Saturday, December 31, 2011

’पोट कशानं भरावं ?’


पोट कशानं भरावं ?
या केविलवाण्या, भाबड्या प्रष्णाचं उत्तर देतांना, आपल्या विविध अन्यायकारी कररूपी, कराल दाढा करकरवत, तो भुकेचा शहेनशहा आणि महागाईचा दैत्य, उपहासानं म्हणतोय‌... .
पोट दलितांच्या अश्रूंनी, संपदेच्या शस्त्रांनी, नेत्यांच्या आश्वासन-पत्रांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट अज्ञानाच्या तमानं, मजुरांच्या घामानं, अनितीच्या प्रेमानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट स्वप्नांतल्या मृगजळानं, लक्षभोजनांच्या गाळानं, भुकेपोटी येणार्‍या कळांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट मंत्र्यांच्या हास्यानं, अधिकार्‍यांच्या दास्यानं, जनतेच्या सर्वनाशानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट वैमनस्याच्या आगीनं, सत्कर्माच्या रागानं, अपहृत चंदन, सागवानानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट अंधश्रद्धेच्या बळींनी, विस्थापितांच्या कपाळशूळानी, संधिसाधूंच्या पिकल्या पोळीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट शासनाच्या सुस्तीनं, गांवगुंडांच्या मस्तीनं, शेत गिळणार्‍या वांझ गस्तीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट बलात्कारितेच्या असहाय धाव्यानं, भ्याड गनिमी काव्यानं, दुर्बल हताश काव्‌व्यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट धर्माच्या मुखवट्यानं, हुंडाबळींच्या दुखवट्यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट रोज मिळणार्‍या लाचेनं काळ्या पैशाच्या आचेनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट महानगरांतल्या धुरानं, नेमेचि गिळणार्‍या पुरानं, सर्वभारल्या अतिरेकी अत्याचारानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट चार घंट्यांची ग्लानी देणार्‍या ठर्यानं, रेससाठी पोसलेल्या घोड्यांच्या खरार्यानं,झोपद्यांवर कोसळणार्‍या दगडी भिंतीपल्याडच्या, गगनचुंबी इमारतींतून येणार्‍या सुगंधी फवार्‍यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट शिवीगाळीच्या, द्वेषात्वेषाच्या कर्दमानं, गावगुंडांनी दिलेल्या दमानं, मतपेटीनं निरसनं केलेल्या भ्रमानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट जाहीर संपत्तीच्या आंकड्यांनी, दगडी देवाला घातलेल्या साकड्यांनी, एकमेकांचे पाय ओढणार्‍या खेकड्यांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट पोपटानं ओढलेल्या पाकिटांतल्या भाकितानं, तथाकथित हितचिंतकांनी टाकलेल्या कातेनं, विझू विझू पाहाणार्‍या जगण्याच्या ज्योतीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

No comments:

Post a Comment