Sunday, October 19, 2014

।।भासबोध।। ३०८ ते ३५०

।। दास-वाणी ।। ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/३१ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जरी काही कारणाने षोडशोपचार यथासांग पूजाविधी करता आला नाही तरी त्याची खंत न बाळगता मानसपूजा सुरू करावी. परमेश्वर सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्यामुळे आपण मनानेच कल्पना करून वाहिलेली पाने, फुले, फळे, गंध, अक्षता थेट त्याच्यापर्यंत पोहोचतातच. फक्त आपल्या मनात तो उत्कट अर्चनभक्तीचा भाव मात्र असावा. रामकृष्ण परमहंस कालीमातेची मानसपूजा नेहमीच करायचे. जर असशी सर्वव्यापी सर्वसाक्षी । उद्योग सोडोनि अबाल-वृध्दासी । मग वारी कां बा करविशी । फुका, कष्टप्रद ?।। ३०८ मनोमनी वेधतो आम्ही । सतर्क राहोनि दिशा दाही । उपजीविकेची साधने कांही । त्यासि संबोधा परमेश्वर ।। ३०९ प्रार्थना पूजेचे काय काज ? उदरभरणां घास रोज ?। आणि रात्री निवांत नीज ?। अट्टाहास त्याकारणेचि ना ?।। ३१० प्रांत:काळी छकुल्याचे हसू । वयस्कांचा सावरी स्पर्शू । अस्तुरिचा लाडिक कटाक्षू । लाभता सगळे पावते ।। ३११ क्षणोक्षणी पाठोपाठ । तिन्ही त्रिकाळ उपदेशाचे लोट । त्याने कां भरते पोटं । भस्मपट्टेधारींनो ।। ३१२ हातांत नाही घेत झोळी । वा पंचपात्र-पळी । कर्मोत्तरीच मिळते पोळी । आम्हासारख्यांना जगी ।। ३१३ कां दवडता उगा वाफ । म्हणतां 'वारितो आम्ही पाप !'। पडता पोळीवर अनासाय तूप । होता क्षणार्धांत अदृश्य ।। ३१४ जोडोनि दोन हस्तक । तुकवोनि एक मस्तक । समस्त आम्ही सांसारिक । विनम्र असतो सदा ।। ३१५ हे लिहीलं कोणीही, लिहावे । अंत:करण मथुनि व्यक्त व्हावे । धगधगते शब्द 'ओवीं'त जावे । मोकळणे हेतू ।। ३१६ ।। दास-वाणी ।। आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेता जीवें । देवहि त्रासे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१३ त्या एका परमेश्वराशिवाय कोणीही संकटातून मला वाचवू शकणार नाही अशी ठाम श्रद्धा म्हणजे अनन्यभाव. तो असला की आपोआप योग्य तो मार्ग दिसतोच. आपल्या निष्ठा जर बदलत राहिल्या, अनन्यभाव ढळला तर आपल्याच देहात वास्तव्यात असणारा आत्मदेवही त्रासून जातो. आतून येणारे स्फुरण थांबते आणि कार्यही बिघडते. माहीत असोनि हे सारे । कां कष्टविती शरीरे । माय-बाप, अस्तुरी, पोरे । सुखवा ! 'देव' जाणा तिथेचं ।। ३१७ विचार आप्त-स्वकीयांचा प्रथम । विस्तारलेला कल्पद्रुम । देवोनि वात्सल्य-ममता प्रेम, । जोपासला जो आपणचि ।। ३१८ देव जर असला सर्व ठाई । आप्तांमधे तो कां नाही ?। सोडून पळण्याची घाई । भोगोत्तरि कां संतांना ?।। ३१९ ना मी रुजवू पाहातो विषवल्ली । माझी प्रामाणिक ही 'काका'वली । सद्भाव, निष्ठेने सरसावली । निर्मूलण्या अंधविश्वास ।। ३२० ।। दास-वाणी ।। शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे तें येथार्थ । परी आपण मिथ्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/१०/१ ९ एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी शब्द आवश्यकच असतात. त्या वर्णनातून वस्तू समजली की शब्दांचे महत्व संपले. शब्दांनी सांगितले ते यथार्थ असल्यामुळेच जरी आकलन झाले तरी निव्वळ शब्द हे मिथ्याच मानावे कारण त्या वस्तूवर्णनापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. जिचे वर्णन शब्दांनी केले गेले ती मूळ वस्तूच सत्य मानावी. इथे वस्तू हा शब्द परब्रह्म या अर्थाने घेतल्यास उलगडा अधिक स्पष्ट होईल. डोळसांसाठी प्रतिमेचा ठसा । मेधा सहजचि रुजविते सहसा । श्रवणे वेधलेला शब्दार्थ योग्यसा । ताड़ून पाहते तर्काने ।। ३२१ केवळ प्रतिमा वा शब्द । वा वेगळा ठेवला अर्थ । जर तर्क ताडण्या असमर्थ । फोल ठरतो प्रयास ।। ३२२ भाषांमध्ये शब्द समानार्थी । उच्चार, लिपीरूपे विविध धारिती । प्रतिमेशि परि एकवटती । केवळ तर्कबळाने ।। ३२३ तर्काविना तथ्यहीन । भाषण, उच्चारण, लेखनं । असंबध्द, बेलगाम,बेभानं । केवळ जाणा 'नाद' तो ।। ३२४ ।। दास-वाणी ।। सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासारविचारें । संतसंगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०६/५५ साधनेची सुरूवात मूर्ती, प्रतिक किंवा चिन्ह डोळयासमोर ठेऊन होते. चर्मचक्षू ते पाहू शकतात म्हणून मन एकाग्र होते. पुढे सद् गुरू, संतकृपेने ज्ञानचक्षू उघडले की साकार समोर नसले तरी निर्गुण परब्रह्मावर लक्ष केंद्रित होते. सार म्हणजे काय जपावे, असार म्हणजे काय टाकून द्यावे हा विचार पक्का होत जातो. देवशोधन दशकात मुख्य देव संतसंगानेच मिळतो हे सांगताहेत. डोळे मिटता विवंचना । समोर ठाकती संकटे नाना । त्या गर्दींत 'देव' गणां । स्थान कैसे लाभावे ?।। ३२५ अंतर्यामी विविधांच्या मूर्ति भिन्न । प्रेमिका, चंडिका, परिचारिका ! वयास अनुसरून । प्रत्यक्षावे कि भग्नावे स्वप्न । अवलंबे इप्सितावरी ।। ३२६ ।। दास-वाणी ।। भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद् गुरू जाणावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/११ भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. गो म्हणजे गाय परब्रह्माचे प्रतीक. वत्स म्हणजे संसारात अडकलेला जीव. प्रपंचरूपी वाघाने मनुष्यावर उडी घालून त्याची परमेश्वरापासून केलेली ताटातूट जो थांबवतो आणि जीवब्रह्माचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करतो तो सद् गुरू ! थोडक्यात सामान्य प्रापंचिकाला जो परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद् गुरू होय. कां करता बा ताटातुट । ब्रह्मभेटी साठी आटापिट । सुखदु:खांशी भव भेट । होता आम्ही समाधानी ।। ३२७ नका होवू कल्याणकारी । तोडून आम्हा विविधपरी । जिवाभावाच्या संसारी । पोरके करण्या सरसावू नका ।। ३२८ नका होवू कराल दैत्य । तुम्हा जरी 'ब्रह्म' सत्य । ना संसार, आप्त, अपत्य । म्हणोनि हेवा करू नका ।। ३२९ तरुणहो वेळच्या वेळी । भोगसुखे, मिळवा सगळी । काळ पळतो न देता हाळी । अन्यथा उरते विदग्धता ।। ३३० ग्रंथ वाचणे, अभ्यासणे । आशयांत न गुंतोनि जाणे । रुचेल, रुजेल ऐसे निवडणे । श्रेयस्कर ।। ३३१ निरुद्योग्यांशी अध्यात्म । भजनि लागा सोडोनि काम । नसल्या 'देव' 'मोक्षा'चा नित्यनेम । व्यसनांचे हे व्यपारी ।। ३३२ म्हणती ठेवा दक्षिणा । फळे-फुले मिष्टान्न आणा । मग दावीन चमत्कार नाना । ऐसे लोभी हे 'महाराज' ।। ३३३ सावध राहा ऐशांपासुनी । लाथाडा फोलपट त्याची वाणी । उधळा, जाळा काळी करणी । म्हणा, ' जा मोक्षाप्रती !' ।। ३३४ ।। दास-वाणी ।। जे जे रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडली गळां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२४ शिष्याला जे आवडेल तेच गुरू करतो. त्याच्या लहरीप्रमाणे वागु देतो. शिष्य साफ चुकला तरी त्याला योग्य ती समज देण्याऐवजी त्याचीच मनधरणी करतो असा लाचार गुरू. आश्रमाचा खर्चच मुळी श्रीमंत शिष्य भागवत असतो ना . इलाज नाही कामनारूप पापिणी गळयात पडलेला हा भोंदू गुरू कोणाला मोक्ष मिळवून देणार कोण जाणे ? ऐसे माजले 'शिक्षण सम्राट' । भोवती गोडवे गाणारे भाट । गुणी, बुध्दिवंताने त्यांतुनी वाट । शोधावी कैसी ? सांगा बरें !।। ३३५ परीक्षा देती शिक्षकगण । सोडविती शिष्यांचे प्रष्ण । ऐसे 'आनंददायी' शिक्षण । म्हणे, 'प्रगती योग्य' साधेल ।। ३३६ कांही महाभाग 'सम्राट । स्वशिष्येशि लाविती पाट । यथेच्छ भोगोनि सोडिती मोकाट । अश्रू मुकाट ढाळावया ।। ३३७ सगळिच माजली बजबजपुरी । धन-संपत्ती वोपरून सत्ताधारी । तडस लागेस्तो मिष्टान्न-पुरी । म्हणती 'चाटा उत्सर्जित !' ।। ३३८ ।। दास-वाणी ।। तैसे आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तरीं सामग्री पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/११ साधना करता करता गुरूकृपेने परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान झाले तरी आत्मबोधावर स्थिर होण्यासाठी साधना सुरूच ठेवावी. साधनाक्रमही तोच असावा. बदल करू नये. कितीही तुडंब जेवलो तरी संध्याकाळ साठी जसा शिधा तयार ठेवावाच लागतो तसच ज्ञानोत्तर साधनेचे आहे. आता पुरे असे कधीच म्हणता येत नाही. 'पुरे पुरे आतां' नये म्हणू । नुरे नुरे होतं नाही ज्ञानाचा घनु । खरे खरे भेटतां शिष्यवरु । उचंबळे गुरुहृदय ।। ३३९ जैसे जिरते ज्ञानामृत । बौध्दिक कृती तीक्ष्ण होतं । नीर-क्षीर विवेके सुकृत । घडविते आपोआप ।। ३४० ।। दास-वाणी ।। सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४९ जो दुश्चित्त नाही म्हणजेच अत्यंत सावध आहे, विशेष प्रयत्नांचे सातत्य ज्याच्यामधे भिनलय, चिंतन मनन करू शकणारी बुद्धी म्हणजे प्रज्ञा अंगभूतच आहे आणि परमेश्वराविषयी अपार श्रद्धा आहे तो सत् शिष्य ! अशा शिष्याला साधनेचे फार कष्ट पडत नाहीत किंवा पडले तरी ते बिलकुल जाणवत नाहीत. ।। दास-वाणी ।। तया स्वानमुखीं परमान्न । की मर्कटास सिंहासन । तैसें विषयाशक्तां ज्ञान । जिरेल कैचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/६२ मेधा, प्रज्ञा, तर्कशक्ती । बुध्दीची आभूषणे असती । वर्धमान ती होता प्रगती । कृतिमधे दृश्यमान।। ३४१ विना योगे यांच्या होडी । भवसागरांत करते कोंडी । शीड, वल्ह्याविना नावाडी । हताश जैसा ।। ३४२ अरुणी वा एकलव्या । अदृश्य गुरु, देतो छाया । दक्षिणापेक्षा केवळ परीक्षाया । निष्ठा, साधना स्थिर मति ।। ३४३ कुत्र्याला पंचपक्वान्ने भरवली, माकडाला राजसिंहासनावर बसवला तर जो परिणाम होईल तीच गोष्ट एखाद्या दैनंदिन सुखविलासात लोळत असलेल्या शिष्याला आत्मज्ञान शिकवायला गेले तर होईल. अनधिकारी शिष्याला ब्रह्मज्ञान आवडणारही नाही अन् पचणारही नाही. श्वान, मर्कट, कुशिष्य जरी । मिष्टान्न, सुकृताची आंस धरी । स्वप्नांची आव्हाने त्यांच्या स्वीकारी । तोचि खरा गुरू ।। ३४४ जीव सगळे सारखेचि ना ? मग कां हेटाळता सर्वदा त्यांना ? प्रलोभना तुम्हि कधीच ना । शरण गेला ?।। ३४५ ब्रह्मचा-या विषयभोग । पंगूसि शारीर आवेग । अवकाशी उल्केशि पतनयोग । निसर्गदत्त, स्वाभाविक ।। ३४६ विकाराविना जीवमात्र । जगण्या असतो सत्पात्र ?। सत्प्रवृत्तीचा अवलंबुनी वेत्र । दुष्कृत्य वारी तो भला ।। ३४७ ओसाडावर फुलवी मळा । त्यां वंदावे कृषिवलां । खडक, तणास कधी न भ्याला । कार्यप्रवण एकाग्र ।। ३४८ 'हा असा, तो तसा' म्हणती । कार्यपरावृत्त सदैव होती । वृथा कालापव्यय करिती । जाणा तें बाष्कळ ।। ३४९ आखुनी वेळीच कार्यकक्षा । लाभार्थींच्या रास्त अपेक्षा । पूर्ततेसाठी करिति दुर्लक्षा । संकटांकडे ! कर्मयोगी खरे ।। ३५०

Thursday, October 9, 2014

।।भासबोध।। २५६ ते ३०७

।। दास-वाणी ।। रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०६/०१ एखाद्याचे रंग रूप उंची बांधा कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे बदलता येत नाहीत. सह ज म्हणजे जन्मत: जी ठेवण घेऊन मनुष्य येतो ती अपरिवर्तनीय असते. तरीही स्वत: प्रयत्नपूर्वक जे सद् गुण किंवा कौशल्य अंगी बाणवणे शक्य आहे त्यासाठी कष्ट केल्यास नैसर्गिक उणीवा भरून काढता येतील हे नक्की. चित्तवृत्ती स्वभाव । सहजची देतो अनुभव । प्रामाणिक वा अन्य डाव । मुद्रेवरी उमटतो ।। २५६ सरळ नासिका, नेत्री चमक अद्वितीय । शुभ्र दंतपंक्ती, सुबक ओष्ठद्वय । प्रमाणबद्ध श्रवणेंद्रिय । लक्षणे कां सुरूपाची ?।। २५७ वाणींत, स्पष्ट मृदु भाष्य । मुद्रेवरी स्मित हास्य । धारण करणे अवश्य । समाजांत जातांना ।। २५८ नासिका चाफेकळी असे । सावध नजरेंत मृग विलसे । ओष्ठद्वय ताज्या गुलाबासम भासे । कर्ण प्रमाणबध्द समांतर ।। २५९ हे सर्व काय कामाचे । जर मुद्रेवर दुर्भिक्ष हास्याचे ।नासिकेस वावडे सरळपणाचे । आणि जाळे आठ्यांचे कपाळी ।। २६० ।। दास-वाणी ।। विद्या नाही बुद्धी नाही । विवेक नाही साक्षेप नाही । कुशलता नाही व्याप नाहीं । म्हणोन प्राणी करंटा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१० शिकला नाही, तशी बुद्धीही झाली नाही त्यामुळे योग्य अयोग्य निवडण्याचा विवेक नाही. आळसामुळे प्रयत्नांचे सातत्य नाही. कौशल्य कधी अंगी बाणलेच नाही त्यामुळे कामाची व्याप्ती मर्यादित राहिली असा माणुस दरिद्रीच राहणार. जाणपणनिरूपण समासात समर्थ करंटलक्षण सांगताहेत. श्वापदेसुध्दा धरिती सावज । प्रस्तर जळबळे फुटता करि आवाज । तमगर्भी दीप्यमान होई वीज । प्रळयवेळी ।। २६१ हालेना डुलेना कांहीकेल्या । ऐसा बैल, सांगा तेल्या । काय कामाचा भल्या । भुईला भार नुसता ।। २६२ ।। दास-वाणी ।। वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । काहीं केल्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०२/०८ सभेमधे वक्ता बोलतोय.विषय छान मांडला जातोय. अशा वेळी आपण मध्येच त्याला अडवून शंका विचारू नये. त्याने आपले पांडित्य तर सिद्ध होणार नाहीच उलट एकाग्र झालेले श्रोते विचलीत होउन सभेचा बेरंग होईल. आपण स्वत:चा विद्याभ्यास करूनच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधावीत हे उत्तम लक्षण ! शंकांचे निराकरण । करण्या ज्ञान संवर्धन । परंतु सकल निरुपण । श्रवणोत्तरी, करोनि घ्यावे ।। २६३ टोकण्या, गाठू नये टोक । नि:शब्द चिंतनाचा विवेक । अवलंबुनी, व्हावे विश्लेषक । आशया, विषयाचा ।। २६४ ।। दास-वाणी ।। करंटयास आळस आवडें । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०३/०४ करंटा म्हणजे कर्मदरिद्री. तो आर्थिक दारिद्र्यात नसेलही कदाचित. परंतु आयुष्य कायम असमाधान अशांतीमधेच जाते. आळस म्हणजे काहीही करायचा कंटाळा. प्रयत्न कष्ट उद्योग याला आवडत नाहीत. याच्या इच्छा चमत्कारिक असल्याने इच्छापूर्तीचे मार्गही सरळ सात्विक नसतात. गैरमार्गानेच व्यवहाराकडे करंटयाचा कल असतो. विनाकष्ट संपदा प्राप्ती । एहिक सुखांची देई प्रचिती । परंतु अधोगतीची निश्चिती । नकळत हळुवार, जाणा ।। २६५ आळसाने वाढे मेद । पाठोपाठ बुध्दिभेद । अंती देह-अंतरिचा आक्रंद । आपोआप ।। २६६ ।। दास-वाणी ।। अंतर्निष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्य्रांची संगती खोटी । मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०५/१९ साधना करता करता मन अंतर्मुख केलेल्या व्यक्ती उच्च प्रतीच्या मानाव्यात. बहिर्मुखी मनाचे लोक खाणे पिणे, कपडे लत्ते यात मशगूल असल्याने त्यांची संगत प्रगती पथावर नेत नाही. ही गोष्ट शाहाणे जाणतात. मूर्ख आणि चंचळ समजू शकत नाहीत. म्हणोनि घ्यावा धांडोळा । स्वांतरीच्या नाना कळा । दर दिवसा एक तरि वेळा । पारखाव्या चिंतनी ।। २६७ विचार विकारांची दळे । स्व-तेज, वा तमोबळे । उन्नतीप्रति क्रमण सगळे । पाहतील ग्रासू ।। २६८ तरी अढळ ठेवावा विश्वास । फेडत शंक-कुशंकांचे पाश । आपुल्या विहित कर्मास । जात राहावे सामोरे ।। २६९ मी हा ऐसा उपदेश । साक्ष ठेवोनि वास्तवास । पुराणांतील आदर्शवादास । शब्दांकितो भेदण्या ।। २७० ।। दास-वाणी ।। मन दिसते मां धरावे । ज्याचें त्यानें आवरावें । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/१७ सूक्ष्मदेहाचा एक भाग असलेले मन हे दिसत नाही, दाखवता येत नाही, धरून पकडता येत नाही. परंतु प्रत्येकाला स्वत:ला मात्र पूर्ण जाणीव असते की ते कुठे भरकटलय. ज्याने त्याने मनाच्या मुसक्या बांधाव्या, त्याला आवरावे आणि आत्मविवेकाने श्रवणाच्या अर्थाकडे लावावे. तर आणि तरच उन्नती आहे. अतर्क्य घटना, गर्दी, कल्लोळ । मन ठेवणे स्थिर निश्चल । कष्टप्रद ! तरि उत्तम फल । अनुभवावे ।। २७१ परिस्थितीजन्य अस्वस्थता । सुधारते वातावरण निवळता । कालौषधि एकमेव असतां । फोल सर्व उपाय ।। २७२ म्हणोनि दैवावरी भिस्त । ना ठेवतो आम्ही समस्त । कर्मधर्म राहतो साधत । अविरत ।। २७३ मग शरण आपोआप । संकटे येती टाकींत धाप । पदरांत देती माप । यशाचे, प्रयत्नांति ।। २७४ द्विशतकोत्तरी सप्तदशके । वर पंचम, लिखाण इतुके । फोलपटे नि 'जळ'मटांचे पुंजके । जणु, म्यां पामरे प्रसविले ।। २७५ कलानिधि, साहित्यिक नामी । नसतांना ! कोण्या अधिकारे मी । 'प्रतिबिंब ओवी' प्रबंध कर्मी । म्हणोनि जाणला जावा ?।। २७६ ।। दास-वाणी ।। मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/११ एखादा जाणकार श्रोता पुष्कळ सभा, कीर्तने, निरूपणे वर्षानुवर्षे ऐकत असतो. यथावकाश त्याच्या ज्ञानात खूपच भर पडलेली असते. त्याला कुठलाच विषय नवीन वाटत नसल्याने तो सभेमधे वाक्यावाक्याला अडथळे आणतो. पांडित्य दाखविण्याच्या हव्यासात तो इतर श्रोत्यांचे श्रवण सुद्धा बिघडवतो. हा श्रोता ज्ञानी असला तरी अवलक्षणीच मानावा. बेभान वक्त्याची, अनावर । सहसा टाळिते नजर । म्हणोनि भले वाटू दे अडसर । लक्ष वेधण्या मधेमधे ।। मंच मिळतांच सुटतांत । विषयांतरी बरळतांत । त्यांना भानावर आणणे क्रमप्राप्त । होते नाइलाजे ।। २७७ वेदना, व्यथेचा आवाज । विरून जातो, गर्जता मत्त गाज । बहुधा असते जी विनाकाज । भाटांना सुखावण्या ।। २७८ गरिबांचा जो कैवारी । जो असतो परोपकारी । 'सत्ता'धा-सास त्रास भारी । सहसा होतसे ।। २७९ कार्यकारणभावाचे भानं । सहजचि जाती विस्मरुन । गांजल्या शंकांचे रानं । अडसर वाटे ऐशांना ।। २८० व्हा आक्रामक, प्रष्णकर्ते । शोधा वाचाळ निष्क्रिय नाकर्ते । विद्वान जरि म्हणविती ते । उत्तरदायित्व त्यांसि शिकवा ।। २८१ ।। दास-वाणी ।। बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंवीण तत्वता । कार्य न चले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२१ परमेश्वरापाशी पोहोचण्यासाठी जी नवविधा भक्ती सांगितली आहे तिची सुरूवात श्रवण आहे. ऐकणे ही पहिली पायरी अत्यावश्यकच. त्यानंतर मनन, चिंतन येते. मग मनात ज्ञान मुरायला लागते आणि शेवटी आचरणात येते. श्रवणाशिवाय पुढचे सर्व टप्पे अशक्य, त्यामुळे अन्य कोणतीही ज्ञानसाधने श्रवणापुढे कनिष्ठ होत. बहुधा स्वतःव्यतिरिक्त । इतरांचे संवाद, ध्वनिसंकेत । नावडणारेच बहुसंख्येंतं । आढळतांत सहसा ।। २८२ ऐकत जावे सर्व कांही । परंतु त्याची धरुन बाही । अवलंबून राहाणे बरे नाही । आधारास्तव कदापी ।। २८३ स्वमति, मंथनोत्तर विचार । स्वानुभव, जगण्यातिल अपार । संयम, विवेक सारासार । स्मरावा कृतिपूर्व ।। २८४ कां असले अक्षर-पांप । विधानार्थाना येई दर्प । की मज डसला सर्प । अगंकाराचा ?।। २८५ ।। दास-वाणी ।। मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१९ सगुण म्हणजे ज्याला रंग रूप आकार आहे असे मूर्त स्वरूप. कुठल्याही स्वरूपातल्या मूर्तिरूप देवता समोर नसतील तर आणि ऐकणारे श्रोते विद्वान अभ्यासू असतील कीर्तनकाराने अद्वैत शास्त्रांचे निरूपण जरूर करावे. 'अहम् ब्रह्मास्मि ' हा भाव समजण्यासाठी श्रोता जाणकारच हवा. ऐका एक सुरसा कथा । शब्दांनी सजली होती गाथा । ग्रंथ होता पुरेपूर सर्वथा । परंतु निरक्षरा काय त्याचे ?।। २८६ कोणे एकाने आणिले चित्र । उलगडू लागला आशयाचे गोत्र । निरक्षराने तेंव्हा मात्र । प्रतिबंधिले ।। २८७ कारण, समजणे सोपे । जाणवते आपोआपें । शब्देविण आशय छापे । सहजचि चित्र ।। २८८ विद्वान, ज्ञानियांच्या जगी । प्रगल्भांची मांदियाळी जंगी । अक्षरांचा उदोउदो जागोजागी । निरक्षरा अप्राप्य ।। २८९ शब्दसंभार ऐकताक्षणी । अर्थाची समूर्त लेणी । ऐसी असावी मांडणी । समग्र ग्रंथांची ।। २९० चित्रमयता सोपी नसे । अभावानेच प्रतिभेंत विलसे । सहजी अनुभवास न येतसे । पढत पांडित्यांत ।। २९१ श्रवणेंद्रियांची सजगता । उच्चारेच्छेची करिते पूर्तता । मेधा तर्कबळे विश्लेषिता । साकारते चित्र ।। २९२ ।। दास-वाणी ।। पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती । तेचि पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१० मंदिरामधे कीर्तन सुरू आहे. समोर राम, कृष्ण, शंकरादि कुठल्यातरी दैवताची सुंदर मनोहारी रमणीय मूर्ती आहे. श्रोते छान सगुणाच्या आख्यानासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी जर कीर्तनकाराने निर्गुण ब्रह्माचे निरूपण सुरू केले आणि परमेश्वराच्या सगुण रूपाचे खंडण सुरू केले तर तो ज्ञानी असला तरी मूर्खच ! पढतमूर्ख मानावा. कौतुक करावे पाथरवटाचे । काष्ठ-पाषाण-मृद् कसबकाराचे । अनुल्लेखे टाळण्या-याचे । उपटावे कान ।। २९३ समूर्त-सगुण-साकार ठाकले । जेंव्हा प्रस्तरें घाव सोसले । स्वेदगंगेंत चिंब झाले । छिन्नी-हातोडीसह हात ।। २९४ मूर्तीचे मंद स्मित । भरून वाहते काळजांत । ओघळते प्रेय अश्रुरूपांत । सांगा श्रेय कुणाचे ?।। २९५ ।। दास-वाणी ।। हरिनामे प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायणनामें पावन जाला । अजामेळ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१७ दैत्य, राक्षस कुळातला असुनही प्रल्हाद सतत नारायण नारायण असे नामस्मरण करायचा. त्याचे वडील हिरण्यकश्यपु. विष्णुच्या द्वेषापोटी स्वत:च्या मुलाला सुद्धा हर प्रयासाने ठार करण्याचे प्रयत्न केले. केवळ नामस्मरणामुळे प्रल्हादाचे रक्षण झाले. अत्यंत पापी नामद्वेष्टया अजामेळ नावाच्या ब्राह्मणाने रोगजर्जर अवस्थेत स्वत:च्या नारायण नावाच्या मुलाला आर्ततेने हाक मारली, विष्णुदेवांना नाही. तरी देखील अजामेळ वाचला आणि पुढे उत्तम गतीस पावला. अभावितपणे केलेला नामोच्चारही जर तारून नेतो, तर समजून उमजून निष्ठेने केलेले नामस्मरण कितीतरी अधिक फलदायी ठरेल. होय ना ? नाम घेत राहा बसून । कवळ मुखी येईल आपणहून । कृतिशीलतेस छेद देऊन । म्हणे 'मोक्ष' मिळतसे ।। २९६ हा कसला उपदेश ?। कां सुचला ऐशा 'संतास' ?। कर्मधर्माचा करण्या -हास । कसा बा सरसावला ?।। २९७ हा गीतासाराचा अवमान । आलस्यभावाला निमंत्रण । कर्मेच्छेचे निर्घृण वपन । या परते कोणते ?।। २९८ आवरा आवरा ऐशा नरा । सावरा सावरा सामान्यांच्या संसारा । भवरा भवरा, सुखसरितेच्या उदरा । अवजार कृतिनाशाचे जाणा ।। २९९ अध्यात्म,मोक्ष कल्पना भ्रामक । स्वेदगंगेंस आटविणारा पावक । भोंदू, संधिसाधूंची विकृत भूक । शमवेलही हा कदाचित ।। ३०० जरि असेल ज्ञानसमृध्दी । थोरांचीही चळते बुध्दी । भावुक जनता भोळी, साधी । बिचारी जाई भांबावुनी ।। ३०१ आवरा आवरा ऐशा नरा । विशेषत्वाने उत्साही शिष्यवरा । सदुपदेशाच्या विखारी अवतारा । जे जनमानसी रुजविती ।। ३०२ माहीत नाही कोणती । दासांची होती मन:स्थिती । केवळ नामस्मरणाची महती । सांगो धजले ।। ३०३ रूप आगळेचि सामोरे आज । काय घडले ? काय काज ?। दासांतरी अंकुरले बीज ?। कैसे नैराश्याचे ।। ३०४ हे शिवरायांचे गुरु । सकारात्मत्मकतेचे आधारु । बल-बुध्दी-वृध्दि निर्धारु । सदैव केला ।। ३०५ मागे शिष्यांचे कोंडाळे । 'गादी'वरी ज्यांचे डोळे । संस्थानाधिकार मधाचे पोळे । जिभल्या चाटित वेधिती ।। ३०६ मज नवल नेहमा वाटें । विश्वास ठेविती थोर मोठे । भाकडावरचे मुलामे खोटे । आकर्षिती त्यांसही ?।। ३०७