Sunday, January 29, 2012

’अक्षर-बाकी’


’अक्षर-बाकी’ भाग १
’पिलांस फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे
आतां आपुली कांचनसंध्या, मेघडंबरी सोनपुटे’
वृद्धत्वाला ’संध्याछाया’ असं उदास संबोधन न देता,  वयोमानानुसार आलेल्या शारीर थकव्यांत सुद्धा, मनाची सोनेरी किनार अबाधित राखण्याचं आवाहन करणारे, ’बाकीबाब’  बाळकृष्ण भगवंत बोरकर हे महाराष्ट्राच्या समृद्ध कविकुलांतले एक अग्रणी...
’जळल्यावाचुन नाही ज्योती, रडल्यावाचुन नाही प्रीती, कढल्यावाचुन नाही मोती
ना घणावाचुनी देवपणा
रे अजून थोडे सोस मना...
प्रसववेदनांविण ना सृष्टी, तपनावाचुन नाही वृष्टी, दु:खाविण ना जीवनदृष्टी
मेल्याविण मिळला स्वर्ग कुणा ?’
अटळ, अबाधित सत्य, कांही वैज्ञानिक, कांही माणसाच्या भावभावनांशी निगडित...दुखर्‍या ,खंतावल्या सामान्यजनांच्या वेदनांवर फुंकर घालतांना बोरकर काय छान उदाहरणं देतांत, बरं ते सुद्धा, त्या पंक्तींमधल्या काव्यात्मकतेला एका वेगळ्या अध्यात्मिक उंचीवर नेत, कुठल्याही ’उपदेश’पर उक्तीचा वास न येवू देता...
तशीच आणखी एक रचना
अखंड प्रीतीची घट्ट वीण, भावस्पर्शी शब्दांतून व्यक्त करतांना बोरकर एक छान दृष्टांत (कांहीश्या वेगळ्या नजरेनं पाहाणार्‍याला, त्याचा अंत:प्रवाह शारीर वाटू शकतो) देतांत, अर्थातच ते ज्या माडापोफळीच्या, सागरतीराच्या स्वप्नभूप्रदेशांत वातावरणांत वाढले, तिथंच क्षणोक्षणी घडणार्‍या भौगोलिक सत्याचा, दिसणार्‍या दृश्याचाच
’विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेल
ओसरल्यावर आपण सजणी अशीच ओलं उरेल
आणि गंमत पाहा हे भरती (भरतं ?) येणं आणि ओसरणं, पृथ्वीच्या निर्मितीपासून अखंड अव्याहत चालू आहे. अतूट प्रेमाच्या वर्णनासाठी यापेक्षा कोणता दृष्टांत आधिक समर्पक असू शकतो ? भरतीचा आवेग खळाळणारा तर ओसरणं ? संथ, सबुरीनं, किनार्‍याच्या कणाकणाला स्पर्श करीत...
बोरकरांच्या कवितेंत अत्युच्च काव्यगुणांबरोबरच भाषेची समृद्धी, प्रभावानं दृष्टोत्पत्तीस येते.
रुसलेल्या प्रिय सखीची समजूत धालणार्‍या प्रेमिकाच्या प्रणयाराधनेंच्या वर्णनपर गीताच्या ध्रुवपदांत, ते
’कशि तुज समजावु सांग
कां ’भामिनि’ धरिसी राग ?’
अशा ओळी ओवतांना सामान्यत: मराठींत सहसा न वापरलं जाणारं, ’भामिनी’ हे संबोधन वापरतांत...
तर...
’गडद निळे गडद निळे जलद भ्ररुनी आले’
मधे, तें बाष्पवृत्त ढगाला, ’मेघ’ असं न म्हणता, संस्कृतोद्भव ’जलद’ हे विशेषणात्मक संबोधन वापरतांत...
कारंण ’मेघ’ श्वेत, जलविरहित असू शकतो, पण ’जलद’ ? अधिक स्पष्टीकरणाची गरज नसावी बहुधा !
गत वर्षी ३० नोव्हेंबरला, गोव्याच्या या शब्दप्रभु सुपुत्राच्या जन्मशताब्दीची सांगता झाली. करंदीकर-बापट-पांडगांवकर यांच्या आधीच्या पिढींतल्या, स्वत:च्या कवितांच सादरीकरण, ’काव्यगायन’ पद्धतीनं करणार्‍या कांही निवडक कवींपैकी एक म्हणजे ’बाकीबाब’ ! लेखांत उल्लेख झालेल्या सर्वच रचना, खरं तर पूर्णपणे वाचाव्या अशाचं आहेत. पण लेखाच्या शब्दमर्यादेंत जमेलं एवढंच लिहितांना, त्या काव्यरसिकांकडून आणि विशेषत: मराठीच्या अभ्यासक तरुण पिढीकडून त्यांचा ’पूर्णास्वाद’ घेतला जाईल ही अशा व्यक्त करतो.
एकेका शब्दाचे प्रचलित पदर उलगडून दाखवतानांच, त्या अर्थांपलीकडचे भाव अनावृत्त करण हेच तर कविजनांच कसब. या माझ्या उक्तीच्या पुष्ट्यार्थ, जाताजाता, बोरकरांच्या, आणखी एका रचनेचा उल्लेख अपरिहार्य आहे...
’जळणार्‍या जळत रहा, जळतो सारेच आम्ही
जळण्याच्या लाख तर्‍हा, राख मात्र जास्त कमी’
आतां या ’लाख तर्‍हा’ कुठल्या ? संपूर्ण कविता वाचा...आणि ’जाणिवे’चा आनंद घ्या.
अशीच आणखी एक कविता, जिचा उल्लेख, ’बाकीबाब’ अभ्यासतांना अपरिहार्य म्हणजे, पत्निविरहाची वेदना परतिबिंबित करणारी ही रचना,
’तू गेल्यावर फिके चांदणे, घर-परसूंही सुने, सुके...
मुले मांजरापरी मुकी अन्‌ दरदोघांच्या मधे धुके...
कविता वाचतावाचता शेवटाला याल आणि थक्क व्हाल...खात्रीनं सांगतो !
ह्या अशा  ’सारस्वतां’च वर्णन एका लेखांत करणं कर्म कठीण. कारण माझा आवाका इतका लहान आणि ही सगळी मंडळी म्हणजे,
’दशांगुळे उरला...’
तेंव्हा उर्वरित ’बाकीशब्द’, पुढील भागांत...
****

’माझ्या दूरस्थ लाडक्यांनो...’
या आपल्या कवितेंत, शिक्षण-व्यवसायानिमित्त, परदेशी स्थलांतरित भारतीयांना, तिथल्या ’सांस्कृतिक’ धोक्यांबाबत सावध करतांना, बोरकर म्हणतांत
’आणि तुमच्या हृदयांतून उसळू दे इतक गंगौदक की, त्यानं पण्यांगनेची पुण्यांगना होवून जावी’
’पण्यांगनेची पुण्यांगना’ अशा, केवळ एका उकारप्रदानांतून, लौकिकार्थानं कंचनी असणार्‍या स्त्रीला, गरती करून टाकण्याचा हा ’चमत्कार’ केवळ बोरकरांसारखे भाषा प्रभुच करू शकतांत...
स्वप्नभूमी गोव्याच्या...
’आमराइतुन गातो कोकिळ, दडून पानां आड...
पुळणीवरती स्पर्धा करिती पिसारलेले माड...’
आपल्या जन्मभू, कर्मभूबद्दल सांगतांना, विशेषत:
’माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या साळीचा रे भात,
वाढे आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात...’
ह्या ओळी गातांना, बोरकर भावविवष होवून सद्गदीत होत असत......
अशा वातावरणांत अंकुरत, आपल्या कल्पनांचा शब्दोत्सव, काव्यसंग्रहांच्या पानापानांतून साजरा करणार्‍या...
कविवर्य ’बाकीबाब’ बा.भ.बोरकरांची,.अशीच, एका ओकाराच्या जागी, उकार ठेवीत वेगळाच आयाम देणारी ही रचना
’विझवून दीप सारे, मी चाललो निजाया...’
या कवितेंत पुढे, एके ठिकाणी ते लिहितांत,
’मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे !...’
’जे न देखे रवी ते देखे कवी’...यासाठी परकाया प्रवेशाची विद्या कवीला निसर्गत:च प्राप्त झालेली असते. मग श्रेष्ठ रचनाकार, ’बाकीबाब’ त्याला अपवाद कसे असतील ? एका ’कोठी’वरच्या नायिकेची वरकरणी ’हसवणूक’ करणारी पण मनाच्या भळभळा वाहणर्‍या जखमेच उदास अस्तर असणारी ही रचना ’बाकीबाबां’चीचं
’विसर म्हणाया कधी तुझे मी स्मरण ठेविले होते ?
दिसल्यावर तू, हसले मी ते, मुळांत होते खोटे...’
योग आणि भोग यांच्या सीमारेषेवर वसलं आहे बहुतेक गोवा,
इथला सगळाच ’माहोल, ज्याला जसा भावेल तसा त्यानं घ्यावा...
पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरबद्ध करून गायलेलं, ’नाहि पुण्याची मोजणी, नाहि पापाची टोचणी’ हे.... काय म्हणूया ?.... ’विलय-समीप’ गीत आठवा...विशेषत: त्यांतला..’आम्हा नाहि नांमरूप, आंम्ही अवकाश स्वरूप’...हा चरण...
आजीनं लहानपणी, स्वरचित श्लोकाला ’बाकी म्हणे’ अशी नाममुद्रा लावल्याबद्दल, व्यक्त केलेल्या नाराजीनंतरची ही उपरती तर ’बाकीबाबां’ना झाली नसावी ना ? कदाचित म्हणूनच ’नाममुद्रे’च्या ठिकाणी ’आम्हां नाहि नामरूप’ वगैरे विश्वामित्री पवित्रा... ?
भावोत्कटता ह्या, काव्याला आवश्यक घटकाबरोबरच ’बाकीबाब’ समृद्ध भाषासंस्कृतीचं दर्शन, अनेकवेळा जागोजागी संस्कृतोद्भव शब्दांचा प्रयोग करून घडवतांत...
गंगौघ, पण्यांगना-पुण्यांगना, जलद, भामिनी...हे कांही वानगीदाखल.
बहुतेक वेळां, पांढरं स्वच्छ, करवत कांठी धोतर, गुडघ्याखालपर्यंत लांबीचा रेशमी झब्बा किंवा कुर्ता, छान तेल लावून मागे वळविलेला भरपूर केशसंभार, चेहेर्‍यावर कायम एक मिश्किलपणाकडं झुकणारं स्मितहास्य असं उमदं व्यक्तिमत्व होतं कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचं...बहुतेक वेळा. उजव्या हाताच्या. तर्जनी आणि मघ्यमा यामधे, तर कधी करांगुली आणि अनामिका यामधे विराजमान, धूम्रकांड...म्हणजे अर्थातच सिगारेट्‌...असायचीच...उंची मेक्‌ची ...
गोवा म्हणजे रुपेरी वाळूच्या पुळणी, समोरच्या तळ्यांत प्रतिबिंबित होणारी   मंदिरांची गोपुरं, उन्हाळ्यांत रंध्रारंध्रांतून, दमट उष्म्यामुळे उसळणार्‍या स्वेदधारा आणि पावसाळ्यांत, अक्षरश: कोसळणार्‍या पर्जन्यधारा...
ऐन पावसाळ्याच्या तॊंडावर, दूर क्षितिजावर समुद्राशी सलगी करू पाहाणार्‍या, कृष्णमेघांच्या पंक्तींच ’ओथंबलेपण’ न्याहाळतांना ’बाकीबाब’ सहजच लिहून जातांत...
’समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पांचवा महिना’
अशा मेघाच्छादित, हुरहुर लावणार्‍या वातावरणांत, ’बाकीबाबां’च्या चित्तवृत्ती सजग होवून ते उत्स्फूर्तपणे गायला लागतांत
’गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले’
लाहीलाही झालेल्या तना-मनांबरोबरच, आसुसल्या भूमीला सचैल स्नान घडवून तृप्त करून, मग अनेक वाटांनी पागोळणार्‍या ओघळणार्‍या, खळखळणार्‍या, झुळझुळणार्‍या, वाचलेल्या, साचलेल्या, उरलेल्या, मुरलेल्या, धावणार्‍या, बावणार्‍या अशा या, पाण्याची विविधरूपं, बोरकरांनी आपल्या शब्दरंगांनी चितारली आहेत.
आणि मग श्रावणांतला ऊन-पावसाचा खेळ...’साळीच्या बालकां’ना सुखावणारा, खुलविणारा, हसविणारा...त्याचं हे वर्णन आणखी एका प्रसन्न रचनेंतलं...
इकी अलंकृत कविता आहे की परतपरत वाचावीशी वाटेल तुम्हाला...
’फारा दिवसांनी आज, उन्हे सोनियाची आली...
चिंब साळिची बालके उब पीऊनीया धाली...
गोव्यासारख्या प्रदेशांत मानसिक जडण घडण आणि वैचारिक उपज झालेले कविवर्य बोरकर, आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यावर, आपल्या कवितांम्धून झोके घेतांना वारंवार जाणवतांत...
अशाच एका, विरक्त मनस्थितींतल्या, बोरकरांनी लिहिलेल्या एका कवितेचं गीत रूप, ...
’आतां माझ्या व्यथा-कथा कुणा न येती जाणता..
वृथा त्यांना का दूषण, ना ये मला न सांगता...’
****
अरुण काकतकर.




Thursday, January 26, 2012

शुद्ध-लेखना आधी शुद्धोच्चार


शालेय-स्तरापासून, आपल्या सगळ्यांच्याच मनावर शिक्षकांकडुन, लेखनाच्या सरावाच्यावेळी ’शुद्धलेखना बद्दल जेवढा अग्रह ध्रला जातो, तेवढाच तो शब्दांच्या ’शुद्धोच्चाराबद्दलही धरला जातो की नाही हे मला माहीत नाही. पन लेखन शुद्ध होण्या/असण्यासाठी, शब्दांचे, शुद्ध स्वरूपांतले उच्चार माहिती असणं आवश्यक आहे. आणि आजकाल अशा ’शुद्धोच्चार’ जाणणार्‍या आणि शिकविणार्‍या शिक्षकांचीच वानवा आहे.
उदाहरणार्थ..संधी’चं अनेकवचन ’संधी’ असच होतं,,,’संध्या’ नाही...’गांधी’ म्हणजे माशी किंवा कीटक चावल्यावर उठते ’ती’ किंवा ’त्या’ ’गांधी’च...त्यांच अनेकवचन ’गांध्या’ नाही होत... तसच पाणी आणि पाणि.. ’कृष्ण किंवा विष्णू’चक्रपाणी’ नसून तो ’चक्रपाणि’ आहे...कारण ’पाणी’ म्हणजे जल, उदक, नीर किंवा H2O अशी रासायनिक संज्ञा... तर ’पाणि’ म्हनजे हात, कर...म्हणून ज्याच्या हातांत ’चक्र’ आहे तो ’चक्रपाणि’...... तसंच दुसरा-दूसरा...तिसरा-तीसरा या उच्चारांतला फरक. हा सगळा वाहिन्यां,रोज माथी मारीत असलेल्या हिंदीचा प्रभाव, मला मदतच्या ऐवजी माझी मदत अशी अशी अनेक उदाहरण देतां येतील. परंपरा, इतिहास, व्यवसाय या शब्दांच विशेषणरूपं, पारंपरिक, ऐतिहासिक, व्यावहारिक...पहिल्या अक्षराला ’अ’ चा जोड, तिसरं अक्षर तसच्यातसं आणि चौथ्या अक्षराचा ’इ’ कार (म्हणजे ’र्‍ह्स्व’) हा सर्वसाधारण नियम इथं दिसतो. तसच नांव आणि नाव...नांव म्हणजे नाम, संबोधन...या मधे ’ना’चा उच्चार सानुनासिक हवा. तो तसा नसेल तर त्याची होईल ’होडी’,किंवा ’तर’..
हृषीकेश हे नांव सामान्यत: आणि विशेषेकरून वाहिन्यांवर कायम ’ऋषिकेश’ असं लिहिलं जातं कारण ’हृ’चा उच्चारच माहिती नसतो...आणि त्यावर कडी म्हनजे ’ऋ’चा उच्चार ’रु’ असाच चुकीचा शिकविला गेल्यामुळे मुळांतले सगळे ’ऋषि’ ’ऋचा’ ’ऋग्वेद’, ’रुषी’ ’रुचा’ ’रुग्वेद’ असे लिहिले गेलेले मी अनेकवेळा व्यथित होवून पाहिले आहेत... तसंच, ’सूचना’...मराठी मायबोली म्हणून मिरविणार्‍या मराठी अधिकार्‍यांच्या उच्चारांत...आणि ते सुद्धा विशेषत: ’शिक्षण’ विभागाच्या अधिकारीवर्गाकडून, या शब्दाचं उच्चारण ’सुचना’ असं चुकीच झालेल, आणि ,ग्रामीण विभागांतल्या जिल्हा परिषदांच्या शाळांपासून ते अगदी त्या विभागाच्या मुख्यालयांत सुद्धा फलकावर ’लिखित’ स्वरूपांत, तीच चूक मी वर्षानुवर्ष पाहात-ऐकत आलो आहे. तसच ’सूत्रधार’ परीक्षक’ प्रतीक्षा’ निरीक्षक’ हे शब्द बहुतेक वेळा इकार,उकार र्‍हस्व करून लिहिले जातांत. वाहिन्यांवर, आरेखन विभागांत, मराठीचं ज्ञान असणार्‍यांची वानवा असते...आणि अभ्यासक-संशोधकांनी, वर्षानुवर्ष काम करून साकारलेला मराठी ’शब्दकोश’ जवळ बाळगण्याच्या मानसिकतेचा अभाव असतो...शब्दकोशांत मंजुषा आणि मंजूषा तसंच मनिषा आणि मनिषा दोनीही मान्यताप्राप्त आहेत. पण ’सूत’ च ’सुत’ झालं की, ’धाग्या’चा ’पुत्र’ होतो ना ! गंमत म्हणून ’शब्दकोशां’तून ’कोश’ आणि ’कोष’ यामधला फरक जाणून घ्या.
भाषा-शुद्धतेचं भान राखण्यासाठी (किंवा भरकटलेल्यांना भानावर आणण्यासाठी) जसा ’शब्दकोशा’चा उपयोग आहे तसाच तो अधूनमधून चाळणे हासुद्धा एक उपयुक्त ’विरंगुळा ठरूं शकतो
अनुस्वारांचा उपयोग, अंत्याक्षराचं ’पूर्णोच्चारित्व’ अधोरेखित करण्यासाठीच असतो. उदाहरणार्थ अमुक अमुक ’होतं’(भूतकाळ) आणि अमुक अमुक ’होत’(सद्यस्थितिदर्शक), ’उच्चारणं’ आणि ’उच्चारण’, ’कारण’ म्हणजे एक आणि ’कारणं’ म्हणजे अनेक...
सहस्र, स्रोत हे शब्द बहुतेक वेळा त्यांत एका ’आगंतुक’, ’अनावश्यक’ ’त’ची जोड देवून ’सहस्त्र’ स्त्रोत’ असे चुकीचे लिहिले जातांत...कारण तेच...मुळांत त्या शब्दांचा उच्चारच माहिती नसतो... संस्कृत मधल्या अनेक ’इ’कारान्त उच्चारांना ’ई’कारान्त होण्याची मान्यता मराठी व्याकरणकारांनी दिली आहे...उदाहरणार्थ ’कवि’चा मराठींत ’कवी’, स्वीकारार्ह झाला आहे
दिवा, दिवाळी जसे बरोबर तसेच दीप, दीपावली, दीप्ती हे शब्द लिहितांना ’दीर्घत्वाचं भान राखायला हवं ! ’महत्त्व’ ’महत्व’ असा लिहिण हे चूक आहे.
इंग्रजीमधे लिखित अक्षरं, अनेक शब्दांमधे उच्चारांत लुप्त करण्याची पद्धत आहे...म्हणजे ’Spelling' आणि उच्चार यांत खूपच तफावत असते...उदाहरणार्थ...'Schedule' ’Scintiletting' Lieutinent' ’'Psycology' उच्चारणांत ’शेड्यूल्‌’ ’सिंटिलेटिंग्‌’ ’लेफ्ट्नंट्‌’ ’साय्‌कॉलॉजी’ होतांत. ’Colonel'चा उच्चर ’कर्नल्‌’ कां ? याच उत्तर कुणी इंग्रजीचे व्यासंगी ’पंडित’च देवू शकतील.
तसंच, इंग्रजींतसुद्धा, र्‍हस्व-दीर्घोच्चार योग्य केले नाहीत तर अर्थ बदलतो. उदाहरणार्थ, Kill, Keel (मारणे, जहाजाचा कणा)..Pill, Peel (औषधाची गोळी, सोलणे)..Mill, Meal(गिरणी, जेवण)..Fill, Feel (भरणे, स्पर्श करणे किंवा जाणवणे)
म्हनजे भाषेची शुद्धता राखण्यासाठी लेखनाआधी उच्चार व्यवस्थित आणि शुद्ध-स्वरूपांत होतील याची कालजी आवश्यक आणि अनिवार्य आहे..
*****
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com