेणी ?। जलधीस घालाल गवसणी ?। अवकाशांत तडितेची हिरकणी । धजाल कवळण्या ?।।१६५३ मेद आणि उमेद । केवळ उकाराचा भेद । एक मारक दुसरी साद । जगण्याला ।। १६५४ छिन्नी-हातोड्याचा घावं । भरील फत्तरांत देवं ?। कळाकुसर मूर्तिकारी भाव । दृश्यमान, होता 'लक्षणीय-दर्शन' ।। १६५५ हवा तेंव्हा हवेने वारिला । परि संतत धारेने कोसळला । प्रार्थना-अनुष्ठानांनी न भारावला । तो निसर्ग ।। १६५६ कोठ कुणाचे काय गळेल । अनिश्चित स्राव प्रवाहेलं । नरासही अनावर होईल । मनी राहा जाणोनि ।। १६५७ गर्भावस्थेतच शरीर । विविध स्रावांनी परिपूर्ण । वाढ, परिपक्वतेस कारण । हितकरचि जे ।। १६५८ अरे निर्लज्ज बडव्यांनो । कर्मकांडी, मानवारि कडव्यांनो । स्खलनशील, विज्ञानबुडव्यांनो । बाहेर या ढोंगांतुनी ।। १६५९ ठावके नाही शिक्षित वा मूढ
मी ! लिहिले कैसे ? मलाच गूढ
परि शब्दांची अगम्य ओढ
प्रेरित गेली अविरत ॥ १६६०
निरोपासि अर्धाधीक तीन
चरणांकरवी मी होय लीन
आंता उलटू द्या पान
अखेरचे ॥ १६६१
म्हणता-करतांना 'इति'
कुणास ठावे, पण ओलावती
पापण्या ! वाचकांप्रती
व्यक्तण्या कृतद्न्यता ॥ १६६२
तसेहि तुटणे नसते सोपे
इवली लाविलि अक्षर रोपे
वृक्ष होवोनि नभावर पाहा झेपे
असोशीने दिव्याच्या ॥ १६६३
इवली रुजवत गेलो बीजे
आज झळाळति स्वत्व-ओजे
कां आणि कुठल्या काजे
ठावके झालेचि असेलं ॥ १६६४ आतां नको गळामिठी । नकोच दहिवर पांपणीकांठी । निरव, निश्चल तमभेटी । कटि म्यां कसली ।। १६६५ माझ्या शब्दमाये वैखरी ।
विनवितो परोपरी ।
आतां जाउ दे पैलतिरी ।
भावसागर लंघुनी ।। १६६६ सोड ना रे अक्षरबाळा ।
पुरे झाला आतां लळा ।
मग निर्वाणाच्या वेळा ।
कशी निमेल ज्योत ? ।। १६६७ गदगदला जरी कंठ ।
आता फिरवलीच पाहिजे पाठ ।
घ्यावया उकलुनी निरगांठ ।ह
तरल, विरल निरोप ।। १६६८ रीतीने विवाहोत्तरी । अश्राप सोळा सहस्र नारी । कामना पूर्ण करी । उरी कवटाळोनि, त्यांच्या ।। १६६९ ऐसा पूर्णपुरुष समर्थ । रक्षक भवती असता सर्वार्थ । किं कारणे भाडोत्री भक्तांचा हात । धरिते 'राधे मॉं' ।। १६७० मिरवित न्हाती-धुती पोक्त नारी । सांभाळती 'सरे आम' घेउन कडेवरी । निर्लज्जपणाच्या सीमा पार करी । म्हणे, 'ही भगिनी' ।। १६७१ कां कुणास ठावे आज । कानी घुमू लागली आज । दूरस्थ तरी अटळ जहाज । 'अखेर' नावांचे ।। १६७२ म्हणावे ! झाली इतिकर्तव्यता ?। म्हणावे ! लागले इप्सित गातां ?। म्हणावे ! स्वर विरले गातांगातां ?। निमाल्या श्वासासवे ?।। १६७३ निवांत मन ! विचारांचे काहूर । निवांत मन ! कुरतडणारी हुरहुरं । निवांत मन ! वेदनांची झालरं । संचिताला ।। १६७४ आधी खोल निळाशार । कधी मग झाकोळाचे घर । मळभ प्रतिबिंब काळेशार । चर्येवर जलधिच्या ।। १६७५ अस्वस्थगर्भी पिंगळावेळं । पैल घंटांचा कल्लोळ । बाहणारी निर्मळ जळं । करण्यावा शुचिर्भूत ।। १६७६ हे सांगण्या शेवटी कोठे । जेंव्हा ''बोलती बंद' होते । आप्तांचा पांपणी दहिवरते । शोक शंकेने ।। १६७७ शोक ? संपत्ती विरहाचा ?। शोक ? जिवलगाच्या दुराव्याचा ?। शोक ? स्वतत्वांत विरघळून जाण्याचा ?। करू नको बाप्पा !।। १६७८ म्यां, एक सर्वसामान्य । परि शिखेवर असामान्य । दिव्य करांचा सतत धन्य । आशीर्वाद परंतु ।। १६७९ हे असावे लागते प्राक्तनांत । सहसा नाहीच कुणा मिळतं । योगायोगांची हीचं रीत । बहुधा असावी कां ?।। १६८० सारेच बहाणे फसवे । हरघडी रुसवे-फुगवे । अक्षरांचे ! कधि उभे दावे । पटकुरावर मांडिले म्यां ।। १६८१ या या ! भाव ? लई कमी । 'लय' जाणवे अंतर्यामी । लुबाडा, फाडा, ओरबाडा ! राही । भरलेली थाळी द्रौपदीची ।। १६८२ चित्र ! अर्थपूर्ण रेषांचा मेळ । चित्र ! रंगांचा सुखद कल्लोळ । चित्र ! आनंद-तरंग कधी, कधि दु:खाचा जाळ । निर्विकार स्वत: ।। १६८३ चित्र ! अनुभवाचे प्रतिबिंब । चित्र ! तृषार्त मनाचा कोंभ । चित्र ! कधि अज्ञाताची साद । कुंचल्यासी ।। १६८४ चित्र ! डसलेली नागीणं । चित्र ! भूताची कधि वीणं । चित्र ! देईल कां दृष्टिकोन । मतपरिवर्तना ? ।। १६८५ चित्र ! असे तसे नि:शब्द । चित्र ! निरक्षराचा परि वेद । चित्र ! अपेक्षांना देते छेद । क्वचित प्रसंगी ।। १६८६ चित्र ! खुलविते सौंदर्य । चित्र ! कुरुपतेचा लय । चित्र ! प्रत्यक्षाला भय । विस्मरणाचे ।। १६८७ चित्र ! जर झाले जिवंत । चित्र ! व्यक्तेल मनाचा पोत । चित्र ! हलवील भिंत । सत्यासत्यते मधली ।। १६८८ चित्र ! झाले जर त्रिमिती । चित्र ! कुंठित करील मति । चित्र ! रंगरेखांची नीती । उलगडेल सहजी ।। १६८९ चित्र ! रंग-रेखांचे तान्हुले । चित्र ! कुंचल्याचे बाहुले । चित्र ! प्रतिबिंब स्थिर जळांतले । विलोभनीय ।। १६९० चित्र ! अंतर्मन आरसा ?। चित्र ! कसबाचा कवडसा ?। चित्र ! आनंदाचा वसा । कुंचल्याच्या ।। १६९१ चित्र ! गतस्मृतींचे रंग । चित्र ! रेषांचे वक्र अंग । चित्र ! निळाईंतले कृष्ण-धवल मेघ । पतनोत्सुक ।। १६९२ चित्र ! अतर्क्याशयी नसावे । चित्र ! भडक छटांचे नसावे । चित्र ! अस्पष्ट रेखांचे नसावे । कदापिही ।। १६९३ चित्र ! मनाचिये गुंथिची वीणं । चित्र ! अपूर्व, निसर्गदत्त वाणं । चित्र ! अव्यक्तास दिलेली जाणं । कल्पनातींतं ।। १६९४ चित्र ! चौकट-मर्यादे आंतले । चित्र ! परि अमर्याद पसरलेले । चित्र ! धरूं पाहता विरघळले । रसिकाच्या दृष्टींत ।। १६९५ चित्र ! असले तर फलकशोभा । चित्र ! फसले तरि फलक'शोभा' । चित्र ! नसले तर 'कलंकशोभा' । म्हणुनि गोंजारिती ।। १६९६ चित्र ! सत्याला खुलविते । चित्र ! कल्पनाबीज फुलविते । चित्र ! मानस झुलविते । हिंदोळ्यावर सुखाच्या ।। १६९७ चित्र ! केवळ बाह्यदर्शन । चित्र ! स्पर्शेल अंतर्मन ?। चित्र ! विचारांचे रंगावतरण । सहसा दिसते ।। १६९८ सुखं ! साखरेच्या गाठीं । दु:ख । सूत्र, ओवण्यासाठी । अर्थ ? अनिवार्य भेटी-गांठी । तुटेवेरी ।। १६९९ प्रबोधन ! वारण्या किंतू । संशोधन ! साधण्या हेतु । विज्ञान ! रक्षिण्या जीवजंतू । 'धर्म' कांडा पासोनी ।। १७०० *************** अध्याय सहावा: आजपासून कोसळे अगणित करें निसर्ग । की आरंभला जलयाग ?। चिंबचिंब परिसर, भूभाग । आतुर अवनी प्रसविण्या ।। १७०१ राखाडी जाहले हिरवे सहजी । 'तहान', 'शुष्क' भासती 'माजी' । निसर्गासि असते काळजी । भजा, पूजा वा हेटाळा ।। १७०२ भळभळा पाहे वाहू मन । आषाढ सरींशी स्पर्धा जाणं । आळा घालणारा मी कोण ?। उचंबळोनि वोसंडता ।। १७०३ तरारलेली हिरवळ पायतळी । भुरे चला दूत आभाळ कपाळी । तुषारोर्ध्व पागोळी साकळल्या जळी । मृद्गंध दरवळे आसमंती ।। १७०४ ऐशा ओलेत्या चिंब क्षणी । मनांत रुंजी घालती गाणी । ऐकायला, गाया जवळचे काणा । असावे वाटे ।। १७०४ मळभाविणा आभाळ वाऱ्यासि जैसे ! विकाराविना मुक्त मन होय तैसे । दाव्यासि बांधू पहाल पाडस कैसे ?। असतां गाउली समोर ।। १७०५ आज ऐसे कां गंमे एकाकी । जिवलग सोडून गेले लौकिकी । ठेविले मसि एकला बाकी । दाटून येतो कंठ। ।। १७०६ दर निशांत समयी । सईंची तेवते समई । पापणी कांठी ठाईठाई । साकळतो दहिवर ।। १७०७ आज कां होई चित्त हळवे । दुरून आठवणींचे रावे । बाहती मसी तयांच्या गावे । होण्या आनंदविभोर ।। १७०८ कटु-मिष्ट स्मृति कल्लोळ । पुनरुज्जिवित करण्या हतबल । हरवलेले कैसे गवसेल । शंका ! वेदना खाईंत लोटे ।। १७०९ गुरु देई मार्गप्रदीप्ती । गुरुचा अंगुलीनिर्देश निधानाप्रती । गुरु करितो समृध्द स्वमती । देवोनि सकळ कळा ।। १७१० पुळणीसि सागर, सागरासि धरणी ? । जळामध्ये कमळ, पंकजासि पुष्करणी ? । रत्नासि कांकण, कांकणासि गृहिणी ?। शोभविते ! कोण ? कुणा ।। १७११ मेघ:शाम भारले आभाळ जळ इतस्तत: झुळझुळ बीजफुटल्या हिरवाईचा कल्लोळ आनंदले घर-परसूं ॥ १७१२ धर्म सांगतो 'तोडा फोडा' ?। धर्म सांगतो 'निष्पाप्यांसि रगडा' ? । धर्म सांगतो 'हाणून पाडा' । नीती सहिष्णुतेची ?॥ १७१३ मनगटावर सुवर्णकडे । परि मुद्रेवर भाव वाकुडे । ऐसे अवलोकिता रूपडे । बुचकळ्यांत पडे मन ।। १७१४ धूत वस्त्र सर्वांग झाके । मुद्रेवर भाव प्रसन्न, बोलके । आकर्षक प्रभा फाके । सज्जनांच्या भवताली ।। १७१५ विचित्र हळवी पिंगळावेळ । मन उगा उदास घायाळ । ढवळू पाहती अंतरिचा तळ । सुह्रदांच्या सईं ।। १७१६ लख्ख ना जोवरी तेजोनिधी । जडून राहिल मनोव्याधी । पुसत 'सरणार कधी ?'। पिसे सैरभैर ।। १७१७ तसेही गर्दींत एकलेपण भयाण । सुख-दु:खांच्या आठवांची खाण । विखारी विचारें लडडबडलेले मन । होवू पाहे अनावर ।। १७१८ स्वर दुरून तरंगत यावे । रिकामपण भारोनि जावे । अलवार फुंकर सलेवर व्हावे । जैसे मन:क्षोभावर आषाढघन ।। १७१९ नात्यांचे अतूट बंध । दरवळ, परिमळ, सुगंध । भावनांचा अनावर बांध । रूपे विविध,अलवार ।। १७२० स्नेह ! कधि न वाटे तुटावा । स्नेह ! विविध रूपे भेटावा । स्नेह ! विरहाने वृध्दिंगत व्हावा । भेटी पूर्वी ।। १७२१ विरहाच्या अनेकानेक परी । वेदना, खंत रूप एकचि परी । सत्य मनडोहाच्या तीरी । स्वप्नमग्न वांछा ।। १७२२ स्वर ! नादचरणिचे तीर्थ । स्वर ! मनवेधी करुणार्त । स्वर ! उचंबळणारी प्रीत । शब्दांप्रति ।। १७२३ स्वर ! आविष्कृत आनंद । स्वर ! अनावर निसर्गछंद । स्वर ! कळकामधला छेद । भारू पाहे ।। १७२४ अंतिमाची अनाठाई भीती । पावलातळी सरकते माती । जिगिषा कां पडते कोती । नकळे सद्यकाळी ।। १७२५ सळसळती उमेद, नटलेली हिरवाई । कां उगा किंतु अन् मनास चिंता खाई । श्वासाला सरत्या जाण मुक्तिची होई । ना ! अलिकडे ।। १७२६ आश्वासक तरिहि रोजंच झुंजूमुंजू । तमपरिघालाही मंगल सुवर्ण बाजू । लागल्या जरी पैलतटी घंटा वाजू । शंख, वीणा, डमरूं सुखावती ।। १७२७ ऊर्ध्वासि फेके सकळ जळे । मेघगजांची धावती इतस्तत: दळे । हा हा:कार, आपुल्या अचाट बळे । माजवे निर्हेतुक ।। १७२८ नगाधि, आरण्ये, जीवजंतू । ना विचार, विकार वा किंतू । राखोनि ! विध्वंस वा निर्माण हेतू । कृती जाणा निर्हेतुक ।। १७२९ 'त्यां'सि ना देणे घेणे । दिठीचे फेडावयासि पारणे । सप्तरंगी अगम्य लेणे । 'तो' चि विखरे निर्हेतुक ।। १७३० 'त्यां'सि भजा, पुजा वा लाथाडा । आपुल्याचि रंगी दंग बापुडा । असतो ! काळरेखेचा घालीत वेढा । ना आदि-अंत, 'त्यां' निर्हेतुक ।। १७३१ अवकाशीय घडामोडी । शास्त्राला अगम्य कोडी । मनुष्ये क्षुद्र बापुडी । सदा विस्तीर्ण वासती मुखे ।। १७३२ वाटते वरकरणी सारे नियमीत । घटनाक्रम दिन रजनी चक्राकित । परंतु अनाकलनीय उलथापालथ । निखर्व युगांतुनि कधीतरी ।। १७३३ तरिही धरिती एकमेकांचे गळे । उध्वस्त करिती प्रार्थनास्थळे । पसरीत अमानुष धर्मांचे जाळे । क्षणभंगुर जगण्यांत ।। १७३४ आशा निराशा संस्कृती विकृती । छेदण्या, छाटण्याहेतु विविध पाती । अनाकारण सरसाविती असिधाराव्रति । विविध प्रांत, देशांत ।। १७३५ विक्राळ उसळते जळ ! प्रतिनिधी । पेटला वणवा, वडवानल ! प्रतिनिधी । झंजावाते वृक्षवल्ली उन्मळ ! प्रतिनिधी । 'त्या'च्या लहरीचे ।। १७३६ 'ज्या'ला म्हणू पाहती 'देव' । तो असतो प्रत्यक्ष असा संभव । 'त्या'च्या ठाई आपला 'भाव' । 'शून्य' जाणा ।। १७३७ भवताल, घटना, दृश्य ? भौतिक जाणा । कार्यकारण, प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम ? भौतिक जाणा । उद्गम, विस्तार, अंत ? भौतिक जाणा । अनंतांत विश्वगर्भी ।। १७३८ कशास सीमा आणि लढाई । भिंतीपल्याडचे निर्घृण कसाई । व्याघ्र मिळेना म्हणुनी गाई । मारिती अमानुषपणे ।। १७३९ मनुष्येचि अलिकडे पलिकडे । भाषा, अन्न, रिवाज वा अंगडे । जरि वेगळाली, किं कारणे कवाडे । विखाराची उघडती ! ।। १७४० अशी कांहीशी माउलीची जाणीव । हृदयांतरीची अपार कणव । ठेवोनि निर्मळ निरपेक्ष भाव । पसायदान मागीतले ।। १७४१ श्वानांचे अनावर भुंकणे, रडणे । आक्रमक कधी, कधि केविलवाणे । ऐसेचि कांहिसे सामान्यांचे जिणे । मजसारिखे ? ।। १७४२ नुरलो जरि शारीर, भाव रूपे । अक्षरांची बीजांकुरुनि रुजवेन रोपे । घेवोनि स्वत्व अहंकार, पुण्य पापे । सांगाती ! पंचमहाभूतांत विरेन ।। १७४३ असंभवेन तरिही सई । ठेवोनि पंक्तीं-अंतरांठाई । पहाल सहज जरि कांही । भासेल माझे मंदस्मितं ।। १७४४ गुणावगुणा पलिकडे । आकाराचीहि ना बेडी कडे । तरी त्यां'सि अंगडे टोपडे । चढवू पाहती ।। १७४५ वेदना ! अश्रूंचा मूलस्रोत । वेदना ! मुद्रेची रडवेली गत । वेदना ! भाबडे निवारणार्थ । अंधश्रध्देला बळी जाती ।। १७४६ गंडे, दोरे मनगटावर । ताईंत, गोंदण अंगभर । भस्मलेप, बुक्कादि भाळावर । 'असल्यां'च्या सर्वकाळ ।। १७४७ अध:शाखारूपी मूळ । वा पारंब्या ऊर्ध्वमूल । विस्तारण्या स्वकुल । रस शोषिती वृक्षाचा ।। १७४८ सशक्त होता किंचित बळे । रूप दाविती अतर्क्य बांडगुळे । सांगती 'आमच्याचि मुळे । उभा राहि पाहा वृक्ष' ।। १७४९ 'ऐशां'सि वर्णांवे कैसे । वाणी मुखांत जडावतसे । उत्च्चारा कंठ रुध्द होतसे । उद्वेगाने ।। १७५० कृषिवल जाणितो निरंतर । बीज रुजविणारा राहतो दूर । मांडतांति 'भावां'चा बाजार । दलाल, आडते, व्यापारी ।। १७५१ मुळांसि कुऱ्हाडिचे कैसे भय ?। वा पारंब्यंसि त्याचे काय ?। पडता घाव, मोकलुनि धाय । वृक्ष बापुडा रडतसे ।। १७५२ जातपात, धर्म, पंथ भेद । राजकारण्यांचा प्रथम वेद । लागता मतपेट्यांचे वेध । लागूलचालन, लाचारी बोकाळे ।। १७५३ शिखरं दिसता जोडतो हात । मी ! विचारांवर संस्कारांची मात । होते कां सहज नकळत ?। नाकारेन जाणतेपणी ॥ १७५४ धर्मविचारांचा संचार मनी । कर्तव्य हाचि धर्म मानोनी । आळा कर्मकांडासि घालोनी । प्रतिपादितो विज्ञान ॥ १७५५ कधी पसरतो मागावया पसा। मैत्राचा जीव होतो कसनुसा । 'अमानुष' जेंव्हा रोधते श्वासा । आवरोनि हताशी अविचार ॥ १७५६ मी क्रांतिकारक वगैरे ? नाही । तत्ववेत्ता, वा चिंतक ? नाही । अवतार, प्रेषित, संत, साधू ? नाही । भेदरून घाबरा आक्रंदतो ॥ १७५७ शब्दाचा भावार्थ शब्दाचा ध्वन्यार्थ । शब्दाचा मथितार्थ शब्दाचा व्यंग्यार्थ । शब्दाचा श्लेषार्थ शब्दाचा काव्यार्थ । उलगडावा संवादामाजी ।। १७५८ शब्दांना आवर, शब्दांना सावर । (सावर म्हणजे मार्दव, सावरी सारखं ) शब्दांना किनार, शब्दांना झालर । शब्दांना दुधार, शब्दांना विचार । हितकर संवादामाजी ।। १७५९ शब्दाचा आवेग शब्दाचा सहभाग । शब्दाचा वियोग शब्दाचा विनियोग । शब्दाचा विसर्ग शब्दाचा उपसर्ग । असावा संवादामाजी ।। १७६० शब्दाचे माधुर्य, शब्दाची कामना । शब्दाचे तात्पर्य, शब्दाची भावना । शब्दाची जाणीव, शब्दाची योजना । जपावी संवादामाजी ।। १७६१ शब्दांचा आक्रंद, शब्दांचा आनंद । शब्दांचा प्रमाद, शब्दांचा अनुनाद । शब्दांचा अनुवाद, शब्दांचा मकरंद । दिसावा संवादामाजी ।। १७६२ विधान वा पृच्छा, उद्गार वा मौन । विनोद वा परिचर्चा, क्रोध वा अवमान । आव्हान वा आवाहन, अव्हेर वा समर्पण । मोकळावे संवादामाजी ।। १७६३ पूर्वरंग, आख्यान, उपसंहार । आरंभ, मध्य नी अखेर । उन्नयन, समाधान, सारासार । अनिवार्य, संवादामाजी ।। १७६४ श्लोक, आर्या, ओवी, अभंगवाणी । पोवाडा, गौळणी, विरहिणी, लावणी, । काव्य प्रकारांची सुयोग्य पेरणी । विरंगुळा संवादामाजी ।। १७६५ म्या पामरे काय नि कां सांगावे । उचंबळावे ते ते केवळ मांडावे । अभिप्राय, हेटाळणीस नम्र भावे । जावे सामोरी इतुकेची ।। १७६६ देखिले, ऐकिले, अनुभवले त्याची उजळंण । सखोल अंतरांत दृढोत्तरी विश्लेषण । परिणामी प्रकट उच्चारण । सावधपणे करितो जी ।। १७६७ गुहा, गिरिवनांत एकांत, लंगोटी । नकोचि चिमटा, कफनी छाटी । किंवा अस्वच्छ जटा, दाढी मोठी । अवडंबर, देखावा ।। १७६८ एक संवेदनशील मन । पूर्वसुरींच्या शब्दांचे दान । अनुभवसमृध्द जिवंतपण । अल्पअपेक्षा सर्जनहेतु ।। १७६९ अविरत चक्र मगजामाजी । उलथापालथ अंतरामाजी । तरि स्थिरभाव मुद्रेमाजी । लक्षण प्रगल्भतेचे ।। १७७० परक्याचे धन वांछावे । भुकेजल्याचे ग्रास भिक्षावे, भक्षावे । आनंदावर अकारण झाकोळावे । उपदेशरूपे ! बरे नोहे ।। १७७१ साकडे ! हवे ते पिकण्यासाठी । साकडे ! आहे ते टिकण्यासाठी । साकडे ! उभे ठाकण्यासाठी । सामोरी 'तो' ।। १७७३ साकडे घालिता काय सरेल ? साकडे घालिता काय भरेल ? साकडे घालिता काय वारेल ? आपदा 'तो' ।। १७७४ साकड्याने होते काय ? साकड्याने सुटतो पाय ? साकड्याने होते सोय ? बसल्याजागी ग्रासाची ?।। १७७५ साकड्याने होते काय ? साकड्याने वारिते भय ? साकड्याने सापडतो उपाय ? भवसागर लंघण्याचा ?।। १७७६ सांकडी तद्दन बेगडी । सांकडी, अंधश्रध्देची आंकडी । सांकडी, मूलत: वाट वाकडी । इप्सिताप्रति ।। १७७७ सांकडे, कार्यनाशाचा आरंभ । सांकडे, कालापव्ययी गर्भ । सांकडे, कांचणारा सुंभ । मनासि भयभीतांच्या ।। १७७८ अविरत 'ज्यां'साठीअट्टाहासं । 'प्रत्यक्ष भेटेल' अंतरी आंसं । स्वप्नांतही केवळ भासं । ना कदापि होईल, जाणा ।। १७७९ कळवळेल जरी जीव । 'त्या'ला नाही कुणाची कीव । मुळांत, कारण जो 'असंभव' । 'पोकळ, 'हवा', जाणा ।। १७८० परिक्रमा करावी सरितांची । परिक्रमा करावी तरु-लतांची । परिक्रमा करावी जीव-भूतांची । विभोर होण्या निरीक्षणी ।। १७८१ परिक्रमेने साधते काय ? परिक्रमेने समज समृध्द होय । परिक्रमेने विस्तारित जाय । परीघ अनुभवाचा ।। १७८२ सण ! भेटी, विरंगुळ्याचे क्षण । सण ! वस्त्र-प्रावरणे, अलंकार, पक्वान्न । सण ! देवोनि धर्माचे अधिष्ठान । त्यां ! नासवूं नका ।। १७८३ खुडोनि, गुंफण्या अक्षरगोफ । प्रसवाया शब्दांचे सगुणरूप । बहुधा आशीर्वाद आपेआप । दासांचा असावा ?।। १७८४ मगजांतली अनावर चुळबुळ । मनांतली अलवार तळमळ । भावांतली मांडण्या कळकळ । लिहित गेलो अल्पाक्षरी ।। १७८५ वाहावयाचे सैर ऐसे कुठवरी ?। लागायचे कोठल्या अगम्य तीरी ?। ऐल-पैल ! वा मध्यावरी । खावयाच्या गटांगळ्या ?।। १७८६ 'नको आंतां, पुरे !' म्हणतो । तरी पुन्हपुन्हा कां बाहतो । लहरींपरी उचंबळोनि येतो । अनिर्बंध प्रवाहो हा ।। १७८७ धाडिले, कृपया साठवा । फुले वा प्रस्तरखंड पाठवा । परंतु त्या योगे आठवा । मला कधीतरी भविष्यांत ।। १७८८ वाटले, कांहि सापडले नवे । मन म्हणे बोलोनि टाकावे । हेटाळावे किंवा गोडवे गावे । सामान्यजनांसारखे ।। १७८९ छंद, 'गद्या'चे बांधीव रूप । ताल, मात्रां, नियमांचे चाप । लावोनि ! अल्पाक्षरी दीप । अर्थवाही तमारि तेवण्या ।। १७९० ढकलिले जाणे जळांतं । अनिवार्य ! मारावया हातं । शिकण्या ! नसेल खावयाची गोंत । जर भवऱ्यांमाजी ।। १७९१ साठवाया हवी कोठी ?। जाणतो, तुमची हृदये मोठी । आत्मीयतां, प्रेमापोटी । माझ्या ! वेदना सोसालं ।। १७९२ [9/1, 09:06] Arun Kakatkar, idea: झुंजुरका आन्हीकवेळी । मनांत असते निर्विकार पोकळी । नामस्मरणाची विसविशींत जाळी । वाटल्यासि अनुभवावी ।। १७९३ कारण संस्कारांच्या कोटी । अविरत मनांत 'ज्येष्ठ' कोंबती । त्यां पासोनि घ्यावी मुक्ती । वाटले तरी, व्यर्थ ।। १७९४ परंतु मनांतले श्रध्दादर । राखावे तसेच तिथवर । कटाक्षाने टाळावे अवडंबर । प्रदर्शुनी त्यांना जनांत ।। १७९५ [9/1, 17:37] Arun Kakatkar, idea: वामांगीच ! कां असावी भार्या ? वामांगीच ! कां नसावी शिरोधार्य आर्या ? वामांगीच ! दशरथासह संगरकार्या । समर्पित झाली ।। १७९६ वामांगीच, मगजाचा नियंत्रणकक्ष । वामांगीच, कर्मयोग्यांचा पक्ष । वामांगीच, चाप भेदण्या लक्ष । प्रत्यंचेसि नेत्र लाविता ।। १७९७ [9/2, 06:17] Arun Kakatkar, idea: श्रावण ! कधी लख्ख कधि झाकोळ । श्रावण ! उन-पावसाचा खेळ । श्रावण ! वेदना-आनंदाचा मेळ । तुटण्या-भेटण्याचा ।। १७९८ श्रावण ! प्रणयाचे विविधरंग । श्रावण ! ओलेतीचे अंग । श्रावण ! तपश्चर्या भंग । सत्शीलांचा ।। १७९९ श्रावण ! हरळीवर बिंदूंचा झेला । श्रावण ! हळू हळू ओसरला । श्रावण ! वाजवून सनई-चौघडे गेला । भादव्याच्या उत्सवाचे ।। १८०० [9/2, 06:32] Arun Kakatkar, idea: छानसे नवे सुचावे कांही । छानसे हवे सुहृदांना देण्याही । छानसे, शोधून त्याची बाही । धरोनि वाटे 'निघावे' ।। १८०१ [9/2, 06:44] Arun Kakatkar, idea: ओवी माझिया मराठीची घाट ओवी भिजवी तृषार्त कंठ ओवी, फिरवुनी तिजकडे पाठ हट्ट कां 'अन्यां'चा ?।। १८०२ [9/2, 07:27] Arun Kakatkar, idea: भादवा ! उत्सवाचा स्रोत । भादवा ! उत्साहाचा पोत । भादवा ! भेटावया माहेरी गणगोतं । अष्टावधानी 'गौरीं' ना ।। १८०३ भादवा ! सजावटी घरा-दारा । भादवा ! मोदक, पुरणाचा पसारा । भादवा ! संधी परतोनि, भेटण्या माहेरा । नवपरिणित ललनांना ।। १८०४ [9/3, 07:17] Arun Kakatkar, idea: आम्हा ! सत्य केवळ दारिद्र्य । आम्हा ! सत्य केवळ चारीत्र्य आम्हा ! सत्य केवळ पावित्र्य कर्मयोग ।। १८०५ आम्हा ! अवमान अवदशा । आम्हा ! साक्षात्कार व्हावा कैसा । आम्हा ! पसरावा लागतो पसा । स्वप्नांसाठीही ।। १८०६ [9/3, 07:42] Arun Kakatkar, idea: आम्हा वसा कठोर प्रस्तरभंगाचा आम्हा वसा अप्राप्य अथांगाचा । आम्हा वसा जहरी बिचनागाचा । जीवीतभरी ।। १८०७ [9/3, 07:56] Arun Kakatkar, idea: आम्हा स्वेदगंगा सुखदायी । आम्हा 'जखमा' हीच भरपाई । आम्हा खाई कृष्णमयी । विहार विरंगुळा ।। १८०८ [9/3, 08:01] 24ak47@gmail.com: आम्हा वसा कठोर प्रस्तरभंगाचा आम्हा वसा अप्राप्य अथांगाचा । आम्हा वसा जहरी बचनागाचा । जीवीतभरी ।। १८०७ [9/3, 08:02] Arun Kakatkar, idea: आम्हा वसा कठोर प्रस्तरभंगाचा आम्हा वसा अप्राप्य अथांगाचा । आम्हा वसा जहरी बचनागाचा । जीवीतभरी ।। १८०७ [9/4, 20:35] Arun Kakatkar, idea: असा आज मी भांबावलेला । अंतरी द्विधा झालेला । मूर्तीरूप मिळालेला । त्यांसि वंदावे ?।। १८०९ परंतु आहे निश्चिती । जरी केली पूजा आरती । कांहींही घेणे 'त्यां'सि जगती । नसते कधीही ।। १८१० बहु उत्सव करा साजरा । आनंद, उत्साह मनी धरा । परंतु बजावा अंतरा । हौस भागवा केवळ ।। १८११ चार भेटतिल स्नेही, आप्त । मोदक, पुरणाने होतिल तृप्त । वाखाणणी यजमानाची करीत । पांगतील दिशांना चारी ।। १८१२ अस्तुरी, पोरे, तात-माय । त्यांच्या उपजीविकेची सोय । करण्या, अर्थार्जन उपाय । कोणती 'पूजा' यापरती ?।। १८१३ त्यांना लावुनि देशोधडी । कुरवाळिती कुबट कफनी, दाढी । भिक्षा, स्व-क्षुधेची कोडी । सोडविण्या मागती ! ते 'संत'? ।। १८१४ यांचा अनिष्ट गोंधळ नित्याचा । आवरण्या, सफल-हेतु साचा । मानस जनसामान्यांचा । जोपासणे अनिवार्य ।। १८१५ [9/6, 06:13] Arun Kakatkar, idea: विस्मरण निसर्गाचे अमूल्य देणे । निसर्गेचि घडविले भाषा, अक्षर-लेणे । बोलणे लिहिणे स्वाभाविकपणे । साकळण्या विचार ।। १८१६ विस्मरणाने जुळती बंध । विस्मरणाने विस्तारिती भेद । विस्मरणाने लागती वेध । भेटीचे डोळियांना ।। १८१७ [9/6, 07:13] Arun Kakatkar, idea: म्हणोनि नित्यनेमे लिहिणे । आणि विचारापुष्पे फुलविणे । कारण 'संधी' परतुनि येणे । रास्त अशी, दुरापास्त ।। १८१८ अल्पाक्षरीची धरा कांसं । विविध घाटांतुनि हमखास । खेळवा वा लोळवा तींसं । साकारेल विचार हवीतशी ।। १८१९ निबंध, प्रबंध लंबे चवडे । त्यांचे अल्पाक्षरींस वावडे । कालापव्ययी वृथा कोडे । तिच्या नसते अंतरी ।। १८२० [9/6, 07:30] Arun Kakatkar, idea: जैसा विचार तैसी दृष्टी । मथितार्था देते पुष्टी । संकुचित वा विस्तारीत सृष्टी । पहावी भिंगें तशी ।। १८२१ [9/6, 08:20] Arun Kakatkar, idea: पाहाणे खोलं मनांत रुजते । बोलणे हवेंत बहुधा विरते । लिहिणे अक्षररूपे स्थिरावते । संदर्भाकरिता भविष्यांत ।। १८२२ [9/6, 09:05] Arun Kakatkar, idea: क्वचितचि गद्य बोलले । अलंकारांनी सजवीत गेले । ओवी ! रिचवीच विषाचे प्याले । प्रतिष्ठानी ज्ञानोब्बा ।। १८२३ आटलासा वाटतेस स्रोत । मन उगा होय अस्वस्थ । कल्पना आतां झेपावत । नाही ! बिघडले कोठे ।। १८२४ म्हणावे, खळबळ संपली ? । म्हणावे, इतिकर्तव्यतां झाली ? । म्हणावे, शांती स्थिरावली । मनोगर्भी ? ।। १८२५ वाचल्या ? वाचेल कोणी पंक्ती ? अंतरांत अनाठाई भीती । त्याची विनाकारणे क्षिती । म्यां बाळगावी कां ? ।। १८२६ परि अक्षर शब्दादि मीतं । करीत होते प्रोत्साहितं । आजपावेतो अखंडित । मांडण्याअस्वस्थतां ।। १८२७ कां मग अचानक वन्ही । जाऊ पाहे संगत सोडोनी ?। जुळले बंध विस्मरुनि । विरहावस्थेंतं ।। १८२८ पुनःश्च झेपेसाठी खाक । होण्या ! पांघरोनि पावक । जळणे असते आवश्यक । वैनतेया सारिखे ।। १८२९ सद्यकाळी दूरवेरी । विषाणूंच्या विविधपरी । मनां-तनांत विनाशकारी । हेतु ठेवोनि असती स्थितं ।। १८३० म्हणोनि विज्ञानाराधना । हितकर नेहमीचं जाणा । वारावया विखारी बाणा । निरामयारि तत्वांचा ।। १८३१ कालबाह्य परंपरेतून रुजवि-फुलविलेले । अंतरी भाबड्यांच्या 'भक्तीचे मळे' । उत्सवाच्या मिषाने बिभत्स चाळे । दादा, भाई प्रोत्साहिती ।। १८३२ संवाद 'हरविलेल्या' जगतांत । कदाचित निमित्तमात्र होतांत । भेटण्या-बोलण्या 'प्रत्यक्षांत' । उत्सवकाल, पर्वणी ।। १८३३ कला साहित्यासि प्रतिष्ठित मंच । करोनि उपलब्ध, चढवा शिरपेंचं । बुध्दि ज्ञान साधनेचा खरा तोचं । बहुमान होय ।। १८३४ असे प्रेक्षक-सन्मुख होतांना । कसबींच्या विविध 'कळां'ना । नवनवीन सर्जक कल्पनांना । मिळेल वाव ।। १८३५ काळ पुढे झेपावलेल तसा पूर्वसुरी देतील संस्कारांचा वारसा । आणि वर्तनावर अनुभवांचा ठसा । उमटेल आपेआप ।। १८३६ इष्टमित्र स्नेही आप्तजन । होतील शुभेच्छा रूपे अवतीर्ण । वेदना, आपदांचे करण्या निवारण । झालो जर सिध्द ।। १८३७ गणगोतांकरिता जे इष्ट । राहोनि सदा संसारनिष्ठ । झुगारोनि अध्यात्माचे 'अरिष्ट' । करावे हे उचित ।। १८३८ परि झिडकारणे सद्यकाळी । सुकृतांना ! हवेल्यांत आगळी । तऱ्हा वाड्या-वस्त्याही बोकाळली । उपायो काय ? ।। १८३९ वेधहेतू बांग, घंटा वा शंखनाद । चुकल्या पांतस्थाला आश्वासनप्रद । कर्णकर्कश परि ध्वनि भयप्रद । प्रतिष्ठित मात्र आज ।। १८४० शार्वीलिक सोडुनी हेरती साव । गुन्हा ? अपराध ? कोणां ठाव । दुष्कीर्त सत्तामत्त वृत्तिवैभव । मिरविती आज ।। १८४१ त्यांत खोटे ओवळे-सोवळे । परिधानूनि कर्मकांडी डोमकावळे । शोणितपिपासू, कापण्या गळे । सज्ज मारण्या टोच ।। १८४२ महनीयता मिळते जी पदाने । महनीयता वा मिळाली जी दाने । महनीयता, तिच्या व्यर्थ अभिलाषेने । चळती भलेभले ।। १८४३ भान, प्रतिबिंब संस्कृतीचे । वर्तन, प्रतिबिंब प्रवृत्तीचे । समर्पण, प्रतिबिंब निवृत्तीचे । मनुष्यांमधे ।। १८४४ अवलोकन, अभ्यास परिणामी वेध । मंथन, विचार परिणामी प्रबोध । मोह, मत्सर, परिणामी क्रोध । मनुष्यांमधे ।। १८४५ आनंदाच्या कल्पना आगळ्या । व्यक्तिसापेक्ष असती सगळ्या । फुले वा अर्धोन्मलित कळ्या । खुडाव्या वाटे कुणा ।। १८४६ असुरी वा सात्विक आनंद । कठोर टीका वा नर्म विनोद । सहमति वा टोकांचे मतभेद । मनोवस्था साऱ्या ।। १८४७ तेजाने विश्व सारे उजळे । तम, खोल खाईचे तळे । उचंबळे, झाकोळे वा रसातळें । तैसे मन जाई ।। १८४८ असतांत अवस्थेचे ऐलं पैलं । मधे स्थित गर्ता खोल । एक लंघो जातां उभे ठाकेल । अन्य आव्हानं सामोरी ।। १८४९ हेच असतें कां 'जगणे' ?। 'संघर्ष' हाचि कां म्हणे ?। कारण, स्वीकार अव्हेरा विणे । आळणी सारे कदाचितं ।। १८५० किनारा, तीर वा टोक । तरून गाठणेहेतु आवश्यक । परिणामी वेदना वा आनंद'लोक' । नसेल तर 'अधांतर' ।। १८५१ 'तरंगण्या' करिता मग कां यावे ?। जगण्यांत 'मृत' होवोनि राहावे ?। नऊं मास मातेस कष्टवावे ?। विनाकारणे ! ।। १८५२ मनुष्यांमधला स्नेह, प्रेम, माया । आटोनि फुका जाईल वाया । झाको जाल जर सुकांत काया । वृथा भगव्या वस्त्रानें ।। १८५३ असोशीचे करावया शमन । वा वोसंडल्या भावनांचे वमन । ठावके मसि केवळ साधन । शब्दांचेचि ।। १८५४ शब्दांशी खेळतां खेळ । जमत गेला भावांशी मेळ । कळेना व्याकूळ वा अनुकुळ । आशयो जाला ।। १८५५ पेरण्या बीज प्रयास करिता । जोपासनेचे योगदान तुम्ही देता । फुला-फळांना बहर येतां । उत्सव करूं मिळोनी ।। १८५६ 'अंतर' मनुष्यांस जन्मभेट । विचार, संकल्पनाचे बेट । बहिर्देखाव्याने जोखणे बिकट । अंतावेरी गूढगर्भी ।।१८५७ अतर्क्य विकारांची दळे । वृत्तीवरी त्यांचे विखारी जाळे । पसरण्याआधी घालण्या आळे । नियमांचे ! म्हणजे 'धर्म' ?।। १८५८ परंतु ज्यांनी घडविले नियम । 'जे' कोण 'ते' होते 'ठाम' ?। जगण्या, पुनर्निर्माणा कर्म, अर्थ, काम । अपुरे 'त्यां'सि कां बा भासले ?।। १८५९ गाजरे दावोनि, 'मोक्ष', 'गती' । पिशाच्च योनिची हास्यास्पद भीती । भाबड्यांत रुजविण्या आयती । संधी 'भोंदू', 'साधू'ना त्या योगे ।। १८६० भळाळा उसळे स्रोतं । झळाळा तेज प्रेरितं । खळाळा बांध घालींतं । शब्द थको जायं ।। १८६१ निद्रा! नितळ जलधि तळ । निद्रा ! निरव शांतीची कल्लोळ । निद्रा ! परिपूर्त पक्व फळ । धारिल्या वांछेचे ।। १८६२ मुद्रा ! विचारांचा चेहरा । मुद्रा ! चलनाच्या मोहरा । मुद्रा ! डोहाकांठी पोहरा । संपदा उद्वहनहेतु ।। १८६३ पंचतत्वांकारणे सजीवन । पंचतत्वांकारणे संहारण । पंचतत्वांकारणे संक्रमण । अवस्थांचे ।। १८६४ तेजोद्भव असते ऊर्जा । तडितोद्भव वा मेधराजा । उद्भव स्थैर्य वा विलय काजा । निसर्ग नि निसर्गचि होय ।। १८६५ अपेक्षा, आकांक्षांचे जाळे । वांछापूर्तीची मृगजळे । जगण्यांत रोजचे डोहाळे । मनुष्यांसि ।। १८६६ वेदना ! मग कोरड्या वांत्या । वेदना ! तरिहि आशा दात्या । वेदना ! अखेरिस ठरती कोत्या । शमनप्रसवा ।। १८६७ बंद आंतां गवाक्ष, कवाडे । शब्दरूप माझे वेडे-वाकुडे । दखल घेण्या तुम्ही साकडे । नाही यापुढे जाणा ।। १८६८ वांछितहेतू कर्मे नाना । किंवा मनोभावे अर्चना । तदनंतर परिणामी वंचना । खदखदा हासे ।। १८६९ कधि पदरी बळेबळे । सत्ता, संपदेचे घंगाळे । काठोकाठ वोसंडुनि गळे । बैसला खाटेवरी जरी ।। १८७० प्राक्तन दावी ऐसी किमया । तरी कार्यसिध्दी करावया । कांस कर्मयोगाची वाया । नाही निश्चित जाणा ।। १८७१ छंदबध्द भाषा संवाद । विवाद, भलावण वा प्रवाद । व्यक्त होण्या ! अबाल-वृध्द । बोलतील ? स्वप्न एक ।। १८७२ कोणे एके प्राचीन काळी । रसना म्हणे प्रसवू लागली । श्लोक, आर्येची जन्मदा झाली । साधत लघु-गुरू ।। १८७३ आपदा विपदांचे हलाहल । घरकुलात काहूर, कोलाहल । विखारी दाह शमविण्या जळ । आंसवे मायेची ।। १८७४ भवसागरी भयावह उचंबळ । क्रोधनाशास, विभ्रम-खेळ । सौम्य प्रभा शृंगार-शीतळ । स्पर्शांत अस्तुरिच्या ।। १८७५ गंगौघ शिखेवरी उसळे । शशि जटांवरी झळाळे । स्कंधावर विखार बळे । फुत्कारे शेष ।। १८७६ शिवरूप कल्पिले ज्याने । हीच असतील कां प्रमाणे ?। हेतू ? साठविणे, स्मरणे । सहज 'संसारी' मनुष्यांना ।। १८७७ ऐसी मूर्तिरूपे आगळी । भासमान, साकारलेली । रुज-फुलविण्या संसारवेली । श्रध्येये भाबड्यांना ।। १८७८ भवताली जळते जिथे 'माती' । रक्षारूप क्षणार्धांत होती । सहज, रक्त-मांस-अस्थी । आगळा निवास ।। १८७९ दर घटिका जगण्यांतल्या । तैशांचं दाविती वाकुल्या । 'लगाव, नात्यांच्या स्मशानांतल्या । हवेल्या या' म्हणती, 'जाण' ।। १८८० सगुणरूपे ऐसी हाती । भोळ्या भाबड्यांच्या साकारती । अंतरी ! मूलतत्व विसरुनी जाती । पुढे गर्ता खचितची ।। १८८१ हताश ऐशावेळी मन । म्हणे, ' कां न ठरावे प्रयत्न । यशदायी ! पुन:पुन्हा समजावून । सांगीतले जरी संतांनी ।। १८८२ माउलींनी नमिले केवळ आद्या । वारण्या सामान्यांच्या बुध्दिमांद्या । भलतांचि अर्थ जडवोनि पद्यां । 'अर्थ'पूर्ण भलेभले ।। १८८३ आरडती, गाती सारे वैष्णव । कच्छ, वराह, नक्र वा नरसिंव्ह । म्हणे झाले प्राप्य नि संभव । अवतारी विविध ।। १८८४ निसर्गदत्त अनेक प्रजाती । उंचावण्या मनुष्यांमधे महती । विज्ञाननिष्ठांनी अवतारांप्रती । विष्णु'पंतासी नेमस्तिले ।। १८८५ निरक्षरां आकळती केवळ चित्रे । योजिली बहुधा बहुविध पात्रे । निसर्गे, सहज उतरविण्या सूत्रे । गळी भाबड्यांच्या ।। १८८६ जगा, जगूं द्या सकळा सर्वत्र । जळ, अवकाश वा धरित्र । सहजीवनाचा आद्य मंत्र । विस्मरती सद्यकाळी ।। १८८७ मग शस्त्रांसह अनिवार्य आक्रमणे । असो वस्ती वा निबिड आरण्ये ! सुसह्य निरामय व्हावे जगणे । म्हणोनि हिंसा, आक्रंदन ।। १८८८ ऐशी विखारी विचारांती । प्रबळ अश्लाघ्य विकृत प्रवृत्ती । रुजण्या आधींच जळोनि जाती । बीजे ! आटती मूळ स्रोत ।। १८८९ व्याप्तीची भीती उरी दाटे । व्याप्तीने मती कुंठित होते । व्याप्ती सर्वदूर चराचरी भेटे । अवकाशाची अनंत ।। १८९० व्याप्ती केवळ असे पोकळी ?। व्याप्ती गर्ता भयाण काळी ?। व्याप्ती, उडवा-फेकाल ते निगळी । अवकाशाची कालातींत ।।१८९१ व्याप्ती ! क्षुद्र 'मी'पणाचे प्रमाण । व्याप्ती ! लंघण्या अथांगाची जाण । व्याप्ती ! मनुष्यत्वा पेलण्या भान । आव्हान अवकाशाचे ।। १८९२ 'व्याप्ती' ! अर्थाला आहे पैलं । 'व्याप्ती' ! शब्दाला आहे मोलं । 'व्याप्ती' ! जर गर्भित समावेल । आशय ! अनंत मग कैची ?।। १८९३ शब्द, आपेआप दावितो विरोधी । शब्द, जन्मत: जुळ्यास संधी । शब्द, विकृतिचा अपराधी । आशयाच्या ।। १८९४ नाकाराल म्हणोनि जर 'देव' । साकाराल सगुण संभव । मग कर्मठांची 'कावकाव' । घाव वर्मी घालेलं ।। १८९५ उच्चार म्हणोनि करूं नका । 'त्त्या'च्या नांवें आणा-भाका । घालाल ! कालापव्यय फुका । निश्चित, जाणा ।। १८९६ विनवितो प्रार्थितो परोपरी । आपण सारेंच अधिकारी । सर्वसामान्य । कोणाची मक्तेदारी । नसे मांडण्या अंतरंग ।। १८९७ अनुदानित भ्रष्ट पीठे । लेखक कविंचे सवंग कट्टे । 'सिंव्हासनोत्सुक' लाविती सट्टे । 'साहित्य' प्रांती सद्यकाळी ।। १८९८ सांगण्या मी काहुन पामर । लिहीत बसलो वारंवार । प्रयत्न अविरत समग्र । लागतील कारणी ? ।। १८९९ सहस्रोत्तर नऊ शतके । शब्दांची 'अ-क्षर' ज्योत झळके । शिवधनुष्य, मज ठावके । उचलिले मियें ।।१९०० ********* ।। अध्याय सहावा ।। चालल्या शुष्कावत धमन्या । आर्द्र अंतरी आर्त कहाण्या । पापणीकांठ ओलावण्या । सिध्द सदा ।। १९०१ गाणे म्हणजे स्वर केवळ?। गाणे म्हणजे शब्द-मोहोळ ?। गाणे म्हणजे भाव व्याकूळ ?। जाणावे कैसे ?।। १९०२ गाणे म्हणजे सांगण्याचा पैल ?। गाणे म्हणजे व्यक्त अबोल ?। गाणे ? स्वरकाहूर अंतरांतील ?। भिडावे ऐसे ?।। १९०३ स्वर कंठांतुन उमलावा । स्वर भवतालांत घुमावा । स्वर उपकारक सदैव व्हावा । श्रमल्या भागल्यांसि ।। १९०४ स्वर आलापांत स्थिरावा । स्वर द्रुत तानेंत फिरावा । स्वर मुक्त रवांत झुलावा । 'बोल' ताना ।। १९०५ शब्दें विषय मांडावा । शब्दें आशय उकलावा । शब्दें भावांस मिळावा । बोल, अंतरीच्या ।। १९०६ उषा, उत्साह प्रभा जननी । उषा, निसर्गाची सदाचारिणी । उषा, शरीरांतरा श्रावणी । कर्मयोग्यासि ।। १९०७ माध्यान्ह, इंद्रीये बुध्दी सजग । माध्यान्ह, क्षुधा-तृष्णेस जाग । माध्यान्ह, छायेतळी श्रांत जग । कर्मयोग्यासि ।। १९०८ निशा, परिश्रमाची इति । निशा, सौम्य तेजाची दीप्ती । निशा, स्वप्नगामी सुख-तृप्ती । कर्मयोग्यासि ।। १९०९ संधिकाल, हुरहुर बेचैनी । संधिकाल अगणित शंका मनी । संधिकाल भय, कधी आनंदगाणी । आप्तांसवे ।। १९१० अनुभवांती विचार भळभळ । सुखद कधि, कधि झाकोळ । सांगो वाटे, ही कळकळ । स्नेहि-स्वकीयांसि ।। १९११ ज्ञाना, मसि अतीव भावे । ज्ञाना, बोलला केवळ मृदुरवे । ज्ञाना, उचंबळवी आंसवे । पांपणीकांठी, स्मरणाने ।। १९१२ ज्ञाना, साकव लंघण्या भव । ज्ञाना, साकळ प्रक्षाळण्या अनुभव । ज्ञाना, वारण्या पायतळी लवलव । आपदा, क्लान्तासि ।। १९१३ डोइवरी असह्य होतसे भार । बोल-सांगण्या नाही अधिकार । हृदय परि गोंधळले अपरंपार । कां बा ऐसे ?।। १९१४ क्षमस्व, जर दुखावले मन । क्षमस्व, व्यापले अनमोल क्षण । क्षमस्व, विचळले अवधान । मियें अक्षर-प्रमादें ।। १९१५ मज गमे हे अक्षर-साहस । साहित्यादराचा अंतरी ऱ्हास । कीं औधत्य, गर्वगर्भी विष । विखुरले स्वभावी ? ।। १९१६ मसि ठावके नाही ओवी । अक्षरसूत्रांत कैसी गुंफावी । आशयघन समृध्द प्रभावी । व्हावी उपाये कोणत्या ? ।। १९१७ पद्य-काव्यांतला छंद । लघु-गुरूंनी सहसा निबध्द । परंतु अकल्पित अनिर्बंध । छंद निसर्गाचा ।। १९१८ भाकिते सारी खोटी । ठरवोनि । उलथा-पालथी । करण्यांत मजा मोठी । लुटतो निसर्ग ।। १९१९ तोच त्याचा अंगभूत स्वामी । बेमुर्वत, निर्दय, बेलगामी । भूतमात्रांच्या प्रार्थना कुचकामी । साघावया लक्षितें ।। १९२० अतिवृष्टी वा अवर्षणे । एक धरा, विविध ठिकाणे । एकसमयावच्छेदे अवतरणे । जाणे निसर्गचि ।। १९२१ जोखतो कां क्षणोक्षणी ? । जीवमात्रांची केविलवाणी । धडपड ! भव रणांगणी । 'निसर्ग' ?।। १९२२ तशीही चिंता त्यांस काय ?। कोटि विश्वांच्या मधे ठाय । 'धरा' नामधारी कस्पट-विषय । किं कारणे 'दखला'वी ।। १९२३ हाहा:कार ! असह्य भूक- तहान । हाहा:कार ! सौदामिनि वा तिरिप तीक्ष्ण । हाहा:कार ! कोण घालेलं वेसण ?। खोंडासी या उधळल्या ? ।। १९२४ निसर्ग ! म्हणे आहे गुरू । निसर्ग ! चौखूर, बेबंद, वारू । निसर्ग ! विज्ञाने पाहाल धरूं । खोटे पडाल हिरमुसुनी ।। १९२५ श्रध्दा ! किं कारणे स्थितं ?। श्रध्दा ! असते निर्लेप, नि:स्वार्थ ?। श्रध्दा ! घाबरा जीव भयभीत । होतो जेंव्हा, खरे सांगा ।। १९२६ श्रध्दा ! असावी सदैव निर्व्याज । श्रध्दा ! तान्ह्याप्रती वात्सल्याची गाज । श्रध्दा ! ऐसी जपणे असते बोजं । संतांसि भल्या भल्या ।। १९२७ सर्वांसि लाभावे निरामय । सर्वांसि भवताल मुक्तभय । सर्वांसि मधे 'मी' सामाय । आपेआप ।। १९२८ देखिला कोणे म्हणे 'इटू' । देखिला कोणे सुखाचा वटूं । देखिला कोणे मोक्षावेरी सेतू । म्हणे 'श्रध्दा' कारणे ।। १९२९ नकळे, हंसावे वा रडावे । नकळे लोटपोट की खिदळावे । नकळे डोळे उघडावे । कैसे 'अंध'श्रध्दांचे ।। १९३० मृत्यू ! म्हणजे खरेच अगम्य कोडे ?। मृत्यू ! म्हणजे जगण्याशी वावडे । मृत्यू ! म्हणजे दिशा जायची पुढे । अनंताच्या तमगर्भी ।। १९३१ मृत्यू ! म्हणजे पुन्हा न परतुनि येणे । मृत्यू ! म्हणजे येरझार संपणे । मृत्यू ! म्हणजे उचंबळ गोठणे । धमन्यांत शोणिताचा ।। १९३२ मृत्यू ! जन्मत:च सोबत येतो । मृत्यू ! भयप्रद तेंव्हा परि होतो । मृत्यू ! व्यधिग्रस्त जेंव्हा होतो । वेदनाभारल्या शरीरी ।। १९३३ मृत्यू ! सुखांत उपासनेने ?। मृत्यू ! सुसह्य पाठ पूजेने ?। मृत्यू ! टाळतो कां कवळणे ?। 'पुण्यात्म्यासि ।। १९३४ मृत्यू ! जगण्यांतुन सुंदर सुटका । मृत्यू ! जगण्याची अंतिम रेखा । मृत्यू ! जगण्याला अविरत हाकां । देतो कष्टकऱ्यांच्या ।। १९३५ मृत्यू ! उच्चारण कां बा अशुभ ?। मृत्यू ! 'नसले'पणाचा गर्भ ?। मृत्यू ! अवतरणाचा कोंभ । म्हणे ! भाकड सारे ।। १९३६ मृत्यू ! निमित्त मातिस मिळण्या । मृत्यू ! निमित्त दूरवर जाण्या । मृत्यू ! निमित्त पुनश्च विरघळण्या । तमप्रवाही अथांग ।। १९३७ मृत्त्यो ! तुजप्रति स्वागत । मृत्त्यो ! जिवलग तूं जन्मजात । मृत्त्यो ! अपूर्ण तुजविण अस्त । श्वास-निःश्वासाचा ।। १९३८ मृत्यू ! भीषण, भयाण गर्ता ?। मृत्यू ! की ठरतो चिरसुखदाता ?। मृत्यू ! पावता मग कशास चिंता । तुम्ही आम्हा ?।। १९३९ मना भावबंधांत गुंतू नको रे मना स्नेहबंधांत किंतू नको रे मना बाळगू विखारी जंतू नको रे संशयाचा कदापी ।। १९४० मना खंत अंतरी न ठेऊं जपोनी । मना संत बा आचरी पारखोनी । मना भ्रांत भवरी प्रवाही भेदुनी । कर क्रमणा कर्मबळे ।। १९४१ मना कां बरी व्यर्थ उद्विग्नता? । मना उभारी धरी जागता । मना दूर फेकोनि निष्क्रीयतां । सिध्द हो कर्तव्याप्रती ।। १९४२ मना सोड सोड ना नीज आतां । मना तोड तोड ना विघ्नकर्ता । मना फाड फाड भीतिची सर्व गाथा । होई बा धीट ।। १९४३ मना पाळण्या धर्मासि सज्ज हो । मना टाळण्या कर्मकांडां सज्ज हो । मना तोलण्या जीवमात्रा सज्ज हो । मनुष्य तत्वें ।। १९४४ मना पाहि घोंगावती वादळे । मना स्वत्व जपलेले तेहि उन्मळे । मना सजग हो आत्मबळे । आपत्काल वारण्या ।। १९४५ कांहा अद्भूत हृदयंगम पाहाता । कांहा स्वरावलीं विभोर करितां । कांही बोल नि अंतरी भिडतां । ओलावाव्या पांपण्य ! कां ?।। १९४६ कुठला जलधी हा वोसंडे ?। कठली वा सरिता प्रवाह सोडे ?। कुठला तलाव बांध फोडे । चिरता अंतरं ? ।। १९४७ आंसवे वरदान की शाप ?। आंसवे भंगण्याचे रूप ?। आंसवे की मिळाले 'आप' । मेकळण्या ? ।। १९४८ कां बरे हळवे होते ! मन ? अस्वस्थ हुरहुरते । शंका कुशंकाना घेरतें । असतांना एकांडे ?।। १९४९ सिध्द सामान्यत्व माझे होते । हृदय ऐसे जेंव्हा बोलते । ढेपाळते, खचते, कोलमडते । आप्तां समोरी ।। १९५० आपदाग्रस्त कां असावे सदा । दर्शनदुर्लभ कां संपदा । कष्टोत्तरीही कोणत्या प्रमादा । शासन हे ।। १९५१ कां वाचावी पोथ्या-पुराणे ?। कां करावी उत्खनने ?। वा धाडावी अवकाशयाने ?। वेध अगम्याचा घेण्या ?। १९५२ काय आहे जळधीतळी ?। वा धरेच्या बीजस्थळी ?। व्याप्ती, लांबी, रुंदी, खोली । पोकळिची भवताली ?।। १९५३ बाहेरी जे जे भासते । ते खरेंचि तेथे असते ?। त्रिस्तरी मनांत रुजते वसते ?। की ते खरे ?।। १९५४ तम-तेजाची सारी करणी । पतन-परावर्तन रचती कहाणी । बुध्दिभ्रमाची अंतरास गवसणी । अखंड सोबतीला ।। १९५५ सुख एकांडे बहुधा अळणी । दु:खाने डोळां पाणी । आनंद, वेदनांची गाणी । पूरक परस्परां ।। १९५६ अश्रू ! विरहोत्तर मिलनाचे । अश्रू ! वेदनेोत्तर सुटकेचे । अश्रू ! कष्टें कमावल्या यशाचे । पूरक परस्परां ।। १९५७ व्याधी ! कुणा, कोठेही । व्याधी ! धरते बाही कधिही । व्याधी ! टाळता येतसे नाही । जीवमात्रांसि सहसा ।। १९५८ स्थितप्रज्ञ, निर्विकार व्हावे । वांछा असोनि कैसे साधावे । गणगोतं बाहतां उच्चरवे । वेधण्या भानं ?।। १९५९ पारमार्थी, परोपकारी । व्हावे वाटे आयुष्यभरी । माय-तांत, पोरे, अस्तुरी । परतुनी येई भानं ।। १९६० नेसुनि कुबट सोवळी । करि धारोनि पंचपात्री-पळी । ओढणे भाबड्यांची पोळी । सांगा, बरें कां ?।। १९६१ खांद्यावर सावरित झोळी । हेरित अंधश्रद्ध भोळी । भिक्षासेवनोत्तरी डरकाळी । ढेकर ! सांगा, बरें कां ?।। १९६२ साधने जरी वेगळाली । हेतू तोचि असे सद्यकाळी । विविधं प्रलोभनांनी भारलेली । पळें अहर्निशं ।। १९६३ मंडप ! सजावटीसाठी ?। मंडप ! गर्दीच्या चिंतेपोटी ?। मंडप ! कुकर्मांची कोठी ?। पार्श्व, अधरी ?।। १९६४ मंडप ! देखावे, रोशणाई । मंडप ! भाबड्या आकर्षुन घेई । मंडप ! परंतु काळोखाची खाई । मागे, अगम्य ।। १९६५ मंडप ! स्तंभ, महीरपी, कमानी । मंडप ! लोलक, झुंबरे अच्छादनी । मंडप ! झालर, बेगडी सुवर्णपाणी । मयसभा उत्सवहेतु ।। १९६६ मुद्रा ! छाप वा काटा । मुद्रा ! अंतराळी उडवितां । मुद्रा ! रोखते पांपणी लवतां । श्वास, शिगेस उत्कंठा ।। १९६७ परंतु तिसरी बाजू मुद्रेची । सीमा असते भल्या-बुऱ्याची । विसर पडतो तिची सहजची । शास्ता-जनता,मधें क्रांती ।। १९६८ श्रुती ! स्वरांमधले सेतू । श्रुती ! भिन्न लगाव हेतू । श्रुती ! जैसे संवत्सरी ऋतू । ऊष्णार्द्र, शीतळ ।। १९६९ श्रुती ! स्थिर स्वराभवती । श्रुती ! समर्पणा फेर धरती । श्रुती ! मींड, मूर्छना, मुरक्यांप्रती । सिध्द सदा ।। १९७० श्रुती ! जे जे केले श्रवण । श्रुती ! स्मरणासि आवाहन । श्रुती ! संचयित उक्त ज्ञान । अभ्यासकां ।। १९७१ तमाला लागली तीट । पूर्णचंद्र शुभ्र मिळाली भेट । 'जागताहे कोण' शोधत । हिंडताहे निशा ।। १९७२ स्खलनोत्तर फलनप्रारंभ, श्रावणी । प्रथमांकुरा कौतुकविधान, अश्विनी । आहुती कुकर्मांची देण्यां फाल्गुनी । नेमस्तिली होलिका ।। १९७३ निद्रा ! कष्टोत्तरी क्लान्त गात्रां । निद्रा ! पांपणीआंड मिटल्या नेत्रा । निद्रा ! विचारमंथनोत्तरी थकल्या अंतरा । गुणकारी औषधी ।। १९७४ निद्रा ! तान्हुल्यांसि स्तनपानोत्तरी । निद्रा ! युवती-युवकांसि शृंगारोत्तरी । निद्रा ! वृध्दां, ऊर्वरीत आयुष्यभरी । माया, प्रिया, अखंडभया ।। १९७५ निद्रा ! साफल्याची परिणिती ?। निद्रा ! प्रभेस झुंजुरकेपूर्व विश्रांती ?। निद्रा ! शास्त्यांची हेतुत: नीती । गांजल्या जनतेप्रति ?।। १९७६ निद्रा ! सुखाचे अंतिम निधान । निद्रा ! जागृतिचे इत्यर्थ विधान । निद्रा ! शवासनाचे साधन । अबालवृध्दांना ।। १९७७ धर्म असावा सत्तारहित । धर्म नसावा कांडभारित । धर्म जपावा अविरत हित । पाहण्या जीवमात्रांचे ।। १९७८ धर्माला कशास हवे 'पीठं' । धर्माला कशास कांड, पूजा-पाठ । धर्माला कशास सगुण गणगोतं । पंचतत्वां पल्याडचे ?।। १९७९ धर्म गुंडांना आयते निमित्त । धर्म 'उत्सव' ? मने भयभीत !। धर्म कां नसावा सीमित ? दर्गा, गिरिजाघर वा मंदिरी ?।। १९८० धर्म, सद्यकाली बांडगूळ । धर्म, अकारण कपाळशूळ । धर्म, मनुष्यत्व तोडण्या बळ । राज्यकर्त्यंना ।। १९८१ धर्म, कोलीत मर्कटाहाती । धर्म, भाकड, चमत्कारांचींच कीर्ती । धर्म, एकसमयावच्छेदे कोलिती । प्रेषित, अवतारांचे, जीवारि ।। १९८२ परवचा, बाराखड्यांचा धर्म । स्नेह, वात्सल्य, मनुष्यत्व धर्म । अखंड ज्ञानसाधना, निष्ठेचा धर्म । कां न व्हावा दृश्यमान ।। १९८३ माणसे 'जाणती' करावी धर्माने । माणसे 'कर्मनिष्ठ' व्हावी धर्माने । माणसे 'निर्भय' व्हावी धर्माने । वारण्या साधू, मुल्ला, बडवे ।। १९८४ माझा विस्तारित कुटुंबकबिला । माझा आप्त-गणगोतांचा मळा । माझा मगज राहो आंधळा । 'अभाव'देवाप्रति सदा ।। १९८५ तुमच्यांच अंतरांतली खळबळ । मांडण्या ! मला हवे आहे बळ । लंघण्या, कुबट काळे जळ । गैरश्रध्दां, समजुतींचे ।। १९८६ आतां टवकारा कानं । ऐकण्या 'भागवत' पुराणं । कर्दमांस उकळी देवोनि । 'खळं' सांगतां, 'वोरपा' ।। १९८७ ज्ञानाची ओवी भरजरी । तुक्याहाती एकतारी । नामदेवाची पंगत न्यारी । तोषविण्या श्वान ।। १९८८ जीवमात्रांची क्षुधा-तृष्णा । भागविण्या गरजा दक्ष बाणा । सदय, सकल संतांनी अंत:करणा । जागे सदा राखिले ।। १९८९ सध्या अभ्यासक पुष्कळ । परि सहृदयतेचा अवकाळ । हेत्वारोप, मत्सर, स्पर्धेचा जाळ । हवी ? रसिक मनांचा ।। १९९० धर्म सांगतो 'फूट पाडा' ?। धर्म सांगतो 'विरोध लाथाडा' ?। धर्म सांगतो 'निधर्म्यांसि गाडा' । नि:पात हेतू ?।। १९९१ धर्म, जळाचा तृषाशमन । धर्म, कवळाचा क्षुधाशमन । धर्म, आभाळाचा तेजोदान । कांडविरहित ।। १९९२ दर्पाची माझ्याचं दुर्गंधी । येई ! चिरनिवृत्तीची ही नांदी ?। की स्वकंद्रित आत्मानंदी । शेवाळली वृत्ती ?।। १९९३ अंतर्नादास शब्द भेटे । हायसे सहजचि वाटे । वीरेचन जाणीव दाटे । मोकळलेली ।। १९९४ तेच तेच परत परत । कां मी बसलो आहे लिहित। अवर्षण उपदेशकांचे येथं । नसतां सद्यकाली ।। १९९५ प्रवाह कधी हा खंडेल ?। निर्विकार मन होईल ?। उचंबळ, खळबळ थांबेल ?। शांतवनी ?।। १९९६ निशा, निद्रोत्तरी उषा । चक्रांकित निसर्गभाषा । नवजात हरेक मनुषा । नवल, जरि कालातीत ।। १९९७ भवताली रोज वेगळी हवा । दाह असह्य, क्वचित गारवा । होतील कां कधी जाणिवा । बोथट, त्यांप्रति ।। १९९८ यावे वाटते ! येते मरण ?। वांछेचे कोण्या होते समाधान । जनन वा हरपणे प्राण । निसर्गाहाती ।। १९९९ द्विदश-शतकी उमलल्या पाकळ्या । टवटवींत,ताज्या वा कोमेजलेल्या कुणासाठी किं कारणे ओविल्या । ठावके नाही ।। २००० (१८-१०-२०१६) *************