Tuesday, November 22, 2011


’अक्षरे’
कविवर्य मंगेश पांडगांवकरांच्या संगीतिकेतल्या ,’शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ आणि’ माझे जीवन गाणे’ अशी दोन गीतं, तत्कालीन आकाशवाणीसाठी पु. ल. देशपांड्यांनी संगीतबद्ध केली आणि आपल्या खास शैलींत, मधली आलापी, गमकाच्या अंगानं करीत, गावून पंडित जितेन्द्र अभिषेकींनी ती अजरामर करून ठेवली. दोघांच स्मरण, ८ नोव्हेंबरला सगळ्या  साहित्य-संस्कृती-संगीत रसिकांनी केलं.  अनुक्रमे, जन्मदिन आणि पुण्यतिथी निमित्त. ’वैशाख वणवा’ चित्रपटांमधलं, रमेश देव आणि जयश्री गडकर यांच्यावर, पार्श्वगीत म्हणून चित्रित झालेलं, ’गोमु माहेरला जाते रे नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा’ हे सुद्धा ’बुवां’च्याच आवाजांतल, स्पष्ट श्ब्दोच्च्चारानं अर्थ अधोरेखित करीत म्हटलेलं, रुपेरी पडद्यावरचं त्यांचं, बहुतेक पहिलंच गीत. त्याच ’आकाशवाणी’ दिवसांतलं... ’आकाशवाणी’ साठी अभिषेकींनी, कविवर्य सुरेश भटांचं ’मेंदीच्या पानावर...’ हे गीत स्वरांकित करून उषा पंडित...देवकीची आई...कडून गाऊनही घेतलं होतं, हे अनेकांना माहीत नसेल. नंतर ’प्रथितयश’ झालेल्या अनेक कलाकारांची ’पहिली रोजी-रोटी’ देणार्‍या ’आकाशवाणी’तल्या दिवसांतचं !
नाट्यसंगीताला नवा रंग देत, बहराला आणणारे अभिषेकी वरकरणी अतीशय गंभीर पण मुळांत सर्वार्थानं खूप रसिक आणि मिश्किल व्यक्तिमत्व होतं. संस्कृत साहित्याचा चांगल्यापैकी अभ्यास. विशेषत: शब्दोच्चार, अगदी शास्त्रीय बंदिशी (रचना) मधले सुद्धा, स्पष्ट आणि अर्थवाही करण्यांचा त्यांचा कटाक्ष असे. कथालेखनाचा सुद्धा त्यांचा व्यासंग होता. राहाणी-वागणुकीतला साधेपणा इतका की संगीतसभा, महोत्सव यांसाठी प्रवासाला जातांना, बुवा नेहमी  साथीदारा आणि शिष्यांसह, रेल्वेंत एकाच श्रेणीच्या बोगींतून जात असत. सादरीकरणांतला प्रामाणिकपणा, शिस्त, गांभिर्य यांचा पगडा शिष्यमंडळींवर, साथीदारांवरपण आपोआपच  जाणवायचा. गाणं सुरू व्हायच्या आधी कमींतकमी अर्धातास ते बैठक घालून साथीदारांसह तयार असायचे. तानपुरे सुरांत लावून तयार असायचे. (पडदा उघडल्यावर, अर्धा-पाऊणतास तानपुर्‍यांशी झगडणारे, अगदी राष्ट्रीय कीर्तीचे प्रथितयश गायक आणि त्यांच्या ...फक्त...त्याच सवयी घेतलेले त्यांचे शिष्योत्तम मी इतके पाहोलेत, की नमनाला सुरुवात व्हायच्या आंतच श्रोत्यांच्या डोळ्यांतून घडाभर पाणी सांडलेलं असायचं, म्हणून हा खास उल्लेख). मफिली दरम्यान शिष्य़ांना मधे गायला भरपूर संधी देवून त्यांच्याकडून गायल्या गेलेल्या आलाप, बोलतांना, तानांना यथोचित दाद देण्यांत त्यांनी कधीच कंजूषपणा दाखविला नाही.
बुवांच्या नाट्यसंगीत संयोजनांतले महत्वाचे टप्पे म्हणजे, भावसंगीताला त्यांनी अत्यंत सहजतेनं नाट्यसंगीतांत सामावून घेतलं. त्यामुळं नाट्यसंगीताला एक नवा आयाम तर मिळालाच शिवाय नाटकांत ’आळवल्या’ जाणार्‍या अनिर्बंध ’गायकी’ला एकप्रकारची शिस्त मिळाली  ’मत्स्यंगंधा’ मधली, ’गर्द सभोती रान साजणी, मी तर चाफेकळी’, किंवा ’तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना’ ही दोनच गाणी जरी आठवलीं तरी पटेल. शिवाय ’विकल मन आज झुरत असहाय’, ’कांटा रुते कुणाला’ अशी कितीतरी भावगीत आणली बुवांनी नाटकांत. ’लेकुरे उदंड झाली’ किंवा ’बिकट वाट वहिवाट’ मधली, पूर्वध्वनिमुद्रित वाद्यमेळा (Pre-recorded score) बरोबर, श्रीकांत मोघ्यांसारख्या समर्थ कलाकारानं सादर केलेली गाणी हा आणखी एक’ बुवांच्या प्रायोगिक संगीत -नियोजन-प्रक्रियेंतला महत्वाचा यशस्वी टप्पा. ’कट्यार काळजांत घुसली’ या नाटकांतल्या सर्व पदांचा, बुवानी गायलेला Track जर कुठे ऐकायला मिळाला तर अवश्य ऐका. मी ज्या काळांत हे नाटक बघितलं...शंकर घाणेकर ’राग-मालिका’ सादर करायचे त्या काळांत...त्यां काळांत, पडदा उघडण्या पूर्वी प्रेक्षक प्रेक्षागृहांत येत असतांना, हे ध्वनिमुद्रण लावलेलं मी अनेकदा ऐकलं आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ’ययाती आणि देवयानी’ मधलं, ’सर्वात्मका, सर्वेश्वरा’चं संगीत-नियोजन आणि गायन हे तर बुवांच्या, पक्क्या अध्यात्मिक बैठकीचं प्रत्यंतरच प्रत्येक वेळी देत असे, आणि त्याच रंगावृत्तीतलं,’ हे सुरांनो चंद्र व्हा’ हे त्यांच्या संगीत नियोजनाच्या शास्त्रीय बठकीच्या सखोलतेचं ! त्यांच्या, ’अबीर गुलाल, उधळीत रंग...’ सारख्या अनेक संतरचना,बरोबरच आधुनिक संत, कविवर्य ’बाकीबाब’ बोरकरांची, ’नाहि पुण्याची मोजणी, नाहि पापाची टोचणी’ किंवा अशोकजी परांजप्यांची ’कैवल्याच्या चादण्याला भूलला चकोर’  या रचनांमधली उत्कटता...कशी कोणी विसरणं श्यक्य आहे. तशीच बकीबाबांच्यांच ’कशि तुज समजावू सांग, का भामिनि धरिशी राग’ ह्या रचनेंतलं आर्जव, विनवणी...क्या बात है सर !!
’नको जन्म मरण आतां, नको येरझार
नको ऐहिकाचा आतां व्यर्थ बडिवार’
म्हणत, ९८ मधे, बुवा  फारच लवकर, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अद्वितीय स्वरावलींपासून पोरक करून गेले, बाकीबाबांच्या पंक्तीत थॊडा बदल करून
’विरले सगळे सूर, तरीही उत्तर रात्र सुरेल
स्वरावलींची तरिही हृदयी, तशीच ओलं उरेलं’
असं म्हणावसं वाटतं...
आमराइतुन गातो कोकिळ, दडतो पानांआड
आभाळाशी स्पर्धा करिती, हिरवे खेटुनि माड...
राउळांतुनी घुमत नगारे, पवित्र घंटानाद
टाळमृदुंगासवे आर्तशी सुरेल अभंग साद...
लाल मातिची विरते सीमा पुळणिंत ! सागर साक्षी
लाट किनारी खेळ खेळता रेखुन जाई नक्षी...
मंगेशा अभिषेक कारणे अवतरली स्वरगंगा
गाज गभिरशी जिंकुन घेई रसिकाहृदयी जागा...
टिपुन आणिले अमृतकण, शोधून मंदिरे नाना
भावस्वर गहिर्‍या रंगांचे विणून केल्या रचना...
वरकरणी जरि असे मुनीश्वर अंतरि इंद्रधनू
रती-विरक्ती-शक्त्यासक्ती मयसभाच ही जणू...
अनुयायांवर केली माया, अशी गुरूची कृपा
परिक्रमा घडविली स्वरांची, दावित अनंत रूपा...
ज्ञानाच्या आसक्तीपोटी कसे लोटले जिणे
माधुकरीचे घास रिचवुनी, कंठि रुजविले गाणे...
कृतज्ञता जपली हृदयी जरि पैलतिरीची हांक
दमड्यांचा ना विचार केला, भागविली स्वरभूक...
राजाश्रय ना कधी मिळाला, खंत कधी ना केली
जणू हलाहल पचवुनि सहजच अमृतवाणी सजली...
विविध सजविले कवी स्वरांनी, वेधुनि भावार्थाला
बाकिशब्दसम गंधाराच्या स्वयंभु प्रकटार्थाला...
सय स्नेहाची नकळत करिते आर्द्र पापणी कांठ
कृपा एक की पुत्राकरवी नितनूतन स्वर भेट...
*****
अरुण काकतकर
24ak47@gmail.com
 

No comments:

Post a Comment