Friday, January 30, 2015

।।भासबोध।। ३१८ ते ३४५

अंतरी निरुपण, कीर्तन, प्रवचन । रिचवाया, रुजाया जिवंत हवे तन । परि पचन व्हायला अन्न । जर नसेल ? सर्व व्यर्थ !।। ३१८ प्रवचन, निरूपण, कीर्तन । करतील कदाचित समाधान । राखण्या शरीर, मनाचे कोंदण । पचनासाठी अन्न हवे ।।३१८ साधेल काय अध्यात्मज्ञान ?। आत्म्यास मिळेल समाधान । 'त्या'च्या निवासास परि तन । नसेल तर ? सर्व व्यर्थ ।। ३१९ रुचेपचेल ते केवळ सेवावे । अन्य 'अन्न' दुरोनि आदरावे । मोक्ष, गती, फसव्या 'पक्षां' चे थवे । दुर्लक्षावे खचित ।। ३२० तंत्र, यंत्र ना, मंत्र आधी । आवश्यक, ठरण्या लक्षवेधी । कार्यपूर्ती, वा मिळण्या सिध्दी । शाखाज्ञान जाणिजे ।। ३२१ मंत्रोत्तरी तंत्राची जाण । मग यंत्राची जडण-घडणं । साध्य करण्या कार्यकारण । साहाय्यभूत जे होते ।। ३२२ अर्थाची नका करूं गल्लतं । मंत्र म्हणजे नव्हे उपासना, व्रतं । विषयाशयाने असतो संपृक्त । लक्षवेधी नेमका ।। ३२३ जाणिवेस देतं प्रतिसाद । मगजांतरी तर्क-बुध्दी वाद । ज्ञान-कर्मेंद्रये आदेशानुरूप सावध । कर्यप्रवण तदनंतर ।। ३२४ ।। दास-वाणी ।। जेणें देहबुद्धी तुटे । जेणे भवसिंधु आटे । जेणे भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०३/५० मी म्हणजे माझा देह. त्याचे संगोपन, लाड हेच आयुष्य असे वाटणे ही देहबुद्धी. जे जे दिसते, अनुभवाला येते ते सर्व चर अचर, स्थावरजंगम असा प्रपंचाचा पसारा म्हणजे भवसिंधु . कवित्व कशाला म्हणायचे ? जे नियमीत श्रवण केल्याने देहबुद्धी नष्ट होते. जगातील प्रत्येक गोष्ट नाश पावणारी आहे हे कळल्यामुळे प्रपंचावरील लक्ष उडून परमेश्वराकडे केंद्रित होते, भगवंताची साक्षात अनुभूती साधकाला प्राप्त होते तेच खरे कवित्व. तोच खरा कवी. नाश कैसा पावेल कोण ?। अवतरेल ना घेउन पुनर्जन्म ?। 'तुम्ही'च देतां शिकवण !। मग अव्हेरिता कां ?।। ३२५ कल्पना, बीजरूपी कवित्व । त्याचीच निर्मिती 'देवत्व' । 'नसलेपणास' अस्तित्व । देती कवी ।। ३२६ अंतरंगी हरेकास होते प्राप्ती । अनुभवसमृध्दिची व्याप्ती । व्यक्त करण्या अल्पाक्षरी क्लृप्ती । अवगत असते कवीस ।। ३२७ कर्म, कष्टकऱ्यांचा 'भगवंत' । कालापव्ययी जपजाप्य व्यर्थ । 'अर्थ' होतो कार्योत्तरी कृपावंत । 'भवसिंधू'त तरावया ।। ३२८ विश्रामाच्या क्षणी कधी । थोडा शोधून त्यांत अवधी । देहधाऱ्यांच्या व्यथा, व्याधी । वेदनांचे जाणा कवित्व मूक ।। ३२९ कवित्व म्हणजे स्वप्न पाहाणे ?। कवित्व म्हणजे दिव्य लेणे ?। कवित्व म्हणजे प्रतिबिंबापल्याडचे जोखणे ?। व्याख्या उलगडा !।। ३३० सामान्य पाहातो स्वप्ने । सामान्य जाणतो मरण्यांत जगणे । सामान्यास सुख-दु:ख, संसारलेणे । मातीतला कवि-प्रतिनिधी ।। ३३१ शून्य म्हणजे नसलेपण । परि दाविण्या अस्तित्व लागते चिन्ह । तैसेचि 'देवा'चे 'पूज्य'पण । प्रस्तरांत ।। ३३२ नाकारू नका मुळांत काहीच । नकारांशिवाय, होकार नसतोच । जैसे तम-तेजाचे नातेच । परस्परावलंबी ।। ३३३ म्हणोनि उच्चारूच नका आहे-नाही । मूक रहोनि घडते ते पाही । प्रचिती दिसण्याने देई । तेचि सत्य ।। ३३४ 'पाहातो तो सर्व वरून' !। 'त्या'च्या 'धाका'चे असूद्या भान !। म्हणून सोडेल भयभीत करुनं । अंतरंगी तो भामटा ।। ३३५ दयार्णवासि कां बा भ्यावे ?। वात्सल्यमूर्ति मूळ स्वभावे । देई धीर पोटाशी धरुनी प्रेमभावे । क्षमाशील तो सत्पुरुष ।। ३३६ पुढती मांडोनि सुवर्णपात्र । वाढून देती नाचणिची भाकर । तेवढीच पचवेल व्याधिग्रस्त शरीर । ना दुसरा इलाज ।। ३३७ भाज्या, चटण्या, कोशिंबिरी । उजव्या, डाव्यामधे विविध परी । पंचपक्वान्ने आणि खिरी । परंतु सारे निषिध्द ।। ३३८ विटेवरी चढविती विटा । गिलाव्या नंतर इंद्रधनुषी छटा । अंतरंग सजवुनि धरिती वाटा । पाले आपली पाडुनी ।। ३३९ जे उभारिले, ते नाही माझे । सोडतांना मनावर नाही ओझे । कार्यपूर्ती कोणत्याकाजे । जाणितो निस्पृह कर्मयोगी ।। ३४० आस्तिकतर टोकाचा नास्तिकं । श्रध्दा त्यांची केवळ एकं । अस्तित्व 'त्या'चे सर्वभर, बाकी मिथिकं । जैशा वारूसि झापा ।। ३४१ अवकाश अखंड, अगम्य, अनंत । तमप्रवाह त्यांत कालातित । आकाशगंगेत तारे केवळ निमित्त । जैसे गेरूवरी ठिपके ।। ३४२ कुंभार, माळी, विणकर, तेली । अनंत भाषा, विविध बोली । 'उक्ति'वल्ली उमलत गेली । उन्मनावस्थी, 'इटु' कारणे ।। ३४३ कोणीच नव्हते 'पदसिध्द' संत । कष्टकरी, संसारी कार्यरत । शब्द, सहज आले ओठांत । कौतुकास्तव 'त्या'च्या ।। ३४४ जर्जरावस्था आणि श्वान । अवस्था बहुश: एकसमान । नाकरीत नाहीत अन्न । वटारती नजर अधिकासाठी भुंकता ।। ३४५

No comments:

Post a Comment