Wednesday, May 1, 2013

प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोली

*** मागील भागांत सुरुवातीलाच प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोलीचा उल्लेख पाहिला. या देहबोलीचाच भाग म्हणजे, नर-नारी(सामान्यत:) प्रेमांत पडायच्या आधीची अवस्था..नजरबंदी. आधी नजरबंदी आणि मग स्वामित्वाच्या हव्यासापोटी ’नजर-कैद’ ’ति’ची किंवा ’त्या’ची आधी ’डोळ्यांत वाच माझ्या, तू गीत भावनांचे’ आणि मग लगेच, Wishful thinking, तू नजरेने 'हो' म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ? वगैरे ओघानं आलंच.. असच असतं प्रेम.. अधीर, निलाजरं तरी लाजरं, बावरं, आसुललेलं.. आतां आसुसलेलं शब्दाचा आसु हा अविभाज्य आहे की नाही.. मग त्याची पण तयारी ठेवावी लागते प्रेमींना बरं ! मग शेर बोलायला लागतांत’ बोझ होता जो गमों का तो उठा ही लेते जिंदगी बोझ बनी हो तो उठायें कैसे ।। बोझ, गम.. प्रेमभम्गाचा.. म्हणजे आसूं आलेच की हो ! नैना बरसे रिमझिम रिमझिम पिया तोरे आवन की आस.. वगैरे.. या नजरबोलीचा उपयोग कांही प्राणीसुद्धा, वेगबेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी करतांत, पण आपण सध्यातरी ओहक्त प्रेमभावनेचाच विचार करूंया ! ज्ञानदेवांच्या एका अभंगांत.. देहा लाजिलिये, शब्दा रुसलिये । कासवीचे दूध देवोनिया बुझविले माय ॥ काय सांगो तिचा नवलावो, । महालोभेविण कैसा येतो पान्हाओ ॥ कासवी आपल्या पिलांना, नजरेंतून वात्सल्य, अभय, आश्वासनरूपी दूध देवून त्यांचं संगोपन करते अशी एक समजूत आहे. कूट अभंगांतला हा अभंग मला, प्राचार्य राम शेवाळकरांनी निवडून दिलाव्‌ता, एका अल्बम्‌साठी. त्याच अभंगांतल्या अखेरच्या ओवींत ’आवसेचे चांदिणे’ असा उल्लेख आहे आणि तेच त्या अल्यम्‌चं शीर्षक आहे. त्यांतला हा अभंग मी स्वरबद्ध केलाय आणि देवकी,, देवकी पंडितनं तो गायलाय्‌ ! ते कशाला ? गाईच्या डोळ्यांत नेहमीच एक वात्सल्य मिश्रित करुणा दिसतेच की ! प्रेमाचाच प्रकार.. वात्सल्य.. वत्साप्रत.. छकुल्याप्रत..पुत्राप्रत.. उसळणारा, ओसंडणारा प्रेम-स्रोत..करुणोद्भव पान्हा.. कविवर्य माणिक गोडघाटे तथा ’ग्रेस’ची ओळ आठवा, ’गाइचे डोळे, करुण उभे की सांज निळाईतले’ हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या, ’वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले’ या गीतांतली ही पुढची ओळ. १५ ऑगस्ट्‌ १९८६.. लक्ष्मी क्रीडा मंदिरामधे, आमच्या ’आनण्दघन’ या कार्यक्रमांत, बाळासाहेबांनी ते गीत गायलं. माझ्याकडे आहे त्याची चित्रफीत. चिमुकल्याच्या चिंतेंत, काळजींत अतीव प्रेमापोटी, तन-मनानं एकरूप झालेल्या ’माय’च्या पाठीलासुद्धा डोळे असतांत. मग ते अंगणांत जावू लागलं की तिचा जीव घाबराघुबरा होतो, कुठं पडेल झडेल म्हणून. कवयित्री इंदिरा संतांनी बाळाची वांछा आणि आईच्या जिवाची घालमेल, त्यांच्या बाळ उतरे अंगणी.. या कवितेंत व्यक्त केली आहे... अशा या, तळहातावरच्या फोडासारखं जपून लहानाची मोठी केलेली मुलं जेंव्हां, पिलांस फुटुनी पंख, तयांची घरटी झाली कुठेकुठे, आतां आपुली कांचन संध्या, मेघडंबरी सोनपुटे अशी मोकळ्या आवकाशांत झेपावतांत.. आणि उरतांत मग वृद्धावस्थेंतली दोघं... वर्षानुवएष आनंदाचे, संघर्षाचे, संकटांचे प्रसंग एकमेकांच्या साथीन निभावतांना, मुरलेल्या लोणच्यासारखं प्रेम मिठीमधे कवटाळून. त्यांतून कांही कारणानं तातौरतं दुरावायला लागलंच तर मग कांसाविशी आणखीच वाढते. अण्णा.. अण्णा माडगु्ळकरांनी ती हृदयीची साद किती छान आणलिये, ’ऊन पाऊस’ या चित्रपटांत ! वृद्ध नायिका म्हणते.. ’या कातरवेळी.. पाहिजेस तूं जवळी..’ या जवळिकींतली कोणा एकाची साथ सरते आणि मग आयुष्य रिकामं भासायला लागतं, नजर तासनतास शून्यांत लागत असते. काय असतं तिकडं ? पैलतीर ? त्या तीरावर परत सहजीवनाची आंस घरणारा जीव, ऐहिकांतला सहचर किंवा सहचरी, येरे येरे पावसा.किंवा येगयेग सरी गात उभे असतांत ? पण तिकडं जायचं म्हणजे इथले पाश सोडून, बंधमुक्त होवून, बाकीबाबांच्या शब्दांत त्या मृत्यू-प्रेमामुळं म्हणांवसं वाटतं आंता माझ्या व्यथा कथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषणं, ना ये मला सांगता आणि अखेरीस, विझवून दीप सारे मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया... काय गंमत आहे पाहा. ते सगळं शाश्वत, आयुष्यभर उपभोगून झाल्यावर, मग आपण, ’विश्वामित्री पवित्रा घेवून, ’इदं न मम’ म्हणायला तयार असतो ! कृतघ्न.. मनुष्यसुलभ.. हो की नाही ? या शिवाय इतरही नातेसंबंधातलं ’प्रेम’ म्हणजे उदाहरणार्थ भ्रातृप्रेम.. भरत, श्रीराम यांच्यांतलं...परत गदिमांची आठवण अनिवार्य आहेच, कर्तव्यप्रेमापोटी सिंव्हासन अव्हेरणारा राम, भरताला सांगतोय ’पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे कर्तव्यप्रेम की दैववादामुळं निर्माण झालेली हताशा ? कारण रावणमर्दनानंतर, आयोध्येंत, स्वत:च्या नीरक्षीरविवेकी राजा, या प्रतिमा-प्रेमापोटी सीतेला विजनवासांत धाडणार्‍या रामाचं प्रेम कुठल्या चौकटींत बसवायचं ? मधुराभक्ती..राधेची, माई माई.. तुम बिन कैसे कैसे जिऊम री म्हणणार्‍या मीरेची... हे प्रेमचं.. अतिथीप्रेम.. चिलियाबाळाची आहुती अतिथीचा जठराग्नी विझवण्यासाठी.. प्रेमच ! सत्ताप्राप्तीसाठी कैकयीचं, भरताचं अगदी स्वाभाविक पण फारसं कल्याणकारी जरी नसलं..पुत्रप्रेम...तरी प्रेमचं.. सौंदर्याचं प्रेम(?) स्वत:च्या भोगलोलूपते-लालसेपोटी... रावणाचं.. भिक्षुकाच्या वेषांत आलेल्या देवाधिदेव इंद्राला, शिधा द्यायला आलेली न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा, ही नार करी बेजार, थांबवा दंगा कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात.. अशा अवस्थेंतया माझ्या स्वरचित लावणींतल्या लावण्यवती सारखे निसर्गालंकार लेवून आलेली यजमानीण पाहून, भरती आलेलं शारीर जरी असलं तरी शेवटी प्रेमचं ना ? *****

No comments:

Post a Comment