Sunday, August 26, 2012

पैलतीर गाठण्या

चित्राधारित मजकूर या छायाचित्रांत, पावसाळ्यांत, सांडव्यावरून ओढ घेत वाहणार्‍या पाण्यांतून दुचाकीवर बसून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य कष्टकर्‍याचे दृश्य आहे. ***** पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन प्रसंगी भेदुन प्रवाहा, पैलतीरा भिडेन पाऊस सुखवी प्रेमीकांना , म्हणति ऐसे जरि जन ... लेउनी मग विरहसयि नक्राश्रु ढाळे तन-मन मांडतो जरि प्रपंचाचा डाव मोहाच्या क्षणी मोडुपाहे कधि कणा मग झुंजतां रात्रंदिनी संकटांना घेउनी पाठीवरी मी धावतो पापण्या ओलावल्या तरि हसूं ओठी धारितो अंदाज नाही पलिकडे मज, काय वाढुन ठेविले भाळरेखा रेखितांना निर्मिकाने योजिले अडथळ्यांच्या अभावी पण काय जगण्याची मजा ? निष्क्रीय, आळशि लोळणे ही धनिकपुत्रांची ’सजा’ रोजचीही जरि व्यथा, तरि वृथा कां आक्रोश मग ? वाट आपुली शोधतांना धडपडे सारे जग धडपडे सारे जग... तेंव्हा या नमनाला धडाभर तेल झालेल्या पंक्तींचा मथितार्थ इतकाच की कष्ट आणि कमाई यांच गणित विणतांना किंवा सोडवितांना, नियती ’पंक्तिभेद’ करतेच ! आणि म्हणूनच मग सर्वसामान्य पोटार्थी माणूस अडथळे ओलांडत किंवा त्यांना सोइस्कररित्या ’वलसे’ घालत, "टाळत’, पडतझडत, ठेचकाळत, अपमान पचवीत पुढेपुढे धावत असतो, नियतीकडे, कुंडलींतल्या गेहांकडे, तळहातावरच्या, निसर्गदत्त रेषांकडे सर्वथ: दुर्लक्ष करीत ! There is no shortcut to success..या इंग्रजी वाक्प्रचाराला पुढे .for the poor. & down-trodden. अशी जोड द्यायला हवी. विविध उत्पादनांच्या जाहिरातींचा पाया हा, अशाच ’यशा्ची शोधयात्रा’ या सूत्रावर आधारित असतो...म्हणजे ’तुम्हाला ते मिळवायचय ना ? मग तुम्ही आमचं हे उत्पादन वापरा...’ ! या विधानांतल्या ’ते’ आणि ’हे’ च्या जागी ’फायदा’ आणि ’उत्पादनाचं’ नांव फक्त भरत जायचं.. उदाहरणार्थ तुम्ही ती बास्केट्‌ बॉल्‌ खेळणार्‍या मुलीची किंवा अ‍ॅथेलेटिक्स्‌ उडीचा(Bench lift jump ?) सराव करणार्या मुलाची जाहिरात पाहिली आहे ? आधी अपयश आणि कांहीतरी ’शक्तिवर्धक’ दुधांतून धेतल्यावर एकदम यशोदीपांचा पंचपंच उष:काल...बालकाच्या आणि मातेच्या प्रफुल्लित मुखावर ! म्हंजी, ’पी हळद आन्‌ हो गोरी’.... है का नाय ? *****

Thursday, August 23, 2012

’दुसरीही बाजू’

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत पावसाळ्यांत,हे. कार्यालयीन कामाच्या वेळेंत संगणकाचा पत्ते खेळण्यासाठी उपयोग करणार्‍या महिला कर्मचार्‍याचे दृश्य आहे. ’दुसरीही बाजू’ आम्हि काय कुणाचे खातो रे । तो धनी आम्हाला देतो रे ॥ रंगला डाव पत्त्यांचा । ग्राहक जरि उभे बिचारे ॥ हा सुयोग्य जागी पडदा । ना दिसतो, कळतो त्यांना ॥ यत्किंचित संशय, शंका । ना भिडे भाबड्या मना ॥ समजतील ’अ’दृश्यांत । मी संगणकावर व्यस्त ॥ परि सदैव गुरफटलेली । निज सुखांसनि मी ’मस्त’ ॥ आम्हि ’निवडक’ नेहमी असतो । बेपर्वा, अन्‌ माजोरे ॥ जरि आम्हा कारणे होती । ’बदनाम’ इतरपरि सारे ॥ हे एक प्रातिनिधिक चित्र.. कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणाचं की ग्राहकांच्या, अशा गैरव्यवस्थेला सामोर जावून धीटपणे प्रष्ण विचारीत त्याचा निषेध करण्याची मानसिकता गमावल्याचं ? सेवा देणारे आणि घेणारे...दोनीही बाजूंची मन, संवेदना ’मेल्या’सारख्या झाल्या आहेत. बरं ग्राहकानं, शब्द, मूक देहबोली, हस्तमुद्रा, मुखावरची साधी नाराजी जरी अशा वर्तनाबाबत दाखवली तरी, डाफरून एकदम ’संघटित’ वगैरे होवून ’सहकारी-संरक्षणार्थ’ क्षणार्धांत. ’वयं पंचाधिकम्‌ शतम्’ असा पवित्रा घेत ’कर्म’(?)चारी तयार. पण या ’चित्रा’ची दुसरी सकारात्मक, खरीखुरी सेवाभावी, कृतिसमर्पित भावनेनं, मिळालेल्या सु(?)विधांबद्दल यत्किंचित नाराजी मनांत न बाळगणारी मानसिकता मी कांही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली आहे. ’बालचित्रवाणी’मधील माझ्या कार्यकालांत, पुणे जिल्हापरिषदेच्या, विविध विभागांतल्या शाळांना शासनानं दिलेले चित्रवाणीसंच, त्यांची नियमित देखभाल, त्यांची सुयोग्य उपयोगिता वगैरे बाबींची खातरजमा करणं हा माझ्या कामाचा भाग होता. अशाच एका भेटीच्यावेळी, खेड-शिवापुरमधल्या एका शाळेंत आम्ही जरा लवकरच, म्हणजे सव्वानऊवाजतांच पोहोचलो होतो. ऐन पावसाळ्याचे दिवस धोधो पाऊस पडत होता..वर्गखोल्या अजून बंदच होत्या. पण समोरची मोकळी अच्छादित जागा उघडलेली होती..दिसलेलं दृश्य फारचं आश्वासक होतं एक शिक्षिका वीसपंचवीस मुलांना त्या व्हरांड्यांत समोर बसवून शिकवीत होत्या.. मी सहज चौकशी केली.. तर मिळालेली माहिती अशी.. शिष्यवृत्ती-परीक्षेची तयारी करून घ्यायला, दैनंदिन वेळापत्रकांत उपल्ब्धी नसते..त्यामुळं या पोक्त शिक्षिका, आपली पुण्यांतल्या घरांतली गृहिणीची सगळी कर्तव्य पार पाडून, सकाळी सातला, छत्री-पिशवी सांभाळंत, राज्य परिवहनाची बस गाठायला घराबाहेर पडतांत.. एकदीड तासाचा प्रवास करून विद्यालयांत पोचतांत आणि तिथं ज्ञानार्जनाच्या शुद्ध हेतून, तीनतीन, चारचार मैल, अर्धवट भिजत, चालत आलेल्या विद्याथी-विद्यार्थिनींची, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतांत. शाळा सुरू व्हायच्या आधी... मी ऐकतांना गहिवरलो, मूक झालो आणि अंतर्मुख सुद्धा.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Saturday, August 18, 2012

Locked Footwear...

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एका रबरी चप्पल-जोडाला, चोरीला जाऊ नये म्हणून, मोठे कुलूप लावले आहे.. ”चप्पल’, ’वहाण’ हे स्त्रीलिंगी शब्द पण ’जोडा’ खणखणींत पुल्लिंगी ! इंग्रजीत Weaker gender किंवा मराठींत अबला असं वर्णन असून सुद्धा ह्या वहाणेला कां बरं स्थानबद्ध केलय ? ’बिचरी स्त्री आधीच परंपरांच्या ओझ्याखाली ’स्थानबद्ध ! ती कुठं जाणार पळून ? पन पुरुषवर्ग भयभीत आहे अनादि काळा पासून.. कारण स्त्रीत्वाच्या शृंखला तोडून, पुरुषांपेक्षा आक्रमक होत, प्रसंगी मानसिक कणखरपणाचा आदर्श घालून देणार्या स्त्रिया अगदी वेदकालापासून आजतागायत सर्वदूर परिचित आहेत. पहिली ऋचा लिहिणारी अपाला. पहिली ओवी-रचिता महदंबा, पतीच्या रथाचं चांक निखळत असतांना, त्याच्या आरीला स्वत:च्या हाताचा आधार, ऐन युद्धभूमींत देणारी कैकयी, झांशीची राणी, अहल्याबाई होळकर, कित्तुर चेन्नम्मा, इंदिराजी गांधी, कल्पना चावला, अगदी परवांपरवां ऑलिंपिक् पदक जिंकून आणणारी मेरी कोम, अशी विविध क्षेत्रांत देदीप्यमान, आणि प्रसंगी तथाकथित ’पुरुषां’नासुद्धा पराक्रमंच्या शतसूर्यांच दीपदान करणारी ही कांही अत्यल्प उदाहरण ! स्त्री-मुक्ती चळवळीची या स्त्रियांना कधीच गरज भासली नाही. ’स्वातंत्र्य मागायचं नसतं तर ते स्वत:च्या कर्तृत्वानं मिळवत, कमावत उपभोगायचं असतं...विरोधकांच परित्राण करीत आणि समविचारी सहकार्यांच्या स्वातंत्र्यावर गदा ना आणता..’ हे सूत्र या सर्व ’भामिनी रणचंडिकांनी कायम उराशी बाळगलं होतं. याच स्त्रीमुक्ती चळवळीच्या सुरुवातीच्या काळांत किंवा आजकाल स्त्रीभ्रूण ह्याविरोधी चळवळीच्या काळांतसुद्धा, एक अतिशय बोलक्या....केवळ दहा सेकंदांच्याच...मूक-चित्रफितीचा उल्लेख केल्यावाचून मला राहावत नाही.. एक नवजात बालिका...निद्रिस्त अवस्थेंतली तिचे कवळेकवळे हातपाय दोरीनं बांधलेले...गोबर्यागोबर्या गालांमधल्या लालचुटुक ओठांवर एक पांढरी चिकटपट्टी लावलेली...असं हृदय दयार्द्रतेनं हेलावून टाकंणार चित्र दृश्यमान होतं सुरुवातीला ! त्या दृश्यांत एक हात प्रवेश करतो आणि हाता-पाया-मुखावरची बंधनं अल्वारपणे दूर करींत, त्या तान्ह्या जिवाला...बालिकेला मुकत करतो... क्या बात है... कशाला हवेंत शब्द हवेंत विरून जाणारे ? वर्षानुवर्ष हा ’दृश्यसंदेश’ माझ्या कालजांत घर करून बसलाय ! मुक्तीची उक्ती । नका करू मूक । स्वातंत्र्याची भूक । क्रांतिची जन्मदा ॥ *****

Monday, August 13, 2012

भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एक आठ दहा वर्षांचा बालक, थेट गाईच्या आचळांना जाऊन भिडला आहे...लुचायला भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ कसे तुवा बापा । सोडिले छकुल्याला । भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ माउलीने त्यास । की रागे भरियेले ? धास्तावून भिडले । कपिलाईस ॥ भुकेजला बाळ । जरी नसे तान्हा । तरी शोधे पान्हा । वात्सल्याचा ॥ जणू देवकीनंदन । यशोदेचा कान्हा । गाउलीच्याही भाना । हरतसे ॥ गाउलीच्या डोळा । ममतेचे आंसू । माउलीसही हासूं । आवरेना ॥ तुम्हाला माहीत आहे, हे चित्र पाहिल्यावर मला काय काय दिसलं ? चित्रांत नसलेला, माजावर येवून उधळलेला ’(अ)राजकी’य बैल, अपप्रवृत्तींचा, विकृती-विकारांचा, पापवासनांचा भारवाही रेडा, ’नेते’पणाच्या टोपीखालचे आणि विविधरंगी ’टिळ्यां’मागचे, जनतेला क्षणोक्षणी कुठल्या ना कुठला कारणाने वेठीस धरून ’गर्तेप्रत’ ’नेते’ झालेले, अभागी जनतेमधलेच कांही महाभागी सर्प सदृश गुंड-मवाली आणि... ’ज्ञानदेव’ नावाच्या पायापासून ’तुकाराम’ नावाच्या कलशधारी मानवता-मंदिरांतल्या, मीरा-सूर-कबीरापासून, सावतामाळी, गोराकुंभात, कान्होपात्रा, जनाई, ’पंढरिनाथ’रूपानं, मुगल दरबारी मोहरा घेवून गेलेला महार, अशा सर्व जाती-चर्म-पंथांच्या संताच्या मांदियाळीपासून ते बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसा आदि, जवळ आलेल्या प्रत्येकाची व्यथा, वेदना, खंत, भीती, गंड जाणून घेत त्यांना धीर देत आश्वासक हात त्यांच्या पाठीवर ठेवत त्यांना ’जीवनमार्ग-प्रदीप’ ठरणारी ही वात्सल्यरूपं ! तस पाहिलं तर भूक कुणाला चुकली आहे ? जे जे अंकुरलय, वाढलंय, उमललंय फुलतय त्या प्रत्येक सजीवाला..इथं वनस्पतीही अभिप्रेत आहेत अर्थातच..भूक, तहान आणि निवारा हे जगण्याला जोडलेले अविभाज्य घटक आहेत. ते मिळवण्यासाठी, उपभोगण्यासाठी, ’उद्या मिळाले नाहीत तर ?’ या भीतीने आजच्या घासांतला भाग बाजूला काढून तो राखण्यासाठी रोज ’अहर्निश’ धडपेड चालते या अवनीवर त्यांची ! कुठे हे चित्र आणि कुठे सततच्या यादवी युद्धांत निर्घृण अत्याचार, छळ करीत, हलाल पद्धतीनं मृत्यूचं थैमान मांडीत, खदखदा हांसत ’तोडलेली’ मानवी मुंडकी शीतगृहांत ठेवून त्यावर रोजची भूक भागविणारा इदी अमीन नावांचा, ’नावालाच’माणूस असलेला कॅनिबल्‌, नराधम. तस बघायला गेलं तर ’इदी अमी” हे कोणा एका व्यक्तीचं नाव नसून, ’संस्कृती’ला जबरीनं आणि जरबेनं ’निवृत्ती’प्रत नेणार्‍या एका प्रवृत्तीचं एक नांव आहे. या प्रवृत्तीला छेद देणारी एक चित्रफीत महाजालावर एका माझ्या मित्रानं पाठविलेली मला पहायला मिळाली आणि मी, ’माणुसकी अजून जिवंत आहे’ या भावनेनं आश्वस्त झालो. ’अरे मानसा मानसा कधी व्हशील म्हानूस ?’ असा आक्रोश करणार्‍या बहिणाबाईनं ही चित्रफीत किंवा त्यांतलं दृश्य पाहिलं असतंतर त्यांतल्या व्यथेची धार थोडी कमी झाली असती असं मला उगाचच आपलं वाटून गेलं ! दक्षीण अमेरिकेंतल्या एका समुद्रकिनार्‍यावर एका हौशी ’व्हिडिओग्राफरनंचित्रित केलेली ही घटना..निळ्याशार सागरलाटांचं दृश्य तो साठवत होता..आणि.. अचानक त्या दृश्यांत लाटांवर ’गटागळ्या’ खात, बहुधा ’वाट’ चुकलेले वीस पंचवीस शार्क्‌सदृश मासे किनार्‍याकडे येवू लागले आणि वाळूंत तडफडायला लागले. हे अतर्क्य, अवचित दृश्य नजरेस पदताच सुरुवातीस अचंबित झालेले, समुद्र-पर्यटनासाठी आलेले तरुण-तरुणी, ललना-बाप्ये, अबाल वृद्ध कांही पळांतच भानावर आले. सुरुवातीस एकानं त्यांतल्या एका माशाला, शेपटीधरून ओढत खोल समुद्रांत नेलं आणि त्याला परत ’जलचर’ केलं. ते पाहून अनेकांची भीती, भीड चेपली आणि मंडळी चक्क, ”संकटनिवारन आणि पुनर्वसन कार्या’ला प्रवृत्त झाली. पाहातांपाहातं सर्व च्या सर्व मासे खोल पाण्यांत जावून आपली ’रोजमराकी जिंदगी’ व्यतींत करायला लागले आणिमग किनार्‍याचर्च्या सर्व विघ्नहारी, संकटविमोचकांनी एकचं जल्लोश केला...स्वत:च्या ’जागल्या’च्या भुमिकेवर पशिसित होत, कुणालातरी ’जगवल्याच्या आनंदांत..हर्षविभोर होत.... तेंव्हा आतां, कान्होपात्रेच्या, ’नको देवराया । अंत पाहु आतां ।’ या टाहोमधले ’हरिणीचे पाडसं । व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले । तैसे देवा ॥’ हे चार चरण, संदर्भाधीन चित्र पाहाता.. ’गाउलीची कांस । तान्हे धरियेली । देखता दहिवरली । देवसभा ॥ इवल्याल्या ओठी । प्रपातला पान्हा । जणू शुष्क राना । हिरवा बहरं ॥ मरणाला आतां । करूनी निवृत्त । बासनी बंदिस्त । ठेवू आम्ही ॥’ असे बदलून घ्यावे की काय असा मोह होतो... खरंच असं होईल ?

Friday, August 3, 2012

’उद्या आयुष्यांतनं उठणार्‍या नऊ गोष्टी’

’उद्या आयुष्यांतनं उठणार्‍या नऊ गोष्टी’ ही ना तक्रार अथवा वेदनांची यादी भविष्यांतल्या बदलांची आहे, नोंद घ्यावी अशी नांदी. पण ढळू नका चळू नका, खुशीत राहा, नि:शंक निचिंत आज तरी सुविधांची आपणा कुणाला नाही भांत आला दिवस मजेंत जगा, बदल तर होतच राहाणार, उत्क्रांतावस्थेंत, या पुढेही मर्कटांची पुच्छ गळूनच जाणार या ’नवां’ची नवलाई बहुधा आतां नुरली नि सरली ’गर’ सगळा संपून गेला आतां फक्त ’सालं’ उरली ..तर.. या, तुमच्या-माझ्या हयांतींत, कुणाला त्याच्यात्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे आवडो वा नावडो, पण कालानुपरर्त्वें लोप पावत जाणार्‍या किंवा परिवर्तन पावत जाणार्‍या नऊ बाबी ’सुख’सोयी, ’रोजमराकी जिंदगी’ सुसह्य करणा‍‍र्‍या सुविधा, ...तुम्ही त्या बदलांसाठी तयार असा किंवा नसा... कुठल्या ? टपाल-कार्यालयहीन संज्ञापनाला सामोरं जायला तयार राहा. कारण त्यांची अर्थव्यवस्था इतकी ढासळलेली आहे कीं त्यांतून बाहेर पडण आणि फार काळ कार्यप्रवण राहाणं त्यांना यापुढ अवघड आहे. ई-मेल्‌, फेड्‌ एक्स्‌ आणि यूपीएस्‌ हया इतकया कमी खर्चिक आणि वेगवान संज्ञापन सुविधांनी, कागदी पत्रांच, टपालानं येणा-जाणार्‍या संदेश वहनाच जग जणू संपुष्टांत आणलं आहे. कारण आज अनावश्यक माहितीपत्रकांचा ’कचरा’ आणि कागदी बिलांची, धूळ खात पडणार अडगळ आणि रद्दी ह्या ’तापदायक’, या सदरांत मोडल्या जाताय्‌त ! धनादेश.. इंग्लंड्‌मधे, इसवीसन २०१८ च्या अखेरीपर्यंत, धनादेशाची बोळवण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत या आधीच. कारण अक्षरश: कोट्यवधी डॉलर्स्‌ केवळ धनादेश वटविण्याच्या प्रक्रियेवर खर्च होण्याचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर दरवर्षी पडतो. क्रेडित्‌ कार्ड्स्‌चा वापर आणि संगणकाद्वारे व्यवहार या दोनीही पर्यायामुळे हळूहळू धनादेशांचा वापर बंद होत चाललाच आहे. आणि पर्यायानं टपाल कार्यालय सुद्धा या मुळं ’कार्यरहित’ होण्याचा संभव आहे. कारण तुम्ही तुमची देयक जर महाजालातर्फे मिळवत आणि भागवत असाल तर मग ती टपालाने देवाणघेवाण करण्याचा प्रयास वाचतो आणि पर्यायानं टपालकार्यालयांच बरचसं काम सुद्धा ठप्प होतं. वृत्तपत्र, नियतकालिक म्हणजेच दैनिक, साप्ताहिकं किंवा मासिकं... तुम्ही सांगा, तरुण पिढीच्या प्रतिनिधींपैकी कितीजन रोजचं वर्तमानपत्र किंवा एखाद नियतकालिक नियमितपणे वाचतांत ? हाताच्या बोटावर मोजण्याइअतके सुद्धा नाही. कारन त्यांना सकाळे उठून घाईघाईनं सगळी आन्हिकं उरकून त्यांच्या ’दफ्तरी’’ दाखल व्हायचं असतं. कुठून बिचार्‍यांना वेळ मिळणार ? कित्येकजण तर मुद्रित माध्यमांशी फारकत घेतलेलेचं असतांत. भविष्यांत ’दूधवाला’ आणि ’धोबी’ यांचीही हीच दशा होणार बहुधा.. म्हनजे तेही ’येणं’ हे लोक बंद करनार...म्हणजे दुधाच्या गोळ्या आंणि ’क्रीज्‌लेस्‌’ कापडाच्या ३/४ चड्या आणि 'टी-शर्टस्‌चा वापर वाढवून.. अहो तुम्हाला चल्त्ध्वनिसंचावर महाजाल उपलब्ध झाल्यावर कोण घरी ’वर्तमानपत्रांच्या घड्या उघदत-घालत बसनार ? उगाच रद्दी.. झालं, ? म्हणजे रद्दीवाल्यांच्या पोटावरसुद्धा पाय.. उध्या प्रकाशक आणि विपनक अ‍ॅपल्‌ सारख्या संस्थांबरोबर हातमिळवणीकरून ’मूल्याधिष्ठित’’ मजकूर-सेवा देण्याची संकल्पना राबवतील.. अं हं त्यांना ती राबवावीच लागेल अन्यथा देशोधडीला लागतील बिच्चारे ! पुस्तकं तुम्हाला वाटतय ना की तुम्ही तुमच्या हातांत पुस्तक घेवून त्याची पानं उलतत आरामांत वाचत पडून राहाल. मलाही, माझ्या आवडीच्या संगीता बद्दल तसंच वाटत होत. की माझ्याकडे ध्वनिचकती असेल आणि मी ती पाहिजे तेंव्हा वाजवून ऐकू शकेन. आणि तसं होतही होतं पण जोप्र्यंत मला आय%% ट्यून्स्‌वर, जवल जवल निम्म्या किमतींत तीच गाणी.. अगदी अद्ययावत.. ’उतरवून घेण श्यक्य झालं नव्हतं किंवा ते तंत्रज्ञान माहीत नव्हतं तोपर्यंत. आणि ते सुद्धा घराच्या बाहेर न पडता, विनासायास ! पुस्तकांच्या बाबतींतसुद्धा... माझ्याकडून लिहून घ्या की..तुम्हाला तोच अनुभव येणार आहे नजिकच्या भविष्यांत. विनासायास, घरबसल्या, महाजालांतल्या पुस्तकांच्या दुकानांत जावून पुस्तकांचे अभिप्राय, परीक्षणांचा तौलनिक अभ्यास करून, तुम्ही पाहिजे ते पुस्तक, निम्म्याहून कमी किमतींत वाचू शकणार आहांत महाशय ! आहांत कुठं ? फरक एवढाचं की पानं बोटांनी ’उलटा’यच्या ऐवजी तुम्हाला ती ’क्लिक्‌’ करायला लागणार आहेत. तुम्ही त्या मजकुरांतल्या आशयाच्या मध्यभागी विराजमान होत, आपण पुस्तक हातांत धरण्याऐवजी संगणक’ नावाच्या एका सुविधे समोर बसलो आहोत याचं कालांतरानं विस्मरण होणार आहे तुम्हाला, आणि एक दिवस या सवयीचेही गुलाम होणार आहांत. सर्वसामान्य दूरध्वनिसंच जोडणी: जर तुमचं कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीचं नसेल आणि तुम्ही दिवसांत, दूरध्वनिसंचाचा स्थानिक संपर्कासाठी खूप उपयोग करीत नसाल तर अशा परिस्थितींत, तुम्ही सर्वसामान्य दूरध्वनिसंच जोडणीऐवजी साहाजीकच, चलत्ध्वनिसंचालाच पसंती देणार ना ? कांही लोक केवळ ’सवयी’नं अशी जोडणी ठेवतांतही, पन त्यांच्या हे लक्षांत येत नाही की कांही अनावश्यक सेवांसाठी उगाचच त्यांना शुल्क भरावे लागतं. आणि बहुतेक सर्व चलत्ध्वनिजोडणीसंस्था तुम्हाला त्याच दरांत संपर्काची सुविधा देतांत. संगीत: नवनवीन संगीतकार गायक विविधप्रकारच्या सादरीकरणाचे अनेकविध आणि खरोखरंच अप्रतिम प्रयोग करून पाहाताहेत पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, महाजालावरच्या उपलब्ध सण्गीताचं बेकायदेशीर ’अपहरण’ आणि वापर यामुळं ही सगळी सर्जकता, प्रयास वाया जातांत की काय अशी भीती वाटण्याइतकी परिस्थिती गंभीर झाली आहे. सद्यस्थितींत संगीत-तबकड्या निर्मिती संस्थांनासुद्धा पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही आणि आणि चित्रवाणीच्या ’आक्रमणा’मुळं ’ध्वनिप्रक्षेपणा’ला श्रोता नाही. हव्यास यशस्वितेचा आणि मत्सर, यशस्वी झालेल्यांचा अशी दुधारी तलवार चालतेय ती मात्र सुरां’वर. शिवाय जुन्या जमान्यांतल्या गायक-गायिकांची गीतं अजून श्रोत्यांच्या मनांत रुंजी घालतायत हे आणखी एक कारण. संगीत मैफिलींची अवस्था याःउन कांही वेगळी नाही. या विधानांच्या पुष्ट्यार्थ, स्टीव्ह नॉपर्‌चं, स्वनाशाचा हव्यास.. "Appetite for Self-Destruction" हे पुस्तक वाचणं आणि "Before the Music Dies."या शीर्षकाचा एक लघुपट तुम्ही बघण आवश्यक आहे असं मला वाटतं ! चित्रवाणी: महाजालावर उपल्ब्ध असलेल्या कथापटांच्या प्रवाहा.. अं हं. धबधब्यामुळं लोकांचं त्यासाठी चित्रवाणीच्या छोट्या पडद्याला शरण जाणं, चित्रपटगृहांत तिकिटं काढून जाण्यापाठोपाठचं बंद झालय जवळ पास ! शिवाय चित्रपटांव्यतिरिक्त, विविध मनोरंजक खेळ..आणि ’बरंच’कांही संगणकावर केवळ कांही ’क्लिक्स्‌’च्या अंतरावर हात जोडून उभं असतांना कोण फुकाचे कथापट पाहाणार ? praaim^^ Taaim^^' असा आता मुळी राहिलाच नाहिये..शिवाय चित्रवाणीच्या पदद्यावरचे तद्दन भिकार कथापट, दरचार मिनिटांनी चार मिनिटे पहाव्या लागनार्‍या निरर्थक, निरुपयोगी जहिराती यांचा उबग आतां सर्वसामान्य जनतेला येवू घातलाय. आतां हळूहळू चित्रवाणी वाहिन्यांनी गाशा गुंडाळायला हवा कारण ’त्यांना’ पाहिजे ते प्रेक्षकांनी बघण्यापेक्षा, प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचं मनोरंजन निवडण्याचं स्वातंत्र्य संगणकीय महाजालाच्या क्षितिजावर तळपायला लागलय ! ’तुमच्या’ मालकीच्या कांही गोष्टी: तुमच्या खास खाजगी अशा कांही वस्तू, गोष्टी, बाबी ज्या आजही तुमच्या घरांत अस्तित्वांत आहेत, त्या कदाचित उद्या तिथं नसल्या तर चक्रावून जावू नका. तुमच्या संगनकाची Hard-drive, तुमच्या संगणक प्रनाली ज्याचांत आहेत आणि ज्या तुम्ही पाहिजे तेंव्हा संगणकाच्या Hard-driveमधे समाविष्ट करू शकता त्या तुमच्याकडच्या CD,DVD वर असतील ना ? पण आतां ‘आपल्‌. माय्‌क्रोसॉफ्ट्‌, गूगल्‌ सारख्या संस्था यापुढ त्यांच्या सेवा बंद करतील आणि तुम्ही तुमचा संगणक सुरू केलांत की महाजालच एक सेवाप्रणाली म्हणून काम करायला लागेल आणि विंडोज्‌, गूगल्‌, मॅक्‌OS वगैरे सगळे महाजालाचे गुलाम होतील. तुम्ही एखाद्या चिन्हावर क्लिक्‌ केलंत की महाजालाचं महाद्वार उघडेल आणि कांही ’वाचवायचं’ असेल तरीही महाजाल त्याचं ग्रहण करून त्याला ’ग्रहण’ लागणार नाही याची काळजी घेईल. अर्थांत ’ते’ या महाजालावरच्या अब्जावधीगोष्टींम्धे हरवून जाईल कां ? ’आपल्या’ असनार्‍या बहुतेक गोष्टी कचर्‍यासमान होतील कां.. आणि छायाचित्रांचा तुम्ही जपलेला संगेह, जपलेल्या पुस्तकांतलं मोराचं पीस किंवा जाळीदार पिंपळ पान, एखादी महत्वाची CD ? या अमूल्य गोष्टी, ज्यांच्याशी तुमच्या अलवार भावना निगडींत आहेत त्यांचं काय होईल ? माहीत नाही... आणि शेवटी.. अर्थातचं ’स्वत्व’ ’सत्व’ आणि ’संपृक्तता’ गतस्मृतींत रमण्याचा आनंददायी अनुभव, स्वत:शी जपलेले अनमोल क्षण, त्यांचा पुन:प्रत्यय नाही तरी आठवणी, हे आपलं नेहमीचाच एक स्वप्न, असोशी असते. ते ’खाजगी’ पन आतां संपलच आहे. कारन बारा महिने चोवीस काळ तुमच्या अवतीभवती, रस्त्यावर, घरांत तुमच्या संगणकावर, चलत्ध्वनिसंचाचर छायक तुमच्यावर पहारा देताहेत. तुम्ही कुठे आहांत, काय करतां आहांत, अगदी अक्षांश-रेखांशासह ठिकाणाच्या अचूक माहितीसह तुमचं ’स्वत:’शी असण, तुमच स्वत:चं अवकाश ओरबाडताहेत. तुमची खरेदी, तुमच्या सवयी लकबी, या सगळ्यावर ’त्यां’चं नियंत्र्ण असणार आहे. तुमची खरेदी. पसंती ’ते’ बदलतील किंवा अगदी रद्द सुद्धा करतील उद्या...! आहांत कुठं ? फक्त एकच गोष्टं आपल्या ताब्यांत राहाणार..अगदी खात्रीपूर्वक...म्हणजे आपल्या ’सुवर्णमूल्य स्मृती. असो.. हे ही नसे थोडके.. पण सावध.. उद्या ’अल्झाय्‌मर्स्‌’..डिम्नेशिया किंवा ’स्मृतिभ्रंश’ त्यां पासूनही तुम्हाला वंचित करू शकेल ’स्मृतिभंशात्‌ बुद्धिनाशो बउद्धिनाशांत प्रणश्यती’ ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar