Thursday, July 26, 2012

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा

’वृद्धत्वी नित तोषवा निजक्रमा’ ***** जे जे जगी या जन्मते, उमलून फुलते, बहरते कालापरत्वे शुष्क अन्‌ निष्पर्ण होवुन संपते... चुकले कुणां कां हे कधी, जरि होतसे परमावधी वय जाय पुढती हर क्षणी, ’लय’ साधतो बेसावधी, म्हणुनी कुणी कां थांबती, शिर धरुनी हाती बैसती, बेतून कार्य नि योजना, धरती असोशि नि, धावती उलटली साठी तरिही अजुन यौवनांत मी... अशी भूमिका ठेवून वागा, हा एक सल्ला..कदाचित अनाहूत असेल, पण सार्थ आहे. हजारो वर्ष जगलेले वृक्ष या अवनीवर अजून आहेत, पण आवघी शंभरी गांठलेली कितीशी माणसं आहेत ? लाखांत एखादांच वयाची शंभरी गाठतांना, ओलांडतांना आपल्याला दिसतो, कळतो किंवा फारच क्वचित, आपल्या परिचितांपैकी असतो. तुम्ही नव्वद वर्ष जगलांत तर तुमच्या पदरी दहा वर्ष शिल्लक असतांत..आणि ऐंशी वर्ष जगलांत तर अर्थातच, आणखी वीस वर्ष वाट पाहायची असते. जर ’जायच्या’ आधी तुम्हाला फक्त कांही वर्षांचच आयुष्य उपभोगायला मिळणारं असलं आणि ’जातांना’ तुम्ही इथून ’कांऽऽऽहीऽऽऽही’ घेवून ’जाऊ’ शकणार नाही आहांत याची खात्री... अं हं ! ते एक त्रिकालबाधित सत्य असल्यामुळे, तुम्ही कंजूषपणे वागून कांही साध्य होणार नसतं.म्हणून.. पैसे खर्च करा, मौजमजा पुरेपूर करून घ्या, घ्यायचे राहिलेले आनंद या उर्वरित उतारवयांत जमतील तसे, तेवढे उपभोगून घ्या, त्यांतून शिल्लक राहिलंच तर ’सत्पात्री’ दानं द्या, पण आयुष्यभराची सग्गळी कमाई, पुत्र-पौत्रांच्यानांवे करू नका, जर त्यांना परावलंबी झालेलं तुम्हाला पाहायचं नसेल तर... तुम्ही ’गेल्यावर’ काय होईल याची चिंता करीत बसूं नका. कारण त्यावेळी खालेल्या तुमच्या चिमुटभर राखेला, राग-लोभ, प्रशंसा-निर्भत्सना, स्तुती-नालस्ती यांची जाणीवच नसणाराय्‌ मुळी ! मुलांच्या चिंतेचे, काळजीचे गुलाम होवू नका, कारण त्यांचं नशीब तुम्हीच काय कोणीच बदलू शकणार नाही. ते तर, जसे तुम्ही वाढलांत जगलांत तसेच त्यांच्या पद्धतीनं वाढणार, जगणार आहेत. तेंव्हा व्यर्थ, फुकाचं मानसिक ओझं कशाला ? मुलाबाळांच संगोपन करतांना, त्यांच्या बालपणी त्यांना काय हवं नको ते बघतांना, कोडकौतुक करतांना, त्यांच्या बद्दल फार अपेक्षा बाळगायची अक्षम्य चूक कधीही करू नका मित्रांनो ! कारण येणार्‍या ’उद्यां’ ते त्यांच्या आयुष्याशी झगडण्यांत, कर्तव्यांच पालन, उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करण्यांत, , कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यांत व्यग्र असणार आहेत. जेआपल्या अपत्यांबाबत हे करणारनाहीत त्यांची अपत्य त्यांच्या ’असले’पणींच ’वडिलोपार्जिता’वरून वादविवाद, वितंडादि आयुध एकमेकांवर उगारणार आहेत, आणि तुमच्या ’महानिर्वाणा’ची प्रतीक्षा करण्यांतच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यतां मानणार आहेत. तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे तेच फक्त वारस आहेत याबाबत तुमच्या मुलाबाळांना हक्काची नुसती हमींच नाही तर शतप्रतिशत निश्चितीच असते. तुमच्यासारखा साठ्योत्तर ’वर्धिष्णु’ स्वत:च्या ’आरोग्य-संपदा’ या पैकी कशाचीही देवाणे-घेवाण करण्यापलीकडे पोहोचलेले असतांत. कारन आरोग्य हे कधीच पैशांनी विकत घेता येत नाही, हे तुम्हाला एव्हांना पटलेलं असतं. आतां पैसा.. मग तो किती मिळवायचा ? लाख ? दहा लाख ? कोटी ? दशकोटी, अब्ज ? हा ज्याचा त्याचा प्रष्ण आहे. पण एक कायम ध्यानांत ठेवलं पाहिजे आपण सर्वांनी की एक हजार एकर उत्तम प्रतीच्या पिकाऊ जमिनीमधे घेतलेल्या भात पिकापैकी एकट्याला फक्त तीन भांड्यांचा शिजवलेला भात एका दिवसांला, आणि हजारो महालांची मालकी जरी तुमच्या गांठी असली तरी केवळ बहात्तर चौरस फूट जागा तुम्हाला रात्री झोपण्यासाठी लागते. आणि जोवर, तुम्हाला उदरनिर्वाहासाठी पुरेस अन्न मिळतय आणि तुम्ही जवळ पुरेसा पैसा बाळगून आहांत तर मग तुमचं उत्तम चाललं आहे असं म्हेणायला हरकत नसावी, नाही कां ? म्हणून आनंदी, प्रसन्न राहा. अडचणी कुणाला आणि कुठल्या कुटुंबांत कुरबुरी नसतांत ? दुसर्‍यांच्या आमदनी, लौकीक, प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी स्वत:च्या तत्सम बाबींची तुलना करीत बसूं नका. पुढची पिढी किती यशस्वी होते आहे, मुलाबाळांच्या प्रगतीचा आलेख उद्‌गामी आहे की नाही याकडे बारकाईने लक्षपूर्वक नजर ठेवा. आणि दुसर्‍यांच्या आनंद, प्रकृती आणि दीर्घायुष्याचं गमक साध्य करायचा प्रयत्न करा. जे बदल करणं तुमच्या आवाक्याबाहेरचं असेल त्यांच्या फंदात उगा पडू नका. तो वेळेचा अपव्यय तर ठरेलच आणि तुमच्या अनारोग्यालाही कदाचित कारणीभूत ठरेल. तुम्हाला स्वत:लाच अखेर ’स्वांत:सुखाय’ जगण्याचा आणि संतोष मिळवण्याचा प्रयास करावा लागेल. तुमच्या चित्तवृत्ती जोवर प्रसन्न आहेत, तोपर्यंत ’गोड गोष्टी’, बकुळिच्या तळाशी मिळतांत तशा सुगंधित स्मृतींचीच कांस धरा. स्वत:ला ’छान’ वाटेल अशा काहीतरी कृती, कर्तव्य, समाजकार्य रोज करायची सवय अंगवळणी पाडा. गंमत असते त्यांत आणि वेळही छान जातो हा एक ’बोनस्‌’ फायदा.. एक दिवस ’आला तसा गेला’ तर तुमच्या साठ्यांतला एक दिवस ’कमी’ झाला, तोच दिवस तुम्ही ’आनंदमयी’ केलांत तर तुम्हाला तो ’मिळाला’ असंहे साधं गणित आहे ! ’प्रसन्नवदना’ला रोगराई सुद्धा वचकते, आणि लांब प्ळते, ’ साजिरे’ असाल तर व्याधी लवकर बर्‍या होतांत, आणि दोन्ही... म्हणजे आनंदी आणि खुशहाल असाल तर आजारपण येतच नाही. शिवाय उल्हसित चित्तवृत्तीनं, स्वच्छ सूर्यप्रकांशांतला व्यायाम, न्याहारींत आणि भोजनांत पुरेशी जीवनसत्व, क्षारं असलेले, विविध ’जायका’वाले पदार्थ यांचा समावेश केलांत तर, खात्री बाळगा की पुढची वीस-तीस वर्ष तुमच्या आरोग्याला कांऽऽहीऽऽही धोका नाही. सगळ्यांत महत्वाचं म्हणजे स्वत:च्या आजूबाजूला बहुतेक वेळ ’आनंदविभोर’ वातावरण राहील याची दक्षता घ्या. आणि मित्रमंडळ ? त्या शिवाय आयुष्य असूंच शकत नाही कोणाचं खर की नाही ? तो एक महत्वाचा ऊर्जास्रोत असतो रोजच्या जगण्यांतला. त्यांच्या आणि त्याच्या शिवाय अस्तित्व ? उघड्याबोडक्या माळावरच्या एकाकी, शुष्क, निष्पर्ण वृक्षासारखं ! त्याला काय असंणं म्हणायचं ? अहो म्हणून ठेवल ना..कुणीतरी.. ’निदकाचे घर (सुद्धा चालेल एकवेळ, पण), असावे शेजारी’ तेंव्हा.. शुभेच्छा... हो, आणि ’साठ्योत्तरी’ साजर्‍याकरणार्‍या तुमच्या सुहृदांना ही ’विचार=आहेर’ नक्की द्यायला विसरू नका !!

No comments:

Post a Comment