Saturday, July 14, 2012

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’

’पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं’ ***** येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाउस आला मोठा येग येग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून तान्ह्याला रिझवण्यासाठी मराठी माय, अडगुलं मद्डगुलं बरोबर पावसाची पण आठ्वण काढतेच पण यंदा ही बडबड गाणी बदलून ये ना बाबा पावसा, जीव वाटे जाईसा अंदाज ठरतो खोटा, उगा करत्यांत बोभाटा ये बाई सरी, मडके अर्धे तरी भरी सर भाव खाऊन, बसली कुठं जाऊन ? अशी म्हणायची वेळ आली आहे. एकेकाळी... फार कशाला ? अगदी मागल्या वर्षीसुद्धा आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंग रानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग, ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ प्रत्येक हृदयी ठाकला, वाकला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ ’विका भांडीकुंडी, भाकर घ्या हाती, पोराले शिकवा बापडे हो !’ डेबूजी सांगूनी गेला तरीही ही मानसं आंधळी असी कां हो ? असा असायचा... असो... पण काय गंमत आहे अबाल वृद्धांना वेग वेगळ्या कारणांसाठी पाऊस हवा-नकोसा असतोचं अष्ट नायिकांपैकी कुणी विरहिणी, ऐ सावन तूं इतना ना बरस की वो आना सके और उनके आनेके बाद इतना बरस की वो जा ना सकें अशी दुहेरी विनवणी सुद्धा करायला मागे पुढे पाहात नाही. ऐतिहासिक काळांत कदाचित या ’लहरी राजा’ ला वेसन, तानसेन सारखे गायक घालू शकत असतील कदाचित पण आजकालं ढगांवर रासायनिक फवारणी करतांत म्हणून ’मेघराज’ फिरकतच नाहीत त्याचं काय ? कवि मंडळींचं कवित्व तर पावसावरची एखादी तरी कविता केल्याशिवाय पूर्णत्वाला पोहोचतच नाही पाऊस कुणालाही भुरळ घालतो. अगदी डॉ. वसंतराव पटवर्धन...महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष सुद्धा या मोहांतून सुटले नाहीत. विविध ऋतूंवर त्यांनी लिहिलेल्या गीत-समूहांत, वर्षाऋतूच स्वागत करतांना, अवचित आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, आपल्या सखीला त्यांची गीत-नायिका, मोहरून म्हणते, आला पाउस नव्हे नव्हे ग जिवलग आला घरी अंगांगावर आषाढाच्या, नव्हे सुखाच्या सरी कविकुलगुरु कालिदासाच्या मेघदूताचं भाषांतर, रुपांतर करण्याचा मोहसुद्धा असाच मोठमोठ्या साहित्यिकांना पडला. शेलेनं डोक्यावर घेवून नाचत ’जगांतलं सर्वश्रेष्ठ’ प्रीत महाकाव्य’ म्हणून गौरविलेल्या या महाकाव्याचा नायक एक शापित यक्ष. वैशाखवणव्याच्या काहिलीनं तनाची आणि पत्निविरहानं मनाची लाहीलाही झालेला आणि त्यामुळं मंदमंद झुळुकांच्या शोधात पर्वतारोहन करीत हिंडतांना,त्याला दिसला, विदर्भांतल्या रामटेकच्या नगाधिवरून आपल्याच तंद्रींत, पूर्वोत्तर वाहाणार्‍या मरुत्‌वेगावर स्वार होत, विहरणारा एक पांढरा-भुरा मेघ. त्या मेघांचा हृदयस्थ ओलावा आणि स्वत:च्या विरहव्याकुल अवस्थेंतल्या अश्रुपाताची दखल घेण्याची त्याची क्षमता यामुळच ’आपली व्यथा आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचविण्यासाठी, सांगावा धाडायला हाच दूत योग्य आहे’ याची खात्री त्याला पटली असावी. त्या महाकाव्याच्या पहिल्या कांही श्लोकांच, त्यांच्या ’गीत-मेघ’ या काव्यसमूहांत रूपांतर करतांना, डॉ. वसंतराव पटवर्धन लिहितांत, आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला म्हणुनिया विनवित मेघा तुला बाकीबाब बा.भ. बोरकर तर गोव्याच्या यक्ष भूमींतले, त्यांच्या शब्दाशब्दातून संस्कृतप्रचुर भाषालावण्य मिरवत आशयघन बरसलेले आपण पाहिलेश-ऐकलेले आहेत. पुलंनी १९८० ्मधे फिल्म्‌ इन्स्टिट्यूट्‌च्या कलागारांत, दूरदर्शनसाठी एक मुलाखत घेतली होती कविवर्य बोरकरांची. तींत ’बाकीबाब’ इतके धुंवांधार बरसले की पुलं सारख्या कसलेल्या निवेदक-सूत्रसंचालकालाही, मंचावर कुठं आसरा शोधावा याचा प्रष्ण पडला ! घन बरसे रे घन बरसे.. नं सुरुवात झालेली ही बरसातीची सांगता सरिवर सरी आल्या गं सचैल गोपी न्हाल्या गं असं आपल्याचं तंद्रींत गांत बोरकरांनी केली तशीचं, अण्णा ग.दि.माडगुळकर..बाबूजी अण्णा सुधीर फडके-आशातईंनी अजरानर केलेलं, चार वेगवेगळ्या अंतर्‍यांना वेगवेगळ्या, रागसंगीतावर आधारित स्वररचनेनं सजविलेलं आज अचानक या धरणीवर गरजत यावी वळवाची सर तसे तयाने गावे आज कुणितरी यावे किंवा घनघन माला नभी दाटल्या, कोसळती धारा.. हे चित्रपट गीत किंवा मृच्छकटिक मधे अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येवुनी बिलगति आवेगाने तेचि पुरुष दैवाचे ही स्त्री-लोलूप ’पुरुषी’ आग जागविणारं नाट्यपद, आपण विसरूं शकतो ? दशरथ पुजारी-सुमन कल्याणपुर जोडीचं.. रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशांत प्रियाविण उदास वाटे रात हे गीत, किंवा, मंगेश पांडगांवकर-श्रीनिवास खळे-लता मंगेशकर त्रिकुटाचं श्रावणांत घन निळा बरसला रिमझिम रेशिम धारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ह्या रचना शब्दावली, स्वरावली नाहीत नुसत्या तर आपल्या आयुष्यांतल्या कितीतरी नाजुक, भावुक, व्याकूल क्षणांच्या स्नृती ताज्या राखणार्‍या नादावली आहेत. ’कॉफी हाउस‌, कॉफी हाउस‌..प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस’ शांताबाईं शेळक्याकडून, अश्याच कुठल्याशा गप्पांच्या मैफलीत ऐकलेला ’हायकू’...एक जपानी काव्य प्रकार .. ’हायकू’ म्हणजे क्मीत कमी शब्दांत, विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणार्‍या पंक्ती. खरंच, ह्या नियमानं आपलं रोजचं जगण म्हणजे, विविध इंद्रधनुषी रंग घेवून येणार ’कॉफी हाउस्‌’च असतं की... अगदी अंकुरण्यापासून, निर्वाणापर्यंत कितीतरी रंग... सुख दु:खाचे, रागा लोभाचे, मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे... घडण्या बिघडण्याचे, मीलनाचे, ताटातुटीचे, प्रेमाचे, विरहाचे बघणारे डोळे आणि आणि त्यामागची ’नजर’, आणि त्याही मागच्या मनाची, त्या विशिष्ट वेळची धारणा...’Mood' म्हणू हवंतर... यावरचं ठरतं त्या रंगांच गडद किंवा फिकेपण...नाही का ? लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे बिंबाच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे, फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग... दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे, उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग... मग माझ्या एका मैत्रीणीनं, ’मी टीव्हीचे कार्यक्रम बघते’, म्हटलं तर कुठे बिघडतं ? ’काय बघतेस गं परी तू ?’, ’मला ? मला ना, घरांतल्या, माझ्या खोलीच्या खिडकीशी हातांत, स्वत: केलेल्या वाफाळत्या कॉफीचा कप्‌ घेवून बाहेर ’बघतां’ना गडगडणारे ढग, कडाडणार्‍या विजा, श्रावण सरींतून मधेच येणारं आश्वासक ऊन...शाळेंतून परत आल्यावर दूधबीध पिऊन, ओठ फ्रॉकच्या बाहीनं पुसत, शेजारी, पैंजण वाजवत येणारी मिनी...मालकीण घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी, ’मिशू’...कमरेला लवलेला चांदी्च्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येवून, मिनीला हाक मा्रणारी तिची आई...सगळ दिसतं मला अरुण...!’ खिडकींतून, पावसांत खाली हुंदडणारी मुलं दिसतांत तिला, एकदम वर आभाळाकडे बघत, ओरडत नाचायला सुरुवात करतांत ती... ’परी’पण वर ’बघते’... आणि चक्क ’इंद्रधनुष्य’ दिसतं की हो तिला... काय म्हणावं या पोरीला ? तिनं आम्हा, ’डोळस आहोत’ असा भ्रम असणार्‍यांना कधीचं, चारी मुंड्या चीत केलय जगण्याच्या मैदानांत जगण्याच्या तिच्या ’कॉफी हाऊस्‌’मधल तिच ’टेबल्‌’, तिन बरोबर दरवाजा ’दिसेल’ अशा पद्धतीनं, ’अतिथिभिमुख’ निवडलय आणि खुर्चीचा कोन असा साधलाय की येणार्‍या जाणार्‍याचं, प्रसन्न मुद्रेनं स्वागत करताकरता ती, त्यांच्या भावविश्वांत हळूचं दाखल होवून मनांतला आनंदविभोर, प्रसन्न, बरसणारा, कोसळणारा पाऊस.. तो थांबल्यावर घरंग्ळणार्‍या पागोळ्या... सगळ सगळं त्यांच्या अंगावर उधळूं शकेल... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com

No comments:

Post a Comment