Tuesday, September 6, 2011

अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव... ’अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’


अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...
तुझ्या पूजनांत । आनंद सोहळा । भाव मनी भोळा । वसे सदा ॥
दहाच दीसांत । लावलासी लळा । गौरीच्या वेल्हाळा । विघ्नहरा ॥
जातांना माघारी । वळून रे पाही । भिजू पाहे बाही । आसवांनी ॥
हातावरी तुझ्या । दह्याची कवडी । देताना भाबडी । भांबावती ॥
ओसरता कल्लोळ । उरे मागे गाज । अस्तित्वाचा षड्ज । रेंगाळतो ॥
शुभसूचक उक्ती । बाहूंमधे शक्ती । हृदयांतरि भक्ती । सर्वदा दे बा ॥
’कृतीविणा नाही । भक्तीला बा अर्थ’। शिकवण सार्थ । देई सर्वां ॥
विरह-अष्टक । स्वीकारा गणेशा । करा दशदिशा । निरामय ॥’

अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’
देखिला ना कधी म्यां देव । परि अनुभवला भक्तिभाव ।
दुर्दम्य निश्चय असंभव ।  सहस्रावधि ललनांचा ॥
निश्चयाच्या महामेरू । सकल कुटुंबाच्या आधारू ।
हृदयी वत्सल शरीरी चारु । माता, भगिनी गौरी या ॥
गणेशा आधी उच्चार, गौरी । सर्वज्ञात चराचरी ।
नरास भारी पडते नारी । यशस्विते ! अनुभवा... ॥
गणपति-अथर्वशीर्ष पठणाचा घोष करीत रात्रभर चालत पहाटेपहाटे ’श्रीं’च्या चरणी सेवेसाठी, मंदिरांत ’समूर्त, सगुण’रूपा समोर रुजू होण्याचे, आदल्या दिवशीचे मनसुबे,, श्रावण सरतासरता त्याच्या विरहांत, कोसळणार्‍या, भादव्यातल्या धुंवाधारांनी, अक्षरश: ’वाहून’ गेल्यावर सुद्धा , स्त्री-सुलभ हिरमुसलेपणा त्यजून, जवळ जवळ बारासहस्र पुण्यपत्तनस्थ ’गौरी’ सकाळी प्रार्थनास्थळी पोहोच्ल्या ! त्यांनी ’एकसमयावच्छेदेकरून’ अथर्वशीर्षाचा पठण-घोष संपन्न केला. बालिकांपासून, वृद्धांपर्यंत, सर्व जाति-पंथांच्या पलीक्डे जावून, हा उपक्रम निर्विघ्नपणे. निर्वेध पार पडला.
घोषाची महती आणि कीर्ती किती ? पूर्वी युद्धांत, योद्ध्यांना स्फुरण देण्यासाठा, घोष पथक ज्यांत शंख, तुतारी, शिंगे यासारखी उच्च-ध्वनिकंपनसंख्या असलेली फुंकवाद्य तर खर्ज-गंभीर नादाची पण दूरवर ऐकू येणार्‍या नगारे, पडघम, ढोल, ताशे अशा चर्मवाद्यांचा समावेश असायचा आजसुद्धा आप्ल्या सैन्यदलांची घोषपथक ख्यातकीर्त आहेत.. इतकच काय तर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी, होलिवुड‌ निर्मिती, ’अ क्लोज्‌ एन्‌काउंटर्‌ ऑफ्‌ दी थर्ड काइंड्‌’ या इंग्रजी चित्रपटांत सुद्धा, परग्रहावरील ’जीवां’ना आवाहन करण्यासाठी, जगांतल्या विविध देशांत धर्मगुरू, साधू, सामान्यजन ’घोष’च करतांना दाखविले आहेत. कसला घोष माहीत आहे ? अवकाशाचा, स्वयंभू अनाहत अनुनाद ॐकाराचा..’द लॉंगेस्ट्‌ डे, चित्रपट सुरू होतांना ऐकू येतात, नगार्‍यावर वाजवलेले तीन र्‍ह्स्व आणि एक दीर्घ आवाज, म्हणजे ’थ्री लॉंग्‌ अन्द वन्‌ शॉर्ट्‌’...मोर्स्‌कोड्‌ मधे ’व्ही’ अक्षरासाठी पर्याय, अर्थात ’व्हिक्टरी’साठी, मित्रराष्ट्रांच्या फौजांनी केलेलं ’नॉर्‌मंडी बीच्‌ इन्व्हेजन्‌’, ’व्ही’ फॉर्‌ व्हिक्टरी ! संधी मिळाली तर चित्रपट जरूर बघा हे चित्रपट !
सर्वसामान्यांची तळमळ, त्यांच्या व्यथा व्यक्त करण्याच्या पद्धतीततला हा सकारात्मक बदल, जाळपोळ, दंगली, हिंसाचारापासून दूर नेणारा, खरोखरच कौतुकास्पद ! इप्सित साध्यासाठी साधन, हे अहिंसात्मक असूं शकतं हे या महिलांना कुठल्या प्रशिक्षणवर्गांत जावून शिकावं लागलं नाही कधी ! अर्थात ऐहिक सुविधांमधे वृद्धी असल्या उपक्रमांमुळ होईल किवा नाही याची माझ्या, ’अंधश्रद्धाविरोधी’ मनाला खात्री नाही...अहं, होणार नाहीच, याची नि:शंकपणे मी ग्वाही देतो ! पण या सर्व माउलींनी गणपतिअथर्वशीर्षाच्या, अगदी फलश्रुतीसह, केलेल्या या पारायणामुळं, त्यांच्या पाल्यांचे श्ब्दोच्चार सु्धारण, शब्दसंपदा वृद्धिंगत होणं..उदाहरणार्थ:
कर्ता, धर्ता, हर्ता, वक्ता, दाता, धाता ही विशेषण...अवपश्चात्तात म्हणजे पश्चिम पासून पूर्व, उत्तर, दक्षिण, उर्ध्व आणि अधर...वरची आणि खालची दिशा... यासह दशदिशा वगैरे अनेक शब्द...
कुठल्याही निश्चयाबाबत, दृढ ’श्रद्धे’बाबत, पाठांतराबाबत...ज्याची आजकाल वानवा आहे... बालकांची विद्यार्थ्यांची, आस्था जागृत झाली तरी निर्गुण निराकार वगैरे ’बाप्पा’ पावले म्हणायला हरकत नाही... अर्थात ’मराठी’चागलं येत म्हणून अर्थार्जनांत वृद्धी होण्याच भाग्य, ’मर्‍हाठी’ तरुणांना कधी लाभणारं आणि लाभणार का ? हा प्रष्ण सुटणार कधी...असो...
गेले दहा दिवस, समाजमनांत ’उत्सव-सौदामिनि-संचार’ करणारी ही ऊर्जामूर्ती, आज तिच्या ’मूलस्थानी’ जळांत, पृथेंत एकरूप होत मिसळून जाणार...
म्हणून हा अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...




No comments:

Post a Comment