Wednesday, December 5, 2012

’वज्रमुष्टी..

सदर चित्रांत, एक छकुला एका मोठ्या घमेल्याची नाव करून ती खळाळत्या, ओढाळ नदीप्रवाहांत पैलतीराला वल्हवत न्यायच्या प्रयत्नांत आहे... ’वज्रमुष्टी..’ खूप वर्षांपूर्वी, बालचित्रवाणीत मी कार्यरत असतांना, बालकांचं भावविश्व शोधावं म्हणून त्यांच्या अंतरंगांत जावून, त्यांना अभ्यास शाळा, स्पर्धा-परीक्षा या बाबत काय वाटत असेल ? हे ताडण्यासाठी, त्यांतल्या काहींशी गप्पा मारल्या. अर्थात ही सगळी छोटी सेना मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू कुटुंबांतली होती.. रोज आईनं ह्नाऊ-माखू घालून, डाव्या हातांत चेहेर्‍याचे दोन्ही गाल धरून, उजव्या हातानं ओल्या केसांचा भांग पाडून, पाठीवर दफ्तर-बिफ्तर देवून, ’बालिस्तर’ व्हायला, शाळेंत धाडली जाणारी...त्याचा परिपाक म्हणून मी एक रचना केली.. एका हातांत खूप खाऊ, दुसर्‍या हातांत खेळणी मगच सुरू करू आम्ही अभ्यासाची बोलणी या रचनंतल्या शेवटचे दोन चरण होते.. म्हणून थोडी माया मिसळा दुधावरच्या सायींत नाइतर आमची ’यंत्र’ होतिल ’हुश्शार’ व्हायच्या घाईंत पण सोबतचं छायाचित्र बघितलं आणि खाडकन भानावर यायला झालं. तसं आम्ही बालचित्रवाणीसाठीच, भामरागडला जावून, डॉ. प्रकाश आमट्यांच्या प्राणिसंग्रहालय आणि लोकबिरादरीवर आधारित लघुपट तयार करतांना बघितलेलं एक दृश्य माझ्या मनांत नेहमीच रेंगाळत राहील. आम्ही राहात असलेल्या भामरागडच्या शासकीय विश्रामगृहांतून समोर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र यांच्या सीमा अधोरेखित करणार्‍या तीन नद्यांचा संगम दिसायचा. मुक्कामादिवशी रात्री झालेल्या वादळवारा, विजांचा कडकडांट, प्रलयंकारी वाटावा असा मेघांचा गडगडाटानंतर धुंवाधार कोसळलेल्या पावसानंतरची भीषण शांतता.. आणि दुसर्‍या दिवशी झुंजूमुंजू व्हायच्या आधी नदीच्या खळखळत्या पाण्यांत त्यातल्या त्यांत संथ शांत प्रवाहाची जागा शोधू्न....कारण जलचरांना सुद्धा शांत, संथ प्रवाहच आवडतो. खळाळ, ओढाळ, खट्याळ पाण्यांत ते हडबडतांत..तिथं येतांत आणि फसतांत मासेमार्‍यांचे, कोळ्यांचे बळी ठरतांत होतांत....चाळण्या, घरांतली चिरगुट घेवून मासे पकडणारी छोटीछोटी मुलं.. हसत खेळत, एकमेकांच्या खोड्या काढत, पाणी उडवत , कधी कुणाचा पाय ओढून त्याला गटांगळ्या खायला लावत त्या पाण्यांत हुंदडणारी... दिसली आम्हाला सकाळी विश्रामगृहाच्या व्हरांड्यांत बसून चहा पितांना ! कधी हा लघुपट पाहायचा योग आला तर तुम्हाला जाणवेल... कसलं सर्वशिक्षा आणि साक्षरता अभियानं, आनंददायी शिक्षण, बालसंगोपन, ज्ञानवृद्धी वगैरे संकल्पना ? सकाळ झाल्याबरोबर, रोज, पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:घराबाहेर पडतांना मुलांना बाहेर पिटाळायचं हेच फक्त पालकांना, ’ग्रामीण आणि आदिवासी, गिरिजन’ जनतेला माहीत आहे या देशांत. आणि मुलं पण असल्या जिण्याला निर्ढावली आहेत.. जशी शहरी भागांतली धनाढ्यांची मुलं गुन्हेगारीला निर्ढावलीत तशीच छायाचित्रांत त्या, पाठमोर्‍या, ’बिनधास्त’ छोट्याच्या कसबाचं, नाविक कौशल्याच्या प्रतिभेचं प्रतिबिंब, प्रवाहांत तर आहेच, पण त्याला सोबत म्हणून, पाठराखण करणार्‍या सवंगड्यासारखी त्याची सावली पण दिसते आहे. याला उत्तर मिळाली आहे.. निश्चित.. कारण ज्या अर्थी सावली उजव्या अंगाला आहे त्या अर्थी मावळतीचा सूर्य त्याच्या डाव्या अंगाला आहे आणि उत्तराभिमुख छकुला पाठमोरा आहे.. त्या मुळे अर्थातच ’उत्तर ’ आयुष्यातल्या कठिण, गहन प्रष्णांचं... त्याच्या समोर आहे खळाळत्या जळौघांला कापणारी वाट अगदी योग्य दिशेनं चालली आहे वल्ही धराया उभ्या वज्रमुष्टी क्षणार्थात जिंकेल हा सर्व सृष्टी घमेले जरी ’नांव’रूपास आले’ पैल गाठणे त्यांतुनी शक्य झाले प्रवाहा विरोधी शोधून मार्ग वक्र जगाचे सहजीच फिरवेल चक्र क्षिति वा न भीती न थकवा हातांना नावीक हा आदर्श बालकांना *****

No comments:

Post a Comment