Thursday, May 5, 2011

Mahaalaxmee nimittaana...


बरं झालं कोल्हापुरच्या महालक्ष्मी-गाभारा-प्रवेशानिमित्तनं आंदोलन झालं आणि सगळ्या कालीमाता, चडिकाभगिनी महालक्ष्मीच्या गाभार्‍यांत पोहोचल्याही थेट. नंतर पूजार्‍यांनी, आत्मदहनाच्या वगैरे घोषणा-बीषणाही केल्या. काय तर म्हणे स्त्री रजस्वलावस्थेत ’अपवित्र’, ’अस्वच्छ’ असते. पूर्वीच्या काळी, दिवसरात्र घरसंसाराच्या जात्यांत भरडल्या जाणार्‍या आया-बहिणी-माउल्यांना, त्या अवस्थेत, हक्काची विश्रांती मिळावी म्हणून, कामापासून आणि विकृत पुरुषी ’कामेच्छे’पासून, दूर ठेवण्याच्या या ’कौटुंबिक-हितकारी’ योजनेचा उपयोग, धर्ममार्तंडांनी सोवळ्या-ओवळ्याच्या भ्रामक जोखडाखाली स्त्रियांना जुंपण्यासाठी केला. आता शारीर-स्वच्छतेबाबत उपलब्ध सुविधा आणि जागृती, सर्व वयोगटांतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत, माध्यमांच्या कृपेमुळे, जरा जास्त प्रमाणांतच का होईना, पण पोहोचली आणि पटलीसुद्धा आहे. अशा वेळी, श्रद्धेयाच्या पार्थीवपुतळ्याजवळ जाण्याने कुठले आणि कसले ’ओवळेबिवळे’ होते ? रजस्वलावस्थेत स्त्रीदेहांतून कांही हानीकारक ’किरणोत्सर्ग’ वगैरे तर होत नाहीना ? आणि झालाच, तर ’सर्वशक्तिमान’ श्रद्धेय-मूर्तींवर त्यांचा कांहीच परिणाम होणार नाही ! पण त्रास होणार तो. अंधश्रद्धेनं विखारलेल्या मनांना, तथाकथित पूजारी जमातीला. संतांनी याविषयी कांही लिहिलय की नाही, मला माहीत नाही, पण तो काळ, वैज्ञानिक-कांतीच्या आधीचा होता. कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मुख्य पुजार्‍यांनी, जनमताचा रेटा आणि त्याची तीव्रता लक्षांत घेवून, नंतर सामोपचाराची भूमिकाही घेतली हे बरेच झाले. निसर्गानच निर्माण केलेल्या नर-नारीमधल्या नराला, वयांत आल्यावर स्खलनशील तर नारी दर महिन्याला रजस्वला होण्यामागे, निसर्गाचा, प्रजोत्पादनाचा निखळ हेतू असतो हे या धर्म मार्तंडांना कोण सांगणार आणि पटविणार. आणि पटवायच कशाला, एका ’आई’रूप नारीपोटीच ज्यांनी जन्म घेतला, त्यांना काय हे माहीत नाही ? उगाच ’वेड पांघरून पेडगांवला’ जाणाच्या या वृत्तीची आता लोकांना सवय झाली आहे.
असो...त्या निमित्तनं दोन राजकीय पक्षांना, काहीतरी विधायक केल्याच समाधानही मिळाल आणि कधीनव्हत ते चक्क मतदात्या जनतेला, विशेषत: महिलांना.. पण, त्यांचे हक्क मिळल्याच समाधान मिळालं. अशीच सगळी, ’पूजार्‍यां’च्या तावडीत सापेडलेली मंदिरं आणि श्रद्धेयं मुक्त झाली पाहिजेत.पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरांत सुद्धा, दर्शनाला लेकी-सुनांसह येणार्‍या आया-बायांना, ज्या पद्धतीनं ’सुरक्षा’(?) रक्षक, अंगाला ’इथं-तिथं’ धरत, पांडुरंगा समोर ’आपटायला’ ओढतांत ते बघून चीड येते ती ’रक्षकां’ची नाही तर, हे सगळ बघत, थंडपणे उभ्या असणार्‍या, पार्थीवरूप ’देवा(?)’ची.
माझ्या एका परिचित बाईंनी प्रष्ण केला की, ’काय हो, देवीला वस्त्र-प्रावरणांनी सजवायला पुरुष काय म्हणून ? ही आमच्या स्त्री-देवतेची विटंबना आणि अघिक्षेप आंम्ही बायांनी का सहन करावा ? आधी गाभार्‍याच्या बाहेर काढा सगळ्या पुरुषांना ! तिथं आमचाच अधिकार चाल्ला पाहिजे.’ विचार केला तर तथ्य आहे यार मागणीमधे...अं ? तेंव्हा आता, सर्व स्त्री-देवतांच्या गाभार्‍यांमध्ये, ’स्त्री-सेवक-प्रतिष्ठापना’ करण्याचा विडा, या आंदोलनापासून आतापर्यंत ’वंचित’ राहिलेल्या कोणा राजकीयपक्षाला उचलायला हरकत नाही, नाही का ?
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

2 comments:

  1. Well said. The tragedy is that the women had to use force to assert their rights. Does this ring a bell?

    ReplyDelete
  2. good venture...blogging is always a good outlet...keep blogging!!!!

    ReplyDelete