Saturday, June 16, 2012

प्रेमाला कसले मोल

प्रेमाला कसले मोल ’प्रेम, म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमच आमचं अगदी ’सेम्‌’ असतं’ कविकुलदीपकांच्या मांदियाळींतले एक अग्रणी वारकरी, वीणेकरी आदरणीय मंगेशजी पांडगांवकरांच्या कवितेंतल्या या लोकप्रिय ओळी..’प्रेम’ ला ’सेम्‌’ चं यमक अगदी ’फिट्ट्‌’ बसलय... सगळं ठीक आहे...पण.. ’तुमचं आमचं सगळ्यांच ’प्रेम’ अगदी ’सेम्‌’ असत कां हो ? आईच मुलांवर, पतीच पत्नीवर, आणि मैत्रीणीच मित्रावर, किंवा उलट्या क्रमानं(विवाहपूर्व..अर्थातच), शेतकर्‍याचं पिकावर, शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर...सगळी सारखी ’प्रेमं’ असतांत ? या प्रत्येक ’प्रेम-प्रकारां’वर एक स्वतंत्र लेख होईल इतकी ती भिन्न असतांत याच ’प्रेम भावनेचा एक अनोखा प्रकार आहे पुढे वाचाल त्यां गोष्टींत तर... एका कृषिवलाच्याघरी पाळलेल्या कुत्रीनं एक दिव्स कांही गोडगोड गोजिरवाण्या बछड्यांना जन्म दिला. आपल्याच सारख्या, परिसरांतल्या सहकार्‍यांना कदाचित ही पिलं पालता येतील आणि घराच्या घरपणाला रात्रीसुद्धा ’जागत’ ठेवणारा सवंगडी मिळेल या हेतून, कृषिवलानं कुंपणाबाहेर एक सूचना-फलक लावायच ठरवल. तो फलक कुंपणाच्या दाराला लावत असतांनाच त्याला जा्णवलं की आपला सदरा कुणीतरी मागून ओढत आहे. कृषिवलानं मागे वळून बघोतलं तर त्याचा गुढग्याशी एक छोटा त्याला दिसला. ’काका, मला एक पिलू द्याना...विकत !’ छोटा म्हणाला, ’बेटा, ही पिलं फार उच्च जातकुळीची आहेत. बरीच किंमत मोजावी लागेल तुला. आहेत का एवढे पैसे तुझ्याजवळ ?’ कृषिवलानं आपल्या कपालावरचा घाम पुसत छोट्याला विचारलं.. छोट्यानं निराशेनं खाली मान घातली सुरुवातीला पण क्षणभर थांबून, एक हात विजारीच्या खिशांत घातला आणि मूठभ्र नाणी काढली. वर पाहात, आशेने ती मूठ सेतकरीकाकांकडे करीत उघडली त्यानं, ’काका माझ्याकडे हे एवढेच पैसे आहेत. मला कमीतकमी पाहूतरी द्यानां त्या पिलांना..’ विनवणी करीत उच्चारला छोटा ’गड्या, एवढ जर मी केलं नाही तुझ्यासाठी तर मला तो’ वर आभाळाकडे पाहात दादा म्हणाले, ’क्षमा करेल कां ?’ आणि चत्कन शीळ घालीत त्यानं श्वानमातेला सद घातली. तत्क्षणी मागे दुडूदुडू धावणार्‍या चार कापसाच्या गुंड्यांसह बाहेर दाखल झाली श्वानमाता.. ’ती पाहतांच बाळें, काळीज धन्य झाले’ अशी अवस्था, कुंपणाच्या कांटेरी तारेला अगदी चिकटून, पिलांना निरखणार्‍या छोट्याची झाली...डोळे आनंदानं भिरभिरू लागले, मनांत खुशीचा मोर, पिसारा फुलवायला लागला...आणि तेवढ्यांत त्याच लक्ष श्वान-सदनाकडं गेलं..आंतमधे कांहीतरी हालचाल दिसली त्याला आणखी एक कापसाचा गोळा पाठोपाठ बाहेर येत होता, हळूहळू चालत..किंवा खुरडत म्हणा हवंतर..बाकीच्या आपल्या भावंडांना गाठण्याची धडपड करीत.. छोट्याचे डोळे आणखी आनंदानं विस्फारले गेले. आणि तो उच्चरवांत, त्या पिलाकडे तर्जनी दाखवत, मागणी मांडू लागला... ’काका मला तेच हवय..सगळ्यांत शेवटी आलेलं..’ सेतकरीदादा, छोट्याच्याशेजारी बसत, थोड खंतावत म्हणाले, ’बेटा, नको नेवूस त्या पिलाला घरी. ते कधीच खेळू किंवा पळू शकणार नाही तुझ्या बरोबर, या बाकीच्या पिलांसारखं !’ छोटा दोन पावलं मागे सरकला, खाली वाकला, आणि आपल्या विजारीचा एक पाय वर गुंडाळू लागला.. आणि दृश्यमान झाला एक दैवदुर्विलास...छोट्याच्या विजारीच्या गुंडाळलेल्या पायाआड होता एक पंगू पाय दोनेही बाजूला खास बनविलेल्या आधाराच्या पोलादी पट्ट्या लावलेला...’ काका, अहो मलातरी कुठं धावता येतय इतरांसारखं. मी पण तरीसुद्धा खुरडत राहातोच की सवंगड्यां मागे त्यांना गाठायच्या प्रयत्नांत.. मला असाच माझ्याबरोबरीचा एक नवा सवंगडी सापडेल ना, या कापसाच्या गोळ्यांत..! आणि त्यालापण, या, आपल्याबरोबरच्या अपंग, बलहीनांना मागे सोडत धावणार्‍यांच्या जगांत सांभाळणारा, त्याला समजून घेणारा, त्याच्या जगांतला आणि जगण्या-जागण्यांतला कुणीतरी हवांच की हो काका.. !’ शेतकरीदादा, पांपणीकांठावर सांकळलेल दहिवर सदर्‍याच्या बाहीनं टिपत, छोट्यापासून नजर लपवत खाली वाकले. त्या पिलाला उचलून त्यांनी पोटाशी ध्ररलं आणि, रुद्ध कंठांतून शब्दफुटेनासा झाल्यामुळं थबकले क्षणभर.. पन परत भानावर येवून, मंदस्मित करीत, ते पिलू त्या छोट्याच्या हातांत देवू लागले.. छोट्यानंपण, लगेच पिलाला हातांत घेवून कुरवाळत छातीशी धरलं. पिलू सुद्धा, त्याच्या इवल्याश्या लालचुटुक जिभेनं छोट्याचा खुललेला चेहेरा चाटायला लागलं... जगांतल्या सगळ्या वात्सल्यमूर्तींनी हेवा करावा असं दृश्य साकार होत होतं तिथं त्या क्षणी... डबडबल्या डोळ्यांनी,पण अत्यंत आनंदित स्वरांत छोटा शेतकरीदादांना प्रष्ण करता झाला.. ’किती पैसे देवू दादा मी याचे ?’ शेतकरीदादाच्या ’कुर्दांत’ चर्र झालं..गळ्यांत दाटलेला हुंदका बड्या मुश्किलीनं दाबत शेतकरी दादा म्हणाले, ’अंहं.. कांही देवू नकोस मला...खूप दिलस तू आतांच आम्हा दोघांना, मला आणि या दुर्दैवी जीवाला...प्रेम-वात्सल्य-माया-ममता यांची पखरण करीत. यापेक्षा अधिक मूल्यवान कांहीच नाही बाळा या जगांत...’ आंसवं, नेत्रगामी व्हायच्या आधीचं सेतकरीदादांनी, झटकन पाठ फिरवली आणि ते जड अंत:करणानं घराकडे चालायला लागले... हा मजकूर लिहितांना आझीसुद्धा अवस्था जवळपास त्या शेतकरीदादा इतकीच बिकट झाली होती... प्रेमाला कसले मोलं, स्पर्शांला उजवा कौलं ही मधुभावाची भूल, निष्पाप वेलिवर फूल प्रेमांत नसे हव्यास, बरसतो जसा पाऊस निरपेक्ष देवुनी कांस, निष्पर्णा देई जोश प्रेमाने फुटति धुमारे, प्रेमांत नसति देव्हारे मागते प्रेम क्षण सारे, पत्र मात्र ठेवुनि कोरे प्रेमांत नसे कुरघोडी, सहजीवन असते गोडी शब्दांची भाषा थोडी, आवंतण नजरचं धाडी हे असे विश्व मायेचे, स्नेहाचे, अनुबंधांचे खोट्या नात्यांपलिकडचे, अन्‌ विशुद्ध आनंदाचे ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment