Tuesday, March 19, 2013

मीनाताईं ’शब्दांच्या पलीकडले

दुपारी खूप उशीर झालाव्‌ता.. सकाळी १०ची शिफ्ट आहे असा निरोप मिळाल्यामुळं बहुतेक सगळे वाद्यवादक हजर झाले होते तासभर झाल्यानंतर चुळबुळ सुरू झाली त्यांतल्या ज्येष्ठ मंडळींच्या ’कंपू’त..’ये कौन काकतकर है ? उसको मालूम है ना के एक मिनिट ज्यादा हुवा तो दूसरी शिफ्ट्‌ का भी पैसे देने पडेंगे.. हम दूरदर्शन वगैरा नही जानते.. हमे हमारा पैसा इंडस्ट्रीके रेट्स्‌नुसार मिलनाही चाहिये.. और अगर काकतकरने नही दिया तो देख लेते है उसको...’ अस्वस्थता आतां अशी धमकीवजा शब्दांत उतरायला लागली.. फिरोजशहा मेहेता रस्त्यावरच्या HMVच्या ध्वनिकलागाराबाहेर एक एक जण जावू लागला कुणी वडापाव तर कुणी तंबाखू चोळायला तर कोणी पान चघळायला.. कोण बोलणार ? कारण वाद्यवादक ही जमात त्याकाळी, भल्याभल्या संगीतकारांना पण आवरत नसे इतकी त्यांची, म्हणजे जमातीची एकजूट भक्कम होती..( त्या काळी माझ्या, २३, मुकुंद निवास या, राहात्या दादरच्या घरा आगेमागे दोन प्रसिद्ध वाद्यवादक राहायचे.. समोर शहासदन मधे प्रभाकर जोग आणि पाठीमागे सीकेपी हॉल्‌शेजारी परशुराम बिल्डिंग्‌च्या कौलारू भागांतल्या एका छोट्या खोलींत, पार्सेकर.. श्रीधर पार्सेकरांचे बंधू... दोघेही अप्रतिम व्हायोलीन्‌वादक.. आणि मी करीत असलेल्या वर्णाला अपवाद ठरावेंत असे) बाबूजी.. अण्णा सुधीर फडके तर त्यांना ’दैत्य’ म्हणायचे... सगळे आपापल्या ’हुनर’मधे अत्यंत वाकबगार होते. पण एका सडक्या सफरचंदाची ’लागण’ टोपलींतल्या इतरांना होते ना ? तशी कांहीशी गत झाली होती या ’जमाती’ची.. कारण एरवी सर्वसामान्यपणे गाण्याची साथ आणि ’Take' साठी साथ यांत जमीन आस्मानाचा फरक असतो.. बीट्‌ टू बीट्‌.. बार‌ टू बार्‌.. वाद्यमेळ संयोजकानं आखल्याप्रमाणे त्या वाद्यावर तेवढा स्वरसमूह वाजवायला लागतो.. जरा इकडतिकड झालं तर परत पहिल्यापासून.. म्हणजे त्या काळी तरी.. १९८४मधे अशीच आजकालच्या मानानं ’असुविधा’ होती. पैसे खूप मिळायचे वाद्यवादकांना.. इतके की संगीतकार बस आणि लोकल्‌नं तर निरोपे म्हणजे ’मेसेंजर्‌’ आणि वादक त्यांच्या स्वत:च्या ’शोफर’चलित चारचाकी वाहनांतून अशी अवस्था होती.. त्यामुळे आजकाल इलेक्ट्रॉनिक्‌ वाद्य विशेषत: ’सिंथेसाइझर्‌’ आल्यापासून संगीतकार, वाद्यमेळ संयोजक यांनी हुश्श केलय. आतां आकुस्टिक्‌ ची सर.. म्हणजे चर्मवाद्य(तबला, ढोलकी, खंजिरी, डफ), तंतुवाद्य(सतार, सारंगी, व्हायोलिन्‌, दिलरुबा, संतुर), फूंकवाद्य‍(क्लॅरिनेट्‌. बांसरी, सनई, सुंद्री, सॅक्साफोन्‌) यांची सर आणि त्या स्वरांतला आत्मा इलेक्ट्रोनिक्‌ वाद्यातून मिळवता येणं श्यक्य नाही पण त्या .जमाती’च्या छळवादापेक्षा हा Compomise’ स्वीकारतांत बापडे.. बरं आतां तांत्रिक सुधारणांमुळे चुकलेले तुकडेतुकडे वेगवेगळे भरतां येतांत सुधार करून.. त्यामुळं सगळ्यां ’फौजे’ला एकत्र बोलाविण्याचं कारण नसतं.. तर जवळ जवळ दीड तासानं दिदी प्रवेश करत्या झाल्या, कारण, मीनाताईंच्या ’शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी दिदी गाणार होत्या ’माणसाला पंख असतांत’ या, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(१९७४) पहिले मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध मराठी लेखक ’ययाती’कार वि.स. खाडॆकरांच्या कथेवर आधारित चित्रपटांतलं एक गाणं ! ’ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’.. एक दलित तरुणी सामाजिक अन्यायाला कंटाळून करुणा भाकतेय देवाची... समाजरूपी सागरांतल्या, आजूबाजूनं जाणार्‍या होड्या, बोटी यांच्याकडून दुर्लक्षित बेटाप्रमाणं. असं दृश्यांकित रूपक साधणारा प्रसंग. गाण्याच्या ध्वनिमुद्रिका Out of Stock झाल्याव्‌त्या त्यामुळं पुनर्ध्वनिमुद्रण अनिवार्य होतं इतक्या वर्षांनी म्हणजे १९८४ मधे.. दिदी ध्वनिमुद्रणाला कलागारांत पोहोचल्याबरोबर सगळी चिडीचाप झाले. इतर चौकशी करतांना दिदींच्या कानावर वाद्यवादकांची कुरबुर पोहोचली.. वापरलेली भाषा, धमक्या..यासह. दिदींनी सगळ्या वाद्यवृंदाकडे एकदा पाहिलं. ऐंशी टक्के चेहेरे वरमले.. कारण दिदींची नाराजी किती नुकसानीची ठरू शकते याची त्यांना कल्पना होती. मधले व्हायोलीनचे स्वरसमूह अमरनं.. अमर हळदीपूरनं वाजवले.. क्या बात है.. मींड, मुरक्या.. सबकुछ लाजवाब. एका उत्तम गीताच, साक्षांत सरस्वतीच्या कंठातून अवतरलेलं स्वरस्वरूप ऐकायला मिळालं आणि धन्य झालो..पुनश्च.. आरोही नंतर ! कार्यक्रमासाठी मीनाताईंनी माझंही एक गीत निवडून मला आयुष्यभराचं ऋणी करून ठेवलं, ’आनंदघन क्षणांचा रावा दुरून यावा’ असे होते शब्द आणि गायलवतं श्रीकान्त पांरगांवकरनं, शिवाय ’सुरसुखखनि, तू विमला’ या नाट्यपदावर आधारित, शांताबाईंनी लिहिलेलं , तू असतां मज संगे..’ हे भावगीत आणि कांही बालगीतं उषाताई, विनय मांडके आणि सुरेशनं.. वाडकरांच्या... गाइली होती. ’असावा सुंदर चॉक्‌लेट्‌च बांगला’ गायलावता आरती काकतकर आणि दामले आणखी एक अशा तीन बालगायकांनी. या गाण्याचे मूळ गायक योगेश आणि त्याची लहान बहीण, बसले होते प्रेक्षकांत, शांताबाई आणि साक्षांत दिदींबरोबर. मीनाताईंनी सुरसुखखनि थेट बाबांच्या.. मास्टर्‌ दीनानाथांच्या ढंगात गायलं आणि ’ये जवळी..’ची मूळ बंदिश, ’ए सुगुराई..’ दिदींनी सादर केली मीनाताईंच्या कांही आठवणी सांगतांना.. गाण्या आधी.. मी विचारलं, ’दिदी, स्वर द्यायला सांगू कां अमरजींना ?’ माझ्याकडे पाह्यलं त्यांनी.. एक मंदस्मित केलं.. मी काय समजायचं ते समजलो आणि गप नियंत्रण कक्षांत पळालो.. सर्व वर्णन वाचल्यावर, कार्यक्रम किती उच्चकोटीचा झाला असेल हे मी सांगायची आवश्यकतां भासू नये नाही कां ? दुर्दैवानं हा कार्यक्रम दूरदर्शन कडे नाही.. पण माझ्याकडे प्रत आहे त्याची.. *****

1 comment: