Friday, August 26, 2011

’लता’, सचिन’, ’अवयवदान’, ’अतर्क्य-था’


’लता’
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
हे सगळं व्यक्त व्हायला मला कांही कुठल्या वाहिनीवरच्या कार्यक्रमाची गरज नाही !
****
’सचिन’
आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी ।
क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी  ?
ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा ।
पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥
त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र ।
’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥
***
’समीक्षा’
जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान ।
आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥
जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ ।
ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥
आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक ।
कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥
चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व ।
त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥
परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र ।
तोचि झिरपतो हृदयापर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ॥
****
’अवयवदान’
डॉ. लहान्यांनी, देशांतल्या दृष्टीहीनांची,  डोळ्यांची गरज आणि उपलब्ध दाते, यांच गणित कसं व्यस्त आहे, हे सांगितलं...पण ’डोळ्यांपेक्षा .’दृष्टी’ची गरज...डोळसांपैकी ९९% जनतेला विशेषत: राजकारणी, नेते, तथाकथित पुढार्‍यांना..कशी आहे हे सर्वज्ञात आहे. नाहीतर, माझी एक अम्ध मैत्रींण म्हणते त्या प्रमाणे,
          जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ?
          वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी
          जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’,
          दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी...
          भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही
          डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही...
                              अश्रूंनी भिजेल बाही
****
’अतर्क्य-था’
विंदाच्या कवितेतल्या सारखं
परत परत तेच तेच , मालिकांमधले डाव..पेच
याला मार, त्याला ठेच, ’कथा’ (?), (मालिका लांबविण्यासाठी) चहूबाजूंनी खेच...
गरीब गाय काशी ,तिची अचानक झाली ’झांशी’ (म्हणजे ’झांसा’ देणारी)
टीआर्‌पी साठी बाबा, तुझी दिसतिया कासाविशी...
****

 



No comments:

Post a Comment