Saturday, January 26, 2013

मनाला सुख-शांती देणारं ’धन’

’मनमोकळं’.. *** परवा, एका दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीमधे, भविष्यांच सदर, केवळ सवयीनं चाळतांना, माझ्या भविष्यांत, ’अचानक धनलाभ’ असं भविष्य वाचलं आणि हसूं आलं. अहो ! इतक दैव बलवत्तर असतं तर, अशी दांत कोरून पोट भरायची पाळी कशाला आली असती ? पण ’अहो आश्चर्यम्‌’.. खंरच झाला की हो ’धनलाभ’. आतां धन कशाला म्हणायचं हा ’ज्याचा त्याचा प्रष्ण’ नाही कां ? ’सोने-चांदी आम्हां मृत्तिके समान । देखता विठूला हरपते भान ॥’ म्हणणार्‍या महाराष्ट्रीय संतांच्या मांदियाळीला, ते ’सावळे परब्रह्म, आवडे या जीवा ।’ म्हणजेचं मनाला सुख-शांती देणारं तेच ’धन’.. माही कां ? एखाद्या माउलीला, कडेवरच्या छकुल्याच्या ओठावर फुललेलं हंसू, तर बाबा आमट्यांसारख्या ’संता’ला कुष्ठरोग्याच्या जखमा धुतांना मिळणारं समाधान हेचं धन ! अगदी निर्विवाद... तर त्याचं झालं असं की, मी जेंव्हा दूरदर्शनमधे कार्यरत होतो, त्या काळी घरगुती दृकश्राव्यमुद्रक...Domestic Video Recorders फारसे प्रचलित नव्हते असले तरी ते घरी आणणं आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखही नव्हत. आपण करीत असलेल काम पूर्ण झाल्यावर, ते तटस्थपणे पाहायची संधी म्हणजे तो कार्यक्रम जेंव्हा प्रक्षेपित व्हायचा तेंव्हा आणि तेंव्हाच ! कारण Off-Telecast recordong सुविधाच नसायची स्वत:कडे. कार्यक्रम निर्मितीची नशा एव्हढी असायची की निर्मिती दरम्यान साधी छायाचित्र काढून ठेवण्याचंही भान नसायचं. आजकाल 'Making' चं record ठेवण्यासाठे एक स्वतंत्र युनिट्‌ असतं म्हणे... कालायतस्मै:नम: त्यामुळे, हे ’वेचोनि धन’ आणण्यासाठी गेल्या कांही वर्षांत मी माझ्याच कार्यक्रमांच्या शोधांत झोळी घेवून हिंडतो आहे आणि बर्‍यापैकी (दृक्श्राव्य)माया जमविली आहे त्यांतून. अशाच शोधांत असतांना सुप्रसिद्ध लेखक, आपल्या लिखाणाच्या महतीनं राष्ट्रीय स्तरावर वाचकप्रियता कमावलेले, शिवाजीराव सावंतांच्या मुलाखतीचा, १९८५ मधे ’प्रतिभा आणि प्रतिमा’ साठी चित्रित केलेला.. कार्यक्रम मिळाला..मुलाखत चित्रित केली होती सिंव्हगडाच्या कल्याण दरवाज्यांत त्यांना आणि मुलाखत घेणार्‍या दोन संवादक.. कै. कविवर्य रविंद्र भट आणि माझे एक सन्मित्र ज्यांच्यामुळं माझा शिवाजीरावांशी वैयक्तिक परिचय झाला तें, विजय केसकर.. असे तीघे आणि कांही कुटुंबीय मंडळींना नेवून. चित्रीकरण चमूंत छायाचित्रकार श्रीकांत पुराणिक, आणि ध्वनिरेखक मुकुंद येवलेकर.. एक सहायक अभय काटे आणि मी स्वत: असे चारजण होतो. एका इतिहास-तज्ज्ञ लेखकासाठी याहून सुयोग्य पार्श्वभूमी चित्रीकरण स्थळ मलातरी त्यावेळी सुचलं नाही बुवा ! प्रतिभा आणि प्रतिमा या कर्यक्रमाच्या चित्रीकरणांत कांहीतरी वेगळ, वैविध्यपूर्ण करायला हवं या ऊर्मींतून, ’लेखकाला कलागारांत न बोलविता दूरदर्शननच लेखकाकडे जायचं ठरवलं. या आधी असा प्रयोग मुंबई केंद्राच्या अगदी सुरुवातीच्या आठवड्यांत आम्हीचं, म्हणजे निर्माते केशव केळकर आणि त्यांचा सहायक मी, मिळून केला होता सुप्रसिद्ध लेखक बाबूराव बागुल यांची प्रतिभा आणि प्रतिमासाठी मुलाखत चित्रित करतांना..किंवा कविवर्य आरतीप्रभु तथा चं.त्र्यं. खानोलकर यांच्या साहित्यावर आधारित ;गेले द्यायचे राहून’ या कार्यक्रमाच्या निर्मितीवेळी.. कृष्णधवल, सेल्यूलॉइड्‌ फिल्म्‌वर, किंवा १/२ इंच्‌ ओपन्‌ स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ मुद्रकावर चित्रीकरण करून... शिवाजीरावांच्या दारांत जावून आम्ही ’टक्‌टक्‌’ केलं आणि मग शिवाजीरावांनीच सुहास्य मुद्रेनं आमचं स्वगत केलं. कांही प्रष्णोत्तरं झाल्यावर मग ’मृत्युंजय’ आणि ’छावा’ या दोन कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानचे त्यांचे अनुभव चित्रित करण्यासाठी जवळच असलेल्या सिंव्हगडावर आपण कां जावू नये ? असा प्रस्ताव मी मांडला.. आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही सर्वजण गडाच्या कल्याण दरवाज्यांत.. जिथं वर्दळ कमी असते तिथं जावून छान बसायची जागा शोधून चित्रीकरणाला सुरुवात केली. मला इथं या कार्यक्रमांतल्या ध्वनिमुद्रणाच्या उत्कृष्टतेबद्दल विशेष उल्लेख करायलाच हवा, कारंण गडासारख्या उंचावरच्या बाह्यचित्रीकरण स्थळी, वातावरणांतील कुठल्याही इतर आवाजांचा Ambiance.. कुठलाही त्रास ऐकणार्‍याला होवू नये अशा पद्धतीनं तो आमच्या मुकुंदानं... मुकुंद येवलेकरनं.. तो मुद्रित केला होता. कधी संधी आलीच तर मजकडे असलेल्या या कर्यक्रमाचा जरूर लाभ घ्या खूप छान मुद्दे मांडलेंत शिवाजीरावांनी या कार्यक्रमांत पौराणिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या लिखाणादरम्यानच्या अनुभवांबद्दल आणि एकूणच आगामी संकल्पाबद्दल, साहित्य चळवळीबद्दल ! ’रामायण’ हे आयुष्य कसं असावं हे सांगत तर महाभारत हे आयुष्य कसं असतं हे सांगतं.. महाभारतावर कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना मोकळ आकाश होतं पण छावा सारखी ऐतिहासिक कादंबरी लिहितांना, कल्पनाशक्तीच्या पंखांना, नोंद झालेल्या प्रत्येक घटनेची, प्रत्यक्ष प्रसंगाची वेसण होती, त्यामुळं मृत्युंजयमधली भाषा अधिक लालित्यपूर्ण करतां आली आणि छावा मधल्या भाषेचा लहेजा वेगळा ठेवावा लागला.. त्यांत सुद्धा राजघराण्यांतल्या पात्रांच्या तोंडची आणि सर्वसामान्य मावळे सैनिकांच्या तोंडची भाषा यांतला फरक लक्षांत घेवून, ते भान ठेवून संवाद लिहावे लागले..’ खूप छान आणि अत्यंत शांतपणे मुद्दे मांडत , त्यांचं विवे्चन विश्लेषण करतकरत संवाद सहज खुलत होता.. चित्रीकरणाचे तीनचार तास कसे संपले हे कळलचं नाही... आणि मग सगळ्यांच्या पोटांत कावळे कोकलायला लागल्यावर आम्ही गडावरून पायउतार झालो.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment