Saturday, February 21, 2015

।।भासबोध।। ३७६ ते ८४० (४४०)

कोण 'संत' म्हणोनि अवतारिला ?। अनुभवाने सुविचारी वचने बोलु लागला । हांसत सत्कर्म करोनि कृतार्थ झाला । 'हा संत' म्हणति सामान्य जन ।। ३७७ त्याला कुठे, कधी कां भेटला 'देव' ?। वाढला, जगला कटु-गोड घेत अनुभव । निगळुनि ! तरि अमृत शब्द-स्वर-भाव । बोलला, वागला तो 'संत' ।। ३७८ सकारात्मक, रचनात्मक देइ विचार । विशुध्द समृध्दीचे निर्देशितो द्वार । लावितो विवेके जगण्या सारासार । मार्गप्रदीप 'संत' जाणा ।। ३७९ उक्ती-कृतींत समाधानि घरी संसारी । झोळी घेउनि न ठाकितो परक्या द्वारी । पालकत्व आप्तांचे स्वीकारी । रयतेला नकळत उध्दरी, 'संत' ।। ३८० मनस्वी, सहृदय सेवाभावधारी । वेदना पाहून होतो व्यथित उरी । उपकारक कृतींस कार्यप्रवण करी । स्वत: ! तो 'संत' ।। ३८१ वेदनामुक्त ज्यांस त्याने केले । ओठावरी त्यांच्या स्मित पेरिले । उपजत मायेने उराशी धरिले । ते 'बाबा' म्हणती स्वयंस्फूरतीने ।। ३८२ मूलस्रोत माया, ममता, वात्सल्य प्रीतीचे । उर्जाबल 'कर्म'कारी, मधुराभक्तिचे। अ'धर्म'गर्भी धर्मकांड निराकरणाचे । कृतिपाठ देई तो 'संत' ।। ३८३ सत्कर्मांसाठी जन जागविती । सगुणांची बीजे रोविती । सेवाभावाची वाढविती रती । संसारी राहुनि दक्ष 'संत ' ।। ३८४ जो आहे तेच दर्शवा । मुखवट्याआड कांही न लपवा । आढ्यता, ढेंगास बळी न जावा । शिकवण देती कृतींतुनं ।। ३८५ श्राध्द, पक्षांचे अवडंबर । कशास ? येते ना सईंची सर। मुलळधार वा थेंब अलवार । सुखविण्या, दुखविण्या ।। ३८६ ।। दास-वाणी ।। कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०३ प्रयत्नांचे सातत्य म्हणजे कष्ट. या जगात फुकट प्राप्त झालीय अशी एकही गोष्ट नाही. फळ ही कष्टाची देणगी आहे. राज्य सत्ता तर सामुहिक प्रदीर्घ कष्टांचे फळ आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे. ही साध्याची गुरूकिल्ली आहे. सातत्याने जो करितो कष्ट । त्यास यश मिळतेचि निश्चित । माळ घेवोनि जपजाप्य करित । जर नाही बसला !।। ३८७ बसल्या जागी मिळतो घास । तान्हे,बालक,वृध्द,अपंगांस । म्हणावे लागते 'आ वास' । तरिही भरवितांना ।। ३८८ ।। दास-वाणी ।। येकदा मेल्याने सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वाचविना । तो आत्महत्यारा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०९ शिल्लक राहिलेल्या इच्छा (वासना) भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे एकदा मरून जीवाची सुटका होत नाही. पुन्हा जन्म घेतला की गर्भवासापासून,बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळया यातना भोगाव्याच लागतात.अशा जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तीसाठी साधना करून जो स्वत:ला वाचवत नाही तो आत्मघातकीच मानावा. गर्भस्थित अंडकोषी बीज फळले । बाल-युवा-पोक्तासि, वार्धक्य आले । जो जन्मला त्यासि न टळले । मरणही ।। ३८९ सुख-दु:ख भोग जगतांना सारे । इथेच मांडायचे पसारे । श्वास थांबता कांहीच न उरे । पार्थिव होई रक्षारूप ।। ३९० जनन मरण एकवार । तमगर्भच त्या आधी, नंतर । पुनर्जन्मादि भाकड वारंवार । जरि रुजवू पाहाती 'ते' ।। ३९१ साधना करणे सवयीचे । सामान्यासि वर्म त्याचे । उपजतचि अंगी असायाचे । साध्यहेतु कष्टकर्म ।। ३९२ आनंद भोगता ना वरचेवर ?। मग यातनांचे ओझ कां मनावर ?। जगण्याच्या या 'तऱ्हे'वर । नको कदापि नाराजी ।। ३९३ वासना, विकृती देहधारी । सत्कर्म-हंस मानस सरोवरी । परंतु मरणोत्तर सर्वोपरी । पावते लोप ।। ३९४ म्हणोनि धावती, करिती घाई । समोर दिसते नसलेपणाची खाई । सौख्यभोग मिळणे नाही । अंधार दाटता चहूकडे ।। ३९५ घडण्या घडविण्याची हीच वेळ । सर्वथा चहुकडे वैचारिक गोंधळ । पिसाळलं कुत्र खातय, दळतय आंधळं । सांभाळा मित्रहो ।। ३९६ शिक्षण जागवते सामाजिक जाण। नीर-क्षीर विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन । तेचि सत्य केवळ, बाकी विश्वासहीन । हृदयी धरा हा बोध ।। ३९७ चाळितो अक्षरे शब्द कल्पना बोली । वाटते,'कोठुनी झेप अशी घेतली ' । ना लायक व्यक्ती लेखणि तरि मी धरिली । कोण्या कारणे ? अचंबा !।। ३९८ 'इति' संगे घुमते, 'इदं न मन', ची गाज। हे माझे नाही आशयांतले ओज । कोठून येउनी, रुजले, फुलले बीज । विरलेली ऊर्जा संपृक्तली ।। ३९९ या अष्टशतकी अनुभवसिध्द ओव्या । वाचकांसी विचारप्रवर्तक व्हाव्या । प्रत्येकाने लिहावयास हव्या । पिढ्यांसाठी पुढच्या ।। ८०० हे तरंग, झटके, शब्दांची 'आकडी' । आशयाचि झाली कधी न वाट वाकडी । मज पडली होती जगण्यामध्ये कोडी। कावडींत मृगजळ वोसंडते ।। ८०१ लौकिकार्थी पापी अन् बहुव्यसनी । पाहता वेदना पण कणव दाटते मनी । हा असला सरडा फिरतो रक्तामधुनी । मुखवटे हे निसर्गदत्त ।। ८०२ नशेचा माझ्या होतो त्रास । 'आम्ही सारे साहावे कशास ?'। पाहांतांत मूकपणे एकमेकांस । भेदरूनि गृहवासी ।। ८०३ ।। दास-वाणी ।। करंटयाचे करंट लक्षण । समजोन जाती विचक्षण । भल्यांचे उत्तम लक्षण । करंटयास कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/१७ नशीबात असून भोगण्याची, योग्य विनिमयाची जाण नाही तो करंटा. अशा मूर्खांची आततायी वागणूक शाहाण्या बुद्धिवान लोकाना चटकन समजते. परंतु उत्तमपुरूषांचे मोठेपण मात्र करंटयांच्या लक्षात येण्याची शक्यताच नाही. गुणग्राहकतेचा अभाव म्हणजे करंटा. कुणी पारधी शोधित असता अन्न । मृगमुद्रा समजुनी सोडिला बाण । तळव्यास लागोनि युगंधर कृष्ण । गतप्राण झाला ।। ८०४ कोणि वागणुकींत बिभत्स करंटा । विद्वत्ता-लेखन-वक्तृत्वी अचाट मोठा । संसारी जगतांना वेदनांचा वाटा । कोणि कसा जाणावा ।। ८०५ ऐसे बहुत अनुभविल् कवि-लेखक । बोलण्या-वागण्यांत भिन्नता अनेक । कलाविष्कार भोगतांना श्रोता-प्रेक्षक । मनोमनी म्हणे, 'अत्युत्तम !'।। ८०६ हटयोगी साधू धारिती रक्षा । जळस्पर्शाची अत्यल्प अपेक्षा । तरि 'गतिज्ञान' प्राप्तण्या मोक्षा । देता, जनसामान्य घेतीच ना ?।। ८०७ कुबट कद-सोवळी माजघरांत । ना पसरति त्यांना प्रखर रविकिरणांत । वर्षानुवर्षे तैसीच धारित । कवटाळिती पवित्र 'वेदांग' ।। ८०८ मुद्राप्राप्त्यार्थ सर्व क्षम्य । अखेरिस उदरभरण हेचि गम्य । स्वच्छता, घृणेंत नसता साम्य । पंक्तींत एका बैसती ।। ८०९ ऐशाना कोणता अंकुश । भुकेला अक्षम घालण्या पाश । यजमानाच्या भावनेचा सर्वनाश । जाहला जरी ।। ८१० प्रतिमा अभेद्य मनांत । संस्कार, शिकवण धनन्यांतुन भिनवितं । चालली,चाललो, चालेन वाट । चालेल श्वास जोवरी ।। ८११ नाकांत शेंबूड मेकडे । त्यांतूनि डोकावती उंट, घोडे । मुद्रेवर भाव वेडेवाकुडे । वाणींत प्रगल्भता, असामान्य ।। ८१२ तर्क-बुध्दीचा मगजांत पसारा । प्रतिभेचा स्रोत तेथेच खरा । घेणे नसते कांही शरीरा । तरी स्वास्थ्य राखणे हितकर ।। ८१३ ओंगळ आणि अष्टवक्र । कुबड मोठे पाठीवर । परंतु प्रगल्भ विचार । विचरती भक्तांसाठी ।। ८१४ कोणी अखंड घामेजला । ऊष्णता, पित्तदोषांनी व्याधलेला । पीतदंत, मुखरस गाळित बसला । तरि तर्कशुध्दता अबाधित ।। ८१५ आजूबाजूस आप्तांचा मेळा । तरचं मिळतो मनाय विरंगुळा । विशेषत: मावळतीच्या वेळा । करितो एकांडेपणा खिन्न ।। ८१६ संध्येचा येथे तेजोविलय । अन्यठिकाणी भास्कर उदय । दोन्ही घडते एकचि वेळ । परिणाम अस्तोदयस्थळी ।। ८१७ निरांजनास मिळते तूप । दरवळतो आसमंती धूप । कराग्री लक्ष्मीचे रूप । तिकडे मावळती पलिकडे ।। ८१८ पार्थीवास मिळते तिरडी । नवजात करते रडारडी । दु:खानंदाश्रूंच्या लडी । एकाच विश्वांत ।। ८१९ कोठे मोटे वर ललकारी । पर्जन्या अभावी कोठे हाल भारी । म्हणुनि कां त्यागून संसारी । जाती जनलोकं ? ।। ८२० भिववति जरि संध्याछाया । मावळतीली सुवर्णमाया । आश्वासक उद्याचा पाया । रंगत मिसळती तमगर्भी ।। ८२१ भय कधीच संपत नाही । जगण्याची धरून बाही । क़ायम, सर्वदा ठाईठाई । 'पळ' म्हणते, 'थांबू नको ।। ८२२ अंगणांत एखादा तरी जीव । असावा ! मूकप्राणी मैत्रीवैभव । श्वान अथवा जित्राप गोठ्याचा ठाव । घेता, डोळ्यांत दिसे कृतज्ञता ।। ८२३ कष्टकऱ्यांसि निद्रोत्तरी जाग । पुनर्जन्माचाचि सद्यकालीन भाग । चिंतांची चितागर्भांतली आग । शेजसरणावर त्यास जाळितसे ।। ८२४ आनंद मनसोक्त लुटता ना ? तशाच कधीतरी भेटती यातना । नाण्याचा दोन बाजूंना । मुद्रा एकचि असते कां ?।। ८२५ मुद्रांही खेळते खेळ फसवा । प्रदर्शनात गनिमी कावा । अंतरांतल्या खरा भावा । दर्शविते कां ?।। ८२६ अथांग, अगम्य अनेकविध कृती । आव्हाना स्वीकारिते संशोधक वृत्ती । उलगडून कार्यकारण, उत्तरे मांडिती । जनकल्याणार्थ ।। ८२७ सुरकुतल्या, सावरीच्या तळव्यांत । आजी पणजी कुरवाळिते हांत । श्रावणसरी बरसतांत अंतरात । थकव्याची जागा घेई तकवा ।। ८२८ 'आलास बाळा ?' शब्द दोन ? । थरथरत्या काळजीची जाण । दिसभर काळजांत राखून । ठेवलेली, मुकपणे ।। ८२९ ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणे नव्हे साधन । दुश्चीतपणे न घडे भजन । दुश्चीतपणे नव्हें ज्ञान । साधकासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/२२ एकाग्रता हा चित्ताचा गुण. दुश्चीत म्हणजे मन विचलित होणे. साधनेला बसला पण मनाने भरकटला. परमेश्वराचे भजन सुरू केले पण मनात भलतेच भजन सुरू. अशा साधकाला आत्मज्ञान होण्याची शक्यता सुध्दा नाही. ज्ञानदशक, दुश्चीतनिरुपण समास. एकाग्रता कल्पनेचा चाप । कल्पना देई अरूपासि रूप । साधनोत्तरी कल्पितास धूप-दीप । दावावा, 'भातुकलीं'तला ।। ८३० ज्याने कल्पिले त्यत्तीस कोटी देव । म्हणे कपिलागर्भी घेतला ठाव । देवोनि प्रत्येकी एकेक नाव । भयकंपित केले भाबडे ।। ८३१ कल्पनेतचि राहुद्या देव । सगुणरूप साकारणे असंभव । शोधितो, त्यासि, 'थांबव' । सांगा, 'वृथा वेळ दवडू नको ।। ८३२ चित्र, आकारांचे सजीवन । नाही भरू शकत त्यांत प्राण । म्हणोनि करिती प्रतिष्ठापन । पुरोहित, घालण्या समजूत ।। ८३३ उपचार कां हा भीतीवरी ?। कां नसावा विश्वास कर्मावरी ?। यशाचे सुवर्ण झळाळता मुद्रेवरी । 'हा तर देव' म्हणतील ।। ८३४ निसर्गरम्य शांतिस्थळे । दृष्टिक्षेपांत निर्मळजळे । अन् त्यांत विविधरंगी कमळे । बहुअसती ।। ८३५ परंतू यासाठी लागती मुद्रा । मी निष्कांचन, दळभद्रा । करण्या श्वासावर लक्ष केंद्रा । संधी कैची ?।। ८३६ ।। दास-वाणी ।। न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२२ सूर्यदेव दिसेनासे झाल्यावर अवघ्या पृथ्वीतलावर अंधार दाटलेला राहातो, त्याचप्रमाणे ज्या क्षणी वाचन, चिंतन, मनन, निदिध्यासन थांबते त्याच क्षणी ज्ञानाची अवस्था नष्ट होऊन अज्ञानाचा अंधक्कार साधकाच्या जीवनात भरून येतो, टिकून राहातो. श्रवण सतत केले पाहिजे हा संदेश समर्थ श्रवणनिरूपण समासात देतात. जर लयास भास्कर गेला । ना परतुन उदयास कधिही आला । जीवमात्रांचे कळिकाळा । निमंत्रण स्वाभाविक ।। ८३७ मग विसरा योग-भोग । अंत्योदयास समजा जाग । संजीवन समाधीचा अवघे जग । घेईल अनुभव आपोआप ।। ८३८ ज्ञान-कर्मेंद्रिये, श्वसनक्रिया । जाण, विचार, तर्क-बुध्दी विलया । जातील ! अगम्य अवकाश माया । राहील ? कोण जाणे !।। ८३९ सर्वसामान्य वाचन, चिंतन, श्रवण । जपजाप्य, उपासना, धारणे ध्यानं । शब्द फोल, अस्तित्व अर्थहीन । होतील अनायसा ।। ८४०

No comments:

Post a Comment