Tuesday, June 4, 2013

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या

राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना असलेल्या राष्ट्रीय सवयी.. अंगवळणी पडलेल्या.. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही.. नसावा बहुधा !! १..शांपूच्या बाटलींतल्या संपृक्त द्रावानं तळ गाठला, की आम्ही त्या बाटलींत थोड पाणी घालून, ते विसळंण, पुनःपुन्हा वापरतो. काय करणार.?. कांटकसर अंगवळणी पडलिये नां..! २..दंतमंजनार्थ मलम..Paste.. तेंव्हाच आम्ही संपलं असं म्हणतो, जेंव्हा, पत्र्याचं आच्छादन पिळून, खालपासून वर पर्यंत गुंडाळून सुद्धा त्यांतून कांहीही फलित मिळत नाही तेंव्हा ! ३..मी जेंव्हा भाजी बाजारांत जावून, १००य१५० रुपयांची भाजी खरेदी करतो, तेंव्ह त्या भाजीवाल्या/ली कडे, आल्याचा तुकडा, कोथिंबिरीच्या..दोन कां होईना.. कांड्या, कढीपत्ता आणि एकदोन मिरच्या, ‘तशाच’, म्हणजे ‘फुकट’, पिशवींत टाक अशी मागणी करतो.. तो मसाला माझ्या जन्मसिद्ध हक्काचा असल्या सारखा.. ४..मला कांही कारणानं, समारंभांत, आप्तेष्ट, स्नेही आदी मंडळींनी, प्रेमादरानं दिलेल्या भेट वस्तू, मी संधी मिळतांच, कुणा नवपरिचिताला, किंवा माझ्यासाठी फारशा महत्वाच्या नसलेल्या व्यक्तीला, त्याच्याकडच्या आमंत्रणानंतर, नाइलाजानं, नाखुषीनं जावून, व्यवस्थीत पुख्खा झोडून (नाइ’लाजा’नं ?), मजकडून भेट म्हून प्रदान करतो. आणि साज्या निर्लज्जपणाचा कळस, कहर म्हणजे, मी त्या मिळालेल्या भेटवस्तूचा चकचकीत आच्छादन-कागदसुद्धा पुनर्वापर करींत, कांटकसरीच्या संस्कारांची बूज राखतो. ५..शोभेच्या वस्तू ठेवायच्या, कांचांची पारदर्शक दारं असलेल्या कपांटांत आलेल्या पाहुण्यानं डोकावून, त्यांतल्या, मी हौसेनं खरिदलेल्या चिनी मातीच्या, कषाय-पेय-धारक-संचाचं कौतुक करून, किंमत विचारली, की मी मनोमन सुखावून, खरिदल्या किमतीच्या दीडदोनपट बढाके दाम सांगतो. पण त्या पाहुण्याला हे माहीत नसतं की मी स्वतः त्यांतून चहा-कॉफी वगैरे कधीच पीत नाही. हाः..हाः..हाः.. फुटलं तर नुस्कानी नको रे बाबा.. ६..घरांत कांही कार्य आहे.. अलंकार घडवून पत्नीला सुखावून, तिचं कौतुक भरलं स्मितहास्य झेलंत, कसचं, कसचं म्हणत मान ताठ करायची आहे. तेयासाठी सराफकट्ट्यावर जावून सुवर्ण खरेदी करायची आहे.. असं कांही नसतांनासुद्धा मी सोन्याच्या आजच्या भावाची चिंता करीत बसतो. ७..माझ्या चित्रवाणीसंचाचा, किंवा दृक्श्राव्य-तबकडी-दर्शकाचा दूरनियंत्रक.. म्हणजे Remote हो..जोंव्हा मला सहकार्य करेनासा होतो, तेंव्हा मी तो, खिळखिळा होईस्तो, सर्व बाजूंनी ठोकतो, आपटतो, उघडून, उगाचाच, त्यातलं तंत्रज्ञान अवगत असल्याच्या आविर्भावांत, त्यांत पारंगत असल्यासारखा आंतले भाग उचकटत बसतो, पण साधी गोष्ट की त्याचा ऊर्जा स्रोतसंच..Battery of cells..बदलंला पाहिजे हे माझ्या लक्षांत येत नाही, किंवा लक्षांत येवऊनसुद्धा अवलंबकृती करीत नाही.. खिशांतले चार चव्वल खर्ची पडतील म्हणून.. ८..कधीकाळी, बायको-मुलांनी फारच हट्ट केला तर.. म्हणजे मुलांचा हट्ट आणि भार्येचं डोळे वट्टारणं.. चौपाटीवर जावून भेळ-पाणीपुरी खायचा बेत करतोसुद्धा मी, बरंका,, पण पाणीपुरी खावून झाल्यावर, दोनचार डाव मसाल्यांचं पाणी ढोसल्यावर, हायहुई करीत, तिखट लागलं म्हणून, भेळवाल्या भय्याकडे, साधी कोरडी पुरी, फुकट मागायची सवयच लागली आहे मला एका साध्या पुरीचे कुणी पैसे देतं कां सांगा बरं मला... आणि जर कां भैयानं ती नाकारली तर मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते, मी बरोबरच्या कुटुंबियांना शरमेनं मान खाली घालावीशी वाटेल, अशा पद्धतीनं आकांडतांडव करतो.. आजूबाजूला गर्दी जमेस्तो.. ९..कुणाकडचं, दुपारच्या भोजनाचं जर निमंत्रण मिळालं मला, तर यजमानाला, अतिथी पूर्ण समाधानानं भरपूर, यथेचित जेवला हे समाधान मिळावं या प्रमाणिक आणि शुद्ध हेतूनं, त्यादिवशीच्या सकळच्या नाश्त्याला फाटा देतो, नि जवळजवळ उपाशीपोटी पोहोचतो इप्सित स्थळी.. १०..माझे सदरे, जुने दिसायला लागल्यावर, मी ते शय्याभूषा म्हणून वापरायला सुरुवात करतो. ते आणखी जुने वाटायला लागल्यावर, मी, खास होळी, धुळवड, रंगपंचमीसाठी म्हणून, बासनांत बांधून ठेवतो.दोनचार वर्षांनी मग जेंव्हा ते फारच जीर्णशीर्ण दिसायला लागातांत, तेंव्ह, नाइलाजानं, अत्यंत जड अंतःकरणानं, पत्नीच्या हवाली करतो.. पोच्छ्या म्हणून वापरायला.. ११..तसा पिझ्झाबिझ्झा घरपोच मागवायला मला जिवावरच येतं. पण काय करणार, मुलाभाळांसाठी करावं लातं ना कधीकाळी, सठीसमाशी..त्यांतल्या त्यात एक, माझ्या कांटकसरीच्या संस्करांना पूरक गोष्ट म्हणजे, त्या वितरणकुमारांना, ‘वरदक्षिणा घ्यायला बंदी असते म्हणे.. मग मी खूप आग्रह करतो त्यांना प्रेमपूर्वक.. नशीब, घालून दिलेला नियम तोडणारा, त्यांतला एखादा भेटला नाहिये मला.. नाइतर पंचाईतच नां.. मग आतां तो अगदीच नाहा नाही म्हणतोय अशी खात्री झाल्यावर, मी कोडगेपणानं त्याच्या मागं लागून, चारपांच, आमचुरा आणि मीर्चीच्या भुकटीच्या पुड्या पदरांत पाडून घेतोच.. दुस-या दिवशई सकाळी, मॅगीवर छिडकून, ती आणखी चविष्ट करायला.. आणि... छिद्रान्वेषी लोक कितीही आणि कांहीही म्हणोंत.. कांही गोष्टी म्हणजे, पुणेकरांची मक्तेदारी आहे असं मुळीच नाही हं..! उदाहरणार्थः दुधाची प्लास्टिक् पिशवी विसळून ते पाणी, मूळ दुधांत मिसळणे, आदल्या दिवशीच्या पोळ्या कुस्करून, त्यांत तूप-साखर किंवा तूपगूळ घालून त्याचे छान लाडू करणे वगैरे. हे सगळ तर आम्ही करतोच, पण तुम्हाला सांगतो, माझी आई दोन लाजवाब पदार्थ करायची.. छान, बिनडागाच्या, केळीच्या सालांची, डाळ घातलेली भाजी आणि वांगी, भोपळा, भेंड्या यांची देठं चिरून, त्यांत दही, तिखट, मीठ घालून केलेली देठी.. आम्ही उदबत्ती पाण्यात भिजवून लावतो.. जास्त वेळ टिकते.. अमृतांजनाच्या किमती वाढल्यापासून, कांही दुकानदारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ आम्ही, त्याला दुवा देत, घेतो.. म्हणजे, उघड्या बाटलींत बोट घालून त्याला लागलेलं अमृतांजन कपाळाला चोळून घ्यायचं.. फक्त एक रुपयांत.. हे सगळ आम्ही कां करतो..? विनोद निर्मिती करायची म्हणून.. ? गैरसमज, मनांतून काढून टाका..! आज आमच्या सारख्या सर्वसामान्यानं, असा निगुतीनं संसार केला नाही, तर मरण्यासाठी विष विकत घ्ययलासुद्धा दमड्या उरणार नाहींत. जनहो..!!

No comments:

Post a Comment