Thursday, June 14, 2012

एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस...


एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस... ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा... या अभंगा मधे बदल करून तो रस नाही अंगा परी ऊसं लई डोंगा असं म्हणायची वेळ आतां...आतां काय म्हणा, गेली कित्येक तप, म्हणजे साधारणत: स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर प्रत्येक निवडणुकीच्या ’लोकशाही’तत्वांना वगैरे अनुसरून जाहीर झालेल्या निकालोत्तर, सगळ्या राज्य विधान आणि राष्ट्र लोक सभागृहांत, लोकप्रतिनिधींनी आपाआपल्या ’शिटा’ धरल्या की...सर्वसामान्यजनांवर येते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून, पुढं येणारी कथा वाचाचं लोकहो ! त्याचं काय झालं... एक दिवस एक फुलंविक्रेता एका केशकर्तनालयामधे आला, या नापित महोदयांच्या..केशकर्तनाची क्रिया पूर्ण झाल्यावर, सहाजीकच त्या फुलंविक्रेत्यानं, सरसावत, खिशांत हात घालत, ’किती झाले ?’ असा स्वाभाविक प्रष्ण विचारला. नापित महोदय, आपले हात मागे घेत आणि मागे सरत उद्गारले, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’ चेहेर्‍यावर आश्चर्य आणंत, पण मनांत, सुखावत, फूल-विक्रेत्यानं, खिशांतला हात तसाच ठेवला. दुसर्‍या दिवशी आपलं दुकान उघडायला गेल्यावर नापिताला दाराशी एक पुष्पगुच्छ आणि एक आभार-पत्र ठेवलेलं मिळालं आणि त्याच्याही चेहेर्‍यावर मंदस्मित झळकलं नंतर कांही वेळानं एक पोलिसदादा केशसंभार कर्तनार्थ दाखल झाले दुकानांत. परत सगळा प्रसंग, जो आदल्या दिवशी घडला होता त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजे पोलिसदादानं पैसे काढणं, नापितानं ते नम्रतापूर्वक नाकारत, त्याचं कारण सांगणं वगैरे वगैरे. पुढल्या दिवशी परत आदल्या दिवशी सारखीच फुलं दाराशी..फक्त एक बदल म्हणजे आज आभार-पत्राबरोबरी एक ताज्या, गरमागरम बटाटावड्यांचा पुडाही होता. ’कृतज्ञता केवळ शब्दांनी व्यक्त करण्या ऐवजी, कृतीनं का नये करूं व्यक्त ?’ या सद्‌हेतूने आणि ’उदरभरणाने, यज्ञकर्माचे पुण्य मिळून उपकारकर्त्याची क्षुधाशांती होवून, आशीर्वादही प्राप्त होईल’ या वरकरणी सद्भावनेने पण अंतस्थ स्वार्थी हेतूने, कदाचित ठेवला असावा त्या फूलं विक्रेत्यानं... त्या दिवशी मग एक ’खासदार’..चक्क..आले डोकं भादर्ण्यासाठी केशकर्तनालयांत..कर्तनोत्तर परत, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’. सुरू झालं नापिताचं पालुपद...’खासदार’ महोदय तत्परतेनं पैसे परत खिशांत कोंबत, ओठांचा चंबू करून, शिळेवर एक त्यांच आवडत चित्रपटगीत वाजवत, आनंदित होत्साते, हर्षविभोरावस्थेंत, टणाटण निघाले परतीच्या वाटेनं. चौथ्या दिवशी सकाळी, सत्कारणार्थ आपल्या ’कर्मभूमी’कडे निघालेल्या नापिताला, लांबूनच दिसलेलं दृश्य बघून तो बुचकळ्यांत पडला...जवळ गेला तो काय ! अहो आश्चर्यम्‌.. दुकानाबाहेर एक डझनभर खासदार उभे होते ’नापित कधी एकदा येतो आणि दरवाज्याच्या फळ्या उघडतो’ याची वाट पाहात. तात्पर्य: मित्रांनो ! हाच तर फरक आहे, सर्चसामान्य भारतीय नागरिक आणि जनतेला, ’मुकी बिचारी, कुणिही हांका !’ म्हणत आणि त्यांच्या (मतपेटींत खोट्या आश्वासनांनी हुरळून मतं टाकणार्‍या) भोळसटपणाला हसंत त्यांना ’हाकणार्‍या..भारतीय राजकारण्यांमधला !! आणि म्हणून शासनकर्ता राजकीय पक्ष, बालकांच्या वारंवार बदलाव्यालागणार्‍या ’लंगोटांप्रमाणेच बदळून, अंगी परिवर्तनवाद बाणवायला पाहिजे आंता आपल्याला...

No comments:

Post a Comment