Sunday, July 29, 2012

ए मित्रा !

ए मित्रा तू कांही लोकांसाठी किती, अनमोल, ’खास व्यक्ती आहेस, माहीत आहे तुला ? तुझा नुसता आवाज त्यांच्या आयुष्य़ांतले कांही क्षण आनंदाने उजळून टाकतो..आणि मग तुझं दर्शन..किंवा सहवास जर मिळाला त्यांना तर काय होईल त्यांचं ? जरा विचार कर ! तू नेहमीच तुझ्या सहकार्‍यांना, सहाध्यायांना, सहप्रवाशांना खूपच उत्थापन देवून त्यांच तुझ्या जगण्यांतलं स्थानं किती महत्वाचं आहे हे जाणवून देतोस. त्या पैकी प्रत्येकजण तुझ्या या वागण्यामुळं मनोमन सुखावलेला असतो ...आणि ते सुखावण त्यांच्या चेहेर्‍यावर नेहमीच मंद स्मिताच्या रूपानं दिसतं. अनेकवेळा ते कांही कारणांनं व्यथित असतांना, तुझा साधा, ’कस काय पावनं, बरं हाय ना ?’ असा सर्वसामान्य चौकशी करणारा निरोप जरी त्यांना मिळाला तरी ते पतर उत्साहित होतांत आणि कांहींच्या चेहेर्‍यावर चक्का हसू दृग्गोचर होतं.. मित्रा ! ठावूक आहे.. तुझ्याजवळच्याअ सगळ्याचा त्यांच्याबरोबर उपभोग घेतांना तुझे आभार वगैरे मानण्याचा प्रपंच उगाच ते करीत नाहीत..कारण त्यांना माहीत आहे की तुझं-त्यांचं नातं हे कधीच औपचारिक नव्हत, नाही आणि नसणार आहे तू त्यांना किती आवडतोस हे कधी तुला त्यांनी तोंड उघडून शबदांकित केलय ? नाही ना ? तेच कारण आहे... आणि तेच मी तुला सांगतोय या क्षणी .. स्नेहा शिवाय आणि स्नेह्याशिवाय जगणं शय्क्य आहेकां ? सांग बरं तूच.. म्हणून...आपलीमैती आहे..आपण दोस्त आहोंत एकमेकांचे यापरतं सुख-आनंद-समाधानदायी काय असूं शकत.. सांग मित्रा ?

Thursday, July 26, 2012

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा’ ***** जे जे जगी या जन्मते, उमलून फुलते, बहरते कालापरत्वे शुष्क अन्‌ निष्पर्ण होवुन संपते... चुकले कुणां कां हे कधी, जरि होतसे परमावधी वय जाय पुढती हर क्षणी, ’लय’ साधतो बेसावधी, म्हणुनी कुणी कां थांबती, शिर धरुनी हाती बैसती, बेतून कार्य नि योजना, धरती असोशि नि, धावती उलटली साठी तरिही अजुन यौवनांत मी... अशी भूमिका ठेवून वागा, हा एक सल्ला..कदाचित अनाहूत असेल, पण सार्थ आहे. हजारो वर्ष जगलेले वृक्ष या अवनीवर अजून आहेत, पण आवघी शंभरी गांठलेली कितीशी माणसं आहेत ? लाखांत एखादांच वयाची शंभरी गाठतांना, ओलांडतांना आपल्याला दिसतो, कळतो किंवा फारच क्वचित, आपल्या परिचितांपैकी असतो. तुम्ही नव्वद वर्ष जगलांत तर तुमच्या पदरी दहा वर्ष शिल्लक असतांत..आणि ऐंशी वर्ष जगलांत तर अर्थातच, आणखी वीस वर्ष वाट पाहायची असते. जर ’जायच्या’ आधी तुम्हाला फक्त कांही वर्षांचच आयुष्य उपभोगायला मिळणारं असलं आणि ’जातांना’ तुम्ही इथून ’कांऽऽऽहीऽऽऽही’ घेवून ’जाऊ’ शकणार नाही आहांत याची खात्री... अं हं ! ते एक त्रिकालबाधित सत्य असल्यामुळे, तुम्ही कंजूषपणे वागून कांही साध्य होणार नसतं.म्हणून.. पैसे खर्च करा, मौजमजा पुरेपूर करून घ्या, घ्यायचे राहिलेले आनंद या उर्वरित उतारवयांत जमतील तसे, तेवढे उपभोगून घ्या, त्यांतून शिल्लक राहिलंच तर ’सत्पात्री’ दानं द्या, पण आयुष्यभराची सग्गळी कमाई, पुत्र-पौत्रांच्यानांवे करू नका, जर त्यांना परावलंबी झालेलं तुम्हाला पाहायचं नसेल तर... तुम्ही ’गेल्यावर’ काय होईल याची चिंता करीत बसूं नका. कारण त्यावेळी खालेल्या तुमच्या चिमुटभर राखेला, राग-लोभ, प्रशंसा-निर्भत्सना, स्तुती-नालस्ती यांची जाणीवच नसणाराय्‌ मुळी ! मुलांच्या चिंतेचे, काळजीचे गुलाम होवू नका, कारण त्यांचं नशीब तुम्हीच काय कोणीच बदलू शकणार नाही. ते तर, जसे तुम्ही वाढलांत जगलांत तसेच त्यांच्या पद्धतीनं वाढणार, जगणार आहेत. तेंव्हा व्यर्थ, फुकाचं मानसिक ओझं कशाला ? मुलाबाळांच संगोपन करतांना, त्यांच्या बालपणी त्यांना काय हवं नको ते बघतांना, कोडकौतुक करतांना, त्यांच्या बद्दल फार अपेक्षा बाळगायची अक्षम्य चूक कधीही करू नका मित्रांनो ! कारण येणार्‍या ’उद्यां’ ते त्यांच्या आयुष्याशी झगडण्यांत, कर्तव्यांच पालन, उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करण्यांत, , कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यांत व्यग्र असणार आहेत. जेआपल्या अपत्यांबाबत हे करणारनाहीत त्यांची अपत्य त्यांच्या ’असले’पणींच ’वडिलोपार्जिता’वरून वादविवाद, वितंडादि आयुध एकमेकांवर उगारणार आहेत, आणि तुमच्या ’महानिर्वाणा’ची प्रतीक्षा करण्यांतच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यतां मानणार आहेत. तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे तेच फक्त वारस आहेत याबाबत तुमच्या मुलाबाळांना हक्काची नुसती हमींच नाही तर शतप्रतिशत निश्चितीच असते. तुमच्यासारखा साठ्योत्तर ’वर्धिष्णु’ स्वत:च्या ’आरोग्य-संपदा’ या पैकी कशाचीही देवाणे-घेवाण करण्यापलीकडे पोहोचलेले असतांत. कारन आरोग्य हे कधीच पैशांनी विकत घेता येत नाही, हे तुम्हाला एव्हांना पटलेलं असतं. आतां पैसा.. मग तो किती मिळवायचा ? लाख ? दहा लाख ? कोटी ? दशकोटी, अब्ज ? हा ज्याचा त्याचा प्रष्ण आहे. पण एक कायम ध्यानांत ठेवलं पाहिजे आपण सर्वांनी की एक हजार एकर उत्तम प्रतीच्या पिकाऊ जमिनीमधे घेतलेल्या भात पिकापैकी एकट्याला फक्त तीन भांड्यांचा शिजवलेला भात एका दिवसांला, आणि हजारो महालांची मालकी जरी तुमच्या गांठी असली तरी केवळ बहात्तर चौरस फूट जागा तुम्हाला रात्री झोपण्यासाठी लागते. आणि जोवर, तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पुरेस अन्न मिळतय आणि तुम्ही जवळ पुरेसा पैसा बाळगून आहांत तर मग तुमचं उत्तम चाललं आहे असं म्हेणायला हरकत नसावी, नाही कां ? म्हणून आनंदी, प्रसन्न राहा. अडचणी कुणाला आणि कुठल्या कुटुंबांत कुरबुरी नसतांत ? दुसर्‍यांच्या आमदनी, लौकीक, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी स्वत:च्या तत्सम बाबींची तुलना करीत बसूं नका. पुढची पिढी किती यशस्वी होते आहे, मुलाबाळांच्या प्रगतीचा आलेख उद्‌गामी आहे की नाही याकडे बारकाईने लक्षपूर्वक नजर ठेवा. आणि दुसर्‍यांच्या आनंद, प्रकृती आणि दीर्घायुष्याचं गमक साध्य करायचा प्रयत्न करा. जे बदल करणं तुमच्या आवाक्याबाहेरचं असेल त्यांच्या फंदात उगा पडू नका. तो वेळेचा अपव्यय तर ठरेलच आणि तुमच्या अनारोग्यालाही कदाचित कारणीभूत ठरेल. तुम्हाला स्वत:लाच अखेर ’स्वांत:सुखाय’ जगण्याचा आणि संतोष मिळवण्याचा प्रयास करावा लागेल. तुमच्या चित्तवृत्ती जोवर प्रसन्न आहेत, तोपर्यंत ’गोड गोष्टी’, बकुळिच्या तळाशी मिळतांत तशा सुगंधित स्मृतींचीच कांस धरा. स्वत:ला ’छान’ वाटेल अशा काहीतरी कृती, कर्तव्य, समाजकार्य रोज करायची सवय अंगवळणी पाडा. गंमत असते त्यांत आणि वेळही छान जातो हा एक ’बोनस्‌’ फायदा.. एक दिवस ’आला तसा गेला’ तर तुमच्या साठ्यांतला एक दिवस ’कमी’ झाला, तोच दिवस तुम्ही ’आनंदमयी’ केलांत तर तुम्हाला तो ’मिळाला’ असंहे साधं गणित आहे ! ’प्रसन्नवदना’ला रोगराई सुद्धा वचकते, आणि लांब प्ळते, ’ साजिरे’ असाल तर व्याधी लवकर बर्‍या होतांत, आणि दोन्ही... म्हणजे आनंदी आणि खुशहाल असाल तर आजारपण येतच नाही. शिवाय उल्हसित चित्तवृत्तीनं, स्वच्छ सूर्यप्रकांशांतला व्यायाम, न्याहारींत आणि भोजनांत पुरेशी जीवनसत्व, क्षारं असलेले, विविध ’जायका’वाले पदार्थ यांचा समावेश केलांत तर, खात्री बाळगा की पुढची वीस-तीस वर्ष तुमच्या आरोग्याला कांऽऽहीऽऽही धोका नाही. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे स्वत:च्या आजूबाजूला बहुतेक वेळ ’आनंदविभोर’ वातावरण राहील याची दक्षता घ्या. आणि मित्रमंडळ ? त्या शिवाय आयुष्य असूंच शकत नाही कोणाचं खर की नाही ? तो एक महत्वाचा ऊर्जास्रोत असतो रोजच्या जगण्यांतला. त्यांच्या आणि त्याच्या शिवाय अस्तित्व ? उघड्याबोडक्या माळावरच्या एकाकी, शुष्क, निष्पर्ण वृक्षासारखं ! त्याला काय असंणं म्हणायचं ? अहो म्हणून ठेवल ना..कुणीतरी.. ’निदकाचे घर (सुद्धा चालेल एकवेळ, पण), असावे शेजारी’ तेंव्हा.. शुभेच्छा... हो, आणि ’साठ्योत्तरी’ साजर्‍याकरणार्‍या तुमच्या सुहृदांना ही ’विचार=आहेर’ नक्की द्यायला विसरू नका !!

Sunday, July 22, 2012

’विश्वात्मकता..’

’विश्वात्मकता..’ विश्वात्मकता म्हणजे नेमक काय ? सामान्यत: रुचू-पचू शकणारी व्याख्या बहुधा हीच असावी... माझ्या माफक बुद्धीला आकलन होत असलेला किंवा झाला असलेला, विश्वात्मकतेचा अर्थ असा... प्रष्ण: वैश्वकतेचा तंतोतंत, शब्दश:, अचुक, नेमका अर्थ काय ? युवराज्ञी डायनाचं ’महानिर्वाण’ (आता अपघाताला महानिर्वाण म्हणायच कीाही हा ’ज्याचा त्याचा प्रष्ण’, पण व्यक्ती महान म्हणजे ’निर्वाण’ सुद्धा ’महान’च असणार, नाही का शाब्दिक त्रैराशिका प्रमाणे ?) आतां हे कसं हे सांगण क्रमप्राप्त झालं...असो पाहूया हं ! उत्तरादाखल ’दाखल’ केलेली विधान माझ्या प्रिय वाचकांनो काळजीपूर्वक अभ्यासा.. युवराज्ञीचा नित्र होता इजिप्शियन. दोघेही Pleasure Drive साठी एका जर्मनींतल्या स्वयंचलित वाहन निर्माण संस्थेनं दच्‌ इंजिन वापरून साकारलेल्या आणि एक ’पियक्कड’ बेल्जियन चालक चालवीत असलेल्या ’कार’ मधून जात असतांना फ़्रेंच बोगद्यांत (French Tunnel) कशालातरी धडकले आणि दोघांच्या हृदयाची धडकन ’विझूविझू’ पावायला लागली. गंमत म्हणजे...खरंतर या मधे गमतीशीर वगैरे म्हणून वर्णन करण जरा जास्तच ’क्रूर’ वगैरे ठरेल, पण दुर्दैवानं ते खरं आहे असं न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षावरून सिद्ध झालं..त्या चालकानं प्यालेली ’वारुणी’ स्कॉट्‌लंड्‌ मधे तयार झालेली होती. त्या दोघांवर’ करडी नजर’ ठेवायला...गुप्तहेरच म्हणाना...इटालियन ’पापाराझ्झीं, जपान मधल्या स्वयंचलित दुचाकी-निर्मिती संस्थेनं कौशल्यपूर्ण बांधणी केलेल्या दुचाकीवरून पाठलाग करीत होते. अपघातग्रस्ततेनंतर, दोघांवरही ऑस्ट्रेलियन शल्यचिकित्सकानं, ब्राझीलि औशधींचा वापर करून उपचार सुरू केले.. पण.. हाय रे दुर्दैवा... असो.. ही माहिती एका मलेशियन्‍६ नागरिकानं अमेरिकेतल्या विख्यांत माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञानं विकसित केलेलं तंत्रज्ञान वापरून संगनकाच्या महाजालांत गोवली.. आणि तुम्ही ज्या संग्णकसंचावर ती पाहात आहांत, ज्यांत तैवानमधे बनविलेल्या Micro-chips वापरलेल्या आहेत, आणि, ज्याचा पडदा (Monotor), कोरियांततला आहे, तो बांगलादेशी कारागिरांनी सिंगापुरमधल्या एका कार्खान्यांत ’विणला’ (विणणे म्हणजे जन्म देणे या अर्थी) आहे. नंतर तो भारतीय, अवजडवाहनचालकांनी त्यांच्या वाहनांतून एका ठिकाणेहून दुसर्‍या ठिकाणी नेत असतांना इंडोनेशियन दरोडेखोरांनी पळवून, व्हिएतनामी कोळ्यांकडून बोटींवर चढविला आहे, ज्या बोटी म्यानमारमधल्या अतिक्रमित, बेकायदा नागरिकांनी पुढे, त्यांच्या वाहनांतून वाहिला आहे. तर मित्रांनो.. याचं नावं वैश्विकता... कळ्ळं ? *****

Saturday, July 14, 2012

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’ ***** येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाउस आला मोठा येग येग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून तान्ह्याला रिझवण्यासाठी मराठी माय, अडगुलं मद्डगुलं बरोबर पावसाची पण आठ्वण काढतेच पण यंदा ही बडबड गाणी बदलून ये ना बाबा पावसा, जीव वाटे जाईसा अंदाज ठरतो खोटा, उगा करत्यांत बोभाटा ये बाई सरी, मडके अर्धे तरी भरी सर भाव खाऊन, बसली कुठं जाऊन ? अशी म्हणायची वेळ आली आहे. एकेकाळी... फार कशाला ? अगदी मागल्या वर्षीसुद्धा आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंग रानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग, ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ प्रत्येक हृदयी ठाकला, वाकला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ ’विका भांडीकुंडी, भाकर घ्या हाती, पोराले शिकवा बापडे हो !’ डेबूजी सांगूनी गेला तरीही ही मानसं आंधळी असी कां हो ? असा असायचा... असो... पण काय गंमत आहे अबाल वृद्धांना वेग वेगळ्या कारणांसाठी पाऊस हवा-नकोसा असतोचं अष्ट नायिकांपैकी कुणी विरहिणी, ऐ सावन तूं इतना ना बरस की वो आना सके और उनके आनेके बाद इतना बरस की वो जा ना सकें अशी दुहेरी विनवणी सुद्धा करायला मागे पुढे पाहात नाही. ऐतिहासिक काळांत कदाचित या ’लहरी राजा’ ला वेसन, तानसेन सारखे गायक घालू शकत असतील कदाचित पण आजकालं ढगांवर रासायनिक फवारणी करतांत म्हणून ’मेघराज’ फिरकतच नाहीत त्याचं काय ? कवि मंडळींचं कवित्व तर पावसावरची एखादी तरी कविता केल्याशिवाय पूर्णत्वाला पोहोचतच नाही पाऊस कुणालाही भुरळ घालतो. अगदी डॉ. वसंतराव पटवर्धन...महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष सुद्धा या मोहांतून सुटले नाहीत. विविध ऋतूंवर त्यांनी लिहिलेल्या गीत-समूहांत, वर्षाऋतूच स्वागत करतांना, अवचित आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, आपल्या सखीला त्यांची गीत-नायिका, मोहरून म्हणते, आला पाउस नव्हे नव्हे ग जिवलग आला घरी अंगांगावर आषाढाच्या, नव्हे सुखाच्या सरी कविकुलगुरु कालिदासाच्या मेघदूताचं भाषांतर, रुपांतर करण्याचा मोहसुद्धा असाच मोठमोठ्या साहित्यिकांना पडला. शेलेनं डोक्यावर घेवून नाचत ’जगांतलं सर्वश्रेष्ठ’ प्रीत महाकाव्य’ म्हणून गौरविलेल्या या महाकाव्याचा नायक एक शापित यक्ष. वैशाखवणव्याच्या काहिलीनं तनाची आणि पत्निविरहानं मनाची लाहीलाही झालेला आणि त्यामुळं मंदमंद झुळुकांच्या शोधात पर्वतारोहन करीत हिंडतांना,त्याला दिसला, विदर्भांतल्या रामटेकच्या नगाधिवरून आपल्याच तंद्रींत, पूर्वोत्तर वाहाणार्‍या मरुत्‌वेगावर स्वार होत, विहरणारा एक पांढरा-भुरा मेघ. त्या मेघांचा हृदयस्थ ओलावा आणि स्वत:च्या विरहव्याकुल अवस्थेंतल्या अश्रुपाताची दखल घेण्याची त्याची क्षमता यामुळच ’आपली व्यथा आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचविण्यासाठी, सांगावा धाडायला हाच दूत योग्य आहे’ याची खात्री त्याला पटली असावी. त्या महाकाव्याच्या पहिल्या कांही श्लोकांच, त्यांच्या ’गीत-मेघ’ या काव्यसमूहांत रूपांतर करतांना, डॉ. वसंतराव पटवर्धन लिहितांत, आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला म्हणुनिया विनवित मेघा तुला बाकीबाब बा.भ. बोरकर तर गोव्याच्या यक्ष भूमींतले, त्यांच्या शब्दाशब्दातून संस्कृतप्रचुर भाषालावण्य मिरवत आशयघन बरसलेले आपण पाहिलेश-ऐकलेले आहेत. पुलंनी १९८० ्मधे फिल्म्‌ इन्स्टिट्यूट्‌च्या कलागारांत, दूरदर्शनसाठी एक मुलाखत घेतली होती कविवर्य बोरकरांची. तींत ’बाकीबाब’ इतके धुंवांधार बरसले की पुलं सारख्या कसलेल्या निवेदक-सूत्रसंचालकालाही, मंचावर कुठं आसरा शोधावा याचा प्रष्ण पडला ! घन बरसे रे घन बरसे.. नं सुरुवात झालेली ही बरसातीची सांगता सरिवर सरी आल्या गं सचैल गोपी न्हाल्या गं असं आपल्याचं तंद्रींत गांत बोरकरांनी केली तशीचं, अण्णा ग.दि.माडगुळकर..बाबूजी अण्णा सुधीर फडके-आशातईंनी अजरानर केलेलं, चार वेगवेगळ्या अंतर्‍यांना वेगवेगळ्या, रागसंगीतावर आधारित स्वररचनेनं सजविलेलं आज अचानक या धरणीवर गरजत यावी वळवाची सर तसे तयाने गावे आज कुणितरी यावे किंवा घनघन माला नभी दाटल्या, कोसळती धारा.. हे चित्रपट गीत किंवा मृच्छकटिक मधे अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येवुनी बिलगति आवेगाने तेचि पुरुष दैवाचे ही स्त्री-लोलूप ’पुरुषी’ आग जागविणारं नाट्यपद, आपण विसरूं शकतो ? दशरथ पुजारी-सुमन कल्याणपुर जोडीचं.. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशांत प्रियाविण उदास वाटे रात हे गीत, किंवा, मंगेश पांडगांवकर-श्रीनिवास खळे-लता मंगेशकर त्रिकुटाचं श्रावणांत घन निळा बरसला रिमझिम रेशिम धारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ह्या रचना शब्दावली, स्वरावली नाहीत नुसत्या तर आपल्या आयुष्यांतल्या कितीतरी नाजुक, भावुक, व्याकूल क्षणांच्या स्नृती ताज्या राखणार्‍या नादावली आहेत. ’कॉफी हाउस‌, कॉफी हाउस‌..प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस’ शांताबाईं शेळक्याकडून, अश्याच कुठल्याशा गप्पांच्या मैफलीत ऐकलेला ’हायकू’...एक जपानी काव्य प्रकार .. ’हायकू’ म्हणजे क्मीत कमी शब्दांत, विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणार्‍या पंक्ती. खरंच, ह्या नियमानं आपलं रोजचं जगण म्हणजे, विविध इंद्रधनुषी रंग घेवून येणार ’कॉफी हाउस्‌’च असतं की... अगदी अंकुरण्यापासून, निर्वाणापर्यंत कितीतरी रंग... सुख दु:खाचे, रागा लोभाचे, मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे... घडण्या बिघडण्याचे, मीलनाचे, ताटातुटीचे, प्रेमाचे, विरहाचे बघणारे डोळे आणि आणि त्यामागची ’नजर’, आणि त्याही मागच्या मनाची, त्या विशिष्ट वेळची धारणा...’Mood' म्हणू हवंतर... यावरचं ठरतं त्या रंगांच गडद किंवा फिकेपण...नाही का ? लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे बिंबाच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे, फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग... दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे, उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग... मग माझ्या एका मैत्रीणीनं, ’मी टीव्हीचे कार्यक्रम बघते’, म्हटलं तर कुठे बिघडतं ? ’काय बघतेस गं परी तू ?’, ’मला ? मला ना, घरांतल्या, माझ्या खोलीच्या खिडकीशी हातांत, स्वत: केलेल्या वाफाळत्या कॉफीचा कप्‌ घेवून बाहेर ’बघतां’ना गडगडणारे ढग, कडाडणार्‍या विजा, श्रावण सरींतून मधेच येणारं आश्वासक ऊन...शाळेंतून परत आल्यावर दूधबीध पिऊन, ओठ फ्रॉकच्या बाहीनं पुसत, शेजारी, पैंजण वाजवत येणारी मिनी...मालकीण घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी, ’मिशू’...कमरेला लवलेला चांदी्च्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येवून, मिनीला हाक मा्रणारी तिची आई...सगळ दिसतं मला अरुण...!’ खिडकींतून, पावसांत खाली हुंदडणारी मुलं दिसतांत तिला, एकदम वर आभाळाकडे बघत, ओरडत नाचायला सुरुवात करतांत ती... ’परी’पण वर ’बघते’... आणि चक्क ’इंद्रधनुष्य’ दिसतं की हो तिला... काय म्हणावं या पोरीला ? तिनं आम्हा, ’डोळस आहोत’ असा भ्रम असणार्‍यांना कधीचं, चारी मुंड्या चीत केलय जगण्याच्या मैदानांत जगण्याच्या तिच्या ’कॉफी हाऊस्‌’मधल तिच ’टेबल्‌’, तिन बरोबर दरवाजा ’दिसेल’ अशा पद्धतीनं, ’अतिथिभिमुख’ निवडलय आणि खुर्चीचा कोन असा साधलाय की येणार्‍या जाणार्‍याचं, प्रसन्न मुद्रेनं स्वागत करताकरता ती, त्यांच्या भावविश्वांत हळूचं दाखल होवून मनांतला आनंदविभोर, प्रसन्न, बरसणारा, कोसळणारा पाऊस.. तो थांबल्यावर घरंग्ळणार्‍या पागोळ्या... सगळ सगळं त्यांच्या अंगावर उधळूं शकेल... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com

Thursday, July 5, 2012

’धाडसी पण आवश्यक..’

’धाडसी पण आवश्यक..’ हिंदुस्थानावर, पूर्व-पश्चिम अशा दोनीही बाजूंनी कुरापती काढत, कायमचं दुखणं बनण्याचे पाकिस्तानचे मनसुबे, ’भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू कांठी ॥’ या संतश्रेष्ठ सुकाराम महारांच्या ओवीप्रमाणे, प्रमाणाबाहेर चालविलेल्या पाकिस्तानच्या माकडचाळ्यांनी त्रस्त होवून तत्कालीन पूर्वपाकिस्तानमधल्या असंतोषाचा अत्यंत चतुरपणे फायदा उठवत, कै. इंदिराजींनी, अक्षरश: उभे चिरले. आंतरराष्टीय स्तरावर खळबळ माजविणारा हा धादसी निर्णय, त्यांच्या इतक्या समर्थपणे कोणी अन्य नेत्याने...पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांशिवाय...घेतला असतां कां ? ह्या विषयी शंकाच वाटते. ९/११ ला अमेरिकेवरील दहशतवाद्यांनी केलेक्ल्या हल्ल्यानंतर, आणि त्यानंतर अफगाणिस्थानवर अमेरिकेनं, अतिरेक्यांना त्यांच्या बिळांतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या तळावर केलेल्या पूर्वादेशित ड्रोन क्षेपणास्त्र हल्यानंतर वैश्विक स्तरावर दहशतवादी आणि अतिरेकी यांची दहशत इतकी वाढली की शांतताप्रिय राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान एकत्रित आणि उघडपणे हे छळसत्र संपविण्यासाठी कटिबद्ध झाले. त्यांतून एखादी महिला राष्ट्रप्रमुख असली तर ती जरा जास्तच आक्रमक असते (कारंण मादीच फक्त आपल्या पिलांच्या संरक्षणाबाबत इतकी कठोर आणि क्रूर होवू शकते) की काय अशी धरणा पक्की करीत, एक जहाल भाषण, एका, सलग दुसर्‍यांदा नवनिर्वाचित राष्ट्रप्रमुखानं केलं. ओह ! क्या बात है ? तिनं हे पुन्हा एकदा सत्यांत उतरवून दाखवलं. ऑस्ट्रेलियानं नाही म्हटलय. दुसर्‍यांदा..हे तिनं खरं करून दाखवलय ! स्वतंच्या कठोर वागणुकीच्या पवित्र्यांतून ती कदापीही मागं हटणार नाहीये ! आणि स्वदेशवासियांच्या ह्क्काबद्दलच्या तिच्या जागरूकतेला दाद द्यायलाच हवी आपण सर्वांनी ! एखादी स्वच्छ, थंडगार वार्‍याची, वेलींवरच्या ताज्या फुलांचा सुगंध लेवून आलेली मंद झुळूक अंगावर सुखद शहारा आणत आणि मनाला आश्वासक सहारा देत प्रसन्न करीत अलवारपणे कळत नकळत, आसमंत व्यापावी तस कांहीसा निर्णय ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री महोदयांनी घेतलाय ! विश्वांतल्या यच्चयावत राष्ट्रांना सध्या अशा पुढार्‍यांची नेत्यांची गरज आहे. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री ज्यूलिया गि्लार्ड्‌. मुस्लिम शरियतप्रमाणे जगू-वागूपाहाणार्‍या नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यांत आलं आहे. कारण कुठल्याही धर्माच्या मूलतत्ववाद्यांच्या अतिरेकी, दहशतवादी कारवाया आणि लाड या पुढं ऑस्ट्रेलिया खपवून घेणार नाही कांहीश्या संतापानंच ज्यूलिया जी, मुस्लिमांवर कडा्डून गरजल्या, ’इथल्या स्थानिक ऑस्ट्रेलियन जनतेच्या ऐवजी: इथं नव्यानं स्थाईक होवू पाहाणार्‍यांनी इथल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे. हे पटत असेल तर गुण्यागोविंदानं राहा नाहीतर चालते व्हा, मुकाट्यानं.. कारण मला कुणा एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक भावना दुखावल्यातर जांत नाहीत ना ? वगैरे बाबींची काळजी करायचा खरंच कंटाळा आला आहे. बालीमधे दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्याकांडानंतर, देशांत राष्ट्रीय भावनेची जणू कांही ’त्सुनामी’ आली आहे.. ,आणि सगळे देशवासीय त्यानं भारावले आणि वेड्यासारखं वागायला लागलेत आहेत. स्वातंत्र्यप्रापतीसाठी, झगडतांना इथल्या स्थानिक अबालवृद्ध युवक-युवतींनी जवळपास दोन शतक पिळवणूक, अत्याचार, दंडेली, स्वातंत्र्यसैनिकांवरचे न्यायासनासमोर उभे राहिलेले खटले आदि संकटांशी सामना करीत पारतंत्र्याच्या बेड्या तोडत महामुश्किलीन मुक्ती मिळवली आहे आणि सांस्कृतिक जडण घडण जपली आहे. आमचा सर्व बोली-लेखी व्यवहार इंग्रजींत चालतो. स्पॅनिश्‌, लेबेनीज्‌, अरेबिक, चायनीज्‌, जपानी, रशियन्‌, किंवा इतर कोणत्याही भाषेंत नाही. बहुतेक ऑस्ट्रेलियन नागरिक देवाच्या अस्तित्वाला मानतांत. ही कांही ख्रिश्चन धर्माची, किंवा राजकीय अथवा परंपरावादी ध्येयांनी प्रेरित चलवळ नाही तर हे एक सत्य आहे. कारण धर्मानं ख्रिश्चनं असणार्य़ा अबालवृद्धांनी उभारलेली आणि ख्रिश्चन धर्माच्या तत्वाधारित अशी ही भूमी, हे राष्ट्र आहे, आणि हे संदर्भाधीन कागदपत्रांमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि अर्थातच माझ्या या राष्ट्रातल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागांवर त्याबाबतचा मजकूर असण हे अगदी स्वाभाविक आहे. कारण ’देव’ हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ’देवा’च्या अस्तित्वावरच्या श्रद्धेबद्दल तुमच्या मनांत आकस असेल तर तुम्ही, ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त या विश्वांतला इतर कुठलाही भाग तुमच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी निवडू शकता. तुमच्या श्र्द्धा, श्र्द्धास्थानं, धर्मगुरूंबद्दल आमचा काखहीही आक्षेप नाही. तसाच तो तुम्हाला आमच्या श्रद्धांबद्दल नसावा आणि आमच्याबरोबर तुम्ही गुण्यागोविंदानं, शांततापूर्वक आपलं आयुष्य इथं व्यतीत करावं ही माफक अपेक्षा आहे. ही आमची भूमी, आमचं राष्ट्रं आणि आमची जीवनशैली आहे, आणि आम्ही या सगळ्याचा पुरेपूर उपभोग धेण्याच्या सर्व वाटा तुम्हाला खुल्या करून देवू. पण तुम्ही जर तक्रार, कुरबूर, नापसंती, असंतोष या पोटी धुमसणार्‍या क्रोधाच्या भरांत, आमचा राष्ट्रध्वज, आम्ही राष्ट्राच्या नावांन घेतलेली आण आणि आमच्या ख्रिश्चन श्रद्धा, श्रद्धेय यांचा अधिक्षेप करण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलांत, तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या स्वातंत्र्याचा आहेर मिळेल...हा देश सोडून जाण्याचं स्वातंत्र्य !! तुम्ही जर इथं सुखी नसाल तर कृपया चालते व्हा. कारण आम्ही तुम्हाला इथं येण्याचं आमंत्रण कधीच दिल नव्हत. तुम्ही तुमच्यास्वत:च्या सुखाच्या शोधांत इथं येण्याचं निश्चित करून आला आहांत हे कायम ध्यानांत ठेवा, तेंव्हा जे राष्ट्र तुम्ही पूर्ण विचारांती निवडलय त्याचा स्वीकार करा. धन्यवाद ! ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्यांच्या या भाषणांतला सूर जरी कांही विशिष्ट दहशतवादी संघटनांविरोधांत असला तरी पिळवणूक आणि पारतंत्र्यातून सुटका करून घेण्यासाठीचा लढा, त्या भावनॆंतून जन्मलेली अतिरेकी प्रवृत्ती आणि सत्तालोलूपता आणि जगावर राज्य करण्याच्या अहंकारी महत्वाकांक्षेपोटी अतिरेकी अत्याचार या मधे फरक करायलाच हवा. आणि हकनाक दहशत माजविणे ही विशेषत: मानव ’जमाती’ची... मग ती कुठल्याही देश-प्रांत-जात-पंथ-धर्माची असो... प्रवृत्ती आहे. महान तत्ववेत्ते, सर बर्ट्रांड्‌ रसेल यांनी बघितलेलं वैश्विक प्रजासत्ताकाचं स्वप्न हे स्वप्नच जोपर्यंत राहील तो पर्यंत असे क्रोधोद्गारांचे उद्रेक होतच राहाणार... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar