Wednesday, June 12, 2013

जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं

गीतरामायणाच्या या चित्रमुद्रणा दरम्यान, रोज उशिरा, काम संपल्यावर, चित्रकुटीत म्हणजे बाबूजींच्या पुण्यांतल्या घरी भोजनमैफल रंगायची बाबूजीं बरोबर, श्रीधर, सुधीर(मोघे), श्रीकांत पांरगांवकर, केशव बडगे, प्रसिद्ध संगीतकार रामभाऊ फाटक, अजित सोमण अश्या नामचिन व्यक्ती असायच्या आणि मला सुद्धा त्यांत सहभागी करून घेतलं जायचं. तो काळच असा होता, कौटुंबिक जिव्हाळा, नाती, प्रेम, आपुलकी वात्सल्य जपण्याचा. मग गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगायचा. मग बाबूजी आणि रामभाऊंचे वाद वगैरे गम्मत झाल्यावर ‘आमटी आणि ताक यांच्या समप्रमाणांतल्या मिश्रणाने तयार होणारा ऍमटॅक् हा पदार्थ उत्कृष्ट असून जागतिकस्तरावर तो अफाट लोकप्रिय होवू शकतो, आणि आपण उपहारगृह सुरू केल्यावर, होच नांव त्याला देऊ !’ या बद्दल त्यांच एकमत व्हायचं. अशाच एका रात्री, कॅन्टोनमेंट् भागांत, रामभाऊंच्या एका मैत्रिणीकडे जायच ठरलं. त्यांचे पति सैन्यदलांत कर्नल होते. दूरदर्शनच्या ऍंम्बॅसडर् मधे आठ अधिक एक चालक बसून इप्सितस्थळी पोचलो. साडे अकरा.. फक्त.. वाजले होते..यजमान युगुल घरी नव्हतं. मग ते येईपर्यंत तिथंच बंगल्याच्य हिरवळीवर बसून, बरोबर नेलेलं लिंबूपाणी, नारळपाणी, ताक अश्या पेयां(?)बरोबर चकल्लस सुरू झली. यजमान आल्यावर, आणखी रसद आली..पिठलंभात, पापड अश्या बेतानंतर, परतून पुण्यांत पोचायला अडीच वाजले. पहिलं घर श्रीकांतचं. तो उतरला आणि घराच्या दिशेनं निघाला.. दरवाज्यांत उभी होती, पांरगांवकर-अर्धांगिनी प्रभा.. रणचंडीचा अवतार धारण करून, ‘काकतकर कुठैत ?’ ती गरजली आणि मी डुलकींतून खडबडून जागा झालो. माझ्या पत्नीनं.. निरंजनानं काळजीपोटी विजय देवांना फोन् केलावता. ती दोघ नुकतीच पांरगांवकरांकडे येऊन गेलिवती..मला शोधायला.. मग काय ? घरी गेल्यावर, वाट पाहात थांबलेल्या विजयरावांनी कान पिळून, एकंदर रागरंग बघून, काढता पाय घेतला आणि मग.. नच सुंदरि करु कोपा दे ना मज.. वगैरे मनधरण्या, पुरुष सुलभ... अश्या खूप गमती.. पण काम पण खूप झालं. ते दिवस जणू की होते पिंपळपानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानी दृश्यमान हर क्षणी मज अप्रुप होते सगळे जणु की स्वर्ग समृद्ध जाहला नूतन जीवन सर्ग कधि सामान्यातच असामान्य प्रकटले कधि कुणी फाटका वैश्विक उक्ती बोले कधि प्रचिती येई बौधिक श्रीमंतीची कधि विद्वज्जड आढ्यता, कर्मकांडांची तो सुहासिनीचा केवळ आशीर्वाद आधारा स्मरुनी कृतज्ञ अन् कटिबद्ध राहील सदा जाण तिची.. माझा शब्द मनरंजन निर्मळ, विशुद्ध.. आम्हा वेद नियती सगळांना सगळच भरभरून देते असं नाही. स्नातकोत्तर, पुढच्या मार्गक्रमणासाठी, दिशा मिळण्याच्या प्रतीक्षाकालावधी दरम्यानच्या दिवसांत, मला कधी स्वप्न सुद्धा पडण्याची सुतराम श्यक्यता नव्हती, की मी, सरधोपट मार्ग चोखाळणार-या मुंबईतल्या एका कुटुंबांतला मुलगा, चित्रवाणी नामक एका, त्या काळांत फारशा परिचित नसलेल्या माध्यमांत, माझं भविष्य घडविणार आहे.. जाउ दे पुढे, ज्यांना भरभरुनि मिळाले मी पाहत आहे मागे कितिजण उरले जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं बाकींची आलिमिळि गुपचिळीच राखेनं..

No comments:

Post a Comment