Thursday, March 28, 2013

जगण्याचा ’३१ मार्च’

जगण्याचा ’३१ मार्च’ परवा, माझा शाळेंतला वर्गमित्र भेटला. शाळेंत असतांना खूपच हुशार होता तो. इतका की त्याला एखाद्या विषयांत मिळालेल्या गुणांपेक्षा मला सर्व विषयांत मिळालेल्या गुणांची बेरीज सुद्धा कमी असायची. अर्थातचं तो वार्षिक परीक्षेंत पहिला तर आम्ही कांही दयार्द्रहृदयी गुरुजनांच्या कृपेने, वरच्या वर्गांत ढकलले गेलेले... असो.. तर त्याला म्हटलं ’बर्‍याच दिवसांनी भेटतोय्‌ आपण.. आज संध्याकाळी ये ना घरी ! जरा बसू...गप्पा मारत..’ (आजकाल हे स्पष्ट करायला लागतं नाही तर लोक कांहीबाही अर्थ काढीत बसतांत उगा !) तर म्हणला, ’नको बाबा मार्च अखेर आहे. सगळे हिशेब चुकते करून ताळेबंद करायचाय्‌. एका पैशाची तफावत झाली तर सरकारी हिशेब तपासनीस जीव खातांत..’ ’ठीकै बाबा.’ म्हणून निरोप घेतला आणि बोरकर..’बाकीबाबां’च्या दोन कविता आठवल्या,पहिली विझवून दीप सारे, मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया आणि दुसरी आतां माझ्या व्यथाकथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषण, ना ये मलाच सांगता मनांत आलं ! जगण्याच्या अखेरच्या दिवशी, सगळ्यांनाचं ताळेबंद द्यायचा असतो आपापल्या कर्मांचा, पाप-पुण्याचा... नाइतरी, कविवर्य रॉय किणीकरांनी त्यांच्या रुबायांमधे म्हटल्या प्रमाणे इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती तेंव्हा, आपण इतिहास घडविला की तुडविला ? त्याची नोंद झाली किंवा नाही ? सऽऽगळे जमा-खर्च स्मरून.. सगळे हिशेब द्यावे लागतांत बंद करून खाती, टांक मोडून जावं लागतं, सोडून नातीगोती मोह, माया, द्वेष, मत्सर, ममता, प्रेम, लळा, नावं वेगळीवेगळी तरी खेळ खोटा सगळा भाता वर-खाली तोवर ’तेवर’ उधळायचे धकधक थांबली की मग फक्त ’लाकूडं’ उचलायचे पण या हिशेबांत राहून जातो मरण्याला आलेला खर्चं म्हणतील, ’कसं फेडायचं हे ? थोडं कां झालय्‌ घरचं ?’ कारण अहो.महागाईच्या तापल्या तव्यावरचं.. महागलय्‌ मरण सुद्धा, दमड्या लागत्यांत लई पड झड, रोग राई, हजार तोंडांची खाई तपासणी अन्‌ औशीधपाणी, देतय कोण फुकाट ? कद्रावलेले आप्त, पाहून मरनारा जातो मुकाट लहानग्यांन्ला वाढवायचं की म्हातार्‍यांना जगवाय्‌चं ? उलटुन पडतोय घास, पाणी तरी बळं भरवायचं.. उर्ध्व लागला तरी लावत्यांत नाकाड्यावर नळी इस्पितळाची भर करायला उभी दागदरांची फळी ’मुलग्याला यायला येळ लागल ? ठेवा शीतगृहांत’ माती झाली तरी सैल सोडावा लागतुया हात तिरडीचे बांबू नि निखार्‍याला कोळसा, नाई सस्त सुतळ बी आवळायला ’वासा’ आता नाही येणे जाणे, गात वरात निघते, भजनी नी टाळकरी का भौ फुकटांत येते ? चिरीमिरी द्यावी लागते, भेटायला ’पास्‌’ जगन्याला तर हायेच, पर मरनाला बी त्रास ? तूप साजुक किरवंत मागतोय्‌ ’धाडतो’ म्हनतोय्‌ ’स्वर्गांत’ डोरल्यांतल्या वाट्या बी हळूच घालतांत खिशांत सरणावर लाकुडफाटा अखेर लागतोचं जाळाया कवटी फुटेस्तोवर कोण असतो आंसवं ढाळाया ? द्या फेकून रानांत, विसरून सुरकुतलेले हात आजचं जिणं जगून घ्या, कशाला उद्याची बात ? कोल्ही कुत्री ’मातीमोल’ खाउन, देतिल तरी दुवा उरल्यासुरल्या तुकड्यांच मुंग्या करतिल रवा आत्मा म्हनं जातो वर आभाळांत वस्तीला तितं कुठं जागा हाई ? गर्दी आलिया भरतीला ! एखादी सकाळ उजाडते मळभ घेवुन मनांत प्रष्ण उठवतो काहूर, घुमतो स्वत:च्याच कानांत आयुष्य अंगावर येतय्‌ मित्रा ! संपायचं कधी रे सगळं ? आंतल्या आंत कोंडतोय जीव ,चावी गहाळ, बाहेर नुसतच टाळं जगण बरोबर घेऊन आलय, मरणाचा वसा , म्हणून भोगला हरेक क्षण, भरून घेतला पसा खोटं खोटं जगायला खरीखरी हवा नि श्वास नवी वस्त्र ? नको.. आतां ’कोर्‍या’चाच ध्यास तिकाटण्यावर नको मडकं.. नको कर्मकांडं आलं तसच जाऊद्या गळक फुटकं भांड तुझी मदत काय मित्रा, या ’कार्यांत’ होणार आसवं गाळणारे सगळे माघारी घालवणार ? आपल्या माघारी उरलेल्यांना, आपलं मरण हा ’आंत बट्ट्याचा’ व्यवहार वाटू नये म्हणून मग म्हणायचं.. ( ही भावना, मी माझ्या ’नक्षत्रांचे दिवस’ या नव्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडली... की सांडली म्हणू ? पण आहे ! ) मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी ***** परत रॉय किणीकर.. हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ, या विदूषकाला नाहि रडाया वेळं लावून मुखवटे नवा खेळ चल लावू सोडून सावल्या पडद्यामागे जावू पडद्यामागे जावू

No comments:

Post a Comment