Saturday, November 1, 2014

।।भासबोध।। ३५१ ते ४०० (पुस्तकासाठी विश्राम)

।। दास-वाणी ।। लागता सद् गुरूवचनपंथे । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५१ सद् गरूंनी एकदा मंत्र दिला, साधना सांगितली, त्या मार्गाला लागला की अगदी जगबुडी आली तरी ज्याची आपल्या गुरूवरील निष्ठा कणभरही कमी होत नाही तो सत् शिष्य. आत्यंतिक अडचणीतही जो साधना सोडत नाही किंवा बदलत नाही तो पैलतीर गाठतोच ! गुरु वागला यथार्थ । तरीच शिकवण सार्थ । शिष्य समाधानी परिपूर्त । मग होतो ।। ३५१ गुरु सद्यस्थित आगळे । फोल बोलांचे फेकीत जाळे । नको ते दावीत बळेबळे । नकळे कोठे नेतील ।। ३५२ न ठावे मज ब्रह्म । करित राहाता उचित कर्म । निरपेक्ष न राहाणे हेचि वर्म । गृहस्थाश्रमी जाणिले ।। ३५३ आकंठ लुटतो आनंद । भोव-यांचा करुन भेद । भव-सरितेंचा झुळझुळ नाद । ऐकतो ! हेचि का हो ब्रह्म ।। ३५४ नाही कोणी शिकवीत । अनुभवाची सारी करामत । ज्ञानेंद्रियांना ठेवोनि प्रवृत्त । अखंड अंतरी रुजवितो ।। ३५५ सद्भावनेस जागृत ठेवोनी । घडवीत राहातो जीवमात्र, प्राणी । सात्विक लक्षणि मधुरवाणी । अवलंबुनी अविरत ।। ३५६ तर्कबुध्दीचा दिवा । ज्ञानघृते तेववा । जे करितांत 'देवा'चा धावा । प्रतीक्षेंत अखंड राहोत ।। ३५७ सिध्द करिते रोज विज्ञान । अंधश्रध्देचे फोलपण । बंद डोळे आणि कान । गल्लाभरूं, परि 'संतां'चे ।। ३५८ अरे पाहा अवती-भवती । ठाई ठाई विज्ञानाची प्रचिती । करू नका आयुष्यांची माती । निष्फळ भजनी लावूनिया ।। ३५९ मंगलग्रह समृध्द लाल । मृद्-जळयोगे परिपूर्ण स्थलं । वसति योग्य म्हणे ठरेल । भविष्यांत कदाचित ।। ३६० प्रथम, द्वितीयाचे क्षेत्र । तृतीय प्रथमपदासि पात्र । चमत्कार नाही, गणितीय सूत्र । साधे, सरळ, सोपे ।। ३६१ एक येतो, एक जातो । रितेपणा भरून पावतो । सोबत्यांच्या प्रतीक्षेंत राहातो । तरी कां बा आपण ।। ३६२ एकलेपणाची वेदना । जन्म देई विविध प्रलोभनां । अपहार, आत्मघात मना । वारंवार मग खुणावतो ।। ३६३ सिध्द करा, जर खरे वाटे । की मी बोलतो खोटे । अनुभवांचे वेचीत काटे । पोहोचलो येथवरी ।। ३६४ ।। दास-वाणी ।। विवेके अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । नि:संग योगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०४/१२ सार असार किंवा नित्य अनित्य विवेक केल्यामुळे कुठल्याही वस्तु विषयी आकर्षण उरले नाही. विरक्ती मुळे व्यावहारिक गोष्टींशी फारकत घेतली. अंतर्बाह्य मोकळा झालेला हा नि:संग साधक योगी मानावा. ऐसा कैसा अतर्क्य निष्कर्ष । काढिती समर्थराम दास । नि:संग, विरक्त पळपुट्यास । म्हणती साधक योगी ?।। ३६५ शेजेवरी वर्षे इतुकी । कुठल्या 'योगे' भोगिली सखी । लुटावयास ना उरले बाकी । म्हणुनि पळे पाहा 'चोर' ।। ३६६ म्हणे हे आदर्श रामभक्त । नशीब, राम नाही सद्यकाळांत । धरुनी छाटी, कमंडलूस । असते दिले सुळावरी ।। ३६७ शोषितासि निराधार सोडे । त्या मातीवरी उभारी वाडे । त्यांच्या मनगटी सुवर्णकडे । चढवू पाहाती कां दास ।। ३६८ हे तर जाणा नारी अरि । संसारास म्हणती उघड्यावरी । न्हाणुल्या लेकी, सुना घरी । टाकुनि ! म्हणति 'व्हा साधक' ?।। ३६९ ।। दास-वाणी ।। जाणावें दुसर्याचें जीवीचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०५/३४ समोरच्या माणसाच्या मनातील विचार त्याच क्षणी तो काही न बोलता ओळखणे याला मनकवडा म्हणतात. ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याने तो फार मोठा ज्ञानी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाचे लक्षण नाही. पाहावें आपणासी आपण या नांव ज्ञान. स्वत्व तर जाणांवेचि प्रथम । तत्पश्चात इतरांचे अंतर्याम । जाणिवेशि तोलतां जाणीव । सुख-दु:खे प्रकर्षें भिडतील ।। ३७० ।। दास-वाणी ।। रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/४४ रथ किंवा कुठलेही वाहन वेगात धावत असताना दोन्ही बाजूची जमीन तितक्याच वेगाने उलट दिशेने मागेमागे सरकत आहे असा भास होतो. प्रत्यक्षात जमीन स्थिरच असते. भौतिक शास्त्रातील दृष्टांत वापरून समर्थ सांगताहेत की मायेमुळे अनेक रंग रूप आकारांत व्यक्त झालेला मुख्य देव आपल्याला दिसतो, भासतो परंतु त्याचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार असेच आहे. (सूक्ष्म आशंका निरूपण समास ज्ञानदशक. ) भूमी जर धावली उलट्या दिशेने । वेग रथाचा वाढेल दुपटीने । भौतिक सिध्दतो ऐशा लक्षणे । वैज्ञानिक सत्य ।। ३७१ कोठे सांगा दिसतो 'देव' । मूर्ती तर पाषाण संभव । 'त्या'च्या नावें उच्चरव । कोणत्या कारणे करावा ?।। ३७२ सुसंस्कृत, विकृत स्वभावता । माणसे विविध स्थळी भेटता । विशुध्द जोपासता वा नासता । कोठे असतो तुमचा 'देव' ?।। ३७३ आंता ऐका सांगणे । एकचि आहे मागणे । करोनि टाका आम्हास उणे । अध्यात्म, गति, मोक्षांतुनी ।। ३७४ आम्ही तर 'गति' प्राप्तं । जगता जगता मरणांत । मोक्ष आम्हा सदाचि परोक्ष । राहिला तर बरेचि ।। ३७५ असो थंडी, वारा, ऊन । स्वेदगंगेत आनंदे न्हाऊन । बांसगांव ठेवू बांधून । कुबट कद, सोवळी ।। ३७६ शिशिर, ग्रीष्म वा श्रावणसरी । सर्वत्र आम्हा आनंदाच्या परी । निर्ढावलेल्या कणखर शरीरी । झेलू, रिचवू, पचवू अखेरपर्यंत ।। ३७७ ।। दास-वाणी ।। तेजीं असे परि जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनी असे परी कळेना । परब्रह्म तें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०४/३२ निर्गुण निराकार असलेले परब्रह्म हे सर्व चराचराला व्यापूनही शिल्लकच असते. तो ईश्वर अग्नीमधेही असतोच पण इंधनासारखा जळून संपत नाही. वायूमधेही अस्तित्वात असतो पण वावटळीबरोबर हलत नाही. तेच परब्रह्म आकाशात असते तरी जनसामान्यांना ते दिसत नाही. सिद्धपुरूषांना मात्र ते विमलब्रह्म ठायीठायी अनुभवास येते. काय पडले आकाशांतुनी ? 'सिध्द' ? हे तर अध्यात्माचे वाणी । आद्य निसर्गाची लेणी । संबोधिती 'परब्रह्म' ?।। ३७८ नसते ज़र एक पेशीय जीव । 'अध्यात्म' ठोकण्या उत्क्रांत मानव । जाहले असते संभव ?। सांगा बरे ।। ३७९ आतां तरी या भानावर । पंचमहाभूतांचा आविष्कार । क्षणोंक्षणि देतीं साक्षात्कार । वंदनीय खरे तेची ।। ३८० हडपोनि संचित, करोनि निर्धन । वृध्द माय-तांत हताश पराधीन । देतां,दयानिधींच्या भरवशां सोडून । ऐसे करंटे वर्णांने कैसे ।। ३८१ मजपाशी नाही लौकिक, धन । 'शब्द' केवळ उपजीविके साधन । त्या आधारे मन तवाव, प्रसन्न । ठेवू पाहातो ।। ३८२ जर कांही अधिक उणे । लिहिले गेले उद्वेगाने । त्यासाठी 'क्षमस्व' म्हणणे । आवश्यक अखेरीस ।। ३८३ नाही अधिक्षेप करणे, अंतरी । बल वापरुन कर्म घरी-दारी । नाही केले ! विश्वास धरी । मायबापा ! अन्यायगर्भी संताप ।। ३८४ सोड सोड ना माझ्या अक्षरबाळा । धड धड वाजतो पडघम आगळा । वेड-सूड, मूळ विकृतविकार ज्वाळा । बघ मजला बाहती ।। ३८५ मी संतापी, करंटा भोगलोलूप । मज सगळे पुण्य नि पाप । सारखेचि ! अनुष्ठान-जप-तप । नावडलेच निरंतर ।। ३८६ ।। दास-वाणी ।। उंचनीच नाही परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरूष अथवा नारी । येकचि पद ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२४ त्या मुख्य देवापाशी कुठलाही भेदभाव नाही. मग तो राजा असो वा भिकारी, स्त्री असो वा पुरूष सर्वजण एकाच समान पातळीवर येतात. प्रत्येकाला साधनेअंती येणारा आत्मानुभव सारखाच उत्कट असतो . मी लिहितो तो उपदेश ?। मलाच येउ लागला त्याचा वास । काय म्हणुनि 'सद्भावी' 'संतास' । 'पोकळ' मग म्या म्हणावे ।। ३८७ तरि निक्षून सागतो बाप्पा । ढोंगीपणा, भाकड, थापा । टाळा ! दावा निखळ रूपा । जैसे निसर्गे घडविले ।। ३८८ जीवजंतू वा उत्क्रांत मानव । स्थल काल भिन्न तरि एकच भाव। निसर्ग मर्यादेंत शोधणे ठाव । जगण्या !जोवर ना मरण ।। ३८९ जनकल्याण संतांचा श्वास । शब्द माझे, तर उत्सर्जित नि:श्वास । कदाचित बोधाचे भास । होइल ! परि फसूं नका !।। ३९० जर समान नर नारी । त्यजुनि संसार भोगोत्तरी । शोधाया मोक्ष-गति, द-या खोरी । सांगिती केवळ नरास कां ?।। ३९१ निसर्गे जखडिले नारीस । उच्चाटुनि 'मातृपदास' । श्वशुरगृही भोगत राहाते त्रास । परागंदा पती जरी ।। ३९२ ओवींत गुंफिता शब्दक्रमणा । नकळे कोठेनि मिळाली प्रेरणा । दासांच्या मार्गप्रदीप्तीविणा । बहुधा नसते झाले संभव ।। ३९३ आसने मर्यादित जरी । मात्र कामना अंतरी धरी । स्वप्नाळू बुभुक्षित चर्येवरी । भाव कांही मिटेना ।। ३९४ सर्व मण्यांची माळ एक । कुणि पोवळ्, पाचू वा मौत्तिक । सूत्रांतुनि ओघळणे स्वाभाविक । त्यांसा कैसे उमगेना ?।। ३९५ अंत येता नाही परतणे । प्रत्येक जीव अंतरि हे जाणे । 'वेळ' आली तरी झगडणे । आप्तां सांगे 'सोडू नका' ।। ३९६ सहज निवृत्ती कठिण फार । उसने अवसान करी जोर । 'बलवंत' आहे शरीर, अंतर । कथित राही परिवारा ।। ३९७ सनई, चौघडे, ढोल, ताशे । मर्तिक, विवाह वा बारसे । धनिकांघरी 'सोहळे' असे । होती ! सेवकां पर्वणी ।। ३९८ मी आरडतो कोणत्या काजे ?। कष्टकल्लोळांची वेदना गाजे । महानगरांत आयुष्य माझे । व्यतीत झाले ! म्हणोनी ?।। ३९९ शतके चार, अखंड प्रवास । मजसाठी कैसा महत्प्रयास । प्रेमभरे कवटाळा पामरास । उरी धरोनि, निरोप द्या ।। ४००

No comments:

Post a Comment