Friday, August 29, 2014

।। दास-बोध ।। आणि ।। भास-बोध ।। १३१ ते १५५

।। दास-वाणी ।। प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४६ प्रज्ञा म्हणजे वैचारिक प्रगल्भ बुद्धी. अनन्य म्हणजे एकनिष्ठ. साधक निष्ठावान आणि प्रज्ञावंत असेल तर ज्ञानप्राप्ती एका क्षणात होते. पण भक्तिभावाशिवाय फक्त प्रज्ञा त्या टप्प्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. सत् शिष्य कसा असावा ते समर्थ सांगताहेत. मेधा, प्रज्ञा, बुध्दीचे द्वार । सहजसाध्य करिते ज्ञानसागर । काठोकाठ अपरंपार । वोसंडुनि वाहावया ।। १३१ तरि अंतरी उत्कंठा, तृषा । तळमळ, शुध्द अभिलाषा । साधकाचे ठाई सहसा । व्हावी दृश्यमान ।। १३२ गुरु वात्सल्याचा झरा । गुरु, दीपस्तंभ एकमेव आधारा । गुरु, भेदतो तमाच्या परा । तेजोनिधी दाविण्या ।। १३३ ।। दास-वाणी ।। सूकर पूजिले विलेपने । म्हैसा मर्दिला चंदने । तैसा विषयी ब्रह्मज्ञाने । विवेके बोधला ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५८ डुकराची पूजा अंगभर सुवासिक द्रव्ये चोपडून केली तरी पुढच्या क्षणात ते उकिरडयावर लोळणार. रेडयाचे चंदन लावून शरीर रगडले तरी तो शेणातच बसणार. त्याचप्रमाणे छानछोकी ऐषारामाची आवड असलेल्या विषयासक्त शिष्याला ब्रह्मज्ञानाचा विवेक कितीही समजावला तरी मूळ चैनीची वृत्ती बदलेल काय ? शिष्य कसा नसावा हे शिष्यलक्षण समासात समर्थांनी सांगितलय. विकृतिला ना जातपात । पशु-पक्षी-मानव सर्वांत । लक्षणे दावी सतत । अतिरेकी ।। १३४ सुकर-म्हैस, यक्ष-राक्षस । कुणास चुकला मद-मोह-पाश। ऐशा जीवमात्रास । हेटाळावे कां कुणी ।। १३५ शिष्य, ब-या-वाइटासहित । स्वीकार करावा गुरुगृहांत । धरुन हात हातांत । गुरुने न्यावे सन्मार्गी ।। १३६ ।। दास-वाणी ।। धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी । मनने अर्थांतर काढी । या नाव साधक ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/०५ अध्यात्मिक ग्रंथांचे नियमित वाचन, श्रवण, कीर्तन आवडीने करतो. अद्वैत निरूपण जेथे सुरू असेल तेथे मनापासून रोज जातो. शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐकतो. स्वत: घरी गेल्यावर ऐकलेल्या सिद्धांतांवर मनन चितन करतो. त्या तत्त्वांचा गूढ अर्थ शोधून काढून जो साधनमार्गावर चालत राहातो तो खरा साधक ! गाज सागराची अव्याहत । खर्ज निसर्गाचा, श्रवण तृप्त । नारळी पोफळी करिती स्वागत । पावले भरून अंतर्बाह्य चक्षू ।। १३७ जळावरी जळ लोळे । आत्म जाणिवेंत अंतर कल्लोळे । जैसी भरती-ओहोटी चंद्रबळे । निसर्गचक्रांत ।। १३८ चित्तवृत्ती आनंद विभोर । सुखविण्या क्षणेक्षणि अपार । विविध सेवा, साधने तत्पर । हाच इथला 'वारसा' ।। १३९ छाये मागचे चित्र । वेगळेचि बहुधा सर्वत्र । थरारती अंतर्बाह्य गात्र । ठाके जेंव्हा सत्य उभे ।। १४० ।। दास-वाणी ।। ज्ञानियांचे जे शेरीर । ते मिथ्यत्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/१० सामान्य माणूस धर्मक्षेत्री मरण आले तर आत्म्याला उत्तम गति आहे असे मानतो. साधुपुरूष साधना करून ब्रह्मज्ञानप्राप्त असल्याने देह मिथ्या आहे या भावात जीवनभर राहतात. मिथ्या म्हणजे जे सत्य नाही तरी भासते ते. अशा निर्विकार साधूंना ज्या ठिकाणी मृत्यू येतो ती जागाच तीर्थक्षेत्र बनते. पुढील कित्येक काळ ती सामान्यजनांना प्रेरणादायक अन् साधकांना मोक्षदायक ठरते. 'आत्मा', 'गती', 'मोक्ष' । अतर्क्य अंधश्रध्दांचे लक्ष । अदृश्यासि ठवोनि साक्ष । भोंदू', 'भामटे' बरळती ।। १४१ ।। दास-वाणी ।। तळघरामधे उदंड द्रव्य । भिंतीमधे घातले द्रव्य । स्तंभी तुळवटी द्रव्य । आपण मधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/२१ पूर्वजांनी घराच्या तळघरात, जाड भिंतींच्या पोकळीमधे, खांबामधे आणि तुळई मधे जागोजागी अमाप संपत्ती भावी पिढीसाठी जपुन ठेवलीय परंतु हे माहीतच नसल्याने हलाखीत दिवस काढतोय. त्याचप्रमाणे परब्रह्म आपल्या चारी दिशांना कोंदाटले असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. अज्ञानापोटी ओढवुन घेतलेले हे पारमार्थिक दारिद्र्यच नव्हे काय ? अवघा निसर्ग धनभारित । जीवमात्र सारा ऋणाइत । आपल्याचि कर्माचे फलित । कु-हाड घाली पायावरी ।। १४२ 'ये रे बाळा' म्हणे काळी आई । परंतु माजली 'इमलेशाही' । वपन करुनी वृक्षवल्ली, वनराई । कुठे फेडतिल ही पापे ? ।। १४३ समोरचे सुवर्णपात्र । अव्हेरित मनुष्यमात्र । कथिला देउनि मानपत्र । डोहाळे जाणा भिकेचे ।। १४४ ।। दास-वाणी ।। इकडे दृश्य तिकडे देव । मध्ये सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/१०/६६ दृश्य म्हणजे जे इंद्रियांद्वारा समजते, उपभोगता येते ते. निर्गुणाच्या साधनेला लागल्यावर एक एक गोष्ट निरसन करता करता शून्यावस्था प्राप्त होते. यापलीकडे खरा आत्मदेव असतो. साधक अज्ञानाने शून्यावस्थेलाच ब्रह्म मानतो. हे मानणे सुद्धा जिथे संपते ती ब्रह्मस्थिती . इंद्रीया जाणवे तेचि खरे । अदृश्याचे वर्णन, अंदाज सारे । 'कालापव्ययी' व्यर्थ पसारे । निरुद्योगी मांडिती ।। १४५ शिशु, वृध्द, ऋग्ण, गर्भवती । कर्मकांडापासून यांना मुक्ती । कठोर धर्मंार्तंडही देती । हे ही नसे थोडके ।। १४६ हृदयस्थ माया-ममतेची निगराणी । सत्य-शिव-सुंदरदर्शने पांपणींत पाणी । 'माणुसकी' धर्माचरणी । हेचि पाळू व्रत ।। १४७ जपू झरा, धरा, तारा । भवतीचा संपन्न निसर्गपिसारा । हव्यास, आक्रोशापरता बरा । उपकारक सर्वदा ।। १४८ ।। दास-वाणी ।। कैचे घर कैचा संसार । कायसा करिसी जोजार । जन्मभर वाहोन भार । सेखीं सांडून जासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/१०/४८ काय माझे घर घर, माझा प्रपंच, माझी माणसे करत बसला आहेस. स्थावर जंगम मालमत्ता जन्मभर सांभाळण्याचा कुटाणा चालू आहे तुझा. ओझी वाहिलीस आयुष्यभर. शेवट काय होणार ? हे साठवलेले सगळे इथेच टाकून तू एकटा मृत्यपंथाने निघून जाशील, तुला कळणार देखील नाही. वैराग्य निरूपण समासात समर्थ व्यावहारिक गोष्टीची मर्यादा स्पष्ट करतात. मग जन्मास यावेचि कां बा ? । जर संसाराची साहेना आभा । अर्ध्यावर रडगाण्याची मुभा । पळपुट्याचे लक्षण ।। १४९ जन्म ? तमांतरि तेजोरेखा । जन्म ? नियतीस, खेळण्या सारखा । जन्म ? सर्वांगपरिपूर्णतेस पारखा । जाणा जीवमात्रांस ।। १५० ।। दास-वाणी ।। जयास जैसें भासले । तेणें तैसें कवित्व केलें । परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०५/२३ पिंड ब्रह्मांड रचनेविषयी ज्याला ज्या प्रकारे भासले, समजले त्या तशा शब्दात कवीने वर्णन केले आहेे. मुळात वेदानाही जे अवर्णनीय वाटते त्या निर्गुण ब्रह्माचे अनेकांनी केलेले आकलन हे स्वानुभवाच्या कसौटीवर निवडूनच घेतले पाहिजे. जाणिव म्हणजे खरे ज्ञान । सशब्द अथवा निरव कारण । जगरहाटीसाठी पैरण । चिलखती ।। १५१ जैसे भावेल तैसे ध्यावे । त्यंस मांडोनि भजा-पुजावे । आळवावे, गोडवे गावे । इष्टाराध्याचे ।। १५२ हा ऐसा शब्द-प्रवाहो । त्रिकाळ पसरुनी आपुले बाहो । कवळू पाहे 'अपात्र' कां हो । नवलचि, मजसारखे ।। १५३ ना तत्ववेत्ता, ना मी संत । भाव धारण करुनी मनांत । उर्जा फुंकू पाहातो शरीरांत । जगण्यासाठी अवसान ।। १५४ शिरावर कां बा मग हे ओझे । पाप, पुण्य ? कोणत्या काजे ? । कवळ केवळ जे माझे । नियती कां दइना ? ।। १५५

Wednesday, August 20, 2014

।। दास-बोध ।। आणि ।। भास-बोध ।। १२२ ते १३०

वृध्दाप्रती मार्दव । बालांप्रती लाघव । प्रणयाराधनी आर्जव । संवादांत बाणवावे ।। १२२ स्पर्धेमधे प्रभुत्व । कार्यामधे ममत्व । धनसंचयोत्तरी दातृत्व । रुजवू, फुलवू अखंड ।। १२३ ।। दास-वाणी ।। श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अति तत्पर गुरूभजनी । सिद्ध साधु आणी संतजनी । गुरूदास्य केलें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०१/ ४२ रामाने वसिष्ठ ऋषी अन् श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींची शिष्य भावाने भक्ती आणि दास्य भावाने सेवा केली, मगच त्यांना ब्रह्मचर्याश्रमात सर्व विद्या प्राप्त झाल्या. अनेक सिद्धपुरूष, साधुसंताना सुद्धा ज्ञानप्राप्ती गुरूचरणांच्या सेवेनेच झालीय. देवांच्या अवतारांना सुद्धा गुरूशिवाय तरणोपाय नाहीच. गुरूनिश्चय समासात श्रीगुरूची महती समर्थ सांगताहेत. गुरु हवाच मार्ग दावण्या । गुरु हवाच संकटांत सावरण्या । सैरभैर मन होते गुरुकृपेविणा । भवसागरी बुडताना ।। १२४ गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा । गुरु वारी शिष्याच्या आपदा । गुरु वेदांच्या वेदा । निरूपतसे ।। १२५ नका मला म्हणू 'स्वामी' । सुख-दु:ख, जीवनानुभवी । नाही भरीत वृथा चरवी । उपदेशाच्या क्षीराने ।। १२६ मी साधा सरळ सामान्य । पोटार्थी कारसेवक मनी धन्य । तारावयास नाही अन्य । येत सहसा नसे कुणी ।। १२७ ।। दास-वाणी ।। शिष्य विकल्पें रान घेतो । गुरू मागें मागें धावतो । विचार पाहों जाता तो । विकल्पचि अवघा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०७/०७ अनधिकारी मूर्ख शिष्य अध्ययन साधना न करता शंकांचा भडिमार करतो आणि गुरू मठाला मिळत असलेल्या भल्या मोठया देणगीच्या लोभापायी बाबापुता करत शिष्याच्या मागे मागे धावतो. विचार केला तर गुरू कोण आणि शिष्य कोण असा संभ्रम निर्माण होतो. अशा दांभिक गुरूंमुळे सामान्यजनामधे परमार्थाविषयीच संशय निर्माण होतो. श्रद्धा घटते. दांभिक, ढोंग्यांचे माजले रानं । अपप्रवृत्तीने होती बेभानं । गुरु कोणं कळेना शिष्य कोण । माळेचे मणि एका ।। १२८ धावले पाहिजे शिष्याने । गुरुमागे असोशीने । ग्रथगुह्य, संस्कार ज्ञानाने । पूर्णत्वप्राप्ती साधावया ।। १२९ साधना साधकाचे ध्येय । गुरुमुखांतुन उलगडते प्रेय । धना साठी इतर पर्याय । तद्नंतर अनेक ।। १३० Uu

Sunday, August 17, 2014

कांही स्वरचित रुबाया

हे मद्य नव्हे मस्तवाल अबलख वारू मोहास सांग या कुठल्यामार्गे वारू वारुणी घेतली म्हणुन न सोडिन ताळ कां करिल क्षमा मज स'माज'बुद्धी बाळ ? मी क्षुल्लक ! माझे नसलेपण अस्तीत्व कापूरआरती, कर्पूरा दिव्यत्व मृत्त्यू न झडकरी कां कवळे मज आता ? चालणार कुठवर क्षेमखुशाली कथा ? विसविशीत वाटा, काटे तळि दडलेले शिव सत्य नि सुंदर घायाळुन पडलेले पिउनी काळोखा होइन म्हणतो काळा घट बुडे,दीपकळि निवली ,समीप वेळा ही कसली गर्दी ? झुंडी धावत येती चिंतातुर नजरा,काय 'बरे' शोधित ? पांगले हळुहळु चेहरे हिरमुसलेले कुणी 'नामचीन' ? बेवारस कुत्रे मेले घट तुटती फुटती रिते, कधी भरलेले ज्यां त्यां नशिबी पण 'घट कुठला ?' ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे

Thursday, August 14, 2014

।।दासबोध।। आणि ।।भासबोध।। ओवर १०३ ते १२१

।। दास-वाणी ।। तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । माहांपापी आणि भला । येकचि मानी ।। ।। जय जय रधुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२५ ब्रह्म म्हणजे काय हे अभ्यासपूर्वक ग्रंथामधून समजून घेतले परंतु आत्मानुभव नसल्याने आत्मरूपाविषयी अज्ञानी ठरला. कीर्तनात सांगुन टाकले सर्व काही ब्रह्मरूप च आहे. अत्यंत दुष्ट पापी मनुष्य आणि संत एकरूप माना ! सामान्यांना हे पटेल का ? आपल्याला नीट समजलेला मुद्दाच कीर्तनात मांडावा. भक्तांमधे ईश्वराविषयी भ्रम निर्माण होऊ नये. तैसे मनुष्य सगळे सारखे । येरे गबाळे चतुर प्रकार अनेके । जैसा वारा तैसे वाके । तृणमात्र ।। १०३ ईश्वर मनी कोंबू नये । निर्मळासि झोंबू नये । उपदेशसीमा लंघू नये । आत्मप्रौढीने ।। १०४ ।। दास-वाणी ।। पाहो जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी । तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौन वदवावी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०४/०९ तसे पाहिले तर या जगामधे अनेक जाती धर्म पंथांचे वेगवेगळे देव मानले जातात. अशा दैवतांची संख्या अगणित आहे. त्यांचे आराधना मंत्र सुद्धा लक्षावधी असतील. मानवाने रोज वेगवेगळे मंत्र म्हणून उपासना करू नये.सर्व दैवते समान मानून एक देव, एक मंत्र या मार्गाने भक्ती केल्यास अधिक लाभ होईल. नामस्मरण, आराधना । साहित्यवृध्दीची अखंड चेतना । ओवी, अभंग, मंत्राविना । ग्रंथभाषा अपूर्ण ।। १०५ झुंजुरका कधि येते सय । आप्त-स्वकीय, बाप, माय । ढवळूनि मनाचा ठाय । दहिवर दाटे डोळ्यांत ।। १०६ ।। दास-वाणी ।। नाना आसने उपकर्णे । वस्त्रें आळंकार भूषणें । मानसपूजा मूर्तिध्याने । या नांव पांचवी भक्ती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/०३ भगवंताच्या मूर्तीला, जो मुळातच ऐश्वर्यसंपन्न आहे त्याला, आपल्या ऐपतीनुसार उत्तम आसन, उत्तम धातूची पूजेची उपकरणे, रेशमी वस्त्रे, उंची दागदागिने अर्पण करावेत. अशा रूपामधील तो परमेश्वर आपल्यासमोर साक्षात उभाच आहे अशा उत्कट भावाने त्या मूर्तीचे ध्यान करावे. ही पाचवी अर्चन भक्ती. कसबी निपुण मूर्तिकार । आभूषणे वस्रालंकार । सजविण्या प्रस्तर निराकार । कोरिती छिन्नि-हातोड्यांनी ।। १०७ त्यास ना धर्म, संप्रदाय । कारागिरी हेचि कार्य । भाकरीसाठी अखंड भय । टोचतसे उदरांत ।। १०८ ओवी चालत राहील अखंड । शब्द-भाव ओवीत स्वच्छंद । कांटेकोर पाळीत निर्बंध । वैयाकरणींचे ।। १०९ ।। दास-वाणी ।। नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे । नमस्कारास कांहीच नलगे । उपकर्ण सामग्री ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/२२ साध्या नमस्काराला एक दमडीचा खर्च नाही. नमस्कार केल्याने शरीराला कष्ट म्हणाल तर अजिबात नाही. पूजासाहित्य, नैवेद्य अशी कुठलीही गोष्ट आवश्यक नाही. तरीही संपूर्ण पुण्य या वंदन भक्तीने प्राप्त होते. कर्ज काढून केलेल्या उत्सवापेक्षा निर्मळ मन:पूर्वक केलेला नमस्कार अधिक श्रेष्ठ अन् लाभदायक सुद्धा ! नमस्कार अष्टांग असावा । पदस्पर्शे ऊर्जास्रोत व्हावा । नमस्कारे योग सराव करावा । नित्यनेमाने ।। ११० नमस्काराने प्रसन्नचित्त । होती सहसा अभ्यागत । सभेची चर्या क्षणार्धांत । आशंकाविरहित होतसे ।। १११ दोन हस्तक, एक मस्तक । सामुग्री इतुकीच आवश्यक । धूप-दीप गंधपुष्पादिक । अवडंबर, तुम्हि जाणा ।। ११२ पाहूनी स्वराज्याची दैना । दासामनी दु:ख माईना । धारण करी आज मौना । खंतावुनी ।। ११३ देहवृक्षाच्या शाखा-फुले- फळे-पर्ण । मरणोत्तर करावे स्वेच्छादान । स्मग निरिच्छपणे मोकळून । मातींशी व्हावे एकजीव ।। ११४ जितेपणी राखा भान । अंतरी रुजवा विज्ञान । 'मृत्यूपश्चात' वगैरे जीवन?। भ्रम यापरता कोणता ? ।। ११५ म्हणे 'आत्मा' जाणावा-पाहावा । पिंड 'त्यासि' नेमाने. भरवावा । भाकडकथांचा काक-सांगावा । झटकुनि फेंका लोकहो ।। ११६ ।। दास-वाणी ।। छप्पन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुन वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/३१ जगामधे शेकडो भाषांमधे हजारो ग्रंथ पारमार्थिक उन्नतीसाठी लिहिलेले आढळतात. त्या सर्वांमधुन परमेश्वराचे जे सत्यरूप आहे तेच वेगवेगळया उदाहरणांतून सांगितले आहे. एकं सत् विप्रा बहुधा वदंति । हे समजून घेतले तर वितंडवाद थांबतील. सुसंवाद वाढेल. संवादार्थ बोलीभाषा । उपदेशार्थ ग्रंथभाषा । प्रणय-प्रेमार्थ स्पर्शभाषा । प्रमाणभूत विश्वांत ।। ११७ अश्रू ! भाषा सुख-दु:खाची । शीर्षशूळ ! संताप-क्रोधाची । भावमुद्रा ! नृत्याभिनयाची । नि:शब्द, सर्वमान्य ।। ११८ ईश्वर कैसा असेल नश्वर । पंचमहाभूती तो तर स्थिर । ज्ञानेंद्रियांना देतो साक्षात्कार । क्षणोक्षणी अखंड ।। ११९ धूप-दीप, फळ-पुष्पे सगळी । बांग, शंखध्वनि वा टाळी । नश्वराची गोतावळी । बांडगुळे आगंतुक ।। १२० ऐशा नश्वरांची मांदियाळी माजली सकळ धरातळी । मागे जनता भाबडी, भोळी । धापा टाकित धावताहे ।। १२१

Sunday, August 10, 2014

।। दास-वाणी ।। नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/१४ वंदनभक्ती म्हणजे नमस्कार. आपण श्रेष्ठ व्यक्तीसमोर नमस्कार घातल्याने नतमस्तक लीन होतो. काही कारणाने मनात अढी निर्माण झाली असेल तर ती दूर होते. अनेक लोकांबरोबर जिव्हाळा अन् मैत्री जुळून येते. मानव हाच परमेश्वर मानून वंदन भक्ती केल्यास आपले कल्याणच होईल ! ।। दास-वाणी ।। नमस्कारा आड येगळेची । कल्पना न केलेलि बरी त्याची । पाठीवर कधि राळाची । आग उसळे ।। १ देव सख्यत्वे राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं । आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसी येती पडसादें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१२ देवाशी सख्य भक्ती करायची तर त्याचे वर्म आपल्यापाशीच असते. आपण जसे विचार मनात आणतो तसाच प्रतिसाद आपला अंतरात्मा म्हणजे मुख्य देव देत असतो. तात्पर्य शुभ विचार सत्कर्माची प्रेरणा देतात. ।। दास-वाणी ।। दिसेना त्याशि सख्य कैसे ? जाणिवेविणा वर्म तैसे । अनुभवांति कर्म होतसे । जनसामान्यांचे ।। २ तत्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेक पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०३/३५ पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्वांपासून मी बनलो अस मानतो तेव्हा मला प्रश्न पडतो मी नक्की कोण? नीट विचार केल्यावर समजत की ते ब्रह्म म्हणजेच मी. जर मी खरोखर ब्रह्मरूप झालो, तर माझ्यातला देहरूप मी म्हणजे अहं आणि आत्मरूप मी म्हणजे सोहम्, या दोन्ही भावना संपुष्टात येतात. कल्पनेचा प्रांत जिथे पूर्ण मावळतो ती नववी आत्मनिवेदन भक्ती ! ।। दास-वाणी ।। जळी-स्थळी-काष्ठि-पाषाणी । निसर्गाची अगम्य लेणी । अनादि अनंताची खेळणी । त्यांतलाचि म्यां येक ।। ३ जेथून हें सर्वही प्रगटे । आणी सकळही जेंथें आटे । तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/१६ सर्व चराचर सृष्टी आणि ब्रह्मांडे जेथून निर्माण होतात आणि प्रलयाअन्ती ज्यात विलीन होऊन जातात, त्या परब्रह्माचे ज्ञान एकदा प्राप्त झाले की मी, माझा देह, माझे लोक, माझी संपत्ती अशा सर्व बंधनांपासून मनुष्य मुक्त होतो. ही आत्मनिवेदन भक्ती. सर्वश्रेष्ठ भक्ती ! ।। दास-वाणी ।। मियें उभारला संसार । कसा म्हणू आतां असार ? भक्ती-पूजन-भजन-उक्ती निरंतर । होई उदरभरणा कैची ? ।। ४ फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवि निजसार । तोचि गुरू माहेर । अनाथांचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/१५ आपल्या धर्मग्रंथांमधील सिद्धांत आणि तत्वे सोप्या शब्दांत उलगडून साधकांना आणि भाविकांना निर्गुणाची वाटचाल सुरू करून देतो तो सद् गुरू, अध्यात्मिक अनाथांचे साक्षात माहेरच ! ।। दास-वाणी ।। शब्द आणि भावार्थ । भुकेल्याला सर्व निरर्थ । ग्रासाचीच घेते साथ । जाणीव, मनी प्रकटण्या ।। ५ सुभूमि आणि उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/०८ जमीन कसदार उत्कृष्ठ आहे, पेरायचे बियाणे सुद्धा अव्वल प्रतीचे आहे. परंतु पाऊसच जर पडला नाही तर पीक उगवणारच नाही. त्याचप्रमाणे सद् गुरू सत् शिष्य दोघेही यथायोग्य असले तरी अध्यात्म निरूपणाची क्रियाच घडली नाही तर ज्ञानसंक्रमण होईल का ? ।। दास-वाणी ।। काऴ्या आईला पेरणीवेळा । पाणियाचा लागला लळा । म्हणे ' येइ माझ्या बाळा । पान्हा कैसा तुजविण ?' ।। ६ मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/६४ राजहंस पक्षी मानस सरोवरावर आढळतात. ते फक्त मोत्यांचा आहार घेतात अशी कवीकल्पना आहे. राजहंसाच्या कळपात त्यांच्यासारखाच काळया रंगाचा एक डोमकावळा घुसला. विष्ठेचा गोळा दिसतांच झडप घातली अन् त्याचे नकली पण सिद्ध झाले. शिष्य म्हणून सगळेच सारखे दिसले तरी विषय प्रलोभने समोर येताच अनधिकारी शिष्य लगेच उघडा पडतो. ।। दास-वाणी ।। कधी काकांचा येई कळप । 'भक्षिन' म्हणे तुमचे पाप । मग 'गति' आपोआप । मिळेल आम्हा पहा तुम्ही ।। ७ जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/०३ जो संतांना, सद् गुरुला मनापासून संपूर्ण शरण गेला. त्याची खात्री पटल्यावर संतानी आश्वस्त होवून ज्याला जवळ केला आणि अध्यात्माचा श्रीगणेशा घालून दिला तो साधक अशी व्याख्या ग्रंथांमधे आढळते. साधकलक्षण समास. स्वर-शब्द-भाव संतांनी । आम्हा आश्वस्त करोनी । शुध्द केली क़रणी वाणी । नियमितपणे ।। ८ हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥२॥ नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥४॥ वर असलांत देवा । तर ढगांना हलवा । समद्यांचे सुके हालं । आनी हुर्दांत कालवा ।। ९ बेगिन भर बा कावडी । नायतर दावीन चावडी । का बा आम्हाला आपदा ? हात जोडावा कां सदा ? काक म्हणे याद राख भीक नको.. मागू हक्क ।। १० ।। दास-वाणी ।। त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरितां जाले ज्ञान । तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल की ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०७/२२ आमच्या कुळामध्ये श्री रघुनाथाची उपासना आहे. त्या रामरायाचे आम्ही पिढयानपिढया सेवक आहोत. आजवर केलेल्या दास्यभक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त झालय. आता जर अभिमानापोटी ही उपासना सेवा मधेच सोडली तर साधकाचे अध:पतन निश्चित आहे. सगुणभक्ती कधीच सोडू नये, अगदी देह सुटेपर्यंत ! 'दास्यभक्ती' नाही 'दासभक्ती' असो... राम होता मानव । नाही झाला कधीच 'देव' । वर्तनि ठेविला आदर्शभाव । म्हणोनि त्यासि स्मरावे ।। ११ ।। दास-वाणी ।। जितां नाही भगवद्भक्ती । मेल्या कैची होईल मुक्ती । असो जे जे जैसे करिती । ते ते पावती तैसें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/२२ अरे जिवंत असताना जर भगवंताची भक्ती केली नाहीस तर मेल्यावर तरी मोक्ष, स्वर्ग मिळेल अशी अपेक्षा का धरतोस ? असो करावे तसे भरावे या नियतीच्या नियमाला तू सुद्धा अपवाद नाहीस हे समजून सन्मार्गाला लाग ! अन्न पाणी यांची क्षती । जनसामान्य रोज भोगती । कैसा देव नि कैसी भक्ती । सांगा ढोंगी बडव्यांनो ।। १२ ।। दास-वाणी ।। येकांती मौन्य धरून बैसे । सावध पाहातां कैसें भासे । सोहं सोहं ऐसे । शब्द होती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/०७ अत्यंत शांत निर्जन स्थळी बसावे. सावधपणे फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास आत घेताना 'सो' असा आवाज येतो तर शांतपणे सोडताना 'हं' असा आवाज आपल्याला ऐकू येतो. तोच आपला अंतर्नाद, जाणीव, स: अहम् म्हणजे सोहम् ! गर्दी आणि गदारोळ । किंकाळ्या, आर्ताचा कल्लोळ । अवतीभवती विखारी खेळ । जळो जाय 'मी' पणं ।। १३ ऐसे कोठे निवांत स्थलं । वृध्दींगत करील आत्मबलं। प्रोत्साहित करून वृत्ती सकल । मन होइल तवान ।। १४ भावसूत्रांत शब्द ओवीन । गूढार्था स्पर्शेन ओवानं । मनाचिये गुंथीची वीण । करू पाहेन पामरे ।। १५ ।। दास-वाणी ।। तो सकळ देहामधें वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो । प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्री ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/०६ परमात्म्याचा अंश असलेला हा जीवात्मा प्रत्येक शरीरात राहातो. डोळे नाक कान इत्यादी इंद्रियांना तो त्यांचे काम करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्या देहाच्या हालचालींद्वारा चैतन्यरूपाने प्रत्येक प्राण्यामधे तो प्रत्ययाला येत असतो. मी तर निसर्गाचा निखर्वांश । तेणे धारिला शरीरवेश । कोणे पाहिले परमात्म्यास ? केवळ शब्द एक ।। १६ ।। दास-वाणी ।। तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आता येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/१०/५३ अरे तुझे स्थूल शरीर सुद्धा पंचमहाभुतांचे बनलय. सूक्ष्मदेह तर मन बुद्धी अहंकार या मिश्रणातून बनलाय. हा तुझा तुझा देह सुद्धा तुझ्या नियंत्रणात नाहीये तर इतरांची शरीरे कुठल्यातरी नात्याने तुझी आहेत असे तू मानतो आहेस. हा भ्रम दूर कर आणि भक्तीच्या शक्तीने एक परमेश्वरच माझा आहे असे ठरव. वैराग्यनिरूपण समास दशक स्वगुणपरीक्षा . मन तरी माझे कोठे । दिले कुणा ? ऐसे वाटें । कधी कुठेतरी भेटे । विदग्धरूप ।। १७ ।। दास-वाणी ।। आवघे आंधळेचि मिळाले । तेथें डोळसाचें काय चाले । अनुभवाचे नेत्र गेले । तेथें अंध:कार ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०५/१७ आंधळयांनी एकत्र येऊन एखादी गोष्ट कशी दिसते याचा एकमताने निर्णय घेतला, त्या सभेत एक डोळस माणूस आला आणि वेगळेच मत मांडू लागला तर त्याला एकमताने झिडकारले जाते. तसे अनुभव, प्रचीति नसेल तर कितीही पुस्तकी विद्या जोडली तरी तिथे ज्ञानाचा अंध:कारच असतो. आंधळिया चित्तचक्षू । विस्तारिती कल्पनाकक्षू । शब्दप्रवाहा मिळे गवाक्षू । डोळसाशि जे अप्राप्य ।। १८ 'देव' कसा कुठे कुणि पाहिला । म्हणे सर्वत्र भरुन राहिला । सुख-जवे, दु:ख-पर्वते धारिला । तोच कां बा हा ? ।। १९ सुख-दु:खाचे अविरत क्षण । रोज भोगिती संत सज्जन । मन- शरीरा आपलेपण । कैसे येई आपोआप ।। २० शब्दांंमाजी काळे-गोरे । घेउनी 'अनर्थां'ची भांडारे । अर्वाच्य वमन भलेबुरे । क्षमायोग्य तुम्हि जाणा ।। २१ 'देव' अचुक वेधिला सारंगे । अनुभवांती अर्थ बघे । इतरें होवोनि जागे । अनुकरणावे असे ।। २२ ।। दास-वाणी ।। ऐसी हे सृष्टीची चाली । संपत्ती दुपारची साउली । वयेसा तरी निघोन गेली । हळुहळु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०७/२८ तर अशा प्रकारे हे सृष्टीचे रहाटगाडगे सुरूच राहाते. आयुष्यभर राबराबून मिळवलेली संपत्ती ही दुपारच्या वेळी झाडाखाली मिळालेल्या सावलीइतकीच साथ देते. सूर्य कलला की सावली सोडून जाते तशीच संपत्तीही ! वय तर यथावकाश निघुनच जाणार ! अशा स्थितीत भगवंताचे चिंतन हेच शाश्वत आणि फलदायी हे नक्की ! तागडी तोले कोण वाणी । का न ऐकू ये त्याची वाणी । सजलेली दगडी लेणी । कैसा फुटेल शब्द त्यां ।। २३ ।। दास-वाणी ।। कल्पनेकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे । जळाकरितां गार वसे । निमिष्य येक ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/०३ झोप लागलेली असताना मनाच्या कल्पनेच्या भरारींमुळे स्वप्न पडते. दुपारच्या कडक उन्हात समुद्रकिनारी शिंपला चकाकतो म्हणून चांदीचा तुकडा पडल्याचा भास होतो. पाणी अत्यंत थंडीमुळे बर्फ या स्थितीत काही काळ दिसते. बर्फ, चांदी आणि स्वप्न यांना मुळात अस्तित्वच नाही. ते पाणी, शिंपला आणि झोप यांमुळे भासतात. तसेच हे संपूर्ण विश्व हे परमेश्वराने मायारूप धारण केल्यामुळे दिसते खरे पण तो भास आहे. तुम्ही-आम्ही भिन्नरूपी । परिस्थितीप्रमाणे पुण्यवंत वा पापी । जैसा सरडा बदले रूपी । बसून कुंपणावरी ।। २४ ।। दास-वाणी ।। ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार । ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ।। पांडुरंग हरी विठ्ठल ।। दासबोध : ०६/०५/०२ परब्रह्माला विशिष्ट गुणधर्म किवा आकार आहे असे ठरवता येत नाही. त्यापासूनच निर्माण झालेली माया मात्र गुणमाया असल्याने वेगवेगळया रूपांमधे सृष्टीमधे दिसते ओळखली जाते. ब्रह्म अनंत अन् सर्वव्यापी आहे तर माया मात्र नाम रूपात्मक असल्याने नदी, झाडे, मनुष्य, प्राणी अशा दृष्य पदार्थांपुरती मर्यादित आहे. प्रकाशाची उमलती कमळे । तेंव्हाची रूप आकळंे। अंधार सुध्दा उजेडामुळे । होई साकार ।। २५ ।। दास-वाणी ।। देहाचे जे थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण । मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देहो ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/३४ शरीर, त्याचे सौंदर्य, त्याचे लाड यातच जे मोठेपण मानतात ते लोक देहबुद्धीप्रधान मानावे. देहाला धर्माचरणाचे साधन मानून मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करणारे ज्ञानी लोक देहाला दुय्यम मानतात. इतकेच नव्हे तर शरीराचे चोचले पुरवत असलेल्या माणसांवर कडाडुन टीकाही करतात. किती 'कराल' धर्म धर्म । विसरोनी उचित कर्म । सकळ संतांनी उलगडले वर्म । आकळेना कां तरी ? ।। २६ धर्माचिये व्याख्या जाणा । कर्म प्रत्यक्ष असतो कणा । कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा । म्यां पामरे पाळिला ।। २७ रामे मोकळिला अर्थ । कृष्णे बोधविला पार्थ । शिवरायांसि केले 'समर्थ' । दासे विविध पत्रांतुनी ।। २८ ।। दास-वाणी ।। कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचे फळ । कल्पना तेंचि केवळ । मोक्षदाती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०५/२४ ही जी परब्रह्मापासुन निर्माण झालेली माया किंवा कल्पना आहे, तिच्यामुळेच देहबुद्धी आसक्ती वासना निर्माण होतात.जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, म्हणून पुनर्जन्म सुद्धा कल्पनेमुळेच. परंतु हीच कल्पना भक्तीकडे वळवली की माणसाला पुण्यप्रद ठरतेच पण मोक्षाचीही वाट दाखवते. कल्पनेची व्याप्ती मोठी । सृजनाची आधार-काठी । कधि भित्याच्या लागे पाठी । हडळ, संमंध होवुनी ।। २९ कल्पनेची झेप मोठी । दशांगुळावर जगजेठी । प्रसविण्या कोठडी वा कोठी । सहजभावे स्वीकारी ।। ३० कल्पनेचे पंख मोठे । अवकाशहि भासे छोटे । शुष्क शाखेसहि कोंभ फुटे । कल्पनाजगी ।। ३१ कैसे चालावे बोलावे ? अनंत अडथळे नित्य नवे । 'पुनर्जन्म'चे भाकड गोडवे । सांगा गाई कोण गुरू ? ।। ३२ कोण्या काळी जगतों आपण । ज़रा राखुया थोड़े भान । ममत्वाच्या जाणिवेनं । वचन 'सु'कर्माचे देऊ ।। ३३ प्रेरणाच खरी असते गुरू । सत्ता, संपत्ति, संस्कृती बाजारू । सत्प्रवृत्ती, विकृतिचेही मेरू । कर्मा होती कारण ।। ३४ गरज प्रेरणेची जननी । जगावयासि अन्न-पाणी । मिळवावया, विविध 'करणी' । धजावती माणसे ।। ३५ नकळत कुणी करिती पाप । लौकिकार्थि गुन्हा आपोआप । देउन अपराध्याला शाप । संस्कृतिनिष्ठ सुखावती ।। ३६ अक्षर शब्दाचा गुरू । शब्द वाक्याचा आधारु । ग्रंथास ओढिती वाक्यांचे वारू । वाचकाप्रति न्यावया ।। ३७ चरण ऐसे दाखवा कोणी । रुध्द कंठे आसवे पांपणी । क्षणभर ज्याच्या भ्रमणी । सुखावेल जीव ।। ३८ ।। दास-वाणी ।। निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें वेवाद पडे । उपाधीमिसें येऊन जडे । अभिमान आंगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/६६ निरूपण करताना आपला मुद्दा लोकांवर बिंबवण्याच्या नादात कळत नकळत आपण समोरच्यांची टिंगल टवाळी करून जातो. चर्चा संवाद करत असताना वितंडवादच सुरू करतो.आपल्या फाजील अभिमानापोटी आपण ' तुटे वाद संवाद तो हीतकारी ' हे सोयीस्कर विसरतो. याचे मूळ कारण आपणच स्वत:ला जोडलेल्या महाराज, दादा, गुरूदेव इत्यादी उपाध्या, आणि त्याबद्दलचा फुलवलेला अभिमान, अहंकार होय. म्हणजे बोलू-सांगोचि नये । व्यक्त कांही होवोचि नये । शिवलेल्या ओष्ठद्वये । पुतळे व्हा बा सकळजन ।। ३९ ।। दास-वाणी ।। पापाचें फळ तें दु:ख । आणी पुण्याचे फळ तें सुख । पापपुण्य अवश्यक । भोगणे लागे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/०७ ' करावे तसे भरावे ' हा नियतीचा नियम आहे. चुकीच्या व्यवहाराचे फळ दु:खद आणि योग्य वर्तनाचे फळ सुखद असते. पाप आणि पुण्य यांची फळे वेगवेगळी भोगावीच लागतात, टाळता येत नाहीत. मुख्य म्हणजे पापपुण्याचा एकत्रित जमाखर्च मांडता येत नाही. त्यांची खातीच वेगवेगळी आहेत. पुण्य कोणते आणि पाप । तुळसी की अफूचे रोप । होतो निवाडा आपोआप । परिणामांतरी ।। ४० माया ममता वात्सल्य । शत्रूच्या यशाचे शल्य । वा विध्वंसाचेे कौशल्य । विविधांसाठी भले-बुरे ।। ४१ प्रार्थना पूजा आरती अर्चना । प्रसन्न करण्या उपाय नाना । परंतू शोधता दिसेना जाणवेना । अट्टाहास ज्यासाठी ।। ४२ ।। दास-वाणी ।। साधु स्वरूप निर्विकार । तेथें कैचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०९/२९ साधुसंत स्वत: आत्मस्थितीमधे असल्याने त्यांना आप पर भाव नसतो.विकार म्हणजे स्थितीमधील बदल. निर्विकार म्हणजे सुख आणि दु:ख दोन्हींमधे शांत राहणारा. समाजाशी जो संपूर्ण एकरूप झालाय तो तिरस्कार तरी कोणाचा करेल ? आपण स्वत:चा मत्सर करतो का ? सिद्धपुरूष विश्वमय असल्याने तो फक्त प्रेमच करतो. कृपेचा वर्षाव करतो. ऐसे सज्जन बहुत विरळा । भेटतील तो दिस आगळा । कारण ढोंगियांच्या गळा । अडकती बहुधा मूढ ।। ४३ सिध्दास हवी प्रसिध्दी आज । शोधिती अव्याहत काज । सोडोनिया मनाची लाज । कमरेचे घेती डोइवरी ।। ४४ माध्यमांचे मोहक जाळे । विद्वत्ता शुचिता संधी शोधत पळे । मातीमोल तपश्चर्येची फळे । निमिषां़त ।। ४५ ।। दास-वाणी ।। निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण । तें जाणावें अत:कर्ण । जाणती कळा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०८/०४ अंत:करणपंचकात मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा समावेश होतो. यातील मूळ अंत:करण त्याचे उगमस्थान नाभीस्थानी परावाणीमधे आहे. शुद्ध स्फुरलेला निव्वळ विचार म्हणजे अंत:करण .ते जाणीवयुक्त असल्याने जाणती कळा मानले जाते. हा निव्वळ विचार पुढे अर्थानुरूप होवून पश्यंतीमधे सरकतो.नादरूपात मध्यमेकडे जातो. शेवटी शब्दरूपात वैखरीद्वारा व्यक्त होतो. जाणिवेंत रुजतो । विचारांती अंकुरतो । ध्वनिरूप धारितो । त्यासि म्हणावे शब्द कां ? ।। ४६ ।। दास-वाणी ।। ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार । तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०१/२१ उत्पत्तीचा देव ब्रह्मा, स्थिती अर्थात पालनकर्ता विष्णु आणि लय म्हणजे विनाश घडवणारेे महादेव यांच्यामार्फत सृष्टीचे चक्र सुरू राहते. हे तीनही देव ज्याच्यापासून निर्माण होतात तोच निर्गुण निराकार मुख्य देव होय जो परब्रह्म या नावाने ओळखला जातो. ज्ञानदशकातील देवशोधन समास. एकपेशीय उत्पत्ती । बहुपेशीय उत्क्रांती । झेप माणसाची अज्ञाताप्रती । निसर्गकृपा जाणा ।। ४७ ।। दास-वाणी ।। प्रपंची जो सावधान । तो परमार्थ करील जाण । प्रपंची जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०१/०९ दैनंदिन व्यवहारात जो अत्यंत दक्ष असतो तोच परमार्थ समर्थपणे पेलू शकतो.जागरूकपणा दोन्हीकडे अत्यावश्यक गुण आहे. परमार्थासाठी तर थोडा अधिकच ! प्रापंचिक देवाणघेवाण ज्याला धड जमत नाही त्याला अध्यात्मिक उपदेश काय झेपणार ? विवेकवैराग्य दशक. परम अर्थाची जाण। सर्वांतरी विलक्षण । भवसागरी समाधान । करती सकल सदस्यांचे ।। ४८ वाहती ओझे साहती त्रास । त्यातंच अध्यात्मगर्भ उपदेश । अडविती कंठासी ग्रास । तथाकथित संतजन ।। ४९ ।। दास-वाणी ।। आपणासीं बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवधा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०७/ १६ स्वत:लाच धड पोहता येत नाही अन् पोहण्याचे वर्ग सुरू करतो. लोकांना बुडवायचे धंदे नाहीत का हे ? विद्यार्थ्य़ांच्या मनात बुडायच्या धास्तीमुळे शंकाच निर्माण होऊन पोहण्याची आवड गोडी संपून जाईल. हा दृष्टांत आहे भंपक गुरू आणि नादी लागलेले सामान्य भाबडे शिष्य यांच्या संदर्भात शिकवणनिरूपण दशकात. लहानांची सावली । मोठी होऊ लागली । जाणा वेळ झाली । तेजोविलयाची ।। ५० परंतु ज्योत पणतिची । ज़रि असेल पायाशी । सावली उंच भिंतिशी । निश्चितपणे ।। ५१ ऐसी रूपके दृष्टांत । साहित्य करिती अलंकृत । उपदेश निद्रित ग्रंथात । परिणाम शून्य ।। ५२ ।। दास-वाणी ।। उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपडावें । नीचत्व पहिलेंच घ्यावें । आणि मूर्खपण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०५/०९ आपण हाती घेतलेला प्रकल्प वाढवावा त्याची व्याप्ती देखील खूप विस्तारावी. स्वत: मात्र त्याच ठिकाणी गुंतून पडू नये. महंताने स्वत:कडे कमीपणा घ्यावा. अगदी मूर्खपणा घेतला तरी चालेल परंतु कार्यकर्त्यांना सतत बरोबरीच्या नात्याने वागवूनच कामे करून घ्यावीत. नंतर लोकावर जबाबदारी सोपवून निस्पृहपणे वेगळया प्रकल्पाला सुरूवात करावी. कैसे व्हावे मोकळे । सांभाळता गोतावळे । भेली भोवती मुंगळे । वारावे कैसे ।। ५३ विस्तारू जाता व्याप्ती । प्रमाणांत वाढेल कां संपत्ती । यासाठी शोधती क्ॢप्ती । नेते भ्रष्ट ।। ५४ ।। दास-वाणी ।। वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन झाला । तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०७/०६ महंत सामाजिक कार्यासाठी एखाद्या गावी दीर्घकाळ राहिला आणि भोजनासाठी किंवा भिक्षेसाठी ठराविक घरांमधेच रोज गेला तर तो पराधीनच मानावा. असे महंत त्या त्या कुटुंबाचे मिंधे होऊन त्यांचे विचारस्वातंत्र्यसुद्धा नष्ट होऊन सार्वजनिक कार्य बाधित होते. म्हणून महंताने एकाच घरी जेवू नये, थांबू सुद्धा नये. मिंधे अवघे जन होती । बिचारे काय करतिल पोटार्थी । सत्ताधा-या पुढती म्हणती । ॐ भवति भिक्षांदेहि ।। ५५ यजमान जेंव्हा धनहीन । निर्लज्ज वर्तणूक हीन । फिरवुनि टोपी साहित्य'सज्जन' । करिति भलावण अन्याची ।। ५६ ।। दास-वाणी ।। निस्पृहता धरू नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडो नये । वोळखीमधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०१/०४ स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृह म्हणजे निरिच्छ. स्वत:साठी काही हवे असे मनात सुद्धा न येणे. एकतर अवघड वाटत असेल तर हे व्रत धरूच नये. विचारपूर्वक हाती घेतले असेल तर कदापि सोडू नये. वैयक्तिक स्वार्थापोटी निस्पृहता सुटली तर किमान कार्यकर्त्यांना तोंड तरी दाखवू नये. तेथून निघून जावे. समाजाचा विश्वास तुटला तर सुरू केलेले कार्य सुद्धा खुंटते. निस्पृहलक्षणात लालसेला स्थान नाही. ते काळी ते श्यक्य होते । निष्क्रिय भोंदू 'संत' कोते । पोट भिक्षेने भरत होते । कार्मिकांच्या दानांतुनी ।। ५७ निस्पृहता कशासाठी ? । फुकटे फिरती अवती-भवती । कष्टसाध्य प्रयत्नांती । दमड्या अव्हेराव्या आम्ही ? ।। ५८ ।। दास-वाणी ।। समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवि जो दूषण । गुण सांगता अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/०८ संपूर्ण पुस्तक लक्षपूर्वक समजून उमजून वाचावे मगच काय टीकाटिप्पणी करायची ती करावी. असे न करता जो नुसताच पूर्वग्रहदूषित विचारांनी ग्रंथाला जो शिव्या देतो. त्यातील सुविचारांनाही जो कुविचार मानतो तो एक पढतमूर्ख. शिक्षित असला तरीही मूर्खच ! अनुभव उपदेशाहुनी अस्सल । दुर्लक्षुनी 'समूळ' ग्रंथ लिहील । माथा जनसामान्यांच्या मारील । वो कुठला शहाणा बा ? ।। ५९ कालपरत्वे बदले स्थिती । जो न बाळगे त्याची क्षिती । रेटित जाय संतांची नीती । शिष्य कसला ? तो भोंदू ।। ६० जो जे वांछील ते कां मिळते ? । अन्याचीच ओंजळ भरते । माउलीसही माहित नव्हते । वैश्विक अंतिम सत्य हे ।। ६१ उघडुनि जबडा बडबड करिती । भिक्षेद्वारे झोळी भरिती । मेद वाढवुनि चिलिम फुंकिती । मवाली गुंड समकक्ष ।। ६२ भरल्यापोटी करि उपदेश । अंधश्रध्देचे फेकुनी पाश । अबालवृध्दांचा 'समूळ' नाश । करि, तो कुशिष्य समजावा ।। ६३ ऐसे पुण्यपत्तनी खूप । 'चिंचोळ्या' बोळांत सेविती तूप । लुंग्या लावुनि लपविती 'स्व'रूप । सावध ऐशांपासुनी ।। ६४ राष्ट्रपती, येक पद । करोनी एकसमयावच्छेद । बाया-बापड्या, अबाल-वृध्द । वांछतील जरि, मिळेल कां ? ।। ६५ कुणि फ़क़ीर, बाबा, मौला । पोटार्थी भरण्या ग़ल्ला । अंधश्रध्देच्या उतरविती हलाला । गांजल्यांच्या नरड्यांत ।। ६६ म्हणे दासें प्रेतांत । फुंकोनि प्राण केले जिवंत । भाकडकथा ऐशा अविरत । लुंगेसुंगे प्रेरिती ।। ६७ शोधुनि काढा ऐशा नरा । हाती घेउन पैजारा । मार्ग 'मोक्षा'चा दावा खरा । मिळूनि तुम्ही सकळजन ।। ६८ ।। दास-वाणी ।। स्वयें नेणें परोपकार । उपकाराचा अनोपकार । करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०१/३० परत फेडीची बिलकुल अपेक्षा न धरता एखाद्या व्यक्तीला केलेली मदत म्हणजे उपकार. स्वत: उपकाराचे नाव सुद्धा काढत नाही. समोरच्याने आपल्यावर केलेल्या उपकारांचे स्मरणही नाही. तोंडाने मात्र सामाजिक उपक्रमांची अखंड बडबड, प्रत्यक्षात कृति शून्य ! मूर्खलक्षण समासात समर्थ वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. भिक्षेची झोळी रुंद । भोजन करी अनिर्बंध । दात्यापाठी बोल अर्वाच्य बेबंद । उच्चरिती ते भोंदू ।। ६९ निष्क्रिय आळशी गांजेकस । फासुनी रक्षा अंगास । तप्श्चर्येचा उभारती आभास । सावध ऐशांपासून ।। ७० दानाने माजती फुकटे । कुरण आपले ऐसे वाटे । तुपाचे भरुन नेती लोटे । स्वगृही वोतावया ।। ७१ दानाने माजती फुकटे । कुरण आपले ऐसे वाटे । तुपाचे भरुन नेती लोटे । स्वगृही वोतावया ।। ७२ दानें माजविले ऐतखाऊ । मिळेल ते वोरपून घेऊ । म्हणति 'श्रीमंती' वाढवू । कष्टेविण ।। ७३ ।। दास-वाणी ।। सत्वगुणे भगवद्भक्ती । रजोगुणे पुनरावृत्ती । तमोगुणे अधोगती । पावति प्राणी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/०२ सत्वगुणात स्थित असलेली व्यक्ती कायमच भगवंताच्या भक्तीमधे बुडालेली असल्याने हातून गैरव्यवहार होतच नाहीत आणि परिणामी मृत्यूनंतर सुद्धा ऊर्ध्व म्हणजे सत् गती प्राप्त करते. रजोगुणी व्यावहारिक राहतो. हवे नको वाढत राहते. अंतिम क्षणी सुद्धा इच्छा असतातच. त्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा जन्माला येतो. चक्र सुरूच राहते. तमोगुणी व्यक्ती आयुष्यभर समाजाला त्रासदायक ठरतेच आणि मृत्यूनंतर सुधा राहिलेले भोग भोगण्यासाठी मनुष्येतर हलक्या योनीमधे जन्म घेतेे. जीव अतृप्त राहतो ही अधोगती. सत्व-रज-तमाचा योग्य मेळ । मन-शरीरासाठी सर्वकाळ । घालोनि करी प्रतिपाळ । तोचि गोपाळ योगि-भोगी ।। ७४ ऐसा ठेवावा आदर्श । शिरोधार्य ज्याचा स्पर्श । पंचमहाभूत सदेह सदृश । अंतर्लहरी कल्लोळवी ।। ७५ तारे-वारे-धरा-तेज । जळाचे सुखद हितगुज । सत्य-शिव-सुंदराचे बीज । एकवटले ते ठाई ।। ७६ ।। दास-वाणी ।। महत्कृत्य सांडून मागे । देवास ये लागवेगे । भक्ती निकट अंतरंगे । तो सत्वगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०७/३४ कितीही महत्वाचे काम हातात असले तरी देवकार्याची हाक कानी आल्यावर जो ताबडतोब धावत जातो ,ज्याच्या अंत:करणामधे भक्तीची भावना तुडंब भरून ओसंडून वाहात असते तो सत्वगुणी. जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त । श्रवणेंद्रिये राखिती निद्रिस्त । 'असल्या' हाका ऐकावया ।। ७७ काय म्हणोनि 'कारसेवा' । अन्य बसून सेविती मेवा । श्रेयाप्रती दावीत दावा । तथाकथित संत, ज्ञानी ।। ७८ ।। दास-वाणी ।। साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढे सरवाडती । खाती जेविती सुखी होती । येत्नेंकरूनी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०३/११ अखंड उद्योग करणार्याला सुरवातीला पुष्कळ कष्ट पडतातच परंतु नंतर मात्र तो सुखात राहतो. खाणे पिणे मजा करणे हे स्वकष्टाच्या कमाईवर केल्यास निश्चिंत झोपही लागते ही वरकमाई मानावी. सिकवण निरूपण समासात समर्थ प्रयत्नांचे महत्व सांगताहेत. आतां समर्था आली जाणं । मानुनी काबाडकष्ट परिपूर्ण । प्रतिष्ठित केले प्रयत्न । रंजल्या गंजल्यांचे ।। ७९ आधी रुसली वर्षाराणी । भेगाळे भुई, शुष्क पांपणी । मग आले मुसळधार पाणी । धरे घरी सुखवाया ।। ८० पहाड फोडित धबाबा । निसर्गाचा सुटला ताबा । कळिकाळाच्या विक्राळ जिभा । स्पर्धा करिती गिळावया ।। ८१ भक्तीने तारले जीव ? पूजिला त्यांनी कुठला 'देव' ? कृषिवलांवरी नाहक घाव । कां कुणी घातला ।। ८२ बाया-बापड्या, वृध्द नि तान्ही । निद्रिस्त होती समाधानी । आक्रोश त्यांचा कां कसा कानी। 'अभाव-देवा'च्या पडेना ? ८३ पाणी ! तृषेला आधार । पाणी । रूप कधी अघोर । पाणी ! अश्रूंची संतत धार । पाहुनि हसे खदखदा ।। ८४ प्रदीर्घ ओढ कधि देई पाणी । वर्षत अविरत सुखवी धरणी । कधि हृदय दावी पाषाणी । हाहाक्कार माजवी ।। ८५ 'परिपूर्ण' ऐशा पाण्याच्या त-हा । मग कोत्या जन्मजात नरा । दावता विकृतिच्या पदरा । 'पाप अय्यो' आरडती ।। ८६ ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणे न घडे श्रवण । दुश्चीतपणे न घडे विवरण । दुश्चीतपणे निरूपण । हातीचें जाये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/२४ एकाग्रता भंगलेले मन म्हणजे दुश्चित्त. त्याचे तोटे काय ? श्रवणाला बसलाय पण डोक्यात काही शिरत नाही. विवरण म्हणजे अर्थांतर शोधणे. श्रवणापेक्षाही अधिक कठीण. त्यामुळे समोर सुरू असलेले निरूपण सुद्धा नको वाटते कारण विवरण जमत नाही. त्यामुळे च संतांनी केलेला बोध हातचा निघून जातो. संसार उधळतां वा-यावरी । तरिहि चित्त था-यावरी । ठेवोनि, प्रयत्न परोपरी । करिती तें धैर्यशील ।। ८७ माय-बाप-अस्तुरी । पोरे-सोरे किना-यावरी । सोडून उपदेशाच्या आहारी । जाय तो शतमूर्ख ।। ८८ उतावळा गाठे बोहले । बाशिंग गुडघ्याला बांधिले । सजवे 'तिच्या' कंठी डोरले । पाही स्वप्ने बेभानं ।। ८९ ।। दास-वाणी ।। येकांती नाजुक कारबार । तेथें असावें अति तत्पर । त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रंथी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०३/०७ व्यवहारामधे काही गुप्त खलबते करून निर्णय घेताना सुद्धा अत्यंत सावध अन् नेमकपण लागते . अध्यात्मग्रंथ समजून घेताना तर कोटीपट सूक्ष्म आणि अचूक लक्ष दिले तरच खरे अपेक्षित असे श्रवण साधकाकडून घडते. क्षणोक्षणी सावध राहाणे । हे आम्हा सामान्यांचे जिणे । दृश्यादृश्य शत्रूंशी दोन हात करणे । मार्गक्रमितो अहोरात्र ।। ९० परंतू याची खंत । मनाशी नाही यत्किंचित । जिणे 'तसले' गुळगुळित । संघर्षाविणा ओशाळवाणे ।। ९१ अर्धपोटी उपदेश कैसा । रुचतो-पचतो न तो सहसा । पसरता जाणिवांचा पसा । अपेक्षा क्षुधाशांतिची ।। ९२ बाष्फवत् जिणे तुमचे-आमुचे । धरू पाहाता हाती न यायचे । कोणा नकळत विरून जायचे । जाणिवे पल्याड ।। ९३ ।। दास-वाणी ।। श्रवणे आशंका फिटे । श्रवणे संशयो तुटे । श्रवण होता पालटे । पूर्वगुण आपुला ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/०५ पारमार्थिक ग्रंथ ऐकणे, वाचणे किंवा त्यांवर मनन करून लोकाना समजावून सांगणे म्हणजे श्रवण. पुन्हा पुन्हा ऐकल्यावर मनातल्या शंका कुशंका दूर होऊन बुद्धी संशयरहित होतेेच. परिणामी श्रोता वक्ता दोघांचेही पूूर्वीचे अवगुण, दोष कमी होण्याची शक्यता वाढते. डोळे म्हणजे नाही 'दृष्टी' । आकळण्या अवघी सृष्टी । श्रवण-स्पर्श-गंधासह पूर्ती । ज्ञानवृध्दी करि रसना ।। ९४ नेत्रहीनां केवळ श्रवण । कल्पनेने मनाशी दृश्यांकन । प्रत्यक्षापेक्षा कधि विलक्षण । सरस ठरत असेलही ।। ९५ ।। दास-वाणी ।। थोडे बोलोनि समाधान करणे । रागेजोन तरी मन धरणे । मनुष्य वेधींच लावणें । कोणी येक ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०७/०४ निरूपणकाराने अचूक शब्दात थोडक्यात विषय मांडून श्रोते समाधानी करावेत.सभा गैरशिस्त असल्यास रागवावे परंतु श्रोते उठून जातील एवढे नाही. त्यांना आपल्या बोलण्याने खिळवून हळू हळू परमार्थाकडे वळवावे. प्रास्ताविकी बडबड करिती । बीज भाषण दुर्लक्षिती । लक्षवेधाची 'अति' प्रीती । हौश्यागौशासि सर्वदा ।। ९६ 'हुश्श', 'हाड् हाड्' वा 'वाव्वा' । निरर्थक अक्षरे, तरि भावा । व्यक्तण्या कौतुक, किळस, कावा । बोलीभाषेंत उपयुक्त ।। ९७ संत, विद्वान उच्चारता 'देव' । अंधश्रध्देचा वधारतो भाव । लोकशिक्षणाचा अभाव । सदैव दुर्लक्षित ।। ९८ ।। दास-वाणी ।। प्रसंगे हरिकथा करावी । सगुणी सगुणकीर्ती धरावी । निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०२/१७ वेगवेगळया उत्सवामधे कीर्तने, प्रवचने होतात. कीर्तनकारानी भगवंताच्या लीला विविध कथांमधून मांडाव्या तसेच परमेश्वराच्या मूर्त सगुण रूपाचे रसभरित वर्णन करावे. सामान्य भक्तांना ते आवडते, समजते. प्रवचनांमधे मात्र निर्गुण निराकार रूपाचे गुणगान करावे आणि सर्व विद्यांमधे श्रेष्ठ अशी जी अध्यात्मविद्या तिचाच प्रसार करावा. साधकांसाठी ती अधिक योग्य. सामान्यांची साधना परमार्थी । स्वत: कष्टुनी आप्तांस पोशिती । निरुद्योगी 'जे' अध्यात्म सांगती । कर्मयोगांत अडथळा ।। ९९ सगुण सरूप जर 'देव' । वर्णनानेचि कां संभव ?। कधी-कुठे-केंव्हातरी ठाकावं । दर्शनहेतू 'देवा' नं ।। १०० ही शतकोत्तरी पहिली । ओवी आज सफल झाली । ऊर्जा, प्रेरणा शब्दस्रोतां दिली । तुम्हाकारणे चिंब भावधारेंत ।। १०१ प्रस्तरावर गोरस-घृत-दही । क्षुधाग्नीत जरि लाहीलाही । आंधळ्यांच्याच गृही होई । 'न्याय' ? अतर्क्य, अघोरी ।। १०२