Tuesday, May 29, 2012

दोन कथा...दोन तात्पर्य...

दोन कथा...दोन तात्पर्य... ’चार गोष्टी..न परतणार्‍या’ एक सधन स्त्री, एका विमानतळावरच्या प्रतीक्षालयांत, आपल्याला घेवून जाणार्‍या विमानाची वाट पाहात होती. कदाचित बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल या विचारानं तिन, दरम्यानच्या मनोरंजनासाठी, वृत्तपत्र-विक्रेत्याकडून कांही नियतकालिकांची खरेदी केली, आणि संभाव्य ’क्षुधाशमनार्थ’ कांही खाद्यपदार्थांचीही बेगमी केली. बाईसाहेब, खरिदलेल्या वस्तूंसह, परत प्रतीक्षागृहांत दाखल झाल्या आणि आपल्या आरामदायी आसनाचं अधिग्रहण कर्त्या झाल्या. कांही कालावधीनंतर, त्यांच्या शेजा्रच्या आसनावर एक गृहस्थ येवून बसला आणि हातांतलं नियतकालिक चाळू लागला. बाईसाहेबांनी, नियतकालिकांतला एक लेख वाचायला सुरुवात केली आणि बरोबरच्या खाद्यपदार्थातलां एक तोडात टाकला. गृहस्थानंसुद्धा बाईसाहेबांच्या कृतीची अगदी नकळत पुनरावृत्ती केली आणि खाद्यपदार्थातला एक घेवून तो चघळू लगला. बाईसाहेबांच्या हे लक्षांत आल्यावर त्यांच्या कपाळाला एक आठी पडली...पण, ’जाऊ दे ! अनवधानानं झालं असेल कदाचित..’ या विचारानं त्यांनी दुर्लक्ष केलं, आणि आणखी एक ’घास’ उचलला आणि ग्रहण केला. थोड्या वेळानं, गृहस्थानं, एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसं, खाद्यक्रिया सुरू ठेवली आणखी एक घास उचलून, खायला सुरुवात केली. गृहस्थाच्या प्रत्येक कृतीबरोबर, बाईसाहेबांचा पारा चढतच होता, पण मन धास्तावलं होतं, ’उगाच वादावादी वाढेल’ म्हणून त्यां जरी, मूग गिळून गप्प होत्या, तरी संतापापोटी उद्भवलेल्या बेचैनीमुळं, मनोमनी गृहस्थाला शिव्याशापांची लखोली वाहतच होत्या, ’ऐत्या बि्ळावर नागोबा, मेला !’ वगैरे, वगैरे.. करतां करतां, वाचनांत मग्न दोनीही सहप्रवाशांपैकी गृहस्थाच्या लक्षांत आलं की खाद्यपदार्थाचा एकच तुकडा उरला आहे आंता. त्यानं त्याचे दोन समान भगकेले आणि त्यापैकी एक शिल्लकठेवून दुसरा खाऊन टाकला. ’आता मात्र हद्द झाली याच्या निर्लज्जपणाची’ असं म्हणत बाईसाहेब तिरिमिरीनं उठल्या. आपलं सामान बरोबर घेवून संतापदग्धावस्थेंत त्यांनी आपल्या नियोजित ठिकाणी ताडताड निर्गमन करत्या झाल्या. इच्छित स्थळी पोहोयच्या आधी, प्रसाधनगृहांत जाऊन त्यांनी, झाल्या प्रसंगातल्या, त्या गृहस्थाच्या गर्हणीय वागणुकीच्या क्रोधानं, कपाळावर, कानशीलावर, नाकाच्या टोकावर, जमलेले घर्मबिंदू टिपण्यासाठी, ’पर्स्‌’ उघडली आणि... बाईसाहेबांचा चेहेरा त्यांनाच समोरच्या आरशांत बघवेना.. इतका उतरला होता..क्रोधाचे, नाराजीचे, कांहीही न करता आल्याच्या घुसमटीचे सगळे रंग उतरले होते एका क्षणांत...कारण त्यांनी खरीदलेले खाद्यपदार्थ त्यांच्याच पर्स्‌मधे नीट अवगुठितावस्थेंत, सुखरूप होते. त्यांनी वाचनादरम्यानं उपभोग घेतला होता तो त्या गृहस्थानं खरेदी केलेल्या पदार्थांचा...ज्याच्यावरच्या रागानं, गेला जवळजवळ तासभर त्या धुमसत होत्या..बाईसाहेबांनी खजिल मनानं, त्या गृहस्ठांना, त्याच जागी शोधण्याचा प्रयत्न केला...पण तो गृहस्ठ पण मार्गस्थ झाला होता तोपर्यंत...एका वेगळ्या समाधनानं. जवळच्या वस्तूला भागीदार मिळाल्याच्या समाधानानं पण आता कांहीही होवू शकत नव्हतं...दोघांचे मार्ग भिन्न झाले होते. परत कधी भेट होईल याची श्यक्यता पुसटशीही नव्हती.. हातांत होता फक्त पश्चात्ताप...आणि मनांत आयुष्यभर कुरतडून खाणारी खंत... ’अशी पांखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती.. दोन दिसांची (दोन घडीची..म्हणूया हवंतर..या गोष्टीच्या संदर्भांत ) रंगत संगत, दोन क्षणांची नाती !!’ या गीता प्रमाणे किंवा ’माडगुळकरांच्याच गीत रामायणांतल्या, ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या, भरत भेटीच्यावेळी, ’परत चला दादा, परत सिव्हासनाचं अधिग्रहण करून राज्यशकटाचं नियंत्रण हाती घ्या..’ अशी कळकळीची विनंती करणार्‍या परमप्रिय बंधूच आणि आयोध्येच्या जनतेचं सांत्वन करीत समजूत घालणार्‍या श्रीरामाच्या तोंडी, आयुष्याचं क्षणभंगूरत्व, हृद्य शब्दांत मांडून अजरामर केलेल्या गीतांतील ओळीप्रमाणॆ.. ’दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाहि गांठ’ तर कथेचं तात्पर्य: चार गोष्टी या जगांत अशा आहेत की त्या निसटल्या की परत ’हांसिल’ माही होवू शकत.. एक : फेकलेला दगड दोन: उच्चारलेला शब्द तीन: नुकसानीला कारणीभूत झालेला, घडलेला प्रसंग आणि, चार: सरलेली वेळ !! ***** एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस... एक दिवस एक फुलंविक्रेता केशकर्तनालयामधे आला, या नापित महोदयांच्या..केशकर्तनाची क्रिया पूर्ण झाल्यावर, सहाजीकच त्यानं सरसावत, खिशांत हात घालत, ’किती झाले ?’ असा स्वाभाविक प्रष्ण विचारला. नापित महोदय, आपले हात मागे घेत आणि मागे सरत उद्गारले, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’ चेहेर्‍यावर आश्चर्य आणंत, पण मनांत, सुखावत, फूल-विक्रेत्यानं, खिशांतला हात तसाच ठेवला. दुसर्‍या दिवशी आपलं दुकान उघदायला गेल्यावर नापिताला दाराशी एक पुष्पगुच्छ आणि एक आभार-पत्र ठेवलेलं मिळालं आणि त्याच्याही चेहेर्‍यावर मंदस्मित झळकलं नंतर कांही वेळानं एक पोलिसदादा केशसंभार कर्तनार्थ दाखल झाले दुकानांत. परत सगळा प्रसंग, जो आदल्या दिवशी घडला होता त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजे पोलिसदादानं पैसे काढणं, नापितानं ते नम्रतापूर्वक नाकारत, त्याचं कारण सांगणं वगैरे वगैरे. पुढल्या दिवशी परत आदल्या दिवशी सारखीच फुलं दाराशी..फक्त एक बदल म्हणजे आज आभार-पत्राबरोबरी एक ताज्या बटाटावड्यांचा पुडाही होता. त्या दिवशी मग एक ’खासदार’..चक्क..आले डोकं भादर्ण्यासाठी केशकर्तनालयांत..कर्तनोत्तर परत, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’. सुरू झालं नापिताचं पालुपद...’खासदार’ महोदय तत्परतेनं पैसे परत खिशांत कोंबत, शिळेवर एक त्यांच आवडत चित्रपटगीत वाजवत, टणाटण निघाले परतीच्या वाटेनं. चौथ्या दिवशी सकाळी, सत्कारणार्थ आपल्या ’कर्मभूमी’कडे निघालेल्या नापिताला, लांबूनच दिसलेलं दृश्य बघून तो बुचकळ्यांत पडला...जवळ गेला तो काय ! अहो आश्चर्यम्‌.. दुकानाबाहेर एक डझनभर खासदार उभे होते ’नापित कधी एकदा येतो आणि दरवाज्याच्या फळ्या उघडतो’ याची वाट पाहात. तात्पर्य: मित्रांनो ! हाच तर फरक आहे, सर्चसामान्य भारतीय नागरिक आणि जनतेला, ’मुकी बिचारी, कुणिही हांका !’ म्हणत आणि त्यांच्या (मतपेटींत खोट्या आश्वासनांनी हुरळून मतं टाकणार्‍या) भोळसटपणाला हसंत त्यांना ’हाकणार्‍या..भारतीय राजकारण्यांमधला !! आणि म्हणून शासनकर्ता राजकीय पक्ष, बालकांच्या वारंवार बदलाव्यालागणार्‍या ’दुपट्या-लंगोटां’प्रमाणेच बदलून, अंगी परिवर्तनवाद बाणवायला पाहिजे आंता आपल्याला... अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Monday, May 28, 2012

’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’

’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’ ’काय करणार ? दगडाखाली हात अडकलायना आमचा ? तो सुटेपर्यंत नाइलाजा आहे’ अशाप्रकारच विधानं आपण स्वत: करीत असतो किंवा कुणा आप्त-स्वकीय किंवा मित्रमंडळींकडून ऐकत असतो. पण ही ’हताशा’ कांही माणसांना शरण जाते कारण त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाच्या आणि धडाडीच्या आक्रमकतेला, ’कार्यकक्षा’ वगैरे नसतांत. ’अनंत अमुची ध्येयासक्ती’ या काव्योक्तीचं, ही मंडळी मूर्तिमंत उदाहरण असतांत... तुम्ही एक कादंबरी वाचली आहे ? इंग्रजी.. ? कादंबरीच नांव 'Alive..'. विषय: युरोपांतल्या पर्वतराजींत एका हिमाच्छादित शिखरावर, अपघातानं कोसळलेल्या एका विमानांतल्या, जवळजवळ ’चमत्कार’ वाटावा अशा पद्धतीनं वाचलेल्या कांही प्रवाशांची गोष्ट ! निसर्गाच्या ’उलट्या काळजा’शी स्पर्धा करीत त्यांतल्या दोन चिवट वीरांना, तब्बल २७ दिवस नियोजन आणि खडतर प्रवास केल्यानंतर, जित्याजागत्या ’माणसां’च्या प्रदेश दृष्टिपथांत आला...आणि मग सगळ सुरळीतं झालं...त्याची गोष्ट...वास्तवाच्या ’हिमाच्छादित ’विस्तवां’त होरपेळलेली... असंच आणखी एक वास्तव...एक जिद्द, ’दुर्दम्य’. राल्‌स्टन्‌चा जन्म, २७ ऑक्टोबर १९७५ रोजी, इंडियानापोलिस्‌मधे, डोन्ना आणि लॅरी, या जोडप्याच्या पोटी झाला पण त्याच्या कुटुंबानं, त्याच्या ११ व्या वर्षी डेन्‌व्हर्‌ला स्थलांतर केलं. शालेल शिक्षण कोलोरॅडो राज्यांतल्या, ग्रीनवुड्‌ नावांच्या एका खेड्यांतल्या, चेरी क्रीक्‌ हाय्‌स्कूल्‌ मधे झाल्यावर त्यानं, पिट्स्बॉरोतल्या कामेजी मेलॉन्‌ विद्यापीठांतून, यंत्र अभियांत्रिकी, फ्रेंच्‌ हे मुख्य विषय आणि ’पियानो-वादन’ हा आवडीचा, अशा विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. विद्यापीठांत त्यानं ’निवासी सहायक’ म्हणूनही काम केलं. परदेशांतही शिक्षण घेतलं आणि, तो एक स्वयंस्फूर्त खेळाडूही झाला पुढं. अ‍ॅरिझोना राज्यांतल्या फिनिक्स्‌ मधल्या ’इंटेल्‌’ कंपनीतल्या छानशा नोकरीचा या महाभागानं २००२मधे राजिनामा दिला.. कां ? तर गिर्यारोहणाचा त्याचा ’जन्मजात’ ध्यास त्याला कांही केल्या स्वस्थ बसूं देत नव्हता..कोलॅरॉडोमधले सगळे दुर्गम कडे त्याला सर करायचे होते..१४,००० फुटांपेक्षाही अधिक उंचावरचे...जवळजवळ ५३ की ५४ कडे होते असे..हे धाडस सुद्धा त्याला ऐन हिवाळ्यांत करायचं होतं...एकट्यानं..जे त्या आधी कुणीही स्वप्नांतसुद्धा आणलं नव्हतं. पण या पठ्ठ्यानं, आपलं ते स्वप्न प्रत्यक्षांत आणलंच एके दिवशी ! ऑगस्ट २००९ मधे राल्‌स्टन्‌नं, जेसिका ट्रस्टी नांवाच्या युवतीशी विवाह केला आणि या दांपत्याला, फेब्रूअरी २०१० मधे एक छानसा छकुला मिळाला जेसिका कडून. त्याचं नांव ठेवल राल्‌स्टन्‌नं, लिओ...लिओ राल्‌स्टन्‌. सध्या हे कुटुंब, कोलोरॅडोमधल्या बोल्डर्‌ या गावांत वास्तव्य करतय ! आता कहाणी राल्‌स्टनं दैवाशी केलेल्या...त्याच्यावर गुदरलेल्या संकटाशी केलेल्या दोन हातांची. २००३ मधे म्हणजे लग्ना आधी जवळजवळ सहा वर्षं, २६ एप्रिल ला, उटाह्‌ मधल्या पूर्व वायनी काउंटीत, हॉर्स्‌ शू कडेकपारींत, म्हणजे कॅनियन्‌ नॅशनल्‌ पार्क्‌च्याच एका भागांत राल्‌स्टन्‌ नेहमीप्रमाणे गिरिभ्रमण करीत होता. परतीच्यावाटेवर एका घळींतून खाली येतांना, एक लोंबकल्ळणारी, तोल हरवलेली महाकाय शीळा वेगानं खाली आली आणि राल्‌स्टन्‌च्या हातावर पडून त्याचा उजवा तळवा आणि मनगटापर्यंतचा हात अडकला, आणि कपारीची भिंत आणि ती शीळा यामधे चिरडला गेला...राल्‌स्टन्‌नं आपल्या या गिरिभ्रमणाची कोणालाच कल्पना दिलेली नव्हती त्यामुळं, त्याचा शोध घेत कोणी येईल याची श्यक्यतांच नव्हती. ’आपण आतां कांही वाचत नाही या ’शीला-पातां’तून.. आता फक्त मरणाची वाट पाहायची..’ असे नैराश्यजनक विचार मनांत घोळवत, राल्‌स्टन्‌नं, तब्बल पांच दिवस, हात दगडाखालून सोडविण्याचा प्रयत्न करीत, जवळच्या पाण्याचे...३५० मि.लि. म्हणजे, छोटी शीतपेयाची बाटली असते नां ? तेवढे.. अगदी छोटे घोट घेत, त्याच अवस्थेंत काढले.प्रयत्न व्यर्थ ठरत होते कारण शीळेचं वजन होतं, जवळपास ३६० किलोग्रॅम्‌..तीन दिवसांच्या, अथक प्रयत्नांनतर, तहानेनं व्याकूल आणि अर्धमेला झालेल्या राल्‌स्टन्‌नं, स्वतंचा दगडा खाली अडकलेला हात, सुटका करून घेण्यासाठी, तळहात आणि कोपर यामधे, स्वत:च तोडायचा ठरवलं..गिर्यारोहणाच्या कांही टोकदार हत्यारांच्या साहाय्यानं, राल्‌स्टन्‌नं, सुरुवातीला कांही ’ओरखडे’वजा जखमा करून बघितल्या..वेदनांचा अंदाज घेण्यासाठी. चौथ्या दिवशी त्याच्या लक्षांत आलं की सुटका करून घ्यायची असेल तर नुसतं मांसच नाही तर हाताच हाडसुद्धा ’तोडणं’ आवश्यक आहे. आणि, त्याच्याकडे उपलब्ध असलेली हत्यारं या कामासाठी सक्षम नव्हती, हे ही त्याला ठाऊक होतं.. पांचव्या दिवशी, जवळच पाण्याचा शेवटचा थेंब जेमतेम शिल्लक राहिक्याचं त्याच्या लक्षांत आलं आनि त्यानं त्याच्या ’महाप्रयाणाची’ तयारी सुरु केली. समोरच्या दगडावर स्वत:च नांव आणि संभाव्य ’मृत्यु-दिनांक’, वेळ आदि माहिती कोरली..स्वत:च्या चलत्ध्वनिसंचावर, कुटुंबियांसाठी ’शेवटचा संदेश’ चित्रमुद्रित केला..त्या रात्री ’आपण मरणार’ या खात्रीनं तो पडल्यापडल्या परत मूर्छित झाला.. आणि अहो आश्चर्यम्‌... दुसर्‍या दिवशी...१ मे, गुरुवार...सकाळी त्याला चक्क ’जितेपणी’ जाग आली. मनांत कल्पना आली त्याच्या की आपण आपलं हाड, फांदी मोडतो तसं मोडलं तर ? आणि ’जिगरबाजानं केलं कि हो तसं ! आणि मग एका गंजलेल्या, दोन इंची पात्यानं..जे त्याच्याकडच्या सामुग्रीचा भाग होतं.. त्यानं तुटलेल्या हाडाचा लटकतां भाग कापायला सुरुवात केली..स्वत:कडच्या त्या चिमुकल्या हत्याराचं तो कौतुकानं वर्णन करतो, ’स्वच्छ प्रकाश देणार साधन किंवा बहु-उपयोगी’ वगैरे तसलं कांही हत्यार असतं तरी हेच केलं असत ना मी ?’ हात ’तोडून’ स्वत:ची सुटका करून घेतल्यावर, राल्‍स्टन्‌ त्याच अवस्थेंत, घळ उतरून घसरत खाली आला..’पि्टॉन्‌-मिटॉन्स्‌’ आनि दोरखंडाच्या मदयीनं ’रॅप्‌लिंग्‌’ करीत..एका हातानं...ऐन दुपारच्या उन्हांत. त्याची गाडी १३ किलोमिटर्‌ दूर होती.. आणि दळणवळणाचं कुठलही साधन नव्हतं त्याच्याकडे..पण त्याच वेळी, एरिक्‌ आणि मोनिक्‌ मीजर आणि त्यांचा मुलगा अ‍ॅंडी, या नेदरलॅंड्‌च्या प्रवासी गिर्यारोहकांनी त्याला बघितल आणि त्वरित संबधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून मदत-कार्याला सुरुवात केली.तो पर्यंत, राल्‌स्टन्‌च वजन ४० पौंड्‌ कमी झालं होतं आणि शरीरांतील एकूण रक्ताच्या २५ टक्के रक्त वाहून गेलं होतं. अतिरक्तस्रावानं आपण मरणार, याची राल्‌स्टन्‌ला पुरेपूर खात्री पटली होती एव्हाना..पण दरम्यान, तो घरी न परतल्यामुळे , कुटुंबियांनी चौकशी सुरू केली होती आणि ते शोध पथक हेलिकॉप्टर्‌सकट पोहोचलं होतं दुर्घटनास्थळी...हात तोडल्यानंतर सहा तासांनी.. राल्‌स्टन्‌ म्हणतो, ’आधी हात तोडला असता तर रक्तस्रावानं किंवा तोडला नसता तर तहान-भूक-अशक्तपणानं...माझं कलेवर झालं असतं तसंही !’.. सुटकेसाठी हात तोडण्याची खुणगांठ त्यानं मनाशी वेळेवरच बांधली होती. नंतर, कालांतरानं, त्याच्या तोडलेल्या हाताला कृत्रिम हात , तळवा, कोपरासकट, बसवून मिळाला हॉस्पिटल्‌मधे... तो तुटलेला हात, घळींत पडलेली शीळा हलवून, शोधून आणण्यासाठी १३ माणसं, कांही अवजड यंत्रसामग्रीसह झटली, आणि राल्‌स्टन्‌नं त्या हाताचं व्यवस्थित दफन केलं अखेरीस !! म्हणतांत ना..I was complaining about my shoe untill I saw a person without feet.. तसंच कांहींसं... रोजच्या परिस्थींतल्या छोट्या मोठ्या संकटांची चिंता आणि तक्रार करीत बसणार्‍या आपणा सर्वांसाठीच ही कथा..अगदी वास्तव आणि सत्य घटना, आठ नऊ वर्षांपूर्वीच घडलेली..an eye opener नाही कां ? किंवा असही असेल, की, जिवावरचं बेतलं तर परिस्थितीनुसार सर्वसामान्य माणसंसुद्धा पुरेशी लढाऊ, जिगरबाज आणि प्रसंगी आक्रमकही होतांत... ****** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

’अरे संसार संसार, वरं ’भामे’ची पांखरं (?)

’अरे संसार संसार, वरं ’भामे’ची पांखरं (?)’ अखिल जगतांतल्या तमाम महिलावर्गाची, विशेषत: विवाहित ’भामिनीं’ची (कविवर्य बोरकरांनी, पत्नीसाठी वापरलेलं संबोधन, ’कशि तुज समजाउ सांग ? कां भमिनि धरिशी राग’ या ’क्रोध-शामक’ भावगीतांत ! जे पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरबद्ध करून स्वत: गायलंसुद्धा आहे.) सुरुवातीलाच सपशेल क्षमामागून, पुढील विषयाला हात घालतोय. धोका आहे...पण अखिल जगतांतील, विविध प्रदेशांतील पुरुषवर्गाची धारणा, भावना, संवेदना, एकुणांतच ’लग्न’, ’विवाह’बंधन’, ’सहजीवन’ या संस्कार, उपचारां(?)बद्दल आणि, पत्नी’, ’बायको’ या पुरुषवर्गाच्या व्यक्तिमत्वाला अस्तित्वाला, आत्माभिमानाला, अक्षरश: ’झाकोळून’ टाकणार्‍या नात्यांबद्दल काय आहे हे या, उंबरठ्यावरचं माप, लक्ष्मीच्या पावलांनी ’वलांडून, सासरच्या भिंतींवर, आळता लावलेल्या तळव्याचे ठसे उमटवत पत्निपदपावलेल्या भोळ्याभाबड्या (?) अबलांच्या कानावर घालून, मनावर ठसवीत, त्यांचा भ्रमनिरास करणं हे मी माझं कर्तव्य समजतो, आणि ’मी ते करणारच’ अशी राणा भीमदेवी थाटांतली प्रतिज्ञा मी केली आहे... या मतांत कांही विधानं, जागतिक स्तरावर गाजलेल्या कांही विख्यांत लेखकांची तर आहेतच तर कांही भारतांत आणि परदेशांत प्रचलित असलेल्या वाक्प्रचारांच्या रूपांत परंपरेन ’घरंगळत’ आलेली आहेत. आतां कांही खोडसाळ मंडळी,’ अग अग म्हशी, मला कुठं नेशी’ हा वाक्प्रचारसुद्धा या सूचींत समाविष्ट करू पाहात होते पण मीच त्यांना ’मज्जाव’ केला (बरं कां भगिनींनो, कारण लेख पूर्ण वाचून झाल्यावर माझ हेच कृत्य माझ्या संरक्षणाची ’ढाल’ ठरणार आहे...कदाचित !) कविवर्य सुधीर मोघ्यांनासुद्धा अशीच ’अतिरतीनंतर उपरती’ झाली असावी. कारण त्यांच्या सरखा ’निरंकुश’ (त्यांचं ’निरंकुशाची डायरी’ नावांच पुस्तक खूप छान आहे. अगदी शोधून, मिळवून वाचावं असं !) सुद्धा स्वतं:भोवती, रेशमाच्या किड्यानं विणावा तसा, हौसेनं विणून घेतलेला, वेढून घेतलेला ’पाश’ (’पाश’वी ह्या शब्दाची व्युत्पत्ती आत्तां कुठ मला उलगडल्यांचा दृष्टांत’ मला अचानक झाला पाहा) आणि त्यांत ’चक्रव्य़ूहां’त अडकलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था झाल्यानंतर ही लौकिकार्थानं ’दुराग्रही, क्रूर, अन्यायकारी’ शब्दांनी ओतप्रोत ’बरबट’लेली’ कविता लिहितो... ’खर म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो पण एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला भेटतो अक्कल गहाण पडते, भेजा कामामधून जातो टक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो त्या चेहेर्‍याच असली रुप मग आपल्याला कळतं बायको नावाचं वेगळच प्रकरण आपल्यापुढे येतं हा दारूण मनोभंग अगदी झालाच पाहिजे कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? आपण कविता म्हणू लागलो की, हिला फोडणी सुचते शुभ्र टिपुर चांदण्यांत ती चक्क जांभई देते मैत्रीणी भेटल्या की बाजारात तासन्‌तास तिष्ठत ठेवते मित्रांच्या घोळक्यांतून मात्र ओढून आंघोळीला काढते काळीज नावाचा जिन्नसच तिचा ‍अ‍ॅबसेन्ट्‌ असतो कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? पण बायको फार चांगली जेव्हा ती मैत्रीण असते आणि मैत्रीण तर फारच चागली, कारण ती बायको नसते पत्येक पुरुशाला या सत्याचा साक्षात्कार होतो फक्त हा बोध त्याला फार उशिरा होतो अपवाद म्हणुन सुद्धा याला अपवाद नसतो कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? काय हे कविवर्य ? कुठे फेडाल हे पाप ? असाच एक, लग्न ’करून ’बसलेला’ (फसलेला ?) एक अनामिक, घाबर्‍याघुबर्‍या म्हणतो, ’प्रत्येक पुरुषानं लग्न हे करायलाच पाहिजे...कारण फक्त ’आनंद’ हे कांही जगण्याचं एकमेव प्रयोजन नाही.’ हे गृहस्थ ’अनामिक कां ? तर बायकोला जर हे विधान त्यांच्या तोंडून ’बरळलेल’ आढळंलं तर काय गत होईल याची त्यांना कल्पना असावी !! ’ब्रह्मचारी..अविवाहितांकडून भरपूर करवसुली केली पाहिजे..कारण ’आनंद-प्राप्ती’ ही काहींचीच फक्त मक्तेदारी नसावी.. नाही कां ” -ऑस्कर्‌ वाईल्ड्‌नं म्हटलय हे बरं ! ’कुणाला काय हो त्याचे ?’ आनखी एक स्कॉटिश्‌ वचन.. अं हं...आश्वासन आहे. काय तं म्हणे: ’लग्न.. ? आणि तेही पैशांसाठी ? छे, छे.. अहो ते (पैसे हो !) तर खूप स्वस्त व्याजदरानं मिळतांत की !!’ तसंच विख्यात लेखक, सॅम्‌ किन्सन्‌ म्हणतो: ’दहशतवादाची आणि अतिरेक्यांची वगैरे मला मुळीच भीतीबीती वाटत नाही. अहो माझं लग्न होवून तब्बल दोन वर्ष झालीयेत, महाराजा...आहात कुठं !’ एक विलक्षण विश्लेषणात्मक वगैरे आत्मचिंतन.. (असं भारदस्त नांव दिलं की विधानाचं अर्ध समर्थन होवून जात असावं बहुधा !) ’पुरुषमंडळी स्त्रियांपेक्शा दोन बाबतींत नशिबवान असतांत.. पहिलं म्हणजे ते आयुष्यांत वाढल्या वयांत, उशिरा लग्न करतांत, आणि अर्थातच (त्या मुळं..कदाचित?)..ते ’वैकुंठवासी’ही लवकरचं होतांत..’ कुणी ऐरागैरा नाही तर खुद्द, एच्‌.एल्‌.मेंकेन्‌ म्हणतोय्‌..लक्षांत घ्या !.. आणखी कांही ’घाबर्‍याघुबर्‍या’ अनामिकांची, इकडंतिकडं पाहात, सावधपणे केलेली विधानं पाहूया: ’नवपरिणित वधुवर जेंव्हा मंदस्मित करतांत, हसतांखिदळतांत तेंव्हा कळतं आपल्याला कारण अगदी सहज....पण लग्नाला तब्बल, दहा वर्ष पूर्ण झालेलं जोडपं एकत्रित हसतं तेंव्हा जरा नाही... खूपच आश्चर्य वाटतं बुवा !’ ’प्रेम आंधळं असतं म्हणतांत..त्याच न्यायानं ’लग्न’ झालं की लोकं विचारतांत, ’काय ? उघडले की नाही आता डोळे ?’ ’एखाद्या महभागानं, आपल्या गाडीचा दरवाजा पत्नीसाठी उघडला तर दोन पैकी एका गोष्टीची खात्री बाळगा.. एक तर गाडी नवी आहे.. किंवा, हमखास.. बायको !!’ ’माझ्या प्रिय पत्नीला मी सगळीकडे हिंडायला घेवून गेलो. पण काय करणार ? प्रत्येकवेळी तिला घराकडे परतायचा रस्ता अगदी सहज सापडतो हो !’ माझ्या माया ममतेच्या आया-बहिणींनो हा पुरुषी मानसिकतेचा (Man 'sick'.. eh ?) हा धांडोळा इथंच संपत नाहीबरं ! उर्वरित पुधील सपताहांत ... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar ॥श्री॥ ’अक्षरे’...’उत्सव’ पुरवणीसाठी मजकूर.... (संजयजी डहाळे कृपया) ’अरे उर्वरितं संसार, ***** आतां आषाढ सरला की श्रावण येईल.. सणावारांचे वारे वाहूं लागतील..पूजा-अर्चा, व्रतवैकल्य..उपासतापास.. ’कुंकवाच्या धन्याच्या’..पतिराजांच्या यशासाठी..भल्यासाठी नवस सायास बोलतील भोळ्याभाबड्या महिला...तर कुमारिका, ’मला चागल Husband Material वाला नवरा मिळूं दे’ म्हणून, आपलं आधुनिक युगांतल्या स्थानाचं भान राखत, जीन्स्‌वर ’Ready-made नऊवारी परिधान करीत, परंपरेच्या ’मांदियाळींत’ सामील होतील... आणि इकडं..दुष्ट दुराग्रही पुरुषवर्ग...त्यांच्या ’सद्भावनांची, सद्‌हेतूंची टिंगल टवाळी करण्यांत, संध्याकाळच्या, मित्रांच्या टोळक्यांमधल्या ’धुंदावलेल्या’ गप्पांत त्या बुडवून टाकण्यांत मग्न असेल. अगदी , तरुणपणी बाहूंसकट सगळंच स्फुरण पावत असतांना , कानांत वारं भरलेल्या खोंडाच्या उत्साहानं, आवेगानं, पालकांनी आणलेल्या किंवा स्वत: हेरलेल्या, युवतीमध्ये, तिच्या स्त्रीसुलभ विभ्रमांनी हुरळून जात, तिच्यांत 'House wife Mmateral आहे की नाही याची खातरजमा करून न घेतां, उतावळेपणानं ’गुडघ्याला बाशिंग बांधत’ लग्न करून बसलेली पुरुष मंडळीसुद्धा, वसंत कानेटकरांच्या ’लेकुरे उदंडझाली’ मधल्या नायकाच्या मनांतले प्रष्ण विचारत बसतांत, ’ही शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच कां करतांत, ? अन्‌ जाणूनबुजून खड्ड्यांत अशी जाउन कां पडतांत ? करूनसावरून घोरपड गळ्यांत, ही बांधून कां घेतांत ? आणि मग ’मेलो, मेलो ! बुडालो !!’ म्हणून ओरडत कां बसतांत ?’ अशाच एका खास, सुपीक ( कुठल्याही ’पत्नी’च्या नजरेंतून ’सडक्या’) मेंदूतून सुचलेली अफलांतून कल्पना.. हे सद्‍गृहस्थ आपल्या प्रिय पत्नीला विचारते झाले, ’प्रिये ! लग्नाच्या वाढदिवशी तुला कुठे घेवून जावू मी ?’ पत्नी हरखत, लाजून चूर (?) वगैरे होत, गृहस्थच्या नजरेंत आपली व्याकूळ, भिरभिरती नजर मिसळत म्हणाली, ’सख्या..तू नेतोय्‌स्‌...मग अशा ठिकाणी घेवून जा मला की जिथे मी आजवर कधीही गेले नाही..नेशील ना ?’ गृहस्थ अत्यंत (कुजकटपणे) प्रष्णकर्ताझाला, ’लादके मला तुझी इच्छापूती करायला फार लांब जायला लागणार नाही आपल्याला .. !’, पत्नी, ’खरं ? मग चला ना ! उशीर कशाला ?’, पतिराज ’बरळले’, ’चल..लवकर पावलं उचल.. आपल्याला त्वरेनं आपल्या घराचा ’मुदपाकखाना’ गाठायचाय, जिथंतू गेल्याचं तुला आणि मलाही आठवत नसावं..नाही कां ?’ आणखी कांही ’इरसाल नमुने: .मी माझ्या प्रिय पत्नीचा हांत, माझ्या हातांत, नेहमी घट्ट धरून ठेवतो...पखड अजिबात सैल करीत नाही ! कारणहातं सुटला तर ती लगेच ’खरेदी’साठी पळत सुटते हो !’ ’भामा..माझी प्रिया...’सौंदर्यवर्धन-गृहांत जवळजवळ दोन तास होती...हा एक आपला अंदाज हं ! तिनं ’पंक-लेपनोपचार’, म्हणजे ज्याला मराठींत, ललना ’Mud-pack' का काय ते म्हणतांत...घेतला होता आणि छानचं दिसत होती ती दोन दिवस...पण हाय रे माझ्या कर्मा...अहो, दोन दिवसांनी तो ’पंक-लेप’ गळून पडका की हो... !!’ आणि हा जरासा अतिरेकीच.. वाग्बाण ! क्रूर, कठोर, दुष्ट वगैरे विशेषणांना योग्य: ’परतीच्यावाटेवर, वेग वाढवत जाणार्‍या कचर्‍याच्या गाडीकडे बघून, ती त्या गाडीमागे धावात ओरडायला लागली, ’अहो थांबा ! थांबा ना...मला उशीर झाला कां थोडा ?’ मी तिची धडपड पाहून तिच्यामागे धावत कळवळून ओरडलो, ’नाई नाई...पटकन उडी मार ! मी वेग कमी करायला सांगतो त्यांना...नाईतर, आयती चालून आलेली संधी गमावू, तू आणि मी...आपण दोघेही...’ एका अनामिकाला, बडी टेड्डी सांगत होता, ’मी नाही करणार लग्न ! कारण लग्नाआधी वाङ्‌निश्चयतर करावाचं लागेल...म्हनजे ते साखरपुडा, भेटीगांठी वगैरे लांबलचक प्रकरण. आणि मग ते एकमेकांनी ’अंगठ्या’ बोटांवर चढविणं वगैरे... नेमक्या याच ’अंगठ्या’ मला नेहमीच, म्हणजे इतरांच्या वाङ्‌निश्चयाच्यावेळी बघितलेल्या, अक्षरश: सू्क्ष्मरूपधारिणी ’बेड्या’च भासतांत, पुढचं चित्र स्पष्ट करीत ’सावधान’ म्हणणार्‍या... त्याला मी काय करूं ?’ आनखी एका दुष्ट प्रवृत्तानं काय सल्ला दिलाय पाहा. हा खलनायक म्हणतो, ’मागल्यादारी तुमचा पाळलेला ’भु:भू’ जोरजोरांत भुंकतोय आणि मुख्य प्रवेशद्वारांत तुमची पत्नी ओरडतीये...तर तुम्ही कुणाला आधी आंत घ्याल ? अर्थातच ’भु:भू’ला ! कारण तुम्हाला खात्री असते की आंत आल्यावर तो भुंकायचं थांबणार आहे.’ आतां शेवटचे, ’शुभास्तेपंथान:सन्तु’ म्हणत हाणलेले दोन षट्कार: एका स्मशानभूमींत एक गृहस्थ आपल्या आईच्या थडग्याशी येवून, हातांतली फुलं वाहून अत्यंत मनोभावे, तिच्या आत्म्यासस सद्गती मिळावी म्हणून प्राथना करीत होता. प्रार्थना संपल्यावर थडग्यावर माथा टेकून परत उठून तो आपल्या गाडीकडे परतत होता. तेवढ्यांत, तिथंच कांही अंतरावर आणखी एक गृहस्थ अत्यंत शोकाकूल अवस्थेंत, अगदी हमसाहमशी रडत, ’कां इतक्या लवकर ? काय कारण होतं असं मधेच सोडून जायचं ? आता मी काय करायचं ?’ असे दु:खभरले प्रष्ण करीत होता, आणि त्या थडग्याकडून जणूकांही उत्तर मिळणार आहे अशा पद्धतीनं, गुडघे टेकून अश्रू ढाळत होता. पहिल्या गृहस्थाला ते दृश्य बघवेना. त्यानं जवळ जात, त्या गृहस्थाच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, ’ किती व्यथित आहात तुम्ही ! तुमच्या खाजगी भावाक्रंदनामधे मी व्यत्यय आणू इच्छित नाही पण... मी आजवर इतक्या भग्न मानसिक अवस्थेंत कुणालाच पाहिलं नाही हो ! कोण गेलं ? तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी की मुला-बाळांपैकी कोणी ?’, शोकभग्नावस्थेंतल्या गृहस्थानं वर पाहिलं, स्वत:ला सावरत तो उत्तरला, ’अहो गेला तो आणि जो या थडग्याखाली चिरनिद्रा घेतोय तो माझ्या बायकोचा पहिला नवरा होता हो ! कसं सागू ? सहन होत नाहीये आणि सांगताही येत नाहीये कुणाला... !!’ आतां ही तर सर्वांवर कडी आहे: एक जोडपं एकदा एका इच्छापूर्ती विहिरीजवळ गेलं. पतीनं विहिरींत वाकून एक नाणं आंत फेकलं. पत्नीनही विहिरींत वाकून बघायचा प्रयत्न केला पण अचानक तोल गेल्यानं ती विहिरींत पडली.. आणि पोहोता येत नसल्यामुळे गटांगळ्या खात तळाशी गेली...ती गेलीचं. पतीनं विहिरींत बघितलं. धक्क्यांतून बाहेर येतांयेतां तो स्वत:शीच पुटपुटला, ’क्या बात है ! चक्क इच्छापूर्ती होतीय्‌ कि हो !!’ आतां थांबतओ..कारण अखिल स्त्रीवर्गाच्या निढेधाच्या आरोळ्या आणि त्यांच्या हातांतल्या ’लाटण्यां’चेयुद्धनाद, समीप तेत असल्याचं मला जाणवतय्‌.... *****

Friday, May 18, 2012

’सगळंच अनाकलनीय...

’सगळंच अनाकलनीय...’ ’नंदभवन, नंदलाल, ठुमक चलन लागे । पीछे माँ यशोमती बाबा नंद आगे ॥ पंडित नरेंद्र शर्माजी यांच्या लेखणींतून स्रवलेलं हे कौतुकामृत. आपल्या देशांतल्या, ’माय मरो पण मावशी जगो’, या संस्कृतिचा पुरस्कार करणार्‍याच आहेत. गोपाल जरी ’देवकिनंदन’ असला तरी, ’कंस मामा’ला भाचरांपासूनचे ’भय’इथंले संपत नाही’ या भयगंडानं ग्रासल्यामुळे, आपल्या सख्ख्या बहीण-मेव्हण्याला कैदेत टाकण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. मग वसुदेवानं आपल्याच गोंडस, गोजिरवाण्या तान्ह्या...कान्ह्याचं तुरुंगांतून, ’तस्करी’ करून दुथडी वाहणार्‍या यमुनेच्या पात्रांतून, डोक्यावरच्या टोपलींतून, पैलतिरावरच्या गोकुळांत नेऊन, नंद-यशोदेच्या पदरी दिल, ही कथा आपल्या सगळ्यांनाच कांही नवी नाही. नॅट्‌ वाईल्ड्‌ वर परवा एक अद्वितीय दृश्या बघितलं. एका चुत्यानं एका भल्या मोठ्या ’हुप्प्या’चा, पाठलाग करून त्याला पकडत त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि नंतरचं दृश्य इतकं मन हेलावून टाकणारं होतं की, जगणारे सर्व प्राणिमात्र..मग ते हिंस्र, वन्य, जंगली ’असंस्कृत’ असले तरी ’कणव’नावाची भावना उपजत असते याचं प्रत्यंतर मिळावं. ज्याला भक्ष केलं त्याच्याच बछड्याला हे चित्ता महाशय..बहुधा चित्तीण’ असावी...इतक्या हलक्या ’पंजानं’ खेळवत होती, त्याला लांडग्यापासून वाचवत होती, ते फांदीवरून पडायला लागलं, तर त्याला सावरत होती... क्या बात है ! इथं, ’माय’ मारून, ती ’वाघाची मावशी’ त्याच ’माय’च्या ’बच्चू’ला जगवीत होती. हे सगळं वाचलं, बघितलं, स्मरलं की वाटतं की बालकांचा ’लैंगिकछळ’ वगैरे कल्पित-कथा असाव्यांत.. पण नाही...हा छळ थांवविण्यासाठी ’कायद्याचा आसूड उगारायची वेळं न्यायासनाला भासायला लागली... मुळांत, ’उत्क्रांत’ माणूस क्रूर असतो का ? हो ! तो श्वापदांइतकाच क्रूर असतो..Virtue of an 'Animal instinct'...आणि संस्कृती’च्या कमाई बरोबरच, श्वापदांमधे, अपवादानचं आढळणार्‍या विकृतीचं माप अगदी पुरेपूर वागवत असतो तो त्याच्या अंतर्मनांत..माणूस विनाकारणसुद्धा हल्ला, खून करतो...Cold blooded killing. रामन राघव, जक्कल..सुतार..शहा...ही धडधडींत उदाहरणं आपण बघीतली आहेत. हेतू ? केवळ,माथेफिरूपणा, दुसरा जीव तडफडत असतांना तो बघत ’आनंदॊत्सव’ साजरा करणारा माथेफिरूपणा...जो सहसा श्वापदांत आढळत नाही...भरल्यापोटी कुठलाही ’हिंस्र’ नख लावत नाही....’विकृती ही माणसाच्या मेंदूची उत्क्रांतावस्थेतली ’कमाई’...जसं हसता येण हे पण केवळ माणसालाच शक्य तद्वतच...दुसर्‍या रडवितांना खूप हसणं...हे ही ! माझा एक मित्र आहे. श्रीकांत गद्रे. पुण्यांत तो बालकं-पालकांच्या मानसिकते बाबत, शैक्षणिक असोशी, रुची, आस्था जाणिवांबाबत नवनवीन प्रयोग सातत्यानं करीत असतो. त्यानं मला एक गमतीशीर खेळ, त्यानं स्वत: प्रयोग करून बघितलेला...मला सांगितला. खेळाचं स्वरूप होतं स्पर्धेचं ! कसली स्पर्धा ? तर पालकांची स्पर्धा. एका सभागृहांत त्यानं बर्‍याच पालकांना निमंत्रित केलं. स्पर्धेचं स्वरूप सांगितल्यावर सगळ्यांचाचं उल्हास, उत्साह वाढून सगळे एकदम ’सजग’ झाले. पालकांच्या बसायच्या जागेपासून साधारण शंभर फुटांवर एक सुतळी आडवी बांधून तिला असंख्य छोटे दोरे बांधले होते. स्पर्धक पालकांना, प्रत्येकी ओजळभर फुगे दिले होते. पालकांनी, आधी फुगे फुगवून, धावत जावून, ते त्या सुतळीला बांधून, धावत परत येणे आणि नंतर आयोकांकडून मिळालेली टाचणी घेवून, परत पळत जावून, आपणच किंवा इतरांनी फुगविलेले फुगे फोडणे...अशी स्पर्धा होती. आधी ’जोडायची’ आणि नंतर’ तोडायची स्पर्धा ! मंडळींना, फुगे फुगवायला जेवढा वेळ लागत होता त्याच्या एक दशांशापेक्षा कमी वेळ फुगे फोडायला लागत होता आणि फुगा फुटला की मोठ्यानं, स्वत:च्या ’निर्घृण’कृतीवर ’बेहद खुशी मनाते हुएं, खिदळत, किंचाळत होते. निष्कर्ष ? घडविणं अवघड पण बिघडविणं सोपं.. आणि विध्वंस, दुसर्‍याचा, आनंददायी असतो... अगदी गंमत म्हणून, आणखी एक सर्वपरिचित उदाहरण:...’तान्हा’ जीव उभं राहायला लागला की पायाखाली असते भूमी, अवनी, माती जिच्यां कणाकणांतूनच त्याची ’जडण घडण’ झालेली असते... आणि मग एखाद्या ’जीव घेण्या, जल-संकटांत’, जन्मदात्री माता त्याच तान्ह्याला पायतळी ठेवून, स्वत:व्हा जीव वाचवू पाहाते ! जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ॥ एका निरागस, निर्मळ, हळव्या मनाच्या सहृदय संतश्रेष्ठानं मागितलेलं ’दान’... पण साप विंचू त्यांचा ’विष’भाव त्यजतील ?...ते तर स्वसंरक्षणाचं साधन... भीती किंवा क्षुधा शमनार्थ वापरायचं शस्त्र...पण भरल्यापोटी, भयमुक्त वातावरणांत, केवळं करमणूक म्हणून ’हिस्र’ उद्योग करणार्‍या माणसांसाठीच केवळ हे दानं त्या संतशिरोमणीनं मागितलं असावं, बहुधा.. *****

’दुरावा...असा आणि तसा..’

’दुरावा...असा आणि तसा..’ ’तू दूरदूर कोठे, हुरहूर मात्र येथे विरहांत रात्र मोठी, प्रेमीजनांस वाटे’ किंवा, कां कुणास ठावूक पण मी ज्या कवितेला ’Most Unlike विंदा’ असं मानतो ती ’सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी, सांगू कसे रे मी तुला सांगू कसे रे याहुनी’ ही संगीतकार-कवी यशवंत देवांच्या सिद्धनाद-स्वरांनी सजलेली कविता, किंवा ’दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन्‌ मी इकडे’ ही, आणि ’हा असा दुरावा किती म्हणुन सोसावा ? रे वार्‍यावाचुन जीव कसा वाचावा ? कवयित्री योगिनी जोगळेकर यांनी शव्दबद्ध केलेली ही विरहव्यथा, आंतड्याला पीळ पाडणार्‍या, तेवढ्याच भावविभोर सुरांतून गजाननराव वाटव्यांनी श्रोत्याभिमुख केली.. अनेक वर्षांपूर्वी. जुळण्यांत आनंद आहे पण तुटण्यांत नाट्य आहे. (विधान जरा ’क्रूर’ आहे पण खरं आहे). पाहा ना ! रामायण, महाभारत किंवा अन्य कुठलही महाकाव्य...त्यांतून ’तुटणं’ विरह’, 'दुरावा' काढून टाका..आणि बघा ते वाचायला आवडतं का ते ? जुळणं आणि तुटणं, सहवास आणि दुरावा, बरसण आणि ओसरणं...हे दोनीही हातांत हात घालून चालतांत नेहमी. एकमेकांच्या सावली सारखे ’विरले सगळे सूर तरीही (किंवा ’तरी, ही’), उत्तररात्र सुरेल ओसरल्यावर आपण सजणे अशीच ओलं उरेल’ पुळणीच्या अवती भवती रेंगाळत, खारं वारं कानांत भरून, Romantic गोव्यांतल्या सागरतीरी तारुण्य व्यतींत केलेल्या, बाकीबाबांना, आलेली लाट (बंगालींत लाटेला ’कल्लोळ’ म्हणतांत. डोळ्यासमोर आणा लाट, आणि पाणी कसं ’लोळ’ण घेत किनार्‍यावर, ते जाणवेल तुम्हाला..) आणि ती ओसरल्यावर किनार्‍यानं धरून ठेवलेला ओलावा, ’शृंगारोत्तर’क्षणांच वर्णन करायला चपखलपणे न वापरला तरच नवल... -कविवर्य ’बाकीबाब’ बा.भ. बोरकर, एक जबरदस्त आशावाद आयुष्याच्या अखेरपर्यंत वागण्या बोलण्यांतून, अक्षर-शब्दांतून उधळणारे ’बाकीबाब’ यांच्या कवितेंतली ही ओळ. संगीतकार चंद्रशेखर गाडगीळांनी त्याच एक सुंदर गाणं केलय‌.. पंचवीस तीस वर्षांपूर्वी... अशाच विरहव्यथेवर किंवा ’तुटण्या’वर, बोरकरांनी आणखी एक कविता लिहिली आहे, तू गेल्यावर फिके चांदणे, घरपरसूंही सुने सुके मुले मांजरापरी मुकी अन्‌ दरदोघांच्यामधे धुके.. गहिवरल्यानं, ’दहिवर’ल्या पांपणीकाठांचं किती सार्थ वर्णन !! सहचारिणी ’गेल्यावर’, दुरावा जाणवायला, जाळायला लागल्यावर, मनाच्या तळांतून आक्रंदत उठलेले शब्द... कवितेचा आस्वाद घेणारा रसिक श्रोता, ती वाचतांवाचतां, नकळत त्या वातवरणांत दाखल होतो आणि त्यांतल्या ’दाहकते’चा अनुभव घ्यायला लागतो...पांपणीकांठ पाणावतांत, गळा दाटतो, हुंदका प्रकट होवू बघतो, भावुकभावुक होत ’कच्च्या’ अल्वार मनाच्या रसिकांच्या मनांत ’कसं सोसलं असेल, या ’गृहस्था’नं हे सगळं ?’ असे सहानुभूतीपूर्वक तात्कालिक, व्यर्थ प्रष्ण, (खरंतर) उगाचच उभे ठाकायला लागतांत... तोच !! शेवटच्या दोन पंक्ती, (कधीच लिहून मोकळे झालेले, आणि गंमत बघायला सज्ज झालेले) बाकीबाब...एक मस्त, ’गुगली’ टांकतांत, त्या ओळींमधे...शेवटी ! एक ’प्रौढत्वी’सुद्धा जपलेला बालसुलभ ख्ट्याळपणा, ’एक ’मिश्किल’ खोडसाळपणा यामधून उद्भवलेला ’गुगली’...: ’तू गेल्यावर दोन दिसांतच जर माझी ही अशी स्थिती, खरेच मग गेलीस सखे तर होइल माझी काय गती ?’ म्हणजे ? हो ! अहो, म्हणजे पत्निविरह हा, तिच्या माहेरपणामुळं वाट्यास आलाय कवीच्या..ती कांही ’तशी’ ’गेलेली’ नाही. झाली की नाही गंमत ? ओलावल्या पापणी कांठी एक खजील स्मितहास्य फुलविण्यांत ’बाकीबाब’ किती बाकबगार (वकूबगार ?) आहेत हे पटलं की नाही ? वपुंच्या ,सुरुवातीला हलक्याफुलक्या प्रसंग, संवादांतून फुलत जाणार्‍या कथा शेवटी शेवटी, हुरहुर लावणारी करुण झलर लेवून, अस्वस्थता मागे ठेवून जातांत. तसच पुलंचा नारायण किंवा अन्य कांही ’वल्ली’ व्यक्तिरेखाही त्यांच्या अंतर्मनांत कुठेतरी, अदृश्य, अनामिक चुरचुरणारी जखम, आंतल्या तोंडाच्या गळवासारखी ठुसठुसणारी, घेवून वावरत असतांत, किंवा कानेटकरांच्या ’लेकुरे उदंड झाली मधला, श्रीकांत मोघ्यांनी त्यांच्या अभिनयानं अजरामर करून ठेवलेला नायक...’ या गोजिरवाण्या घरांत माणसांना लागलय खूळ, कारण ? यांतली गोम अश्शी आहे की, आम्हाला नाही मूल..’ म्हणतांना प्रेक्षागृहांतल्याअ सन्नाट्याला मूकपणे, नि:शब्द ’बोलक’ करतो. त्याच्या बरोब्बर उलटी अशी बोरकरांची ही कविता... अखेरीस, ’फसल्या’चाही आनंद देणारी... *****

Wednesday, May 9, 2012

’लळा, जिव्हाळा शब्द ? अगदी खरे..खरे..’

’लळा, जिव्हाळा शब्द ? अगदी खरे..खरे..’ तुम्ही ओळखता या छायाचित्रांतल्या महिलेला ? अवघड आहे. कारण तशी फारशी प्रसिद्ध नसलेली ही व्यक्ती आहे. इरिना शे‍न्ड्‌लर्‌. दिनांक १२ मे २००८ रोजी, वॉरशॉ, पोलंड इथं ती निवर्तली... दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रींत, इरिनाला, वॉर्‌शॉमधल्या घेट्टोमधे पाणीपुरवठाविभाग आणि मलनि:सारन विभाग यामधे काम करण्याची परवानगी मिळाली इरिनानं तिथल्या ज्यू नवजात तान्ह्यांना, स्वत:च्या कामासाठी लगणार्‍या छोट्या हत्यारांच्या पेटींत लपवून, छळछावणीच्या नरकांतून ’बाहेर काढण्याचं पुण्यकृत्य सुरू केलं. थोड्या जास्त वयाच्या बालकांना एका मोठ्या तादपत्रीच्या किंवा दांबरी कापदाच्या पिशवीची योजना करून, ती पिशवी, ती मालवाहू वाहनाच्या मागील भागांत ठेवून बाहेर काढू लागली. ज्यांना जर्मन फौजांच्या अत्याचारांची कल्पना वाचनांतून किंवा चित्रपटांतून समजली असेल त्यांना पटेल की हे किती जिकिरीचं, जोखमीचं आणि ’जीवघेण’ काम होतं. एखाद काम करायचं मनवर घेतलं की माणसाला, त्यांत येणार्‍या विघ्नांवर मात करायचे उपाय आपोआप सुचूं लागतांत. म्हणतांत ना, गरज ही शोधाची जननी आहे’..तसंच कांहीसं ह्या लहान तान्ह्यांच्या आणि बालकांच्या र्डण्या-ओरडण्याचे आवाज, नाझी सैनिकांच्या कानावर प्डू नयेतं यासाठी इरिनानं एक शक्कल लढविली. तिची कॢप्ती अशी होती: तिनं चक्क एक भला मोठा कुत्रा पाळला आणि त्याला नाझी सैनिकांवर जोरजोरांत भुंकण्याचं प्रशिक्षण दिलं. घेट्टोच्या फाटकांतून ये-जा करतांना या भु:भु:च्या ठणाणा गर्जनेमध्ये मुलांचे आवाज लोप पावू लागले आणि ’तस्करी’ सुलभ व्हायला लागली. या, अद्वितीय, माया, ममता, वात्सल्य, माणुसकीचं प्रेम या सर्व भावनांची अतुलनीय परिसीमा गाठंत या जगन्माउलीनं, तब्बल २५०० ’अंकुरां’ना, ’जगण्याच्या’ मुक्त आकाशांत झेप घेण्यासाठी अलगद सोडून दिलं. पण...अखेरीस एक दिवर ती, त्या क्रूर, नराधम नाझी सैनिकांच्या कराल दाढांत गवसली हे ’पुण्कृत्य’ करतांना ! त्या यमदूतांनी तिचे दोनीही हात, पाय मोडून, जायबंदी करून तिला यथेच्छ मारहाण केली. मात्र, इरिनानं अत्यंत दूरदृष्टीनं आणि हुशारीनं एक महत्वाचं काम केल होतं. तिनं, छळछावणीबाहेर काढलेल्या सर्व लहानग्यांच्या माहितीची सूची एका कांचेच्या बाटलींत घालून, ती बाटली, तिच्या घराच्या परसांतल्या एका झाडाखाली पुरून ठेवली होती. युद्ध संपल्यावर, तिनं या, निराधार (?) मुलांच्या बचावलेल्या आई-वडिलांचा शोध धेवून, त्यांचं त्यांच्या चिमुकल्यांशी ’हृदयंगम’ मिलाप सुद्धा धडवून आणला..बरेचसे पालक, छळछावण्यांमधल्या ’गॅस्‌चेंबर्‌’चे बळी झाले होते. त्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कांही ’दयाबुद्धी’ कुटुंबांनी स्वीकारली, किंवा दत्तक घेतली गेली. इथं ही साठा उत्तराची कहाणी संपते... आणि मग सुरू होते, राजकारण्याची गुलाम झालेल्या प्रवृत्तींच्या, संस्थांच्या, ’कीव’ यावी अशा मानसिकतेची ’निर्लज्ज’ कहाणी... २००७म्धे इरिनाला ’नोबेल्‌ शांतता पुरस्कारासाठी नामांकित केलं गेलं. पण त्या वर्षी, अल्‌ गिर्‌ना, एका Global Warming वर आधारित ’स्थिरचित्र प्रदर्शना’साठी तो पुरस्कार मिळाला. नंतर, कांही वर्षांनी, बराक्‌ हुसैन ओबामा नावाच्या एका राजजकारणी धुरंधर गृहस्थांना, हा पुरस्कार, सामाजिक समन्वयाच्या कार्यासाठी मिळाला. ’अरे मानसा मानसा.. कधी व्हशीलं मानूस ? ’ह्या एका छोट्याशा संदेशांत सामावलय माझा खारीचा वाटा. तुम्हीसुद्धा असंच कांही कार्य कराल अशी आशा करते.’ युरोपांतलं दुसरं महायुद्ध सरून आतां जवळपास ६५ वर्ष होत आली. जुलमी नाझी राजवटीच्या, छळवाद, रक्तपात, बलात्कार, अत्याचार, निर्घृण हत्या यांना बळी पडलेल्या सहा लाख ज्यू, दोन लाख रशियन आणि दहा लाख ख्रिश्चनधर्मियांच्या वतीनं, त्यांच्या स्मरणार्थ हा मजकूर उधृत करीत आहे. कां ? तर भविष्यांत असले ’आगडोंब’ उसळले तरी कुठेतरी’ कुणीतरी, ’दयार्णवा’च्या रूपांतली ’इरिना’ उभी आहे याची खात्री बाळगा.’ ****** अरुण काकतकर

’रंगधून’...एक इंद्रधनुषी अनुभव

’रंगधून’...एक इंद्रधनुषी अनुभव साहित्यिक, रंगकर्मी, गायक, नर्तक, वादक, मूर्तिकार आदि कलाकारांना व्यक्त होण्यासाठी निसर्गानं प्रतिभेची देणगी दिलेली असते. म्हणजे चक्षूंकरवी साठविलेली दृश्ये, श्रवणेंद्रियांकरवी साठविलेले नाद, रसनेकरवी साठविलेल्या चवी, घ्राणेंद्रियाकरवी अनुभवलेले गंध त्वचेकरवी अनुभवलेले स्पर्श, या सगळ्यासगळ्यांना आपल्या जन्मजात प्रतिभेच्या साहाय्यानं मोहक, लक्षवेधी, असामान्य शब्द-रंग-नादरूप देवून ते रसिकाभिमुख करण्याची यशस्वी किमया त्यांना साधलेली असते. ’काठोकाठ’ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या’ या काव्यपंक्तीप्रमाणे त्यांच्या प्रतिभेच्या ’मोहाच्या’पेयाला एकाच कलामाध्यमाच्या पेल्यांत बंदिस्त राहिलेलं रुचत नाही आणि मग ते ’फेस’रूप वायू होवून मुक्तपणे उसळायला लागतं. मूलत: आवीष्कारप्रवण बुद्धिधारक असल्यामुळे, व्यक्त होण्याची माध्यमं अपुरी पडायला लागली की. ते, व्यक्त्यार्थ अन्य माध्यमांचा धांडोळा घ्यायला सुरुवात करतांत. आमचे ज्येष्ठ मित्रवर्य कविवर्य-संगीतकार-गायक-पटकथालेखक-अभिनेते-दिग्दर्शक आणि शेवटी, अत्यंत महत्वाच म्हणजे एक उत्तम संवेदनशील, सहृदय माणूस आतां त्यांना जे म्हणायचं आहे ते रंगांत मांडू पाहाताहेत. गेली दोन-अडीच वर्ष ते या ’रंगधून’ मधे विभोर आहेत. आणि शब्दभावा पासून ते रंगभावा पर्यंतचा हा गेल्या जवळजवळ पांच तपांचा प्रवास, प्रत्येक न्यासावर पक्केपणानं, स्वत:ची खास नाममुद्रा आणि वेगळेपण कोरत झालेला आहे. त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या कलाकृती पाहून या विधानाची सत्यासत्यता सहज पडताळता येते. सुधीरच्या शब्ददूनचा जन्म माझ्या मुंबईतल्या घरीच झालेला याची देही-डोळा-कानी मी अनुभवलाय. एखाद्या पुष्करणींतल्या निर्मळ, नितळ, अनंत-अगम्य आभाळाला प्रतिबिंबरूपांत स्वत:च्या अंकावर सामावून घेणार्‍या जळांतून बुडबुडे उर्ध्वगामी होत, फुटावेत आणि त्यांतून जाई-जुई-मोगर्‍याच्या मंद सुगंधाबरोबरच, कवठीचाफा-सुरंगी-केवड्या सारखा कांहींसा ईग्र-उन्मादक सुगंध ’उमटावा, तशी ही ’धून’ प्रवाहित होतांना मी पाहिली आहे. कविवर्य ’बाकीबाबां’च्या शबदांत थोडा बदल करून म्हंणावसं वाटलं त्यावेळी ’कवी घरी आल्याचे शब्दांना कळले आहे, त्यांचे अवगुंठन आतां ढळले आहे’ ’पंडित’, ’अभिनेता’ ह्या किंवा तत्सम उपाधी, स्वत:हूनच आपल्या नांवाआधी लावण्याचा खटाटोप, चढाओढ, आजकाल कुठलही पांडित्य नसणार्‍या ’न’कलाकारांमधे लागलेली आपण पाहात आहोत. अशा ’कलि’युगांत सुधीर सारखा सर्जक-चैतन्य, उमेद, उत्साह, सकारात्मक स्रोतांनी सळसळणारा ऋजु व्यक्तिमत्वाचा ’तरुण’ बघीतला की वाटतं प्रत्यक कलाक्षेत्रांतलं त्याचं पदार्पण हे कवळ्या लुसलुशींत नवजात अर्भकाइतक, किंवा हिरव्यागार पिंपळपानांवर पडलेल्या, पावसाच्या पहिल्या थेंबाइतकं निरागस निर्मळ प्रामाणिक असतं. हा सगळा माणूस घडलाय...घडवलाय म्हणूया...प्रचंड वाचनानं व्युत्पन्न झालेले, उत्तम कीर्तरतनकार पिताश्री आणि संगीत आणि पारंपरिक रचनांची आयुष्यभराची संस्कार शिदोरी त्याला देणारी मातोश्री या उभयतांनी. हे करतांना त्यांना कदाचित कल्पना नसेल की भावगंधित शब्द-सुरांवर प्रेम करणार्या आणि रंगांच्या मैफलींत हरवून जाणार्‍या असंख्य रसिकांवर त्यांनी केवढे अनंत उपकार करून ठेवले आहेत. शिवाय अनेक कलागुणांनी युक्त,वडील बंधू श्रीकांत मोघे, या सगळ्या वाटचालींत पाठीवर हात ठेवून प्रोत्साहानासाठी आजही उभे आहेत. तुम्हाला कदाचित ठावके नसेल पण अहो ! हा माणूस जेवढी वेदना जास्त तेवढयाच आक्रमकपणे हसत असतो...वेदनेला वाकुल्या दावीत तिची खिल्ली उडविण्या हेतू ? .वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही’...इथं या गृहस्थांना स्वत:लाच खंत नसते आणि इतर कुणाला ते करू देत नाहीत.अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या होणार्‍या ’हस्तीं’च्या गदारोळांत सुधीरनं आपल्या कलाक्षेत्रांतलं आपलं स्थान, वैचारिक परिपक्वता आणि खोली यांच्या बळावर अढळ राखलय...कुठलीही आढ्यता, खोटी प्रतिष्ठा यांचा आधार न घेतां. कांही चित्रांतले गूढरम्य लाल, काळे, भगवे रंग आणि त्यांची अनोखी वीण मला पसिद्ध लेखक ’जीएं’ कुलकर्णींच्या अनेक साहित्य कृतींतल्या, बारीकसारिक निरीक्षणांतून फुलत गेलेल्या, कांहीश्या हुरहुर लावणार्‍या वातावरणाची आठवण करून देतांत, अगदी रंगांच्याअनवट खेळासकट... तशीच माणदेशी वास्तवाशी जवळीक साधणारी चारकोल किंवा कृष्ण-धवल पेन्सिल्‌नं रेखाटलेली अचुक त्रिमिती-परिपूर्ण चित्रं...क्या बात है सुधीर...जिओ याऽऽऽर !! मी ना कलाकार, ना समीक्षक, विश्लेषक, वा टीकाकार किंवा लौकिकार्थानं, समझदार रसिक आस्वादक वगैरे.. वगैरे. पण एक ज्येष्ठ कलाकार मित्र ( तो मला मित्र मानतो म्हणून अन्यथा मला तसंसंबोधण्याचा अधिकार नाही).. जे कांही करतोय त्या सगळ्याकडे आवाक्‌ होवून पाःआणरा आणि त्याच्या आवाक्याचा अचंबा मनांत ओळख झाल्यापासून साठविणारा, त्याचा एक चाहता. केवळ याच भूमिकेंतून, अशा अनेकांचा प्रतिनिधीम्हणुन हा ’कौतुक प्रपंच’ इथं मांडतो आहे... सुधीरच्या रंगाकृतींच प्रदर्शन, प्ण्यांतील सेनापती बापट रस्त्यावरील, कलाछाया संस्थेच्या नव्या वास्तूंत आयोजोत केलं गेल आहे आज पासून...आणि ते दिनांक १३ मे पर्यंत चालूराहाणार आहे. आपल्या या लाडक्या कलाकाराचा कलावीष्कार अनुभवायला प्रदर्शनाला अवश्य भेट द्यायलाच हवी तुम्ही सर्वांनी... ***** अरुण काकतकर.