Friday, January 30, 2015

।।भासबोध।। ३१८ ते ३४५

अंतरी निरुपण, कीर्तन, प्रवचन । रिचवाया, रुजाया जिवंत हवे तन । परि पचन व्हायला अन्न । जर नसेल ? सर्व व्यर्थ !।। ३१८ प्रवचन, निरूपण, कीर्तन । करतील कदाचित समाधान । राखण्या शरीर, मनाचे कोंदण । पचनासाठी अन्न हवे ।।३१८ साधेल काय अध्यात्मज्ञान ?। आत्म्यास मिळेल समाधान । 'त्या'च्या निवासास परि तन । नसेल तर ? सर्व व्यर्थ ।। ३१९ रुचेपचेल ते केवळ सेवावे । अन्य 'अन्न' दुरोनि आदरावे । मोक्ष, गती, फसव्या 'पक्षां' चे थवे । दुर्लक्षावे खचित ।। ३२० तंत्र, यंत्र ना, मंत्र आधी । आवश्यक, ठरण्या लक्षवेधी । कार्यपूर्ती, वा मिळण्या सिध्दी । शाखाज्ञान जाणिजे ।। ३२१ मंत्रोत्तरी तंत्राची जाण । मग यंत्राची जडण-घडणं । साध्य करण्या कार्यकारण । साहाय्यभूत जे होते ।। ३२२ अर्थाची नका करूं गल्लतं । मंत्र म्हणजे नव्हे उपासना, व्रतं । विषयाशयाने असतो संपृक्त । लक्षवेधी नेमका ।। ३२३ जाणिवेस देतं प्रतिसाद । मगजांतरी तर्क-बुध्दी वाद । ज्ञान-कर्मेंद्रये आदेशानुरूप सावध । कर्यप्रवण तदनंतर ।। ३२४ ।। दास-वाणी ।। जेणें देहबुद्धी तुटे । जेणे भवसिंधु आटे । जेणे भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०३/५० मी म्हणजे माझा देह. त्याचे संगोपन, लाड हेच आयुष्य असे वाटणे ही देहबुद्धी. जे जे दिसते, अनुभवाला येते ते सर्व चर अचर, स्थावरजंगम असा प्रपंचाचा पसारा म्हणजे भवसिंधु . कवित्व कशाला म्हणायचे ? जे नियमीत श्रवण केल्याने देहबुद्धी नष्ट होते. जगातील प्रत्येक गोष्ट नाश पावणारी आहे हे कळल्यामुळे प्रपंचावरील लक्ष उडून परमेश्वराकडे केंद्रित होते, भगवंताची साक्षात अनुभूती साधकाला प्राप्त होते तेच खरे कवित्व. तोच खरा कवी. नाश कैसा पावेल कोण ?। अवतरेल ना घेउन पुनर्जन्म ?। 'तुम्ही'च देतां शिकवण !। मग अव्हेरिता कां ?।। ३२५ कल्पना, बीजरूपी कवित्व । त्याचीच निर्मिती 'देवत्व' । 'नसलेपणास' अस्तित्व । देती कवी ।। ३२६ अंतरंगी हरेकास होते प्राप्ती । अनुभवसमृध्दिची व्याप्ती । व्यक्त करण्या अल्पाक्षरी क्लृप्ती । अवगत असते कवीस ।। ३२७ कर्म, कष्टकऱ्यांचा 'भगवंत' । कालापव्ययी जपजाप्य व्यर्थ । 'अर्थ' होतो कार्योत्तरी कृपावंत । 'भवसिंधू'त तरावया ।। ३२८ विश्रामाच्या क्षणी कधी । थोडा शोधून त्यांत अवधी । देहधाऱ्यांच्या व्यथा, व्याधी । वेदनांचे जाणा कवित्व मूक ।। ३२९ कवित्व म्हणजे स्वप्न पाहाणे ?। कवित्व म्हणजे दिव्य लेणे ?। कवित्व म्हणजे प्रतिबिंबापल्याडचे जोखणे ?। व्याख्या उलगडा !।। ३३० सामान्य पाहातो स्वप्ने । सामान्य जाणतो मरण्यांत जगणे । सामान्यास सुख-दु:ख, संसारलेणे । मातीतला कवि-प्रतिनिधी ।। ३३१ शून्य म्हणजे नसलेपण । परि दाविण्या अस्तित्व लागते चिन्ह । तैसेचि 'देवा'चे 'पूज्य'पण । प्रस्तरांत ।। ३३२ नाकारू नका मुळांत काहीच । नकारांशिवाय, होकार नसतोच । जैसे तम-तेजाचे नातेच । परस्परावलंबी ।। ३३३ म्हणोनि उच्चारूच नका आहे-नाही । मूक रहोनि घडते ते पाही । प्रचिती दिसण्याने देई । तेचि सत्य ।। ३३४ 'पाहातो तो सर्व वरून' !। 'त्या'च्या 'धाका'चे असूद्या भान !। म्हणून सोडेल भयभीत करुनं । अंतरंगी तो भामटा ।। ३३५ दयार्णवासि कां बा भ्यावे ?। वात्सल्यमूर्ति मूळ स्वभावे । देई धीर पोटाशी धरुनी प्रेमभावे । क्षमाशील तो सत्पुरुष ।। ३३६ पुढती मांडोनि सुवर्णपात्र । वाढून देती नाचणिची भाकर । तेवढीच पचवेल व्याधिग्रस्त शरीर । ना दुसरा इलाज ।। ३३७ भाज्या, चटण्या, कोशिंबिरी । उजव्या, डाव्यामधे विविध परी । पंचपक्वान्ने आणि खिरी । परंतु सारे निषिध्द ।। ३३८ विटेवरी चढविती विटा । गिलाव्या नंतर इंद्रधनुषी छटा । अंतरंग सजवुनि धरिती वाटा । पाले आपली पाडुनी ।। ३३९ जे उभारिले, ते नाही माझे । सोडतांना मनावर नाही ओझे । कार्यपूर्ती कोणत्याकाजे । जाणितो निस्पृह कर्मयोगी ।। ३४० आस्तिकतर टोकाचा नास्तिकं । श्रध्दा त्यांची केवळ एकं । अस्तित्व 'त्या'चे सर्वभर, बाकी मिथिकं । जैशा वारूसि झापा ।। ३४१ अवकाश अखंड, अगम्य, अनंत । तमप्रवाह त्यांत कालातित । आकाशगंगेत तारे केवळ निमित्त । जैसे गेरूवरी ठिपके ।। ३४२ कुंभार, माळी, विणकर, तेली । अनंत भाषा, विविध बोली । 'उक्ति'वल्ली उमलत गेली । उन्मनावस्थी, 'इटु' कारणे ।। ३४३ कोणीच नव्हते 'पदसिध्द' संत । कष्टकरी, संसारी कार्यरत । शब्द, सहज आले ओठांत । कौतुकास्तव 'त्या'च्या ।। ३४४ जर्जरावस्था आणि श्वान । अवस्था बहुश: एकसमान । नाकरीत नाहीत अन्न । वटारती नजर अधिकासाठी भुंकता ।। ३४५

Monday, January 26, 2015

।।भासबोध।। ३०४ ते ३१७

आपदा, विपदांचा होता उद्भव । आरडतांना 'देवा धाव' ?। छकुले रडते मातेस्तव । कां मग रागेजता ।। ३०४ नजरेआड झाली माय । तर तान्हे मोकलते धाय । उभे ठाकते कसले भय ?। कुशींत घेईल कोण ?।। ३०५ प्रारंभी कल्पना, मग हुंकार । हुंकारोत्तर अक्षर, उद्गार । पाठोपाठ शब्दमोहर । आशयपरिमळ दरवळे ।। ३०६ बीजांकुराचा उद्गम । प्रवाहस्रोताचे धाम । तर्क-बुध्दि-चातुर्याचा आगम । शुंडाधारी सुंदर ।। ३०७ थेंब आधी, संततधार नंतर । पागोळी ठिबके तळ्यावर । होड्या। सोडित, जणू जळचर । भासती बालके ।। ३०८ तानसेनाची आर्त तान । जर करील शेष श्रवण । डोलू लागेल हरपून भान । हा हा:कार अवनीवरी ।। ३०९ निसर्ग मग जाणीवपूर्वक । झाला परित्राण योजक । शेषास श्रवणेंद्रिय धारक । सद्हेतूने नाहि केले ।। ३१० प्रलयांतुन प्रसवण्या प्रसन्नता । चिंतामुक्ती देऊन चिंताक्रांता । भवसागरी तारक 'नेता' । सर्वदा होतो लंबोदर ।। ३११ पसरिता पसे दोन । जो देतो भरभरून । नाही पाहात मागे वळून । तोचि गुरु खरा शिष्याचा ।। ३१२ आधीच अवघडल्या शरीरी । कष्टविते गर्भधारी नारी । सांकडे घालण्या द्वारी । प्रस्तराच्या ।। ३१३ राम ना, ना दास, ना मी समर्थ । जाणिला, आकळला जेवढा अर्थ । ओवी, उपदेश सद्यकालांत सार्थ । असे-नसे जोखिले ! इतुकेची ।। ३१४ मी मतिमंद, मूढ लेकरू । भ्रांत भुकेची ! काय करू ?। कष्टसाध्य भाकरिचा आधारू । कोण देइल जगण्याला ।। ३१५ जपजाप्य, नामस्मरण खूप केले । परि कांहींच ना साधिले । क्षणोक्षणी दिवस वाया गेले । फुकाची व्यथा ।। ३१६ गति वाढली, झाला कपाळ'मोक्ष' । माळेत ओवुनी, विविध मुखी रुद्राक्ष । पोथ्यां-ग्रंथ घेउनी हेरणारे भक्ष । 'अध्यात्मिक' कल्लोळ आसमंती ।। ३१७

।।भासबोध।। २३४ ते ३०३

व्याघ्रादिकांचि वृत्ति श्वापदी । कवळ कवळून करिति जायबंदी । नरडे फोडोनि होती आनंदी । शोणित-प्राशने ।। २३४ तैसेची तथाकथित 'समाजकारणी' । लटक्या प्रेमभरे कुरवाळुनी । करिती काळेंना अत्याचारी करणी । जैसा फुकरे मूषक ।। २३५ सगेसोयरे, आप्तेष्ट। नित्यनेमाने वास्तपुस्त । करत राहावे कर्म रास्त । सर्वांस जे हितकर ।। २३६ कर्म-कर्तव्य प्रामाणिकपणे । गृहस्थाश्रमी करीत राहाणे । बाळ-गोपाळ, अस्तुरी सुखविणे । हीच आमुची जीवनकला ।। २३७ ।। दास-वाणी ।। भिक्षेने वोळखी होती । भिक्षेने भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०२/१३ गावोगावी, घरोघरी भिक्षा मागितल्यामुळे महंताचा जनसंपर्क वाढतो. लोकांच्या मनातील धर्माविषयीचे भ्रम महंत दूर करू शकतो. अत्यंत कमी मोजकीच भिक्षा महंत घेत असल्याने गरीबाला सुद्धा आर्थिक बोजा न पडता पुण्यप्राप्ती होते. (आताच्या काळात महंत म्हणजे कार्यकर्ते, भिक्षा म्हणजे सभासदत्व व देणगी घेणे) उदरनिर्वाहासि मागण्याने भिक्षा । दास म्हणति रुंदावते संपर्ककक्षा । परगृही शिजले ते 'मोक्षा' । कष्ट टाळोनि मिळवीलं?।। २३७ सद्यकाली नाकारला 'चंदा' । तर तोडफोडती उदिम, धंदा । गुन्हे करोनि परागंदा । होती कार्यकर्ते महंत ।। २३८ हेरोनि तोरणे,माळा, उत्सव । त्रस्त करिता अबालवृध्द बांधव । 'राजा'श्रयासि ही एकच ठेव । गांवगुंड 'महंतां'कडे ।। २३९ हा असला 'उपदेश' । कर्मयोगी साधकास । देशोधडीला हमखास । लावेल ना ? सांगा बरें !।। २४० ।। दास-वाणी ।। मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावें । मरोन कीर्तीस उरवावे । येणें प्रकारें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/१०/१३ कधीतरी आपण नक्की मरणार आहोत.आपल्या चांगल्या वाईट कृत्याची वर कुठेतरी पक्की नोंद होतीय ही जाणीव म्हणजे मरणाचे स्मरण. व्यावहारिक, प्रापंचिक, सुखविलासापेक्षा जो हरिभजनात प्राधान्याने दंग असतो अशा उत्तमपुरूषाची कीर्ती तो मृत्यू पावल्यावरही खूप काळ टिकते, वाढतच जाते. मरण कसले ?, म्हणाना 'मोक्ष' । 'आत्मा' शोधितो नवा 'कक्ष' । अध्यात्माला कोरे 'भक्ष' । आपोआप ।। २४१ कशास हवी, कुणास कीर्ती ? सय येतां पांपण्या पांणवती । हृदये आप्तस्वकीयांनी हेलांवती । पुरेसे असते जनसामान्या ।। २४२ स्मरण कोणाचे ? किती ? कृत्ये विविधांगी करिती । प्रमाणांत त्यांच्या, व्यक्ती । राहती आठवांत ।।२४३ गद्गद होवुनी कुणी वंदे । आठवुनि जखमा कुणि क्रोधे । उच्चारण्या अपशब्द, ओठामधे । कर्माजोगी प्रतिक्रिया ।। २४४ नको कीर्ती नको पुतळे । टाळक्यावर बसतिल कावळे । 'कावकाव'त मिळुनि सगळे । मुद्रा भरतिल विष्ठेने ।। २४५ जगण्याची कला कां 'शिकविता'?। सहज श्वासना सारिखी असतां । 'रवि'तेजातळि रोज घडतां । 'शंकर' काय करील ? ।। २४६ शिबिरे की नृत्यांगणे ? । कालापव्यय विनाकारणे । द्विजास अवकाशी झेप घेणे । शिकवणारा एक मूर्ख ।। २४७ फोडिता शब्दांची अंतरे । त्यांतूनि प्रसवतील धनधान्यांची कोठारे ?। सुखावतील अस्तुरि आणि पोरे ?। क्षुधाशमनोपरान्त ?।। २४८ संधी गरजूंना काबाडकष्टांची । त्यांतूनि चरितारार्थ अर्थार्जनाची । भवसागर तरून जाण्याची !। व्हा प्रदीप त्यस्तव संतहो !।। २४९ म्हणे 'अध्यात्मिक अनाथ' । आणि सद्गुरू तारिल धर्माचरणांत । पण जगण्यासाठी घास ओठांत । देइल ऐसा गुरू ?।। २५० उपदेश हवेंत विरेल । जर श्रोता पुढती नसेल । भरल्या पोटीच सहसा पचेल । व्यर्थ बोध वा भक्तिधारा ।। २५१ आधी भागवा शारीर गरजा । विशेषत: चालना देण्या मगजा । सजग करण्या चेतना,संवेदना, समजा । तवान हवे ना तन-मन?।। २५२ होईल साध्य, की राहील स्वप्न ?। ज़रि अर्पिले तन-मन-धन । जैसे ज्याचे कर्मावगुंठित प्राक्तन ।च तेचि पदरी पडेल ना ?।। २५३ भव्य आकार जरि बहिर्रूप । हृदयांत वात्सल्य, माया अमाप । विघ्नहर, आपदांचा सकोप । संहारकर्ता ।। २५४ चंद्रगुप्तासि चाणक्य जैसा । शिवरायांसि समर्थ तैसा । सत्तेसाठि नाहि पसरायचा पसा । मिळवायची लढोनि, हा केला उपदेश ।। २५५ शुंडेंत एकवटली शक्ती । कर्ण विस्तीर्ण उत्सुक ऐकण्या स्तुत्योक्ति । नेत्र किलकिले तरि तीक्ष्ण दृष्टी । पांखर सदैव भक्तांवरी ।। २५६ लंबोदरांत सहज रिचवे । सेवा जे करिती मनोभावे । ऐशांचा अपराध संभवे । जरि अनवधानें ।। २५७ ऐसी ठेवावी गुरुने धारणा । ज्ञानतृषार्था शिष्य म्हणा । जळनिधी जगति कधि कोणा । अव्हेरतो कां ?।। २५८ योग्यता जोखावी गुरुंची । तेथे 'आवड-निवड' त्यांची । तीक्ष्णबुध्दी शिष्योत्तमांची । क्षीणबुध्दी बालकांवर अन्याय ।। २५९ भेगाळल्या भुईवर बीज रुजवी । निगराणी करुनि फुलवी, फळवी । झेलण्या वादळ-वारे मार्ग दावी । तोचि कसबी कृषिवलां ।। २६० धरुन हाती हिरा मुळांतला । घासुनि-पुसुनी चमकविला । 'वल्गना' करितो, 'मीच घडविला' । तो कसला गुरू ?।। २६१ मोकळिली सर्वत्र शारदा । विविध विद्याशाखांची संपदा । ज्ञान-विज्ञान, कर्मयोग, व्यवसायीसि सर्वदा । वरदायिनी ।। २६२ कळाकुसर, तंत-स्वर-ताल । ज्ञान भारले भवताल । अनंत अवकाशाचा तोल । शारदा सहजी सांभाळी ।। २६३ शाश्वती, रक्षण, दायित्व । वात्सल्य, प्रिती, ममत्व । कर्तृत्व, दातृत्वादि तत्वं । अंतरंगी उपजवी ।। २६४ असो राजा वा रंक । अनाकारण कुणा डंख । करू पाहेल ! तर हकनाक । सर्वनाश अटळ ।। २६५ जगा, जगूद्या हे सूत्र । मानवतेचा आधारमंत्र । अत्याचारासि दया मात्र । दुरापास्त ।। २६६ राम होता ना देव ?। मग चंद्रप्राप्ती कां झाली असंभव ?। झाली प्रतिबिंबित कल्पनेची धाव । कौसल्या मायेची ।। २६७ म्हणे होता बालहट्ट । वसतो जो 'बिंदू पासुनि सिंधूंत । बाल, युवा वा जर्जराशक्त । 'देव' कसा असेल हो ?।। २६८ विरंगुळा कथेचा रयतें । करमणूक आयती होते । परस्पर 'कार्य' सिध्दीस जाते । भाकड भाटांचे ।। २६९ संकटे झेलीत राज्ञी सीता । परपाशांतुन सोडवुनि आणिता । झाला राम आज्ञा करिता । अग्निदिव्याची ।। २७० रापाच्या मिशें वणवे । लाविती कृषिवव अननुभवी नवे । भडकतां अवघे रान पेटवे । विक्राळ पावक ।। २७१ अमर्यादित त्याची व्याप्ती । मरुतादी भूते साहाय्य करिती । शमविण्यासि जळनिधी अपुरे ठरती । प्रसंग बांका ठाकतो ।। २७२ कर्मोत्तरीच अनुभव । तोचि जाणा योग्य 'देव' । त्याचाच जर असला अभाव । तर 'शोधेनि गवसेना' अशी स्थिती ।। २७३ केवळ म्हणे पदस्पर्शाने । शीळेंतुन अहल्येस मुक्त केले । मग स्वपत्नीस कां म्हणे । धाडिले वनांत ? ।। २७४ प्रष्णांची उत्तररामचरितांतं । उत्तरे सारी मिळतांत । आणि सिध्द करतांत । 'मनुष्य'पण रामाचे ।। २७५ म्हणोनि जरि दिसला नाही । कल्पनाचक्षूंनि न्याहाळी पाही । शब्दरूप 'त्या' ला दई । रसिकांसाठी ।। २७६ मात्र जाणा त्यांतील सत्य । ते कल्पनेचेचि क्रीडाकृत्य । 'दिसला, पाहिला', गर्जोनि नृत्य । आनंदविभोरें करू नका ।। २७७ काव्य, गीतांत बहुतेक । फसव्या प्रतिमा अनंत । सत्य प्रतिबिंबाचीचं भ्रात । तेथ नेमकी असते ।। २७८ उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांतादी । अनुप्रास, रूपक अलंकारांची यादी । लेखक, कवि, बुध्दिवादी । वसते याच्या संग्रही ।। २७९ विणोनि कल्पनाविश्वाचे जाल । हे सुखाशांचे दलाल । भाबड्या रसिकांसाठी कलाल । सहजी होती ।। २८० चढवुनि होता पुरेपूर नशा । 'गल्ला' जमता गुंडाळिती गाशा । वाचकास सोडोनि प्रदेशा । अतर्क्य, अनाकलनीय अनुभवण्या ।। २८१ जय जय भास्कराचार्या । अपाला वदली प्रथम आर्या । वेदरचनेच्या महत्कार्या । आरंभिले जिने ।। २८१ जयतु सुश्रुत शल्यचिकित्सक । अश्विनिकुमार, औषधोपचार संशोधक । कृषि, अवकाश वैज्ञानिक । जगणे सुखविण्या जे झटले ।। २८२ कोणास आत्मा मुळांत । दिसला, जाणवला भवतालांत ?। परमात्म्याचे कां मग 'भूत' । व्यथितांच्या गळी उतरविता ।। २८३ जगतों, चालतो, बोलतो । हसतो, खंतावतो, वेदना रिचवितो । संसारावर पांखर धरितो । तो धैर्यशील ।। २८४ 'संत' पण काय वेगळे ?। अतर्क्य बडबड, अगम्य जाळे । त्यांत भाबड्यांना ओढण्याचे चाळे । करिती ते संत ।। २८५ संकटांत अविचल । सुकाळांत सुखे भोगीत । आकंठ बुडला संसारांत । तो खरा 'संत' ।। २८६ वाटते कां कमीपण ?। अभ्यासण्या त्यांची शिकवण । अनुभव, वागण्या-बोलण्यांतुन । कां दुर्लक्षिवा कथित 'संतांनी ।। २८७ वक्ता वक्ताचि नव्हे श्रोतेविणं । समोरचा ज्ञानतृषार्त जनगण । तृप्त श्रवणाने मन । समाधान पाहिजे पावले ।। २८८ प्रारंभी रीझवावी अंत:करणे । मग आकर्षूनि आशयाप्रत नेणे । उपसंहारे प्रोत्साहित करणे । असा क्रम सामान्यतः ।। २८९ कुणा कमी न लेखतो । स्मितभाष्यें सर्वांस सुखवितो । नेत्रांतली उत्कठा जाणितो । वक्तादशसहस्रेषु ।। २९० त्यां हृदयीचे स्वहृदयी रुजविती । रसिकत्वा परस्पर येइ भरती । देउ-घेवोनि समृध्द होती । वक्ते, श्रोते ।। २९१ जो संसारी आप्तांसाठी झटला । त्याने नाही कां परमार्थ साधिला ?। जपजाप्य, उपासनेसि नाही बसला !। बिघडले कोठे ?।। २९२ चिंतन चिंतांचे केले । वारण्यास उपाय शोधिले । भवसागर करून गेले । ते कर्मयोगी परमार्थी ।। २९३ जो ज्या जागी स्थित । करीत राहतो कार्य विहित । तोचि रोजच्या जगण्यांत । परमोच्चपदी ।। २९४ कोणी पाहिले जन्म अनेक ?। काय असते त्याचे प्रमाणक ?। कशाल मग स्मरता चार्वाक ?। म्हणे 'तत्वज्ञानी आम्ही' ।।२९५ शब्दरत्नाच्या भांडारा माजी । सद्यकाली वसती माझी । आपोआप वीण त्यांची । उपजवी आशया ।। २९६ स्वर-शब्द उठविती तरंग । उचंबळविती अंतरंग । अमूर्त आनंदाचे भाग । पिसे जडवित उधळिती ।। २९७ स्वरभारित आसमंत । रसिकत्व होई उत्क्रांत । ज्ञानेंद्रिये कांठोकांठ तृप्त । पांपणीकांठी दहिवर ।। २९८ हे तो होय सत्कीर्तल । हरेक पावला पुनर्तवान । विस्मरण्या शरीरे नि मन । आपदा विपदांना ।।२९९ थकले वाटे हृदय, मगज । क्षणिक विश्रामाची गरज । सप्तशतकी लहरींची गाज । भारतसे अंतर्मन ।। ३०० पुन:पुन्हा पुनर्जन्म । कशास सारखे स्मरण । एकदाचि असते मरण । कां पांडिता भ्रमांत ?।। ३०१ अक्षरे वाचू लिहू लागली । भाबडी शिक्षणाने सरसावली । आंता अंधश्रध्दांची काळी बाहुली । नको वाटे त्यांना ।। ३०२ आतां आवरा भाकडे । ना तर म्हणतिल 'खोटारडे' !। भिऊनि पाउल वाकडे । ना टाकेल कोणी ।। ३०३

Wednesday, January 7, 2015

।।भासबोध।। २२२ ते २३३

निसर्गें सृजनाचा वर । मगजग्रंथींत रुजविला पुरेपूर । अखंड अभिषेक कलेवर । करण्या दिला मनुष्यां ।। २२२ अलंकाराचा करण्या वापर । सुकृतार्थ विचार सारासार । करावा ! अन्यथा 'कलेवर' । होइल त्याचे निश्चित ।। २२३ ।। दास-वाणी ।। मीपणे प्रपंच न घडे । मीपणे परमार्थ बुडे । मीपणे सकळहि उडे । येशकीर्तिप्रताप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/४७ ' मी ' पणाची सतत असलेली जाणीव म्हणजे अहंकार. प्रपंचामधे तर तो त्रास देतोच कारण मोठेपणाची कर्तृत्वाची जाणीव इतरांचा अधिकार मन मान्य करत नाही. परमार्थातही मी साधना करतो हा अहंकार परमेश्वरापर्यंत पोचू देत नाही. संपूर्ण शरणागतीशिवाय तो भेटत नाही. याच अहंकारापोटी भौतिक जगतातील यश, कीर्ती, प्रताप, मानमरातब यांनाही किंमत उरत नाही. विनम्रपण स्वीकारले तरच समाजमान्यता मिळते. 'मी' च नाही तर भवताल । काष्ठ-पाषाण-तेज-सलील । जैसी कवडश्याची 'सल' । नेत्रहीनासि ।। २२४ 'मी' च नाही तर भवताल । काष्ठ-पाषाण-तेज-सलील । जैसी कवडश्याची 'सल' । नेत्रहीनासि ।। २२४ 'अस्तित्व'चि जाणिते पंचतत्वे । ना जडती कसलीच ममत्वे । विचार, कल्पना, यश, कर्तृत्वे । नसलेपणासि फोल सर्वथा ।। २२५ 'मा'पण ज्याचे सरले । जगणे कशास मग उरले । मरण सुध्दा परवडले । तुलनेंत ।। २२६ संत ना मी, ना तत्ववेत्त । माझी तर शुध्द अनुभव-कथा । सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा । लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। २२७ ।। दास-वाणी ।। बहुतां जन्मांचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती । येथें न होता ज्ञानें सद् गती । गर्भवास चुकेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/१८ अनेक प्रकारचे जन्म घेतल्यावर क्वचित माणसाचा जन्म मिळतो. मानवी देहातच साधना करणे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून उत्तम गती लाभणे शक्य आहे. अन्यथा शिल्लक राहिलेल्या वासनांच्या पूर्तीसाठी जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते. मोक्षलक्षण समासात मनुष्यजन्मातील कर्तव्याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. कोण जाणे, कैसा पुनर्जन्म । हा तर केवळ अंधश्रध्द भ्रम । निसर्गे नेमुनि दिलेले विहित कर्म । करावे जोवरि हृदय सजग ।। २२८ जन्मला तो नाशवंत । मरणातुनी न होय उत्क्रांत । हे तर परंपरासिध्द निश्चित। विज्ञानसत्य जगन्मान्य ।।२२९ 'हे तर थोतांड !' म्हणे चार्वाक । एकदाच प्राक्तनी इहलोक । अभ्यासुनि उक्ती विस्मरती विवेक । पुनःपुन्हा 'संत' बरळती ।। २३० जे 'गेले'ते परतुनी आले ?। बाष्फ घनरूपे अवतरले ?। 'रक्षेंतुन' मूळरूपी प्रकटले ?। दावा ना मज कोणी ।। २३१ वास्तव कालातीत भीषण । आदर्शवादाची त्याला वेसण । युगानुयुगे, साधक, संत सज्जन । पाहती घालू ।। २३२ परि बदलेल सद्यावस्था ? । शर्यत लुटण्या सत्ता, संपदा । राजकारणे बरबटल्या कथा । ऐकता मन विषण्ण ।। २३३

Saturday, January 3, 2015

।।भासबोध।। २०१ ते २२१

न केले अपेयपान । वा कधि अभक्ष भक्षण । पूजिली अवघी श्रद्धास्थानं । अकाल काळाघात टळेना ।। २०१ आनंदे जगला स्वच्छंदी । रंगला भिजला सुस्वरनादी । 'तृप्त मी ! घेउदे समाधी' । विनवणी परि ऐकेना ।। २०२ सूर्यकिरणां उगमस्थळि विघटिते । जळबिंदूतुन सत्व शोषिते । व्यघिविनाशक सहजचि होते । शुध्दस्वरूपी प्राशिता ।। २०३ (सूर्यपादोदकम् तीर्थम् जठरे धारम्यांमहं ।।) विरघळता हितकर क्षार, वायू । जळांत ! निरामय होण्या आयु । प्राशिता, कृत्रिम औषधी, उपायू । अनावश्यक ।। २०४ रुजल्यावर सहजचि वृध्दी । स्थैर्याची सखि समृध्दी । अस्तवेळि विकार, व्याधी । स्नभाविक जीवनक्रम ।। २०५ लिहिणे केवळ हव्यास । नका म्हणू, 'हा व्यास' । कक्षेचा विस्तारणे व्यास । जगण्याच्या ! हा हेतू ।। २०६ म्हणून अनुभवत जगतो । डोळसपणे जागर करितो । खंतावतो, उचंबळतो, रागेजतो । कल्लोळ अंतरी माजता ।। २०७ कुणि अवकाश वैज्ञानिक । कुणि सावकाश अज्ञान मानक । दोघेही निवडले पुरस्कारार्थ । साहित्यतीर्थे ? अचंबा !! ।। २०८ कुणि शतकी शतक खेळे । कुणि डबक्यांत वळवळे । दोघे एका मंचावर ? आगळे । दृश्य याहून कैचे ।। २१० कुणि स्वरांची मांडी दुकाने । वाहिन्यांच्या वाऱ्या करित नेमाने । थोरांच्या बाह्या धरुन राहाणे । धर्म निष्ठेने आचरती ।। २११ आग्रह असतो पुण्यनगरींत । 'भूषण' म्हणावे त्यां, ऐसी रीत । नामचीन साहित्यिक अडगळींत । कुरवाळित स्वाभिमान ।। २१२ 'सरले' म्हणता कां सरिते । प्रवाहित राहावेच लागते सरितें । भविष्याची आव्हाने पसरिते । कर्म-कर्तव्य पूर्ततेची ।। २१३ तोचि सूर्य, तीच आभा । निळाईही आश्वासक तीच नभा । मनि धरोनि लाभ, लोभा । पळत सुटूं नित्यासारखे ।। २१४ तेच तेच सारे सारे । ठाई ठाई चराचरे । कर्म-कर्तव्याच्या उभारे । म्हणू, 'उत्तिष्ठत, जाग्रत' ।। २१५ परत परत सा रे सा रे । म ग ध नी प्रेमभरे । अवनीवरी तेजोभरे । तैसाचि पसा उजळेल ।। २१६ आकडे पुढे चालले । उदयास्त रोज पाहिले । अर्थहीन पळ जगलेले । भेडसावति आतांशा ।। २१७ हा मोजायाचा खेळ । चालेल असा किति काळ ?। त्यांतच चिरनिद्रा भूल ?। मिळो आंता !।। २१८ मावळती-गुलाल सलीलां । यमुना तीरी रासलीला । मधुराभक्तिच्या विविध लीला । रंगती गोकुळी ।। २१९ म्हणे अध्यात्माने आत्मोंन्नती । अर्थार्थ कर्मापासोनि मुक्ती । ज्यची नियत करंटी । तोचि जाणे घेऊ ।। २२० आत्मोन्नत मुक्ती फसवी । डोहाळे भिकेचे पुरवी । दारिद्र्याचे अस्मान दावी । आप्त-स्वकीयां ।। २२१