Thursday, May 23, 2013

रमेश गोविंद वैद्य

रमेश गोविंद वैद्य संस्कारानं मित-मृदुभाषी, सहृदय, प्रसन्नचित्त, शिक्षणानं कायदेतज्ज्ञ वकील, व्यवसायानं जाहिरात संकल्पक, लेखक, वृत्तीनं सक्षम कवि-रुबाईकार असा आमचा मित्र रमेश गोविंद वैद्य..याचा परिचय मला करून दिला, आणखी एका सुहृदानं.. १९८०-८१ मधे बहुधा.. २३, मुकुंद निवास, डी.एल्. वैद्य रोड, दादर, या माझ्या मुंबईंतल्या वास्तव्याच्या ठिकाणी, ८० ते ८७ हा सातवर्षांचा कालखंड, आम्ही सर्वांनी श्रवण, दर्शन, घ्राण, रसना आदि ज्ञानेंद्रियांनी, म्हणजे त्वचेचा सहभाग फक्त रोमांच जाणिवेपुरतांच हं..अक्षरशः भोगलाय ! आम्ही म्हणजे कोण माहीत आहे..आजकालचे सगळे प्रथितयश.. डेबू देवधर, सुधीर मोघे, त्या काळांत माझ्याशी.. कां कुणास ठावकी.. पण खूप जवळीक साधून असलेला, म्हणजे किमान तसं अगदी बेमालूमपणे भासविणारा सुधीर गाडगीळ, अरविंद हसबनीस, चंद्रशेखर गाडगीळ, विलास आडकर आणि शिवानंद पाटील..या यादींतले तीघे आतां हयात नाहीत पण ते लौकीक जगासाठी.. आमच्या मनांत ते रुजलेत, वाढलेंत बहरलेंत आणि बरसलेंत.. शब्द-स्वरांच्या स्नेहमयी वर्षेंत चिंब भिजवीत.. अक्षरशः काव्यशास्त्रविनोदाचं वारं रोज अगदी पंचपंच उषःकाली..म्हणजे थोडक्यांत सगळ्या हस्ती जागृतावस्थेंत येवून माणसांत आल्यावर..वाहायला लागायचं.. मग जाऊन येऊन, सुरेश वैद्य, आनंद मोडक, श्रीकांत पांरगांवकर, चंदू काळे, सदानंद चांदेकर अणि पुण्यातले अनेक कलाकार.. उभरते, प्रथितयश.. स..ग्गळे. अगदी आदरणीय, सुप्रसिद्ध, जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त सुद्धा एका रात्रीचा निवारा घेवून गेलेंत २३ मुकुंद निवासांत.. आणि विख्यात संगीतकार रामभाऊ कदम.. माझी पेटी घेवून, रात्री ११ ते पहाटे तीन पर्यंत.. लिहायला लागलं तर एक लठ्ठमुठ्ठ कादंबरी होईल या वास्तूवर.. असाच एक ‘दिवस’ रमेशला घेवून आला आमच्या त्या मठींत.. आणि, उंबरठा ओलांडल्या क्षणापासून रमेश मग आमच्या परिवारांतला एक होवून गेला. जशी सुधीरनं.. मोघेंच्या हं.. शब्दधून तीथं लिहिली, एका हिंदी चित्रपटासाठी गीतं रचली संगीतबद्ध केली, डेबू नागीण किंवा खानदान च्या छायाचित्रणांत व्यस्त असायचा, चंद्या गाडगीळनं बाकीशब्द आणि कांचनसंध्या स्वरांकित केली, तशाच अनेक रुबाया किंवा अन्य काव्यप्रकारांच्या ज्योती, रमेशनं तिथं उजळल्या पाजळल्या.. त्याच दरम्यान त्याची ही कादंबरी, व्हिक्टोरिया टर्मिनस्, महानगर मधून प्रकाशित होतं होती. सगळ्यांना एकत्र सवड असेल तेंव्हा तो, क्रमशः प्रसिद्ध होणारं ते लिखाण वाचून दाखवीत असे. ‘यह मुंबइ मेरि जान’.. देणारी आणि चुकलांत माकलांत तर घेणारी सुद्धा.. अशा या मायामोहिनीचे नखरें आणि तिच्या त्या गुबगुबींत पंज्यामधे लपलेली नखं.. दोन्हीचं यथार्थ, रोमांचक वर्णन, रमेश ऐकवायचा आणि आम्ही अंतर्मुख व्हायचो.. कारण आमच्यापैकी प्रत्येकजण, पोटार्थी, रोजमरा की जींदगी जगण्याचा एक अविभाज्या भाग म्हणून.. त्या चरकांतून घाम गाळत थकलाभागला घरी.. त्या मठींत येत होतां..त्यामुळं ब-या जवळच्यांच्या जगण्याचा जणू आरसाच असल्याचा भास व्हायचा ऐकतांना.. रमेशला मी कधी, खिन्न, दुःखी, खंतावलेला पाहीलाच नाही इतक्या वर्षांत..कायम हसतमुख, प्रसन्नमुद्रा. पण कधीकधी अंतर्मुख, तंद्री लागलेला मात्र अनेक वेळां पाह्यलय त्या काळांत..ही तंद्री बहुतांशी अध्यात्मिक भासली मला.. उगा सृजनाचा आव आणलेली कधीच नव्हती ती.. कारण त्याच्या रचना सहजप्रसवा असतांत.. आयुष्याचे चढउतार, अनुभव, निरीक्षणं यांचं शब्दरूप असलेल्या.. या रचनांनी जशी मला भुरळ पडली ,तशीच, एका अतिशय संवेदनशील आणि कवितेच्या शब्दांमधल्या अध्याऋताची विलक्षण जाण असणा-या चंद्य़ाला.. चंद्रशेखर गाडगीळलाही पडली आणि रुबायांना अप्रतिम स्वरकोंदणं मिळाली. त्या काळांत, मुंबई दूरदर्शनची मेट्रोवाहिनी...म्हणजे दुसरा मनोरंजन-स्रोत.. सुरूं झालिवती. त्या वाहिनीसाठी मी या, प्रगल्भ पण उपेक्षित कलाकाराच्या रुबायांवर बेतलेले दोन कार्यक्रम केले. तसा वरकरणी.. आणि अंतःकरणीसुद्धा खरं तर..अत्यंत साधा सीधा, अगदी लक्षमणच्या कॉमन् मॅन इतका, फाटका दिसणारा हा माणूस, स्वरचित रुबाया सादर करायला लागाला की, जितक्या अलवारपणे तो एखाद्या छोट्या समूहाला मोहून टाकतो, तितक्याच सहजतेनं, पहिल्या दहा-बारा मिनिटांतच, कुठल्याही जाणकार वयोगटाच्या, पांचशे हजार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला लागतो. आणि मग, रुबाई घाटाला साजेसे विविध विषय, प्रेमापासून प्रेतापर्यंत, भोगापासून वैराग्या पर्यंत, आणि कळ्यंपासून पुतळ्यांपर्यंत, कधी तिरकस फटकेबाजी करीत. कधी निष्ठुर सत्य सांगत आपल्याला अंतर्मुख करतांत, आणि प्रसंगी खळखळून हसायलासुद्धा लावतांत.. हे सगळ आज लिहायचं निमित्त म्हणजे, व्हिक्टोरिया टर्मिनस् चं वाचन होतय.. पुण्यांत. आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दप्रपंच.. हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा आमचा हा आनंदी निरागस, निर्व्याज, निरपेक्ष जिवलग सखा, यंदा त्र्यहात्तरींत प्रवेश करतोय.. या वळणावर त्याला, निरामय आरोग्य, अभिष्ट चिंतून आणखी खूप, गूढार्थी शब्दलेणी, त्याच्याकडून पुढच्या काळांत मिळतील, अशी खात्री बाळगूया ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment