Wednesday, October 19, 2016

।।ठोसबोध।। २००१ ते ४०००

(१८-१०-२०१६) ************* अध्याय सातवा: *********** अंगडे नाही बेतलेले । लक्ष नाही ठरलेले । फुगे, शब्द भारले-भरलेले । फुटतील, नको चिंता !।। २००१ तोटी जुनाट गळणारचि । काठी पोखरली मोडणारचि । वाटी छिद्रांकित बुडणारचि । जळांत, भरतां घटिका ।। २००२ एकदा कां उघडली ताटी । परतून नाही भेटी गांठी । शिज-सजवलेला पिंड पोटी । कावळ्याच्या भुकेल्या ।। २००३ जे जे कांही दडपले जाते । ते ते उसळुनी ऊर्ध्वगामी होते । एकवटोनि बल, गिळूं पाहाते । अनाचाऱ्यासि ।। २००४ हे तर घटित, वैश्विक सत्य । हा इतिहास, बखरबंद, अमर्त्य । ऐल क्रांतिदूत, पैल अनाचारी दैत्य । देशोदेशी ।। २००५ मनुष्यत्वास देता हाळी । अवतरते चित्कार वा किंकाळी । शास्ते बहुधा घेतांत बळी । मागतां न्याय ।। २००६ धडा, तरीही ते नाहीच घेत । जनक्षोभाच्या क्रांतियज्ञांत । आपुल्याच पायी चालतं । जाती, कृतघ्न, क्रूरकर्में ।। २००७ परतुनी निर्लज्ज लांगूलचालन । दावोनि 'रामराज्य' प्रलोभनं । भाबड्या, गरिबांसि 'चारोनि' धन । गैरव्यापार 'रावण' करिती ।। २००८ अत्याचारी, अमानुष धर्म(?)सत्ता । श्रध्देयांस करोनि निमित्ता । तुडवीत, होरपळल्या प्रेतां । साजरे करिते सोहाळे ।। २००९ ज्याने आळविला विरोधी सूर । त्यांसि ठेचोनी फाडती असुर । माना चिरण्या सदा तत्पर । सिध्द सदा हे 'अहिंसक' ।। २०१० कांही अनुदानित हिंडती नागडे । मिष्टान्न वोरपोनी 'सजविती' आखांडे । कांहींना चिंता 'तोकड्यां'ची पडे । प्रस्थापिती 'लांबी' ।। २०११ फसवी, बेगडी अहिंसांकित ममता । सोडा ! बाणवा असिधाराव्रता । उच्चारणी-आचरणी दिसूंद्या कटुता । धर्मकांडांप्रती ।। २०१२ गुडघे, पोटऱ्या झाकोनि साधेल काय ?। मिळेल अन्न, वस्त्र निवारा, न्याय ?। भाबड्यांचे खोल गर्तेंत पाय । ओढणे धर्मांधानी, थांबेल ?।। २०१३ बोचऱ्या थंडीची पहांट । माध्यान्ही उष्म्याशी गांठ । सांजेला हुरहुरिची सोबत । प्रतिके जिण्याची ?।। २०१४ कोणा कघी कां हे टळेल ?। वेळीच जाणवेल, उमगेल ?। भाकरीसाठी जो कष्टवेल । सांसारिक, त्यांसि ?।। २०१५ वर पाहेल कोणी जर डोके काढूं । वायफळ धर्मकांडाचे बुरखे फाडूं । भोसकून वा 'गोळी'ने रक्त सावडूं । भर चौकांत बघतील ।। २०१६ अशी व्यवस्था देशांतर्गत । सेना सीमेवर जरी झुंजतं । अस्तनींतले हे भयावह भूत । निपटण्या उपायो काय ?।। २०१७ 'कां शाब्दीक चिडचिड । याची ? तोडून बांधा गाठोडं । यांचं ! फेका वेशी पल्याड । गिधाडा' म्हणतील, 'भक्ष!' ।। २०१८ कुणि धर्मवेडा अतिरेकी । मरण माझे लावेल सार्थकी ?। उरलेसुरले जिणे बाकीं । संपवोनि, मिरवेल ?।। २०१९ क्षुल्लक फालतूं बाबींची कुरणें । चर्चेत चघळण्या विषय निष्कारणे । कष्टकऱ्यांचे अवधान भंगविणे । खेळ ढोंगी, स्वार्थी नेत्यांचा ।।२०२० एका झाकोनी दुसऱ्यांस काढाल । चेहेरे भिन्न परि मोहरे जुळतील । फुंकर मारीत कुरतडतील । मूषकासारिखे ।। २०२१ लेउनी परिटघडीचे पोषाख । सेवोनि बदाम, बेदाणे, खारीक । कोट्यवधी चुरगाळिंत शासकं । सहजी गाळंतील नक्राश्रू ।। २०२२ भाबडे भोळे जाणतील चौर्य ?। मुखवट्यामागचें वाचतिल क्रौर्य ?। छपविलेले दिसेल कां ऐश्वर्य । त्यांच्या 'करां'तून लुटलेले ?।। २०२३ धूळ अकारण उठविणे, फेकणे । त्रस्त जनांस वा दावोनि प्रलोभने । दिवास्वप्नांची भूल पाडणे । गारुड सत्तालोलुपांचे ।। २०२४ धूळ ! कधि गुलालरंगी, उत्सवांत। धूळ ! कधि बुक्का वारी, पालखींत । धूळ ! कधि आश्वासनांच्या कोंदणांत । 'नाम'धारी जडविती ।। २०२५ श्रध्दा असावी कर्मयोगांत । श्रध्दा असावी परिणितींत । श्रध्दा असावी सुखविण्यांत । गणगोतं, आप्तस्वकीय ।।२०२६ जनक्षोभा कारणे अनेक । शमेना तृषा न भागे भूक । म्हणोनि घेवोनि सुरक्षा रक्षक । हिंडती शास्ते ।। २०२७ प्रभांत, माध्यान्ह, सांजेनंतर निशा । आय, व्यय, अतिचारोत्तर हताशा । जगण्यातल्या विविध दशा । हरेकास भेटती ।। २०२८ बदल्या, मोजण्या, दाखले देणे । गुन्हे बेदखल करणे, अनुदाने । भ्रष्ट मुद्रासंचयाची कुरणे । पदाधिकारी, शास्त्यांना ।। २०२९ 'पक्ष्यां'चे थवे वेगळाले जरी । चोचींची घाव सारखेच, अघोरी । टोच खाउनी परतती घरी । अनुयायी ! दाविता विरोध ।। २०३० अनुयायांची ही ऐसी कथा । कस्पटासमान सामान्य जनता । उठता भेदात सांगण्या व्यथा । मुस्कटदाबी ठरलेली ।। २०३१ याचि कारणे पदरी गुंड । ठेविती, दडपण्या बंड । सत्ताप्राप्त्योत्तर स्रवतो मद । गजगंडासम, बेफाम ।। २०३२ कष्टोत्तरी प्राप्त विहित मुद्रा । केवळ, आश्वासते सुखनिद्रा । भयावह स्वप्न, भास नि अभद्रा । ठेविते दूर ।। २०३३ कधी कशीही पलटते बाजी । आजी क्षणांत होता माजी । 'पुख्यापरीस भाकर-भाजी । बरी बां !' ढोंगी वदतील ।। २०३४ दावितील 'चांगल्याची' प्रलोभने । वळवू पाहातील भाबडी अवधाने । सत्यांत उतरतां वांछित स्वप्ने । फिरवितील पाठ ।। २०३५ 'येतील, आलें पाहा अच्छे दिन' । भाबडे बिचारे वेडावती दीन । चरचरत्या जखमेवर लवण । झोंबते, भान येतां ।। २०३६ कदाचित असेन कां मी कोल्हा ?। इप्सित विरहाने घायाळ झालेला । धनिक सत्ताधाऱ्यांचा पाहून तोंडवळा । करितो नैराश्यवमन ?।। २०३७ भय ! ज्वाळेस विझण्याचे । भय ! वायूस विंझण्याचे । भय ! जळास आटण्याचे । अवकाशास कोणते भय ?।। २०३८ भय ! तरूस वठण्याचे । भय ! पर्णास गळण्याचे ! भय ! पुष्पास कोमेजण्याचे ! कंटकासि कोणते भय ?।। २०३९ भय ! पृथेस भ्रंशाचे । भय ! मनास दंशाचे । भय ! ज्वरास अंशांचे । रक्षेस कोणते भय ?।। २०४० भय ! वसन ढळण्याचे । भय ! श्वसन खंडाचे । भय ! व्यसन वृध्दीचे । निराकारास कोणते भय ।। २०४१ भय ! पथास वळणाचे । भय ! मतीस चळण्याचे । भय ! गतीस खिळण्याचे । अधांतरास कोणते भय ?।। २०४२ भय ! भंगण्याचे प्रीतीला । भय ! मोडण्याचे रीतीला । भय ! डागण्याचे कीर्तीला । सुकृतास कोणते भय ।। २०४३ घनांस झालर सोन्याची । निशेवर पांखर चांदण्याची । लाटेस किनार पुळणीची । सजविते ।। २०४४ क्षण कांही दिवसाकाठी । क्षण कांही उकलण्या गाठीं । क्षण कांही स्वत:साठी । राखावे निवांत ।। २०४५ क्षण व्यापतो मनास । क्षण पळवितो काळास । क्षण उजळतो सईंस । कधीकधी एखादा ।। २०४६ शिबिरांत दक्ष 'लक्ष' दाते । उदयांस आणिती नवे 'नेते' । संस्कारांचे विस्मरण होते । लगोलग, मिळता 'अधिकार' ।। २०४७ कार्यकर्ता प्रामाणिक भला । फसतो 'नेत्या'च्या हाकेला । फासतो काळे सुकृताला । आजवरच्या ।। २०४८ ओठांस तांबूलावकळा । भाळी भगवा वा निळा । लावून 'सोइस्कर' टिळा । बोकाळती 'गुंड' ।। २०४९ मग 'चांगल्या'चे दलाल । नवे ! हाती घेउनी मशाल । बेगड्या 'क्रांती'ची ढाल । इप्सित साधण्या दाविती ।। २०५० ऐशा कथा राजकारणी । रोज भाबड्यांच्या कानी । तरी पाठोपाठ मेंढरावाणी । पडतांत फशी ।। २०५१ असोनि परतविण्या जहरी वार । सेना, स्वयंपूर्ण बध्दपरिकर । कर्तव्य कठोर, प्रतिकार तत्पर । 'संघ संस्कार' म्हणे, 'कारण' ।। २०५२ संघच केवळ राष्ट्रप्रेमी ?। बाकी घातकी, कुचकामी ?। मुळांतले सेवाभावी सत्कर्मी । कां 'बाष्कळ'ती विधाने ?।। २०५३ राहूद्या ना रक्षणार्थ केवळ । सैनिकांस ! देऊंया मनोबल । जाणोनि एकलेपणाची कळ । सीमेवर, त्यांची ।।२०५४ हमिद, माणेकशाॅ, उन्निकृष्ण, जाधव । हेतू एक, भिन्न जरी नांव । धर्म, प्रांतापल्याडचा भाव । असतो अरिहंतांचा ।। २०५५ हुतात्म्यांचा कोणता धर्म ?। अतिरेक्यांचा कोणता धर्म ?। जनांतरी विष पेरण्याचे कर्म । कां उगा 'कांड'ती शास्ते ।। २०५६ 'उरी' ताजा असतां घावं । आचरती अतर्क्य हावभाव । 'ओठांत असुद्या केवळं नांव । आमुचे !' सत्तालोलूप सांगती ।। २०५७ प्रधान सेवक मात्र कर्मयोगी । निरपेक्ष, कठोर, संयमी अभोगी । वेसण अनुयायांसि आवळण्याजोगी । वेळींच घालणे क्रमप्राप्त ।। २०५८ प्रत्यंचा आकर्ण खेचून । चापास लावतिल बाण । जाणवतां सीमेवर असह्य ताणं । राजकारण्यांचा ।। २०५९ मग आरडतील 'त्राही त्राही !। मनांस कधी स्पर्शिले नाही । असे कधी होईल कांही !' । आवरा आवरा 'यादवी' !।। २०६० संचयित अलिकडे जनक्षोभ । सेना पलिकडे, जणु प्रतिबिंब । परिणामी चुकविण्या प्रकोप । उडेल त्रेधा तिरपिट ।। २०६१ कशास मुखवटे, ढोंगीपणं । सहसा जर प्रकृती प्रवण । किंवा कधीं विकृती शरण । प्रवृत्ती जीवमात्रांची ?।। २०६२ नका करूं मायबापा । 'धर्म' जडविण्याच्या पापा । कर्मयोगी धावतांना धापा । मनुष्ये जी टाकिती ।। २०६३ खरेंच मी अस्वस्थ बंडखोर ?। की वृथा जाहलो हेकेखोर ?। प्रामाणिक प्रष्णांचे आगार । मन होय आतांशा ।। २०६४ बोथट होतं जाय मन । ना क्रोध ना समाघान । हे कशाचे आहे लक्षण । आकळेना ।। २०६५ परदु:खाने होतं असे । पूर्वी मन कसनुसे । नजर ताठर झालीसे । केवळ, भासे आज ।। २०६६ चेतविला पाहिजे वन्ही । अंतर हवे निघाया ढवळोनि । तळव्याच्या मुठी वळोनी । कराया हवे प्रहार ।। २०६७ मनुष्यत्वाची राखण्या बूज । वारण्या 'धर्म'कांडाची सूज । खारीचा वाटा घेउनि मज । लागेल क्रमावे ।। २०६८ साहाय्यासाठी देता हाळी । समविचारींची मांदियाळी । उचलेल कां कृतीची तळी । साशंक मन ।। २०६९ भाबड्यांचा उतरविणे भ्रम । एकल्याचे हे नोहे काम । केवळ भेद वा साम । लागतील अवलंबावे ।। २०७० प्रीत उमलते, जडतो जीव । प्रकृतिक, सहज संभव । ठावकेही नसते नांव गांव । दूर राहे धर्मप्रांत ।। २०७१ निरागस देखता तान्हे । हरपून सर्व जाती मने । वोसंडती वात्सल्यभावाने । दूर राहे धर्मप्रांत ।। २०७२ तैसेचि तीव्र,प्रखर वैरांत । क्रोध,सूड केवळ सोबत । संतापभाव ज्वालेंत । धर्मप्रांत जाय जळोनी ।। २०७३ अतर्क्य प्रवृत्ती सद्यकाली । गझनी मोहमद मगजांतली । कोणाठाई दिसते व्यालेली । आवरणे अनिवार्य ।। २०७४ अंगणी बांधोनि व्याघ्रं । चारूं पाहाती तृणांकुर । किंवा गजराज अजस्र । जखडूं बघती सुतळीने ।। २०७५ सत्ताधाऱ्यांत सुंदोपसुंदी । 'चिखलफेक' जडली व्याधी । तारूं फुटण्याची नांदी । बहुधा असावी ।। २०७६ समीक्षा असावी मर्मभेदी । समीक्षा असावी सुधार-संधी । समीक्षा असावी संक्षिप्त नांदी । आस्वादकांसाठी ।। २०७७ समीक्षा असावी नर्म रोचक । समीक्षा असावी आशयप्रेरक । समीक्षा असावी पूर्वग्रहनिवारक । आस्वादकांचा ।। २०७८ समीक्षा चिरफाड नसावी । समीक्षा नकारात्मक नसावी । समीक्षा अकारण नसावी । टीकाभाष्य ।। २०७९ समीक्षा असावी कृतिकारक । समीक्षा नसावी कार्यविदारक । समीक्षा कर्मयोग प्रतिपादक । ठरावी सहसा ।। २०८० समीक्षा आकळण्या जटिल । समीक्षा हेतुत: कुटिल । समीक्षा अवास्तव खल । नसावी ।। २०८१ समीक्षा असावी आवाहन । समीक्षा असावी विचारधन । समीक्षा गुणावगुणमंथन । असावी अभ्यासोत्तर ।। २०८२ समीक्षा असावी विविधांगस्पर्शी । समीक्षा असावी विश्लेषणदर्शी । समीक्षा तंत्रातिरेकाच्या फशी । मात्र पडू नये ।। २०८३ कर, रुजवितो बीजा । कर, पूर्ततो वांछा । कर, रचितो ऋचा । जगण्याची ।। २०८४ कर, कर्मयोगाचे साधन । कर, आकांक्षा आविष्करण । कर, पूर्णत्वाची जाण । देई कष्टकऱ्यांसि ।। २०८५ कर, व्यक्तक्षम मुद्रा नर्तनी । कर, मूक-बधीरासि समजावणी । कर, अश्लाघ्य, अतर्क्य वर्तनी । ताडण्या सक्षम ।। २०८६ गतिमंदासि पुनरावर्ती शिकवणी । दृष्टिहीनासि वेधितो ध्वनी । वा कर, अंगुलीजुळणी । मुकबधिरासि सार्थ ।। २०८७ ज्ञान-वितरणां विविध परी । उपलब्ध घरी वा बाहेरी । मनुष्यां सर्वदूर सक्षम करी । मनुष्यचि जाणा ।। २०८८ चक्रनेमिक्रमे संवत्सरे । चक्रनेमिक्रमे नवे वारे । चक्रनेमिक्रमे उघड-मिटती द्वारे । जगण्या विरण्याची ।। २०८९ सीमारक्षणार्थ प्राणांची बाजी । लावणाऱ्यांसि स्मरण्या ऐवजी । सीमित बुध्दिधारी आजी-माजी । पदाधिकारी चहुंकडे माजले ।। २०९० नको आंता, पुरे झाले । शुभेच्छांचे अनंत झेले । गुदमरूंन होउ लागले श्वास कसनुसे माझे ।। २०९१ इच्छा लाख असतिल शुभ । कार्याचे करपले जर कोंभ । कोसळले जेंव्हा वाटते नभ । सावरण्या येते कोण ?।। २०९२ आजार तैसा हितकर । व्याधिग्रस्त असतां शरीर । मनोवस्थेस येतो उभार । वोसंडण्या भाव ।। २०९३ स्खलनपूर्व घालिती धिंगाणा । आरोहण्या वासनांचा लिंगाणा । जंगलांत हिंस्र प्राणिगणां । रोखणे असंभव ।। २०९४ झुंजती, तंडती तमाम नरपुंगव । अरीप्रति क्रोध, मादीस प्रेमभाव । लागूलचालनकृतिभव । उचंबळे स्पर्धा ।। २०९५ कुणी फुलविती पिसारे । 'रंग' उधळिती कुणी सारे । मादीस आकर्षिण्या सामोरे । चढाओढिने होती ।। २०९६ आरण्ये, दगडांच्या देशी स्थितं । पर्यटनांस वनराईंनी शोभिवंत । निसर्गाच्या सन्निध क्रीडा अपरिमित । भटकंतीतं ठाईठाई ।। २०९७ मनुष्ये जन्मत: मुळांत जंगली । परिणामी विकृतिने माखलेली । विशुध्द प्रकृतीच्या भाळी । धजावती कलंकण्या ।। २०९८ बहिणाबाई माझे भले । लक्ष तुवा जें नेमस्तिले । प्रामाणिकपणे नेले । पूर्णत्वासि आज ।। २०९९ विषयांशयाचा तृणमेळ आगळा । अल्पाक्षरीचा घेऊन आळा । प्रयत्ने बांधू पाहिलेला । मियें ! स्वीकारा मायबापहो ।। २१०० (१४ जून २०१४ ते ३० आॅटोबर २०१६, दोन वर्षे ४ मास १६ दिवस अहर्निश) 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 शब्द भाषा केवळ रव । मागे कशास शारीर मानव । रसना दंतपंक्ती ओष्ठ अधरोर्ध्व । कोणत्या कारणे बां ? ।। २१०१ मर्यादा, बेगडी कणखरपणा । मर्यादा, उगां ताणलेला कणा । मर्यादा, पिला-बाळांना भरविण्या दाणा । बाबांना अनेक ।। २१०२ पांपणीआड जिरवितो पाणी । स्मरणांत राहाते कठोर वाणी । व्याघ्रांबरधारी सश्याची कहाणी । म्हणजे बाबा ।। २१०३ लौकीक जगती करोनि पापा म्हणंत हिंडती 'बाप्पा बाप्पा' । जनक्षोभाच्या अखेरीस कोपा । होतांतच सामोरे ।। २१०४ ज्याने सोडली भीड, मुर्वत । अन् मोडींत काढले जनहित । सोडीत त्यांसि कदापि नाहीत । सुज्ञ, विवेकी, न्यायलब्ध ।। २१०५ कोठे जळनिधी अपार । कोठे वालुकेचे आगार । कोठे प्रचंड नगाधीस आधार । होतसे धरा ।। २१०६ कोठे भडकतो वडवानळ । कोठे कोसळे अफाट जळ । कोठे कंपाने हादरे समूळ । एकसमयावच्छेदे विश्व ।। २१०७ मागतो नैवेद्य शांतवना ?। कर्मकांड, पूजा वा अर्चना ?। 'त्या' पुढे सर्व फोल जाणा । क्रमा जगणे सामान्य ।। २१०८ कालापव्यय ठरेल केवळ । दावू पाहाल आमिषे सकळ । 'तो' अनिर्बंध कळिकाळ । कधि कठोर, अलवार कधी ।। २१०९ गोठू गोठू पाहे जीव, सांकळल्या वृत्ती उठूं उठूं जाय नीव, अंधुकली नाती पुन्हा पुन्हा वाटे वन्ही नको चेतवाया थिजूं थिजूं पाहे आणि ओसरली रया वाफाळला चहा, वृत्तपत्र सळसळे घ्राण-श्रवणाने गात्रा नवी ऊब मिळे 'आबा ! उठा आंता',चिमणी नातं चिवचीवे शब्द-त्रय अंगडे-टोपडे देई नवे जडावेल नजर, पांपणी । मूकावेल कंठ, वाणी । निर्विकारल्या शून्य मनी । स्थितप्रज्ञा होईल ।। २११० श्वसांची वाढेल गती । शरीर गारठेल संगती । जैसी क्षर-वृध्दावते ज्योती । निमण्या आधी ।। २१११ 'घर ! घर !' घोकेल प्राण । विनवोनि मागेल वाण । जरि अवरोधेल स्वभिमान । 'वेळ' येतां ।। २११२ कोणा माहिता पैलास काय ? शमतां, विझतां ऊर्जामय । अस्तित्व ! शौर्य, चातुर्य वा भय । फोल सारे ।। २११३ मोड ! राष्ट्रभाषेंत वळणं । मोड ! बीजाचे अंकुरणं । मोड ! पूर्णमुद्रेचे खंडनं । लहान घटकांत ।। २११४ सण ! आनंदाचे क्षण । सण ! उत्सवा कारण । सण ! भेटण्या आप्तजन । पर्वणी जाणा ।। २११५ परि 'तो' झुंजतो सीमेवरी । निर्दालण्या, अतिरेकी, विकृत अरि । राखोनि हेतू केवळ अंतरी । अंतर्गत सुरक्षा ।। २११६ सतत स्मरण असावे 'त्या'चे । सतत बांधावे सेतु पाठराखणीचे । सतत असिधारेवर जगणे ज्याचे । 'मरण'छायेंत ।। २११७ करोनि 'त्यां'कडे अंगुलीनिर्देश । वंदावे ! जो करूं पाहे अखंड देश । जिंकोनि अपहृत भूमीस । प्रस्थापूं पाहे स्वमित्व ।। २११८ राष्ट्र'धर्म' एकचि केवळ असावा । बाकी 'कांडां'सह फेकोनि द्यावा । अंधश्रद्धांसि आवर्जून घालावा । आळा ! वा दावावा सूळ ।। २११९ विश्वधर्म जोडोनि राष्ट्रां । प्रस्थापावा बहुत करोनि कष्टां । ञानोब्बांसि म्हणोनि 'द्रष्टा' । घालावे दंडवत ।। २१२० 'त्या'ला अभिप्रेत मनुष्यपण । निर्मळ ! विकृती, विखाराविणं । सहिष्णुता, मार्दव, आपलेपण । होते सर्वकाळ ।। २१२१ तरीच जन्मा यावे । 'बरें' कांही करो जावे । दखलपात्र व्हावे न व्हावे । स्वान्त: सुखाय जे जे ।। २१२२ निखळला कोठ असेल तारा । भेदोनि नक्षत्र-सरितेचा किनारा । भरकटोनि जवळ करेल धरा । अवचित, अकल्पित ।। २१२३ छेदोनि कक्षांना, प्रसवेल हेतू । प्रवासांत स्थापेल नवे राहु-केतू । आकर्षणे लंघीत बांधेल सेतू । संहार चक्र पूर्तण्या ।। २१२४ ऐसी धारणा राखोनि अंतरी । भविष्याची नियोजने करा सारी । क्षणार्धाचिही पुढच्या, खातरी । नसते ! जाणती ते सुज्ञ ।। २१२५ पण नको उगा घबराट । विश्वाचा प्रदीर्घ रहाट । पद्मावधी 'वर्षां'नि फुटतो घट । कसा ? अनिश्चित !।। २१२६ 'ताऱ्या'स निष्प्रभण्या शस्त्रे । घेवोनि वेध, अभ्यासेनि शास्त्रे । मनुष्ये अमोघ रचतीलची छत्रे । पांखर जीवामात्रांना ।। २१२७ फलगर्भी असावी वृत्ती । फलद्रूप व्हावी कृती । फलप्राप्त्योत्तर निवृत्ती । सहजी घ्यावी ।। २१२८ कर्म नसावे निरपेक्ष । कर्म करतां राहावे दक्ष । कर्मफलास करण्या आयते भक्ष । सोकावली भवताली गिधाडे ।। २१२९ माय-तांत, अस्तुरी, पोरे । संसारार्थ-सरितेचे किनारे । दुर्लक्षोनि, परमार्थाचे वारे । हुंगणे, कृतघ्नतां ।। २१३० वाटतील कफन्या, झोळ्या, कमंडलू । म्हणतील 'चला, मोक्षाची वाट चालू' । ऐशा भोंदूंच्या आवाहना नका भुलूं । टाकोनि संसार उघड्यावरी ।। २१३१ 'मोक्ष', 'स्वर्ग', 'मुक्ती', परिकथा । तान्ह्यांस नीजवेळी जैशा सांगता । भारोनि भाबडेपणाने चालतां । परत फिरणे अप्राप्य ।। २१३२ नेतील 'चालू' ऐसा प्रदेशां । उध्वस्त जिथे दाही दिशां । ढकलोनि, पाहतील तमांशा । स्वानंदसुखे ।। २१३३ ऐशा अतर्क्य सत्संगे । यकायक व्हाल भूके-नंगे । लुटोनि अंगभर लेतील झगे । 'भक्षण' सम्राट ।। २१३४ आरडतील 'त्यजा ऐहिके' । भुलल्या भाबड्यांची ओढतील नखे । ओरबाडाया सरसावतील बोके । असोद्या सदा 'सावध'चित्त ।। २१३५ कुणि म्हणतील 'वाजवा टाळ्या' । कुणि मागतील मुग्ध कळ्या । उकिरड्यावर फेकतील निर्माल्या । रस-रूप-गंध-स्पर्श भोगुनी ।। २१३६ सांगतो आहे सत्यकथा । ना कल्पित भाकडांची गाथा । समाजमनाची आर्त व्यथा । पाहताहे मांडूं ।। २१३७ कृती एक !उजळला अंधार । कृती एक ! उफाळला विखार । कृती एक ! जन'मानस' सरोवर । निर्मळ झाले ।। २१३८ शास्ता असावा ऐसा कठोर । शास्ता असावा ऐसा निडर । शास्ता असावा ऐसा नम्र । जनसामान्याप्रती ।। २१३९ सत्य कटु असते वरकरणी । सत्य खट्टू होते अंतर्मनी । सत्य भेटू पाहाते क्षणोक्षणी । 'वेळ' येता समीप ।। २१४० दिवा मित्रत्वाचा, स्नेहसुगंध !। दिवा चरबीचा लाविती मदांध । दिवा भडकतो, होण्याआधी शांत । भरतां 'घटिका' ।। २१४१ दिवा, परमार्थाचे सानुले रूप । दिवा, तेजारंभीची झेप । दिवा, ग्रहण आपेआप । लावितो तमासि ।। २१४२ दिवा जाळत राहतो वात । दिवा, खर्चोनि स्नेहांकित । दिवा, निमे पर्यंत ज्योतं । आसमंत भारितो ।। २१४३ मन कैसे गमे गमतीशीर । मन, पांपणींत अखंड नीर । मन, वा आनंदविभोर । स्मृतिमग्न ।। २१४४ मन, गदगदते सईंनी । मन, हुंदकते भूतांनी । मन, नाचते कधी समजोनी । भवती आहेंत सुहृद ।। २१४५ वृथा तोलिती शिशुवृत्तींनी । वृथा ताडिती शुष्क बोलानी । वृथा जखडती चार भिंतींनी । अनुभवसिद्ध वृद्धत्व ।। २१४६ मउशार तळव्याचे वात्सल्य । निवृत्त प्रवृत्तीचे मांगल्य । खोलावल्या नजरेंतले साफल्य । वृद्धत्व जाणा ।। २१४७ कोठी कवाडावर म्हातारी । अतिमहत्वप्राप्त लग्नघरी । नजर चुकवुनी करणे चोरी । शार्वलिका केवळ स्वप्न ।। २१४८ प्रीत सरते, उरते माया । सुरकुत जाते जरी काया । अनुभव दुर्लक्षोनि परि वाया । जनहो घालवूं नका ।। २१४९ चिमणचारा हेरतां । सांवलीवरी पांखर धरिता । चांदव्याची भ्रमणगाथा । निळाईंत अविरत ।। २१५० व्याधी, जन्मत: निसर्गदत्त । व्याधी, दोष मूल रचनेंत । व्याधी, व्यसनोत्पन्न, मनुष्यांत । जगण्यांत अडथळा ।। २१५१ व्याधी, पावलाच्या नखांत । व्याधी वा शिरोधार्य शिखेंत । व्याधी शारीर वा मनांतरांत । वोदनादाई ।। २१५२ व्याधिहरणा उपाय अनेक । व्याधिहरणा विविध शाखा वैद्यक । व्याधिहरणा अविरत संशोधक । जागर वैश्विक मांडती ।। २१५३ नाती नसली जरी रक्ताची । नाती नसली जरी प्रीती-भक्तीची । नाती परि निरपेक्ष भावबंधांची अतूट आपेआप ।। २१५४ निरागस कवळ्या तान्ह्यास । प्रेमभरे मायेने उरापास । धरोनि ! भरवला जर घास । नाते यापरते काय ?।। २१५५ माझा शब्द जे बोलेलं । कटू ते कदाचित लागेलं । पण अंतरांत कालवेलं । आकळता आशय ।। २१५६ पाळीव जीवमात्र घरांत । लळा कैसा लावतांत । लांगूलचालन गतिने करीत । बिलगतांत ना ?।। २१५७ मनुष्य तर उत्क्रांत प्राणी । भाव व्यक्तण्या आविर्भाव लेणी । लटकी हसणी रडणी मनधरणी । योजिती उपाय विविध ।। २१५८ गांठ प्रक्तनाची भाळाशी ?। गांठ नात्याची नाळेशी ?। गांठ कुशींतल्या बाळाशी । जन्मदात्रीची ? ।। २१५९ असतांत जन्मदाते 'पालक' ?। पाहातांत नवजाताचे सुख ?। होतांत प्रवृत्त देण्यास दत्तक । तांत-माय किं कारणे ?।। २१६० माती माय, रुजविते बीज देते अंगीची द्रव्ये, भीज जोपासोनि शाखा, पर्णे हिरवीकंच राखिते, सजविते सृष्टी ।। २१६१ जळ, तेज, अवकाश, धरा । ग्रह, तारे, वन्ही, वारा । अगणित अाकाशगंगांची असीम कारा । भासते न त्यां ! नांदती सुखें ।। २१६२ जे जे पंचमहाभूते रचिले । त्यांसि अंतर नाही कधी दिले । कुरवाळिले कधि, कधि ताडिल । त्यजिले कदापि, परि नाही ।। २१६३ 'कल्याणकारी' मुखवटे फसवे । धारोनि म्हणे, 'वाटले भेटावे' । 'सामा' चे जाल पसरले नवे । जाणा 'लांडग्यां'चे ।। २१६४ संताप, असूया, द्वेष, मत्सर । दुराग्रह, गर्व, अविवेक, दुराचार । साऱ्यांचे असते एकचि छप्पर । अपेक्षा अतर्क्य ।। २१६५ वृंदा, तुलसी, वा वैजयंती । भिन्न नांवे दर कोसांवरती । विविधांगी शुद्धीकरणांप्रति वनस्पती कटिबद्ध ।। २१६६ वागविती गळां तुलसीमाला । तरि अंतरी हेतूं काळा । बुक्का भाबड्यांच्या कपाळा । फासती बळे ।। २१६७ मुंडकी धरोनि आदळती । फत्तराच्या पायावरती । 'अर्थ'कारणाची आगळी नीती । गर्भगृही श्रद्धेयांच्या ।। २१६८ सुखावती भाबडे भोळे । 'काळे,पांढरे' म्हणती, 'झाले' । कुकर्म करण्या आतां मोकळे । 'झाकोळा' पर्यंत पुढच्या ।। २१६९ नात्यांची अगणिंत नांवे । नात्यांचे दावे, दुरावे । नात्यांचे फेकोनि द्यावे । वाटते पाहता, जोखडं ।। २१७० नात्यांची बेगडी रूपे । नात्यांची नाळ तिचे हेत्वारोपे । नाती 'मानलेली', लवलवती हपापे। कोण्या ? आकळेना ।। २१७१ कोणी गर्भगृही प्रतिबंधिती ललनांना । 'ओवळ्या' म्हणती, 'या ! जाणा !'। परि 'दशकोनी' अभद्र दृश्यांकना । सरसाविती नराधम ।। २१७२ नाती शोधणे ठरते व्यर्थ । नाती लादणे तसेहि निरर्थ । नाती जोडतांना सावधचित्त । असावे सदा ।। २१७३ भावबंध, अदृश्य मेखला । भावबंध, जखडती परस्पराला । भावबंध, उधळल्या नात्यांचा आळा । कुटुंबांत ।। २१७४ भावबंध, जोडत जातो मने । भावबंध, जाणतो स्नेहार्द्र आवतणे । भावबंध, एक 'स्वीकारणे' । पल्याड नात्यांच्या ।। २१७५ भावबंध, प्रीत कधी, कधि माया । भावबंध, वात्सल्य कधी, कधि दया । भावबंध, शहारणारी काया । लक्षण जिवंतपणाचे ।। २१७६ भावबंध, कासवीच्या नजरेंत । भावबंध, गाउलीच्या डोळ्यांत । भावबंध, माउलीच्या काळजांत । पिलांप्रती ।। २१७७ क्रांती म्हणजे बदलू पाहाणे ?। क्रांती म्हणजे सुधारूं पाहाणे ?। क्रांती म्हणजे रुजवूं पाहाणे । बीजे नवी ?।। २१७८ क्रांती, अत्याचारजन्य । क्रांती, अतीव भयजन्य । क्रांती, भरडलेले जनसामान्य । अंतरांत सुप्त, वागविती ।। २१७९ क्रांती मागते ठिणगी एक क्रांती मागते धगधगती आग । क्रांती मागते हविभाग । सर्वस्वाचा, यज्ञांत ।। २१८० क्रांती, नाही झोळींतली भीक । क्रांती, अस्वस्थतेचा परिपाक । क्रांती, वैनतेयाचा पांख । रक्षेंतुनी झेपावल्या ।। २१८१ क्रांती, एका लाटेचे फुटणे । क्रांती, आसमंत घुसळणे । क्रांती, अपप्रवृत्ती वारणे । सद्रक्षणार्थ ।। २१८२ क्रांतीला क्षती नाही । क्रांतीविणं गती नाही । क्रांती ज्योतीस वाण देई । तेजोनिधीचे तळपत्या ।। २१८३ क्रांती, मोकळण्या साकळ । क्रांती, उजळण्या झाकोळ । क्रांती, झुगारण्या जाल । विविधोद्भव अंधश्रद्धांचे ।। २१८४ क्रांती अव्हेरण्या कुकर्मफल। क्रांती उंचावण्या आत्मबल । क्रांती रेखण्या भविष्यकाल । सुवर्णाक्षरांनी ।। २१८५ ऐल क्रांती, पैल दहशत । ऐल क्रांती, पैल गैर रीत । ऐल क्रांती, पैल अस्वस्थ । विनाशभयें ।। २१८६ डोळे, भावांचे कोंदण । डोळे, अश्रूंची साठवण । डोळे, म्हणती सौंदर्यलक्षण । बाह्यांगी परि केवळ ।। २१८७ डोळे, मनोवस्थांचे दर्शन । डोळे, प्रीत, क्रोध, असोशी, समर्पण । डोळे, असोनि जागेल आत्मभान ?। शंकाकुल मानस !।। २१८८ डोळे नाही, दृष्टी आहे । डोळे नाही, सृष्टी पाहे । डोळे नाही, सुखी राहे । लौकीक अंध ।। २१८९ डोळे, निसर्गाचे देणे । डोळे, पांपणीआड लेणे । डोळे, केवळ एक 'असणे' । 'दृष्टी'विना ।। २१९० वेगवती, हिमनग दुहिता । मध्यगती नागर सरिता । मुक्त कचधारांकित समर्पिता । येतां समीप रत्नाकर ।। २१९१ लोभस हिची रूपे अनेक । लोभस अवखळ मनमोहक । लोभस पुष्कळा सुखदायक । जलनिधि भार्या ।। २१९२ निसर्ग देतो भरभरुनी । जीवमात्रांस उरतो पुरुनी । परंतु नियमांच्या उल्लंघनी । सरसाविती मनुष्ये ।। २१९३ प्रवाहितासि घालिती बांध । अहितकारी करिती प्रबंध । प्रकोप होता पंचतत्वांचा अनिर्बंध । प्रवृत्त कर्मकांडां करिती भाबड्यां ।। २१९४ माया ममता शौर्य क्रौर्य प्रीत तिरस्कार विरह धैर्य निसर्गदत्त भावं अनिवार्य जगरहाटींत ।। २१९५ प्रलोभने ऱ्हासाला आवतणे प्रलोभनें कलंकित पोथ्यां-पुराणे प्रलोभनें भारिता अवलंबिणे संयमासि जाणा ।। २१९६ कृष्णमेघ, सांकळलेले जळ कृष्णमेघ, रुपडं सावळं कृष्णमेघ, श्रेयस्कर झाकोळ तृषार्तांना ।। २१९७ घेउनि माझी शब्दावळी । आशयाच्या रानोमाळी । अहोरात्र फिरतो आहे । सर्व वेळी मी बापडा ।। २१९८ मतीने अतींतपैल शोधतां । जाण अंतरीची पणां लावतां । पदोपदी मथित अनुभवगाथां । उपायो नवनीताकारणे ।। २१९९ पावकें पावन भास्करं । कलंकित तरि शीतल शशधर । मनुष्ये विखारी, विकृत अवनीवरी । कां नाही स्वाभाविकं ?।। २२०० ************ २८-११-२०१६ ************ येरझारीला सर्व साक्ष । उघडी कवाडे-गवाक्ष । बंद करूं ती गेल्यास । कसनुसा जीव होईल ।। २२०१ मन असो, असो वा शरीर । एकच लागूं सर्वां सूत्र । 'झाकले'पणाचे गोत्र । रुजण्या-अकुरण्या मारक ।। २२०१ उंच आभाळ खोल सागर । वारा भणाण, वणवा धरेवर । हाहा:कार, कहाराचे घर । उरेल बांधू पाहातां ।। २२०३ कळकळ, आंतड्याचा पीळ ? कळकळ, निश्चयाचे बळ ? कळकळ, कधी कळिकाळ । अश्लाघ्याप्रति व्हावी ।। २२०४ हादरेल अंतर्बाह्य धरा । कांपेल वृत्ती थरथरा । भेदरेल जीवमात्र सारा । प्रलयवेळी ।। २२०५ गरारा फिरेल अवघे अवकाश । भरारा भणभणेल पंचतत्व विनाश । करकरा खाईल कराल दाढांस । प्रलयवेळी ।। २२०६ अगणित 'सूर्य' अवचित । रक्षारूप समग्रांस क्षणार्धांत । देवोनि उधळतील अगम्य पोकळींत । प्रलयवेळी ।। २२०७ जळ, धरा, अवकाश, पावक । पवनासह, एकत्र यकायक । अस्तासि नेतील अस्तित्वाचे मानक । प्रलयवेळी ।। २२०८ गर्व, मायावी प्रेम, हेवेदावे । आजवरी कंलंकिले मानवें । अज्ञातावेरी झेपावतील भावांचे थवे । प्रलयवेळी ।। २२०९ उन्मळतील धरागर्भ,जळनीधि । वाढेल शतपटिने परिवलन गति । अतर्क्य दर्शनें होईल कुंठित मती । प्रलयवेळी ।। २२१० कधि प्रसन्न सकाळ । कधि उगवतीस झाकोळ । कधि उदास सांजवेळ । हुरहुरती ।। २२११ कधि वृत्ती अतीव उल्हसित । कधि विचारशृंखला विकृत । कधि निवृत्त, निर्विकार,परावृत्त । विविधांगी मन ।। २२१२ संस्कृति विकृती एके ठाई । नांदतांना विश्व पाही । दयार्णव संत करुणामई । चिरडे उपद्रवी मत्कूण ॥ २२१३ विकृती प्रकृतीचे विडंबन ?। विकृती प्रकृतीची बहीण ?। विकृती प्रकृतीची बाही धरून । वसते मनुष्यांत सदा ॥ २२१४ कोण, दाखवा महाभाग । अंतरी रुखरुख वा राग । नाही ! वा लौकिक भोग । समोर ठाकता अव्हेरी ॥ २२१५ कुणि शुक्राचार्य झारींत । कुणि विंचू सुघडांत । कुणि आकर्ण प्रत्यंचा ताणींत । मुखवट्या मागे ॥ २२१६ कुणि द्रोण'गुरु' एकलव्यासि । कुणि माता आपुल्य अपत्यासि । कुणि सुहृद उभा कधि पाठीशी । स्वार्थकारणे घालण्या घाव ॥ २२१७ धूम्र, बाष्फ, रजकण । मूल, शाखा, फुले, पर्ण । रसातळी अस्तित्व, जितेपण । प्रलयवेळी ।। २२१८ अवकाश गणिताचे प्रमाण । अवकाश नियंमांचे प्रमाण । अवकाश आकुंचन प्रसरण । पावताहे सर्वकाल ।। २२१९ कणव करुणा, पीडितांप्रती । विचलित करून विवेकी वृत्ती । चिंता, क्रोधप्रवणकृति उद्गाती । होतसे सहसा ।। २२२० मानस ! विस्तीर्ण, अथांग, खोल । मानस ! हरेक सांद्री असते अनमोल । मानस ! भरून कांठोकांठ वोसंडेल । दहिवर दाटेल पांपणींत ।। २२२१ मानस ! अवकाशाचे प्रतिबिंब । मानस ! भावावेग, वृत्तिरंगांचे नभ । मानस ! शांतता, सदाचार वालभ । प्रतींततें सामान्यतः ।। २२२२ पाठविले ! पाहिलेंच पाहिजे । ऐसा आग्रह माझा नाहिजे । कंटाळवाणे उचलोनि फेकिजे । प्रार्थना इतुकी ।। २२२३ जळतो मी ! मज वाटे मत्सर, हेवा । जळतो मी ! उसळतो अंतरी वणवा । जळतो मी ! हवि देतो अनुभव-ठेवा । प्रदीप्तहेतूं अन्यां ।। २२२४ जळतो मी ! ज्यां मिळते सदैव छत्र । जळतो मी ! ज्यां करांत भरले पात्र । जळतो मी ! ज्यां हातीं अमोघ शस्र । कुकर्मेदमना ।। २२२५ जळतो मी ! जो कंठ सदा स्वरसिद्ध । जळतो मी ! जो क्रमतो नीयमबद्ध । जळतो मी ! जो सहजि दावि विरोध । अश्लाघ्याप्रति ।। २२२६ जळावे ! परि त्यागुनी देह-प्रीत । जळावे ! परि लावुनी एक ज्योत । जळावे ! परि दउनी एक स्रोत । जगण्याला कुणा ।। २२२७ जळोनी परी देहरूपे उरावे । जळोनी, त्रुटींच्या ठाईं रुजावे ! जळोनी, तरी पुनर्जीवीत व्हावे । देण्या पूर्ण रूप ।। २२२८ जळनिधी कल्लोळ सांडोनी । शुष्कता भिनेल काष्ठि पाषाणी । चिरपफळोनि होइल धरणी । विदीर्ण, प्रलयवेळी ।। २२२९ उर्जा रूपे सकळ अविनाशी । ताडूं, तोडूं, सोडून पंचतत्वांसी । एकमेकां आवेगे अवकाशी । भिडतील प्रलयवेळी ।। २२३० कधी होईल शांतवन ? । कशास चिंता अकारण । जीवजंतू, प्रजाती लंघोन । हरपतील जर अस्तित्व ।। २२३१ वस्त्र प्रावरणे बाह्यांग । किती निर्मळ देहांग ?। वा सखोल अंतरंग ?। ठावे केवळ स्वत:सचि ।। २२३२ रंगा भुलला जो वरलिया । हुरळला फसवी पाहोनि माया । क्रीडेस अथांग मनाचिया । जाणेल कैसा ।। २२३३ मनाचे प्रतिबिंब असते मुद्रा ?। बोचणी असते ठावकी अग्रा ?। प्रतिनिधी, म्हणावे समुद्रा । धरास्थित जळनिधींचे ?।। २२३४ अरुण ! तेजोनिधीस सारथी । अरुण ! धारीं अस्थिभंग व्याधी । अ-ऋण ! निश्चित निष्कांचन निश्चिंती । समाघीकाळी ।। २२३५ अरुण ! अष्टाश्व वाहनचालक । अरुण ! तमारि मार्गदर्शक । अरुण ! दृश्यमान प्रथम नायक । प्राचीवरी फांकता प्रभा ।। २२३६ मुळे झेपावतील आभाळावेरी । शाखा-पर्ण लक्तरे भुइभरी । आश्रित द्विजगण विचलित सैरावैरी । प्रलयवेळी ।। २२३७ इतरांकरिता साकारती घरे । ठेउनी उघड्यावर अस्तुरी, पोरे । व्यथा, वेदना कोण वारे । जगण्यांतल्या याच्या ।। २२३८ हेचि असतांत खरें 'ईश्वर' । निरपेक्ष, निर्व्याज, निराकार । अखंड नाविन्याचे कर्मकार । साकारण्या भूवर ।। २२३९ दिन ढळता कष्टोत्तरी । चार मुद्रा पडती पदरी । चुलींवर मग साकारते भाकरी । अस्तुरी, सुस्मित वदनें ।। २२४० भोजनोत्तरी कोणी उरले सुरले । घास, बाल, वृद्धांनी अव्हेरलेले । धनिकाघरी ! 'दान'रूप ल्यालेले । पडते पसरल्या पश्यांत ।। २२४१ हरखती पाहून 'गोड' मग बालके । भले अर्धवट तोडलेले लचके । नाचती हर्षोल्हासे फुके । मानोनि 'सण' ।। २२४२ ही ऐसी त्यांची रोजची कथा । 'अध्यात्म, मोक्ष, पुराणे, गाथा जाणा ! अवलंबा परमार्था' वृथा करूं नका उपदेश ।। २२४३ जोवरी चालती हातपाय । चित्तवृत्तीही स्थिर होय । मंथन मगज करूं जाय । अविरत, अनुभवांचे ।। २२४४ दृष्टी सक्षम निरखण्यासी । श्ववणेंद्रिये नाद जाणण्यासी । काया विश्लेषक स्पर्शासी । तोवरी असते जगणे ।। २२४५ रसना बोलण्या चांखण्या सिद्ध । कंठ गाण्या, आक्रंदण्या सिद्ध । काळिज, भाव जोखण्या सिद्ध । जितेपण जाणा तोवरी ।। २२४६ कधीतरी लागेल ऊर्ध्व । कसनुसा होईल जीव । सीमेपल्याडचा अनुभव । सांगतां न ये, परतोनी ।। २२४७ मृत्युपश्चात वगैरे जीवन ?। केवळ भाकड कल्पना जाण । चार्वाकें सिद्ध केले अज्ञान । तपस्योत्तरी ।। २२४८ स्वत:चे फुकोनि प्राण । आनंदाचा दीप लाऊन । घरांस देवोनि 'घर'पण । पागती वाऱ्यावरी ।। २२४९ कळ दाबता तमारि प्रपांत । कळ फिरविता मंद वात । कळ भुकेची दाबोनि पोटांत । घासाकरिता 'तो' जाय ।। २२५० मोकलोनि धाय, रडे । मनांत घेवोनि साकडे । 'चल ना माय घराकडे । पोर, झोंबे पदरांस ।। २२५१ 'घे बाळा घे डोईवर । माझा विरला, विटला पदर । 'तेचि' माय म्हणे, 'तुझे घर । भाकर भरविन कोठेही' ।। २२५२ श्वास मग घ्याया मोकळे । खुडोनि मोगरीचे कळे । अंजुलींत घेवोनि सुमनबाळे । सिद्ध होती 'रहिवासी' ।। २२५३ मायेस 'त्यां', कांडाचे फळ । गति-मोक्ष-अध्यात्म बळ । सांगो जाल, पाठीवर वळ । कांठीचे उठतील ।। २२५४ कष्टकऱ्यांच्या वस्तांत । जिथे स्वेदगंगा प्रवाहित । रुजवूं कोणी पाहेल अहित । पश्चात्ताप पावेल ।। २२५५ धरूं नका जमेस त्यांना । जागविण्या आत्मभाना । सद्यकाली, राखण्या ताठ कणा । सिद्ध 'योगी' तत्पर ।। २२५६ कशास शोधता कोणी 'स्वामी' ? प्रामाणिक, निर्मळ जर अंतर्यामी । असाल ! पंचतत्वांनी भारलेली भूमी । आहे अखंड आधार !।। २२५७ ही नाही केवळ आत्मप्रौढी । नाही सोडवित कोणीही कोडी । आपणचि वाहावयाच्या कावडी । तृषाशमनार्थ स्वकीयांच्या ।। २२५८ भोगोत्तरी जोखोनि बरें वाईट । भरोनि अनुभवांचे ताट । निवडण्या सुयोग्य वाट । प्रवणकारी, कां न संत ?।। २२५९ त्यागावा लागतोचि संसार ?। व्हावे लागते कफनी, जटाधर ?। भस्माचे पट्टे अंगभर । अंनिवार्य 'संत'पणी ?।। २२६० मी मुळांतच आहे मंदबुद्धी । प्रष्ण विचारायची जडली व्याधी । 'काय कटकट, अकारण उपाधी' । निंदतांत 'जाणते' ।। २२६१ पुढच्या क्षणी ओसरला श्वास । पुढच्या क्षणी आटले जर मानस । पुढच्या क्षणी मिळालो मी मातीस । लढवू नका अतर्क्य ।। २२६२ 'अश्रद्ध नास्तिकावर पाहा अवकृपा । झाली ! नाकारत बसला सगुण रूपा । कोठे,कसे फेडील आपुल्या पापा ?'। आरडू नका अकारण ।। २२६३ 'तरी वारंवार होतो सांगत । करीत होतो सावध चित्त । शिकविता पूजा अर्चना रीत । थकलो' व्यर्थ फुशारकी ।। २२६४ मृत्यु कारण ? व्याधि उत्पात । मृत्यु कारण ? कधी अपघात । मृत्यु कारण ? असते निगडित । पाप-पुण्याशी ! भ्रम एक ।। २२६५ सहचर मुद्रेवर स्मितरेखा । उमटेल ! ऐसा व्हा सखा । नका एकमेकांचा पारखा । अखेरवेरी जीव करुं ।। २२६६ सद्यकाली सर्व क्षेत्रांत बरोबरी । पतीसंगे करोनि यशस्वी सहचरी । होतांत ! संसारशकट दिशांना चारी । सिद्ध हांकांया असतांत ।। २२६७ एकमेका अतीव स्नेहादराने । राखोनि परस्पर मान, मने । 'पालक'धर्म परोपरीने । आचरावा उभयतां ।। २२६८ चढलांत विवाहवेदीवरी ?। कशांस फिरता मग माघारी ?। 'तैसे' आदर्श उबवोनि उरी । साधाल काय ?।। २२६९ पाउलापाउली स्वीकारा आव्हाने । भवसागरी ! निधड्या छातीने । माय-तांत, अपत्ये सांभाळणे । कर्तव्य कठोर सदा असा ।। २२७० दूर रानोमाळी बैसोनि घळींत कैसे सांगण्या धजावतांत ? 'हे', 'ते' आचरावे संसारांत !' अतर्क्य उपदेश ।। २२७१ तत्कालीन समाजमन । पूर्णपणे दुर्लक्षोन । बालिकेसि सोडिले, अजाण । वाऱ्यावरी ? कां बां ?।। २२७२ रामें जाणिले जनगण मन । दासें जागविले आत्मभान । पावलावरी पाऊल ठेवोन । कोणाच्या ? सांगा क्रमावे !।। २२७३ 'आधार' उभयता पिचलेले । निर्णय स्वानुभवे घ्यावा ! हेचि भले । यशापयश अखेरी आपुले । आपुल्यापाशी ।। २२७४ स्वर, व्यंजन नादाची अक्षररूपे । जुडतां, साकार शब्द आपोआपे । आशयाचा धांडोळा लोपे । अंकुरतां विधान ।। २२७५ खुरपणी करोनि काढा तण । नांगर धरोनि करा उफळण । आषाढ- श्रावणी करा पेरण । बीजांची, मृदगर्भी ओलेत्यां ।। २२७६ मगजांतिलं झाडा जळमटे । मनांतले उपटा काटेरीचे रोपटे । सिद्ध करा सद्विचार गोमटे । ऊर्ध्वाधरी धारण्या ।। २२७७ कृतांतकटकामलद्धजजरा । दिसतां अंमळ मौन धरा । वेदनाविभोर होवुनी घरा । अवकळा आणो नका ।। २२७८ बालपणी कठोर वाटे शिक्षण । तारुण्यांत यश नाही कष्टेविण । उपचारांत सरे पोक्तपण । वृद्ध आप्तांच्या ।। २२७९ ऐसा सहसा जीवनक्रम । वाटते, ग्रासतो आहे भ्रम । उसंत आचरण्या धर्मार्थकाम । सामान्यांसी न मिळे ।। २२८१ अंतरांत पेटलेला वणवा । त्यांसि निंदेची मिळता हवा । भवताली कितीही भडाग्नी पेटवा । तारण्या मज समर्थ ।। २२८२ ज्यांपांस कळकळ आत्मीयतां । आधार होतो धरोनि हाता । सदस्य प्रत्यक्ष वा सहवासी नसता । कुटंबाचा होतो भाग ।। २२८२ आयुष्य, देहपेशींची केवळ वृद्धी ?। आयुष्य, मृत्युला जगण्या केवळ संधी ?। आयुष्य, कवडसा तटांस दोन्ही सांधी । तमसरितेच्या ?।। २२८३ आयुष्य, श्वास चालणार अखेरवेरी । आयुष्य, 'भेट' एकदां जिवा मिळणारी । आयुष्य, नाहि होणार पुन्हपुन्हा वारी । जगण्याची ।। २२८४ वृद्धत्व असे शारीर वाढ वा जरा ?। वृद्धत्व असे कां विवेकावरी चरा ?। वृद्धत्व, मिळे आवरण्यासि पसारा । अवसर विरण्यापूर्वी ।। २२८५ वृद्धत्व कडू वा गोड सईंचे धाम । वृद्धत्व कांहिसां जडलां बुद्धीभ्रम । वृद्धत्व, त्यागण्या धर्म, अर्थ अन् काम । अवसर विरण्यापूर्वी ।। २२८६ वृद्धत्व तिन्हीसांजेची पिवळी प्रभा । वृद्धत्व खोड झिजले नि राहिला गाभा । वृद्धत्व निमंत्रित दुर्धर व्याधीं-सभा । अस्तावण्यापूर्वी ।। २२८७ चार्वाक वदें, 'बा ! पुवर्जन्म भाकडं' । परि पूर्णजन्म ? सर्वां पडले सांकडं । गर्ता खोल वा उत्तुग गिरी अवघड । अपुरे लंघता पडे बळ ।। २२८८ दाखवाल मजला परतुन आला कोणी । कां वृथा घडवितां अतर्क्य, असत्य लेणी । अंधश्रद्धां कां विकुनि घृणास्पद वाणी । भांबड्यांसि, होता ?।। २२८९ करपते बीज कोण्या ठाईं गर्भांत । हरपते भान शतकोत्तरि कुठें जरेंत । निरुपते अतर्क्या कोण कुठे विश्वांत । अद्यापहि नाही ठावे ।। २२९० भांकड संकल्पना बळे गळी । उतरवण्या कां धजावती मंडळी । भूत हडळी पिशाच्चांची मांदियाळी । पाहतील दाखवू ।।२२९१ या ना, ना त्या प्रवेशला शरीरांत कोणी 'आत्मा' भटकला अधांतरांत काक अव्हेरू पाहेल बळी 'पक्षांत' आरडतील 'अनर्थ' ।। २२९२ सावध राहा ऐशांपासोनि ।। 'प्रमेय सिद्ध केले संशाधनी !। एकदां तरी' म्हणतील 'अभ्यासोनि पाहा जरा' ।। २२९३ गैरश्रद्धांची दीर्घ निशा । अघोरी उपचारांची नशा । मनोविकारींची परिणामी दुर्दशा । सरणार कधी ?।। २२९५ जन्मोद्भव मरण दुर्लक्षोनि । काहींचे ! संशोधने अवलक्षणी । ऐसी करोनि, पुनर्जन्माची गाणी । उच्चरवें कां गाती ?।। २२९६ जीवजंतू विविध प्रजाती । धरेचा भाग अविभाज्य असती । जी प्रत्यक्ष कीं प्रतिबिंब ? माहिती । देईल कोण ?।। २२९७ अगम्य अनंत व्याप्त तमनिधी । पैकी एका तेजोखंडाची उपाधी । धरा ! अक्षौहिण्यांश प्रतिनिधी । 'मी, माझे' बरळती ।। २२९८ कवट्या, बळी, काळी जादू । हलाल 'उपाय' दाविती भोंदू । कष्टावले भाबडे आपला मेंदू । गहाण त्यां कडे ठेविती ।। २२९९ कोण्याठाई दूरवर तेज-स्रोत । धरेवरि प्रकाशवेगे सूर्यमालेंत । भिडेतो कदाचित होतो 'भूत' । सत्य वैज्ञानिक ।। २३०० ******** २१-१२-२०१६ परम ! निष्क्रियांचा खेळ । परम ! दृष्टीस नाही मेळ । परम ! शब्दच्छल केवळ । विवादासाठी ।। २३०१ परम ! अगम्याची सुरुवात । परम ! पुढच्या उकलल्या स्थलापर्यंत । परम ! क्षितिजाचा प्रतीक्षित अंत । अस्तित्वहीनं ।। २३०२ अस्थीरतेंत कैसे परम ?। अनिश्चितेंत कैसे परम ?। भ्रमावस्थेंचे कल्पित 'परम' । व्याधिग्रस्त मनांत ।। २३०३ गळावी आयुष्याची वसने । श्वास निमावे संथपणे । वाटे उठावे पावलाने । ना परतण्या ।। २२०४ शुभ्रासह रंग विरावे । अंतरांत तम रुजावे । पांपण्यांनी अलवार मिटावे । न उमलण्या ।। २३०५ श्रवणाची जाण सरावी । नीरवाचीच गाज उरावी । ऐसी अवस्था वेधावी । प्राणांनी ।। २३०६ इतुके असतें कां हे सोपे । निवण्या जरि ज्योत हपापे । विविध व्याधि वेदना रूपे । खोळंबती कवाडांत ।। २३०७ बहुत कुरवाळिल्या हौशी । खेळविले हसंत जगण्यांसि । लोळविले, विकार-व्यसनासि । न धारतां मुखवटें ।। २३०८ मथुनि मिळाले नवनीत ?। सत्व कांहि उरले घटांत ?। सरणावर तडकेल क्षणार्धांत । वितळोनि मगज ।। २३०९ न वाटे कोठे जावे । न स्नेही आप्त भेटावे । उन्मळोनि आतां फुटावे । आंतल्याआंतं ।। २३१० इतिकर्तव्यता पूर्ती कारणे । मोह माया वासना वारणे । साध्य होईल इच्छामरणें । वा समाधीने ?।। २३११ कचखाऊ भयभीत मन । अस्थिर प्रज्ञा लक्षण । एवढी ठाम जाण । राखोनि मी आहे ।। २३१२ परंतु सामान्यपणचि बरवे । द्राक्षांसि अप्राप्य म्हणावे । 'आंबट' समजोनि सोडोनि द्यावे । भलेपण यांतची ।। २३१३ कोठल्या आंतरिक कळा । ज्यांकारणे येतो उमाळा । पांपणीकांठ करोनि ओला । गळां कां दाटतसे ।। २३१४ कोण जाणे कां वाटे । भोगून झाले आपुले वाटे । परतपाउली आल्यावाटें । जावे त्यजोनि सर्व ।। २३१५ करंटे हे लक्षण नाही । दुखावले आहे कांही । जाण सदैव सलत राही । यातनांनी कोण्या ?।। २३१६ डोळियांसि जडला श्रावण । अवकाळी उगां खिन्नपण । अजून कां प्रतिक्षिप्त मन । आहे वेदनांना ।। २३१७ व्हावे वाटे पुनरपि जननं । मळली झिजली कात टाकेन । विकार मनगुंथीचे झटकोन । व्हावे म्हणतो 'पुण्यश्लोक' ।। २३१८ बरेंच 'मिळवणी' बाकी आहेंत ?। पण उगां करूं नका खंत !। संधी पूर्तता करण्यास निश्चित । पुनर्जन्मांत लाभेल की !।। २३१९ करोनि घ्या सारी पापे । वारण्या ती आपोआपे । पुण्यें रसावली फलद्रूपें । दिसतील पुनर्जन्मांत ।। २३२० अंतर्गत टवाळी अध्याऋत । संकल्पना भाकड निश्चितं । 'सुखावतील कां' पाहातं । कोणी ? 'ओवि'तो शब्द ।। २३२१ सबजा, उडीद, जादू काळी । वा पसरलेली भिक्षेसाठी झोळी । पेक्षा नर्म, निरुपद्रवी 'टवाळी' । अर्थार्जना हितकर ।। २३२२ घासाकरिता आटविणे रक्त । भोंदू साधूंना असते माहीत ?। इतरांचे, ते, लुटण्या संचित । नग्नांगे धावती ।। २३२३ कोणि अभ्यासिला दिनक्रम ?। कोणि अभ्यासिले नेमके वर्म ?। कोणि अभ्यासिले ग्रासहेतू कर्म । 'यां'चे ! कडे-कपारी-आरण्यांत ?।। २३२४ देह राहिला नाही सक्षम । श्वासांचे मग काय काम । धुंडण्या नवाकोरा 'पुनर्जन्म' । 'आत्म्या'ने उडणे बरें ।। २३२५ कुणी वृद्ध शिंपे परसबाग । कुणी वृद्ध उबवे पार्श्वभाग । कुणी वृद्ध संचितावरी नाग । जैसा बिळांतल्या ।। २३२६ कुणि तंडे तत्वांकरिता । कुणि न्याहळे स्मृतिसरिता । कुणि सुखांवोनि अश्रुपाता । देई वाट ।। २३२७ कुणि आप्तविरह व्याकूळ । कुणि एकवटे जीर्ण मनोबल । कुणि तुटल्या नात्यांची नाळ । जुळवू पाहे ।। ।। २३२८ कुणि नेत्रदान आग्रही । कुणि स्वप्न पिंडाचे पाही । कुणि याचि डोळा याचि देही । पाहोजाय मरणांसी ।। २३२९ कुणि गिळत बसला अपमान । कुणि पराकोटिचा आत्ममग्न । कुणि व्यर्थ भंगलेले मन । सांधू पाहे ।। २३३० कुणि स्वत:शीच पुटपुटे । कुणां नेत्री जळ दाटे । कुणि वृद्धा रुद्ध कंठे । आळवे श्रद्धेयांसि ।। २३३१ कुणां चर्चा वाद प्रिय । कुणि बसोनि राही निष्क्रिय । कुणा कामना असोनि पाय । उचले ना ।। २३३२ कोण्या मनी कर्दळीवन । कोण्या मनी अपूर्त व्यसन । कोणी कल्पनेंत ढळते वसन । सुखावे पाहोनी ।। २३३३ कोणी मनातली पापे वारी । कोणी दिवास्वप्नांत करिती वारी । कोणा कोणत्याही वारी । घडे उपास ।। २३३४ कोण्या शरीरी वेदनांचे काहूर । कोण्या अंतरी भळाळ रुधिर । कोण्या सांवरी वत्सल मउशार । अंथरली मानसी ।। २३३५ युगानुयुगे वैश्विक तेजोस्रोत । स्थिर भासतो अंतराळांत । परिवलनाने दिवस रात । उदयास्त धरेच्या ।। २३३६ कधि प्रसन्न आकाश निळेशार । कधि राखाडी वाहते मळभार । कधि लखलख ताऱ्यांचे भांडार । चांदणे अवसेचे कधी ।। २३३७ कोणते सांगा नवल वर्ततें । लौकिकार्थी जन्मते, वारते । सणवारांची नांवे देते । सीमित, नाशवंत आयुष्य ।। २३३८ आनंदासाठी कांही निमित्त । अपेक्षा जनसामान्यांची रास्त । कष्टोत्तरी उमलते अंतरांत । धर्म, प्रांत भेदा पल्याड ।। २३३९ पाडवा, नाताळ, दीपावली, ईद । तृषार्त अपेक्षांना प्रतिसाद । उत्सवांत विरून जाती भेद । बेगडी मनुष्यांमधले ।। २३४० राखाया सुहृदांचे अंतरे । इच्छितो मनापासोनि बरे । व्हावे आनंदांत साजिरे गोजिरे । वर्ष नवे तुमचे ।। २२३४१ फोडा कितीही प्रतिमा वा पुतळे । अवशेषांना भिरकांवा रसातळे । अ-क्षरसाहित्यालंकार आगळे । परंतु राहाणार अबाधितं ।। २३४२ अशोक, टिपू वा छावा संभाजी । पराक्रमाने सरस ठरले बाजी । व्यक्तिगत त्यांच्या आयुष्याची । चर्चा करणे व्यर्थ ।। २३४३ अतिसंवेदित भाव, अंधश्रद्धा । सद्यकाली करिती मने द्विधा । इतिहास पुराणे जीर्ण गाथा । वेधणे जरि फोलं ।। २३४४ कुणास टळली विकार विकृती । भले भले तिचे बळी होती । दिव्य त्यांच्या केवळ कार्याप्रती । व्हावे जनांनी एकाग्र ।। २३४५ जितकी शिखा उंच आभाळांत । तितुकी पाउले खोल गर्तेंत । जरी मानिते त्यांना प्रेषित । समाजमन ।। २३४६ किंकारणे तरुणाई उद्विग्न ? कां अशी करूं पाहती भग्न । स्मारके ? पृच्छेचे या निराकरण । व्हावे कसे ?।। २३४७ माथेफिरू ? अविचारी अनाध्यायी । जीव जंतू तेथे नर-मादी ठाईठाई । प्रबोधनार्थ यांच्या सरसावुन येई । कोणी हरीचा लाल?।। २३४८ नशीब ! नाहीत शंभूराजे । वर्तन करून पळती जेजे । त्यां , 'मुसक्या बांधोनि आणिजे । सत्वर !' असते गर्जले ।। २३४९ मदांध अनाचारी सत्ताधीश । समग्र प्रजातींचा इतिहास । संशोधना लावण्या कसं । बुद्धिचा ! कालापव्यय ।। २३५० पिळदार पाहुनी नाही चळली । रंध्रांतुन सर्वांगी नाही गळली । वात्सल्य, ममतावृत्ती नाही ढळली । दाविता मादी ?।। २३५१ निसर्गदत्त कां नाकारतां । अंतरांतल्या या 'व्यथा' । सुसंस्कृत करोनि स्वयंचित्ता । वावरणेचि हितकर ।। २३५२ क्षुधा, तृषा तैसाचि काम । शमविण्या आवश्यक कर्म । युगानुयुगाचा वैश्विक हा धर्म । येतो विसरतां ?।। २३५३ कशास ओढावे कोणी बुरखे । आंत लाळेचे मारींती भुरके । लब्धमोहींचे हे रूप परकें आतांशा नाही सर्वदूर ।। २३५४ लेवून वस्त्र-प्रावरणे अंगभर । झांकतां येते उचंबळणारे अंतर ?। क्षणोक्षणी सामान्यतः:चर्येवर । होतेचि प्रकट ।। २३५५ शौथिल्य शरीरी, सुटती स्राव । पैलासमीप पोचली वाटते नावं । वरती घालिते कावकाव । पिंडासाठी घिरट्या ।। २३५६ उत्तरक्रिया ! केवळ कालापव्यय । दक्षिणाभिमुख करोनि ठेविती पाय । किरवंतांचा अजब, अतर्क्य न्याय । भाबड्यांसी कोडे ।। २३५७ भंग-भोग-उधळल्या रंगांच्या अनेक । चिंध्या शिवुनी बांधिली गोधडी एक । हेतूने, भाबड्या होईल उपयोग । गारठ्यांत कदाचित जरेच्या ।। २३५८ कडु गोड स्मृतींची शिदोरी । कशास ? परतुन यायचे ना घरी । अ-क्षररूपे सजविली वासरी । करोनि ओवीबद्ध ।। २३५९ भरा चार लोकांची पोटे । टिपुनि हाल-बोलते रूप गोमटे । 'उत्तरक्रिया' नामक 'विनोद'-वाटे । टाळणे, जाण्या श्रेयस्कर ।। २३६० आप्त म्हणती, 'जैजै राम' । तेंव्हा झालेला असतो कर्दम । 'आत्मा' वगैरे भाकड भ्रम । उत्तम, रवंथण्यासि ।। २३६१ अनाकलनीय मंत्रोच्चारणे । 'पुढल्या खेपेस, बरें मिळणे 'आत्म्यांस शरीर' म्हणे । सहज होते शक्य ।। २३६२ म्रुत्योत्तरी अवयव एकूणएक । आधी माती नि मग होतांत राख । सत्यापासोनि दूर पळण्या अनेक । उत्सुक अविरत भलेभले ।। २३६३ किरवंत मुख वासे केवळ । मूकपणे ढकलण्या कवळ । भवती स्नेही नात्यांचे मंडळ । साश्रु ! खरें ? खोटे ?।। २३६४ कोणा प्राशिला 'अ-मृत' प्याला ?! श्वास थांबला, तो 'मृत' झाला । माती ! तरी 'आत्मा' म्हणती, 'ल्याला' । शरीरवस्त्र नवे ।। २३६५ बरेंच सांगती, 'एकदां दाखवेन' । वेळ-स्थळ ? मध्यरात्र आणि स्मशान । जागृत टक्क नजरेने निद्रा नासोनं । म्हणती 'चला'!।। २३६६ देहांत पूर्णपणे भिनली नीज । निश्चल अवयव, बे-भान मगज । किति सुंदर अवस्थेचा साज । पाहा जाणिवे पल्याडचा !।। २३६७ शब्दविण्या विविध विषय । अल्पाक्षरींत सापडली लय । कितीसा आकलनीय आशय । मथिला मियें ? नकळें ।। २३६८ विविधांगी अधिक कमी । जन्मजात स-न कारात्म उर्मी । कारणी लाविती तदार्थ कर्मी । धारक वृत्तींचे ।। २३६९ कोणा प्रीत, वात्सल्य, माया । कोणा कणव, अंगभूत भूतदया । कुणाची सहजचि शहारते काया । देखता क्रौर्य ।। २३७० लाट झेपावे किनारी । समर्पण धारोनि अंतरी । परतुनि परि लोटे संसारी । जलधिच्या, नकळत ।। २३७१ तैसे कांहिसे मन होई । निश्चलता पांघरू पाही । फिरुनि मागे परि जाई । जाणवतां जिणे ।। २३७२ ज्ञानोब्बा म्हणुनी महान । गिळुनि सारे अपमान । वदला, वागला ठाम राहोन । संजीवन समाधिविचारा ।। २३७३ निवण्या आधी ज्योत भडके । प्रसरण्याने जड शुष्क तडके । वार्धक्य, कांहिसे तैसेचि मोडके । तोडू पाहे जिणे ।। २३७४ हौस बयो जरी 'पदराची' । असते तारुण्यांत जोखमीची । पडतांत जपण्याकरिता खर्ची । 'भोगतां'ना बाळे, परिणाम ।। २३७५ पदर ! भीती अवेळी ढळण्याची । पदर ! भीती व्यवधान चळण्याची । पदर ! भीती सहज चाळवण्याची । पडे नरांसही ।। २३७६ पदर ! युक्ति आकर्षण्याची । पदर ! शक्ति प्रजननाची । पदर ! 'आ'वृत्ती संगोपनाची । पांखर धरण्यासही सक्षम ।। २३७७ असून अडचण नसून खोळंबा । 'खोचा कमरेला नीट, नको ओळंबा । पदराचा ! सुखाने संसारांत राबा' ! वडिलधारे आरडती ।। २३७८ सत्तेंत बसले मांजर । घांट बांधूपाहाती उंदीर । वेडे भाबडे नाचती वानर । 'जन' ठरति 'धन' 'पेटींत ।। २३७९ पडद्यावर किळसवाणी । उत्सर्जने, तोड-फोडणी । 'पक्षां'ची राजकारणी । मदधुंद अहर्निश ।। २३८० परस्परावर बेछूट करिती वार । 'गुंडां'स शाल, श्रीफळ, आदर । यां पासोनि चार हात दूर । 'मत'प्रसंगी राहाणे बरें ।। २३८१ अनाघ्रात निरागसता मनी । आधारा विश्वासें बिलगोनी । मुद्रेवर खट्याळी उजळोनी । विमुक्त उचंबळे छकुला ।। २३८२ 'काळजी घे' म्हणे माय । 'समजाव ना म्हणजे काय । ठेउं पाहातो जिथे पाय । तातं-पावलांचे ठसें' !।। २३८३ 'हस ना गं जरा आई । कशास धरायाची घाई ?। मात्र,पडो जातां झडकरि घेई । उचलोनि!' वदे छकुला ।। २३८४ दृश्य तारकासमूहांचे पुंजके ।' 'बारशि'ली नामांनी जी अनेके । म्हणे, ती ग्रहांची असतांत स्थानके । कालमर्यादित ।। २३८५ दिन-रात होती लहान मोठे । प्राणिमात्रां अनुभवा येते । चक्रनेमिक्रमे घडत राहाते । नियमबद्ध, कालातींत ।। २३८६ अनुसरोनि त्यांसि नियोजिती । मनुष्ये आपुल्या रीती-भाती । विसरण्या कष्ट-वेदना, कृति । आचरती, म्हणती 'सण' ।। २३८७ बुडबुडा ! वायू सीमित, भवती द्राव । बुडबुडा ! झुळुकेचा परि होतां उद्भव । बुडबुडा ! मानोनि बहुधा तिजला अश्व । पळे आरुढ होउनी ।। २३८८ बुडबुडा ! निर्वातांत मुक्त प्रसरें । बुडबुडा ! जळपृष्ठी स्वैर विहरे । बुडबुडा ! सत्य भिडतां बोचरे । होई नाशवंत ।। २३८९ त्रिज्याधारी दर्पणी प्रतिबिंब । विकरते लौकिक नियमबंध । आकारांचे करिते सहजी भेद । भौमितीय शाखा ।। २३९० ( 'टोपाॅलाॅजी' [Geometry on a rubber sheet] चं तत्व मांडण्याचा एक 'गरीब' प्रयत्न ) सय एखादी ! घेतल्या आणाभाका । सय एखादी ! व्याकुळल्या हाका । सय एखादी ! आंत दबलेला हुंदका !। मोकळला विरहोत्तरी ।।२३९१ सय एखादी ! रुजल्या बीजाची । सय एखादी ! चाहुल अंकुराची । सय एखादी ! नादावल्या मनगटीची । तान्ह्याहातीच्या ।। २३९२ सई ! हरेका वेगळाल्या तऱ्हा । सई ! हाती न लागणारा वारा । सई ! दिवास्वप्न, भासंच खरा । सुखा-दुखारी ।। २३९३ बुडबुडा ! अस्तित्वाचे प्रतीक ?। बुडबुडा ! भयग्रस्त जिण्याचे रूपक ?। बुडबुडा ! ध्यानस्थ साधूंचा विवेक ?। क्षणभंगुरं ।। २३९४ बुडबुडे, ज्योत, मृद्घट रूपके । जीवनतत्वांत विविध कारके । अभ्यासकासि आशय-समृद्धके । साहित्यकृतींगर्भित ।। २३९५ विरोधांत परस्परांच्या बरळती । गरळ एकमेकांवर ओकिती । ऐशा 'कार्य'कर्त्या-नेत्यांची क्षति । 'उद्या' निश्चित पाहील ।। २३९६ निर्लज्ज बेमुर्वतखोर जमात । 'समाजकारणा'ची झुगारोनि कात । भाबड्यांचे आटविण्या रक्त । सरसावतील गुंड छुपे ।। २३९७ एका झाकोनि उघडा दुसरा । मुखवट्यांआड तोच चेहरा । निळा, पिवळा, लाल विविध तऱ्हा । 'निशाणा'सक्त निशाणांच्या ।। २३९८ ताठ करोनि पिचला कणा । थुंकून मूग घेतील शपथा आणा । खेचून मग ओरबाडतील 'यांना' । दुष्कृत्य-संहारहेतू, भाबडे ।। २३९९ नाठाळांच्या मर्कटलीला । रोजचा यांचा 'बैलपोळा'। संपदेवर सदैव मारिती डल्ला । सामान्यांच्या ! 'माज'कारणे ।। २४०० (१९-०१-२०१७) एकजात बगळे सगळे । 'योग'साधनेप्रती वळले । समोर भगवा वैनतेय ढळे । संपदा-सत्ता लालसें ।। २४०१ एकाग्र चित्तें बकध्यान । हेतूं ? योग क्षेम कल्याण । भक्ष डोकावतां जळांतुनं । चळें मती ।। २४०२ झाका रंजले गांजले नागडे । कंठासि शोष ज्यांच्या पडे । करोनि त्यांना तवान, तगडे । मग 'आळवा' योग-राग ।। २४०३ मनुष्यांसि अभिप्रेत माणूसकी । पूजा, ध्यान, अनुष्ठान शून्य बाकी । कष्टोत्तरप्राप्त ग्रासचि सार्थकी । जनसामान्यांना ।। २४०४ शांत निरव आसमंत । भारलेले क्षण निवांत । पंचतत्वांचा अनुभव अविरत । असंभव ऐसा ।। २४०५ ज्ञानेंद्रियांजुली भरभरून । स्पर्श, गंध, रूप, श्रवण । पळ भोगा विलक्षण । विरळा ऐसे ।। २४०६ वाटे शिरावे दृश्यांत । एक त्याचा भाग होत । स्वप्न ! उतरेल सत्यांत ?। ठावके कुणा !।। २४०७ एक गळता शाखेवर दुजे भवे । पालवीचे कवळे अलंकार नवे । गर्द राईंत पाखरांचे थवे । हिरवाइंत पुन:श्च वस्तीला ।। २४०८ फिकट पिवळा, मग पोपटी । गर्द हिरवा, डोळियांसि सुख-कुटी । जराबाधित शुष्क शाखेवरती । पुन:श्च पिवळा, गळण्याआधी ।। २४०९ पीत कवळ्यां सुखदायी हिंदोळा । पोपटी, हिरव्यांसि आनंद आगळा । पीत जरेचा जीव कंठांत गोळा । स्पर्शता झुळुक अलवार ।। २४१० कधि पालवते निराशा । कधि खुरटतेहि आशा । मन अपेष्टांत ऐशा । फसते यशपूर्व ।। २४११ कुण्या घरी खिन्न अंधार । कुण्या घरी आनंद अपार । भवसागरी लाटांवर स्वार । कुणि येरझारी ।। २४१२ मृदु कवळे रेशमी गुतविते । उचंबळ, उसळणारे भडकविते । जीर्ण शुष्क तडकुनि भंगते । वयोपरत्वे ।। २४१३ मेंदू बुद्धिचा निवास ?। मेंदू प्रज्ञेचा आभास ?। मेंदू संवेदना प्रवाहाचे अवकाश । मस्तकामधे ?।। २४१४ मेंदू बुद्धिचे कारक शरीर ?। मेंदू प्रज्ञा सगुण साकार ?। मेंदू संवेदना स्रोत सागर । मस्तकामधे ?।। २४१५ मरण बोलावे, मरण सांगावे । मरण स्पर्शावे, मरण हुंगावे । मरण भोगावे, विस्मरावेसुद्धा । मरण, जगतांना ।। २४१६ तळवे जोडून मस्तके झुकलेली । अष्टांगे, धरे समांतर झालेली । प्रार्थना ! केवळ एक देहबोली ?। शून्य मनासह ।। २४१७ बुद्ध, काली, अल्लाह्, वा ख्रिस्त । विश्वातिल निर्गुणी 'पूज्य' समस्त । याची कोणावर असेल भिस्त । अवतरता धर्मांध ।। २४१८ कोणी भंगतील अद्वितीय मूर्ती । कोणी आचरतील वमनकृती । कलाकृतींच्या नासतील स्मृती । कोणी विनाकारणे ।। २४१९ सारी असतांत मनाची खेळणी । कालापव्यय केवळ पूजा-अर्चनी । ठेवणे स्व-उंबरठ्या आंत 'लेणी' । रुचावे कोणा कसें ?।। २४२० अंधश्रद्धापूर्व अतीव भक्ती । आराधनोत्तर प्रणय प्रीती । व्याकूळ असोशी, विरहांती । प्रतिबिंबिती विखार ।। २४२१ भक्ती अपेक्षिते प्रसाद । प्रीती अपेक्षिते प्रतिसाद । कीर्ती अपेक्षिते आनंद । आप्त-स्नेहीजनांचा ।। २४२२ भवताली कोलाहल माजला । गर्दींस सामोरा केवळ एकला । नजरेंतल्या 'माणूसकी'चा भुकेला । मनुष्यांच्या, मी ।। २४२३ यश देते सुखसमृद्धीचा गारवा । अपयश काहिली, घुसमट, दुरावा । सहवास हितकर नित्यनेमे हवा । येरझारी लाटांचा, तरीही ।। २४२४ कधी आंबट तर कधी मिष्ट । कधी कटु तर कधी तुरट । रसनेची संवेदना मात्र बोथट । कधि न व्हावी ।। २४२५ आलापाद्वारे रागविस्तार । निवडक स्वरांचा आवीष्कार । नादसोपानाचा चढ-उतार । सफलक्रम असावा ऐसा ।। २४२६ आरोही अतिजलद स्वरावली । कंठांत तपस्योत्तर स्थिरावली । अवरोही आपेआप मग मोकळी । संगीत तत्व !।। २४२७ कधि समेवर आघाती । कधि दिसावी अनाघ्राती । रचनेच्या कधि विविध गमती । श्रोत्यांना सुखावह ।। २४२८ स्वररूपे नादाला दिली । रचनाकारांची नामे जाणिली । कोणि ? अज्ञातंचि राहिली । निरपेक्षपणे ।। २४२९ मूर्च्छना ! थाटाचा मूलगर्भ । मूर्च्छना ! स्वरचमत्कारारारंभ । मूर्च्छना ! पांडित्याचा अवलंब । निष्णातचि जाणे ।। २४३० अल्पमति मी, माझे अल्पज्ञान । विविध विषयसंदर्भी विधानं । करितो ! प्रमादोत्तर उपटा कान । विना संकोचे ।। २४३१ संदर्भाविना साकारते अधांतरी । तरंगते कधी अल्पाक्षरी जरी । आशयचक्राची बळकट आरी । चरणी अर्धाधिक तीन ।। २४३२ लब्धप्रतिष्ठित न होतो, नाही । न संभवेन कधि भविष्यांतही । स्नेहीजनांच्या मनांत शोधून पाही । आत्मीयतेचा निवास ।। २४३३ मूर्च्छना ! चक्रव्यूह स्वरांगणांत । मूर्च्छना ! प्रवेश सहजी कदाचित । मूर्च्छना ! भेदोनि परतणे मूलांत । दमछाक भल्यांची ।। २४३४ ज्ञानाचा सर्रास व्यापार । गुरुकुल प्रथेचा अनादर । धडपड उमटविण्या मोहोर । पांडित्याची ! करिती विद्या(?)र्थीं ।। २४३५ सर्वक्षेत्री अश्लाघ्य, अनिती । बेगडी प्रतिष्ठार्थी अवलंबिती । रोज नवनव्या अतर्क्य क्लृप्ती । संशोधितीं चातुर्यें ।। २४३६ विश्वाचे आकुंचन प्रसरण । म्हणजे श्वासोच्छ्वास ? महाप्राण ?। शरीरोत्सर्जित प्राण त्यांतं विलीन । लौकीक होतो मृत्योत्तर ?।। २४३७ अनेक प्रष्णांची शृंखला । ठाकते सामोरी दर पळाला । निरगांठी प्रयत्नें उकलण्याला । धजे जरा ।। २४३८ 'ह' कार ! उच्छ्वासोच्चार रंग । 'ह' कार ! महाप्राणाचे अंग । 'ह' कार ! व्यंजनासि अधिकयोग । बाराखडींत, द्वि-चतुर्थस्थानी ।। २४३९ ( ख/ घ /छ /झ /थ /ध /ठ /ढ /फ /भ ) हुंकार ! ना दंत्य वा ओष्ठ्य । हुंकार ! नासिका करिते सारथ्य । हुंकार ! व्यक्त होण्या स्वीकार्य । भावना,एकाक्षरी ।। २४४० 'ह'कार जर अनुस्वारांकित । 'अ'कार करा अनुस्वारांकित । मात्र जाणा नकार निश्चित । प्रतिष्ठता पूर्वपदी ।। २४४१ मर्कटांच्या सद्यकाळी टोळ्या । भिकेसाठी पसरती झोळ्या । भाजावया स्वत:च्या पोळ्या । हाळि, 'वाढ मत गे माय' ।। २४४२ जो तो परस्परांच्य पिरगाळी । शेपट्या ! करित शिवी गाळी । उतरवू पाहती भाबड्यां गळी । आश्वासने तद्दन खोटी ।। २४४३ गुंड कुणि, कुणि विदूषक । अखेरी 'सर्वकार्येषु' विनाशक । एखादाचि कृतिकार्य साधक । 'भाई'गर्दींत या ।। २४४४ अतर्क्य यांच्या निर्घृण खेळी । हेतू ? लूटमार, 'गंगाजळी' । आधी धुळवड मग होळी । हवि जनसामान्यांची ।। २४४५ 'पाहा, राव हा अर्धवट । 'अखंड क्रमतो मार्ग भ्रष्ट । बांगडी फुटली जरि लाखांत । तंडती निर्लज्ज ।। २४४६ नक्राश्रू गाळित अति संतापाने । भयग्रस्त, आकुंचित नैराश्याने । गांजले एल्गार करतील उठावाने । पळता भुई होइल थोडी ।। २४४७ जरी इप्सित लाभली असिधार । उडविण्या भ्रष्ट 'दादा' चार । बीजे फळोनि बचनागांकुर । उगवतील ! वरदान विकृतीस ।। २४४८ सांडेल कां खळांची व्यकटी । फळे रसाळ शुद्ध बीजापोटी । सुदृढ, निर्मळ निरागस गोमटी । कधि अवतरतील ?।। २४४९ असंबद्ध, आक्रस्ताळी, भयग्रस्त । सत्तालालूप, चिंताक्रांत, त्रस्त । बेमुर्वत, निरर्गलक्षेत्र प्रविष्ट । भाषा 'पक्षां'ची ।। २४५० अधिकयोगे अधिक फळ । छेदनीती जवळिकीस अवकाळ । नैराश्य, अज्ञातवासाचा जाळ । मग केवळ उरेल ।। २४५१ वाभरे आचरट अपरिपक्व नेते । 'कधी एकदा सत्ता मिळते' । मनोमनी निद्रेंत संपदा-स्वप्नांतें । पाहती उतावळे ।। २४५२ ज्या नाही आदि वा अंत । जो कधी न होणे सजीव, मूर्त । धांडोळा घेत राहाणे, निश्चित । त्याचा ! वृथा कालापव्यय ।। २४५३ कुणी धनिक निवान्त निश्चिंत । कुणा क्षुधा-तृषा-शमन भ्रांत । ऐशा प्रकांड भयावह दरींत । शोधणे 'ईश्वर' हास्यास्पद ।। २४५४ ज्या नाही अखेर वा सुरुवांत । कधी न जो येई दृष्टिक्षेपांत । त्यां मागे अपेक्षेने धावणे व्यर्थ । अनंत डावलून कर्मे ।। २४५५ आव्हाने लौकीक जे अव्हेरुनी । सिद्ध मिरविण्या बिरुद 'आत्मज्ञानी' । म्हणावे त्यांसि प्रपंच-रणांगणी । भेदरट, पळपुटे ।। २४५६ 'आत्मा' संकल्पनेचा खल । भोंदू, 'संधि'साधूंचे भांडवल ।. अपप्रवृत्त, फुकट्यांचे हे जाल । झुगारणे हितकर ।। २४५७ आप्तजनांचा मान राखितो । गरजांचे भान यथार्थ ठेवितो । प्रपंची सत्कर्म अखंड करितो । 'मनुष्य' जाणा !! २४५८ कष्टोत्तरी स्वेदबिंदू भाळावर ओघळतां बुबुळांत अनावर । जागवितो कर्तव्याची 'नजर' । आप्तांप्रती ।। २४५९ मनोरे साकारले हस्तिदंती । बाळपणींच ज्यांच्या भवती । त्यां कशा 'कळा'व्या भ्रांती । कष्टकऱ्यांच्या ?।। २४६० सांगो धजाल 'आत्मज्ञान' ?। पाठीची जो करोनी कमान । क्षुधा-तृषार्त गांजले आप्तजन । जोपासण्या, वाहतो 'संसार ?।। २४६१ 'आत्मज्ञान' ! प्रदेश तुष्टांचा । 'आत्मज्ञान' ! प्रदेश 'कर्म'भ्रष्टांचा । 'आत्मज्ञान' ! काटेरीच्या रोपट्यांचा । प्रदेश दुरापास्त ।। २४६२ झाली जरी अपघातें होळी । नाही फैलावणार झोळी । परक्या मुखीची ओढण्या पोळी । आयती ! कर्मयोगी ।। २४६३ आळशी, बेपर्वा, कर्तव्यच्युत । मानगुटी त्यांच्या आरूढ भुतं । 'खाटल्यावरी हरी देईल' सांगत । चळविती भाबड्यां ।। २४६४ व्याधी अवकळा जयांना घेरी । करावी लागते मग उसनवारी । व्यथां-वेदनांच्या कहाण्या अघोरी । धनसत्ता मदांधास अस्पृश्य ।। २४६५ बोटं मोडणं ! कानशिलावर । बोटं मोडणं ! तळ हातावर । बोटं मोडणं ! एकक संख्यांवर । कृतिहेतू अनेक ।। २४६६ घास, अंजुली, पसा वा चिमुट । बोटांची विविधपरी, एकवट । पुरेशी, मूक ठेवोनि ओठ । कार्यसिद्धीक्षम ।। २४६७ तर्जनी ! दर्शक, शासक, वेधक । तर्जनी ! वक्र, घृतप्राप्ती साधक । तर्जनी ! रोधक कधि अनुमोदक । परिस्थितीजन्य ।। २४६८ झुंजुरका केवळ शब्द-वारा । खुरटलेला आशय 'पिसा'रा । ग्रासत जायं हळुहळु जरा । कालव्यया हितकर ।। २४६९ जाणि-नेणिवे पल्याडावेरी । पोहोचण्यापूर्विचि शिदोरी । अनुभवाने जगण्याच्या खरी । लाभली असे ।। २४७० का कोण जाणे सद्यकाळ । भासे जगण्यावर झाकोळ ? जैसे आटोनि जाय जळ । जाळाशी भिडतां ।। २४७१ जैसी समईंतली दीपकळी । वेगे उत्सर्जित राही काजळी । तेजोसीमांती तैसी तमपोकळी । बाहे पसरोनि बाहू ।। २४७२ उरलीसुरली मातेरी खरकटे । इतस्तत: ओघळलेली शिते । निवण्यापूर्वी सावडण्यापुरते । राहिले पाहिजे भान ।। २४७३ असाध्य जडता चेताव्याधी । देहावयदाना नामी संधी । न दवडिता औषधी. अवधी । छाटावे जिण्याचे पर ।। २४७४ मन तवान ताजे नि उभार । उकलत जाई शब्द संभार । जुळवित जोडित आशय बळ । होण्या 'सा'र्थ ।। २४७५ फुलपाखंराची होता माती । मुंग्या एकवटोनि सहज वाहती । तैसी कांहिशी मनुष्यांची नीती । प्रतीक्षिती पतन ।। २४७६ ओरबाडोनि सत्ता प्राप्त्योत्तर । आरूढ होण्या सिंव्हासनावर । स्वप्ने दिसती धुंद, आनंद विभोर । मुद्रेवर 'भिकाऱ्या'च्या ।। २४७७ 'ती' देते अधिकार, अपार संपत्ती । 'ती' वाढवते नाकर्त्यांची महती । परिणामी फोफावते मदांध अपप्रृत्ती । 'ती', कुबीजांतुनी ।। २४७८ शब्दांचाचि क्रीडाहेतू छंद । शब्दांचेचि अतूट स्नेहबंध । शबंदांचाचि आवेगाला बांध । भावनांच्या ।। २४७९ रतीब रोज माझा शब्दांचा । कसं लावोनि जोखण्याचा । अधिकार सर्वस्वी तुमचा । वारण्या 'फोल'पटे ।। २४८० जगणे, जगविणे । कोणत्याही उपायांने । जरी संपले जिणें । बरे नोहे ।। २४८१ शिकवण, विचार, संस्कार । बिंबविलें कोवळ्या मनावर । जुळती हस्त, नत शिरं-शरीर । समई उजळतां, आपेआप ।। २४८२ नाही प्रत्यक्ष जरी दिसत । आणि राहाते वर्णनार्तींत । धरूं पाहातां शब्दांत । केवळ कृतिसुख ।। २४८३ गर्तागमनी ! निरक्षरतेचा अंधार । गर्तागमनी ! विद्वत्तेचा अहंकार । गर्तागमनी ! असाध्य विकृतीज्वर । अतिरेकी ।। २४८४ अंधश्रद्धेचे भय, गंड सार्थ । माडले आहे उपनिषदांत । अडली गाढवे पाय धरितांत । तरिही अभाव'देवा'चे ।। २४८५ तेल नको नमनाला घडाभर । करण्या 'प्रेम' शब्दोच्चार । एकवटूनि अवघा धीर । मोकळा युवामित्रहो ।। २४८६ हात जोडणे वा नाकारणे । स्वीकारणे वा विविध बहाणे । त्यासि परि नाही देणे घेणे । निसर्ग जाणा ।। २४८७ अफाट तेज विषय दृष्टीचा । नाद जैसा श्रवणेंद्रियांचा । अनुभव एकत्रित उद्भवाचा । 'ॐ', विज्ञानसिद्ध ।। २४८८ कालचा गोंधळ बरा होता । आतां नवे गुंड, राज्य, सत्ता । वाढेल यांचा 'माल', मत्ता । पटीने, शीघ्रगतीने ।।२४८९ घटितांची विरोधी जैसी मुळे । वेगळी तैशी साहाजिक फळे । परिमाणांचे परिणाम वेगळे । मिसळूं जाता ।। २४९० टाकाऊ ते फेकावे । उपयुक्त तें राखावे । रक्षारूपी विलीन व्हावे । स्वत्व नि:सत्व होता ।। २४९१ म्हणोनि राखाव्या आठवणी । वेदनांची दुखणी बाणी । गाइलेली आनंदगाणी । काळजांत ।। २४९२ तमगर्भी उचंबळ । तेजाची जन्मवेळं । तारकांची मंडळं । सरितेंत अवकाशी ।। २४९३ तमाकर्षी अतिवेगी कणं । तेजास देत आत्मभान । संपृक्तावस्थी एकवटोनं । झाले तारकारूप कां ?।। २४९४ ऐसी अगम्य कोडी । विचारांची करिती कोंडी । उकलूं, उघडूं पाहतां घडी । अंतरांत ।। २४९५ तमाभावी उरेल काय ?। अनिर्बंध तेजाचे भय ?। किनारा-सीमादि संज्ञांचा लय । आपेआप ।। २४९६ विसाव्यासि किनारा हवा । थकलेल्यासि उभार नवा । क्रमणासि मार्गप्रदीप तेवावा । तमावल्या अंतरात ।। २४९७ संथ शांत जळावर । लाट होता डौलाने स्वार । विलोभनीय उघडते द्वार । त्रिमितीचे ।।२४९८ साद एकली विरून जाते । प्रतिसादाने परि शहारते । मीलनाच्या स्वप्नाहाते । सिद्ध कवळण्या ।। २४९९ पंचशतकी द्विसहस्रोत्तरी । मूढमतिने रचिल्या अल्पाक्षरी । नमून मियें शिरी-शरीरी । विनितो, करा स्वीकार ।। २५०० ********** २०-०२-२०१७, सकाळी ७.४५ (दोन वर्षं, आठ महिने, सहा दिवस) असंस्कृता सामोरी ठाकते वारंवार । आपदा, वेदना ! परिणामी अखेर । सुलभ दाविती युक्तिचे चार । संस्कार, त्यांना वारण्या ।। २५०१ साद ! भयनिवारणा पित्यासि । साद ! वेदनाशमनार्थ मातेसि ! साद ! मार्गदर्शनार्थ अपत्यांसि । जगरहाटी ।। २५०२ रांधा ! पोळल्या देण्या पोटभरे । सांधा ! उध्वस्त-उजाडली घरें । मशिदी, गिरिजाघर, मंदिरे । बांधा ! मग सवडीने ।। २५०३ राष्ट्रध्वजांतले चोरोनि पवित्र रंग । लक्तरांवर फांसत, झोकोनि भांग । वेडीवाकुडी हलवित अंगप्रत्यांग । निलाजऱ्यांनो नाचूं नका ।। २५०४ उद्रेक ! वात्सल्य, प्रीती, मत्सराचा । उद्रेक ! असोशी, मीलनेच्छा, विरहाचा । उद्रेक ! क्रोध, द्वेष, हेटाळाचा । उतरुद्या अक्षरासिधारी ।। २५०५ रंगांना असतो नाद ?। रंगांना असतो गंध ?। रंगांना भोगतिल अंध ?। ज्यां योगे, सहज ?।। २५०६ रंग, नखे-ओठ-केशकलापावरी । अलंकार, जरीकाठी शरीरावरी । व्याधी असाध्य अंतरेंद्रियांसि घेरी । मनुष्याचे जिणे ।। २५०७ रंग, नखे-ओठ-केशकलापावरी । मुखांत जिव्हा उपमर्दासि दुधारी । केसाने कोणी आप्ताचा गळा चिरी । कवळ्या गर्भांसि लावी नख ।। २५०८ मार्ग सुयोग्य, सार्थ । शोधणे क्रमप्राप्त । फिरतांना गाडग्यांत । हितकर, स्वत: ।। २५०९ पंचतत्वे ! घटक अनिवार्य । दृश्यरूपे जी करिती कार्य । जर पावली अचानक लय । घडेल अनर्थ शब्दश: ।। २५१० असीमासि गुणा वा घनफळा । असिम त्यांत मिसळा वा गाळा । व्यापोनि काष्ठ-पाषाण-जळा । असीमचि उरेलं ।। २५११ दाही दिशांना मोकळे । संकुचे प्रसरे स्वबळे । मनुष्यांशि परि नाकळे । ते असीम ।। २५१२ ये ना मृत्यो, ये ना बापा । तम पांघरेन ओढून झापा । अंतर्बाह्य उजळोनि रूपा । ऊर्जा उधळेन अवकाशी ।। २५१३ ये ना मृत्यो, ये मज कवळी । वार फुंकोनि फडफडती दीपकळी । जराजर्जरें अवकृपा अवकाळी । भयावह, तुझी ।। २५१४ ये सुहृदा मृत्यो, आवळ फास । नात्यांचे रेशमी ये, तोड पाश । लंघतांना भव क्लान्त दास । आज विनवितो ।। २५१५ ****** आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाचं यमक.. प्रत्येक दृष्टीस । 'देव' (?) गा आगळा । निसर्गाच्या गळा । माळ कधी ?।। २५१६ भजन पूजन । माळ वा हेटाळ । आपुले तंत्र-ताळ । ना सोडतो तो ।। २५१७ ठाई ठाई देतो । दर्शन विनाकष्ट । तुकवीती मान 'भ्रष्ट' । तरी 'दगडां'पुढे ?।। २५१८ शहाण्या सुरत्या । कैसा भ्रम होई । आपदांची खाई । वासता मुख ।। २५१९ कैसी रहाटी येथं । ठाकतो अभावे । त्यासी मनोभावे । पूजती जन हे ।। २५२० सारे तुम्ही मसि । नावाला अक्षरे । मुद्रांचे मोहरे । अनोळखी ।। २५२१ कोण कोठे स्थित । नाही देणे घेणे । अक्षरांचे लेणे । अबाधीत ।। २५२२ तांबडं फुटतां । एकट, एकला । अंतरीच्या कळा । भोगावया ।। २५२३ तांबडं फुटतां । उमलते मन । अक्षरांचे रान । खुणावते ।। २५२४ प्रांत:प्रभेसवे । आनंद लहरी । स्वीकारा तमारि । नित्यनेमे ।। २५२५ श्यामघन पाहा । ओथंबू लागले । दिवस की गेले । पोकळीला ?।। २५२६ तुटेस्तो ना ताणून । राखावी अंतरे । सारासार विचारे । व्हावा निग्रह ।। २५२९ विसाव्यासाठी ।स्वत:ची सावली । पावलोपावली । निष्प्रभ ।। २५३० तोल ढळो जाता । होतो कां आधार । पायांचा उभार । आपुल्याची ?।। २५३१ वेदना गांजता । स्वत:चा तळवा । होतो कां हळवा । पांपणीकांठी ।। २५३२ लौकीकार्थी पाप । झाले नकळत । घेणे प्राय:श्चित्त । साधते कां ?।। २५३३ संभव होईल । काळीज-सावरी । मनाला सावरी । कधी असे ?।। २५३४ मंथनोत्तरी आतां । थको पाहे मती । मिळेल कां गती । 'सीमो'ल्लंघा ।। २५३५ वारी कल्लोळाची । कधी शिखेवरी । कधी खोल दरी । भयावह ।। २५३६ असह्य जाहले । भणभणे डोके । काळजाची भोके । भळभळा ।। २५३७ धरेवरी कोण्या । 'मनुष्या'चे जिणे । निरपेक्षपणे ?। असंभव !।। २५३८ मुद्रेवर जरी । बेगडी आढ्यता । निखारा पेटता । अंतरांत ।। २५३९ कशासाठी कोणी । वाराव्या वासना । जिण्याच्या वसना । फेडोनी उगा ।। २५४० 'कुंभां' मधे कुंभ । वासनांचे हाती । घेवोनि 'भिक्ष'ती । नग्न भोंदू ।। २५४१ काळजाचे ठोके । नित्यनेम जीवा । कशासाठी हवा । श्रेयनामा ।। २५४२ जे जे झाले भूत । त्यासी स्थिती. अंत । आहे कां विश्वांत । अपवाद ?।। २५४३ जिण्याच्या वसना । लागतांच धस । कावळ्यांचे घोस । भवताली ।। २५४४ शाखांचे धारिष्ट्य । भास्करा भंगती । घेऊन सांगाती । पर्णभार ।। २५४५ नुळांत नश्वर । चित्र वा मूर्ती । उगा श्रेयाप्रती । नेऊं नका ।। २५४६ निरव, निवांत । उधळले रंग । धरेचे हे अंग । पंचतत्वे ।। २५४७ अंतरांत भय । शोधते निवारा । विवेक सारासारा । सारोनी दूर ।। २५४८ भय वारा, सारा । श्वास घ्या मोकळा । गाता व्हावा गळा । जगतांना ।। २५४९ 'लिहिण' खूपच सोपं असतं 'सर्जनाची देणगी' वगैरे मुळीच नसतं व्यक्त व्हायचं भान लागतं उचंबळ आवश्यक हृदयी... सर्वसामान्य ? मूक कवी ! कवि ? मन मथणारी रवी ! व्यक्तण्याची जिगिषा मात्र हवी ! सहज नि बोलींत.. शिकू शमवाया । वेदनां, दु:खाला । विकृत व्याधीला । स्रोत बहू ।। २५५० ज्योत पुन्हा लावू । गाउलिच्या डोळ्यांत । कसायाचे हात । झाले बहू ।। २५५१ जळाच्या भवती । कधी हिरवळ । कधी पानगळ । सोबतीनं ।। २५५२ एका जिण्यामध्ये । आनंद विभोर । दु:खाची झालरं । सोबतीनं ।। २५५३ एकाचं जिण्यांत । यौवनाची झिंग । जर्जर अंगांग । सोबतीनं ।। २५५४ एकाचं जिण्यांत । ग्रीष्म आगडोंब । आषाढ ओथंब । सोबतीनं ।। २५५५ एकाचं जिण्यांत । मोडलेला कणा । प्रसवाच्या वेणा । सोबतीनं ।। २५५६ एकाचं जिण्यांत । तरुवर मोहोळ । सावळी शीतळ । सोबतीनं ।। २५५७ एकाचं जिण्यांत । आपदांचा जाळ । हास्याचा कल्लोळ । सोबतीनं ।। २५५८ एकाचं जिण्यांत । अजीर्णी ढेकर । भिक्षेची भाकर । सोबतीनं ।। २५५९ एकाचं जिण्यांत । यशाची पायरी । निराशेची दरी । सोबतीनं ।। २५६० एकाचं जिण्यांत । उन्हाचा तडाखा । थंडीचा कडाका । सोबतीनं ।। २५६१ स्नेहबंध दृढ । क्षणांत तोडते । मनासी ताडते । एकलट ।। २५६२ हात हातांमध्ये । हातं खांद्यावर । कधी पाठीवर । भावस्पर्शी ।। २५६३ दृष्टीद्वारा व्यक्त । कधी आश्वासक । कधी कवतीक । वीनापेक्ष ।। २५६४ तसे येणे जाणे । स्वाभावीक जरी । झोंबते जिव्हारी । स्नेहांतांकी ।। २५६५ एकाचं जिण्यांत । सुखाच्या कावडी । दु:ख, टोळधाडी । सोबतीनं ।। २५६६ एकाचं जिण्यांत । श्रावणाच्या सरी । भेगा भूईभरी । सोबतीनं ।। २५६७ एकाचं जिण्यांत । क्रौंचाचा आक्रोश । अनुष्टुभ घोष । सोबतीनं ।। २५६८ कोणी करून । कोणी न करून । कोणी नाकारून । एकवटती ।। २५६९ (घाशीराम कोतवाल मधे 'तें' नी लिहून ठेवलय समानार्थी..) एकाचं जिण्यांत । यशाची तोरणे । ' वस्ती'वर जिणे । सोबतीनं ।। २५७० एकाचं जिण्यांत । बिल्वर, गंठण । सासरीं कुंपण । सोबतीनं ।। २५७१ एकाचं जिण्यांत । हात खांद्यावर । पाठींत खंजीरं । सोबतीनं ।। २५७२ एकाचं जिण्यांत । माय पान्हावेली । नाती दुरावेली । सोबतीनं ।। २५७३ एकाचं जिण्यांत । शिंपल्यांत मोती । शोणिताला माती । सोबतीनं ।। २५७४ एकाचं जिण्यांत । आभाळाचा माया । लोपलेली रया । सोबतीनं ।। २५७५ एकाचं जिण्यांत । पती धांदरट । राया अंगलटं । सोबतीनं ।। २५७६ 😜😜 इवलासा कोंभ । तोरा ऐटदार । विश्वास अपार । जगण्याचा ।। २५७७ निसर्ग पाहातो । मनुष्यांचे धार्ष्ट्य । २५७८ स्मरोनी अगस्त्य । करीती जे ।। पाय सुखासाठी । करीतो उपाय । मऊ मातीमाय । दुर्लक्षोनी ।। २५७९ एकाचं जिण्यांत । पहाट निरव । काळजां कालव । सोबतीनं ।। २५८० पहाट नीरव । डोळां दहिवर । अश्रू अनावर । सईंसंगे ।। २५८१ गर्द हिरवाई । अनावर दाटी । सीमादंड दाटी । वृथा तीसं ।। २५८२ नका बांधु 'त्यांस' । 'तो' अनिर्बंध । करेल आक्रंद । विनाशक ।। २५८३ जिगिषेला जणू । लाभलीअसिधार । फोडोनी फत्तर । पर्णावली ।। २५८४ स्वागताला मग । शुभ्र झाले सिद्ध । पंच पाकळ्यांत बद्ध । पुष्पावले ।। २५८५ कीर्ती म्हणे यांची । जाहली दिगंत । निमालेली वात । स्वगृही ।। २५८६ कीर्ती म्हणे यांची । सुवर्ण झळाळ । उजाड आभाळ । स्वगृही ।। २५८७ कीर्ती म्हणे यांची । थेट तळागाळी । भाकर हो शिळी । स्वगृही ।। २५८८ कीर्ती म्हणे यांची । सत्याग्रही घोर । आप्त वाऱ्यावर । स्वगृही ।। २५८९ कीर्ती म्हणे यांची । सेवाभावी, व्रती । फाटकी धडूती । स्वगृही ।। २५९० कीर्ती म्हणे यांची । पालवी नवेली । सुखे सूकलेली । स्वगृही ।। २५९१ कीर्ती म्हणे यांची । वात्सल्य ल्यालेली। मुले कोमेजेली । स्वगृही ।। २५९२ कीर्ती म्हणे यांची । दातृत्वाचा मळा । एकादशी निर्जळा । स्वगृही ।। २५९३ झुंजतांना जीव । थकला सर्वांगी । धारातीर्थालागी । पडो पाहे ।। २५९४ आधाराला मध्ये । शाखा कणखरं । संसार घर दारं । जैसे जगी ।। २५९५ एकाचं जिण्यांत । प्रेमावेग कथा । विरहाच्या व्यथा । सोबतीन ।। २५९६ एकाचं जिण्यांत । पायघड्या, मांडवं । आपदांचे तांडव । सोबतीन ।। २५९७ एकांच जिण्यांत । डोरल्याच्या वाट्या । ऊलट्या-सुलट्या । सोबतीनं २५९८ एकाचं जिण्यांत । झुलतो पाळणा वेणांच्या वेदना । सोबतीन ।। २५९९ एकाचं जिण्यांत । तान्हा घरभरं । सुरकुती कांपर । सोबतीन ।। २६०० जरा उग्र होता । मती मंद होते । शरीरहि कोते । होत जाय ।। २६०१ ********* २१ मार्च २०१७ ऊन सावलीची । पायातळी नक्षी । हिरवाई साक्षी । भवताली ।। २६०२ भाळावर मेघ ?। की भादव्या अवेळी ? । आनंदा ना जळी । पारावार ।। २६०३ भाळावर मेघ ?। की श्रावण अवेळी ? । छाया-प्रकाशाची खेळी । वारंवार ।। २६०४ दृष्टीक्षेपी एका । पाने, फुले, फळे । वैभव आगळे । सामावले ।। २६०५ सदस्य सारे । सुखी संसाराचे । प्रतिनिधी साचे । पूर्णत्वाचे ।। २६०७ एकांचं पटलावर । निष्पर्ण शाख शुष्क । शशिबिंब आश्वासक । संगतीनं ।। २६०८ गिरिवराच्या अंकी । लालिमा ल्यालेला । बालसूर्य पहुडला । क्षणभरि केवळ ।।२६०९ तेजोवल्लरीवरी । अनुपम दीपकळी । देत आहे हाळी । 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत' ।। २६१० पाषाणास पाहा । कपितुल्य आकार । हरळी अंगभर । नटावया ।। २६११ नवल देख माये । तृणमूलाचा प्रहार । कठोर फत्तर । सहजी भेदे ।। २६१२ लाल भाळावर । चांदव्याचा टिळा । सृष्टीचा आगळा । शृंगार साज ।। २६१३ लाल भाळावर । शुभ्र चांदव्याची कोर । आगळा शृंगार । सृष्टीचा ।। २६१३ वृद्धवल्या घरांत । शैशव जपलेली । हट्टीही झालेली । बाळे दोन ।। २६१४ अशितकी मुले । नी शतकी माय-बाप । उधाण आपेआप । आनंदाला ।। २६१५ एकांच घरांत । शशिबींब सहस्र । शताब्दीस बहर । हिरवा-कवळा ।। २६१६ आते जाय पैलं । मामंजी माघार । पोरके जैसे पोर । कोंडलेले ।। २६१७ मामंजीस पैल । आते घरी रडे । रांधे, वाढे काढे । खरकटी परी ।। २६१८ संसारी सुनेच्या । जांच होय भारी । लाचारी जिव्हारी । झोंबतसे ।। २६१९ शुभ्राभ्र कुक्कुट । भेदरल्या नेत्री । श्वापदांच्या गात्री । सूड पाहे ।। २६२० मेघांचे आकार । पालटती रूपे । मेधा आपेआपे । कल्पू पाहे ।। २६२१ कठोर खडकावर । प्रीतभाव उमले । जळ थबकोनि घुटमळे । साठवण्या क्षण ।। २६२२ तोच सूर्य । तीच आभा । लालिमा नभा । रीतीने ।। २६२३ काय नवे । सांगा व्हावे । व्यक्तोनि भावे । शुभचिंतनं ।। २६२४ फुकाचींच चित्रे । गुळगुळींत पत्रे । मन नि गात्रे । जरि विरोधांत ।। २६२५ व्हायचे आहे जे । टळते कां ? छे !। वृथा कां मग ओझे । प्रयत्नांचे ?।। २६२७ जरा होवूया सजग । निरखण्या खरें जग । भूक, तहानेची आग । विझवू कर्मयोगें ।। २६२८ शुभचिंतने पाहोनी । उबगला जीव । उतरला भाव । सद्भावाचा ।। २६२९ उच्चार किंकारणे ?। हेतु ? नाकारणे ?। गर्भित होते स्वीकारणे । आपेआप ।। २६३० तेथे कोटींचा वाडे । येथे जीर्ण कोठीचे वावडे । भाबडा, विकोनि 'शिववडे' । भरे खळगी ।। २६३१ मुंडक्याच्या मागे । सावळा गायब । बडवा नायब । पंढरीचा ।। २६३२ एक पेशीय उत्पत्ती । बहुपेशीय स्थिती । उत्क्रांत्योत्तर लया जाती । मर्कटे, मेधाग्रस्त ।। २६३३ रटरटत्या कथिला । सुवर्णाची साय । तैसे कांहिसे होय । मजलागी ।। २६३४ माझिया चिरगुटा । भरजरी बासन । तेचि 'सिंव्हासन' । मजलागी ।। २६३५ साहित्य पैठणी । ढुढ्ढाचार्य वसती । अनुदानाची मस्ती । रोमरोमी ।। २६३६ म्हणे आहे उभा । कर कटेवरी । खरकटे घरी । माजते आहे ।। २६३७ पूर्णोन्मलित जरी । नम्रभावी होय । चुंबे मातीमाय । कृतज्ञतेने ।। २६३८ काळ्या मायेला । फूल मूल झाले । सर्वांग लोटले । समर्पणा ।। २६३९ सत्तेच्या वावरीं । मदांधांचे तळ । क्रांतीत अवेळ । ठावकी नाही ।। २६४० सुख म्हणजे । असते काय ?। तान्हा लुचे माय । भुकेजला ।। २६४१ संगतीनं दोघं । पाहू जगाकडे । सुखाला कवाडे । उघडूया ।। २६४२ संगतीनं दोघं । घेऊंया कां झेप?। संघर्षाचे रूप । आकळण्या ।। २६४३ संगतीनं दोघं । वेचू काडी काडी । संसाराची घडी । बसवाया ।। २६४४ वर्तले नवल। स्वप्रभा फाकोनी । विश्वास व्यापोनी । दशांगुळे उरला ।। २६४५ परदु:ख देखता । शहारते काया । हात धरावया । सरसावे ।। २६४६ परदु:ख जर । असेल शीतळ । कणवेस उचंबळ । कां येई बा ?।। २६४७ परदु:खें होई । मन सैरभैर । पांपणींत दहिवर । साकळूं पाहे ।। २६४८ परदु:ख देखता । खंतावते मन । स्वसुखाची जाण । बळावते ।। २६४९ परदु:खें सांकळे । पांपणींत दहिवर । अवचित धूसर । दृष्टीपथ होई ।। २६५० साहित्यपंढरींत । बडव्यांचा पहारा । नवोदित थरथरा । कांपतसे ।। २६५१ जळ शीतळ निश्चळ । तटी हिरवेकंच धन । विसावण्या क्लान्त मन । उत्कंठले ।। २६५२ अनावर वडवानल । बेभान अनील । आभाळा जळ चुंबेल । प्रलयवेळी ।। २६५३ संस्कृति विकृती एके ठाई । नांदतांना विश्व पाही । दयार्णव संत करुणामई । चिरडे उपद्रवी मत्कूण ॥ २६५४ विकृती प्रकृतीचे विडंबन ?। विकृती प्रकृतीची बहीण ?। विकृती प्रकृतीची बाही धरून । वसते मनुष्यांत सदा ॥ २६५५ कोण, दाखवा महाभाग । अंतरी रुखरुख वा राग । नाही ! वा लौकिक भोग । समोर ठाकता अव्हेरी ॥ २६५६ अगोतलीवरी । गुरगुट्या भात । लोणकढे रवाळ घृत । त्यावरी ।। २६५७ कैरीचे लोणचे । इवले मेथीकूट । चंगळ पंगत । छकुल्यां, थकल्यां ।। २६५८ बिरुदाचा हपाप । तसा स्वाभाविक । मनुष्यांना भूक । प्रतिष्ठेची ।। २६५९ माडाच्या आडून । डोकावे चंद्रकळा । दोहोंची आभाळा । शोभावळी ।। २६६० लपाछपी संपेल । कांहींच पळांत । बिंब मावळांत । विरून जाता ।। २६६१ सागराची गाज । मउशार पुळण । शांत, रम्य कोंकण । मसि बाहे ।। २६६२ टेकड्यां वाड्यांत । माड नी पोफळ । आमराइं कोकीळ । कुहू करी ।। २६६३ छकुल्याने कंदूक । युवकांनी बंदूक । पोक्तांनी संदूक । सांभाळावी ।। २६६४ दलाल, आडते । कडवे बडवे । जिणे यांच्यासवे । भाबड्यांचे ।। २६६५ इटु दर्शनार्थी । पंक्तीं प्रविष्टती । भाबडे कष्टती । वारकरी ।। २६६६ सामोरी ठाकता । बडवा व्यापारी । चरणी वार करी । मुंडक्याने ।। २६६७ प्रेतांनाही नाही । सोडीत दलाल । मर्तिकांत हाल । आप्तेष्टांचे ।। २६६८ कोण एक वेडा । लावो पाहे जीव । स्वप्न असंभव । जाय पाहो ।। २६६९ पांपणीच्या आड । बांधू पाहे घर । आसवांचा पूर । भवताली ।। २६७० पांपणीच्या आड । आसवांचा पूर । भरलेले घर । जन्मभर ।।) दोन ध्रुवांवरी । असतां वसती । वंचना सांगाती । हेची फळ ।। २६७१ कधीतरी वाटते । एकटे असावे । मुक्त विहरावे । स्वच्छंद ।। २६७२ झाकोळ आभाळी । सय परि दाटे । माघारी खोपटे । बाहे मग ।। २६७३ अशा पंचतत्वी । निरव निवांत । सहजचि अंत । व्हावा वाटे ।। २६७४ खचली जरि सीमा । वळून ना पाहाणे । माप लवंडणे । पैल उंबरठ्यांवर ।। २६७५ राही नी रखमा । लक्ष्मी नी शारदा । रिद्धी सिद्धी सदा । 'त्यां' भवती ।। २६७६ महदेवा हव्या । पार्वती भागिरथी । दोघीना सांगाती । घेऊं पाहे ।। २६७७ केली वा जिंकीली । भामा नी रुक्मीणी । तलवारी म्यानी । दोन, एकां ।। २६७८ कृष्णावतारी तर । सोळासहस्र नारी । परित्यक्त्यां 'उद्धरी' । म्हणे जगन्नाथ ।। २६७९ एकीनं भागेना । म्हणेनि बहु केल्या । कां रं द्येवा मेल्या । आक्रीत हे ?।। २६८० मनुष्यमात्र तर । आहे स्खलनशील । कां बां पांघरता झूल । संस्कारांची ?।। २६८१ हरळिचे निश्वासं । दवरूप घेती । अलंकृत करिती । श्वेतांबरा ।। २६८२ तेजोशलाकेशी । स्पर्धा करूं पाहे । खग मुक्त देहे । पसरोनि पंख ।। २६८३ रोजची वादळे । श्वासासाठी निश्चिंत । छातीवरी झेलतं । जगती जन ।। २६८४ सुखाच्या शोधांत । फुफाट्यासि वळणे । वणव्यांत पोळणे । अजाणता ।। २६८५ दमड्या मोजोनी । विकत घेती वेळ । लावोनि मग बळ । गाजविती हक्क ।। २६८६ रंग एकमेकां । जरी छेदतांत । उठाव देतांत । परस्परा ।। २६८७ विरोध सांगाती । सदा बाळगणे । अवसेचे चांदिणे । अनुभवा ।। २६८८ हरळी मधोमधं । गार पाणवठा । आनंदाचा साठा । अपरंपार ।। २६८९ थंडावा अधीक । कोण देऊं जाणे । स्पर्धा, तंटे, भांडणे । श्रेयासाठी ।। २६९० गारगार जळ । तृणपात्यां स्पर्शे । शहारतें हर्षे । अंगांगी ।। २६९१ लवलवत्या पात्यांना । जळराणी चुंबे । शहारा ओथंबे । अंतर्बाह्य ।। २६९२ निरुद्योगी खेळ । मानोनि घ्या गोडं । कौतुक नी कोडं । संचित माझे ।। २६९३ ऐल पैल मनुष्यत्व । मधे धर्म-जात्यांध विकृती । तिला 'माणूस' म्हणती । दुर्दैवाने ।। २६९४ ऐल पैल तमप्रदेश । मधे बेगडी तेजोरेख । तिला मानती 'आश्वासक' । दुर्दैवाने ।। २६९५ ऐल पैल खंडप्राय । मधे अथांग जलधी । जन त्यांत उडी घेती । दुर्दैवाने ।। २६९६ ऐल पैल मेघावळी । मधे भकास आभाळ । निळाईची त्याच्या भूल । दुर्दैवाने ।। २६९७ ऐल पैल प्रीत, ममता । मधे गोड गोतावळा । वाढवी जटा-जंजाळा । दुर्दैवाने ।। २६९८ ऐल पैल ज्ञानार्णव । मधे छाटि-जटाधारी । अविद्येचा व्यापार अघोरी । दुर्दैवाने ।। २६९९ ऐल पैल कांटेरी । मधे काळीशार सुपीक । फुटल्या कोंभाचे कवतिक । दुर्दैवाने ।। २७०० ******** ०९-०४-२०१७ सकाळी ६.१० २ वर्षं ९ महिने २५ दिवस कोठतरी असे । आश्वासक नक्षी । जरी वृक्ष साक्षी । शुष्कशाखं ।। २७०१ स्पंदनी अंत:कर्षी संपृक्त । सूर्यमंडळे एकवटतील अगणित । मोहोळे अतिवेगे उसळतील । प्रलयवेळी ।। २७०२ कृष्णविवरे,तारकां-पुंज । पांवता विस्तारोनि प्रसरण । तडकतील मुळांतून । प्रलयवेळी ।। २७०३ ऐल पैल श्रध्येय प्रस्तर । मधे जिण्याची भ्रांत अघोर। दुर्लक्षोनि करिती अव्हेर । दुर्दैवाने ।। २७०४ रक्षणास दोन । वृक्षगण सज्ज । खळाळाची गाज । सोबतीला ।। २७०५ सीमा जळभरी । झुळझुळ वाहते । पल्याड तृणपाते । पायघड्या ।। २७०६ (सीमा जळभरी । वाहे झुळझुळी । पल्याड तृणावळी । पायघड्या ।। २७०६) तृषार्त पांखरू । शोधते आर्द्रता । पंख फडकतां । थको जाय ।। २७०७ वेगळाले मार्ग । साथ सोबतीला । दूरच्या गांवाला । झेपावतांना ।। २७०८ लंघोनि झाकोळ । साधण्या इप्सित । हाती धरोनि हात । क्रमावे निर्वेध ।। २७०९ पाया कणखर । प्रस्तर कभिन्न । रंगावली धून । हरळींत ।। २७१० ऐसेची कांहिंसे । संसारी असते । जडलेले नाते । भरते छटा ।। २७११ मेदावल्या पाशी । उभी आहे शेलाटी । दाटीवाटीने गोमटी । सहवाससुखांत ।। २७१२ एकास दुसरा । होताहे आधार । आनंदी संसार । जाणा तैसा ।। २७१३ गवाक्ष दावते । क्षणोक्षणी शोभा । मुक्त मोकळ्या नभा । प्रतिबिंबे जळ ।। २७१४ मातीमाय जणू । निरखते कळवळून । 'कां झाले पतन । माह्या बाळाचे ?॥ २७१५ विक्राळ कभिन्न । गर्ता कारागृही । खोलवर लाही । काळजांत ॥ २७१६ सोपान अवघडं । परी अखेर गोड । तेजाची उलगड । आश्वासक ॥ २७१७ यौवनासि कैसी । कुंपणाची जाळी ?। बेबंद झाली । तवानी ताठी ।। २७१८ झेप घेऊं पाहे । पर्ण-पुष्पयुक्त । शाखा विमुक्त । सीमेपार ।। २७१९ ऐल पैल अवहलिका । मधे निवृत्ती-सोपान । अव्हेरती मुक्त ज्ञान । दुर्दैवाने ॥ २७२० ऐल पैल घनदाट । मधे शुष्क वाळवंट । शोधती जळस्रोत । दुर्दैवाने ॥ २७२१ साकळल्या एकत्र । रंगांगी सहस्रछटा । निसर्गाची सिद्धता । फेडण्या पारणे ॥ २७२२ भाबड्यांनी अर्पावे । बडव्यांनी ओरपावे । खोट्या भावे अर्चावे । ऐसी स्थिती ।। २७२३ गर्भगृही दगड । त्यांचे लाड-कोड । सोन्याची लगड । चढविती ॥ २७२४ वृद्धत्वे शुष्कत्व । पतनसिद्धता जरी । जर्जरेस सावरी । फाकले नभ ॥ २७२५ मार्ग वेगाचा । स्थित उच्चपदी । मनुष्ये वाहती । रोजचे जिणे ॥ २७२६ कवडी दह्याची इवली । अंबाडीत लसूण फोडणी । चुलींत घूमते फुंकणी । भाकरीसाठी ॥ २७२७ गुंतलेल्या बटा । कोमेजले गजरे । पहाटेचे स्वप्न अधुरे । रेंगाळले ॥ २७२८ 'शृंगारोत्तरी । केलीसं अवस्था । धसमुसळ्या गृहस्था । सोड राजा !'॥ २७२९ साहित्य मंदिरी । अनुदानित बडवे । हवशे गवशे नवे । बारी मधे ।। २७३० साहित्य दरबारी । भाबड्यांचे थवे । 'फुल्लां'चे ताटवे । 'टाकले'ल्या ।। २७३१ साहित्याच्या गावा । खूप पर्यटक । अस्तुरीसंगे साहित्यिक । सवलतधारी ।। २७३२ रातांब्याचे सार । नाचणी तळण । कुळिथाचे कढण । भातावरी ।। २७३३ साहित्य जाळ्यांत । भाषांतर उणे । 'एका कोळियाने' । टाकलेल्या ।। २७३४ तिठ्यांत वळून । आप्तावळी दिसेनाशी । तोच पाठ त्यांसि । देती सोयरे ।। २७३५ नको पाहू मागं । कुणी ना थांबले । कामाला लागले । आपापल्या ।। २७३६ रूपडे आगळे । नित्य नवे रोज । उदयास्ती ओज । प्रमाणांत ।। २७३७ पिवळेपणाला । नका भुलू त्याच्या । माध्यान्ही प्रत्यंचा । टणत्कारेल ।। २७३८ वठल्या खोडाची । तवान हिरवी फूट । प्रजोत्पादन लयलूट । निसर्गांत ॥ २७३९ पाहाल तोडू जितके । नव्या जोमाने उसळूं । आभाळ मायाळू । खेळांगण आम्हा ।। २७४० एकला आज जरी । षट्पर्णदलयुक्त । विश्व येईल कवेंत । होता छायानिधी ॥ २७४१ एकवटोनि दिले । मातीमायेने संस्कार । परतण्या उपकार । वाढणे-विस्तारणे ।। २७४२ साहित्य प्राकारी । गुणवत्ता दीन । अंतर्बाह्य 'सत्ता'रण । धुमसते ॥ २७४३ कितीतरी रंग । आकारांच्या परी । पंचतत्वांच्या प्राकारी । वोसंडती ॥ २७४४ जाती पातींत कैसा । अडकला 'संत' । कणवेची भ्रांत । मग कवणाला ?॥ २७४५ मायेला हो सांगा । असती जात, धर्म । वात्सल्य, ममता वर्म । केवळ जिचे ॥ २७४६ तिच्या कासेला । क्षीराचांचि वास । जात बचनागी रस । असंभव ॥ २७४७ (तिच्या कांसेला । पान्ह्याचींच आस । बचनागी जातरस । असंभव ।।) नवजातासि कां बा । विखारी व्ववस्था । माय-बापाची लावता । जात्याधारी ॥ २७४८ असेल विखारी । झाला मना स्पर्श । तयासीं 'आदर्श' । म्हणावे कैसे ॥ २७४९ घोर तपश्चर्या । कपारींत घळी । निमिषांत जळी । वाहू गेली ॥ २७५० गोदातटी घाट । प्रतिष्ठा नि ब्राह्मण । 'ज्ञान्या'चे अवहेलन । त्यांनी केले ॥ २७५१ ऐशा अहंकारी अधमां । दास उंचावती । 'मूढमती तरि उच्चज्ञाती' । म्हणत शतदा ॥ २७५२ मीने 'दासबोधा' । लावला न हात । त्याचे दु:ख, खंत। आज नोहे ॥ २७५३ जाती भरडती । पाळीमध्ये दाणे । जातीकारणे कोणे । अव्हेरीले ?॥ २७५४ विक्षिप्त जर ऐशा । विचारांची निपज । वाटे मग लाज । ब्राह्मण्याची ।। २७५५ साहित्य प्रांगणी । झिम्मा नी फुगडी । कोणाची बुगडी । सांडियेली ?॥ २७५६ साहित्य मानसी । बगळ्यांचे राज्य । राजहंस 'पुज्य' । किमतीचे ॥ २७५७ साहित्य कोंदणी । मायंदळ रत्ने । अथक प्रयत्ने । 'पद'सिद्ध ॥ २७५८ सुरकुतले वार्धक्य । हिरवी संगत । अनोखी पंगत । उपवनी ।। २७५९ माझ्या शिंपल्यांत । साकळला मोती । अाकस्मात दीप्ती । मजलागी ॥ २७६० सापडला ? चोर । सुटला ? साव । दोहोंचे नावं । सर्वमुखी ॥ २७६१ ऐसा येथं न्याय । आज्ञा, आदेश । 'लोक'शाही देश । धनाढ्यांचा ॥ २७६२ करोनि कुणी । कुणी न करोनं । कारावासी जन । अप्रतिष्ठित ॥ २७६३ आसाभवती नसा । जुळल्या जरि नाही । काळजाची ग्वाही । हिरवा गारवा ॥ २७६४ मुद्रेने प्रसन्न । तवान स्वागत । मनाचे स्वगत । प्रकटले ॥ २७६५ संभ्रमावस्था । कळ्या? फुले ? फळे ?। प्रीतरंगाचे आगळे । संमेलन ॥ २७६६ कांही उमलेली । पिकलेली कांही । मुग्धावस्था नाही । अंतरली ॥ २७६७ वसंतागमन । दृश्य आसमंती । वनराणी पुरती । अलंकृत ॥ २७६८ पसरोनि बाहू । कणा सरळसोट । बिंबाची पहाट । फाकंता प्रभा ॥ २७६९ प्रतिबिंब कैसे । प्रकाशाविणा ?। अस्तित्व दर्पणा । नाही तमांत ॥ २७७० छाया वास्तूची । वस्तूचे प्रतिबिंब । सांगा आपेआप । संभवेलं ?॥ २७७१ उजेडा पारखा । जो कोणी होईल । अंधारी शोधेल । दिशा दाही ॥ २७७२ निशेला पडते । पहाटेचे स्वप्न । तमाचे दमन । पाहे त्यांत ॥ २७७३ कसे वारू सांगा । पदराने उन ?। आंचळास तान्हं । लूचताहे ॥ २७७४ पेलू पाहे आकाश । सजलेल्या शाखेवर । सळसळता तरुवर । गर्वभरें ॥ २७७५ वाटे आता जिणे । उगा घोटाळणे । ढोंगीपण रुजणे । प्रारंभले ॥ २७७६ सूत, आधी पेळू । बोंडे त्याआधी नवी । काळ्या आईची थोरवी । वस्त्रहेतू ॥ २७७७ दृश्यरूप संभवती । गुणावगुण, व्याधी । आध्यात्म-मोक्ष-गति । पोकळ शब्द ॥ २७७८ जीवमात्रांस सर्व । अन्न-वस्त्र-निवास । गरजांचा सारांश । जिण्यासाठी ॥ २७७९ अवकाशस्थ तारे-वारे । धरेवर काष्ठ, पाषाण जळ । वनस्थ वणवा जाळं । पंचतत्व प्रतिनिधी ॥ २७८० रक्त मांस स्नायूं अस्थी । मेद विकारी पेशी कूर्चा । रसहीन श्लेष्मल त्वचा । उत्सर्जन योग्य ॥ २७८१ इप्सित ? ना समित्या । वांछिली ना मंडळे । प्रलोभनांचे कोंडाळे । बाहे जरी ॥ २७८२ ऐसा पाहिला कोणी । निर्वाचित नेता निरपेक्ष । झांका वा उघडा पक्ष । गणंगांचा ॥ २७८३ रोजचाचि भास्कर । भवतीं शब्दावळी नक्षीदार । वाटो लागला 'आजार' । आतांशा मजलागी ॥ २७८४ अल्पाक्षरी चरण, कविता । चघळोनि झाला चोथा । जाळण्या त्यांसि आतां । शोधताहे वन्ही ॥ २७८५ हा तर शब्दातिचर । 'सहज-स्फूर्ती' संहार । कल्पनांचा आविष्कार । अतिरेकी ।। २७८६ यांत्रिकतेस कां शरणागती ?। वाटे 'कुंठित व्हावी मती '। अवरोधोनि अतर्क्य गती । अतिरेकी ॥ २७८७ मज जडले वाटे व्यसन । अहंकाराचे पीत वसन । गळोनि जाईल अवसान । कधीतरी नकळतं ॥ २७८८ घेऊन समग्र व्यंजने । स्वरांकित करा चाणाक्षपणे । यमकयोग्य शब्दावतरणे । आपेआप ॥ २७८९ शब्दांची मग धरोनि बाही । एकवटोनि करा स्थाई । फुका आशय अर्थवाही । आकळण्या सहज ॥ २७९० शब्दांची मग धरोनि बाही । एकवटोनि करा स्थाई । फुंका आशय अर्थवाही । आकळण्या सहज ॥ २७९१ प्रवाही झुळझूळ । खेळतसे जळ । शाखेची आबाळ । पर्णांविण ॥ २७९२ हिरव्यांत रक्तीम । त्यांतून पिवळी । तेजाची नव्हाळी । झुंजुरका ॥ २७९३ अनावर जळ । प्रपाती कोसळे । मुक्त नि मोकळे । गिरिचरणी ॥ २७९४ पर्णहीन जरी । शिखेवरी तुरे । शाखेचे नखरे । पाहा जरा !॥ २७९५ (शिखांवरी तुरे । शाखांचे नखरे ) अ-क्षर शब्दावेगा । घालावया भिंत । न वाटे खंत । मजलागी ॥ २७९६ आशयाची कासंडी । सदासर्व अपुरी । कल्पनांची भरारी । निवूं पाहे ॥ २७९७ मृत्यूचींच सीमा । भावविश्वां मज । अखेरची नीज । लौकिकार्थी ॥ २७९८ विरक्तीची फोल । लागली उचकी । आसक्ती नेमकी । बाहताहे ॥ २७९९ शब्दावळी उष्ट्या । करावया गोळा । फिरवाया बोळा । मोकळा मी ॥ २८०० ********** २८-०४-२०१७ आज अक्षय तृतिया.. बहिणाबाईची आखाजी... माझ्या तीर्थरूप मातोश्रींचा जन्म दिवस उजाडले ! उजाडते रोज । प्रक्रिया ? नियमित, सहज । अविरत, परि शोधण्या काज । घालमेल मनुष्यांची ॥ २८०१ 'नाहीच उजाडले तर ?'। मनांत चिंतेचें घर । अकल्पिताच्या कल्लोळाने ऊर । फाटो पाहे ॥ २८०२ कोठेतरी इवलासा । जळभरला घनु । आशेची कामधेनू । पान्हावली ॥ २८०३ परी नको दृश्ये । नको प्रतिक्षिप्ती । शब्दांची पुनरावृत्ती । 'भय'कारी ॥ २८०४ काळोख, स्थाई पाषाण । कोरून त्यांस सारेजण । पेरूं पाहती प्रकाशकण । भासहेतू ॥ २८०५ झुळुझुळु जळ । बिंब उडी घेई । लाव्ह्यांत प्रवाही । निखारा भासे ॥ २८०६ जळराणी कपोली । लज्जेची लाली । बिंबाची टिकली । भाळावरी ॥ २८०७ झुंजुरका करुण रूदन । व्याधीग्रस्त पोरका श्वान । कणवेने घेईल कोणं । दखल त्याची ?॥ २८०८ तैसेचि कांहिसे वृद्धपण । जिव्हारी लागते एकटजिण । निराधारपणाची जाणं । लोटे खाईंत ॥ २८०९ माणकांची कर्णफुले । रक्तिमप्रभा कपोली लोळे । तैसे विलोभनीय आगळे । दृष्टिसुख ॥ २८१० पंचतत्वांच्या चमत्कृती । आत्मप्रौढीस वेसण घालती ।आत्मकेंद्री प्रवृत्ती । वारिती सहज ॥ २८११ पोक्तपणी नम्र । वृक्षराज सुपर्ण ?। कोणते कारण । असेल झालें ?॥ २८१२ छायेने भारोनि । निवांत सारे अंगण । दोन क्षणांचे दान । देताहे प्रवेशपूर्व ॥ २८१३ यजमान भेटेतों । पांथस्थां उपकारक । क्लान्तचित्त शामक । स्वागतसिद्ध ॥ २८१४ निवृत्ती ठाकली । तरि गुंततें काळीज । मोह, माया रोज । नित्य नवे ॥ २८१५ अथांग मन मुक्त । स्वच्छंद सैरभैर । कसा घालावा आवर । ना आकळें ॥ २८१६ वळतांना अखेर । छळती अनुबंध असे । तोडण्या बेडी कसे । उठावे पाऊल ?॥ २८१७ असते लक्षण कां । हेचि सामान्यत्वाचे ?। कर्मोत्तर फळाचे । प्रतीक्षित ॥ २८१८ अर्ध्यास पूर्णत्व देऊन । रुजेल खरे ध्रुवीकरण ?। 'मनुष्यत्वा' प्रति 'संचलन' । होईल वारोनि धर्म ?॥ २८१९ ऐल पैल अवकाश, प्रकाश । मधे तमप्रवाह अखंडित । समांतर दोनीहि तट । अज्ञातावेरी, अनिवार्य ॥ २८२० कसे सांग मना । तुज समजाऊं । चिंतांचा बाऊं । नको करूं ॥ २८२१ कुणा हवे अखंड । कुणा भावे खंड । करिती चिरफाड । आपापल्यापरी ॥ २८२२ कोण पुराणास्थ । अवतरला दैत्य । उंचावोनि हात । आव्हानरूप ॥ २८२३ लेउनी धरेवर । वृक्षाचे वसन । मुळे ठाम रोवून । करालमुद्रा ॥ २८२४ वृक्ष उन्मळतां । ढळेल वसन । मुद्रा, अवसान । प्रलयवेळी ॥ २८२५ कल्पनाद्रुमावर । बहुरंगी पर्ण, पुष्पे । धुमारे आपआपे । शब्दगर्भी ॥ २८२६ श्वशुरगृही कुटुंबांत । स्त्रियांच्या अतर्क्य कथा । दुखऱ्या, झोंबणाऱ्या व्यथा । राहती मूक ॥ २८२७ नववधू वा गर्भवती । लेकुरवाळी प्रौढा, पतिव्रती । कौतुकाची सदैव भ्रांती । माजघरांत ॥ २८२८ भलावण निमित्तमात्र, खोटी । नेहमीचींचं असते रीती । होता सुप्त इप्सितपूर्ती । ढकलिती चुलीपुढे ॥ २८२९ होता अधिक उणं । रांधलेल्यांत लवण प्रमाण । संसाराची निष्ठूर उधळण । जाणा निश्चितं ॥ २८३० मग सासूचे नाक वाकडे । संतापोनि काढते वाभाडे । पंगतींत टवाळी धिंडवडे । आप्तांकरवी ॥ २८३१ पतिराज खजील । श्वशुर लालेलाल । जर विवाहोत्तर संसारवेल । नाही 'फुलं'ली ॥ २८३२ कांहिलींत तप्त तेल । त्यांत पडता जळबिंदू । भडकतो, उसळतो ज्वाळासिंधू । अनुभव सकळांसी ॥ २८३३ वेदना दु:खें हेलावणे । सांत्वनशव्दें गहिवरणे । धीराने डोळे पाणावणे । होते सहसा ॥ २८३४ मेघे झाकोळतां उगवती । 'मीच' म्हणे, 'तेजोनिधी' । फुगवित इवली छाती । तात्कालिक झोतं ॥ २८३४ कोठवर पोहोचेल झेप । गर्व हरेल एकच तिरीप । म्हणोनि त्याने शरणरूप । कां घ्यावें ॥ २८३५ झाकोळलासि बा तेजोनिेधे । बिंबित परि झालासि जळामधे । अस्तित्वाचे मर्म साधे । शिकावे यांतुन आम्ही ॥ २८३६ नाही दिसले जरि 'प्रत्यक्ष' । कर्तृत्वाचा लागतो कसं । यशोत्तर पसरतो सुवास । अस्तित्वसिद्ध ॥ २८३७ म्हणोनि लिहित जावे । बिंब, अ-क्षर व्हावे । बाकी केवळ उरावे । तेचि 'मागे' ॥ २८३८ (म्हणोनि व्हावे लिहिते । बिंब, अ-क्षर होते । बाकी केवळ उरते । तेचि 'मागे' ॥) प्रपात की स्वच्छंद मेघ ?। गिरिशिखा ! शुभ्र हिमरेघ । हिरवाई भवति अथांग । सुखवर्षा ॥ २८३९ पहा रंगगर्भ अंकुरले । तेजप्रतीक्षेंत एकवटले । अलवार सज्ज झाले । सांकळण्या इंद्रधनू ॥ २८४० बाह्यांगी उंची वस्त्रे । अस्तरांत परजलेले वस्तरे । अवलंबिती अघोर अविचारे । सहजची ॥ २८४१ तृणपात्यांतूनं । उंचावोनि मान । दवबिंदूंचे परि गंठण । सर्वांलागी सारखे ॥ २८४२ पंचतत्वांची कवाडे । आतं भेदाचे वावडे । दान पशांत पडे । समभागी ॥ २८४३ स्नुषा, नातवंडे, संसार । गतधवेचा विरंगुळा, आधार । गोतांवळ्यांत जरि विधुरं । भोगतो वनवास ॥ २८४४ आषाढ मनांत संभवे । पांपणींत श्रावणसर आंसवे । उघडीप अंगभर होता भादवे । सण सोहळ्यांचे ॥ २८४५ ना कांही ठरवितो । ना कांही मिरवितो । काळ लोटोनि पुढे जातो । केवळ, निसर्ग ॥ २८४६ पंचतत्वांचा कल्लोळ । उजळूं पाहे तेजोबाळ । लंघोनि मेघांची प्रभावळ । रंगसंगतीनं ॥ २८४७ आधी कोसळते काळीज । परिणामी बधीरतो मगज । अखेरची स्थिर नीज । वारण्या विश्व ॥ २८४८ व्याधींच्या कोठाराची कुठार । भेगाळते जीर्ण शरीर । इंद्रियांचा नकळत जागर । विरो जाय ॥ २८४९ अनुक्रमाची नाही शाश्वती । ऐनवेळी बदलतें रीती । नेण्यास्तव चिरनिद्रेप्रती । अनिश्चिती निश्चितं ॥ २८५० नका होवू अचंबित । ही तर शब्दावळीची पंगत । स्वान्त:सुखाय नशेची संगत । केवळ, मजलागी ॥ २८५१ ऐल लिंगभेद । पैल जातपात । तरी अबाधित । मनुष्यत्व ॥ २८५२ ऐल धर्म प्रांत । पैल रीत भात । मधे प्रवाहित । मनुष्यत्व ॥ २८५३ ऐल संस्कारव्रण । पैल कर्मठपणं । तरी अजेय, अभेद्य । मनुष्यत्व ॥ २८५४ ऐल दंगेधोपे । पैल क्रौर्य, पापे । वात्सल्य, माया जपे । मनुष्यत्व ॥ २८५५ कल्लोळा बाळाचे । लागतांच पाय । मोकळली माय । जळवंती ।। २८५६ अलवार ओसरे । उंचावली भिंत । पैलाचा प्रांत । क्षितिजावेरी ॥ २८५७ विविध स्रावांचा संभव । शरीरांतरी सहजभाव । वीरेचन, उत्सर्जन प्रभाव । अनिवार्य ॥ २८५८ थेंबे थेंबे साचणे । एकजागी साकळणे । प्रवाहित न होता विखारणे । विकारोद्भव ॥ २८५९ मानसांत प्रीतबिंदू । काळजांत कल्लोळसिंधू । युवतीची होणे नववधू । परिणामी ॥ २८६० ऐलपैल मखमाली तृणपाती । मधे मनुष्यांची निर्मिती । समांतरहि एकवटे अंती । भिडतांना चित्रांत ॥ २८६१ चित्रकार, सर्जक-मती । साधावया परिणामी त्रिमिती । कुचल्यने तोडती भिंती ।प्रत्यक्षाच्या ॥ २८६२ कधि कोण कुठे उमलेलं । कशी कुणा लाभते 'वेल' । कणखर खांद्यावर मूल । भासते, हसते ॥ २८६३ शशिसखि चांदणी । शुक्राची देखणी । दंगली रिंगणी । बिंबाभवती ॥ २८६४ धरेवर निष्पर्ण चौकड । नजरेंत लेउनी वेड । दूरस्थ कौतुक कोड । निरखूं पाहे ॥ २८६५ दवबिंदू साकळती । बिजे अंकुरती । ओली होता माय माती । आर्द्रसंपृक्त ॥ २८६६ कांचेच्या भंगुर भिंती । घेवून स्वत: भवती । पाषाणहृदयें वमन करिती । वचने निरर्गल ॥ २८६७ तप:श्चर्या, अभ्यास । ज्ञानाला लावणे कस । निर्लज्ज सत्ताधाऱ्यांस । आकळावे कसे ॥ २८६८ कोणी म्हणे, 'मुतूं कां ?'। कोणी म्हणे, 'उतूं कां ?'। मनांत किंतू ठेउं नका । धाडा यांना 'स्वगृही ॥ २८६९ रंगावली दररोज । रेखीतसे ठाई ठाईं । पान-फुलांची दुलई । मायमातीची ॥ २८७० मुक्तहस्ते उधळोनी । लाडकोड पुरविते । चित्ती शांती रूजवीते । मूकपणे ॥ २८७१ तृणशिखेंत शुभ्र तुरे । स्पर्धा कोण्या तेजाशी । धरा अवकाशासी । भिडूं पाहे ॥ २८७२ काय खरें काय खोटे । ऐल पैल भास भेटे । दूर जाताहेसी वाटे । जाणीव,जिगिषा ॥ २८७३ क्षितिजभाळाला । अष्टगंध टीळा । रंगोधळीचा आगळा । आविष्कार ॥ २८७४ सीमारेखेमागे । नित्याचे धावणे । विरंगुळा शोधणे । तिच्याच संगे ॥ २८७५ धरेंमध्ये जळ । जळांत अवकाश । एकवट सावकाश । तमगर्भीं ॥ २८७६ पूजा पाठ्योत्तर । संपदा घरभर । मानावे आभार । योगायोगाचे ॥ २८७७ माजले धनिक श्रीमंत । मनुष्यत्वाचा पाहती अंत ।खदखदते मनांत खंत । हताशेची ॥ २८७८ संसाराचे रंग । ठेऊन पाठीशी । 'पार्थीव' 'सगुणा'शी । अर्चावे कैसे ?॥ २८७९ दोनीही फसवे । काढीती आंसवे । अनिमिष मनोभावे । पाहूं जाता ॥ २८८० भुरळ जरी ऐसी । घालिते भुलावण । अकारण भलावण । दूर बरी ॥ २८८१ आयुष्य तोकडे । जिण्यासाठी पडे । व्यर्थ साकडे, कोडे । उकलूं नका ॥ २८८२ आहे हा केवळ । आकड्यांचा खेळ?। आशयाशी मेळ । दूरान्वये ?॥ २८८३ गुलाबी कवळी काया । जेष्ठांची पाठिशी माया । दवबिंद्वालंकरण किमया । पर्णांकुरासि ॥ २८८४ मगजांतिल स्मृति-दालन । मानसिचे आक्रंदन । शब्दांशी सुसंधान । अल्पाक्षरि-बीजे ॥ २८८५ गुलाबी गोंधळ । भवताली हिरवळ । आसमंति दरवळ । जिगिषेचा ॥ २८८६ शुभ्र तुरे ऊभे संगे । तोऱ्याने सर्वागे । असुया मनामागे । टाकोनिया ॥ २८८७ त्वचेवर खचले । डोळ्यांमधे फुले । कंबरडे मोडलेले । वृद्धावस्था ॥ २८८८ पचनक्रिया वातग्रस्त । वर्तणूक वादग्रस्त । क्रमणा सदैव द्विधाग्रस्त । वृद्धावस्था ॥ २८८९ दांत ढळतांत । केसं गळतांत । स्नायूंत जळवात । वृद्धावस्था ॥ २८९० अनावर जिव्हा । दम्याच्या उद्भवा । वारण्या । वृद्धावस्था ॥ २८९१ अक्षर-प्रस्तरांतुनी । काढीली कोरोनी । आशयाची लेणी । 'ओवी'रूप ॥ २८९२ अक्षरनिधींत । वेचोनी मौक्तिक । सजवोनि कवतीक । मांडिली मियें ॥ २८९३ काळजाचा कौल । काळजीचा तोल । भावनेची ओलं । राखिली मियें ॥ २८९४ स्वांतरिची गाणी । गाई जर कोणी । डोळाभर पाणी । तुटतां नाळ ॥ २८९५ फुलपांखरू की पर्णनक्षी ?। भ्रमें घेरिले अंतरासि । कवळी कलिका साक्षी । उंचावोनि मान ॥ २८९६ पर्णाचा विलास विस्तृत । कीं धरिले छत्र शोभिवंत ?। चिंतामग्न, रक्षणार्थ । उष्णतेंत वसंतोद्भव ॥ २८९७ वांछित जाय अखंड । इप्सिते जपली जिवापाड । त्यागिले परि किती खंड । स्वनिधीचे ?॥ २८९८ मागे वळोनि पाहो जातां । भ्रमनिरास होइल यर्वथा । उपदेश, अपेक्षांची गाथा । व्यर्थ भासेल ॥ २८९९ नवशतकोत्तर द्विसहस्र । भावनांचे लावुनी अस्तर । आशयाचे गोधडी वस्त्र । अर्पियले मियें ॥ २९०० ************* आज २१-०५-२०१७ २ वर्ष ११ महिने पूर्ण मला भासला गजाननं । किलकिलें नेत्र करोन । भूषविलेले पवित्र चरण । पुष्पांजलीने ॥ २९०१ (। बाहे कवतिकें ॥) निसर्ग आपुली कलाकारी । क्षणोक्षणी साकारी । आकाराकृतींच्या विविधपरी । अगाध, अगम्य, बिनतोड ॥ २९०२ केंद्रापासोनि उभा दूर । त्रिज्येच्या टोकावर । परिघाच्या काठावर । व्यासाघारे म्या ॥ २९०३ वर्तुळाकार जगणे । मध्याभवती फिरणे । भोवळ येतां तोल जाणे । आयुष्य तुमचे-आमुचे ॥ २९०४ तुटेवेरी नाळ । वाजेवेरी टाळ । घेरल्यावेरी जाळ । सुटका नाही ॥ २९०५ झाकोळावेरी आभाळ । ओथंबल्यावेरी जळ । उचंबळल्यावेरी मेघावळ । वर्षा नाही ॥ २९०६ प्रणयोत्तर शृंगार । सप्तपद्योत्तर घर संसार । इटुकली कळी वेलीवर । चक्रांकित जिणे ॥ २९०७ अनुभवण्या संकोच वा विस्तार । विश्वाची अघोरी लहर । अगम्य, अकल्पित दृश्यांतर । राहील शून्य ॥ २९०८ महाकाय निद्रिस्त । वन्यजीव निवांत । होता पण जागृत । आसमंत कंपेल ॥ २९०९ भाऊ सुग्रीवाचा ?। सखा हनुमंताचा ?। भास मनुष्याचा । उत्क्रांतीपूर्व ?॥ २९१० कोणाचा कुंचला ?। कोठून हा आला ?। रंग उधळेला । नभांगणी ?॥ २९११ गुलाल नी बबुक्का । भंडाऱा हलका । द्विजद्वया पाठीराखा । नभांगणी ॥ २९१२ मधे अडकला । दादा जर पडला । धूम ठोकायाला । मोकळा मी ॥ २९१३ लागले खूपले । रडू त्याला आले । फुंकर घालायेले । थांबतो मी ॥ २९१४ लावेल चढतं । आभाळाला हात । टाळ्या मग पीटत । नाचेनं मी ॥ २९१५ जीवांचे निश्वास । एकसमयावच्छेदांस । सुटता ! विरुद्ध दिशेस । कलंडेल धरा ॥ २९१६ भेदोनी परिवलय । साधण्या चलन-लय । अन्य मंडळांत पाय । ठेवेल धरा ॥ २९१७ मनांत राहू दे । तसाचं नांदू दे । नकोच करूं दे । उंबरा पार ॥ २९१८ अंतरांत पूजा । काळजांत भजा । शांततेच्या काजा । व्हावा आधारं ॥ २९१९ बहुत केल्या विचारे । साधेल काय सांगा 'बरे' ?। जे भूतांत अविचारे । मोडिले म्यां ॥ २९२० तेजोशलाका दूरवर । सोबतीला अंधार-जहर । सामान्यांना जिणेभर । ऐसी स्थिती ॥ २९२१ प्रकाश पाहोजाता धराया । सरकतो कर्माचा पाया । तुपापाठी जाते वाया । तेलही ॥ २९२२ राखिले केवळ साहित्यभान । बहुत मंचिले विद्वज्जन । हळुवार उपटिले ज्यांनी कान । अहंकाऱ्यांचे ॥ २०२३ साकळल्या जळांत । नभ प्रतिबिंबितं । निश्चल, निरव, शांत । झुंजुरका ॥ २९२४ मार्ग ओलसर । स्वच्छंद विस्तार । नभांगणभर । झाकोळाचा ॥ २९२५ दीड इंच छाती । खाईलची माती । फिरली तर मती । अहंकारे ॥ २९२६ कोण बा हा कवी । आशया संभवी । शब्दांतून ओवी । कोरतांना ?॥ २९२७ दादा नि ताई । उभयतां झोप नाही । बाबा आणि आई । येणार कधीं ?॥ २९२८ विविधरूपी मेघमुद्रा । प्रेरित करितीं चित्रां । मनाप्रमाणे पात्रां । मुभा योजण्याची ॥ २९२९ सत्तेची स्वप्ने पाहात । कुणाचाही धरतील हात । डोळे झाकल्या मांजरीगत । बेमुर्वत निर्लज्ज ॥ २९३० बांगेंत विरेल शंखध्वनी । भगवा नांदेल हिरव्या सदनी । कमळा करेल मनधरणी । चांदव्याची ॥ २९३१ सरडे कुंपणी जमतील । बाहतो कोण ? पाहतील । झरझरा रंग बदलतील । प्रमाणांत प्राप्तीच्या ॥ २९३२ सहकाऱ्याचा गळा धरतील । गनिमाच्या गळा पडतील । गोळा लोण्याचा झेलतील । कुंपणावरचे बुभुक्षितं ॥ २९३३ गंगा उलटेल प्रवाहांतं । हिमालय कच्छच्या रणांत । हिंस्र माजतील नगरांत । अभद्र युत्यांकारणे ॥ २९३४ ऐल भडकला पावक । पैल वेदना दाहक । मधे अलवार आश्वासक । मनुष्यत्व ॥ २९३५ आधी मूर्ती मग कथा । आधी सत्य मग गाथा । आधी कृती मग प्रथा । विश्वनियम ॥ २९३६ भ्रांतोद्भव भुकेचे साकडे । जिणे झाले एक कोडे । गुंता सोडण्या अपुरे पडे । आयुष्य सामान्यांना ॥ २९३७ शब्दांची जोडणी । आशयाची फोडणी । ठसक्याने डोळ्यांत पाणी । वाचकाच्या ॥ २९३८ डौलदार मानेचा । जळांत द्विजाचा । भास संधिकालाचा । नयनरम्य ॥ २९३९ उतरला कां धरेवर ?। आभाळांत रंगदंगाचे घर । त्यांत शुभ्र पर । भिजतील, शंका ?॥ २९४० ’गाउलीची कांस । तान्हे धरियेली । देखता दहिवरली । देवसभा ॥ २९४१ लालसर ओठ । प्रपातला पान्हा । जणू शुष्क राना । हिरवा बहरं ॥ २९४२ आतां मरणाला । करूनी निवृत्त । बासनी बंदिस्त । ठेवू आम्ही ॥’ २९४३ कसे तुवा बापा । सोडिले छकुल्याला । भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ २९४४ माउलीने त्यास । की रागे भरियेले ? धास्तावून भिडले । कपिलाईस ॥ २९४५ भुकेजला बाळ । जरी नसे तान्हा । तरी शोधे पान्हा । वात्सल्याचा ॥ २९४६ जणू देवकीनंदन । यशोदेचा कान्हा । गाउलीच्याही भाना । हरपतसे ॥ २९४७ गाउलीच्या डोळा । ममतेचे आंसू । माउलीसही हासूं । आवरेना ॥ २९४८ नको आतां अतिचार । अव्यापारेषु वा व्यापार । अखेरच्या सोपानावर । मन म्हणे ॥ २९४९ कमावले ते जपावे । अतिरिक्त ते वाटावे । पूर्ण भारविरहित असावे । ओलांडतां उंबरा ॥ २९५० द्विजरूप रेखीव । कुंपणावरी एकमेव । प्रतीक्षेंत अचल भाव । सखीच्या ॥ २९५१ निवारा मागे निवांत । बाहताहे छायेंत । परि तो तपश्चर्येत । एकाग्र गुंग दंग ॥ २९५२ कभिन्न पाषाणवत् । निश्चल तापस व्रत । करितसे अपार मोहित । अंतरंगा ॥ २९५३ की लेउनि मोरपंख । कल्पनेंतले सौंदर्यसुख । घ्यावया उत्सुक । माड पर्ण ?॥ २९५४ मुळांत नाही आपुले । ते वृथा कां वांछिले ?। निसर्गाने जे दिले । सर्वसाकल्ये परिपूर्ण ॥ २९५५ आखूड शिंगी, बहुगुणी । भले वांछिली कोणी । मिळते कां शोधुनी । सांगा बरें ?॥ २९५६ चौकटी मोडाव्या वाटणे । उत्कांतीची लक्षणे । सुप्तेच्छा सीमित करणे । परि श्रेयस्कर ॥ २९५७ हात दावुनी अवलक्षणा । उगा देणे निमंत्रणा । कधी उलटतो जाणा । सोडलेला तीर ॥ २९५८ स्वत:च्या दुर्गंधीचा । होवु लागला त्रास । अतरिच्या धूपांस । श्रेयस्कर वन्ही ॥ २९५९ अहंकार, गर्वाचा । अत्युत्क्रांत मगजाचा । भासरूप आतां स्वत्वाचा । ढळो डोलारा ॥ २९६० आश्वासक बहु बाहूंनी । द्रुम कणखर उंचावोनि । तेजाच्या जणु आवाहनी । तापस व्यग्र ॥ २९६१ विक्राळ जरी देखावा । अंतर्यामी कणव ओलावा । रामप्रहरिच्या सद्भावा । प्रकर्षें व्यक्त ॥ २९६२ चौकटींचे बंधन । गजांचे काटकोन । सामावू पाहाती जीवन । आधुनिक, नागर ॥ २९६३ परी भवताली दूरवर । दिठीच्याही पार । मूलतत्वांचा जागर । विस्मरू नये ॥ २९६४ कल्पना डोळसांशी । 'अ'चित्र 'सा'कारणेचि । मात्र नेत्रहीनीसी । 'कल्पना'चि अकल्पित ॥ २९६५ मीट्ट अंधारकोठडींत । आधारार्थ पुढे हात । आपेआप चांचपडितं । भवताली ॥ २९६६ भवताल नसणे । हेचि ज्यांचे जिणे । त्यांना कल्पना भरविणे । आव्हान एक ॥ २९६७ चौकटीले रिकामपणं । असे आज काहून ?। जैसे पात्र वोसंडून । गेले वाटे ॥ २९६८ सय चित्रांची सुद्धा । डाचते सर्वदा । सहवास सांगता । न व्हावी वाटे ॥ २९६९ शब्द आज वाटे । पडावे कां एकटे ?। पापण्यांचे पात्र रिते । शुष्क, वागवीत ॥ २९७० रितेपणातटी । अस्तित्वाच्या गळाभेटी । सरसावतील चौकटी । रेखिण्या सीमा ॥ २९७१ रितेपणी एक । निरवाची हांक । वांछांचा पावक । शमला वाटे ॥ २९७२ रितेपण असह्य होई । मूलतत्वांतराठाई । तडितेसि धाडण्या घाई । मेघावळीस ॥ २९७३ रितेपणापोटी । विकृताची कडवटी । आनंदघन क्षणांची दाटी । अस्तित्वकारणे ॥ २९७४ स्वाभिमान, अहंकार गर्व । अतिरेकाचे अस्वस्थ पर्व । ओसाड निर्जन गावं । परिणामी ॥ २९७५ तणावाच्या दाबांतं । सहसा उसळी घेतं । नियमाविरुद्ध होतं । उर्ध्वगामी जळं ॥ २९७६ भवताली नवजात कवळी । लाल, गुलाबी, हिरवी, पिवळी । अनिमिष न्याहाळती सगळी । न्हाउनी तुषारांत ॥ २९७७ तैसेति कांहिसे अंतर । विचारांचे माजता काहूर । आवेगाला येतो पूर । सर्जक वा विध्वंसक ॥ २९७८ निर्जल रिते शुभ्रवर्ण । वारू पाहे झेपावुन । जलदांस देई आवतण । कल्याण दूत ॥ २९७९ ऐसे आगळे मनुष्यत्व । कां न अंगी बाणवित ?। विध्वंसाचे अंकितं । कां होती 'माणसे' ?॥ २९८० कृषिउत्पादने रस्त्यावरती । गोरसाच्या नद्या वाहती । क्षुधा-तृषेने गरीब मरती । जगी अमानुषांच्या ॥ २९८१ कांही आटविती क्षीर । भरती शीत कोठार । दृष्टि ठेवोनि दूर । भाज्या-फळांनी ॥ २९८२ फेकलेले वेचिती । ओतलेले भरूं पाहाती । तहान-भुकेची वाढीव गती । प्रवृत्त नाइलाजे करी ॥ २९८३ नवसासाठा तान्हे कवळे । उचावरुनी फेकिले लेकुरवाळें । कैसे कांहिसे कृषिवले । केले सद्यकाली ॥ २९८४ काय उधळोनि मिळाले । चिवडोंनि नागरांनी नासले । तैसे कांहिसे ग्रामस्थे केले । कोणत्या काजे ॥ २९८५ माय म्हणविती स्वत:ला । परि मगजांत क्रोध भडकला । ममता वात्सल्या पल्याड गेला । आगळिकीने कोण्या ॥ २९८६ मृत्युभयाचे काहूर । वर्तनांत डोकांवतो वेडाचार । क्षणोक्षणी लागतो आधार । वृद्धावस्था ॥ २९८७ खाचांवर काचा सुवर्ण काडीत । आधार चांदीच्या मुठींत । चमचम हिरकणी अनामिकेंत । वृद्धावस्था ॥ २९८८ ध्वजजरा ? नाही । अंगरख्याची बाही । हिरव्याला धरोनि राही । पर्णपरिघांत ॥ २९८९ ऐशा विविधपरी । पंचतत्वसंसारी । वेदना, दु:खारि । जीवमात्रांसि ॥ २९९० शुभ्र शरीरावरी । गुलाबी कर्ण टवकारी । अबोलाशि स्पर्धा करी । पानगळल्या ॥ २९९१ कोणी टाकिती पावले. निद्रेंत । कुणी उमललेया नेत्री निद्रिस्त । कुणा निद्राचि दुरापास्त । निद्राविकारी ॥ २९९२ कोणि असंबद्ध बडबडे । जागल्यांना अगम्य कोडे । कोणि भयापोटी आरडे । निद्राविकारी ॥ २९९३ योजिले नाही कधींच कांही । तरिहि धरोनि बाही । सोबतीने चालत राही । शब्दवृंद नि:शब्द ॥ २९९४ वळोनि पाहता असोशीने । सईंची विविध वदने । अश्रू कधि, कधि स्मिताने । माखलेली नजरेपुढे ॥ २९९५ तिसरे सहस्रक क्षितिजावर । मृगजळ की जळधर । धावावे लागेल निरंतर । तृषाशमनार्थ ॥ २९९६ तीन वर्षे नाही सरली । तोचं सायंकाल झाली । की नवी पहांट फुटली । कार्यपूर्तीस्तव ?॥ २९९७ भात्यांत हवा नव्याने हवी । उसंत भरावया मिळावी । स्वरावली कैसी प्रकटावी । शुद्ध, निखळ अन्यथा ?॥२९९८ तीनाआधी तीन शून्ये । मला जडली अ-क्षर व्याधी । कैसी कोठे मिळेल औषधी । आकळेना ॥ २९९९ आनंद विभोर की वेडाचार । नशेचा अंमल मगजावेर । कोणत्या काजे मजवर । अमृतवर्षा जाहली ॥ ३००० *********** २२ जून २०१४ ते आजपर्यंत.. ७ जून २०१७ दोन वर्षे, ११ मास, पंधरा दिवस काळवंडले आभाळ । उचंबळे मेघावळ । काष्ठ, पाषाण, स्थळ । आतुर शीतवाया ॥ ३००१ पुच्छ कोणते, कोणते मुख । अद्वितीय माय-लेक । दुरंग तरी नाळं एक । पंचतत्वां दंडवत ॥ ३००२ मायेचे शुभ्र वसन । ठिपक्यांचे वरती आरेखन । पीत चोळीचे अवगुंठन । झाकावया पान्हा ॥ ३००३ माय बिचारी संपुटली । लेकाने कक्षा विस्तारिली । काळी आई सुखावली । मनोमनी ॥ ३००४ शुभ्र ! रंगांचे मूळ । सूत्र ध्यानांत राखालं । आपेआप मोकळेलं । अर्थ सहजी ॥ ३००५ वाहतां शब्दांची मोळी । स्वेदबिंदू ओघळती कपाळी । परि आनंदकंदाची कळी । उमलो पाहे ॥ ३००६ कधि क्षितिजावरती । द्विजगणांच्या पंक्ती । मेघावळी तरंगती । पतनोत्सुक ॥ ३००७ काळवंडले आभाळ । उचंबळे मेघावळ । काष्ठ, पाषाण, स्थळ । आतुर शीतवाया ॥ ३००८ पंच पंच उष:काल । चित्तवृत्ती शीतळ । जगण्याचे बळ । परिणामी ॥ ३००९ दृश्यांची पुनरावृत्ती । जळे, स्थळे जरी वेगळाली असती । सहजी शब्दाशयांशी नाती । जोडणे दुरापास्त ॥ ३०१० मोहाने नाही चळला । खोल अंतरांत नाही ढळला । ऐसा जीवमात्र विरळा । भेटवा मज ॥ ३०११ कृष्णमेघ गजराज । तडितांची सुखद गाज । आभाळांत संगर रोज । वर्षाऋत्वारंभी ॥ ३०१२ कुडी कृश माजघरांत । गुट्या औषधींचा गंध । निरांजनांत ज्योत मंद । वृद्धावस्था ॥३०१३ आप्त येती जाती । कोणी पाहाती, दुर्लक्षती । नातवंडे मात्र बिलगती । वृद्धावस्था ॥ ३०१४ भोगिले वारा, धारा, धरा । आप्त-स्वकीयांसह संसारा । उभी ठाकिली सामोरी जरा । वृद्धावस्था ॥ ३०१५ केंद्रभूती केवळ । आभास मृगजळ । समांतर अस्तित्वाची कळ । भेटीविना ॥ ३०१६ तैसेची कांहिसे । सांगाती आहे भासे । भवती पाहता न दिसे । अखेरवेरी ॥ ३०१७ हे असेल परविश्व ?। की अंतरांतले अस्तित्व ?। अव्हेरुनी दृश्यमानत्व । वसे परि न दिसे ?॥ ३०१८ गाउलीच्या पाउलखुणा?। कीं पागोळ्यांचा अवखळपणा?। तरारल्या शाखा, फुला,पर्णा । संभ्रमावस्था ॥ ३०१९ जराविद्ध तरि तशांत । तेजास करुनी अंकित । पसरोनि देह अस्ताव्यस्त । मिरवूं पाहे ॥ ३०२० पाहावे दिठीने जसे । अंतरांत उमटती ठसे । परिवर्तितं होतसें । शब्दावळींत ॥ ३०२१ कितीही बांधा इमले । अंतर्बाह्य सजविलेले । हिरवी पैठणी ल्यालेले । हवेंचि भवताल ॥ ३०२२ देह, अंतरीची उद्विग्नता । पोळण्या अग्नि भासतां । मूलतत्वांची शुद्धता । शातवना पर्याय ॥ ३०२३ विलगू पाहते म्हणोनि मन । लौकीक सुखापासोन । अनुभवण्या तरुवर, जळ, पाषाण । करिते देहांस उद्युतक्त ॥ ३०२४ जरि क्षणोक्षणि वनराई । 'अंतराग्नि' शमविण्या सज्ज होई । मन नसेल जर देहाठाई । परिणामी फोल ॥ ३०२५ दृश्य पाहेल दिठी । अंतर्याम परि निरगांठी । राहेल सोडवीत ऐलतटी । उपायो शून्य ॥ ३०२६ शरीर वाटतसे थाऱ्यावर । मन परि वाऱ्यावर । ऐसी अवस्था दुधार । दुभंगण्या स्थैर्य ॥ ३०२७ मायबोली, अखंड पान्हा । लुचूं पाहेल कुणिही तान्हा । न ओसरेल कधिही जाणा । केल्याविणा तृप्त ॥ ३०२८ समान मानसिकतेने अनेकं । कित्येकें लिहिले लेखं । अनाठाइ परि उद्रेक । परोपासनेचा टळेना ॥ ३०२९ व्यथा प्रवाहे भळभळा । कशी उतरवावी 'व्यवस्थे'च्या गळा । धनी अनावर उचंबळा । एकलां मी ?॥ ३०३० उठा उठा भरुया चला । मायबोलीच्या पान्ह्यचा प्याला । तृषावल्या कंठाला । देण्या ओलावा ॥ ३०३१ डोळे वटारून । कोण पानाआडून । पाहे निरखून । कंठा दवाचा ?॥ ३०३२ तीन सहस्र-दशकोत्तरी तीन । रचियेल्या चरणी अर्धाधिक तीन । अ-क्षर निधिने त्रिवार वंदन । स्वीकारावे ॥ ३०३३ ज्ञानाबाळाचे पसायदान । विश्वकीर्त व्हावे म्हणोन । वाघिण-पान्ह्यात रूपांतरण । धजतो आहे करूं ॥ ३०३४ युक्त आधार, निवाऱ्याने । विसावण्या सुखद आसने । सजले अंगण रंगाने । कुणासाठी ?॥ ३०३५ परि हे सुखाचे द्वार । बंद काहून आजवर । शंका-कुशंकांचे काहूर । ग्रासे वृथा ॥ ३०३६ चित्र, शब्द परस्परा । देऊन एकमेका आधारा । अर्थवाही सारासारा । माडती सहजी ॥ ३०३७ क्रमणे दीर्घकाल सोबतीने । अव्हेरित भेटी, मुखदर्शने । रचनेंत केवळ रमणे । अतिसुखदायी ॥ ३०३८ भेटी बाहती अपेक्षा । सुखासवे कधि निराशा । दूर मनोविकारांच्या पाशा । ठेवणे हितकर ॥ ३०३९ शब्दांनी भिडावे, तंडावे । सुखवावे, शांतवन करावे । स्वत:स परि ठेवावे । नामानिराळे ॥ ३०४० शब्द असतो केवळ वारा ?। अस्पृश्य ज्ञानेंद्रिय शरीरा ?। त्वचेवरी सरसरून शहारा । फुटत असेलचि क्वचित ॥ ३०४१ तैसे असावे लागते दृश्य । सजग करण्या भावांसं । मूक हुंकार निश्वास । मग संवादतो शब्देविणा ॥ ३०४२ कोठल्याही घटिटांतं । मर्यादा भावाविगेला घालतं । अवलंब विवेकाचा करितं । वागणे इष्ट ॥ ३०४३ कठिण काळ जातो परतोनं । पाहतां पाठमोरे मागे वळून । सुख-दुखावलेले क्षण । भासती परकें ॥ ३०४४ सांकळले ? प्रवाहित करा । मोह झाला ? प्राप्त करा । अश्लाघ्य भासते ? अव्हेरा । कृतनिश्चयें ॥ ३०४५ मैफल सुनी सुनी । आज आली बहरुनी । शाख शिखांवर सुमनांनी । आसमंत उजळला ॥ ३०४६ काल परवावेरी होती । सीमांतरी अस्वस्थ शांती । तपाची प्रकटली निष्पत्ती । शुभ्रांगे ॥ ३०४७ तान्ह्याचे आगमन । आनंदासि सदैव कारण । बोबड्या बोलांनी 'घरपण' । पावते पूर्णत्व ॥ ३०४८ वल्लरी तेंव्हा होती । टेकलेली गर्भवती । भयग्रस्त अन् दिठी भवती । अपेक्षागर्भ स्तब्धता ॥ ३०४९ रापल्या भुजेवर । छकुल्याचा तरार । रावे पोपटी सहस्र । की जमले?॥ ३०५० की सावळ्या सख्यांमधे । उजळवर्णा रुळूं पाहाते । अहंकारे वावरते । मिरवित रूप ?॥ ३०५१ रंगांना अंगभूत आयती । छटांची अंगडी मिळती । छाया- प्रकाशांत भासती । परिणामी वेगळे ॥ ३०५२ प्रेम, माया, वात्सल्यभाव । जेवढी लावाल जीव । तेवढा जाणा तीव्रोद्भव । उसळेल विरहांत ॥ ३०५३ जाऊं पाहेल जीव । जेवढा अधिक लगाव । चरचरत्या जखमेचा घाव । त्यापरता सुसह्य ॥ ३०५४ म्हणतां, 'जडला जीव' । सांकळतीलंचि आसंव । मग कोणतेही असो नांव । प्रेमपात्राचें ॥ ३०५५ भेट होता नमन । वा कधी आलिंगन । कृतीचा आद्य कर्ता कोण ?। कैसी पडली प्रथा ?॥ ३०५६ वाटली पृच्छा, बरे झाले ! । भाव सहजी सजग झाले । समीकरण साधण्या अवतरले । शब्द चार ॥ ३०५७ चेतवा चेतवा गहन प्रष्ण । पेटवा पेटवा माझे मन । भेटवा भेटवा आशयधन । संवर्धनहेतु ॥ ३०५८ काजव्यांची स्फुंल्लिंगे । अजून रेंगाळली मागे ?। नवल कोणत्या योगे । वर्तले आज ?॥ ३०५९ भव्य भासे एक पान । तरुवरास स्पर्धा पूर्ण । त्रिमितीच होते कारण । पाहो जातां ॥ ३०६० निकटचे भव्य भासे । दूरचे अस्पष्ट दिसे । जरि मुळांत असे । प्रभावी अधिकं ॥ ३०६१ या ऐशा धारणा । मोहांत ढकलिती मना । सारासार विवेकाचा कणा । पाहती मोडूं ॥ ३०६२ दृष्टिभेट घडणे, उजाडणे । सर्वस्व बुडणे, उजाडणे । एकांचि समोच्चारणे । परिणाम भिन्न ॥ ३०६३ कोठे संभवे उजाडणे । कोठे भवताल उजाडणे । घटनांची परि कारणे । तेज वा तमोद्भव ॥ ३०६४ एक केवळ भौतिक । दुहे, असते आंतरिक । तारक कधि, कधि विदारक । पावक जरि तोची ॥ ३०६५ शीतळ सुखद बहुश: जळ । वेदना केवळ देते जळजळ । शमवाया कंठस्थ वा मनाची कळ । उपायो भिन्न ॥ ३०६६ अंशत: निशा जिथ । चांदव्याचा वास तिथे । तरिही परतेज परावर्ते । दिमाखाने ॥ ३०६७ स्वत:चे निवडावे अवकाश । सहसा असावे विनापाश । सहजी स्थळभ्रष्ट करण्यास । न धजावेल ऐसे ॥ ३०६८ अनिर्बंध सत्ता । मूलतत्त्वांची असतां । वेसण घालण्या वृथा । धजावती मनुष्ये ॥ ३०६९ धडाडत्या ढकलोनि कुडांत । पशुधन, धान्य, घृत । पिंड कावळ्यांचा उदरस्थ । चोरिती मनुष्ये ॥ ३०७० अभ्यासोनि वेग, काळ, काम । प्रतिष्ठूं पाहती नियम । कालांतराने सिध्दतो 'भ्रम' । जगती, मनुष्यांच्या ॥ ३०७१ अरे आपण कस्पटांची कस्पटें । मगजाचे कौतुक वाटे । जोवेरी निसर्ग ना लोटे । खाईंत मनुष्यांना ॥ ३०७२ निष्पर्ण, विविध स्तरनिविष्ट । शाखा धावती अस्ताव्यस्त । गाढ निळाईची संगत । अविचल ॥ ३०७३ आधार पाहती अव्हेरूं । जैसे उधळले वारू । कुंपण त्या पाहते ठरूं । जाचक बंध ॥ ३०७४ सोडोनि स्वगृह तुटतील । तर धरेवर पडतील । पुन:श्चं जोडू पाहतील । नाते, यत्न व्यर्थ ॥ ३०७५ धातूं, कठिण छंदबंधन । यमक जाणा कोंदण । उपमा, दृष्टांतादी रत्नांनि परिपूर्ण । काव्यमुद्रा होतसे ॥ ३०७६ असोनि पर अनंत । विहरतां येइना अवकाशांत । मुद्रा दर्शविते खंत । उमललेले ॥ ३०७७ समान सर्वां मिळते । विश्वांत कधिंच ना घडते । आपापल्या भवतालांते । मानावे सुख ॥ ३०७८ विहरणारा पसरोनि पर । कोठे असतो सुगंधी सुंदर । स्थलांतरित त्यांस वरचेवर । भक्षहेतू लागते व्हावे ॥ ३०७९ प्रकटणे, उमलणे, फुलणे । दिनांतरी कोमेजून गळणे । ऐसे क्षणभंगुर जिणे । शाखशिखेवरी ॥ ३०८० सौंदर्य, मोहक मखमली । कुणा जरी प्राप्त झाली । तेवतचि ज्योत अखंड राहिली । होते ऐसे ?॥ ३०८१ वेळ येता अवतरणे । इतिकर्तव्योत्तरी माघारणे । काळ घाला घालणे । निसर्गेच्छा ॥ ३०८२ जेथून मिळेल वाट । तेथोनि होते तेज प्रकट । छाया कितीही आवृत्त । जरि पाहे करूं ॥ ३०८३ छायादेहधारी माई । छकुले सावली सोबत जाई । सावलीच्या सावलींत होई । पूर्णाश्वस्त ॥ ३०८४ तेज प्रवाह तत्वत: सरळ वाट । वळसा घालोनि वक्रिभूत । उजळितो परि आसमंत । वोलाडोनि अडसर ॥ ३०८५ सूर्योदय वा अस्तवेळी । प्रभा फाकते आभाळी । सिद्धांताला मुरड आगळी । विज्ञानानुभूत ॥ ३०८६ ग्रहणकाली विशेषत: । वेध वा कर लागता । प्रकाश वक्रीभवन सत्यकथा । होते संपन्न ॥ ३०८७ संभव गोमट्या फळांचा । कर्म, कष्टोत्तरीच असायाचा । विश्वास कर्मकांडी कसायांचा । धरो नये ॥ ३०८८ धुऱ्या, मिरच्या, सुया, लिंबे । 'वारावया' म्हणे 'पापे' । सबजा ने 'बाबा' झोडपे । 'धरल्या' झाडाला ॥ ३०८९ वस्तीपासोनि दूर । उंच शोधा डोंगर कपार । उताणे होवोनि पाहा वर । दृष्टिसीमेवेरी ॥ ३०९० परिधा कल्पनेचे पर । जैसै वेगाने जातो तीर । सरळ अनंत योजने अपार । क्रमत राहा अखंड ॥ ३०९१ आकळेल परिचित स्थान । मनास वाटेल स्वप्न । विश्व-वर्तुळाचे ज्ञान । परतोनि येतां ॥ ३०९२ हिरवीकंच धावरी । कडेने पसरली सारी । शुभ्रांची नक्षी तीवरी । विलोभनीय ॥ ३०९३ शृंगारोत्तरी जणु क्लांत । गात्री सुख रिचवुनी निवान्त । गजरा वाढवोनि अस्तव्यस्त । चुरगळला कोणे ॥ ३०९४ घेवोनि समृद्ध शब्दावळ । मांडेल आशयपक्वान्न थाळ । साहित्य पंगतींत सेवेल । तो बिरुदें 'लेखकू' ॥ ३०९५ शुभ्रवर्णी षड्पंखी खग ?। की कात टाकलेला कीटक ?। नाजूक वा आक्रमक । संबोधावे कैसे ॥ ३०९६ नेमक्या भौमीतिक । रचना त्रिमिती सुबक । निसर्गदत्त नेत्रसुख । अपरिमित, अनिमिष ॥ ३०९७ अस्वस्थ रात्र-कथा । वेदनांची अखंड व्यथा । उपायो व्याधिशमनार्था । शोधतो आहे ॥ ३०९८ अश्वत्थामा मागे तेल । जखम वाहते भळभळ । किती युगांतूनि हिंडेल । मनुष्यत्व ॥ ३०९९ निश्चित केले स्थान । छेदबिंदू चतुराईने हेरोन । दश दिशांना झपावोन । देह सहजी उठावा ॥ ३१०० ********** २६ जून २०१७ तीन वर्षे, ४ दिवस पूर्ण.. संशोधनाने आले पुढे । अनंत विश्वांचे कोडे । त्याचे असते वावडे । बहुतेकांसी ॥ ३१०१ इवल्या मिळाल्या जिण्यांत । वारतां गरजांची भ्रांत । कैसे व्हावे एकाग्र चित्त । अभ्यासण्या कोडी ?॥ ३१०२ अर्धोन्मलित दोन । दोन विस्तारली पूर्ण । ताम्र एक, एक रजतांगानं । स्वागतसिद्ध ॥ ३१०३ पानगळ कि फुलोरा । मनांत संभ्रमाचा कंगोरा । मातीमाय परि आधारा । सकळांच्या ॥ ३१०४ फुले विखुरलेली चार । सुदर जणु पात्रे शुभ्र । मिळाली निळाईची झालर । खुलविण्या रूपडे ॥ ३१०५ चैतन्य पाहा उसळले । अश्वत्थशिखेवर अवतरले । अग्रांतून व्यक्त झाले । जपण्या सई ॥ ३१०६ कोणी तोडला वृक्षवर । साकारण्या घर संसार । पिंपळपानांच्या जाळीवर । उमटतील सई ॥ ३१०७ नको नको म्हणतांना । फुटलींच पाने । वासनांची राने । भुई'भार' ॥ ३१०८ कां बरे असा हट्ट । घालण्या सीमा भिंत । सुबक सजलेली चौकट । बाधकचि परि ॥ ३१०९ येतील दृश्यें बाहेर । तोडून बेड्या अघोर । नाही राहाणार पारावार । परिणामांना ॥ ३११० चला वल्लरी सुमने । डोलणारी आनंदाने । होतील अवनत मानेने । हिरमुसली अवकाळी ॥ ३१११ ईवले साकळ । समावले जळ । प्रयत्ने सफल । विश्वबिंब ॥ ३११२ जणू छकुल्याने । हट्टावे खेळणे । प्रतिबिंब मायेने । द्यावे जळी ॥ ३११३ कोण माय सांगा ?। कोठला लाडका ?। वचनांच्या फुका । वावड्याची ॥ ३११४ धार्ष्ट्य पाहा कसे । जळांतरी वसे । उलटलें भासे । अवकाशही ॥ ३११५ परावर्त पाशें । संभ्रम कांहींसे । साकार होतसे । मयसभा ॥ ३११६ समीक्षा ! नसावी निर्भत्सना । समीक्षा ! नसावी कुत्सितपणा । समीक्षा ! असावी दिशादाना । तत्पर सदा ॥ ३११७ समीक्षा ! नसावी भलावण । समीक्षा ! नसावी छिद्रान्वेषण । समीक्षा ! कृतींत फुंकण्या प्राण । प्रवृत्त सदा ॥ ३११८ स्मरते कां पाहा चोयटी । कर्तृत्वांत चिवट मोठी । पळसां सांधणारी छोटी । पत्रावळाधार ॥ ३११९ जर चोयटी गेली पोटांत । वेदनांची पराकोट । राहावे लागते प्रतीक्षेंत । प्रभांतीच्या ॥ ३१२० (परि जर गेली चोयटी । कवळा कवळोनि उदराप्रती । वेदनांची वाढते गती । निद्रानाश निश्चितं ॥) त्या सुरम्य 'गत'काळी । सणावारी सकाळी । लावण्या सुबक पत्रावळी । स्पर्धा असें घरांत ॥ ३१२१ तैसी कांहिसे महत्त्व । बालकां भरल्या घरांत । धरोनि राखण्या माय-तांत । होती कारक ॥ ३१२२ छकुल्यास दुखते खुपते । मन घराचें हेलावते । प्रतीक्षेंत राहावे लागते । कळी खुलण्याच्य ॥ ३१२३ वमन वा वीरेचन । भिन्नरूपी उत्सर्जन । आवश्यक राखण्या देह, मन । निरामय सदा ॥ ३१२४ धरेअंकी अवकाश । पहुडे विनासायास । मनोमनी जळांस । देत श्रेय ॥ ३१२५ मिलन आगळे । प्रतिबिंब बळे । एकुणांत भास सगळे । जडतां प्रीत ॥ ३१२६ प्रीत मृगजळ । प्रीत दाहक जाळ । प्रीत, भंगता व्याकूळ । जीव होती ॥ ३१२७ प्रीत, खरांच लगाव ?। प्रीत इंद्रधनूंचा गांवं ?। प्रीत केवळ अभाव । निवांत नीरवाचा ॥ ३१२८ प्रीतीविणा अस्तित्व ?। सांगा येईल पूर्णत्व?। निरस, नि:सत्व । वाटेल जीणे ॥ ३१२९ रुद्राक्षाच्या माळा । तरुवराच्या गळा । म्हणे 'संसारवल्लरी टाळा !। करा वारी' ॥ ३१३० धनी गेले वाटे म्होरं । बंद करून सारी दारं । आतां नको ऊशीर । गाठायला ॥ ३१३१ वाऱ्यावर शब्दावळ । उधळते विनामेळ । वेळीच त्यांस खीळ । घालणे उचीतं ॥ ३१३२ सुटूं पाहे तृण मेळा । इतस्तत: रानोमाळा । वेळीच आवळोनि आळा । बांधणे उचीतं ॥ ३१३३ पाहतांना पाठमोरी । थकलेली अस्तुरी । कष्टवलेले संसारी । जाणवे अस्तित्व ॥ ३१३४ धुकावल्या दिठींतं । खोल कुठेतरी अंतरांत । सईंशी कटु-गोडं, भेट । मूकपणे ॥ ३१३५ आलो ईथवर आज । संसाराला देत साज । आप्तस्वकीयांची गजबज । भवताली ॥ ३१३६ कधी भिडलो शृंगारी । कधी तंडलो तुटेवेरी । ना परि अतिचरी । कधि वाहवलो ॥ ३१३७ चित्त ठेवोनि सावध । दीठीने अपरिचितासि अवरोध । आक्रमणा विरोध । करूं पाहे ॥ ३१३८ जीव जरी इवलासा । देहबोलींत भरवसा । रक्षक सज्ज जैसा । सीमेवरी ॥ ३१३९ सुबक रेखीव सजलेली मूर्ती । परि पांपण्या दिठीपुढती । नमवून मस्तक कर जोडिती । श्रद्धाभावे ॥ ३१४० भांबड्यांसी सांगणे उचितं । साठवोनि घ्या दृष्टींत । कौतुक फुलवा अंतरांत । कसबकाराप्रतीं ॥ ३१४१ एक शुष्क पडले पिवळे । दुजे तवान हिरवे कवळे । एकमेकां वांछाबळे । आधारभूत ॥ ३१४२ जैसा वृद्ध कोणी । लहानग्याची अंगुली धरोनी । जीवनानुभवाची शिकवणी । देऊन पाहे ॥ ३१४३ सेतू किती बांधाल ?। गर्दी कल्लोळ टाळाल ?। हेतू सफल होईल ?। इप्सिताचा ॥ ३१४४ त्यापेक्षा धारा पर । वेगाने कापा अंतर । मेघावळीसह आधार । आभाळ देईल ॥ ३१४५ द्विजगणांची विहरणारी माळ । दिशादर्श सहजी होईल । वादळवाऱ्याचा कल । अभ्यासोनि सवयीने ॥ ३१४६ द्रोणाकडे रितेपणी । आज नाही दाणापाणी । पाठ त्यांकडे म्हणोनी । फिरवतीं कां ॥ ३१४७ परि तिरीप असह्य । जशी होत जाय । परततील तेचि पाय । छायाहेतूं आसऱ्या ॥ ३१४८ म्हणोनि तात्कालिक रूपे जरी । सांगती 'जा माघारी' । गुणावगुणांच्या विविध परी । साकल्याने स्मराव्या ॥३१४९ झाकताहे स्वमुद्रा, भाळ । अनावर जटाजंजाळ । हिरवी परंतू भूल । चित्तवेधी ॥ ३१५० तापसां पळ मोहाचे । सामोरे ठाकती रोजचे । अंतरास तरी करावयाचे । परावृत्त निग्रहें ॥ ३१५१ सोपानी थबकले मेहूण । प्रतीक्षिते यजमान । सुग्रास भोजन, दक्षिणादान । की अपेक्षिती ?॥ ३१५२ कंच हिरवा चुडा हाती । सुस्नांत, पतीसंगे प्रसन्न प्रभांती । मिरवत मनगटांवरती । उभी, पुष्कळा,सुलक्षणा ॥ ३१५३ स्पर्धा रंगे रंगछटांची । आकाशी की हिरवा याची। वनराणी नी मनुष्यांची । उद्यानांत निर्जन ॥ ३१५४ देण परि रंगांची । मुळच्या फसव्या शुभ्राची । अथांगी ज्याच्या अंतरंगाची । मापणे दुरापास्त ॥ ३१५५ पंख फुटता मोकळे होते । स्वबळान् झेपाऊं पाहाते । निळाईचे बोट धरते । कोठलेही छकुले ॥ ३१५६ बागुलबुवा सामोरी । परतावे वाटते घरी । भिडते मायेच्या उरी । विश्वासें, छकुले ॥ ३१५७ शुष्कशाख ऊर्ध्वगामी । तळाशी तरार बेलगामी । सद्यचित्र धामी, ग्रामी । वसते सामान्यतः ॥ ३१५८ सावरावे एकास । की जपावे दुजास । तारांबळ प्रौढ, पोक्तांसं । अनिवार्य ॥ ३१५९ उजव्याने कमावले । डाव्याने वितरित केले । पांपणीआडं साकळले । समाधान ॥ ३१६० उजव्याने ऐकिली । डाव्यांतून मुक्त केली । निंदा, निर्भत्सना, टवाळी । स्थिर पज्ञें ॥ ३१६१ इतस्तत: विखुरलेले । जलद जर गोळा झाले । अनावर होवोनि बरसले । सुखावतील वृत्ती ॥ ३१६२ पानांच्या पन्हाळींत । प्राण धारांचा धारिंतं । अखेरच्या थेंबापर्यंत । संवर्धेन जळ ॥ ३१६३ प्रकट सहज स्वगत । दृश्यमान देहबोलींतं । माडाच्या अंतरांत । अंकुरलेले ॥ ३१६४ अवहालिका खंबीर । सोपानसीमेवर । चिंब चिंब परिसर । आर्द्रावला ॥ ३१६५ गाभुळली सृष्टी । जडावली दृष्टी । पारिजात वृष्टी । कोण्या स्वागतां ?॥ ३१६६ षड्जाचा लगाव । मंद्र, खर्ज प्रारंभोद्भव । स्वरावलीं श्रुतींचा संभव । रागनिविष्ट ॥ ३१६७ पूरिया वा मारवा । स्वरसमूह तोच असावा । वादी-संवादी योगे मांडावा । भाव भिन्नरूपे ॥ ३१६८ एक झेपावले । दोन स्थिरावले । भोगती चौकटींआंतले । सीमित अवकाश ॥ ३१६९ जोखोनि स्व-क्षमतांनिधी । पर पसरावे, रावें जाणती । मनसुबे निगुतीने रचिती । विहारहेतु विहंगत्रय ॥ ३१७० चोयटी अतिप्रभावी । पत्रावळींस धरून ठेवी । परिणाम मात्र भिन्न दावी । अनिष्टस्थळी पोचतां ॥ ३१७१ जपल्या शिशुत्वा । शब्दांची खेळणी । वेदना, दुखणी । खोळंबली ॥ ३१७२ तिष्ठली आसमंती हिरवाई । दृष्टीचा ठाव घेई । प्रतीक्षेंत थकोनी जाई । जागल्यांच्या ॥ ३१७३ ऊघडा बाबांनो । मनाची कवाडं । दडता निद्रेआड । साधते काय ?॥ ३१७४ पळ दररोज । वेगे पळतांत । राहोनी जातांत । भोगक्षण ॥ ३१७५ निश्चितची तांत । वांछेस लागते । कोणी ना थांबते । तेल देण्या ॥ ३१७६ क्षणोक्षणी सुखावते । तना-मनां शीतल हवा । कशासाठी शोधाया हवा । 'तो' नसलेला ॥ ३१७७ क्षणोक्षणी करीतसे । वर आभाळ आवाहन । डोळे खाली झुकवोन । 'तो' दिसेल ?॥ ३१७८ क्षणोक्षणी शमवीते । तृषा शुष्काची जळं । न सांडा हृदयस्थ सांकळ । 'त्या' करिता, वृथा ॥ ३१७९ क्षणोक्षणी आधार । केवळ एक देते धरा । माथा टेकवाया फत्तरा । 'त्यां' आकार उगा ॥ ३१८० क्षणोक्षणी सामोरे लख्ख । वने, सरिता, उंच नग । तुलनेंत कां त्यांच्या अथांग । 'तो' आहे ?॥ ३१८१ म्हणे उरतो दशांगुळे । पार, धरा-तेज-वारा-अवकाश-जळे । थको गेले जरी अंतर, डोळे । 'तो' ! ना जाणवे वा ठाके ॥ ३१८२ तारा जणु कर्दमांत । जुळवो पाहे स्वत्व विभक्त । झेपावेल पुन:श्च अवकाशांत । मूलतत्वांत स्थिरावण्या ॥ ३१८३ आदर्श ऐसा असावा । प्रेरक पतनांत व्हावा । वैनतेयासम झेपावा । पांखबळे, रक्षेंतुनी ॥ ३१८४ किती व्हावी पर्णतर्पणे ?। किती थेंबांतून समर्पणे ?। एकजुटीची वचने । शाखेवरची ॥ ३१८५ धरावतरित अधिर जळ । होवून रूपधारी पागोळ । गाठू पाहे तळ । पर्णसोपानें ॥ ३१८६ चर्चा ! मोकळण्या अव्यक्त । चर्चा ! उत्तर वा घटनापूर्व रवंथ । बहुधा कांहीच हाती न लागतं । फलितं, विरतां चर्चा ॥ ३१८७ जराजर्जर देह, भानं । वेढण्या जरतारी वसनं । वाटते आले आवतण । मजलागी ॥ ३१८८ थांबता श्वास उरते माती । तरी कां तिज सजविती । किडा मुंग्यांना चंगळ आयती । परिणामी ॥ ३१८९ दृश्याचा वेध घेता । समोर केवळ अं'धुकं' अस्पष्टतां । की मगज-नजरेची अक्षमतां । जरोद्भव ॥ ३१९० तरिही प्रतिबिंबे प्रकर्षाने । निश्चित हेरोनि आपुली स्थाने । डुचमळती जळावतरणे । विकरण्या आकार ॥ ३१९१ कोण महाभाग लाटांवरी । क्रमणा नेटाने करी । गाठेल इप्सित ? शंका उरी । काळजी काळजांत ॥ ३१९२ चित्र पाहा अवचित वदले । मानसी माझ्या पूर्वावतरले । बुद्धि-अंतर प्रतिध्वनित झाले । परस्परां ॥ ३१९३ उंचावेनी मान । निरखते सान । थोरले सुपर्ण । फोफावलेले ॥ ३१९४ पहाटे पहाटे । अविरत चालते । जुळवाया नाते । पायवाट ॥ ३१९५ विस्तारलेले कुळ । घेवोनि हिरवळ । करूं पाहे शीतळ । पायवाट ॥ ३१९६ साठा उत्तरांच्या कहाण्या । सफळ संपूर्ण करण्या । आशयसंपृक्त वाहिन्या । केल्या शब्दसिद्ध ॥ ३१९७ अखेर साधायचे आहे । इप्सित पुन:पुन्हा बाहे । आणोनि असोशीने पाहे । प्राण ! दिठी कांठी ॥ ३१९८ थेंब चार जपलेले । 'शोषण'मुक्ती दिलेले । पानावरी विस्तारले । अस्तित्वसुखें ॥ ३१९९ तारकांका बाहेरी । अदृश्य सीमा अघोरी । उतरू पाहेल धरेवरी । गिळंकृती निश्चितं ॥ ३२०० म्हणोनि मर्यादांचे भान । इष्ट जिण्याकारणं । अतिचरागाठी मरण । जीवमात्रांसि ॥ ३२०१ म्यां पामर मूढमती । सर्वतोपरी मंदगती । नको झाली शब्दश्रीमंती । मजलागी ॥ ३२०३ हे पिशाच्च मानेवरी । उदयापासोनि अस्तावेरी । पिसाळते अविचारी । क्षमता न जोखता ॥ ३२०४ चोरा, लुटा, हरा । उसळत्या शब्दभांडारा । खाली करा घरा । माझिया गर्वाच्या ॥ ३२०५ पुढती सावली । पार्श्वी तेजावळी । त्रिमिती साधली । आपेआप ॥ ३२०६ पोक्तं स्व-आधारे । धाकले वाभरे, धावरे । इतस्तत: पसरे । पायवाटे भवती ॥ ३२०७ एकेक विटेने रचिले । विश्वभर मनुष्ये सजविले । कक्ष, परि रिकामे राहिले । बहुतांशी निशेंतं ॥ ३२०८ पंचदश प्रतिशत । सामग्री, कष्ट व्यर्थ । सांगा बरे आहे कां उचितं । जाणे वाया ?॥ ३२०९ ओलेती धरित्री । शिरशिरी गात्री । पाणावल्या नेत्री । प्रतीक्षा अखंड ॥ ३२१० 'ये ना झडकरी । राजसा तूं घरी । दाटलेल्या उरी । उचंबळ' ॥ ३२११ 'रातभर कांही । नीज आली नाही । मनोमनी सई । जोजावल्या' ॥ ३२१२ 'आठवणीं फुकां । मारतांती हाकां । वाढवीत भूका । मीलनाच्या' ॥ ३२१३ फुटतां पहाटं । उरांउरी भेट । राया आला थेटं । स्वप्नांतरी ॥ ३२१४ स्वप्ने पहाटेची । होती कां खरेची । की केवळं सायची । वांछेवरी ॥ ३२१५ अदृश्याने करावा प्रबंध । दृश्यमान, कारण अनिर्बंध । खाटल्यावरी वेध । देणाऱ्याचें, निष्क्रियां ॥ ३३१६ कांचनकणांची पखरण । अतिथि ? ना ठावके कोण । स्वागतास परिपूर्ण । सज्ज, पायघड्या ॥ ३३१७ गालिचे विविध पोताचे । भवतालि, गंध कोटींचे । आभाळ रंग-स्रोताचे । विविध, उदयास्तावेळी ॥ ३३१८ ऐशा परी महाभूतीं । स्थलकालातींत सांगाती । तैसी मात्र हवी वृत्ती ।आकळण्या ॥ ३३१९ पर्णांनी अवचित ल्याली । लज्जालालि कपोली । किमया कोणी केली ?। आकळेना ॥ ३३२० की फुले कुठे दडलेली । प्रीतरंगी रंगलेली । संभारांतुन वरती आली । गच्च पर्णांच्या ॥ ३३२१ धर्म, श्रद्धेय उंबऱ्यांत । मनुष्यत्व जनांत, वर्तनांत । बाणवणे आचरणांत । उपायो जिण्याचा एकमेव ॥ ३३२२ जगा जगूंद्या सहजपणे । कर्म'कांड न अवलंबणे । हेचि हितकर जिणे । सद्यकाळी ॥ ३३२३ कर्म'कांडा' पोटी केवळ । फुका दवडाल अर्थ, वेळ । पंचतत्वे आपुला 'खेळ' । राखणार अनिर्बंध ॥ ३३२४ बांग नको, नको शंख । नको वा घंटानादातिरेक । माणूसकीची एक हाकं । सर्वापरी सरस ॥ ३३२५ ऐका सागराची गाज । वा मेघांचा पखवाज । शीळेंच्या स्वरांतली भीज । रुजवा, वेळूवनांतल्या ॥ ३३२६ सगळी जाणा साद । 'अदृश्यां'ना देऊन छेद । उघड्या डोळ्यांनी वेध । घ्या विज्ञानसिद्ध सत्याचे ॥ ३३२७ नखशिखांत सजवोनी । अंगप्रत्यांगी अलंकरणोनि । लपेटले वल्लरींनी । मेहुण गौरींचे ॥ ३३२८ बाळ घेउन कडेवरी । पतिराया बरोबरी । घेण्या चालली माहेरी । पक्वान्नास्वाद ॥ ३३२९ आत्मविश्वास मळवट । प्रसंगी वाग्बाणक्षेपी कंठ । लेऊन अंगभर मर्दानी थाट । 'भामिनी' सज्ज ॥ ३३३० गर्द हिरवा पर्णभार । आधारा हात तत्पर । पार्श्वतेजाचे कर । उजळती अंगांग ॥ ३३३१ जणू करितसे पृच्छा । 'कोणती पुरवू वांछा ?। कल्याणकारी होवू काजा । साहाय्यभूत कसा ?'॥ ३३३२ फळतां मायगर्भी बीजांकुरी । वसा अखंड वागवूं उरी । पिवळे पडून गळेवेरी । राखूं इमान ॥ ३३३३ झोंबतां विखारी दृष्ट । स्पर्श अश्लाघ्य विकृत । अधिक्षेपभंगा सज्ज मनगट । सद्यकाली नारींचे ॥ ३३३४ काळी नितळ काय । दूरवर एकाग्र होय । डोंगरमाथा लंघोनि जाय । ऐसे भासे ॥ ३३३५ जलद निधाले जलद । धरेवर सांडोनि उद । अस्वस्थ, उसवलेले हुरुद । विरहकल्पनेने ॥ ३३३६ गिळावया कोणापासे । सळसळा पळतसे । आडदांड, शब्दश: भासे । शुष्क, धाराशायी ॥ ३३३७ अंतरांत उचंबळ, उधम । परिणामी दृष्टिविभ्रम । ऐसा असतो क्रम । सहसा संधिकाली ॥ ३३३८ जे दिठीस भासे । प्रत्यक्षी तैसे नसे । मनांस वाटत राहतसे । कुशंकोद्भवी ॥ ३३३९ पाहोनि सद्यस्थिती । अंतरी खंतावती । मूलस्रोती धाव घेती । शोधीत ठाव ॥ ३३४० पुच्छ ठेवोनि लोंबते । पाहाते आहे सावधचित्ते । जनावळीची नोंदण्या अनुचिते । वर्तनांतली ॥ ३३४१ गुप्त असावा छायक । तैसा कांहींसा रोख । नजरेंत सुप्त धाक । वागवीतसे ॥ ३३४२ कबरे, श्यामल, भुरे । वोतोनि जळ सारे । तृप्त करोनि धरें । मार्गस्थ सुप्रभांती ॥ ३३४३ ऐसे असावे निरपेक्ष । स्वत्व अर्पोनि शांतवनास । राखोनि आपुल्यापासं । न कांही, परतणे ॥ ३३४४ वेदनांची रिचवीत हलाहले । वेदीवरी सहज गेले । प्राणाहुती देवोनि निमाले । निमित्तें स्मरावे ॥ ३३४५ सुखद असेवेरी । किरणे घ्या अंगावरी । माध्यान्ही अंगारी । अन्यथा कष्टाल ॥ ३३४६ अश्वमेधाची यशस्वितां । मगजावर चढवते आढ्यता । मती भल्याभल्यांची चळतां । बळावते नैराश्य ॥ ३३४७ सत्ता, संपदेची सूज । अंतरबधीरतेचे काज । क्रांतीचे रुजविते बीज । आप्तस्वकीयांत ॥ ३३४८ पार्थीव मूर्ती थंडगार । म्हणोनीच वृश्चिकाचे घर । दंश अंगुलीक्षेपणोत्तर । निश्चित जाणा ॥ ३३४९ स्थलभ्रष्टता अप्रियची । सहसा सर्वांनाचं असायाची । प्रतिष्ठां 'संकटे' वारायाची । सवय आपेआप ॥ ३३५० दूर जाता बाहतो । 'आगंतुक' जणु पाहतो । जो जवळी जातो । लक्षण नेत्याचें ॥ ३३५१ ऐशा निलाजऱ्या परी । सद्यकाळी दंडधारी । उतलेमातले जनारि । विखुरले 'व्यवस्थें'त ॥ ३३५२ ढोल ताशे ताबूतं । कोण ठेवणारं काबूंतं ?। सार्वजनिक जनहित । पाहतो कोण ?॥ ३३५३ प्रारंभी प्रतिष्ठापन । अखेरीस विसर्जन । शक्ती, कालापव्यय दरम्यान । होतसे अपार ॥ ३३५४ प्रबुद्धही संतापती । संयमशिक्षा सांडती । मर्यादा अतिचारे वोलांडती । छळण्या 'भ्रष्टांना' ॥ ३३५५ शासक, नेते आरत्यांत । करोनि आत्महत्याप्रवृत्त । लांगूलचालन खिदळतं । करिती मतांमत्तां कारणे ॥ ३३५६ युवाशक्ती लावण्या सुकारणी । धजावेल जो जो कोणी । पाजतील त्यांसि पाणी । जनहितारि मदांध॥३३५७ ऐशा अस्वस्थ निराशाकाळी । विझोजाय आत्मज्योति पाकळी । खोल तमगर्तेतळी । विसावावे वाटे ॥ ३३५८ पुन:पुन्हा बाप्पा बाप्पा । झाल्या-घडल्या वारण्या पापा । पूजती विविध 'त्या'च्या रूपा । भयग्रस्त मनुष्ये ॥ ३३५९ 'तो' नि:संशय निराकार । अनिर्बंध निर्विकार । वाचविण्या निराधार । नावतरेल निश्चित ॥ ३३६० पापे कोणीही करावी । स्वत:च प्रायश्चित्ते भोगावी । साकडीं कशास घालावी । असमर्थासि फुका ॥ ३३६१ कर्णफुले विखुरली । कांचनकोंदणांतली । स्पर्धा रूपांची रंगली । आपेआप ॥ ३३६२ उतूं जाय 'अहं'पण । मौक्तिकांचे द्वाडपण । आधाराच्या बंधन । झुगारोनी हट्टाने ॥ ३३६३ कळिकाळाचे सोसून आघात । पायाचे प्रस्तरचि अबाधितं । युगानुयुगे जगतांत । जगतांत हे सत्य ॥ ३३६४ शिखरे पड-झडतील । निखळतां चिरे गाठतील । कसें ? कधी ? धरातल । 'पाया' वरी नकळता ॥ ३३६५ प्रीतरंगी बेभान । नकळत कैसे पतन । घरदारां सोडून । कां हे एकटे ॥ ३३६६ परत पाहाशील परतूं । जोडाया नात्यांचे तंतू । आप्तांतरांतला किंतू । नाकारेल मित्रां !॥ ३३६७ नियम रानांतले कठोर । भ्रष्टासंगे अधिकचि क्रूर । झंजावात आणखी दूर । क्षणार्धांत लोटेल ॥ ३३६८ झडली पाकळ्या, पर्णे । नाही त्यांना परतोनि जाणे । अविचारास न्याय ? मृत्युदंड देणे । बंद करोनि कवाडे ॥ ३३६९ घरभेद्यास नाही क्षमा । पुत्र-पौत्र कन्या वा वामा । आव्हान जंगलांतल्या नियमा । ठरते निष्फळ ॥ ३३७० रंगता आकड्यांचा खेळ । भाबड्यां, आंकड्या, भोवळ । शुद्धीसाठी शिंपण्या जळ । मग होते अप्राप्य ॥ ३३७१ बडव्यां हातीं कट्यार-शिक्का । भक्ताआठींत-पाठींत 'पवित्र' बुक्का । श्रध्येय पार्थिवासि आर्त हाकां । विरतीं 'बारीं'त ॥ ३३७२ आशयसमृद्ध शब्दांकिता । समग्र अनुभवगाथा । पुढती तुमच्या मांडतां । समाधान चित्ती ॥ ३३७३ छेद देता-घेतां जुळलेले अंतर । पाहोनि हस्तांदोलना अधीर । कंच हिरव्या शाखांवर । तरालली पाने ॥ ३३७४ दुरूनि निरखते नभ । रुजल्या आपुलकीचे कोंभ । विस्मरोनि जाती पाती भेद । छेद देत आनंदे ॥ ३३७५ हेतु राहो अबाधित । उंचवेरी प्रांगणांत । त्यांचे करण्या स्वागत । सज्ज निरभ्र निरव निळे ॥ ३३७६ जन्मजात मनुष्यतत्व । जोपासाया हवे अंतरांत । बीजे 'धर्मा'ची आगंतुक । निपटणे श्रेयस्कर ॥ ३३७७ धर्म दृष्टि देतो एकांगी । खुंटवितो बुद्धी एकाजागी । 'अन्यां'च्या निर्भेळ जगी । शोधितो भ्रंश ॥ ३३७८ कलला नारायण । सृष्टीस निद्रेचे आवतण । राहिले आहे खोळंबुन । उंबऱ्यावरी ॥ ३३७९ ढळेल जेंव्हा भास्कर । मिटूं जातील पांपण्यांची द्वार । थकले भागले शरीर ।आतुरेल विसावा ॥ ३३८० सूर्योदया परततील सावल्या । विरुद्ध दिशेने लांबलेल्या । तवान गात्रे, सर्वेंद्रीयां । करतील सजग॥ ३३८१ ऐसे जिणे चक्रांकितं । सहसा वनस्पती, जीवमात्रांत । अपघाताने बदल होतांत । क्रमण्यांतं ॥ ३३८२ प्रीत, वात्सल्य, ममता, माया । कळवळा, कणव, उमाळा वेधाया । कन्या, स्नुषा, माय, जाया । उपजत भाव वागविती ॥ ३३८३ सहसा जी स्थिराचल । कंपनें उचंबळोनि विचळेल । सोडून जाऊं पाहतील । धरा ! जीवमात्र ॥ ३३८४ खग व्यापतील आभाळ । जलचर खोल गाठतील तळ । भयभीतीनेचि गळून जातील । वनचर वा मनुष्ये ॥ ३३८५ उलटतील वृक्षवल्लरी । मुळे विखुरतील अवकाशावेरी । दृश्ये असली जिव्हारी । झोंबतील ॥ ३३८६ उमाळा अनावर कंठाशी । कधी जायचे ? कोणत्या दिशी ?। बंधनांना सोडून गाठींशी । कापूर होतं ?॥ ३३८७ मन द्विधा, त्रिधा, चतुर्विधा । वेगवेगळ्या परींच्या वेधा । टिकवू पाहते सांधा । कां अजूनवेरी ॥ ३३८८ होईल कधी 'शून्य' मन ?। आगळ्या प्रभेचे अंगण । शांती, निरव, निर्विकारपण । भारेल भवताल ?॥ ३३८९ विलोभनीय अशा परी । मूलतत्वांच्या अंतरी । पुष्प-पर्णे रचना कमानीवरी । दिवसाच्या स्वागतां ॥ ३३९० मुग्ध जरि अबोल । दृष्टीस सहज मोहजाल । प्रीतरंग मूकपणे हलवेल । मानसलहरी ॥ ३३९१ जठरतुष्टीस हवे मिष्टान्न । नखशिखान्त पार्श्वपृष्ठास वस्त्रालंकरण । दृष्टीस कोसळत्या वृष्टीचे विलोभन । गाभुळल्या सृष्टीचे ॥ ३३९२ काया, वाचा, मन । समग्र एकाग्र करोन । व्हावे कर्मप्रवण । फाकंता प्रभा ॥ ३३९३ कर्म, पर्यायी देव । कर्मांतचि वसतो भाव । कर्मांतचि लागतो ठाव । फलप्राप्तीचा ॥ ३३९४ शोधींत असतां आधार । नात्यांचे गवसले घर । पात्याची विरली धार । विळखोनि बिलगतां ॥ ३३९५ आधाराशी गळाभेट । भावनेचा ठाव थेट । आंसवभिजले पांपणींकाठ । परिणामी ॥ ३३९६ खरे काय, काय खोटे । संघर्षणाने गांठ सुटे । कालांतरें सत्य भेटें । बहुधा विपरीत ॥ ३३९७ अच्छादित परि रिता । उघडा परि पालथा । घटांच्या विविध कथा । व्यथा अबोल ॥ ३३९८ घडविलेला कुणि सुबक । कुणि अंगारांतचि खाक । जन्मजात असते कां सुख ?। की कर्मोद्भवी ॥ ३३९९ घट, ज्येोत वा फुले । प्राक्तन असते वेगळे । देव्हाऱ्यांत कुणी, कुणि चाले । प्रेतासवे ॥ ३४०० धर्मवेडे इथे बेबंद । अबलंबित अतर्क्य कर्मकांड । 'मनुष्यत्व' केवळ जोखड । मानिती एक ॥ ३४०१ नवजातं की पिकलेले ?। जराजर्जर कीं कवळे ?। पतनोत्सुक कीं तरारलेले ?। कोडी असंख्य ॥ ३४०२ अंतरंग प्रतिबिंबितं । बाह्यरूप, देहबोलींत । सहसा न असे होतं । उत्कांत प्रजातींतं ॥ ३४०३ मुखवटेचि भेटती अनंत । चेहेरे मात्र मर्यादितं । कैसी कोणं टाकेलं कातं । सांगतां न ये ॥ ३४०४ प्रेम, लगाव वा विखार । सहजचि दाविते नजरं । जित्रापांनेत्रिचा पार । जैसा सहजी आकळें ॥ ३४०५ ऐसी मनोवस्था कांहिंशीं । दाटते रुद्ध कंठाशी । सांकळतां एकांडेपणाशी । समग्र भावं ॥ ३४०६ काय असेल पैलासी ?। काय ठावे कोणासी । बहुधा कसनुशी असोशी । विरह भारले भवताल ॥ ३४०७ कोण परतला कथाया । पैलाची अतर्क्य 'माया' ?। तोचि असतो मूळ पाया । धावण्या जिण्याकारणे ॥ ३४०८ अकारण असतो ध्यास । मरणानुभव घेण्यासं ?। कधी वाटते कोणास । व्हावे तमगर्तागामी ?॥ ३४०९ वेदना वंचना व्याधी व्यथा । जिण्यातल्या मरणकथा । शोषितायुष्यांची गाथा । आसवांची वोसंडते ॥ ३४१० धर्म, टाळकी 'बडव्यां'चा । धर्म, मनुष्यत्व बुडव्यांचा । धर्म, कर्मठ कडव्यांचा । सद्यकाली ॥ ३४११ सुवर्णपात्र कलंडले । जळ निळेशार वोसंडले । हिरव्या नक्षीच्या फुटले । स्मित कपोली ॥ ३४१२ अश्विनी कांचनझळाळी । नभासही चाहूल लागली । स्वागताची सुगी झाली । कृषिवलागृही ॥ ३४१३ जड दूधभरले घट । कणसभारें वाकली धाटं । कापणी मळणी झटपट । अन्नदाता करुं पाहे ॥ ३४१४ वारिले मळभ झाकोळ । आतां आनंद कल्लोळ । अंतरी प्रीत, मायेचा उचंबळ । अस्तुरी, आप्तांसाठी ॥ ३३१५ तरवारी, चिलखते, मुजरे, फेटे । घोडे, भगवे-हिरवे बावटे । अंतरी ओतप्रोत उबग दाटे । शिळ्या कढीच्या उताने ॥ ३४१६ पैठण्या नऊवारी, पिंगे । महिलावर्ग समस्त रंगे । शतकानुशतके मागे । पिटाळती मानसं ॥ ३४१७ पुरातन उखडलेले चिरे । गंजलेली 'महा'द्वारे । सोडिती गिधांच्या आसरें । दुर्लक्षोनि गडकोट ॥ ३४१८ उघडा डोळे बघा नीट । सांकळले युद्धाचे सावट । सज्ज कराया युवा धीट । सद्यकाली सरसावा ॥ ३४१९ हे खरेंचि विभूती स्मरण ?। कीं केवळ समृद्ध 'अर्थ'कारणं ?। दीड वितीची छाती घोवोनं । बाजारबुणगे माजले ॥ ३४२० नदीपात्रांत वाहवती लुगडी । त्रस्त भाबडी उघडी नागडी । अंधश्रद्ध मूर्ख कावडी । वाहती शहाणेसुरते (?) ॥ ३४२१ कशासाठी अर्थहीन तुष्टी ?। भरण्या केवळ मतपेटी । निर्लज्जांच्या उरली गांठी । दाविण्या प्रलोभने ?॥ ३४२२ कुठवर द्याल भूलथापा । कांटेरीच्या जोपासत रोपा । उलटेल बाजी, 'मारा, कापा' !। कोपलेले आरडतील ॥ ३४२३ शुष्क पर्णहीन शाखा । शुभ्र चाफा धारी शिखा । तैसा कांहींसा अनोखा । दृश्यमेळ ॥ ३४२४ लपायाला चांदव्यास । नाही हिरवा निवास । मावळतीचा प्रवास । जरी आरंभिला ॥ ३४२५ कवळ्या किरणांचे झेले । झेलायाला आतूरले । निळभोर सज्ज झाले । तेजोनिधि स्वागता ॥ ३४२६ किती लावाल चाळण ?। नी झाकाल शुभ्र वाण ?। निळाई मिरवे गोंदण । चांदव्याचे ॥ ३४२७ अती नसावे शोकमग्न ।अती न करावे सांत्वनं । अती ठाई माती जाणं । मतीची सहसा ॥ ३४२८ अती नये राखू गर्व । अती नये चाखू सर्व । अती नये घोकू पर्व । स्वस्तुतीचे ॥ ३४२९ नार अस्तुरी पूर्णपोळी । तुही मर्जी बी सांभाळी । दिल्ली काहून साडी-चोळी । सवतीले ?॥ ३४३० तिले लाड सांज-सकाळी । हिची करायाले होळी । तिने द्यावी कोणा हाळी । मदतीले ॥ ३४३१ अवघ्या संसाराची साय । आज छकुल्याची सय । कंठी उमाळ्याचे भय । क्षणोक्षणी ॥ ३४३२ अवघ्या संसाराचे सार । नातवंड घरभर । वाटे वाजेल कां दार । हाके पाठी ?॥ ३४३३ हिच्या ठाई साकळले । अवकाशीचे अवघे निळे । चौर्यकर्म बहुधा झाले । निद्रेच्या साखरझोपी ॥ ३४३४ हिच्या ठाई साकळले । गडद निळे, गडद निळे । अवकाशी जरी ओसरले । जलद जळघट ॥ ३४३५ अवकाश अनंत अथांग । ठाई बाळगे विपुल रंग । अमर्याद कोठाराचे अंग । कधि न जाय वोसंडू ॥ ३४३६ लुटोनि लुटालं किती । 'दानशूर' याची कीर्ती । पंचमहाभूतांची व्याप्ती । कुठवेरी, न कळे ॥ ३४३७ चित्ता बाळगावा चित्ती । वारण्या जिण्यांतल्या भ्रांती । सशाची ओतप्रोत वृत्तीं । पापभिरुतें असावी ॥ ३४३८ हिरवाईच्या गवाक्षी । नभनिळाई साक्षी । विलोभनांत कुणि पक्षी । धजेना उडूं ॥ ३४३९ आभाळ ज्याचे त्यास । हवेंच मिळावयास । जिणेभर सायास । अट्टाहास त्यासाठी ॥ ३४४० गवाक्षी अंगभर । पटल लालीम चुणीदार । बहर नक्षीचा त्यावर । पुष्पांकित ॥ ३४४१ गिरिशिखरावर स्थाई । विहंग निरखून पाही । घटतटावरची कांही । मोहक पुष्पे ॥ ३४४२ ऐशा स्वाभाविक आकृती । काष्ठ-पाषाणी दडून असती । मात्र शोधावया मती । हवी सजग ॥ ३४४३ मूलद्रव्ये धरागर्भी ठाय । विवध योजुनी उपाय । सिद्धता त्याची करो जाय । कल्याणार्थ विज्ञान ॥ ३४४४ सरितेस या पैल नाही । अखेरवेरी जगत राही । श्वास खंडतां हो प्रवाही । तमभरला निरव ॥ ३४४५ हे स्वप्न असेल कदाचित । परि शेवट मात्र निश्चितं । दृश्ये अतर्क्य मृत्युपश्यात । कल्पणे व्यर्थ ॥ ३४४६ ज्या जायचे नाही । गावां ! 'बहुधा असा असावा, । भवताल !'। अंतरी पाहावां । सायास वृथा ॥ ३४४७ लाल फेटे डोईवरी । तुऱ्यांची फडकते भरारी । निघाली रामपारी स्वारी । कुठे म्हणे ?॥ ३४४८ समभाग चौकटीचे दोन । बिंब-प्रतिबिंब, कांटेकोर प्रमाण । दृश्यमान वैश्विक गुण । ठाई ठाई निसर्गाचे ॥ ३४४९ कधि दावि तो नटलेले । आभाळ, रंगांनी माखलेले । वडवानळ, अनावर जळे । भयावह कधी ॥ ३४५० तो गर्वधर, अहंकारी ? नाही !। तो सर्वनाशकारी ? नाही !। दयार्णव, कल्याणकारी ?। नाही ! अ-जाणता तो ॥ ३४५१ राहा ! जोवरी राखेल । जगा ! श्वास चालेल । जोवेरी ! झाकोळ ग्रासेल । जिण्याला ! निमुटं तोवेरी ॥ ३४५२ दृश्यभागी उत्सर्जन मार्गिका ?। काय म्हणावे रचना साधका ?। ऐशा नरा कां फुका । सोपवावे कर्म ?॥ ३४५३ ओवी ज्ञानेशाची । व्हावी सकल विश्वाची । व्यक्तण्या अंतराशयाची । व्हावी साधन ॥ ३४५४ कसली नाती गोती । कसल्या जाती-पाती । अनलानिलाभाळावनि, जळवंती । कसली ? उन्मळतां विश्व ॥ ३४५५ आपुलकी बेगडी वा द्वेषाची धार । अंतरी जवळीक वा हेटाळ, अपार । खदखदताहे तोवर । पोरके राहील मनुष्यत्व ॥ ३४५६ स्वगृहिची माय, अस्तुरी । लेकी सुना तद्नंतरी । नेमाने स्मरा आयुष्यभरी । त्याचं 'दुर्गा' जाणा ॥ ३४५७ नवरात्र ! केवळ असावे निमित्त !। नवरात्र ! जागवण्या मानस निद्रिस्त !। नवरात्र ! आदरण्या महिलांना समस्त । करावे साजिरे ॥ ३४५८ धाडूं पाहाल उघड्यावरी । पलिते होतील अवघ्या नारी । नारायणास पळण्या भुईवरी । न कुशाग्र राहील ॥ ३४५९ इतिहासजमा अबला आज । शोधू पाहाल अतर्क्य काज । ' 'मर्दा'नकीचा वृथामाज । दावण्या ! नका धजूं ॥ ३४६० स्वागतार्थ उंच कमान । पायघड्यांप्रित्यर्थ पुष्पभान । आज काहून ? येणार कोण ?। जाणण्या उत्सुक मानस ॥ ३४६१ आभाळी अल्प झाकोळ । गारवा पांघरोनि सोनसकाळ । रेखीव सुखविण्या पायतळ । मार्गिका सज्ज ॥ ३४६२ वनराई हिरवीगार । खाली कौलारू छप्पर । आनंदाचे निवांत घर । माडांमधे ॥ ३४६३ अस शांत नी निरव । मन स्थिरायाला हवं । शुद्ध विचारांचा भव । मग आपेआप ॥ ३४६४ कलिका, बालिका, कुमारी । रजस्वला, नवोढा, गर्भधारी । जराजर्जर वृद्धा कांपरी । अवस्थांतरे बिकटं ॥ ३४६५ नर वाढतो, फोफावतो । मद मस्ती जिरवित ओसरतो । अंगी न लावोनि कांही घेतो । निवृत्त होतो सुखाने ॥ ३४६६ दुखावली जर वल्लरी । सूड वागवीत अंतरी । भल्या भल्यांची त्रेधा करी । मोहिनीरूपे ॥ ३४६७ जिण्यांत बंधने सोसणे । अखंड सासुरवास, बाळंतपणे । निगळणे अपेष्टा मूकपणे । परी मरणाच्या अनंत ॥ ३४६८ माघारे भुरा झाकोळ । निळाईस खुले आभाळ । ऊन सावलीचा खेळ । अश्विनातही ॥ ३४६९ तरुअंकी पर्णसमृद्ध शाख । शिखेवर उंच विहरे खग । मोकळे मुक्त अवघे जग । उचंबळू पाहे ॥ ३४७० प्रतिबिंबे निरखुनं । पाहती जलयान । मनोमनी आनंदोन । क्रमती संथपणे ॥ ३४७१ अंतर्मनांत डोकवावया । स्थल ऐसे हवे मिळावया । मोह, मद, मत्सरभया । न जेथे प्रवेश ॥ ३४७२ स्तब्ध सारी सृष्टी असे । पाते लवताहि प्रलय भासे । शांतप्रज्ञा पूर्ण विश्वासे । भवताली स्थिर ॥ ३४७३ मेळावे, गर्दी ठाई ठाई । कर्मेंद्रियां उसंत नाही । एकाग्रतेची सोडून बाही । ज्ञानेंद्रिये इतस्तत: ॥ ३४७४ ऐशा काहीशा सद्यकाली । जिथे जिण्याची उलाघाली । सुप्त वांछा मनांतली । सफल, चित्रोत्तरी ॥ ३४७५ अंतरिची दीपकळी । सुकृत, विचारांसि उजळी । विखाराचा तम जाळी । निश्चयांती सहजपणे ॥ ३४७६ मेळावे गर्दी ठाई ठाई । चित्त घाबरे थकोनि जाई । काळीज कांपींत येई । चित्कार कधि किंकाळ्या वृथा ॥ ३४७७ मेळावे गर्दी ठाई ठाई । भुरट्यांना ऊत येई । सुरक्षा अवघी व्यस्त, मस्त राही । बेसावध सणासुदींत ॥ ३४७८ सन्निध जलाशय विस्तीर्ण । तटावर तरुवर, तृण । घरटे सुस्थळी केले निर्माण । साधनेस्तव मनुष्यें ॥ ३४७९ जळअंकी पंचबिंदूंची नक्षी । विलक्षण समांतर तरंगति पक्षी । दृष्टी एकाग्र होवुनी प्रेक्षी । वेधण्या पैलप्रदेश ॥ ३४८० भुजा दोन्ही उंचावोनि । जटाशीर्ष मुद्रा निर्विकार करोनि । योगमग्न कोण मुनी । आहे उभा ?॥ ३४८१ निरखोनि पाहा मुख । चिंता नजरेंत भासेल एक । लंबगोल भवती शाख । दृश्य मर्यादा ॥ ३४८२ काल गेलेले जाउंदे वाहून । उद्या परि टाळण्या पुनरावर्तनं । आजपासोनि सावधान । राहणे उचितं ॥ ३४८३ बेसावध जो राहील । परिणाम खचित भोगेलं । सावरण्या मग 'अकालं' । न गवसेलं संधी ॥ ३४८४ तरुणाईची घनदाट जाळी । सोबत ज्येष्ठांची मांदियाळी । चांदवा चतकोर न्याहाळी । अनिमिष कौतुके ॥ ३४८५ निळ्या आभाळभाळा । चांदव्याचा नाम-टिळा । अबालवृद्धांच्या डोळा । परमसुख ॥ ३४८६ टाळ, चिपळ्या एकतार । घेऊन सज्ज अवघे तरुवर । वारीचा उत्साह अपार । कार्तिका आधी ॥ ३४८७ आभाळ विरघळे कधि तमांत । कधि आभाळ उजळे क्षणार्धांत । युगानुयुगे सृष्टि-नियमांतं । स्थितं, जाणा आभाळ ॥ ३४८८ आभाळ ! एक अगम्य कोडे । आभाळास ना कुणाचे वावडे । कोसळून कुणा डोईवरी पडे । आभाळ, अनिश्चित ॥ ३४८९ आभाळ ! केवळ अनंत पोकळी ?। आभाळ ! उदासवाणे, कां झाकोळी ?। संपृक्त, ओथंबलेले कधी गर्भजळी । आभाळ ! वर्षण्या सुख ॥ ३४९० पोरांसंगे नारी, फेर तालावरी, थिरकं दारोदारी, बेभान होतं..! ३४९१ नभ उजळेल, कान्हा माघारेल, विरहं उरेल, केवळं गांठी...! ३४९२ शेष वंशाचा प्रतिनिधी । कणखरं बाहूबळाचा निधी । अतिक्रमणा प्रतिबंधी । सजगपणे वनारींच्या ॥ ३४९३ रापलेली कभिन्न काया । रासवटीची पूर्ण रया । युगानुयुगांची तपश्चर्या । संपता संपेना ॥ ३४९४ राजवट याची कुंपणाअल्याडं । मनुष्ये वसती निवांत पल्याड । कोण्याकाळी शाखांची पडझड । अंगांग दाविते जखमां ॥ ३४९५ कोण्या द्विजाचे छकुले । अजून नाही ल्याले । पर ! परि घरटे सोडले । किमर्थम् म्हणे ?॥ ३४९६ योग्य अयोग्य चिन्हांकित । विणीची पोलदी चौकट । तीवर दुविधावस्थ । स्थिरावले पिलू ॥ ३४९७ प्रतीक्षा चिमण्या ग्रासाची । आतां यापुढे रोजची । पंख फुटोनि झेपावण्याची । अक्षमता जोवरी ॥ ३४९८ माय तांत येतीलं । मुखी सुग्रास लावतील । आनंदे विभोर होईल । कुटुंब अवघे ॥ ३४९९ समग्र जीवमात्राची ही कथा । रोज नेमाने अनुभवतां । पंचमहाभूतांप्रति कृतज्ञता । अनिवार्य तुम्हा आम्हा ॥ ३५०० त्रिसहस्रोत्तरी पंचशतके । शब्दांचे खेळ फुके । कशास ? मलाच ठावके । नाही होत ॥ ३५०१ कुठली होती अक्षर-नशा । बाहत होती गुंतविण्या पाशां । समर्थ आशयांश स्पर्शा । ठेवोनि दूर ॥ ३५०२ भरकटलेला मी पांथस्त । अक्षरांच्या निबिड रानांत । विक्राळ गर्जनांनी भयभीत । ग्रंथकर्ते, वैयाकरणींच्या ॥ ३५०३ नखशिखान्त सरळ सोट । काटेरी भवतालि फक्त । दूरच्या वसती पर्यंत । दिसे भकास धरती ॥ ३५०४ जाळता एकांडेपण । सोबती न येत कोण । खुल्या वृत्तीचे अंगण । स्नेहमयी ठरते ॥ ३५०५ बालके तर क्षणार्धांत । ज्येष्ठांचे धरुन हात । लंघुनि गर्दीचे पथ । दाविती पैल ॥ ३५०६ डोळे वटारोनी दोन । मनीमाऊं पानांमधून । पाहताहेंत एवढे निरखून । काय बरें ?॥ ३५०७ दडून एकमेकापाठी । भक्षामागे पळण्यासाठी । मनांतल्या खूणगांठी । पाहती दृढ करूं ॥ ३५०८ गर्द राज्ञिरंग, उचंबळे बहर, आनंदविभोर, तरु अवघा ! ३५०९ सुमनांचे गेंद, शाखशिखेवरी, स्वागताची तयारी, दसऱ्याच्या ! ३५१० डोकाऊं पाहाती, फुले सीमापार, लंघण्या अंतर, प्रेमभरे ! ३५११ गार हिरवा अल्याड, तप्त साज पल्याड, शांत अंतरा कवाड, शृंगाराचे । ३५१२ पर्णपुष्कळा वल्लरी । कंठी मंगलसूत्रधारी । उजाडता प्रयत्ने वारी । नारी अशुभ झाकोळ ॥ ३५१३ कसली दशमी वा दसरा । जिण्याचा तोच पसारा । कमावण्या चिमणचारा । सजग अवघे जीवमात्र ॥ ३५१४ कोण्याकाळी रावण । म्हणे होता व्युत्पन्न ब्राह्मण । बाळगोनि राक्षसगण । अत्याचार हेतु ॥ ३५१५ तैसेचि सद्यकाल काहींसे । पुराण भाकडांच्या मिशें । मनुष्यांतली राक्षसे । जागृतावस्थ ॥ ३५१६ जाण्या जलधि लंघोनि । वानरे सेतु बांधोनि । राक्षसावस्था झटकोनी । मोकळिली मनुष्ये ॥ ३५१७ काय खरे काय खोटे । कालापव्ययी जाल मोठे । कर्मयोगास फोडण्या फाटे । फेकती भोंदू अव्याहत ॥ ३५१८ बाकावर मनीमाऊं । जमीनीले खंड्याभाऊं । 'दोघे मिळून जाऊं' । म्हणती, 'स्वप्नांगाठी !'॥ ३५१९ आली उन्हे अंगावर । मनी निद्रेचा कहर । करेल ना गुरगुर । आता धनी ? सांगाजी ?॥ ३५२० आज सुटीचा दिवस । काहून बा याचा त्रास ?। ३५२१ छान साखरझोपेस । कां हा भंगू पाहे ?॥ दोघे जणू ध्यानमग्न । उगा करीती चिंतनं । निमिषांत तप भग्न । सुवासें न्याहारीच्या ॥ ३५२२ खंडूभाऊंमनी आसं । मनी राखूं दे विश्वासं । या अतूट मैत्रीसं । न लागो गालबोट ॥ ३५२३ जैसी इवली दीपकळी । शिखेवर रेखते काजळी । तैसी दिसा उत्तरी काळी । उरे निशा ॥ ३५२४ प्रकाशांती अंधार । जीवमात्रां भय घोर । अस्वस्थभारे अंतर । उजाडेवेरी ॥ ३५२५ मावळणे, उजाडणे । जरी चक्रांकित नेमाने । पंचतत्वांचे नियम चुकणे । ठावके कोणा ?॥ ३५२६ किरणे कोवळी । अंगभर ल्याली । पालवी फुटली । जिगिषेची ॥ ३५२७ उर्ध्वगामी होत । पांपण्या मिटतं । गर्तेच्या खोलींतं । डोकावते ॥ ३५२८ स्वच्छ अवकाश । मोकळण्या श्वास । निशेच्या नशेस । विस्मरण्या ॥ ३५२९ थांबवू पाहाता । कां न ओसरतां । अक्षरांची कथा । जाय पुढे ?॥ ३५३० जन्म आज मनुष्याधीन । अनियोजित परि मरण । ज्या-त्याचे प्राक्तन । रेखलेले ॥ ३५३१ निवृत्ती कळिकाळ । आंत्रास्तरा गंडमाळ । मगज काळीज वा गर्भजाल । व्याधीग्रस्त ॥ ३५३२ जोडणे घडण । तुटणे मरण । सारेंच अाधीन । प्राक्तनाच्या ॥ ३५३३ कुणापाठी मनीमाऊं । पाहाते आहे धाऊं । की मूषकांचा राऊं । पळताहे पुढे ॥ ३५३४ शुभ्र स्वच्छ सर्वांग । काळे जरी अंतरंग । हेतूं साधण्यांत दंग । देहबोली ॥ ३५३५ जातो नेहमीच बळी । भेटतां जिण्यांत बळी । जाणोनी अशावेळी । हितकर पलायन ॥ ३५३६ जळामध्ये सळसळ । प्रस्तरांतुन उचंबळ । उन्मेषी उर्जेचा भवताल । पंचतत्वकारणे ॥ ३५३७ तृणबाळे झेपावती । मासोळी धरूं पाहाती । पाषाण, जलतत्वाची । सजीवांगे दोन्ही ॥ ३५३८ कुणाचा सूर खोलवरी । अग्रावर कुणा धार कट्यारी । जिण्यासाठी विविध परी । स्वरक्षणाच्या ॥ ३५३९ ऊजळणे त्याचा । धर्म अंगभूत । प्रकाशवाटेंत । सौम्यतेज ॥ ३५४० परिपूर्ण दृश्यात्म । आशयघन, काव्यात्म । महाभूतांचे अध्यात्म । प्रतीती देई ॥ ३५४१ कवळी किरणे अंगावरी । कोण योगी शीर्षासन करी । रापलेला देहधारी । भासे तापस ॥ ३५४२ जटा पसरल्या धरेवरी । शोषण्या जळ अंगभरी । ऊर्ध्वगामी शाखशिखेवेरी । पोषणहेतूं ॥ ३५४३ ऐसी सारी तऱ्हा उलटी । शरीरी धारण्या तेजपुटी । समग्र योगीयांच्या गांठी । क्लृप्त्या अघोरी ॥ ३५४४ निरपेक्ष भक्ती ?। ढोंगी प्रवृत्ती । फळाची आसक्ती । अनिवार्य ॥ ३५४५ निरपेक्ष भक्ती ?। बकध्यानं वृत्तीं । इप्सित भक्ष प्राप्ती । साध्य अंतीम ॥ ३५४६ झुंजुरका कोण गवळणी । कुडीजोड पथावर सांडोनी । अनावर ऊर्मीं शमवोनी । रासक्रीडांतरी परतल्या ?॥ ३५४७ गोपाळें नाही सोडिल्या । हिसकता इतस्तत: पांगल्या । जनलज्जें भयग्रस्त झाल्या । त्यजुनी नाजुक कर्णफुले ॥ ३५४८ वाढविली कंकणे काहींची । श्रृंगारी धसमुसळ्या, शुद्ध कसची । वस्त्रे तेवढी अंगावरची । सांवरली त्यांनी ॥ ३५४९ (वाढविली कडी, कांकणे। श्रृंगारी प्रकार जीवघेणे । तोडोनि, सवतीकडे जाणे । सवय दुष्टाची ॥) (वस्त्रे कांस, वक्षांवरची । जेमतेम सांवरली ॥) छळणार हा कोठवरी । बालमुकुंद अवखळ मुरारी । अलवार फुंकोनी बांसरी । देहाची भारल्या ॥ ३५५० भंगलेला सांधला । पालथा घातला । भरल्या गृहांतला । सुघड तरुतळी ॥ ३५५१ व्याधिग्रस्ता रितेपण । कल्याणकारी सद्हेतूनं । इलाजकारणे आप्तजन । देती सहसा तात्कालिक ॥ ३५५२ प्रतिनिधी असतो जिण्याचा । घट जगती जीवमात्रांचा । आधार कुणा घडवंचीचा । तिकाटण्यावर विसावे कुणी ॥ ३५५३ भरकटलेला मी आज । उबगलेला क्लान्त मगज । आशयाची दुरावली गाज । चाहूल पैलाची ?॥ ३५५४ जसा भरत जाइल घट । वेगळाली खुलेल सुरावट । जलतरंगाचा मग पट । उलगडेल ॥ ३५५५ रितेपणी होईल ताल । भरतांना आगळी स्वरमाळ । सगळा जळाचा खेळ । घटासवे ॥ ३५५६ ईवली दिवली । ज्योत अंकूरली । ऊब भवताली । आपेआप ॥ ३५५७ ईवली दिवली । अलवार तेवली । झुंजूरकां झाली । झोप जागी ॥ ३५५८ ईवली दिवली । तमाला पावली । दिसाया लागली । 'माया' सारी ॥ ३५५९ ईवली दिवली । हलाया लागली । भेदरे सावली । अस्तव्यस्त ॥ ३५६० ईवली दिवली । चवली पावली । पूर्ण मुद्रा झाली । भूकेल्यांची ॥ ३५६१ ईवली दिवली । विझूविझू आली । सरसावे अंजुली । वारण्या वारा ॥ ३५६२ शुभ्रांगी व्याघ्रकुळी । ल्याली कशी लाली ?। की हो ही लोळली । माती मधे ?॥ ३५६३ दबा पाहा कसा । धारी एकाग्रसा । लबाड तापसा । देई मात ॥ ३५६४ खाली लाल माती । नीळ तरंगे वरती । मधे इतस्तत: फिरती । क्षण भंगूर ॥३५६५ मैत्री ! मालकी हक्क ?। मैत्री ! स्नेहोद्भव सख्य । तदांतरि अन्याचे कौतुक । ज्वालाग्राही जाणा ॥ ३५६६ किती वेलांट्या, उकार । कुणा भरते रुकार । वल्लरी नाजुक नार । मधाळ मेघाळ मिठीसाठी ?॥ ३५६७ परी उरतोचि प्रष्ण । अधांतरी लोंबते चिन्हं तापता उग्र माध्यान्हं । कोमेजेल सख्य ?॥ ३५६८ स्वयंभू कुठे स्फुरतो । ऊर्जेंत कुठे विरतो । कंठ वा तंतांत प्रकटतो । नाद तपोत्तरी ॥ ३५६९ स्वयंभू शीळ ! कळकाच्या बनांत । स्वयंभू गाज ! सागर पुळणींत । स्वयंभू गंधार ! षड्ज पंचमांत । तरंगागर्भी ॥ ३५७० फुटण्या किनारा । चिंबण्या जळधारा । तेवण्या गाभारा । सांजवात ॥ ३५७१ झाला तपोभंग । सजग सर्वांग । आटोपले ढोंग । की तपस्येचे ?॥ ३५७२ काय नीरखीते ?। भक्षासी वेधते ?। होरा वागवीते । कूट 'मनी' ?॥ ३५७३ भोंदू साधूंतले । भवताली माजले । हेतूं मनांतले । अगम्यातर्क्य ॥ ३५७४ भेदक दुष्ट दृष्टी । भेदरली अवघी सृष्टी । भयप्रद 'बोका'ळल्या गोष्टी । मूषकजगती ॥ ३५७५ जे प्रत्यक्ष वास्तव । असते बहुधा विस्तव । मग अकारण त्यास्तव । कल्पनाभंग काहून ?॥ ३५७६ कल्पना परिक्रमा विरंगुळा । भ्रमणांत आनंद आगळा । मनांतल्या मांड्यांकरिता ज्वाळा । चेतविणे अनिवार्य ॥ ३५७७ (भरकटलेला मी..😔😪) चौकटी बाहेर । असते माहेर । सासुरवास घोर । आंतं घुसमट ॥ ३५७८ विवाहिता नार । छळाने बेजार । आसवांचा पूर । पाहे परतवू ॥ ३५७९ (कांहीहीं हं काकतकर !) मनुष्ये रचलेले । निसर्गे रुजविलेले । परस्परें सजविले । एकमेकां ॥ ३५८० कठोर सीमित । रचलेले काठं । हिरवाईची नजाकत । आक्रमक जरा ॥ ३५८१ जराग्रस्त कांही । आसुसले देही । उपचार देऊं पाही । पर्णावळीस दवबिंदू ॥ ३५८२ घंटिका, गीत, जाणीवा । आवश्यक व्यक्त होण्या हवा । आघात, कंठ, शब्दांचा ओलावा । अनुक्रमे ॥ ३५८३ वक्तव्ये सारी निरर्थ । जर नसतील श्रोते समर्थ । ऐकण्या, आकळण्या सार्थ । आशयस्रोतं ॥ ३५८४ सावलीचे तुकडे । इतस्तत: मागेपुढे । प्रकाशवर्षा चोहीकडे । अंतर्बाह्य ॥ ३५८५ योगतेजाची व्याप्ती । अंतस्तमास उपरती । कणाकणास उजळती । वाती अनंत ॥ ३५८६ छिद्रान्वेषी मानस । निरखते बकध्यानास । हेतुत: मिटले अर्धाक्ष । भक्ष वेधकारणे ?॥ ३५८७ अदृश्य जरी परिमळ, नाद, । ज्ञानेंद्रियांसि अचुक वेध । घ्राण-श्रवणा परमानंद । जीवमात्रां बाह्यांतरी ॥ ३५८८ आकांत कर्मयोग्यासी । रोजची भेट मरणासी । लंघणे क्षणोक्षणी भवसागरासी । दुखरे सुख ॥ ३५८९ ध्यान ? कालापव्यय केवळ । भाळावर स्वेदबिंदूची माळ । कर्मोत्तरी मिरवीणे सुफळ । सद्यश्रेय जाणा ॥ ३५९० हिरवी पैठण । कंठी रक्तवर्ण । पिंजर पखरण । भाळावर ॥ ३५९१ सजली धजली । दवांत न्हालेली । अंगभर ल्याली । शुभ्र कळ्या-फुले ॥ ३५९२ भोगोनि संसार, नारी । माय-तांत अपत्ये वाऱ्यावरी । परदु:ख पाहोनी धरेवरी । भगवेधारी तो निर्लज्ज ॥ ३५९३ अस्तुरीने नउ मास । उदरांत वागविले गर्भास । नर जो लागेल भजनास । नीचोत्तम जाणा ॥ ३५९४ परततां माघारी । धुके कांहिसे दिठीवरी । विरहाची वेदना करी । सुन्न मन ॥ ३५९५ स्वागतासि तत्पर । उगवतां भास्कर । तेजोनिधीचे द्वार । मोकळले ॥ ३५९६ झाकोळले आभाळ ?। उद्या उजेडाशी मेळ । स्थिती अनंतकाळ । न राहते ॥ ३५९७ होईल जर पुनरावृत्ती । गंजोनि जाईल प्रवृती । अस्वस्थतेने प्रकृती । बिघडो जाय ॥ ३५९८ यंत्रवत जगणे । परावलंबी जिणे । कुबड्या घेवोनि चालणे । एकुणांत दुर्दैव ॥ ३५९९ भवताल तमभारले । स्नेह त्यागोनि उजळे । पणतीतील सानुले । स्वतेजोबळें ॥३६०० ज्योतिर्मय दीपकळी । दशदिशां देत झळाळी । पिवळी सोनसळी । इवलाली स्वर्णप्रभा ॥३६०१ सुबक रांगोळ्या । तेवल्या दीपकळ्या । दिसाच्या आगळ्या । सज्ज स्वागतां ॥ ३६०२ सरला अंधार । रंगांना बहर । मुदित अंतर । सर्वदूर ॥ ३६०३ हा बाबा तो बाबा । झुंजुरका तोबा तोबा । उगवत्या तेजोनिधीची शोभा । वाया जाय ॥ ३६०४ अति झाला उपदेश । लागणे भजनास । जाणा उपवास । आपेआप ॥ ३६०५ बाबा ? काम, क्रोध गोंधळ । इंद्रियांत अनावर मळमळ । भाबडे वाऱ्यावर रानोमाळ । भांबावलेले ॥ ३६०६ भगतांनी उपभोगिले । दासांना नासविले । उपदेश विकृत केले । पाठभेदें ॥ ३६०७ मी नतद्रष्ट संतापी । भोंदू, ढोंगी अन् पापी । अर्वाच्य, अतर्क्य नि कोपी । मुळांतला ॥ ३६०८ व्यसनाधिन भोगागमनी । रुपवती कुणी कामिनी । अर्धोन्मलित अक्ष करुनी । न्याहाळे भक्ष ॥ ३६०९ अडगळ, केर, पोतेरे । तैसे होय जिणे सारे । जरेसवे निराधारे । केविलवाणे, एकांडे ॥ ३६१० कां निर्मळ शब्दप्रवाह । प्रतिभेचा सुवर्ण डोह । वसतीहेतूं मम देह । होय गेहरूपी ?॥ ३६११ दक्षिणेस सौध एकट । तमगर्भी बुडे तेजोघट । जराग्रस्त कुणी वेडपट । प्रतीक्षेंत अवसेच्या ॥ ३६१२ घुबडमुखी, गर्दभनाद । कुरुपाचा संग्रह निर्निवाद । नासल्या कंदाचा दुर्गंध । मी जाणा ॥ ३६१३ ज्ञानेंद्रिया बिभत्सयोग । मानसासि कुष्ठभोग । अ-क्षरासि क्षयरोग । पाहें जडूं ॥ ३६१४ क्षतेग्रस्त त्वचा सारी । रक्तशर्करा प्रमाणाबाहेरी । वेगाभिसरण काळजांतरी । अस्वस्थ व्यवहार ॥ ३६१५ अंतर्स्राव अनावर । ओसरे प्रौढत्व अलवार । उचंबळे जराज्वर । निर्वाणवाटे ॥ ३६१६ क्षीरारि ठरते क्षार । बलारि ठरतो भार । शीलारि होते नार । विश्वांत सहसा ॥ ३६१७ रक्षक सानुले । तट. बुरुजावरले । सजग सरसावले । सावध’चित्ते’ ॥ ३६१८ डोळ्यांत तेल । बाहूंत बळ । हेरते हालचाल । साम्राज्यारिची ॥ ३६१९ जाणता राजा । बिनघोर प्रजा । डंका गाजावाजा । विश्वकीर्त ॥ ३६२० छकुल्यांच्या जगांत । दगड मातींत । अवतार घेतांत । गरुडपंख ॥ ३६२१ अंतरांत खूणगाठं । शौर्य कांठोंकांठ । छातीचे गडकोट । सज्ज सदा ॥ ३६२२ साम दाम आधी । अन्यथा दंड, भेदी । समस्त सर्व नीती । अरि वारण्या ॥ ३६२३ राजांची शिकवण । देईल अन्य कोण ?। आपदांचे निर्दालन । रयतेच्या ॥ ३६२४ ज्योतीच्या एकल्या । प्रती जणू तेवल्या । समांतर धावल्या । केंद्रांतुन बहिर्गामी ॥ ३६२५ ऐशी असावी प्रवृत्ती । निजरूपाची आवृत्ती । होवोनि प्रतिकृती । ठाकावी विश्वकारणे ॥ ३६२६ स्वर ! दशाधिक दोन । श्रुती ! एकाधिकदश द्वैवर्तन । रचनांची अगणित खाण । रत्नमाला अखंड ॥ ३६२७ (एकाधिकदश=११, द्वैवर्तन=दोनदा, म्हणजे २२) देह असेतो क्षुधा । श्वास चालेतो बाधा । मन असेतो दुविधा । जगराहाटी ॥ ३६२८ कुणा चुकली जरा । इंद्रियावरूनि वा वारा । आत्म्याला लागतो निवारा । सोडावया अखेरी ॥ ३६२९ निसर्ग मूलत: अनिर्बंध । स्थल काल अबाध । संधी तिथे प्रमोद । देतसे मनुष्यांना ॥ ३६३० तीच अनियमिततां । सुख दुःख: प्रकटता । प्रमाद अजाणता घडतां । मनुष्यांचे ॥ ३६३१ वास्तूच्या कंठी । माळ सजवीली । गजरे माळेली । सुस्मित सुस्नाता ॥ ३६३२ (वास्तूच्या गळा । शोभतांत माळा । गजरे कुंतला । सुस्नातेच्या ॥) गारठा बोचऱा । बाहेर सारा । वृक्षवल्ली तरुवरा । कार्तीकी चाहूल ॥ ३६३३ उब घरट्यांत । साखरझोपेंत । नीज थोडी दीठींत । रेंगाळते ॥ ३६३४ सत्यांतले सौंदर्य । काळजाचे ऐश्वर्य । दिठीला अनिवार्य । फसवे देखावे ॥ ३६३५ विरोनी जातांत । चौकटी काळांत । जपल्या परि जातांत । कालातींत उरी ॥ ३६३६ मधे समृद्ध बेट । पैल ऐश्वर्यभारला तट । निळाई प्रवाहित । सांधणारी ॥ ३६३७ विलोभनीय उचंबळे । कसब कार्मिकाचे आगळे । नक्षीदार कमानींचे जाळे । पावलोपावली सुखकर ॥ ३६३८ अलवार सावर-स्पर्शी । सकळ अबालवृद्धजनांसि । प्रवेशता, स्वागतासि । यजमानें सिद्ध केले ॥ ३६३९ जिण्यांत विणा सुलक्षणी । सत्प्रवृत्त मनुष्यांची लेणी । परतोनि जाणारे कोणी । सहसा नसावे ॥ ३६४० संधी समोरच्या बाहतां । न म्हणा ‘नको आतां !’ । स्वीकारण्या मनाची सिद्धता । राखा सदा ॥ ३६४१ अबालवृद्धा सुखावोनि । आतां निवृत्तिच्या क्षणी । अंतरंगी साठविलेले सोडोनि । पावती समाधान ॥ ३६४२ अल्पकाल अशी । द्यावी सकळासी । आनंदे भिडण्यासि । संधी परस्परां ॥ ३६४३ सानुल्या गमती जमती । जगण्या हितकर होती । रोजच्या मरणांती । कष्टकऱ्यां ॥ ३६४४ क्षणांत उठतो जाळ । उचंबळे शमवाया जळ । सईंचे ! देते बळ । क्रमण्या अविरत ॥ ३६४५ क्षणांत पेटतो भडाग्नी । काळजाचे पाणी पाणी । गिळोपाहे सारी धरणी । कुंठित होते मती ॥ ३६४६ स्मित हास्य परितोषा । वा सुखविण्या चारु भाषा । प्रतिबिंब कृति अशा । सौंदर्याच्या आंतरिक ॥ ३६४७ विहगाक्रमण अवकाशी । मेघांच्या माघारती राशी । निळाईची चाहूल सुखदशी । शिशिरी शिरशिरी ॥ ३६४८ तबक वेधू पाहाते । संदेश कोणाचे कोणते ?। मनुष्यकल्याणार्थे । कर्षसिद्ध ॥ ३६४९ महाभूतांना सोबती । घेऊन ! अविरत प्रगती । वैज्ञानिक साधू पाहाती । समयोचित ॥ ३६५० विखुरले शांतिदूत । पांख पसरोनि, इतस्तत: । स्पर्धा सहजी करीत । तबकाशी ॥ ३६५१ हरेक उडाला पारवा । परतेल घेवोनि गारवा । सुगीच्या मिठीचा गोडवा । वाकळींत घुमेल ॥ ३६५२ सईंची बासने भरजरी । इष्टाप्त सहवास शिदोरी । भरलेली असते अखेरवेरी । थाळी द्रौपदीची ॥ ३६५३ उतारावर आधारकांठी । वा चघळण्या साखरेच्या गांठी । रसनेच्या चवीसाठी । गाठीं असणे अनिवार्य ॥ ३६५४ विहगभारल्या आभाळी । परतून आली मेघावळी । तळ्यांत भरल्या जळी । मारावया सूर ॥ ३६५५ आर्द्र धरा सचैल आकंठ । जळसेतू सरितेचे तट । जलद, तडितेचे पखावजी भाट । आळविती मल्हार ॥ ३६५६ पीतवर्ण मुद्रा । बालमर्कट गोंडस हसरा । पसरोनि दोनिही करा । बाहतसे अवखळ ॥ ३६५७ हिरवेगार अंगडे झबले । चढवोनी सजविले । छाया प्रकाशांत न्हाले । रूपडे गोजिरे ॥ ३६५८ चौकटी आपल्याआप । साकारतां इष्टरूप । मन समाधान आपेआप । क्षणार्धांत,पावते ॥ ३६५९ जवळिक किंचित धूसर । तरी पेलते आशयभार । निराकारास करणे साकार । झेप कल्पनेची ॥ ३६६० अस्वस्थता ! भूतकाल । उताविळी ! उद्याचा कोलाहल । अंत:स्तर निवांत ! सद्यवेळ । मनोवस्था दर्शके ॥ ३६६१ निगडित असावे धरणीशी । उडोनये आकाशी । नाळ वाहल्या पाण्याशी । जोडणे बरे नोहे ॥ ३६६२ तमारि योगिप्रभा । उजळींत निजल्या नभा । जीवमात्र, यंत्रांचा ताबा । घेऊं पाहे ॥ ३६६३ दिनक्रम अनादि काल । चालला, चालतोहे चालेलं । थांबूं परि पाहेल । ती प्रलयवेळा ॥ ३६६४ क्षणभंगुर जिण्यांत । कष्टकऱ्यांच्या प्राक्तनांत । सामोऱ्या ऐशा येतांत । अनंत प्रलयवेळा ॥३६६५ मरण्यांत जगणे भोगती । अहोरात्र झगडती, लढती । दिठी उघडता परतोनि मिटती । पांपण्या भयाने ॥ ३६६६ प्रौढीवरहित शब्दांकने ।हेतूविरहित जीव लावणे । अपेक्षेविणा जोपासणे । लक्षणे दृढ नात्यांची ॥ ३६६७ स्वार्थाविणा प्रार्थणे । आप्तजनांसि सुखविणे । भ्रांत भुकांची वारणे । लक्षणे दृढ नात्यांची ॥ ३६६८ कवळी किरणे पाठीवर । घेवोनि सजग राखणदार । आवरोनि आतां जागर । शिरतील कुशींत निजेच्या ॥ ३६६९ स्वर-श्रुतींचे अचुक ज्ञान । मगजामध्ये सुयोग्य मंथन । कर्मेंद्रियांचे कार्यकारण । ठाव काळजाचा घेई ॥ ३६७० शुभ्र ! रंगांचा मूलस्रोत । शुभ्र ! पारिजातकाचा पोत । मधे माणिक कोंदणांत । शुभ्र पाकळ्यांच्या ॥ ३६७१ देठांत गर्द क्रांतिवर्ण । वा सदेह समर्पण । त्यागाचे वा दर्शन । होता निर्माल्य ॥ ३६७२ शुभ्र ! शरणागतिचा ध्वज । शुभ्र ! तमारि, प्रभेचे बीज । शुभ्र ! शांतीप्रतीक द्विज । मान्यताप्राप्त ॥ ३६७३ हिरव्या धावऱ्यांची गर्दी । मिळेल तशी साधून संधी। रानफुले अंगावरती । वागविती अलवार ॥ ३६७४ पत्री, त्रिदल तृणपाती । धारोनि सुखावे धरती । शाषूनि जळ फोफावती । रानोमाळ इत:स्तत: ॥ ३६७५ स्वविवंचना कधिही । इप्सितास बाधत नाही । परार्थ जो झटो जाई । तो निर्वेध ॥ ३६७६ अन्यांच्या कल्याणी । आवर्जोनि अवधी शोधोनि । समाधान, वेदना वारोनि । पावती ते ॥ ३६७७ बहिर्गामि अतिवनील । तेजोमणि सुबक गोल । शूर्पकंट की कुंतल । शाखेवर वसले ॥ ३६७८ पर्णे समूहान । आधार घेऊन । शाखेवर लगडून । तवान, डोलती ॥ ३६७९ इवल्याशा वाटिकेंत । मुद्रा ऊभारत । नक्षी साकारत । हिरवाई मग्न ॥ ३६८० दुरावा दिसतां सामोरी । खंतावूं नये अंतरी । जवळीक कोणितरी । ठाकेलचि साधण्या ॥ ३६८१ पिवळे जरी पडले गळोनं । कवळे हिरवे फुटतेचि पान । पंचमहाभूतांचे आश्वासन । जीवमात्रां ॥ ३६८२ जरेशी हात दोन । कर्म महा कठीण । साथ देण्या अंतर्मन । कच खाई ॥ ३६८३ परिवर्तन साकारणे हेतू । न बाळगा कोणता किंतू । रूप, बुद्धी वा संपत्तिसेतू । पेक्षा जडवा जीव ॥ ३६८४ फुलांचा संभार । स्वयंसिद्धें अंगभर । मंद सुगंधाचा बहर । अपूर्व योग ॥ ३६८५ पथावरी भासे वीज । वेगाशी स्पर्धा रोज । ‘मार्गक्रमा’ सदा सज्ज । कर्मनिष्ठ ॥ ३६८६ जगतांना हरवलेला पळ । अचानक सामोरी ठाकेल । अलवार भरेल ओंजळ । सुख शांतीनं ॥ ३६८७ त्यागावे जे लागेल । कारणें कोणत्या असेल । भरोनि अन्यरूपें पावेल । प्रतीक्षे अंती ॥ ३६८८ तेजोशलाका दिठींत । मुद्रेवर स्मित किंचित । दृढनिश्चय काळजांत । वागवीत चला पुढे ॥ ३५८९ जैसे ज्याला भावे । तैसे त्याने ध्यावे । हेतू केवळ वागवावे । समर्पणाचे ॥ ३६९० आग्रहणे उगा कांही । धर्माची धरोनि बाही । कर्मयोग जरी बाही । कालापव्यय वृथा ॥ ३६९१ काय शोषण्या इतुकी घाई ?। की बहिर्गामी वेध घेई ?। जवळिकींत दृश्यमान होई । पानफुटी कवळिक ॥ ३६९२ जेष्ठ उभा सरळसोट । बिलगूं पाहे नवजात । पानगळीचा जरी ऋत । नवोन्मेष अनिमिष ॥ ३६९३ न्याहाळत आप्तजन । कौतुकाने, हरपोनि भान । तान्ह्याचे अवखळपण । लगटतांना मायेसी ॥ ३६९४ कौतुक रचनांचे करा । वंदा कसबकाराच्या करा । होवून धर्मांध ‘हत्यारा’ । साधेल काय ?॥ ३६९५ यमसदनी चार जातील । घरे क्षणांत उध्वस्त होतील । ‘जितं मया’ आरडतील । क्षणभंगूर मनुष्ये ॥ ३६९६ फुले उधळती पार्थिवावरी । फुले उधळती पार्थिवावरी । फुले उधळती पार्थिवावरी । पाषाणाची पाथरवट ॥ ३६९७ विक्राळ रूप धारोनि । धरेवर जटा पसरोनी । कुणी बाबा मौनी । तरुवरा आधार ॥ ३६९८ कोणी फासला शेंदूर ? । की गणनेकरिता अंगावर । गेरूची पांघरली चादर । निबिड आरण्यांतं वनपालें ?॥ ३६९९ तवान ताजी नातवंडे । तान्ही ! जोजविती जुनी खोडे । वात्सल्य ममतेचे दर्शन घडे । रानांतही, घोर ॥ ३७०० उरलेल्या जिण्याचा भाग । सहावयाचे अनंत भोग । जोवेरी ना मरणयोग । जीवमात्रां ॥ ३७०१ कांही काळ आनंदाचा । उरलेला , वेदना, विवंचनांचा । अंतरीच्या स्थितप्रज्ञेचा । लागतो कसं, हरघडी ॥ ३७०२ पावल्या सौख्यकाला ठाई । खर्चिल्या ऊर्जेची भरपाई । जो नेमाने करोनि घेई । अखेरवेरी निर्वेध ॥ ३७०३ करीत बसाल खंत । दुर्घटनांचा वा रवंथ । न टाकतां वेळीच कांतं । अस्वस्थता वृद्धी निश्चितं ॥ ३७०४ नवतेजाची व्हावी पहाट । उलगडाया नवा पट । जरी भासले अतीव कष्ट । विस्मरण अनिवार्य ॥ ३७०५ दुरुपयोग प्रेमाचा करो नये । गरजवंतासि नडो नये । खोटी आशा दावो नये । अवलंबितांना ॥ ३७०६ सईंनी बांधलेले । नात्यांनी सांधलेले । दुराव्याने गांजलेले । विस्मरू कदापि नये ॥ ३७०७ तोच मार्ग, गतिमाया । तेच तरुवर, त्याच छाया । तेजोशलाकेस प्रवेशाया । मात्र सानुले गवाक्ष ॥ ३७०८ निवांत निद्रिस्त विश्व । स्वप्नांत आठवांचा ठाव । बदलणारे विविध भाव । साकारती मुद्रेवरी ॥ ३७०९ सृष्टी चुळबुळेल अलवार । नीज घेवोनि दिठीवर । जोडोनि दोन्ही कर । कर्मयोगा प्रार्थेल ॥ ३७१० प्रतिबिंबित भासमान हिरकणी । भवतालास सोनियाचे पाणी । गतिमायेस ऐश्वर्य लेणी ।क्षणार्धांत विरणारी ॥ ३७११ विश्वाच्या तमतटद्वयांत । कोंदलेले तेजांकित । जिणे जिवमात्रांचे तद्वत । जळी, स्थळी, अवकाशी ॥ ३७१२ फुलां मागे फक्त । शाख पर्णयुक्त । मात्र मधल्या अंतरांत । अपवादे ॥ ३७१३ माळून पुष्पें कुंतलांत । हांत गुंफुनी हातांत । गडणी दोन टेचांत । विहारा निघाल्या ॥ ३७१४ तेथेच पडला । पीत वर्णी झाला । कायेंत सुरकुतला । पचोळा गळोनं॥ ३७१५ रूपाला भूलती । मनुष्ये जगती । खंगल्यांशी नाती । विस्मरोनी ॥ ३७१६ स्वर पदन्यास समृध्दी । आपला आपल्यांशी संवाद वेधी । नांदी, नाट्यकथा भरतवाक्या आधी । लेणी रंगदेवतेची ॥ ३७१७ शाख पुष्प पर्णांकित । पूर्ण चंद्रासमोरी नत । लोभस लज्जावर्णांत । अनावर वृद्धी ॥ ३७१८ लाजेने चूर सुमन । गर्द हिरवाई सुपर्ण । स्वाभाविक पाठराखण । मिलनघडिला ॥ ३७१९ कशाय पेय, सुबक घट । स्वादिष्टासि थाल सुशोभित । सुप्रभाती मांडला थाट । सोडण्या उपवास ॥ ३७२० पांख स्वत:चे मिटोनि । स्थिरावल्या पात्यावरी बैसोनि । अस्तित्व रिकामे न्याहाळोनि । होई अचंबितं ॥ ३७२१ धवलासि कृष्ण छेद । ऐसा कैसा झाला भेद । छतासमीप उच्चपद । भासे वर्णविरोधी ॥ ३७२२ पारवा, पारवाधारी । घुमताहे गभीरांतरी । झेपावण्या क्षणार्धांत बाहेरी । सज्ज, अवकाशी ॥ ३७२३ जोपासावा एखादा छंद । राहून गेलेले इप्सितं । सुफळ होइल कदाचितं । कौतुकपात्र ॥ ३७२६ वा वाखाणा पुढची पिढी । स्वागतासं उभारा गुढी । त्यांच्या ! जिण्याचा कोडी । सोडवा स्वनुभवाने ॥ ३७२७ गृहप्रवेशा उत्सुकं । तवान वा वृद्ध अनेकं । ‘तुमचे आमुचे सामायिक ‘। सागूं पाहाती यजमानां ॥ ३७२८ द्वार असले जरि विहित । हट्टाने पाहुणे टाळंतांत । शार्वीलिकी ऐसी अवलंबितांतं । कां ? नकळे ॥ ३६२९ उलगडण्या ऐश्वर्य पट । मनांशी बांधा खूणगांठ । कोणतेही अतर्क्य संकट । वारेन समर्थपणे ॥ ३७३० ऊन आंत येता । सावलीची होय सांगता । विश्राम तिला आंतां । सांजेवेरी ॥ ३७३१ उन्हे येतां डोईवरी । सावली स्वत:सि सावरी । नम्रपणे राहे पळभरी । पाया ‘पाशी’ पडून ॥ ३७३२ हळू हळू पिवळे पडोनि । जात आहेंत एकेक झडोनी । कवळी पालवी मधुनी । डोकावून पाहे ॥ ३७३३ एक जाणार । नवा येणार । थाटणार क्षणभंगूर । संसार ! जगराहाटी ॥ ३७३४ कुणि जरेने विव्हळे । कुणि ऊन झेलते कवळे । वाऱ्याने कुणि रानोमाळे । तरुज सारे ॥ ३७३५ कुटुंबांत ऐशांचं कथा । विविधांच्या विविध व्यथा । आळविती, गाती गाथा । असोशीने आपआपल्या ॥ ३७३६ सकारात्म जर असालं । विश्व प्रेमभरे निरखाल । आनंदे सर्वार्थाने भोगालं । जिण्यांतल्या घटिका ॥ ३७३७ रागिणी बागेश्री स्वरावळींतं । पंचम आरोहांत निषिद्ध खचितं । परि अचानक लगाव दावित । करावे स्वरमुग्ध रसिकांसि ॥ ३७३८ जगणे निरामय सदा । विस्मरू नका कदा । अन्यांची वाहतांना चिंता । सजग असावे स्वत्व ॥ ३७३९ आप्तांकरिता कर्मयोग । तोचि जाणा परमार्थसाधक । स्वत: राहाणे निर्धोक । आवश्यक तद्हेतु ॥ ३७४० कोणी पाहिला पुनर्जन्म ?। उरकोनि घ्या आतांच कर्म !। सुसंस्कारांचे मात्र वर्म । विस्मरूं नका ॥ ३७४१ इथेच कार्य तप साधना । इथेच भोगावयाची फळे नाना । भाकडं वचने हरपूं पाहता भाना । फेका उचलोनि तत्क्षणी ॥ ३७४२ चूल विटा-मातीची । पात्रे चांदी सदृश धातूंची । धरा, जळ, अग्नि परि तोची । भेदाभेदा पलीकडे ॥ ३७४३ शिजवाया सुवर्णपात्रे । पाकगृही स्वयंचलित यंत्रे । तडितागर्भी जनित्रे । हताश महाभूताविना ॥ ३७४४ विज्ञानाचा अहंकार । हतबल ठरतो पुरेपूर । महाभूतांचा अनिर्बंध व्यापार । बांधण्या दाव्यासि ॥ ३७४५ भूक ! स्थाई जीवमात्रांतं । भूक ! वादळी जठराग्नीतं । भूक ! हपापल्या गात्रांतं । अनावर,कुकर्मोद्भवी ॥ ३७४६ भूक ! व्याधिग्रस्त वृद्धाची । भूक ! सानुल्या तान्हुल्याची । वा कष्टकरी कर्मयोग्याची । भूक ! निवारणे अनिवार्य ॥ ३७४७ भूक ! केवळ अंतिम सत्य । भूक ! अशमनी होते दैत्य । भूक ! एकमेव कारण नित्य । संग्रामांत जिण्यांतल्या ॥ ३७४८ भूक संपता सरते सर्व । विरतांत विकार विकृती गर्व । नव्या दमाच्या तमाचे पर्व । मग होते सुरू ॥ ३७४९ सिद्धता इतुकी असते पुरी । निवारण्या भूकमारी भस्मपट्टे वा जटाधारी । प्राक्तनी अनिवार्य समग्रांच्या ॥ ३७५० दारिद्र्य नि भुकेची भ्रांत । दोघीं एकमेका संगत । हात घालोनि हातांत । प्राक्तनांत प्रवेशती ॥ ३७५१ रंग ? नाहीत पंरांचे माहींत । सांकळतांत परि पांपण्यांत । तुमचे सद्गुण व्यक्तिगत । तद्वत जाणतीं स्नेहीजन ॥ ३७५२ उगवतां तेजोभास्कर । तरु-वल्लरींना तरार । पीत पुष्पांना बहर । झुडुपांवरी ॥ ३७५३ प्रभा फाकें भगवी पिवळी । ऊबदार किरणे कवळी । ऐश्वर्य वर्णनां शब्दावळी । भासते कोती ३७५४ एकदाचं लाभते आयुष्य । इथेंच भूत-सद्य-भविष्य । निगुतीने सावरा हरेक निमिष । परतोनी न येणारा ॥ ३७५५ एक विहरे नभांत । अनेकं पर्णभानांत । निसर्गाची अगम्य रीतं । अनिमिष ॥ ३७५६ दुरावली जरी लाटेने । बांधलेली जी ममत्वाने । परस्परांच्या अशोशीने । सांधणे अनिवार्य ॥ ३७५७ गर्द पोपटी आगळा । पुढे झुकून आलेला । पार्श्वांतल्या वल्लरी फुलां । उगा देताहे गंड ॥ ३७५८ सुस्मित मुद्रा राखिती । यशस्वी आपेआप होती । सद्गुणी, न्यूनगंडें संकोचिती । जाती दुर्लक्षिले ॥ ३६५९ निर्मळ, नि:स्वार्थ हृदयांत । देह गाभाऱ्यात पवित्र ज्योतं । सदैव असते तेवतं । विश्वामाजी ॥ ३७६० मुद्रेवरि स्मितहास्य । मोहविते अंतरांसं । फसवे परि बहुतांश । अनुभवांतरि ॥ ३७६१ स्नेहाची प्रभांत । दृश्यमान कांळजांत । ज्योतींना लोटोनि धुक्यांत । फेर धरल्या ॥ ३७६२ सुहृद, दाता, कठिणकाळी । वीर युद्धावेळी । चाकर देता हाळी । लागतो कसास ॥ ३७६३ भविष्याची नांदी । दर्शवीते शुष्क फांदी । पानगळ, शाखाभंगाची संधी । कराल शिशिर साधेल ॥ ३७६४ सुखासंगे कधि वेदना । मुद्रेची दुसरी धारणा । विरोधाभास मना । साहणे अनिवार्य ॥ ३७६५ निर्धनासंगे धनवान । भाकडा संगे सवत्स गोधन । भेगाळा संगे सुपीक जमीन । शमन स्वाभाविक वेदनोत्तर ॥ ३७६६ विरोधाविना संघर्षक्षण । ताठ कणा भाराविण । वैवणव्याविण श्रावण । जाणा अर्थहीन ॥ ३७६७ मनुष्यांशी राखोनि अंतरे । अंकुरलो इथे आम्ही सारे । परि निवृत्तिचे आतां वारे । करिती अस्वस्थ ॥ ३७६८ शेजार असा छाटलेला । शाखा, पर्णांसि दुरावलेला । पाहोनि खंतावलेला । रुद्ध होई कंठ ॥ ३७६९ मनुष्ये सारी स्वार्थी खाशीं । सुविधा सगळ्या स्वत:पाशीं । सोईच्या होतील अशी । करितांत योजना ॥ ३७७० येईल जर कुणी वाटेंत । सहजी करितांत नि:पात । दगड झाल्या काळजांत । यत्किंचित न फुटतो पांझरं ॥ ३७७१ तोड-तुडवतील निसर्गलेणी । हादरेल क्रोधाने मग धरणी । गिळो पाहेल संहारोनी । अवघी चलाचल सृष्टी ॥ ३७७२ मनुष्यांची प्रगतवाट । निसर्गाची पीछेहाट । उसळेल संहारकारी लाट । गिळण्या जीवसृष्टी ॥ ३७७३ फिरोनी सारे अवतरेल ?। शाश्वती कोण देईल ?। लयाला सर्व जातील । जीवाश्म, अस्थी, माती ॥ ३७७४ चित्तवृत्ती उल्हसित । सदैव आवश्यक नाहीत । बऱ्या-वाइटांच्याच गर्दींत । उमलते, फुलते ‘व्यक्तित्व ॥ ३७७५ मला जडली एक व्याधी । खेळतो घेवोनि शब्दप्यादी अवतरतां बुद्धि’बळि’ राज्ञे, वजीरादि ।ओशाळवाणा माघारतो ॥ ३७७६ साहित्यमानसी राजहंस । एक त्यांत काकवंश । शशकांमधे वा घूस । तद्वत बापडा मी ॥ ३७७७ फुका पाहतो स्वप्ने । ‘जिंकेन वाचकांची मने । विविध मान सन्मानाने । प्रथितयश मान्यवर होईन !’॥ ३७७८ सानुली खेळकर । खोड्यांना आला बहर । माय बैसली निर्घोर । सवे त्यांच्या ॥ ३७७९ चुबत ओरबाड । जैसा कुस्तीचाची फड । जग जिंकायाचे वेड । जन्मजात ॥ ३७८० बाप हिंडे रानोमाळ । वारण्या भुकेची कळ । ‘तू संसार गे सांभाळ’ । अस्तुरीस सांगे ॥ ३७८१ नरें वाढवावी प्रजा । नारी मात्र भोगे सजा । जगराहाटीच्या काजा । कोण देईल आव्हान ॥ ३७८२ सर्वसाधारण काय । हाची असतो कां न्याय ?। सुटकेचा ‘ति’च्या उपाय । जाणे कोण ?॥ ३७८३ इप्सिताची आग । वाढवते वृथा वेग । विपरीत फळे मग । दृश्यमान ॥ ३७८४ तऱ्हा वेगवेगळाल्या । ज्या कोणी अवलंबिल्या । पादाक्रांत सहज केल्या । संग्रामवेळा ॥ ३७८५ निर्णयाच्या ऐशा खेळी । खेळाव्या लागती वेळोवेळी । तेंव्हा यशाचा कपाळी । लागतो टिळा ॥ ३७८६ निद्रिस्त स्वप्नांसवे राहाणे । जागृतावस्थेंत वा त्यांपाठी धावणे । सुयोग्य तो निवडणे । पर्याय आपापला हितकर ॥ ३७८७ उरांतली प्रबल कामना । प्रत्यक्षांत साकारते स्वप्नांना । असोशी, ध्यास प्रयत्नांना । सुफल निश्चिती ॥ ३७८८ बल अन्य कोणते । बाहावे उगा कशांतें । स्वकर्तृत्वानेचि साध्य होते । ध्येय, आकांक्षा, इप्सितं ॥ ३७८९ पुरातन उभी बहुसंख्येने । सोबत अर्वाचीन सजली सदने । उभयतां अलंकारिली निसर्गाने । शोभिवंत प्रांगणयोगे ॥ ३७९० छकुल्याची अंगुली धरावी। अनुभवी पितामहें अनुभवावी । तवान धमन्यांतून जाणवावी । उचंबळ, तद्वत ॥ ३७९१ अबालवृद्ध आवश्यकं । कुटुंबांचे अनिवार्य घटकं । कोणा एकांसि दुर्लक्षिणे घातकं । स्थैर्याकारणे ॥ ३७९२ (भरकटलेला मी ) पानगळी सवे नवी । कवळी नाजुक पालवी । छटा पिवळी पेहेरावी । सज्ज प्राशण्या ऊर्जा ॥ ३७९३ ऋतु सरला पावसाळि । सदनशिखा शेवाळी । वार्धक्याची ‘नव्हाळि’ । न्याहळी तरुमित्र ॥ ३७९४ बंद गवाक्षे सारी । अंतरि हुडहुड शिरशिरि । शिशिरकंट त्वचेवरी । अबालवृद्धांच्या ॥ ३७९५ स्वयंसाहाय्योत्तर । वंचितांसि पैलतीर । समाधानानंद अपार । लाभेल आपेआप ॥ ३७९६ वेदना शमना तत्पर । उपाय करि निरंतर । परमार्थाचे हेचि द्वार । कर्मयोगि ‘संता’सी ॥ ३७९७ हिरवी राई पार्श्वप्रकाशित । वळण घेणारी तांबडी वाट । निरामय जिण्याचा घाट । उपवनी, प्रसन्न ॥ ३७९८ माध्यान्हीची तिरिप कठोर । तापवेल अवघे चराचर । पांथस्था छायेचा आधार । देतील तरुवल्लरी ॥ ३७९९ तऱ्हतऱ्हेच्या पर्णरचना । उभारी देऊन थकल्या मनां । प्रोत्साहित पुन:श्च परिक्रमणा । घटकेंत करतील ॥ ३८०० ( १९-११-२०१७) जिणे घेइल आपुली वळणे । प्रसंग येतिल जीवघेणे । वृत्ती सकारात्मक राखणे । मंत्र यशोमार्गाचा ॥ ३८०१ विधिलिखित जरी प्राक्तनं । पराकाष्ठेचे परि प्रयत्न । आपदा विपदांचे मर्दनं । अनिवार्य ॥ ३८०२ साखरझोपेंत किलकिले । नेत्र एकाने केले । दुजे सारे सुस्तावले । व्योमी फांकतां प्रभा ॥ ३८०३ सरल्या राखणी । जागे जीव, प्राणी । येतील उद्यानी । योगहेतू ॥ ३८०४ एकाग्र होतं । पुन्हा जागवीतं । ज्योती अंतरांतं । देहभानाच्या ॥ ३८०५ ऊर्जा इंद्रीयांत । काठोकांठ घेत । होईल मार्गस्थ । जनावळी ॥ ३८०६ अखंड शिकवण । मनुष्यांकडून । जिण्यांत जागरणं । केले ज्यांनी ॥ ३८०७ कधी परमानंद । कधी होई खेद । अनुभव भेदाभेदं । बहुमोल ॥ ३८०८ स्व स्थिती सांभाळणे । ठाकणे ठामपणे । विरहणे, संचारणे । होय, मुक्ती ॥ ३८०९ आप्त, स्नेहीजन । कौतूके न्याहाळोनं । देतील प्रोत्साहन । असावे भवताली ॥ ३८१० त्याचं पुरस्कारा । सहर्ष स्वीकारा । आनंदाश्रूं धारा । वर्षतीलं ॥ ३८११ हरित परांचे लेउनि लेणे। झुंजे कुक्कुटद्वय ईर्षेने । आसमंत भयग्रस्त अचंब्याने । थरारला सारा ॥ ३८१२ बहिर्गामी दृश्यमान त्वेश । व्यक्त होई अवघा आवेश । तरारली नस नि नस । देहावर ॥ ३८१३ स्वरक्षणार्थ रंग बदलणे । वा कुंपणी बसोनि राहाणे । जीवमात्रां शिकविण देणे । ठरते व्यर्थ ॥ ३८१४ तोचि देतो अवतरण । तोचि देतो जिण्या कारण । क्षुधा-तृषा निवारण । करितो अखेरवेरी ॥ ३८१५ तो म्हणजे अभाव । जो नाहींचं संभव । ‘त्या’सि म्हणती ‘देव’ । भाबडे भोळे ॥ ३८१६ सुहृद हितचिंतक स्नेहीजन । जिण्यांतले आशीर्वचन । प्रतिबिंबे वा छायाकारण । निगडित सत्य केवळ ॥ ३८१७ जागले बालक । फांकली शलाक । हेतू असे एक । क्रमणे दिसभरं ॥ ३८१८ अर्धनिग्रिस्त धरा । आसमंत सारा । पाठमोऱा मोहरा । ।स्वयंचालिकांचा ॥ ३८१९ चार चाकावर । स्थायी रातभर । उरला पळभर । चर होण्या ॥ ३८२० तांपतां भास्कर । काहिली समोर । जगणे दुस्तर । जाणवेल ॥ ३८२१ निशा दीनांतरी । परतता माघारी । सारे कष्टकरी । सुखावती ॥ ३८२२ कांही कुणा अयोग्य । तेचि कुणा परी भोग्य । मग काहून वैराग्य । फसवे वृथा ?॥ ३८२३ जटायूच्या कोणा । राहिल्या मागे खुणा ।कोण्या व्युत्पन्न ब्राह्मणा । भिडला तो ॥ ३८२४ जिण्यांत घडी घडी । अडथळ्यांच्या भेटती झुडी । त्यांवर करण्या कडी । स्वत्वाश गमवातो ॥ ३८२५ पाउलखुणांचे जंजाळ । युद्धभूमींत अटळ । रुधिरबिंदूंचे पागोळ । साक्ष कंदनाची ॥ ३८२६ हिरवीगार पोपटी पैठण । लाल काठांचं अलंकरण । निसरर्गाची रंगधून । अनिमिष ॥ ३८२७ आखीव रेखीव प्रांगणी । घुमटदार विश्रामलेणी । नव्या जगाची मांडणी । पार्श्वभूमींतं ॥ ३८२८ जुन्या आणि नव्याचा । संगम वेधायाचा । उत्क्रांत विज्ञानाचा । घेता धांडोळा ॥ ३८२९ परंपरा संस्कृतीच्या । साक्षी जपायाच्या । शोध परी घ्यायचा । नवनव्याचा सदैव ॥ ३८३० सुहृदाच्या दिठींत । स्नेह प्रतिबींबितं । कशास दर्पणांत । शोध वृथा ॥ ३८३१ दिठीं भावदर्शी । चिंता काळीजस्पर्शी । पांपणीतल्या धुक्याशी । सांत्वनोद्गाराचे नाते ॥ ३८३२ कनकशोभा इतस्तत: । द्विज मुक्त विहरतील आतां । कृषिवलांसि निवांततां । ओसरता सुगी ॥ ३८३३ मोकळे आभाळ । नुरला झाकोळ । जीवमात्रांतरी कल्लोळ । आनंदतरंग ॥ ३८३४ संरतां निशा । एकंचि दिशा । सर्वामुखी एकचं भाषा । क्षुधाशांती ॥ ३८३५ शब्द, कल्पनांची लग्ने । अंतरांत अनुभवणे । तद्हेतु मोडणे । चौकटी, अनिवार्य ॥ ३८३६ कोंदणांची कुंपणे । अनुभवंताली उभारणे । शब्द अल्पाक्षरी नियोजणे । व्यक्तण्या, काव्य ?॥ ३८३७ (अनुभव+भवंताली=अनुभवंताली एका ‘भवा’चा लोप केला.. Poetic license.. 🙂😌😁) प्रतिसाद अपेक्षित देणे । हृदयांसी सहज जिंकणे । लाभले जीवमात्रांसि लेणे ।अलवार, स्वाभाविकं ॥ ३८३८ हितचिंतकां सदैव । द्यावा सुखद अनुभव । काळजाचां त्यांच्या ठाव । घ्यावा लगावाने ॥ ३८३९ महाभूते मुळांत । जागली अंतरांत । लुटूपुटीच्या रचनांत । दंगला मनुष्य ॥ ३८४० रंग, छटा, आकार आगळे । रचनांचे प्रकार वेगवेगळे । स्पर्धा करूं, उत्क्रांत बुद्धिबळे । पाहती मनुष्ये ॥ ३८४१ परि ‘तो’ अनिर्बंध, अतर्क्य । आकळे, ना वैर, ना सख्य । विध्वंस करेल सहजी शक्य । नकळंत अचानक ॥ ३८४२ ‘त्यां’सि ना खंत वा खेद । ना भावनांची खदखद । विनाशोत्तरही निवांत । स्थितं सदैव ॥ ३८४३ यमके छंदादि कोंदणे । उपमा, रूपके, उत्प्रेक्षादी अलंकरणे । भावोद्गारादेही सजविणे । म्हणावे काव्य?॥ ३८४४ इतस्तत: ओघळ । उतू गेले जळ ?। द्विजद्वया प्रांत:काळ । निशोत्तरी गारवा ॥ ३८४५ घेईल ते बाष्फरूप । कालांतरें आपेआप । भास्कराचा प्रकोप । होता माध्यान्ही ॥ ३८४६ जाणवता भवताल । सुखद ! विश्रामपल । अनुभवावे सकल । हरपण्यापूर्वी ॥ ३८४७ निशा उषेच्या सीमेवर । आगळी निळाई आभाळभर । कनकरंगी होइल परिसर । पळांत कांही ॥ ३८४८ रक्षिला जागोनि रातभर । ज्यांनी अवघा संसार । तेजोगोल भवतालंचे चार । परततील कृतार्थ स्वगृही ॥ ३८४९ कांहींच नसते स्थिर । रंग बदलते चराचर । लवतां पांपणी, चमत्कार । दृश्यमान लौकिकर्थी ॥ ३८५० स्वप्नांतले कांही क्षण । निद्रावशी पटींत प्रमाणं । जागल्यावरी येते भान । लोटल्या काळाचे ॥ ३८५१ स्नेहीजन, हितचिंतकं । सम दर्पण वा छायकं । (ताप, तिरिप, लाहीशामकं) जिण्यांतले स्फूर्तिदायकं । नायकची होतं ॥ ३८५२ बिंब ! सत्यचि केवळ । छाया ! प्रत्यक्षाच्या जवळ । राखतांत उभयता नाळं । सामान्यतः ॥ ३८५३ स्नेह, नाती ! मधु मधुर । परागार्क वा धना पार । सावर वा शुभ्र क्षीर । भासती व्यर्थ ॥ ३८५४ ऊर्ध्वास्फूर्त, जरि गगनगामी । बलशाली, वा पराक्रमी । मैत्रचि मार्गी दुर्गमी । होते साहाय्यभूतं ॥ ३८५५ म्हणोनि राखांवी अंतरे । प्रसंगी त्यजुनी ‘बरें’ । चातुर्यें टाळोनि सारे । हसरे वरकरणी ॥ ३८५६ जनसामान्यां क्षीर । देण्यासी महिषी तत्पर । वागविती तलवार । रंगशृंगी ॥ ३८५७ कर्तव्यकठोर जीवमात्र । जिणेमंचावरी ‘आधारपात्र’ । जोपासती अंतरी सूत्र । ‘कृतज्ञपण’ ॥ ३८५८ ‘जगा, जगू द्या । सहभागी होवू द्या । उतराई’, म्हणती ‘करूं द्या । अन्न, पाणी निवाऱ्याची’॥ ३८५९ कनकदेही पुण्यवंता । उदारहस्ते होतो दाता । स्वर्णपुटांची झूल देतां । तमारि स्वांतरी सुखावतो ॥ ३८६० अतर्क्य भ्रामकांना खंडण्या । वृथा कर्मकांडे झुगारण्या । भाबड्यांची उद्युक्त करण्या । विज्ञाननिष्ठा, लिहितो जी ॥ ३८६१ शाखंपांख पसरोनी चोहीकडे । झेपावूपाहे अवकाशाकडे । मातीमाय परि जखडे । मुळापाशी ॥ ३८६२ चराचरी प्रत्येकाची । स्वगृहींच असते महती । मोडू चौकट पाहाती । नैराश्यग्रस्त सहसा ॥ ३८६३ समग्र स्थावरांसि स्वप्ने । जंगमासम चर होणे । अवघड परंतु साकारणे । असते मूर्तरूपी ॥ ३८६४ निसर्गे मजशी । देणगी दिली ऐसी । शब्दांची असोशी । उपकार ॥ ३८६५ वृद्धत्वा प्रक्षाळितं । हिरे-माणके-मोत्यांत । जिण्याचा कणाकणाने पोतं । उंचावला ॥ ३८६६ कानी सांगते गुपींत । माय पिलां जगण्यांत । ‘इमानं धन्याशी राखत । चालं सदां’ ॥ ३८६७ ‘आव्हाने ठाकतील । भय तुला दावतील । परी राहा अविचलं । बाळा,ढळूं नको’ ॥ ३८६८ ‘उबदार माझी कुशी । नसेल उद्याच्या दिशी । गारठ्यासवे जगण्यांशी । बाळा, हो सज्ज’ ॥ ३८६९ गणना होण्या उत्तमांत । दररोजच्या जिण्यांत । काळ जाई प्रयत्नांत । मनुष्यांचा ॥ ३८७० पडणे, ठेच लागणे । चुकणे, अडखळणे । वेदनांसह पुन्हा उठणे । मनुष्यत्व ॥ ३८७१ अखंड शिकतं राहाणे । फलाशा जोपासणे । श्वासाशी कृतज्ञ असणे । मनुष्यत्व ॥ ३८७२ कार्यकारणभावें कांही । मांदियाळीच्या प्रवाही । स्नेहबंध जुळत राही । पांथस्थांशी ॥ ३८७३ अहेतुक विविध नाती । जिणेभर जडत जाती । काळजांत स्थिर होती । अकारण ॥ ३८७४ परस्परांचे प्राक्तनं । गुंफते घट्ट विण । लगावाचे आलिंगन । साकारते ॥ ३८७५ आत्मप्रेरणेचा उचंबळ । स्वत्वासि देई झळाळ । विविध पैलूंचे जालं । विकसते भवती ॥ ३८७६ रोजचा तोच दिवसं । परि नित्यनवे भास । अंतरी निराशा वा आवेश । छटा आगळ्या तद्रूपी ॥ ३८७७ प्रात:प्रभा उजळे । एका मायेपोटी जुळे । खोलवर दृढ मुळे । तिच्या गर्भी ॥ ३८७८ विस्तीर्ण वाढतील । छायेला धाडतील । क्लान्तगात्रीं पाडतील । पांथस्थाच्या ॥ ३८७९ उभ्या करा सीमाभिंती । कुणाची ना यांना क्षिती । जन्मजात कर्तव्याप्रती । निष्ठा यांची ॥ ३८८० नवलाईची कांती अशी । देहभर पारदर्शी । समोर जरि धरली आरशी । अभावेल बिंबं ॥ ३८८१ मोहपाशाबळे । लज्जा सारी ढळे । परागांची दळे । चुंबू पाहे ॥ ३८८२ सर्वांगाची लाही । उतू वासना जाई । पांखें कवळू पाही । प्रियकरा ॥ ३८८४ करू असेल धजायाचा । विचार वेगळा आशयाचा । त्याच्या सदैव स्वागताचा । पुरस्कर्ता असेन मी ॥ ३८८५ जुने पुराणे अभ्यासणे । निवडून योग्य पांखडून घेणे । आयाम नवे संशोधणे । प्रक्रिया अव्याहत ॥ ३८८६ कालानुरूप संदर्भ । बदलणे, राखोनि आब । क्षेपण्या खुले नभ । लाभणे इष्ट ॥ ३८८७ अन्यथा माजते दलदल । फोफावते कुबट शेवाळ । निसरडे नि बुळबुळ । खीळ वृथा प्रगतीस ॥ ३८८८ बोंडे मायंदळ । कपास बक्कळ । उतलया आभाळ । अस्ताव्यस्त ॥ ३८८९ द्विजद्वया झेपाळ । लोळणीचा खेळ । सावरीचे पळ । भोगतांना ॥ ३८९० सोडून धरती । उंच झेपावती । काहून हे जाती । दूरदेशी ?॥ ३८९१ कोण आहे संगती । पिलांच्या भवती । कवळे क्षुधा-तृषार्ती । सावराया ?॥ ३८९२ जैसे विठ्ठल रखमाई । बाप आणि आई । निवृत्ती-सोपान-ज्ञाना-मुक्ताई । पोरके केले ॥ ३८९३ अमंगळ आदर्श । अंतरी कशास ?। ऐसा इतिहास । झुगारावा ॥ ३८९४ करू नका निवाडा । क्षमामार्ग निवडा । आनंदहेतु उघडा । कवाडा, माया-ममता वात्सल्याच्या ॥ ३८९५ आपुलकी, नको हक्क । मुक्ततेंत पाहा सुख । विखार जाळा, करा राख । तटस्थपणे ॥ ३८९६ उताराकडे धावती जळे । तरुवरां प्रिय आभाळे । धरागर्भी परि नाते जुळे । परस्परांचे ॥ ३८९७ अभावे प्रकटतां जळे । कासाविस होती मुळे । अवर्षणादी शंकादळें । ग्रासती अंतर ॥ ३८९८ प्रपातशिल्प प्रस्तरांतले । चला सौंदर्य पारदर्शी आगळे । छायाचित्रें गोठविलेलें । तृप्त होय दिठीं ॥ ३८९९ झुळझुळती तलम वस्त्रे । झांकूं पाहति धरागात्रे । प्रत्यक्षाचि प्रतिमागोत्रें । साकळल्या जळी अस्फुटं ॥ ३९९० सुहृदांतरीची हितचिंता । नकळत व्यापते कल्याणार्था । सुखांत ती परिवर्तितां । जाणा आशीर्वचं ॥ ३९०१ प्रहरी निवांत । तवानी मनांत । मूक, परी सचिंत । उभयता ॥ ३९०२ दिसाच्या प्राक्तनी । असतील गाणी ?। भूपाळी की विरहिणी । कोणा ठावे !॥ ३९०३ सारेंच आवृत । संगरा प्रवृत्त । धरोनी हाती हातं । व्हाया होवे ॥ ३९०४ साऱ्या संसारांची । कथा ही नित्याची । भ्रांत क्षुधा-तृषेची । निवारण्या ॥ ३९०५ भक्त वेडावले । अतिरेकी माजले । ‘मूळा’च्या आश्रयाले । बिचारा ‘तो’ ॥ ३९०६ दावी निसर्ग गोंधळ । निळेशार कधी आभाळ । कधी व्यापतो झाकोळ । वर्षापूर्व ॥ ३९०७ कळां भूतां अवकाळी । कळा धरतीची अबाळी । कधी भेगाळ कधि पागोळी । तिच्या देही ॥ ३९०८ (पहिल्या ‘कळा’ प्रसूतीपूर्व.. महाभूतांच्या.. दुसरी ‘कळा’, अवस्था ) लहरी असा हा राजा । त्याला भजा अथवा पूजा । य:कश्चित्तसि मिळे सजा । अकारण ॥ ३९०९ भय दावता ‘देवा’चे ?। फेकतां जाळे विज्ञानाचे ?। विकट हांसंत तो नाचे । रडवीत सकळ ‘जीवां’सि ॥ ३९१० सुटकाहेतु शरण जाणे । आत्मक्लेश भोगत जगणे । उत्क्रांतासि वाटते जमणे । सहजासहजी ?॥ ३९११ ‘जीव’ ‘त्या’चीचं अपत्ये । सांभाळोनि सारी पथ्ये । उलटवूं पाहातील, जरी कोते । प्रयास ठरतील ॥ ३९१२ मजा घेऊं लढण्यांचा । मिळविल्या आनंदक्षणांचा । विजय ज्ञान-कर्मेंद्रियांचा । साजरा करूं हर्षोल्हासे ॥ ३९१३ नक्षत्रसरितांच्या समूहांत । जीवजंतूं अगणितं । क्षणोक्षणी झेलतांत । अखेरवेरी संकटे ॥ ३९१४ दिठींतुनी जाणिवेस प्रवेश । काळजावेरी होतो प्रवास । स्मितहास्य स्वागतास । असावे भावनांच्या ॥ ३९१५ तरुवराच्या शाखाकृती । भाव मुद्रा रेखाटती । अवर्णनीय कलाकृती । साधिली आपेआप ॥ ३९१६ कपोलावर शशिबिंब । की क्षीराचा राहिला थेंब ?। वोसंडल्या उचंबळाचा कुंभ । कीं आभाळमायेच्या ?॥ ३९१७ देखणेपणाची असोशी । निवडोनि ऐश्वर्यवंत दृश्यांसी । निरव, नि:शब्दासी । देताहे सीमानिश्चिती ॥ ३९१८ निर्मळभाव अंतर्मन । कृतींतून दृश्यमान । स्वत: पल्याडचे इतरेजन । सुखावताहे अजाणता ॥ ३९१९ घटितांसि असती कारणे । कारणें परिवर्तन संभवणे। कटु क्वचित वा दुखावणे । स्वाभाविक, परिणामी सुखांतं ॥ ३९२० पश्चिमा नखशिखान्त । आधारांगुली धरित । नवा दिवस पादाक्रांत । करण्या सिद्ध ॥ ३९२१ दुर्दम्याशा दिठींत । देहबोलिं एकवटित । । क्षणभर उभे छायेंत । सान बालब्रह्म ॥ ३९२२ कंठसिद्धी सोबत । आपेआप येते गीतं । सदैव राहते सांगतं । ‘गाणे गा रे गा !’ ॥ ३९२३ भावमुद्रा नि स्वर । नि:शब्द भाषा विश्वभर । म्हणोनि कदाचित आनंदविभोर । मूकव्रती सहसा ?॥ ३९२४ अष्टभुजा पसरोनी । बाहताहे वनराणी । गात हिरवाईची गाणी । रिझवाया मनुष्ये ॥ ३९२५ (०९-१२-२०१७) झांजर नि धुके । भवताल अंधुक, फिके । जीवमात्र, न फिरके । चिडिचाप, सर्वदूर ॥ ३९२६ पंखांवर नक्षी साजीरी । सावली गरीब बिच्चारी । पांखर किडा-मुंगीवरी । धरी समाधानें ॥ ३९२७ मिळालेल्या मार्गाने । प्रवेशती नेटाने । कवळी जरी तेजोकिरणे । विश्वव्यापी ॥ ३९२८ अडसर अनिर्बंध महाभूतांना । आवर त्यांना घालतांना । सामर्थ्याची त्यांच्या असुंदे मना । जाणीव सदैव ॥ ३९२९ अखंड राहांत । जळतत्वांत । बिंबस्वरूपांत । उफराटे विश्व ॥ ३९३० हलक्या स्पर्शबळे । सर्वांग डुचमळे । लहरींना वाट मिळे । जळांगी ॥ ३९३१ ऊर्ध्वभागी स्थिर । चैकटींच्या सीमांवर । दृश्यांगी थरथर । परिणामी ॥ ३९३२ राखाडी कृष्णरंगी । राजहंस शुभ्रांगी । विहरताहे विरहांगी । सखीविणा जळपृष्ठी ॥ ३९३३ जिणे सुख- दु:खाचे चक्र । आपदा बहु, आनंद क्षणमात्र । थकतांति समस्त गात्र । विरोधाभास पचवितां ॥ ३३९३४ झाकोळोत्तर स्वच्छ निळाई । तेजोनिधी तळपतो वरदाई । जगराहाटी ठाई । चक्रनेमिक्रम सारखाची ॥ ३९३५ आभाळच्या कपोलाला । प्रीतरंगाचा लळा । काकद्वयाचा टिळा । गालबोट ॥ ३९३६ यवनिका ल्याली । सुमनांसह वेली । सुशोभित झाली । बिंबरूपे ॥ ३९३७ श्रेय ऐश्वर्याचे । लुटूं पाहायाचे । दर्पणतत्वाचे । हेची वर्म ॥ ३९३८ स्वयं जरि निष्कलंक । बिंबांचा परि पालक । जे जे उभे ठाकं । समोरी, त्याच्या ॥ ३९३९ सई ! भेटती विविधरंगांत । हसऱ्यांनी पाणी दिठींत । वेदनांचे बेसूर स्मरतांत । कधि विनोदरूपे ॥ ३९४० विरोधाभास जाणवतो । भूतकाळ जागवितो । नेणिवेंत लोपतो । आठवांच्या ॥ ३९४२ ऐसेचि असते जिणे । जीर्ण उशाशी घेणे । नाविन्यांची स्वप्ने पाहाणे । अखेरवेरी ॥ ३९४३ कधी धावणे मार्गावर । कधी अडथळ्यांचा कहार । अडगळ-वाट मिळे अखेर । हरेक वस्तुरूपा ॥ ३९४४ कुणि ‘रंगेल’ छकडा ।कुणि ‘रगेल’ तगडा । अखेरी सर्वांचांचि घडा । भरणार, निश्चितचि ॥ ३९४५ भोगोनि होती दूर । विस्मरती पळ सुखकर । सहजचि सरसावति कर । कवळाया नवे ॥ ३९४६ भूत, वर्तमान, भविष्य । अळी भवती उद्या कोष । रेशमास जीर्णोत्तरी धसं । चुकलि नाही ॥ ३९४७ कर्मोत्तरी अतर्क्य अपेक्षा । धरो नये भलत्या आशा । प्राशो नये लोभस विषा । मोह, मायेच्या ॥ ३९४८ श्रवणेंद्रिये आणि दिठी । ऐको-पाहोनि समग्र गोठी । जाणिवा अनुभविण्यासाठी । उघडतील आपेआप ॥ ३९४९ पर्जन्याचे पाठिराखे । परि झाले वृद्ध सखे । परततांना शुभ्रवर्ण अंगरखे । संकेत निवृत्तीचे ॥ ३९५० की कुठले वायुयान । क्षणार्ध अस्तित्वाची तत्थळी खूण । ठेवोनि पिसारा धूम्रवर्ण ।भिडले तीरासम, अरिसी ॥ ३९५१ नैराश्य, संभ्रम वा वेदना । जर व्यापेल अंतर्मना । पृच्छा करा दर्पणा । ठेवोनि सन्मुख ॥ ३९५२ दिठी तत्क्षणी सुखावेल । सत्प्रवृत्ती काळजां भारेल ।सद्भाव उचंबळेल । देहबोलींत ॥ ३९५३ चिंता साऱ्या वारतील । ज्योत अंतर्यामी उजळेल । ज्ञान-कर्मेंद्रिया होईल । मार्गदर्शी ॥ ३९५४ पोक्त पित्यांची पांखरं । कवळ्या झुडुपावर । भक्कम कणखर आधार । वाढतांना जोमानं ॥ ३९५५ दूरवर मनुष्यांची वसती । मधे हरळिची दाटी । पायवाट राखते संगती । शेजारून ॥ ३९५६ आयुर्वेदाचे संशोधन । हेतु ? वेदनाशमन । धन्वंतरी अतिप्राचीन । कर्ते झाले ॥ ३९५७ देह वेदनांदाह जाण । परकायाप्रवेशाविण । मनुष्यतत्वभारित मन । करोजाय ॥ ३९५८ माया, वात्सल्य, ममत्व । असोशी, लगावं प्रीततत्व । भक्ति, ओढ, मनुष्यत्व । जाणतांतं वेदना ॥ ३९५९ सांकळांत तरगती विहग । तत्स्पर्शे जळावरि तरंग । थरकतांत प्रतिबिंबे अनेक । भवतालाची ॥ ३९६० शांत निरव परिसर । चित्तासि विश्राम-घर । चिंतनासि सहजी एकाग्र । अंतरंग होतसे ॥ ३९६१ बंधने, सीमा, कारा । काय घेणे भास्करा ?। स्वागत हवाक्षी वा द्वारा । कोणत्याही ॥३९६२ शाख-पर्णे डोकावती बाहेर । परंतु त्यांना जाळीचा अडसर । आखून दिल्या सीमेपार । संचरणे अवैध ॥ ३९६३ मुळे मात्र कणखर । प्रसंगी दुभंगती प्रस्तरं । वा उखडती भूस्तर । सहजी कोणताही ॥ ३९६४ म्हणोनि असावे पायथा । वा अवकाशी हाकावे रथा । जैसी मिरविते गाथा । ओवी वा अभंग ॥ ३९६४ ज्ञानोब्बा पाया जैसा । तुकोब्बा कळस तैसा । वारकऱ्यांसि आदर्श असा । मांदियाळींत संतांच्या ॥ ३९६५ गंमत.. ज्ञाना ठाम पायरीवरी । तुका बळे किरिट धरी । जनावळीची आंस अपुरी । उद्युक्तेल उन्मळण्या ‘इटूं’ ॥ ३९६६ संत कवचांतील मनुष्ये । युक्त निस्पृह भक्तिच्या पाशें । अश्लाघ्य, अकल्याणकारी दृश्ये । निमिषार्गांत ‘वार’तीलं ॥ ३९६७ निसर्गाचाचि असतो अंश । कोठही कसलाही माणुस । काळजांत कळवळा वा क्रोधास । अनिर्बंध धारितो ॥ ३९६८ मावशीस तरु ‘वर’ । इमानदार राखणदार । दोहोंसि आधार । गृहसंकुलांत ॥ ३९६९ श्वान आपुल्या नादांत । मावशी भेदरल्या अवस्थेंत । निशोत्तर उगवती प्रभांत । दृश्ये भवताली गमतीची ॥ ३९७० ठाकले समोर । अस्पर्श परि अंतर । समाधान चित्तभर । न होते ॥ ३९७१ हलतां काळीज । चमकते वीज । जिण्याला काज । आपेआप ॥ ३९७२ प्रीत सहसा निर्व्याज । बोल सुखावह सहज । अंकुरते मग बीज । आनंदाचे हुर्दांत ॥ ३९७३ गुलाबी उमलती आभा । व्यापोनि पूर्ण नभा । शाखशिखाधारी द्रुमा । छदितसे सहजी ॥ ३९७४ मूळचा तेजोनिधी । सर्वदूर तम वेधी । वक्रीभूत कठोर पाती । अवलंबे प्रसंगी ॥ ३९७५ विश्वाचा कणकण उजळणे । हाचि हेतू, तेचि जिणे । सिद्धी कल्याणकारणे ।खर्चितसे जन्मजात ॥ ३९७६ ऐसा परंतु विरळा । आचरतो मार्ग आगळा । सामान्य हिणविती ‘जगावेगळ’ । जाणा ‘संत’ ॥ ३९७७ गुलाबी उमलती आभा । व्यापोनि पूर्ण नभा । शाखशिखाधारी द्रुमा । छदितसे सहजी ॥ ३९७८ मूळचा तेजोनिधी । सर्वदूर तम वेधी । वक्रीभूत कठोर पाती । अवलंबे प्रसंगी ॥ ३९७९ विश्वाचा कणकण उजळणे । हाचि हेतू, तेचि जिणे । सिद्धी कल्याणकारणे ।खर्चितसे जन्मजात ॥ ३९८० ऐसा परंतु विरळा । आचरतो मार्ग आगळा । सामान्य हिणविती ‘जगावेगळ’ । जाणा ‘संत’ ॥ ३९८० मैत्र, स्नेह जागवीत । चित्तवृत्तींत रंग भरींत । प्रकटते जेंव्हा प्रभांत । आगळा तो दिनु ॥ ३९८१ विस्मरत नाहींत । हितचिंता जपतांत । विरळाची भेटतांत । मनस्वी तरिही ॥ ३९८२ आज उगवत्यां आभाळी । कोण अज्ञांत माळी ?। गुलाब पाकळ्या उधळी । कोणावर ?॥ ३९८३ ऐन सरत्या मार्गशीर्षांत । रंगपंचमीचा खेळ रंगांत । अवकाशास प्रीत ।देताहे भूल ॥ ३९८४ बोचरा गारठा हुडहुडता । हाडांस फोडूं पाहता । हिरवाई न्हाणुली होतां । प्रेमरंग माळताहे ॥ ३९८५ आनंद ! उर्जा क्षणोक्षणी जगण्याला । आनंद ! प्रेरणा अखंड कार्यप्रणवतेला । आनंद ! निवांत विश्रामाच्या घडीला । द्विगुणित आपेआप ॥ ३९८६ मुद्रेवर स्मित धारेन । कल्याणकारी विचार आचरेन । कार्यपूर्त्योत्तर लयास जाईन । समाधानें ॥ ३३९८७ पसा पसरितो आशीर्वचासाठी । पसा पसरितो शुभचिंतनासाठी । पसा पसरितो स्वर्णदिनासाठी । भरिताहे निरोप घटिका ॥ ३९८८ आळा आज तुटो पाहे । पैल मसि बाहताहे । रानोमाळ उडो जाए । भंगोनि कल्पनाविश्व ॥ ३९८९ अक्षय मी सेवाव्रती । अक्षरे जाणिल्या धरोनि हाती । अक्षत, तथाकथित ‘साहित्य’कृती । धजलो रचाया ॥ ३९९० अखंड राखिली शब्दांची बूज । आशया देवोनि भावनांची भीज । अंतरि सांकळले गूज । उन्मळोनि बोललो जी ॥ ३९९१ कल्पनानिधिवरि बुडबुडा । निमिषार्ध जिण्या एवढा । उतो जाऊ पाहिल्या कढा । प्रवाही केले मियें ॥ ३९९२ काळजाच्या, व्याधिग्रस्त अस्वस्थ । सीमेवर घालींत गस्त । राहिलो असतो तटस्थ । भ्रमिष्टावस्थेने असते ग्रासिले ॥ ३९९३ घोंघावे कळिकाळ । दिसो लागे तळ । मुक्कामाशी मेळ । होवा घालाया ॥ ३९९४ अवघे पसरले व्योम । म्हणे हेचि निजधाम । पंचतत्वांचे वर्म । येथं वसे ॥ ३९९५ नक्षत्रसरिते पासोनि । दूरत्व जरी ठेवोनि । कोणि वसविले स्थानी । साहेन बापुडा ॥ ३९९६ परि व्हावा दिठीमेळं । सांज सकाळ तीन्ही काळ । आसुसले काळजा विकलं । न कदापि व्हावे ॥ ३९९७ नाळ तुटणे स्वाभाविक । निरोप द्या-घ्याया एकेक । आप्तेष्ट, स्नेही हितचिंतकं । भेटतीलची अखेर ॥ ३९९८ निरोप घेतां कंठी कँप । दिठीस पांझर आपेआप । काळजाचा थरकांप । उमटे देही ॥ ३९९९ जीव लावता लागतो लळा । खंड पडतां असह्य कळा । परंतु संसार त्यजोनि सगळा । मावळणे अनिवार्य ॥ ४००० अरुण काकतकर

No comments:

Post a Comment