Friday, February 6, 2015

।।भक्तिबोध।। ३४६ ते ३७५

।। दास-वाणी ।। मुक्त क्रिया प्रतिपादी । सगुण भक्ती उछेदी । स्वधर्म आणी साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/०४ पारंपारिक शास्त्र, धर्म, परंपरा, रितीरिवाज यांना पूर्ण फाटा देऊन स्वैर वागणुकीचे स्वत:चेच नियम निर्माण करून नवीन पंथ तयार करणे. सगुण भक्तीचे उच्चाटन व्हावे असा प्रयत्न. स्वधर्म म्हणजे नेमून घेतलेले स्वकर्म निष्ठेने करत असलेल्या साधकांची टवाळी करणारा. ही तीनही लक्षणे पढतमूर्खाची आहेत. तो शाहाणा असला तरी मूर्खच मानावा. (उदा. - केजरीवाल) बहुधा विश्व सारे मूर्खांनी भरलेले ।महंत, साधूंच्या भाकडांनी भारलेले । सारे जपज्याप्य, उपासनेने तारलेले । स्वप्न त्यांचे म्हणावे कां ?।। ३४६ नियम-जननी सांसारिक गरजा । धर्मावडंबरांचा वाजला जरि बाजा । कर्मकांड परजून, 'प्रायश्चित्त' गर्जा । अविचल राहातील कर्मकारी ।। ३४७ सगुण म्हणजे चित्र, मूर्ती ?। त्यापुढे जे उगा ठाकती । परिणाम 'शून्य' असोनि माहिती । जाणा निरुद्योगी शतमूर्ख ।। ३४८ ताऱ्यांची उत्पत्ती, स्थीती, विलय । ग्रहगोलांचे त्यां भवती परिवलय । गणितज्ज्ञ ज्ञानियांचे ध्येय । वर्तविणे, मांडणे अचुक ।। ३४९ गणितशास्त्राची सर्वत्र व्याप्ती । शून्यापासोनि गणन अगणिती । विविधाकृतींत भूमिती । अनुभवा येते ठाइठाई ।। ३५० पारंपरिक ठरते कालबाह्य । नाविन्यांत घेते स्वारस्य । आधुनिक होती उपास्य । कालानुरूप ।। ३५१ मंदिरे तत्कालीन संस्कृतीकेंद्रे मोठी । सणावारी रीतीनुसार आप्तभेंटी । शास्रांनी स्वीकारिल्या विविध कोटी । साधण्या सुवर्णमध्य ।। ३५२ टाका फेडुन कुबट सोवळे । खुंट्यां, कोनाडे करा मोकळे । निरर्थ कर्मकांडांचे तोडुनी जाळे । मुक्त करा आसमंत ।। ३५३ ।। दास-वाणी ।। धनधान्यांचे संचित । मन होये द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/१३ धनधान्याने आपली कोठारे तुडुंब भरलेली असावीत. मनामधे सतत पै आणि पै जोडण्याची अनावर इच्छा. अमाप संपत्ती जोडून सुद्धा राहाणीमान अत्यंत कंजूष आणि दरिद्री. येथील येथे अवघेचि राहाते हे न समजल्याने उपभोग न घेताही फक्त साठवत राहातो तो रजोगुणी. संचय करणे उपकारकचि । संसारांत गरज असतेचि त्याची । मुंग्यासुध्दा करिती कणाकणाची । वर्षाऋतूसाठी साठवण ।। ३५४ ज्याला वाटे विरक्त व्हावे । त्याने जन्मासचि न यावे । जगल्यांचे घास वाढवावे । स्वप्नी सांगोनि मायबापा ।। ३५५ महाररूपे गरिबांसाठी । रिकामी करविली धान्यकोठी । केवळ 'रजोगुणा' पोटी । केले सत्कृत्य ?।। ३५६ कोठारे भरली शिगोशिग । लुटावयास गरजू भुकेल्यांची रांग । लोकोपयोगी उदरभरण योग । साधणे.. काय पाप ?।। ३५७ घरधन्यास राहावेच लागते साधेपणी । अन्यथा ओंजळिची होते चाळणी । राखणे आप्तांसाठी अन्न-पाणी । होउन बसते अवघड ।। ३५८ अखेरीस संपदा न येते कामा । जेंव्हा जायची वेळ निजधामा । सुकृते दुष्कृत्ये केलेली 'जमा' । न बांधती तिरडीवरी ।। ३५९ मग 'पिंडा' वरली शिते । टोचावी लागतांत होवुन भुते । विसरतांत सर्वजण नाते । घरोघरी पोचता ।। ३६० कधि झुंझुरका विभोर आनंद । कधि जागवते वेदनांची साद । हा परस्पर, विसंवादी विरोध । आमुचे जगणे ।। ३६१ घरोघरी चुली मातीच्या । विविध भाषा प्रांत जातीच्या । तेढ, तंटे सरपण मुखि तिच्या । सज्जन माणसे घालिती ।। ३६२ त्यावर शिंजते रोज अन्न । पदार्थ, आवड, निवड भिन्न । तरी क्षुधाशांती, तृषा शमन । एकची हेतू ।। ३६३ कष्टसाध्य भाकरतुकडा । नाहि लागत सुखान् तोंडा । त्यांतही वाटा थोडा । मागतात देणारे ।।३६४ असते म्हणे ही रीत । कष्ट करण्या नाही देत । मन होते मग दिवाभीत । स्वीकारते 'व्ववस्था' मूकपणे ।। ३६५ व्यवस्थे विरुध्द ठाकणे । सामान्यासि कैसे जमणे ?। मरत जिणे जगत राहाणे । लाचार, लज्जास्पद ।। ३६६ सुंदर ध्यान समचरण 'इटु' बरवा । मुखदर्शना मधे 'दलाल' आडवा । धरुन टाळके चरणी बडवा । देण्या कपाळ'मोक्ष' ।। ३६७ भ्रष्टासि पाठविती घरी । सत्तेवर निर्वाचित पदाधिकारी । त्यासि पृच्छा जो करी । धनि पश्चात्तापाचा ।। ३६८ काळे,बरबटलेले कोठारी । गरिबांच्या घरट्यावर कुठारी । ऐशांची माजली बजबजपुरी । ताळ कुणास तंत्र ना ।। ३६९ जुने गेले, नवे आले । 'शपथे' करिता कोट्यवधी खर्चिले । ज्याच्या ओंजळींतुनि लुटले । मिळाले काय त्यांस ?।। ३७० मरणहि मागते 'चिरिमिरी' । पै पै राखिली संसारी । म्हणे, 'एखादी हवीच व्याधी तरी' । अन्यथा आम्ही यावे कसे ।। ३७१ निगुतिने केल्या संसारी । अडिअडचणिसाठी अस्तुरी । उरलासुरला पै पैसा भरी । घडवंचीवरि गाडग्यांत ।। ३७२ उपभोग जगतांना त्याचाही । 'मरण' घेउ देत नाही । औषधींसाठी खर्चिले सर्व कांही । तरिही काढावे लागते ऋण ।। ३७३ मंदिरी कांडी धुराची सुगंधी । सभोवताली कर्दम, असह्य दुर्गंधी । झोडिती मेजवानी उंदिर-घुशी-वराहादि । अवस्था प्रार्थनास्थळांची ऐसी ।। ३७४ राजवाडे कस्तुरि-वाळादि द्रव्ययुक्त । 'लाडक्या' रयतेमाथी आभाळ मुक्त । भोजनांत पक्वान्न, कदान्न विभिन्न बेत । ऐसी 'समानता' प्रदेशी ।। ३७५

No comments:

Post a Comment