Tuesday, April 24, 2012

’बोला’क्षरे...

’बोला’क्षरे...’ ’विहीरमें घागर पड्या तो हमने वाक वाकके देख्या..तू ने देखा क्या बे ?’ किंवा, ’काऽऽय मर्दा ? बावंतं काय बुचकळून राह्यला गड्या... चल ! रंकाळ्याला जाऊ कि रे..’ किंवा ’कुटं गेला काय की. आत्ता हुता बगा हितं...’ किंवा ’काय ग ! येणीगिणी घालून शाळेगिळेला जायचय की न्हाई ?’ अशी मराठी भाषेची वेगवेगळी मोहक रूपं तुम्ही-आम्ही प्रवासांत, किंवा मुंबई-पुण्यासारख्या बहुसंस्कृतिधारक शहरांत ’चाळ’ किंवा ’फ्लॅट्‌’ पद्धतींच्या राहाणींत अगदी ’सख्ख्या शेजारी’ सुद्धा, क्षणोक्षणी अनुभवत असतो. ’दर दहा कोसावर भाषा बदलते म्हणतांत...भाषा बदलतांत म्हणण्या ऐवजी ’बोली’ बदलते असं म्हणायला हवं खरंतर. ’बोली’मधे शब्दांची उच्चाररूपं बदलतांत तसाच प्रत्येक ’बोली’ला तिचा असा एक विशिष्ट ’हेल’ किंवा Acsent आणि त्या हेलांतचं खरंतर त्या ’बोली’च मोहकपण दडलेलं असंतं. भाषाबदलामधे, ती लेखनरूपांत येतांना, लिपी बदलणं अभिप्रेत किंवा अपेक्षित असतं. जसं मालवणची कोंकणी ही मराठीची ’बोली’ त्यामुळं लिपी देवनागरी, याच समीकरणांनं, ’मराठी’ ही खरंतर, ’संस्कृत’ची बोली भाषा म्हणतां येईल कां ? कारण अनेक शब्दांच उच्चार साधर्म्य आणि ’देवनागरी’ लिपीचा लिखाणासाठी वापर..या न्यायानं ? पण गोव्याची कोंकणी ’जरी’ आपण ’बोली’ म्हणत असलो तरी, जुने गोवेंकर अजून ती लिहितांना रोमन लिपीचाच वापर करतांत. त्यामुळं म्हापसा लिहितांना त्याचा Mapuca, पणजीचं Panjim, वाघदराचं Wagadora अशी रूपं होतांत जसं ब्रिटिशांनी खडकीचं Kirkee केलं तसच कांहीसं. महाजालावर या विषयांत धांडोळा घेतांना एक छान, Interactive किंवा परस्परसंवादक, Site पाहाण्यांत आली. फार गमतीशीर आणि रंजक Site आहे ही. विशेषत:, अनेक वर्षे परदेशांत स्थाईक असलेल्या मराठीभाषिकांना तर या Siteचं Surfing खूपच आग्ळा वेगळा अनुभव देवून जाईल.तुम्ही मुळचे कोल्हापुर, नागपुर, नाशिक, रत्नांग्री, बेळगांवचे असाल तर तुमच्या बोलींतला एखादा अस्सल नमुनासुद्धा या Siteवर Upload करू शकतां आणि त्यावर प्रतिक्रिया मागवू शकतां... याच ’मायबोली’ नावाच्या Siteवरचे, विविध बोलीभाषांतले कांही उतारे तुमच्या अवलोकन/अभ्यासार्थ देत आहे. तुमचं काम ? ते वाचून, ती, महाराष्ट्रांतल्या कुठल्या भगांत वापरली जाणरी बोली आहे ते ओळखायचं... ** १.. "सल्लूभाय. सलाम वालेकूम" "वालेकूम अस्सलाम. सैफू, तू हिकडे खय?" "हिकडे माझ्या बायकोचा घर हय" "आयला, हे मला कसा नाय म्हायती. किती दिसानी मिल्लोस. बोल काय बोलतस." "काय सांगू? मुंबयलाच हव मी. आनखीन जाईन खय? " "येवडो कंटालून नुको बोलू. चल, च्या पीत पीत बाते करु ** २..हटं कटं ? कवर्‍याला घेतरी गं केरी तू ? ** ३..नवरा मुलगा मारुतीच्या दर्शनाला गेला आहे. त्यावेळचा हा वधुपक्षाकडचा २-३ मिनिटाचा संवाद नवर्‍या मुलीचे काका (यांचं नाव देवराव): नवरदेव अर्ध्या तासात वापस येइन अन आपल्याकडचे पोट्टे तं इडल्याच खाऊन राहिले अजून. एकजन कामाचा न धामाचा. सकाड पासनं पाहून र्‍हायलो, कोनी केसं सरडच करते तं कोनी जेल्-फ्येल लाऊन चिपकऊन टाकते. नुसते झामल झुमल करुन र्‍हायले.. काय बे ए जितेंदर, हारं आनले का फूलवाल्याकडून? जितेंदर: आनले नं पप्पा. तुमी आत्तापासुन कशाला किटकिट करुन रायले? भाऊजीकडचे पोट्टेसोट्टे घंटाभर तरी बारातीत नाचतीन मंगच येतीन मांडवात. तिकडे पंडितजी पूजा मांडून रायले, तिकडे पहा नं सगडं ठीक आहे का ते.. देवराव: आता हे कालचे पोट्टे मला आरडरी देऊन रायले पहा. आवं जितेंदरची मम्मी, तिकडे मांडवात पूजा-गिजा मांडून झाली का पाहून या. नवर्‍या मुलीची आजी: कोन भांडून रायलं मांडवात? जितेंदरची मम्मी: कोनी तं नाई वो. न.मु.आजी: नाई तो जितेंदर अन देवराव काय तरी म्हने पूजा आन कोनीतरी भांडून रायली मनून जि.मम्मी: आवं भांडून न्हाई मांडून म्हने ते. न्.मु.आजी: काय बोलते वं तोंडातल्या तोंडात? ही वाली सूनबाई मुद्दामच हडू बोलते मले कडू नाई म्हनुन..देवराव, कोनी भांडून रायलं का मांडवात? देवराव: आँ? मले तर न्हाई माईत. जाऊनच बघतो एकेकाला. जितेंदर: सोनुभैया, ते बुडी नुसती मधात मधात सवाल करत रायते तिला जरा भाएर घेऊन जाशील यार. तिच्यासमोर बोलनं म्हनजे आ बैल मुझे मार. भौत्तीच परेशानी है यार! .** तर ..! लागा कामाला. ओळखा ’बोली’चा प्रभाग आणि कळवा...

Monday, April 23, 2012

’भान देणारं ’मन’

’भान देणारं ’मन’ ****** रस्मे उल्फ्त को निभाएं तो निभाएं कैसे हर तरफ आग है दामन को बचाएं कैसे मधला एक शेर बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते जिदगी बोझ बनी हो, तो उठाएं कैसे ’दिल की राहें’ या १९७३ म्ध्ये वितरित झालेला हा बी.आर. इशारा दिग्दर्शित चित्रपट, Box Officeला कितपत चालला माहीत नाही. पण मदन मोहननं संगीतबद्ध करून ’लता’नं अजरामर करून ठेवलेल्या अनेक गझलांपैकी शायर ’नक्ष्‌’ लैलापुरी यांनी शब्दबद्ध केलेली ही एक गझल अनेक जागतिक सत्य अगदी सहजपणे सांगून जाते. यातल्या, ’जिदगी बोझ बनी हो, तो उठाएं कैसे’ ह्या काफियाची मला विशेषत्वानं जाणीव झाली...कांही निमित्तानं. मंगेश तेंडुलकरांनी ’दामोदरपंत’ नावाचं एक व्यक्तिचित्र लिहिलेलं परवां वाचण्यांत आलं. ही व्यक्ती म्हणजे वर उधृत केलेल्या काफियाचं, त्यांत शायरानं उपस्थित केलेल्या प्रष्णाचं, एका सर्वसामान्यानं दिलेलं चोख उत्तर वाटलं मला. ’दामोदरपंत’ वाचतांना आणखी एक जाणीव झाली ती म्हणजे असं कांही वाचण्यांत आलं की आपल्या मनाला इतकं स्पर्शून जातं की आपल्याला या ’रोजमरा की जिंदगी’मध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. कारण मन हेचं जित्या-जागतेपणी ’जगणार्‍या’ माणसाच्या अस्तित्वाच लक्षण आहे. ’मन’विरहित जगण म्हणजे यंत्रवत जगणं. ’मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा’ या कविवर्य सुधीर मोघ्यांच्या कवितेंत त्यांनी, मनाला ’मन रानभूल , मन चकवा’ असं जरी म्हटलं असलं तरी पुढे मनाला ’धनि अस्तित्वाचा’ असं संबोधून, त्याला मालकी हक्क प्रदान करून टाकला आहे. मन असतं पण दिसतं कुठे ? ते वपुंच्या कथेशेवटाला असणार्‍या कारुण्याची अल्वार झुळुक अंगावर घेतांना स्वत:ची होणारी घालमेल, किंवा प्रभाकर पेंढारकरांच्या ’अरे संसार संसार’ या सर्वसामान्य मुंबैकराचं जगण (?), संसारांतली ससेहोलपट ’किरण’ या स्त्री-पात्राकरवी रेखाटलेली वाचतांना, किंवा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या, ’कणा’ या कवितेतल्या मास्तरांचे, ’मोडून पडलं घर पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त "लढ" म्हणा’ असे उद्गार वाचतां-ऐकतांना, किंवा स्टाइनबेक्‌च्या, ’Grapes of Wrath' मधल्या शेवटच्या प्रकरणांतल्या शेवटच्या प्रसंगांत, आपल्या नवजात , रडणार्‍या अर्भकाला थोडावेळ तसच भुकेलं ठेवून, भुकेपोटी मरणासन्न झालेल्या म्हातारीला, स्वत:चा पान्हा देवून जगवू पाहाणार्‍या Native निग्रो महिलेचं वर्णन वाचतांना, ’मन’ उन्मळून येतं, आणि गहिवरून येतांना पांपणीकाठच्या दहिवरांत ते ’दिसतं’ ! हो ! या आणि अशाच जागा असतांत ’मन’ दिसण्याच्या.’मना’चं दिसणं म्हणजे नवरसांचा आविष्कार, अगदी क्रोध, शृंगारा पासून शांत रसापर्यंत, असं ढोबळ मानानं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. ’मनां’त कर्माचं...सत्कर्माचं किंवा कुकर्माचं.. बीज, रुजतं, अंकुरतं, आणि त्याचं ’कृतिरूप’ झालं की ते ’दिसतं’ ’मनां’त आल्याशिवाय, आणि ’मना’नं कृति करण्यासाठी हिरवा कंदिल दाखविल्याशिवाय, (बि)घडणार्‍या कृतीला ’अविचारी’ असं म्हणतांत. ’मन सुद्ध तुझं, गोस्ट हाये प्रिथिवि मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कुनाची’’ हे चित्रपटगीत आठवा किंवा ’मनी नाही भाव आणि (म्हणे) देवा मला पाव’ ही म्हण. सगळंच वरकेलेल्या प्रत्येक विधानाला पुष्टी देणारीच आहेत. कारण ’मनि असे ते स्वप्नी दिसे’ इतकं Haunted होवू शकतं ;मन’ तसंच ’मन चिती ते वैरीही न चिंती’ इतकं क्रूर-कठोरही होवू शकतं मन’ मनाचिये गुंथी गुंफियेला शेला । बापरखमादेवीवरे विठ्ठली अर्पीला ॥ इथं सुद्धाद्धा ज्ञानदेव, मनांतल्या वैचारिक ’गोंधळ’रूपी गुंत्यांतून, मधुराभक्तीची हळुवार फुंकर घालत, एक एक धागा मोकळा करीत त्याची ’वाकळ’ नाही तर ’शेला’ करून विठूमाउलीला अर्पण करतांत. परत हे ’मनां’चं दिसणं व्यक्त होतं ते आधी ’विरचित’ ’ध्वनिरूपां’तून आणि मग लेखी ’शब्दरूपां’तून. ’पसायदानां्तल्या सगळ्या मागण्या ’मनां’त ठेवून भागलं असंतं का ? ते भाबड्या भक्तांसमोर आणण्यासाठी त्याला ओवी ’रूप’ द्यावच लागलं ज्ञानदेवांना अखेरीस. अशीही ’मनोगाथा’ वर्णन करणार्‍या ’समर्थ रामा’चे ’दास’विरचित ’मनाचे श्लोक’ बाबतींत पुढे कधीतरी... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

Monday, April 16, 2012

’दादर’

’दादर’ असं दादर, दादर..माझं ’प्रेमाचं माहेर... फुटे स्मृतींना मोहोर...सय येता... असं दादर, दादर..धरे मायेची पांखर... यश-कर्तृत्व ’बखर’...कित्येकांची... दादर... म्हणजे जिना...म्हणजे सोपान...मुंबई २८...मुंबई १४...कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ’मराठी. व्यक्तिविशेषांच्या यशाचा सोपान...कर्मभूमी... मराठी मनाच्या स्वाभिमानाचा केंद्रबिदू...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ’बाबूजी’ सुधीर फडके, पं.सुरेश हळदणकर, पंडित जगन्नथबुवा पुरोहित, पंडित शरश्चंद्र आरोळकर, गानगुरू वसंतराव कुलकर्णी, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर पणशीकर, यशवंत-करुणा देव, माणिक वर्मा, शोभाताई गुर्टू. प्रभाकर जोग, श्रीधर पार्सेकर, जयवंत कुलकर्णी, सतीश पुळेकर, मोहन वाघ, विद्याधरजी गोखले, दिलिप प्रभावळकर, नाना पाटेकर, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, अरविद-सुलभा देशपांडे, सुकन्या कुलकर्णी, सुचेता भिडे, देवकी पंडित, विजय मांजरेकर, स्मिता तळवलकर, बालमोहनचे दादासाहेब रेगे, छबिलदासचे अक्षीकर गुरुजी, किंग्‌जॉर्ज्‌चे नाबर गुरुजी, मनोहरपंत, सुधीरभाई जोशी, बबन-नीलम प्रभु, कविवर्य राजाभाऊ बढे, गदिमा... माझ्ं २३ मुकुंद निवास, जिथं विजयाबाई मेहता, विजय तेंडुलकर, बाबूजी, जितेंद्र अभिषेकी आदींची वर्दळ असायची, एखाद्या संध्याकाळी, ज्येष्ठ मित्रवर्य, दस्तुरखुद्द हृदयनाथ-बाळासाहेब-मंगेशकरचे माझी पेटी (तेंव्हा तिला संवादिनी वगैरे म्हनत नसत) ओढून अर्धा पाऊन तास खणखणींत गाऊन जात असत, त्याचं २३ मुकुंद निवासचे ’दादर’ चढत उतरत मोठे झालेले, कविवर्य सुधीर मोघे, ’देबू’ देवधर, शिवानंद पाटील, चंद्रशेखर गाडगीळ, आनंद मोडक, माझ्या शाळेंतले...Indian Education Societyच्या पिंटोव्हीला मधले...जगदीश पुळेकर, विनय धुमाळे... पलीकडे TTला मनहर बर्वे, हेमू अधिकारी यांचं दादर...संस्कारभूमी दादर कीर्ती, रुपारेल, रुईया महाविद्यालय, केटरिंग्‌ कॉलेज, VJTI, UDCT,...च दादर... मराठी माणसाच्या अस्मितारक्षणासाठी, आपल्याचं घरांत...मुंबईत...बेघर होण्याची वेळ आलेली असतांना, ’हक्कां’साठी, प्राण पणाला लावून, वेळप्रसंगी रक्तही सांडून लढलेले, कांही कामासही आलेल्या, सर्वसामान्य ’अनामिक’ हुतात्म्यांचं, कार्यकर्त्यांचं दादर... ’सचिन’च्या शाळेचं...’शारदाश्रम’चं दादर अमरहिंद मंडळ, शिवाजी मंदीर चं, रवीन्द्र नाट्य मंदीर...जिथं मी ’रंगायन’च तारू फुटल्यानंतर, नयानं उदयास आलेल्या, अरविंद देशपांडे, सुलभाताईंच्या ’आवीष्कार’च्या पहिल्या नाटकाची, ’तुघलक’ची Zero hour rehearsal, अरविंदच्या करारी रंगसूचनांबरहुकूम, अरुण सरनाईक , माधव वाटवे आदींची ’तालीम...बघीतली...विजया-भक्तीचम ’बाई खुळाबाई’ बघीतलं... अनेक चळवळींच्या शुभारंभांचं...विजयसोहळ्यांचं साक्षीदार, जिथं ’सचिन’नं आचरेकर मास्तरांच्या देखरेखीखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले अनेक अष्टपैलू व्यासंगी वक्त्यांची ओघवती, रक्त सळसवणारी, भावनेला हात घालणारी भाषणं,थंडी-ऊन-पावसांत, ऐन दुपारी वा अगदी मध्यरात्रीपर्यंत ऐकण्यासाठी जनसामान्यांना स्वत:च्या ’अंकावर’ स्थान दिलेलं ’शिवतीर्थं’ शिवाजीपार्क्‌ मैदान, कित्ते भांडारी हॉल्‌, जिथं मी माणिकताईंच्या अनेक मैफिली ऐकल्यांत आणि त्यांचं केवळ आवाजांतून, लटका रुसवा, आदाकारी काळजांत उतरविणारं, ’नाही मी बोलत नाथा’ ऐकलय ! ’नाटकघर’...अरुण काकड्यांच्या प्रायोगिक रंगभूमीची प्रयोगशाळा, ’दुर्गा झाली गौरी’ सारख्या नृत्य-नाट्याची...ज्यानं मराठी रंगभूमीला उत्तमोत्तम ’अभिनेत्री’ मिळवून दिल्या ती ’चंद्रसूर्य’ रंगभूमी, ...छबिलदास(मुलांच्या) शाळेचं सभागृह, जिथं मी तेंडुलकरांच ’पाहिजे जातीचे’(नाना-सुषमा), ’चांगुणा’(बा आणि सासू-रोहोणी हट्टंगडी आणि सतीश पुळेकर), गो.पु. देशपांड्यांच ’उध्वस्त धर्मशाळा’ (डॉ. श्रीराम लागू), ज्यो अनुईंचं ’अ‍ॅंटिगनी’(लागू, दीपा, विनय आपटे, अनंत भावे, रामनाथ थरवळ), अशी ’नाटकां’ची त्रिमिती अनुभूती घेतली, पृथ्वी थिएटर्‌ची मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली तो वनमाळी हॉल्‌, HMV...म्हणजे हरी महादेव वैद्य हॉल्‌, जिथं मी किशोरीताईंच्या सकाळच्या रागांच्या मैफिलीसह अनेक दिग्गजांच्या मैफिली, मनांत साठवून घेतल्यांत, ६८-६९ साली ! CKP हॉल्‌, सिद्धीविनायक, अक्कलकोट स्वामींचा मठ...जिथं मी, निजामपुरकरबुवांसारख्या अनेक ख्यातकीर्त कीर्तनकारांची रसाळ कीर्तनं ऐकली रिचवली, पचवली आणि ज्ञान-भाषा-वाणी शुद्धतेचे धडे घेतले, सध्याचं धन्वंतरी रुग्णालय म्हणजे पूर्वीचा ब्राह्मण सहायक संघ, जिथं मी, रामभाऊ मराठ्यांच्या मुलांच्या मुंजीत, याचिदेही याचीडोळा, साक्षांत नारायणराव राजहंस’बालगंधर्वां’च दर्शन घेतलं आणि गाणही ऐकलं...’जोहार मायबाप जोहार..तुमच्या महाराचा मी महार’...एका अत्यंत विश्वासू, इमानदार अस्सल ’मर्‍हाठी’, १९६२च्या चीनबरोबरच्या युद्धांत विशेष पराक्रम गाजविणार्‍या, लढ्वय्या, चिवट, निधड्या छातीच्या, शूरवीर महार ज्ञातीला ’परमेश्वर’ विठ्ठलपदापर्यंत पोचविणारं नाट्यपद...ज्या ओळींमधे ’फुकाचा’ राजकीय, मतपेटीवर लक्षठेवून, बळेबळे आणलेला बेगडी कळवळा नव्हता, ’आरण्यरूदन’ नव्हतं... खांडके बिल्डिंग्‌, भिकोबा निवास, टायकल वाडी बोरकरवाडी असे आमच्या त्या शाळकरी वयांत जरा, घबराटीपोटी आदरयुक्त दहशत निर्माण करणारी ’राडेबाज’ नांवं... १९४२ मधे माझ्या पिताजींनी डी. एल्‌. वैद्य रोडवर गोरेगांवकर चाळींत एक ’डबल्‌ रूम्‌’ भाड्यानं घेतली त्या घटनेला यावर्षी ८० वर्ष पूर्ण होताहेत ! शेजारच्या कुसुरकरवाडींत तीन खोल्यांचा ’फ्लॅट्‌’ त्याच भाड्यांत उपलब्ध होता तेंव्हा...पण ’आपल्या छोट्या कुटुंबाला एवढी मोठी जागा काय करायची ?’ या टिपिकल्‌’ मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेंतून ती संधी त्यांनी घालवली... असो... डॉ बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे अशा समाज धुरंधर, पत्रकार, वक्ते-नेत्यांच्या पार्थिवांना आपल्या पोटांत मायेच्या ममतेनं सामावून घेणार्‍या या दादरच्या भूमींत आतां, चैत्यभूमी शेजारच्या इंदु कापड-गिरणीच्या आवारांत, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरस्थाई स्मारकाला जागा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं, समस्त दादरकरांबरोबरच, समस्त देशवासियांकडून स्वागत न झालं तरच नवल ? *****

Tuesday, April 10, 2012

’चित्राक्षरे’

’चित्राक्षरे’ ’अपलम चपलम, चपलाइ तेरे दुनियाको छोड चली आइ रे आइ रे आइ रे. या दिदींबरोबर गाइलेल्या ’आझाद’ या हिदी चित्रपटांतल्या गाण्यानं खरंतर, आपली हिदी आणि एकूणच, १९५३मधे, पार्श्वगायनाची सुरुवात करणार्‍या आदरणीय उषाताई मंगेशकरांना यंदाच्या ’राम कदम पुरस्कारानं गौरविण्यांत आलं. उषाताई आपल्या स्वरेल गीतांनी, लावण्यांनी, भावगीतांनी, भक्तिगीतांनी मराठी प्रेक्षक श्रोत्यांना रिझवीत असतांनाच, त्यांचं स्व्त:च असं एक, रंगरेषांच भावविश्व त्यांनी निर्माण केलं होतं. स्वराविष्कारानं समाधान होईना म्हणून की काय त्यांना हा चित्र प्रपंच मांडावासा वाटला. दिदींच्या अनेक अल्बम्‌ची कव्हर्स्‌ उषाताईंनी चितारली आहेत. ’लता सिग्ज्‌ गालिब’ किंवा ’चाला वाही देस’ मधल्या रचना...हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेल्या आणि दिदींनी गाइलेल्या अप्रतिम अवर्णनीय आहेतच. पण त्या ऐकण्या आधी त्या लॉंग्‌ प्लेइंग्‌ तबकड्या...पूर्वीच्या काळच्या...हातांत पडल्या की प्रथम दर्शन व्हायचं ते त्यावरच्या सुंदर चित्रांचं..उषाताईंनी चितारलेल्या... आपण काय ऐकणार आहोत याची यथार्थ पूर्वकल्पना देणारी चित्र...त्या मानसिक अवस्थेप्रत पोचायला साहाय्यभूत ठरणारी. त्या चित्रांची संकल्पनासुद्धा कलाकाराच्या सर्जनशीलतेची साक्ष पटविणारी. ’गालिब..’च्या मुखपृठावर एका जुन्या मुघल कालीन महालाच्या सज्ज्यांतून, हातांत ’श्मा’ घेवून जानारा एक अकेला ’गालिब दिसतो अपल्याला.. आणि मनांत फुलतांत त्याच्या गझलचे लब्ज्‌, त्या मधल्या नि:शब्द सुरेल लम्ह्यांसह.. ’बाजे चै अत्‌फल, ये जमाना मेरे आगे, होता है शबेरोज तमाशा मेरे आगे...’. मीरा चालली आहे आपल्या लाडक्या हरीमधे..जो प्रियकर, त्राता, ’माई’ सर्व कांही आहे... विरघळून जायला...अगदी सर्वसंग परित्याग करून.. परित्याग पण किती टोकाचा ? आधी राज्ञीपद, नंतर मेवाडचा राणीराजविलासी राजवाडा, आणि अखेरीस परिसीमा म्हणजे, जन्मभर हरिभक्ती साठी आळवणी करतांना, विरहव्यथा मांडतांना, ज्यानं साथ दिली, त्या एकतार्‍याचा भारसुद्धा तिला असह्य झाल्यामुळं ती तो एकतारा सुद्धा त्यजून, त्याला तसाच तापल्या वाळूंत सोडून गेली आहे. चित्रांत आपल्याला दिसतो तो फक्त एकतारा आणि दूर दूर जाणार्‍या पावलांचे ठसे. खरंतर उषाताईंचं पहिलं प्रेम म्हणजे पेंन्टिंग आंणि ’पुढाकार’ घेवून करायची ’घरगृहस्थी;... घर टापटिपीचं आणि व्यवस्थित, स्वच्छ आणि शिस्तीचं ठेवणं.. खरं तर रंग आणि रेषांच्या आविष्काराचं आभाळ त्यांना अपुरं पडलं असावं, स्वाभाविक सर्जनशीलतेला आणखी अवकाश हवहवसं झालं म्हणून त्यांनी स्वरसरितेच्या कांठावरची गांव पादाक्रांत करायला सुरुवात केली आणि तिथही त्या किती यशस्वी झाल्या हे कांही मी सांगायला नको. त्यांच्या चित्रांच्या संकल्पना, जन्मत:च लाभलेल्या, अगदी घरांतल्याच ’स्वयंभू गंधारा’च्या सहवासांतूनच तर मिळत नसाव्यांत ? पण असं म्हणून मी उषाताईंच्या स्वत:च्या थक्क करणार्‍या निर्मितीसर्जनक्षमतेला. इथं उषाताईंच्या आनखी एका कलाकृतीचा उल्लेख जर मी केला नाही तर या लिखाणाला पूर्णत्व येवूचं शकत नाही. हे कुठल्या गीतसमूहाचं...Album..मुखपय्ष्ठ आहे मला स्मरत ना ही पण ते फारसं महत्वाचं नाही.. ऐहिक विश्वाच्या अगदी कडेला जिथं क्षितिजावर आभाळाचं परतत्व सुरू होतंतिथ. एक अगदी छोटी मनुष्य़ाकृती, पाठमोरी आकाशाकडे बघत उभी आहे...ते आकाश आहे कां ? अं हं... कपाळावर अष्टगंधाचा टिळा पूर्णचंद्राच्यारूपानं मिरवत, तो ’कान्हा निळा’ अत्यंत शांत नजरेनं आवाहन करतोय त्या मनुष्याकृतीला...अर्थांत मीरेला ! चित्रांत, अंधारलेल्या पृथ्वीचा काळपट तपकिरी रंग त्यांतून हलकेच उगवणारा गडद निळा आणि वरवर जातांना ’कृष्ण’काळा होत जाणारा अनंत अवकाशाचा रंग.. त्यांतच अत्यंत अल्‌वारपणे अस्फुटश्या प्रकटणार्‍या अर्धोन्मिलित पांपण्या, माया, ममतेनं ओतप्रोत. तसेच अत्यंत रेखीव नांक आणि ओठं. छे: ! हे मी करीत असलेलं वर्णन अत्यंत अपुरं आहे... One must see it to believe and adore and appreciate it !! उषाताईंची अनेक चित्र लोकांना, त्यांच्या चाहत्यांना माहीतच नाहीत. त्यांच्या संगीत कारकीर्दीत ती झाकोळून गेली आहेत. केस मोकळे सोडून बसलेल्याअ दिदींच पेंटिंग्‌, बाळकृष्णाची मूर्ती धरलेले फक्त दोन ( अर्थात मीराबाईचेचं) उंचावलेले हात... बहोत खूब बहोत खूब उषाताई... अशीचं, जागतिक स्तरावर म्हणण्यापेक्षा सर्व मनुष्यमात्रांच्या मनांत, हृदयांत भावनांच्या उचंबळरूपानं संपन्न असूनही, रसिकांना हुरहुर लावणारी स्वरप्रतिभा लेवून सुद्धा, त्याचं मंगेशकरांच्या घरांतला एक कलाकार आपल्या आवीष्कार-तृप्तीचं अवकाश शोधत छायाचित्र काढायच्या छंदाकडे वळला... कोण ? अर्थांत, हे वर्णन कागू पडणार्‍या, एकमेवाद्वितीय..दिदी..’लता’...मंगेशकर. त्यांच्याही या दृश्य माध्यमाच्या प्रेमाबद्दल पुढं कधीतरी... ******

Monday, April 9, 2012

’शब्दांच्या अलि-पलीकडे...’

’शब्दांच्या अलि-पलीकडे...’ बोलतांना लिहितांना शब्दांच्या अलि-पलीकडे बरेच अर्थ त्या शब्दाला खुणावत असतांत, जसं एखाद विधान तुम्ही किती ’अल्वार’ किंवा कठोरपणे करतां यावर त्याचा अपेक्षित परिणाम अवलंबून असतो...उदाहरणार्थ... माझी सासुरवाडी तिकडची उत्तरप्रदेशांतली..म्हणजे पत्नीचा जन्म बनारसचा शिक्षण लखनौ, दिल्ली वगैरे..आमचं लग्न ठरल्यावर सुरू झालेल्या पत्रव्यवहारांत, तिनं लिहिलं होतं, ’आप वाकई मुझे लाएंगे ना ?’.. बाप रे ! मी मनांत म्हटलं ’ही बाई लग्ना आधीचं ’वाकी’ ची मागणी करतेय्‌, नंतर माझ्या खिशांत कांही ’बाकी’ उरणार की नाही?’ असो.. विनोदाचा भाग सोडा पण समौच्चारी पण दोन भिन्न भाषांत भिन्न अर्थ असलेले शब्द असा ’अनर्थ’ घडवू शकतांत हे मला नजरेस आणून द्यायचं आहे इथं.. तुम्हाला माहीत आहे, ’राम’ या शब्दाचा हिब्रू भाषेंतला अर्थ आहे Thunder म्हणजे मराठींत, मेघांच्या हालचालींतून प्रचंड घर्षणामुळं निर्माण झालेली अवकाशस्थ वीज, किंवा विजेचा लोळ, किंवा संस्कृत मधे ’सौदामिनी’. आणि ’आबा’ या शब्दाचा हिब्रू भाषॆंतला अर्थ काय आहे माहिती आहे ? ’Aba' चा हिब्रूतला अर्थ आहे 'Father or Grand father'..आतां बोला. आपण मराठींत सुद्धा वडिलांना किंवा आजोबांना आबाच म्हणतोना ? इथं समौच्चारी शब्द आहेंत आणि अर्थ सुद्धा. तसाच आणखी एक शब्द ’वडील’...उर्दू मधे त्यांचे ’वालिद’ होतांत.. म्हणजे रोमन लिपींत लिहून बघितलत तर फक्त 'l' आणि 'd' च्या जागांची अदलाबदल केली की तोच जन्मदाता मिळतो आपल्याला. मी कांही भाषा तज्ञ किंवा संशोधक, व्युत्पत्तीशास्त्र-तज्ञ वगैरे नाहीये ! पण मला असे शब्द नेहमीच खुणावत असतांत मैत्री करण्यासाठी ! ’इरा’ म्हेणजे पाणी.. डॉ. द.भि. कुलकर्णींनी एका गप्पांदरम्यान सांगितलेली माहिती. त्यावरून ’इराक’ म्हणजे पाण्याची कमतरता असलेला आणि ’इराण’ म्हणजे मुबलक पाणी असलेला असे दोन देश. कोल्हापुरकडं, मंडळी बहिर्दशेला जातांना, ’वाइच ’इरेला’ जावून येतुया’ ’ म्हणतांत म्हणे.. माझ्या नवजात नातीचं जन्माक्षर आलं ’यी’. आतां यी वरून कुठलं नांव शोधायचं.. पण माझ्या कन्यकेनं महाजालावरून एक नांव शोधलं...भले जपानी कां असेना...’यीरा’ म्हणजे मराठी अर्थ समृद्धी.. आतां पाणी आणि समृद्धी यांचा किती जवळचा संबंध आहे हे ’शेतीप्रधान’ संस्कृतींत वाढलेल्या आपल्या देशांतल्या प्रत्येक नागरिकाला पटवून द्यायला नको.... तसंच पाण्यासाठी रशियन शब्द ’वोदा’... आणि तोच संस्कृतमधे ’उद’.. म्हणतांत ना ’पृथ्वी गोल आहे’ किंवा इंग्रजींत ’This world is so small' महाजालावरच्या उपलब्ध माहितीनं आणखी आणखी जवळ येत चाललेलं ’अलि’चा ऊर्दू मधे अर्थ प्रॉफेट्‌ महंमदाच्या कुटुंबाचा एक सदस्य, एक मुस्लिम राजा, धर्मांतरित पहिला मुस्लिम असा महाजालावर आढळतो तर संस्कृत मधे ’अलि’ म्हणजे भुंगा,( कै. शंकरराव शास्त्री रचित ’मर्म बंधातली ठेव ही...’ या नाट्यपदामधली ’हृदयांबुजी लीन लोभी अली हा, मकरंद ठेवा लुटण्यासि आला..’ ही पंक्ती आठवा ), कली म्हणजे एका युगाचे जसे सत्य, द्वापार, त्रैता तसे एक नांव किंवा मनांत अंकुरणारं ’पाप’ किंवा ’विकृती’ या अर्थीसुद्धा हा शब्द साहित्यिकांनी वापरलेला आढळतो, तर कळी किंवा कलिका म्हणजे उमलायच्या आधीची फुलाची अवस्था.. मातृ, पितृ, भातृ आणि मदर्‌, फादर्‌, ब्रदर्‌ हे सगळे शब्द आपण रोमन लिपीमधे लिहायला गेलो तर अक्षरांमधलं साधर्म्य अगदी सहज जाणवतं. हे सगळ जे मी मांडलं ते कांही माझं स्वत:चं ’ज्ञान’ वगैरे पाजळण्यासाठी नव्हे तर, वार्षिकपरीक्षरोत्तर, आतांच चाहुल लागलेल्या उन्हाळ्याच्या सुटींत, भाषाप्रेमी विशेषत: मराठी-प्रेमी पालकांनी आपल्या पाल्यांना हे ’शोध-कार्य’, संगणक उपलब्ध असेल तर महाजालावरून, किंवा नसेल तर मराठी ’शब्दकोश’ किंवा ’विश्वकोशा’चे उपलब्ध खंड (एव्हांना बहुतेक सगळे प्रकाशित झाले आहेत बहुधा..) चाळतांचाळतां, करण्यास उद्युक्त करावं. महाजाल त्यांना उपलब्ध करून देतांना मात्र, ते नेमकं काय शोधताहेत याकडे ’कडी नजर’ ठेवायला हवी... कारण महाजाला वर संस्काररक्षम जसं बरंच आहे तसंच विकृतिसंवर्धक मोहजालही आहे.. *****