Sunday, October 19, 2014

।।भासबोध।। ३०८ ते ३५०

।। दास-वाणी ।। ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/३१ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जरी काही कारणाने षोडशोपचार यथासांग पूजाविधी करता आला नाही तरी त्याची खंत न बाळगता मानसपूजा सुरू करावी. परमेश्वर सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्यामुळे आपण मनानेच कल्पना करून वाहिलेली पाने, फुले, फळे, गंध, अक्षता थेट त्याच्यापर्यंत पोहोचतातच. फक्त आपल्या मनात तो उत्कट अर्चनभक्तीचा भाव मात्र असावा. रामकृष्ण परमहंस कालीमातेची मानसपूजा नेहमीच करायचे. जर असशी सर्वव्यापी सर्वसाक्षी । उद्योग सोडोनि अबाल-वृध्दासी । मग वारी कां बा करविशी । फुका, कष्टप्रद ?।। ३०८ मनोमनी वेधतो आम्ही । सतर्क राहोनि दिशा दाही । उपजीविकेची साधने कांही । त्यासि संबोधा परमेश्वर ।। ३०९ प्रार्थना पूजेचे काय काज ? उदरभरणां घास रोज ?। आणि रात्री निवांत नीज ?। अट्टाहास त्याकारणेचि ना ?।। ३१० प्रांत:काळी छकुल्याचे हसू । वयस्कांचा सावरी स्पर्शू । अस्तुरिचा लाडिक कटाक्षू । लाभता सगळे पावते ।। ३११ क्षणोक्षणी पाठोपाठ । तिन्ही त्रिकाळ उपदेशाचे लोट । त्याने कां भरते पोटं । भस्मपट्टेधारींनो ।। ३१२ हातांत नाही घेत झोळी । वा पंचपात्र-पळी । कर्मोत्तरीच मिळते पोळी । आम्हासारख्यांना जगी ।। ३१३ कां दवडता उगा वाफ । म्हणतां 'वारितो आम्ही पाप !'। पडता पोळीवर अनासाय तूप । होता क्षणार्धांत अदृश्य ।। ३१४ जोडोनि दोन हस्तक । तुकवोनि एक मस्तक । समस्त आम्ही सांसारिक । विनम्र असतो सदा ।। ३१५ हे लिहीलं कोणीही, लिहावे । अंत:करण मथुनि व्यक्त व्हावे । धगधगते शब्द 'ओवीं'त जावे । मोकळणे हेतू ।। ३१६ ।। दास-वाणी ।। आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेता जीवें । देवहि त्रासे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१३ त्या एका परमेश्वराशिवाय कोणीही संकटातून मला वाचवू शकणार नाही अशी ठाम श्रद्धा म्हणजे अनन्यभाव. तो असला की आपोआप योग्य तो मार्ग दिसतोच. आपल्या निष्ठा जर बदलत राहिल्या, अनन्यभाव ढळला तर आपल्याच देहात वास्तव्यात असणारा आत्मदेवही त्रासून जातो. आतून येणारे स्फुरण थांबते आणि कार्यही बिघडते. माहीत असोनि हे सारे । कां कष्टविती शरीरे । माय-बाप, अस्तुरी, पोरे । सुखवा ! 'देव' जाणा तिथेचं ।। ३१७ विचार आप्त-स्वकीयांचा प्रथम । विस्तारलेला कल्पद्रुम । देवोनि वात्सल्य-ममता प्रेम, । जोपासला जो आपणचि ।। ३१८ देव जर असला सर्व ठाई । आप्तांमधे तो कां नाही ?। सोडून पळण्याची घाई । भोगोत्तरि कां संतांना ?।। ३१९ ना मी रुजवू पाहातो विषवल्ली । माझी प्रामाणिक ही 'काका'वली । सद्भाव, निष्ठेने सरसावली । निर्मूलण्या अंधविश्वास ।। ३२० ।। दास-वाणी ।। शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे तें येथार्थ । परी आपण मिथ्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/१०/१ ९ एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी शब्द आवश्यकच असतात. त्या वर्णनातून वस्तू समजली की शब्दांचे महत्व संपले. शब्दांनी सांगितले ते यथार्थ असल्यामुळेच जरी आकलन झाले तरी निव्वळ शब्द हे मिथ्याच मानावे कारण त्या वस्तूवर्णनापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. जिचे वर्णन शब्दांनी केले गेले ती मूळ वस्तूच सत्य मानावी. इथे वस्तू हा शब्द परब्रह्म या अर्थाने घेतल्यास उलगडा अधिक स्पष्ट होईल. डोळसांसाठी प्रतिमेचा ठसा । मेधा सहजचि रुजविते सहसा । श्रवणे वेधलेला शब्दार्थ योग्यसा । ताड़ून पाहते तर्काने ।। ३२१ केवळ प्रतिमा वा शब्द । वा वेगळा ठेवला अर्थ । जर तर्क ताडण्या असमर्थ । फोल ठरतो प्रयास ।। ३२२ भाषांमध्ये शब्द समानार्थी । उच्चार, लिपीरूपे विविध धारिती । प्रतिमेशि परि एकवटती । केवळ तर्कबळाने ।। ३२३ तर्काविना तथ्यहीन । भाषण, उच्चारण, लेखनं । असंबध्द, बेलगाम,बेभानं । केवळ जाणा 'नाद' तो ।। ३२४ ।। दास-वाणी ।। सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासारविचारें । संतसंगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०६/५५ साधनेची सुरूवात मूर्ती, प्रतिक किंवा चिन्ह डोळयासमोर ठेऊन होते. चर्मचक्षू ते पाहू शकतात म्हणून मन एकाग्र होते. पुढे सद् गुरू, संतकृपेने ज्ञानचक्षू उघडले की साकार समोर नसले तरी निर्गुण परब्रह्मावर लक्ष केंद्रित होते. सार म्हणजे काय जपावे, असार म्हणजे काय टाकून द्यावे हा विचार पक्का होत जातो. देवशोधन दशकात मुख्य देव संतसंगानेच मिळतो हे सांगताहेत. डोळे मिटता विवंचना । समोर ठाकती संकटे नाना । त्या गर्दींत 'देव' गणां । स्थान कैसे लाभावे ?।। ३२५ अंतर्यामी विविधांच्या मूर्ति भिन्न । प्रेमिका, चंडिका, परिचारिका ! वयास अनुसरून । प्रत्यक्षावे कि भग्नावे स्वप्न । अवलंबे इप्सितावरी ।। ३२६ ।। दास-वाणी ।। भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद् गुरू जाणावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/११ भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. गो म्हणजे गाय परब्रह्माचे प्रतीक. वत्स म्हणजे संसारात अडकलेला जीव. प्रपंचरूपी वाघाने मनुष्यावर उडी घालून त्याची परमेश्वरापासून केलेली ताटातूट जो थांबवतो आणि जीवब्रह्माचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करतो तो सद् गुरू ! थोडक्यात सामान्य प्रापंचिकाला जो परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद् गुरू होय. कां करता बा ताटातुट । ब्रह्मभेटी साठी आटापिट । सुखदु:खांशी भव भेट । होता आम्ही समाधानी ।। ३२७ नका होवू कल्याणकारी । तोडून आम्हा विविधपरी । जिवाभावाच्या संसारी । पोरके करण्या सरसावू नका ।। ३२८ नका होवू कराल दैत्य । तुम्हा जरी 'ब्रह्म' सत्य । ना संसार, आप्त, अपत्य । म्हणोनि हेवा करू नका ।। ३२९ तरुणहो वेळच्या वेळी । भोगसुखे, मिळवा सगळी । काळ पळतो न देता हाळी । अन्यथा उरते विदग्धता ।। ३३० ग्रंथ वाचणे, अभ्यासणे । आशयांत न गुंतोनि जाणे । रुचेल, रुजेल ऐसे निवडणे । श्रेयस्कर ।। ३३१ निरुद्योग्यांशी अध्यात्म । भजनि लागा सोडोनि काम । नसल्या 'देव' 'मोक्षा'चा नित्यनेम । व्यसनांचे हे व्यपारी ।। ३३२ म्हणती ठेवा दक्षिणा । फळे-फुले मिष्टान्न आणा । मग दावीन चमत्कार नाना । ऐसे लोभी हे 'महाराज' ।। ३३३ सावध राहा ऐशांपासुनी । लाथाडा फोलपट त्याची वाणी । उधळा, जाळा काळी करणी । म्हणा, ' जा मोक्षाप्रती !' ।। ३३४ ।। दास-वाणी ।। जे जे रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडली गळां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२४ शिष्याला जे आवडेल तेच गुरू करतो. त्याच्या लहरीप्रमाणे वागु देतो. शिष्य साफ चुकला तरी त्याला योग्य ती समज देण्याऐवजी त्याचीच मनधरणी करतो असा लाचार गुरू. आश्रमाचा खर्चच मुळी श्रीमंत शिष्य भागवत असतो ना . इलाज नाही कामनारूप पापिणी गळयात पडलेला हा भोंदू गुरू कोणाला मोक्ष मिळवून देणार कोण जाणे ? ऐसे माजले 'शिक्षण सम्राट' । भोवती गोडवे गाणारे भाट । गुणी, बुध्दिवंताने त्यांतुनी वाट । शोधावी कैसी ? सांगा बरें !।। ३३५ परीक्षा देती शिक्षकगण । सोडविती शिष्यांचे प्रष्ण । ऐसे 'आनंददायी' शिक्षण । म्हणे, 'प्रगती योग्य' साधेल ।। ३३६ कांही महाभाग 'सम्राट । स्वशिष्येशि लाविती पाट । यथेच्छ भोगोनि सोडिती मोकाट । अश्रू मुकाट ढाळावया ।। ३३७ सगळिच माजली बजबजपुरी । धन-संपत्ती वोपरून सत्ताधारी । तडस लागेस्तो मिष्टान्न-पुरी । म्हणती 'चाटा उत्सर्जित !' ।। ३३८ ।। दास-वाणी ।। तैसे आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तरीं सामग्री पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/११ साधना करता करता गुरूकृपेने परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान झाले तरी आत्मबोधावर स्थिर होण्यासाठी साधना सुरूच ठेवावी. साधनाक्रमही तोच असावा. बदल करू नये. कितीही तुडंब जेवलो तरी संध्याकाळ साठी जसा शिधा तयार ठेवावाच लागतो तसच ज्ञानोत्तर साधनेचे आहे. आता पुरे असे कधीच म्हणता येत नाही. 'पुरे पुरे आतां' नये म्हणू । नुरे नुरे होतं नाही ज्ञानाचा घनु । खरे खरे भेटतां शिष्यवरु । उचंबळे गुरुहृदय ।। ३३९ जैसे जिरते ज्ञानामृत । बौध्दिक कृती तीक्ष्ण होतं । नीर-क्षीर विवेके सुकृत । घडविते आपोआप ।। ३४० ।। दास-वाणी ।। सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४९ जो दुश्चित्त नाही म्हणजेच अत्यंत सावध आहे, विशेष प्रयत्नांचे सातत्य ज्याच्यामधे भिनलय, चिंतन मनन करू शकणारी बुद्धी म्हणजे प्रज्ञा अंगभूतच आहे आणि परमेश्वराविषयी अपार श्रद्धा आहे तो सत् शिष्य ! अशा शिष्याला साधनेचे फार कष्ट पडत नाहीत किंवा पडले तरी ते बिलकुल जाणवत नाहीत. ।। दास-वाणी ।। तया स्वानमुखीं परमान्न । की मर्कटास सिंहासन । तैसें विषयाशक्तां ज्ञान । जिरेल कैचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/६२ मेधा, प्रज्ञा, तर्कशक्ती । बुध्दीची आभूषणे असती । वर्धमान ती होता प्रगती । कृतिमधे दृश्यमान।। ३४१ विना योगे यांच्या होडी । भवसागरांत करते कोंडी । शीड, वल्ह्याविना नावाडी । हताश जैसा ।। ३४२ अरुणी वा एकलव्या । अदृश्य गुरु, देतो छाया । दक्षिणापेक्षा केवळ परीक्षाया । निष्ठा, साधना स्थिर मति ।। ३४३ कुत्र्याला पंचपक्वान्ने भरवली, माकडाला राजसिंहासनावर बसवला तर जो परिणाम होईल तीच गोष्ट एखाद्या दैनंदिन सुखविलासात लोळत असलेल्या शिष्याला आत्मज्ञान शिकवायला गेले तर होईल. अनधिकारी शिष्याला ब्रह्मज्ञान आवडणारही नाही अन् पचणारही नाही. श्वान, मर्कट, कुशिष्य जरी । मिष्टान्न, सुकृताची आंस धरी । स्वप्नांची आव्हाने त्यांच्या स्वीकारी । तोचि खरा गुरू ।। ३४४ जीव सगळे सारखेचि ना ? मग कां हेटाळता सर्वदा त्यांना ? प्रलोभना तुम्हि कधीच ना । शरण गेला ?।। ३४५ ब्रह्मचा-या विषयभोग । पंगूसि शारीर आवेग । अवकाशी उल्केशि पतनयोग । निसर्गदत्त, स्वाभाविक ।। ३४६ विकाराविना जीवमात्र । जगण्या असतो सत्पात्र ?। सत्प्रवृत्तीचा अवलंबुनी वेत्र । दुष्कृत्य वारी तो भला ।। ३४७ ओसाडावर फुलवी मळा । त्यां वंदावे कृषिवलां । खडक, तणास कधी न भ्याला । कार्यप्रवण एकाग्र ।। ३४८ 'हा असा, तो तसा' म्हणती । कार्यपरावृत्त सदैव होती । वृथा कालापव्यय करिती । जाणा तें बाष्कळ ।। ३४९ आखुनी वेळीच कार्यकक्षा । लाभार्थींच्या रास्त अपेक्षा । पूर्ततेसाठी करिति दुर्लक्षा । संकटांकडे ! कर्मयोगी खरे ।। ३५०

No comments:

Post a Comment