Thursday, November 29, 2012

’तव राहो नेहमिच ताठ कणा..

सदर छायाचित्रांत एक कष्टकरी, डोक्यावर चक्क एक मोटर्‌साय्‌कल वाहून नेतोय.. मजुरीसाठी... ’तव राहो नेहमिच ताठ कणा..’ रे अजून थोडे साहि तना, श्रमल्यावाचुन नाही प्राप्ती, दारिद्र्यांतुन नाही मुक्ती, जीवन परिघा नाही व्याप्ती नशिब घडव, घालून घणा... तिजवर सारे नेहमिच ’स्वार’, आजार ’तिला’ ? मग ’हे’ बेजार, टाकिति ’बोजा’ तुझ्या शिरावर, हा धनिकांचा रे ’चतुरपणा... तुला निरंतर स्मरेल रे ’ती, यंत्रांनाही असते रीती, सचेत करिती ’निर्जिव’ नाती, ’तिज’पाशि खरा ’माणूस’पणा पाहाणारे वाकून पाहती, ’बोजा’ला वचकून राहती, दयार्द्र कटाक्ष नाहि तुजप्रती’ तव राहो नेहमिच ताठ कणा... छायाचित्र बघितल्याबरोबर, मला ’बाकीबाब’ बा. भ. बोरकरांची ती सुप्रसिद्ध ’जीवनदर्शी’, वास्तवाचं भान देणारी, सुस्त जनांच्या मनाला खडबडून जाग करणारी रचना आठवली... रे अजून थॊडे सोस मना प्रसव वेदनांविण ना सृष्टी, तपनावाचुन नाही वृष्टी, दु:खाविण ना जीवन दृष्टी मेल्याविण मिळला स्वर्ग कुणा ? रे अजून... आणि तो घाट वापरत छायाचित्रांतल्या वास्तवच्या ’विस्तवा’ झळा शब्दांकित करत मांडायचा मोह आवरला नाही ! असली, लौकिकार्थानं ’हलकी’ (?) काम करणार्‍यांबद्दल पांढरपेशांचा एक नेहमीचा प्रश्ण, तुच्छतेच्या तिरक्या कटाक्षासह असतो.. ’कौन है बे तू ?’ त्यांना या कष्टकरी जिवाचं हे उत्तर तर नसेल ? ’तुम्ही कोण ?’ म्हणून काय पुसता, नाही आम्ही कोणिही पोटासाठि अतर्क्य कर्म असले ’हट्‌ के’ करू कांहिही ’तुम्ही कोण ?’ म्हणून नजरा वळवू नका वाकड्या ’आम्हा’विण नेहमीच ठरतिल तुमच्या, धनराशी तोकड्या ’तुम्ही कोण ?’ म्हणोनि करु नका हर घडी ’बेदखल’ तुम्हा अमृत देवुनी पचवितो आम्हीच हो हलाहल आणि असली दृश्य पाहायची सवय नसलेल्या नजरांना, हे, त्यांच्या परिचित आश्चर्यांमधली भर वाटेल कदाचित ! पण म्हणतांत ना, ’मरता न क्या करतां ?’ मेरू पर्वत मुंगीनं गिळला, डोइवर चढली दोन-चाकी सागर सारा आटून गेला, घामांतच राहिलं मीठ ’बाकी’, उचलायाच होवी ही ’नखरेल नार’, जरि खायला कहार अन्‌ भुईला भार फुटक्या नांवेतलं पाणी उपशित, पार कराया होवी ना ओढाळ धार ? दुनियेला आनंद कदाचित, ’गिनीज्‌’मध्ये एक आणखी भर गोरगरिबाला काय हो त्याचं ? एका दिसाची सुटली भाकर ’चवल्या पायजेत ? तर कर बाबा ह्ये !’ म्हने मालक रामप्रहराले, ओझं जिण्याचं वागवित चालणं, किती दीस आमच्या नशिबाले ? तक्रार करणार कुणा कडे ? सरकारास्नि कुठला येळ सारे नेते येतिल लोळत, ’तेंव्हा’ मतांशि घालाया मेळ कुणाला पडलिये चिंता आमची ? हर आमआदमी भई है व्यस्त, पेट्यांच्या, खोक्यांच्या चळती मोजत, दादा भाई सदा नशेंत मस्त आणि राजकारणातल्या ’मांडवली’ करंयासाठी, ’तू थोडं मार, मग मी गोंजारतो’ या सत्ताधारी आणि विरोधकांच्या जीवघेण्या खेळांतला ’बंद’ हा एक हुकमाचा एक्का.. त्यांनाही विनंती करावीच लागते दरिद्री नारायणांना.. हरदम.. नका करू बंदबिंद आम्ही जगायचं कसं ? हातावरच्या पोटाल समजावावं कसं ? नका करू बंदबिंद कशी कमवायची रोटी ? तेल, मीठ कसं न्यायच कच्याबच्यांसाठी ? नका करू बंदबिंद, आम्हा ’बारा’ची भ्रान्त रक्ताचा घाम जरी, वृत्ती क्लान्त क्लान्त करू नका बंदबिंद, झालीत मढी आमची आधीच परवड आणि कुरतड चुकवीत मेलोय जगलेपणी कधीच ! मेलोय जगलेपणी कधीच !

No comments:

Post a Comment