Sunday, November 22, 2015

।।भक्तिबोध।। २२-०८-२०१५ ते १९-११-२०१५

।।भक्तिबोध।। दिनांक २२-०८-२०१५ शनिवार साठी. ।। दास-वाणी ।। करंटयाचे करंट लक्षण । समजोन जाती विचक्षण । भल्यांचे उत्तम लक्षण । करंटयास कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/१७ नशीबात असून भोगण्याची, योग्य विनिमयाची जाण नाही तो करंटा. अशा मूर्खांची आततायी वागणूक शाहाण्या बुद्धिवान लोकाना चटकन समजते. परंतु उत्तमपुरूषांचे मोठेपण मात्र करंटयांच्या लक्षात येण्याची शक्यताच नाही. गुणग्राहकतेचा अभाव म्हणजे करंटा. ********** कुणी पारधी शोधित असता अन्न । मृगमुद्रा समजुनी सोडिला बाण । तळव्यास लागोनि युगंधर कृष्ण । गतप्राण झाला ।। ८०४ कोणि वागणुकींत बिभत्स करंटा । विद्वत्ता-लेखन-वक्तृत्वी अचाट मोठा । संसारी जगतांना वेदनांचा वाटा । कोणि कसा जाणावा ।। ८०५ ऐसे बहुत अनुभविल् कवि-लेखक । बोलण्या-वागण्यांत भिन्नता अनेक । कलाविष्कार भोगतांना श्रोता-प्रेक्षक । मनोमनी म्हणे, 'अत्युत्तम !'।। ८०६ कारण सामान्यजन, समोरच्या विद्वानाचं, कलाकाराचं, साहित्यिक-कविचं फक्त बाह्यरूप, जे ऐकता-पाहाता-वाचतांना प्रभाव पाडतं, तेच केवळ जाणत असतांत. पण मनुष्य म्हटल्यावर, जरी तो प्रेषित असला तरी त्याचे पाय अखेरीस मातीचेच असतांत, हेच अंतिम सत्य, नाही कां ? हटयोगी साधू धारिती रक्षा । जळस्पर्शाची अत्यल्प अपेक्षा । तरि 'गतिज्ञान' प्राप्तण्या मोक्षा । देता, जनसामान्य घेतीच ना ?।। ८०७ कुबट कद-सोवळी माजघरांत । ना पसरति त्यांना प्रखर रविकिरणांत । वर्षानुवर्षे तैसीच धारित । कवटाळिती पवित्र 'वेदांग' ।। ८०८ मुद्राप्राप्त्यार्थ सर्व क्षम्य । अखेरिस उदरभरण हेचि गम्य । स्वच्छता, घृणेंत नसता साम्य । पंक्तींत एका बैसती ।। ८०९ ऐशाना कोणता अंकुश । भुकेला अक्षम घालण्या पाश । यजमानाच्या भावनेचा सर्वनाश । जाहला जरी ।। ८१० प्रतिमा अभेद्य मनांत । संस्कार, शिकवण धनन्यांतुन भिनवितं । चालली,चाललो, चालेन वाट । चालेल श्वास जोवरी ।। ८११ नाकांत शेंबूड मेकडे । त्यांतूनि डोकावती उंट, घोडे । मुद्रेवर भाव वेडेवाकुडे । वाणींत प्रगल्भता, असामान्य ।। ८१२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २४-०८-२०१५ सोमवार साठी. तर्क-बुध्दीचा मगजांत पसारा । प्रतिभेचा स्रोत तेथेच खरा । घेणे नसते कांही शरीरा । तरी स्वास्थ्य राखणे हितकर ।। ८१३ ओंगळ आणि अष्टवक्र । कुबड मोठे पाठीवर । परंतु प्रगल्भ विचार । विचरती भक्तांसाठी ।। ८१४ कोणी अखंड घामेजला । ऊष्णता, पित्तदोषांनी व्याधलेला । पीतदंत, मुखरस गाळित बसला । तरि तर्कशुध्दता अबाधित ।। ८१५ विद्वत्तेला कशाचेच कांही देणे घेणे नसते. शारीर बाह्यांग आणि अंतरंग यांचा परस्परांशी कांही संबंध असतेच असे नाही. सौंदर्यगर्भीं विकृती आणि कुरुपांतरी सुसंस्कार, सुसंस्कती यांचा मेळ अनेकवेळा, अनेकांठाई अनुभवायला येतो. आजूबाजूस आप्तांचा मेळा । तरचं मिळतो मनाय विरंगुळा । विशेषत: मावळतीच्या वेळा । करितो एकांडेपणा खिन्न ।। ८१६ संध्येचा येथे तेजोविलय । अन्यठिकाणी भास्कर उदय । दोन्ही घडते एकचि वेळ । परिणाम अस्तोदयस्थळी ।। ८१७ सांजवातीची वेळ, हुरहुरती संधिकाल असांच द्विधा मनस्थितीची अनुभव देतो. निरांजनास मिळते तूप । दरवळतो आसमंती धूप । कराग्री लक्ष्मीचे रूप । तिकडे मावळती पलिकडे ।। ८१८ पार्थीवास मिळते तिरडी । नवजात करते रडारडी । दु:खानंदाश्रूंच्या लडी । एकाच विश्वांत ।। ८१९ कोठे मोटेवर ललकारी । पर्जन्या अभावी कोठे हाल भारी । म्हणुनि कां त्यागून संसारी । जाती जनलोकं ? ।। ८२० भिववति जरि संध्याछाया । मावळतीली सुवर्णमाया । आश्वासक उद्याचा पाया । रंगत मिसळती तमगर्भी ।। ८२१ भय कधीच संपत नाही । जगण्याची धरून बाही । क़ायम, सर्वदा ठाईठाई । 'पळ' म्हणते, 'थांबू नको ।। ८२२ अंगणांत एखादा तरी जीव । असावा ! मूकप्राणी मैत्रीवैभव । श्वान अथवा जित्राप गोठ्याचा ठाव । घेता, डोळ्यांत दिसे कृतज्ञता ।। ८२३ कष्टकऱ्यांसि निद्रोत्तरी जाग । पुनर्जन्माचाचि सद्यकालीन भाग । चिंतांची चितागर्भांतली आग । शेजसरणावर त्यास जाळितसे ।। ८२४ आनंद मनसोक्त लुटता ना ? तशाच कधीतरी भेटती यातना । नाण्याचा दोन बाजूंना । मुद्रा एकचि असते कां ?।। ८२५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २५-०८-२०१५ मंगळवार साठी. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । कारे भुललासी वरलिया रंगा ? ।।' -संत मांदियाळींतल्या, कटु-गोड अनुभवांनी प्रेरित होत, आपल्यासारखी ठेच पुढे येणाऱ्यास लागू नये, या सदहेतूनं, मराठी मातींतल्या प्रत्येक संतांनं अभंग, ओव्या सांगीतल्या, त्या पैकी हे प्रसिध्द चरण संत चोखोबांचे... मुद्रांही खेळते खेळ फसवा । प्रदर्शनात गनिमी कावा । अंतरांतल्या खऱ्या भावा । दर्शविते कां ?।। ८२६ 'गोगलगाय नि पोटांत पाय' ही अशीच एकम्हणं, वर उधृत केलेल्या चरणाची बहीण पण सावत्र, वाटावी अशी. कारण अभंगांत, ' विकृत, कुरुपाआड सत्प्रवृत्तीदर्शनाची श्यक्यता, हमी, चोखोबा देतांत, तर म्हण ' म्हणते' की चांगुलपणाचा आव आणि मागे काव्याची कावकाव.. म्हणजे 'नांव सोनूबाई नि हाती 'कांटेरी' कथलाचा वाळा' नाही कां ? असो... या सर्व, लोककल्याणार्थ जनजागृती करणाऱ्या संतांसारखेच असतांत संशोधक. आपल्या कामांत व्यग्र राहात, एकाग्रपणे संशोधन करतांना, मूकपणे कुठलीही टिमकी न वाजविता, गाजावाजा न करिता, संशोधनोत्तर निष्कर्षांची, कठोर वैज्ञानिक निकष, कसोट्यांनी सिध्दता केल्यावर, ते अवलंबांत आणण्यासाठी त्यांचं लोकार्पण करतांत.. अथांग, अगम्य अनेकविध कृती । आव्हाना स्वीकारिते संशोधक वृत्ती । उलगडून कार्यकारण, उत्तरे मांडिती । जनकल्याणार्थ ।। ८२७ संतपण यापरत वेगळं काय असतं ? भाबड्या भोळ्या जनतेप्रती, अतीव कणवेनं, घरांतल्या अनुभवी ज्येष्ठा प्रमाणे, माया, ममता, वात्सल्य बरसंत राहाणं म्हणजेच संतत्व नव्हे काय ?... सुरकुतल्या, सावरीच्या तळव्यांत । आजी पणजी कुरवाळिते हांत । श्रावणसरी बरसतांत अंतरात । थकव्याची जागा घेई तकवा ।। ८२८ 'आलास बाळा ?' शब्द दोन ? । थरथरत्या काळजीची जाण । दिसभर काळजांत राखून । ठेवलेली, मुकपणे ।। ८२९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-०८-२०१५ बुधवार साठी. ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणे नव्हे साधन । दुश्चीतपणे न घडे भजन । दुश्चीतपणे नव्हें ज्ञान । साधकासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/२२ एकाग्रता हा चित्ताचा गुण. दुश्चीत म्हणजे मन विचलित होणे. साधनेला बसला पण मनाने भरकटला. परमेश्वराचे भजन सुरू केले पण मनात भलतेच भजन सुरू. अशा साधकाला आत्मज्ञान होण्याची शक्यता सुध्दा नाही. ज्ञानदशक, दुश्चीतनिरुपण समास. ************* कुठल्याही कर्मांत, कामांची आवड, निष्ठा, एकाग्रता जोवर प्रतिबिंबित होत नाही तोवर कार्योत्तरी, अपेक्षित फळ मिळत नाही. साधक ही व्याख्या सर्वच कर्मयोग्यांना आपोआपच लागू झाली पाहिजे. कारण जे साधायचय, ते आप्त स्वकीयांनी युक्त कुटुंबासाठी असो वा समाजासाठी वा वैश्विक कुटुंबासाठी, कुणासाठीही असो, साधन म्हणजे कार्यप्रवणता, आणि साधक म्हणजे व्यक्तीच ना अखेरीस ? एकाग्रता कल्पनेचा चाप । कल्पना देई अरूपासि रूप । साधनोत्तरी कल्पितास धूप-दीप । दावावा, 'भातुकलीं'तला ।। ८३० ज्याने कल्पिले त्यत्तीस कोटी देव । म्हणे कपिलागर्भी घेतला ठाव । देवोनि प्रत्येकी एकेक नाव । भयकंपित केले भाबडे ।। ८३१ कल्पनेतचि राहुद्या देव । सगुणरूप साकारणे असंभव । शोधितो, त्यासि, 'थांबव' । सांगा, 'वृथा वेळ दवडू नको ।। ८३२ चित्र, आकारांचे सजीवन । नाही भरू शकत त्यांत प्राण । म्हणोनि करिती प्रतिष्ठापन । पुरोहित, घालण्या समजूत ।। ८३३ उपचार कां हा भीतीवरी ?। कां नसावा विश्वास कर्मावरी ?। यशाचे सुवर्ण झळाळता मुद्रेवरी । 'हा तर देव' म्हणतील ।। ८३४ निसर्गरम्य शांतिस्थळे । दृष्टिक्षेपांत निर्मळजळे । अन् त्यांत विविधरंगी कमळे । बहुअसती ।। ८३५ परंतू यासाठी लागती मुद्रा । मी निष्कांचन, दळभद्रा । करण्या श्वासावर लक्ष केंद्रा । संधी कैची ?।। ८३६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २७-०८-२०१५ गुरुवार साठी. ।। दास-वाणी ।। न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२२ सूर्यदेव दिसेनासे झाल्यावर अवघ्या पृथ्वीतलावर अंधार दाटलेला राहातो, त्याचप्रमाणे ज्या क्षणी वाचन, चिंतन, मनन, निदिध्यासन थांबते त्याच क्षणी ज्ञानाची अवस्था नष्ट होऊन अज्ञानाचा अंधक्कार साधकाच्या जीवनात भरून येतो, टिकून राहातो. श्रवण सतत केले पाहिजे हा संदेश समर्थ श्रवणनिरूपण समासात देतात. ************** निरक्षरतेचा अंध:कार नष्ट झाल्यावर साक्षरतेपाठोपाठ सुसंस्कारांच्या निवडीचा मार्ग प्रदीप्त होतो. आणि मग चहूकडे तळपत राहाणारा तेजोनिधी कधीच तमगामी होत नाही... जर लयास भास्कर गेला । ना परतुन उदयास कधिही आला । जीवमात्रांचे कळिकाळा । निमंत्रण स्वाभाविक ।। ८३७ मग विसरा योग-भोग । अंत्योदयास समजा जाग । संजीवन समाधीचा अवघे जग । घेईल अनुभव आपोआप ।। ८३८ ज्ञान-कर्मेंद्रिये, श्वसनक्रिया । जाण, विचार, तर्क-बुध्दी विलया । जातील ! अगम्य अवकाश माया । राहील ? कोण जाणे !।। ८३९ सर्वसामान्य वाचन, चिंतन, श्रवण । जपजाप्य, उपासना, धारणे ध्यानं । शब्द फोल, अस्तित्व अर्थहीन । होतील अनायसा ।। ८४० तैसे पाहता पटेल मनोमन । हरेक प्राणिमात्र सज्जन । 'संत'पदाचे नामाभिधान । धारिण्या सुयोग्यची ।। ८४१ सर्वाठाई ठेवतो सद्भाव । त्यांस ना कोणाशी वैरभाव । कृति करी,जाणून कार्यकारणभाव । 'सम'संत जसा ।। ८४२ जसा सूर्यास्तानंतर अंधार । डोळसासही भासे सर्व निराधार । तडफतील अवघे जीवमात्र । जैसा जलचर जलधिविना ।। ८४३ सुखान्ती, कां ठावके, वाटते । भय अवचित मनी दाटते । अंधश्रध्द अंत:करण पेटून उठते । बोलण्या नवस सायास ।। ८४४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २८-०८-२०१५ शुक्रवार साठी. परंतु हे सामान्य सत्य । जलधीसही भरती-ओहोटी नित्य । तम-तेजाचा लपंडावांतल् तथ्य । निसर्ग निर्मित कल्याणकारी ।। ८४५ 'देव' स्वत:च भेदरलेला । बुध्द, ख्रिस्त, महादेव वा अल्ला । 'जर झाला अतिरेकी हल्ला' । म्हणती, 'लपावे कोठे ?'।। ८४६ राहावे सुखरूप भक्तनिवासी । म्हणजेच खोल त्याच्या मानसी । सापडणे कठिण 'मारेकऱ्यासी' । म्हणती, एकमताने ।। ८४७ पण हौस भक्त, महंतांस । ओरबाडिती स्वमानस । काढून 'थरथर कांपणाऱ्यास' । भर चौकांत ठेविती मधोमध ।। ८४८ मग रंगते 'रक्षणस्पर्धा' । भाबड्यांचा जीव अर्धाअर्धा । हिरव्या-भगव्या-निळ्यांची त्रेधा । वाचविण्या अनुयायी ।। ८४९ कारण भक्ताविणा कसला 'देव' । कसली ध्यान धारणा, श्रध्दाभाव । संपदाप्राप्तिप्रती सिध्द नाव । प्रवाही कसे बडवे ढकलतील ?।। ८५० घुमानला चालले साहित्यिक । ध्वनिवर्धक घुमवायला सारे उत्सुक । जत्रेस जाणारे श्रोते-प्रेक्षक । अनुदानपात्र ।। ८५१ हट्टी बाळास माय दाटे । 'थांब तुला बुवाकडे देते' । धिटुकल् म्हणे, 'दाव कोठे ?। ठोसे मारेन ढिश्यांव ढिश्यांव'।। ८५२ तैसेचि झाले माझे आहे । भय, धाक मला दावू पाहे । 'देवा' जवळी बांधुन दावे । जखडू दास पाहातांती ।। ८५३ परंतू जोवरी माझे प्रष्ण । न करू पावत त्यांचे शमन । मी विचारतचि राहेन । प्रतीक्षेंत उत्तराच्या ।। ८५४ उपदेश असा करावा । निरुपणी ज्याचा उलगडा व्हावा । तर्कशुध्द, सरळ-सोपा असावा । सकळांसी ।। ८५५ रजस्वला म्हणे ओवळी । जरि नुकतीच उमलेलि कळी । टाळालं जर तिला सद्यकाळी । संहार-दुर्गा पहाल ।। ८५६ तुमच्या आठवा आया, बहिणी । 'बाजूस' बसविले त्यांनाही कोणी । दिलेली प्रजोत्पनार्थ लेणी । दुर्लक्षुनी ! हेटाळिले ।। ८५७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-०८-२०१५ शनिवार साठी. जगण्यांत पडता कोडे । कशास अभाव'देवास साकडे ?। निसर्गनियमांचे नियमित धडे । आचराल तर उलगडेल ।। ८५८ ५, ६ महिन्यांपूर्वी, आपल्या शेजारील देशांत एक भीषण नरसंहार करविला अतिरेक्यांनी.. कुणाचातरी सूड उगवण्यासाठी, कथित दुष्कृत्यांची परतफेड करण्यासाठी निरागस, निष्पाप बालक नाहक मारण्यांत आली... बालके निरागस भोळी । शतकोत्तर पंचदश गेली । म्हणजे 'गोळ्या' खाउन मेली । अतिरेक्यांच्या ।। ८५९ कुणि आला कां हो प्रेषित । वाचविण्या त्यांना धावत ?। संकट कोण्या सूडाने प्रेरित । होते अनाठाई ?।। ८६० कच्या बच्या तान्ह्यांना । भींतीवरून खाली फेकतांना । कुठल्या श्रध्देचा म्हणा । माय-बापांना पाजिला ?।। ८६१ कुणांत रंगला सांगा 'देव' । रासक्रिडा की सारिपाटाचा डाव । सीतेसाठी सुवर्णमृगापाठी धाव । कां त्या दुष्टाने घेतली ।। ८६२ कां नाही उपटत समाजाचे कान ?। कां देत नाही जन्मदात्यांना भान ?। कां न राखितो सहृदयतेचा मान ?। म्हणे संकटविमोचक !।। ८६३ आतां येतिल चैत्रजत्रा । अंधश्रध्दांना नशेची मात्रा । चेंगरुनि, चिरडुनी शरीरे, गात्रा । विकलांग होतिल भाबडे ।। ८६४ काय साधता बाया-बापड्यांहो ?। सत्कर्माचा मार्ग नाही गड्याहाे । संतांनी फोडला टाहो । टाळण्या, आयुष्य वेचिले ।। ८६५ एकतरी हरेकाने अनुभवावी । आणि प्रचीती तिची घ्यावी । येथेतर प्रसवली ओवी । प्रत्यक्षावुभूतिगर्भांतुनी ।। ८६६ गाडगे आतांशा लागे तडकूं । तीव्रता झळीची कैसी रोकू ?। सावलींस्तव कैसे झाकू ?। जिणे जोवरी भोगांच ।। ८६७ काडीकाडी जमवुनि घरटे । द्विजद्वय वळचणीस रचिते । पंख फुटता झेप घेते । चोचींत ज्याच्या भरविले ।। ८६८ वळून परत पाहत नाही । 'अवकाश' शोधण्याची घाई । पंखांत बळ भरत राही । दुर्दम आशा, कुतुहल ।। ८६९ विळा-हातोडा, लेखणी, कुंचला । कुऱ्हाड, फावड़े, खुरपणी जोडीला । हल, उपलण्या; सरींतुनि फिरवायला । कर्मयोग्याची श्रध्येये ।। ८७० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३१-०८-२०१५ सोमवार साठी. घाव टाकीचे पाळि-पाट्यावर । चालतील न पडले जर ?। जातील भरडिले दाणे, ज्वार ?। भाकरी पडेल चुलीवर ?।। ८७१ शरीराची आणि मनाची जडण घडण सुरू असतांना, संवेदनाशीलतेबरोबरच, कणखरपणा हा अविभाज्य भाग असलाच पाहिजे. अन्यथा, दुर्धर, कठिण प्रसंगांत प्रतिकारशक्ती एकवटणं कसं साधेल ? कांही संशोधकांनी, कांही दिवसांपूर्वी तेजोनिधि भास्कराच्या परिवलयांत अखंड सुरू असलेल्या ज्वलनप्रक्रियेचा नाद म्हणजेच वैश्विक आदिनाद 'ॐ' हे सिध्द करायचा प्रयास केला, अगदी अत्याधुनिक ध्वनितरंगमापकांचं साहाय्य घेत.. तुम्ही वाचलंच असेल... पावकोक्ति, सूर्यध्वनिमुद्रणां । घेवोनि विविध उपकरणां। सरसावले तंत्रज्ञ, वैज्ञानिक संशोधना । 'ॐ' नादसम ! सिध्द केले ।। ८७२ प्रभावित, ऐशा वैज्ञानिक सत्याने । होतिल तथाकथित 'साधक' ? कोणजाणे ?। परंतु धर्म-कर्मठांनी गांशा गुंढाळणे । आंता श्रेयस्कर ।। ८७३ सुंदर घरे, इमले, माड्या । मार्गावर सजविलेल्या गाड्या । आटलेल्या शुष्क बावड्या । संपदेची मोट, वस्तीवर निष्फळ ।। ८७४ झोपड्यांत वा वाऱ्यावर । कच्या-बच्यापोटी भूक अनावर । फोकाने मारे नागव्या कुल्यावर । 'भीक माग, रांडच्या' म्हणत माय ।। ८७५ ऐशा दारिद्रय-सदनी । विपदा, वंचना जेथे राज्ञी । इटुकल्या पांपणीतले पाणी । टिपायला येतो 'तो' ?।। ८७६ वार्धक्याने आधीचं वाकलेला । जगण्याच्या ओझ्याने अर्धमेला । सांगण्या 'गति-मोक्ष', जो गेला । निर्भत्सना त्याची निश्चित ।। ८७७ घासा पेक्षा घोटभर ठर्रा । निश्चित देइल निश्चिंत निद्रा । म्हणुनी तळव्यांवर मुद्रा । पडताचि, धावे गुत्त्याकडे ।। ८७८ ही सर्व खळबळ, अस्वस्थता व्यक्त करायला मला उदंड शब्दसंपदा, माझ्यावरच्या अक्षरसाहित्य-संस्कारांतून दृक्गोचर होवो.. इतुकेचि... अंतरांतला माझ्या वडवानळ । शब्दांस देवो निर्दालनबळ । जादूटोणा, करणी यांचं जंजाळ। उचलुनि फेकण्या मिळो शक्ती ।। ८७९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१-०९-२०१५ मंगळवार साठी. ।। दास-वाणी ।। नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवांचें पूजन करावें । नाना उपचारी आर्चावें । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/१७ परमेश्वराचे वास्तव्य, संतांचे जन्मगाव, कार्यक्षेत्र, समाधीस्थल ही तीर्थक्षेत्रे मानावीत. त्या ठिकाणी अध्यात्मिक स्पंदने तीव्र असतात. वेगवेगळया तीर्थक्षेत्रांच्या वारंवार यात्रा कराव्या.तेथील गैरसोयींचा पाढा न वाचता अत्यंत श्रद्धेने त्या दैवताची मनोभावे पूजा करावी. पत्र, पुष्प, फल, तांबुल, वस्त्रे इ अर्पून मुख्य परमेश्वर एकच सर्वव्यापी आहे या भावनेने ते ते दैवत पुजावे. ही खरी अर्चनभक्ती. *********** उद्योगतीर्थस्थळी जावे । कर्मकारी हातांचे पूजन करावे । कल्याणार्थी उपकारक व्हावे । ऐसे करावे कांही ।। ८८० जेथे हात राबती सदैव । सृजनबुध्दिजन्य प्रकल्प वैभव । मनुष्यकल्याणार्थ मानव । जिथे अखंड कृतिशील ।। ८८१ देश-प्रदेशांत ऐसी ऊर्जास्थले । उभी तंत्रविज्ञानबले । सिंचन करण्या स्वेदगंगा उचंबळे । उत्पादनसमृध्दीहेतु ।। ८८२ 'तीर्थे', 'देवालये' उपासना-सदने । जरी उत्तम वास्तुशास्त्राचे नमुने । दलालाहाती, घृणास्पद भ्रष्टाचारचे खेळणे । कर्मकांडकऱ्यांनी सोपविली ।। ८८३ गुलाल, खण-लुगडी, श्रीफले । गाभाऱ्यांत श्रध्दापूर्वक वाहिलेले । सस्त्यांत ठेले परिसरांतले । प्रदर्शिती परत भाविकां विकण्यासी ।। ८८४ समचरण 'इटु' बरवा । वारकऱ्यास हवा हवा । गर्दी, गदारोळांत श्वास घेण्या हवा । गर्भगृही अभावानेचि ।। ८८५ 'लावणी', सौंदर्य-शृंगार-नृत्य साज । लावणी-हेतु, अंधश्रध्दा निर्मूलन बीज । प्रेक्षक-श्रोत्यांची वानवेचे काज । हेचि असावे ।। ८८६ करमणूक-मनोरंजन गोडवा । त्यांत कडु घोट कसा रुचा-पचावा । उपस्थित जे त्यांना द्यावा तकवा । ऐसा आमुचा उद्देश।। ८८७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०२-०९-२०१५ बुधवार साठी. 'अरे देवा !' म्हणता शेजारी । येउनी बसतो कां चतुर्भुज हरी ?। वेदना, विपदांना सहज वारी । चमत्कारें ! अनुभवलेंत ?।। ८८८ जोडींत जावे स्नेही, सुहृद । एकमेकांच्या जाणिवांना दाद । नकळत, शब्देविण संवाद । अलवार नजर, स्पर्शे मग घडतो ।। ८९० एकां डोळिया जर आले पाणी । दुसऱ्याची दहिवरते पांपणी । इतुके वसलेले मनोमनी । कोणि असावे सोबती ।। ८९१ कुणि कृष्ण, कुणि बालमित्र सुदामा । संसारी, गृहिणी-सखि-सचिव-भामा । जगतांना सुख-दु:खादी अटळ नेमिक्रमा । क्रमण्या जे धीर देतील ।। ८९२ नुसता बोलून 'त्या'चा धावा । 'रामा, रघुनंदना ! सोडव केशवा..!। घडणार नाही, ध्यानांत ठेवा । तराल भवसागरी कर्मयोगे ।। ८९३ वेदनागर्भिचे जाणोनि वर्म । कपिल जो शमनार्थ कर्म । 'तो पाहा बदलितो धर्म' । भुभु:कारिती वांनरे ।। ८९४ वारंवार ऐसी विधाने । थोर(?), मोठे(?) किंकारणे । बरळत राहाणे सातत्याने । अशोभनीय अनुभवसिध्द ज्येष्ठास ।। ८९५ धर्मांतर ? खोटे नाणे । भिंतावर चित्र वा घराचा रंग बदलिणे । मनांतील श्रध्देयांची स्थाने । बदलतील ? सांगा ।। ८९६ माणुसकी, धर्म कणखरं । जगण्या-मरण्यांतले अंतर । धावतांना अखंड बरोबर । जाणा, एकमात्र राहीलं ।। ८९७ जीवमात्र कल्याणकारणे । धर्म अवतरला ! अभ्यासला कोणे ?। पुष्ट्यार्थ कमकुवत करित राहाणे । विधाने ! ते जाणा अमानुषधर्मी ।। ८९८ स्वेदगंगा पवित्र, क्रियाशील, निर्मळ, । ज्ञान-कर्मेंद्रिये कार्यतरुवर शीतळ। पर्ण-फुलांमध्ये स्वादीष्ट फळ । तटावरी लगडती दुतर्फा ।। ८९९ कधीकधी मनांत येते । हे ओविरूप जे अवतरते । उगम पावोनि प्रवाहित होते । भावनेपोटी कोणत्या ?।। ९०० नवशतकी ओव्यांतला शब्दप्रपात । आशयघनतेने होतो चकित । योगदान माझे या कार्यांत । कारण आकळेना ।। ९०१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०३-०९-२०१५ गुरुवार साठी अंतरांतला बेलगामी फुफाटा । ज्वालामुखी स्फोटक मोठा । जगण्यात साचलेला साठा । होवू पाहे उत्सर्जितं ।। ९०१ विविध ठिकाणी, विविध वयांत, बालपणी, तरुणपणी, पोक्तपणी, वृध्दावस्थेंत प्रवेश केल्यावर, विविध वातावरणांत, घेतलेले अनंत कड़ी-गोड अनुभव, सहकार, सत्कार, निंदा, हेटाळणी.. मनांत रिचवत, पचवत या दिवसापर्यंत वाटचाल केली. त्याचे पडसाद आतां छायाचित्रांची दृश्यमालिका सरसर मनांतून सरकत जावी त्याप्रमाणे उचंबळून अंतराच्या किनाऱ्यावर आदळताहेंत, गाजत गाजत.. त्यांचून निर्माण होणाऱ्या व्यथा-वेदनाच, निवारणार्थ देतील हाळी नि करतील कर्मप्रवृत्त... चिंतांचि देइल कार्यप्रवणता । सुख ठेवेल बसवुनी अन्यथा । हरेक सुदाम्यास न देतो हाता । वल्हवाया नौका हरी ।। ९०२ सुख ! आळसाला निमंत्रण । सुख ! माजवृध्दीचे कारण । सुख ! जरी सर्वसामान्यांचे स्वप्न । प्राप्य सहजी न होतसे ।। ९०३ दासे चेतविला वन्ही । सजग केले मनोमनी । मुक्त करण्या पिढी तान्ही । अंधश्रध्देच्या बेडींतुनी ।। ९०४ द्विधा मन:स्थिती रामाची । करावी हत्या सुवर्णमृगाची ?। की दैत्यांच्य अनन्वित अत्याचारांची । अखेरीस अस्तुरीच्छा ठरली श्रेष्ठ ।। ९०५ माय-तांत, अस्तुरी घरी । नंतर लष्करच्या भाकरी । मनोमन जाणिले अंतरी । आदर्श रामाने सुध्दा ।। ९०६ ऐशा रामाच्या पावलावरी । ठेवून पाउल जो वाटचाल करी । तोच 'आदर्श' ठरेल संसारी । निश्चितपणे ।। ९०७ त्याने धारिले चाप-बाण । हेतु ? भयग्रस्त उध्दरण । परंतु निराकरण करून । इच्छा-अपेक्षांचे आप्तांच्या ।। ९०८ आज धड़ाडा पेटवू हुताशन । पुरेपूर देऊन त्याचे क्षुधाशमन । अनिष्ट प्रथा-प्रवृत्ती अंधश्रध्दांचे हवन । मनोभावे ।। ९०९ सर्वांस प्रवृत्त करण्या शुभमुहूर्त ठरावा । भाकडांच्या जोखडांची हवा । देऊन भडाग्नी संताषवावा । जाळापोळाया कुकर्म ।। ९१० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-०९-२०१५ शुक्रवार साठी ।। दास-वाणी ।। माझे शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०२/२९ आपण जेव्हा माझ्या शरिराला अमुक अमुक होतय असे म्हणतो तेव्हा जो म्हणणारा असतो 'तो' शरिरापेक्षा कुणीतरी वेगऴाच असतो. माझे मन असे जेव्हा आपण समजतो तेव्हा असे समजणारा तो मनापेक्षा कुणीतरी वेगळाच असणार. हा वेगळे अस्तित्व दाखवणारा माझ्यातला 'मी' म्हणजे आत्मा. तो शरीरही नाही आणि मनही नाही. देवशोधन दशक, ब्रह्मपावननिरूपण समास. ************** शरीर ! रक्त-मांस-अस्थि-कूर्चादि गोळा । शरीर ! घरटे, राखण्या सहज भाव भोळा । शरीर ! जोवरी श्वास घेते मोकळा । नंतर मिळुन जाई मृदांगी ।। ९११ मन ! जोवरी शारीर अस्तित्व । मन ! जाणते आकांक्षांचे महत्व । मन ! जरी अदृश्य निर्गुणतत्व । सजग, तोवरी सुख-दु:ख ।। ९१२ मी जर जाणतेपणी माझ्या शरीराचे सारे व्यवहार, विकार स्वीकारत असेल तर मी स्वत: नसून दुसरा कोणी असणं कसं श्यक्य आहे ? शरीर, मन-भाव मिळून । साकारते संसारी जनजीवन । मृत्युपश्चात रक्षा होवुन । उडोनि जाई अवकाशी ।। ९१३ शरीर ! मनाविणा प्रेत । शरीर ! मनाविणा जाणरहित । शरीर ! मनाविणा अप्रवृत्त । म्हणोनि राखा 'मन' मनाचे ।। ९१४ मन ! शरीरास करिते कार्यप्रवण । मन ! शरीरास देते त्राण । मन ! शरीरास ठेवते तवान । कर्मयोग्याच्या ।। ९१५ सुख ! जखमेवर फुंकर । सुख ! ना आनंदा पारावार । सुख ! निरव शातीचा परिसर । वांछिती सकलजन ।। ९१६ दु:ख ! वेदना अपरंपार ! दु:ख ! उध्वस्त मनाचे घर । दु:ख ! तमगर्भी वावर । शत्रूसहि नको लाभाया ।। ९१७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-०९-२०१५ शनिवार साठी रंग ! शुभ्राचे प्रतिनिधी । रंग ! आनंदाचा निधी । रंग ! नजरेंस सर्वां आधी । घालतसे भुरळ ।। ९१८ रंग ! प्रकटती विविधांगाने । रंग ! वापरा निगुतिने । रंग ! देणगी पेरिलि निसर्गाने । जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ।। ९१९ रंग ! पंचमहाभूतांचे अंग । रंग ! कधि शश, कधि नाग । रंग ! सुशीतळ कधी आग । प्रोत्साहन योगा वा भोगा ।। ९२० होवू नका अस्वस्थ । राहा नेहमी आश्वस्त । मनात बाळगू नका खंत । प्रष्ण विचारणे सोडू नका ।। ९२१ ओरबाडा गरुडाचे पंख । शब्दांत पेरा शेषाचा डंख । कोणी नसतो संत बित । झेप सज्ज हत्यारा ।। ९२२ जिणे न मिळे पुनःपुन्हा । स्वीकारा हरेक आव्हाना । देवकिनंदन जगला कान्हा । सुख-दु:खा सोबती ।। ९२३ मार्ग ! अवघड,कांटेरी वळणावरला । मार्ग । मउ हरळीवर कधि डंवरलेला । मार्ग ! कधी ठेचा खांत क्रमलेला । इप्सितस्थळ गाठण्या ।। ९२४ आज करुया निश्चिंत निर्णय । निश्चित होवू निर्भिड, निर्भय । निराकरण्या, काळ्या करणिचे भय । अंधश्रध्दोपजत ।। ९२५ झुंजुरका जाते भूपाळी गाते । द्विजगणांच्या किलबिलाटे जाग येते । कोवळा कवडसा कौलांतुन भेटे । आनंदकंद भवताली ।। ९२६ तरुवर कोवळी पालवी । नवीन दिवस, आशा नवी । चैत्रगौरी सजण्या-सजविण्या हवी । रंगबिरंगी रानफुले ।। ९२७ भोगले, सरले ते ठेवा अंतरांत । जपून स्मृतींच्या जरतारी बासनांत । उघडुन, न्याहाळण्या वृध्दापकाळांत । एकांडे असतांना ।। ९२८ सरले जेमतेम बालपण । युवावस्थेंत पदार्पण । गीतार्थ सागोनि सकळजन । उध्दरले ।। ९२९ 'संभवामि युगेयुगे' ऐसे । सभोवताली आपुल्या कितिसे ?। प्रखर तर्क-बुध्दि-ज्ञानप्रकाशे । आयुष्ये उजळिली ।। ९३० आपेगांवी फुफाटा, उल्लंघुनी काटेरी पायवाट । गांठिले पैठण, निर्भत्सना ऐकुनी थेट । नेवाश्यास, पैसाच्या स्तंभी टेकुनी पाठ । उक्तिल्या ओव्या नऊसहस्र ।। ९३१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-०९-२०१५ सोमवार साठी अनाथ भावंडे वरकरणी सामान्य । कोणां ना कळली महती अनन्य । 'पोरे संन्याशाची', हेटाळणीचा पर्जन्य । संतत साहिला ।। ९३२ इवली मुक्ता धाकुल्यासाठी । 'मांडे करिते' शब्द ओठी । वन्ही साक्षात आला भेटी । धाकुल्यापाठी कौतुके ।। ९३३ चम्तकार ना, जाणा मथितार्थ । प्रबल इच्छाशक्तीने सार्थ । अपेक्षित फलासहित । कर्मयोग साधतसे ।। ९३४ तोच पाऊस, तोच गारवा । तेच ऊन, अन् तापलेली हवा । निसर्गाच्या विविध भावा । नसे उपायो ।। ९३५ आयुष्य निरामय हेचि धन । चालत नाही दुर्लक्षुन । व्याधिग्रस्त होते जेंव्हा चेतन । असतो झालेला उशीर ।। ९३६ वेळ ,प्रांत: वा सायंकाली । नियोजून करण्या हालचाली । योग अथवा विविध प्रणाली । नित्यनेमे अवलंबाव्या ।। ९३७ ओरपलेंत आयुष्यभर । मुक्त, सुखाचे लेउन पर । थोडे थांबुनि पळभर । वळून मागे पहा जरा ।। ९३८ राहून गेले बरेच कांही । देण्यासारख् असूनही । सवड झाली, किंवा काढली नाही । जाणवेलचि सुरत्यास ।। ९३९ हृदयस्थ सुप्त गहिवर । दृश्यमान देही दहिवर । पाणांवती पापण्यांचे पर । कंठमणी वर-खाली ।। ९४० कृतज्ञ जगतांना असावे नेहमी । सुखकरांच्य स्मरुनी धामी । वारून दु:खाच्या तमी । उजळिला ज्यांनी आनंद ।। ९४१ आनंदाच्या विविध कोटी । परीक्षिता ज्ञानेंद्रियांची कसोटी । दृक्श्रवण, स्पर्श, गंध, रसनेसाठी । स्पर्धा हरघडी ।। ९४२ नांगर ओढी जोडी खिलारी । बीज धारी कृषिवल करी । कृतिशीलांच्या विविध परी । शुभंकर सुप्रभाती ।। ९४३ कंच हिरवा परिसर । खेळ खेळते झुळुक गार । जळभरणा कमनीय नार । अपार दृश्यात्मक ।। ९४४ गवसणी !तरुवर घालू पाहाती अवकाशा । तैसी ठेवा महत्वाकाक्षा । प्राप्तण्या आरोग्य-संपदा, सुयशा । प्रकाशवाटा अटळ ।। ९४५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-०९-२०१५ मंगळवार साठी किरणे विखुरली रानोमाळ । गोवत्स सोडता लुचण्या आंचळ । तैसे तेज, गाठण्या तमतळ । जणु सरसावे ।। ९४६ निसर्ग ! गुरु कालांतींत । निसर्ग ! प्रत्यक्ष नाही शिकवितं । निसर्ग ! जगण्याची रीत । दावी पंचमहाभूती ।। ९४७ गर्व न शिवो माझ्या मना । 'हे ? उपजे कैसे' ठावके ना । सांभाळण्या या 'अ-क्षर' धना । बळ द्यावे, वाचक-श्रोत्यांनी ।। ९४८ आळशी निरुद्योग्या पोटी । वृथा भुकेच्या गाठी । उपाय एक त्यासाठी । ज्ञान-कर्मेंद्रीयां करा कार्यरत ।। ९४९ वाचा, लिहा, अनुभव । वा ज्यावर जडला विशेष जीव । गाणे छानसे त्याच्या स्मृतीस्तव । विसराल भूक आपसुक ।। ९५० समोर इतुकी पसरलेली । पृथा विविध रंगी नटलेली । मनुष्ये, श्वापदे निळाईखाली । बाहती सदैव ओवीला ।। ९५१ सुचलोले हे 'शहाणपण' । वृध्दापकाळ होता दृश्यमान । वाटे टाकावे सांगोन । कृतांतकटकामलध्वजजरा लागता दिसो ।९५२ ज्याला न कळे स्वत:चे भले । त्यास कसे समजावावे नाकळे । ऐशंसाठी कोठोनि आणावे कानपिळे । कोडेचि एक ।। ९५३ घालू पाहता ब्रह्मांडाची घडी । थकाल प्रयत्नांती दोन घडी । वृथा घेउं नका उडी । अ-ज्ञानांत ।। ९५४ म्हणोनि यत्न सोडू नका । विज्ञानास घाला हाका । विश्वकण-शोध प्रयोगासारखा । प्रकल्प राबविती जे ।। ९५५ प्रेमळ, करुण तरि सावध । द्वारी उभ्या श्वानाच्या नजरेचा वेध । रक्षण्या यजमाना प्रतिबध्द । सर्वदा ।। ९५६ सख्या सारिखे हे सोबती । जैसे एकनिष्ठ सेवाव्रती । लळा जिव्हारी इतुका लाविती । दुरावल्यास वेदनाकारी ।। ९५७ निश्चित निरव नि शाॅत । चराचर निद्रिस्त निवांत । निशाचर अज्ञाताची भिंत । लंघू पाहे ।। ९५८ जीव परि अंगणांतला । सावधचित्ते बसलेला । अनाचारावर करण्या हल्ला । मिटलेल्या जरि पांपण्या ।। ९५९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-०९-२०१५ बुधवार साठी चराचरा पलिकडली व्याप्ती !। मोजण्या ठावकी कोणती पट्टी ?। अक्षम सगळ्या तंत्रशक्ती । निर्मिलेल्या मनुष्ये ।। ९६० प्रत्येक क्षणी, दर दिवशी, अहर्निश धडपड चालली आहे संशोधकांची या विश्वाचा, अगणित तारकापुंजातल्या अक्षय सूर्यमालांच्या आणि पर्यायाने आपल्याला ज्ञात विश्वाच्या उद्गमाचा, परिघातील, सीमांचा. धडपड या अर्थानं की आज मांडलेला, सिध्द झाले असे वाटत असलेला निष्कर्ष, उद्या फोल ठरतो आणि मग, ' पुनःश्च हरिॐ'... पण निराश न होता दमून, अपयशाच्या चुकलेल्या पायरीवरून निम्नस्तरावर घसरायला झालं, तरी घाबरून न जाता वैज्ञानिक कार्यमग्न आहेंत घाबरू कुणास ? कशासीठी ? मनांत संमंध भित्यापाठी । ग्रास न पडला भुकेल्या पोटी । तर मात्र जीव कंसनुसा । ९६१ माझे तप, माझी साधना । योगे सुकांती लाभली तना । गर्व धरी ऐसा मना । तो कसला संत ।। ९६२ अखेरीस सगळे वाया । दोन श्वासांमधली माया । जर जरा, वेदना शनवाया । निरूप योगी ।। ९६३ म्हणे आमुचा कुलस्वामी । पंचमहाभूतांच्या अंतर्यामी । संसारी, बाहेरी, धामी, ग्रामी । अनुभव देण्या सज्ज सदा ।। ९६४ पिंडी वसते भू-पातळीतळी । परंतु ब्रह्मांडी जळी- स्थळी । उपकारक वा विक्राळी । निसर्गरूपे अवतरतो ।। ९६५ अनाकलनीय कां लिहावे ?। अविचारे कां वागावे ?। अविरत बरसण्या स्वप्नावे । आनंदघन ।। ९६७ अविवेके करिती हिंसा । अतर्क्य अघोरी पेशा । आवळती नरड्याभोवती फासा । स्वत:च्या नकळत ।। ९६८ उत्तरदायित्वापासून मुक्ती । शोधू पाहील कोणी व्यक्ती । लौकिकाथें ती दुष्प्रवृत्ती । मानितो समाज ।। ९६९ अपप्रवृत्तींना विन्मुख होणे । हीच सत्कर्म प्रारंभ लक्षणे । सर्वदा लोककल्याणकारणे । होति साहाय्यभूत ।। ९७० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १०-०९-२०१५ गुरुवार साठी ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणे नव्हे साधन । दुश्चीतपणे न घडे भजन । दुश्चीतपणे नव्हें ज्ञान । साधकासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/२२ एकाग्रता हा चित्ताचा गुण. दुश्चीत म्हणजे मन विचलित होणे. साधनेला बसला पण मनाने भरकटला. परमेश्वराचे भजन सुरू केले पण मनात भलतेच भजन सुरू. अशा साधकाला आत्मज्ञान होण्याची शक्यता सुध्दा नाही. ज्ञानदशक, दुश्चीतनिरुपण समास. ********* मन थाऱ्यावर न राहू पाहे । मन एकाग्रता शोधत आहे । मन अस्वस्थ उचंबळुन वाहे । प्रयत्नांतिही ।। ९७१ ऐसी अवस्था क्लेशदायी । टाळावी कोणत्या उपायो?। शून्य विचार अंतर्मनाठाई । सांसारिकासि अशक्य ।। ९७२ *********** ।। दास-वाणी ।। आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावे अनन्य । अनन्य म्हणिजे नाही अन्य । आपण कैचा तेथें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/१७ हा जो परमात्मा आहे तो सत्व, रज, तम या तीनही गुणांच्या पलीकडे आहे. त्याला रंग रूप आकार नसल्याने तो निर्गुण आहे.एक विशिष्ट असा कोणताही गुण नसल्याने तो बहुगुण मानावा. ते आत्मतत्व अत्यंत शुद्ध आहे. त्या निर्गुणाशी साधकाला अनन्यभावाने एकरूप व्हायचय. अनन्य म्हणजे त्या एका ईश्वराशिवाय तीन्ही लोकांत दुस-या कोणत्याही वस्तूला अस्तित्वच नाही. अशा भावनेने एकरूप झाल्यास 'मी साधक ' असे वेगळेपण शिल्लक कसे राहील ? आत्मनिवेदन नववी भक्ती. ************* बहुगुणी, निर्गुणि कैसा समान ? की जैसे रंग शुभ्राचे प्रतिमान ? विकारोत्कटी निर्विकार । प्रवृत्ति तैसी ?।। ९७३ 'नाही' नाही म्हणजे 'आहे'। नकार नकारा छेदू पाहे । तम जैसा तमास भेदू पाहे । अनंत, अगम्य अवकाशी ।। ९७४ अनन्य केवळ अवकाश । शोधू पाहता न पडे दृष्टीस । 'दिसले' म्हणजे केवळ भास । प्रगत तंत्रासही ।। ९७५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ११-०९-२०१५ शुक्रवार साठी ।। दास-वाणी ।। माझे शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०२/२९ आपण जेव्हा माझ्या शरिराला अमुक अमुक होतय असे म्हणतो तेव्हा जो म्हणणारा असतो 'तो' शरिरापेक्षा कुणीतरी वेगऴाच असतो. माझे मन असे जेव्हा आपण समजतो तेव्हा असे समजणारा तो मनापेक्षा कुणीतरी वेगळाच असणार. हा वेगळे अस्तित्व दाखवणारा माझ्यातला 'मी' म्हणजे आत्मा. तो शरीरही नाही आणि मनही नाही. देवशोधन दशक, ब्रह्मपावननिरूपण समास. *************** शारीर जाणिवांचा वेध । वेदना, निराशा वा आनंद । जोवरि मन तर्क प्रबुध्द । घेतची राही ।। ९७६ 'आंत' ? माझे हृदयांत ?। 'आंत' ? माझे ओठ, पोटादी अवयवांत ?। 'आंत' ? माझे ज्ञानेंद्रियांत ?। अदृश्य 'तो' जाणावा कैसा ?।।९७७ की अजाणवे तो आत्मा ?। की निरूपे दृश्य तो आत्मा ?। की आठवाने विचळे तो आत्मा ?। अनुत्तरित प्रष्ण अनेक ।। ९७८ *************** ।। दास-वाणी ।। शरणागतांची वाहे चिंता । तो येक सद् गुरू दाता । जैसें बाळक वाढवी माता । नाना येत्ने करूनी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/४० ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला जन्मल्यापासून मोठा कर्तृत्ववान होईपर्यंत नाना खस्ता खाऊन साथ देते त्याचप्रमाणे संपूर्ण शरण आलेल्या साधकांची सद् गुरू माउली चिंता करत असते, मोक्षाचा मार्ग दाखवून शेवटपर्यंत सोबत करते. माउली आणि सद् गुरू ची माया, उत्कट प्रेम एकाच उच्च पातळीवर असते. ***************** शरणागत एकलव्य होता । परंतु द्रोण झाला क्षमादाता ?। गुरुने दक्षिणा मागता । शरणागतें अर्पिली तत्क्षणी ।। ९८९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १२-०९-२०१५ शनिवार साठी साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान । नाना वाद्ये सिकविती जन । ते हि येक गुरू ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/०४ साहित्यातील विविध छटा, संगीतातील बारकावे, वेगवेगळया शास्त्रीय रागदारीचे प्रकार, गायनातील हरकती, नृत्याचे पदन्यास आणि मुद्रा, तालांच्या मात्रा, अनेक वाद्ये उत्तम पद्धतीने शिकवणारे असंख्य शिक्षक असतात.त्यांनाही एक प्रकारे गुरूच मानावे, श्रेष्ठही मानावे. परंतु परमेश्वराशी सूर आणि ताल जुळवून देणारे, शब्दब्रह्माच्या आधारे साधकाला अद्वैतबोध प्राप्त करून देणारे सद् गुरूच सर्वश्रेष्ठ होत. ************* कांही गुरू वैचित्र्याच्या खाणी । दडवुनी ठेविती ज्ञानसमृध्द सुवर्णनाणी । हिणकस, निरुपयोगी शिकवणी । देती अधन शिष्यांना ।। ९८० ************ ।। दास-वाणी ।। सांडून अक्षै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखे दु:ख । आणीक कांहींच नाही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/४१ कधीही संपत नाही असे जे अक्षय स्वरूपी समाधानाचे सुख सोडून देऊन सत्ता, संपत्ती, किंवा योगमार्गाने प्राप्त झालेल्या सिद्धीसामर्थ्याच्या मागे लागतात ते मूर्ख मानावेत. कुठलीही कामना किंवा इच्छा ही कायमच अपूर्णावस्थेत जिंवंत राहाते. आता पुरे असे कधीच वाटत नाही. अतृप्तीमुळे सलग दु:खमय अवस्थेतच माणूस राहातो. समर्थ रामदास अशा सिद्धीच्या चमत्काराच्या जोरावर लोकप्रियता मिळवणा-या गुरूला दांभिक गुरू मानतात. ************** कामना कां बा त्यजावी ?। कां मना वेसण घालावी ?। काम ना करिता अपेक्षावी । मात्र हे अयोग्य ।। ९८१ कसे 'पुरेसे' वाटावे ? । अस्तुरी-पोरां ओठी ग्रास पडावे । कष्टोत्तरी फळ पुरेपूर मिळावे । अपेक्षिणे काय अनिष्ट ?।। ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १४-०९-२०१५ सोमवार साठी ।। दास-वाणी ।। शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य असावा संसारदु:खी । संतप्त देही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/३३ विवेक ३ पातळयांवर राहातो. अध्यात्मिक : आत्म अनात्म व्यावहारिक : सार असार पारमार्थिक : नित्य अनित्य शिष्याला हे तीनही विवेक हवेतच. पिढिजात श्रीमंती ही भोगाला प्रवृत्त करते म्हणून विरक्तीच्या शिक्षणासाठी शिष्य गर्भश्रीमंत नसला तर उत्तम. संसारातील विविध घटनांचा मनस्ताप होऊन त्यातील फोलपणा लक्षात आलेली व्यक्ती पारमार्थिक अध्ययनावर लक्ष पटकन केंद्रित करू शकते. शिष्यलक्षण समास. ************** भाबड्यां परत परत संसारातुनी । परावृत्त करोनि कर्मापासूनी । कोणते फळ मिळवुनी । 'त्यां' हवे समाधान ?।। ९८२ 'जमात' वाढवू पाहाती ? कर्मप्रवृत्ता भिकेला लाविती ?। त्याच्या झोळींतला वाटा मागिती ?। कां हे ऐतखाऊ अध्यात्मगुरु ?।। ९८३ *********** ।। दास-वाणी ।। मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर । मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/०९/४० मृत्यू असे म्हणत नाही की हा फार मोठा माणूस आहे. याला सोडून देऊ. मृत्यू हरी हर किंवा भगवान राम, पूर्णावतार श्रीकृष्ण यांनाही चुकलेला नाही. या मर्त्यलोकात म्हणजे पृथ्वीतलावर 'उपजे ते नाशे ' हाच नियम असून मृत्यूची भीती न बाळगता मिळालेल्या मनुष्यजन्माचे उत्तम वागणुकीने सामाजिक, पारमार्थिक हित साधून घेणे हेच योग्य. ************* जो गेला त्याची मूर्ती ?। पार्थीव वा कागदावर आकृती ?। 'भजा, पूजा, ओवाळा आरती । 'त्याला' ! लक्षण मूढमतीचे ।। ९८४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-०९-२०१५ मंगळवार साठी ।। दास-वाणी ।। जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्यू येईल कैचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/२८ सिद्धपुरूष हे आत्मरूप झालेले असतात. देहबुद्धी नष्ट झाल्याने ते जीवंत असतानाच मुक्त झालेले राहतात. अशा दैवी पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याच्या शिष्यपरिवार आणि भक्तांच्या दु:खाला पारावार नसतो. साधूचा देह नष्ट झालाय आत्मा नाही हे ज्ञान नसल्यामुळे हा शोक होतो. आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. साधू आत्मस्वरूप असल्याने नित्य अनित्य विवेेकाने त्यांनी जन्ममृत्यूवर विजय प्राप्त केलेला असतो. चौदा ब्रह्मांचा दशक, देहांतनिरूपण समास. ********* जो नाहीच तो दाखवा !। तेथे असते नुसतीच हवा । अध्यात्म्यांचा गनिमी कावा । अडकू-फसूं नकां त्यांतं ।। ९८५ शिक्षित म्हणजे साक्षर । समज असे अत्यंत गैर । कसबी कलाकार कारागिर । अक्षर वंचित, तरि मानपात्र ।।९८६ ********* ।। दास-वाणी ।। मुळीं पाहता येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर । त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/०३ नीट पाहिले तर 'सा' हा एकच स्वर तीन सप्तकांमधे लावता येतो. ध्वनिकंपनाच्या तीव्रतेनुसार तार (उच्च),मंद्र(मध्यम),घोर (खर्ज) असे सा चे उच्चारण होते. घोर हा सूक्ष्म स्वर मानतात. अजपाजप म्हणजे वैखरी वाणीने उच्चार न करता केलेला जप. त्याची कंपने अर्थातच घोर स्वराहूनही सूक्ष्मच असणार. प्रत्येक श्वासउच्छ्वासागणिक परमेश्वराचे केलेले अखंड नामस्मरण म्हणजे अजपा. आकार प्रथम, स्वरेल स्थिरं । इकार, उकार अंताक्षरानुसार । लावणे आलापांत हितकर । गाणाऱ्यासी ।। ९८७ श्वासउच्छ्वास पंचमहाभूतांकारणे । सहजसाध्य होते जगणे । म्हणोनि त्यांस अखंड रक्षिणे । अटळ मनुष्यासी ।। ९८८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १६-०९-२०१५ बुधवार साठी ।। दास-वाणी ।। मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें येकाचें येक दिसे । भासों नये तेंचि भासे । विलक्षण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/२७ आराध्यदैवताच्या सगुण रूपाचे ध्यान करायला बसला. चित्त एकाग्र नसल्याने रामाच्या मूर्तीऐवजी गणपतीचीच मूर्ती डोळयासमोर आली. हे ही एकवेळ ठीक, परंतु मनच था-यावर नसल्याने देवदेवताऐवजी भलभलतीच दृष्ये मिटलेल्या डोळयांसमोर तरळू लागली. हे विचित्र भास ध्यानाची अखंड स्थिती साधकाला साधू देत नाहीत. सर्वसामान्यांची ही व्यथा समर्थांनी मांडली आहे. ************ अभावदेवां'च्या उपलब्ध सुरस कथा । संस्कृत साहित्य समृध्दी करिता । चतुर, शोधक नजरेस येता । रंजक ठरती जनसामान्या ।। ९८९ लौकिकार्थी अश्लाघ्य, शारीर जरी । विश्राम विरंगुळ्यास नर-नारी । चविष्टपणे चघळती तरी । स्वाभाविक, नैसर्गिक ।। ९९० जरि आराध्य इष्टदैवत । तरि प्रत्यक्ष भेटणे दुरापास्त । असोनि पुरते माहीत । भज-पूजती आनंदहेतु ।। ************* ।। दास-वाणी ।। कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०३ प्रयत्नांचे सातत्य म्हणजे कष्ट. या जगात फुकट प्राप्त झालीय अशी एकही गोष्ट नाही. फळ ही कष्टाची देणगी आहे. राज्य सत्ता तर सामुहिक प्रदीर्घ कष्टांचे फळ आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे. ही साध्याची गुरूकिल्ली आहे. हाच कर्मयोगोपदेश । करतील कधी दास ?। करीत होतो प्रतीक्षेस । मासा नऊ ।। ९९१ साध्य होतेचि निश्चित । अपवाद नियमा बहुधा नाहीत । कृतिप्रवणता जर संस्कारांत । दिली माय-बाप-गुरवर्यें ।। ९९२ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १७-०९-२०१५ गुरुवार साठी ।। दास-वाणी ।। येकदा मेल्याने सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वाचविना । तो आत्महत्यारा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०९ शिल्लक राहिलेल्या इच्छा (वासना) भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे एकदा मरून जीवाची सुटका होत नाही. पुन्हा जन्म घेतला की गर्भवासापासून,बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळया यातना भोगाव्याच लागतात.अशा जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तीसाठी साधना करून जो स्वत:ला वाचवत नाही तो आत्मघातकीच मानावा. जन्मला तो मरणारची । परतून तेथुनि येण्याची । सुविधा कधीच निसर्गाची । नव्हती-नाही-नसेल ।। ९९३ म्हणोनि, मन न होय द्विधा । साधायचे ते जगत असता साधा । 'आता नाही येणे, जाणे' साधा । निरोप रुजवा हृदयांतरी ।। ९९४ तसे 'अति' जगणे व्यर्थचि । वेळ 'ती' कोणती ? माहितीची । नसते स्वप्नांतही कल्पायाची । जनसामान्यांनी ।। *********** ।। दास-वाणी ।। देवाचे कर्तृत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राव । कळल्यावीण कितेक जीव । उगेच बोलती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/१४ मुख्य देव परब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्यापासून त्याच्या ईच्छेने माया निर्माण झाली. मायेपासून सगुण साकार असा विश्वाचा अफाट पसारा निर्माण झाला. परमेश्वर करून अकर्ता म्हणतात तो असा. माया निर्माण केली. पुढे स्वत: काहीच केले नाही. या विषयी शास्त्रशद्ध माहिती न घेता स्वत:ची मते निर्माण करून लोक बोलतच राहतात. जनस्वभावनिरूपण समास. *********** जगणे जगोनि बोलू पाहे । अनुभव मनाशी सांगत राहे । पण ऐकेल त्याचे ऐसा आहे । कोण, कोठे ?।।९९५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १८-०९-२०१५ शुक्रवार साठी ।। दास-वाणी ।। विचारे येहलोक परलोक । विचारे होतसे सार्थक । विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/२० इहलोक म्हणजे प्रपंच . परलोक म्हणजे परमार्थ. दोन्हीकडे विचारपूर्वक आचरण हवे. तरच आयुष्याचे सार्थक आणि जीवाचे कल्याण होईल. चिरंतन म्हणजे नित्य नाशवंत म्हणजे अनित्य याचा सूक्ष्म विचार म्हणजे विवेक. हा एकदा जमला की अनित्याकडून नित्याकडे म्हणजे मोक्षाकडे प्रवास सुरू होतो. *********** इहलोकी प्रपंचांत । कुटुंबियांच्या क्षुधाशमनार्थ । झटत राहाती दिवस-रात्र । कसा पाहावा 'परमार्थ' ?।। 'स्व' पलीकडले जे जे । त्यांसि संगोपन काजे । शिरावर वाहिले ओझे । कां न मानती 'परमार्थ' ?।। परलोक परमार्थ असे । तर आम्हा तो हरघडि दिसे । केवळ परमार्थीचेच पिसे । लागलेले असते संसारी ।। ९९६ ****************** ।। दास-वाणी ।। नाना वस्त्रें नाना भूषणें । येणे शरीर श्रृंघारणे । विवेकें विचारें राजकारणे । अंतर श्रृंघारिजें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०६/०१ अनेक प्रकारचे कपडे आणि दागदागिने शरिराचा श्रृंगार वाढवतात. रूबाब आणि दिखाऊ सौंदर्य वाढते नक्की. परंतु सारासार विवेक, सखोल विचार, समाजहिताचे राजकारण या गोष्टींनी अंत:करणाचे सौंदर्य वाढते. अंतरंगी जो सुंदर तोच उत्तमपुरूष. ********** लक्षवेधी जर दिसाल । कार्यदाते विचार करतील । तत्पश्चात मुद्रा लागतील । हातासि, करण्या गुजराण ।। मिळाल्या ग्रासाचे वाटे । करोनि सारखे, जितुकी पोटे । राखोनि, द्यावा कणव वाटे । त्यासी, ममत्वाने ।। देखाव्यास शारीर सुंदरता । नि जाणत्या मनांत सहृदयता । अद्वैत असे साधता । व्यक्ती होते 'मनुष्य' ।। ९९७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १९-०९-२०१५ शनिवार साठी ।। दास-वाणी ।। जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण । जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/२६ देवाचे मुख्य स्वरूप निर्गुण आहे हे समजणे म्हणजे ज्ञान होय. माझे आत्मस्वरूप समजून घेणे हे खरे जाणणे आहे. नाव, पत्ता, रंगरूप, उंची वजन शिक्षण संपत्ती हे फक्त देहाचे वरवरचे ज्ञान होय. जो मूळ मी आहे तो समजला तर मूळ परमेश्वराशी अनन्य होता येते. परमेश्वरा तुझ्याशिवाय या जगात इतर कशालाही अस्तित्व नाही अशी पक्की भावना म्हणजे अनन्यता. ती प्राप्त झाली की साधक मुक्तच मानावा. जाणपणनिरूपण समास. ********** जोवरी तो येतांना नाही दिसला । हसला, दुखावला, वा कोपला । पार्थीवांत दडून बसला । तोवरी तो शून्यचि आम्हा ।। ९९८ तरिही विभोर उत्सवहेतु । बांधण्या सांधण्या विचार, सेतू । न बाळगता अश्रध्द किंतू । मनांत ! आणिली मिरवणुकीने ।। आणोनि, विधिवत प्रतिष्ठापिली । मनोभावे न्याहाळिली, पूजिली । उत्तरपूजोत्तरी विसर्जिली । वाहुनी अ-क्षता ।। सुख वाटले निरखिता । उचंबळली वेदनांची गाथा । तरी मागणी उध्दरण्या करिता । न केली, निग्रहाने ।। न चर्चिले सर्वांगी भस्म । न रुद्राक्षांचे कांही काम । न जटा, जप-तपादि धर्म(?)कर्म । नाहक आम्ही अवलंबिले ।। कोठे म्हणे सांडले 'अमृत' । वडवानली 'पुण्य'प्राप्त्यार्थ घृत । दमल्या भागल्या भुकेल्या पोटांत । घातले घास कोणी ?।। अरे विटाळू नका रे माणूसकी । काय घेवोनि जाल उरले बाकी । वस्त्र-प्रावरणे छानछोकी । ओरबाडतील कुडिवरोनी ।। आम्हा साधले संसारी । साधूंनी साधोनि कधीतरी । नौका वल्हवतांना भवसागरी । करोनि पाहाव्या वल्गना ।। ९९९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २१-०९-२०१५ सोमवार साठी ।। दास-वाणी ।। कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तमगती । ऐसें हे ऐकावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०१/२५ ऐकणे, वाचणे, ऐकलेले पुन्हा चिंतन करणे यांना एकत्रित श्रवण म्हणावे. मनुष्याने जन्मभर काय ऐकावे ? नऊ प्रकारच्या भक्ती .. श्रवण : ऐकणे कीर्तन : सांगणे स्मरण: परमेश्वराचे अखंड नामस्मरण पादसेवन : सेवा अर्चन : षोडशोपचार यथाशक्ती पूजा वंदन : मनोभावे नमस्कार दास्य : मी देवाचा दास असा भाव सख्य : देव माझा सखा, मित्र. आत्मनिवेदन : संपूर्ण समर्पणभाव चार प्रकारच्या मुक्ती .. सलोकता : देवलोकात वास्तव्य समीपता : देवाच्या अगदी जवळ वास सरूपता : देवासारखे आपण होणे सायुज्यता: आपणच देव होणे उत्तम गती म्हणजे मोक्ष, मुक्ती प्राप्त होण्यासाठी जे जेे आवश्यक तेवढेच ऐकावे, वाचावे, दुस-यास सांगावे. हेच खरे श्रवण होय. ************** वृध्दांच्या वेदनाध्वनींचे श्रवण । अस्तुरिच्या लाडक्या बोलांचे श्रवण । आनंदविभोर चित्कारांच् श्रवण । छकुल्यांच्या ! कोणती भक्ती ?।। कीर्तन ! घणाच्या घावांचे । कीर्तन ! कर्मयोग्यांच्या नावांचे । कीर्तन ! शब्द-श्रुतीं पल्याडल्या भावांचे । कोणती भक्ती ?।। स्वेदगंगेत बीजांस भिजविणे । मायेच्या छायेंत, रुजविणे, फुलविणे । कळेने पांपणी पाणावणे । काळजांतल्या ! कोणती भक्ती ?।। जराजर्जर मायबाप स्मरणे । तान्हांसि आठवोनि स्मित करणे । मनोमनी पाहाणे । आप्तस्वकीयांसि ! कोणती भक्ती ?।। सेवा ! दीन, दुबळ्यांची । सेवा ! अपंग, अनाथांची । सेवा ! अथक् कृतिप्रवणांची । कोणती भक्ती ?।। वास्तव्य वा वास नकोचि समीप । 'अभाव' देव होणे टळेल आपोआप । नसलेपण स्वप्नांतही पाहाणे.. पाप । थांबता श्वास, मुक्तीसत्य ।। वंदन ! पंचमहाभूतांना । वंदन ! शशि भास्कर तारकांना । वंदन ! सप्तस्वर, द्वादशाधिक दोन श्रुतींना । अविरत आमुचे ।। दास्य, सख्य तेवढे सोडोनि । चारहि मुक्ती नकोंत आचरणी । वृथा कालापव्यय आप्तरक्षणी । नकोची आम्हा ।। १००० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २२-०९-२०१५ मंगळवार साठी ।। दास-वाणी ।। दृष्टांती काही अपूर्व आले । अंत:कर्ण तेथेंचि राहिले । कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/२२ निरूपण ऐकायला बसला. मूळ तत्व समजण्यासाठी एखादा छानसा दृष्टांत सांगितला गेला. ते उदाहरणच इतके आवडले की मनाने तिथेच रेगाळला. निरूपण पुढे निघून गेले तिकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.कुठपर्यंत काय वाचलय काहीच कळेनासे झाले. जे लक्षात ठेवायला हवे तो सिद्धांत आणि अनुषंगित महत्वाचे विषय समजलेच नाहीत. श्रोता अवलक्षणनिरूपण समास. ************* वाचतांना गाथा, ग्रंथ । जर भावला कांहि दृष्टांत । शोधण्या साहित्यालंकार स्रोत । रेंगाळले मन ! वावगे काय ? वारंवार होण्या एकाग्र । मन राहिले जर व्यग्र । तर्क-बुध्दी मूलत: कुशाग्र । हरवोनि बसेल संवेदना ।। रुजण्या सुफळण्या आशय । पळभर 'रवंथ' नको काय ?। अन्यथा 'अपचना'चे भय । अभ्यासांशि जाणा सदा ।। उपदेश जरि योग्य असला । शिष्याप्रति पोहोचवायला । सुचल्या जर क्लृप्त्या 'सत्' गुरुला । दिनु जाणा 'सोनियाचा' ।। तुमचे लाभो तुम्हासचि दृष्टांत । झगडणे, मरत असता जगण्यांत । स्वेदबिंदूंची कष्टकार्यांत साथ । देते समाधान ।। १००१ अध्यात्म प्रचारा उचलता लेखणी । स्वेदबिंदूंची करुण कहाणी । व्यथा, वेदना दुखणी-बाणी । दृष्टिआड करू नका ।। १००२ उपाय 'उपासना' सांगो नका । ना बोलतो नवस फुका । कष्ट करितो कार्यश्रध्द मुका । उपास ना घडवे आप्तांसी ।। १००३ उलथुनि अनंत ब्रह्माडे । ज्ञानेंद्रियासि सताड उघडे । ठेवोनि, धुंडाळिता न सापडे । तो 'नायक' ।। १००४ म्हणे 'शोधा अंतरंग । दिसेल त्याचे स्फटीकांग । नमस्कार त्यासि साष्टांग' । म्हणे 'घाला' ।। १००५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २४-०९-२०१५ गुरुवार साठी ।। दास-वाणी ।। उफराटया नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१६ लोकांना मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. राम च्या उलट मरा हे उलटे रामनाम. इतकेच नव्हे तर शंभर कोटी श्लोकांचे रचलेले रामायण हा आपणा सर्वांसाठी वाल्मिकी ऋषींचा प्रसाद आहे. याचा अजून एक अर्थ निघतो. आपण वैखरी वाणीने प्रत्यक्ष उच्चार करून रामनामाचा जप करतो. परा हे वाणीचे पहिले स्फुरण, जिथे शब्द,अर्थ, श्वास काहीही नसतानासुद्धा नामस्मरण सुरूच असते. म्हणून परावाणी हे उफराटे नाम. सर्वश्रेष्ठ नामस्मरण. वाल्मिकींनी या उफराटया नामाने स्वत:चा उद्धार केला आणि समाजाचाही. नामस्मरणाचा महिमा समर्थ साधकांना सांगताहेत. *********** बोकाळिले 'उफराटे' कर्म । साधूचि देउ लागले दम । नग्नावस्थेंत वसविण्या ग्राम । 'कुंभ'स्थळी, आग्रहती ।। १००६ भाबडे कष्टविती शरीरे । संगती घेउनि अस्तुरी पोरे । गावांत समग्र घरे दारे । ओसाड, उघडी ।। तिकडे साधू साधती संधी । अनुदानाचा भोगत निधी । पक्वान्न झोडीत राहुटीबंदी । होत ! घोरती बिनघोर ।। ह पाहिलेंत चित्र उलटे ? । माणुसकीसहि लज्जा वाटे । भाविकांची रिकामी पोटे । सांगा ! ते जाणतील ? ।। ठाइ ठाइ करा उफराटे । इठा इठा म्हणोनि 'इटु' भेंटें ?। समज ग़ैर भ्रामक खोटे । प्रसविती कोण्या गर्भी ?।। १००७ आंता येईल कुंभमेळी । नग्न साधूंची मांदियाळी । 'तपश्चर्या' करणे रानोमाळी । सोडोनि, लांजवितील बाया-बापड्या ।। १००८ राष्ट्राला काय उपयोग यांचा । वृथा अपव्यय मनुष्यबळाचा । लावुनि चाप प्रशिक्षणाचा । पाठवा सीमा रक्षिण्या ।। १००९ पोशितो कोण यांना सांगा ?। सांगतो कोण 'भिक्षा' मागा ?। फसवे तापस, खोट्या योगा । भुलू नका बापडे हो !।। १०१० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २५-०९-२०१५ शुक्रवार साठी ।। दास-वाणी ।। संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण । सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०४/०८ वस्तू किवा व्यक्तीविषयी अनाठायी आसक्ती, आपुलकी नसणे. स्वत:चे संपूर्ण समर्पण. देहाच्या कोडकौतुकाविषयी यत्किंचितही प्रेम नसणे. अनुकूल, प्रतिकूल घटनांपासून पूर्ण अलिप्तपण. समाधानी शांत सहजावस्था. उन्नत अवस्थेतील मन. परमेश्वराची साक्षात अनुभूती (विज्ञान). या साधकाच्या सातही अवस्था एकच असून सिद्धावस्थेकडे प्रवास होत होत मुक्ती हे अंतिम फलआहे. सगळी व्यवधाने अबाधीत । लागती राखावी संसारांत । सुख-दु:ख-आपदा-आनंदांत !। सहभागी स्थितप्रज्ञेने ।। १०११ भवसागरी नौका वल्हविणे । सिध्दीपेक्षा अवघड साधणे । एकटे राहोंनि 'विश्वचिंता' करणे । अकारण निरुद्योग ।।१०१२ साधनेकरिता एकटपण । कधि प्रसवते हेकटपण । हट्टांतुनं क्रोधाचे स्रवणं । अनिवार्य 'ताप'सासी ।। ।। दास-वाणी ।। नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवांचें पूजन करावें । नाना उपचारी आर्चावें । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/१७ परमेश्वराचे वास्तव्य, संतांचे जन्मगाव, कार्यक्षेत्र, समाधीस्थल ही तीर्थक्षेत्रे मानावीत. त्या ठिकाणी अध्यात्मिक स्पंदने तीव्र असतात. वेगवेगळया तीर्थक्षेत्रांच्या वारंवार यात्रा कराव्या.तेथील गैरसोयींचा पाढा न वाचता अत्यंत श्रद्धेने त्या दैवताची मनोभावे पूजा करावी. पत्र, पुष्प, फल, तांबुल, वस्त्रे इ अर्पून मुख्य परमेश्वर एकच सर्वव्यापी आहे या भावनेने ते ते दैवत पुजावे. ही खरी अर्चनभक्ती. बहुस्थली प्रवास, निरीक्षण । हे जाणत्या शहाण्याचे लक्षण । तेथल्या कार्याची शिकवण । रुजविणे मनोमनी, हीच अर्चना ।। १०१३ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-०९-२०१५ शनिवार साठी ।। दास-वाणी ।। नमस्कारें दोष जाती । नमस्कारे अन्याय क्ष्मतीं । नमस्कारें मोडली जडतीं । समाधानें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/१५ मनापासून विनम्र भावाने परमेश्वराला केलेला नमस्कार भाविकाचे काम, क्रोध, लोभ, अहंकारादि दोष नष्ट करतो. आपणाकडून केल्या गेलेल्या अन्यायाचेही परिमार्जन होते. व्यावहारिक जीवनात सुद्धा कोणाशीही वर्षानुवर्षे बिघडलेली नाती निव्वळ एका सप्रेम नमस्काराने समाधानपूर्वक पुन्हा प्रस्थापित होतात. वंदनभक्तीचे पारमार्थिक आणि ऐहिक असे दोन्ही लाभ समर्थ सांगताहेत. ********** नमस्कार जणु शरणागती । व्यक्तण्या आदर, आपुलकी, प्रीती । स्मितमुद्रा असावी सांगाती । अभ्यागता सुखविण्या ।। १०१४ ************* ।। दास-वाणी ।। सांडून आपली संसारवेथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/०७ संसारातल्या अडीअडचणी येत जात राहणारच. त्यांची चिंता करून त्या कमी होणार नाहीत. उलट प्रापंचिक अडचणीत सुद्धा जो फक्त परमेश्वराचेच स्मरण ठेवतो . निरूपण, कीर्तन, कथा जे जे काही बोलायचय ते फक्त ईश्वराविषयीच बोलत राहातो तो खरा देवाचा सखा. सुदाम्याने श्रीकृष्णभेटीमधे स्वत:च्या दारिद्रयाचा उल्लेखसुद्धा केला नाही. भगवंताने त्याची अडचण जाणून त्याला भरभरून समृद्धी दिली. निरपेक्ष सख्यभक्तीचे फळ हे मिळतेच. संसाराची अखंड चिंता । पोखरीत मनास असता । कसले कीर्तन, नामस्मरण, कथा । भाकड सारे कां सांगावे ?।। १०१५ तत्वांशी फारकत घेणे । एकमेकांसि 'समजुन' घेणे । वेळप्रसंगी 'वेल्हार'ही करणे । म्हणजेचि राजकरण भौ !।। १०१६ विधानगृहांत 'हमरी-तुमरी । खुळ्या कार्यकर्त्यांत सुरामारी । हाकलली जाती मुक्ती 'बिचारी' । गळ्यांत गळे विरेधकांचे ।। १०१७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २८-०९-२०१५ सोमवार साठी कधी उघडणार डोळे जनता ?। कधी मिळणार महत्व मतां ?। कधी आपदांतुनि मुक्ता ?। मिळणार ।। १०१८ 'निर्लज्ज' प्रतिष्ठित सिंव्हासनी । आपलीचि पापे, कर्मकहाणी । केवळ भूल-थापांची खेळणी । गाजरासम निर्दय दाखविती ।। १०१९ अपंग, अजाण बालके, गर्भवती । सोडोनि, इतरांच्या न पडो कवळ हाती । कष्टेविण ! व्हावी राष्ट्रनीती । स्वप्न माझे ।। १०२१ न टाळती समागम । शेधित हिंडती शृंगारधाम । हेटाळिति परि अपत्यजन्म । श्वापदांपेक्षा अक्षम्य ।। १०२६ 'त्याची' म्हणजे कोणाची । आंस आहे दृढभेटीची । युगानुयुगे मनुष्याची । न ढळे पांपणी ।। १०२७ भेंटवाना एकदा 'त्या'ला । वाजत गाजत कधि आलासे वाटला । परंतु प्रस्तर वा मातीचाच् निघाला । कृतिशून्य ! देखता ।।१०२८ पंचमहाभूते हरघडी भेटतांत । दुखवित, सुखवित येत-जातांत । भवसागरी कधि नाव बुडवित । मार्ग पैलाचा दाविती ।।१०२९ म्हणोनि निसर्गा द्या मान्यता । तोचि जन्म-स्थैर्य-विलय दाता । 'त्य'च्या, बासनांतल्या भाकड कथा । जाउद्या विस्मरणांत ।।१०३० लागेल कटु, पण आहे सत्य । आपदेंत कधि सख्खे अपत्य । 'कर्तव्य' म्हणोनीही नाही कृत्य । धजते करावया ।।१०३१ धुडाळण्या वेळ हवा । कष्टकऱ्या कसा मिळावा । घरी परततां आप्तांचा मेळावा । घेरतो घासासाठी ।।१०३२ श्रीमंतास उत्तम उद्योग । शोधुनि सापडला तर माग । काढोनि, गरिबांसि थांग । सांगा सत्वरी ।।१०३३ युगानुयुगे मनुष्ये शोधला । कर्महीन होवेनि वेडाचार केला । तन-मन-धने, प्रार्थिला, पूजिला । दिसला, श्रविला, जाणवला नाही 'तो' ।।१०३४ स्वीकारिता आव्हाना ? दाखविता 'तो' ? उगा वल्गना । गरिबांच्या शिणल्या तना-मना । कृपया सोडा मोकळे ।।१०३५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-०९-२०१५ मंगळवार साठी चमत्कारास नाहीच अस्तित्व । विश्वांत सारे निसर्गाचे कर्तृत्व । कार्यकारणभावे युक्त । संपृक्त विज्ञान सर्वदा ।।१०३६ कार्यरत नाही त्यास निवृत्ती ?। कशाची द्योतक प्रवृत्ती ?। अभावदेवासंबंधी भ्रामक समजुती । भाबड्यांच्या ऐशा ।। १०३७ एकतरी मुहूर्त ओवी । आजच्या दिशी रचावयास हवी । फटफटतांना पहाट नवी । पाडव्याची।। १०३८ ।। दास-वाणी ।। काया माया दो दिसांची । आदिअंती अवघी ची ची । झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०८/३८ हे शरीर आणि त्याने आयुष्यभर हाडांची काडे करून मिळवलेली संपत्ती दोन्ही नाशिवंत आहेत. ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार आपले आयुष्य एक क्षण सुद्धा नाहीये. जन्माला येतानाही वेदना, मरताना सुद्धा त्रास हालअपेष्टा आणि अतृप्ती. एकंदरीत कायमच फजितीचे आयुष्य जगणा-या मानवाने संपत्ती आणि उत्कृष्ठ पेहरावाच्या बळावर स्वत:ची थोरवी मिरवावी काय ? मान्य करीता ना 'पुनर्जन्म' ? मग, काया नाशवंत कायम । हाड़ा-मांसाशि नेइल यम । कां सांगता बरे ?।।१०३९ जगत असतांना समाजांत । हसत राहाणे अप्रस्तुत ?। पेहेराव, बोलणे, चालणे इत्यांदितं । थोरवी कां वर्ज ?।। १०४० काया वाचा नि मन । तिन्ही एकत्र करून । क्रमणे म्हणजे जीवन । क्षणार्धांत नाशवंत ।। १०४१ चित्तवृत्ती मोकळून । द्यावे स्वत:ला झोकून । खुलवून फुलवुन मन । जगणे यापुढे ।। १०४२ आले आले संमेलन । लोटले अवघे भक्तजन । देखण्या, अनुभवण्या घुमान । 'नामा' मुळे नांवरूपास ।। १०४३ व्यासपीठावर आजी माजी । सिंव्हासनी प्रतिष्ठापित पंतोजी । परंतु साहित्यिक 'फौजी' । 'नेमा'ने राहती अनुपस्थित ।। १०४४ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-०९-२०१५ बुधवार साठी ।। दास-वाणी ।। आपण जिव्हेमधें खेळे । पाहातो परिमळ सोहळे । केंस काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १३/०९/२० हा जो मूळ परमात्म्याचा अंश जीवात्मा आहे तो प्रत्येक प्राणीमात्राच्या देहात संचार करत असतो. जेव्हा तो जीभेमधे खेळू लागतो तेव्हा वेगवेगळया चवी, अन्नाचा घमघमाट अनुभवतो. खाता खाता मधेच एखादा खडा, केस किंवा काडी जर घासाबरोबर तोंडात आली असेल तर जीवात्मा लगेच ओळखतो आणि ताबडतोब थुंकून तोंडातून बाहेर काढून टाकतो. रस आणि स्पर्शाचे ज्ञान जीवात्म्याला जीभ या ज्ञानेंद्रियामार्फत होते. उभे राहतिल देखावे, प्रदर्शने । मंडप सजतिल झालरीने । फांशी घेतल्यांच्या नांवाने । कवियंमेलने 'गलबल'तील ।। १०४५ आधी मिळूदे मुखी कवळ । खडे, काड्या, केसांचे जंजाळ । न भासे क्षुधाग्नींत होरपळं । भोगती जे ।। १०४६ ।। दास-वाणी ।। भंगली देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं । सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतन चि कार्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०७/०४ दास्यभक्तीमधे देव माझा मालक आणि मी त्याचा दास म्हणजे इमानी तत्पर नोकर असा भाव मनात हवा. या दासाने जुनी पडकी देवळे पुन्हा बांधून काढावीत. त्यासमोरील मोठे जलाशय, तलाव डागडुजी करून पाय-या कठडे व्यवस्थित करावे. ओवरी, धर्मशाळा इत्यादी भाविकांच्या राहण्याच्या जागा साफसुथ-या ठेवाव्या,गरज पडल्यास नवीन बांधून सुद्धा काढाव्यात. या सर्व गोष्टी विनम्रपणे करून दास्यभक्ती पार पाडावी. भंगली मने दुविधांनी । त्यांसि सांधावे प्रथम करोनि । जातिल रानोमाळी उडोनि । बांधिली नाहि जर आळ्याने ।। १०४७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०१-१०-२०१५ गुरुवार साठी मग देवोनि अन्न-पाणी पुरेसे । क्षुधाशांती-तृषा शमवीलसे । ज्यामुळे निरामय होतसे । तवाव देह ।। १०४८ आजकालची मंदिरे वेगळी । विज्ञान मूर्त अवतरते स्थळी । संशोधक, शास्त्रज्ञांची मांदियाळी । मोहोळ जणु मधुमक्षिकांचे ।। १०४९ पायऱ्यांवरी जीवजंतू । मनुष्यांसि अपायह्तु । आढळले तर नि:पातू । त्वरित करणे अनिवार्य ।। १०५० विज्ञानांमृतांच्या पुष्करणी । दिठींत साठवाव्या क्षणोक्षणी । होईल प्रतिबिंब त्यांत पाहोनि । तर्क-बुध्दी प्रयोगक्षम ।। १०५१ ऐशा कांही निवडक ओव्या । बालकांनी अभ्यासाव्या । निश्चित देतील दिशा नव्या । विज्ञाननिष्ठा बळावण्या ।। १०५२ सण वार गृहिणींस पर्वणी । त्या दिशी मिळून साऱ्याजणी । सजुनि, आभूषण् अलंकारांनी । मुक्तांगणी खेळतं असतं ।। १०५३ परा, पश्यन्ती, वैखरी । संस्कृत अर्थवाही जड जरी । व्यक्तण्या योजना त्रिस्तरी । समजाववावी तत्वज्ञांनी ।। १०५४ 'करुण' ! राजा सर्व रसांचा । 'करुण' ! स्रोत माउली हृदयिचा । 'करुण' ! पहावा गाउलीच्या नेत्रिचा । रुध्द होतसे कंठ ।। १०५५ कीर्तन ! सहज सोपे माध्यम । कीर्तन ! वाचा, देहबोलींचे धाम । कीर्तन ! थकल्या, श्रवणी विश्राम । उभारी आणण्या परतुनी ।। १०५६ कळा व्यक्त करिता आनंद । कळा दाविणे सहजभावी छंद । कळाकार सांगतो अतिगुह्य वेद । देत मनां विरंगुळा ।। १०५७ ।। दास-वाणी ।। जैसें बोलणे बोलावें । तैसेंचि चालणे चालावे । मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०९/२३ ************ वचने लागती पाळावया । नको वाटते पळावया । अपेक्षापूर्ती टाळावया । मन नाहि धजावत ।। १०५८ कशासि फसवावे कोणासी । वचने देउनि अश्यक्यशी । अपेक्षाभंग मनासि । दाहक असतो साहावया ।। १०५९ आकर्षण असणे नैसर्गिक । प्रतिसाद तेवढाचं आवश्यक । अन्यथा विकृत कृति जनक । नर-नारींमधे ।। १०६० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०३-१०-२०१५ शनिवार साठी जो दिसतात नाही, त्यावर विश्वास न ठेवता, निसर्गांतल्या प्रत्येक दृश्यमान घटकांवर विश्वास ठेवणंच रास्त, हे 'अंधश्रध्द' जीवांना कसं समजावून सांगावं ? मोठा पेच आहे, पण.. 'हे भ्रामक, खोटें' सांगोनि अस्वस्थ । करणे ! त्यांसि, नाही रास्त । अभावदेवावरी भिस्त । ठेविती भाबडे ! ही चिंता ।। १०६१ पण जाणीव सत्याची देणे । लिहित चाललो याचि कारणे । कर्मावर श्रध्दा वळविणे । श्रेयस्कर ! सांगा कोणीतरी ।। १०६२ *************** ।। दास-वाणी ।। तैसीच माव राक्षेसांची । देवांसही वाटे साची । पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०८/२७ तसेच राक्षसांनी घेतलेली मायावी रूपे प्रत्यक्ष श्रीरामांनाही खरी वाटून कांचनमृगरूपी मारिच राक्षसाचा पंचवटीमधे पाठलाग केला. मनुष्यरूपात असल्याने माया सत्य आहे असे परब्रह्मस्वरुप रामचंद्रांनाही वाटले. सामान्य मनुष्यालाही २४ तास प्रत्यक्ष दिसत असलेले बहुरंगी मायिक विश्व सत्य वाटलेे तर काय नवल ? तरीेही ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या हाच सिद्धांत होय. देवशोधन दशक, दृष्यनिरसन समास. ************ पाहता पाहता दृष्टांत झाला । 'राम' मनुष्यांत आणुनी बसविला । सामोरा गेला सुख-दु:खाला । कर्मयोगी सामान्य ।। १०६३ परि तत्वनिष्ठा राजपदाची । त्यजुनी प्रीती स्वपतिनीची । अपेक्षापूर्ती सर्वसामान्यांची । मूकपणे केली 'आदर्श' ।। १०६४ कोण कुठला य:कश्चितं । सारेच माझे अनिश्चितं । भयावह गर्दी गोंधळांत । दिवाभीत मी ।। १०६५ मी कां अजुनी 'आहे' ?। कोणत्या कारणे श्वास वाहे ? । प्राण कां न सुटो पाहे ?। देहांतुनी ।। १०६६ मन आजकाल अशांत । म्हणे, 'चल विजनवासांत । नसेल कोणी स्वकीय आप्त । अपेक्षिण्या परस्पर ।। १०६७ परंतु 'पळणे' योग्य नव्हे । अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये । न अधिकार ठेवण्या नांवें । ऐशास ! मजला राहील ।। १०६८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-१०-२०१५ सोमवार साठी सणवार असे पर्वणी । एकत्र जमून ग्रामस्थ गृहिणी । झिम्मा, फुगड्या फेर धरुवि गाणी । गात होत्या मुक्तरवे ।। १०६९ आधुनिकतेच जरि पेहेरावांत । माया, ममता तीच उरांत । प्रगतं संकल्पना संगोपनातं । प्रत्यक्षांत उतरवे माता ।। १०७० जिजाऊंनी घडविला शिवबा । ज्ञान-कर्मेंद्रियांचा देत ताबा । सुयोग्य गुरु अन मोकळ्या नभा । निष्णात केले सर्वतोपरी ।।१०७१ शारीर निद्रा, म्हणजे पूर्ण विश्राम समाधी नव्हे. नुसते मिटलेले नेत्र म्हणजे निद्रा नसते हे आपणा सर्वांनाच ठावके आहे. जोपर्यंत मन हळूहळू जागृतीच्या शून्यावस्थेप्रत पूर्णपणे पोहोचत नाही, तोपर्यंत व्यक्ती निद्रावस्थेंत विरघळली असं म्हणता येत नाही. 'खुट्ट' झालं तरी येणारी पूर्ण किंवा अर्धवट जागृतावस्था म्हणजे निद्रा नव्हे. गाढ झोपलेल्या व्यक्तीला जागं करणं किती अवघड असतं ते तुम्ही जाणतांच.. ही तुर्या त्रिस्तरीय असते... ते स्तर अभ्यासण्याचा , विविध उदाहरणांतून केलेला प्रयत्न ,मनोरंजक ठरेल ! तुर्या नसलीच जर गाभ्यांत । चर्या असली जरि अस्तित्वांत । सूर्यासहि आणणे टप्प्यांत । तिला ! दुरापास्त ।। १०७२ तुर्या ! भाग जगण्याची असतो चौथा ' तुर्या ! महति तिची ऐका । तुर्या ! अस्तित्व सांभाळणारी नौका । भवसागरी ।। १०७३ तुर्या ! पायाचा पाषाण । तुर्या । अस्तित्वाचा प्राण ! तुर्या । कार्य, भाव, कारण । मनुष्यासी ।। १०७७ घट वरचा ! द्राव दृश्यमान । घट मधला ! द्रावासि झाकलेपण । घट तळाशि ! द्रावास सगळ्या आधार कोण ? भंगला जर ।। १०७८ त्याकारणे निसर्गे तुर्या । निवारण्या भंग भया । जगण्यांस देते छाया । आशीर्वचतरुची ।। १०७९ इतके सोपे ज्ञान । देवोनि दृष्टांत, उदाहरण । कां न करिती कीर्तन । शिष्यगण, महंत ?।। १०८० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-१०-२०१५ मंगळवार साठी ।। दास-वाणी ।। न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२२ सूर्यदेव दिसेनासे झाल्यावर अवघ्या पृथ्वीतलावर अंधार दाटलेला राहातो, त्याचप्रमाणे ज्या क्षणी वाचन, चिंतन, मनन, निदिध्यासन थांबते त्याच क्षणी ज्ञानाची अवस्था नष्ट होऊन अज्ञानाचा अंधक्कार साधकाच्या जीवनात भरून येतो, टिकून राहातो. श्रवण सतत केले पाहिजे हा संदेश समर्थ श्रवणनिरूपण समासात देतात. *************** आधी पाहिजे आडांतं । तरच येइल पोहऱ्यांत । हे सत्य जागतिक । कशास लागावे कथण्या ?।। कसब मुळांत असल्याविणा । अर्थ नाही प्रशिक्षणा । साक्षरतेचे महत्व जाणा । सांगोनि थकला डेबू ।। १०८१ थांबले जरि वाचन श्रवण । मगज विचारांचे निधान । अखंड कार्यरत, राखते भान । जितेपण जोवरी ।। १०८२ आदि अंत न ज्याचा ठावे । त्यांसी कैसे संबोधावे । दशदिशांनी आपुल्या प्रभावे । निसर्ग खेळे 'बाहुल्यां'शी ।। १०८३ नश्वर म्हणजे नाशवंत । बुवा, बाबा असो वा महंत । त्यांच्याच नादी भसभीत । भाबडे लागती ।। १०८४ निसर्गाच्या विविध तऱ्हा । उध्वस्त करिती घरसंसारा । तेल घालोनि ठेवावा पहारा । लागतो नजरेचा ।। १०८५ पानगळ, पुन्हा पालवी । आषाढांत जळे नवी । श्रावणांत वाटे हवी हवी । सणवारांची बरसांत ।। १०८६ शरदातले टिपुर चांदणे । निरभ्र आकाशाचे लेणे । शिशिरांत हुडहुडीची आवंतणे । परतुनि येण्या शिलेदारा ।। १०८७ ऋचा, श्लोक आर्या, ओवी । गण-गौळण, लावणी आसमंत घुमवी । फटका, पोवाडा, वा मुक्तछंद, नवी । गीतांचीच रूपे अभंग ।। १०८९ वर्णन, निरूपण, निवेदन, कथा । निबंध, दीर्घांक, चरित्र, गाथा । समीक्षा, विश्लेषण वा ग्रंथा । संशोधनोत्तर मांडणी अनिवार्य ।। १०९० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-१०-२०१५ बुधवार साठी जैसे, वर्णनहेतु निरीक्षण। निरुपणपूर्व आकलन । दीर्घांक फुलविणे प्रसंगांतून। उदाहरणार्थ ।। १०९१ कोणत्याही प्रकारच्या अध्यापनापूर्वी, अध्यापकाला, जो विषय विद्यार्थ्यांना विषद, विश्लेषण, विवेचचनोत्तर समजावून सांगायचा तो स्वत: एकदा गतिमान वाचन, उजळणीद्वारे दृढ करून, त्याचे, विद्यार्थ्यांच्या वयाला रुचतील, रचतील असे ग्रास नियोजित करून तदनंतर अध्यापनास सुरुवात करणे इष्ट ठरते. अन्यथा, एखाद्या चिकित्सक वृत्तीच्या विद्यार्थ्यानं शंका विचारल्यास, आशयाची फोड करण्यास सांगीतल्यास, ऐन वेळी कुचंबणा होण्याचा संभव असतो. त्यामुळं ही दक्षता अनिवार्य... समीक्षापूर्व बारकाव्यांचा अभ्यास । चरित्रासाठी जीवनानुभव विशेष । आशय करितो, गाथा, वा ग्रंथास। आकलनयोग्य अध्ययनयोगे ।। १०९२ निसर्गसुध्दा, मनुष्यांना आपल्या विविध रूपांची अनुभूती देतांना सहसा अनाकलनीय चमत्कार दाखवीत नाही. विविधांगे, परिवर्तन अलवार उलगडत जातो... शुभ्र मेघमाला नभांत । अवतरू लागल्या तरंगता । झालर कृष्णवर्ण कडांत । हळुहळु होइल दृश्यमान ।। १०९३ दासच सांगोनि गेले । नाही कांही जर लिहिले । अनुभव व्यर्थ गेले । रोजचे अनमोल ।। १०९४ मग बाष्फ उर्ध्वगामी । प्रवेशेल अंतर्यामी । जलकुंभावतार वर्षाग्रामी । होतील प्रसवोत्सुक ।। १०९५ मेघडंबरांत गर्जेल गाज । घुमूलागतिल मृदंग, पखवाज । मधूनच कडाडेल वीज । उजळिंत अकाली झाकोळ ।। १०९६ आसुसले प्राणिमात्र । एकवटोनि मन, गात्र । उंचावतील शुष्क नेत्र । आभाळमाया टिपावया ।। १०९७ पुलकित होइल अवनी । धावत सेइल वर्षाराणी । भूमि, तरुवर उदंड पाणी । जडावेल आसमंत ।। १०९८ आधार ! चहुबाजूंनी असावा । आधार ! दशदिशांतुनि भासावा । आधार ! स्वत:च नसावा । निराधार ।। १०९९ जरा म्हणजे असतो शाप ?। जरा जीवमात्रांसि आपोआप । जरा जीवनानुभवाचे रोप । वृक्षरूपी, वितरण्या छाया ।। ११०० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०८-१०-२०१५ गुरुवार साठी अध्ययन, साधना, आकलनासाठी । अध्ययन, साधना, कृतिशीलतेसाठी । अध्ययन, साधना, स्पर्धेसाठी । जिण्याकारणे रोजच्या ।। ११०१ दातृत्व ! मुळांतले सहज । दातृत्व ! असावे निर्व्याज । दातृत्व ! सत्कर्मांची व्यर्थ गाज । टाळावी, हेतुपूर्वक ।। ११०२ पंचमहाभूतांना वेसण । वैज्ञानिक संशोधाने प्रयत्न । हेचि प्रार्थना पूजन । अज्ञात शक्तिचे ।। ११०३ अजाणतेपणी पुष्प-बुक्कादि उधळणे । उपास सायास, नैवेद्य अर्पणे । अभावदेव प्रसन्नता प्रतीक्षिणे । फोल अनादिकाळापासोनी ।। ११०४ 'चमत्कार' होती फसवणूक । निरक्षरांची अप्रत्यक्ष पिळवणूक । करीत होते भोंदू अध्यात्मिक । सर्वदा सदा ।। ११०५ गुरु करितो ज्ञानवृध्दी । गुरु वारी आपदा, व्याधी । गुरु देतो शिकवण साधी । प्राप्त परिस्थिति रिचविण्या ।। ११०६ गुरु तम भेदी अज्ञानाचा । गुरु परिचय देई पंचमहाभूतांचा । गुरु आग्रही कृतिशीलतेचा । सत्कर्मांसाठी ।। ११०७ गुरु मार्गदर्शक सखा । गुरु विपदेस विन्मुखा । गुरुसि घाला हाका । प्रकटेल हात देण्या ।। ११०९ गुरु अंतर्बाह्य विवेक । गुरु सत्प्रवृत्ती, जनक । गुरु अशिष्यासि पावक । सजग सदा ।। १११० गुरु ज्ञानगंगेचा उगम । गुरु शिकवी भेद, दंड, साम । गुरु आदर्श मानव राम । पाहावा सदा ।। ११११ गुरु रूपधारी कोणीही । गुरु मित्र, वैरी, शार्वीलिकही । गुरु, निसर्गाची वही । पंचमहाभूती ।। १११२ गुरु वेधतो शिष्योत्तम । गुरु सर्वांवरी करि प्रेम । गुरु उध्दरण्या सक्षम । मूढांसीही ।। १११३ गुरुवर असावी निष्ठा । गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा । गुरु ज्ञानामृताच्या घटा । दडवित नाही कधिही ।। १११४ गुरु भीम, बलवान महारुद्र । गुरु शिष्यगणा सुभद्र । गुरु तर्क-बुध्दि-आकलन समुद्र । जीवमात्रा ।। १११५ मी एक प्रस्तरखंड । शेंदुरजणे चढविति विनाखंड । अंकुरू लागला भयगंड । मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल ।। १११६ शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी । आशयाची रेटारेटी । टाळोनि न टळें त्यांत ।। १११७ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-१०-२०१५ शुक्रवार साठी शिष्य व्हावा यशस्वी । म्हणोनि त्यांसि शिकवी । अध्ययन अध्यापनापूर्वी । करि गुरु विषय-आशयाचे ।। १११८ परंतु परीक्षाकाळी । साहाय्यास जाणे जवळी । यशोमाला पडावी गळी । म्हणोनि ! हेतू अनिष्ट,अश्लाघ्य ।। १११९ अध्ययनार्थ उच्चश्रेणी वर्गांत । जर असला धडे घेत । कस त्याचा जोखण्यांत । सहभाग कनिष्ठाचा कां बा ?।। ११२० गुरुसि मिळत नाही सवड ?। की लोळत पडण्याची आवड ?। मग ज्ञानार्पण, अध्यापनाची कावड । घेवोचि नये ऐशाने ।। ११२१ ऐसे धुंडाळोनि खेचा । जनक्षोभ मुसळाने ठेचा । जखडा ऐशा घालोनि पेचा । कि सुटो नये ।। ११२२ प्राक्तन ! एक कारण । प्राक्तन ! आलस्यासि निमंत्रण । प्राक्तन ! कृतिशीलासि आव्हान । भेदून, करण्या क्रमणा ।। ११२३ प्राक्तन ! म्हणे विधिविखित । प्राक्तन ! 'हरी' भरवसा पात्र ?। प्राक्तन ! भरवेल कवळ मुखांत । म्हणावे शहाण्याने ?।। १२२४ प्राक्तन ! दावेल यश ?। प्राक्तन ! पळवेल विघ्नासं ?। प्राक्तन ! घडवेल विनासायांस ?। कार्य ! निद्रिस्त व्हा बिनघोर ।। १२२५ प्राक्तन ! ना वारेल उचित कर्म । प्राक्तन ! ना धारेल संपदेचे वर्म । प्राक्तन ! ना सजवेल विरूप चर्म। निसर्गदत्त ।। ११२६ तीन वर्षाची कवळी पोरं । माय बापान्ला नाही घोर । खाईल कुल्यावर फटके चार । ना जर मागेल भीक ।। ११२७ पायाला अखंड चटके । अंगावर धडुते फाटके । मुख्यमंत्र्याचे वारस नेटके । मात्र बापासवे शाळेंत ।। ११२८ जेवढी वाढेल प्रजा । मंत्रि'गणां'ची मजाच मजा । 'तापला तवा, पोळी भाजा' । अध्यादेश काढिती ।। ११२९ कुणा आली कणव दया । हृदय द्रवले, वोसंडली माया । पालन पोषण कराया । नेती पोरे स्वगृही ।। ११३० सवरु-शिकुनि मोठी झाली । ठाव स्रोताचा घेऊ लागली । मुळाशि येवुनि ठाकली । विचारण्या जाब ।। ११३१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १०-१०-२०१५ शनिवार साठी हडबडतील सिंव्हासने । गडबडतील तोंतरी वचने । डबडबतील अंत:करणे । कांहींची, कथेने ।। ११३२ दुर्गा शस्रधारि पाहोनी । भयभीत तळवे जुळवित दोन्ही । करतील दयेसाठी विनवणी । पापि नराधम अतिरेकी ।। ११३३ परिस्थिती होवू शकते ऐसी । मदांध उधळती संपदेसी । करोनि रिकामी जर धनराशी । प्रामाणिक कष्टकऱ्यांची ।। ११३४ पुराण इतिहासांत ऐशा कथा । अभ्यासता ग्रंथ, गाथा ?। किती टोकदार व्यथा । असते, येते कळोनी ।। ११३५ तान्हेला शुष्ककंठ तान्हा । मातेसही फुटेना पान्हा । घास नसल्याने क्षुधाशमना । कारणे रडती कळवळत ।। ११३६ तैसीच अवस्था जनतेप्रती । हाल अपेष्टा रोज भोगती । मधुचंद्र कधि, कधि झगडा, युती । जखमांवर चोळिती मीठ ।। ११३७ अनुभवाच्या प्राशुनि विषा । बोलला अमृताची भाषा । ऐशा माउली ज्ञानेशा । दंडवत ।। ११३८ माय-तात जरि रागेजले । बोबडे गोड तरि तान्हे बोले । नाही कांही नवल वर्तले । वडवानळावरी जळ ।। ११३९ ऐसेचि असते निरागसपण । निर्मळ हृदय, अंत:करण । दाम-दंड-भेदादि लक्षणं । अनैसर्गिक सूड, द्वेषापोटी ।। ११४० हे सगळे वृध्दापकाळी । उपदेशार्थ येते उफाळोनी । अनुभव उकळोनि, गाळुनी । अर्का संपृक्त निव्वळ ।। ११४१ ज्ञानार्जनासाठी असोशी । धारोनि मनि करितो तपासी । जाणा उज्वलेल भविष्यासी । शिष्य खरां ।। ११४२ प्रज्ञा लौकिकर्थि ग्रंथावगत अध्ययना । म्हणे आवश्यक असतोच कणा । तैसीचि इतर संगीत-नृत्या-अभिनय कलागुणा । स्रोतरूप आपोआप ।। ११४३ पण समाजभाग गतिमंदासही । कसब कांही तरण्या जीवनप्रवाही । जाणेनि, अभ्यासोनि न्यून त्याचेही । सुयोग्य दावावा पथ ।। ११४४ हे जो केरेल सहज साध्य । गुरु खरेचि होईल तो वंद्य । मन:पूर्वक श्रध्येय नि आराध्य । शिष्यासि ऐशा ।। ११४५ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १२-१०-२०१५ सोमवार साठी अशा या प्राक्तनाची अतर्क्य रूपे, पाहावयाची । होवू देत पांपणी काठांची । दहिवरे प्रळयजळं ।। ११४६ कां मी लिहितो भरताडं । कुणि उघडलं तरी कां हे बाड ? उघडोनि निद्रिस्त कवाड । पांपण्यांची ?।। ११४७ पूर्वरंगोत्तर आरती, मग उत्तररंग । कीर्तनाची दोन जरि भिन्नांग । उपदेशगर्भी मनरंजन अमोघ । वक्तेबुवा गाती अजोड ।। ११४८ डफ ढोलकी खंजिरी । पायी चाळ चढवुन नारी । लचकत मुरडत फडावरीद । कांचनसंध्या सजवाया ।। ११४९ वेणू, वीणा, एकतारा । डमरु, ढोल ताशे नगारा । तमगर्भी निद्रिस्त धरा । जागवाया नादावती ।। ११५० प्रारंभी 'जय राम कृष्ण हरि' गजर । एकात्म चित्त साधण्या एकत्र । संवादिनी सूर संगे थाप तबल्यावर, । टाळ करिती तोड योग्यस्थली ।। ११५१ धूलीकणहि दावितो अस्तित्व । पांपणीत ! स्पर्शिता क्षणभर अंधत्व । मुंगीसाठी आधारतत्व । होतसे गरज पडतां ।। ११५२ ना दिसति सुरक्षा रक्षक । वा लघु छपविलेले छायक । मग शोधतिल शार्वीलिक ?। कैसे, आणि कोठे ?।। ११५३ मशिद, चर्च, गाभारा । जीवास राखण्या बरा । प्रतिकृति न्या बाजारा । सजवा, पूजा वा बोळवा ।। ११५४ आगंतुक अतिथी आले । तर कामी येते उरलेसुरले । भर टाकुनि त्यांत वाढिले । क्षुधाशांत्योत्तर प्रसन्नता ।। ११५५ रांधू-वाढोनि स्वयंपाक । गृहिणी करिती झांकपांक । निवान्त निद्रा आपसुक । सुख समाधानाने ।। ११५६ 'पोकळी' हेची मूलतत्व । भ्रामक असते अस्तित्व । 'निर्गुण निराकारा'चे ममत्व । विरघळते स्वस्थळी ।। ११५७ कोण येतो कोण जातो । कधी कांही फरक पडतो ?। एकमेकांसि फक्त जाणवतो । पोकळी निरव, निस्तब्ध ।। ११५८ प्रार्थना, करावी प्रारंभवेळी । प्रांत:, माध्यान्ह वा सांध्यकाळी । सद्विचारासोबत, योग्यस्थळी । कार्यसिध्दी नि:शंक ।। ११५९ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १३-१०-२०१५ मंगळवार साठी आपुले साधन कर्मयोग । कार्यस्थळि सर्वांशी संयोग । अनुभवाचे समृध्द जग । त्यांसि पारखे 'संत' ।। ११६० कशास पाहातांत 'पोकळी' । घेउन भिक्षेची झोळी । कोण टाकितो पुरणपोळी । 'पोकळीं'मध्ये ! हेरिती ।। ११६१ या म्हणावे जमिनीवरी । पडोनि पाहा संसारी । सांभाळा माय-बाप, पोरे, अस्तुरी । पोकळी वोसंडेल क्षणार्धांत ।। ११६२ नेमाने वाचा भक्तिबोध । जर अंत:करण होईल क्षुब्ध । सोडा दैवी 'चमत्कारांचा' शोध । एकचि उपायो, कार्यमग्नता ।। ११६३ चार दिसांची भातुकली । लाटणे, पोळपाट, टोप, पातेली । खेळणी सगळी इवली इवली । पंचमहाभूता हाती जीवमात्र ।। ११६४ कधि भात राहातो कच्चा । 'पोळी करपेल ! झडकरि उलथा' । पत्नीवर आरडे कपाळी मारित हाता । 'नवरे'पण जरि लटके ।। ११६५ साहित्य ? गूळ, शेंददाणे । चैनचं, मिळाले जर फुटाणे । बाळ ? बाहुलीचे रडण्, हसणे । हौस, नसते मोल तिला ।। ११६६ तेथे असते सुखचि सुख । प्रसन्न चेहरा संपता 'स्वयंपाक' । वेदना, दु:खांच्या झळा नाहक । ना फिरकत कधी इथे ।। ११६७ म्हणोनि नेहमी वाटते कां ?। 'सरोचि नये हे' ऐसे बालका । मोठेपण मारिते हाका । आपदांना आवताण ।। ११६८ संतांची सदुपदेशी उक्ती । शिष्य येरे गबाळे दुर्लक्षिती । 'जागविण्या' स्मृती वा जयंती । वर्तन करिती अर्वाच्य ।। ११६९ सद्हेतूने, वस्तींतिल गांजलेले । निवडुनी, समजाविले, उद्बोधिले । तरिही मर्कटलीलांनी उच्छादले । सामान्यांस त्यांनी ।। ११७० सुरक्षेची काय शाश्वती ? । विश्वस्ताची फिरली मती । फिरविण्या पाठ मिळाली संपत्ती । माहिती 'त्यांना' देईलं ।। ११७१ उंबरठ्याआंत ठेवला । ऐसा कैसा 'देव' भजिला, पूजिला । जर नाही अवडंबरे प्रदर्शिला । कळावे कसे वस्तींत ?।। ११७२ आम्हा सोडवा, करा मोकळे । बेड्या न चढवा बळेबळे । जत्रा उत्सवांचे सोहळे । वृथा भोग, शीर्षशूळ ।। ११७३ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १४-१०-२०१५ बुधवार साठी अरूपासि कसले अस्तित्व ?। 'मनासि दिसते' ? कल्पना भ्रामक । 'दावा आम्हासि!' म्हणतां कारणे अनेक । सांगती 'अध्यात्म'वादी ।। ११७४ 'जाउन एकांती,तप:श्चर्या करा, । ऐहिकाच्या मोहासि मारा । उपदेश ऐका, पण श्रध्दापूर्वक भरा । झोळ्या आमच्या नेमाने' ।। ११७५ न जमले, चिंता सोडा । सज्ज पाप-पुण्य व्यापारा । खर्चीला कांही आम्हाला मुद्रा । लुटा सुख बिनघोर !।। ११७६ उगा का म्हणावे 'माया' ?। कसब लागते तंत छेडाया । अंगुलि अग्रभागी जपाया । कष्ट प्रारंभी बहु ।। ११७७ सवयीने सुयोग्य कठोरता । कराग्रा कालांतराने लाभता । तंत स्वरांकित सहज होता । समाधी, साक्षात्कार ।। ११७८ विविध रंग फिरता अति वेगे । शुभ्राचाचि भास राहतो मागे । हे सारे विज्ञानयोगे । जाणती सहज बालकेही ।। ११७९ विश्व सारे विज्ञान भारितं । 'माया' संबोधिणे नाही शोभत । तेचि सत्य जगरहाटींत । प्रमाणींत संशोधनोत्तरी ।। ११८० अनाकलनीय म्हणजे कां माया ?। कळोनि रिचवा-पचवाया । तयार असावे मन-वाचा-काया । भ्रम सारे निवारण्या ।। ११८१ राजकारण, व्यवसाय । निरुद्यागेयासि 'तरणोपाय' । 'पोटभरि'साठी खेचिती पाय । मतदारांचे, कर्दमांत ।। ११८२ सत्ता, संपदा येते, जाते । जाणती कलाकार, गुंड, नेते । टांगती तलवार देते । डोक्यावरची.. भान सदा ।। ११८३ अदृश्य झाले गाड्या-घोडे ?। परत ठोठवा कवाडे । अश्वासनांचे दावून गाठोडे । भीक मागण्या मतांची ।। ११८४ कोण कसा कधी फिरेल । मन, बुध्दी विचलित होईल । शत्रूचेही गोडवे गाईल । निसर्ग जसा अवकाळी ।। ११८५ कोणाची कोणाशी युती । कोण जाईल कोणाच्या सांगाती । सदासर्वदा मनांत भीती । सर्वसामान्यपणे ।। ११८६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १५-१०-२०१५ गुरुवार साठी आवरा आवरा शिष्य'गण' । दावितांति अवलक्षण । संतोपदेश, कर्मयोगि विलक्षण । भाकड भरुनी वितरती ।। ११८७ सांगतील अतर्क्य कर्मकांडे । 'ना तर जालं नरकाकडे' । वेळीच घालण्या साकडे । मुद्रा' म्हणती, 'टाका ओंजळींत !' ।। ११८८ ऐसा चाले व्यापार । पुण्याचि भरण्या घागर । जिथे असते प्रार्थनाघर । श्रध्येय इष्टाचे ।। ११८९ तबके, नारळ वा चादरी । वाढविण्या, चढविण्या करती वारी । पिंडीसमोर वा पीरावरी । नेमाने ! दुर्लक्षुनि कर्मधर्म ।। ११९० ऐशांस कैसे समजावावे ?। उपाय कोणते योजावे ?। ज्यायोगे निरसन व्हावे । अंधश्रध्दांचे ?। ११९१ परंतु परंपरावादि कर्मठ । बसले कवटाळोनि 'कुबट' । प्रतिष्ठापोनि 'जाल'मठ । वारावे कैसे ।। ११९२ सोडावे लागेल अहिंसातत्व । तुकोब्बांचे स्मरोनि 'अभंग'त्व । लाठीधारी नेतृत्व । लागेल स्वीकाराया ।। ११९३ दहा महिने पूर्ण झाले । जे मानसी संकल्पिले । पूर्णत्वास नेण्यास,आपुले । साहाय्य मागितो पामर ।। ११९४ धाडा 'समर्थ' एक ओवी । त्या आधारे वाटते चढावी । शतके बारा ! अर्पावी । घोषित, 'इदं न मम' ।। ११९५ लावोनि उत्तम 'व्यसन' । मागे सरणे, दुर्लक्षुनं । चक्षु देवोनि विलक्षण । नका झाकूं 'दृष्टि' माझी ।। ११९६ दहा मास अति दाहक । थंड गारवा शिडकला 'पावक' । ऊर्जा आंच आनंदोद्भावक । लेखनाची ! अनुभविलि मियें ।। ११९७ वेदनाशमनार्थ फुंकर । जो घालितो, जावा न कधीच दूर । स्वार्थी जरि 'असला' विचार । प्रामाणिक परि, जाणा ११९८ भवतालचे दु:ख, विवंचना । अस्वस्थता हरघडी मना । 'स्व'त्वास देण्यास दाना । ओंजळींत घेतले म्या ।। ११९९ प्रेरणास्रोत प्रवाही, 'समर्थ' । ठावके नाही, कितिसा सार्थ । ओहळ ओढाळ अंतर्मनांत । उचंबळला जो ।। १२०० ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १६-१०-२०१५ शुक्रवार साठी ।। दास-वाणी ।। देव अनुकूळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवाब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/२३ ज्याला परमेश्वर अनुकूल होत नाही त्याने विचारपूर्वक आपली कृत्ये आठवावी. पूर्वजन्मातील पापकर्मेसुद्धा या जन्मी दुर्दैव म्हणून येऊ शकतात.अशा जीवाला संसारसागर तरून पलीकडे मो्क्षाच्या तीराला पोहोचता येत नाही.आत्मस्वरूपाची भेट न घेताच मृत्यू पावतो म्हणून समर्थ त्याला आत्महत्यारा म्हणतात. या जन्मातील आपले कर्मस्वातंत्र्य वापरून जो दुष्कृत्ये टाळून सत्कर्मे करीत राहील त्याला कालांतराने मोक्ष निश्चित आहे . ************** स्वतंत्राने कसेही वागणे । म्हणजे इतरांसि लोटणे । पारतंत्र्यात ? आणि दुर्लक्षिणे । कामना त्यांच्या ? अश्लाघ्य !।। पै पै करुनी अल्पसंपदा घडवंचीत । कामास जी येइल संकटांत । दानासाठी ती स्वहस्ते खर्चीत । जाणे ! अस्तुरीस कष्टप्रद ।। ऐसे भाबड्यांसि लाविती भजनी । 'साधू'न संधी लुटती सोने, नाणी । म्हणती, 'अर्पिण्या, 'त्या'च्या चरणी । न दिसे, जो ! भेटणे दूरचि ।। भरभरूनी लेकरे, वृध्द बापे बाया । म्हणती 'चला दर्शन घ्याया' । गर्दीत मरती चेंगरुनि पोरे, जाया । बेफिकिरीची परिसीमा ।। यात्रा तीर्थाटनासि जाती । प्रवासांत अपघातग्रस्त होती । अनुकळण्या त्यास संधी न देती । आत्महत्यारी ॥ कोणता येतो देव ?। जो देऊन अमृतानुभव । परतोनि संसाराचा भव । असंभव जो दावेल ?।। दयार्द्र ओढिती कलेवरे । परिचर, औषधोपचारे । बेशुध्द आपदाग्रस्तासि वाटावे बरे । म्हणुनी झटती अहर्निश ।। कोण करंटा होतो सिद्ध । मतिमंद भक्त निर्बुद्ध ? की जो करण्यात मग्न प्रबुद्ध । 'त्या'च्या भक्तास ?॥ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १७-१०-२०१५ शनिवार साठी बालपण विखारू नका त्यांचे । शिकवतीलचि प्रसंग अनुभवाचे । सांगोनि 'भीषण' भविष्याचे । हिरावू नका आनंद ।। १२०१ वारसा देता तुम्हीचं ना ?। मग कशास करिता 'सावध' मना ?। रुजता, फुलता, फळतांना । हर्ष कल्लोळी लोळू द्या ।। १२०२ उद्याच्या दु:ख, वेदना । सांगा, चुकल्या कधी कुणा ?। आणि वारण्या त्यांना । 'बलवंत' ते होतील ।। १२०३ नका करू फार चिंता । प्राक्तनांतली सुखे, व्यथा । 'परतविण्या अरिष्टा, चालवा हाता' । शिकवण द्या कष्टांची ।। १२०४ हरळीवरच्या सुखद वाटे । कशास त्यावरचे दावता काटे ?। सुखी पैरण सहज कुणा भेटे ?। विचारा मनासी ।। १२०४ *********** ।। दास-वाणी ।। मृत्तिका खाणोन घर केले । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें । परी तें बहुतांचे हें कळलें । नाहीच तयासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/१०/३४ अगदी खोलवर पाया खणून उंच च्या उंच घर बांधले .माझ्या कर्तृत्वाने ते बांधलय असा अभिमानाने दृढनिश्चय केला. ऐटीत राहू लागला . त्याच घरात कालांतराने उंदीर ,घुशी ,पाली ,डास ,ढेकूण इ अनेकजण राहायला आले . कितीही काळजी घेतली तरी ते पूर्णपणे जाईनात . माझे घर असा शंख केलात तरी त्यावर अनेकांची मालकी असते . मी म्हणजे अहंकार . ममत्व म्हणजे माझे माझे . या दोघांचा त्याग म्हणजे परमार्थ . *************** घरगृहस्थी, संसार वाढवितो । सुख-दु:खे झेलोनि परतवितो । कोण स्वान्त:सुखाय जगतो ?। एकलकोंडा ।। १२०५ निसर्गाने दिले अनमोल जिणे । हिंस्र, जीवजंतू, जित्रापासह जगणे । 'घर' सर्वांचे स्वाभाविक होणे । अनिवार्य ।। १२०६ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक १९-१०-२०१५ सोमवार साठी सद्यकाळांत, कोणत्याही धर्माच्या आचरणाकडे, त्यांतल्या सदुपदेशाचा, सद्भावन्चा उपयोग, अवलंब ज्या प्रकारे, कर्मठांच्या सोईच्या वाटेवर वळविला जातोय, ते पाहून मन खंतावतं ! धर्म ! असतो कष्टकऱ्यांसी ?। धर्म ! असतो आपदा, हर्षोल्हासासि ?। धर्म ! असतो परमार्थासी ? जाणा फोलपण धर्माचे ।। धर्म ! म्हणजे मंत्रोच्चार ?। धर्म ! म्हणजे पूजा, पाठादि अवडंबर ?। धर्म ! म्हणजे रक्षा, रुद्राक्ष, भिक्षाज्वर ?। दुर्लक्षिण्या आप्त स्वकीय ?।। धर्म ! मेघांचा, बरसणे !। धर्म ! तरुवरांचा, छायाकारणे । धर्म ! वायूचा, पुनरुज्जीवन संभवणे । निसर्गांत ।। धर्म ! विरावा कर्मकेंद्री । धर्म ! विझावा सहृदयांतरी । धर्म ! विरघळावा खडिसाखरेपरी । मनुष्यतत्वांत ।। धर्म ! लीनतेचे व्हावे वर्म । धर्म ! हीनतेचा व्हावा तम । धर्म ! माणूसकीचा उद्गम । व्हावा धरेवर ।। धर्म ! विद्वेषाचे कारण । धर्म ! झगडे, तंटे, युध्दांसि आवतण । धर्म ! सामान्यांचे मरण । सत्य हेचि अंतिम ।। धर्म ! रक्ताचा कोणता, धमनींत ?। धर्म ! शक्तीचा कोणता, शौर्यांत ?। धर्म ! भक्ताचा कोणता, प्रार्थनास्थळांत ?। वेगळी जरी श्रध्देये ।। धर्म ! उत्सव, बेहोषीस कारण । धर्म ! वादळे, संकटांना कां ना कारण ?। धर्म ! कर्पूरासम शुध्दिकारक प्रमाण । कां न व्हावा ज्वलनोत्तरी ?।। धर्म ! का न व्हावा वात्सल्य, माया । धर्म ! का न व्हावा, शहारणारी काया। धर्म ! का व्हावा, अडथळा पाया ?। होवोनि बेडी ?।। धर्म मानतो निसर्गखुणा । धर्म सांगतो 'श्रध्येये तीच जाणा' । 'धर्म' आरडत घालिती धिंगाणा । पार्थिवांशी घालीत सांगड ।। धर्म ! उपजीविकेचे साधन । धर्म ! विरंगुळ्याचे क्षण । धर्म ! न उधळावा बेभान । ही अल्प अपेक्षा ।। धर्म ! कोसळतो भक्तांवरी । धर्म ! जाळितो भक्तांच्या जमाती । धर्म ! चेंगरून मरती, तरि कवटाळिती । भाबडे भयभीत ।। धर्म ! दावितो सदैव भीती । धर्म ! अडसर 'माणूस'कीं प्रति । धर्म ! कर्मठांच अतर्क्य नीती । विना अपवाद जगभरी ।। ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २०-१०-२०१५ मंगळवार साठी कर दोन्ही, उर्जास्रोत । जोडोनि तळवे एकवट । अखंड असावे कार्यरत । अभावदेवा दुर्लक्षुनी ।। १६१६ विखूरले, विसविशींत ऊर्जास्रोत । तंत्रज्ञानें केले जर संपृक्त । पुराण, इतिहास होईल ज्ञात । दृक्श्राव्यांतुनी ।। १२०७ ऊर्जाचि केवळ अखंड अमर्त्य । अस्तित्व तिचे विविध रूपांत । पंचमहाभूती सर्वांगांत । विघटित वा एकवट ।। १२०८ जे दिसते ते आहे अथवा होते । अवकाशस्थांचे सत्य विज्ञान सांगते । परावर्तित प्रकाशयोगेचि असते । वा भासते, 'अस्तित्व' ।। १२०९ प्रकाशवर्ष, 'महा'कालगणन । प्रवास प्रदीर्घ, अगम्य विलक्षण । दृष्टिपथांत तेजोकिरण । येता ! म्हणा 'आहे तिथे' ।। १२१० परंतु जाणा, तो केवळ भ्रम । 'आहे'चे प्रमाण दूरस्थ तम । मोजण्या अपुरे, अक्षम । प्रगत तंत्रही ।। १२११ गुन्हा न केला तरी दाखल । गुन्हा केला तरि ना दखलं । ऐसे सत्ताधारी गुंड नि रक्षकदल । जगावे सामान्याने कैसे ।। १२१२ आत्महत्या जर झाली सफल । मरत जगण्यातुन सुटालं । पण जर प्राक्तनें अर्धमेले सापडाल । तर मारतील जगतांना पुरते ।। १२१३ काय फ़रक पडतो 'त्यांना' ?। कशास सोडतील सिंव्हासना ?। नशेंत सत्तेच्या असतांना । ज्ञानेंद्रिये मृतावस्थ 'त्यांची' ।। १२१४ वयांत येता जडतो जीव । प्रेयासाठी सर्व हावभाव । हसणे, झुरणे, रडणे प्रभाव । दाविती उत्कट काळी ।। १२१५ मग बोहले, बाशिंग, चौघडे । नवे पर्व जगण्यांतले वेडे । संसारवेलीवर गोंडस बछडे । आनंदकंदा ना पारावार ।। १२१६ अन्न, वस्त्र, निवारा या गरजा । पुरविता ओहोटीस लागते 'मजा' । 'फक्त आतां तू राणी, मी राजा' । शब्द विरती हळूहळू ।। १२१७ कालांतरे पालथे होते । घरभर छकुले रांगू लागते । पडते, झडते, खट्याळी दाविते । प्रेमपात्रास मात्रा वात्सल्य, ममतेची ।। १२१८ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २१-१०-२०१५ बुधवार साठी 'घर' होते आप्तांच्या हृदयी । पोरे, अस्तुरि, माय-बापा ठाई । चार भिंती, छप्पराखाली डोई । बांधण्या क्रमप्राप्त, मृत्तिकाखनन ।। १२१९ घर ! दोघांचे ? नाही राहात । घर ! प्रार्थना, परवचादि संस्कारस्रोत । घर ! अबालवृध्द आप्तांसमवेत । सजविण्या, शमविण्या सौख्य, आपदा ।। १२२० घर ! मृत्तिकेंत तुलसीबीजं । घर ! शेंजेवर शांत नीजं । घर ! बंधन सिंधुचि अखंड गाजं । गृहस्थाश्रमी ।। १२२१ नका दृष्ट लावू त्यांसी । एकरूप झाले संसाराशी । हसत सदा राहू दे मानसी । 'विरक्ती, अध्यात्म' लादू नका ।। १२२२ करंटी दांपत्ये ऐसी कैसी । जीव जन्मासि अजाणता घालिती ?। पोरके सोडोनी दूर जाती ?। अश्राप, मुक बिचारे जीव ।। १२२३ शोधत हिंडावे लागते त्यांना । माया, वात्सल्य शांतवना । लपवावी की दाखवावी कोणा । आसवे, जैशा पागोळ्या झडीनंतर ।। १२२४ शिष्याची मानसिकता । नेहमीच धारावी कार्य करिता । काय शिकवेल, कोण नकळता । कोठे, कधी अनिश्चित ।। १२२५ कर्मेंद्रिये कार्यरत असतां सगळी । ज्ञानेंद्रीये ठेवावी मोकळी । अतिरिक्त, भरावी मगज पोकळी । ताज्या, नव्या जाणिवांनी ।। १२२६ श्रवण, मनन, अध्ययन । अखंड करावे ज्ञानार्जन । तदनंतर अनुभव कथन । करणे, शोभते ज्येष्ठांसी ।। १२२७ संकलनापूर्वी टिपण । क्रमवारीने प्रसंगांचे लिखाण । ऐसा संकेत सर्वसाधारण । असावा साहित्य निर्मितींत ।। १२२८ तसे पाहू जाता । कोण जगी सर्वज्ञाता । जो समजेल 'झालो आतां' !। मृतचि जाणावा ।। १२२९ ज्यांस सर्वज्ञान मिळेल । जो स्वर शुध्दोत्तम गाईल । कसब लंघोनि जाईल । इहलोकी राहात नाही ।। १२३० म्हणोनि जाणावे अंतरंगी । न वागा-बोलावे अतरंगी । सर्वसुखप्राप्त असा जगी । ना ठावके, कोण झाला ।। १२३१ ************* अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २२-१०-२०१५ गुरुवार साठीविश्लेषण, समीक्षा, मर्मभेद । चिकित्सोत्तर, विद्वानांशी वादविवाद । चर्चा प्रेक्षकाभिमुख मग सुबोध । अजमाविण्या परिणाम ।। १२३२ सारे अखेर लक्षितांसाठी । विद्यार्जन, अध्ययन करिति बहुपाठी । अर्काच्या मात्रा शेवटी । उतरावावया कंठांत ।। १२३३ प्रत्येकाची कर्मकथा, प्रवास वेगळा । हुरहुर, आपदा, आनंद आगळा । तरि सामान्यतः सगळा । सरिखाचि 'मनुष्य' ।। १२३४ अंगण सारवुनि सड़ा-शिंपणं । उष:काली रंगावली रेखुन । उडळुन ज्योतीने, वृंदावन। वंदन करुनि परतसे ।। १२३५ वेणी- फणी, मुखमार्जन । आन्हिके उरकोनि अभ्यंग स्नानं । मन:शांतिस्तव योगाचरण । करोनि, जुंपतसे संसारा ।। १२३६ नियोजन, पुरवठा, प्रक्रिया । स्वयंपाक आप्तांसि सुखवाया । नित्यनेमाने अविरत काया । झिजविते, सुगृहिणी ।। १२३७ पति-मुलांची मग पाठवणी । वृध्दांची दुखणीबाणी । कुणा औषध, कुणास पाणी । दुर्लक्षुनि देतसे स्व-व्यथा ।। १२३८ सहज सरते दुपार । करिता झांकपाक, आवरसावर । दोन पळांच्या विश्रामास प्रहर । शोधता होते दमछाक ।। १२३९ संध्याकाली निरांजन धूप । श्लोक, परवचादि संस्कार प्रदीप । मुलांसि ! मग दृष्टिक्षेप । पतीकडे, प्रेमभरे ।। १२४० हा खरा कर्मयोग । आप्तांसि देत सुखोपभोग । दावाया हिला 'अध्यात्मिक जग' । 'पळपुट्यां'नो, धजू नका ।। १२४१ सारेचि कां अवतरले पळपुटे । म्हणति, मी परमारार्थाकारणे झटे'। सोडोनि घरे, तोडोनि नात्यांते । 'भोगोत्तरी' संतपद ?।। १२४२ त्यांचेही असेल कांही म्हणणे । रोज रडत जगत मरणे । दर क्षणी पावकाशी लढणे । होत असेल असह्य ।। १२४३ म्हणोनि सुखवाया पळभर । अवलंबित पति-पत्नि परस्पर । बेभानी, नशा, नेते उंचावर । जातो सहजचि तोल ।। १२४४ कोण एक शुक्रजंतू । बीजांडांत पाहातो रुतू । कदाचित विनाहेतू । जाते घडोनि निमिषांत ।। १२४५ *********** अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक २३-१०-२०१५ शुक्रवार साठी दुर्भागी साकारतो जीव । विनाकारण, कार्यभाव । पदरी भविष्याचा अभाव । घेवुनि सडत पडत तडफडतो ।। १२४६ दोघे पांगती दोन दिशांना । 'लग्न' संस्था, वचनांना । चुरगळून, तोडित नाळ ।। १२४७ एवढं सगळे करुनि सायास । जन विचारिती 'काय करतेस ?'। संसारासि 'काम' मानावयास । जडावते मन त्यांचे ।। १२४८ ************** ।। दास-वाणी ।। जेणे जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयास नाही कामना । जयास नाही कामना । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/५६ ज्याने सर्व प्रकारच्या चवींवर विजय प्राप्त केलाय. खाण्यापिण्यातले हवे नको संपून गेलय .जीभ हे ज्ञानेंद्रिय तसेच कर्मेंन्द्रिय ही आहे म्हणून ज्याचा बोलण्यावरही ताबा आहे. वासना म्हणजे अपूर्ण इच्छा . कामना म्हणजे वासनांचे प्रकटीकरण . जो पूर्णतृप्त म्हणजे निर्वासन झालाय . इच्छाच संपवून टाकल्याने जो निष्काम झालाय तो खरा सत्वगुणी . ************* कशास करिता खटाटोप ?। कामनांना द्यावया निरोप । श्रमले, कष्टावले रूप । जनांचे न दिसें ? आंधळ्यांनो ।। १२४९ अविरत उपदेशांचे जंजाळ । सामान्यांसि सदासर्वकाळ । दावोनि, 'आपत्तीचे मूळ, । पाप पूर्वजन्मिचे' बरळता ? ।। १२५० सहनशीलतेलाही असतो अंत । स्मरण, संतां'नो, राहू दे मनांत । करतील, करवतील आकांत । दंड, भेद अवलंबुनी ।। १२५१ राम ! मनुष्यत्वाचा आदर्श । म्हणवित त्याचे 'दास' । सुखाचे चार घास । सामान्यांचे कां गिळता ?।। १२५२ खरेच वदला हे, सांगा, तुम्ही ?। विश्वास कैसा राखावा मनी ?। 'बोघ(?)' अतर्क्य दूर ठेवोनि । पळू पाहतिल लक्षिते ।। १२५३ वारंवार छळदायी ठरते । ठेवा हृदयी तुमच्यापुरते । किंवा मूर्ख, भाबड्या श्रवणार्थे । अध्यात्म, मोक्ष, गत्यादि भाकड ।। १२५४ नका आणु आतां दृष्टीपुढती । मोक्ष, उपास-तापास, भक्ती । आमुच्यापासोनि निवृत्ती । घ्या, भले जर असला ! ।। १२५५ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २४-१०-२०१५ शनिवार साठी निर्गुणाच्या शब्दांगी 'गुण' । म्हणजे नाही त्यासि वेसण । असले अनाकलनीय येडेपण । कां बा करिता ?।। १२५६ 'सगळे' म्हणतां, 'त्यागावे' । अन् भजन तुमचे आळवावे । आळवावर 'पत्र पतितं तोयं' पाहावे । पाऱ्या-वाऱ्यासारखे नश्वर ?।। १२५७ हाती घ्या तरवारी, भाला । मज पाप्यावर घाला घाला । 'मोक्ष' शतप्रतिशत तुम्हाला । जर हवा मरणोत्तर ।। १२५८ फाडुनि कोल्हे, कुत्री पार्थीवास । खातिल क्षुधाशमनार्थ । पाहण्या सोहळा तो खास । आवंतण धर्ममार्तंडांसि द्या ।। १२५९ संधी तुम्हसि मिळेल 'कुंभां'त । नग्न निर्लज्जांच्या मांदियाळींत । पाडा, तोडा, ओढा फररटत । भक्तांसि करमणूक पळभरी ।। १२६० लावणी जैसी शृंगारिक । ओवी जैसी भक्तिभावजनक । शब्द जैसै विविधभावांचे दर्शक । तैसे आम्ही जाणिजे ।। १२६१ वृध्दापकाळी आपोआप । निवृत्ती उघड़ते झाप । वासनांना लागते झोप । झेप नष्टत्वाकडे घेता ।। १२६२ सेवा निरपेक्षपणे करिती । परि कोठेही न 'झळकति' । ना कधिही कार्याची मागती । पावती कुणाकडे ।। १२६३ 'कर्ते'अनेक ऐसे ठाई ठाई । दख़ल कोणी जरि घेत नाही । वंचितांप्रति कार्यप्रवाही । लंघून जाती कल्लोळ ।। १२६४ ना याचना ना मस्ती । केवळ समाजकारणी प्रवृत्ती । आधी याचना मग मस्ती । दृश्यमान 'राजकारणी' ।। १२६५ शासनानुदाने सुखावती । पुलाव-पुऱ्यांनी क्षुधाशांती । धाक-दपटशा जनतेप्रती । 'पाळलेल्या' गुंडांचा ।। १२६६ संघ, शाखा, परिषदा, मंडळे । अनुदानासाठी खटाटोप सगळे । मंत्री, संत्री मान्यतेसाठी वेगळे । निकष लाविती सोईने ।। १२६७ मग कशाला मागतील हिशेब ?। मांडवली, सारवासारव आपोआप । विरोध, मतभेद पावती लोप । मिळतां खिरापत सर्वांना ।। १२६८ कधि अस्तुरिची प्रतारणा । कधि पति'राज' हाणती वाहाणा । कधि आप्तां(?)ची लुडबुड बुडविण्या । संसार 'लाडक्या'चा भवसागरी ।। १२६९ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २६-१०-२०१५ सोमवार साठी कधी अपुरा अन्न, वस्त्र, निवारा । भाग पाडे पोरके करण्या पोरा । संकटांचा वादळवारा । असेल होत कारण ।। १२७०तरिही ऐसे कैसे निर्दय । होती पालक, बाप-माय । रक्तवांछित होत नाही हृदय ?। हात छकुल्याचा सोडतांना ।। १२७१ कधि जन्मत:च व्याधिग्रस्त । छकुल्याचे हाल वाढतांत । दारिद्र्याने आधीच त्रस्त । नाइलाजे त्यजून त्याना, सोडिती ।।१२७२ कसले शासन कसली व्यवस्था ?। कोण जाणते ऐसी दुरवस्था । प्रजा वाढवी तरच सत्ता । मतपेटीद्वारा ! 'त्यां'ची स्वप्ने ।। १२७३ भक्ती ! केवळ प्रार्थना, पूजा, आरती ?। भक्ती ! केवळ देते अध्यात्मिक उन्नती ?। भक्ती ! केवळ तोडते नाती ?। गृहस्थधर्माची ।। १२७४ मन ! परजाणिवेपल्याड । मन ! अजोड, बंद कवाड । मन ! टिपण्या, शोषण्या अखंड । अथांग, अनंत पोकळी ।। १२७५ मन ! सहजपणे अप्राप्य । मन ! अवघड, अनाकलनीय, अजेय । मन ! मूलत:, निर्व्याज,निष्पाप । जैसी माती कुंभाराची ।। १२७६ मन ! शोधते सुयोग्य विरंगुळा । मन ! वात्सल्याच्या विविध कळा । मन ! प्रेम, ममताभावे जळा । पांपणीकांठी साकळते ।।१२७७ मन ! असते कर्मनायक । मन ! साधते सारासार विवेक । मन ! मोहक वा भयानक । कल्पनांचे जनस्थानं ।। १२७८ कोणा, 'मानं' हानीची 'सल' । कोणा पाहावेना आप्ताची घालमेल । कोणा गुंतल्या संपत्तीचे मोल । करि अस्वस्थ ।। १२७९ बघा बघा मारेकरी,गुन्हेगार । ज्याच्या नांवाचां जयजयकार । अजब न्यायदानाचा प्रकार । जणु कुतरे मेले पदपथी ।। १२८० 'राम ?' 'शास्त्री ?' नांवे नुसती । इतिहास, बखरी केवळ सजविती ?। अप'मान' झाल्याची पुरती । 'सल' ठुसठुसेल जन्मभरी ।। १२८१ ऐसे कैसे झाले भोंदू ?। नामवंतांचे हृदय, मेंदू । दुष्कृत्यासि पाहती भेदू । दिखाव्यास्तव केवळ ?।। १२८२ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २८-१०-२०१५ बुधवार साठी निरुद्योग्यासि आनंद अनावर । शहर-वाड्या-वस्त्यांभर नवल वर्तेल अवनीवर । गेला जर बेलगाम, उद्दाम, गजाआड ।। १२८३ मने आपली मुर्दाड झाली । घट्टे पडोनि, शिणली, थकली । पराभूत करण्या अनिष्ट 'कली' । झेपावेल कुणि 'वैनतेय ' ।।१२८४ कधी उगवेल तो भास्कर ?। शस्त्रधारी, लेवून पर । आमुच्या आकांक्षांचा आधार । जडावल्या पांपण्या ।।१२८५ उपदेशाचा अतिरेक टाळा । वेळीच स्वत:स सांभाळा । क्रोधाग्नीच्या अन्यथा, ज्वाळा । भिडोनि तुम्हा जाळतील ।। १२८६ भयगंड नका कुरवाळू । हातांतुन गळतेच वाळू । उपासना जपजाप्याकडे वळू । पाहता ! ठरेल व्यर्थ ।। १२८७ जे ठरले आहे होणे । ते अशक्य आहे टळणे । म्हणोनि हिरमुसून बसणे । बरे नव्हे संसारी ।। १२८८ 'कर्मानेच मिळते फळ, । कठोर परिश्रमांची कळ । जीवघेण्या परिस्थितीचा जाळ । सोसावा लागतो त्यासाठी ।। १२८९ एक श्वान बाहेर अंगणांत । एक घरांत खाटेवर व्याधिग्रस्त । करोनि प्रत्येकजण व्यस्त । व्यवस्था, आपल्या पंरीने दोहोंची ।। १२९२ ऐसी अवस्थेप्रत कां यावे । कशास उगा श्वास चालावे ?। काळीज नियमित धडधडावे । अकारण ?।। १२९३ तैसे हे जगणे काय कामाचे ?। विनाकारण भार गृह,धामाचे । क्रूरपण कराल मृत्यूचे । जाणवावे येथेही ?।। १२९४ भूतांनो, नजरे समोर अंधारी । म्हणत, कण्हत चालणे कुठवरी ?। पुरे झाले, वाटे परोपरी । तरि भोगणे ! प्राक्तन ।। १२९५ कधि होईल आनंद-सोहळा ?। जीव पार्थिवापासोनि वेगळा । संपतील अस्तित्वात्या झळा । कुणा ठावे ?।। १२९६ सारे पंचतत्वागाठी । तेच ठरविणार आहुती । कैसी, कोठे विलयांती । द्यायची,आम्हा क्षुद्रांची ।। १२९७ दुराग्रह तरुणाईंत स्थाई । परंतु तिच्यापासोनि सुटका नाही । सिमित ठेवणे श्यक्य होई । मोजक्यांसी ।। १२९८ ज्याने जिंकिला अवगुण । खचितचि जाईल ओथंबुन । हर्षोल्हासाचा श्रावण । वर्षेल सरी सुखाच्या ।। १२९९ दिसो लागला आतां पैल । चित्त, वृत्ती, जाणिवा सैल । सुख, विषाद, वेदना, शल्य । निमाले ! उजळल्या सहस्र ज्योती ।। १३०० *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक २९-१०-२०१५ गुरुवार साठी दान मागोनि थोडेचि मिळते । पसाय, पसरोनि पदराते । जेंव्हा कष्टवावे शरीरांते । प्रसाद कवळाचा, प्रतिसाद ।। १३०१ प्रसाद ! मिळावा काय कारणे ?। प्रसाद ! त्या वाचोनि अडते जिणे ?। प्रसाद ! इतरासाठीही मागणे ?। जोपासणे कृतिक्षती ।। १३०२ कर्मेंद्रिये जर असतील कार्यरत । लक्षित परिणाम कष्टाने साधत । प्रसाद 'कवळ' मुखापर्यंत । सहजपणे येईल ।। १३०३ प्रसाद फुकटा न मागता । वृत्तींत रुजवा कार्यप्रवणता । 'आळस' व्यसनाची दाहकता । जनसामान्यांना घातक ।। १३०४ 'दान' 'नमोजि आद्या'स मागावे । 'माउलीं'नी वाटले, सद्भावे । अपेष्टा पाहाता हृदय द्रवावे । ऐसा बालयोगी, निष्पाप ।। १३०५ विषहि पचविले स्नेहार्द्राने । बोचरे बोल ऐकविले प्रतिष्ठानें । निष्ठा, निरागसता, निर्मळता प्रतिष्ठेने । रुजविली, जोपासली,सत्कर्मांत ।। १३०६ रेटत दररोजचे जिणे । कालापव्यय नामस्मरणे । 'प्रसादा'ची प्रतीक्षा करणे । 'जन्मा'वर अन्याय ।। १३०७ भक्ती, जपजाप्य उपासना, । ठावके एवढेचि होते भाबड्यांना । भिक्षा मागोनि उदरभरणा । न वाटतसे लाज ।। १३०८ 'माउली'स ज्ञात नव्हते । फुकटखाऊ, मिळण्या आयते । सोकानलेले बोके होते । संधी ऐशा शोधीत ।। १३०९ बाहेर प्रतीक्षेंत प्रार्थनास्थळी । भाबडेयांची जिथे मांदियाळी । 'दान देउनी भरतिल झोळी । खचितचि' वदति विश्वासें ।। १३१० जे वांछील ते त्यां मिळेल । रंध्रांतुनि जर स्वेदगंगा वाहील । म्हणे 'हरी खाटल्यावर देईलं' । 'पसायदान'भक्त, जाणा ।। १३११ 'तुक्या' संसार अविचारे सोडोनी । लागला 'इट्या' च्या भजनी । श्वापदेसुध्दा अपत्ये पत्नि । नाही वाऱ्यावरी सोडतं ।। १३१२ त्यजिला संसार जयाचिये आवडी । त्याने भवसागरी कधि कावडी । वाहोनि, जपली शेतीवाडी?। कैसा ? ज्यास ना अस्तित्व ।। १३१३ *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३०-१०-२०१५ शुक्रवार साठी नेमेचि येती निवडणुका । देता-घेता आणा भाका । टाहो फोडून घालिती हाका । 'उमेद'वार' ।। भाद्रपदांत अतर्क्य साटी-लोटी । अश्विनांत आश्वासनांना भरती । जेत्यांचे अश्व मग उधळती । ऐसा यांचा नित्य नेम ।. आघाड्या-युत्यांचे फोल संकल्प । माध्यमांस बातम्या खूप । यज्ञांत या बंडखोरीचे तूप । अराजक चहूकडे ।। मतदार सामान्य गरीब । धरूनि आकांक्षांचे सुंभ । परि नेत्यांचे आसन-वालभ । कैसे याला कळावे ।। आतां मात्र अती झाले । हताश अश्रूही सुकून गेले । मनांत , नजरेंत अंगार फुलले । सावधान 'पक्षां'नो ।। कोंडीत सापडली मुंगी । प्रस्तरासही ती भंगी । समूहाची शक्ती अपार अंतरंगी । जरि नसे बळ नसे बाहूंत ।। हिमरूप धारिते जेंव्हा जळ । कठोर कुठार धारदार, सहस्र गजबळ । सहजी भंगीत जलनिधि कल्लोळ । अवतरे भाग आठवा ।। १६३९ वरकरणी प्रवाही निर्मळ । निर्झरी नितळ स्वच्छ जळ । परि तळाशी साचतो गाळ । जैसी परमार्थोत्तरि उद्विग्नता ।। १६४० सुज्ञ सुजाण नेत्यांनो । तरुण तिकिटधारींनो । शिक्षित सुसंस्कारी जनांनो । मनाशी बांधा खुणगांठ ।। ओळखा काळाची पाउले । दिसती जे लटकलेले । तन-मन यांचे कुजलेले । राहा सजग सदैव ।। राष्ट्रपित्याची सरली जयंती । उरले निर्माल्य पुतळ्याभवती । ओवाळण्या आरत्या स्वत:भोवती । पळू नका निर्लज्जांनो ।। निवडणुकांची रणधुमाळी । साम दाम दंड भेदादि खेळी । मतदारांच्या मात्र कपाळी । वाट कांटेरी नित्याची ।। मतांसाठी रस्सिखेच । घालिती एकमेकां पेच । ओढण्या लाल दिव्याचा शिरपेच । उतावळे 'निवडक' ।। कोट्यवधींच्या लागती बोली । जरि विकासकामे रखडलेली । मरो जनता रडवेली । ऐसे हे मत्त-धुंद ।। कोणी घालिती गालिचे । बेबंद हिंडती राजकीय चांचे । कुणा घरी पाय कुणाचे । संभ्रमावस्था *********** अरुण काकतकर. ।।भक्तिबोध।। दिनांक ३१-१०-२०१५ शनिवार साठी पोटावर हात ठेवोनी । मुख सताड उघडोनी । लांब पाय पसरोनी । बसल्याजागी निद्रिस्त, तो आळशी ।। १३१४ मुखावरची माशी न वारे । चिर्रविचित्र ध्वनि करित घोरे । जगण्यांतल्या अमूल्य मारे । वेळेस ! तो आळशी ।। १३१५ सांगो जावे कार्य कांही । कधीच नाकारित नाही । प्रत्यक्षांत टाळू पाही । सबबी देत ! तो आळशी ।। १३१६ दोन वेळा भरपेट । न चुकता अन्नग्रहण करित । हालचाली पासोनि मुक्त । ठेवितो, तो आळशी ।। १३१७ जो आयतखाउ सोकावला । ज्याने कार्यभाग नाकारला । विकृत व्यसनांच्या आहारी गेला । खचितचि जाणा, तो आळशी ।। १३१८ ऐशांसि करावा प्रतिबंध । विवाहोत्तर नाते संबंध । जोडण्या ! करावा प्रबंध । ठेवण्या दूरचि त्यासी ।। १३१९ अग्रभागी ? चर्चेंत केवळं । किंवा सामान्यत: मुखदुर्बळ । कार्यप्रवणतेस कैसे बळं । मिळावे यांना ?।। १३२० आर्त विश्वाचे रिचवुनी । प्रदीप्त तर्क-बुध्दी करोनी । गीतासार सामान्य जनी । रुजविले योग्याने ।।१३२१ हाच होता अज्ञानाचा 'रेडा' । श्रवणेंद्रियांना देउनि वेढा । स्वर्णानुभवाचा ! उध्दरिले मूढा । श्वासागणिक योग्याने ।।१३२२ योगी ! वैश्विक ऐसा असतो । योगी ! परमार्थासाठीच जगतो । योगी ! स्वत्व क्षणोक्षणी विस्मरतो । म्हणती 'माउली' त्या कारणे ।।१३२३ ना एकही कठोर व्यंजन । उक्त ओवी, मृदु संभाषण । दृष्टांत-रूपक-उपमादि अलंकरणं । 'मराठीच्या बोलू' ममत्वे केले ।। १३२४ धर्माचरण, माणूसकी विरहित । कर्म-कठोर रूपे होती, भिंत । स्वार होवोनि, निमिषार्धांत । निवृत्ति-ज्ञान-सोपान-मुक्ते चालविली ।। १३२५ प्रामाणिकासि घाला आळा । भ्रष्टाचार जपा, सांभाळा । तोच तारून नेतो कठिण काळा । 'तत्व'ज्ञान सद्यकाली ।। १३२६ प्रामाणिकासि काय मिळते ?। प्रामाणिकासि केवळ सत्य कळते । प्रामाणिकासि कधी न फळ ते । लाभते सहजी ।। १३२७ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०२-११-२०१५ सोमवार साठी प्रामाणिक ? वेडा रे वेडा । प्रामाणिक ? झारींतला खडा । प्रामाणिक ? उघडा पाडा । जोपासण्या दुष्कृत्ये ।। १३२८ सहज सद्भावापोटी। परिवार, आप्तेष्टासाठी । सत्कृत्ये कोटिच्या कोटी । घडूं नये, कां ? सांगा ।। १३२९ कशास, बैठकीस गिरद्या गाद्या । लाजविति ज्या मारेकरी गारद्या । खंडोनि सत्कर्मांच्या नद्या । 'आलस्य' बेटे निर्मिती ।। १३३० जळ उधळे तुषार, बिंदुरूपे । तेजोशलाका किरणरूपे । समागमे प्रसवती रंगरूपे । शतछटा सजविती ।।१३३१ संतपदाची प्राप्तोनि गादी । सुकर्म ? नाइलाजे उपाधी । ऐसे झाले या आधी । बहुतवेळा ।।१३३२ कुणा 'बाबा' चा छकुला । जन्मला उध्दरण्या सद्यकाला । डिंडोरे पिटोनि म्हणति झाला । 'बालयोगी' ! मूढ खुळे ।। १३३३ गांगरोनि जाय बालक । झुंडी लोटता हेतुपूर्वक । फळे-फुले-मिष्टान्न-उदक । वाहण्या त्यां 'चरणी' ।।१३३४ हे तर सर्वज्ञात विज्ञान । अशीच खेळती मने, मन । द्वेषा पासोनि प्रीतिची जाण । मग तमगर्भी इंद्रधनू ।।१३३५ लांगूलचालन अथवा नमन । करो नये अकारण । पारखोनि घ्यावे चरण । स्वाभिमानि सामान्य जनांनी ।। १३३६ चारित्र्याचे वृथा हनन । जोखोनि वरवरचे लक्षण । अंतर्मनाचे बारीक निरिक्षण । कृतीपूर्व करणे अनिवार्य ।। १३३७ मनना आधी सारासार विचार । बोलण्या आधी निवडोनि शब्दभांडार । लिहिण्या आधी आधार । पूर्वानुभव, परिणामांचा घ्यावा ।। १३३८ कोठोनि येते कळेना । स्रोताचा उगम, ठिकाणा । वाटतो कधी 'वेडेपणा' । शब्दकर्दम, छळवादी' ।। १३३९ तेजोशलाकांची कवळिक । जणु अलवार झाला पावक । प्रसन्नवेळी जैसा पाळितो विवेक । प्रमादांप्रति अपत्यांच्या ! पिता ।। १३४० जिगिषा करते मात । सर्व आपदा संकटांत । असेल उर्जा वातावरणांत । घरात, आप्तेष्टांत, सकारात्मकं ।। १३४१ अज्ञातांतुन मूर्तरूप सांडणे । सगुण साचणे, साकळणे । जड होवोनि निखळणे । जाणे, न परतण्यासाठी ।। १३४२ ************अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०३-११-२०१५ मंगळवार साठी अनंताचा एक अंश । न टळतसे कर्मोत्तरी ऱ्हास । जे जे पावते जन्मास । नाश त्यां सोबतीला ।। १३४३ तरिसुध्दा प्रसन्नता । मनास देते उभारी, पाहाता । नित्यनूतन रूपे साकारता । पंचतत्वांची, भवताली ।।१३४४ मित्रा ! दे हात हातांत ! मित्रा ! नको आतां अश्रुपात । मित्रा ! धीराने क्रमणा उर्वरित । करूया ! देत आधार परस्परा ।। १३४५ मी जाणतो वेदना तुटण्याची । अखेरची गांठ सुटण्याची । वस्त्र, विसविशींत भंगण्याची । शांतवन नसे सोपे ।। १३४६ आठवणींच्या मग लाटा । आर्द्र पांपण्या ठेवोनि परतता । हुंदक्यांचा असह्य भाता । अविरत ! आवरणे कल्पनांतीत ।। १३४७ जैसा पुळणीवरी कल्लोळ । निरखुत असते प्रकांड आभाळ । शशि आभावी ओहोटीची वेळ । जाणतो केवळ निसर्ग ।। १३४८ आपण ना संत, शिष्योत्तम, महंत । टाळली अखंड खोटेपणाची संगत । सावरित दु:ख, वेदना मनांत । जिणे झाले सवईचे ।। १३४९ मी मूर्ख ! लाचार शब्दांचा । मार्ग चोखाळितो व्यक्त होण्याचा । जगराहाटींत नाचक्कीची श्यक्यता । जाणेनि आहे मनोमनी ।। १३५० प्रयत्नांची कराल पराकाष्ठा । जागविण्या तेजोरूप निद्रिस्ता । विज्ञानाच्या दाविता चेष्टा । परि मूलस्रोत ? भास्कर ।। १३५१ ऊर्जा अखंड अविनाशी । स्थित विविधरूपे अवकाशी । पंचमहाभूत निसर्गाशी । जीवाचे मैत्र राखिते ।। १३५२ संधिकाली मनांत हुरहुर । शंका-कुशंकांचे काहूर । सयी भूतकाळांत दूरवर । नेती ! दहिवर पांपण्यांत ।। १३५३ ठसे विहंगम पक्ष्यांचे । अवकाशी तोरण नक्ष्यांचे । विलक्षण सौंदर्य निसर्गाचे । रोज नवे, जणु बहुरंगदर्शी ।। १३५४ स्मित ! मनुष्यांच्या लढण्याचे ?। स्मित ! मनुष्यांच्या आपदा-विपदांचे ?। स्मित ! मनुष्यांच्या प्रयत्नांचे ?। लंघण्या सहजी त्यांना ।।१३५५ मनुष्यांच्या संहारक नीतीनं । विश्वासघाताच्या भीतीनं । निसर्गचक्षु हिरवाईचं मन । पर्णपापणी आड, डोळेच अश्रू झाले..।। १३५६ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०४-११-२०१५ बुधवार साठीसुबीज सुभूमींत रुजणे । मशागत,निगराणी करणे । फळाआधी, मोहरणे, फुलणे । कलांतराने ! नैसर्गिक सहजक्रिया ।। १३५७ रंग किती ? विविध छटा !। इंद्रधनूसहि न येती सांगता । कोठे आरंभ वा सांगता । अनाकलनीय, विलक्षण ।। १३५८ अवनी असे सहृदय माय । तुडविती अब्जावधी पाय । ओठांतुनि परि 'हाय' । कोणी सांगा ऐकिली ?।। १३५९ नांगरणी, पेरणी, पुरेसे पाणी । इतुकेचि अपेक्षिते धरणी । बीजास भंगुन अंकुरलेणी । साकारिते म्हणत, 'कल्याणमस्तु ।। १३६० मूळ शोषिते अन्न-पाणी । कोरांटी, कोरफडीच्या पर्णी । कांट्यावरती पुष्पालंकरणी । अलवार होतसे ! किंकारणे ।। १३६१ निषिध्द वा स्वीकारयोग्य । पृथेस नसते कधीच भय । मंदगती वा कुशाग्रमतिमय । अपत्य जैसे मायेसं ।। १३६२ कधि भेगाळल्या दुष्काळाची छाया । कधि पर्जन्याची अपार माया । पंचतत्वांची अमोघ किमया । रचनात्मक वा संहारक ।। १३६३ रोज अनुभवती जन भाबडे । 'कां घडे' पडे जरि कोडे । भोंदूंत्च्या उपदेशांचे कोरडे । कोरडे पाठीवरी झेलिती ।। १३६४ वाहतो तमारि कावड । देह-मनाचे कवाड । उघड ! नाही सवड । तुज अाता दिनभरी' ।। १३६५ घुटमळते उंबऱ्यांत । कार्य ! उरक, जरा पळत । भान ज्ञान-कर्मेंद्रियांत । भरुनि, सजग हो ! मनुष्या ।। १३६६ टळते कां आवर्तन ?। काळीज ? अविरत स्पंदन । पाहिजे तयार मन । गाठण्या 'सम' ! अंत्योदयि !।। १३६७ संपदेचा दुष्काळ । आपदांचे जंजाळ । गिळावया कळिकाळ । सज्ज सदा ।। १३६८ स्थिती कर्मयोग्यांची ऐसी । काडीही न मिळे आधारासी । 'हवा गिळा, जगा, पिऊन उपदेशासी । मरता मरता !' सांगती 'शास्ते' ।। १३६९ 'जे' नाही त्याला जोखू पाहातो । कल्पनेनेचि वर्णन करितो । ब्रह्म 'दावण्या'सि असमर्थ असतो । मात्र लावितो व्यसन ।। १३७० ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०५-११-२०१५ गुरुवार साठी श्रोता हवा जाणकार ?। मग काय मूर्ख कर्मकार ?। कसब नाही नजरेवर । साधते परिणाम ?।। १३७१ जो पाहू शकतो दृश्य । जाणतो त्यांतला आशय । लेख वा बोल ? निरुपाय । ऐशा निरक्षरासी ।। १३७२ एक छानसा दृष्टांत । ओवींच्या पुष्ट्यार्थ । ज्याचे अंतिम फलित । समजेल सहजी ।। १३७३ जलधारांनी, पारदर्शी । प्रतिबिंबांची लेउन नक्षी । विश्वभर होती साक्षी । मार्ग ! ओसरता पर्जन्य ।।१३७४ प्रतिबिंब तसे फसवेची । सत्य नेमके उलटे वेची । स्वमनांत उमटतचे ते चि । खरा ? भास अबोध !।। १३७५ प्रतिबिंबासाठी वृष्टी । आर्द्र ओलेती सृष्टी । चाळविण्या निर्मळ दृष्टी । निसर्गक्रीडा ।। १३७६ दाढी, जटा, झोळी, छाटी । रुद्राक्ष, भस्म कशासाठी ?। क्षुधाग्नी चेतता पोटी । येती कां कामासी ?।। १३७७ अध्यात्म ? केवळ मृगजळ । अध्यात्म ? भ्रमाचे मूळ । अध्यात्म ? निरुद्योग्याचा खेळ । हवेंतला ।। १३७८ अध्यात्म ? कृतिफल मारक । अध्यात्म ? विघ्नसंतोषधारक । अध्यात्म ? बचनागी विख । धरू जाता मराल फुके ।। १३७९ अध्यात्म ? मोक्षदिशा भाविकासि । अध्यात्म ? रुक्षदिशा कर्मयोग्यासि । अध्यात्म ? 'पक्ष'दिशा गतप्राणासि । तद्वत जाणा ।। १३८० आंधळिया चर्मचक्षु । आळशिया कर्मचक्षु । काळकोठडिया बंद गवाक्षु । फोल तैसे जिणे माझे ।। १३८१ पौर्णिमोत्तरी विलोभनिय । चंद्रास्त नि रविउदय । एकसमयावच्छेदे उभय । भिन्न जरि दिशा ।। १३८२अनुभव ऐसे आवर्जून घ्यावे । निसर्गाचे खेळ पहावे । एकरूप त्यच्यशी व्हावे । हरखून चित्तवृत्ती ।। १३८३ परंतु वळावेचि लागेल । अन्यथा योग कैसा येईल । शरीर जरा कष्टवाल । तर सुखावेल मानस ।। १३८४ कोणा चुकली का जरा ?। कोवळिकीसाठी परंतु धरा । सज्ज असतेच आधारा । पुराणे गळते, नवे फळते ।। १३८५ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०६-११-२०१५ शुक्रवार साठीजैसे कर्दमांत कमळ । नित्य पवित्र गंगाजळ । जैसे राहाते निर्मळ । प्रदूषित केले जाता ।। १३८७ कमलपत्र, ओघळूनं । टाकिते, न घेता अंगास लावोनं । जैसे अथांग विद्वज्जन । दुर्लक्षिती नकारात्मकता ।। १३८८ लोभस जरी विविध रंग । मूळ, शुभ्राचेचि अंग । करण्या, विश्वेषण्या अभंग । तेजोशलाका समर्थ एकमेव ।। १३८९ म्हणोनि न चळावे, ढळावे । गोंधळ दुर्लक्षोनि क्रमत राहावे । भवतालिच्या कुकर्मास वारावे । निग्रहाने ।। १३९० पार्थीवपण मरणोत्तरीचे । गर्भांकुरण जन्माआधीचे । तमांतरि सूक्ष्म तेजोरेखेचे । जगणे निरव, नि:शब्द ।। १३९१ जर वास्तव्य 'देवा'चे । आहे निश्चित ठाई माझे । तैसेचि असणार इतरांचे । देही ! आपोआपची ।। १३९२ निष्ठा राखणे जीवमात्रांशी । खग, खेचर वा जलचराशी । तैसी भवतालच्या मनुष्यांशी । असणे स्वाभाविकं ।। १३९३ सुहृद, आप्त बहु असणे । निष्ठा नात्यांवर ठेवणे । त्यांच्या ! म्हणजे 'बदलणे' । होतसे कां ?।। १३९४ श्वासोछ्वास सजीवांचा । धमन्यांच्या कार्यकारणाचा । व्याप, वाटतो कां त्याचा । जगत असता, तयांना ।। १३९५ पंचपंच उष:काल की हुरहुरती सांजवेळ । न कळे जेंव्हा येई झाकोळ । खिन्न वा प्रसन्न आभाळ । पाहावे तैसे रूप त्याचे ।। १३९६ मायावी तमाची सारी । दिनकर-दर्शन पूर्वोत्तरी । झाकोळांत मनाची अधांतरी । होतसे अवस्था ।। १३९७ अनुभव उतरावा शब्दांत । म्हणोनि गेलो लिहित । विद्वज्जनांनी केले प्रोत्साहित । अभिप्राय, देवुनि कसोट्यांती ।। १३९८ कण कण मुंग्या वेचिती । वारुळांत वाहून नेती । संचिताची 'संपत्ती' । कठिण समयी साहाय्यभूत ।। १३९९ अनुभवला जो आनंद । पूर्ण होण्या आधी अब्द । वर्णायासि अपुरे शब्द । माझ्या 'गरीब' झोळीमधे ।। १४०० ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०७-११-२०१५ शनिवार साठी वृक्षाभवताली प्रेमभरे जैशी । वेल बिलगते नाजुकशी । ना त्याच्या आधारासी । सोडतसे ।। १४०१ जीवनरस तरुवराचा । शोषुनी ! शोध आधाराचा । घेता करिती त्यास पृच्छा । 'बांडगुळ कां बा होशी ?'।। १४०२ कोठेही साठवा । कसेही पाठवा । ज्याने ठाव घ्यावा । काळजाचा ।। १४०३ करतो जो धावा । त्या वाचविण्या धावा । पडत्या झेला घावा । वरचेवर ।। १४०४ अवडंबर सत्शीलतेचे । श्रेय उगा सत्कार्यांचे । प्रदर्शन सत्कृत्यफलांचे । टाळावे सहेतुक ।। १४०५ सत्कर्म व्हावा सहज स्वभाव । सत्कार्यासाठी असावा सत्कारणभाव । स्वार्थोत्तरी परार्थ अभाव । नोहे बरा ।। १४०६ शब्दचि घडे अ-क्षरांमुळे । क्रम अर्थवाही तरचि आकळे । अन्यथा स्वरूप निरर्थ वेगळे । होई जनांसि अगम्य ।। १४०७ जर दिसेना 'परब्रह्म' कोठे । तर्कबुध्दीस कशी भेंटें ?। प्रतिमा ! कैसे साटे-लोटे । परस्परांचे जुळावे ।। १४०८ 'दिसलाच नाही तरी माना । सत्य तेथेचि' म्हणे 'जाणा !'। ऐशा उपदेशांचा फोलपणा । लक्षांत घ्या वेळीचं ।। १४०९ अवकाशांत, पोकळीचे अंत:करणं । दावी अमोघ आकर्षणं । तेजोशलाका, प्रकाशकिरणं । वेगाने ओढिते गर्भांतं ।। १४१० परिणामी तमरंगी । होते भवताल सर्वांगी । 'पेटते' काळी होळी अंतरंगी । वैज्ञानिक विश्लेषण ।। १४११ कुणि लता नाजुकशी । कुण्या गृही कुंपणाशि । सावरींत सुमनांसी । गंध, मकरंदासह आतुर ।। १४१२ बलवान निरखिते शरिरा । भविष्यांतल्या आधारा । आश्वासक पर्णपिसारा । छाया, झळा वारण्या ।। १४१३ बालपणी वेळ, सामर्थ्य । असते परि नसे 'अर्थ' । स्वप्न न होतसे सार्थ । त्या विना ।। १४१४ तरुणाईंत अर्थ, सामर्थ्य । बहुप्रमाणांत स्थित । भोगण्या पळ नाहीत । परंतु ! ऐसी दशा ।। १४१५ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ०९-११-२०१५ सोमवार साठी वार्धक्यांत वेळ, माया । पाहे सर्वथा उतू जाया । सामर्थ्य नसे कवळाया । सुखाचा ग्रास ।। १४१६ शुभ्र कळ्या, पुष्पे वनांत । सांजवेळी, समई, निरांजनांत । आपापल्या जागी स्थित । तेवती निरव, संथपणे ।। १४१७ सुधारित: जेथे जडते अतीव प्रीती । मन धुंडाळते विविध क्लृप्ती । जोडण्यास रेशिमनाती । धडपड सदासर्वकाळ ।। १४१८ प्रेम ! भाषा-शब्दाक्षरांचे । प्रवृत्त करितसे रचनेच्छें । लिखाणोत्तरि अर्थ वेचे । तर्क-बुध्दी संदर्भें ।। १४१९ 'जळांत आपण समाधानी । परंतु जर धारील अवनी' । वत्सासि माय सांगे समजाउनी । तळमळेल जीव ।। १४२० जळचरा समवेत जळचर । जळांत राहून कैसे वैर ?। सुहृदावर माणूस वार । पाठीवरी करे ! स्वार्थापोटी ।। १४२१ प्रतीक्षाहेतू जर थांबाल । 'वाहन' घोकीत 'घेऊन जाईल'!। मांदियाळी मार्ग क्रमेल । पायी ! सहज जगी ।। १४२२ कोण जन्मला सर्वगुणी । कलंकित अवघी धरणी । सद्भाव मनुष्यांत शोधोनि । दुर्लक्षावे अवगुण ।। १४२३ जैसा कलंकधारी शशी । सुखवे शीतलप्रकाशी । नाकारित भेदाभेद ! जनासी । धरेवरी सर्वत्र ।। १४२४ आयुष्य सुखद जर नाती । सांभाळित पुढे नेती । नाती जर असतिल रेशिमगांठी । जगणे कंद आनंदाचा ।। १४२५ अपराध वारण्या विधाने । स्वत:च करित राहाणे । जोखेनि स्वत:स सजा देणे । शहाणपण कोणते ?।। १४२६ जगण्यावरी कां प्रीती ?। मरणास अन् कां निवृत्ती ?। जगणे सुंदरता खोटी । मरण वेदनादाई सत्य ।। १४२७ विद्रोहाची आहे परंपरा । लंघण्या परतंत्र-सागरा । परतविला 'विंग्रज गोरा' । घेरुनी क्रांतिबले ।। १४२८ प्रतिबिंबित वसुंधरा । कुठल्या संथ सागरा । बहाल करेल सर्वांग सुंदरा । होउनि मायारूप ?।। १४२९ अनुभव सहसा सर्वांना । वाटे घडोनि गेली घटना । प्रतिबिंब तेचि जाणा । मानस सरोवरी ।। १४३० ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १०-११-२०१५ मंगळवार साठी शोध घेते विज्ञानं । अवकाशी, दूरदर्श लावोनं । तरंगांचे सारखेपणं । जुळते-मिळते कां ।। १४३१ तेज माया, तम सत्य । फल माया, कर्म सत्य । ठेवू,रुजवू नित्य । जाणिवेंत ।। १४३२ नाही उतरले । रुसूनी थांबले । व्यकुळ झालेले । बघा शिवार ।। १४३३ थांबल्या थेंबात । किरणें झेलतं । नाहते रंगांत । इंद्रधनू ।। १४३४ कोठेही पाहावे । कसेही भोगावे । मन रेंगाळावे । सईंमधे ।। १४३५ जणु विहंग हर्षविभोर । लंघोनी कडा कपार । झेपावतो जळावर । मत्स्यभक्ष टिपण्या ।। १४३६ काय साधेल ओठ शिवोनी ? । पित्त येईल वर उसळोनी । औषधी एकचि त्याच्या शमनी । व्यक्त होत राहाणे ।। १४३७ पंचमहाभूतांची निपज । अंकुरले एक बीज । रुजले, करतांना गूज । पृथेशी ।। १४३८ शुभ्र, गुलाबी मधे हरित । सजली वनराई विविध रॅगांत । झुळुक स्पर्शाने लाजत, शहारत । तृण, पत्री आषाढी ।। १४३९ संथपणे आकाशी विहरतं । मेघदूताशी स्पर्धा करीतं । परबळे उर्ध्वगामी होतं । झेपावला, वैनतेय ।। १४४० तुर्रेदार पर्णांची नक्षी । काळ्या कातळाच्या वक्षी । ठेवोनी जुळ्यांना साक्षी । हले-डुले ।। १४४१ धरा, धरणि, पृथा, अवनि । अभिषेकातुर गगनी । मेघ सज्ज जलकुंभपाणि । दामिनि उजळति सोहळा ।। १४४२ कधि गारा, कधि धारा । स्तब्ध अचंबित वारा । पिसेभारित पिसांचा पसारा । पसरुन हर्षविभोर मोर ।। १४४३ आषाढ ? मुसमुस जळगर्भी । आषाढ ? गुपचुप चुंबाचुंबी । आषाढ ? चुळबुळ करित गोपी । अधिर अधर, क्लान्त नेत्र ।। १४४४ जगणे आंता अकारण । का न कवळे मरण ?। भेदरून, गलबलून । जीव पाहता भवताल ।। १४४५ धारा, पावसाच्या बाहेर । धारा, जडावती अंतर । धारा, विरह ! दुरावल्या घोर । कुरतडत बळावतो ।। १४४६ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक ११-११-२०१५ बुधवार साठी हरळीवर उदास, खिन्न । झाकोळ ? भैरविमंथन । कां हुरहुरे उगाच मन ?। होतांना एकांडे ।। १४४७ कसा कराल प्रवास ?। आहे छळवादी पाऊस । हाती धरोनी तडितेस । ढोल-ताशे वाजवेल ।।१४४८ टक्क डोळे, पण अंधार । दृष्टि जाय न दूर फार । कोसळतो धुंवाधार । लुटत स्वानंदाला ।। १४४९ थेंब एक अनुभवावा । पाऊस अवघा जाणेनि घ्यावा । झेलावा, रुजवावा, जपावा । चिंब ओल्या मनांत ।। १४५० पांपणीकांठचा दहिवर । दावे बरसणारे अंतर । विचारांचे माजता काहूर । अदृश्य जरी ।। १४५१ दीर्घदिनांति लघुनिशा । निसर्गचक्राची भाषा । धरेच्या कलत्या आसा । श्रेय ! विज्ञान देतसे ।। १४५२ ऋतुचक्र झाले संभव । घटना, अब्जाब्द पूर्व । मनुष्ये घेतला ठाव । गणिती सिध्दांते ।। १४५३ जैसी, उजाड असता गावे । बीज नसता काय रुजावे ?। जल-कर्ब घटक अभावे । असती झाली अवस्था ।। १४५४ ऋजुभावे झुकलेली । तरुस्पर्शे लाजलेलि । गर्भभारे वाकलेली । कलिका ? मुग्धा ? प्रौढा ? ।। १४५५ सुंदर जरतारी गाभा । न लगे बाह्य आभा । कल्पनेंतल्या नभां । असोशीने बाहण्या ।। १४५६ विविध छटा घेउनि हिरवा । डोळियां देतसे गारवा । एकपर्णी घेतसे विसावा । सांवरीत संसार ।। १४५७ वर दाटले झाकोळ । खाली हिरवाई कल्लोळ । आशा-निराशेचा खेळ । पंचतत्वांचा ।। १४५८ कोण्या मनी हर्षोल्हास । कुणा खाई भय, भास । कुणा निशा,कुणा दीस । होती असह्य ।। १४५९ सारे मनाचेच खेळ । कुठे गुंता, कुठे पीळ । थकल्याचा होतो काळ । व्यतीत फुका,सोडवीता ।। १४६० सावरि जणु शाखांवर । पाचुस मउशार बहर । 'कधि येइल श्रावण सर ?'। पुसतसे सख्याला ।। १४६१ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १२-११-२०१५ गुरुवार साठी नभानन जळ झाले । प्रतिबिंबी साकळले । प्रत्यक्ष ? प्रतिमा ? न कळे । जणु माया नगरी ।। १४६२ जणु मौत्तिक मालिका । उजळत राही मार्गक्रमिका । कृत्रिम तेजोशलाका । तरि बहु आश्वासक ।। १४६३ हुरहुरती सांजवेळ । लेउन चमकदार माळ । मोजते उरलेले पळ । प्रतीक्षेचे, सखयाच्या ।। १४६४ धारा साकळल्या घनांत । थेंब थांबले पांपणीत । उतरतील क्षणार्धांत । स्पर्श, गारव्याचा होता ।। १४६५ सांज सकाळ भासतांत । जुळ्या जणू, झाकोळांत । कधी विरह कधी प्रीत । दाटून याव्या जशा ।। १४६६ शब्दमालिका मनांत । उच्चरिता धारिते भावार्थ । 'कविता' पदवी प्राप्त । पावते प्रतिष्ठासाहित्यांत ।। १४६७ सरळसोट कुणि सज्जन । पिळवटोनि कुणि अंत:करण । काटेरी, कुणि पर्णहीन । रानकुटुंबी सदस्य ।। १४६८ राही, रखमा जळापाळी । सवती तरी भासवीत 'खेळीमेळी'। मत्स्यावतारी प्रतीक्षाकाळी । गोंडस, गोजिऱ्या ।। १४६९ कृष्णविवर आकर्षिण्या सजग । ओलांडोनि प्रकाशावेग । गिळण्या तेजोस्फुल्लिंग । दूर अवकाशी कोठेतरी ।। १४७० मन आसावतां सुखा । मेघांतली शुभ्ररेखा । दु:खास करिते पारखा । विकृतानंदासि ।। १४७१ निरव निवांत । सारा आसमंत । स्तब्ध नि संथ । तरंगही ।। १४७२ दृश्याची चौकट । हिरवाई दाट । जळाभाळ अलोट । अधरोर्ध्वी ।।१४७३ पाखंरांची नक्षी । वनराई साक्षी । तळ्याच्या गवाक्षी । प्रतिबिंबली ।। १४७४ वृत्ती ! भिन्न प्राकृतिक । वृत्ती ! गुणावगुण विश्लेषक । वृत्ती ! प्रेरक मारक तारक । व्यक्तीमाजी ।। १४७५ मन ! बंदिवान भृन्ग । मन ! देहांतरी शृन्ग । मन ! विनाअंस्तित्व अपंग । जीवमात्र ।। १४७६ संपदा ! क्रियाशीलारि । संपदा ! कधि असह्य वेदनाकारी । संपदा ! भ्रामक प्रतिष्ठाधारी । जगण्यात ।। १४७७ अश्या 'देवा' कांहो ध्यावे ?। नाव 'त्या'चे कांहो घ्यावे ?। निरांजन, धूप, नैवेद्ये तोषवावे ?। काय भले करेल 'हा' ?।। १४७८ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १४-११-२०१५ शनिवार साठी संरक्षिण्या पिलांस सिध्द । तीक्ष्ण चंचू, जणु आयुधं । अवकाशाचा घेत वेध । रिपुदमना ।। १४७९ नुसतांच परस्पर शब्दवेध । उभय मने अबोध । समीप तरिही रूढी-रीतीबध्द । कां अजुनी ?।। १४८० काक सूकर जळस्थित । हरि हरीण दिवाभीत । गुणावगुण निसर्गदत्त । वावरती लेऊनी ।।१४८१ तळव्यावर मेंदीची नक्षी । पाठीवर आवेगाची नख्शी । नवनीत, बीजांकुरास कुक्षी । स्वाभाविकं ।। १४८२ तरारल्या कपोली । वनराणी ल्याली । उन्मुक्त लाली । अवचित ।। १४८३ अस्फुट सीमांच्या बळे । मुग्धपण, लज्जा, वात्सल्य आकळे । शक्तितत्व वर्धमानी उजळे । स्थित्यंतरी ।। १४८४ 'मृत्युपश्चात' वगैरे जीवन । प्रतिपादिणे वेडेपण । विखारी फोलपटांचे बीजांकुरण । पोषक अंधश्रध्देस ।। १४८५ ही 'असली' साहित्य(?)कृती । प्रतिष्ठा, संपदा, मान्यताप्राप्ती । परीक्षक, विश्लेषकांची मती । कैसी झाली विकृत ।। १४८६ रुजणे ! स्रोतांत समर्पित होणे !। रुजणे ! मूकपणे विरघळणे, विरणे !। रुजणे ! अस्तित्व विस्मरुनि जाणे!। अंकुरण्या पुन:पुन्हा ।। १४८७ अंकुरणे ! बीजांतुनि होणै मुक्त !। अंकुरणे ! प्राणानी होणे युक्त !। अंकुरणे ! अवकाश भारणे रिक्त !। अस्तित्वहेतु ।। १४८८ ठोका ! जगण्याचा अनुपम झोंका !। ठोका ! चुकण्याचा सदैव धोका !। ठोका ! विस्मरण्या अनावर भुका !। मोजा, अनंतकाल ।। १४८९ जाणीव ! जगण्याचे लक्षणं ?। जाणीव ! सुख-दु:खांचे भवन ?। जाणीव ! नेणिवेचे अवतरण ?। रिते जरी, विलक्षण लख्ख !।। १४९० कृष्णास दृष्ट लागों नयें । धवल विचलित होवू नये । रंगसंतुलन ढळू नये । समसंख्य, समांतर ।। १४९१ जनांत वा रानांत । पटमांडणी नेहमीच सार्थ । वसते बुध्दीच्या बळांत । अभिन्नता ।। १४९२ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १६-११-२०१५ सोमवार साठी वास्तू ! केवळ निवारा ?। वास्तू ! अवहालिक, गवाक्ष, द्वारा ?। वास्तू ! पोकळीचा पसारा !। मनुष्येविण ।। १४९३ वास्तू ! असावी आश्वासक । वास्तू ! व्हावी नित प्रेरक । वास्तू ! विश्रामाधार, सकारात्मक । अबालवृध्दांना ।। १४९४ वास्तू ! असावी उब मायेची । वास्तू ! असावी वनराई छायेची । वास्तू ! असावी क्लान्त समयिची । झुळूक शीतळ ।। १४९५ वास्तु ! देत राहिली अभय । वास्तु ! झाली अक्षर-माय । वास्तु ! कोणत्या बळे ओवीमय । साहित्यसरितेतटी ? न कळे !।।१४९६ पंचतत्वांना केवळ नमन । सजग ठेवुनी अष्टावधान । ज्ञान-कर्मेंद्रियांचे संतुलन । राहावे अंतकाळी, प्रार्थना !।। १४९७ देहावर पर्ण वल्कली । पुष्प बीरुदावली सजली । वनराणी सज्ज झाली । श्रावण शृंगारा ।। १४९८ दिशादाते झाले दास । उलटले दशाधिक अडीच मास । सहस्राधिकपंचशतक वोतण्यास । ओवींत मानसतल्लोळ ।। १४९९ प्रवास आनंदविभोर । घेउन आला इथवर । उद्देशपूर्तीचा महासागर । लंघणे, अजून बाकी ।। १५०० ।। दास-वाणी ।। वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी । वडिलाऐसा व्याप न करी । म्हणौनिया ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१२ वडिल म्हणजे आधी जन्मलेला . मोठा भाऊ , बाबा ,काका ,मामा हे सर्व वडिल . कर्तृत्ववान वडिल आणि निकम्मा धाकटा असे ब-याच ठिकाणी दिसते. मोठया लोकांचे काबाडकष्ट , चिकाटी प्रामाणिकपणा हे गुण अंगी न बाणता नुसताच बेधडक व्यवसाय सुरू केला तर तो वाढणार तर नाहीच , उलट बुडेल आणि भीक मागायची पाळी येईल . जाणपणनिरूपण समास . ************* धाकुलेपणाचे लाड कोड । 'वडिलां'चे कौतुक गोड । वृत्तीत करिती बिघाड । परिणामी यशक्षती ।। १५०१ म्हणोनि असावे यथोचित । धाकुल्याप्रति माया, प्रीत । जगराहाटींची रीत । आवर्जुन दावावी ।। १५०२ रोजचे आमुचे जगणे । साक्षांत मृत्यु अनुभवणे । काळजाचा ठोका थांबणे । संपणे, मग सई केवळ ।। १५०३ देह आळसावलेला । जरी उन्हानं तडकला । तृणपर्णा समवेत सुखावला । 'मुळांत'ला पिळदार ।। १५०४ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १७-११-२०१५ मंगळवार साठी स्तोम वारी कुंभाचे । सावट भेगाळत्या दुष्काळाचे । हाल खाइना जनतेचे । श्वानसुध्दा ।। १५०५ यंदाच्या कुंभात, करदात्याच्या खिशांतून काढून शासनाच्या तिजोरींत जमा झालेली किती रक्कम कुंभावर, म्हणजे नंगेपणाची बडदास्त ठेवण्यावर खर्च झाली, याची माहिती अधिकारानं कुणी कार्यकर्ता विचारू धजेल ? राहुट्यांसाठी मारामारी । हैराण पुरवठा कारभारी । लांगूलचालनी सत्ताधारी । सदैव व्यग्र ।। १५०६ साधूंनी भरल्या मतपेट्या ? रित्या करती धान्य कोठ्या ! चिलिमी गांजा फुंकत राहुट्या । नग्नावर रक्षा फासती ।। १५०७ विश्वसंग म्हणे त्यजिला । तरी राहुटींत जीव अडकला । जळे उत्सर्जितांनि नासावयाला । धावती नग्न ।। १५०८ अंगावर फासुनी रक्षा । हावरट अपेक्षिती भिक्षा । निर्लज्जपणाच्या सर्व कक्षा । लंघती सहजी ।। १५०९ धाडा यांना सीमेवरी । चमत्कारास्त्र विविध परी । संहारण्या अतिरेकी अरि । संमोहुनि जाळांत ।। १५१० कसला कुंभ ? कोठले अमृत ?। थेंब भेगाळल्या भुईंत । वा कोरड्या पांपणी काठांत । कां न सांडे ।। १५११ प्रदर्शिती सवंग, ओंगळ । विनाच्छादित काय अमंगळ । विकृतिचा समग्र गाळ । उपसती साधू, किंकारणे ?।। १५१२ नासत जळे, स्नान 'शाही' । खिरी, आमट्या, विविध चवी । मिष्टान्ने रोज नवी यांना हवी । गांज्या फुंकण्या आधी ।।१५१३ इकडे संत, महंत, बाबा । तिकडे वाळवंटी काबा । वळवळती अमानुष जिभा । 'धर्मा'च्या, सर्वदूर ।। १५१४ एकीकडे अभियाने । दुसरीकडे अनुदाने । राखण्या मौला, साधूंची मने । वेठीस जनसामान्य ।। १५१५ हिरमुसली अंत:करणे । भोगिती रोजची मरणे । एकेदिवशी पेटून उठणे । हल्लाबोल स्वाभाविक ।। १५१६ परी ! भिन्न प्रकार । परीं । रंग पंखांवर । परी ! कथेंतला बहार । शब्द एक बहुआयामी ।। १५१७ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १८-११-२०१५ बुधवार साठी ।। दास-वाणी ।। कांहींयेक पुर्ते कळेना । सभेमधें बोलों राहेना । बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०३/२२ कुठल्याही विषयामधील संपूर्ण ज्ञान नाही , समजून घ्यायची इच्छाही नाही .आगाऊपणा करून लोकांसमोर बोलू नये , आपले हसे होईल हे ही समजत नाही. हा जे बोलतोय ते वायफट आहे ,लबाडीचे आहे हे सर्वांना कळून चुकते. अशी करंटलक्षणे समर्थ त्यागार्थ सांगताहेत . ********* करंटे कोण वोळखिले । भोंदू, साधू फसवे बोकाळले । विज्ञाने उघड केले । मायाजाल त्यांचे ।। १५१८ करंटे जगी सकलजन । शिष्य, महंत वगळुन । स्वमनि अतर्क्य बिंबवुन । उपदेशिती व्यर्थ ।। १५१९ करंटे भरती पोटे । आप्तजनांची बहुकष्टे । पोथ्यां, पुराण, भाकडांत गोते । खाण्या नाकारती ।। १५२० साधू नित्य पसरणार झोळी । जो अस्तुरी-पोरे सांभाळी । 'करंटा', त्यास भाबडी-भोळी । संबोधिती, कृपणपणे ।। १५२१ अक्षद्वय स्पष्टवते । बुंध्यांतुन खुणावते । काष्ठशिल्पी वसते । कोठे ? जाणा !।। १५२२ ********** ।। दास-वाणी ।। मननसीळ लोकांपासी । अखंड देव आहिर्निशीं । पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०१/२२ अध्यात्मिक ग्रंथांचे सतत वाचन श्रवण करणारे लोक परमेश्वराच्या सतत चिंतनमननात राहतात . परमेश्वराचाच निदिध्यास लागल्याने देव त्यांच्यापाशीच अहोरात्र असतो.(अह - दिवस , निशी - रात्र ) त्यांचे पूर्वसुकृत म्हणूनच त्यांना हे भाग्य प्राप्त होते. त्याला खरोखरीच तोड नाही. 'सत्यवादाचे तप केले अमित कल्प ' त्या जन्मोजन्मी केलेल्या तपाचे फळ म्हणजे ज्ञानेश्वरी असे ज्ञानदेवानी म्हटलय. ************ नाही भूत ना भविष्य । जगणे निगडित वर्तमानास । संचयासि, विनियोगावे अहर्निश । श्वासापर्यंत अखेरच्या ।। १५२३ ************ अरुण काकतकर ।।भक्तिबोध।। दिनांक १९-११-२०१५ गुरुवार साठी निरीक्षणोत्तर मननं । वाचनोत्तर तर्क-बुध्दिने पारखुनं। प्रतिक्षिप्तावे व्यक्त होवूनं । मोकळे व्हावे ।। १५२३ फळ अध्ययन, मननाने । मिळतेच ! जैसे कर्माने, । कष्टोत्तर प्राप्त यशाने । जगणे सुसह्य ।। १५२४ ज्ञानराजांचा दाखला । वारंवार देता कशाला ?। न मानता भूत-भविष्याला । वांछिले पसायदान ।। १५२५ हर्षोल्हासं उमलतो । विविधरंगी, वृक्ष-वेलींवर 'तो' । निसर्ग किमया दावितो । वर्णावी कैसी, न कळे ।। १५२६ ऋुतू बदलतोय, हवेंत गारवा नि वातावरणांत शुष्कपणा जाणवायला लागलाय. प्रत्येक ऋुतूची आपली अशी एक मागणी असतें. तशींचं, शिशिराचीही आहे.. ऊब आणि ओलाव्याची, उर्जेसाठी आणि लवचिकतेसाठी.. या मागण्यासुध्दा निसर्गचे पूर्ण करणार, शरदांत नंतर येणाऱ्या हेमंत वसंतां वर्षेंत... प्रतीक्षा.. प्रतीक्षा.. उदयवेळी प्रहुल्लित होणे । अस्तवेळी सर्वांगे मिटणे । चक्रांकित जगणे मरणे । जणु झाले प्रतिबिंबितं ।। १५२७ मेघदूतांची आभाळमाया । शांतिदूतांची छत्रछाया । ऐसे द्विदल भाग्य लाभाया । हवे सुकृत गांठीशी ।। १५२८ बुडखा शाख पाहूनं । हेलावले, द्रवले मन । पांपणींत साकळून । राहिले पाणी ।। १५२९ ऐसे माजले पंचतत्वारि । कैशा योजाव्या शासनपरी । अवलंबिण्या मानसिकता खरी । सत्ताधाऱ्यांत वसे अभावाने ।। १५३० पृच्छा करावी वाटते श्वानासी । पुच्छ वृथा कां डोलविशी । भिडेल मनुष्यांच्या काळजासी । लाचारी, स्वाभिमानारि तुझी ?।। १५३१ काळ्या आईचा पान्हा । मुळांतून लुचे तान्हा । पाणियाचे वाळे कान्हा । मिरवतसे ।। १५३२ कान्हारूप जाले रोप । आप लोळे आपेआप । काढला रानाचा राप । फळो आला ।। १५३३ ************ अरुण काकतकर