Monday, December 26, 2011

’दोन लावण्या...’


’दोन लावण्या’
चवल्या-पावल्यांचा केलाय मी वांधा
रुपया रूपाचा कलदार बंदा...
भाळ आभाळावर उगवतीचा शिलेदार..थंडावा रातिचा कां जळ नजरेवर ?.. डाळिंबि व्हटाची पहाट जणू हाकारं..
रंग-कांतिची पुनव उतरली, जनु चाफा बहरलाय औंदा....
नथं नाकांत थरथरे, तिरिप जशी माध्यान्ह..कानि कुडिबुगडी, सांज गुपितांचं कोंदन..मान कमळदेठ धाडि पांचव्याचं आवतान...
केस मोकळे द्वाड, पसरले..झाकत्यांत अटकर बांधा...
धडधडत्या वक्षी, दिठी काढुद्या नख्‌शी..मनगतांव माझ्या बसवा राघवपक्षी..अवघ्या मुशींत रिचवा बेगिन तुम्ही रसरशी...
लुटा कवळ्या तरनाईचा चंदा...
( ही राम कदमांनी संगीतबद्ध करून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांत, माधुरी सुतवणेनं गायली होती.)
*****
हाड फोडते थंडी तरिही, थोडक्यांत असते गोडी..
राया जरा सैल करा मिठि थॊडी..
कनगींत भरुनिया दाणं तुमी निवांत..गोविंदविडा घ्या,देते लावुनि ! पंत..मन चुळबुळते तरि ठेवा त्याला शांतं...
वाकळ घेवू आंतुन, वरती पांघरुया घोंगडी...
आडसालि उसाची होइल साखर आंता..चतईच्यां वाकितं, हिरकणं बसवुनि देता ?..नजरेचं माज्या कसबं तुमी जाणता..
धुंद सुखाच्या, भरून आनल्या तुम्हासाठी कावडी...
गारटःआ असोनी, दमटपना कां वाटे ?..चोरटे स्पर्श शहार्‍याचे फुलविति कांटे..ठिणगीचा झाला वणवा, डोंगर पेटे...शमवायाला डोंब तुम्हि बरसा वळिवझडी...
*****
अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment