Wednesday, December 28, 2011

ऋतूंची लावणी...


शेकोटीचे दिवस साजणी, रोमांतुन हुडहुडी भरे..
कटू स्मृतींची पाने गळती, आनंदाची ऊब उरे.
******.

ऋतूंची लावणी

वैशाखी बघ धग गात्रांतुन, सवय लागली वाळ्याची..
शिशिरधुंद गंधित रात्रींतुन, निनादली सय चाळांची (चाळ्यांची ?)

पदरावरचे राघू-मैना निपचित झाले काहुन आज ?
धडधड पदराआड नि तेंव्हा, दडून बसण्या शोधी काज
पदरपदर का भिजवुनि श्रावण, शमविल लाही अंगाची ?

अधिर जिवाचे ऊष्ण उसासे, भिरभिरते कशि पहा दिठी
सुगींत जरिकांठी जरि खुपली, तरी मधाची मऊ मिठी
मावळतीला मळभ साजणा ! लवते पापणि डोळ्याची...

नको दाउ भीती विरहाची, बेगिन येना आज घरा
धगधगत्या स्पर्शांतुन उसळुन, थंडावा शिडकवी जरा
प्रतिमा डबडबल्या भाळी, सय भिंग जडविल्या चोळीची..

१३ मे १९८९




No comments:

Post a Comment